श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर
कवितेचा उत्सव
☆ तू… ☆ श्री राजकुमार कवठेकर ☆
☆
तू रे सुखा जरासा दिलदार मित्र हो ना
केंव्हातरी गुलाबी तू प्रेम -पत्र हो ना
*
नुस्त्याच कल्पनेने पाहू तुला कसे रे
दृष्टांत..रंग..रूपे थोडा सचित्र हो ना
*
वैराण माळ पायी.. माथ्यावरी उन्हाळे
तू मोडके तरीही डोईस छत्र हो ना
*
आयुष्य हाच आहे रे यक्ष-प्रश्न माझा
तो सोडवावया तू सोपेच सूत्र हो ना
*
प्रत्येक वेळ आहे येथे रणांगणीची
रे जीवना मवाळा, तू ही सशस्त्र हो ना
*
होवून सूज्ञ, दुःखी-कष्टीच व्हायचा तू
विक्षिप्त अन् जरासा ढोंगी.. विचित्र हो ना
*
ही भांडणे..लढाया..आकांत..सांत्वने ही
आता निवांततेचे अंतीम-सत्र हो ना
*
आजन्म आटलेला.. आजन्म साठलेला
माझे खळाळणारे विस्तिर्ण पात्र हो ना
*
काही न भव्य आता काही न दिव्य आता
स्फूर्ती मिळेल ज्याने ते तू चरित्र हो ना
*
भेटोत ही शकूनी, होवोत लाख शत्रू
माझा सखा ‘सुदामा’ तू एकमात्र हो ना
*
अंधार बारमाही वाट्यास जीवनाच्या
कोजागिरी प्रमाणे तू एक रात्र हो न
☆
© श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर
कवी / गझलकार
संपर्क : ओंकार अपार्टमेंट, डी बिल्डिंग, शनिवार पेठ, आशा टाकिज जवळ, मिरज मो ९४२११०५८१३
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/ सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈