सौ.ज्योत्स्ना तानवडे
कवितेचा उत्सव
☆ भूतली वैकुंठ… ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆
वैकुंठ पंढरी | आषाढीची वारी |
भावे नेम करी | दर साल || १ ||
वाट पंढरीची | ओढ विठ्ठलाची |
साथ भाविकांची | मेळा चाले || २ ||
श्रद्धेचा मृदुंग | मनाचा अभंग |
संकीर्तनी दंग | नाम घेई || ३ ||
देहबुद्धी सोडी | लोभ माया तोडी |
अभंगाची गोडी | मना जडे || ४ ||
रिंगण जन्मांचे | धावणे मनाचे |
चंदन भक्तीचे | लावियले || ५ ||
वारीतले क्षण | जीवन शिक्षण |
संत शिकवण | मनी ठसे || ६ ||
पूर्व सुकृताची | वारी पंढरीची |
ध्वजा वैष्णवांची | फडकते || ७ ||
© सौ.ज्योत्स्ना तानवडे
वारजे, पुणे.५८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈