मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ निरागस कळ्या… – दोन काव्ये ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ निरागस कळ्या… – दोन काव्ये ☆ सुश्री नीलांबरी शिर्के

( १ )

इवल्या इवल्या पोरी

निष्पाप निरागस

आपल्या बाबांच्या 

वयाच्या पुरूषाला 

काका म्हणणाऱ्या

मोठ्या मुलांना दादा

दादा म्हणून बोलणाऱ्या …. 

*

त्यांना कळतच नाही

याच दादा काकांमध्ये 

वावरत असतो नीचपणा

हलकट पाशवी वृत्ती

त्यांना तुमच्यात दिसतं 

तुमचं मुलगी असणं ….. 

*

त्यांना ओळखताही येत नाही

किंवा विशेषण नसत त्यांना

तुमच्या निरागसतेला

सावध करण्यासाठी

ते संभावितपणे वावरतात

समाजात सहजपणे

अन मोका मिळताच 

चुरगळतात निष्पाप कळ्या …… 

*

कशा ठेवायच्या लेकीबाळ्या 

जरा मोठ्यांना काही 

सांगता तरी येतं  ,

पण तरीही घरातली पोर

बाहेर गेली की मन

कावरंबावरं होतंच होतं …. 

*

आल्यावरही लक्ष जातंच

 ती गप्प आहे का ?

तिला कोणी छेडलं तर नसेल

अशा नाही नाही त्या विचाराने…

कवयित्री : नीलांबरी शिर्के 

( २ )

कसे कळावे जनसमुदायी

कोण सज्जन आणि संत

भय वाटते सततच आता

अस्वस्थतेला नाही अंत

*

निरागस कळ्या घराघरातील

वावरती  घरीदारी शाळेत

सुरक्षित त्या नाहीत आता

धाकधुक अन वाटतसे खंत

*

अबोध अजाण मूक कळ्या

चुरगळल्या जाती वाटे मना

कसा ओळखू हरामजादा

मती गुंग अन काही कळेना

*

असेल ज्याच्या मनात पाप

वाटे तयाला फुटावे शिंग

कुकर्म  त्याच्या मनात येता

आपसूक सडावे त्याचे लिंग ….

©  सुश्री नीलांबरी शिर्के

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मावळतीवर… ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? कवितेचा उत्सव ? 

☆ मावळतीवर… ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

(२१ ऑगस्ट : जागतिक ज्येष्ठ नागरीक दिनानिमित्त)

निसर्गाने नेमलेल्या नियमांनी

नियतीने आखून दिलेल्या चाकोरीत 

आयुष्याने नेलेल्या मार्गावर

जीवनक्रमण करत आलो 

विहित कर्मे समर्पित

निरपेक्ष बुद्धीने करता करता 

मावळतीच्या क्षितिजासमीप 

नकळतच येऊन पोहोचलो 

*

उगवतीच्या कोवळ्या उन्हाचे 

मध्यान्हाला झालेले रणरणते ऊन

हळू हळू कसे क्षीण होत गेले 

मावळतीच्या क्षितिजावर

समजलेच नाही

*

तरीही याच लोभसवाण्या

भेडसावणाऱ्या मावळतीच्या क्षितिजावरून

हातून सुटलेले कित्येक छंद 

जाणवतायत मोहकशी साद घालतांना 

माझ्यातल्या लपलेल्या कौशल्यांना 

उदयोन्मुख व्हायचे आव्हान देतांना 

किती आतुरतेने

*

तिन्हीसांजेला उषःकालासाठी

मध्यरात्रीला भेटावेच लागेल

निसर्गाचे हे चक्र 

उलटे कसे फिरेल माझ्यासाठी

पुन्हा उदयाची आंस   असली तरी

परतीचा मार्ग

केव्हाच बंद झाला आहे

*

पुन्हा प्राचीवर यायला 

मावळतीच्या क्षितिजा पलीकडे

बुडी मारायलाच हवी

पश्चिमेला मावलायालाच हवे

अस्त करून घ्यायलाच हवा.

कवी : © डॉ. निशिकान्त श्रोत्री

           एम. डी. , डी. जी. ओ.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “कविता बहिणीची —” ☆ श्री नितीन सुभाष चंदनशिवे ☆

श्री नितीन सुभाष चंदनशिवे

? कवितेचा उत्सव  ?

☆ “कविता बहिणीची —” ☆ श्री नितीन सुभाष चंदनशिवे 

या चिमण्या कुणाच्या

या बहिणी वाघाच्या

त्यांचा हात सोन्याचा

माझ्या बहिणी गुणाच्या

*

कावळ्याची काव काव

काल थांबलीच नाही

माहेराहून गाडी

अजून आली कशी नाही

*

आला आला गं मुराळी

बंधू न्यायला सकाळी

भाऊ मारीतो गं हाळी

कुंकू लावते कपाळी

*

माहेराची माझी वाट

गाडी चढतिया घाट 

भाव माझा समिंदर

मी काळजाची लाट 

*

आली पूनिव राखीची

माझी राखी चांदीची

ताट भावाला ओवाळी

त्याच्या डोळ्यात दिवाळी

*

तोंडी साखर गोडीची

मिशी वाकड्या मोडीची 

माझ्या भावाच्या घामाची

आली ओवाळणी साडीची

*

चिमण्या चालल्या नांदायला

त्यांचा संसार बांधायला

लेकुरवाळी बहिणीची

कविता संपली भावाची

कवी : नितीन चंदनशिवे. (दंगलकार)

© श्री नितीन सुभाष चंदनशिवे

संपर्क – मु. पोस्ट. कवठेमहांकाळ, जि. सांगली.

मो 7020909521

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ चंद्र… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

? कवितेचा उत्सव  ?

☆ चंद्र…  सुश्री नीलांबरी शिर्के 

बोला  म्हणून त्यांना 

सांगायचे कशाला !    

अव्यक्त मौन आपुले

सोडायचे कशाला !

*

जखमा उरातल्या या

ज्यांनी बहाल केल्या

त्यांच्यासमोर अश्रू

ढाळायचे कशाला !

*

 कोंडेल वाफ जोवर

 तोवर तशीच ठेऊ

 विस्फोट होऊ दे

मग भ्यायचे कशाला !

*

ओटीत चंद्र माझ्या

अन तारका सवेही

हलकेच चांद त्यांना

मी दाखवू कशाला !

©  सुश्री नीलांबरी शिर्के

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विजय साहित्य # 234 ☆ अधिक मास दिवस पंधरावा…! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 234 – विजय साहित्य ?

☆ अधिक मास दिवस पंधरावा…! ☆

पौराणिक कथा,

वैज्ञानिक जोड

आहे बिनतोड,

कथासार…!

*

जाणूनीया घेऊ,

चांद्र, सौर ,मास .

कालाचा प्रवास, सालोसाल…!

*

कलेकलेनेच,

होई वृद्धी, क्षय

चंद्रबिंब पूर्ण,

पौर्णिमेस…!

*

पौर्णिमेच्या दिनी,

नक्षत्राचा वास

तोच चांद्रमास, ओळखावा…!

*

नक्षत्रांची नावे,

मराठी महिने

बारा महिन्यांचे,

चांद्रवर्ष…!

*

पौर्णिमांत आणि,

दुसरा अमात

चांद्रवर्ष रीत,

गणनेची…!

*

तिनशे चोपन्न ,

चांद्रवर्ष दिन

सौरवर्ष मोठे,

अकरानी…!

*

मासभरी सूर्य,

एकाच राशीत

म्हणोनी संक्रांत,

राशी नामी…!

*

हर एक मासी,

प्रत्येक राशीत

सूर्याची संक्रांत,

सौरवर्षी…!

*

मधु, शुक्र, शुचि ,

माधव, रहस्य.

इष नी तपस्य ,

संज्ञा त्यांच्या…!

*

अकरा दिसांचा,

वाढता आलेख

अधिकाची मेख, तेहतीस…!

*

कविराज लेखी,

अधिकाचा नाद

अंतर्यामी साद,

मानव्याची…!

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ तिरंगा… 🇮🇳 ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी ☆

प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी

? कवितेचा उत्सव ?

☆ तिरंगा… 🇮🇳 ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी 

(तिरंगा 🇮🇳शीर्षक एकच पण कविता दोन… त्याही अगदी भिन्न )

[ एक ]

दुनियेत होतो गाजावाजा 

हसरा तिरंगा भारत माझा  ll ध्रु ll

*

हिम मस्तकी शोभे किरीट 

हिंद सागर चरण धूत 

पश्चिमेस किल्ले गड कोट 

राबतो शेतात जेथे बळीराजा ll 1 ll

*

अनेक भाषा अनेक पंथ 

कैक विद्वान अनेक संत 

लडले झगडले बहू महंत 

सोज्वळ प्रांजळं ऐसी प्रजा ll 2 ll

*

वेद विद्या कला पारंगत 

रामायण अन महाभारत 

नालंदा तक्षशिला संस्कृत 

स्वातंत्र्याची बलिदान पहाट 

असा दुनियेत गाजावाजा  ll 3 ll

*

कीर्ती लोकशाहीची जगात 

प्रजासत्ताक राज्य जोमात 

भारत माझा असेल जीवात 

प्रसिद्धीचा मुकुट राजा  ll 4 ll

✒️

[ दोन ]

असूनही सनाथ झाले अनाथ

माझा तिरंगा हा वृद्धाश्रमात

*

जगत पालक कृष्ण जन्मे बंदिवासात

पालक करी नोकरी मोठया शहरात

नशीब त्यांचे कोण कुणाला भार

माझा तिरंगा असे पाळणा घरात

*

किती जीव जगती हाल अपेष्टात

मूक बधीर कोणी अंध अंधारात

 कोणी विकलांग अपंग जगात

माझा तिरंगाही त्यांच्याच दारात

*

किती गरीबी किती दैन्य मांडू

झोपडपट्टीत पोटासाठी भांडू

सरहद्दीवरती किती रक्त सांडू

हिंदवी स्वराज्य हा त्यांच्याच प्राणात

माझा तिरंगा त्यांचाच हातात

© प्रो डॉ प्रवीण उर्फ जी आर जोशी

ज्येष्ठ कवी लेखक

मुपो नसलापुर ता रायबाग, अंकली, जिल्हा बेळगाव कर्नाटक, भ्रमण ध्वनी – 9164557779 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ थांबव रे आता… ☆ सौ. प्रतिभा संतोष पोरे ☆

सौ. प्रतिभा संतोष पोरे 

? कवितेचा उत्सव ?

☆ थांबव रे आता…  ☆ सौ. प्रतिभा संतोष पोरे ☆

✒️

दया करी नाथा

थांबव रे हा जलप्रपात

थांबव रे आता

झाली साऱ्या जीवांची दैना 

दया करी नाथा ।। धृ।।

थांबव रे आता

*

रस्त्यावर नद्या वाहती

मार्गी चालता

संततधार मुसळधार

पर्जन्य कोसळता

थांबव रे आता ।।१।।

*

पक्षी लपले घरट्यात

थंडीने गारठता

गाय वासरे निपचित

पाण्यात भिजता

थांबव रे आता ।।२।।

*

शाळेभोवती तळे मोठे

सुट्टी न मागता

धरणाची दारे उघडी

संपली क्षमता

थांबव रे आता।।३।।

*

आले पीक जाय वाहून

पापणी लवता

जलगंगेचा हैदोस मोठा

न साहवे आता

थांबव रे आता।।४।।

✒️

शब्दसखी प्रतिभा

✒️

© सौ. प्रतिभा पोरे

पत्ता – ‘सोनतुकाई’, शांतीसागर कॉलनी, सांगली – भ्रमणध्वनी क्रमांक – ८७८८४५८६२४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ रक्षाबंधन असेही… ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? – रक्षाबंधन असेही… – ? ☆श्री आशिष  बिवलकर ☆

दगडांच्यात आयुष्य,

दगडाचा बसायला पाट !

पारणं डोळ्यांचं फिटलं,

पाहून रक्षाबंधनाचा थाट !

 

रस्ता बनवता बनवता,

मुलं बाळं वाढती रस्त्यावर !

सणवार त्यांनाही असतात,

पण हक्काचे कुठे नाही घर !

 

विंचवासारखे बिऱ्हाड,

फिरे गावोगाव पाठीवर !

पोटासाठी मोलमजुरी,

नशिबाने बांधल्या गाठीवर !

 

रंक असो वा राव,

भावा बहिणीत तेवढीच ती ओढ !

आपल्या आपल्या परीने ते,

साजरा करती सण आनंदाने गोड !

 

राखीचा धागा,

सोन्याचा असो वा रेशमचा !

मनगटाला शोभे,

भाव दोघांच्या मनी आपुलकीचा !

 

औक्षणाचे ताट नसले तरी,

नेत्रज्योतीने बहीण करते औक्षण !

रक्षण कर छोट्या भाऊराया,

तुझे प्रेम तिच्यासाठी जगी विलक्षण !

 

चिंधी बांधे द्रौपदी,

हरी धावला तिच्या रक्षणाला !

रक्ताचे नव्हते नाते,

जागला चिंधीच्या बंधनाला !

 

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ पॅरिस ऑलिंपिक ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल

?️?  चित्रकाव्य  ?️?

? पॅरिस ऑलिंपिक ?  सुश्री वर्षा बालगोपाल 

खेळ मांडीयेला पॅरिस देशी ।

खेळती जागतीक खेळाडू रे।

देश अभिमान आला उभारून ।

एक मेकांशी चाले स्पर्धा रे ॥१॥

*

गतीमानता, उच्चता आणि तेजस्विता 

यांचा सुंदर मेळा ।

सुवर्णं रौप्य कास्य पदक वर्षाव ।

अनुपम्य सुखसोंहळा रे॥२॥

*

वर्णअभिमान विसरली याती

खेळ खेळाडू हीच नाती ।

खिलाडू वृत्तीने जालीं नवनीतें।

हार जीत नावा पुरती रे॥३॥

*

होतो जयजयकार गर्जत अंबर

मातले हे खेळाडू वीर रे।

देशांमध्ये साधण्या एकोपा या योगे ।

पाच खंडाचे घेऊन प्रतीक रे ||४||

*

आयफेल टॉवर सम कार्य करू मोठे 

देश नाव उज्ज्वल करू 

बोलू नाही आता करून दाखवू 

कार्य नेत्रदीपक रे ||५||

*

खेळ मांडीयेला पॅरिस देशी ।

खेळती जागतिक खेळाडू रे।

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 243 ☆ अभिमंत्रित वाटा… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 243 ?

☆ अभिमंत्रित वाटा☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

आयुष्य काजळते अन्

हृदयाशी सलतो काटा

तेव्हाच भेटती सखये

सृजनाच्या अभिमंत्रित वाटा…१

*

दाटते मनात काहूर

भोवती भयाण सन्नाटा

तेव्हाच भेटती सखये

सृजनाच्या अभिमंत्रित वाटा….२

*

सागरी नाव वल्हवता

ग्रासती भयंकर लाटा

तेव्हाच भेटती सखये

सृजनाच्या अभिमंत्रित वाटा….३

*

घडलेले नसता काही

भलताच होई बोभाटा

तेव्हाच भेटती सखये

सृजनाच्या अभिमंत्रित वाटा….४

*

वेगळेपणा जाणवता

ऐहिकास मिळतो फाटा

तेव्हाच भेटती सखये

सृजनाच्या अभिमंत्रित वाटा….५

☆  

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares