1

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मनं पाखरू! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक

श्री प्रमोद वामन वर्तक 

🦋 कवितेचा उत्सव 🦋

⭐ मनं पाखरू!….. 🙏 श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

मनं पाखरू पाखरू

पर हलके पिसागत

जाई साता सुमद्रापार

क्षणी विलक्षण वेगात

 

          मनं पाखरू पाखरू

          सारा सयीचा खजिना

          इथे दुःखी जखमांना

          कधी जागा अपुरी ना

 

मनं पाखरू पाखरू

घर बांधे ना फांदीवर

नेहमी शोधित फिरे

वृक्ष साजिरा डेरेदार

 

          मनं पाखरू पाखरू

          पंख याचे भले मोठे

          दृष्टी आडचे सुद्धा

          क्षणात कवेत साठे

 

मनं पाखरू पाखरू

वारा प्याले वासरू

बसे ना त्या वेसण

सांगा कसे आवरू ?

 

© श्री प्रमोद वामन वर्तक

(सिंगापूर) +6594708959

मो – 9892561086

ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मैत्री ☆ सुश्री संगीता कुलकर्णी

सुश्री संगीता कुलकर्णी

🦋 कवितेचा उत्सव 🦋

☆ मैत्री ☆ सुश्री संगीता कुलकर्णी ☆ 

 

ना किनारा समुद्राचा

ना क्षितिज आकाशाचे

ना हसू आनंदाचे

ना रडू दुःखाचे

ना तमा कशाची

ना भान जगाचे

स्वतःतचं हरवलेली

खोल खोल समुद्रासारखी

मुक्त आकाशात भरारी घेणारी

अविरत अशी जळणारी

जळून पण मागे

धूर व राख ठेवणारी

आठवणींच्या धुराने पाणी आणणारी

सोबत असते वर्तमानात

जोडून ठेवते भूत- भविष्याला

अस्तित्वातचं मनसोक्त रमणारी

मैत्री… !!

©  सुश्री संगीता कुलकर्णी 

लेखिका /कवयित्री

ठाणे

9870451020

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ अप्रूप ☆ श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर

श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर

अल्प  परिचय 

अनेक कविता अनेक दिवाळी अंक,मासिके, वृत्त पत्रे यातून प्रकाशित.

‘बंद मनाच्या दारावर’ हा कविता संग्रह प्रकाशित. ‘काफला’ या प्रातिनिधिक गझल संग्रहात गझलेचा सामावेश.

🦋 कवितेचा उत्सव 🦋

☆ अप्रूप ☆ श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर ☆ 

देवू नयेच मोका कोणास सांत्वनाचा

राखावया हवा त्या सन्मान आसवांचा

 

साधाच वाहणारा वारा नको म्हणू हा

अंदाज लागतो ना केंव्हाच वादळांचा

 

आहे सुखात सांगू त्यांना; टिपून डोळे

दाटून कंठ आहे प्रत्येक माणसाचा

 

दारात चांदण्यांची तिष्ठून वेळ गेली

डोईवरी उन्हाळा आता सहावयाचा

 

बोलाविल्याविनाही भेटून दुःख जाई

नाही निरोप आला केंव्हा सुखी क्षणांचा

 

बाहेर..आत..आहे वैशाख हा जरीही

तू भेटताच होतो आभास श्रावणाचा

 

ऐकून हाक माझी ना थांबले कुणीही

ती माणसेच होती का खेळ सावल्यांचा?

 

दारी वरात येते थाटात त्या सुखांची

आवाज वेदनेच्या येतो न पावलांचा

 

जोजावले सुखाला मांडीवरी जसे मी

केला तयार खोपा दुःखास काळजाचा

 

तोही लबाड कावेबाजातला निघाला

जो भासवीत होता सात्विक आसल्याचा

 

वाटे मलाच माझे अप्रूप आज याचे

होता निभावला मी रे संग आपल्यांचा

 

प्रत्येक माणसाचा आधार होत गेलो

दुःस्वास सोसला मी होता जरी जगाचा

 

वाटे सरावलेले जीणे तुझ्याविना ही

जातोच तोल आहे अद्यापही मनाचा

 

© श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर

संपर्क : ओंकार अपार्टमेंट, डी बिल्डिंग, शनिवार पेठ, आशा  टाकिज जवळ, मिरज

 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ रंजना जी यांचे साहित्य # 73 – मंद वारा सुटला होता ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

☆ रंजना जी यांचे साहित्य # 73 – मंद वारा सुटला होता ☆

 

मंद वारा सुटला होता, गंध फुलांचा दाटला होता।

आज तुझ्या आठवांनी कंठ मात्र दाटला होता।।धृ।।

 

हिरव्या गार वनराईला चमचमणारा  ताज  होता।

मखमली या कुरणांवरती मोतीयांचा साज होता।

चिमुकल्यां चोंचीत माझ्या,तुझ्या चोंचिचा आभास होता।।१।।

 

पहाटेलाच जागवत  होतीस , झेप आकाशी घेत होतीस ।

अमृताचे कण चोचीत ,आनंदाने भरवत होतीस।

आमच्या चिमण्या डोळ्यांत ,स्वप्न  फुलोरा फुलत होता ।।२।।

 

आनंद अपार होता, खोपा स्वर्ग बनला होता।

विधाताही लपून  छपून , कौतुक सारे पाहात होता।

आज कसा काळाने वेध तुझा घेतला होता।।३।।

 

आता बाबा पहाटेला ऊठून काम सारं करत असतो।

लाडे लाडे बोलत असतो गाली गोड हसत असतो।

आज त्याच्या डोळ्यांचा कडं मात्र ओला होता।।४।।

©  रंजना मधुकर लसणे

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
मराठी साहित्य – कविता ☆ साप्ताहिक स्तम्भ # 90 – हरवलेले प्रेम जेव्हा .. . . ! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते

कविराज विजय यशवंत सातपुते

🦋 साप्ताहिक स्तम्भ # 90 – विजय साहित्य 🦋

☆ ✒ हरवलेले प्रेम जेव्हा .. . . ! ✒  कविराज विजय यशवंत सातपुते ☆

हरवलेले प्रेम जेव्हा

तुला मला हसू  लागते

तुझ्या माझ्या काळजाला

पुन्हा चूक डसू लागते. . . . !

 

हरवलेले प्रेम जेव्हा

नवी वाट चालू लागते.

जुन जुन प्रेम देखील

नव नवं रूसू लागते. . . . !

 

हरवलेले प्रेम जेव्हा

एकट एकट राहू लागते

तुला मला  एकदा तरी

वाट त्याची दिसू लागते. . . . !

 

हरवलेले प्रेम जेव्हा

आठवणींचे मेघ होते

ओठांमधले नकार  सारे

शब्दांमध्ये फसू लागते. . . . . !

 

हरवलेले प्रेम जेव्हा

तुझी माझी झोप पळवते

नकळत आपल्या डोळ्यात

नवे स्वप्न वसू लागते. . . . !

 

हरवलेले प्रेम जेव्हा

तुला मला शोधू लागते.

काळीजदारी उंबरठ्यावर

वाट बघत बसू लागते.

 

हरवलेले प्रेम जेव्हा

वळवाची सर होते

जपून ठेवलेले वादळवारे

पाऊस होऊन  बरसू लागते. . . . !

 

© कविराज विजय यशवंत सातपुते 

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  9371319798.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सार ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे

🦋 कवितेचा उत्सव 🦋

☆ सार ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆ 

(षडाक्षरी)

खणीत रहाव्या

अंधाराच्या खाणी

लागेना जोवर

नक्षत्रांचे पाणी !

 

कधी उसवावे

घातलेले टाके

पुनश्च ऐकावे

जखमांचे ठोके !

 

न्यायाच्या संगरी

कैसी हार,जीत

रक्त नित्य मागे

एक दिव्य ज्योत !

 

तूच अश्व,रथ

आणिक सारथी

तूच न्यायाधीश

वादी,प्रतिवादी !

 

सोडावा किनारा

अथांगा भिडावे

मोती अनमोल

खोलात शोधावे !

 

स्वत्व सत्त्वशील

प्राणांचे इमान

निरंत जपावे

वणव्यात रान !

 

कधी बंधनात

मातीच्या असावे

कधी पक्षी, कधी

आभाळचि व्हावे !

 

एक कोवळीक

एक सच्चा सूर

एक दूर तारा

आयुष्याचे सार !

 

© श्री हरिश्चंद्र कोठावदे

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ गमजा ☆ श्री तुकाराम दादा पाटील

श्री तुकाराम दादा पाटील

🦋 कवितेचा उत्सव 🦋

☆ गमजा ☆ श्री तुकाराम दादा पाटील ☆ 

जगण्याच्या पाणवठ्यावर

सुखदुःख वाहते आहे

पण जीवन घागर माझी

मी तिथेच भरतो आहे

 

कधी स्वच्छ,लाभते पाणी

कधी गढूळ प्रवाहित होते

पर्याय कोणता नसतो

वास्तवता सांगून जाते

 

हा  निसर्ग कायम आहे

आम्हीच येथले उपरे

आमच्याही भवती सगळे

या कळी काळाचे फेरे

 

हे  वास्तव  स्विकारावे

यालाच भलेपण समजा

हे सगळे पचल्यावर मग

जगण्याची कळते गमजा

 

© श्री तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ सुजित साहित्य # 79 – बाप्पा…! ☆ श्री सुजित कदम

श्री सुजित कदम

☆ साप्ताहिक स्तंभ – सुजित साहित्य #79 ☆ 

☆ बाप्पा…! ☆ 

बाप्पा तुझा देवा घरचा पत्ता

मला तू ह्या वर्षी तरी

देऊन जायला हवा होतास..

कारण..,

आता खूप वर्षे झाली

बाबांशी बोलून

बाबांना भेटून…

ह्या वर्षी न चूकता

तुझ्याबरोबर बांबासाठी

आमच्या खुशालीची

चिठ्ठी तेवढी पाठवलीय

बाबा भेटलेच तर

त्यांना ही

त्याच्यां खुशालीची चिठ्ठी

माझ्यसाठी

पाठवायला सांग…

बाप्पा…,

त्यांना सांग त्याची चिमूकली

त्यांची खूप आठवण काढते म्हणून

आणि आजही त्यांना भेटण्यासाठी

आई जवळ नको इतका हट्ट

करते म्हणून…,

बाप्पा तू दरवर्षी येतोस ना तसच

बाबांनाही वर्षातून एकदातरी

मला भेटायला यायला सांग..,

तुझ्यासारखच…,त्यांना ही

पुढच्या वर्षी लवकर या..

अस म्हणण्याची संधी

मला तरी द्यायला सांग…,

बाप्पा.., पुढच्या वर्षी तू…

खूप खूप लवकर ये..

येताना माझ्या बाबांना

सोबत तेवढ घेऊन ये…!

 

© सुजित कदम

पुणे, महाराष्ट्र

मो.७२७६२८२६२६

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ पाऊस ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे

श्री उदय गोपीनाथ पोवळे

🦋 कवितेचा उत्सव 🦋

☆ पाऊस ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆ 

पाऊस टाळ मृदूंग

वाटे विठ्ठल माउली

माळकरी ते दंग

भासे देवाची सावली

 

पाऊस बडवी ढोल

पाऊस तडतड ताशा

कधी जोशात बोल

भासे मांडला तमाशा

 

पाऊस नाचे लावणीय

पाऊस दिसे लक्षणीय

रंभा उर्वशी नर्तकी

भासे अप्सरा स्वर्गीय

 

पाऊस पहाटे भूपाळी

निशेला जोड भैरवीची

पाऊस मेघ मल्हार

भासे बैठक सुरावटीची

 

पाऊस बासरी कान्हाची

कधी मोहक अवखळ 

पाऊस एकतारी मीरेची

भासे ओंकार निखळ

 

पाऊस प्रतीक मैत्रीचे

धरती गगन भेटीचे

पाऊस वाजवी सनई

भासे मिलन अद्वैताचे

 

© श्री उदय गोपीनाथ पोवळे

मो. नं. ९८९२९५७००५. 

ठाणे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ ☆ मृगजळ ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर

सुश्री अरूणा मुल्हेरकर

🦋 कवितेचा उत्सव 🦋

☆ मृगजळ ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆ 

दिसे दूर तो एक जलाशय

रूप मनोहर तसेच निर्मळ

भुलोनी जाऊ नको मानवा

ते तर आहे केवळ मृगजळ

 

संसार ही तर माया

धावू नकोस मृगजळापाठी

मोह तो तर क्षणिक सुखाचा

नलगे काही तुझ्याच हाती

 

झेलुनिया वादळ वारे

ताठ उभे तरूवर सारे

सुखदुःखात समभाव ठेवुनी

तू पण मनुजा उभा रहा रे

 

ईश्वरनिर्मित अवघी सृष्टी

आनंद असे जीवनाचा

जीवन परि हे आहे नश्वर

नको ध्यास मृगजळाचा

 

सत्य असे तो परमात्मा

असत्य बाकी सारे

धाव घेऊनी ईश्वरचरणी

मुखी रामनाम घ्या रे.

 

©  सुश्री अरूणा मुल्हेरकर

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈