मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ शेखर साहित्य # 15 – कवितेशी बोलू काही ☆ श्री शेखर किसनराव पालखे

श्री शेखर किसनराव पालखे

 ☆   साप्ताहिक स्तम्भ ☆ शेखर साहित्य # 15 – कवितेशी बोलू काही ☆ श्री शेखर किसनराव पालखे ☆ 

अनामिक हे सुंदर नाते

तुझ्यासवे ग जुळून यावे

तुझ्याच साठी माझे असणे

तुलाच हे ग कळून यावे

 

आनंदाने हे माझे मन

सोबत तुझ्या ग खुलून यावे

दुःखाचे की काटेरी हे क्षण

कुशीत तुझ्या ग फुलून यावे

 

भेटावी मज तुझी अशी ही

घट्ट मिठी ती हवीहवीशी

अथांगशा या तुज डोहाची

अचूक खोली नकोनकोशी

 

रुजावेस तू मनात माझ्या

प्रेमळ नाजूक सुजाणतेने

तूच माझे जीवन व्हावे

अन तुच असावे जीवनगाणे

 

© शेखर किसनराव पालखे 

सतारा

05/06/20

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ ‘नि:संग’ – सुश्री संजीवनी बोकील ☆ प्रस्तुति – सौ. राधिका भांडारकर

सुश्री संजीवनी बोकील

 ☆ कवितेचा उत्सव ☆ ‘नि:संग’ – सुश्री संजीवनी बोकील ☆ प्रस्तुति – सौ. राधिका भांडारकर ☆ 

स्वत:चं सामान्यत्व

फार छळू लागलं

की म्हातारीच्या पिसाकडे बघावं

स्वच्छंदपणे कसं

उडत असतं हवेत

आपल्याला कुणी गरुड

म्हणत नाही

याची त्याला खंत नसते

बळकट पंख नसल्याचा

खेद नसतो

आकाशाचा अंत गाठण्याचा

हव्यास नसतो

अन् पृथ्वीचा ठिपका

होउन जाण्याइतकी

उंची गाठायचा मोह नसतो.

आपल्याच मस्तीत भिरभिरत

हवेशी जुळवून घेत

आपल्या हलक्या अस्तित्वाला

सहजपणे स्वीकारत

ते मजेत जगून घेतं

उंचावर गेल्यावर

जमिनीची भीती नसते

अन् जमिनीवर उतरल्यावर

नसतो आकाशाचा मोह!

म्हणून

स्वत:चंं सामान्यत्व

फार सलु लागलं

की बघावं

नि:संग भिरभिरणार्‍या

म्हातारीच्या पिसाकडे….

 

सुश्री संजीवनी बोकील

(या कवितेचे रसग्रहण काव्यानंद मध्ये दिले आहे.)

प्रस्तति: सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कविता ☆ साप्ताहिक स्तम्भ # 82 – विजय साहित्य – अस्तित्व….! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते

कविराज विजय यशवंत सातपुते

☆ साप्ताहिक स्तम्भ # 82 – विजय साहित्य ☆ अस्तित्व….! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

शब्दांनीच शब्दांची

ओलांडली आहे मर्यादा

फेसबुक प्रसारण आणि

ऑनलाईन सन्मानपत्र,

नावलौकिक कागदासाठी

धावतात शब्द…..

अर्थाचं, आशयाचं,

आणि साहित्यिक मुल्यांचं

बोटं सोडून…..;

आणि करतात दावा

कवितेच्या चौकटीत

विराजमान झाल्याचा..

खरंच कविते,

लेखक बदलला तरी चालेल

पण तू अशी

विकली जाऊ नकोस

किंवा येऊ नकोस घाईनं ;

कवितेच्या, काव्याच्या

मुळ संकल्पनेशी

फारकत घेऊन….!

तू सौदामिनी,

होतीस,आहेस आणि

राहशीलही….!

पण तुला खेळवणारे

खुशाल चेंडू हात

एकदा तरी,

होरपळून

निघायला हवेत..;

तुझ्या बावनकशी

अस्तित्त्वासाठी…!

 

© विजय यशवंत सातपुते

यशश्री, 100 ब दीपलक्ष्मी सोसायटी,  सहकार नगर नंबर दोन, पुणे 411 009.

मोबाईल  9371319798

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ जन्मरास ☆ श्रीशैल चौगुले

श्रीशैल चौगुले

☆ कवितेचा उत्सव ☆ जन्मरास ☆ श्रीशैल चौगुले ☆ 

कृष्ण रंगवून गेला मधुवन

अन् कायेवर ओघळले घन.

गौळणीही नाचू लागल्या गोकूळी

राधा बेभान हरले तन-मन.

सप्तरंग तालावर थेंब-थेंब

कृष्णाच्या गालावर प्रेमव्रण.

वृक्ष-लता पुलकीत तरुवर

स्वर्गासमच फुलले वृंदावन.

मायेत-रंगूनी धरती भिजली

यमुनेच्या जळी  संभार संपन्न.

आत्मभान विसरुन नाचे भक्ती

मुक्त भावना अर्पून हे जीवन.

अशी श्रेष्ठ लिला भगवंतांची

भक्तीमय बासरी शाम सदन.

 

© श्रीशैल चौगुले

९६७३०१२०९०

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ सुजित साहित्य # 73 – मी… ☆ श्री सुजित कदम

श्री सुजित कदम

☆ साप्ताहिक स्तंभ – सुजित साहित्य #73 ☆ 

☆ मी… ☆ 

एकटाच रे नदीकाठी या वावरतो मी

प्रवाहात त्या माझे मी पण घालवतो मी

 

सोबत नाही तू तरीही जगतो जीवनी

तुझी कमी त्या नदीकिनारी आठवतो मी

 

हात घेऊनी हातात तुझा येईन म्हणतो

रित्याच हाती पुन्हा जीवना जागवतो मी

 

घेऊन येते नदी कोठूनी निर्मळ पाणी

गाळ मनीचा साफ करोनी लकाकतो मी.

 

एकांताची करतो सोबत पुन्हा नव्याने

कसे जगावे शांत प्रवाही सावरतो मी.

© सुजित कदम

पुणे, महाराष्ट्र

मो.७२७६२८२६२६

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ वाटे तुझ्या संगे ☆ सौ. मुक्ता महेश अभ्यंकर

सौ. मुक्ता महेश अभ्यंकर

 ☆ कवितेचा उत्सव ☆ वाटे तुझ्या संगे ☆ सौ. मुक्ता महेश अभ्यंकर ☆ 

वाटे तुझ्या संगे जावे निसर्गात दूर

तिथे नको लोकांचा महापूर

शब्दांचाही  वाटेल तिथे मला गलका

तुझ्यामाझ्यात असेल फक्त भावनेचा श्वास हलका

गुजगोष्टी किती करायच्या त्याला नसेल मेळ

गुंतून राहीलेल्या भावनांचा मनात असेल खेळ

सुखाचे क्षण उधळतांना वेळेची नसेल मर्यादा

आंतरिक समाधानाची भावना आनंद देईल ज्यादा

प्रेम प्रेम  करावे किती त्याला नसेल पाश

आयुष्याच्या अंतर्यामी हिच असेल आस

 

© सौ. मुक्ता महेश अभ्यंकर

संपर्क –साहाय्यक प्राध्यापिका, श्रीमती काशीबाई नवले कॉलेज ऑफ फार्मसी, कोंढवा पुणे

मुक्काम :  सन युनिव्हर्स फेज २, एम ५०३, नवले ब्रिज जवळ, नऱ्हे, पुणे.

फोन   : ९८२२६२०५६६, ७५०६२४३०५०

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कवितेच्या प्रदेशात # 92 ☆ सावळ बाधा ☆ सुश्री प्रभा सोनवणे

सुश्री प्रभा सोनवणे

(आप  प्रत्येक बुधवार को सुश्री प्रभा सोनवणे जी  के उत्कृष्ट साहित्य को  साप्ताहिक स्तम्भ  – “कवितेच्या प्रदेशात” पढ़ सकते  हैं।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 92 ☆

☆ सावळ बाधा ☆ 

(वृत्त-वररमणी)

हे गोविंदा तुझ्याच साठी जन्म घेतला नवा कितीदा या भूमीवरती

अवचित आले भान असे की,तशीच आहे विरहवेदना याही जन्मांती

 

वादळवेडी अभिसाराची प्रतिमा आहे तुझ्या प्रीतिच्या डोहामधली मी

अनंत वेळा तुझीच झाले,घरदाराला सोडुन सारे कोळुन प्यालेली

 

या देहाच्या किती कामना, अभिलाषा की म्हणू मागण्या तारूण्याच्या या

पिसे लागले तुझे जिवाला या संसारी चित्त रमेना जळते ही काया

 

श्रीरंगा मी तुझीच राधा जन्मोजन्मी एकच बाधा श्यामल रंगाची

तुझे सावळे रूप मनोहर पुरुषोत्तम तू माझा ईश्वर व्याख्या प्रेमाची

 

© प्रभा सोनवणे

“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ तू हरवलीस…. ☆ सौ. वंदना अशोक हुळबत्ते

सौ. वंदना अशोक हुळबत्ते

☆ कवितेचा उत्सव ☆ तू हरवलीस…. ☆ सौ. वंदना अशोक हुळबत्ते ☆ 

स्वयंपाक करताना

कविते, नको मनात येवू

लेकरं माझी

जाणार आहेत शाळेत जेवून

तुला लिहित बसले तर

कसं होणार काम?

मी म्हणते जरा तू थांब

 

आॅफिस मध्ये आहे

फाईलींचा ढिग

काम करता करता

जाईन मी वाकून

तिथ तू आलीस तर

काम कसं होणार

पगार नाही मिळाला तर

घर कसं चालणार

कविते तू इथ नको  येवू

 

संध्याकाळी घरी

जाण्यांची घाई

चिमणी पाखरं माझी

वाट बघतात बाई

अंमलेल्या मनात तूला कुठं ठेवू

कविते तू आता नको येवू

 

दिवसभराच्या कामाने

कंटाळा आला भारी

निद्रादेवीच्या कुशीत

शिरली स्वारी

दुसऱ्या दिवशीच्या

कामाची यादी समोर आली

कविते तू  कुठं ग  हरवलीस?

 

© सौ.वंदना अशोक हुळबत्ते

मो.९६५७४९०८९२

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 92 ☆ आपलाही सूर्यास्त ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

☆ साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 92 ☆

☆ आपलाही सूर्यास्त  ☆

ढगांच्या गादीवर पहुडलेला सूर्य

स्तब्ध आहे जागेवर

पृथ्वी ठरवतेय

त्याच्या उगवण्या मावळण्याची दिशा

वाटतोय तो स्वतःहाच्याच कक्षेत

येरझारा घातल्या सारखा

स्वतःहाच्याच किरणांमुळे

झालाय हैराण

घामाच्या वाहू लागल्यात धारा

ओली चिंब होतेय धरती

त्यातून पुटणारा अंकुर

हळूहळू उमलत जाणारं

कोवळ रोप वयात येतं

हिरव्या शालूतील ते सौंदर्य पाहून

मनाला होणारा हर्ष

कणसात दाणे भरताच

काळजीचं लागलेलं ग्रहण…

 

काढणी, मळणी नंतर

कवडी किमतीला

बैलगाडीतून विदा केलेलं धान्य

पुन्हा भरडलं जातं

नजरे समोरून दूर झाल्यावर देखील

सोन्यासारख्या धान्याची

झालेली अवस्था पाहून

मन विषण्ण होतं…

 

उगवत्या सूर्याला नमस्कार करणारे हात

व्यस्त आहेत

आपापल्या कामात

सूर्यकिरणं टेकलीत डोंगरमाथ्याला

त्यांच्या आधारानं

पायउतार होत चाललाय सूर्य

जगाचं लक्षही नाही त्याच्याकडं

पश्चिमेकडे निघालेले लोक

पहातायेत त्याचं मावळणारं रूप

आपलाही सूर्यास्त

जवळ आलाय

याची पुरेपूर जाणीव असलेले…

 

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ आभाळ भरता! ☆ श्री मुबारक उमराणी

श्री मुबारक उमराणी

☆ कवितेचा उत्सव ☆ आभाळ भरता! ☆ श्री मुबारक उमराणी ☆

दुःख आभाळ भरता

श्वासी गडगडे मेघ

हुंदक्यात अश्रूधार

कडाडते वीज रेघ

 

डोळा डोंगर कपारी

अश्रूधार बरसते

गंगा यमुना नयनी

प्रेमभेटी तरसते

 

प्रेमे आशिष मिळता

बाष्प स्पर्शे सूर्य  तनी

पाठीवरी हळुवार

हस्तस्पर्श, हर्ष मनी

 

अश्रूथेंब क्षारयुक्त

समुद्रही  फिका पडे

तन भुमी रे शिंपता

भिजे ह्दयीचे कडे

 

सुख समाधान पिक

कोंब अंकुरेल  मनी

जिद्द, उत्साह कणीस

भरे रोमरोमी कणी

 

पंख पाखरु फिनिक्स

झेप पतंगी रे दंग

इंद्रधनु नसनसी

सुखरंगी सप्तरंग

 

मनमोर थयथय

नाचे आनंदे क्षितीजी

प्रेमवारा गारस्पर्श

कडाडते मन विजी

 

शब्द सळसळे पाणी

हर्ष जलदा शिपिंता

झरझरे ते मोदाश्रू

तृष्णा लोपते रे पिता

 

जन्मी दुःखाश्रू  सुखाश्रू

नेत्री मेघालयी  खुले

सुखदुःख हले झुला

शंकरपार्वती झुले

 

© श्री मुबारक उमराणी

शामरावनगर, सांगली

मो.९७६६०८१०९७.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares