ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ ६ मे – संपादकीय – सौ. गौरी गाडेकर -ई – अभिव्यक्ती (मराठी)
सुमती पायगावकर
सुमती पायगावकर (7 जून 1910 – 6 मे 1995) या बालसाहित्य लेखिका होत्या. त्यांचे शालेय शिक्षण प्रथम दिल्ली व नंतर इंदूर येथे उर्दू व हिंदी माध्यमातून झाले. महाविद्यालयीन शिक्षण मुंबईला एल्फिन्स्टन महाविद्यालयात झाले. बी. ए., बी.टी.होऊन त्या शिक्षिका झाल्या. नंतर शिक्षण-निरीक्षक पदावर कार्यरत असताना त्या सेवानिवृत्त झाल्या.
शालेय काळात त्यांनी लेखन सुरू केले. त्यांची छोटी कादंबरी ‘सरोज’ प्रकाशित झाली. नंतर त्या बालसाहित्याकडे वळल्या.
इंग्रजीतील बालसाहित्याने त्यांना आकर्षित केले. इंग्रजीतील पारंपारिक कथांचा त्यांनी सुटसुटीत, सुबोध शैलीत अनुवाद केला.
‘हॅन्स अँडरसनच्या परीकथा’, ‘ अरेबियन नाईट्स’, ‘ देशोदेशींच्या कथा’, त्याचप्रमाणे ‘स्वप्नरेखा’भाग 1, ‘चाफ्याची फुले’, ‘पोपटदादाचे लग्न’, ‘यमाशी पैज’, ‘छोटा देवदूत’ इत्यादी त्यांची पुस्तके उल्लेखनीय आहेत.
मुलांसाठी लिहिणाऱ्या मोजक्या लेखकांमध्ये सुमती पायगावकर यांचे स्थान आहे.
☆☆☆☆☆
सौ. गौरी गाडेकर
ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : साहित्य साधना, कऱ्हाड शताब्दी दैनंदिनी, विवेक महाराष्ट्र नायक, लेखक :वि. ग. जोशी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ ५ मे -संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर– ई – अभिव्यक्ती (मराठी)
बालकवी
मराठी वाङ्मयात ‘निसर्ग कवी’ म्हणून ज्यांचं नाव आजही कौतुकाने, आदराने, सन्मानाने घेतले जाते, ते बालकवी म्हजेच त्र्यंबक बापूजी ठोंबरे. त्यांचा जन्म १३ ऑगस्ट १८९० मध्ये झाला. ते अल्पायुषी होते. अवघं २८ वर्षाचं आयुष्य त्यांना लाभलं. ५ मे १९१८ मधे त्यांचं निधन झालं. लहानपणापासून ते कविता करायचे. रेव्ह. ना. वा. टिळक यांच्या सहवासात त्यांचा काही काळ गेला. त्यांची प्रतिभा ओळखून, टिळकांनी त्यांना आपल्या घरी नेले. ते आणि त्यांची पत्नी लक्ष्मीबाई यांनी त्यांच्यावर पुत्रवत प्रेम केले.
लक्ष्मीबाईंनी आपल्या ‘स्मृतिचित्रे’ या आत्मचरित्रात बालकवींच्या काही आठवणी दिल्या आहेत.
१९०७ मध्ये जळगाव येथे पहिले महाराष्ट्र कवीसंमेलन झाले. त्याचे अध्यक्ष होते, डॉ. कान्होबा रणछोडदास कीर्तिकर. या संमेलनात ठोंबरे यांनी कविता वाचल्यावर कीर्तिकरांनी त्यांना ‘बालकवी’ ही पदवी दिली.
बालकवींनी निसर्गातील आनेक घटकांवर कविता केल्या. त्यामध्ये निसर्गातील घटकांचे मानवीकरण केलेले दिसते. उदा. ‘फुलराणी’, औदुंबर’ वास्तव वर्णनापेक्षा कल्पनेचा साज चढवून केलेलले वर्णन त्यांच्या कवितेत दिसते. त्यांच्या अनेक कवितेतून उदासीनता व्यक्त झालेली दिसते.
बालकवींच्या कवितेला आज 100 वर्षे होऊन गेली, तरी त्यांची कविता ताजी वाटते. नव्याने कविता लिहू लागलेली कविमंडळी आजही त्यांचं अनुकरण करताना दिसतात. ‘आनंदी आनंद गडे’, फुलराणी, औदुंबर, श्रवणमास, निर्झरास इ. त्यांच्या अनेक कविता प्रसिद्ध आहेत.
बालकवींच्या निवडक कविता असलेली पुस्तके, वी.वा.शिरवाडकर, ना. धों महानोर, अनुराधा पोतदार, नंदा आपटे इ. नी संपादित केली आहेत.
बालकवींवर कृ. बा. मराठे, विद्याधर भागवत, दमयंती पंढरपांडे इ. नी लिहीले आहे. प्दमावती जावळे यांनी बालकवी आणि हिन्दी कवी सुमित्रानंदन पंत यांचा तौलनिक अभ्यास करून पुस्तक लिहिले आहे. आज त्यांचा स्मृतीदिन. त्या निमित्त त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
☆ ☆ ☆ ☆ ☆
श्रीमती उज्ज्वला केळकर
ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : साहित्य साधना – कराड शताब्दी दैनंदिनी, गूगल विकिपीडिया
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ ४ मे -संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित – ई – अभिव्यक्ती (मराठी)
अनंत आत्माराम काणेकर
अनंत काणेकर हे मराठीतील नामवंत लेखक,कवी व पत्रकार.आपले बी.ए.एल् एल्.बी.पर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांनी वकिली सुरू केली.पण चांदरात हा पहिला कवितासंग्रह व पिकली पाने हा पहिला लघुनिबंध संग्रह प्रकाशित झाल्यानंतर त्यांनी वकिली थांबवली व पूर्ण वेळ साहित्याला वाहून घ्यायचे ठरवले.नंतर काही काळ त्यांनी मुंबई येथे खालसा महाविद्यालयात व सिद्धार्थ महाविद्यालयात अध्यापनाचे कार्य केले व तेथूनच निवृत्त झाले.
नाट्यमन्वंतर या संस्थेचे ते संस्थापकअध्यक्ष होते.
अनंत काणेकर यांचे प्रकाशित साहित्य:
काव्य : चांदरात
लघुनिबंध: अनंतिका,उघड्या खिडक्या,तुटलेले तारे,पाण्यावरच्या रेषा,पिकली पाने,शिंपले आणि मोती.
ललित लेख :आचार्य अत्रे विविध दर्शन,उजेडाची झाडे,घरकुल,निवडक गणूकाका,विजेची वेल इ.
प्रवास वर्णन: आमची माती आमचे आकाश,खडक कोरतात आकाश,धुक्यातून लाल ता-याकडे,देशोदेशींच्या नवलकथा,निळे डोंगर,तांबडी माती,रक्ताची फुले.
कथा : रुपेरी वाळू,मोरपिसे,दिव्यावरती अंधार,जागत्या छाया,काळी मेहुणी व इतर कथा,अनंत काणेकर निवडक कथा
नाटक : धूर व इतर एकांकिका,सांबर, निशिकांताची नवरी,पतंगाची दोरी.
याशिवाय त्यांनी माणूस आणि आदमी या चित्रपटांसाठी संवाद लेखन केले होते.
1957 साली औरंगाबाद येथे भरलेल्या अ.भा.मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. 1965साली त्यांना पद्मश्री किताबाने गौरविले होते.तसेच त्यांना सोविएट लॅन्ड पुरस्कारही प्रदान करण्यात आला होता.
आजच्या दिवशी 1980 साली त्यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या कार्यकर्तृत्वास सलाम !
☆☆☆☆☆
श्री सुहास रघुनाथ पंडित
ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : विकिपीडिया
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ ३ मे – संपादकीय – सौ. गौरी गाडेकर -ई – अभिव्यक्ती (मराठी)
राम शेवाळकर
राम बाळकृष्ण शेवाळकर (2 मार्च 1931 – 3 मे 2009) हे लेखक,वक्ते,समीक्षक होते.
त्यांनी मराठी व संस्कृत साहित्यात एम. ए. केले. त्यांनी काही वर्षे कॉलेजात संस्कृत शिकवले.25 वर्षांपेक्षा जास्त काळ ते वणी येथील कॉलेजचे प्राचार्य होते.
शेवाळकरांनी ‘असोशी’, ‘निवडक मराठी आत्मकथा’, ‘अंगारा’ वगैरे 59 पुस्तके, समीक्षणे लिहिली.
रामायण, महाभारत या विषयांसाठी त्यांना शिष्यवृत्ती मिळाली. ज्ञानेश्वर, तुकाराम, रामदास इत्यादी संत, तसेच वि. दा. सावरकर, विनोबा भावे यांच्यावरही त्यांनी अभ्यासपूर्ण लेखन केलं आहे.
1980 मध्ये हृदयनाथ मंगेशकरांनी ‘अमृताचा घनू ‘ हा ज्ञानेश्वरांच्या रचनांवरील सांगितीक कार्यक्रम करायला सुरुवात केली. त्यात शेवाळकर ज्ञानेश्वरांच्या रचनांवर विद्वत्तापूर्ण विवेचन करत असत. रसिकांनी त्यांना चांगलीच दाद दिली.
शेवाळकर महाराष्ट्र राज्य फिल्म सेन्सर बोर्डचे 11 वर्षे सदस्य होते.
1994मध्ये पणजीला भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
नागपूर विद्यापीठाने त्यांना मानद डी. लिट. प्रदान केले.
त्यांना दीनानाथ मंगेशकर, कुसुमाग्रज पुरस्कार, नाग भूषण पुरस्कार, विदर्भ साहित्य संघाचा जीवनव्रती पुरस्कार इत्यादी पुरस्कार मिळाले.
☆☆☆☆☆
वि. द. घाटे
विठ्ठल दत्तात्रेय घाटे (18 जानेवारी 1895 – 3 मे 1978) हे शिक्षणतज्ज्ञ, लेखक व कवी होते. कवी दत्त यांचे ते ज्येष्ठ पुत्र.
वि. द. घाटे यांनी इतिहासलेखन, काव्य, नाट्यलेखन, कवितालेखन, आत्मचरित्र आदी अनेक ललित लेखनप्रकार हाताळले.
त्यांची ‘दिवस असे होते’ (आत्मचरित्र), ‘दत्तांची कविता’, ‘काही म्हातारे व एक म्हातारी ‘(व्यक्तिचित्रण), ‘नाट्यरूप महाराष्ट्र'(इतिहास), ‘नाना देशातील नाना लोक’, ‘पांढरे केस हिरवी मने’, ‘यशवंतराव होळकर’ इत्यादी पुस्तके प्रसिद्ध आहेत.
आचार्य अत्रे यांच्याबरोबर त्यांनी संपादित केलेली ‘नवयुग वाचनमाला’ महाराष्ट्रात शालेय पाठ्यपुस्तके म्हणून नावाजली गेली.
1953 साली अहमदाबादला झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
अनंत देशमुख यांनी वि. द. घाटे यांचे चरित्र लिहिले.
☆☆☆☆☆
हमीद दलवाई
हमीद उमर दलवाई (29 सप्टेंबर 1932 – 3 मे 1977) हे समाजसुधारक व मराठी साहित्यिक होते.
महात्मा फुले यांच्या प्रभावामुळे त्यांनी मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना केली.
तोंडी तलाक, बहुपत्नीत्व इत्यादीमुळे मुस्लिम स्त्रियांची होणारी घुसमट सरकारसमोर आणावी म्हणून 1966मध्ये 7मुस्लिम महिलांना घेऊन त्यांनी मुंबईतील कौन्सिल हॉलवर मोर्चा काढला.
महंमद पैगंबरांचे जीवन, कुराण – हदीस याबद्दल मोकळी, सविस्तर चर्चा होऊन त्या समाजातील साचलेपणा दूर व्हावा, आचारविचारात उदारता यावी यासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले. धर्मनिरपेक्षता व लोकशाही ही दोन मूल्ये त्यांच्या विचारांच्या केंद्रस्थानी होती.
परंपरावादाला नकार आणि ऐहिकतेचा स्वीकार यांचा पुरस्कार करणाऱ्या या मेकर्स ऑफ मॉडर्न इंडियात त्यांना मानाचे स्थान आहे.
‘इस्लामचे भारतीय चित्र’, ‘ राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान’, त्याचप्रमाणे ‘इंधन'(कादंबरी), ‘लाट'(कथासंग्रह) इत्यादी पुस्तके त्यांनी लिहिली.
प्रा. शमसुद्दीन तांबोळी यांनी ‘हमीद दलवाई : क्रांतिकारी विचारवंत ‘हे त्यांचे चरित्र लिहिले आहे.
‘हमीद : द अनसंग ह्युमॅनिस्ट’ हा लघुपट हमीद दलवाई यांच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकतो.
अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशनने जानेवारी 2017मध्ये त्यांना मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कार प्रदान केला.
☆☆☆☆☆
जगदीश खेबुडकर
जगदीश खेबुडकर( 10 मे 1932 – 3 मे 2011)हे मराठी गीतकार व साहित्यिक होते.
खेबुडकर हे पेशाने शिक्षक होते.
वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांनी ‘मानवते, तू विधवा झालीस ‘ हे पहिले दीर्घकाव्य लिहिले. महात्मा गांधींच्या खुनानंतर खेबुडकरांचे घर जाळले गेले. त्या घराच्या राखेचा ढिगारा पाहून त्यांना हे काव्य सुचले.
लोकसंगीत, पोवाडा, अभंग, ओवी असे विविध काव्यप्रकार त्यांनी हाताळले.
संत एकनाथ, भा. रा. तांबे, कुसुमाग्रज, बा. भ. बोरकर, बा.सी. मर्ढेकर यांचा खेबूडकरांवर प्रभाव होता. साधेसोपे परंतु अर्थगर्भ व नादमयी शब्द हे त्यांच्या गीतांचे वैशिष्ट्य होते.
आपल्या कारकिर्दीत त्यांनी 3500 कविता आणि 2500हून अधिक गीते लिहिली.त्यांनी सुमारे 325 चित्रपटांसाठी गीते लिहिली.25 पटकथा -संवाद,50 लघुकथा,5 नाटके,4 दूरदर्शन मालिका,4 टेलिफिल्म्स, 5 मालिका गीते इत्यादी साहित्यसंपदा त्यांनी निर्माण केली.
त्यांची सांगीतिक कारकीर्द पाच दशकांएवढी मोठी होती. ग. दि. माडगूळकरांनंतर इतका मोठा गीतकार झाला नाही.त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी 36 दिग्दर्शक,44संगीतकार,34 गायकांसमवेत काम केले.
1974 साली त्यांनी स्थापना केलेल्या ‘स्वरमंडळ’ या नाट्यसंस्थेतर्फे ‘रामदर्शन’ हा रामायणावरील वेगळा प्रयोग सादर केला. त्यानंतर त्यांनी 1980मध्ये ‘रंगतरंग’ व 1982मध्ये ‘रसिक कला केंद्रा’ची स्थापना केली. ‘रंगतरंग’तर्फे सादर केलेल्या ‘गावरान मेवा’चे 2000पेक्षा जास्त प्रयोग झाले.1986 मध्ये त्यांनी नाट्यकलेच्या सेवेसाठी ‘नाट्यछंद’ व ‘अभंग थिएटर्स’ची स्थापना केली.
खेबुडकरांना 60हून अधिक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. त्यांत 11वेळा राज्य शासनातर्फे मिळालेला पुरस्कार, गदिमा पुरस्कार, फाय फाउंडेशन पुरस्कार,3 जीवनगौरव पुरस्कार इत्यादीचा समावेश आहे.
राम शेवाळकर, वि. द. घाटे, हमीद दलवाई, जगदीश खेबुडकर यांच्या स्मृतिदिनी त्यांना आदरांजली.
☆☆☆☆☆
सौ. गौरी गाडेकर
ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : साहित्य साधना, कऱ्हाड शताब्दी दैनंदिनी, विकीपीडिया.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ २ मे -संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर– ई – अभिव्यक्ती (मराठी)
दि. के. बेडेकर
दि. के. बेडेकर मराठीत लेखक आणि प्रामुख्याने समीक्षक म्हणून प्रसिद्ध असलेले दि. के. म्हणजे दिनकर केशव बेडेकर यांचा जन्म ८ जून १९१०ला झाला.
दि. के. बेडेकरयांची ग्रंथसंपदा –
१. अणुयुगातील मनावधर्म
२. अस्तित्ववादाची ओळख
३. धर्मचिंतन
४. धर्म, राष्ट्र आणि समाजवाद
५. धर्मश्रद्धा एक पुनर्विचार
आज त्यांचा स्मृतीदिन. २ मे १९७३ला त्यांचे निधन झाले.
☆ ☆ ☆ ☆ ☆
रघुनाथ पंडीत
रघुनाथ पंडीत यांचा जन्म कधी झाला, याबद्दल मतभेद आहेत. जुन्या काळी ज्या संत, पंत आणि तंत या महत्वाच्या परंपरा होऊन गेल्या, असे मानले जाते, त्यापाकी पंत म्हणजे पंडीत परंपरेतील हे कवी. त्यांचे संस्कृतप्रमाणेच फारसी भाषेवरही प्रभुत्व होते.
रघुनाथ पंडीत यांची काव्यसंपदा –
१. रामदास वर्णन
२. गजेंद्र मोक्ष
३. दमयंती स्वयंवर
यापैकी गजेंद्र मोक्ष आणि दमयंती स्वयंवर ही आख्यान काव्ये खूप गाजली.
रघुनाथ पंडीत शिवाजीच्या काळातले असावेत, असे अनुमान अ. का. प्रियोळकर आणि द.सी. पंगू यांचे अनुमान आहे.
☆ ☆ ☆ ☆ ☆
बाळकृष्ण अनंत भिडे
बाळकृष्ण अनंत भिडे यांचा जन्म रायगड जिल्हयाती किडिम इथे झाला. ते इतिहासकार, कवी आणि समीक्षक होते. त्यांनी बरेचसे गद्य लेखन ‘बी’ या टोपण नावाने केले आहे. ‘बी’ म्हणजे बाळकृष्ण. ते आधी शिक्षक होते. नंतर मुख्याध्यापक झाले.
पदवी मिळवण्यापूर्वीच त्यांनी ‘प्रभाकर’ नावाचे मासिक चालवले होते. १९०८ ते १९११ या काळात ‘ काव्येतिहास’ व ‘खेळगडी या मासिकांचे ते संपादक होते. १९०४ ते १९०९ या काळात त्यांनी ‘काव्यसंग्रह’ मासिकाचे संपादन केले. १९२४ साली त्यांच्या अध्यक्षतेखाली मराठी ग्रंथसंग्रहालयाचा वार्षिक उत्सव झाला. आज आपण या उत्सवाला साहित्य संमेलन म्हणतो.
भिडे यांचे मराठी, इंग्रजी व संस्कृत भाषेवर प्रभुत्व होते. ते परखड टीकाकार होते. त्यांच्या चिकित्सक, मार्मिक, व्यासंगपूर्ण टीकात्मक लेखनामुळे मराठी समीक्षा प्रभावी, प्रौढ आणि डौलदार झाली. त्यांचे लेखन, मासिक ‘मनोरंजन’, ‘विविधज्ञानविस्तार’, ’काव्यरत्नागिरी’, ‘रत्नाकर’ इ. दर्जेदार नियतकालिकातून प्रसिद्ध होई. त्यांनी१०८ कविता लिहिल्या. त्यात एकीकडे पंडिती वळण दिसते, तर दुसरीकडे आधुनिक इंग्रजी काव्याची छाप दिसते. मुक्तेश्वर, मोरोपंत, वामन पंडीत, या पंडीत कवींच्या काव्यावर त्यांनी विस्तृत, विवेचनात्मक निबंध लिहिले. साहित्य गुणांना प्राधान्य देऊन त्यांनी ज्ञानेश्वरीची सार्थ व सटीक आवृत्ती काढली आहे. त्यांनी एका लेखात प्राचीन व अर्वाचीन कवींची तूलना केली आहे.
बाळकृष्ण अनंत भिडे यांची ग्रंथसंपदा
१.काव्य आणि काव्योदय – ‘किरण, ‘सुधारक, ’आधुनिक कविपंचक, ‘विरहातरंग’ इ. पुस्तकांवरील परीक्षणे
२. चार वीर मुत्सद्दी – ऑलिव्हर क्रॉमवेल, जॉर्ज वॉशिंग्टन, नेपोलियन बोनापार्ट , शिवाजी यांची चरित्रे
३. प्रभुसंपादन – (कविता), ४. फुलांचे झेले ( कविता) ५. मराठी कवींचे बोल इ. अनेक पुस्तके त्यांनी लिहीली.
त्यांचे निधन २ मे १९२९ ला झाले.
☆ ☆ ☆ ☆ ☆
शांताराम आठवले.
खेड्यामधले घर कौलारू, जनी नामयाची रंगली कीर्तनी, यमुनाकाठी ताजमहाल, या कातरवेळी पाहिजेस तू जवळी इ. लोकप्रिय गीते लिहिणारे गीतकार शांताराम आठवले यांचा जन्म पुणे येथे २१ जानेवारी १९१० मध्ये झाला.
शालेय जीवनात त्यांनी अनेक नाटके पाहिली. नाट्यसृष्टीशी त्यांचा लहानपणीच जवळून संबंध आला.
ना. ह. आपटे यांच्या ‘मधुकर’ मासिकाचे, त्याचप्रमाणे श्रीनिवास मुद्रणालयाचे सहाय्यक म्हणून त्यांनी काम पाहीले. ना. ह. आपटे यांच्या शिफारसीमूळे त्यांना ‘अमृतमंथन’ या बोलपटात गीत लेखनाचे काम मिळाले. नंतर प्रभात’मध्ये सहाय्य्क म्हणून त्यांनी नोकरी केली. पुढच्या काळात त्यांनी अनेक चित्रपटांसाठी गीते लिहिली व ती लोकप्रियही झाली.
आज दि. के. बेडेकर , रघुनाथ पंडीत, बाळकृष्ण अनंत भिडे, आणि शांताराम आठवले यांचा स्मृतिदिन आहे. त्या निमित्त या चौघांना भावपूर्ण श्रद्धांजली.
☆ ☆ ☆ ☆ ☆
श्रीमती उज्ज्वला केळकर
ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : साहित्य साधना – कराड शताब्दी दैनंदिनी, गूगल विकिपीडिया
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
आज एक मे. महाराष्ट्र राज्य स्थापनेचा दिवस. महाराष्ट्र दिन.
आज राजभाषा दिन.
आज आंतरराष्ट्रीय कामगार दिन.
आज जागतिक हास्य दिन.
💐 ई-अभिव्यक्तीचे सर्व साहित्यिकांना आणि रसिक वाचकांना या बहुरंगी दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा💐
ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ १ मे -संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित – ई – अभिव्यक्ती (मराठी)
नारायण गणेश तथा नानासाहेब गोरे.
नानासाहेब गोरे यांचा जन्म कोकणातील.त्यांनी पुण्यात शिक्षण पूर्ण केले.ते स्वातंत्र्य संग्रामात सक्रीय होतः.1942 च्या लढ्यातील त्यांच्या सहभागामुळे त्यांना तुरूंगवास भोगावा लागला होता.
स्वातंत्र्योत्तर काळातही ते राजकारण व समाजकारण यात सक्रीय होते.त्यांनी सुरूवातीपासूनच समाजवादी विचारसरणी स्विकारली होती.त्यांनी पुण्याचे महापौर पद भूषविले होते.तसेच लोकसभेत समाजवादी पक्षातर्फे लोकप्रतिनिधित्वही केले होते.शिवाय भारताचे इंग्लंडमधील उच्चायुक्त म्हणूनही काम केले होते.
हे सर्व करत असताना त्यांनी लेखनकार्यही चालू ठेवले होते.त्यांनी राजकीय,सामाजिक,,कथा,प्रवासवर्णन,निबंध असे विविध प्रकारचे लेखन केले होते. 1981 ते 1984 या काळात त्यांनी साप्ताहिक साधना चे संपादक पद भूषविले होते.
नानासाहेबांची साहित्य संपदा :
करवंदे..पत्रलेखन
सीतेचे पोहे
डाली
गुलबक्षी
शंख आणि शिंपले
चिनारच्या छायेत
काही पाने,काही फुले इ.
अनुवाद:
जवाहरलाल नेहरू आत्मकथा
सर्वपल्ली राधाकृष्णन् कृत गांधीजींचे विविधदर्शन
मेघदूत
राजकीय लेखन :
कारागृहाच्या भिंती—तुरुंगातील दैनंदिनी
समाजवादच का
भारतीय पूर्व सरहद्द
तापू लागलेलं हिम
साम्राज्यनाही व विश्व कुटुंबवाद.
01 मे 1993 ला वयाच्या 86व्या वर्षी त्यांचे दुःखद निधन झाले.
त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!
☆☆☆☆☆
श्री सुहास रघुनाथ पंडित
ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : विकिपीडिया
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ ३० एप्रिल -संपादकीय – सौ. गौरी गाडेकर -ई – अभिव्यक्ती (मराठी)
मोरो केशव दामले
मोरो केशव दामले (7 नोव्हेंबर 1868 – 30 एप्रिल 1913) हे मराठी व्याकरणकार व निबंधकार होते.
कवी केशवसुत हे त्यांचे थोरले भाऊ व पत्रकार सीताराम केशव दामले हे त्यांचे धाकटे भाऊ.
इतिहास व तत्त्वज्ञान घेऊन ते मुंबई विश्वविद्यालयातून एम. ए. झाले. त्यासाठी त्यांना डेक्कन महाविद्यालयाची दक्षिणा फेलोशिप मिळाली होती.
त्यांनी उज्जैनच्या माधव कॉलेजात लॉजिक व फिलॉसॉफी या विषयांचे अध्यापन केले. नंतर नागपूर येथील सिटी स्कूल वरील सरकारी पद स्वीकारले.
मोरो नामवंत व्याकरणकार होते.त्यांनी असंख्य उदाहरणे, असंख्य शब्द गटवारीने उपलब्ध करून दिले. शिवाय व्याकरणविषयक प्रश्नांची इतर अंगेही त्यांनी समोर आणली. विविध उपपत्ती संकलित करून त्यांनी त्यांची चिकित्साही केली. व्याकरणावर पीएच. डी. करणाऱ्यांसाठी त्यांचा ‘शास्त्रीय मराठी व्याकरण’ हा आजही मोलाचा ग्रंथ आहे.
1904मध्ये भरलेल्या शुद्धलेखन परिषदेत त्यांनी भाग घेतला होता. त्यासंबंधीची सडेतोड मते त्यांनी ‘शुद्धलेखन सुधारणा अथवा सरकारी बंडावा ‘ या पुस्तकाद्वारे प्रसिद्ध केली. याशिवाय त्यांनी ‘विचारभ्रमण आणि आधुनिक असंतोष’ हे एडमंड बर्कच्या ‘प्रेझेंट डिसकन्टेन्ट’चं मराठी भाषांतर केलं.’न्यायशास्त्र निगमन’ व ‘न्यायशास्त्र निगमन -दुसरे पुस्तक ही त्यांची तर्कशास्त्रावरील पुस्तके.
☆☆☆☆☆
वसंत पोतदार
वसंत गोविंद पोतदार (6 सप्टेंबर 1937 – 30 एप्रिल 2003) हे लेखक, पत्रकार व अभिनेते होते.
त्यांनी हिंदी, मराठी व बंगाली भाषेत पत्रकारिता केली. तर त्यांचे एकपात्री प्रयोग मराठी, हिंदी, बंगाली, उर्दू व इंग्रजीत होते.
बी. ए. झाल्यावर त्यांनी अध्यापकाची नोकरी धरली.
नंतर पु. लं.च्या मार्गदर्शनावरून त्यांनी ‘वंदे मातरम’ या भारतीय क्रांतीच्या महाभारताचे 5000हूनही जास्त प्रयोग केले. याशिवाय त्यांनी ‘शेर शिवराज’, ‘आक्रंदन एका आत्म्याचे ‘, ‘महात्मा फुले’, ‘योद्धा संन्यासी’ हेही एकपात्री प्रयोग केले.
पोतदारांनी स्वामी विवेकानंदांवरील ‘योद्धा संन्यासी’, पु. लं. वरील ‘एका पुरुषोत्तमाची गाथा’, गाडगे महाराजांवरील ‘ तोची साधू ओळखावा’, ‘अग्निपुत्र’, ‘नाळ’, ‘अनिल विश्वास ते राहुल देव बर्मन’, ‘कुमार गंधर्व’ इत्यादी अनेक पुस्तके लिहिली.
‘वसंत पोतदार -एक असाधारण गद्य शिल्पी’ हे पोतदारांवर विजय बहादुर सिंह यांनी लिहिलेले हिंदी पुस्तकही प्रसिद्ध आहे.
पोतदारांच्या ‘नाळ’ला मसापचा पुरस्कार मिळाला. त्यांच्या ‘योद्धा संन्यासी’ला मुंबई ग्रंथ संग्रहालयाचा पुरस्कार मिळाला. तर ‘कुमार’ला महाराष्ट्र राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला.
मोरो केशव दामले व वसंत पोतदार यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना सादर अभिवादन.🙏
☆☆☆☆☆
सौ. गौरी गाडेकर
ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : साहित्य साधना, कऱ्हाड शताब्दी दैनंदिनी, विकीपीडिया.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ २९ एप्रिल -संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर– ई – अभिव्यक्ती (मराठी)
श्री कृष्ण केशव क्षीरसागर
श्री. के. क्षीरसागर यांचा जन्म ६ नोहेंबर १९०१ मधे झाला. ते लेखक, विचारवंत, समीक्षक आणि टीकाकार म्हणून प्रसिद्ध होते. ज्ञानकोशकार केतकर यांचे ते समविचारी होते.
शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी प्रथम शिक्षक म्हणून आणि नंतर प्राध्यापक म्हणून नोकरी केली. पुण्याच्या एम. इ. एस. किंवा सध्याच्या गरवारे कॉलेजमध्ये ते मराठी विभाग प्रमुख होते.
श्री. के. क्षीरसागर यांचे प्रकाशित साहित्य
१. आधुनिक राष्ट्रवादी रविंद्रनाथ ठाकूर . २. उमरखय्यामची फिर्याद, ३. टीका विवेक, ४. वादे वादे ५. व्यक्ति आणि वाङ्मय, ६. मराठी भाषा वाढ आणि बिघाड, ७. बायकांची सभा ( प्रहसन), ८. श्रीधर व्यंकटेश केवतकर, ९. समाज विकास,
इ. त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत.
१९५९ साली मिरजेत भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
महाराष्ट्र सरकार दरवर्षी वाङ्मयीन समीक्षेवरील एका ग्रंथाला श्री. के. क्षीरसागर यांच्या नावाने पुरस्कार देते.
या विचारवंत थोर समीक्षकाचा आज स्मृतीदिन (२९ एप्रील १९८०) . त्या निमित्ताने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
☆ ☆ ☆ ☆ ☆
श्रीमती उज्ज्वला केळकर
ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : साहित्य साधना – कराड शताब्दी दैनंदिनी, गूगल विकिपीडिया
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ २७ एप्रिल -संपादकीय – सौ. गौरी गाडेकर -ई – अभिव्यक्ती (मराठी)
वि. वा. पत्की
विश्वनाथ वामन पत्की(12 नोव्हेंबर 1912 – 27 एप्रिल 1992) हे कादंबरीकार, कथालेखक, समीक्षक होते.
मुंबईत एम ए केल्यावर त्यांनी लंडन येथून पत्रकारितेतील पदविका घेतली.
ते सुरुवातीला शिक्षक होते. मग महाराष्ट्र शासनाचे प्रसिद्धी अधिकारी व नंतर जनसंपर्क अधिकारी झाले. ते जनसंपर्क, वृत्तपत्रविद्या, जाहिरातकला या विषयांचे अध्यापनही करत असत.
पत्कींनी विविध प्रकारचे लेखन केले. ओघवते निवेदन, समर्पक शब्दकळा, ललित लेखनाच्या तंत्राची चांगली जाणकारी ही ना. सी. फडकेंची लेखनवैशिष्ट्ये पत्कींच्या लेखनातही जाणवतात.
‘आंधळा न्याय’, ‘साक्षात्कार’, ‘लक्ष्मणरेषा’, ‘शोभेची बाहुली’ या कादंबऱ्या, ‘आराधना’, ‘ तुझं सुख ते माझं सुख’ हे कथासंग्रह, ‘पश्चिमवारे’ हे प्रवासवर्णन, ‘खरं सांगू तुम्हाला?’ व ‘वेळी – अवेळी’ हे दोन लघुनिबंधसंग्रह वगैरे पुस्तके त्यांनी लिहिली. शिवाय ‘युगप्रवर्तक फडके’ हा समीक्षात्मक ग्रंथ फडकेंनी शि. न. केळकर यांच्या सहकार्याने लिहिला.
त्यांनी चरित्रलेखनही केले. ते उत्तम अनुवादक होते. भारताचे माजी उपराष्ट्रपती न्यायमूर्ती एम. सी. छगला यांच्या ‘रोझेस इन डिसेंबर’चा ‘शिशिरातील गुलाब’, भारताचे माजी अर्थमंत्री चिंतामणराव देशमुख यांच्या ‘द कोर्स ऑफ माय लाईफ’चा ‘माझा जीवनप्रवाह’ आणि भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या आत्मचरित्राचा ‘स्वप्नसिद्धीची दहा वर्षे’… हे सर्व अनुवाद वाचकांच्या विशेष पसंतीस उतरले.
‘दीपगृह’ हे वि. स. खांडेकरांच्या खासगी पत्रांचे संपादनही त्यांनी केले.
वि. वा. पत्की यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना सादर अभिवादन.
☆☆☆☆☆
सौ. गौरी गाडेकर
ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : साहित्य साधना, कऱ्हाड शताब्दी दैनंदिनी, विकीपीडिया.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ २५ एप्रिल -संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर– ई – अभिव्यक्ती (मराठी)
चिंतामणी त्र्यंबक खानोलकर
गेले द्यायचे राहुनी, नाही कशी म्हणू तुला, ये रे घना ये रे घना इ. लोकप्रिय गीतांचे गीतकार आरती प्रभू म्हणजेच चिंतामणी त्र्यंबक खानोलकर यांचा जन्म ८ मार्च १९३० मध्ये तोंडोली – वेंगुर्ले इथे झाला. त्यांचे शिक्षण सावंतवाडी आणि मुंबई इथे झाले. त्यांनी गद्य लेखन चिं. त्र्यं. खानोलकर या नावाने केले आणि कविता-गीते आरती प्रभू या नावाने लिहिली.
शालेय वार्षिकापासून त्यांच्या लेखनाला सुरुवात झाली. मार्च ५१ मध्ये त्यांची ‘जाणीव’ ही कथा सत्यकथेत प्रसिद्ध झाली. ‘वैनतेय’ साप्ताहिकात त्यांची ‘कुढत का राह्यचं’ ही कविता १९५३ ला प्रकाशित झाली आणि ते कवी म्हणून प्रकाशात आले. ५४ मध्ये त्यांची सत्यकथेत ‘शून्य शृंगारिते’ ही कविता प्रकाशित झाली. १ जानेवारी ५७ ला आकाशवाणी पुणे केंद्राने आयोजित केलेल्या कविसंमेलनात त्यांनी प्रथम कविता वाचली. ४ मे ५८ रोजी मालवण येथे झालेल्या साहित्य संमेलनात त्यांचा ‘पल्लवी’ हा कविता संग्रह प्रकाशित झाला.
२६ जानेवारी ५४ ला त्यांच्या ‘येईन एक दिवस’ या नाटकाचा प्रयोग झाला. ५९ मध्ये आकाशवाणी मुंबई केंद्रावर स्टाफ आर्टिस्ट म्हणून त्यांनी काही दिवस नोकरी केली.
चिं. त्र्यं. खानोलकर यांच्या कविता, कथा, कादंबर्या् यात दु:खाची अनेक रुपे प्रगट झाली आहेत. नशीब आणि माणूस यांच्यात काय संबंध आहे, पाप-पुण्य या संकल्पना या गोष्टी त्यांच्या साहित्यातून दिसतात. दु:खाकडे तटस्थतेने पाहून दु:ख स्वीकारण्याची अपरिहार्यता त्यांच्या साहित्यात दिसते. ‘एक शून्य बाजीराव ‘ हे त्यांचे अतिशय गाजलेले नाटक
चिं. त्र्यं. खानोलकर यांचे निवडक प्रकाशित साहित्य-
कादंबर्या – १. अजगर, २. कोंडूरा, ३. गणुराया आणि चानी (चानीवर पुढे चित्रपटही निघाला होता. ) ४. पाषाण पालवी
नाटके – १. अजब न्याय वर्तुळाचा, २. आभोगी, ३. अवध्य ४. कालाय तस्मै नाम: , ५. हयवदन
त्यांची अनेक अप्रकाशित नाटकेही आहेत.
कविता – १. जोगवा २. नक्षत्रांचे देणे
खानोलकरांनी चित्रपटासाठी गीतेही लिहिली.
चिं. त्र्यं. खानोलकर यांना मिळालेले पुरस्कार
नक्षत्रांचे देणे या कविता संग्रहाला १९७८ साली साहित्य अॅंकॅडमीचा पुरस्कार मिळाला.
त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ दिले जाणारे पुरस्कार खालील लेखक –कलावंतांना मिळालेले आहेत. विष्णू सूर्या वाघ, सतीश आळेकर, शफाअत खान, महेश एलकुंचवार, सई परांजपे, महेश केळुस्कर, सौमित्र, प्रेमानंद गज्वी॰
या अल्पायुषी प्रतिभावंताचा आज स्मृतीदिन. त्या निमित्त त्यांच्या कार्याला शतश: प्रणाम
☆ ☆ ☆ ☆ ☆
श्रीमती उज्ज्वला केळकर
ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : साहित्य साधना – कराड शताब्दी दैनंदिनी, गूगल विकिपीडिया
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈