ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ ३१ मार्च -संपादकीय – सौ. गौरी गाडेकर -ई – अभिव्यक्ती (मराठी)
दत्तात्रय बळवंत पारसनीस
रावबहादूर दत्तात्रय बळवंत पारसनीस (27नोव्हेंबर 1870 -31मार्च 1926) हे इतिहाससंशोधक वं ऐतिहासिक साधनांचे संग्राहक होते. त्यांचे शिक्षण इंग्रजी सहावीपर्यंत झाले होते.
जानेवारी 1887मध्ये त्यांनी ‘सुभाष्यचंद्रिका’ हे मासिक काढले. सहा अंक निघाल्यानंतर 1887मध्ये सुरू केलेल्या ‘महाराष्ट्र कोकिळ’ या मासिकात ते समाविष्ट केले. त्या मासिकांतून मराठेशाहीतील प्रसिद्ध व्यक्तींशी संबंधित कागदपत्रे प्रसिद्ध होत असत.
‘भारतवर्ष’ आणि ‘इतिहास संग्रह’ नावाची नियतकालिके त्यांनी चालू केली. त्यांतून त्यांनी सहा हजारांहून अधिक अस्सल ऐतिहासिक कागदपत्रे प्रकाशित केली.
त्यांच्या प्रेरणेने वं प्रयत्नांनी सातारा येथे ऐतिहासिक संग्रहालय स्थापन झाले. पुढे 1939 साली ते पुण्याच्या डेक्कन महाविद्यालयात हलवण्यात आले. त्यांच्या संग्रहात मराठेशाहीतील, विशेषतः अठराव्या शतकातील घटनांसंबंधीची अस्सल कागदपत्रे, जुनी नाणी, चित्रे, कलाकुसरीच्या वस्तू, पोशाख-पेहेराव आदींचे नमुने, ऐतिहासिक पत्रे, हस्तलिखिते वगैरे होते.
त्यांनी विपुल लेखन केले. ‘अयोध्येचे नबाब’, ‘ महादजी शिंदे याजकडील राजकारणे -5खंड’, ‘सवाई माधवराव पेशव्यांचा दरबार ‘वगैरे 12 मराठी पुस्तके, तसेच त्यांनी संपादित केलेली काही पुस्तके, त्याचप्रमाणे ‘दि सांगली स्टेट’ वगैरे विविध ऐतिहासिक स्थळविषयक माहिती देणारी 5इंग्रजी पुस्तके, ‘अ हिस्टरी ऑफ द मराठा पीपल – 3खंड (सहलेखक :सी. ए. किंकेड), ‘ट्रीटीज, एंगेजमेंटस अँड सनदज, बॉम्बे’ (सहसंपादक :पी. व्ही. मावजी व जी. सी. लाड) हे इंग्रजी ग्रंथ अशी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली.
पारसनीसांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना मानाचा मुजरा.
☆☆☆☆☆
सौ. गौरी गाडेकर
ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ: साहित्य साधना, कऱ्हाड शताब्दी दैनंदिनी, विकीपीडिया,
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ २९ मार्च -संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित – ई – अभिव्यक्ती (मराठी)
पांडुरंग गोविंदशास्त्री पारखी.
पां.गो.पारखी हे मागच्या शतकातील मराठीतील कवी व निबंधकार होते. त्यांनी पुणे येथे संस्कृत पाठशाळेत अध्ययन केले होते.
कालिदासाचे संस्कृत ॠतूसंहार वर आधारित त्यांनी षड़्ऋतूवर्णन हे पुस्तक लिहिले.तसेच अनेक ताम्रपट, शिलालेख, चिनी प्रवाशांचे ग्रंथ इत्यादीचा अभ्यास करून निबंधलेखन केले आहे.त्यांनी भावगुप्तपद्म या टोपणनावाने काव्य लेखनही केले आहे.
याशिवाय अनेक इंग्रजी ग्रंथांची निर्मिती त्यांनी केली आहे.
29मार्च1911रोजी पांडुरंग गो. पारखी यांचे निधन झाले.
डाॅ.पद्माकर विष्णू वर्तक:
श्री.वर्तक हे व्यवसायाने डाॅक्टर होते. एम.बी.बी.एस.झाल्यानंतर त्यांनी प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन या विषयामध्ये एम.डी.केली.शल्यचिकित्सका अभ्यास केला. काही काळ वैद्यकीय व्यवसाय केल्यावर त्यांनी रामायण आणि महाभारताचे संशोधन यावर पूर्ण लक्ष केंद्रित केले. ऋग्वेद,महाभारत यांचा अभ्यास करून रामायणाचा काळ ठरवला. त्यांनी अध्यात्म व योग यांच्या संशोधनेसाठी ‘अध्यात्म संशोधन मंदिर’ स्थापन केले. तसेच प्राचीन भारतीय विज्ञानाचा शोध घेण्यासाठी ‘वेद विज्ञान मंडळ’ स्थापन केले.
वर्तक यांची ग्रंथसंपदा:
वास्तव रामायण
स्वयंभू(महाभारतावर आधारित)
तेजस्विनी द्रौपदी
युगपुरूष श्रीकृष्ण
पातंजल योग
दास मारूती? नव्हे, वीर हनुमान
संगीत दमयंती परित्याग(नाटक) इत्यादी
29मार्च2019 ला श्री.वर्तक यांचे निधन झाले.
शंकर नारायण जोशी :
श्री.शंकर नारायण जोशी यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील पाचवड येथे झाला.त्यांचे शिक्षण पाचवड,कुरंदवाड,जमखंडी येथे झाले.परंतु वडिलांच्या निधनामुळे त्यांना इंग्रजी तिसरीतच शिक्षण सोडावे लागले.नंतर पुणे येथे ज्ञानप्रकाश व आर्यभूषण छापखान्यात त्यांना मुद्रित तपासणीचे काम मिळाले. या कामामुळेच त्यांना वाचनाची व विशेषतः इतिहास वाचनाची गोडी लागली.त्यांचा लोकमान्य टिळकांशी संबंध आला.लोकमान्यांच्या दौ-याच्या वेळी ते लोकमान्यांचे स्वयंसेवक म्हणून काम करू लागले.1916 मध्ये भारत इतिहास संशोधन मंडळात त्यांना काम मिळाले व त्यांचा इतिहासाचा अभ्यास सुरू झाला.इतिहास विषयक सूची व शकावल्या तयार करण्याचे किचकट काम त्यांनी उत्तम प्रकारे पार पाडले.मध्ययुगीन ग्रामव्यवस्था,वतनदार,
राज्यव्यवस्था याविषयी संशोधन करून शोधनिबंध सादर केले.याशिवाय शिवाजी महाराजांवर व अनेक थोर व्यक्तींवर त्यांनी अनेक ठिकाणी भाषणे दिली.
शं. ना. जोशी यांची ग्रंथसंपदा:
मुळशी पेट्यासंबंधी ऐतिहासिक माहिती
राजवाडे लेखसंग्रह(संपादन)
राजवाडे लेख संग्रह संकीर्ण निबंध भाग 1 व 2
शिवकालीन पत्रसारसंग्रह खंड 3
शिवचरित्र साहित्य खंड 5
संभाजी कालीन पत्रसारसंग्रह
मराठेकालीन समाजदर्शन इ.इ.
कै.शं.ना.जोशी,पद्माकर वर्तक व पांढरा.गो.पारखी यांचा आज स्मृतीदिन.या तीनही अभ्यासू,संशोधक साहित्यिकांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन !
☆☆☆☆☆
श्री सुहास रघुनाथ पंडित
ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : विकिपीडिया.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ २७ मार्च -संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर– ई – अभिव्यक्ती (मराठी)
गंगाधर विठोबाजी पानतावणे
गंगाधर विठोबाजी पानतावणे हे मराठीतील लेखक, संशोधक, समीक्षक होते. ते आंबेडकरी विचारवंत होते. ते पहिल्या विश्व मराठी साहित्य समेलनाचे अध्यक्ष होते. त्याचप्रमाणे विदर्भ साहित्य समेलन (आनंदवन – वरोरा ), मराठवाडा साहित्य समेलन यांचेही अध्यक्ष होते. ते पद्मश्री पदवीचेही मानकरी होते.
पानतावणे हे वैचारिक साहित्याचे निर्माते होते. अस्मितादर्श चळवळीचे जनक होते. अनेक लेखक-कवींच्या पुस्तकांना त्यांनी प्रस्तावना लिहिल्या.
१४ ऑक्टोबर १९५६ रोजी त्यांनी बाबासाहेबांकडून बौद्ध धम्मची दीक्षा घेतली. बाबासाहेबांच्या पत्रकारितेवर ‘पत्रकार बाबासाहेब आंबेडकर’ हा शोध प्रबंध लिहिला. बाबासाहेब आंबेडकर मराठा विद्यापीठात त्यांनी मराठीचे प्राध्यापक म्हणून काम केले.
दलित साहित्याने अंधार नाकारला आहे. कलंकित भूतकाळ नाकारला आहे.मानसिक गुलामगिरीतून दलित मुक्त होऊ पाहत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्त्वज्ञानातून ते तेजस्वी होत आहेत,’ अशा शब्दात दलित साहित्याची पाठराखण त्यांनी केली आहे.
दलित साहित्याचे मुखपत्र असलेल्या ‘अस्मितादर्श’ या वाङ्मयीन नियतकालिकाचे ते संस्थापक संपादक होते. ५० वर्षे त्यांनी हे काम केले. या नियतकालिकाच्या माध्यमातून त्यांनी अनेक साहित्यिक मराठी साहित्यविश्वाला दिले. त्यांनी दलित लेखक-वाचक मेळावेही भरवले होते.
साहित्य, समाज आणि संकृती या विषयावरील २० वैचारिक पुस्तके आणि संशोधनपर ग्रंथ त्यांचे प्रकाशित आहेत. याशिवाय १२ पुस्तकांचे संपादन त्यांनी केले आहे. राष्ट्रीय आणि अंतरराष्ट्रीय चर्चासत्रात त्यांनी शोधांनिबंध वाचले आहेत. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शाहू महाराज, यांच्या विचारधारेतून त्यांचे लेखन झाले आहे. वसंत व्याख्यानमाला व आणि विविध व्याख्यानमाला यातून त्यांनी अनेक व्याख्याने दिली.
गंगाधर पानतावणे यांची काही पुस्तके –
१. आंबेडकरी जाणिवांची आत्मप्रत्ययी कविता, २. साहित्य निर्मिती चर्चा आणि चिकित्सा, ३. साहित्य प्रकृती आणि प्रवृत्ती, ४. अर्थ आणि अन्वयार्थ (समीक्षा), ५. चैती, ६. दलित वैचारिक वाङ्मय( समीक्षा), ८. लेणी व ९. स्मृतिशेष (व्यक्तिचित्रे), १०. वादळाचे वंशज ११. विद्रोहाचे पाणी पेटले
गंगाधर पानतावणे यांना मिळालेले पुरस्कार व सन्मान –
१. मत्स्योदरी शिक्षण पुरस्कार, २. आण्णाभाऊ साठे पुरस्कार, ३. आचार्य अत्रे समीक्षा पुरस्कार, ४. भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर अंतरराष्ट्रीय पुरस्कार ( लंडन) , ५ बाबासाहेब आंबेडकर जीवन गौरव पुरस्कार ६. अखिल भारतीय दलित अॅरकॅडमीचा बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार, ७ किर्लोस्कर जन्मशताब्दी, कुसुमताई चव्हाण, दया पावार पंजाबराव देशमुख, फडकुले, इ. अनेक पुरस्कार त्यांना लाभले आहेत. ८. दलित साहित्य अॅाकॅडमीची गौरववृत्ती, फाय फाउंडेशन गौरववृत्ती त्यांना मिळाली आहे, तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाची शिष्यवृत्तीही त्यांना मिळाली होती. १०. रा. ना. चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुरस्कारही त्यांना मिळाला होता.
गंगाधर पानतावणे यांचा जन्म २८ जून १९३७चा. त्यांना २६ जानेवारी २०१८ला पद्मश्री जाहीर झाली. पण प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते पदवीदान समारंभाला प्रत्यक्ष हजार राहू शकले नाहीत.
गंगाधर पानतावणे यांचे कार्य विपुल आणि विस्तृत होते, त्यामुळे त्यांना मिळालेल्या पुरस्कारांची संख्याही लक्षणीय आहे.
☆☆☆☆☆
डॉ.मधुकर केशव ढवळीकर
डॉ.मधुकर केशव ढवळीकर यांचा जन्म १६ मे १९३०चा. हे पुरातत्व विभागात संशोधक होते. भारतीय पुरातत्त्व विभागात त्यांनी कामाला सुरूवात केली. पुरातत्वशास्त्राच्या अध्यापनात संशोधनाला अतिशय महत्व आहे. ढवळीकर यांनी भारतातील अनेक ठिकाणी उत्खनन करण्यात पुढाकार घेतला. भारत सरकारने त्यांना ग्रीसमधील पेला येथे उत्खनन करण्यासाठी मुद्दाम पाठवले होते.
इनामगावाचा उत्खनन प्रकल्प, हे ढवळीकर यांचे नावाजलेले प्रमुख कार्य. पुण्यातील डेक्कन कॉलेजमध्ये संचालक म्हणून १९९० पर्यन्त ते कार्यरत होते.
डॉ.मधुकर ढवळीकर यांची काही पुस्तके-
१. आर्यांच्या शोधत, २. कोणे एके काळी हिंदू संस्कृती, ३. श्री गणेश आशियाचे आराध्य दैवत, ४. नाणकशास्त्र, ५. पर्यावरण आणि संस्कृती, ६. पुरातत्वविद्या.
त्यांनी अनेक इंग्रजी पुस्तकेही लिहिली.
ढवळीकर यांना मिळालेले पुरस्कार व सन्मान –
१. इंडियन आर्कियालॉजी सोसायटीच्या वाराणसीयेथील अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते.
२. इंडियन हिस्ट्री कॉंग्रेसचे अध्यक्षपद त्यांना मिळाले होते.
३. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाकडून डी. लिट. ही मानद पदवी त्यांना मिळाली होती.
४. पंतप्रधानांचे सुवर्णपदक त्यांना मिळाले होते.
५. त्यांना पद्मश्री ही पदवीही मिळाली होती.
गंगाधर पानतावणे आणि डॉ.मधुकर ढवळीकर या दोघाही आपापल्या क्षेत्रातील मान्यवरांना त्यांच्या स्मृतिदिनी मन:पूर्वक मानवंदना.
☆ ☆ ☆ ☆ ☆
श्रीमती उज्ज्वला केळकर
ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : साहित्य साधना – कराड शताब्दी दैनंदिनी, गूगल विकिपीडिया
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ २६ मार्च -संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित – ई – अभिव्यक्ती (मराठी)
माणिक सीताराम गोडघाटे ऊर्फ कवी ग्रेस (१० मे, १९३७ – २६ मार्च, २०१२)
दुःखसागराचा गूढप्रवासी
‘मी खरेच दूर निघालो
तू येऊ नकोस मागे
पाऊस कुठेतरी वाजे
हृदयात तुटती धागे’
असे तुम्ही म्हणालात आणि खरेच आमच्या हृदयाचे धागे तोडून अज्ञाताच्या प्रवासाला निघून गेलात.
‘जिथे असतील सुंदर मने
जिथे असेल समाधान
जिथे होतील स्वप्ने खरी
तिथे हे जीवना, मला घेऊन चल’
असं आवाहनही तुम्ही जीवनाला केलं होतं. पण तुम्ही परत न येण्याच्या टोकापर्यंत निघून गेलात. आज त्याला बारा वर्षं झाली. पण तुम्ही नाही असं वाटतच नाही.कारण गूढ गहन शब्दांनी बहरून आलेल्या तुमच्या कविता आमच्या मनात सतत रूंजी घालत असतात. आम्ही त्या कवितांत केव्हा हरवून जातो हे समजतही नाही आणि खर तर त्यातून बाहेर पडावसही वाटत नाही. खर सांगायचं तर
गूढ तुझ्या शब्दांची जादू
मनात माझ्या अशी उतरते
चांद्र नील किरणांच्या संगे
संध्येची जशी रजनी होते
इतक्या सहजपणे आम्ही त्यात रंगून जातो, गुंतून जातो. तुमचे शब्द, तुमच्या कल्पना, तुम्ही वापरलेली प्रतिके ही अगदी सहजासहजी समजावीत, पचनी पडावीत अशी नसतातच. पण
कळू न येतो अर्थ जरी, पण
दुःखकाजळी पसरे क्षणभर
खोल मनाच्या डोहावरती
कशी होतसे अस्फुट थरथर
पुढची कविता वाचावी का हा प्रश्न मनात येतच नाही. पहिल्या कवितेचे शेवटचे शब्द मनाला नकळतच दुस-या कवितेकडे घेऊन जातात.खर सांगू?
सोसत नाही असले काही
तरी वाचतो पुन्हा नव्याने
डोलत असते मन धुंदीने
हलते रान जसे वा-याने
मी दुःखाचा महाकवी असे तुम्ही अभिमानाने का म्हणत होता हे तुमच्या कविता समजून घेतल्याशिवाय नाही समजणार. पण तुम्ही म्हटल्याप्रमाणे ‘मन कशात लागत नाही,अदमास कशाचा घ्यावा’ अशी अवस्था जेव्हा होते तेव्हा आठवते ती तुमची कविता. ‘नाहीच कुणी अपुले रे, प्राणांवर नभ धरणारे,’ ही एकाकी पणाची भावना अशा नेमक्या शब्दात तुमच्याशिवाय कोण व्यक्त करणार? आता तुम्ही नसताना, ‘निळाईत माझी भिजे पापणी’ हे खरं असलं तरी ‘निळ्याशार मंदार पाऊलवाटा’ आमच्या आम्हालाच शोधाव्या लागणार आहेत. कित्येक कवींच्या कविता वाचल्या. कधी हसलो, कधी खुललो. कधी गंभीर झालो. पण
ग्रेस, तुझ्या काव्यप्रदेशी
माझे जेव्हा येणे झाले
जखम न होता कुठे कधीही
घायाळ कसे हे मन हे झाले
तुमच्या स्मृतीदिनी तुम्हाला स्मरायचं म्हणजे तरी काय करायचं ?जन्म मृत्यूची नोंद आणि मानसन्मानाची यादी तुमच्यासाठी महत्वाची नाहीच.तुमच्या शब्दांचा संग हाच तुमचा स्मृतीगंध. त्या आमच्या मनाच्या गाभा-यात नेहमीच गंधाळत राहतील. ‘गळ्यात शब्द गोठले, अशांतता दिसे घनी’ अशी अवस्था आजही असताना तुमच्या कविताच आधार असतील. म्हणून तर एवढंच म्हणावंसं वाटतं
संपत नाही जरी इथले भय
शब्दचांदणे उदंड आहे
त्या गीतांच्या स्मरणासंगे
दुःख सहज हे सरते आहे.’
दुःखे….न संपणारी
स्मृती…न संपणा-या. 🙏
☆☆☆☆☆
बाबूराव बागुल (17 जुलाई, 1930 – 26 मार्च, 2008)
दलित साहित्यात भरीव योगदान देणारे प्रतिभावंत लेखक श्री.बाबुराव बागूल यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील विहितगाव येथे झाला. बालपणा पासून विषमतेचे अनुभव घेतल्यामुळे त्यांच्या साहित्यात त्याचे प्रतिबिंब उमटलेले दिसते. शालेय जीवनापासून त्यांच्यावर आंबेडकरी विचारांचा प्रभाव पडला होता. कामगार चळवळ, अण्णाभाऊ साठे यांचेशी आलेला संपर्क, साम्यवादी विचारांचा प्रभाव, साम्यवादी साहित्याचा अभ्यास या सर्वांचा परिणाम त्यांचे व्यक्तिमत्व घडवण्यात झाला.
जातीयवादामुळे भाड्याचे घर मिळणे मुश्किल झाल्याने त्यांनी जात चोरून भाड्याचे घर घेतले. पण मनाला ते पटले नाही. त्यामुळे त्यांनी ते घर व परगावची नोकरीही सोडली. या अनुभवावरील त्यांनी लिहीलेली ‘जेव्हा मी जात चोरली होती’ ही कथा प्रचंड गाजली.
आचार्य अत्रे यांच्या ‘नवयुग’ व युगांतर’ या नियतकालिकांमधून त्यानी कथा लिहिल्या. त्यांचे लेखन हे दलित वर्गातील नव लेखकांना प्रेरणादायी ठरत होते.
श्री.बागूल यांचे साहित्य :
कादंबरी–
अघोरी, अपूर्वा, कोंडी, पावशा, सरदार, सूड इ.
कथासंग्रह–
जेव्हा मी जात चोरली होती, मरण स्वस्त होत आहे
कवितासंग्रह–
वेदाआधी तू होता
वैचारिक–
आंबेडकर भारत
दलित साहित्य: आजचे क्रांतीविज्ञान
सन्मान व पुरस्कार–
अध्यक्ष, पहिले विद्रोही साहित्य संमेलन, मुंबई.
जनस्थान पुरस्कार–कुसुमाग्रज प्रतिष्ठान–2007
महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कार
26मार्च 2008 ला बागुलांचे नाशिक येथे निधन झाले. त्यांच्या स्मृतीस व साहित्यसेवेस अभिवादन!
☆☆☆☆☆
श्री सुहास रघुनाथ पंडित
ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : विकिपीडिया.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ २५ मार्च -संपादकीय – सौ. गौरी गाडेकर -ई – अभिव्यक्ती (मराठी)
केशव रंगनाथ शिरवाडकर
केशव रंगनाथ शिरवाडकर(1926 – 25 मार्च 2018) हे साहित्य समीक्षक व वैचारिक लेखक होते.
ते वि. वा. शिरवाडकरांचे धाकटे बंधू.
केशव रं. शिरवाडकर हे तत्त्वज्ञान विषयातले भारतीय शिक्षण क्षेत्रातील प्रख्यात नाव होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात व नंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात त्यांनी भाषा विषयात अध्यापन केले. त्यांनी ग्रामीण भागातही शिक्षणप्रसार केला. नांदेड येथे पीपल्स कॉलेज उभारण्यात त्यांचे मोठे योगदान होते. तेथे ते इंग्रजीचे अध्यापन करीत. पुढे ते तिथे प्राचार्य झाले.
पुस्तके :
आपले विचारविश्व (तत्त्वज्ञानविषयक ग्रंथ)
तो प्रवास सुंदर होता :कुसुमाग्रज, वि. वा. शिरवाडकर -जीवन आणि साहित्य (चरित्रग्रंथ)
मर्ढेकरांची कविता :सांस्कृतिक समीक्षा.
सार गीतारहस्याचे
विल्यम शेक्सपिअर – जीवन आणि साहित्य.
संस्कृती, समाज आणि साहित्य
रंगविश्वातील रसयात्रा
साहित्यातील विचारधारा
मराठी साहित्य परिषदेने भरवलेल्या पहिल्या साहित्य समीक्षकांच्या संमेलनाचे ते अध्यक्ष होते. (29-30 नोव्हेंबर 2012)
महाराष्ट्र सरकारकडून तत्त्वज्ञान व मानसशास्त्रावरील पुस्तकासाठीचा ना. गो. नांदापूरकर पुरस्कार त्यांच्या ‘संस्कृती, समाज आणि साहित्य’ या पुस्तकाला मिळाला.
☆☆☆☆☆
यशवंत नारायण ऊर्फ अप्पा टिपणीस
यशवंत नारायण ऊर्फ अप्पा टिपणीस (3डिसेंबर 1876 – 25 मार्च 1943) हे मराठी नाट्यनिर्माते, नाट्यलेखक, अभिनेते वेषभूषाकार होते.
त्यांनी रंगमंचावरील पात्रांच्या रंगभूषा, केशभूषा, वेशभूषा जास्तीत जास्त वास्तव बनवण्याचा प्रयत्न केला.
1904मध्ये टिपणीसांनी महाराष्ट्र नाटक कंपनीची स्थापना केली.’कांचनगडची मोहना ‘, (यात ते नायक होते), ‘कमला’, ‘सं. प्रेमसंन्यास ‘ ही नाटके त्यांनी सादर केली.
नंतर त्यांनी ‘भारत नाट्य मंडळी’काढून ‘मत्स्यगंधा’ नाटक केले. त्याचे लेखन, दिग्दर्शन त्यांनीच केले होते व त्यात भीष्माची भूमिकाही केली होती.नंतर त्यांनी ‘आर्यावर्त नाटक कंपनी’सुरू केली. त्यांनी ‘चंद्रग्रहण’ हे शिवाजीच्या जीवनावरचे नाटक लिहून सादर केले.या नाटकाद्वारे प्रथमच ऐतिहासिक स्वरूपातला शिवाजीचा जिरेटोप रंगमंचावर आणण्याचे श्रेय टिपणीसांना जाते.
ललितकला नाटक कंपनीतील ‘शहा शिवाजी ‘या नाटकातील काही पदे टिपणीसांनी रचली होती. या नाटकासाठी त्यांनी पुण्यातील बाबासाहेब घोरपडे यांच्याकडील ऐतिहासिक पुस्तकांचा संग्रह वाचून काढला आणि स्वतःच्या देखरेखीखाली अंगरखे, पगड्या शिवून घेतल्या. पुढे कित्येक वर्षे त्या नाटकांत व चित्रपटांत वापरल्या जात असत.
टिपणीसांनी एकूण 15 नाटके लिहिली.20 नाटकांत त्यांनी अभिनय केला.
पुणे येथे 1921 साली भरलेल्या सतराव्या मराठी नाट्यसंमेलनाचे ते अध्यक्ष होते.
☆☆☆☆☆
मधुकर बाबूराव केचे
मधुकर बाबूराव केचे (18 जानेवारी 1932 – 25मार्च 1993) हे कवी, ललित निबंधकार होते.
एम. ए. करून ते मराठीचे प्राध्यापक झाले.
त्यांच्या कवितेत आधुनिक मानवाची निराशा, ईश्वराविषयी शंकाकुलता, ऐहिक प्रेरणांशी चाललेला संघर्ष या गोष्टी अधोरेखित होतात.
पुस्तके : ‘पालखीच्या संगे ‘, ‘आखर आंगण ‘, ‘एक भटकंती’, ‘एक घोडचूक’, ‘वंदे वंदनम’ हे ललित निबंध संग्रह.
‘पुनवेचा थेंब’, ‘आसवांचा ठेवा’, ‘दिंडी गेली पुढे’ हे कवितासंग्रह.
‘चेहरेमोहरे’, ‘वेगळे कुटुंब’ हे व्यक्तिचित्रसंग्रह.
‘झोपलेले गाव’, ‘माझी काही गावं’ ही प्रवासवर्णने.
‘मोती ज्याच्या पोटी’ ही कादंबरी.
मधुकर केचेंच्या तीन कवितासंग्रहांना महाराष्ट्र सरकारची लागोपाठ बक्षिसे मिळाली.
☆☆☆☆☆
केशव रंगनाथ शिरवाडकर, यशवंत नारायण टिपणीस व मधुकर बाबूराव केचे यांना त्यांच्या स्मृतिदिनी सादर प्रणाम.
सौ. गौरी गाडेकर
ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ: साहित्य साधना, कऱ्हाड शताब्दी दैनंदिनी, विकीपीडिया, मधुकर केचे : वि. ग. जोशी, महाराष्ट्र नायक
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ २४ मार्च -संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर– ई – अभिव्यक्ती (मराठी)
श्री.ना. पेंडसे
श्रीपाद नारायण पेंडसे यंचा जन्म ५ जानेवारी १९१३चा. मराठीतील श्रेष्ठ कथालेखक व कादंबरीकार म्हणून त्यांचा लौकिक होता. त्यांचा जन्म रत्नागिरीतील मोर्डी गावचा. १९३४ मध्ये ते मुंबईला स्थायिक झाले. वयाच्या ११ वर्षापर्यंत जे कोकण त्यांनी पाहीलं, अनुभवलं ते त्यांनी आयुष्यभर आपल्या कथा-कादंबर्या१तून मांडले. तो निसर्ग, तो परिसर त्यांच्या भावविश्वाचा भाग होता. त्यांना खाजगीत आणि नंतर व्यवहारातसुद्धा शिरूभाऊ म्हणत.
मुंबईच्या बेस्ट कंपनीत त्यांनी नोकरी केली. १९७२मध्ये ‘बेस्ट उपक्रमाची कथा’ हे पुस्तक त्यांनी लिहिले.
आपल्या कादंबर्याकतून त्यांनी कोकणातील विश्व आणि तेथील लोकजीवन यांचे प्राधान्याने वर्णन केले, पण पुढे महानगरीय अनुभवही तितक्याच ताकदीने व्यक्त केले.
त्यावेळी मराठी कादंबरी फडके, खांडेकर, यांच्या प्रभावाखाली होती, तेव्हा पेंडसे यांनी एक नवी वाट चोखाळली. मराठी प्रादेशिक कादंबरीची नवी शाखा निर्माण केली. कादंबरी, कथा, नाटक, व्यक्तिचित्रण, आत्मचरित्र आशा विविध प्रकारात त्यांनी लेखन केले. पण कादंबरीकार म्हणून ते अधीक मान्यता पावले.
‘जीवनकला’ ही त्यांची पहिली कादंबरी १९३८मध्ये प्रकाशित झाली. ‘जुम्मन’ हा कथासंग्रह १९६६मध्ये प्रकाशित झाला. हा त्यांचा एकमेव कथासंग्रह. ‘खडकातील हिरवळ’ हे त्यांचे आत्मचरित्र आहे.
एल्गार ही त्यांची कादंबरी१९४९ साली प्रकाशित झाली. त्यानंतर हद्दपार व पुढे गारंबीचा बापू या कादंबर्यार प्रकाशित झाल्या आणि प्रादेशिक कादंबरीकार म्हणून पेंडसे यांना मराठीत वेगळे स्थान मिळाले. या ३ कादंबर्या् डोळ्यापुढे ठेवून गंगाधर गाडगीळ यांनी ‘हर्णैचा दीपस्तंभ ‘ हा लेख लिहून पेंडसे यांचे कादंबरीकार म्हणून मूल्यमापन केले. सातत्य आणि प्रयोगशीलता हे पेंडसे यांच्या कादंबरीचे वैशिष्ट्य. १९८८मध्ये त्यांची ‘तुंबडाचे खोत’ ही १३५८ पृष्ठांची द्विखंडात्मक कादंबरी प्रकाशित झाली.
कादंबरी लेखनासोबत त्यांनी नाट्यलेखनही केले. त्यांनी ११ नाटके लिहिली. त्यातील राजे मास्तर, यशोदा, गरांबीचा बापू, असं झालं आणि उजाडलं, रथचक्र ही त्यांच्या कादंबर्यां वर आधारलेली नाटके. महापूर, संभूसच्या चाळीत, चक्रव्यूह, शोनार बंगला, पंडीत आता तरी शहाणे व्हा, ही वेगळ्या पिढीतील नाटके. सहज, सुंदर, प्रभावी संवाद, एखाद्या समस्येच्या खोल मुळाशी जाणं हे त्यांच्या नाट्यलेखनाचे विशेष.
– श्री.ना. पेंडसे यांच्या कादंबर्यास
एल्गार, हद्दपार गारंबीचा बापू, हत्या, यशोदा, कलंदर, , लव्हाळी, आकांत, तुंबडाचे खोत, रथचक्र एक होती आजी, कामेरू, घागर रिकामी रे , लो. टिळकांच्या जीवनावरची ‘हाक आभाळाची’
– श्री.ना. पेंडसे यांना मिळालेले पुरस्कार
१. हद्दपार, हत्या, कलंदर, संभूसच्या चाळीत, चक्रव्यूह, यांना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला.
२. रथचक्रला साहित्य अॅंकॅदमी पुरस्कार
३. प्रियदर्शनी पुरस्कार
४. महाराष्ट्र फाऊंडेशनचा जीवन गौरव पुरस्कार
५. लाभसेटवार साहित्य सन्मान
६ .कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार
श्री.ना. पेंडसे यांचे अन्य भाषेत अनुवादीत झालेले साहित्य
ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ २३ मार्च -संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित – ई – अभिव्यक्ती (मराठी)
यशवंत पाठक :
संत साहित्याचे अभ्यासक व लेखक श्री.यशवंत पाठक यांनी मराठी व संस्कृत भाषा घेऊन एम्. ए. केल्यानंतर ‘कीर्तन परंपरा आणि मराठी साहित्य’ या विषयामध्ये डाॅक्टरेट
संपादन केली.मनमाड येथील महाविद्यालयात प्रदीर्घ काळ अध्यापनाचे काम केले.
धार्मिक विषयावरील लेखनाव्यतिराक्त कथा,कादंबरी,ललित असे विविध प्रकारचे लेखन त्यांनी केले.त्यांच्या साहित्यिक कारकिर्दीत त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.चतुरंग,डाॅ.
निर्मलकुमार फडकुले,संत ज्ञानेश्वर,संत विष्णूदास कवी अशा पुरस्कारांचे ते मानकरी आहेत.महाराष्ट्र राज्य सरकारचा त्यांना तीन वेळेला साहित्य पुरस्कार प्राप्त झाला आहे.जळगाव येथे भरलेल्या दहाव्या सूर्योदय साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. तसेच नाशिक येथे 2013मध्ये झालेल्या सावरकर साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ २२ मार्च -संपादकीय – सौ. गौरी गाडेकर -ई – अभिव्यक्ती (मराठी)
जयंत बेंद्रे
जयंत बेंद्रे (23 डिसेंबर 1951 -22 मार्च 2015) हे मराठी अभिनेते, नेपथ्यकार, सूत्रसंचालक व लेखक होते.
अहमदनगर येथे त्यांनी एम. ए. पर्यंत शिक्षण घेतले. कॉलेजमध्ये असताना सदाशिव अमरापूरकर यांच्याबरोबर, तसेच किर्लोस्कर ऑइल इंजिन्समध्ये नोकरी करताना मोहन जोशी यांच्याबरोबर कामं करण्याची संधी त्यांना मिळाली.
बेंद्रेनी ‘मोरूची मावशी ‘मध्ये काम केले होते. ते विविध नाट्यसंस्थांशी जोडलेले होते. प्रायोगिक, व्यावसायिक नाटकं, तसेच मराठी चित्रपट व चित्रवाणी मालिकांतून त्यांनी भूमिका केल्या.
‘नटखट नट -खट’ या मोहन जोशींच्या 500 पानी आत्मचरित्राचे शब्दांकन बेंद्रे यांनी केले. वेगळ्या आकृतिबंधामुळे या पुस्तकाचे कौतुक झाले.
याशिवाय त्यांनी सात एकांकिका, इंग्रजी एकांकिका व तीन कथासंग्रह लिहिले.
त्यांच्या ‘अभिनय सम्राट’ या लघुकथेस जी. ए. कुलकर्णी पुरस्कार, ‘ठेविले अनंते तैसेचि रहावे ‘ या लघुकथेला ‘कथा दिल्ली’चा राष्ट्रीय पुरस्कार, ‘शेवटी काय वर घेऊन जायचंय?’ या कथेला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा उत्कृष्ट कथा पुरस्कार तर ‘माणसं आणि माणसं’ या कथासंग्रहाला जयवंत दळवी स्मृती पुरस्कार मिळाला.
‘मैत्री’ या संस्थेद्वारे ते सामाजिक क्षेत्रातही कार्यरत होते.
प्रभाकर आत्माराम पाध्ये
प्रभाकर आत्माराम पाध्ये(4 जानेवारी 1909-22 मार्च 1984) यांनी पन्नास वर्षे वृत्तपत्रीय लेखनाबरोबर कथात्म साहित्य, प्रवासवर्णने, व्यक्तिचित्रे, ललित गद्य, समीक्षा व सौंदर्यमीमांसा अशी निर्मिती अखंडपणे केली.
त्यांचा जन्म रत्नागिरीत झाला. शालेय शिक्षण रत्नागिरी, पुणे, मुंबई येथे झाले. मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयातून त्यांनी बी.ए. केलं.
सुरुवातीला ते ‘प्रतिभा’ पाक्षिकात लेखन करत असत. नंतर त्यांनी श्री. रा. टिकेकर यांच्या सहकार्याने ‘आजकालचा महाराष्ट्र -वैचारिक प्रगती’ हा ग्रंथ लिहिला. ग्रंथाच्या अखेरीस 1799 ते 1934 या प्रदीर्घ कालखंडातील प्रमुख घटनांचा कालपट दिला आहे. मराठी ग्रंथांमध्ये कालपट देण्याची सुरुवात या ग्रंथापासून झाली.
नंतर पाध्ये ‘चित्रा’,’धनुर्धारी’मध्ये पत्रकार होते.पुढे ‘नवशक्ती’चे संपादक झाल्यावर त्यांनी त्याचा खप प्रचंड वाढवला.
मार्च 1953मध्ये ‘नवशक्ती’ हे वृत्तपत्र सोडून ते ‘द इंडियन कमिटी फॉर कल्चरल फ्रीडम’ या संस्थेचे चिटणीस झाले. जून 1955मध्ये ‘काँग्रेस फॉर कल्चरल फ्रीडम’ या आंतरराष्ट्रीय संस्थेचे आशिया खंडाचे सेक्रेटरी जनरल म्हणून ते दिल्लीला गेले.त्यायोगे एक तप ते आंतरराष्ट्रीय पातळीवरील सांस्कृतिक घटना व मोठमोठ्या व्यक्ती यांच्याशी निगडित होते. यामुळे पाध्येंच्या व्यक्तिमत्त्वाला नवेनवे पैलू पडले.
पाध्ये यांनी पाच कथासंग्रह,एक कादंबरिका, पाच प्रवासवर्णनपर पुस्तके, चार व्यक्तिचित्रसंग्रह, स्फूट लेखांचे तीन संग्रह, राजकारणावरील चार पुस्तके, सौंदर्यशास्त्रविषयक तीन पुस्तके व सहा समीक्षा पुस्तके असे त्यांचे अफाट लेखन आहे.
त्यांच्या ‘सौंदर्यानुभव’ला साहित्य अकॅडमीचे पारितोषिक मिळाले.
जयंत बेंद्रे व प्रभाकर आत्माराम पाध्ये यांना त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त सादर अभिवादन.
सौ. गौरी गाडेकर
ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ :साहित्य साधना कऱ्हाड, शताब्दी दैनंदिनी. विकिपीडिया,
प्रभाकर पाध्ये, प्रा. डॉ. विलास खोले, महाराष्ट्र नायक
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ २१ मार्च -संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर– ई – अभिव्यक्ती (मराठी)
मोरेश्वर रामचंद्र वाळिंबे, तथा मो.रा. वाळिंबे यांचा जन्म ३०.जून १९१२चा.
ते शिक्षणतज्ज्ञ, मराठी भाषेचे व्याकरणकार होते. ‘मराठी लेखनपद्धती’ या विषयवावरची त्यांची अनेक पाठ्यपुस्तके आहेत. महाराष्ट्रातील अनेक शिक्षणसंस्थांमध्ये त्यांनी शिक्षक, उपमुख्याध्यापक, मुख्याध्यापक म्हणून काम केले. पुण्यातील टिळक स्मारक मंदिरात मराठी भाषेचा शब्दकोश करायचे कामही त्यांनी केले. मराठी साहित्यात त्यांना रस होता. खांडेकर, फडके., माडगूळकर, मालतीबाई बेडेकर इये. दिग्गज लेखकांशी त्यांचा संपर्क होता.
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळासाठी इ. ५वी, ६वी, ७वी व्याकरणविषयक पुस्तकाचे लेखन, सुगम मराठी शुद्धलेखन व सुगम मराठी व्याकरण या पुस्तकाचे लेखन केले.
वनाराणी एल्सा या बालसाहित्याच्या पुस्तकाचा त्यांनी अनुवाद केला. मराठी शुद्धलेखन प्रदीप हे पुस्तक लिहिले. त्यांच्या सुगम मराठी व्याकरण व लेखन या पुस्तकाची ५१ वी आवृत्ती२०१६मध्ये प्रकाशित झाली. या आधी त्यांच्या कन्येने ब्रेलमध्ये हे पुस्तक उपलब्ध करून दिले.
याखेरीज आंग्ल भाषेचे अलंकार, श्री बाळकृष्ण यांचे चरित्र, सुबोध वाचन (३भाग), शिकरीच्या सत्यकथा याही पुस्तकांचे लेखन त्यांनी केले आहे.
☆☆☆☆☆
पांडुरंग लक्ष्मण ऊर्फ बाळ गाडगीळ यांचा जन्म २९ मार्च १९२६ मधला.
बाळ गाडगीळ पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्राचार्य होते, तसेच सिंबायसिस संस्थेचे उपाध्यक्ष होते. त्यांनी विनोदी लेखन केलेच, त्याचबरोबर आर्थशास्त्रीय लेखनही केले. त्यांनी अनुवादही केले. गाडगीळ यांनी ६०हून अधीक पुस्तके लिहिली. त्यांनी विनोदी कथा, कादंबर्याक, प्रवास वर्णन, व्यक्तिचित्रे, टीकाग्रंथ, भाषांतर, बालवाङ्मय असे विविध स्वरूपाचे लेखन केले.
बाळ गाडगीळ यांची काही पुस्तके –
१. अखेर पडदा पडला, २. अमेरिकेत कसे मारावे, ३. लोटांगण, ४फिरकी, ५. वाशिल्याचं तट्टू , ६ आकार आणि रेषा, ७. आम्ही भूगोल घडवतो, ८ उडती सतरंजी, ९. एक चमचा पु.ल. एक चमचा अत्रे १०. गप्पागोष्टी –भाग ५ ११. सिगरेट आणि वसंत ऋतु (प्रवास वर्णन ), १२ वळचणीचे पाणी ( आत्मचरित्र)
बाळ गाडगीळयांना मिळालेले सन्मान व पुरस्कार
१. ‘लोटांगण’ या त्यांच्या पहिल्या विनोदी संग्रहास राज्य सरकारचा पुरस्कार मिळाला.
२. सिगरेट आणि वसंत ऋतु या प्रवास वर्णनास राज्य सरकारचे पहिले पारितोषिक मिळाले.
३. बडोदे येथे झालेल्या मराठी वाङ्मय परिषदेचे ते अध्यक्ष होते.,
४. मुंबईत ९२मध्ये झालेल्या विनोदी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
५. कोथरूडमध्ये १९९५मध्ये झालेल्या कोथरूड साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.,
☆☆☆☆☆
गोविंद तळवलकर
गोविंद तळवलकर यांचा जन्म २२ जुलै १९२५ रोजी झाला. इंग्रजी आण मराठी दोन्ही भाषेत त्यांनी पत्रकारिता केली. त्याचप्रमाणे या दोन्ही भाषेत लेखन केले. अग्रलेखांकरिता ते विशेष परिचित होते. त्यांना अग्रलेखांचे बादशहा म्हणत. ते स्तंभलेखक होते. सामाजिक, राजकीय, अंतरराष्ट्रीय घडामोडींचे ते भाष्यकार होते, तसेच ते साक्षेपी संपादक होते.
लोकसत्तामध्ये १२ वर्षे त्यांनी उपसंपादकाचे काम केले. त्यानंतर २८ वर्षे ते महाराष्ट्र टाईम्सचे संपादक होते. महाराष्ट्र टाईम्सला एक प्रभावी व परिणामकारक दैनिक म्हणून घडविण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.
टाईम्स ऑफ इंडिया, इलस्ट्रेटेड विकली, द हिंदू, द डेक्कन हेरॉल्ड, फ्रंटलाईन मॅगेझिन अशा इंग्रजी वृत्तपत्रातून आणि साप्ताहिकातून त्यांनी लेखन केले. ‘एशियन एज’ साठी ते अमेरिकेतून लिहीत असत.
गोविंद तळवलकरांचे बरेचसे लेखन पुस्तक रूपातही आहे. लो.टिळकांची परंपरा जपणारे , संतांप्रमाणे सामान्यांनाही समजेल अशी लेखनशैली जोपासणारे असे त्यांचे लेखन होते. भाषेवरील प्रभुत्व, राजकीय आणि सामाजिक भान आण प्रचंड व्यासंग याच्या बळावर अग्रलेखांना त्यांनी खूप उंचीवर नेले. माडगूळकरांनी त्यांचा उल्लेख ‘ज्ञानगुण सागर’ असा केला होता.
गोविंद तळवलकरांची एकूण २५ पुस्तके आहेत. त्यापाकी काही निवडक पुस्तके –
१. अग्नीकांड, २ अग्रलेख, ३.अफगाणिस्तान, ४. अभिजात, ५. अक्षय, ६. ग्रंथसांगाती, ७. नवरोजी ते नेहरू ८. परिक्रमा, ९. पुष्पांजली १०. (व्यक्तिचित्रे आणि मृत्यूलेख संग्रह) ११. मंथन १२. वाचता वाचता ( पुस्तक परीक्षणांचा संग्रह), १३. सौरभ साहित्य आणि समीक्षा
पुरस्कार
१. उत्कृष्ट पत्रकारितेचे दुर्गा रतन व रामनाथ गोयंका
२. लातूर – दैनिक एकमत
३. न.चि.केळकर पुरस्कार – सोव्हिएत साम्राज्याचा उदय आणि अस्त या पुस्तकासाठी
४. जीवनगौरव पुरस्कार २००७
५. महाराष्ट्र सरकारचा लो. टिळक पुरस्कार
६. सामाजिक न्यायाबद्दल रामशास्त्री पुरस्कार
आज मो.रा. वाळिंबे, बाळ गाडगीळ, गोविंद तळवलकर या मराठी भाषेतील वेगवेगळ्या कार्यक्षेत्रात काम करणार्या. दिग्गजांचा स्मृतीदिन. त्या निमित्त त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
☆ ☆ ☆ ☆ ☆
श्रीमती उज्ज्वला केळकर
ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : साहित्य साधना – कराड शताब्दी दैनंदिनी, गूगल विकिपीडिया
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ २० मार्च -संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित – ई – अभिव्यक्ती (मराठी)
बाळ सीताराम मर्ढेकर बाळ सीताराम मर्ढेकर (१ दिसंबर १९०९ – २० मार्च १९५६)
मराठी नवकवितेचे आद्य प्रवर्तक असे ज्यांना संबोधले जाते त्या बा.सी.मर्ढेकर यांचा आज स्मृतीदिन.कवी केशवसुतांनंतरचे युगप्रवर्तक कवी म्हणून मर्ढेकरांचे नाव घेतले जाते.जोष,ठसठशीतपणा,
निर्भिडपणा,आशयसंपन्न नव्या प्रतिमा,धक्का देणा-या दोन विभिन्न कल्पनांची घातलेली सांगड ही त्यांच्या काव्याची ठळक वैशिष्ट्ये आहेत.
फर्ग्युसन महाविद्यालयातून बी.ए. झाल्यावर त्यानी काही दिवस टाईम्स ऑफ इंडिया मध्ये संपादकीय विभागात व नंतर अध्यापक म्हणून नोकरी केली.त्यानंतर ते आकाशवाणीत रूजू झाले.
इंग्लंडमध्ये वास्तव्यास असताना त्यांनी तेथील वांड्मयीन चळवळीळीचा अभ्यास केला.अनेक श्रेष्ठ साहित्यिक व समीक्षक यांच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव पडला.बदलते सामाजिक जीवन,ताणतणाव,जीवनाची तीव्र गतीमानता,सर्वसामान्य माणसाची अगतिकता त्यांच्या काव्यातून प्रतिबिंबीत झालेले दिसतात.
शिशिरागम हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह.त्यानंतर काही कविता , व आणखी काही कविता हे दोन संग्रह आले.तांबडी माती,रात्रीचा दिवस,पाणी या कादंब-यांचे लेखन त्यांनी केले.कर्ण नावाची संगितिका व नटश्रेष्ठ नावाचे नाटकही त्यांनी लिहिले.पण काव्यलेखनातच त्यांनी स्वतःचे स्थान निर्माण केले.
काव्याबरोबरच त्यांनी साहित्य समीक्षाही केली आहे.सौंदर्य आणि साहित्य,वाड्मयीन महात्मा,आर्टस् अॅन्ड मॅन हे त्यांचे समीक्षा ग्रंथ प्रसिद्ध आहेत.
20मार्च 1956 रोजी त्यांचे निधन झाले.त्यांचे स्मृतीस अभिवादन!
☆☆☆☆☆
श्री सुहास रघुनाथ पंडित
ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : मराठीसृष्टी, विकिपीडिया.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈