सुश्री उषा जनार्दन ढगे

कवितेचा उत्सव
☆ शब्दसुमनांजली – स्वरलतादीदी ☆ सुश्री उषा जनार्दन ढगे ☆
आगमनसमयी वसंत ऋतूच्या
कोकिळेचा तो सूर हरवला
स्वर..सम्राज्ञीच्या कंठातला
दशकानुदशके मनांत जपलेला..
गानकोकिळा..गानसरस्वती
नावभूषणें असती तिची किती
भारतरत्नही ती शान देशाची
तीच सूरांची महासम्राज्ञी होती..
चेहेर्यावरी सुहास्य सस्मित
साधीच होती तिची रहाणी
दोनही खांद्यांवरी पदर सावरीत
अदबीने सजली दीदीची गाणी..
ज्येष्ठ सुकन्या मंगेशकरांची
किती गावी तरी तिची थोरवी ?
ज्यांची गाणी लतादीदीने गायिली
ते जाहले भारतातील महाकवि..
नित्य देतच राहिली जगताला
स्वर्गीय स्वरांची अपूर्व अनुभूती
सूरासूरांतून जोडीत राहिली
मनांशी भावनिक आत्मिक नाती..
तिच्या आवाजातील माधुर्याने
शब्दांसही रत्नांचे मुकुट चढले
निःशब्द भावनांना त्या सजविले
ते शब्दचि आज ओठी मुके जाहले..
गीत गाण्यांनी मंत्रमुग्ध केले
कानसेनांचे कान तृप्त जाहले
ठेविला ठेवा अजरामर गीतांचा
परि जग सूरांचे आज पोरके झाले..
गानसम्राज्ञ्री आज ही भारताची
अलविदा करूनी सोडूनी गेली
रफी मुकेश तलत किशोरदांसंगे
स्वर्गात आज हो महेफिल सजली..
तपस्विनी एक शारदास्वरुप
सफल झाली तिची आराधना
श्वासात हळहळले गिळले हुंदके
शोक न आवरे आजि रसिक जनांना..
कितीक तर्हेची गीते आळविली
सप्तसूरांनीच आकंठ भिजलेली
आज आलाप कातरतोय मनांत
लतादीदींच्या चरणी अर्पिते मी श्रध्दांजली..!
© सुश्री उषा जनार्दन ढगे
०६-०२-२०२२
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈