मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ आजचा दिवस शुभेच्छा देण्याचा… ☆ सुश्री संगीता कुलकर्णी

सुश्री संगीता कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ?

आजचा दिवस शुभेच्छा देण्याचा… ☆ सुश्री संगीता कुलकर्णी ☆

आकाशकंदील विराजमान झालाय

छोट्या छोट्या चांदण्यांसह

दरवाजाही केव्हापासून

तोरण बांधून सज्ज झालाय

अंगणही नटून बसलंय

रांगोळीचा गालिचा घेऊन

डबे सगळे तुडुंब आहेत

तिखट गोड स्वादासह

घर आता डोलू लागलंय

आनंदाच्या लहरींवर

आणि मन…

मन अगदी प्रफुल्लित

लाख लाख शुभेच्छांसह

आजचा दिवस त्याच शुभेच्छा देण्याचा…

 

आपणा सर्वांना दिपावलीच्या आगमनाच्या खूप खूप शुभेच्छा…🪔🏮💐

©  सुश्री संगीता कुलकर्णी 

लेखिका /कवयित्री

ठाणे

9870451020

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ दिवाळी आली – – – ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल

?  कवितेचा उत्सव ?

☆ दिवाळी आली – – – ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

लखलख पणत्या लाख लाख शुभेच्छा आकाशकंदील लावायचे

पटपट आवरून फाटफाट फटाके सावधतेने उडवायचे ॥

*

अंगणी रंगली रंगीत रांगोळी किल्लेही सुंदर बनवायचे

चिकचिक चिखल कालवताना भूमी शिवराय स्मरायचे ॥

*

वसूबारस धनतेरस धेनू, धन पुजायचे

तेहतीस कोटी देवांसंगे कुबेरासही नमायचे

मन सुमन मानूनी ते चरणावरी अर्पायचे 

पटपट आवरून फाट फाट फटाके सावधतेने उडवायचे ॥

*

मनातील नर्कासुरासी आत्मा-कृष्णाने मारायचे

संस्कारांच्या लक्ष्मीमातेस अंतरात जपायचे

वर्षारंभी वर्षाफवारे आकाशामधे पाठवायचे

पटपट आवरून फाटफाट फटाके सावधतेने उडवायचे ॥

*

पाडव्यास पतीपत्नीचे बंध नव्याने उजाळायचे

भाऊबीजेला बंधू-भगिनी नात्यास त्या फुलवायचे

यमही जाई यमीकडे त्या नियमास हो पाळायचे

पटपट आवरून फाट फाट फटाके सावधतेने उडवायचे ॥

*

अशा दिपोत्सवी छान फराळी पदार्थ बनवायचे

तिखट गोड फराळाचे आदान प्रदान करायचे

चकचक चकली कडकड कडबोळी कर्र्र्म कुर्र्म खायचे

पटपट आवरून फाट फाट फटाके सावधतेने उडवायचे ॥

या निमित्ताने एक सुचवावेसे वाटते – – –

फटाके उडवणे हे आरोग्यासाठी अपायकारक आहे. तरी फटक्यावीना दिवाळी मनाला पटत नाही. म्हणून एक गाव एक गणपतीप्रमाणे एक गाव एक दिवाळी हि योजना राबवली जावी. यामधे घरोघरी जाऊन फटाक्यासाठी फंड गोळा केला जावा. या फंडापैकी थोड्याच फंडाचे फटाके आणून त्या फटाक्याने सामूहिक आतषबाजी मोकळ्या मैदानावर केली जावी जेणेकरून धूर घरात न येता घरातील आजारी, लहान वा ईतरही लोकांना प्रदूषणाचा त्रास होणार नाही. तसेच ज्याना फटाक्याचा आनंद घ्यायचा आहे त्यांना तो घेता येईल. राहिलेल्या फंडाचा ऊपयोग गरीब व गरजू लोकांना नवे कपडे आणि फराळाचे पदार्थ देण्यासाठी केला तर त्यांचीही दिवाळी आनंदाची भरभराटीची साजरी होईल.

Wish you all a very HAPPY DIWALI & PROSPEROUS NEW YEAR. 🪔🏮💐

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ लक्ष्मी पूजा… ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी ☆

प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी

? कवितेचा उत्सव ?

☆  लक्ष्मी पूजा …🪔 ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी 

उजळीत ज्योती दिवाळी पहाटे 

सजले ते दीप दिवाळी पहाटे

*

शरद चांदणे दिव्याचा महिमा 

लक्ष्मी पूजनी त्या दिवाळी पहाटे

*

आकाशदीप नभी मंद तारा 

नक्षत्र चांदणे दिवाळी पहाटे

*

मखमली राती सुटे गार वारा

रंगली मेहंदी दिवाळी पहाटे

*

सजले दिवे ते लक्ष कार्तिकी

भिजल्यात वाती दिवाळी पहाटे

*

गर्भगृही वाजे मंजुळ घंटा नाद

कर्पूर आरती दिवाळी पहाटे

© प्रो डॉ प्रवीण उर्फ जी आर जोशी

ज्येष्ठ कवी लेखक

मुपो नसलापुर ता रायबाग, अंकली, जिल्हा बेळगाव कर्नाटक, भ्रमण ध्वनी – 9164557779 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “दीपावली सर्वांची व्हावी…” ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? कवितेचा उत्सव ?

☆ “दीपावली सर्वांची व्हावी…” ☆ श्री सुनील देशपांडे ☆

जुन्या पिढीला मागे टाकून 

नव्या पिढीने जग जिंकावे 

यशगाथा त्या ऐकत असता 

सुस्वर माझ्या कानी यावे…

*

आप्त स्नेहीजन यांचे अनुभव 

कटू गोड वा कसेही असले

 प्रतिध्वनीतुन मनात त्यांचे 

सुस्वर माझ्या कानी यावे…

*

राजपटावर चमकून जावे 

न्याय नीतिला सांभाळावे 

असे कुणी असतील तयांचे 

सुस्वर माझ्या कानी यावे…

*

डोंगर हिरवे गार असावे 

दुथडी भरूनी नदी वहावी 

फुला फळांवर पक्षी दिसावे 

सुस्वर माझ्या कानी यावे…

*

युद्धाचे संपवून तांडव 

बुद्धाने हे जग जिंकावे 

विजयाच्या त्या गीतामधले 

सुस्वर माझ्या कानी यावे…

*

सुस्वर ऐसे घेऊन नंतर 

नव्या युगाची पहाट यावी 

ज्ञानदीप उजळून मनीचे 

दीपावली सर्वांची व्हावी…

© श्री सुनील देशपांडे

मो – 9657709640

email : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “अजून सारे तसेच आहे…” ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? कवितेचा उत्सव ?

☆ “अजून सारे तसेच आहे” ☆ सौ राधिका भांडारकर 

(पादाकुलक वृत्त)

जरी ना कधी भेटलीस तू

स्पर्श तुझा तो अवीट आहे 

सुगंध देही तो जाणवतो

कोंब प्रीतिचा अमिटच आहे॥१॥

*

आभाळ निळे तसेच आहे

रात्र चांदणी मला खुणवते

जरी दुरावा आपल्यातला 

तरी मनी तू कशी बिलगते ॥२॥

*

हळूच हसते ती शेवंती

पानामागे लज्जित होते 

आठवणीचा झोका येतो 

हास्य तुझे मग खळीत येते॥३॥

*

काळा संगे सरले नाही 

प्रणयस्मृतींची साथ राहिली

प्रेमांगणात केवळ दोघे 

स्वप्ने आता पुन्हा पाहिली ॥४॥

*
सारे अजून तसेच आहे

प्रेम मनीचे ना ओसरले 

वाटा असोत वेगवेगळ्या 

भास मिठीचे नाही विरले॥५॥ 

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ आयती वाट सोपी – – ☆ सौ. ज्योती कुळकर्णी ☆

सौ. ज्योती कुळकर्णी 

? कवितेचा उत्सव ?

☆ आयती वाट सोपी – – ☆ सौ. ज्योती कुळकर्णी ☆

(भुजंगप्रयात)

हवी जीवनाची लढाई कुणाला

मिळाले असे आयते जर तुम्हाला

*

कधी बाप देतो शिदोरी फुकाची

बरे फावले दान घेणे अम्हाला

*

असे मोप देणार शास्ता जयाचा

रिकामी तिजोरी न चिंता मनाला

*

खरेदी मतांची करा खर्च नोटा

मतांना विका लाज वाटे कशाला

*

मिळे आयती राजगादी मुलाला

तिथे पाटही ना मिळावा भल्याला

© सौ. ज्योती कुळकर्णी

अकोला

मोबा. नं. ९८२२१०९६२४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ भगवंत हृदयस्थ आहे ☆ सुश्री अपर्णा परांजपे ☆

सुश्री अपर्णा परांजपे

?️?  चित्रकाव्य  ?️?

? भगवंत हृदयस्थ आहे… ☆ सुश्री अपर्णा परांजपे ?

तो माझा अन् मी त्याची दुग्धशर्करा योगच हा 

मनी वसे ते स्वप्नी दिसे भगवंताचा खेळच हा…

*

“सोहम् सोहम्” शिकवून मजला धाडियले या जगतात 

“कोहम् कोहम्” म्हणोनी अडलो उगाच मायापाशात..

*

अंतर्चक्षू प्रदान करुनी रूप दाविले हृदयात 

कमलपत्र निर्लेप जसे नांदत असते तीर्थात..

*

सुखदुःखाची जाणीव हरली, ईश्वर चरणी भाव जसा

तसेच भेटे रुप तयाचे, गजेंद्राशी विष्णू तसा…

*

महाजन, साधू संत सज्जन काय वेगळे असे तिथे?

प्रेमाची पूर्तता व्हावी, हे ध्येय निश्चित तिथे…

*

“ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः”।

वचन तुझे रे अनुभव घ्यावा, हीच आस रे तुझी पहा…

*

निजानंदी रंगलो मी तव हृदयाशी भेटता 

आतच होता, आहे, असशी 

जाणीव याची तू देता…

*

कृतार्थ मी अन् कृतार्थ तू ही 

जन्माचा या अर्थ खरा

आनंदाचा कंद खरा तू 

(मम)हृदयाचा आराम खरा…

*

कृष्ण सखा तू, रामसखा तू प्रेमाचा अवतार सख्या 

अयोनिसंभव बीज अंकुरे 

सात्विक, शुद्ध हृदयी सख्या..

*

प्रशांत निद्रा प्रशांत जीवन देहात पावले मज नाथा

प्राणांवर अधिराज्य तुझे रे

केशव देतो (जसा) प्रिय पार्था…

*

आदिशक्ती अंबाबाई शक्तिरुपाने वसे इथे

त्याच शक्ती ने जाणीव होते भगवंत असे जेथे…

*

🌹 भगवंत हृदयस्थ आहे 🌹

© सुश्री अपर्णा परांजपे

कात्रज, पुणे

मो. 9503045495

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 247 ☆ दिवाळी… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 247 ?

🪔 दिवाळी…🪔 ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

दिवाळी येते दरवर्षीच….

तिचं रूप मात्र बदलतंय!

लहानपणीची थंडीत कुडकुडत,

पहाटेच आंघोळ करणारी,

नटून थटून देवळात जाणारी,

उदंड लाडू,चकली,करंजी इ.इ.चा

फराळ करण्यातच गर्क असलेली,

महिला वर्गाची !!

लहानपणाची दिवाळी,

खूप सुखाची वाटायची!

तरूणपणीची नवी नवी दिवाळी,

पण प्रत्येक वयातली दिवाळी,

घरातच राहणारी!

प्रौढ वयातली प्रौढ दिवाळी !

ज्येष्ठ वयातली विरागी दिवाळी !

शांत निवांत!!

वय बदलतंय तसं

रंग रूप आकार बदलंत जाणारी…

दरवर्षीची दिवाळी!

माझी दिवाळी ! माझी दिवाळी !

☆  

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ साहित्य दीपावली… ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी ☆

प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी

? कवितेचा उत्सव ?

☆  साहित्य दीपावली…🪔 ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी 

तेजोमय दीपज्योती

तिमीरहारक सरस्वती…

*

अनादी अनन्त तू निर्मोहक

त्रिगुणात्मक सत्व प्रकाशक

सकळ कला विद्येची कारक

 ज्ञान वैराग्य वाचस्पती…

*

तमोगुण तू नाशकारक

धी धृति स्मृति कारक

विद्यावन्त कला दायक

देवादीक पूजे बृहस्पति…

*

तू सृजनाची माय दाता

सकलांची साहित्य सरिता

माय मराठी तू अमृता

लक्ष्य लक्ष्य दीप ज्योती…

*

अक्षरांची शब्दकळा

 शब्दांचा हिरवा मळा

 नक्षत्रांच्या झुरमाळ्या

 सृजन अंगण फुलती…

*

 रूप किती तुझे थोर

 सप्तरंगी भाव विभोर

 शब्द स्पर्श चित्तचोर

 अलगद मज बिलगती…

*

तेजोमय दीप ज्योती

 तिमिरहारक सरस्वती…

© प्रो डॉ प्रवीण उर्फ जी आर जोशी

ज्येष्ठ कवी लेखक

मुपो नसलापुर ता रायबाग, अंकली, जिल्हा बेळगाव कर्नाटक, भ्रमण ध्वनी – 9164557779 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ स्नेह दीप… ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे☆

सौ.ज्योत्स्ना तानवडे

? कवितेचा उत्सव ?

☆ स्नेह दीप🪔 ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

आली दिवाळी दिवाळी 

चैतन्याच्या लावू ओळी 

मांगल्याचा टिळा लावू 

जिद्द कष्टाच्या कपाळी ||

*

सारी संकटे विपदा 

होवो या तमाचा नाश 

एकमेका जपताना 

विणू स्नेह मधुकोश ||

*

दुःख अन्याय अलक्ष्मी 

साऱ्या तमा संपवूया 

नाती हेच मोठे धन 

त्यास नित्य सांभाळूया ||

*

लावू नात्यांच्या दिव्यात 

स्नेह ममतेची ज्योत 

सारे भेद विसरून 

जोडू पुन्हा नवी प्रीत ||

*

दिवाळीचा सण मोठा

करू मनाला आरास

मनामनाला जोडणे

आहे निमित्त हे खास ||

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print