सुश्री प्रभा सोनवणे
कवितेच्या प्रदेशात # 266
☆ बदल… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆
☆
किती बदलते सगळेच ,
एका रंगपंचमीला रंगीबेरंगी साड्या
नेसून मॉर्निंग वाॅकला गेलो….
आणि झाशीच्या राणीच्या,
पुतळ्याजवळ ,
साजरी झाली गप्पांची
रंगपंचमी !
एका तुकाराम बीजेला,
केली देहूची वारी,
कविता तिथेही होतीच,
आपली सांगाती!
गुढीपाडवा ही साजरा केला,
कवितेची गुढी उभारून
धुळ्यात!
दौंडची ‘भोगी’
संक्रांत, दसरा,
दिवाळी, पंधरा ऑगस्ट,
सव्वीस जानेवारी, शिवरात्र….
सारेच सण आणि उत्सव,
कवितेच्या रंगात रंगलेले !
पण आता,
कुणाच्या तरी कवितेत ऐकलेलं—-
हे कवितेचं मांजर,
मलाही पोत्यात घालून,
दूर कुठेतरी सोडून —
द्यावसं वाटतंय ,
आणि हीच समारोपाची ,
कविता ठरावी असंही !!
१ एप्रिल!२०२५
☆
© प्रभा सोनवणे
संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार
पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
मोबाईल-९२७०७२९५०३, email- [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈