मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “नाच…” ☆ श्री आशिष मुळे ☆

श्री आशिष मुळे

? कवितेचा उत्सव ?

☆ “नाच…” ☆ श्री आशिष मुळे ☆

झालं नाचून?… झालं ..

झालं वाजवून?… झालं ..

त्याने काय झालं?…

काहीच नाही झालं…..

 

कालच्या पाढ्याचं उत्तर

आजही पंचावन्नच आलं ..

आज इकडं दिवं लागलं

तिकडं गाव जळत राहिलं …..  

 

इकडं तिरंगी साडी ल्यालं

तिकडं रस्त्यात लुगडं फेडलं ..

बोलणाऱ्याचं तोंड दाबलं

मुक्याचं मात्र भलतंच फावलं …..

 

येड्यांनी शाण्यांचं सोंग घेतलं

भ्रष्टचाऱ्याचं वजन भलतचं वाढलं ..

फकिराला मात्र देवच पावलं

गरीबाचं पोर गरीबच राहिलं…… 

© श्री आशिष मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ स्वागत  श्रावणाचे… ☆ श्रीमती अनुराधा फाटक ☆

श्रीमती अनुराधा फाटक

? कवितेचा उत्सव ?

☆ स्वागत  श्रावणाचे… ☆ श्रीमती अनुराधा फाटक ☆

वर्षाराणीचे  गे सडासंमार्जन

अधिकाने केले रंग रेखाटन

मनीचा वसंत उमलून आला

श्रावण स्वागता उत्सुक झाला!

 

हिरव्या सृष्टीचा आनंद आगळा

फुलांफळांनी गच्च बहरला

घरट्यातले पक्षी बाहेर आले

निळ्या अंबरात फिरू लागले !

 

सूर्य किरणांना वाकुल्या दावीत

कौतुके प्रेमाचे शिंपण करीत

एखादी जलधारा येत अवचित

इंद्रधनूही येई रंग उधळीत!

 

असा श्रावण  साठा आनंदाचा

निर्माता ठरतो नव्या चैतन्याचा

निसर्गाचा आनंद श्वासात घेत

श्रावण सणांचे करू या स्वागत!

© श्रीमती अनुराधा फाटक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #202 ☆ ‘हळदीचे अंग…’ ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 202 ?

☆ हळदीचे अंग… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

एक कळी उमलली तिचे गुलाबी हे गाल

ओलसर पुंकेसर रक्तरंजित ते लाल

फूल तोडले हे कुणी कसे सुटले माहेर

काय होईल फुलाचे डहाळीस लागे घोर

आहे गुलाबी पिवळा आज बागेचा ह्या रंग

हाती रंग हा मेंदीचा सारे हळदीचे अंग

वसंताच्या मोसमात पहा फुलाचे सोहळे

दिसे फुलाला फुलात रूप नवीन कोवळे

नव्या कोवळ्या कळीला वेल छान जोजावते

नामकरण करून तिला जाई ती म्हणते

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ भेट… ☆ श्री राजकुमार कवठेकर ☆

श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर

? कवितेचा उत्सव ?

भेट… ☆ श्री राजकुमार कवठेकर ☆

तुझी भेट; आनंदाचे 

थुईथुईते कारंजे…

मन चिंब चिंब माझे…

 

घनगर्द केसांमध्ये

माळता मी सोनचाफा…

जिणे फुलांचा हो वाफा…

 

तुझ्या संगती; अंतरी

नवी पहाट तेजाळे…

शांत होतात वादळे…

 

कधी कोवळे तू ऊन

कधी श्रावणाची सर…

फुटे सुखास अंकूर…

 

परी किती दिवसांत

नाही तुला मी भेटलो…

(नाही मला मी भेटलो…)

© श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर

संपर्क : ओंकार अपार्टमेंट, डी बिल्डिंग, शनिवार पेठ, आशा  टाकिज जवळ, मिरज

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – तोडणारा क्षण…– ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

?– तोडणारा क्षण– ? ☆ श्री आशिष  बिवलकर ☆

धरा जरी वाटे शांत,

पोटात शिजतो ज्वालामुखी !

उद्रेक लाव्हारसाचा होई,

होरपळती सारे होऊन दुःखी !

 

जे वरकरणी वाटते शांत,

आत काहीतरी धुमसत असते !

मनात चालत असते घालमेल,

जगणेच नकोसे  होऊन जाते  !

 

भूतकाळात  दिग्गजांनी,

निराशेत  स्वतःला  संपवले !

धक्कादायक कृतीने,

जगा रहस्य ठेवून रडवले !

 

उंच उंच भरारी घेणारा,

शिखरावर एकटाच  असतो !

मनमोकळे करण्यासाठी,

कुणीच योग्य वाटत नसतो !

 

पंखात असते बळ,

तितकीच  घ्यावी झेप आकाशी !

सावरण्याचे आत्मबळ,

सांभाळून ठेवावे आपल्यापाशी ! …… 

© श्री आशिष  बिवलकर

15 ऑगस्ट 2023

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ ये सरसावत… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल 

?  कवितेचा उत्सव ?

☆ ये सरसावत… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

(वृत्त मदिरा – अक्षरे २२ मात्रा ३०)

(गाललगालल गाललगालल गाललगालल गाललगा)

तू मनमोहक तू भवतारक तू जगपालक हे वरुणा

ये सरसावत या धरतीवर शेतकर्‍यांवर ती करुणा॥

 

आसुसले मन आतुरले जन वाट बघे वन ये जलदा

जोडतसे कर तू विहिरी भर जोजव सावर हे शर दा

मोहकसे जग झेपतसे खग वर्षतसे ढग ना गणना

ये सरसावत या धरतीवर शेतकर्‍यांवर ती करुणा॥

 

ढोलक वादक तू सुखकारक जीवन दायक मित्र असा

विश्व विमोचक  हे मनमोहक चेतन वाहक धूर्त जसा

मी शरणागत त्या चरणावर पांघर चादर प्रेम घना

ये सरसावत या धरतीवर शेतकर्‍यांवर ती करुणा॥

 

हे जग सुंदर सोज्वळ मंदिर  लोभस अंतर कार्य तुझे

या धरणीवर प्रेमळ तो कर मोदक निर्झर बीज रुजे

वाजत गाजत अमृत पाजत कस्तुर पेरत रे भुवना

ये सरसावत या धरतीवर शेतकर्‍यांवर ती करुणा॥

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ – श्रावण…– ☆ सौ. अलका ओमप्रकाश माळी ☆

सौ. अलका ओमप्रकाश माळी

?  कवितेचा उत्सव ?

☆ – श्रावण…– ☆ सौ. अलका ओमप्रकाश माळी ☆

कधी सोन पिवळे उन पडे..

कधी सर सर सरी वर सरी..

थेंब टपोरे बरसती..

आनंदी श्रावण आला ग दारी..

 

सण वार घेऊन सोबती..

येई हासरा हा श्रावण..

नाग पूजेचा हा वसा

जपे पंचमीचा सण..

 

जिवतीचे करू पूजन..

 मागू सौभाग्याचे वरदान

भावा बहिणीच्या नात्याची

 विण घट्ट करी रक्षाबंधन..

 

मंगळागौरीचे ग खेळ..

रोज रंगती मनात..

उंच उंच झुले झुलती..

सोन पिवळ्या उन्हात..

 

यथेच्छ सात्विक मेजवानी

मैत्रिणींची गप्पा गाणी..

खेळ रंगतो सख्यांसोबत..

घेऊन माहेरच्या ग आठवणी..

 

श्रावण सरीनी रोज

भिजते अंगण..

समईच्या उजेडात

करू शिवाचे ग पूजन..

 

कधी उतरते उन,

कधी सर पावसाची..

चाहूल लागता श्रावणाची..

होई बरसात मांगल्याची..

 

निसर्ग करी मुक्त हस्ते

सौंदर्याची उधळण..

पाहता सृष्टीचे रूप देखणे..

फिटे डोळ्याचे ग पारणे..

© सौ. अलका ओमप्रकाश माळी

मोब. 8149121976

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हे शब्द अंतरीचे # 140 ☆ कृष्ण… ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

महंत कवी राज शास्त्री

?  हे शब्द अंतरीचे # 140 ? 

कृष्ण…

कृष्ण, आधार जीवनाचा

जीवन तारणहार

असे वाटे भेटावा एकदाचा.

 

कृष्ण, वात्सल्य प्रेमसिंधु

आकर्षण नावात तयाच्या

तो तर आहे दिनबंधु.

 

कृष्ण, सुदामाची मैत्री

ती अजरामर झाली

आज नाही अशी मैत्री.

 

कृष्ण, शुद्ध प्रेमळ

करी जीवाचा उद्धार

हरावे माझे, कश्मळ

 

कृष्ण, कान्हा मिरेचा

विष पिले तिने

जोडला साथीदार आयुष्याचा.

 

कृष्ण, स्मरवा दिनरात

वसावा तोच हृदयात

करावी त्याची भक्ती सतत.

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “खरं आहे…” ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? कवितेचा उत्सव ?

☆ “खरं आहे…” ☆ श्री सुनील देशपांडे

खरं आहे पहिल्यासारखं आज काही राहिलं नाही

पन्नास वर्षानंतर सुद्धा आजचं काही रहाणार नाही

 

पन्नास वर्षापूर्वी सुद्धा आजच्या सारखं नव्हतं काही

बदलणा-या काळाबरोबर बदलत असतं सारं काही

 

बदललं सारं तरी सारंच वाईट घडत नाही

प्रत्येक पिढी नंतर काही जगबुडी होत नाही

 

नातवंडं पहा आपली किती किती छान आहेत

आई वडील त्यांचे जरी म्हणतात ती वाह्यात आहेत

 

समुद्र ओलांडणारा म्हणे एके काळी भ्रष्ट असे

आज मात्र त्याच्या सारखा कर्तबगार कोणी नसे

 

नोकरी करणारी बाई तेव्हा  अनीतिमान ठरत असे

जातीबाहेर लग्न करण्याने समाजस्वास्थ्य बिघडत असे

 

पदर पडला खांद्यावरून तर बाई चवचाल ठरत असे

चहा आणि सिनेमा सुद्धा तेव्हा व्यसन ठरत असे

 

सहशिक्षण झाले सुरू तरी ‘ती’ त्याच्याशी बोलत नसे

बोललेच कोणी मोकळे तर नांव त्याचे भानगड असे

 

पीरीयड बंक होत होते मॕटिनी हाऊसफुल्ल होत होते

सुधारलेले ती अन् तो चोरून सिनेमाला जात नव्हते ?

 

आधला असो वा मधला अलिकडचा वा पुढचा

नीतीमत्ता तिथेच असते दृष्टिकोन बदलतो तुमचा

 

रोमीओ होता चौदाचा बाॕबी नव्हती सोळाची ?

प्रेम त्यांचं अमर मात्र आर्ची बदनाम सैराटची ?

 

होऊदेना सैराट त्यांना घेऊदेना चटके थोडे

परिस्थितीचे खातील फटके शिकतील त्यातून धडे

 

वाढत्या वयात नीतिमत्तेचा ठेका  कशाला घेता

वयाच्या क्वालिफिकेशनवर न्यायाधीश होता ?

 

न्यायाधीश होण्यासाठी मन संतुलित असावे लागते

पण वय जास्त झाल्यावर कित्येकांचे तेच बिघडते

 

© श्री सुनील देशपांडे

मो – 9657709640

email : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ आ र सा ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? कवितेचा उत्सव ? 

🙏 आ र सा ! 🙏 श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

मज पारखून आणले

बाजारातून लोकांनी,

दोरा ओवून कानातूनी

टांगले खिळ्यास त्यांनी !

 

येता जाता, मज समोर

कुणी ना कुणी उभा राही,

चेहरा पाहून पटकन

कामास आपल्या जाई !

 

पण घात दिवस माझा

आला नशिबी त्या दिवशी,

खाली पडता खिळ्यावरून

शकले उडाली दाही दिशी !

 

होताच बिनकामाचा

लक्ष मजवरचे उडाले,

सावध होवून सगळे

मज ओलांडू लागले !

 

रीत पाहून ही जनांची

मनी दुःखी कष्टी झालो,

नको पुनर्जन्मी आरसा

विनवू जगदीशा लागलो !

विनवू जगदीशा लागलो !

© प्रमोद वामन वर्तक

दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)

मो – 9892561086 ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈