मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ कृपेचे आभाळ… ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? – कृपेचे आभाळ – ? ☆श्री आशिष  बिवलकर ☆

सुंदर लोभस | सखा पांडुरंग |

जीवनात संग | श्वासापरी ||१||

*

ललाटी शीतल | चंदनाचा टिळा |

शोभे हार गळा | तुळशीचा ||२||

*

सावळा विठ्ठल | कटेवरी कर | 

उभा वीटेवर | युगे युगे ||३||

*

मकर कुंडल | कर्ण झळकती |

तेज उधळती | दिव्यत्वाचे ||४||

*

सुवर्ण मुकुट | भव्य शिरावरी |

पंढरीत हरी | वैष्णवांचा ||५||

*

कुंतल कुरळे | सावळी ही काया |

हृदयात माया  | माऊलीच्या ||६||

*

लेकरांचा करे | माऊली सांभाळ |

कृपेचे आभाळ | धरोनिया ||७||

(चित्र सौजन्य :कु.ह्रदया सखाराम उमरीकर ) 

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विजय साहित्य # 230 ☆ कवी कालिदास दिन… ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 230 – विजय साहित्य ?

कवी कालिदास दिन… ☆

जोडोनीया दोन्ही कर,

समर्पित शब्द फुले .

स्वीकारावी शब्दार्चना ,

लाभू देत विश्व खुले.

*

कुलगुरु कालिदास ,

काव्य शास्त्र अनुभूती .

शब्द संपदा संस्कृत,

अभिजात कलाकृती.

*

महाकवी कालिदास ,

काव्य कला अविष्कार .

निसर्गाचे सहा  ऋतू ,

ऋतू संहार साकार.

*

अलौकिक प्रेमकथा ,

मालविका अग्निमित्र.

खंडकाव्य मेघदूत ,

सालंकृत शब्द चित्र.

*

शिव आणि पार्वतीची,

कथा   कुमार संभव.

अभिज्ञान शाकुंतल ,

प्रेमनाट्य शब्दोच्चय.

*

राजा पुरूरवा आणि ,

नृत्यांगना  उर्वशीचे.

अभिजात कथानक ,

निजरूप प्रतिभेचे.

*

मेघा बनवोनी दूत ,

यक्षराज आराधना .

कालिदासे वर्णियेली,

प्रेमसाक्षी संकल्पना.

*

कवी कालिदास दिन,

आषाढाची प्रतिपदा .

काव्य शृंगार तिलक ,

प्रासादिक ही संपदा.

*

अग्रगण्य  अभिव्यक्ती ,

कालिदास साहित्याची.

शब्दोशब्दी सामावली,

शब्द शक्ती सृजनाची.

*

चित्रकार, शिल्पकार ,

यांचे वंदनीय स्थान .

साहित्यिक शिरोमणी ,

कालिदास दैवी  ज्ञान.

*

अशी प्रेरणा चेतना ,

व्यासंगात रूजलेली .

कालिदासी साहित्यात,

काव्यसृष्टी फुललेली.

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ निसर्गाचे रुप… ☆ सुश्री त्रिशला शहा ☆

सुश्री त्रिशला शहा

? कवितेचा उत्सव ?

निसर्गाचे रुप… ☆ सुश्री त्रिशला शहा ☆

असा कसा हा व्दाड निसर्ग

क्षणात पालटी रुप आपले

होती समोर नागमोडी वाट

कशी हरवली आता धुक्यात

*

मेघ उतरले धरणीवरती

दाटे काळोख सभोवती

सुटे सोसाट्याचा वारा

वाट कुठेच दिसेना

*

डोंगराच्या पायथ्याशी

दिसे एक टपरी चहाची

घेऊ चहासवे वाफाळत्या

भाजीव कणसे आणि भजी

*

भुरभुर पावसाची चाले

ढग हलके थोडे झाले

धुके बाजूस सरले

थोडे थोडे उजाडले

*

हरवलेली वाट धुक्यात

आता दिसाया लागली

दोन्ही बाजूच्या झाडातून

नागमोडी चाललेली

© सुश्री त्रिशला शहा

मिरज

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ पंढरीची वारी… ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी ☆

सुश्री दीप्ती कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ?

☆ पंढरीची वारी… ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी ☆

(षडाक्षरी रचना)

वारी चालली हो

चंद्रभागे तीरी

एकमुखे गाती

नाम जप हरि  ||१||

 * 

शोभतसे भाळी

चंदनाची उटी

वैजयंती कंठी

कर ते हो कटी  ||२||

*

घोष तो गजर

भक्तीचा प्रहर

मृदंगाचा स्वर

विठाईचे द्वार ||३||

*

वैष्णवांची भक्ती

विठुराजा प्रती

नाम हीच शक्ती

लाख मुखे गाती ||४||

*

सावळी विठाई

गुण गावे किती ?

मूर्ती साजिरी ती

 भक्त साठविती  ||५||

© सुश्री दीप्ती कोदंड कुलकर्णी

हैदराबाद.

भ्र.९५५२४४८४६१

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ नमन कवीकुलगुरू कालिदासा ☆ प्रेमकवी दयानंद ☆

प्रेमकवी दयानंद

? कवितेचा उत्सव ?

☆ नमन कवीकुलगुरू कालिदासा ☆ प्रेमकवी दयानंद 

आषाढातील, प्रथम दिनी

कृष्णमेघ, जमले नभांगणी

सुरु जाहली, सजल जलक्रीडा

पाहुनी व्याकुळ, गजगामिनी..

अमल,धवलगिरी, शिखरावरती

नांदीस नर्तन,मेघांचे

धूम्रवर्ण, वायुमंडलामधे

दर्शन, दिग्विजयी मेघांचे…

सूरवंदनी,वर्षाधारा

सृष्टीचे हे,पूजन मंगल

वृक्ष-वेली, पुलकित अवघे

घनकलशीचे, झरे पवित्रजल…

कृष्ण-घनांचे, सुंदर दर्शन

नयनरम्य, ते विखुरले

पंख पाचुचे, रंग प्रीतीचे

रानी-वनी,नीलमयूर, नाचले…

 विरही, व्याकुळ, प्रेमी कान्ता

दुरुनी जाणी,कालिदास मनी

यक्षाला अन् मेघाला, झणी

पाठवी सत्वर, दूत म्हणोनी..

आषाढातील, प्रथम दिन हा

कालिदास,यक्ष, मेघाचा

निसर्ग उत्सव, प्रतिमा-प्रतिभा,

काव्यसौंदर्य,साहित्याचा…

 प्रवास अलौकिक, हा प्रतिभेचा

सोहळा, अक्षर संस्कृतीचा

कवी कुलगुरु, कालिदास हा, थोर प्रथम कवी,जगी आदरणीय, सर्वांचा..🙏🏼

© प्रेमकवी दयानंद

संपर्क – तावरे काॅलनी.सातारा रोड.पुणे

मो 9822207068

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ “चल गं सखे…” ☆ सौ. रेणुका धनंजय मार्डीकर ☆

सौ. रेणुका धनंजय मार्डीकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

?– “चल गं सखे…” – ? ☆ सौ. रेणुका धनंजय मार्डीकर☆

चल गं सखे शिवारात जोडीनं जाऊ

तुझ्या माझ्या पिरतीच गोड गानं गाऊ

*

ढगाच पांघरून शिवाराची माती

तुझी माझी बैलगाडी डौलात जाती

तू माझी सजनी मी गं तुझा राऊ

तुझा माझ्या पिरतीच गोड गानं गाऊ

*

कस सांगू तुला माझ्या मनातलं राया

तुझ्या संग लाभतोया अत्तराचा फाया

काळजाचा ठाव घेत्यात पिळदार बाहू

तुझ्या माझ्या पिरतीच गोड गानं गाऊ 

*

मांडीवर पाय दे गं हातामधी हात

तुझ्या संग माझं सखे फुलतया नात

हुरुदाचं गुपित नजरेनं पाहू

तुझ्या माझ्या पिरतीच गोड गानं गाऊ

*

पायातल्या घुंगरात खुळखुळ दाटली

व्हटात डाळींब सखी मला भेटली

रानी तुझा शिणगार येडं नको लावू

तुझ्या माझ्या पिरतीच गोड गाणं गाऊ

 © सौ.रेणुका धनंजय मार्डीकर

औसा.

मोबा. नं.  ८८५५९१७९१८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ चांदणे सांडूनी गेले ☆ डॉ.सोनिया कस्तुरे ☆

डॉ.सोनिया कस्तुरे

?️?  चित्रकाव्य  ?️?

? – “चांदणे सांडूनी गेले…” – ? ☆ डॉ.सोनिया कस्तुरे ☆

 

मेघ नभीचे उतरले

चांदणे सांडूनी गेले

उजळले तन काटेरी

मन तेजपुंज झाले

*

सरी बरसता अंधारी

तन नक्षत्र पांघरले

रात्र कुशीतील भय 

वाऱ्यासवे पळाले !

*

काळोखाच्या पदरी

दीप तेजाचे पसरले 

नभातल्या चांदण्यांना

ओठी हसू उमटले !

*

निसर्गाचा साक्षात्कार 

फुलाविना हा बहार

किती सुंदर देखावा  

जणू वाटे चमत्कार

© डॉ.सोनिया कस्तुरे

विश्रामबाग, जि. सांगली

भ्रमणध्वनी:- 9326818354

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 239 ☆ मुक्त चिंतन – होते सृजन सर्वत्र… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 239 ?

मुक्त चिंतन होते सृजन सर्वत्र☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

मजबूत दगडी वाडा ,

दुमजली प्रशस्त छान

न्हाणीघरही भले थोरले…

बंब, घंगाळ ,सतेले तांब्याचे,

पितळी बादल्या तीन!!

*

ते माझे घर लहानपणीचे,

गावाकडचे ओढ्याकाठी,

पलिकडे शिवालय होते,

 वडाच्या झाडा मागे !

*

अंगणात होती बाग,

फुलझाडांची गर्दी—-

वृंदावना पलिकडे विहीर ,

चाफा, कडुलिंब अन,

पाच नांदुर्की -पिंपर्णी !!

*

निसर्ग होता प्रसन्न,

पाऊसपाणी ,आबादानी

मुबलक शेती ,गुरे वासरे,

किलबिलती पक्षी रंगीबेरंगी

होते सृजन सर्वत्र ,

*

चौदा वर्षे टिपले मी ते

निर्मियले मग शब्दामधून

 मनोहारी एक चित्र  ते…..

ती पहिली  कविता …

  …सृजन सोहळा

आज आठवला!!

☆  

© प्रभा सोनवणे

१३ जुलै २०२४

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सावळे परब्रह्म… ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे☆

सौ.ज्योत्स्ना तानवडे

? कवितेचा उत्सव ?

🙏 सावळे परब्रह्म 🙏 ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

जय जय रामकृष्ण हरी |जय जय रामकृष्ण हरी 

झाली वैकुंठ पंढरी | क्षेत्र चंद्रभागे तीरी ||

सावळा बने श्रीहरी | उभा ठाके विटेवरी ||१||

क्षेत्र पावन भूवरी | विठुरायाची नगरी ||

त्रिखंडात तिच्या परी | नाही दुसरी पंढरी ||२||

अगा वैष्णवांच्या देवा | तुझ्या करूणेचा ठेवा ||

वाटे माहेर या जीवा | काय थाट म्या वर्णावा ||३||

भक्तांसाठी धाव घेशी | भक्तांच्या अधीन होशी ||

अभंग तारुन नेशी | भक्ती श्रेष्ठ अविनाशी ||४||

देई ऐसे वरदान | दूर सारावे अज्ञान ||

मिळविता आत्मज्ञान | शुद्धमती देई भान ||५||

आत्मबुद्धीसी सोडावे | भक्तीधन त्वा जोडावे||

सार्थक जन्माचे व्हावे | मुखी नाम सदा घ्यावे ||६||

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ भेट… ☆ श्री राजकुमार कवठेकर ☆

श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर

? कवितेचा उत्सव ?

☆ भेट… ☆ श्री राजकुमार कवठेकर ☆

तुझी भेट ध्यानी-मनी ना तरीही

              उरी चंदनाचे भरे मंद वारे

धुक्याचाच वेढा जणू भोवतीने

          उधाणात जाती बुडूनी किनारे

 

तुझे बोलणे, संभ्रमाचेच जाळे

          तुझे मौन,आकांत होई मनाचा

कधी कोरडा मेघ होऊन येशी

          निळा मेघ होशी कधी श्रावणाचा

 

कधी लख्ख सारे उजेडा प्रमाणे

          कधी वाटतो मी तमीचा प्रवासी

कधी हातचेही दुरापास्त वाटे

          कधी चांदणे येतसे अंगणाशी

 

कसे आवरावे ऋतूंना मनाच्या

          कशी भूल टाळू जिवा जी पडावी

जणू जीवनाला अश्या सैरभैरी

          हवी ती दिशा नेमकी सापडावी

 

तुझी भेट ध्यानी-मनी ना तरीही

          तुझा चंद्र का गे ढगाआड होई?

पुन्हा वेढती प्राक्तनीचे उन्हाळे

          जणू अर्धस्वप्नातुनी जाग येई

© श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर

संपर्क : ओंकार अपार्टमेंट, डी बिल्डिंग, शनिवार पेठ, आशा  टाकिज जवळ, मिरज

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares