श्री मुबारक उमराणी
☆ कवितेचा उत्सव ☆ शुक्राची चांदणी.. ☆ श्री मुबारक उमराणी ☆
चांदणी शुक्राची
मनात फुलते
पहाट गारवा
फुलात झुलते
सरत्या रात्रीला
सलाम करते
दुःखाचा ओहोळ
सुखानी भरते
क्षितिज किनारी
रांगोळी पेरते
शुक्राची चांदणी
मनात कोरते
रातीच्या हुंकारी
निशब्द पावते
काळोखी काजळ
नयनी लावते
निघाल्या चांदण्या
सूर्याच्या स्वागते
रातराणी गंध
हुंगाया लागते
दमले किटक
भैरवीच गाते
चांदण्या फुलांत
माळुनच जाते
ओल्याच दवात
झाडच भिजते
हिरव्या चुड्यात
शृंगार सजते
गारवा सोसत
गवत हसते
काट्याच्या मनात
अंधार लसते
पाखरांचे पंख
गारवा सोसते
पिलांच्या चोचीत
अंधार ठोसते
अंधार गडद
ह्दयी गिळते
पहाटे क्षितिज
प्रकाश पिळते
© श्री मुबारक उमराणी
शामरावनगर, सांगली
मो.९७६६०८१०९७.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈