सौ. पल्लवी ऋषिकेश कुलकर्णी
कवितेचा उत्सव
☆ नात्याची विण… ☆ सौ. पल्लवी ऋषिकेश कुलकर्णी ☆
चुली चुली तुला एक विचारु काय ग
आई आणि तुझं नातं आहे तरी काय ग …. १
दिवसभर एकमेकींच्यात गुंतलेल्या असता
एवढे हितगुज तरी काय करता
एकमेकींच्यात असे तुम्ही सुखातता काय ग
आई आणि तुझं नातं आहे तरी काय ग ….. २
तिच्या खरबडीर हाताने तुला ती सारवते
तुझ्या उबित ती आपल्या वेदनांना हरवते
असेच तुमचे नाते मुक पणे फुलवता काय ग
आई आणि तुझं नातं आहे तरी काय ग ….. ३
तिच्या मनातील तगमग तुझ्या पोटी धगधगते
तुझ्या पोटातील माया तिच्या हाती जाणवते
सुख दुःख दोघींचे तुम्ही वाटुन घेता काय ग
आई आणि तुझं नातं आहे तरी काय ग ….. ४
दोघींमुळे घरादाराला येतो जेव्हा तृप्तीचा ढेकर
देही तेव्हा उसळत असेल भुकेचा डोंगर
एकमेकींच्या जाणिवांना कसे झाकुन ठेवता ग
आई आणि तुझं नातं आहे तरी काय ग ….. ५
तुझ्या दिव्य प्रकाशात तेजाळते माझी आई
तिच्या नयनांच्या निरांजनी तुच असे ठाई ठाई
एकमेकींच्यात असे कसे लवणापरी रहाता ग
आई आणि तुझं नातं आहे तरी काय ग ….. ६
पाण्याच्या शिपकाऱ्याने शांत होता तुझा दाह
आईचाही रात्री मग विसावतो थकलेला देह
दुराव्याच्या या क्षणी दोघींच्या मनी असता काय ग
आई आणि तुझं नातं आहे तरी काय ग ….. ७
© सौ. पल्लवी ऋषिकेश कुलकर्णी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈