चित्रकाव्य
बहावा… (विषय एकच… काव्ये तीन)
सुश्री नीलांबरी शिर्के – डॉ. सोनिया कस्तुरे – श्री आशिष बिवलकर ☆
( १ )
सुश्री नीलांबरी शिर्के
☆
हिरवा चुडा हातात लेऊन
झाड हळदुले नवरी झाले .. की ..
रविराजाने विसरून जाऊन
सुवर्ण घडे इथे ओतले
*
रखरखत्या उन्हात फिरता
दृश्य असे दृष्टीस पडता
निसर्ग संपन्नतेपुढे आपला
आपसुक झुकतोच ना माथा
☆
© सुश्री नीलांबरी शिर्के
मो 8149144177
( २ )
डॉ.सोनिया कस्तुरे
☆
निसर्गाची गुढी | उभी उंच नभी
तम, प्रखरता | नाही तमा मनी
*
डौलदार बांधा | हळद पिऊनी
सोनेरी झुंबर | जणू नभांगणी
*
कोवळी नाजुक | हिरवी पालवी
अंगीखांदी कशी | मधून डोकावी
*
रुणझुण तिला | पवन डोलवी
गाणे सुखे गाते | रणरणत्या उन्ही
☆
© डॉ.सोनिया कस्तुरे
विश्रामबाग, जि. सांगली
भ्रमणध्वनी:- 9326818354
( ३ )
श्री आशिष बिवलकर
☆
ऋतू चक्राचा
घेऊन सांगावा |
चैत्र पावलांनी,
फूलला बहावा |
*
ग्रीष्माचा कहर,
तापले माळरान |
पिवळ्या फुलांनी,
सजला तरु छान |
*
उकाड्याने हैराण,
जीवास लागे उमासा |
रंगांची चाले उधळण,
दृष्टीस मिळे दिलासा |
*
तरुवर लटकली झुंबरे,
तरुतळी गालिचा सुवर्ण |
उष्ण गंधीत समीर,
डुलती तालावर पर्ण |
*
रंगांनी रंगला बहावा,
नादच त्याचा खुळा |
निरंतर चालत असे,
निसर्गाचा सोहळा |
☆
© श्री आशिष बिवलकर
बदलापूर
मो 9518942105
☆☆☆☆☆
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈