ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ ९ नोव्हेंबर – संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? ९ नोव्हेंबर  –  संपादकीय  ?

मॅन बुकर पुरस्कार

या पुरस्काराची सुरुवात इ.स. १९६९ पासून इंग्लंडच्या मेकॉनल या कंपनीने केली. इंग्रजी भाषेत लिहीलेल्या व युनायटेड किंगडममध्ये प्रकाशित झालेल्या पुस्तकांना हा पुरस्कार दिला जातो. आत्तापर्यंत ७ भारतीय लेखकांना हा  पुरस्कार मिळाला आहे. सन    

१९७१ मध्ये व्ही. एस. नायपॉल यांना हा पुरस्कार मिळाला होता. त्यांनाच पुढे २००१ मध्ये नोबेल पुरस्कारही मिळाला. १. द इंडियन ट्रॉयॉलॉजी, २. अमंग द बिलिव्हर्स ,३. अ‍ॅन एरिया ऑफ डार्कनेस  ४. ए वे इन द वर्ल्ड अशी त्यांची पुस्तके आहेत.

२. अनीता देसाई – सन १९८० मध्ये अनीता देसाई यांची प्रथम बुकर पुरस्कारासाठी निवड झाली. त्यांनातर एकूण ३ वेळा त्यांची बुकर पुरस्कारासाठी निवड झाली आहे.  ‘फायर ऑन द माऊंटन’ या कादंबरीला १९७८साली साहित्य अ‍ॅकॅडमीचाही पुरस्कार मिळाला होता. वयाच्या ९व्या वर्षी त्यांची पहिली कथा प्रकाशित झाली. १क्लिअर लाईट ऑफ द डे, २. क्रय, द पिकॉक, ३. बाय बाय ब्लॅक बर्ड ही त्यांची पुस्तके.   

३ सलमान रश्दीसलमान रश्दी हे भारतीय वंशाचे जागतिक प्रसिद्धी असलेले लेखक. १९८१मध्ये त्यांना बुकर  पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार त्यांना ‘मिडनाईट चिल्ड्रन’ या पुस्तकासाठी मिळाला. २. द गोल्डन हाऊस, ३ द जग्वार स्माईल ४. सॅटॅनिक व्हर्सेस इ. त्यांची पुस्तके. त्यांनी गीते, लेख, कथाही लिहिल्या. सॅटॅनिक व्हर्सेस या पुस्तकाबद्दल वाद-विवादाचा बराच धुराळा उडाला. त्यात इस्लामबद्दल काही आक्षेपार्ह मजकूर आहे, असे काहींचे म्हणणे. त्यांना अनेक पुरस्कार, मानसन्मान मिळाले. 

४. अरुंधती रॉय – अरुंधती रॉय यांचे पूर्ण नाव सुझान अरुंधती रॉय . त्या लेखिका आहेत, त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्त्यादेखील आहेत. १९९७ साली त्यांच्या  द गोड ऑफ स्मॉल थिंग्ज या कादंबरीला बुकर पुरस्कार मिळाला. १. द गोड ऑफ स्मॉल थिंग्ज, २. वॉर ऑफ टॉक ३. कम सप्टेंबर इ. त्यांची पुस्तके आहेत. त्यांच्या २ पटकथा व अनेक लेखसंग्रहही आहेत.   

५ किरण देसाई – या भारतीय लेखिका आहेत. २००६ साली किरण देसाई यांना ‘द इनहेरिटन्स ऑफ लॉस’ या पुस्तकासाठी मॅन बुकर पुरस्कार मिळाला. जगतीकरणाच्या प्रक्रियेमुळे माणसाच्या जीवनात येणारे ताण-तणाव येत असले तरी ग्रामीण भागातअजूनही टिकून असलेला आनंदीपणा, याचा वेध घेणारी ही कादंबरी. २. हल्लाबल्लू इन द ग्वावा आर्केड ३. जनरेशन १.५ इ. त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत.

६. अमिताभ घोष – यांना २००८ चा  बुकर पुरस्कार मिळाला आहे. १. द सर्कल ऑफ द रिझन २. द शॅडो लाईन्स ३. द हंग्री टाईड ही त्यांची आणखी काही पुस्तके. . ‘द शॅडो लाईन्स’ला  १९८९चा साहित्य अ‍ॅकॅडमीचा पुरस्कार मिळाला.पुढे त्यांना डिसेंबर २०१८ मध्ये ज्ञानपीठ पुरस्कारही मिळाला. इंग्रजी साहित्यात ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेले अमिताभ घोष हे पहिलेच साहित्यिक. २००७ साली त्यांना पद्मश्री मिळाली होती.

७. अरविंद अडीगा  अमिताभ घोष यांच्याप्रमाणेच अरविंद अडीगा यांनाही २००८ मधेच बुकर पुरस्कार मिळाला आहे.  द व्हाईट टायगर या त्यांच्या पाहिल्याच पुस्तकासाठी त्यांना मानाचा बुकर पुरस्कार मिळाला आहे. त्यांच्या लेखनाची सुरुवात फायनान्शियल टाईम्स , मनी अ‍ॅंड वॉलस्ट्रीट जर्नल इ. वृत्तपत्रातून व्यापार, उद्योग, आर्थिक प्रश्न इ. विषयांनी झाली. टाईम वृत्तपत्राचे ते तीन वर्ष वार्ताहर होते. नंतरही त्यांनी मुक्त पत्रकारिकता केली.

  २. सिलेक्शन डे,  ३. लास्ट मॅन इन टॉवर ही त्यांची पुस्तके लोकप्रिय झाली आहेत.    

 

श्रीमती उज्ज्वला केळकर

ई – अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : – माहितीस्रोत — इंटरनेट  

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ ८ नोव्हेंबर – संपादकीय – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? ८ नोव्हेंबर –  संपादकीय  ?

आज ८ नोव्हेंबर – आज संपूर्ण महाराष्ट्राच्या कोणत्या लाडक्या व्यक्तिमत्वाचा जन्मदिन असतो , हे सांगण्याची गरज खरंच आहे का ? तरी सांगते. आज श्री पु. ल. देशपांडे यांचा जन्मदिन.

(८/११/१९१९ – १२/०६/२००० ) –  ‘ पु. ल. ‘ ही आता दोन वेगळी अक्षरे राहिली नसून “ पुल “ असा एक नवा शब्दच तयार झालेला आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. आणि अतिशय आपुलकीने अगदी जवळच्या माणसासाठी वापरावा तसा हा शब्द मराठी रसिक सहजपणे वापरतात, हेच मराठी मनावर वेगवेगळ्या प्रकारे अक्षरशः गारुड करणाऱ्या या साहित्यिकाचे खास वैशिष्ट्य आहे. त्यांचे व्यक्तिमत्व खरोखरच एखाद्या गारुड्याच्या पोतडीसारखे होते, आणि वेळोवेळी त्यातून त्या व्यक्तित्वाचा लक्ख चमकणारा एकेक पैलू रसिकांसमोर येत राहिला, आणि रसिक भारावल्यासारखे त्याकडे बघत राहिले. 

काही काळ एक शिक्षक, आणि पुढे आजीव– एक रसिकमान्य उत्कृष्ट लेखक-नट- नकलाकार – गायक – उत्तम पेटीवादक- नाटककार-कवी-संगीत दिग्दर्शक-हजरजबाबी उत्कृष्ट वक्ता- संपन्न कलाकृती सादर करणारा निर्माता — आणि या सगळ्या कलागुणांना सातत्याने टवटवीत अशा खुमासदार- बहारदार विनोदाची सुंदर झालर लावणारा एक खंदा विनोदवीर. —-  आणि विशेष म्हणजे यापैकी कुठलीही कला इतकी समृद्ध असायची, की ती समृद्धी अगदी सामान्य रसिकांपर्यंतही आपसूकच जाऊन पोहोचायची. याचे कारण एकच होते, आणि ते म्हणजे त्यातला सहज-साधेपणा. त्यांचे प्रचंड साहित्य– मग तो एखादा लेख असेल, नाटक असेल, व्यक्तिचित्र असेल, पुस्तक असेल किंवा चित्रपट असेल — त्यात त्यांनी चितारलेल्या व्यक्तिरेखा म्हणजे सगळ्यांनाच अगदी आपल्या रोजच्या परिचयातल्या, आपल्या अवतीभवती वावरण्याऱ्या माणसांची आठवण करून देणाऱ्या – आणि काहींना आरशात त्यांचे स्वतःचेच  प्रतिबिंब वाटावे अशा. आणि पुलंची हीच तर खासियत होती. “ गुळाचा गणपती “ या सबकुछ पु. ल. म्हणून गाजलेल्या चित्रपटात त्यांच्या प्रतिभेच्या विविध पैलूंचे अफलातून दर्शन घडले होते. मराठी भाषेवर विलक्षण प्रभुत्व हा त्यांचा आणखी एक विशेष पैलू. त्यांचे हे भाषाप्रभुत्व त्यांच्या प्रत्येक सादरीकरणात आवर्जून लक्ष वेधून घेत असे. आणि तसाच लक्ष वेधून घेणारा होता तो त्यांचा हजरजबाबीपणा. एकपात्री नाटक, अनेकपात्री नाटक, चित्रपट, नभोवाणी, दूरचित्रवाणी, अशा अनेक क्षेत्रांमध्ये त्यांनी कायम लक्षात राहील असेच लखलखते काम केले. दूरदर्शनच्या पहिल्या-वहिल्या प्रसारणासाठी पंडित नेहेरुंची मुलाखत घेणारे पु.ल., हे भारतीय दूरदर्शनचे पहिले मुलाखतकार ठरलेले आहेत. 

त्यांच्याबद्दल विशेषत्वाने सांगायला हवी अशी गोष्ट म्हणजे, साहित्यक्षेत्राशी संबंधित संशोधकांना आधारभूत होतील असे असंख्य संदर्भ, कलांचा इतिहास, कितीतरी ध्वनिफिती, लेख, मुलाखती, असे बरेच साहित्य त्यांनी जमा करून ठेवलेले आहे. अथक प्रयत्न करून, मराठी नाटकाचा अगदी आरंभापासूनचा इतिहास त्यांनी नोंदवून ठेवलेला आहे. लेखसंग्रह, अनुवादित कादंबऱ्या, व्यक्तिचित्रे, काही चरित्रे, उत्तम प्रवासवर्णने, एकांकिका-संग्रह, नाटके, लोकनाट्ये, विनोदी कथा, चित्रपटकथा-पटकथा, आकाशवाणीसाठी श्रुतिका, अशा साहित्यक्षेत्रातल्या त्यांच्या चौफेर कामगिरीबद्दल लिहावे तेवढे कमीच आहे. त्यांची प्रत्येक साहित्यकृती इतकी लोकप्रिय झालेली आहे की त्यांची नावे सांगण्याची गरजच नाही. त्यांची भाषणेही नेहेमी “ गाजलेली “ हे विशेषण लावूनच यायची. विशेष म्हणजे “ पुल “ या व्यक्तिविशेषावरही अनेकांनी स्वतंत्रपणे पुस्तके लिहिलेली आहेत—उदा. विस्मरणापलीकडील पु.ल., पु.ल.: एक साठवण, पु.ल. नावाचे गरुड, ‘ जीवन त्यांना कळले हो ‘ हे  पु.ल. यांच्याबद्दल विविध साहित्यिकांनी लिहिलेल्या लेखांचे संकलन असणारे पुस्तक, पुरुषोत्तमाय नमः, आणि अशी आणखी काही . ‘ भाई ‘या टोपणनावाव्यतिरिक्त  “ धोंडो भिकाजी कडमडे जोशी “, “ पुरुषराज अळूरपांडे “ अशीही त्यांची काही मजेदार टोपणनावे होती. पद्मश्री, पद्मभूषण, महाराष्ट्रभूषण, असे गौरवपर अनेक अनेक पुरस्कार त्यांना मिळाले होते. 

“ इदं न मम् “ या वृत्तीने त्यांनी मुक्तहस्ते लक्षणीय दाने दिलेली आहेत. विनोदाच्या अंगरख्याआड एका  निश्चित तत्त्वज्ञानाने भरलेले आणि भारलेले मन जपत, लॊकांना काही काळ स्वतःच्या व्यथा-वेदना विसरून निखळ आनंदाचा अनुभव भरभरून देणाऱ्या पुलंना आजच्या त्यांच्या जन्मदिनी अतिशय मनःपूर्वक आदरांजली.  

☆☆☆☆☆

कथा- कादंबरी- वगनाट्य अशा वेगवेगळ्या साहित्यप्रांतात स्वतःचा वेगळा ठसा उमटवून गेलेले सिद्धहस्त साहित्यिक श्री. शंकर पाटील यांचाही आज जन्मदिन. ( ८/११/१९२६ –१८/१०/१९९४ ) 

रयत शिक्षण संस्थेत शिक्षक म्हणून काही काळ काम केल्यानंतर श्री. पाटील यांची आकाशवाणी- पुणे केंद्रात नियुक्ती झाली. नंतर एशिया फाऊंडेशनची शिष्यवृत्ती मिळवून त्यांनी ग्रामीण जीवनाचा विशेष अभ्यास केला, आणि त्यावर आधारित ‘ टारफुला ‘ ही कादंबरी लिहिली, आणि तिथून त्यांचा लेखनप्रवास जोमाने सुरु झाला. त्यांनी अनेक उत्तम कथा लिहिल्या. “ वळीव “ या पहिल्या कथासंग्रहानंतर त्यांचे कितीतरी कथासंग्रह प्रसिद्ध झाले, आणि वळीव, भेटीगाठी, आभाळ, धिंड, ऊन, या संग्रहांना त्या त्या वर्षातील उत्तम कथासंग्रह म्हणून महाराष्ट्र शासनाची पारितोषिके मिळाली. त्यांच्या कथांचे तेव्हा इतर भाषांमध्ये अनुवादही झाले होते, ही खूपच महत्वाची गोष्ट. 

गल्ली ते दिल्ली, लवंगी मिरची कोल्हापूरची, कथा अकलेच्या कांद्याची, ही त्यांची लोकप्रिय वगनाट्ये. चित्रपट क्षेत्रात पटकथा आणि संवादलेखक म्हणूनही त्यांची कारकीर्द खूपच गाजली. युगे युगे मी वाट पहिली, गणगौळण, चोरीचा मामला, इत्यादी चित्रपटांच्या उत्कृष्ट पटकथा-संवाद्लेखनासाठी त्यांना शासकीय पुरस्कार दिले गेले होते. पिंजरा, एक गाव बारा भानगडी, केला इशारा जाता जाता, अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांच्या पटकथा आणि संवाद श्री. पाटील यांचे होते. त्यांनी रेखाटलेली माणसे ग्रामीण असोत की नागरी, त्यांच्या व्यक्तिमत्वाचे आणि मनाचेही विविध पदर त्यांच्या कथांमधून त्यांनी अलगदपणे आणि सहज उलगडून दाखवलेले प्रकर्षाने जाणवते, आणि ‘ त्यांची भाषा म्हणजे कथेमधून व्यक्त होणाऱ्या अनुभवांची भाषा असते ‘ असेच म्हणावेसे वाटते. त्यांचा प्रयोगशील स्वभाव कथालेखनातही दिसून यायचा, आणि त्यामुळेच त्यांच्या प्रत्येक कथेत सतत एक चैतन्य जाणवायचे.   

साहित्यक्षेत्रातील मुशाफिरीच्या जोडीनेच, इ.८ वी ते १० वीसाठी ‘ साहित्यसरिता ‘ या वाचनमालेचे संपादन, म.रा. पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळात मराठी भाषेसाठी विशेष अधिकारी म्हणून, आणि नंतर अन्य सहा भाषांमधील पाठ्यपुस्तकांसाठी ‘ विद्यासचिव ‘ म्हणून केलेले  श्री. पाटील यांचे कामही आवर्जून सांगायला हवेच.

मराठी साहित्यात ग्रामीण बाजाच्या साहित्याची अनमोल भर घालणारे श्री. शंकर पाटील यांना विनम्र आदरांजली ?

☆☆☆☆☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

ई – अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : – १) कऱ्हाड शिक्षण मंडळ “ साहित्य-साधना दैनंदिनी. २) माहितीस्रोत — इंटरनेट 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ ७ नोव्हेंबर – संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? ७ नोव्हेंबर  –  संपादकीय  ?

*केशवसुत (७ ऑक्टोबर १८६६ ते ७ नोहेंबर १९०५ )

कृष्णाजी केशव दामले म्हणजे केशवसुत, हे आधुनिक मराठी कवितेचे जनक मानले जातात. त्या वेळेपर्यंत मराठीत काव्यरचना व्हावयाची ती संत, पंत ( पंडीत) किंवा शाहीरी रचनेच्या स्वरूपाची. ती परांपरा केशसुतांनी मोडली. वास्तव जीवनातील विषयांवर कविता केल्या. ‘नव्या मनुतील नव्या दमाचा मी शूर शिपाई आहे.’ अशी ‘तुतारी’ फुंकत त्यांनी घोषणा केली,

 ‘आम्ही कोण म्हणोनी काय पुससी, आम्ही असू लाडके देवाचे

 देवाने दिधले जग तये आम्हासी खेळावया.’

आणि मग त्यांच्या लेखणीने कागदावर शब्दांचा खेळ मांडला. सौंदर्यवादी दृष्टीकोन  त्यांनी मराठी कवितेत प्रथम आणला. कवीप्रतिभा स्वतंत्र असावी, ती अंत:स्फूर्त असावी.  तिच्यावर बाह्य प्रभाव पडू नये, असं ते म्हणत. वर्डस्वर्थ, कीटस, शेली इ. इंग्रजी कवींचा त्यांच्यावर प्रभाव होता. इंग्रजी कवितेतील १४ ओळींचे सॉनेट हा रचना प्रकार त्यांनी  मराठीत ‘सुनीत’ या नावाने लोकप्रिय केला.  त्यांच्या आज १३५ कविता उपलब्ध आहेत. त्यात अन्याय, विषमता, अंधश्रद्धा, याला विरोधा करून मानवतावादाचा त्यांनी पुरस्कार केला. त्यांनी राष्ट्रीयत्व, गूढ अनुभवांचे प्रगटीकरण, निसर्ग इ. विषयांवर कविता केल्या ‘नवा शिपाई, तुतारी, सातरीचे बोल, झपूर्झा , हरपले श्रेय’ इ. त्यांच्या कविता गाजल्या.

मधू मंगेश कर्णिक यांच्या प्रयत्नाने त्यांच्या जन्मगावी मालगुंड इथे त्यांचे स्मारक उभारले गेले. ८ मे  १९९४ साली कविवर्य कुसुमाग्रज यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन झाले.

*य.गो.जोशी ( १७ डिसेंबर १९०१ ते ७ नोहेंबर १९६४ )

य.गो.जोशी हे कथाकार, पटकथाकार आणि प्रकाशक होते. त्यांचा जन्म भिगवणइथला. ‘अन्नपूर्णा, वाहिनीच्या बांगड्या, शेवग्याच्या शेंगा माझा मुलगा’ इ. यशस्वी मराठी चित्रपटांच्या कथा त्यांच्याच.

घरातील आर्थिक ओढगस्तीच्या परिस्थितीमुळे त्यांना ५वीतच शिक्षण सोडून द्यावे लागले. त्यानंर, शाई तयार करणे, सुगंधी तेले तयार करणे, वृत्तपत्रे विकणे इ. अनेक कामे त्यांनी केली. पुढे त्यांच्या लेखनास सुरुवात झाली. १९३४ मध्ये त्यांनी प्रकाशन व्यवसाय सुरू  केला.  त्यांची पहिली कथा ‘एक रुपया दोन आणे’ ही यशवंत मासिकात प्रकाशित झाली. पुढे याच मासिकाच्या कथास्पर्धेत १९२९ साली त्यांच्या ‘शेवग्याच्या शेंगा’ या कथेला पहिले पारितोषिक मिळाले आणि नंतर याच कथेवर आधारलेला ‘शेवग्याच्या शेंगा’ हा चित्रपटही खूप गाजला.

त्यांच्या कथांमधून पांढरपेशीय मध्यम वर्गाचे जीवन चित्रण आढळून येते. उत्कटता, सहजसुंदर संवाद, साधी, प्रसन्न, अर्थपूर्ण भाषाशैली इ. त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये सांगता येतील. पुण्याहून प्रसिद्ध होणार्‍या ‘प्रसाद’ मासिकाचे ते संपादक होते.   

‘अनंता पारत आला ( कादंबरी) , ‘दुधाची घागर ‘ ( आत्मवृत्त ), अनौपचारिक मुलाखती, आवडत्या गोष्टी, औदुंबर आणि पारिजात, गजरा मोतियाचा ,जाई-जुई, तरंग, तुळशीपत्र आणि इतर कथा, पुनर्भेट भाग- १ ते १० इ. त्यांचे अनेक कथासंग्रह आहेत. महाराष्ट्राचा परिचयखंड १ व २ ह्या पुस्तकांचे संपादन त्यांनी केले. सह संपादक  होते, चिं. ग. कर्वे आणि सं.आ. जोगळेकर. महाराष्ट्राच्या माहितीच्या दृष्टीने हा महत्वाचा संदर्भ ग्रंथ आहे.

 *सुनीता देशपांडे (3जुलै1925 ते ७नोहेंबर २००९)

सुनीताबाई जशा लेखिका होत्या, त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्त्याही होत्या. त्यांचे लग्न पु. ल. देशपांडे यांच्याबरोबर १२ जून १९४६ रोजी झाले. त्यांनी  पु. लंबरोबर अनेक नाटकात कामे केली. ‘वंदे मतरम्’ आणि ‘नवरा-बायको’ या चित्रपटातही त्यांनी कामे केली. ‘राजमाता जीजाबाई’ हा एकपात्री प्रयोग त्यांनी केला. पु.ल. देशपांडे यांनी लिहीलेल्या ‘सुंदर मी होणार ‘ या नाटकात त्या ‘दीदीराजे यांची भूमिका करत.

 त्यांनी लिहिलेले ‘आहे मनोहर तरी’ हे आत्मचरित्र खूप गाजले. ‘प्रिय जी.ए.’ हा पत्रसंग्रह त्यांनी संपादित केला. मण्यांची माळ ( ललित ), मनातलं अवकाश’, ‘सोयरे सकळ, (व्यक्तिचित्रण ), . ‘आठवणींच्या प्रदेशातील स्वैर भटकंती’ इ. त्यांची पुस्तके मौज प्रकाशननी प्रकाशित केलीत, ’समांतर जीवन’ हा अनुवादीत लेखांचा संग्रह सन प्रकाशनाने प्रकाशित केलाय.

 जी.एं.च्या स्मरणार्थ दिला जाणारा पहिला पुरस्कार त्यांच्या’ प्रिय जी.ए.या पुस्तकास २००८ साली मिळाला.

केशवसुत, य.गो.जोशी आणि सुनीताबाई देशपांडे या तिघाही महनीय व्यक्तिमत्वांना त्यांच्या स्मृतीदिंनंनिमित्त विनम्र अभिवादन ?

श्रीमती उज्ज्वला केळकर

ई – अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : – १) कऱ्हाड शिक्षण मंडळ “ साहित्य-साधना दैनंदिनी. २) माहितीस्रोत — इंटरनेट  

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ ६ नोव्हेंबर – संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

क्षणाक्षणाला

दिशादिशातून

आनंदाला

उधाण यावे  

स्वप्नामधल्या

परीकथेसम

जीवन अवघे

जगत राहावे

 – श्रीमती उज्ज्वला केळकर

? || शुभ दीपावली || ?

☆☆☆☆☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? ६ नोव्हेंबर –  संपादकीय  ?

मराठीतील सुप्रसिद्ध लेखक,  समीक्षक,  टीकाकार व विचारवंत श्री. श्रीकृष्ण केशव क्षीरसागर उर्फ श्रीकेक्षी यांचा आज जन्मदिवस. त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील पाली येथे दि.  6/11/1901 ला झाला. समाज, जीवन व संस्कृती यांचे सखोल चिंतन त्यांच्या लेखनातून दिसून येते. सौंदर्यवादी, चिंतनशील, वास्तववाद, गूढवाद, नवमानवतावाद इ.  विषयांवर मूलभूत चर्चा करणारे असे त्यांचे साहित्य वेगळा ठसा उमटवून जाते. ज्ञानकोशकार केतकर यांचे ते समविचारी होते.

1940 साली त्यांची राक्षसविवाह ही पहिली कादंबरी प्रकाशित झाली. तेव्हापासूनच त्यांच्या लेखनातील वेगळेपणाची दखल घेतली गेली.

आधुनिक राष्ट्रवादी रवींदनाथ ठाकूर, उमरखय्यामची फिर्याद, टीकाविवेक, व्यक्ती आणि वाङ्मय, वादे वादे ही त्यांची समीक्षेवरील गाजलेली पुस्तके. याशिवाय तसबीर आणि तकदीर हे आत्मचरित्र, बायकांची सभा हे प्रहसन, मराठी भाषा–वाढ आणि बिघाड हे वैचारिक लेखन असे विविधांगी लेखन त्यांनी केले आहे. निवडक श्रीकेक्षी या नावाने त्यांचे निवडक साहित्य साहित्य अकादमीने संकलित केले आहे. साहित्य अकादमीने सल्लागार मंडळावर सदस्य म्हणूनही नियुक्त केले होते. महाराष्ट्र राज्य सरकारने त्यांच्या नावे समीक्षेसाठी पुरस्कार ठेवून त्यांचा सन्मान केला आहे. 1959 साली मिरज येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. मराठी बरोबरच त्यांनी उर्दू शायरीचाही अभ्यास केला होता.  

1980 मध्ये त्यांचे निधन झाले.

सारस्वतकार भावे:

06/11/1871 हा विनायक लक्ष्मण तथा सारस्वतकार भावे यांचा जन्मदिवस. कोकणातील पळस्पे या गावी त्यांचा जन्म झाला तर शिक्षण बालपण व शिक्षण ठाणे येथे झाले . बी.एस.सी. पदवी संपादन केली असली तरी त्यांनी प्राचीन मराठी साहित्याचे संशोधक, इतिहासकार आणि संपादक म्हणून नाव कमावले. ‘मराठी वाड्मयाचा त्रोटक इतिहास’ चे लेखन त्यांनी ग्रंथमाला या मासिकातून केले. महाराष्ट्र कवि हे मासिक 1903 साली काढले. महानुभवपंथाच्या पोथ्या त्यांनी बाळबोधलिपीत प्रकाशित केल्या. ऐतिहासिक संशोधनासाठी ‘मराठी दप्तर’ नावाची संशोधन संस्था काढली. विद्यमान नावाचे मासिक काढले. यावरून त्यांची साहित्य व संशोधन याविषयीची धडपड दिसून येते. पण त्याना लोकप्रियता व प्रसिद्धी मिळाली ती महाराष्ट्र सारस्वत या ग्रंथामुळे. ते या ग्रंथामुळे सारस्वतकार भावे या नावाने ओळखू जाऊ लागले. याशिवाय त्यांनी नेपोलियनचे चरित्र, दासोपंतांचे गीतार्णव, नागेश कविंचे सीतेस्वयंवर यांचा लेखन व सुधारित आवृत्तीचे प्रकाशनही केले. कविकाव्यसूची, वच्छाहरण या महानुभव काव्याचे संपादन केले. ठाण्याच्या सांस्कृतिक चळवळीतील ते एक अग्रगण्य व्यक्तिमत्व होते. भारतातील पहिले मराठी पुस्तकांचे सार्वजनिक वाचनालय त्यांनीच ठाणे येथे सुरू केले. यावरून त्यांच्या कार्याची महती लक्षात येईल.

भालबा केळकर:
भालचंद्र वामन तथा भालबा केळकर हे पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात रसायनशास्त्राचे प्राध्यापक होते. पण लेखन आणि अभिनय या अंगभूत गुणांमुळे त्यानी या क्षेत्रातही महत्वाचे कार्य केले. अनेक बालनाट्ये व नभोनाट्यांचे लेखन व दिग्दर्शन त्यांनी केले. शास्त्रीय विषय रंजकपणे मांडणे हे त्यांच्या बालनाट्यांचे वैशिष्ट्य होते. नंतर त्यांनी प्रोग्रेसिव्ह ड्रामॅटिक असोसिएशन ही नाट्यसंस्था काढली. या संस्थेने अनेक नाटक सादर केली. भालबांनी दिग्दर्शन व अभिनयही केला. 1961 साली प्रेमा तुझा रंग कसा हे नाटक प्रथम दिग्दर्शित केले. नंतर वेड्याचं घर उन्हात, तू वेडा कुंभार इ . नाटके पडद्यावर आणली.

ओळखीच्या म्हणी कथांच्या खाणी, क्रिकेटचा खेळ व इतर गोष्टी, गुरूवरचा माणूस, तलावातले रहस्य हे त्यांचे काही बालसाहित्य. तर प्राचीन भारतीय शास्त्रज्ञ आणि संशोधन, शेरलॉक होम्सच्या अनुवादित कथा (सहा भाग), संपूर्ण महाभारताचे आठ खड हे त्यांचे अन्य काही लेखन.

1987च्या आजच्या दिवशी त्यांचे निधन झाले. त्यांच्या स्मृतीस अभिवादन. !

भाऊ पाध्ये:
भाऊ पाध्ये यांचा आज जन्मदिवस.  आपण त्यांच्या साहित्य कर्तृत्वाविषयी दि. 30/10/21 च्या अंकात वाचले आहे. म्हणून येथे पुनरावृत्ती टाळत आहे.

☆☆☆☆☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

साभार: विश्वकोश मराठी, विकीपीडिया

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ ४ नोव्हेंबर – संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

चित्र – सौ. वंदना अशोक हुळबत्ते

दीपोत्सवी या सजली धरणी
चांदण्याच जणू आल्या भूवनी
मंगलवाद्ये मंगल समयी
लक्ष्मी पुजन घराघरातूनी

 – नीलांबरी शिर्के

? || शुभ दीपावली || ?

☆☆☆☆☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? ४ नोव्हेंबर  –  संपादकीय  ?

आली दिवाळी आनंदाची

आज दिवाळी. आज लवकर उठून ‘मोती’स्नान झाले आहे. घरा-दारात, अंगण-ओसरीत पणत्यांची आरास सजली आहे . इमारती विद्युत माळांनी लखलखत आहेत.

आज श्रीकृष्णाने नरकासुर या दुष्ट राक्षसाचा पहाटे वध  केला आणि सारा प्रदेश भयमुक्त केला, अशी पुराणकथा आहे. म्हणून सकाळी उठून फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा करायचा ही परंपरा॰  उत्तरप्रदेश , दिल्ली इ. भागात ज्याप्रमाणे दसर्‍याला रावण दहन करण्याची प्रथा आहे, त्याचप्रमाणे गोव्यामधे नरकासुर दहनाची प्रथा आहे. तिथे वेगवेगळ्या भागात नरकासुराचे कागदी पुतळे तयार करतात. त्याच्या पोटात फटाके वगैरे दारू भरतात. आदल्या रात्री नरकासुराची मिरवणूक काढली जाते. आपण नाही का अनंत चतुर्दशीला गणपतीची मिरवणूक काढत, तशी इथे नरकासुराची मिरवणूक निघते आणि नरक चतुर्दशीच्या पहाटे त्याचे दहन केले जाते.

दिवाळी हा दिव्यांचा उसव. तुमचं सारं जीवन प्रकाशाने उजळो, असा संदेश देणारा हा दीपोत्सव. पण काहींच्या जीवनातला अंधार या दीपोत्सवानेही जात नाही. अशांच्यासारख्या जीवनात प्रकाशाची वाट उलगडणारी एक व्यक्ती म्हणजे डॉ. तात्याराव लहाने. आज थोडं त्यांच्याविषयी—

सरकारी रुग्णालये म्हणजे अनास्था, निष्काळजीपणा या विचारांना छेद देणारा, रुग्णासेवेचं एक आगळं वेगळं मॉडेल म्हणजे तात्याराव लहाने. त्यांनी मुंबईच्या जे.जे. इस्पितळाच्या नेत्रशल्य चिकित्सा विभागाला नेटका, सुबक आकार आणला आहे. आपल्या टीमला रुग्णसेवेसाठी कटिबद्ध आणि कार्यक्षम बनवून, त्यांनी लाखो गरीब, गरजूंना दृष्टी मिळवून दिली. २००७ पर्यन्त त्यांनी मोतीबिंदूच्या एक लाख यशस्वी शस्त्रक्रिया केल्या. त्याबद्दल शासनाने त्यांना २००८ मधे ‘पद्मश्री’ देऊन त्यांचा गौरव केला. आपल्या विभागात स्वच्छता राहते आहे ना, इकडे त्यांनी काटेकोरपणे लक्ष दिले. २००४मधे जे.जे. रुग्णालयात रेटिना विभागाची सुरुवात त्यांच्या प्रयत्नाने झाली. . अद्ययावत यंत्रणेने आपला विभाग त्यांनी सुसज्ज केला.

लातूर जिल्ह्यातील मकेगाव या लहानशा खेड्यात त्यांचा जन्म झाला. त्यांचे लहानपण अत्यंत गरिबीत गेले. शाळा शिकताना गुरे राखण्याचं काम त्यांनी केले.  पाझर तलाव फोडण्याचंही काम त्यांनी केलं. १० वी पर्यन्तचे त्यांचे शिक्षण त्यांच्या गावातच झाले. पुढे त्यांची हुशारी आणि शिक्षकांची मदत यामुळे ते डॉक्टर झाले. १९८१ साली त्यांनी मराठवाडा विद्यापीठातून मेडिसीनची पदवी घेतली. या काळात त्यांनी आपल्या रूममेटचा स्वैपाक करून आपल्या जेवणाची सोय केली. ‘कमवा आणि शिका’ योजने अंतर्गत झाडांना पाणी घालण्याचं ते काम करत. अशी छोटी छोटी कामे करत ते एम.बी.बी.एस. झाले. १९८५ मधे त्यांनी ऑप्थल्मॉलॉजीमधे एम.बी.बी.एस.केले. 

९१ साली त्यांच्या दोन्ही किडन्या फेल गेल्या. त्यामुळे आठवड्यातून दोनदा डायलेसिस करावं लागायचं. त्यावेळी ते आंबेजोगाईत होते. तिथे ही सोय नसल्यामुळे त्यांनी मुंबईला बदली मागून घेतली. ९५ साली त्यांच्या आईची किडनी त्यांना बसवण्यात आली. .हा आपला दुसरा जन्म आहे आणि तो गोर-गरिबांची सेवा करण्यातच घालवायचा, असा त्यांनी निश्चय केला आणि त्याप्रमाणे ते वागले. आपल्यातला सेवाभाव त्यांनी आपले सहकारी आणि कर्मचारी यांच्यातही  रुजवला.

चंद्रपूर, नंदूरबार सारख्या दुर्गम समजल्या जाणार्‍या भागात, पब्लिक हेल्थ सेंटरच्या माध्यमातून कॅम्प घेतले. माहिती दिली. शस्त्रक्रिया केल्या. वंचित आणि गरजूंना सेवा पुरवण्यावर त्यांचा विशेष कटाक्ष होता. दर वर्षी ते बाबा आमटे यांच्या आनंदवनात जात. तेथील कुष्ठरोग्यांवर आवश्यकतेप्रमाणे शस्त्रक्रिया करत. नेत्रदानासाठीही त्यांनी लोकांना उद्युक्त केले.     

समाज प्रबोधन मराठी साहित्य संमेलनात (१८फेब्रुवारी २०११) त्यांना स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार मिळाला. त्यांना छ्त्रपती शाहू पुरस्कारही २०२०ला  मिळाला. कधी कधी १८ ते २३ तास काम या कर्मयोग्याने केले आहे. त्यांच्या आत्तापर्यंतच्या जीवनावर चित्रपटही निघाला आहे.

अशा कर्मयोगी डॉ. तात्याराव लहाने यांना आज दिवाळीच्या पहिल्या दिवशी विनम्र अभिवादन  ?

श्रीमती उज्ज्वला केळकर

ई – अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

 

संदर्भ : – १) कऱ्हाड शिक्षण मंडळ “ साहित्य-साधना दैनंदिनी. २) माहितीस्रोत — इंटरनेट  /*खरे खुरे आयडॉल्स- युनिक फिचरच्या पुस्तकावरून

 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ ३ नोव्हेंबर – संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? ३ नोव्हेंबर  –  संपादकीय  ?

माधव आचवल-

माधव आचवल हे सुप्रसिद्ध लेखक, समीक्षक चित्रकार, वास्तु शिल्पकार. त्यांचे ललित लेखन प्रामुख्याने ‘सत्यकथेतून प्रकाशित झाले. ‘किमया –ललित, पत्र- ललित, रसास्वाद – ललित . जास्वंद – समीक्षा, डार्करूम आणि इतर एकांकिका, चिता आणि इतर एकांकिका ,अमेरिकन चित्रकला – (अनुवादीत) इ. त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. 3 नोहेंबर 1926 हा त्यांचा जन्मदिन.

*अनंत फंदी  (१७४४- १८१९ )

 पेशवाईच्या उत्तर काळात गाजलेल्या शाहीरांमधे अनंत फंदी सर्वात जेष्ठ शहीर. त्यांचे आडनाव घोलप. अनंत फंदीबद्दल शाहीर होनाजी बाळाने लिहून ठेवले आहे,

फंदी अनंत कवनाचा सागर . समोर गाता कुणी टीकेना. पण या कावणाच्या सागरातील आज थोडीच कवणे उपलब्ध आहेत. आज त्यांचे ७ पोवाडे, ८ लावण्या व काही फटाके उपलब्ध आहेत. पदे, लावण्या , कटाव, फटाके इ. विविध प्रकारच्या रचना त्यांनी केल्या. त्यांच्या रचना रसाळ आणि प्रासादिक आहेत. उत्तर आयुष्यात त्यांनी अहिल्याबाई होळकर यांच्या सांगण्यावरून कीर्तन करायला सुरवात केली, असे म्हणतात. त्यांचा आपल्या पर्यन्त पोचलेला लोकप्रिय फटका म्हणजे

 ‘बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडू नको

संसारामधे ऐस आपुला उगाच भटकत फिरू नको.’

हा उपदेशपर फटका. व्यवहारत कसे वागावे, हे अनंत फंदी  यातून सांगतात. सालसपणाने वाग, खोटे बोलू नको,अंगी नम्रता असावी, कुणाचे वर्म काढू नको,दुसर्‍याचा ठेवा बुडवू नको, गर्व करू नको. पाइजेचा विदा उचलू नको, हरिभजनाला विसरू नको इ. व्यवहारात कसे वागावे याचा उपदेश त्यांनी यातून केला आहे.

श्रीमती उज्ज्वला केळकर

ई – अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : – १) कऱ्हाड शिक्षण मंडळ “ साहित्य-साधना दैनंदिनी. २) माहितीस्रोत — इंटरनेट 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ २ नोव्हेंबर – संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

चित्र – सौ. वंदना अशोक हुळबत्ते

प्रकाश, पाणी, पक्षी झाडे
कष्टकरी अन शेती वाडे
धनतेरसला या धनासह
आदर ठेऊन पुजू चला रे

 – नीलांबरी शिर्के

? || शुभ दीपावली || ?

☆☆☆☆☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? २ नोव्हेंबर –  संपादकीय  ?

राधाधर मधुमिलिंद, वद जाऊ कुणाला शरण, बहुत दिन नच भेटलो सुंदरीला, प्रिये पहा, नभ मेघांनी आक्रमिले…

सगळी पद ओळखीची.अगदी कालपरवाची वाटावीत अशी. पण या नाट्यगीताना शंभर वर्षे होऊन गेलीत असं सांगितलं तर? या गीतांचे जनक बळवंत पांडुरंग तथा अण्णासाहेब किर्लोस्कर यांचा आज स्मृतीदिन. त्यांचे निधन झाले 1885 मध्ये. त्यापूर्वीच्या या रचना. पण पदांचा ताजेपणा अजूनही टिकून आहे. 

अण्णासाहेब किर्लोस्कर यांचा जन्म कर्नाटकातील. त्यामुळे त्यांना कन्नड व मराठी अशा दोन्ही भाषा लहानपणापासून अवगत होत्या. त्यांचे शिक्षण कोल्हापूर व पुणे येथे झाले. तरूण वयातच त्यानी पदरचनेला सुरूवात केली. ते पौराणिक नाटकांसाठी पदे, किर्तनकारांसाठी आख्याने लिहीत असत. श्रीशंकर दिग्विजय हे  पहिले नाटक त्यांनी 1873 मध्ये लिहिले. नंतर काही वर्षांनी म्हणजे 1880 मध्ये कालिदासाच्या अभिज्ञान  शाकुंतलाचे त्यांनी मराठीत भाषांतर करून शाकुंतल हे नाटक लिहिले. ते लोकप्रिय व व्यावसायिक दृष्ट्या यशस्वी झाले. त्यामुळे काही मित्रमंडळींच्या सहकार्याने त्यांनी ‘किर्लोस्कर नाटक मंडळी’ ची स्थापना केली.संगीत सौभद्र हे त्यांचे प्रचंड लोकप्रियता लाभलेले नाटक. पौराणिक कथानकातून उलगडत जाणारी प्रेमकथा आजही सर्वांना भुरळ घालते. राम राज्य वियोग हे त्यांचे शेवटचे नाटक.

अण्णासाहेब हे उत्तम नाटककार व गीतकार तर होतेच ,पण ते उत्तम नट, दिग्दर्शक व संगीत तज्ञही होते. छ. शिवाजी महाराजांवर पाचशे आर्यांचे दीर्घकाव्यही त्यांनी लिहिले आहे. समाजातील विविध समुदायांशी त्यानी संपर्क ठेवल्याने नाट्य क्षेत्राकडे पाहण्याची समाजाची दृष्टीही बदलली व या क्षेत्रात काम करणा-यांना  प्रतिष्ठा प्राप्त झाली.

या श्रेष्ठ मराठी संगीत नाट्य लेखक निर्मात्याला मानाचा मुजरा !!

☆☆☆☆☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

साभार: विश्वकोश मराठी, विकीपीडिया

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ १ नोव्हेंबर – संपादकीय – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सवत्सधेनू पुजनाने
दिवाळी सुरू जाहली आज
ज्योत ज्योतीने चला लाऊया
आसमंत उजळे प्रकाशात

 – नीलांबरी शिर्के

? || शुभ दीपावली || ?

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? १ नोव्हेंबर –  संपादकीय  ?

आज १ नोव्हेंबर — बुद्धिवादी, विज्ञानवादी समाजसुधारक आणि सामाजिक कार्यकर्ते श्री. नरेंद्र दाभोळकर यांचा जन्मदिन. ( ०१/११/१९४५ – २०/०८/२०१३ ) 

अघोरी सामाजिक प्रथांच्या आणि अंधश्रद्धांच्या निर्मूलनासाठी श्री. श्याम मानव यांनी १९८२ साली स्थापन केलेल्या “ अखिल भारतीय अंधश्रद्धा-निर्मूलन समिती “ या संघटनेसोबत शेवटपर्यंत काम केलेल्या श्री. नरेंद्र दाभोळकर यांनी, १९८९ साली “ महाराष्ट्र अंधश्रद्धा-निर्मूलन समिती “ची स्थापना केली, आणि ‘ संस्थापक-अध्यक्ष ‘ म्हणून अखेरपर्यंत या समितीची धुरा अतिशय समर्थपणे सांभाळली. याच संदर्भातल्या त्यांच्या विचारांना आणि त्याला अनुसरून केलेल्या कार्याला अधोरेखित करणारी बरीच पुस्तके त्यांनी लिहिलेली आहेत, जी नावाजलेल्या प्रकाशकांनी प्रकाशित केलेली आहेत.—- ‘ अंधश्रद्धा : प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम ‘, अंधश्रद्धा विनाशाय  ‘, ‘ ऐसे कैसे झाले भोंदू ‘, ‘ ठरलं– डोळस व्हायचंय ‘, ‘ तिमिरातुनी तेजाकडे ‘, ‘ विचार तर कराल ?’, ‘ भ्रम आणि निरास ‘, ‘ मती-भानामती ‘, अशी त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. “ प्रश्न तुमचे -उत्तर दाभोळकरांचे “ या शीर्षकाने त्यांच्या सविस्तर मुलाखतीची, म्याग्नम ओपस कं. ने काढलेली डी. व्ही .डी. म्हणजे त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक वेगळाच आविष्कार म्हणावा लागेल. ऑगस्ट २०१३ मध्ये झालेल्या त्यांच्या निर्घृण हत्येचा निषेध, महाराष्ट्र अं.नि.स. च्या लोकरंगमंचच्या कार्यकर्त्यांनी ‘ रिंगणनाट्य ‘ या माध्यमातून सनदशीर आणि सर्जनशील मार्गाने केला, जो अतिशय प्रभावी ठरला. 

श्री. दाभोळकर यांना रोटरी क्लबचा “ समाज गौरव “ पुरस्कार, दादासाहेब साखवळकर पुरस्कार, पुणे विद्यापीठाचा  “ साधना जीवनगौरव पुरस्कार “( मरणोत्तर ) अशासारख्या पुरस्कारांच्या जोडीने, भारत सरकारतर्फे “ पद्मश्री “ ( मरणोत्तर ) पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. तसेच, अमेरिकेतल्या ‘ महाराष्ट्र फौंडेशन ‘ने, त्यांच्यातर्फे सुरु करण्यात आलेला समाज गौरव पुरस्कार सर्वप्रथम ‘ अंधश्रद्धा निर्मूलन समिती ‘ला दिला होता. याबरोबरच विशेषत्वाने सांगण्यासारखी आणखी एक गोष्ट म्हणजे, न्यूयॉर्कच्या महाराष्ट्र फौंडेशनने २०१३ सालापासून, एखाद्या समाजहितार्थ कार्याला वाहून घेणाऱ्या व्यक्तीला “ डॉ. नरेंद्र दाभोळकर स्मृती पुरस्कार “ देण्यास सुरुवात केली आहे.

एका वेगळ्याच पण महत्वाच्या वाटेवर आयुष्यभर निकराने चालत राहिलेल्या श्री. दाभोळकर यांना कृतज्ञतापूर्वक सलाम… ?

☆☆☆☆☆

आज कवी अरुण बाळकृष्ण कोलटकर यांचाही जन्मदिन. ( १०/११/१९३२ – २५/०९/२००४ ) 

मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषांमध्ये कविता करण्याची हातोटी असणारे कवी अशी श्री. कोलटकर यांची ख्याती होती. १९६० च्या दशकात त्यांनी केलेल्या कविता, खास मुंबईतल्या विशिष्ट  अशा मराठी बोलीभाषेतल्या होत्या, ज्यात मुंबईत आलेल्या निर्वासितांच्या आणि गुन्हेगारीच्या विश्वात अडकलेल्या गुन्हेगारांच्या आयुष्याचे प्रकर्षाने दर्शन घडते— मै भाभीको बोला / क्या भाईसाहबके  ड्युटीपे मै आ जाऊ ?/ रेहमान बोला गोली चलाऊंगा /– अशासारख्या त्यांच्या कविता इथे उदाहरणादाखल सांगता येतील. मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेतल्या त्यांच्या कवितांचे संग्रह प्रकाशित झालेले आहेत, ते असे — मराठी कवितासंग्रह — अरुण कोलटकरच्या कविता, चिरीमिरी, द्रोण, भिजकी वही, अरुण कोलटकरच्या चार कविता. —इंग्रजी कवितासंग्रह –जेजुरी, काळा घोडा पोएम्स, सर्पसत्र, द बोटराइड अँड अदर पोएम्स, कलेक्टेड पोएम्स इन इंग्लिश.— यापैकी “ जेजुरी “ ही त्यांची अतिशय प्रसिद्ध साहित्यकृती ठरली होती.

श्री. कोलटकर यांना साहित्य अकादमी पुरस्कार, कुसुमाग्रज पुरस्कार, बहिणाबाई पुरस्कार, १९७६ सालचा राष्ट्रकुल काव्य पुरस्कार असे मानाचे पुरस्कार प्राप्त झाले होते. “ शब्द “ या लघुनियतकालिकाचे सहसंपादक म्हणूनही त्यांनी कार्यभार सांभाळलेला होता. 

या जोडीनेच श्री. कोलटकर हे एक उत्तम ग्राफिक डिझायनर आणि जाहिरात क्षेत्रातील अत्यंत यशस्वी कला-दिग्दर्शक  म्हणूनही प्रसिद्ध होते हे आवर्जून सांगायला हवे. 

श्री. अरुण कोलटकर यांना आजच्या त्यांच्या जन्मदिनी मनापासून आदरांजली.  ?

☆☆☆☆☆

आज श्रीमती योगिनी जोगळेकर यांचा स्मृतिदिन.  ( ६/८/१९२५ — १/११/२००५ ) 

या एक नावाजलेल्या मराठी लेखिका, कवयित्री आणि शास्त्रीय गायिका होत्या. त्यांनी काही वर्षे शिक्षिका म्हणूनही काम केले होते. याव्यतिरिक्त, राष्ट्रसेविका समितीच्या माध्यमातून त्यांनी उल्लेखनीय असे पुष्कळ समाजकार्यही केले होते. 

त्यांची एकूण ११६ पुस्तके प्रकाशित झालेली आहेत, ज्यामध्ये ५० कादंबऱ्या, ४० कथासंग्रह, कवितासंग्रह, बालकवितासंग्रह, अशा विपुल आणि वैविध्यपूर्ण साहित्याचा समावेश आहे. “ या सम हा “ ही गायनाचार्य भास्करबुवा बखले यांच्यावर लिहिलेली कादंबरी, आणि, “ रामप्रहर “ ही प्रसिद्ध गायक श्री. राम मराठे यांच्यावर लिहिलेली कादंबरी, अशा त्यांच्या दोन कादंबऱ्या विशेष उल्लेखनीय ठरल्या, आणि प्रचंड प्रसिद्ध झाल्या. त्यांची – असंग, उमाळा, मौन, घरोघरी, ऋणानुबंध, कुणासाठी कुणीतरी, नादब्रह्म, अश्वत्थ,अशी किती प्रसिद्ध पुस्तके सांगावीत ? ‘ मधुर स्वरलहरी या ‘, सखे बाई सांगते मी ‘, ‘ हरीची ऐकताच मुरली’, हे सागरा नीलांबरा ‘, अशी त्यांनी लिहिलेली गीतेही खूप गाजली. 

“पहिली मंगळागौर “ या त्या काळी गाजलेल्या मराठी चित्रपटासाठी त्यांनी पार्श्वगायन केले होते. 

‘शास्त्रीय गायिका ‘ म्हणूनही नावाजलेल्या योगिनीताईंनी वयाच्या आठव्या वर्षांपासून शास्त्रीय संगीत शिकण्यास सुरुवात केली होती. शंकरबुवा अष्टेकर, राम मराठे, संगीतकलानिधी मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर असे  मातब्बर गुरू त्यांना लाभले होते. डॉ. भालेराव स्मृती पुरस्काराच्या त्या मानकरी ठरल्या होत्या. त्यांच्याबद्दल विशेषत्वाने सांगायला हव्यात अशा दोन गोष्टी म्हणजे— रायगडाच्या पायथ्याशी त्यांच्या कवितेच्या ओळी संगमरवरात कोरून लिहिलेल्या आहेत. आणि त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या कुटुंबीयांनी “ अक्षरयोगिनी “ हा देवनागरी युनिकोड फॉन्ट उपलब्ध करून दिलेला आहे. 

अशाप्रकारे वेगवेगळ्या क्षेत्रात आपला ठसा उमटवून गेलेल्या श्रीमती योगिनी जोगळेकर यांना त्यांच्या आजच्या स्मृतिदिनी भावपूर्ण श्रद्धांजली.  ?

☆☆☆☆☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

ई – अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग.

संदर्भ : – १) कऱ्हाड शिक्षण मंडळ “ साहित्य-साधना दैनंदिनी. २) माहितीस्रोत — इंटरनेट 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

|| शुभ दीपावली ||

?  || शुभ दीपावली || ?

 

आजपासून दीपावलीला सुरुवात होत आहे. सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा….  !!!!!

 

१ नोव्हेंबर २०२१- वसुबारस !

गाय आणि वासराच्या अंगी असणारी उदारता, प्रसन्नता, शांतता आणि समृद्धी आपणास लाभो !

२ नोव्हेंबर २०२१- धनत्रयोदशी !

धन्वंतरी आपणावर सदैव प्रसन्न असू देत !

निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो ! 

धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो !

४ नोव्हेंबर २०२१- नरकचतुर्दशी !

सत्याचा असत्यावर नेहमीच विजय असावा !

अन्यायाचा प्रतिकार करण्याचे बळ आपल्याला लाभो !! 

आपल्याकडून नेहमी सत्कर्म घडो !

आपणास स्वर्गसुख नित्य लाभो !!

४ नोव्हेंबर २०२१- लक्ष्मीपूजन !

लक्ष्मीचा सहवास आपल्या घरी नित्य रहावा !

नेहमी चांगल्या मार्गाने आपणास लक्ष्मी प्राप्त होवो !

लक्ष्मीपूजनाचे भाग्य आपल्याला नेहमीच लाभो !

घरची लक्ष्मी प्रसन्न तर सारे घर प्रसन्न !

५ नोव्हेंबर २०२१- पाडवा अर्थात बलिप्रतिपदा !

पाडवा आगमनाने आपल्या आयुष्यात सदैव गोडवा यावा !

सत्याचा असत्यावरचा विजय नेहमीच नव्याने प्रेरणा देत राहो !

थोरा मोठ्यांचे आशीर्वाद आपल्याला कायमच मिळत राहोत  !

६ नोव्हेंबर २०२१- भाऊबीज !

सर्वांचे एकमेकांशी असणारे जिव्हाळ्याचे संबंध दर दिवसागणिक उजळत राहू दे !

भावा-बहिणीची साथ आयुष्यभर अतूट राहू दे !

? ही दीपावली आपणास आणि आपल्या कुटुंबास आनंदाची आणि भरभराटीची जावो .. ?

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ ३१ ऑक्टोबर – संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? ३१ ऑक्टोबर –  संपादकीय  ?

श्रीकृष्ण अर्जुनवाडकर (31 ऑक्टोबर 1926 ते 30 जुलै 2013 )

*श्रीकृष्ण अर्जुनवाडकर हे व्यासंगी अध्यापक, अभ्यासक, संशोधक होते. संस्कृत आणि अर्धमागधी हे त्यांच्या अभ्यासाचे विषय. त्यांनी मराठी, इंग्रजी आणि सस्कृतमधून लेखन केले.

संस्कृत योग, वेदान्त, उपनिषदे, भगवद्गीता, रससिद्धांत इ. विषयांवर त्यांनी लेखन केले तसेच व्याख्याने दिली. महाराष्ट्र सरकारने पाठ्यपुस्तक निर्मितीची जबाबदारी स्वत:कडे घेतली, त्यापूर्वी त्यांनी, ८वी ,९वी आणि १०वी ची पाठ्यपुस्तके तयार केली. त्यांनी खालील पुस्तके लिहिली. १.मराठी घटना,रचना परंपरा, २. अर्धमागधी घटना आणि रचना ३. अर्धमागधी शालांत प्रदीपिका ४. प्रीत-गौरी-गिरीशम् ( सस्कृत संगीतिका) ५. शास्त्रीय मराठी व्याकरण

संस्कृत भाषा आधुनिक जीवनाच्याजवळ नेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. इंग्रजी अभिवादनांना त्यांनी समर्पक सोपे शब्द सुचवले. उदा. गुड मॉर्निंग- सुप्रभातम् , गुड डे- सुदिनम्,  स्लीप वेल- सुषुप्त, गुड बाय -स्वस्ति इ॰

त्यांच्या जन्म  दिनानिमित्त त्यांचे संस्मरण.

*आनंदीबाई शिर्के

आनंदीबाई शिर्के या जुन्या काळातल्या, म्हणजे पहिल्या पिढीतल्या लेखिका आणि बालसाहित्यिका. ज्या काळात समाजात स्त्रियांचे शिकणेदेखील मान्य नव्हते, त्या काळात त्यांनी कथा लिहिल्या, आत्मचरित्र लिहिले आणि मुलांसाठीही  कथा लिहिल्या. आपल्या कथांमधून आणि ‘सांजवात’ या आत्मचरित्रातून,  जुन्या काळातील स्त्रीजीवनाचे वास्तव चित्रित केले आहे॰  एकत्र कुटुंब पद्धती, मुलींवर आणि स्त्रियांवर असलेली बंधने, समाजातील रूढी.इ.  गोष्टींचा त्यांनी आपल्या लेखनातून वेध घेतला आहे.

निबंध, कथा, बालसाहित्य, स्त्री साहित्य, अनुवादीत साहित्य (गुजरातीतून), आत्मवृत्त  असे त्यांचे त्या काळाच्या मानाने विपुल लेखन आहे.  

त्यांची बहुविध साहित्य निर्मिती स्त्रियांशी निगडीत आशा सामाजिक समस्यांचे चित्रीकरण करणारी आहे. त्या स्वत: पुरोगामी विचारांच्या होत्या. मराठा समाजातील स्त्रियांची स्थिती, गुजरातमधील सामाजिक वातावरण, जुन्या मराठी भाषेतील शब्द, म्हणींचे वैपुल्य इ. त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये सांगता येतील.

कथाकुंज, कुंजविकास, जुईच्या काळ्या, तृणपुष्पे, गुलाबजांब इ. त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. मुलांसाठी त्यांनी वाघाची मावशी, कुरूप राजकन्या व तेरावी कळ, आपली थोर माणसे इ. पुस्तके लिहिली. ‘रूपाळी’ ही त्यांची कादंबरी. त्यांच्या सर्व पुस्तकात ‘सांजवात’ हे पुस्तक विशेष गाजले. यातील निवेदन प्रांजल, हृदयस्पर्शी, वाचकाला अंतर्मुख करणारे आहे. हे पुस्तक १९७२ साली  म्हणजे त्यांच्या वयाच्या ८० व्या वर्षी प्रकाशित झाले.  समकालीन लेखकांमध्ये महत्वाच्या लेखिका म्हणून यांचे नाव घेतले जाते. मराठी साहित्य परिषदेतर्फे दरवर्षी उत्तम कथासंग्रहाला दिला जाणारा पुरस्कार ‘आनंदीबाई शिर्के’ या नावाने दिला जातो.

आज त्यांच्या स्मृतीदिंनंनिमित्त त्यांना विनम्र श्रद्धांजली.  

श्रीमती उज्ज्वला केळकर

ई – अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : – १) कऱ्हाड शिक्षण मंडळ “ साहित्य-साधना दैनंदिनी. २) माहितीस्रोत — इंटरनेट 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares
image_print