1

मराठी साहित्य – मराठी साहित्य – काव्यानंद ☆ खांब – शांता शेळके ☆ कवितेचे रसग्रहण – सौ. वंदना अशोक हुळबत्ते

कवयित्री शांताबाई शेळके विशेषांक

सौ.वंदना अशोक हुळबत्ते

🌸  काव्यानंद  🌸

 ☆ खांब – शांता शेळके ☆ कवितेचे रसग्रहण –सौ.वंदना अशोक हुळबत्ते ☆

एक प्रतिभा संपन्न कवयित्री, लेखिका, मराठीच्या प्राध्यापिका, सह संपादिका, अनुवादिका, तसेच बालगीते, कथा, कविता, ललित लेख यावर हुकूमत गाजवणाऱ्या रसिक प्रिय कवयित्री शांताबाई शेळके. त्यांची अनेक भावगीते, भक्तीगीते, कोळी, सिने गीते लोकप्रिय आहेत. त्यांनी जपानी हायकूचे अनुवाद ही केले आहेत. एक सालस, सोज्वळ व्यक्तीमत्व. अवघ्या महाराष्ट्राला त्यांच्या शब्दाचं गारूड होत. एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व. त्यांचा स्मृतीदिन ६ जूनला आहे. त्या निमित्ताने. त्याच्या “खांब” या कवितेचे रसग्रहण.

कवयित्री ची ‘खांब’ ही कविता समस्त संसारी महिलाचे प्रतिनिधित्व करते. या कवितेत संसारी स्त्रीला बाई असे संबोधले आहे. इथ मी तोच शब्द वापरते. लग्न होवून बाई घरात आली की तिचे विश्व बदलते.ती त्या घराशी एकरूप होऊन जाते. आनंदाने ते घर स्विकारते. तिला ही घरातील लोक गृहित धरतात. सरळ साध्या बाईचा आधार घराला किती मोलाचा असतो हे कवयित्रीने या  कवितेत मांडले आहे. ही कविता शहरी, ग्रामिण प्रत्येक बाईची आहे असे मला वाटते.प्रत्येकीचे सोसणे सारखेच असते.

संसार करत असताना बाई किती सहनशीलतेने वावरते. नव्या घरात तिला अडचणी येतात, वावरताना अवघडल्या सारखे होते, माहेरची आठवण येते, काही गोष्टी खटकतात, तेव्हा रडू कोसळते, पण हे सारे आवेग बाई चेहऱ्यावर दाखवून देत नाही. आपल्या मनातील खळबळ बोलून दाखवत नाही. ओठांवर आणत नाही, हसून वेळ मारून नेहते. आतल्या आत दु: ख दाबून ठेवते. कुढत राहते. चेहऱ्यावर हसरे मुखवटे चढवते, ओठावर हसू आणते. आतल्या आत खुप काही साठवते. सगळी कामे सहज करत राहते.

त्याच हसऱ्या चेहऱ्याने येणाऱ्या जाणाऱ्या माणसांचे, पैपाहुण्याचे स्वागत करते. त्यांना हव नको ते विचारते. स्वत:राबते. त्याचे आदरातिथ्य करते. हे काम बाईनेच करावे असा अलिखित नियम आहे. असे जणून तशीच वावरते. इथं तिच्या हालचालींना कवयित्रीनी वाऱ्याची उपमा दिली आहे. अगदी वाऱ्या सारखी घरभर फिरून ती बाई आपल कर्तव्य करते असते त्या तिला काही कमीपणा वाटत नाही.

घरातील प्रत्येक व्यक्तीला छोट्या मोठ्या कामासाठी बाई हवी असते. तिच्या शिवाय कुणाचे पान हलत नाही. तिला गृहित धरलेले असते. शिवाय तिच्या कामात नेमकेपणा असतो. तिच्या कामावर सर्वाचा विश्वास असतो. म्हणून नवऱ्या पासून सासऱ्या पर्यत सगळेजण तिच्या कडून कामाची अपेक्षा ठेवतात. “बिन पगारी फुल अधिकारी” प्रमाणे सगळी कामे बाई मनापासून करते पण साधे कौतुकाचे चार शब्द मिळतं नाहीत.मोबदला मिळणे दूरची गोष्ट.

घरातील प्रत्येक व्यक्तीशी प्रेमाचे नाते जुळते.आपलेपणाने त्यांची काळजी घेते. त्यांचे आरोग्य सांभाळते.सर्वानी आरोग्य संपन्न असावे ही गरज वाटते तिला. जर कोणी आजारी पडले तर उश्यापायशाला बसून मनोभावे सेवा करते. दिव्या प्रमाणे स्वत: जळते. रात्रभर जागते. पुन्हा दुसऱ्या दिवशी नित्याच्या कामाला लागते. बाईच झीजणं दिसतच नाही.तिच्या मनाची कदर केली जात नाही. तिच्या शिवाय घरची कामे कोण करणार? सर्वांना तिची सवय झालेली असते. ती फक्त आपलं काम करत असते.

बाईच्या पाठीला पुजलेले काम म्हणजे “रांधा वाढा उष्टी काढा”. बाईने किती पराक्रम गाजवला. ती किती ही कर्तृत्वाने असली तरी ही कामे तिच्या पाठची जात नाहीत. हे तिचेच काम आहे असे गृहीत धरले जाते. या बाबत कवयित्रीनी या ठिकाणी खुप छान ओळी लिहिल्या आहेत. “राबण्याचा गाव तिला लग्नात मिळाला आंदण” हे त्रिकाल सत्य आहेत. लग्नात कुणा कुणाला छान छान वस्तू भेट मिळतात. त्या भेटीतून आनंद मिळतो. पण बाईला मात्र लग्नात राबण भेट मिळत. मूल आणि मूल ही प्रतिमा आज ही विचारात घेतली जाते. तिची काय कळते? तिला कुठाय अकल्ल आहे? तिने चुल आणि मूल सांभाळावे एवढंच तिला कळत. तिने स्वयंपाक करावा,स्वच्छता करावी. सगळ्यांच्या मर्जीने वागावे हेच तिच्या कपाळावर सटवीने ठळक गोंदलं आहे.गोंदण जसं कपाळावर कायम स्वरुपी असतं तसे बाईच्या कपाळी राबणे गोंदलं आहे. कवयित्रीनी खुप छान प्रतिमा वापरली आहे.

आपल्या सुंदर दिसण्याच्या कल्पना ही बाईच्या मनावर बिंबवल्या असतात. अतिशय साध्या गोष्टीत ती समाधानी राहते.रहायला भाग पाडतात.गोंदणावर रूपया एवढे लालभडक कुंकू लावले तरी ती सुखावते. ती तिला सुंदर दिसते.आनंद मानते.सोन्या चांदीच्या दागिण्याची हौस नाही. चार काळे मनी गळ्यात असले तरी तिला ती साजरी वाटते.आपले हे सौभाग्य आहे असं  मानते.तिच्या अपेक्षा जास्त नाहीत.पती परमेश्वरासाठी घरात आनंद पेरते. नवऱ्याच्या  आयुष्यासाठी प्रार्थना करते. आपल्या अहेव मरण यावे असे वाटते.हातातला चुडा अखंड रहावा ही बाईची इच्छा असते. दुसऱ्यावर तिचा विश्वास नसतो म्हणून सगळी कामे स्वत: करते.

आपल्या हातावर तिचा विश्वास आहे. किती कष्ट करण्याची तयारी आहे.

मुला शिवाय घराला घरपण नाही. अगंणात मुलं खेळलं तर संसार सुखाचा होतो हे तिला ठाऊक आहे. ती स्वत: भार सोसून  घराला वंशाचा दिवा देते आणि अनेक पिढ्यांना जोडली जाते. बाळाला मोठं करते तो जेव्हा पुढची पिढी घडवतो. तेव्हा ती पिढीत जोडली जाते. नाते बदलते. घराच घरपण पिढीच्या रूपात बाईच पुढं नेते. हे कवयित्रीने नेमक्या शब्दात मांडले आहे.

धरतीच प्रतिक बाई. संसाराची धरती बाई.घराचा डोलारा बाईच फुलतो. तो फुलवण्यासाठी बाई कष्ट करते. फुलोरा गगनाला भिडतो तेव्हा बाई जमिनीत घट्ट मूळे रोवून उभी असते. ती स्वत: चा तोल ढळू देत नाही. डगमगत नाही. ती या घराचा आधार असते. सारं घर तोलून धरण्याची ताकद फक्त बाईच असते. कवयित्रीने तर या कवितेत “देहाचाच खांब” असे प्रतिक वापरले आहे. संसारात बाई स्वत:चे मूल्य विसरते, आपल्या देहाचे कौतुक विसरते, केवळ आपले घर सावरण्यासाठी, फुलवण्यासाठी कणाकणाने, क्षणाक्षणाने झीजते. आपल्या आधारावर घराचा भार तोलून धरते, सर्वांना सुरक्षित करते.सर्वाची काळजी घेते.स्वत: खांब होते.आपले अस्तित्व विसरून. बाई घरासाठी झिजते, खपते. घर उभं करते.

भुईत पाय रोवून आभाळ फुलवणारी, गंधित करणारी जाई आणि आपल्या देहाचा खांब करून अवघं घर तोलून धरणारी बाई या कवियत्री ने मांडलेल्या प्रतिमा कवितेला अत्युच्च उंचीवर नेतात व रसिकांना बाईपणाच्या समस्त दुखण्याबद्दल संवेदनशील करतात. एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला समजून घेऊ शकते.हे समजून कवयित्रीने स्त्रियांचे चिरंजीव दु:ख व्यक्त केले असले तरी ती घराचा खांब आहे हे सांगून तिच्या मोठेपणाची व अस्तित्वाची सर्वांनाच जाणीव करून दिली आहे.हे या कवितेचे यश म्हणावे लागेल.

© सौ.वंदना अशोक हुळबत्ते

सांगली

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
मराठी साहित्य – मराठी साहित्य – काव्यानंद ☆ तोच चंद्रमा… – शांता शेळके ☆ कवितेचे रसग्रहण – श्रीमती अनुराधा फाटक

कवयित्री शांताबाई शेळके विशेषांक

श्रीमती अनुराधा फाटक

🌸  काव्यानंद  🌸

 ☆ तोच चंद्रमा… – शांता शेळके ☆ कवितेचे रसग्रहण – श्रीमती अनुराधा फाटक ☆

मनाचा ठाव घेणारे काव्य लेखन हे वैशिष्ट्य असणाऱ्या आदरणीय कवियत्री शांता शेळके यांची ही रचना!प्रत्येक तारुण्याला भूतकाळात नेणारे असे गीत !

संसारात गुरफटल्यानंतर तरुणपणीचा मैत्रीचा बहर आपोआप ओसरतो पण मनाच्या कप्प्यात काहीतरी लपलेले असते.ते कधीतरी बाहेर येते.

या गीतातून असाच एक भूतकाळ कवियत्री शांता शेळकेनी उलगडला आहे.

काही कारणाने गीताचा नायक एका ठिकाणी जातो आणि तेथे गेल्यावर आपण आपल्या सखीबरोबर याच ठिकाणी आल्याचे त्याला स्मरते. त्याचेच मन त्याच्याशी हितगुज करते अशी या गीताची मध्यवर्ती कल्पना आहे.

संध्याकाळी तिथे आलेला तो तिथल्या लताकुंजात बसून आकाशाकडे बघत असतानाच त्याला त्याच्या सखीबरोबरची भेट आठवते… तेव्हा जो चंद्र आकाशात होता तोच आता आहे. तीच चैत्र पौर्णिमेची रात्र आहे आणि जिच्याबरोबर मी स्वप्ने रंगविली तिही तूच आता मला इथं आहेस असे वाटते.

तीच शांतता, प्रितीची धुंदी आणणारे चांदणे, आता जसा मांडवावर जाईचा वेल पसरला आहे तसाच त्यावेळीही पसरला होता. जाईच्या गंधमोहिनीवर त्यावेळी आपण लुब्ध झालो होतो पण आता…आता गंधमोहिनीची ती धुंदी नाही. तू आणि मी तेव्हाचेच आहोत पण आपले मार्ग वेगळे झाले,आपले प्रेम विरून गेले, एकमेकांच्या भेटीची ओढ राहिली नाही की स्वप्ने पहाणे नाही. एकमेकांच्या विरहाची आर्तता नाही की डोळ्यात भेटीची स्वप्ने नाहीत. ज्या जाईच्या फुलांच्या सुगंधाने आपण भारावलो होतो ती फुले केव्हाच वाळली असून आज तुझी झालेली आठवण म्हणजे वाळलेल्या फुलातला गंध !प्रेमाच्या भंगलेल्या सुरातून यापुढे कधीच गीत जुळणाय नाही.

हे एक विरहगीत असून सत्यात न उतरलेले स्वप्न बघणे आहे.

निसर्ग कधी बदलत नसतो.तो नित्य तसाच असतो बदल घडतात ते मानवी जीवनात आणि ते बदल उराशी बाळगत आपण जुने शोध घेण्याचा प्रयत्न करत दुःखाला कवटाळत असतो.

 हे गीत ऐकताना मम्मटाच्या काव्य प्रकाश ग्रंथातील एका रचनेची प्रसंग साधर्म्यामुळे आठवण येते.

‘ यः कौमारहरः स एव हि वरः

ता एव चैत्रक्षपाः

ते चोन्मीलित-मालती-सुरभयः

प्रौढाः कदम्बानिलाः ।

सा चैवास्मि तथापि

सुरत-व्यापारलीलाविधौ रेवा-रेतसि-वेतसी- तरुतले

चेतःसमुत्कण्ठते ।।

माझ्या कुमारीपणाचे ज्याने हरण केले तोच प्रियतम( जरी आज आहे)चैत्रातल्या त्याच रात्री आहेत, उमललेल्या मालतीफुलांच्या सुगंधाने भरलेले तेच कदंब वृक्षावरून वहात येणारे वेगवान वारे आहेत,आणि मी देखील तीच आहेतरी त्याच नर्मदा तीरावरील वेतांच्या कुंजामध्ये त्याच सरतक्रीडेच्या विवाहासाठी माझे मन उत्कंठीत आहे.

 या संकृत रचनेत या गीताचे बीज दडलेले असावे असे वाटले म्हणून श्लोकाचा उल्लेख करावासा वाटला फरक एवढाच आहे श्लोकातील नायिका विवाहोत्सुक वाटते आणि हे गीत विरहगीत आहे.

 

© श्रीमती अनुराधा फाटक

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
मराठी साहित्य – काव्यानंद ☆ ‘नि:संग’ – सुश्री संजीवनी बोकील ☆ सौ. राधिका भांडारकर

सौ. राधिका भांडारकर

 

☆ काव्यानंद ☆ ‘नि:संग’ – सुश्री संजीवनी बोकील ☆ सौ. राधिका भांडारकर

सुश्री संजीवनी बोकील

रसग्रहण:

काही दिवसांपूर्वीच संजीवनी बोकील यांची नि:संग ही कविता वाचनात आली. एकेका शब्दांत मी रमून गेले.

मनातला एक  विचार इतक्या सहज आणि साध्या शब्दांत मांडण्याचं कसब, संजीवनीताईंच्या काव्यात जाणवलं… या कवितेतून त्यांनी एक सुंदर संदेश दिलाय्. भरकटणार्‍या, खचलेल्या, थकलेल्या सैरभैर झालेल्या मनाला एक सकारात्मक दिशा दाखवली आहे.

माणसाच्या मनात भय का आणि कधी निर्माण होतं? जेव्हां.. स्वत:च्या सामान्यत्वाला सामोरं नसतं जायचं… पंखातलं बळ ठाऊक नसतं… भरारी गरुडासारखी घ्यायची असते… ऊंच आकाशाला गवसणी घालायची असते…. मग ओंजळीत येतो तो न्यून गंड.. निराशा… अपयश…. आणि एक छान आयुष्य आनंदालाच विन्मुख होतं….!!! अशा मानसिकतेसाठी कवियत्री म्हणते,

।।स्वत:चं  सामान्यत्व फार सलू लागलं की बघावं, नि:संग  भिरभिरणार्‍या म्हातारीच्या पिसाकडे ।।

म्हातारीचं पिस..!!

हातभरच ऊडणार्‍या या पिसाला, आनंदाने भिरभिर उड्या मारत पकडणार्‍या बाळपणीची सहज आठवण झाली… पण या नि:संग, स्वत:च्याच मस्तीत आकाशात गिरक्या घेणार्‍या या म्हातारीच्या पिसांतूनच,संजीवनी बोकील यांनी जीवनानंदाचं एक तत्व किती सहजतेनं उलगडलंय!!

त्याला कुणी गरुड म्हणत नाही याचं दु:खं नाही, पंख बळकट नसल्याचा खेद नाही….. आकाशाचा अंत गाठायचा हव्यास नाही….. उंची गाठायचा मोह नाही… भिरभिरत, हवेशी जुळवून घेत, हलक्या अस्तित्वाला सहज स्वीकारत ते मजेत जगून घेतं…!!

ना जमिनीची भीती ना आकाशाचा मोह…. नि:संग जगण्याची शिकवण अशी निसर्गातूनच मिळते… जगणं महत्वाचं….!!

जगण्यातली स्वीकृती महत्वाची… संतांनी सुद्धा हेच म्हटलंय् ना..

।।ठेविले अनंते तैसेची रहावे। चित्ती असू द्यावे समाधान।।

जे. कृष्णमूर्तींच्ंही असंच एक वाक्य…. Know yourself..!! Be with you…. happiness is within you..!!

सत्यात, सहजतेत, स्वीकृतीत आनंद आहे.. स्पर्धेत, मृगजळापाठी धावून दमछाक का करुन घ्यायची…?

संजीवनीताईंच्या या नि:संग, हवेत मस्त भिरभिरणार्‍या म्हातारीच्या पिसाने शिणवटलेल्या मनावर हलकेच फुंकर घातली..,,

 

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈
मराठी साहित्य – काव्यानंद ☆ पानोपानी वनोवनी – कवी सुहास रघुनाथ पंडित ☆ कवितेचे रसग्रहण – प्रा. तुकाराम दादा पाटील

प्रा. तुकाराम दादा पाटील

 ☆ काव्यानंद ☆ पानोपानी वनोवनी – कवी सुहास रघुनाथ पंडित ☆ कवितेचे रसग्रहण – प्रा. तुकाराम दादा पाटील ☆ 

कवी सुहास पंडित यानी आपल्या या कवितेत भक्तीरस मोठ्या श्रद्धेने आळवला आहे. जीला आपण मधुराभक्ती म्हणून ओळखतो तिची आठवण ही कविता वाचताना येते.स्री सुलभ मनाला परमेश्वराची आठवत कशी येते हे सांगताना कवी म्हणतात.

कवी सुहास रघुनाथ पंडित

जेव्हा माझ्या कानावर बासरीची धून येते तेव्हा मला मनमोहन बन्सीधराची प्राकर्शाने आठवण येते. आता धोधो बरसणा-या आषाढधारा सरल्या आहेत आणि श्रावण मासातील रिमझिम पावसाला सुरवात झाली आहे.अशा वेळी  माझ्या मनाला भुरळ पाडणारे आवचितच भास का होत आहेत? माझे मन हुरहुरते आहे. पण  माझ्या मनात एक इच्छा निर्माण झाली असून माझ्या डोळ्याना मला जिथे तिथे माझा  श्रीनीवासच दिसतो आहे. त्याचाच मला सारखा भास होतो आहे. येथे व्यक्त होणारे हळवे कवी मन फुललेल्या रमणीय निसर्गातच  परमेश्वराचे दर्शन घेत आहे असे वाटते. पण तेवढ्यावरच न थांबता ते मन पुढे म्हणते  मला प्रत्यक्ष परमेश्वराचे रूप पहावयाचे आहे. मी डोळ्यात जीव आणून त्या विधात्याची वाट पहात आहे. जीवाला जीव लावून जायची  देवाची लाघवी जुनी सवय मला माहित आहे. म्हणूनच माझे मन त्याच्या दर्शनासाठी व्याकूळ झाले आहे. या माझ्या आशाळभूत मनावर कोण बरे मायेची फुंकर घालायला येईल?. मी देवाच्या ध्यासाने ठार वेडी झाले आहे असे सारे जगच मला म्हणते आहे.

त्याचे प्रत्यक्ष असे रूप माझ्या नजरे समोर नाही. पण तरीही त्याच्या कल्पक  स्वरूपाचे वर्णन करण्यासाठी माझी वाणी अपुरीच  आहे असे मला वाटते. माझ्या आयुष्यात आसा एखादा सोन्याचा दिवस यावा आणि देवाचे प्रत्यक्ष दर्शन मिळून माझ्या जगण्याचे सार्थक व्हावे.

येथे आता राधा नाही. सखा सुदामा नाही.पण माझे मन  त्यांच्या दर्शनासाठी आणि सहवासासाठी उतावीळ झाले आहे. त्या माझ्या मनाला मी कसा लगाम घालू? माझा हा मनोदय मी माझ्या देवाला आता कोणत्या भाषेत सांगू?

माझ्या हृदयात दाटलेल्या आवेगपूर्ण भावना व्यक्त करणारी भाषा माझ्या ओठावर येइनाशी झाली आहे.  आकाशात दाटलेले हे शामवर्णी मेघ ही मला स्वस्थ पणे जागू देइनासे झाले आहेत. म्हणून मी आता या वनातील पानापानात  व त्यांच्या हरित रंगात दडून बसलेला हरी पहातो आहे.मला आता माझा हरी तेथेच दिसतो आहे.भेटतो आहे.

मनाच्या आभासी संभ्रमावस्थेत निसर्गात समाविष्ट झालेला हरी पाहताना होणारा मनमुराद आनंद निसर्गाचे दिव्यत्व दाखवतो. पण तेथेच परमेश्वर पहाणे ही मानवी श्रद्धा बनायला पाहिजे हेच या कवितेतून कविला सांगायचे आहे असे मला वाटते. निसर्गाच्या या सामर्थ्याची आपल्याला ओळख पटली तर मग आपला स्वर्ग आपल्याच भोवती असेल. आणि तोच आपला तारणहार परमेश्वर असेल.  दिलेल्या या संदेशाला प्रतिसाद देवून आपण एक नवी दृष्टी प्राप्त करून घेऊ आणि सूखीही होऊ. या संदेशाला साठी कवीचे आभार. कविता दीर्घ आहे पण वाचनीय आहे.

धन्यवाद

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित≈
मराठी साहित्य – काव्यानंद ☆ माझा काळ गेला आणि तुझी वेळ गेली – कवी श्री वैभव जोशी ☆ सौ. ज्योत्स्ना तानवडे

सौ. ज्योत्स्ना तानवडे

☆ काव्यानंद ☆ माझा काळ गेला आणि तुझी वेळ गेली – कवी श्री वैभव जोशी ☆ सौ. ज्योत्स्ना तानवडे ☆

रसग्रहण:

आयुष्याच्या शेवटच्या वळणावर मागे वळून कवीने आपल्या आयुष्याचा धांडोळा घेतलेला आहे. तरुणपणी प्रेम यशस्वी झाले नाही, उमेदीच्या वयात अपेक्षित यश मिळाले नाही, ज्या वयात ज्या गोष्टी हव्या होत्या त्या मिळाल्या नाहीत, त्यांची फक्त आठवण काढलेली आहे.  आता अशी वेळ आहे की,  यापुढे या इच्छा पूर्णच होऊ शकणार नाहीत.

दोघे एकेकाळचे प्रेमिक. पण प्रेम असफल झालेले. पुन्हा आता त्यांनी भेटून काय होणार? देणे घेणे खूप झाले. पण सर्व व्यर्थ गेले. आता हातात राहिलेल्या श्वासांच्या भरोशावर काहीच करता येणे शक्य नाही. या भेटीतून काहीच निष्पन्न होणार नाही. कारण माझा काळ सरला आहे आणि तुझी वेळ ही टळून गेलेली आहे अशी अवस्था आहे.

तीच गोष्ट आयुष्यातील यशापयशाची. तेव्हा तारुण्याचा बहर होता. मनात जिद्द होती. ध्येयपूर्तीचा ध्यास होता. त्याच मुळे हाती असलेल्या गोष्टींच्या मदतीने (सरूप) यशाच्या प्राप्तीचे (अरूप) चित्र मनात रेखाटले जात होते. पण ते जमले नाही. त्यावेळी अपयशाची भीती होती. तिचे पण आता वय झाले म्हणजे यश-अपयश यांचे आता काहीच वाटत नाही. मन त्याच्या पलीकडे गेलेले आहे. त्यामुळे यशाच्या अपेक्षेने एवढा मोठा डोलारा सांभाळण्यात काहीच अर्थ नाही. कारण आता माझा काळ सरत आलाय आणि यशाची ती वेळही टळून गेली आहे.

कवी श्री वैभव जोशी

हे ईश्वरा,  तेव्हा तुझी खुप प्रार्थना केली. पण व्यर्थ गेली. आता माझ्या प्रार्थनेत तेवढी आर्तता, तेवढे बळ राहिलेले नाही आणि तुझ्याकडे माझ्यासाठी कृपेचे दानही नाही. आता मी ऐलतीरी आणि माझी नजर पैलतीरी लागली असताना सर्व देव मला सारखेच वाटायला लागले आहेत.  आता या सरत्या आयुष्यात मनामध्ये फक्त प्रेमाची, कष्टांची, श्रद्धेची आठवण जागी आहे. त्यामुळेच मनात भावनांची ओल टिकून आहे.  पण आता याहून वेगळे काही होणारच नाही कारण या सगळ्यांची वेळ टळून गेली आहे आणि माझा काळही सरला आहे.

आयुष्याच्या संध्याकाळी आयुष्यातील अप्राप्य राहिलेल्या गोष्टींच्या आठवणीने कवी सदगदीत होतो. या गोष्टींना उजाळा देतो आहे. यातून एक जाणवते हव्या असलेल्या गोष्टी त्याचवेळेस मिळाल्या तर त्यांचा आनंद वेगळाच असतो.

(चित्र – साभार फेसबुक वाल) 

© सौ. ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
मराठी साहित्य – काव्यानंद ☆ वा.रा. कांत यांचे काव्यविश्व ☆ सुश्री अपर्णा हरताळकर शेंबेकर

स्व वामन रामराव कांत (वा.रा. कांत ) 

Va Ra Kant Kavya Vishwa - Posts | Facebook

जन्म – 6 ऑक्टोबर 1913

मृत्यु – 8 सप्टेंबर 1991

☆ काव्यानंद ☆ वा.रा.कांत यांचे काव्यविश्व ☆ सुश्री अपर्णा हरताळकर शेंबेकर ☆

बगळ्यांची माळ फुले….

त्या तरुतळी विसरले गीत…

हे अजरामर गीत लिहिणारे नांदेडचे कवी वा. रा .कांत !

त्यांच्या काव्याचा आठव व त्यांचे स्मरण याहून अधिक काय हवे त्यांना? त्यांच्या काव्य रसनेने रसिकांची तृषा वाढते आणि शमतेही!

कवी आणि रसिक हे नातेच मोठे विलक्षण! कवी हा रसिकांमध्ये ‘ काव्यतृष्णा ‘ शोधतो आणि रसिक  कवींच्या काव्यात ‘काव्यरससुधा’ !

जीवनातल्या साध्या साध्या गोष्टींकडे, अनुभवांकडे कवी इतक्या वेगळ्या दृष्टिकोनातून बघतात आणि ते ‘बघणे ‘ असे काही काव्यात मिसळतात की ते वाचल्यानंतर रसिकालाही ती दृष्टी मिळते  आणि तो ही  त्या अनुभवाचा तरल ,सूक्ष्म पदर अनुभवतो आणि भावविभोर होतो.

आता हेच पहा ना….. गावातील मातीचे घर… तुम्ही-आम्हीही बघितलेले. पण वारा कान्त लिहितात….

….. माझ्या मातीच्या घराची

भुई सुंदर फुलांची

दारावर अंधाराच्या

पडे थाप चांदण्यांची…..

 

किती सुंदर आहे ही कल्पना!

 

शरद ऋतूतील निळेभोर आभाळ, त्यात उडणारे शुभ्र पांढरे पक्षी….एक सुंदर निसर्ग दृश्य! कवींना मात्र काय वाटतं बघा….

 

शरदाच्या आभाळाचा

रंग किती निळा ओला

उड जपून विहंगा

डाग लागेल पंखाला !

 

अशा ओळी वाचल्या की वाटतं, या कवींच्या हृदयात काव्यरसाची एक कुपी कुणीतरी लपवून ठेवली आहे. त्यातले अत्तर त्यांच्या शब्दाशब्दात सांडत असावे!

अनुभवांच्या परिपक्वतेमुळे येणारी तृप्ती शब्दांमधून मांडताना कांत लिहितात…

 

….    असे बोलता हसता

गेले निघून दिवस

आता उरलीसे मागे

पिक्या फळांची मिठास !

 

अशा साध्या सरळ अनुभवांचे कवींच्या हाती सोने होते !

वा रा कांत यांचे ‘ बगळ्यांची माळ फुले’ हे काव्य म्हणजे एक चित्रच आहे. ती रम्य जागा, ते तरल ,मंतरलेले क्षण प्रत्येकाने आपल्या मनात जपून ठेवलेले आहेत.

 

…….. कमळापरी मिटती दिवस

उमलुनी तळ्यात…..

 

या सुंदर अनुभवात आपण रमलेलो  असताना कांत अचानक प्रश्न करतात….

 

……. सलते ती तडफड का

कधी तुझ्या उरात?…..

 

आणि मग हा प्रश्न कट्यारीसारखा आपल्या हृदयाच्या आरपार जातो!

अशा सुंदर सुंदर काव्य रचना करणाऱ्या वा रा कांत यांनी दोनुली, पहाट तारा, बगळ्यांची माळ, मावळते शब्द, रुद्रवीणा असे एकूण दहा काव्यसंग्रह लिहिले.

माझ्या मनात हे गीत नेमकं गातो कोण या प्रश्नाचा विचार करताना वा रा कांत लिहितात…

अभिमानाने कधी दाटता

रचिले मी हे गाणे म्हणता

‘गीतच रचते नित्य तुला रे’

फुटे  शब्द हृदयात

कळेना गाते कोण मनात…

आपल्या काव्य प्रतिभेचे श्रेयही ते स्वतःकडे घेत नाहीत. अशा या प्रतिभासंपन्न , विनम्र कवींना माझीही शब्दसुमने अर्पण!

 

© सुश्री अपर्णा हरताळकर शेंबेकर

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈
मराठी साहित्य – काव्यानंद ☆ चुकली दिशा तरीही.. स्व विंदा करंदीकर ☆ सौ. राधिका भांडारकर

सौ. राधिका भांडारकर

Vinda Karandikar memorial in Chetana college | चेतना महाविद्यालयात विंदांचे राष्ट्रीय स्मारक | Loksatta

स्व विंदा करंदीकर

 ☆ काव्यानंद ☆ चुकली दिशा तरीही.. स्व विंदा करंदीकर ☆ सौ. राधिका भांडारकर ☆

रसग्रहण 

“चुकली दिशा तरीही  हुकले न श्रेय सारे….”ही कविता वाचताना मनात एक आकृती आकारते. एका मुक्त, बंधनात न अडकलेल्या, स्वत:च्याच धुंदीत, बेफिकीर, अखंड चालत राहणार्‍या मुशाफिराची… हा मुशाफिर वेगळ्याच वृत्तीचा आहे.

आणि कवी या मुशाफिराची सफर एका तटस्थ दृष्टीकोनातून पहात आहेत.. समाजाने नाकारलेल्या अथवा समाजाने स्वीकारलेल्या अशा कुठल्याच मार्गावरुन वाटचाल न करणारा…भले इतरांसाठी दिशा चुकलेला अथवा भरकटलेला पण स्वत:साठी मात्र सगळेच मार्ग खुले ठेवणारा हा वेडा मुशाफिर कवीला मात्र त्याच्या याच विशेषत्वाने आकर्षित करतो.त्याच्यात एक सामर्थ्य जाणवतं…

मला नेहमी असं वाटतं की विंदांची काव्य वृत्ती ही प्रहारक आहे.प्रहार प्रस्थापित वैचारिकतेवर. प्रहार प्रचलिततेवर… म्हणूनच त्यांचे शब्द वेगळ्या वाटेवर वणव्यासारखे फुलतात…

“डरतात वादळांना जे दास त्या ध्रुवांचे..

हे शीड तोडले की अनुकुल सर्व वारे,..”

लोक काय म्हणतील, समाज काय म्हणेल हीच भिती बाळगून जगणार्‍यांना कवी रूढी ,परंपरेचे दास मानतात.

ही गतानुगतिक माणसं त्यांना डरपोक वाटतात.भित्री,भेदरट अरुंद छातीची वाटतात…शीड तोडणारीच माणसं प्रिय  वाटतात. झपाटलेली, झोकून देणारी या मुशाफिरा सारखी माणसंच इतिहास घडवतात,

“मग्रुर प्राक्तनाचा मी फाडला नकाशा…”

नशीबावर विश्वास ठेवणारी वा नशीबाला दोष देत जगणारी माणसं नाकर्तीच असतात.ग्रह तार्‍यांची गणितं मांडून सावधानतेने फुंकर मारत जीवन जगणारा, कवीला मर्द वाटत नाही, त्यापेक्षा, मग्रुर प्राक्तनाचा नकाशा फाडून, ईशारे झुगारणारा असा एखादा ,अधिक बलवान निग्रही,घट्ट मनोधारणेचा वाटतो.

“चुकली दिशा तरीही आकाश एक आहे….”

चुकतमाकत ,चाचपडत चालाणारा हा मुशाफिर नाही.

दिशा चुकेल याचं भय त्याला  नाही.कारण त्याच्यासाठी आकाश एकच आहे.इथे कोलंबसची आठवण येते. त्याचीही दिशा चुकली पण त्याला अमेरिका सापडली. माघार न घेता पुढे जाणं हेच सामर्थ्याचं लक्षण..

आशा तशी निराशा, हे श्रेय सावधांचे बेसावधास कैसे डसणार हे निखारे…?

इथे बेसावध याचा अर्थ जागरुक नसणारा असा नकारात्मक नसून ,जो बेसावध तोच शूर आणि तोच खरा वीर.कारण आशा निराशेचे निखारे त्याच्यातलं झपाटलेपण नाही जाळू शकत.

हा वेडा,दिशा चुकलेला, निराळ्या वाटेवरुन बेधडक चालणारा, बेसावध, झोकून देणार्‍या मुशाफिरांत  विंदाना एक तळपतं सामर्थ्य  दिसतं अन् ते भावतं.

त्याच्या  झपाटलेपणाला त्यांना या कवितेतून दाद द्यावीशी वाटते…

ही संपूर्ण कविता, अर्थाची ऊलगड करत, वाचत असतांना, विंदांच्या वैचारिक प्रतिभेला, पुरोगामीत्वाला, सच्चेपणाला वंदनीय दाद द्यावीशी वाटते.

एक सुंदर संदेश घेऊन ही कविता मनात रुजते…

व्हा वेडे..द्या झोकून..फाडून टाका सारे बुरखे…

शोधा वेगळे रस्ते…..नव्या वाटा तयार करा…जुन्या इतिहासातील जुन्याच चुकांना ग्लोरीफाय करण्याऐवजी,

नवा ऊज्वल इतिहास घडवा…

 

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈
मराठी साहित्य – काव्यानंद ☆ ‘जोगिया’ – महाकवी ग. दि. माडगूळकर ☆ सौ. ज्योत्स्ना तानवडे

सौ. ज्योत्स्ना तानवडे

☆ काव्यानंद ☆ ‘जोगिया’ – महाकवी ग. दि. माडगूळकर ☆ सौ. ज्योत्स्ना तानवडे ☆

स्व गजानन दिगंबर माडगूळकर ‘गदिमा’

Best Bhojpuri Video Song - Residence w

रसग्रहण:

कविवर्य ग. दि. माडगूळकर यांची ही अतिशय तरल,सुंदर अशी विराणी आहे. नाच-गाणे करणाऱ्या एका कोठीवालीच्या आयुष्यात घडणाऱ्या विफल प्रीतीची ही कहाणी आहे. बैठक संपली. रसिकांना विन्मुख होऊन ती दार बंद करून आली. आता पुन्हा ती अतिशय तन्मयतेने विडा लावते आहे. गाणे गुणगुणते आहे. मनासारखा विडा लावला आणि ती आर्त स्वरात गाऊ लागली. डोळे पाण्याने भरले आणि या स्वरओल्या जोगियाने वेड्या प्रीतीची कहाणी सांगितली.

“मी देह विकून त्याचे मोल घेणारी.  इथे सगळ्या भांगेच्याच बागा.  असाच एक दिवस एक सावळासा तरुण जणू वनमालीच आला आणि या भांगेत तुळस पेरून गेला. मी त्याला नावही विचारले नाही. हळूच दबकत इथल्या सगळ्या व्यवहाराच्या विपरीत असे नवखेपणाने बोलला, “राणी, माझी तुझ्यावर प्रीति जडली आहे.”

इथे सगळा नीतीचा उघड सौदा आणि हा खुळा इष्कालाच प्रीती समजतो. हसून त्याला म्हटले,’ थोडा दाम वाढवा ‘ आणि पान पुढे केले. तोवर तो निघून पण गेला. खरे प्रेम फक्त पैशातच नसते. पैशाने ते मोजताही येत नाही हे मला त्यावेळी कळले.

माझा हात तसाच थबकून राहिला. मी त्याची प्रीत जाणलीच नाही. आता माझे मन सतत त्याला हुडकते आहे. पण तो आता कशाला येईल इथे ?

तो हाच दिवस,हीच तिथी आणि अशीच ही रात्र होती. मी थकून बसले होते आणि एखादा तारा तुटावा तसा तो मागं वळूनही न पाहता अंधारात निघून गेला.

आजच्या दिवशी त्याच्यासाठी विडा लावून, त्याचे ध्यान करते. त्याच्यासाठी व्रतस्थ राहते. असा वर्षातून एकदा ‘जोगिया’ रंगतो. असा हा खुळ्या प्रीतीचा खुळा सन्मान. ”

ही कहाणी कविवर्य.  माडगूळकरांनी सरळ,ओघवत्या, तरल शब्दरचनेने मांडली आहे.   ‘जोगिया’ ही अत्यंत आर्त स्वरांची रागिणी. ऐकणाऱ्याच्या हृदयाची तार छेडते. हा राग आत्म्याची परमात्म्याशी एकरूप होण्याची आर्तता व्यक्त करतो. या कोठीवालीला सच्ची प्रीत कधी ठाऊकच नसते. तिचा असतो सगळा देण्या-घेण्याचा रोकडा व्यवहार. भांगेतही तुळस उगवते हे तिच्या गावीही नसते. त्यामुळे त्या प्रीतवेड्या तरुणाची प्रीत जेव्हा तिला समजते तेव्हा खूप उशीर झालेला असतो. त्यामुळे ती अतिशय कासावीस होते.

आता तो येऊन गेलेल्या तिथीला त्याची आठवण म्हणून प्रीतीचा विडा तयार करून त्याच्यासाठी तयार होणे एवढेच तिच्या हाती उरते. जोगियाचे आर्त सूर त्याला साद घालतात. तीच आर्तता आता तिच्या जीवनात उरलेली असते. त्यांच्या असफल प्रेमाची ही आर्तता आपल्यालासुद्धा बेचैन करते. खऱ्या प्रीतीला नाव,गाव,जात-पात, पेशा, व्यवसाय यांच्याशी काही देणेघेणे नसते. ती असते दोन मनांना छेडणारी तार. कधी सुरेल बनते तर कधी आर्त बनून ‘जोगीया’ गाते.

© सौ. ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
मराठी साहित्य – काव्यानंद ☆ पोटापुरता पसा…महाकवी ग. दि. माडगूळकर ☆ सौ. अमृता देशपांडे

सौ. अमृता देशपांडे

☆ काव्यानंद ☆ पोटापुरता पसा…महाकवी ग. दि. माडगूळकर ☆ सौ. अमृता देशपांडे☆

स्व गजानन दिगंबर माडगूळकर ‘गदिमा’

Best Bhojpuri Video Song - Residence w

रसग्रहण:

देणा-याचे हात हजारो

दुबळी माझी झोळी

” प्रपंच” 1961 सालचा हा चित्रपट. भारत सरकारने कुटुंब नियोजन मोहीम राबवणे सुरू केले होते. हम दो हमारे दो,

लाल त्रिकोण, अशा जाहिरातीनी सार्वजनिक वातावरण दणाणून गेले होते.ह्याचा प्रचार अधिकतर ग्रामीण भागात जास्त करणे आवश्यक होते.सावकारी, जप्ती, आर्थिक गरीबी, यात ग्रामीण जनता पिचून गेली होती.  पण अशाही परिस्थितीत घराघरातून दर वर्षी पाळणा हलतच असे. त्यातूनच अस्वच्छता, निकृष्ट  अन्न, व योग्य जोपासना न झाल्याने लहान मुले दगावत असत. पोलिओ, टी बी, सारखे विकार बळावले होते.

यावर कडक धोरण अवलंबून सरकारने ही मोहीम राबवली होती. जन जागृती सर्व थरांवर चालू होती.

त्यासाठीच ” प्रपंच ” या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली. शहरातून, खेडेगावातून, वस्त्यांवर, ग्राम पंचायतीच्या अंगणात अगदी उघड्यावर याचे प्रक्षेपण केले जात होते. मोफत असल्याने खुप गर्दी होत  असे.

या चित्रपटात काम करणारे कलाकार अस्सल काळ्या मातीतले होते. सुलोचनाताई, श्रीकांत मोघे, सीमा असे सर्वांचे आवडते कलाकार होते.

एकापेक्षा एक सुंदर गाणी हे या चित्रपटाचे वैशिष्ट्य.कारण गीतकार ग.दि.माडगूळकर, संगीतकार आणि गायक सुधीर फडके, अणि गायिका आशा भोसले.

“बैलं  तुजं हरना वानी, गाडीवान दादा ” म्हणत फेटा बांधून बैलगाडी हाकणारी आणि “आला वसंत देही मज ठाऊकेच नाही ” म्हणत मक्याच्या शेतातून उड्या  मारत धावणारी चंपा म्हणजेच सीमा,” साळु होता कष्टाळू बाळू आपला झोपाळू” म्हणत मुलांबरोबर खेळणारा शंकर म्हणजे श्रीकांत मोघे.

त्याचे दादा वहिनी गरीब कष्टाळू, देवभोळे साधे  कुंभार काम करणारे जोडपे. ” फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार विट्ठला तू वेडा कुंभार” म्हणत विट्ठलावर संसाराचा भर सोपवुन जगणारे. त्या विट्ठलाचीच कृपा समजुन दर वर्षी पाळणा रिकामा राहू न देणारे ( त्या काळचे प्रातिनिधिक) जोडपे.

विट्ठला तू वेडा कुंभार हे गाणं इतकं प्रसिद्ध झालं आणि ते चित्रपटातलं गाणं आहे की संतांचा अभंग? असं वाटावं..

त्यातील आणखी एक सुप्रसिद्ध गाणं, त्यावेळी फारसं न उमजलेलं, पण आयुष्यात नंतर वेळोवेळी नवीन प्रकारे अनुभवाला येणारं, आणि  1961 सालापासून आज 2020 च्या

“कोरोना” काळापर्यंतच्या परिस्थितीला धरुन असणारं, आजही देवाचा धावा करून त्याच्याकडे मागणं करणारं गाणं म्हणजे ” पोटापुरता पसा पाहिजे नको पिकाया पोळी

देणा-याचे हात हजारो दुबळी माझी झोळी” किती साधे सोपे शब्द…पण  गदिमांच्या लेखणीच्या परिस स्पर्शाने ते अजरामर झाले आहेत.

“देवा, माजं लई मागणं न्हाई, पोळी नगं….भुकेपुरता पसाभर घास मिळू दे. शेतातल्या पिकाला गरज असेल तेव्हा आणि गरज असेल तितकाच पाऊस पडू दे. जेवढी चोच तेवढाच दाणा ही काळी आई देवो. एकवेळच्या भुकेला अन्न लागतं तरी किती?….तळहाताच्या खाळी एवढं, ओंजळभर! तेवढंच मिळू दे. माथ्यावरती छाया देणारं छप्पर आणि अंग झाकण्या पुरती वस्त्रे मिळावीत, इतकच देवा मागणं!

देवा, सोसवेल आणि पेलवेल तितकच सुख आणि दु:ख दे.

माझा कसलाच हट्ट नाही, कारण “तो देणारा हजारो हातानि  भरभरुन देईल….पण  माझी झोळी दुबळी.

सर्व सामान्य माणूस, मग तो आर्थिक दृष्टया कमी असो, मध्यम असो वा श्रीमंत असो, आयुष्य भर काम,क्रोध,लोभ,मद, मत्सर माया  ह्या षड्रिपूंच्या संगतीत असतोच. त्याच बरोबर व्यायसायिक स्पर्धा, वैयक्तिक स्पर्धा, न पेलवणारी स्वप्ने, अपेक्षा या सर्वांवर तारेवरचि कसरत करत वयाच्या 55 वर्षाला पोचला की थोडासा अंतर्मुख होतो. न कळत त्याचा कल अध्यात्माकड़े झुकतो अणि सत्य समोर येतं,

“देणा-याचे हात हजारो दुबळी माझी झोळी ”

असं जीवनाची bottomline असलेलं गाणं आता फारसं ऐकायला मिळत नाही. पण  आठवण येते तेव्हा मन शब्दां भोवती आणि त्याच्या अर्था भोवती रेंगाळतंच. हे रेंगाळणं खुप सुखकारी असतं.

अगदी साधे गुंफलेले शब्द,

“किमान” किंवा “कमीत कमी” या शब्दान्चं किती सुंदर रूप……!

केवळ एक वेळच्या भुके इतकाच घास मिळावा, कारण देणा-याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी… मातीतून जन्म घेतलेले, आकाशाला जाऊन भिडणारे आणि परत मातीत येउन मिळणारे, आणि “अपुरेपण ही न लगे, न लगे पस्तावाची पाळी”  असे सत्यं शिवम सुंदरं ची प्रचीती देणारे शब्द.

मराठी माणसांच्या ह्रदयात,  जेथे पवित्र आणि सुंदरतेचा वास असतो तेथे, गदिमांचे स्थान अढळ आहे.

“ज्ञानियाचा वा तुकयाचा

तोच माझा वंश आहे

माझिया रक्तात थोडा

ईश्वराचा अंश आहे”

असे म्हणणारे गदिमांची लेखणी खरोखरच दैवी होती. शेकडो गाणी त्यांनी रसिकांना दिली. तमाशाच्या फडात, देवळात, शाळेत, तरुणांच्या गळ्यात, माजघरात, देवघरात, शेतमळ्यात, विद्वानांच्या सभेत, सर्वत्र त्यांच्या गाण्यांचा संचार आहे. कविता जन्म घेते आणि  शब्द उतरू लागताच  स्वर त्या शब्दांना मिठीत घेतात, तेव्हा त्या कवितांचे एक सुंदर गीत होतं, अशी अगणित गाणी आज 43 वर्षांनंतर सुद्धा चुकून ऐकायला मिळाली कि, nostalgic व्हायला होतं.

त्यातलंच हे एक अजरामर गाणं “देणा-याचे हात हजारो दुबळी माझी झोळी”.

14 डिसेंबर हा दिवस गदिमा ह्या गीतरामायणकार महाकविच्या निर्वाणाचा.  त्यांच्या स्मृतीला अभिवादन. 🙏🏻

© सौ अमृता देशपांडे

पर्वरी- गोवा

9822176170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈
मराठी साहित्य – काव्यानंद ☆ माहेर…..ग. दि. माडगुळकर ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित

श्री सुहास रघुनाथ पंडित

☆ काव्यानंद ☆ माहेर…..ग. दि. माडगुळकर ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ 

Best Bhojpuri Video Song - Residence w

जन्म नाव: गजानन दिगंबर माडगूळकर

टोपणनाव: गदिमा

रसग्रहण:

शाळेतील विज्ञानाचा किंवा भूगोलाचा तास आठवतो का? मग जलचक्रही आठवत असेल. पाण्याची वाफ होऊन पाऊस पडणे आणि हाच क्रम पुनः पुन्हा होत रहाणे म्हणजे जलचक्र. आठवतंय ना? पण हे असं रूक्ष भाषेत समजावून सांगण्यापेक्षा थोड्या अलंकारीक, काव्यात्मक भाषेत सांगितलं तर? विज्ञान आणि तेही काव्यातून ? कठीण वाटतं ना ? पण जो कल्पना विश्वावर राज्य करीत होता आणि शब्द ज्याला मुजरा करीत होते असा एक महाकवी या महाराष्ट्रात होऊन गेला.त्याचं नांव गजानन दिगंबर माडगूळकर म्हणजेच आपले गदिमा ! त्यांनी हा चमत्कार करून दाखवला आहे. हा चमत्कार म्हणजेच आजची त्यांची ‘माहेर’ ही कविता अर्थात ‘नदी सागरा मिळता’.

नदी पर्वतातून उगम पाऊन वाहत येते व शेवटी सागराला जाऊन मिळते. त्यामुळे  पर्वत, डोंगर हे तिचे माहेर. ज्याला सर्वस्व अर्पण केले तो सागर तिचा पती. तेच तिचे सासर.ती काही तेथून परत येऊ शकत नाही. म्हणजे तिचे माहेर कायमचे तुटलेच असे म्हणावे लागते. पण हे झाले तुमच्या आमच्या सामान्य लोकांसाठी.कवीची दृष्टी एवढी मर्यादीत असत नाही. शब्दांचे पंख लेऊन कल्पनेच्या विश्वात रसिकांना घेऊन जातो तोच खरा कवी. त्यामुळे नदीचे माहेर तुटले हेच कविला मान्य नाही. कवी काय म्हणतो पहा.

सागर नदीचे अवघे जीवन पोटात घेतो पण नदीला मात्र तिच्या पित्याची, डोंगराची आठवण येत असतेच. कसे भेटावे त्याला ? कसे जावे माहेराला ?

माहेरच्या  भेटीची ओढ पूर्ण करण्यासाठी मग ती वाफेचे रूप घेते. वार्याचे पंख लावते आणि मेघांच्या ओंजळीतून पावसाची सर बनून डोंगराच्या पोटी जन्म घेते. वाळे वाजवत वाजवत पुन्हा अवखळ पणे वाहू लागते.शेवटी परत सागराला येऊन मिळते आणि कवीचे जलचक्र पूर्ण होते.

नदी ,डोंगर,सागर……

स्त्री,  माहेर,सासर.

एक रूपकात्मक काव्य. स्त्री सासराशी एकरूप झाली  तरी माहेर कसं विसरेल ? माहेरी जाण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती तिला माहेरी घेऊन जातेच. अगदी नदीप्रमाणे.आणि चार दिवस माहेरपण करून आल्यावर आपोआप सासरची वाट धरते. नदीप्रमाणेच. वर्षानुवर्षे हेच चालत आलय. जीवन चक्र आणि जलचक्रही. खरंच आहे. जीवन म्हणजेच जल ना ?

‘सारे जीवन  नदीचे घेतो पोटात सागर’

या ओळीत कविला जीवन म्हणजे आयुष्य आणि नदीचे पाणी अशा दोन्ही अर्थानी तर हा शब्द वापरायचा नसेल ना असे वाटते.

वार्याचे पंख लावून नदी तरंगत तरंगत डोंगराकडे जाते.अगदी तसच, माहेरच्या वाटेवर असतानाच स्त्री मनाला पंख लावून केव्हाच माहेरी पोहोचलेली असते.

कवी म्हणतो, नदी माहेरी जाते, म्हणून जग चालते. माहेरपणाच्या उर्जेवर स्त्री सासरी पुन्हा रमून जाते,असं कविला सुचवायच आहे,असं वाटतं.

असं हे जलचक्र!काव्यानंद देता देता विज्ञान सांगणारे ,गदिमां च्या प्रतिभेचा साक्षात्कार घडवणारे .

खरंच, जेथे गदिमा तेथे प्रतिभा.!

©  श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈