☆ कवितेचा उत्सव : चांदणं – सुश्री मंजुषा मुळे☆
चांदणे
आली पुनवेची रात
येई चांदवा डौलात
परी चांदणे कधीचे
उतरले या मनात ।।
बालपणासवे माझ्या
चांदणेही अवखळ
येण्या ओंजळीत माझ्या
सदा त्याची खळखळ।।
यौवनाच्या चाहुलीने
चांदणेही तेजाळले
हुरहूर अनामिक
चांदणेही बावरले।।
भेटे सखा तो जीवाचा
चांदणे नि मोहोरले
ओढ अनोळखी तरी
मन बहराला आले ।।
जोडीदाराच्या मागुनी
माझी चांदण पाऊले
आणि प्रेमळ चांदणे
पाठ राखणीस आले ।।
अंकुरता वंशवेल
तृप्त चांदणे हासले
दुडदुडती घरात
जणू त्याचीच पावले ||
असे चांदणे साजिरे
करी सोबत सतत
अंधारल्या वाटांचीही
मग भीती ना मनात ||
वाटे पुढचीही वाट
चांदण्यात चिंब व्हावी
ईशकृपेचे चांदणे,
त्याने पाखर धरावी ….
नित्य पाखर धरावी ||.
© सुश्री मंजुषा मुळे
मो ९८२२८४६७६२