ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ १९ ऑक्टोबर – संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

? १९ ऑक्टोबर  – संपादकीय  – सुश्री मंजुषा सुनीत मुळे  ?

आज १९ ऑक्टोबर. सुप्रसिद्ध मराठी गीतकार आणि कवी श्री. शांताराम नांदगावकर यांचा जन्मदिन. ( १९/१०/१९३६ –११/७/२००९ )

 श्री. नांदगावकर यांनी अनेक भावगीते, आणि मराठी चित्रगीते लिहिली. अशी ही बनवाबनवी, अष्टविनायक, गंमतजंमत, पैजेचा विडा , नवरी मिळे नवऱ्याला, यासारख्या कितीतरी गाजलेल्या चित्रपटांसाठी त्यांनी लिहिलेली गीते, त्या चित्रपटांइतकीच लोकप्रिय झालेली आहेत. हरीनाम मुखी रंगते, सूर सनईत नादावला, ससा तो ससा की कापूस जसा, सजल नयन नित धार बरसती, विसर प्रीत विसर गीत, रुपेरी वाळूत माडांच्या बनात, प्रीतीच्या चांदराती, अशी त्यांची कितीतरी भावगीते रसिक कधीच विसरणार नाहीत. ‘ हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला ‘ हे जगप्रसिद्ध क्रिकेटवीर सुनील गावसकर यांनी गायलेले गाणे श्री. नांदगावकर यांच्या लेखणीतूनच उतरलेले आहे. याव्यतिरिक्त, १९८७ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर काढलेल्या “ दलितांचा 

राजा “ या अल्बमसाठी त्यांनी अतिशय सुरेख गीते लिहिलेली आहेत. 

आणखी एक विशेष म्हणजे, १९८५ साली श्री. नांदगावकर शिवसेनेतर्फे महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेवर निवडून गेले होते. आजच्या त्यांच्या जन्मदिनी त्यांना मनःपूर्वक आदरांजली . 

☆☆☆☆☆

आज प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया तेंडुलकर यांचाही जन्मदिन. ( १९/१०/१९५४ — १९/०९/२००२ )

गोंधळात गोंधळ, मुंबईचा फौजदार, यासारखे चित्रपट, कमला, सखाराम बाईंडर, कन्यादान अशासारखी नाटके, यात त्यांचा उत्कृष्ठ अभिनय प्रेक्षकांना पाहायला मिळाला. “ रजनी “ या टी. व्ही. वरील मालिकेतून त्या अक्षरशः घराघरात पोहोचल्या. त्यांनी काही हिंदी सिनेमांमध्ये तसेच सीरियल्समध्येही भूमिका केल्या होत्या. सुप्रसिद्ध नाटककार विजय तेंडुलकर यांची ही मुलगी स्वतःही एक चांगली लेखिका म्हणून सर्वांना परिचित होती. सामाजिक समस्या हा त्यांच्या लेखनाचा अनेकदा विषय असे. त्यांनी अनेक लघुकथाही लिहिलेल्या होत्या. आणि त्यापैकी काही पुरस्कारप्राप्तही ठरल्या होत्या. ‘पंचतारांकित’ हे त्यांचे अनुभवप्रधान लेखन, तसेच, ज्याचा त्याचा प्रश्न, असंही , अशी त्यांची पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. लेखिका आणि अभिनेत्री म्हणून कारकीर्द गाजवलेल्या प्रिया तेंडुलकर यांना भावांजली . 

 

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

ई – अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग.

संदर्भ :- १) कऱ्हाड शिक्षण मंडळ “ साहित्य-साधना दैनंदिनी “.  २) गूगल गुरुजी 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ १८ ऑक्टोबर – संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

? १८ ऑक्टोबर  – संपादकीय  – श्रीमती उज्ज्वला केळकर ?

सरस्वती सन्मान –

भारतातील प्रतिष्ठित साहित्यिक पुरस्कारांमध्ये सरस्वती सन्मान या पुरस्काराचा  समावश होतो. विद्यादेवी सरस्वतीच्या नावाने हा पुरस्कार दिला जातो. भारतीय संविधांनातील आठव्या सूची मध्ये निर्देशित केलेल्या २२ भाषांसाठी हा पुरस्कार, भारतातील प्रख्यात के. के. बिर्ला फाउंडेशन द्वारा प्रदान केला जातो. इ. स. १९९१पासून हा पुरस्कार देण्यास सुरुवात झाली. हा पुरस्कार देण्यासाठी साहित्य क्षेत्रातील विद्वान आणि सरस्वती सन्मानप्राप्त साहित्यिकांची एक समिती, सन्माननीय साहित्यिकाची निवड करते. पुरस्कार देण्यासाठी निवड करण्यात आलेल्या साहित्यिकाच्या मागील दहा वर्षांच्या लेखनातील प्रकाशित साहित्यकृतीला  दिला जातो. प्रथम वर्षी हा सन्मान श्री हरिवंश राय बच्चन यांच्या चार खंडामध्ये प्रसिद्ध झालेल्या हिन्दी भाषेतील आत्मचरित्रासाठी दिला गेला.

*मराठी मध्ये हा सन्मान विजय तेंडुलकर यांना १९९३ साली मिळाला. त्यांची सखाराम बाईंडर, घाशीराम कोतवाल, गिधाडे, कन्यादान ही नाटके द. लास्ट डेस ऑफ सरदार पटेल (चित्रपट कथा ) प्रसिद्ध आहेत.

*महेश एलकुंचवार यांना हा सन्मान २००२ साली मिळाला.

त्यांची विनाशवेळा, ( हेनरी मिलरच्या पुस्तकाचा अनुवाद),  यातनाघर, (नाटक)  पश्चिम प्रभा, सप्तक (वैचारिक, आत्मपर) , त्रिबंध, (ललितबंध) वाडा चिरेबंदी (नाटक) , सप्तक ( वैचारिक)  इ. पुस्तके प्रसिद्ध आहेत.  

श्रीमती उज्ज्वला केळकर

(संपादक मंडळासाठी)

ई अभिव्यक्ती मराठी

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ १७ ऑक्टोबर – संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

? १७ ऑक्टोबर  – संपादकीय  – श्री सुहास रघुनाथ पंडित ?

आज 17 ऑक्टोबर. मराठी साहित्यातील वेगवेगळ्या वाटेने जाणा-या तीन सारस्वतांचा आज स्मृतीदिन!

पाणिनी हे संस्कृत भाषेचे व्याकरणकार. पण मराठी भाषेचे पाणिनी म्हणून ज्यांना संबोधले जाते त्या दादोबा पांडुरंग तर्खडकर यांचा आज स्मृतीदिन. ते व्याकरणकार तर होतेच.पण त्याशिवाय त्यानी विपुल लेखन केले आहे. मानवधर्मसभा, परमहंससभा आणि प्रार्थना समाज या संस्थांचे ते संस्थापक सदस्य होते. मराठी बरोबरच त्याना फार्शी व संस्कृत भाषेचे ज्ञानही होते. इंग्रज सरकारने त्यांना रावबहादूर ही पदवी दिली  होती.

महाराष्ट्र भाषेचे व्याकरण हे व्याकरणाचे पहिले पुस्तक त्यांनी 1836 मध्ये प्रकाशित केले. त्याची सुधारित दुसरी आवृत्ती 1850 ला निघाली. 1865मध्ये मराठी लघुव्याकरण हे पुस्तक प्रसिद्ध झाले. या शिवाय त्यांनी आत्मचरित्र, वैचारिक, शैक्षणिक, नकाशा संग्रह असे विपुल लेखन केले आहे.

कोकणातील उफळे या गावी जन्मलेले श्री रवींद्र पिंगे यांचे बालपण मुंबईत गेले. पुढे ते अर्थशास्त्राचे पदवीधर झाले.मराठी साहित्यात ललित गद्य लेखनात त्यांचा मोलाचा वाटा आहे. कथा, कादंबरी, प्रवासवर्णन,आत्मपरलेखन, ललित असे विविधांगी लेखन त्यांनी केले आहे. सुमारे 32 पुस्तके त्यांच्या नावावर आहेत.त्यात प्रामुख्याने ललित लेख संग्रह आहेत.निवडक पिंगे या त्यांच्या पुस्तकात त्यांनी लिहिलेल्या तीनशे पैकी 26 नामवंत व्यक्तींच्या व्यक्तिरेखा आहेत. पाश्चात्य साहित्याचा परिचय करून देणारी पश्चिमेचे पुत्र, हिरवी पाने या सारखी पुस्तकेही त्यानी लिहीली आहेत. हलकी फुलकी लेखनशैली, काव्यात्मक लेखन, मराठी आणि इंग्रजी साहित्याच्या व्यासंगाचे दर्शन, प्रचंड प्रवासातील सूक्ष्म निरीक्षणे ही त्यांच्या लेखना ची वैशिष्ट्ये म्हणावी लागतील.

अमरावती येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्री.के.ज.पुरोहित उर्फ शांताराम यांचा आज स्मृतीदिन. अंधारवाट, चंद्र माझा सखा, मनमोर,  संध्याराग शांतारामकथा इ.पुस्तके त्यांच्या नावावर आहेत. याशिवाय प्रातिनिधिक लघुनिबंधसंग्रह, मराठी कथा विसावे शतक, मराठी विश्वकोश यासारख्या ग्रंथांचे त्यांनी संपादन व सहसंपादन केले आहे. शांताराम या नावाने त्यांनी विपुल कथालेखन केले आहे.

मराठी साहित्यातील या तीन साहित्यिकांना सादर प्रणाम.

 श्री सुहास रघुनाथ पंडित

(संपादक मंडळासाठी)

ई अभिव्यक्ती मराठी

संदर्भ: विकिपीडिआ, इंटरनेट.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ १६ ऑक्टोबर  – संपादकीय  – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

? १६ ऑक्टोबर  – संपादकीय  – श्रीमती उज्ज्वला केळकर ?

*सोपानदेव चौधरी – (१९०७-१९८२)

‘आली कुठूनशी कानी टाळ मृदुंगची धून’ हे गाणे ऐकले की आठवतात सोपानदेव चौधरी. अलौकिक प्रतिभेच्या निसर्गकन्या बहिणाबाई चौधरी यांचे, सोपानदेव सुपुत्र. ते रवीकिरण मंडळाचे सभासद होते. यातील सारे सभासद कवी आपल्या कविता गाऊन सादर करत. सोपानदेव चौधरीही आपल्या कविता गाऊनच सादर करायचे. काव्यकेतकी, अनुपमा, छंद , लीलावती इ. त्यांचे कवितासंग्रह आहेत. आचार्य अत्रे यांच्या सांगण्यावरून ते गद्य लेखनाकडेही वळले.

एकदा नागपूर येथे कविसंमेलनासाठी त्यांना निमंत्रण होते. त्या प्रमाणे ते गेले. त्यांनी आपल्या कविता गाऊन दाखवल्या. श्रोत्यांनाही त्या खूप आवडल्या. पण रिपोर्टमध्ये त्यांचे नाव नव्हते. ते उदास झाले. घरी गेल्यावर बहिणाबाईंनी त्यांना त्याचे कारण विचारले. त्यांनी संगितले. त्यावर बहिणाबाई म्हणाल्या, ‘कुणी प्राणी मारत होता. ते पाहून तिथून जाणार्‍या एका माणसाने त्याचा जीव वाचवला. ‘छापून येणार नाही, म्हणून त्याने तसे केले नसते तर ?’ पुढे त्यांचे उत्स्फूर्त उद्गार आहेत,

‘अरे, छापीसनी आलं ते मानसाले समजलं

छापीसनी राहिलं ते देवाला उमजलं’ किती हृद्य आहे त्यांचं हे समजावणं॰ त्या म्हणाल्या, ‘अरे, तुझी सेवा रुजू झाली ना? मग झालं तर!’

शब्दांवर कोटी करण्याचा त्यांचा छंद होता. ‘मी कोट्याधीश’ आहे असे ते म्हणायचे.पुढे पुढे यांना कॅन्सर झाला. त्या काळात हॉस्पिटलमध्ये पडून पडूनही त्यांनी १०-१५ कविता लिहिल्या. एकदा शंकर वैद्य त्यांना भेटायला गेले आणि त्यांच्या अस्थिपंजर देहाकडे पाहून म्हणाले, हे काय हे आप्पा!’ त्यावर ते म्हणाले, ‘आता मी हाडाचा कवी झालो.’अशा त्यांच्या काही आठवणी डॉ. विठ्ठल प्रभू यांनी आपल्या लेखात  सांगितल्या आहेत.

*ना. सं इनामदार (१९२३ ते २००२) नागनाथ संताराम ईनामदार हे ऐतिहासिक कादंबरीकार म्हणून ओळखले जातात. त्यांनी १६ ऐतिहासिक कादंबर्‍या लिहिल्या. इतिहासातील उपेक्षित  पात्रांना न्याय देणारा लेखक अशी त्यांची ओळख आहे. संशोधन, इतिहासाचे सर्जनशील आकलन, प्रसंगातील नाट्यमयता, चित्रदर्शी शैली त्यामुळे ते लोकप्रिय कादंबरीकार ठरले. त्यांच्या सगळ्या कादंबर्‍यांमध्ये राऊ, झेप, शाहेंशाह, मंत्रावेगळा इ. कादंबर्‍या लोकप्रीय ठरल्या भारतीय ज्ञानपीठाने त्यांच्या राऊ कादंबरीचा राऊ स्वामी या नावाने हिंदीतील अनुवाद प्रकाशित केलाय.

*गो. पु. देशपांडे (१९३८ – २०१३) गोविंद पुरुषोत्तम देशपांडे यांनी मराठीत नाटके, कविता आणि निबंधही लिहिले. दिल्लीच्या जवाहर विद्यापीठातून चीन हा विषय घेऊन त्यांनी पीएच.डी. ही पदवी मिळवली व याच विषयावर हॉँगकॉँगयेथून पदविका मिळवली. पुढे दिल्ली विश्वविद्यालयातून राज्यशास्त्राचे प्राध्यापक म्हणून ते निवृत्त झाले.

त्यांनी मराठी आणि इंग्रजी दोन्हीमधून लेखन केले. त्यांनी वैचारिक, राजकीय, रंगभूमीविषयक, साहित्यविषयक, लेखन केले. प्रायोगिक नाट्यलेखनाच्या प्रवाहात विचारनाट्याची धारा त्यांनी पहिल्यांदा निर्माण केली. राजकीय जाणीवा ही त्यांच्या लेखनामागची प्रेरणा होती. अंधारयात्रा, उध्वस्त धर्मशाळा, चाणक्य विष्णुगुप्त, रस्ते, शेवटचा दिवस. सत्यशोधक इ. नाटके त्यांनी लिहिली. सत्यशोधक नाटकाचे हिंदीत रूपांतर झाले. याशिवात इत्यादी इत्यादी (कवितासंग्रह) ‘ चर्चक हे निबंधाचे पुस्तक २ भागात, राहिमतपूरकरांची निबंधमाला २ भागात, नाटकी निबंध हा लेखसंग्रह इ. लेखन त्यांनी केलेले आहे.

त्यांच्या साहित्याचे, इंग्रजी, कानडी, हिन्दी, तमीळ, अशाविविध भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत. त्यांच्यावर बहुआयामी गो.पु.’या लघुपटाची निर्मिती झालेली आहे. त्यांनी, शिवाजी, महात्मा फुले, चाणाक्य इ. दूरचित्रवाणीवरील मालिकांसाठी लेखन केले आहे. चित्रपटांसाठी संवाद लेखनही त्यांनी केले आहे.

गो. पु. देशपांडे यांना जयवंत दळवी पुरस्कार, महाराष्ट्र फाऊंडेशनचा जीवन गौरव पुरस्कार, राज्य शासनाचा अनंत काणेकर पुरस्कार, संगीत नाटक अ‍ॅकॅडमीचा पुरस्कार व मरणोत्तर रूपवेध प्रतिष्ठानचा तन्वीर पुरस्कार लाभले आहेत. (हा पुरस्कार श्रीराम लागूंनी आपल्या मुलाच्या तन्वीरच्या स्मरणार्थ ठेवला आहे.)       

श्रीमती उज्ज्वला केळकर

(संपादक मंडळासाठी)

ई अभिव्यक्ती मराठी

संदर्भ :- १) कऱ्हाड शिक्षणमंडळ, “ साहित्य- साधना दैनंदिनी “ . २) गूगल गुरुजी

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ १५ ऑक्टोबर – संपादकीय – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

?१५ ऑक्टोबर  – संपादकीय  – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ?

? वैविध्यपूर्ण विचारांचं सोनं नेहेमीच लुटत राहणाऱ्या ई – अभिव्यक्तीच्या सर्व लेखक – लेखिका, कवी – कवयित्री आणि सर्व रसिक वाचकांना आजच्या “दसऱ्याच्या शुभदिनी“ संपादक मंडळाकडून अनेकानेक शुभेच्छा. ?

आज “वाचन-प्रेरणा दिन“ — जगभरातील संपूर्ण साहित्यक्षेत्राला ज्यांच्यामुळे प्रसिद्धीच्या आणि लौकिकाच्या झोतात येण्यास आणि दीर्घकाळ त्या झोतात राहण्यास उद्युक्त केले जाते, अशा तमाम रसिक वाचकांना या विशेष दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मा. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन हा वाचन-प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. ज्ञानसंपन्न आणि माहितीसमृद्ध समाजाची घडण, व्यक्तिमत्व विकास, साहित्य आणि भाषाविकास यासाठी वाचन संस्कृती जोपासणे गरजेचे आहे, हा दूरदर्शी विचार यामागे आहे. डॉ. कलाम म्हणत असत की ‘एक चांगले पुस्तक शंभर मित्रांप्रमाणे असते.’ त्यांचा रोख मुख्यत्वे विद्यार्थी आणि तरुण वर्गाकडे होता.

 “ जे आपणासी ठावे ते इतरांसी सांगावे । शहाणे करून सोडावे सकल जन “ हा अतिशय व्यापक विचार श्री. रामदास स्वामींनीही खूप वर्षांपूर्वी समाजाला दिलेला आहे. इथे 

 “ शहाणे “ या शब्दाचा अर्थ ‘विवेक-विचार- समृद्ध’  हाच अपेक्षित आहे, असे निश्चितपणे म्हणावे लागेल. आणि आपले विचार इतरांच्या विचारांशी ताडून पाहिले तरच ते जास्त जास्त समृद्ध होऊ शकतात. इतरांचे विविध विषयांवरचे विचार जाणून घेण्यासाठी  “वाचन “ हा  राजमार्ग आहे. . अभिवाचन, काव्यवाचन, समूह वाचन, वाचन कट्टा, असे अनेक उपक्रम याच उद्देशाने सुरु झालेले दिसतात. म्हणूनच, प्रत्येक जातिवंत वाचकाने इतर अनेकांना वाचनासाठी प्रेरणा द्यावी, या उद्देशाने हा दिवस साजरा केला जावा , एवढीच अपेक्षा. 

☆☆☆☆☆

आज १५ ऑक्टोबर — डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन . ( १५/१०/१९३१ –२७/०७/२०१५ ) 

“  पीपल्स प्रेसिडेंट “ म्हणून गौरवले जाणारे भारताचे ११ वे राष्ट्रपती, भारतरत्न पुरस्कार आणि इतर कितीतरी पुरस्कारांचे मानकरी, “ मिसाईल मॅन “ म्हणून जगभरात ख्यातनाम असलेले, आणि विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रात काम करण्यासाठी उत्सुक असणाऱ्या सर्वांचेच “ प्रेरणास्थान “ असणारे एक सर्वोत्कृष्ट वैज्ञानिक आणि शास्त्रज्ञ — अशी डॉ. कलाम यांची ओळख खरंतर सर्वांनाच आहे. 

त्यांच्याबद्दल विशेषत्वाने सांगण्याची गोष्ट अशी की इतक्या विविध कामांमध्ये सतत अतिशय कार्यमग्न असूनही डॉ. कलाम यांनी पंचवीसहूनही जास्त पुस्तके लिहिलेली आहेत. ही बहुतेक सर्व पुस्तके इंग्रजी भाषेत लिहिलेली असली, तरी इतर अनेक भाषांप्रमाणेच मराठीतही ती अनुवादित केली गेली असल्याने मराठी वाचकांसाठी ज्ञानाचा आणि माहितीचा मोठाच खजिना उपलब्ध झालेला आहे. त्यापैकी काही पुस्तकांचा नामोल्लेख इथे करणे फक्त  उचितच नाही तर आवश्यक आहे ——–” Wings of Fire “– “ अग्निपंख “ हे त्यांचे आत्मचरित्र. // “ अदम्य जिद्द “ – (अनुवादित नाव ) // “ Ignited Minds–Unleashing the power within India “–” प्रज्वलित मने “ // “ India – My Dream “ // “India 2020 – a vision for The New millenium “ —-

“ भारत २०२० : नव्या सहस्रकाचा भविष्यवेध “ // “ सायंटिस्ट टू प्रेसिडेंट “ याच अनुवादित नावाचे त्यांचे आत्मकथन // “ Turning Points “– याच नावाने मराठी अनुवाद . ——आणि इतर कितीतरी पुस्तके. आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे, सन २०१२ मध्ये त्यांनी भारतीय तरुणांसाठी 

“ भ्रष्टाचाराचा पराजय करण्यासाठी मी काय करू शकतो “ या विषयावर आधारित एक कार्यक्रम सुरु केला होता. त्यांना फक्त भारतातच नाही तर जगभरातल्या अनेक देशांनी सन्मानपर पुरस्कार प्रदान करून गौरवले होते. खरोखरच भारताचे “ भूषण “ ठरलेल्या डॉ. अब्दुल कलाम यांना त्यांच्या आजच्या जन्मदिनी अतिशय मनापासून आदरांजली . 

☆☆☆☆☆

आज प्रसिद्ध कवी श्री. नारायण सुर्वे यांचा स्मृतिदिन. ( १५/१०/१९२६ – १६/०८/२०१० ) 

समाज परिवर्तन व्हायलाच हवे, हा विचार अगदी मनापासून करणाऱ्या श्री. नारायण सुर्वे यांनी आपला हा विचार स्वतःच्या कवितांमधून, अनेक कवनांमधून अतिशय प्रभावीपणे लोकांसमोर मांडला. हा विचार कविवर्य केशवसुत यांच्या जातकुळीतला होता. याबाबत अशी एक आठवण सांगितली जाते की, श्री. पु.ल.देशपांडे एकदा असे म्हणाले होते की, “ अरे, केशवसुत कशाला शोधताय ? तुमचा केशवसुत परळमध्येच रहातोय.” या एकाच वाक्यात सुर्वे यांच्याबद्दल बरंच काही सांगितलं गेलं आहे असं म्हटल्यास ते वावगं ठरणार नाही. श्री सुर्वे यांच्यावर मार्क्सवादी विचारांचा पगडा होता, असं त्यांच्या कविता बघता म्हटलं जातं—–

“शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले , रात्र धुंद झाली —

भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बरबाद झाली —-” किंवा —

“असे आम्ही लक्षावधी नारीनर, दिवस असेतो वावरतो–

राबता , खपता आयुष्य मेणबत्तीसम विझवून घेतो —” 

 —-अशा धाटणीची  त्यांची कविता संवेदनशील मनाला थेटपणे  जाऊन भिडणारी आहे. 

१९९५ साली परभणी इथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद श्री. सुर्वे यांनी भूषविले होते. पद्मश्री पुरस्काराबरोबरच सोविएत रशियाच्या नेहरू अवॉर्डसह अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले होते. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पुणे येथे, तळागाळातल्या साहित्यिकांना आणि कलावंतांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणारी, “ नारायण सुर्वे कला अकादमी “ स्थापन करण्यात आली आहे. त्यांच्या नावानेही काही पुरस्कार दिले जातात. त्यांचे काव्यसंग्रहही प्रकाशित झाले आहेत. कवितेची अशी वेगळी वाट आपलीशी करणारे कविवर्य नारायण सुर्वे यांना विनम्र श्रद्धांजली.  

☆☆☆☆☆

मराठी नाटककार आणि विनोदी लेखन करणारे साहित्यिक श्री. वसंत सबनीस यांचाही आज स्मृतिदिन  ( ६/१२/१९२३ – १५/१०/२००२ ) 

सुरुवातीच्या काळात कवी म्हणून ओळख प्राप्त केलेले श्री. सबनीस, पुढे विनोदी लेखक आणि नाटककार म्हणून प्रसिद्ध झाले. चिल्लरखुर्दा, मिरवणूक, आमची मेली पुरुषाची जात , असे त्यांचे बरेच विनोदी लेखसंग्रह, आणि, बोका झाला संन्यासी, आत्याबाईला आल्या मिशा , अशासारखे बरेच विनोदी कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. तसेच सौजन्याची ऐशी तैशी , गेला माधव कुणीकडे, घरोघरी हीच बोंब, अशी त्यांची नाटके गाजलेली आहेत. विच्छा माझी पुरी करा या त्यांच्या नाटकाने तर यशस्वितेचा विक्रम केलेला आहे. तमाशा या लोककला प्रकाराला आधुनिक रूप देण्याचा पहिला महत्वाचा प्रयत्न म्हणून त्यांचा “ छपरी पलंगाचा वग “ या नावाचा वग खूपच उल्लेखनीय ठरला होता, आणि त्यावरूनच “ विच्छा माझी —” हे नाटक साकार झाले. मार्मिक राजकीय भाष्य आणि चतुर संवाद ही वैशिष्ट्ये असणाऱ्या या नाटकाने लोकनाट्याला वेगळे परिमाण दिले. या नाटकाचे “ सैंय्या भये कोतवाल “ हे हिंदी रूपांतरही खूप लोकप्रिय झाले. सबनीस यांनी लिहिलेले दोन एकांकिका-संग्रह प्रसिद्ध आहेत. त्यांना दोन वेळा महाराष्ट्र राज्याचा ‘ उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार ‘ दिला गेला होता. “ किशोर “ या तेव्हाच्या प्रसिद्ध मासिकाचे ते प्रमुख संपादक होते. श्री. वसंत सबनीस यांना मनःपूर्वक श्रद्धांजली.  

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

(संपादक मंडळासाठी)

ई अभिव्यक्ती मराठी

संदर्भ :- १) कऱ्हाड शिक्षणमंडळ, “ साहित्य- साधना दैनंदिनी “ . २) गूगल गुरुजी

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ १४ ऑक्टोबर – संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

?१४ ऑक्टोबर  – संपादकीय  – श्री सुहास रघुनाथ पंडित ?

आज 14 ऑक्टोबर. सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक श्री.सुभाष भेंडे आणि थोर विचारवंत श्री.आ.ह.साळुंखे यांचा आज जन्मदिवस.

श्री.सुभाष भेंडे यांचा जन्म 14/10/1936 ला गोव्यातील बोरी येथे झाला. त्यांचे शिक्षण सांगली व पुणे येथे झाले. कीर्ती महाविद्यालय, मुंबई येथे त्यांनी अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून दीर्घ काळ सेवा केली.अर्थशास्त्रातील डॉक्टरेट संपादन केली असली तरी अंगभूत साहित्यिक गुणांमुळे त्यांच्या कडून विविध विषयांवरील सुमारे पन्नास पुस्तकांची निर्मिती झाली.अदेशी, अंधारवाटा, उध्वस्त, ऐंशी कळवळ्याची जाती, गड्या आपला गाव बरा, हास्यतरंग, दिलखुलास ही त्यातील काही पुस्तके. 2003साली कराड येथे भरलेल्या अ.भा.मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.तसेच 21 व्या गोमंतक मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. 13/12/2010 रोजी त्यांचे निधन झाले.

श्री.आण्णासाहेब हरी तथा आ.ह.साळुंखे यांचा जन्मही आजचाच. खाडेवाडी ता.तासगाव जि.सांगली येथे 1943 ला त्यांचा जन्म झाला. मराठी व संस्कृत या विषयात एम्.ए. व संस्कृत विषयात पी.एच्.डी. त्यांनी संपादन केली आहे. सातारा येथील लालबहाद्दूर शास्त्री महाविद्यालयात 32 वर्षे अध्यापनाचे कार्य केले. सुमारे साठ ग्रंथांचे लेखन त्यांच्या हातून झाले आहे. हे सर्व लेखन सांस्कृतिक परिवर्तनाचा पाया घालून विचारांना दिशा देणारे असे आहे. गौतम बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा पुढे चालवणारे थोर विचारवंत अशी त्यांची ख्याती आहे. विचारवेध संमेलन, सत्यशोधक संमेलन, विद्रोही साहित्य संमेलन, शिवाजी विद्यापीठ इतिहास परिषद अशा अनेक ठिकाणी त्यांनी अध्यक्षपद भूषविले आहे.

समाजस्वास्थ्यासाठी संततिनियमन आणि लैंगिक शिक्षण यासंबंधी बुद्धीवादी विचार प्रवर्तन  व प्रत्यक्ष कार्य करणारे थोर विचारवंत कै.रघुनाथ धोंडो कर्वे यांचा आज स्मृतीदिन. (1953) गणित विषयातील प्रावीण्याशिवाय समाज प्रबोधनाचे फार मोठे कार्य त्यांनी केले आहे.त्यांच्या काही कलाकृती… संततिनियमन -विचार आणि आचार, गुप्तरोगापासून बचाव, आधुनिक कामशास्त्र, आधुनिक आहारशास्त्र यावरून त्यांच्या कार्याची कल्पना येईल.

साहित्यसम्राट न. चि. केळकर यांचा आज स्मृतीदिन (1947).केसरी आणि मराठा या वृत्तपत्रांचे 41 वर्षे संपादन, नाटक, निबंधलेखन, सुभाषिते, विनोद अशा सर्व प्रांतात त्यांनी विपुल लेखन केले आहे.अमात्य माधव, तोतयाचे बंड, चंद्रगुप्त, यासारखी नाटके,ग्यारीबाल्डीचे चरित्र, लोकमान्यांच्या चरित्राचे दोन खंड, भारतीय तत्वज्ञान,मराठे आणि इंग्रज, ज्ञानेश्वरी सर्वस्व, हास्य विनोद मिमांसा, अशा पुस्तकांची निर्मिती त्यांच्या नावावर आहे.

थोर इतिहास संशोधक सेतु माधवराव पगडी यांचा आज स्मृतीदिनानिमित्त. (1994) ते महाराष्ट्र राज्याचे सचीव म्हणून कार्यरत होते. त्याशिवाय इतिहास संशोधनासाठी त्यांनी मोलाचे कार्य केले. विशेषतः शिवकालीन इतिहास हा त्यांचा आवडता विषय होता. त्यांना पद्मभूषण या नागरी किताबाने  गौरवण्यात आले होते.

वरील माहिती विविध लेख,व इंटरनेट वरून उपलब्ध झाली आहे.

सुहास रघुनाथ पंडित

(संपादक मंडळासाठी)

ई अभिव्यक्ती मराठी

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ १३ ऑक्टोबर – संपादकीय ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

?१३ ऑक्टोबर  – संपादकीय  ?

  • गिरीजाबाई केळकर

ज्या काळात स्त्रीयांचे लेखन समाजमान्य नव्हते, त्या काळापासून गिरीजाबाई केळकर या लेखन करत होत्या. म्हणजे स्त्री लेखिकांच्या पहिल्या पिढीतल्या त्या लेखिका. सुरूवातीला त्यांनी ज्ञानप्रकाशमध्ये लिहायला सुरुवात केली. हे लेखन त्यांनी निनावी केलं होतं. काकासाहेब खाडीलकर यांनी स्त्रीयांचे बंड’ असे नाटक लिहिले. त्याला उत्तर म्हणून की काय, त्यांनी पुरूषांचे बंड हे नाटक लिहिले. हे नाटकही त्यांनी निनावीच लिहिले होते. पुढे भारत नाटक कंपनीच्या य. ना. टीपणीस यांनी ते रंगभूमीवर आणले. त्या पहिल्या स्त्री नाटककार आहेत. त्यांनी पुढे आयेषा, मांदोदरी, राजकुवर, वरपरीक्षा, सावित्री इ. नाटके लिहिली.

ज्ञानप्रकाशमध्ये त्यांनी लिहिलेल्या लेखांची गृहिणीभूषण नावाची पुस्तके, दोन भागात प्रकाशित झाली. समाजचित्रे -2 भाग, संसार सोपान हे त्यांचे वैचारिक लेख आहेत. त्यांनी ‘स्त्रीयोनुं वर्ग या गुजराती पुस्तकाचा स्त्रीयांचा वर्ग हा अनुवादही केला आहे. न. चिं. केळकर यांच्या त्या वाहिनी. पुढे त्यांचे चिरंजीव मनोहर केळकर यांनी वङ्मयशोभा नावाचे साहित्यिक मासिक काढून अनेक वर्ष चालवले.

स्त्रीयांचे लेखन समाजमान्य नव्हते, त्या काळात गिरीजाबाई केळकर यांनी इतके समृद्ध साहित्य निर्माण केले आणि पुढील लेखिकांना लेखनाचा मार्ग प्रशस्त करून दिला, त्याबद्दल त्यांचा अभिमान मिश्रित आदर वाटतो. त्यांचा जन्म १८८६ सालचा तर त्यांचा स्मृतीदिन १९८०सालचा.

  • इंदूमती शेवडे 

इंदूमती शेवडे या लेखिका होत्या. पत्रकारही  होत्या. त्यांनी नागपूर तरुण भारतमध्ये महिलांचे मनोगत हे सदर अनेक वर्षे चालवले. नंतर त्या दिल्लीला गेल्या. तिथे त्यांनी नॅशनल बुक ट्रस्टने प्रसिद्ध केलेल्या अनेक पुस्तकांचे इंग्रजीत भाषांतर केले. त्यांचा जन्म १३ ऑक्टोबरचा दिल्लीत त्यांनी ‘मिर्झा गलीब’ची माहिती मिळवली. नागपूरला पुन्हा गेल्यावर त्यांनी  ‘मिर्झा गालीबचे चरित्र लिहिले. त्या उत्तम चित्रकारही होत्या. आपल्या पुस्तकातील चित्रे त्यांनी स्वत:च काढली आहेत.

त्यांचे संत कवियत्री हे पुस्तक स्त्रीमुक्तीच्या चळवळीच्या अभ्यासातील पहिले पुस्तक मानले जाते. महदाईसा, मुकताबाई, जनाबाई, बहिणाबाई, वेणाबाई या ५ संत कवियात्रींच्या काव्याचा या पुस्तकात वेगळ्या दृष्टीने विचार आहे. या शिवाय, इये साहेबाचीये नागरी’, पु.य. देशपांडे (चरित्र) इ. त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत.

त्यांनी नागपूर आकाशवाणी वरून अनेक श्रुतीकाही सादर केल्या.

  • लक्ष्मण लोंढे

लक्ष्मण लोंढे हे विज्ञान कथा लेखक म्हणून प्रसिद्धा होते. त्यांची दुसरा आईन्स्टाईन   ही कथा सायन्स टूडे या मासिकात प्रकाशित झाली आणि पुढे या कथेला जागतिक सर्वोत्कृष्ट कथा म्हणून कॅन्सास विद्यापीठाचा पुरस्कार मिळाला. त्यांची एक कथा जेम्स गुण यांच्या द रोड तू सायन्स या पुस्तकाच्या १९८९ च्या  आवृत्तीत निवडली गेली आहे. अशा तर्‍हेने आंतरराष्ट्रीय बहुमान मिळवणारे ते भारतातील पहिले विज्ञान लेखक.त्याचा जन्म १३ ऑक्टोबर १९४५ साली झाला.       

 विज्ञान कथांशिवाय त्यांनी अन्य ललित लेखनही केले. सोबतमध्ये, लक्ष्मण झूला या नावाने ते सादर चालवीत. असं घडलंच नाही ही त्यांची कादंबरी, आणि वसंत पुन्हा बहरला हे त्यांनी लिहिलेले चरित्र. याशिवाय त्यांची थॅंक्यू इमस्टर फॅरॅडे, काऊंट डाउन, देवासि जीवे मरिले इ. पुस्तके विज्ञान पुस्तके म्हणून खूप गाजली.

त्यांच्यादुसरा आईन्स्टाईन या पुस्तकाला कॅन्सास विद्यापीठाचा, त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य सरकारचाही पुरस्कार मिळाला.        

  • लीलाताई दीक्षित

लीलाताई दीक्षितांनी लग्नानंतर एम. ए. पीएच. डी. या पदव्या घेतल्या. नंतर पुण्याच्या एस.एन.डी. टी. कॉलेजमध्ये अध्यापनाचे काम केले. बालसाहित्याच्या लेखिका म्हणून त्यांची विशेष ओळख आहे. गंमत गाव, गाणारे झाड, नाच रे मोरा, पंख नवे, पॉपतचा झाड फुलांना रंग मिळाले. इ. बालसाहित्याची पुस्तके लिहिली. बालसाहित्यातील त्यांचे योगदान लक्षात घेऊन त्यांना २००५ मध्ये पर्भणी येथे झालेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांना देण्यात आले. त्यांचा जन्म १३ ऑक्टोबर १९३५ मध्ये झाला.

विविध विषयांवरील त्यांनी ५० पुस्तके लिहिली. बालसाहित्याशिवाय त्यांनी आनंदयोगिनी(९ स्त्री संतांची चरित्रे) , अंतरीचे भावे (आठवणी), आजोबांचे घर, घर आमचा कोकणातलं, स्वामी अपरांताचा ( कादंबरी) इ. पुस्तके लिहिली. लिहिली. प्राचीन मराठी साहित्यातील स्त्री दर्शनया त्यांच्या पुस्तकाला महाराष्ट्र राज्य सरकारचापुरस्कार मिळाला.       

श्रीमती उज्ज्वला केळकर

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ 

मराठी विभाग. 

संदर्भ : कर्‍हाड शिक्षण मंडळ ‘साहित्य साधना’ दैनंदिनी , गुगल गुरुजी

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ १२ ऑक्टोबर – संपादकीय ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

 

( १२/१०/१९२२ – ६/६/२००२ )

?१२ ऑक्टोबर  – संपादकीय  ?

आज १२ ऑक्टोबर :- कवयित्री शांता शेळके यांचा जन्मदिन .

श्रीमती शांता शेळके या एक अतिशय प्रतिभासंपन्न कवयित्री तर होत्याच, पण त्यांची एकूणच साहित्यिक कारकीर्द चौफेर- चतुरस्त्र अशीच होती, ज्याबद्दल बोलावे तेवढे कमीच आहे. त्या प्राध्यापिका होत्या, गीतकार, उत्कृष्ट लेखिका, कादंबरीकार, अनुवादिका, बालसाहित्यकार,आणि पत्रकारही होत्या. सुरुवातीच्या काळात ‘ वसंत अवसरे ‘ या टोपण नावानेही त्यांनी काव्यरचना केलेल्या आहेत. आचार्य अत्रे यांच्या “ नवयुग “ मध्ये त्यांनी ५ वर्षं उपसंपादक म्हणून काम केले होते. चित्रपट सेन्सॉर बोर्डाच्या , तसेच राज्य नाटक परिनिरीक्षण मंडळाच्या सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले होते. १९९६ साली आळंदी  येथे झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले होते. तसेच काही पुरस्कार त्यांच्या नावाने दिले जातात. “ आठवणीतील शांताबाई “, “ शांताबाईंची स्मृतीचिन्हे “, अशासारखी पुस्तकेही त्यांच्या कार्यकर्तृत्वावर लिहिली गेली आहेत. त्यांची अनेक काव्ये खरोखरच अजरामर झालेली आहेत, हे निर्विवाद सत्य आहे. त्यामुळे ‘ निवडक ‘ हा शब्द त्याबाबतीत वापरताच येणार नाही.

स्वतःला उपजतच लाभलेल्या अतिशय संपन्न अशा प्रतिभेच्या प्रत्येक पैलूला सहज सुंदर अशा साहित्य-कोंदणात सजवून,  मराठी साहित्य- शारदेचे तेजच त्यांनी जणू आणखी उजळून टाकले. 

मराठीसाहित्याच्या आकाशातल्या या तेजस्वी ताऱ्याला जणू ध्रुवपद प्राप्त झाले आहे, यात साहित्य-रसिकांचे दुमत असणार नाही. 

श्रीमती शांताबाईंना त्यांच्या आजच्या जन्मदिनी अतिशय मनःपूर्वक आदरांजली ……    ?

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ 

मराठी विभाग. 

संदर्भ : कर्‍हाड शिक्षण मंडळ ‘साहित्य साधना’ दैनंदिनी , गुगल गुरुजी

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ ११ ऑक्टोबर – संपादकीय ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

( ३०/०४/ १९०९ – ११/१०/ १९६८)

?११ ऑक्टोबर  – संपादकीय  ?

आज ११ ऑक्टोबर : संत तुकडोजी महाराज यांचा स्मृतीदिन.

अंधश्रद्धा निर्मूलन, जातीभेद निर्मूलन, आणि समाजाच्या सर्व घटकातील लोकांचा उद्धार,  या स्वतःच्या सुनिश्चित ध्येयांसाठी आयुष्य वेचलेले तुकडोजी महाराज हे राष्ट्रसंत म्हणून ओळखले जातात. हे महत्वाचे आणि मोठे ध्येय सर्वसामान्यांच्या मनात रुजवण्यासाठी त्यांनी भजन- कीर्तनाचा अतिशय प्रभावी मार्ग अवलंबला होता. ‘ खंजिरी भजन ‘ हे त्यांच्या सामाजिक प्रबोधनाचे मोठेच वैशिष्टय ठरले होते. मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषांमध्ये त्यांनी काव्यरचना केल्या. “ ग्रामगीता “ या काव्यातून त्यांनी ‘आत्मसंयमन ‘ या आचरणात आणण्यास अवघड पण आवश्यक अशा विचारावर सहजसुलभ भाषेत विवेचन केलेले आहे. आध्यात्मिक, सामाजिक आणि राष्ट्रीय एकात्मकतेचा विचार अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी प्रबोधन करत ते देशभर फिरले. 

१९४२ च्या “ भारत छोडो “ आंदोलनादरम्यान काही काळ ते अटकेत होते, आणि “ आते है नाथ हमारे “ हे त्यांचे गीत त्यावेळी त्या लढ्यासाठी स्फूर्तिगीत ठरले होते, हेही विशेषत्वाने सांगायला हवे. 

त्यांची ध्येये, त्यातही विशेषतः ग्रामविकासाचे ध्येय साकार व्हावे यासाठी त्यांनी उपाययोजनाही सुचवल्या होत्या, ज्या त्यावेळी आणि नंतरच्या काळातही परिणामकारक ठरल्या. त्यांनी सामुदायिक तसेच सर्वधर्मीय प्रार्थनेचा नेहेमीच आग्रहाने पुरस्कार केला. राष्ट्रपतीभवनात झालेले त्यांचे खंजिरी भजन ऐकून तेव्हाचे राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांनी “ राष्ट्रसंत “ या उपाधीने त्यांना गौरविले. ग्रामगीता, अनुभव -सागर भजनावली, सेवास्वधर्म, राष्ट्रीय भजनावली– अशासारखे त्यांचे साहित्य प्रसिद्ध आहे. त्यांनी  हिंदीतून लिहिलेले “ लहरकी बरखा “ हे पुस्तकही प्रसिद्ध आहे. त्यांच्या आठवणी, विचार आणि चरित्र यावरही अनेक पुस्तके लिहिली गेली आहेत.  “ तुकडोजी महाराज साहित्य संमेलन “ आणि “ तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलन “ अशी दोन संमेलने त्यांच्या नावाने भरवली जातात. नागपूर विद्यापीठाला “ तुकडोजी महाराज विद्यापीठ “ असे नाव दिलेले आहे, त्यावरून त्यांच्या महान कार्याची महती सहजपणे समजून येते. 

अशा सर्वार्थाने “ राष्ट्रसंत “ असणाऱ्या श्री. संत तुकडोजी महाराज यांना अतिशय मनःपूर्वक श्रद्धांजली..  

आजच्या अंकात वाचू  या –“ हर देशमें तू “ ही त्यांची हिंदी रचना. हे एक भजन आहे, जे जपानमध्ये भरलेल्या विश्व हिंदू परिषदेत म्हटले गेले होते, आणि दिल्लीतल्या राजघाटावरही हे नियमित ऐकवले जाते. 

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ 

मराठी विभाग. 

संदर्भ : कर्‍हाड शिक्षण मंडळ ‘साहित्य साधना’ दैनंदिनी , गुगल गुरुजी

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ १० ऑक्टोबर – संपादकीय ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

? १० ऑक्टोबर  – संपादकीय  ?

आज आपण कबीर सन्मान पुरस्कारा विषयी माहिती घेणार आहोत.

भारतामध्ये  साहित्य क्षेत्रासाठी जे विविध सन्मान ठेवले आहेत, त्यामध्ये कबीर पुरस्कार हा महत्वाचा पुरस्कार आहे. हा पुरस्कार अखिल भारतीय पातळीवर प्रदान केला जातो. मध्यप्रदेश शासनाच्या संस्कृतिक विभागामार्फत स्थापन केलेल्या विशेष समितीकडून, भारतीय भाषांमधील कवी, लेखक, समीक्षक आणि साहित्य संस्था यांच्याकडून नामनिर्देश केलेल्या साहित्यिक व्यक्तीची या पुरस्कारासाठी निवड केली जाते. या विशेष समितीमध्ये राष्ट्रीय पातळीवरील साहित्य क्षेत्रातील श्रेष्ठ व्यक्तींचा समावेश केला जातो. कवी, लेखक, समीक्षक आणि साहित्य संस्था यांच्याकडून नामनिर्देश केलेल्या व्यक्तींव्यतिरिक्तही, साहित्यिकांची निवड करण्याचा अधिकार या निवड समितीला आहे. त्यानुसार हा महत्वाचा पुरस्कार देण्यासाठी साहित्यिकाची निवड सर्व साहित्यिक मापदंडांना अनुसरून व नि:पक्षपातीपणे  केली जाते.

मराठीत केवळ ३ साहित्यिकांना आत्तापर्यंत हा पुरस्कार मिळाला आहे.

  • विंदा करंदीकरांना ९० -९१ चा पुरस्कार मिळालाय.

जातक, ध्रुपद, स्वेदगंगा, अष्टदर्शने, विरुपिका, मृद्गंध इ. त्यांचे कविता संग्रह प्रसिद्धा आहेत.

त्यांच्या बालकविताही प्रसिद्ध आहेत. राणीचा बाग , एकदा काय झालं, एटू लोकांचा देश इ. त्यांचे १२ बालकवितांचे संग्रह प्रसिद्ध आहेत. त्यांनी  मराठी काव्यमंजुषेत  विविध घाटाच्या, रंजक व वैचारिक काव्यलेखनाची भर घातली.

याशिवाय त्यांनी गद्य लेखनही केले आहे. ललित व वैचारिक लेखन त्यांनी केले आहे. स्पर्शपालवी, उद्गार इ. त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत.  त्याचप्रमाणे ते समीक्षकही होते. त्यांनी मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमधून समीक्षा लिहीली आहे.

ते उत्तम अनुवादकही होते. त्यांनी इंग्रजी ग्रंथांची भाषांतरे केली आहेत. विंदा करंदीकरांना वरील  पुरस्काराव्यतिरिक्त केशवसूत, जनस्थान, कोणार्क व सगळ्यात महत्वाचा म्हणजे ज्ञानपीठ पुरस्कारही मिळाला आहे. त्यांच्या अष्टदर्शने या काव्यसंग्रहाला ज्ञानपीठ पुरस्कारही मिळाला आहे.  

  • नारायण सुर्वे यांना ९९ – २००० चा कबीर सन्मान पुरस्कार मिळालाय

ऐस गा मी ब्रम्ह, जाहीरनामा, नव्या माणसाचे आगमन, सनद इ. त्यांचे काव्यसंग्रह आहेत.

त्यांच्या कवितेतून कामगारांच्या जिवनाचे, त्यांच्या दु:ख – दैन्याचे आणि त्यांच्या चाळवळीचेही दर्शन घडते.

त्यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेचा नरसिंह मेहता पुरस्कार, जनस्थान, सोव्हिएट राशीयाचा नेहरू सन्मान इ. सन्मान व पुरस्कार लाभले आहेत. भारत सरकारने त्यांना पद्मश्री दिली आहे.    

  • मंगेश पाडगावकर यांना २००८-२००९ चा कबीर सन्मान पुरस्कार मिळालाय

पाडगावकरांचे आनंद ऋतु , धारानृत्य , जिप्सी , छोरी, उत्सव हे सारे कविता संग्रह प्रेम भावनेच्या विविध छटा वर्णन करणारे आणि निसर्गाची विविध रूपे साकार करणारे आहेत. ‘सलाम’ पासून त्यांच्या कवितेने आपले वळण बदलले. ती सामाजिक, राजकीय जीवनातले अनुभव व्यक्त करू लागली. त्यांच्या अनेक कवितांची गाणी झाली. त्यांनी बालकविता व बालगीतेही लिहिली आणि ती लोकप्रिय झाली.

ते उत्तम अनुवादक होते. त्यांनी मीरेच्या पदांचे, कबिराच्या दोहयांचे आणि सूरदासाच्या  रचनांचे अनुवाद केले आहेत. त्यांनी मेघदूताचाही अनुवाद केलाय . शेक्सपियरच्या तीन नाटकांचाही त्यांनी अनुवाद केला आहे. विविध विषयांवरील २५ हून अधीक पुस्तकांचा त्यांनी अनुवाद केला  आहे. २००९-१० सालात त्यांनी बायबलचाही अनुवाद केला. ‘सलाम’ कविता संग्रहासाठी त्यांना साहिती अअ‍ॅकॅडमीचा पुरस्कार मिळाला. त्यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पद्मभूषण या पदव्यांनीही सन्मानित केले गेले. 

 

श्रीमती उज्ज्वला केळकर

(ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ)

संदर्भ : कर्‍हाड शिक्षण मंडळ ‘साहित्य साधना’ दैनंदिनी , गुगल गुरुजी

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares
image_print