सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
जन्म – ४ जुलै १९५४.
शिक्षण – एम् ए.
प्रामुख्याने रत्नागिरी आणि सांगली येथे वास्तव्य झाले. आता पुण्यात स्थायिक! गृहिणी पदाच्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडताना च शिशुवर्गापासून ते किशोर वर्गापर्यंत च्या मुलांना अध्यापन.
लेखनाची आवड जोपासली. विविध वर्तमानपत्रे आणि नियतकालिकात लेखन.’ जसं सुचलं तसं’ या लेख व कवितांच्या पुस्तकाचे प्रकाशन पुणे येथे १६ जून २०१९ रोजी झाले.
☆ कवितेचा उत्सव ☆ तू आणि मी ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆
तुझ्या माझ्या आठवणींची
साठीही उलटून गेली!
पाठच्या बहिणीसम सखे,
तुझी माझी जोडी राहिली!
बालपणीची आपुली सोबत,
एकमेकीच्या घरी असे!
साजशृंगार तुझा माझा,
सारखाच मनी वसे !
एकीने घातली चार वेणी,
दुसरी लाही तशी हवी
तर कधी लांब वेणी वरी
रिबिनीची ही झूल हवी !
बालपणाने प्रवेश केला,
अलगद पणे तारुण्यात !
गोड गुपितांची लयलूट,
एकमेकींच्या कानात !
शैशवाचे दिवस सरले,
गेलो मांडवाच्या दारी !
ओढ आपली तरी न संपली,
होती अन् ती खरी खुरी!
मिळे अकल्पित वेळ कधी,
असे एकमेकीसाठी शकून!
सोडला ना एकही आपण,
भेटीचा तो असे सुकून !
आता उरलो एकमेकीचा,
विरंगुळा तोही मनोमनी !
आयुष्याच्या उरल्या क्षणांची,
साथ मिळेल ही क्षणोक्षणी !
© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈