श्री आनंदहरी
कवितेचा उत्सव
☆ पर्यावरण दिन – चल मित्रा, एक झाड लावू… ☆ श्री आनंदहरी ☆
कायद्याने जरी असला गुन्हा
शोधल्या पळवाटा पुन्हा पुन्हा
तोडत राहिलो झाड न् झाड
करत राहिलो सारेच उजाड
कळले नाही कधीच कुणा
आड आला मी, माझेपणा
निसर्गाचाही एक कायदा असतो
तो पाळायचा जन्मतःच केलेला वायदा असतो
‘ सारे काही विसरून जाऊ
उद्याचे काय ते उद्याच पाहू ‘
म्हणता म्हणता काळ सरला
श्वासासाठी प्राणवायू न उरला
तरीही अजुनी जाग नाही
जागेपणाचा काहीच माग नाही
झोपेचं जर घेशील सोंग
( जगणं होईल नुसतंच ढोंग )
भोगावे लागतील अनंत भोग
नको कविता लिहीत राहू
‘कोरडा भवताल’ फिरून पाहू
उठ, आतातरी बाहेर जाऊ
चल मित्रा, एक झाड लावू
..….चल मित्रा, एक झाड लावू !
© श्री आनंदहरी
इस्लामपूर, जि. सांगली
भ्रमणध्वनी:- 8275178099
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈