सुश्री अरुणा मुल्हेरकर
काव्यानंद
☆ पुन्हा एकदा… – सौ राधिका भांडारकर ☆ रसग्रहण… सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆
सौ राधिका भांडारकर
☆ पुन्हा एकदा ☆
(लवंगलता)
*
कुठे हरवला तेव्हाचा तो प्रितीचा रंग सारा
आयुष्याला सोसत नाही रुक्ष कोरडा वारा
*
संवाद नसे शब्द माधुर्य हरवले कसे कोठे
तेव्हा वाटे मौनात बरे.. नसते वादळ मोठे
*
ढग काळे ते दाटले नभी मिटोनि गेले तारे
जलधारांनो तुम्ही आपुले आनंदगीत गारे
*
असा कसा तो गंध गोडवा विरोनि गेला आता
परत एकदा जुळवू आपण बेसुरातला भाता
*
वाटा ओल्या होत्या तेव्हा नरम किनारी वाळू
त्या वाळुतले सदन आपुले वचनांना मग पाळू
*
मावळतीला भास्कर जातो अज्ञानाच्या देशी
निरोप त्याला दोघे देऊ प्रेमस्मृतींच्या वेशी
*
नको दुरावा या वळणाशी त्या नात्यांच्या गाठी
जपूया तशा जशाच होत्या बेधुंद मनासाठी
*
कवयित्री- सौ. राधिका भांडारकर
रसग्रहण –
राधिका ताईंची ही कविता वाचल्यानंतर पटकन लक्षात येणारी गोष्ट म्हणजे या कवितेची नायिका एक ज्येष्ठ,अनुभव संपन्न, आयुष्यातील अनेक चढ-उतार पाहिलेली आणि त्या चढ- उतारांवर सतत पतीची साथ लाभलेली अशी आहे. पती-पत्नी हे नातेच असे आहे की संसाररथाची ती दोन चाकेच जणू. सुरुवातीच्या काळात ही चाके नवीन असल्यामुळे ती फार जोमाने, जोशाने चालतात परंतु हे नाते जसजसे जुने होत जाते तसतसे ते अधिक दृढ झाले तरी तो पहिला जोश राहत नाही आणि दोघांत बऱ्याचदा अगदी क्षुल्लक कारणांवरूनही वाद होत राहतात. या कवितेची नायिका अशीच या टप्प्यावर आलेली आहे आणि तिच्या भावनांचा, संवेदनांचा आविष्कार म्हणजेच पुन्हा एकदा ही कविता.
1) कुठे हरवला तेव्हाचा तो प्रितीचा रंग सारा
आयुष्याला सोसत नाही वृक्ष कोरडा वारा
आयुष्याच्या या टप्प्यावर कवितेतील नायिका काहीशी उदास अंतःकरणाने बसली आहे. तिच्या मनात येते की तेव्हाची तारुण्यातील ती प्रिती कुठे बरे हरवली? आता हे आयुष्य अगदीच रुक्ष, कोरडे वाटत आहे. त्यातील सगळे रंगच फिके, पुसट होऊन गेले आहेत.
2) संवाद नसे शब्द मधुरता हरवली कशी कोठे
तेव्हा वाटे मौनात बरे.. नसते वादळ मोठे
आता आम्हा दोघांत काही संवादच उरला नाही. कारण काही बोलायला गेले तर एकेका शब्दावरून नुसते वादच होतात. तेव्हा अशा वादळांपेक्षा मौनातच राहणे बरे, काहीच बोलायला नको.
3) ढग काळे ते दाटले नभी मिटोनि गेले तारे
जलधारांनो तुम्ही आपुले आनंद गीत गा रे
काळ्या ढगांनी आभाळ भरून आले, की अंधार दाटून येतो, आणि चमचमणारे तारे ढगाआड विरून जातात. नायिकेच्या मनाची अवस्था अशीच मळभ आलेल्या नभासारखी काळोखी झालेली आहे. परंतु ती स्वतःला धीर देते आणि म्हणते की अंधारलेल्या आकाशातून जशा पावसाच्या सरीवर सरी आनंदाने टप टप कोसळत असतात त्याचप्रमाणे मला माझे आनंद गीत गात राहिलेच पाहिजे.
या ठिकाणी कवयित्रीची सकारात्मक वृत्ती वाचकांचेही औदासिन्य निश्चितच कमी करते.
4) असा कसा तो गंध गोडवा विरोनि गेला आता
परत एकदा जुळवू आपण बेसुरातला भाता
पुन्हा एकदा तिला आपल्या नात्यातला, सहवासातला दरवळ निघून गेल्याची खंत वाटत आहे. परंतु या बेसूर झालेल्या संवादिनीचा ( जीवनाचा) भाता आपण सुरात जुळवू शकतो याचा तिला भरवसा वाटतो. तिच्या वृत्तीतील सकारात्मकता पुन्हा जागृत होते.
5) वाटा ओल्या होत्या तेव्हा नरम किनारी वाळू
त्या वाळूतले सदन आपुले वचनांना मग पाळू
तारुण्यातील नात्यात प्रेमाचा ओलावा होता आणि त्या ओलाव्यात आपला संसार एकमेकांना दिलेली वचने पाळत कसा अगदी दृष्ट लागण्यासारखा होता. नायिकेला वाटते की तोच ओलावा आजही असावा आणि तीच वचने आपण वर्तमानातही पाळावी.
6) मावळतीला भास्कर जातो अज्ञानाच्या देशी
निरोप त्याला दोघे देऊ प्रेम स्मृतींच्या वेशी
आता आपला अस्तकाल समीप आला आहे, सूर्य मावळून दूर देशी जातो, कुठे जातो ते अज्ञात आहे. आपलेही तसेच आहे. इथून आपण कुठे जाणार माहित नाही, परंतु निदान निरोप घेताना तरी त्या मधुर गतस्मृतींच्या वेशीवर आपण दोघांनी उभे राहण्यास काय हरकत आहे?
7) नको दुरावा या वळणाशी त्या नात्यांच्या गाठी
जपूया तशा जशाच होत्या बेधुंद मनासाठी
नायिका तिच्या पतीला आर्जवून सांगते आहे की आता या वळणावर आपल्या दोघात दुरावा नको रे! आपल्या नात्याच्या या गाठी जशा होत्या तशाच आपण जपूया, त्या सैल नको पडायला. त्यावेळी बेधुंद मनाने जसे आपण हातात हात घालून जगलो तसेच आताही जगू या ना!
संसार म्हटला की ॲडजस्टमेंट आली असे आपण नेहमीच म्हणतो. तसेच स्त्रीलाच ती करावी लागते असेही आपण म्हणतो. ही कविता वाचल्यावर हे अगदी सोळा आणे सत्य आहे याची जाणीव होते. नायिका दोघातील नात्यांचा दुरावा दूर करण्याचा सतत प्रयत्न करीत आहे.
लवंगलता या मात्रा गण वृत्तातील ही कविता कुठेही सूट न घेता राधिकाताईंनी यथायोग्य शब्दांचा वापर करून अगदी सहज लिहिली आहे. यातील काळ्या ढगांनी दाटलेले नभ, बेसूर भाता, ओल्या वाळूतले सदन वगैरे उपमा व उत्प्रेक्षा या अलंकारयुक्त शब्दांनी कवितेला एक प्रकारचे चैतन्य प्राप्त झाले आहे यात शंका नाही.
कवितेची सुरुवात उदासीन असली, तरी पुढे पुढे ती सकारात्मकता निर्माण करणारी असल्यामुळे आभाळाचे मळभ दूर करणारी आणि नंतर लख्ख प्रकाशाने उजळविणारी अशीच वाटते.
शेवटी एवढेच सांगावेसे वाटते की, या कवितेतील नायिका ही समाजातील अशा कित्येक जोडप्यांचे प्रतिनिधित्व करणारी आहे आणि आयुष्याच्या एका विशिष्ट टप्प्यावर पती-पत्नीच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आहे असे वाटत असले तरी प्रत्यक्ष वस्तुस्थिती तशी नसून ते दोघे एकमेकांसाठीच असतात हा बोध देणारी आहे.
© सुश्री अरुणा मुल्हेरकर
डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈