मराठी साहित्य – क्षण सृजनाचे ☆ जीवनपट… ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी ☆

सुश्री दीप्ती कुलकर्णी

? क्षण सृजनाचे ?

☆ जीवनपट… ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी ☆

माझे वडील संस्कृत चे माध्यमिक शिक्षक व गाढे अभ्यासक होते. जुन्या अकरावीचे संस्कृत व पी.टी. घेत. करवीर पीठात त्यांनी उत्तम अध्ययन केले. त्यांना पीठाचे शंकराचार्य पद स्वीकारा म्हणत होते पण घरच्या जबाबदाऱ्या मुळे त्यांनी ते स्वीकारले नाही. वृद्धत्वात ते थोडे विकलांग झाले नि ते पाहून मला ही कविता स्फुरली‌.

 – दीप्ती कुलकर्णी

☆ जीवनपट… ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी ☆

जीवनाच्या या पटावरी

कितीतरी प्यादी येती जाती

माझे,माझे म्हणती सारे

फोलता हि नच ,कुणा ही ठावे

क्षणभंगुरता कळेल का परी

उरते अंती मृत्तिका जरी

यात्रिक सारे सममार्गावरी

नियतीचीही मिरासदारी

नियतीचीही सर्व खेळणी

कुणा छत्र,कुणी अनवाणी

श्वासासंगे श्वास येई रे

दुजा न कोणी सांगाती

जीवनाच्या या पटावरी

कितीतरी प्यादी येती जाती ||

© सुश्री दीप्ति कुलकर्णी

हैदराबाद

मो.नं. ९५५२४४८४६१

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – क्षण सृजनाचे ☆ घड्याळ गणित… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? क्षण सृजनाचे ?

☆ घड्याळ गणित… ☆ श्रीशैल चौगुले ☆  

भगवद्गिता  ज्ञानेश्वरीतील “सांख्ययोग” या अध्यायात  हेच तर ज्ञानसूत्र फक्त अंकशास्त्राऐवजी तत्वसिध्दांताद्वारे सांगीतले गेले आहे.

आपण सगळे वेळेच्या बंधनात हे कर्म करीत असतो.प्रत्येक घडणार्या क्रिया ठरलेल्या वेळेनुसार एक जीवनाचे गणितीय सिध्दांतानुसार फिरत असते. पंचमहाभूते आणि हे त्रिगुणातीत सजीव घड्याळ भगवंताचे एक सांख्यीकिय कालगतीचे चक्र आहे. जिथे मृत्यू हा नाहीच. फक्त आत्मा एक देह सोडून दुसर्या देहात प्रवेश करतो. जसे घड्याळातील वजाबाकीचे उणे होत जाणारे काटे परत बेरजेतून तासात मोजतो तसे.🙏

☆ घड्याळ गणित… ☆ श्रीशैल चौगुले ☆

यालाच म्हणतात वेळ

यालाच म्हणावे गणित.

यातच आयुष्य नि वय

सरते सुख-दुःखी नित.

बेरजेचे ऊत्तर एक

वजाबाकी उणे प्रत.

आडवे समान उत्तर

वेळ  समांतर गत.

सेकंद मिनीट तास

अंकांचे गुपीत द्युत.

घडती फेर्यांचे चक्र

प्रभात-संध्येचे रथ.

ड्याळ बुध्दि प्रमाण

जीवन तैसेची पथ.

कर्म फळ नि भोगांचे

अंतर जन्मांचे नत.

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – क्षण सृजनचा ☆ माझी फुलराणी ☆ श्री सोमनाथ साखरे ☆

?  क्षण सृजनचा ?

☆ माझी फुलराणी ☆ श्री सोमनाथ साखरे ☆  

काही दिवसांपूर्वी माझ्या मैत्रिणीच्या मुलीचा विवाह सोहळा संपन्न झाला. आईची सखी बनून राहिलेल्या लाडक्या लेकीच्या आठवणीने व्याकुळ झालेल्या आईने (लेकीसाठी) मला तिच्या मनातील भावना कवितेत शब्दबद्ध करण्याचा आग्रहवजा विनंती केली आणि

“माझी फुलराणी” ही कविता अवतरली…..

☆ माझी फुलराणी ☆

तुज लाडाची लेक म्हणू की

प्रिय सखी तू माझी गं…

विरह तुझा साहण्या अजुनी

मन माझे ना राजी गं…

 

अजून आठवे विवाह वेदी

सनई, चौघडे गाणी गं…

क्षणाक्षणाला तुझी आठवण

डोळ्यामध्ये पाणी गं…

 

नको करू तू इथली चिंता

कुशल मंगल सारे गं…

संसार तुझा कर सुंदर आता

हो राजाची राणी गं…

 

नवं नात्यांची मांदियाळी

मधुर ठेव तू वाणी गं…

दोन कुळांचे तूच भूषण

ठेव सदा तू ध्यानी गं…

 

आनंद,सुखाची बाग फुलू दे

हास्य निरागस वदनी गं…

आशीर्वाद मम नित्य तुझ्यावर

तू माझी “फुलराणी” गं…

 

©  सोमनाथ साखरे,

नाशिक.

९८९०७९०९३३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – क्षण सृजनाचे ☆ सप्तपर्णी…. ☆ श्री विजय गावडे

श्री विजय गावडे

? क्षण सृजनाचे ?

☆ सप्तपर्णी…. ☆ श्री विजय गावडे ☆  

दोनेक महिन्यापूर्वी मोहोराने भारलेले सातिवनाचे (सप्तपर्णीचे) डेरेदार वृक्ष आता मुंडावळ्यागत लोम्बणाऱ्या शेंगानी लगडलेत.  फळेच्छुक इतरही वृक्षवल्ली आपापल्या तान्हूल्या फळांचे लाड करतांना दिसताहेत.  वने आणि मने दोन्ही प्रफूल्लीत करणारी हि निसर्ग किमया आपसूकच कवितेत उतरते ती अशी

 

सप्तपर्णी

 

शेंगाळले सातिवन

वने झाली आबादान

रायवनातून घुमे

काक – कोकीळ कुंजन

 

कानी घुमतो पारवा

अंगी झोंबतो गारवा

गार गार वाऱ्यातून

मंद सुगंध वहावा

 

फुले कोमेजून आता

फळे सानुली रांगती

जंगलाच्या राऊळात

गोड अंगाई झडती

 

कोण फळानी बहरे

कोणी  लगडे शेंगानी

निसर्गाचं जसं देणं

घेई धरती भरुनी

 

भारावून वेडे पक्षी

गाती सुरात कवने

रानी वनि जणू भरे

गितस्पर्धा आवर्तने

 

मात करुनी असंख्य

निसर्गाच्या कोपांवर

दिसा मासी सावरे

धरणीमायेचा पदर

 

उठा आतातरी गेली

गत वरसाची खंत

घेऊ भरारी नव्याने

आसमंत ये कवेत.

 

© श्री विजय गावडे

कांदिवली, मुंबई

मो 9755096301 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – क्षण सृजनाचा ☆ आठवणीतला हळदुल्या ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी

सुश्री तृप्ती कुलकर्णी

अल्प परिचय
ग्राफिक डिझायनर आणि साहित्यिक सल्लागार, पुणे

☆ क्षण सृजनाचा ☆ आठवणीतला हळदुल्या ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆ 

काही दिवसांपूर्वी एक हळदुल्या रंगाचा पक्षी आमच्या बाल्कनीत येऊन छानपैकी गोडगोड शिळ वाजवत बसायचा. अगदी नेमानं ठरल्यावेळी यायचा, गाणं गायचा आणि जायचा. बऱ्याचदा मी तेव्हा वाचत बसलेली असायचे. पण त्याचं गाणं सुरु झालं की माझं वाचन थांबायचं आणि नकळत त्याच्याबद्दल विचार चालू व्हायचे…  तो इथंच का येतो…  कुणासाठी येतो…  बरं आला तर त्याच्यासाठी  टाकलेले दाणेही खायचा नाही. नुसताच फाद्यांवर झोके घेत बसायचा आणि गाऊन निघून जायचा. 

माझ्या चाहूलीने त्याची गानसमाधी भंग पावू नये म्हणून मी तिथं जाऊन त्याचा फोटो काढण्याचा आणि  व्हिडिओ करण्याचा मोह टाळला. फक्त एकदाच हळूच दाराच्या फटीतून त्याची ओझरती झलक पाहिली. अतिशय सुंदर तेजस्वी असा पिवळा रंग पटकन नजरेत भरला. पक्षी चिमुकला खरा पण सौंदर्य केवढं! अजून जवळ जाण्याचा प्रयत्न केला पण तेवढ्या चाहुलीने तो उडाला आणि दूर लपून बसला. जेव्हा मी दार बंद करून माझ्या जागेवर येऊन बसले तेव्हा तो परत फांदीवर येऊन बसून गाऊ लागला. 

मग मी काही मिनिटांचं त्यांचं असणं फक्त अनुभवायचं ठरवलं. त्याची गाण्यामागची आंतरिक उर्मी काय असेल याचा विचारही मी सोडून दिला. डोळे बंद करून फक्त ऐकत राहिले. त्या सुरांचा कानोसा घेत राहिले. 

हळूहळू मनातच त्या गाण्यात कुठले शब्द बसतील, ते सूर विरहाचे की आनंदाचे, तो पक्षी पूर्णपणे कसा दिसत असेल अशी कल्पना चित्रं रंगवायला लागले. रोज पंधरा-वीस मिनिटं मी मनातल्या मनात रानावनात जाऊन वेगवेगळ्या पिवळ्या रंगाच्या पक्षांचा शोध घ्यायला लागले‌. उगाचच, काही कारण नसताना‌… ती पंधरा मिनिटं मला हिरव्या-पिवळ्या रंगाची वेगळीच दुनिया दाखवणारी ठरली. कधी प्रत्यक्षात बघितलेले झाडांच्या दाटीवाटीत बसलेले पक्षी, कधी चित्रपटातले, तर कधी इंटरनेटवर बघितलेले व्हिडिओ त्यातले सगळे फक्त पिवळ्या रंगाचे पक्षी आठवण्याचा प्रयत्न करू लागले. आणि काय गंमत, हे आठवताना फक्त पक्षीच नव्हे तर कितीतरी वेळा नदीचा काठ, निळं आकाश, रंगीत फुलं, हिरव्यागार फांद्या असंही काहीबाही दिसू लागलं. अर्थातच खूप छान निवांत असं वाटत होतं. मग मी माझ्या या अवस्थेला एक नाव देऊन टाकलं… ‘हळदुली समाधी’.   

आणि मग काही दिवसांनी तो यायचा अचानकच बंद झाला. सुरुवातीला दोन-तीन दिवस थोडी हूरहूर वाटली पण मग ठरवलं याला आठवणीत बंदिस्त करावा आणि म्हणूनच त्या पक्षाने मला काय काय दाखवलं ते मी या कवितेत मांडलं——-

हळदुल्या…

एय, हळदुल्या रंगाच्या पक्ष्या 

आमच्या अंगणात येऊन 

तू नेहमी नेहमी गातोस काय

खरं सांग, हळदुल्या तुझं आमचं नातं काय

 

शेवंतीच्या फांदीवर बसून मस्त झोके घेतोस 

हिरव्या हिरव्या पानांशी दंगामस्ती करतोस

खरं सांग कशासाठी, कोणासाठी तू इथं येतोस 

आणि इतकं गोड गाणं पुन्हा पुन्हा गातोस

खरं सांग हळदुल्या…

 

दवं भरलेल्या झाडांना आताशी जाग येते आहे

इवल्या इवल्या फुला-पानांवर ऊन कसं डुलतं आहे 

इतका उंच उडतोस तरी तुला दिसत नाही काय

चमचमत्या चांदण्याचाही अजून निघेना इथून पाय 

खरं सांग हळदुल्या… 

 

असा कसा तू आगंतुकपणे उडत उडत येतोस 

इथल्या पानाफुलांशी आपलं नातं जोडतोस 

इथल्या मऊ मातीशी कसलं हितगूज करतोस

तुझ्या गोड गाण्यासाठी सूर तिचे घेतोस काय 

खरं सांग हळदुल्या… 

 

जाईजुईचा वेल कसा वर वर चढतो आहे

चाफ्याच्या फुलाशी खूप गप्पा मारतो आहे

गुलाबाच्या कळीला खोल खळी पडली आहे

एक भुंगा कसा बघ तिच्याभोवती फिरतो आहे

खरं सांग हळदुल्या… 

 

उंच उंच फिरण्याची तुला कित्ती कित्ती हौस 

पण मातीत खेळणाऱ्या पानांची करतोस भारी मौज 

त्यांचा पिवळा रंग पिऊन तु पिवळा होतोस काय 

खरं सांग हळदुल्या– तुझं आमचं नातं काय

आमच्या अंगणात येऊन तू नेहमी नेहमी गातोस काय——-

 

©  सुश्री तृप्ती कुलकर्णी

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – क्षण सृजनाचे ☆ तालीबानी….! ☆ श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

? क्षण सृजनाचे ?

☆ तालीबानी ……! ☆ श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

अध्या अफगाणिस्तानातील सत्तांतर आणि तालिबानी राजवटीची पुनर्स्थापना हा माध्यमासाठी अग्रक्रमाचा विषय आहे.तालिबानी ही एक वृत्ती असून स्त्रियांच्या हक्काबाबत ते कमालीचे प्रतिकूल आहेत हे सर्वानाच माहीत आहे, आणि त्यावर चर्चा ही खूप केली जाते. तालिबानी वृत्ती ही खरेच वाईट आहे यात वाद नाही पण यावर चर्चा करणारा आपला पांढरपेशा वर्ग तरी खऱ्या अर्थाने महिलांच्या  बाबतीत उदारमत वादी आहेत काय? अनेक पुरुषांचे याबाबत खायचे नी दाखवायचे दात निराळे असतात. महीलांचे शोषण हा त्यांचा स्थाईभाव असतो. शिक्षणाने ही तो कमी होत नाही. मग असे वाटते काय त्या तालिबानी वृत्तीवर टीका करता? तुमच्या मनातील स्त्रियांबद्दल असलेले विचार तालिबानी वृत्तीचे नाही काय? याच विचारातून ही कविता मला स्पुरली, शब्दांकित झाली.

“तालिबानी !”

काय शोधतो रे तालिबानी अरबस्थानात

अरे बघ बसलाय तो तुझ्या मनात

 

पत्नी तुझी तुझ्याहून अधिक शिकली, रुतते ना मनास,

पोरगी अन्य धर्मीय,जातीय,विवाह रचते

हात उठतो का आशीर्वाद देण्यास.

 

काय शोधतो तालिबानी…..

 

देतोस समर्थन स्वधर्मिय हिंसाचारास

बघतो तिरस्काराने अन्यधर्मिय सेवाकार्यास,

कोरोना ग्रस्ताच्या सेवा कार्यातही खातो मलिदा

भिनलाय स्वार्थ कणाकणात

काय शोधतो………

 

खरंच मुलीच्या जन्माचा आनंद होतो का मनास

स्त्री भ्रूण हत्ये चा पश्र्चाताप ही नाही जनास

लपून केले गर्भजल परीक्षण,

अपराध न वाटे कुणास

स्त्री जन्मास स्त्री कशी रे कारणी

काय अर्थ रे शिक्षणास.

काय शोधतो……….

 

स्त्री देहाप्रती स्वापदासंम नजर तुझी,सोडेना रक्त संबंधांस

वरून सोंग तुझे निरागसाचे

वासना लाजविते वयास

काय शोधते…………

 

हुंड्यासाठी जाळतो सुनेला, ताडन पशुसंम  गृहलक्ष्मीला

तुजहून बरा तो तालिबानी

उघड दिसे हो अवतार खरा

काय शोधतो…….

 

© श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

चंद्रपूर,  मो. 9822363911

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – क्षण सृजनचा ☆ कविवर्य ग्रेस ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित

श्री सुहास रघुनाथ पंडित

☆ क्षण सृजनचा ☆ कविवर्य ग्रेस ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ 

Grace IMG 1263.jpeg

जन्म नाव – स्व माणिक सीताराम गोडघाटे टोपणनाव – ग्रेस

(जन्म – १० मे, १९३७ नागपूर   मृत्यु – २६ मार्च, २०१२ पुणे)

झाली म्हणजे किती पटकन प्रसन्न होते.नाहीतर एकदा का रूसली की रूसलीच. कवितेच हे असच आहे.

26 मार्च. म्हणजे कविवर्य ग्रेस यांचा स्मृतिदिन. त्यांच्यावर आलेले लेख,व्हिडिओ पाहणे चालू होते. काही नवीन माहितीही मिळाली त्यांच्याबद्दल.  वाचणे चालू होतेच. पण त्यांच्या गूढगर्भात्मक कवितांच्या ओळी मनातून जात नव्हत्या. जे लेख वाचले त्यातही गूढता, दुःख यांचा उल्लेख होताच. आणि तरीही त्या कविता वाचू नयेत अस कोणालाच वाटत नव्हतं. अगम्यतेच आकर्षण. समजो न समजो, पुन्हा वाचाव्यात अशा कविता. नकळतपणे आपण गुंतत जातो त्यांच्यात. वाचलेल्या कविता, त्यांची झालेली गीते, सगळं कानाना ऐकू येऊ लागल आणि नकळतपणे मनात गुणगुणलो,

गूढ तुझ्या शब्दांची जादू

मनात माझ्या अशी उतरते…

आणि पुढचं कसं  सुचत गेलं, मलाही ठाऊक नाही. ती ही कविता, तुम्हांसाठी सादर.

☆ कविवर्य ग्रेस ☆

गूढ तुझ्या शब्दांची जादू

मनात माझ्या अशी उतरते

चांद्रनील किरणांच्या संगे

संध्येची जशी रजनी होते

 

कळू न येतो अर्थ जरी,पण

दुःखकाजळी पसरे क्षणभर

खोल मनाच्या डोहावरती

कशी होतसे अस्फुट थरथर

 

सोसत नाही असले काही

तरी वाचतो पुनः नव्याने

डोलत असते मन धुंदीने

हलते रान जसे वार्याने

 

ग्रेस,तुझ्या त्या काव्यप्रदेशी

माझे जेव्हा येणे झाले

जखम न होता कुठे कधीही

घायाळ कसे , मन हे झाले

 

संपत नाही जरी इथले भय

शब्दचांदणे उदंड आहे

त्या गीतांच्या स्मरणा संगे

दुःख सहज हे सरते आहे

साभार चित्र  – माणिक सीताराम गोडघाटे – विकिपीडिया (wikipedia.org)

©  श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – क्षण सृजनाचे ☆ जगू नव्याने… ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे

सौ.ज्योत्स्ना तानवडे

☆ क्षण सृजनाचे ☆ जगू नव्याने… ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆ 

काही दिवसांपूर्वी आमच्या ज्येष्ठ नागरिक संघाच्या व्हाट्सअप ग्रुपवर एक व्हिडिओ आला. तो पाहून त्यावर कोणाला काय सुचते ते कवितेच्या स्वरूपात लिहा,असा मेसेज दिला होता.

जवळपास ७५ वर्षानंतर भेटणाऱ्या दोन वृद्ध मैत्रिणी. त्यांचे वय असेल ८०-८५ च्या घरात. शाळेत बालपणी एकत्र खेळल्या, बागडलेल्या मैत्रिणी. इतक्या वर्षांनी भेटल्यावर ‘काय करू अन् काय नको ‘ असे त्यांना झालेले. पण पाठीची कमान झालेली, हातात काठी, तोंडाची बोळकी. उत्साहाने भरभरून आनंद व्यक्त करायला तेवढी शारीरिक क्षमता नाही. पण सतत तोंड भरून हसत हसत पुन्हा पुन्हा हातात हात धरणाऱ्या ‘त्या ‘ मैत्रिणीं ची सगळी देहबोली आनंदाने फुलूनआली होती.

हे चित्र पाहिल्यावर झटकन मन पन्नास-पंचावन्न वर्षे मागे गेले.आठवले ते शाळेतले सुंदर, फुलपाखरी दिवस. शाळेची ती छोटीशी टुमदार इमारत. तिच्या पुढे- मागे मोठी मैदाने. त्यावर खेळणाऱ्या, धावणाऱ्या, चिवचिवणाऱ्या अनेक मैत्रिणी. वेगवेगळे खेळ,वेडी गुपिते, रुसवेफुगवे, मनधरणी आठवून हसू आले.त्यावेळच्या सगळ्या गोड, रम्य आठवणींनी  मनात फेर धरला आणि मनाच्या आतल्या खोल कप्प्यातून शब्दांची लड झरझर उलगडत गेली.व्हिडिओतल्या ‘ त्या ‘ दोन वृद्ध जीवांना जणू नवसंजीवनी मिळाली आणि ते पाहून त्या  निष्पाप निरागस मैत्रीने शब्द रूप घेतले.

☆ जगू नव्याने… ☆

बालपणीच्या दोन सख्या

कित्येक वर्षांनी भेटल्या

एकमेकींना बघताच

खळाळून हसत सुटल्या ||

 

डोईवरी रूपेरी कापूस

तोंडाची झाली बोळकी

हसत हसतच दोघींनी

एकमेकींना दिली टाळी ||

 

ओळखलंच नाही बघ

किती बाई बदललीस!

मला म्हणतेस बयो,

तू कुठं पहिली राहिलीस ?

 

कशा होतो ग आपण

नाजुकश्या कळ्या सुंदर !

एकेक पाकळ्या गळत गेल्या

आयुष्य आहे मोठं बिलंदर ||

 

किती खेळलो भांडलो

रोज नवीनच खोडी !

अजूनही आठवते बघ

चिमणीच्या दातांची गोडी ||

 

कमा, सुमा, नंदू, रंजू

पुन्हा कोणी भेटलेच नाही !

प्रत्येकीची कहाणी वेगळी

ढाचा मात्र एकच राही ||

 

फुलपाखरापरी स्वच्छंदी

माहेरघरात वावरलो !

सासरची रीतच न्यारी

प्रत्येक गोष्टीत बावरलो||

 

भलेबुरे अनुभव घेतले

दुसर्‍यांसाठीच धावलो !

अजूनही झोळी रिकामीच

आधारावरच राहिलो ||

 

जाऊ दे सये,विसर सारं

पुन्हा नव्यानेच भेटूयात !

होय ग बयो,दोघी मिळून

संध्या गीत गाऊयात ||

 

© सौ. ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – क्षण सृजनचा ☆ रिडेव्हलेपमेंट.. ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆

सौ. गौरी सुभाष गाडेकर

 ☆ क्षण सृजनचा ☆ रिडेव्हलेपमेंट.. ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆

गेल्या काही वर्षांपासून मुंबईत इमारतींच्या रिडेव्हलपमेंटची लाट आली आहे.

जुन्या इमारती बिल्डर ताब्यात घेतात. त्या पाडून त्याजागी उंच इमारती  बांधतात. जुन्या रहिवाशांना पूर्वीपेक्षा जास्त क्षेत्रफळाचा फ्लॅट दिला जातो. उरलेले फ्लॅट बाहेरच्या माणसांना विकतात.

इमारत तयार होईपर्यंत तीन-चार वर्षं तरी जातात. तेवढ्या अवधीतील तात्पुरत्या निवासासाठी, जुन्या रहिवाशांना भाड्याची रक्कम दिली जाते.

आमच्या जवळची एक इमारत रिडेव्हलपमेंटला गेली. जुने रहिवासी मिळाला तो फ्लॅट भाड्याने घेऊन तिथे राहू लागले. नवीन इमारत तयार होण्याची वाट बघत.

इमारत पाडली. नवीन इमारतीच्या बांधकामाला सुरुवात झाली. आणि अचानक बांधकाम बंद  पडलं. कोर्टकचेऱ्या, स्टे वगैरेंच्या भोवऱ्यात सापडून सगळं काही ठप्प झालं. हळूहळू बिल्डरकडून भाड्याचे चेक मिळणंही बंद झालं.

आठ-दहा वर्षं अशीच गेली. भाड्याच्या फ्लॅटचं नूतनीकरणही कठीण  होऊ लागलं. एकाच फ्लॅटमध्ये दोन-तीन वर्षांपेक्षा जास्त काळ राहायला द्यायला फ्लॅटचे मालक का-कू करू लागले. मग पुन्हा नवीन फ्लॅट शोधणं, सामानाची हलवाहलव वगैरे  व्याप.

या सर्व घडामोडींवरून मला ही गझल सुचली. एका स्ट्रक्चरल विषयावरील कविता स्ट्रक्चर्ड फॉर्म असलेल्या गझलमध्ये सुचावी, हा एक योगायोग.

कविता सुचली अशी :

 ☆ रिडेव्हलपमेंट ☆

एक होती कॉलनी ती, नांदती तेथे घरे

लिंबलोणही झुलत होता,गात होती पाखरे

 

दाखवी आमिष कोणी, खैरातली आश्वासने

कित्येक होते फायदे, फसवे किती काही खरे

 

झाला विरोधही तिडकीने संख्याच जिंके शेवटी

लोकशाहीचा नियम हा सत्य ते नेहमी हरे

 

गुंडाळूनी संसार सारे घेतले पाठीवरी

पांगले दाही दिशांना,सोडून गेले आसरे

 

कोण जाणे काय झाले ठप्प झाले बांधणे

गगन चुंबाया निघाले -स्वप्न होई  लत्करे

 

भोवताली पूर्ण झाली गगनचुंबी ती घरे

भोग भाळी आमुच्या का, का प्रतीक्षा सांग रे

 

लोटली कित्येक वर्षे फक्त सांगाडा उभा

एक सांगाडा उभा अन सोबतीला चौथरे

 

लागला डोळा दिसू अंत आता जीवनाचा

श्वास सरू दे ‘त्या’ घरी हीच आता आस रे

 

© सौ. गौरी सुभाष गाडेकर

संपर्क –  1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – क्षण सृजनाचा ☆ तसदी (कविता) ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

☆ क्षण सृजनाचा ☆ तसदी (कविता) ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ 

सृजनाचा क्षण कधी कुठे उगवेल हे खरंच सांगता येणार नाही. दुसऱ्या दिवशी अँजीओप्लास्टी करायची ठरल्याने मी आदल्या दिवशी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते. स्पेशल रूम मिळाली नाही म्हणून मला जनरल वार्ड मध्ये दाखल केले गेले. गच्च भरलेला तो मोठा हॉल….. जवळ जवळ मांडलेले बेडस, पेशंटसोबत असणाऱ्याला बसायला एक स्टूल एवढीच सोय. इतक्या लोकांसाठी फक्त २-३ नर्सेस आणि २ वॉर्ड बॉय. साहजिकच नर्सेसची धावपळ आणि जोडीला चिडचिड .. वॉर्डबॉयचा हाकांकडे शक्यतो दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न…. स्वतःला नेमकं काय झालंय आणि काय करणार आहेत हे न कळल्याने घाबरलेले पेशंट, आणि डॉक्टरांशी नेमकं काय बोलायचं हे कळत नसल्याने बावरलेले, उपचारांसाठी पैसे कसे कुठून उभे करायचे ही मोठीच चिंता चेहेऱ्यावर सतत बाळगणारे नातेवाईक… भीती, चिंता, हतबलता, नैराश्य अशा-सारख्या भावनांनी तिथलं सगळं वातावरण व्यापून टाकलं होतं…….. संध्याकाळी रूम मिळाल्याने मला तिथे शिफ्ट केलं आणि ते हॉस्पिटल म्हणजे फिरता रंगमंच आहे असं वाटलं …..७-८ खोल्यांसाठी ४-५ नर्सेस, ३ वॉर्डबॉय, वरचेवर खोलीची साफसफाई, परीट -घडीच्या चादरी, सोबत आलेल्याला वेगळा बेड …… लागूनच असलेल्या सुपर स्पेशल खोल्यांची ऐट तर आणखी कितीतरी जास्त …… परिस्थितीची ही दोन टोकं पहाताना मनात दाटलेली ही कविता……उठून बसायला परवानगी नसल्याने, गुडधा उभा करून, त्यावर कागद ठेवून अक्षरशः कशीतरी खरडलेली…

☆ तसदी ☆

भेदभाव मुळी नसतो म्हणती

कधीही त्या भगवंत कृपेला

दीन नि धनवंतांना त्याचा

न्याय एकची ठरलेला ………

 

खरे न वाटे मला कधी हे

अवतीभवती जग हे बघता

कुठे पूर पैशाचा नि कुठे

गरिबीला ती नाही तृप्तता……..

 

कुठे शिंकला श्रीमंत तरी

दहाजण पहा जाती धावत

आणि कोठे रस्त्याकाठी

कोणी मृत्यूशी त्या झुंजत ……

 

कितिकांना फसवूनही येथे

गणले जाती किती मान्यवर

घाम स्वतःचा गाळूनही पण

कितीकांना ना मिळते भाकर….

 

रंक आणखी रावामधली

खोल खोल ही दरी वाढती

तशी झुंड नि पुंडशाहीची

जरब वाढती संस्कृतीवरती……

 

मरणामध्ये जगता क्वचितच

कधी कुणाला आम्ही पहावे

जगता जगता सततच आणि

कितिकांनी ते रोज मरावे……..

 

आता वाटते एकदाच त्या

रामाने अल्लासह यावे

डोळे आपले आणखी उघडूनी

राज्य स्वतःचे पाहून जावे …….

 

अंदाधुंदी येथ माजता

राहू कसे ते शकती शांत

किती भक्त ते रंकच त्यांचे

दोन वेळची ज्यांना भ्रांत ………

 

मरणानंतर देऊ म्हणती

स्वर्ग तयांना नक्की अगदी

नंतर काय करू स्वर्गाचे

आत्ता घ्यावी त्यांनी तसदी…….

 

आत्ता घ्यावी त्यांनी तसदी..

 

©  सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares