सुश्री प्रभा सोनवणे
कवितेच्या प्रदेशात # 123
☆ होळी एक सण… ☆
होळी एक सण–
रंगाचा,
लहानपणी असते अपूर्वाई,
भिजवण्याची, भिजवून घेण्याची!
लाल, हिरवे,निळे, गहिरे रंग—
माखवलेलं अंग,
चित्र विचित्र सोंगं—
फिरत असायची गल्लो गल्ली !
आदल्या दिवशीची पेटलेली होळी,
पुरणपोळी, पापड,कुरडई, भजी,
अग्नीत सोडून दिलेला नैवेद्य,
नारळ,पैसे —-
इडापिडा टळो….साप विंचू पळो!
हुताशनी पौर्णिमेचा उत्सव….
शिव्या…बोंबा…आणि
ज्वाळा..धूर….एक खदखद….
होळी ला पोळी आणि धुलवडीला नळी….अर्थात मटणाची….
सारं कसं साचेबंद…
तेच तेच…तसंच तसंच…
किती दिवस??किती दिवस??
उद्याची होळी वेगळी असेल जरा…
धगधगतील मनाच्या दाही दिशा….उजळून निघेल कोपरा..
कोपरा..
नको होळी…लाकडं जाळून केलेली…
नकोच रंग…पाण्याचा अपव्यय करणारे ….
खुसखुशीत पुरणपोळी…तुपाची धार…सारंच सुग्रास!
एक साजूक स्वप्न—–
रंगाचा सोहळा डोळे भरून पहाण्याचा…
हिरवी पाने, पिवळा सोनमोहोर, लालचुटूक, पांगारा आणि गुलमोहर, निळा गोकर्ण, पांढरे, भगवे, गुलाबी बोगनवेल…
फुललेत रस्तोरस्ती….
तेच माखून घ्यावेत मनावर आणि
निःसंग पणे साजरा करावा वसंतोत्सव!
होळी एक सण…रंगाचा!
करूया साजरा न जाळता न भिजता!
© प्रभा सोनवणे
“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈