मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ स्मृतीयात्रा ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी

सुश्री दीप्ती कुलकर्णी

☆ कवितेचा उत्सव ☆ स्मृती यात्रा ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी☆ 

 मनाच्या प्रांगणावर उतरला पक्षी

उसवू लागला,स्मृतीरुप नक्षी

स्मृती आनंददायी

गात्रे गात्रे सुखविणार्य

स्मृती दुःख दायी

अंतःकरणास भिडणार्या

स्मृती निरोपाच्या

भावविश्व हलविणार्या

स्मृती स्वागताच्या

स्नेह जोपासणार्या

स्मृती सणवारांच्या

उत्साहास उधाण आणणार्या

स्मृती नातेसंबंधांच्या

कडु गोड बनलेल्या

स्मृती अशाही चिवट

नको नकोशा वाटणार्या

मन बनविणार्या बोथट

धारदार जिव्हेच्या

एकामागोमाग एक

जीवनपट उलगडणार्या

आपले नि परके यातील

सीमारेषा शोधणार्या

स्मृती यात्रा ही अपार

मनरुपी वारुवर

वेगाने होई स्वार

नेई मजला दूरवर.

 

सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा.

 © सुश्री दीप्ती कुलकर्णी

कोल्हापूर

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 72 ☆ दीप अंगणात ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

☆ साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 72 ☆

दीप अंगणात

दीप अंगणात जळो

सारी इडापिडा टळो

आहे सण दिवाळीचा

सुख समाधान मिळो

 

दीपावलीचा पाडवा

त्याच्या नावात गोडवा

पंख फुग्याचे बांधुनी

दीप आकाशी उडवा

 

आल्या चांदण्या या खाली

रंग लावुनी या गाली

दारूकाम हे मोहक

फुलो आकाशात वेली

 

शेत पिको हे जोमात

माल विको हातोहात

अन्नदाता बळीराजा

राहो माझा आनंदात

 

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ राहुंन गेलं बोलायचं नसतं ☆ श्री विद्याधर काठे

☆ कवितेचा उत्सव ☆ राहुंन गेलं बोलायचं नसतं ☆ श्री विद्याधर काठे ☆

कसं जगायचं, कसं जगायचं,

हे कुणालाच माहीत नसतं…

न उमगणारं कोडं, उमगलेलं अगदी थोडं…

आयुष्य असं असतं…

राहुंन गेलं बोलायचं नसतं

 

जगतांना फक्त जगायचं असतं…

एकेक क्षण निसटतांना पहायचं असतं…

हसायचं, रडायचं, धडपडल्यावर पुन्हा उठून उत्साहाने चालायचं असतं…

कळलेलं, न कळलेलं, पण त्या वेळेशी सूर जुळलेलं…

आयुष्य असं असतं…

राहुंन गेलं बोलायचं नसतं

 

देत असतं की नेत असतं, काही केल्या कळत नसतं…

दोन क्षणांचं गणित कधीच जुळत नसतं…

साठवायचं की आठवायचं, हे ही ज्याचं त्यानेच ठरवायचं असतं…

कधी मैफल रंगलेलं, कधी खूपंच मरगळलेलं…

आयुष्य असं असतं…

राहुंन गेलं बोलायचं नसतं

 

कसं जगायचं विचारतांना, जगणं विसरायचं नसतं…

प्रवास चुकला की काय, म्हणून वाटेतच उतरायचं नसतं…

गोंधळलेल्या क्षणी बावरलेलं, पण आपण सावध होऊन सावरलेलं…

आयुष्य असं असतं…

राहुंन गेलं बोलायचं नसतं

 

आपणच घडवलेलं आयुष्य फक्त प्रश्न नसतं…

स्वतःत दडवलेलं, बाहेर शोधायला लावणारं उत्तर असतं…

प्रश्न एकच ठेवून , अनेक पर्याय देणारं,पण उस्फुर्तपणे सामोरं जायचं असतं

आयुष्य असंच असतं…

आयुष्य असंच असतं…

राहुंन गेलं बोलायचं नसतं

 

© श्री विद्याधर काठे

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ साप्ताहिक स्तम्भ – हे शब्द अंतरीचे # 24 ☆ भ्रमनिरस… ☆ कवी राज शास्त्री

कवी राज शास्त्री

☆ साप्ताहिक स्तम्भ – हे शब्द अंतरीचे # 24 ☆ 

☆ भ्रमनिरस… ☆

पाऊस येणार नक्की

मनात पालवी फुटली

पालवी मनात फुटताना

गर्दी ढगाने केली…

 

ढग दाटून आले

काळोख ही पडला

कुठल्याही क्षणाला

सुरुवात होईल पावसाला…

 

मयूर नाचू लागला

पिसारा खुलून गेला

पानांची सळसळ

थंडगार वारा सुटला…

 

थंडगार वारा सुटला

त्याचा जोर वाढला

आलेले आभाळ सर्व

काढता पाय त्यांनी घेतला…

 

भ्रमनिरस जाहला

मन अशांत जाहले

न येता पाऊस काहीच

ढग निघून-विरून गेले…

 

आघात असा झाला

खूप बेकार वाटले

येणाऱ्या पावसाने

का असे भुलविले…?

 

© कवी म. मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ पणती घेऊन हाती ☆ सुश्री नीलांबरी शिर्के

☆ कवितेचा उत्सव ☆ पणती घेऊन हाती ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

 

पणती घेऊन हाती

प्रकाश होऊन आले

हलकेच तमाच्या पुढती

उजळती रेषा झाले

 

थंडीच्या गडद रातीला

उबदापणाही येतो

वेढून कुडी भवताली

मायेची उब तो देतो

 

हि इवली प्रकाशपणती

ह्रदयाशी तेवत ठेवु

आपुलकी विश्वासाचे

नीत स्नेह तियेला देऊ

 

एक चिमट रांगोळीची

अंगणास दे श्रीमंती

उंबरठा त्याच सदनाचा

मर्यादेची सांगतो किर्ती

 

व्यवहार भावनेमधुनी

उंबरठा रेष ओढीतो

व्यवहावर जग चाले

घरगाडा भावना जपतो

 

हा प्रकाश घेऊन हाती

चल जपुया सारी नाती

हा वेढून असता भवती

ना उरे तमाची भिती

 

दिपावलीच्या पूर्ण परिवारातील सर्वांना शुभेच्छा ??

 

©  सुश्री नीलांबरी शिर्के

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ भाऊबीज ☆ सौ. मुग्धा कानिटकर

☆ जीवनरंग ☆ भाऊबीज ☆ सौ. मुग्धा कानिटकर ☆ 

भगवान आणि भाग्यलक्ष्मी यांच्या  लग्नानंतर बऱ्याच वर्षांनी घरी पाळणा हलला. सासर-माहेरच्या नातेवाईकांनी बाळ -बाळंतीणीचं कौतुक  भरभरून केले.दिसामासांनी बाळाची प्रगती अगदी नजरेत भरू लागली.केजीतच या बाळाला दुसऱ्या ईयत्तेचा अभ्यास  पण अगदी सहज अवगत झाला होता.त्याचे पाठांतर पाहून शेजारचे लोक अचंबित होत असत.त्याच्या प्रखर बुद्धिमत्तेची चुणूक स्काॅलरशिपच्या परीक्षेतील सुयशाने त्याच्या शिक्षकांना जाणवली. “त्याला शहरात पाठवा ,आणखी चांगली प्रगती होईल” असा सल्लाही भगवानला शिक्षकांनी दिला.पण खर्चाचे गणित जमणारे  नव्हते.

भाग्यलक्ष्मीच्या  संसार वेलीवर बाळच्या पाठोपाठ आणखी एक सुंदर कळी उमलली. जणूकाही  नक्षत्रांची तेजस्वी  जोडीच भास्कर आणि भावना यांच्या रूपाने अंगणात बागडत असे. भगवान एका खासगी काॅलेजमध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत होते.पगार अगदी कमी आणि तोही बऱ्याच वेळा वेळेवर होत नसे. भाग्यलक्ष्मी काटकसरीने संसाराचा गाडा हाकण्यासाठी जमेल तसा आपल्या पतीस हातभार लावत असे. आईबाबांच्या आचरणातून सुसंस्कार घेतं मुलं मोठी होत होती.भास्करला एका चांगल्या कंपनीचा नोकरी साठी काॅल आला.सर्वांचा निरोप घेऊन भास्कर परगावी गेला. त्याची व भावनांची भेट मोठ्या सणांच्या निमित्ताने होई.

एकदा  दिवाळीच्या  सुट्टीत घरी आल्यावर इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला शिकणाऱ्या भावनाताईच्या मनात आलं, “एवढा पगारदार दादा आहे पण दरवर्षी शंभर रुपयेच ‘भाऊबीज’ म्हणून ओवाळणी देतो.आईबाबांसाठी तर एकदाच नवीन कपडे त्यानं आणलेत.” तिनं हा विषय सहज आईजवळ काढला .बोलताना भाग्यलक्ष्मीचा गळा  अगदी दाटून आला.

“जादा तयारीसाठी भास्करला शिकवणी लावणं आवश्यक होती. पण तेव्हा घरच्या बेताच्याच परिस्थितीचे भान ठेवून त्याने मोठ्या स्वकष्टाने दहावीत गावात पहिल्या क्रमांकावर आपली मोहोर उमटवली.आता शहरात जाऊन मोठा इंजिनिअर होऊन गावाकडे परत यायचं असं स्वप्न उराशी बाळगून होता.”

“जमीन -जुमला, शिल्लक काही नाही. अशी निर्धन अवस्था पाहून बाबांची मोठी घालमेल सुरू झाली होती. सुजाण भास्करने त्याच क्षणी  ‘डिप्लोमा कोर्स पूर्ण करावा’  असाच निर्णय घेतला.  पण धाकट्या बहिणीने सतत चांगल्या पद्धतीने मेरीट मिळवावे. तिने इंजिनिअर होऊन आपले अधुरं स्वप्न पूर्ण करावं. अशी इच्छा आमच्या जवळ त्याने व्यक्त केली.”

“पार्टटाईम नोकरी करत अभ्यास करून तो डिप्लोमा कोर्सला प्रथम आला. पण पुन्हा डिग्रीचे शिक्षण परवडणारे नव्हते. त्याला नोकरी करणेच भाग पडले. भास्करदादानं  इंजिनिअर होणाऱ्या  धाकट्या बहिणीच्या डोळ्यांमध्येच त्याची करिअरची स्वप्ने साकार होताना पाहिली होती.”

भास्करच्या  या असीम त्यागाची जाणीव प्रथमच भावनेला झाली. तिच्या चांगल्या भवितव्यासाठी भास्कर ने अगदी जीवाचे रान केले होते.

तिच्यासाठी वेळ काढून त्याने  सर्व प्रकारचे मार्गदर्शन केले होते. वेळच्यावेळी काॅलेजची फी, हाॅस्टेलच्या सर्व खर्चाला तोच बाबांकडून पैसे पाठवत होता. सहा वर्षे त्याने आपल्याला काही कमी पडू दिले नाही हे तिला आता उमगले.

मायलेकींचा अश्रूंचा बांध केव्हाच फुटला होता. “आपला दादा किती ग्रेट आहे” असं म्हणत त्या नोटेकडे  आणि नोकरी साठी परगावी चाललेल्या लाडक्या भास्करदादाच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पुन्हा पुन्हा पहात राहिली.

 

© सौ. मुग्धा कानिटकर

सांगली

फोन 9403726078

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ दीप ज्योती ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी

सुश्री दीप्ती कुलकर्णी

☆ कवितेचा उत्सव ☆ दीप ज्योती ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी☆ 

दीपावलीच्या या ज्योती

दिव्य तेज उजळती

तम दूर गं सारती

रम्य प्रभेच्या संगती

ज्योती ज्योती प्रकाशती

शुभ संदेश देताती

दुःखामागुनी सुखाची

उधळण होई या जगती

येती आप्त नि सोबती

हर्षोल्हास दुणावती

सर्वासवे तेजराशी

दीप्ती करिते आरती.

 

सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा.

 © सुश्री दीप्ती कुलकर्णी

कोल्हापूर

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆निसर्ग राजा ☆ श्री गुरुनाथ चंद्रकांत ताम्हणकर

☆ कवितेचा उत्सव ☆ निसर्ग राजा ☆ श्री गुरुनाथ चंद्रकांत ताम्हणकर ☆ 

 

निसर्ग राजा दैवत आहे,

कृपा करी सदा आम्हावर.

देतो छाया अन् शुद्ध हवा,

तृप्त होती सारे चराचर.

वर्षाराणी देते नवजीवन,

तरु होती पहा हिरवेगार.

पाऊसपाणी आहे म्हणूनी,

मुक्त बागडती ते जलचर.

बळीराजावर आहे कृपादृष्टी,

धनधान्यही मिळे निरंतर.

पशुपक्षीही आनंदे विहरती,

उडती, फिरती ते निशाचर.

फुलपाखरे ही गाणी गाती,

कोकीळ काढतो मंजुळ स्वर.

तो कैवारी अन् तो सांगाती,

कृपाछत्र हे राहे जीवनभर.

 

© श्री गुरुनाथ चंद्रकांत ताम्हणकर

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ बालदिन विशेष कविता ☆ सुश्री स्वप्ना अमृतकर

कवितेचा उत्सव ☆  बालदिन विशेष कविता  – सुश्री स्वप्ना अमृतकर ☆ 

(१४ नोव्हें २०२० भारतीय बाल दिन विशेष निमित्त बालकविता)

आ$$ ऊ$$ आऊच

करता सुरू बालपण

हे$ हे$ ओहो$ आहा$

करी आमचे बालमन, १

 

धुम$ पिचक धुम$

धिंगाणा हो मस्तीचा

बुम$ चिक चिक बुम$

उनाडपणा बालवर्गाचा, २

हो सापशिडी सारखी

धडपड चढ उताराची

संदूक उघडे रमणबाग

खुल्या दिवास्वप्नांची,  ३

चुटकी सरशी सरते

सरसर आमचे बालपण

उपदेश अन् आदेशांचे

नकोच मुळी थोरपण,  ४

कारण की,

आ$$ ऊ$$ आऊच

करता सुरू बालपण

हे$ हे$ ओहो$ आहा$

करी आमचे बालमन, ५..

© स्वप्ना अमृतकर , पुणे

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ पणती…☆ प्रा. सौ. सुमती पवार

प्रा. सौ. सुमती पवार

☆ कवितेचा उत्सव ☆ पणती…☆ प्रा. सौ. सुमती पवार ☆ 

घ्या , घ्या हो ,घ्या

पणत्या माझ्या घ्या ना

जरा वय ही माझे पहा ना …

 

घर माझे हो

आहे झोपडी साधी

झोपण्यास नाही गादी ….

वय झाले हो

तरी नशिबी काम

ठेविल जसा तो राम..

 

तुम्ही घ्या पणत्या

नातू घरी हो माझा

पाहतो वाट तो राजा..

 

मिळता पैसे

नेईन ज्वारी थोडी

भाकरीत आहे गोडी..

 

मी कष्टाची

पहा भाकरी खाते

कष्टांशी माझे नाते ..

 

या पैशांनी

थोडे आणिन तेल

अंगणी दिवा लाविन…

 

पसरत नाही

हात कुणा ही पुढती

ही आहे माझी नीति …

 

तुमच्याच मुळे

दोन घास पोटात

लेकरांच्याही ओठात..

 

आम्ही गरिबांची

तुम्हा मुळे हो दिवाळी

गरिबी ही लिहिली भाळी..

 

नका जाऊ पुढे

टाकून म्हातारीला

ही सारी प्रभुची लीला…

 

नाही दोष

पहा नशिबाला देत

कष्टण्या दिले हो हात…

 

जो वरी श्वास

देईल तोच हो काम

बोला राम राम नि राम …

 

© प्रा.सौ.सुमती पवार ,नाशिक

दि: ८/११/२०२० वेळ : रात्री १२:२६

(९७६३६०५६४२)

[email protected]

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares