मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ उंबरा… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆

श्री शरद कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ?

☆ उंबरा… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆

उघडता ताटी,

झालो ज्ञानेश्वर .

भेटला ईश्वर ,

आपोआप ॥

आपोआप लिहू,

मुक्तीची अक्षरे.

उघडावी दारे,

मंदिराची॥

मंदिरे शोधती,

हरवला देव.

परागंदा भाव,

सनातन ॥

सनातन आहे,

रिकामा गाभारा .

ओलांडू उंबरा,

संयमाचा॥

© श्री शरद  कुलकर्णी

मिरज

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हे शब्द अंतरीचे # 165 ☆ होळी… ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

महंत कवी राज शास्त्री

?  हे शब्द अंतरीचे # 165 ? 

☆ होळी… ☆ महंत कवी राज शास्त्री ☆/

तप्त उन्हाच्या झळा

चैत्र महिना तापला

पळस फुलून गेले

होळीचा सण आटोपला…०१

*

तप्त उन्हाच्या झळा

जीव कासावीस होतो

थंड पाणी प्यावे वाटते

उकाडा खूप जाणवतो…०२

*

तप्त उन्हाच्या झळा

शेतकरी घाम गाळतो

अंग भाजले उन्हाने

तरी राब राब राबतो…०३

*

तप्त उन्हाच्या झळा

पायाला फोड तो आला

अनवाणी फिरते माय

चारा बैलाला टाकला…०४

*

तप्त उन्हाच्या झळा

सोसाव्या लागतील

काही दिवसांनी मग

सरी पावसाच्या येतील…०५

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ कवितेचे कवडसे… ☆ प्रा. सुनंदा पाटील ☆

प्रा. सुनंदा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ कवितेचे कवडसे… ☆ प्रा. सुनंदा पाटील ☆

अर्थाच्या फुलल्या कलिका शब्दांची सजली पाने

रसिकांची दादही मिळता कवितेचे झाले गाणे

*

अर्थाच्या या युगुलाने गगनात विहारा जावे

शब्दांनी क्रौंच व्हावा कवितेने वाल्मिकी व्हावे

*

शब्दांना गोत्र नसावे शब्दांची जात नसावी

शब्दांनी नटली सजली माझी कविताच असावी

*

अक्षरे सांधुनी ओली शब्दांचे राऊळ झाले

अर्थाच्या गाभाऱ्याशी कवितेचे विठ्ठल आले

*

अर्थाच्या दोरा वरुनी शब्दांनी विहरत जावे

कवितेची विजय पताका लहरते पुन्हा सांगावे

*

इंद्राची गौतम गाथा मी अहल्येस सांगावी

कवितेचा राम दिसावा ती शिळा कधी नच व्हावी

*

ओठांची महिरप पुसते  तुज मूक स्पर्श गंधाने

तेथेच फुलावी कविता प्रेमाच्या मृदु शब्दाने

*

अंगणी गाय हंबरता मायेस वासरू लुचते 

वात्सल्य दाटुनी येता मग कवीस कविता सुचते

*

घननीळ सावळा हसला थरथरत्या चांदणवेली

अंगात वीज लखलखता कवितेची राधा झाली

*

इतिहासाच्या पानांनी समरांगण योद्धे कळले

डफ थाप पवाडे गाता कवितेचे डोळे झरले

*

रासात रंगली राधा राधेचा शाम मुरारी

गोपाल शब्दही झाले कविता झाली गिरीधारी

*

शब्दांच्या डेऱ्यामधुनी अर्थाचे घुसळण होई

नवनीत घेऊनी कविता रसिकांस भेटण्या येई

*

रंगात रंगते कविता छंदात काव्यही हसते

लड सप्तसुरांची मिळता नव रसात कविता फुलते

*

व्यासांनी सांगितलेले श्री गणेश घेती लिहुनी

कवितेच्या अंगावरती अक्षरे थांबली सजुनी

*

रुसलेली असते कविता कवी कृष्ण सावळा होतो

राधाच वाटते कविता हलके हृदयाशी घेतो

गझलनंदा

© प्रा.सुनंदा पाटील

गझलनंदा

८४२२०८९६६६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ रंग सृजनाचा…. सण होळीचा… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

☆ रंग सृजनाचा…. सण होळीचा☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

तप्त ऊन झळा  दाह करिती सृष्टीचा ! शिडकावा देई हळूच थेंब वळीवाचा !

फाल्गुन येईल सण घेऊन होळीचा ! रंग सृजनाचा अन् असीम आनंदाचा !

*

विविध रंगांची रंगपंचमी दिसे निसर्गात!

चाहुल त्यांची मनास देई गारवा वसंतात!

*

जळून जाईल दृष्ट वाईट प्रवृत्ती होळीत!

अन् राखेतून नवनिर्मिती होई जगतात!

*

वसंत चाहूल देई उत्साह जीवनाला! पालवीतील सृजन दिसे नित्य क्षणाला !

फाल्गुन पुनवेचे चंद्रबिंब येता नभी! तेजाने न्हाऊन निघते धरती  अवघी!

प्रकटतो सृष्टीचा नूतन अनुपम भाव, रंग सृजनाचा घेऊन येई होलिकोत्सव !

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆– “स्वप्नातले घर…” – ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

? – “स्वप्नातले घर– ? ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

अशी असावी खोली माझी

पुस्तक भरल्या  भिंतीची

नजरेपुढती शब्द  खजिना

विट न दिसावी मातीची

*

 विशाल नभ अथांग सागर

गवाक्षातून   दिसो निरंतर 

 हिरवेगार  झाड  देईल

 झुळूक मधूनच स्फूर्ती जागर

*

 स्वप्नातील घर अनुभवास्तव

 बिछायतही मृदू मुलायम

 लिखाणाची  जुळणी कराया

 असेच असावे सारे सक्षम

*

  लिहा वाचण्यासाठी सांगा

  स्वर्गी असेल का अशी जागा

   शांत निरामयता  मिळवाया

   हीच अशीच ,हवी मज जागा

© सुश्री नीलांबरी शिर्के

मो 8149144177

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ चा’हूल’… ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆

सुश्री तृप्ती कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ?

चा’हूल’… ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी

आपल्या अंगणात

मान खाली घालून

अगदी तन्मयतेने

दाणे टिपणारे

हे पक्षी

कसल्याशा

चाहुलीने

क्षणार्धात

आपले पंख पसरवून

उडत जातात…

अन्

सुरुवातीला स्पष्टपणे

दिसणाऱ्या त्यांच्या प्रतिमा

मग हळूहळू हवेत

आपल्या अस्तित्वाच्या खुणा

सोडून देतात…

एखाद्या चित्रकाराने

मोकळ्या कॅन्व्हास वर

काही चुकार स्ट्रोक सोडून

द्यावेत तशा…

प्रिय कविते

तु ही तशीच …

नेमका तो क्षण

टिपण्याच्या वेळी

तु उडून जातेस

अन्

माझ्या शब्दांत उतरतात

केवळ

तुझ्या काही चुकार,

अव्यक्त जागा…

अन् खूप मोठं

ऐसपैस अवकाश….

 

©  सुश्री तृप्ती कुलकर्णी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ जागतीक कविता दिना निमित्त – कविता होते… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल

?  कवितेचा उत्सव ?

☆ कविता होते… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

(जागतीक कविता दिना निमित्त कविता होणार्‍या श्वासाला अर्पण •••)

एक छोटीशी अळी

असंख्य संकटांचे बोचतात काटे

तेव्हा स्वत:ला सुरवंट बोलते

मग समाजाच्या रूढींच्या कोषात  स्वत:ला बंद करते

मग जाणिव होते स्वत्वाची

मग ••• याच जाणिवेतून

सुंदर रंगीबेरंगी फुलपाखरू भिरभिरते

आणि••••

आयुष्याची कविता होते••••

 

एक परी  आपल्या संसारात विहरते

त्यालाच आपले विश्व मानून•••

प्रेमाची पावती काही काळात मिळते

मातृत्वाची चाहूल लागते•••

आपले रक्त श्वास सारे काही या जिवास ती अर्पण करते

पूर्ण भरताच दिवस ती माता बनते

आणि•••

महिन्यांची कविता होते••••

 

एक छोटेसे फूल

पानाआड कळी होऊन लपते

कुण्या माळ्याची नजर पडून

अवचित खुडू नये म्हणून आपल्या परीने प्रयत्न करते

भरतात पाकळ्या पाकळ्यात रंग

मिळतो एक जादूई स्पर्श

त्या स्पर्शावर सर्वस्व ओवाळून टाकले जाते

आसमंत गंधाने भारते

एक टपोरे फूल झाडावर हसते

आणि•••

दिवसांची कविता होते•••

 

एक कारखाना

कच्च्या आराखड्यास साचात घातले जाते

त्याला पोषक असे अवयव जोडले जातात

सारी जुळणी झाली की मग

त्याला उपकरण सुरू होणारा आत्मा भरला जातो

पॅकिंगचे मेकअप केले जाते

आणि•••

तासांची कविता होते•••

 

एक लक्ष्य•••

त्यासाठी प्रयत्नांची शर्थ होते

आत्मविश्वासाची परिक्षा घेतली जाते

जिद्द कसाला लागते

सातत्य आजमावले जाते

घवघवीत यशाचे शिखर मिळते

त्या क्षणाने भान हरपते

आणि •••

क्षणाची कविता होते•••

 

क्षणा पासून तास

तासापासून दिवस

दिवसा पासून महिने

महिन्यांपासून आयुष्य

सगळ्यासाठी असतो एक ध्यास

त्यासाठी पणाला लागतो श्वास न श्वास

या प्रत्येक श्वासात असते एक कविता

तिला जन्माला घालण्याचा एकसंध होतो श्वास

आणि•••

श्वासाची कविता होते••••

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “कविता —” ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? कवितेचा उत्सव ?

☆ “कविता —” ☆  सुश्री मंजुषा सुनीत मुळे  ☆

कविता माळरानी 

माझी कविता रानोरानी 

हुंदडे बागडे स्वच्छंदें 

मम कविता पानोपानी …. 

*

कुणासवे अन कशी आली हो 

आली ही कुठूनी 

नजराणे नव उन्मेषाचे 

सांगाती घेऊनी …. 

*

साजण जणू हा निसर्गराजा 

ओढ तयाची मनी 

सुख दु:खातही त्याची सोबत 

आली ही ठरवुनी …. 

*

ऋतू ऋतूंचा रंग वेगळा 

जाणून आपल्या मनी 

साज आगळा डौल आगळा 

येते पण सजुनी …. 

*

वसंत येता कोकिळासवे 

जाई मनी हरखुनी 

सृष्टीसंगे आनंदाने 

डोलत जणू ही मनी …. 

*

वर्षेस भेटता तृप्तीने ही 

टपटपते अंगणी 

भाव मनीचे फुलून येती 

मोरापरी नाचुनी …. 

*

शिशिराची ती संगत न्यारी 

मोहरवी निशिदिनी 

शिरशिरी गुलाबी फुलताना 

रोमांच हिच्या की मनी …. 

*

ग्रीष्माच्या काहिलीत जेव्हा 

धगधगते ही अवनी

सांगाव्यावाचून येई ही 

सर वळवाची बनुनी …. 

*

ही रुपे दाखवी वेगवेगळी 

सौंदर्याची खनी 

कोमेजो ना कधी ऊर्मी ही 

प्रार्थनाच मन्मनी ……… 

©  सुश्री मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ माता… ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी ☆

प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी

? कवितेचा उत्सव ?

☆ माता… ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी

अशीच असते तुमची आमची माता

वात्सल्याचा सागर अन मायेची सरिता

*

नऊ महिने तुम्हा कुक्षीमध्ये धरले

घेऊन ओझे ते प्राण रसाने पोशियले

प्रसव वेदने मध्ये तृप्तीची क्षमता

*

लहानाचे मोठे तुम्हा ती करता

सर्व गोष्टीचे लाड तुम्हा पुरविता

प्रसंगी स्वतः ची उपेक्षा होता

*

ना गुरू पाहिला मातेसमान आज

जीवनी राखा थोडी तर लाज

बिकट प्रसंगी उद्धरूनी नेता

*

काबाड कष्ट उपसते ती आई

प्रपंच गाडा ओढत ताणत नेई

स्वदुःख मनातच लपवून ठेवी

वृद्धपणाची काठी व्हा तुम्ही आता

*

ही अशीच असते तुमची आमची माता

© प्रो डॉ प्रवीण उर्फ जी आर जोशी

ज्येष्ठ कवी लेखक

नसलापुर  बेळगाव

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विजय साहित्य # 214 ☆ शिकवण ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 214 – विजय साहित्य ?

☆ शिकवण ☆ कविराज विजय यशवंत सातपुते  ☆

कविता

म्हणजे काय

हे देखील

मला माझ्या

कवितेनंच

शिकवलं

जेव्हा

माझ्या वर

हसणाऱ्या

माणसाला

माझ्याच कवितेनं

रडवलं….!

© कविराज विजय यशवंत सातपुते

हकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈