मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ दूर दूर …☆ सौ. सुचित्रा पवार

सौ. सुचित्रा पवार

? कवितेचा उत्सव ?

☆ दूर दूर … ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

दूर दूर माळरानात

पेटत्या उन्हाच्या ज्वालेत

गर्द झाडाच्या छायेत

तन-मन करावे शांत शांत

 

हिरव्या हिरव्या डोंगरात

मधूर झरे खळाळत

एकांत क्षणी जावे

पिऊन जलास होण्या तृप्त

 

दूर दूर वेळूच्या बनात

शीळ घुमते कानात

हरवूनी वेळूच्या बेटात

नाद साठवावा अंतरंगात

 

अथांग निळ्या सागरात

लाटांच्या संथ हेलकाव्यात

व्हावे मन पीस पीस

तरंगावे खुशाल जलाशयात

 

उंच उंच किल्ल्यावर

जावे चढणी चढत

पराक्रम आठवून शिवबांचा

स्फुल्लिंग पेटावे रोमरोमात

 

© सौ.सुचित्रा पवार 

तासगाव, सांगली

8055690240

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कविता ☆ साप्ताहिक स्तम्भ #123 – विजय साहित्य – साथ…! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 123 – विजय साहित्य ?

☆ साथ…!  कविराज विजय यशवंत सातपुते ☆

बहरली प्रीतवेल

दुःख रंगले सुखात

तुझा लागताच वारा

पडे पक्वान्न मुखात….!..१

 

बहरली प्रीतवेल

नाही ओंजळ रिकामी

तळहाती भाग्यरेषा

तुझ्या विना कुचकामी…!..२

 

अंतरीच्या अंतरात

चाले तुझी वहिवाट

काट्यातल्या गुलाबात

विश्वासाची पायवाट…..!..३

 

बहरली प्रीतवेल

तिथे फिरे तुझा हात

आठवांची मुळाक्षरे

गिरवितो अंतरात….!..४

 

ऊन पावसाळे किती

तुझ्या धामी विसावले

ऋतू जीवनाचे माझ्या

तुझ्या नामी सामावले…!..५

 

बहरली प्रीतवेल

सुखी संसाराची छाया

साथ तुझी पदोपदी

लाभे सौख्य शांती माया….!..६

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ ऊनझळा !… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

? कवितेचा उत्सव ?

☆ ऊनझळा ! … ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

फुललेल्या पांगार्याने शिकवले मला,

दु:खातेही कसे हसायचे!

स्वत: झळा सोसून,

दुसर्यांना आनंद द्यायचे!

 

   केशरी पिसारा फुलवीत

    गुलमोहराने केला डौल,

   उन्हाला सांगितले

     मागे घे तुझे पाऊल!

 

  जांभळी,पिवळी तोरणे लावली

      कॅशियाने सभोवती!

  उन्हापासून धरतीला

      शीतलता देती!

 

  निवडुंगानेही साधली

   त्यातच आपली संगती

 लाल लाल बोंडफुलांनी

    सजवली ती हिरवी सृष्टी!

 

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सुजित साहित्य #108 – कामगार…!☆ श्री सुजित कदम ☆

श्री सुजित कदम

? कवितेचा उत्सव ?

☆ सुजित साहित्य # 108 – कामगार…! ☆

परवा आमच्या कारखान्यातला

कामगार मला म्हणाला

आपण आपल्या हक्कासाठी

आदोलन करू.. मोर्चा काढू..

काहीच नाही जमल तर

उपोषण तरी करू…

पण..

आपण आपल्या हक्कासाठी

आता तरी लढू

बस झाल आता हे असं लाच्यारीने जगणं

मर मर मरून सुध्दा काय मिळतं आपल्याला

तर दिड दमडीच नाणं..

आरे..

आपल्याच मेहनतीवर खिसे भरणारे..

आज आपलीच मज्जा बघतात

आपण काहीच करू शकणार

नाही ह्या विचारानेच साले आज

आपल्या समोर अगदी ऐटीमध्ये फिरतात

आरे..

हातात पडणार्‍या पगारामध्ये धड

संसार सुध्दा भागत नाही…!

भविष्याच सोड उद्या काय

करायच हे सुद्धा कळत नाही

महागड्या गाडीतून फिरणार्‍या मालकांना

आपल्या सारख्या कामगारांच जगण काय कळणार..

आरे कसं सांगू..

पोरांसमोर उभ रहायचीही

कधी कधी भिती वाटते

पोर कधी काय मागतील

ह्या विचारानेच हल्ली धास्ती भरते

वाटत आयुष्य भर कष्ट करून

काय कमवल आपण..

हमालां पेक्षा वेगळं असं

काय जगलो आपण..!

कामगार म्हणून जगण नको वाटतं आता..!

बाकी काही नाही रे मित्रा..

म्हटल..एकदा तरी

तुझ्याशी मनमोकळ बोलाव

मरताना तरी निदान कामगार

म्हणून जगल्याच समाधान तेवढ मिळावं…!

म्हणूनच म्हटलं

आपण आपल्या हक्कासाठी

आदोलन करू… मोर्चा काढू…

नाहीच काही जमल तर

उपोषण तरी करू…पण

आपण आपल्या हक्कासाठी आता तरी लढू..

© सुजित कदम

संपर्क – 117, विठ्ठलवाडी जकात नाका, सिंहगढ़   रोड,पुणे 30

मो. 7276282626

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ अप्सरांचे गाणे… ☆ बालकवी ☆

? कवितेचा उत्सव  ?

☆ अप्सरांचे गाणे … ☆ बालकवी ☆ 

सुमनाच्या गर्भामाजी/रसगंगा भरली ताजी//

आलिंगुनि तिज ही बसली/ शुभ्र अद्रिशिखरे सगळी//

 

सांभाळुनि उतरा बाई/वेळ गडे! स्नानाची ही//

गर्द दाट मधली झाडी/मंद मंद हलवा थोडी//

 

पराग सुमने इवलाली/नीट बघता पायांखाली/

पुष्पांचा बसला थाट/हळूं हळूं काढा वाट//

 

गोड सुवासांचे मेघ/आळसले जागोजाग//

जलकणिका त्यांच्या पडती/थंडगार अंगावरती//

 

स्नान करू झडकरि बाई/पुनित ही गंगामाई//

रवि किरणांचे नवरंगी /रम्य झगे घालुनि अंगी//

 

गुंजतसे मंजुळ गीते/बैसुनि त्या भृंगावरते//

रंगत मग जगती जाऊ/हसू रूसू गाणी गाऊ//

 

 –  बालकवी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “मैत्री…” ☆ सौ. अमृता देशपांडे ☆

सौ. अमृता देशपांडे

? कवितेचा उत्सव ?

☆ “मैत्री…” ☆ सौ. अमृता देशपांडे 

तुझ्या एका शब्दाने

अशी जादू केली

माझं एकटेपणाचं ओझं

मला हलकं वाटू लागलं

 

तुझ्या एका कटाक्षाने

अशी जादू केली

माझं दुखावलेलं मन

थोडं शांत शांत झालं

 

काल अचानक म्हणालास

नको येऊ लागी लागी

वेड्या तुला माझे मन

कधी कळलेच नाही

 

ऋणानुबंधाची ही गाठ

नको म्हणून तुटत नाही

तुझ्या माझ्या मैत्रीला

अंतराचे भान नाही

 

तुझ्या यशाच्या कमानी

चढो आनंदाची रास

माझे मन सुखावेल

लागी असो वा असो पैस

 

तुझ्या नवीन जगात

जरी मला जागा नाही

मन माझे निरपेक्ष

तुला अडवत नाही

 

कधी आली आठवण

पहा वळून तू मागे

थेट माझ्या डोळ्यांमध्ये

तुझे प्रतिबिंब जागे.

© सौ. अमृता देशपांडे 

पर्वरी – गोवा 

9822176170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 130 ☆ गझल… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 130 ?

☆ गझल… ☆

तुझी आमंत्रणे स्वीकारणेही मानवत नाही

तुला भेटायला येणे तरीही सोडवत नाही

 

 तुझ्याशी मारल्या गप्पा कधी काळी भरोश्याने

अताशा बोलते आहेस जे ते ऐकवत नाही

 

 सखे नाते जिव्हाळ्याचे तसे नव्हतेच तेव्हाही

परी होते सुगंधी वाटले ते दरवळत नाही

 

 तुझ्या माझ्यात ना काही टिकावू , शाश्वतीचेही

पहाता आठवू काही मुळीहीआठवत नाही

 

 तुझे ही नाव घेताना कृतज्ञच होत राहो मी

दिले होतेस जे काही कधीही विस्मरत नाही

 

 उन्हाने तापला रस्ता जरासा गारवा लाभो

उकाडा होत असताना कुठेही का पडत नाही

 

अरे तू मेघराजा ना, धरित्री मारते हाका

असा दाटून आलेला तरी का कोसळत नाही?

 

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ दिवाळी,तो आणि मी… ☆ अनंत काणेकर ☆

? कवितेचा उत्सव  ?

☆ दिवाळी,तो आणि मी… ☆ अनंत काणेकर☆ 

दीपांनी दिपल्या  दिशा !-सण असे आज हा दीपावली.

हर्षाने दुनिया प्रकाशित दिसे आतूनी बाहेरूनी !

अंगा चर्चुनि अत्तरे,भरजरी वस्त्रांस लेवूनिया,

चंद्रज्योति फटाकडे उडविती आबाल सारे जन.

 

पुष्पे खोवुनि केशपाशी करूनी शृंगारही मंगल,

भामा सुंदर या अशा प्रियजना स्नाना मुदे घालिती.

सृष्टी उल्हसिता बघूनि सगळी आनंदले मानस,

तो हौदावरी कोणासाठी मज दिसे स्नाना करी एकला;

 

माता,बंधु,बहीण कोणि नव्हते प्रेमी तया माणूस,

मी केले स्मित त्यास पाहूनि तदा तोही जरा हासला.

एखाद्या थडग्यावरी धवलशी पुष्पे फुलावी जशी,

तैसे हास्य मुखावरी विलसले त्या बापड्याच्या दिसे !

 

तो हासे परि मद्हृदी भडभडे,चित्ता जडे खिन्नता;

नाचो आणिक बागडो जग,नसे माझ्या जिवा शांतता !

 – अनंत काणेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ नेम… ☆ डॉ मेधा फणसळकर ☆

डॉ मेधा फणसळकर

? कवितेचा उत्सव  ?

☆ नेम… ☆ डॉ मेधा फणसळकर ☆ 

सूर्य पूर्वेला उजाळे, नेम आहे

फाल्गुनी जळती उन्हाळे, नेम आहे

 

नित्य फेरा या धरेला, घालतो रे

चंद्र फिरतो अंतराळे, नेम आहे

 

जन्मती पोटी कहाण्या या नदीच्या

अंतरी लपवी उमाळे, नेम आहे

 

पावसाचे बरसणे हा, धर्म आहे

मेघ आकाशात काळे, नेम आहे

 

चक्र सृष्टीचे न थांबे मानवांनो

चालणे हा नित्य इथला नेम आहे.

 

© डॉ. मेधा फणसळकर

सिंधुदुर्ग.

मो 9423019961

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #136 ☆ तुझा उन्माद ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 136  ?

☆ तुझा उन्माद ☆

अशी ओकताना आग, सूर्य पाहिला नव्हता

पारा चढलाय त्याचा, जरी होता उगवता

 

मुक्या झाल्या होत्या वेली, तुझा संताप पाहता

नको ओकू अशी आग, सुकतील साऱ्या लता

 

रस्त्यावर नाही आता, रोज सारखा राबता

धाक तुझा एवढा की, त्याचमुळे ही शांतता

 

बिना कष्टाचा हा घाम, मला येईना टाळता

होत आनंदही नाही, आज घामाने भिजता

 

होते देहाची या लाही, वस्त्रे मोहाची त्यागता

शांत झोपही येईना, तुझा उन्माद झेलता

 

शांत मनाला वाटते, जलतरण करता

मिठी पाण्याची भक्कम, आता येईना सोडता

 

अंग आहे पेटलेले, ये ग राणी न सांगता

मन शांत हे होईल, वर्षा राणीला भेटता

 

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print