1

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अलक [1] महात्मा ! [2] बुद्धीबळ – गे म ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक

श्री प्रमोद वामन वर्तक

🌸जीवनरंग 🌸

☆ [1] महात्मा ! [2] बुद्धीबळ – गे म ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक☆

“अलक” या प्रकारात कथा लिहायचा प्रथमच प्रयत्न करतोय !🙏

अलक – १

[1] महात्मा !

भली मोठी पांढरी शुभ्र मरसिडीज, महाराजांच्या बंड गार्डन रोडवरील राजवाड्या सदृश मठाच्या दारात थांबली. शोफरने धावत येवून दार उघडलं. आतून पांढऱ्या शुभ्र कपड्यातील व्यक्ती श्रीमंतीच्या सगळ्या खुणा दाखवत उतरली. महाराजांचे रोजचे प्रवचन, देशी विदेशी भक्तांच्या भरगच्च दरबारात चालू होते. ती व्यक्ती अदबीनं महाराजांच्या पाया पडली. खिशातून पाचशेच्या नोटांच कोरे बंडल काढले आणि महाराजांच्या पायाशी ठेवले. थोडावेळ खाली बसून प्रवचनाचा लाभ घेऊन परत नमस्कार करून मठाच्या बाहेर पडून गाडीतून निघून गेली. एक महिनाभर हा प्रकार सलग चालल्यावर, एक दिवस ती व्यक्ती बाहेर पडताच, महाराजांनी त्यांच्या सुखदेव नावाच्या खास शिष्याला खूण केली.

“महाराज त्यांचे नांव अनिरुद्ध महात्मे. पुण्यात ‘पुण्यात्मा’ नावाची त्यांची स्वतःची IT फर्म आहे.” “उद्या त्यांची आणि माझी भेट माझ्या खाजगी दालनात अरेंज करा.”

“नमस्कार महाराज, काय सेवा करू?” “नमस्कार महात्मे! आम्ही बघतोय, गेले महिनाभर तुम्ही आमच्या समोर रोज पाचशेच्या नोटांच कोरं बंडल…..” “महाराज, गत आयुष्यात केलेल्या पापांच थोड तरी परिमार्जन व्हावे या एकाच हेतूने हे करतोय!” “नाही पण तुमच्या business मध्ये इतका पैसा ?” “महाराज, आपल्या पासून काय लपवणार! अनेक नेते मंडळी आणि उद्योगपती यांची स्विस बँकेतली खाती पण मेन्टेन करतोय महाराज! तो पण माझा एक business च आहे, पण तो उघडपणे…..” “समजलं महात्मे ! आमच्याकडे सुद्धा अनेक चलनात अगणित रोख रक्कम……” “कळलं महाराज, आपण चिंता करू नका, फक्त आज्ञा द्या !” “महात्मे, उद्या सकाळी मला इथेच भेटा आणि ‘त्या’ सगळ्याची व्यवस्था स्विस बँकेत कशी लावता येईल ते पहा!” “जरूर महाराज ! उद्या सकाळी हा बंदा सेवेला हजर असेल !”

“सुखदेव, गेला आठवडाभर महात्मेची रोजची भेट बंद झाल्ये.” “होय महाराज” “सुखदेव, त्यांचा काही निरोप ?” “काहीच नाही महाराज.” “ठीक आहे. उद्या त्यांच्या IT फर्मला भेट द्या.” “होय महाराज.”

“महाराज त्यांच्या फर्मला टाळं आहे.” “काय ssss ?” “होय महाराज, अनिरुद्ध महात्मेनी फर्मची ती जागा तीन महिन्यासाठी भाड्याने घेतली होती, असं चौकशी करता कळलं.”

प्रमोद वामन वर्तक

३०-०८-२०२१

 

अलक – २

[2] बुद्धीबळ – गे म !

“हॅल्लो, सुखविंदर, दिल्लीला तुम्ही सगळे कसे आहात?” “हॅल्लो बलबिंदर, आम्ही दिल्लीला मस्त ! आज संध्याकाळी गेम खेळू या का ?” “चालेल”

संध्याकाळी बलबिंदरने मुंबईला आणि सुखविंदरने दिल्लीला आपापले लॅपटॉप उघडले ! त्यात आधीच, “ऑटो मूव्ह” करून “फिड” करून ठेवलेला व त्यांनी अनेक वेळा खेळलेला, एकच “बुद्धिबळाचा” गेम पुन्हा स्क्रीनवर पहायला सुरुवात केली !

प्रमोद वामन वर्तक

०१-०९-२०२१

 

श्री प्रमोद वामन वर्तक

(सिंगापूर) +6594708959

मो – 9892561086

ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
मराठी साहित्य – जीवनरंग ☆ प्रवास – भाग 3 ☆ सौ. आरती अरविंद लिमये

सौ. आरती अरविंद लिमये

🌸 जीवनरंग 🌸

☆ प्रवास – भाग 3 ☆ सौ. आरती अरविंद लिमये ☆ 

(पूर्वसूत्र – आदल्या रात्री बटाट्याच्या काचर्‍या, ब्रेकफास्टला बटाटेवडे आणि आता बटाट्याचा रस्सा. त्याचे सहकारी शांतपणे जेवण वाढण्याची तयारी करत होते. कोणीच काही बोलण्याच्या मन:स्थितीत नव्हते. टूरिस्टही सगळा आनंद न् उत्साह हरवून बसले होते. वातावरणात एक विचित्र ताण जाणवत होता. जेवण संपताच एक वयस्कर प्रवासी बोलायला उठून उभे राहिले.)

“मंदार, आम्हा २४ जणांपैकी दहा जण जास्तीचे पैसे द्यायला तयार आहेत. तू हिशोब कर, आम्हाला एक आकडा सांग. पुण्याला परतल्यावर मात्र तू स्वतः दिलेला शब्द पाळ.” त्यांनी सांगितले‌. मंदारला हे सगळं अनपेक्षित होतं. त्याने दोन्ही हात जोडून त्यांना नम्रपणे नमस्कार केला. मळभ भरुन आलं तसं क्षणार्धात विरुनही गेलं. टूरिस्टसनी दाखवलेल्या समंजसपणामुळे, त्यांच्या सहकार्यामुळे उरलेली टूर छान पार पडली.

पुण्यात रात्री उतरल्यावर त्याने त्या दहा प्रवाशांना दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता आॅफिसमधे यायला सांगितलं.तो स्वत: नऊ वाजताच ऑफीसला पोचला. नानूभाई आजच परत आले होते. तो केबिनमध्ये गेला. तिथे नानूभाईंसमोर त्यांचे चिरंजीवही होते.

“मंदार..?” मंदारला पहाताच नानूभाईंनी सूचकपणे आपल्या चिरंजीवांकडे पाहिले. आधी ठरल्याप्रमाणे पैसे न आल्यामुळे झालेली गैरसोय आणि टूरिस्टना विश्वासात घेऊन आपण अडचणीतून कसा मार्ग काढला हे मंदारने सविस्तर सांगितलं. नानूभाई शांतपणे ऐकून घेत होते.

“ते दहा टूरिस्ट आत्ता दहा वाजता इथे येणार आहेत. तेव्हा त्यांचे पैसे परत द्यावे लागतील ” मंदार म्हणाला. हे ऐकताच चिरंजीव एकदम संतापलेच.

“त्या दहा जणांना आत्ताची वेळ दिलीयस? कुणाला विचारुन? आणि कशासाठी बोलावले आहेस?”

“कशासाठी म्हणजे? त्यांचे पैसे परत करायला नकोत का?”  

“कुणाला विचारून त्यांच्याकडून पैसे घेतलेस होतेस तू?”

“हे तुम्ही विचारताय मला? तुम्ही दिलेल्या आश्वासनानुसार चार दिवसांनी तुम्ही पैसे पाठवायला हवे होतेत. पाठवलेत? मी फोन केला तेव्हा बंगल्यावर फोन करुन मॅडमशी बोलायला सांगितलंत. त्यानी मला रात्री उशीरा फोन करायला सांगितलं. मी तसा फोन  केला तेव्हा तो त्यांनी उचललाही नव्हता. मी सरांना फोन केला, तो नो रिप्लाय लागला. अशा परिस्थितीत काय करायला हवं होतं मी ? कंपनीचं हित लक्षात घेऊन, कंपनीचं प्रेस्टीज सांभाळणं आणि टूरिस्टना योग्य सर्व्हिस देणं माझं कर्तव्य होतं. मी तेच केलं.”

“व्हाॅट नाॅन्सेस. कंपनीचं हित पहायला आम्ही मालक समर्थ आहोत. दिलेल्या पैशात काटकसर केली असतीस तर सात दिवस सहज निभावले असते.”

“पण का करायची काटकसर ? त्या सर्वांकडून पूर्ण रक्कम आपण आगाऊ वसूल केलीय ना आपण? त्या बदल्यात ज्या ज्या सोयी आणि सेवा आपण प्रॉमिस केल्यात त्या त्यांना द्यायला हव्यातच ना?”

“ते शहाणपण तू मला शिकवू नकोस. त्यांना द्यायच्या सेवेचं निमित्त सांगून त्यांच्याबरोबर तसंच चमचमीत आणि गोडधोड ओरपायला सोकावलायत तुम्ही सगळे. काटकसर कशी न् कुठे करायची शिकवायलाच हवंय तुम्हा सर्वाना..”

त्यांच्या बेजबाबदार शब्दांमधला शेवटचा घाव मात्र मंदारच्या वर्मी लागला.

“मी काय बोलू यावर?” त्याने हतबलपणे नानूभाईंकडे पाहिलं. नानूभाईंनी त्याची नजर चुकवली. चिरंजीव खुर्ची मागे ढकलून तणतणत उठून निघून गेले. आता फक्त नानूभाई काय बोलतात ते ऐकायला मंदारचे कान आतुर झालेले होते.

“ती मंडळी आली की आत पाठव. मी त्यांच्याशी बोलतो.” एवढेच बोलून नानूभाई खाली बघून कांही लिहू लागले.

मंदार घुटमळला. मग न बोलता बाहेर आला. नानूभाई कोणते खरे न् कोणते खोटे त्याला समजेचना. आता क्षणार्धात ते सर्वजण येतील. त्यांना नानूभाईंकडे घेऊन जाऊन त्यांची ओळख करुन देण्यापलिकडे आपल्या हातात कांहीच नाहीय या विचाराने तो हतबल झाला. पण लगेच त्याने स्वतःला  सावरलं. कांही झालं तरी त्यांना न्याय मिळायलाच हवा असं त्याला तिव्रतेने वाटलं तेवढ्यात..

“मंदाsर…”

नानूभाईंच्या चिरंजीवांच्या हाकेने तो भानावर आला. त्याला खरंतर आत्ता या क्षणी त्या माणसाचं तोंड बघायचीही इच्छा नव्हती. पण नाईलाजाने तो पुढे झाला.

“हे बघ मंदार,चार दिवसांनी शिमला-कुलू-मनाली टूर आहे. हा त्याचा फायनल प्लॅन. आज रेस्ट घे न् उद्या सकाळी नऊच्या मिटिंगला हजर रहा “

मंदारला आता इथे गुंतून पडावंसं वाटेचना.

“नाही सर, नको. इथे या पद्धतीने काम करण्यात मला आता अजिबात स्वारस्य नाहीय”

“तू हे असं अचानक कसं काय सांगू शकतोस?”

“इथे बऱ्याच गोष्टी अचानकच घडताहेत सर. त्यावरची माझी ही प्रतिक्रिया समजा”

‌”ठीक आहे. तुझी मर्जी. तू गेलास तर बाहेर शंभरजणं क्यू लावून उभे रहातील हे लक्षात ठेव.”

त्याला झिडकारुन चिरंजीव बाहेर निघून गेले. पण मंदार मात्र शांतपणे तिथंच बसून राहिला. आपण बोललो ते योग्य की अयोग्य या संभ्रमात तो अस्वस्थ असतानाच ते दहा प्रवासी आत आले. मंदारने कांहीच न घडल्यासारखं त्यांचं हसतमुखाने स्वागत केलं. त्यांना घेऊन तो नानूभाईंकडे गेला.

नानूभाईनी प्रथम त्या सर्वांना धन्यवाद देऊन मनापासून दिलगिरी व्यक्त केली. त्यांचे बँक अकाउंट नंबर्स लिहून घेतले. चार दिवसात त्यावर त्यांनी ज्यादा भरलेल्या पैशांचे चेक जमा होतील असे आश्वासन दिले. कंपनीसमोर अकस्मात आलेल्या काही तांत्रिक अडचणी सांगून त्यांचं समाधान करायचा प्रयत्न मंदारला खरंच खूप केविलवाणा वाटत राहिला.

सांगितल्याप्रमाणे रोख पैसे न मिळाल्याने कांहीशा नाराजीने ते दहा जण परत गेले. त्यांना निरोप देताना मंदारला स्वत:लाच अपराधी वाटत राहिलं. तो खूप अस्वस्थ झाला. देवधरांचे फोनवरचे बोल त्याच्या मनात घुमू लागले. नानूभाईंचे चिरंजीव त्याला  वाटेल तसं घालून पाडून बोलत असताना नानूभाईंनी दाखवलेली उदासीनता त्याच्या हृदयाला चरे पाडू लागली. अपेक्षाभंगाची ही भळभळती जखम घेऊनच त्याने राजीनामा खरडला. तेवढ्यांत नानूभाई बाहेर आले. त्याला तिथेच थांबलेला पाहून नानूभाईना आश्चर्य वाटलं. मंदारच्या चेहऱ्यावरची अस्वस्थता त्यांच्या नजरेतून सुटली नाही. त्यांनी त्याला केबीनमधे बोलावलं. समोर बसायला सांगितलं

“मंदार, तू केलंस ते त्या परिस्थितीत योग्यच होतं. पण इथेही काही प्रॉब्लेम्स असतात. त्याचा डोक्याला ताप होतो. तुला त्याने इतकं संतापून बोलायला नको होतं. स्वभावाला औषध नाही हेच खरं. तो संतापाच्या भरात  कांही उलटसुलट बोलला तर तू मनावर घेऊ नकोस.”

त्यांचा हतबल स्वर स्पष्ट न बोलताही बरंच कांही सांगू पहात होता असंच मंदारला वाटत राहिलं.

“सर, टूरवरचं आम्हा सर्व स्टाफचं जगणं किती जिकिरीचं असतं हे मी वेगळं सांगायला नकोय. आम्हाला कौतुक, प्रोत्साहन नाही पण उभारी देणारे दोन शब्द तरी हवेतच ना? आपला काहीही दोष नसताना यापुढे हे असं ऐकून घेणं मला फार अवघड वाटतंय. प्लीज मला माफ करा.” असं म्हणून त्याने आपलं राजीनामापत्र त्यांच्यापुढं ठेवलं. नानूभाईनी त्यावरुन नजर फिरवली. त्यांच्या नजरेतली अस्वस्थता मंदारला स्पष्ट जाणवली.

“हा निर्णय घ्यायला तू थोडी घाई करतोय असं नाही वाटत?”

तो काहीच बोलला नाही. गप्प उभा राहिला. नानूभाईनी क्षणभर वाट पाहिली. मग कसनुसं हसले.

“ठिकाय. पण एक कर. बाहेर काळेंकडे जाऊन तुझे राहिलेले सगळे पेमेंट घे आधी. मी त्यांना फोन करुन सांगतो”

मनातली अस्वस्थता मनातच थोपवून नानूभाई शांतपणे म्हणाले. 

मंदार उठून जायला निघाला.

“आणखी एक. माझा निरोप घेतल्याशिवाय जाऊ नकोस”

तो परत आला तेव्हा नानूभाईनी एक बंद पाकीट त्याच्या हातात दिलं.

” हे काय?”

“जे तुला आत्ताच आणि  मीच द्यायला हवं. मी दिलेली सदिच्छा भेट समज.घे.”

त्याने पाकीट घेऊन त्यांना नमस्कार केला.

“अरे, उघडून तरी बघ.” ते म्हणाले. त्याने उघडलं तर आत कंपनीच्या लेटरहेडवर नानूभाईंच्या  सही-शिक्क्यासह मंदारचं कौतुक करणारं, त्यांनी दिलेलं ते ‘ एक्सपिरीयन्स- सर्टिफिकेट ‘  होतं..! तो अविश्वासाने त्यांच्याकडे पहातच राहिला. पुन्हा एकदा तो नमस्कारासाठी वाकला तेव्हा त्याच्या डोक्यावर हात ठेवून नानुभाई म्हणाले, ‘शुभास्ते पंथानः संतु’ त्याला गलबलून आलं. त्यांची अवस्थाही फारशी वेगळी नव्हती. निरोपाचा क्षण आला होता पण आता मनात खेद खंत यांना थारा नव्हता. दोघांनीही न बोलता एकमेकांना समजून घेतलं होतं..!

नानूभाईंचं प्रशस्तीपत्र आज या क्षेत्रात लाख-मोलाचं होतं. ही सदिच्छांची शिदोरी घेऊन तो ताठ मानेनं बाहेर पडला. या क्षेत्रातली सोनेरी भविष्याची स्वप्ने मनात तरळत असतानाच पुढील प्रवासास तो सिद्ध झाला .

 – समाप्त – 

©️ सौ. आरती अरविंद लिमये

सांगली

मोबाईल 8698906463

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
मराठी साहित्य – जीवनरंग ☆ प्रवास – भाग 2 ☆ सौ. आरती अरविंद लिमये

सौ. आरती अरविंद लिमये

🌸 जीवनरंग 🌸

☆ प्रवास – भाग 2 ☆ सौ. आरती अरविंद लिमये ☆ 

(पूर्वसूत्र –  “रेल्वे, फ्लाईटस्, हॉटेल्स् सगळी बुकिंग आधीच झालीयत. प्रश्न फक्त दैनंदिन खर्चाचा आहे. पूर्ण खर्चाचे सगळे पैसे एकरकमी कशासाठी हवेत? आता एवढीच रक्कम मिळेल. बाकी वेळोवेळी पाठवले जातील. आता यावर वाद नकोय” बूट वाजवीत नानूभाईंचे चिरंजीव निघून गेले. काय करावं त्याला समजेचना. या परिस्थितीत आता  नानूभाई हा एकच दिलासा होता. पण…? )

तो पुन्हा नानूभाईंकडे गेला. ते ऑफिसमधे नव्हते. दुसऱ्या दिवशी पहाटेच टूर सुरू होणार होती. टूरमॅनेजर म्हणून हे काळजीचं सावट त्याला अस्वस्थ करीत होतं. मन चिंती ते वैरी न चिंती अशी त्याची अवस्था झाली होती. कदाचित हे सगळे आपल्याच मनाचे खेळ असतील असंही त्याला वाटलं. सगळं सुरळीत होईल. ‘मनमुराद’ ही टुरिझम क्षेत्रातली एवढी नावाजलेली कंपनी. मग काळजी कसली? सगळं सुरळीत होईल. त्याने स्वतःचीच समजूत घातली. मनातली कोळीष्टकं झटकून टाकली. शांतपणे अंथरुणावर पाठ टेकली. पण अर्धवट झोपेत मनात विचार होते ते या अस्वस्थतेचेच…!

फ्लाईटची रिझर्वेशन्स असलेले दहा टुरिस्ट परस्परच येणार होते.उरलेले १४ जण आणि किचन स्टाफ येण्यापूर्वीच  मंदार स्टेशनवर पोहोचला. प्रवास विनाविघ्न सुरु झाला.

मुक्कामाच्या पहिल्या रात्री जेवणे आटोपताच परस्परांच्या ओळखींचा कार्यक्रम खेळीमेळीत पार पडला. मंदारने  सर्वांचे हसतमुखाने स्वागत केले. दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमाची रूपरेषा सर्वांना समजावून सांगितली. परस्परांचा निरोप घेऊन सर्वजण आपापल्या रूम्समधे गेले. सर्व स्टाफची जेवणेही आवरली. त्यांची झाकपाक सुरू होताच मंदार स्वतःच्या रुमवर आला आणि काल रात्रीपासून मनात दाबून ठेवलेल्या असंख्य विचारांनी तो थोडा साशंक झाला. त्याला अचानक देवधरांची आठवण झाली. ‘त्यांना फोन लावावा का ? सगळा वृत्तांत सांगून त्यांचा सल्ला घेतला तर?..’ देवधर त्याच्यापेक्षा खूप सिनियर होते. अडचण निर्माण झाल्यानंतर मार्ग शोधण्यापेक्षा आत्ताच त्यांच्याशी बोलणंच योग्य राहिल असा विचार करून त्याने देवधरांना फोन लावला.

सगळं ऐकून देवधर क्षणभर गप्प राहिले.

“तुला एका वाक्यात सांगायचं तर सध्या ‘मनमुराद’ ही बुडती नैय्या आहे मंदार.” हे ऐकून मंदारच्या पायाखालची जमीनच सरकली. “एक लक्षात ठेव. नानूभाईंनी अपार कष्टाने आणि सचोटीने ‘मनमुराद’ उभी केलीय आणि सांभाळलीय. ते सर्वेसर्वा होते तेव्हा कामात समाधान होतं. ‘मनमुराद’ हे तिथं काम करणाऱ्यांसाठी एक आनंदी कुटुंबच होतं. आता नानूभाईही थकलेत.त्यामुळे बरीचशी सूत्रं त्यांच्या चिरंजीवांच्या हाती गेलीयत.तेव्हापासून तिथं सगळं विपरीतच घडत चाललंय.चोर सोडून संन्याशाला फाशी असा सगळा मामला आहे. अरे शेवटच्या दोन-तीन महिन्यात माझा पगारही त्याला डोईजड वाटायला लागला होता.वेळीच सावध होऊन बाहेर पडताना मलाही वाईट वाटत होतं पण व्यवहार आणि भावना यांची सांगड घालणं आवश्यकच होतं.मी तेच केलं. तू एक लक्षात ठेव. टूरिस्टसना या कशाशी कांहीही देणंघेणं नसतं. तू कंपनीचा मालक नाहीयेस तर कंपनी आणि टुरिस्ट यांच्यामधला विश्वासू दुवा आहेस. तो विश्वास जप.टुरिस्ट दुखावणार नाहीत हे बघणं ही तुझी प्राथमिकता असू दे. त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नकोस. त्यादृष्टीने अतिशय विचारपूर्वक प्रत्येक निर्णय घे.”

मंदारला शुभेच्छा देऊन त्यांनी फोन ठेवला. मंदारच्या मनात कालवाकालव सुरू झाली. नानूभाईंचाही आता त्याला आधार वाटेना. डोळ्यांसमोर तरळत जाणाऱ्या त्यांच्या चिरंजीवांच्या लांबलचक गाड्या, खर्चिक रहाणीमान आज प्रथमच त्याला खटकू लागलं. त्याही परिस्थितीत काहीही विपरीत घडलं तरी परतीची दारं आता आपल्यासाठी बंद झालेली आहेत या जाणिवेने तो चपापला.पण क्षणभरच. अखेर हे त्याने शांतपणे स्वीकारलं. ‘कांही अडचण आलीच तर आपण नानूभाईना फोन करु. ते आपल्याला वाऱ्यावर सोडणार नाहीत नक्कीच ‘ त्याने विचार केला आणि तो येईल त्या प्रसंगाला सामोरं जायला सज्ज झाला.

दुसऱ्या दिवशी त्याने रुटीन सुरू केलं ते काहीच घडलं नाही असं दाखवतच.त्यानं ठरवलंच होतं की चौथ्या दिवशी रक्कम येणार हे गृहीत धरूनच आपण नेहमीसारखं सगळं पार पाडायचं. प्रवाशांना कसलीही शंका येता कामा नये याची काळजी घ्यायची.

सुखद हवामान, अप्रतिम निसर्ग-सौंदर्य न् ‘मनमुराद’चं अगत्यशील आदरातिथ्य यामुळे पहिले तीन दिवस तरी छान गेले. चौथ्या दिवशी सकाळपासून मात्र तो अस्वस्थ होता. दहा वाजल्यानंतर तासातासाला तो बँकेत फोन करत राहिला. नकारात्मक उत्तरानं त्याची कासाविशी वाढत चालली.अखेर न रहावून त्याने शेवटी पुणे ऑफिसला फोन लावला. फोन नेमका नानूभाईंच्या चिरंजीवांनी उचलला.

“हे बघ, याबद्दल तू बंगल्यावर  फोन करुन ममांशीच बोल.त्या तुला काय ते सांगतील “

 नानूभाईंच्या अनुपस्थितीत कधीकधी त्या कामांची जबाबदारी पार पाडत असायच्या पण अशी वेळ क्वचितच येई.मंदारची तर ही अशी पहिलीच वेळ. मंदारने त्यांना घरी फोन लावला.

“हे बघ,आज रात्री उशीरा तू फोन कर.मीन टाईम मी यांच्याशी बोलून कांहीतरी व्यवस्था करीन. रात्री फोन करशील तेव्हाच मी निश्चित निरोप देईन तुला” उद्वेगाने त्याने फोन ठेवला.न रहावून नानूभाईना फोन लावला पण तो नो रिप्लाय आला. मग लक्षात आलं ते एक ग्रूप घेऊन सिंगापूर टूरवर जाणार होते. काय करावं त्याला सुचेचना. डोक्यावर मणामणाचं ओझं लादल्यासारखं त्याला वाटत राहिलं.शेवटी मनाशी कांही एक ठरवून शिल्लक असलेले पैसे घेऊन तो बाजारात गेला.भरपूर कांदे-बटाटे घेऊन आला.रात्रीही तीच भाजी केली. ठरल्याप्रमाणे रात्री उशीरा शेवटचा प्रयत्न म्हणून त्याने बंगल्यावर फोन लावला.तो कुणीही उचलला नाही.ही शेवटची आशाही मालवली.

ब्रेकफास्टला बटाटेवडे पाहून एक प्रवासी कुजबुजले,

“कालची बटाट्याची भाजी बरीच उरलेली दिसतेय.”

प्रवाशांच्यासमोर चर्चा नको म्हणून मंदारने तिकडे दुर्लक्ष केलं. म्हणाला,

“सकाळचं साईट सीईंग झालं की एक अर्जंट मीटिंग घेतोय.ती झाल्यावरच आपापल्या रूमवर जावं “

“मिटिंग? कांही सरप्राईज आहे का?” कुणीतरी गंमतीने विचारलं.वेळ मारुन न्यायला तोही गंमतीने हसला.बोलला कांहीच नाही.बोलण्यासारखं काही होतंच कुठं? आता जे कांही बोलायचं ते मिटिंगमधेच हे ठरलेलंच होतं.

साईटसीईंगहून परतताच जेवणाआधी मिटिंगसाठी सर्व प्रवासी रिसेप्शन हॉलमधे एकत्र आले.शांतपणे पण तरीही स्पष्ट बोलायचं हे मंदारने ठरवलं होतं तरीही टूरिस्टसमधल्या अनेकांच्या विविध प्रतिक्रियांचं दडपण होतंच.

“हे पहा, आज आत्ताही जेवणात बटाट्याची भाजी आहे आणि ती मला नाईलाजाने करावी लागणारी एक तडजोड आहे.” क्षणार्धात मिटिंगमधलं वातावरण गंभीर झालं.मग त्याने टूरच्या आदल्या दिवसापासून काल रात्री  बंगल्यावर केलेल्या उशीराच्या फोनपर्यंतचा सर्व वृत्तान्त सांगितला.तोवर सर्वांची अस्वस्थता अधिकच वाढली होती.

“पण यात आमची काय चूक ? आम्ही तर सर्व पैसे भरलेले आहेत. विषय संपला.”

प्रवाशांच्या या त्रासिक आवाजातल्या सामुदायिक प्रतिसादानंतरही तो विचलीत झाला नाही.

“चूक तुमचीही नाहीय न् माझीही नाहीय. एक चांगली गोष्ट म्हणजे प्रवासाची आणि सगळीकडची हाॅटेल बुकिंग्ज कन्फर्म आहेत. राहिला प्रश्न चहा,नाश्ता,जेवणाचा. तुम्ही सर्वांनी मिळून जर थोडे थोडे पैसे दिलेत तर कालपर्यंत जशी सेवा दिली तशीच देणं मला शक्य होईल.पुण्याला परत गेल्यावर मी स्वतः तुमच्याबरोबर नानूभाईंकडे येऊन, त्यांच्याकडून तुमचे पैसे परत मिळतील याची जबाबदारी घेतो. पैसे द्यायचे नसले तर शेवटचे तीन दिवस कांदे- बटाट्याचे विविध पदार्थ करण्याशिवाय माझ्याकडे कांहीही पर्याय नसेल.पुण्याहून आणलेला कोरडा शिधा मात्र पुरेसा आहे त्यामुळे बाकी कसलीही गैरसोय होणार नाही हे मी पाहीन.तुम्ही अर्धा तास वेळ घ्या.परस्परांशी चर्चा करा न् मला निर्णय सांगा.”

 बोलणं संपताच तिथं क्षणभरही न थांबता मंदार भटारखान्यात आला आणि  डोक्याला हात लावून बसून राहिला. आदल्या रात्री बटाट्याच्या काचर्‍या, ब्रेकफास्टला बटाटेवडे आणि आता बटाट्याचा रस्सा. त्याचे सहकारी शांतपणे जेवण वाढण्याची तयारी करत होते. कोणीच काही बोलण्याच्या मन:स्थितीत नव्हते. टूरिस्टही सगळा आनंद न् उत्साह हरवून बसले होते. वातावरणात एक विचित्र ताण जाणवत होता.  जेवण संपताच एक वयस्कर प्रवासी बोलायला उठून उभे राहिले.

क्रमश:….

©️ सौ. आरती अरविंद लिमये

सांगली

मोबाईल 8698906463

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
मराठी साहित्य – जीवनरंग ☆ प्रवास – भाग 1 ☆ सौ. आरती अरविंद लिमये

सौ. आरती अरविंद लिमये

ई-आभिव्यक्तीवर  आपले स्वागत.

अल्प परिचय 

शिक्षण – एम ए , बी एड

सम्प्रत्ति – रा .स. कन्या शाळेत 28 वर्षे कार्यरत. 2013 जून मध्ये मुख्याध्यापिका म्हणून निवृत्त . लेखन वाचन आणि प्रवास यात विशेष रुची .

🌸 जीवनरंग 🌸

☆ प्रवास – भाग 1 ☆ सौ. आरती अरविंद लिमये ☆ 

“मेआय कम इन सर ? “

मंदारने अदबीने विचारले.त्याचा  आजचा हा इंटरव्ह्यू ही कंपनीचीही गरज होतीच.आणि तो मंदारसाठीही अतिशय महत्त्वाचा होता.

“येस.हॅव अ सीट”

“थँक्यू सर”

“तर तुम्ही मंदार बर्वे.” त्याच्या फोटोखालील नाव बघून एक सदस्य म्हणाले.

“हो सर”

“तुम्हाला पर्यटन-व्यवसाय आणि त्यातील व्यवस्थापकाची नेमकी जबाबदारी याबद्दल काही माहिती आहे?”

” हो सर. निरनिराळ्या टूरिस्ट कंपन्यांबरोबर मी माझ्या आई-बाबांसह लहानपणापासून खूप प्रवास केलाय. माझा जवळजवळ सगळा भारत फिरून झालाय.मला समजायला लागलं तेव्हापासून त्या प्रवासात संबंधित व्यवस्थापकांशी बोलताना मी त्यांच्या कामाचं स्वरुप आणि जबाबदाऱ्या गप्पांच्या ओघात जाणून घेत असे.प्रवास हे माझं पॅशन आहे सर. त्यामुळेही असेल,मला या फिल्डबद्दल खूप कुतूहल असायचं “

” गुड. मग आजवर तुम्ही नेमकं काय जाणून घेतलंय सांगू शकाल?”

“कोणत्याही टूरचं प्राथमिक नियोजन कंपनीच्या ऑफिसमधेच होत असलं तरी प्रवास सुरू झाल्यावर सर्वांच्या ओळखी करून घेणे, रोजचा दिनक्रम त्यांना सविस्तर सांगणे, स्थलदर्शनासाठी कधी स्थानिक गाईडची व्यवस्था होऊ शकली नाही, तर प्रवासी ग्राहकांचं समाधान होईल इतपत माहिती स्वत: टूर नियोजनाचा एक भाग म्हणून आपण समजून घेतलेली असणे, आणि ती त्यांना सोप्या भाषेत सांगणे,होटेल-रूम्स आणि आहार यातील त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवणे आणि एकूणच आपल्या कंपनीबद्दल त्यांच्या मनातील विश्वास आणि आपुलकी दृढ करणे ही सर्व जबाबदारी टूर मॅनेजरचीच असते.शिवाय बरोबरचा स्टाफही त्याला सांभाळावा लागतो ” मंदारच्या बोलण्यातला आत्मविश्वास सर्व सदस्यांना जाणवलाय आणि त्यांनी एकमेकांकडे पाहून समाधानाने मान डोलावलीय हे मंदारच्या लक्षात आलं.पण कंपनीचे मालक नानूभाई मात्र कांहीसे साशंक वाटले.मंदारकडे पहात,अंदाज घेत ते म्हणाले,

” हे सगळं महत्त्वाचं आहेच. पण आर्थिक बाबींबद्दलची महत्त्वाची जबाबदारीही व्यवस्थापकाचीच असते याची कल्पना आहे ?”

” हो सर.पण त्याचा मला अनुभव नाहीय.तरीही ते मी शिकून घेईन. सर, मला मनापासून आवडतं हे क्षेत्र. आपल्या मार्गदर्शनाखाली मी उत्तम तयार होईन अशी खात्री आहे माझी.”

” बरं..पण..तुझ्या पगाराच्या काय अपेक्षा आहेत?” नानूभाईंचा अनपेक्षित प्रश्न.

” आधीच्या कंपनीत मला 20000/-मिळत होते.सुरुवातीला निदान तेवढे तरी मिळावेत सर.”

” ती कंपनी बंद पडली तरी त्यांनी तुला एक्सपिरिअन्स सर्टिफिकेट मात्र छान दिलंय.सोs डोण्ट वरी.आमच्या ‘ मनमुराद पर्यटन कंपनी’ मधे सुरुवातच २५०००/- ने होते.सो इट्स बियाॅंड युवर एक्सपेक्टेशन्स. कधीपासून जाॅईन होशील?”

“सर,अॅज यू से.अगदी आजपासूनही ” मंदारला त्याचा आनंद लपवता आला नाही.

“ओके देन.उद्या शार्प दहाला  ये.कांही दिवस आॅफीसवर्क.मग थेट टूर मॅनेजरशीप”

मंदारसाठी हा एक सुखद धक्काच होता. सर्वांना धन्यवाद देऊन तो बाहेर पडला ते आनंदाची एक लहर सोबत घेऊनच.

आधीच्या कंपनीत त्याला व्यवस्थापक म्हणून काम करण्याची संधी मिळण्याआधीच ती कंपनी बंद पडली होती. आता या प्रख्यात कंपनीत मिळालेल्या संधीचं सोनं करायचंच असं मंदारने मनोमन ठरवूनच टाकलं. दोन महिन्यातच त्याने सगळी हिशोबा-हिशोबी शिकून घेतली. सुरुवातीला रत्नागिरी,नंतर महाबळेश्वर, गोवा अशा एक-दोन मुक्कामाच्या छोट्या टूर्स व्यवस्थित पारही पडल्या. त्याला टूरिस्टसकडून कौतुक आणि नानूभाईंकडून उत्तेजनही छान मिळालं होतं. अष्टविनायकची तीन दिवसांची टूर करून तो परतला तेव्हा मात्र त्याला ऑफिसमधलं वातावरण थोडं गढूळ, कांहीसं तणावपूर्ण वाटलं.थोडी चौकशी केली तेव्हा  एवढंच कळलं की सिनियर मॅनेजर देवधरनी जाॅब रिझाईन केला होता त्यामागचं नेमकं कारण समजलं नाही तरी एक मात्र सर्वांनाच समजलं होतं की अलिकडे नानूभाईंच्या मुलाची ऑफिसमधली लुडबूड वाढलेली आहे हे देवधरना आवडलेलं नव्हतं. मंदारच्या छोट्या टूर्स सुरु होत्याच त्यामुळे याची त्याला आधी कल्पना आली नव्हती एवढंच.आणखी एक बातमी समजली ती म्हणजे देवधर यांच्या नंतर अलिकडे नुकतीच आणखी दोन टूरमॅनेजर्सनीही  ‘मनमुराद’ सोडलीय. ऑफिसमध्ये त्यामुळेच थोडी अस्वस्थता होती. अशातच नानूभाईंनी मंदारला बोलावलं. कांहीसं दडपण घेऊनच तो त्यांच्या केबिनकडे वळला.त्याला  पहाताच मनातली चिंताग्रस्तता चेहऱ्यावर दिसू न देण्याचा प्रयत्न करीत त्यांनी मंदारचं हसून स्वागत  केलं.

“ये मंदार. हे बघ, येत्या १४ एप्रिलची काश्मीर टूर तू करतोयस.”

मंदारचा स्वत:च्या कानांवर विश्वासच बसेना.या अनपेक्षित सुखद धक्क्याने आत येताना मनात असणारं दडपण नाहीसच झालं एकदम.अविश्वासाने तो पहातच राहिला.

” सर.., हे असं अचानक..”

“तयारी आहे ना तुझी..?”

“हो सर..नक्कीच.पण “

“तुला सगळं सविस्तर समजावतो.बैस”

त्याला मनातून खरं तर आनंद झाला होता.अतिशय दुर्मिळ संधी अशी ध्यानीमनी नसताना समोर आली होती. ‘जुना मॅनेजर असा अचानक सोडून गेला याचा आनंद होतोय का आपल्याला..? ‘..या विचारानेच त्याला अपराधी वाटलं क्षणभर. पहिलीच टूर न् तीही काश्मीरची. ही सुसंधी होतीच न् आव्हानही.  पण जमेल आपल्याला..?

“या पहिल्या टूरला मी असेन तुझ्याबरोबर..” जणू त्याच्या मनातली साशंकता समजल्यासारखं नानूभाई म्हणाले.

ही काश्मीर टूर हा मंदारसाठी अतिशय मोलाचा अनुभव होता.एकतर नानूभाई स्वतः त्याच्याबरोबर होते आणि लॉंग टूर मधील बऱ्याच खाचाखोचा त्यानी वेळोवेळी त्याला समजावून सांगितल्याही . टूर एकट्याने हँडल करायचा आत्मविश्वास त्याला दिला. एप्रिल-मे सीझनमधल्या नंतरच्या दोन टूर्स त्याने एकट्याने समाधानकारक पूर्ण केल्या. टूरिस्टस् कडून मिळालेलं फिडबॅकही उत्साहवर्धक होतं. मे अखेरच्या टूरची तयारी करताना नानूभाई त्याला म्हणाले,

“आता ही या सीजनमधील शेवटची टूर .२४ पॅसेंजर्स आहेत. नेहमीप्रमाणे उत्तम काम करायचं”

त्यांना नमस्कार करून तो अकाउंट सेक्शनला गेला तर नेहमीपेक्षा निम्मी रक्कम त्याच्या हातात पडली.तो चमकलाच.

” अहो, काळेसाहेब हे काय?”

“सध्या एवढेच”

“कमालच आहे. थट्टा करताय की काय?”

“अरे नाही बाबा.धाकट्या साहेबांच्या सूचना आहेत. व्यवसायात अशा अडचणी येतात अरे. आपण त्या कशा फेस करतो हे महत्त्वाचं.सध्या हे एवढे घेऊन जा. टूर सुरू कर. चारएक दिवसात तुला उर्वरित रक्कम पोहोचेल.”

“नाही.असं नको काळे साहेब. मला फार अनसेफ  वाटतंय.”

” अनसेफ ? व्हाॅट फाॅर?”  नानुभाईंचे चिरंजीव

अचानक समोर येऊन उभे होते न् त्रासिकपणे त्यालाच विचारत होते..

“व्हाॅट फाॅर..?” मंदारकडे रोखून पहात त्यांनी पुन्हा विचारलं.काय बोलावं त्याला सुचेचना.

” हे बघ ते म्हणतात त्यावर विश्वास ठेव “

“प्रश्न विश्वासाचा नाहीये. प्रवासात काही कमीजास्त झालं तर हाताशी पैसे असावेत म्हणून मी म्हणत होतो.”

” काही कमी-जास्त होत नाही.रेल्वे,फ्लाईट,हॉटेलस् सगळी बुकिंग आधीच झालीयत.प्रश्न फक्त दैनंदिन खर्चाचा आहे.पूर्ण खर्चाचे सगळे पैसे एकरकमी कशासाठी हवेत? आता तेवढीच रक्कम मिळेल.बाकी वेळोवेळी पाठवले जातील.आता यावर वाद नकोय” टकटक  बूट वाजवीत नानूभाईंचे चिरंजीव  निघून  गेले.काय करावं त्याला समजेचना.आता यावर नानूभाई हा एकच दिलासा होता….पण ?

क्रमश:….

©️ सौ. आरती अरविंद लिमये

सांगली

मोबाईल 8698906463

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
मराठी साहित्य – जीवनरंग ☆ एक कटिंग असाही – भाग 2 ☆ सुश्री समिधा ययाती गांधी

🌸 जीवनरंग 🌸

☆ एक कटिंग असाही – भाग 2 ☆ सुश्री समिधा ययाती गांधी ☆ 

“काका ऐकताय ना? मला तुम्हाला भेटायचे आहे. आजच्या आजच. मी दुपारी येऊ का?” माझी तंद्री भंग पावली.

“का? तू का भेटणार आहेस. तुझ्या बाबांनी का फोन नाही केला. त्याला अजूनही माझ्याशी बोलायचे नाहीच ना? तू तरी कशाला येतोयस मग?”

“काका, प्लीज. मी आल्यावर सविस्तर बोलू. मला प्लीज थोडा वेळ तरी भेटा.”

 मला त्याच्या बोलण्यातली कळकळ जाणवली. मी पण फारसे आढेवेढे न घेता त्याला भेटायला तयार झालो.

त्याला माझ्या घराचा पत्ता मेसेज केला. अर्ध्या तासात येतो असा त्याने उलटा मेसेज केला.

मी त्याची उत्सुकतेने वाट पहात होतो. अक्षरशः वीस मिनिटात माझ्या घराची बेल वाजली. मी दार उघडले तर माझ्या समोर जणू तरूणपणीचा सुरेशच उभा आहे असा भास मला झाला. सुरेशच्या मुलाला मी पहाताक्षणी ओळखले.

तो घरात येऊन बसला. गौतमीने माझ्या सुनेने आम्हाला कॉफी आणून दिली.

“काका तुम्ही चक्क कॉफी पिताय?” सुरेशच्या मुलाला आश्चर्याचा धक्काच बसला होता. “बाबा म्हणायचे की तुम्ही दोघे कॉफी पिणाऱ्यांची थट्टा करायचा आणि आपण जन्मात कधी चहा सोडून कॉफी पिणार नाही म्हणायचात.”

मी पुन्हा जुन्या आठवणीत रमणार होतो पण तेवढ्यात हा सुरेशचा मुलगा सुरेशचा उल्लेख भूतकाळात करतोय हे मला चांगलेच खटकले. मी न रहावून त्याला विचारलेच.” तुझे बाबा का नाही आले, अजूनही राग गेला नाही का? “

” तेच सांगायला आलोय काका.. मागच्या आठवड्यात बाबा गेले. “

” काय!!” 

मला खूप मोठ्ठा धक्का बसला.

“असा कसा गेला. मला न भेटताच. शक्यच नाही. तू मला फसवतोयस. होय ना.”

“नाही काका. मी या बाबतीत कसा फसवीन? बाबांना जायच्या आधी तुम्हाला भेटायची आणि तुमच्याबरोबर चहा प्यायची खूप इच्छा होती पण तितका वेळच मिळाला नाही. त्यांना हार्ट अ‍ॅटॅक आला तोच खूप मॅसिव्ह होता. अर्ध्या तासात सारा कारभार आटोपला. काका उद्या बाबांचे दहावे आहे. तुम्ही याल? तुम्ही  आला नाहीत. तिथे येऊन चहा प्यायला नाहीत तर बाबांच्या आत्म्याला शांती मिळणार नाही. काका याल ना? “

मी पुरता कोसळलो होतो. सुन्न झालो होतो. गौतमीने मला सावरले. तिनेच सुरेशच्या मुलाकडून त्यांचा पत्ता घेतला आणि मला तिथे घेऊन ती स्वतः किवा माझा मुलगा येईल असे सांगितले.

त्या दिवशी मी काय केले, काय खाल्ले याची मला शुद्धच नव्हती. सतत सुरेश डोळ्यासमोर दिसत होता. मी कितीही मनापासून त्याची माफी मागितली तरी त्याचा आता काहीही फायदा होणार नाही हे सत्य पचवणे मला अशक्य होत होते.

दुसऱ्या दिवशी सुट्टी घेऊन माझा मुलगा माझ्याबरोबर सुरेशकडे आला. सुरेशच्या बायकोला, गिरिजावहिनींना मी पहिल्यांदाच भेटलो. त्यांना देखील मी अगदी ओळखीचा वाटत होतो. माझ्याबद्दल सुरेश सतत भरभरून बोलायचा.

थोड्या वेळाने आम्ही गच्चीत गेलो. तिथे सुरेशची सून दोन चहाचे कप घेऊन आली. एक कप माझ्या हातात दिला आणि एक कठड्यावर माझ्यापासून थोडा लांब ठेवला. मी तिला एक कप चहा परत न्यायला सांगितले. पूर्वी प्यायचो तसा अर्धा अर्धा चहा आता आम्ही पिणार होतो. माझ्या चहातला अर्धा चहा एका बशीत ओतून मी गच्चीच्या कठड्यावर ठेवला आणि मी मनातल्या मनात सुरेशशी बोलू लागलो. कित्येक वर्षांची कसर भरुन काढू बघत होतो.

“सुरेशा, बघ मी आलोय तुला भेटायला. बरोब्बर एकोणचाळीस वर्षे सहा महिने बावीस दिवस झाले तुला भेटलो नाही. इतक्या वर्षात तुला माझ्याशी बोलावेसे वाटले नाही ना? माझ्यावर इतका रागावलास. मला मान्य आहे चूक माझीच होती. पण आता मी मनापासून तुझी माफी मागतोय. तुला माहिती आहे. त्या दिवसापासून आजपर्यंत मी चहा प्यायलो नाही. तुझ्याशिवाय चहा प्यायची कल्पनाच करवत नाही. आज मात्र तुझ्या सुनेच्या हातचा चहा आपण दोघे मिळून पिणार आहोत. . मला माहितीये तू आहेस इथेच कुठेतरी आसपास. तुझे शरीर इथे नसले तरी तुझा आत्मा इथेच आहे. तू ऐकतोयस ना? चल आज आपण पूर्वीसारखाच कटिंग पिऊया. “

असे म्हणून मी चहाचा कप तोंडाला लावला आणि भर्रकन एक कावळा आला आणि त्याने कठड्यावर ठेवलेल्या चहात चोच बुडवली.

मित्रांनो, तुमच्या बाबत अशीच एखादी ‘इगोची आडी’ निर्माण झालेली असेल तर वेळीच स्वतःला सावरा…

© सुश्री समिधा ययाती गांधी

वारजे, पुणे.५८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

 
मराठी साहित्य – जीवनरंग ☆ एक कटिंग असाही – भाग 1 ☆ सुश्री समिधा ययाती गांधी

🌸 जीवनरंग 🌸

☆ एक कटिंग असाही – भाग 1 ☆ सुश्री समिधा ययाती गांधी ☆ 

(हृदयस्पर्शी व्याख्या “लंगोटी यार” ची)

सकाळी सकाळी मला फोन आला.

“नमस्कार. आपण भास्कर आपटे बोलताय का?”

“नमस्कार, मी भास्कर आपटे बोलतोय. आपण कोण बोलताय?”

“काका, तुम्ही सुरेश कामतांना ओळखता ना? मी त्यांचा मुलगा बोलतोय. “

” कोणाचा मुलगा?”

” सुरेश कामतांचा. बाबा म्हणाले की तुम्ही कॉलेजात असताना जिगरी दोस्त होतात. “

” हो. होतो आम्ही जिगरी दोस्त. पण आता त्याचे काय. आमची मैत्री मोडून पण चाळीस वर्षे झाली. आता आम्ही कित्येक वर्ष भेटलेलो सुद्धा नाही. “

” हो. बाबा नेहमी तुमच्या आठवणी सांगायचे. तुम्हाला कॉलेजचे जय वीरू म्हणायचे ना? “

सुरेशाच्या मुलाचे पुढचे शब्द माझ्या कानावर पडत होते खरे पण मी पूर्णपणे भूतकाळात शिरलो होतो. एखादा सिनेमा फ्लॅशबॅकमध्ये पहावा तसे माझे बालपण माझ्या नजरेसमोर येत होते.

मी आणि सुरेश काही दिवसांच्या फरकाने एकाच चाळीत जन्माला आलो. आमची मैत्री आधी झाली मग कधीतरी आम्ही चड्डीची नाडी बांधायला शिकलो. इतक्या लहानपणापासून आम्ही दोघे एकत्रच असायचो. एकमेकांशिवाय आमचे पान हलत नसे. कधी भांडलो तरी तेवढ्यापुरते. तासादोन तासाच्यावर आमचे भांडण टिकायचेच नाही.

आम्ही गेल्या जन्मी एकमेकांचे भाऊ असणार असे आमच्या आया म्हणायच्या. मे महिन्याच्या सुट्टीत आम्ही दोघे एकत्रच माझ्या आणि त्याच्या आजोळी राहायला जायचो. मी कामतांकडे मासे खायला शिकलो  सुरेश आमच्याकडचे शाकाहारी जेवण मनापासून जेवायचा. अगदी पंचामृत, अळूच्या फतफद्यासकट सगळे पदार्थ  तो आवडीने खायचा.

कॉलेजातही आमची मैत्री फेमस होती. आम्ही कॅंटीनमधला कटिंग चहा पण अर्धा अर्धा करून प्यायचो. चहा हा आमच्या दोघांचाही वीक पॉईंट..दिवसभरात दोघांचा मिळून दहाबारा कप चहा होत असे. गप्पा मारताना, अगदी मुलींकडे चोरून बघताना, अभ्यास करताना. आम्हाला चहा हवाच असायचा. आमच्या चहा पिण्याची थट्टा व्हायची. आम्ही दोघे नेहमी म्हणायचो आमची चहाची सवय आणि आमची मैत्री कधीच तुटणार नाही. 

सगळे म्हणायचे दृष्ट लागण्यासारखी मैत्री आहे या दोघांची. खरच कोणाची दृष्ट लागली आमच्या मैत्रीला?

 कॉलेजमधल्या आमच्या इतर मित्रांनी एकमेकांत आमच्यात भांडण लावून द्यायची पैज लावली होती. जो त्यात यशस्वी होईल त्याला दोन हजार रुपये इतरांनी मिळून द्यायचे असे ठरले होते.

आम्हाला दोघांना या प्लॅनची अजिबात कल्पना नव्हती.

आम्ही आमच्याच विश्वात मश्गुल असायचो. पण हळूहळू इतरांनी मिळून आमच्या मनात एकमेकांविषयी स्पर्धा निर्माण करण्यात यश मिळविले. कधी नव्हे ते आम्ही एकमेकांकडे संशयाच्या नजरेने पहायला लागलो. आमचा शेवटच्या वर्षाचा रिझल्ट लागला. दरवर्षी मी पहिला यायचो आणि सुरेश दुसरा किंवा तिसरा असायचा. यावेळी पहिल्यांदाच माझा दुसरा नंबर आला आणि सुरेशचा पहिला..

माझा मूड आधीच खराब होता. त्यात इतर मित्रांनी मला सांगितले की सुरेशने कॉपी करुन पहिला नंबर मिळवला आणि मुलींवर पहिल्या नंबरचे इंप्रेशन मारत फिरतोय.

तेवढ्यात सुरेश व आमच्या वर्गातलीच एक मुलगी मला भेटायला कॅंटीनमधे आले. तो बिचारा स्वतःचा पहिला नंबर येऊनसुद्धा माझा पहिला नंबर आला नाही म्हणून अस्वस्थ झाला होता. पण मला काय  झाले होते कोणास ठाऊक. मी त्याला वाट्टेल ते बोललो. त्या मुलीवरूनही त्याला बोलायला लागलो. तो सुरूवातीला शांत होता पण नंतर त्याचा ही संयम संपला. आम्ही खूप भांडलो. एकमेकांची उणीदुणी काढली. आणि पुन्हा एकमेकांचे तोंडही पहायचे नाही असे मनाशी पक्के करूनच घरी आलो. आमच्या घरच्यांनी आमची खूप समजूत काढायचा प्रयत्न केला. ज्या मित्रांनी पैज लावली त्यांनीही आमच्यात समेट घडवून आणायचा प्रयत्न केला. आम्ही दोघेही अडून बसलो. प्रेस्टीज इश्यू केला. पुढे मला नोकरी मिळाली. मी पुणे सोडून मुंबईत आलो. आमची जुनी चाळ पाडली. सगळी पांगापांग झाली.

आताशा कॉलेजच्या मित्रांची रियुनियन झाली. सुरेश तिथे असेल म्हणून मी जायचे टाळले. एकदा वाटले की आपण फोन करून सुरेशशी बोलावे. रियुनियनच्या निमित्ताने का होईना पुन्हा भेटावे. पण माझा इगो आड आला. इतकी वर्षे गेली तरी त्यानेही स्वतःहून कधीच फोन केला नाही. तो ही कॉलेजच्या व्हॉटसॲप ग्रुप पासून दूरच राहिला. आणि आज अचानक हा त्याच्या मुलाचा फोन ——-

क्रमशः….

© सुश्री समिधा ययाती गांधी

वारजे, पुणे.५८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
मराठी साहित्य – जीवनरंग ☆ छोटुली – भाग 6 (भावानुवाद) – डॉ हंसा दीप ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

🌸जीवनरंग 🌸

☆ छोटुली – भाग 6 (भावानुवाद) – डॉ हंसा दीप ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

(मागील भागात आपण पहिले – कोपर्‍यात रुसून बसलेल्या छोटुलीचे डोळे त्याला बघताच चमकले. ती अविबरोबर खेळण्यासाठी धावत – पळत आली. आता इथून पुढे)

दोघेही अरोरांच्या ऑफीसमध्ये खेळत राहिली. अर्धा तास कुणीच त्यांच्यामध्ये बोललं नाही. त्यानंतर अरोरा म्हणाले, ‘बेटा आता तुझा नाच दाखव की अविला. ठीक आहे नं? आपण स्टेजवर जाऊयात?’

ती होय म्हणून त्यांच्याबरोबर गेली. अविला स्टेजच्या अगदी समोर बसवण्यात आलं, म्हणजे तो तिच्या सतत दृष्टीपुढे राहील. तिची खात्री पटेल, की अवी तिथेच आहे. तिला वाटेल, की नाच हासुद्धा खेळाचाच एक भाग आहे. खेळायचं तर खेळायचं. नाचायचं तर, नाचायचं. 

तांत्रिक बिघाडाचं कारण देणं ही अरोरा साहेबांची दूरदृष्टी होती. रेकॉर्डिंग अर्धा तास पुढे ढकलल्याने फारसं काही बिघडत नव्हतं. संभाव्य विजेताने फिनालेमध्ये परफॉर्म केला नसता, तर त्यापेक्षा किती तरी जास्त बिघडलं असतं. ते छोटुलीच्या जीवनभर खेळण्याचा प्रबंध करताहेत, हे समजण्याचं तिचं वय नव्हतं. ती यासाठी खुश होती की अरोरा साहेबांनी आपल्या ऑफिसमध्ये तिला आणि अवीला भरपूर आईसक्रीम खाऊ घातलं होतं. त्याच्याशी भरपूर गप्पा मारून, त्याच्याबरोबर खेळायला भरपूर वेळ दिला होता आणि नंतर तिला परफॉर्म करायला सांगितलं होतं.

छोटुलीची आई, तिचा ‘सल्लू’, शोसाठी आलेले सारेच लोक हैराण झाले होते. त्या छोट्या मुलीची एवढी जिद्द… मनात आलं, तर करेल, नाही तर मुळीच करणार नाही. आरोरा साहेबांनी मोठ्या कुशलतेने समस्या सोडवली होती, जसं काही तिच्या बुटात त्यांनी स्वत:ला फिट केलं होतं॰ त्यांच्या बाबतीत असंच नव्हतं का घडलं? त्यांना मेडीकलला पाठवलं होतं, तेव्हा सगळ्यांना नाराज करूनच ते परतले नव्हते का? आणि नंतर त्यांनी आपल्या पसंतीचं काम सुरू केलं होतं॰ काळाचा तो क्षण आजही त्यांच्या डोक्यात विळखा घालून बसलाय. सगळं काही इतकं सोपं नव्हतं. चार वर्षं उपाशेपोटी काढावी लागली, तेव्हा कुठे त्यांना आवडीचं हवं ते काम मिळालं. मग मात्र त्यांनी कधी मागे वळून बघितलं नाही.

तेही एक सत्य होतं आणि आज हेही एक सत्य आहे. छोटुलीचा मूड.  या सत्यामागे तांत्रिक बिघाड हे छोटसं खोटं दबून गेलय. खरोखरचा तांत्रिक बिघाडचं होता तो. त्या छोट्या मुलीचं मन वाचू न शकलेला तो बिघाड होता. जसा तो वाचला गेला, तसा तांत्रिक बिघाड दूर झाला. छोटुली आपल्या दोस्ताबरोबर मन:पूर्वक खेळली. प्रसन्न झाली. तिला खूप आनंद झाला आणि तो आनंद त्या क्षणी तिला भरपूर ऊर्जा देऊन गेला. इतक्या दिवसात तिला कळलं होतं की ‘उद्या ‘ कधीच येत नाही. तो नेहमी ‘उद्या’च रहातो. हे खरंच  होतं. तिची आई नेहमीच म्हणायची, ‘आज खाल्लं, तेच गोड … ‘उद्या’चं कुणी बघितलय.’

 तिथे बसलेल्या सार्‍या लोकांची धडधड आता थांबली होती. तांत्रिक कारणाने थांबलेला शो आता सुरू झाला. ती नाचू लागली. जसं लोकांना वाटत होतं, तशीच ती नाचली. अर्थातच ती जिंकली. फुलांच्या वर्षावात अवीही तिच्या सोबत होता. फोटो काढताना ती आनंदाने नुसती खिदळत होती.

समाप्त

मूळ लेखिका – डॉ. हंसा  दीप 

Contact- Dr. Hansa Deep, 1512-17 Anndale Drive, North York, Toronto, ON – M2N2W7 Canada

Ph. 001 647 213 1817  Email- hansadeep8@gmail.com

अनुवाद –  श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
मराठी साहित्य – जीवनरंग ☆ छोटुली – भाग 5 (भावानुवाद) – डॉ हंसा दीप ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

🌸जीवनरंग 🌸

☆ छोटुली – भाग 5 (भावानुवाद) – डॉ हंसा दीप ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

(मागील भागात आपण पाहीलं – कलाकाराच्या प्रत्येक हावभावावर टिकून राहिलेली असते. आज तेच कौशल्य त्यांना त्या रुसलेल्या मुलीची समजूत काढण्यासाठी वापरायचं आहे. आता इथून पुढे)

जेव्हा त्यांना पडद्यामागे ती मुलगी दिसली, तेव्हा त्यांना वाटलं, तो पडदा म्हणजे कैकेयीचं कोपभवन झालय. या पडद्यामागे सगळ्या शोचं राज्य डावावर लागलय. तिच्याजवळ ते गेले, पण ती मुळी बोलायलाच तयार नव्हती. जेव्हा त्यांनी अवीचं नाव घेतलं, तेव्हा मात्र तिने लगेच वळून पाहीलं आणि अशा नजरेने बघितलं की अवीचं नाव ऐकताच ती शांतीपूर्वक बोलायला तयार आहे. ते तिच्याशी अतिशय प्रेमाने बोलले. वेळेची नाजुकता, मुलीचं नाजुक वय, आणि ग्रँड फिनालेची नाजुकता, सगळं मिळून त्यांच्या बोलण्याच्या शैलीला अतिशय नाजुक बनवत होतं. आपला राग बाजूला ठेवून त्यांनी त्या मुलीच्या डोक्यावरून हात फिरवला. दोघांच्यामध्ये काही खूस-फूस झाली आणि अनाउंसमेंट केली गेली, ‘काही तांत्रिक अडचणीमुळे यावेळी शूटिंग होऊ शकत नाही. बरोबर एक तासाने शूटिंग सुरू होईल.’

अनाउंसमेंट ऐकताच एकदम चांगलाच गोंधळ माजला. व्ही. आय. पी. संतापले. प्रत्येक मिनिटाचे पैसे गोळा करण्यासाठी त्यांचे बुभूक्षित डोळे निर्मिती विभागाकडे टवकारून पहात होते.  गॅलरीत बसलेले प्रेक्षक, काही न करताही बेचैन झाले होते. ज्यांनी इतका वेळ धाव-पळ करून सेट लावला होता, त्यांची स्थितीही वाईट होती. सजावट, तंत्रज्ञ, मुख्य अतिथी, परीक्षक सगळ्यांचीच आपापली शान होती. आपापला थाट होता. आपआपल्या मागण्या होत्या. सगळ्यांना वाटत होतं, चॅनेल करोडोंनी  खर्च करतेय, ते केवळ त्यांच्यामुळे. परीक्षकांचं ग्लॅमर ही जशी काही कार्यक्रमाला दिलेली फोडणी होती. आशा तर्‍हेने ही फोडणी दिली जात होती, की त्यामुळेच पैसे परतले जाताहेत… भाजीच जशी… तंत्रज्ञांना वाटत होतं, त्यांची प्रगत टेक्नॉलॉजीच असं दृश्य सादर करताहेत आणि तेच यशाचं रहस्य आहे. तिकडे स्पर्धकांच्या आई-वडलांना वाटतय, त्यांच्या मुलांच्या प्रतिभेमुळेच शो चाललाय. सगळ्यांचीच पाची बोटे तुपात होती. 

ती लहान मुलं, ज्यांना लहानपणापासूनच या तणावात ढकललं गेलय, ती कधी असा विचार करत नव्हती, की त्यांच्यामुळेच हा शो चाललाय. ती नेहमीच घाबरलेली, भेदरलेली असत. त्यांना कधी आईकडून, कधी परीक्षकांकडून ओरडून घ्यावं लागे. विशेषत: स्क्रिप्ट लिहिणार्‍याकडून रागावून घ्यावं लागे. जे लिहिलं आणि पाठ करून घेतलं, ते बोलायचं राहिलं तर किंवा चुकीचं बोललं गेलं तर त्यांची धडगत नसे. सुरुवातीच्या ३-४ शोमध्ये सगळ्यांकडूनच स्वयंशिस्त पाळली जात होती. हळू हळू शो पॉप्युलर होत गेला, तशी चॅनेलची हुकुमशाही वाढत गेली. टी.आर.पी. जसजसा वाढू लागला, तसतसे वेगवेगळे कयास बांधले गेले. शोचा प्रत्येक विभाग हे यश आपल्यामुळेच मिळतय, असं मानू लागला. दृश्यांच्या परिकल्पनेत रचनात्मकता आणण्यासाठी अनेकदा धोकादायक दृश्येही दाखवली जाऊ लागली. मुलांना बॉलप्रमाणे इकडून तिकडे ढकलले जाऊ लागले. प्रेक्षक श्वास रोखून ते दृश्य बघू लागले.

यावेळी मिस्टर अरोरा मात्र शांत होते. एका वेळी एकच समस्या सोडवायची, असा त्यांचा नियम होता. सगळ्यांना बाजूला सारत ते, ज्या ठिकाणी अवी बसला होता, तिथे येऊन पोचले. त्याला घेऊन छोटुलीकडे आले. कोपर्‍यात रुसून बसलेल्या छोटुलीचे डोळे त्याला बघताच चमकले. ती अविबरोबर खेळण्यासाठी धावत – पळत आली.

क्रमश:….

मूळ लेखिका – डॉ. हंसा  दीप 

Contact- Dr. Hansa Deep, 1512-17 Anndale Drive, North York, Toronto, ON – M2N2W7 Canada

Ph. 001 647 213 1817  Email- hansadeep8@gmail.com

अनुवाद –  श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
मराठी साहित्य – जीवनरंग ☆ छोटुली – भाग 4 (भावानुवाद) – डॉ हंसा दीप ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

🌸जीवनरंग 🌸

☆ छोटुली – भाग 4 (भावानुवाद) – डॉ हंसा दीप ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

( मागी भागात आपण पाहीलं -. त्या क्षणापासून उतावीळ होऊन ती  अविनाशाची वाट पाहू लागली. आता पुढे )

पायाने ताल देत रहायची. एकटी असतानासुद्धा ती ते करायची. आता गुरूमुळे परिपक्वता आली होती.

ती काही अडाणी नाही. तिला माहीत आहे, खरा शो तर आताच आहे. आत्तापर्यंत जे झालं, त्या सगळ्या रिहर्सल होत्या. पण आता तिला खेळायचय, म्हणजे खेळायचय. तिचे डोळे गर्दीत अवीला शोधत होते. तो दिसला नाही, तेव्हा तिचा विरस झाला. उत्साह मंदावला.

‘आई, अवी नाही आला?’

‘आलाय बेटा! मी त्याच्याबरोबर आणि त्याच्या आईबरोबर बोललेयसुद्धा!’

‘मला दिसत नाहीय. दाखव. कुठाय तो?’

‘आत्ता तू त्याला नाही भेटू शकणार बेटा!’

‘नाही. मी त्याला आत्ताच भेटणार!’

ती रडू लागली. मोठमोठ्याने. कार्यक्रमाचा सेट लावण्यासाठी धावपळ करणार्‍या सगळ्या लोकांच्या आरडा-ओरडयात तिचा आवाज काहीसा दबून गेला होता. तिच्याबद्दल विचार करण्यासाठी कुणापाशीच वेळ नव्हता. कोणी तिचं ऐकत नसेल, तर तिने तरी इतरांचं का ऐकावं? ती आपल्या दोस्ताला भेटण्यासाठी इकडे-तिकडे धावत-पळत असतानाच, तिने त्यांना धडक मारली. ते म्हणजे अरोरा साहेब. या शोचे डायरेक्टर. सगळेच त्यांना घाबरून असायचे. एक भयंकर माणूस. शेवटचा श्वास घेणार्‍यालाही सांगण्याची त्यांची हिम्मत होती, ‘आता तुला मारता येणार नाही. आधी शोचं शूटिंग पूर्ण कर. मग हवं तर मर किंवा काय हवं ते कर!’

अरोरांना धडक मारून ती जोरात धावत जाऊन एका पडद्यामागे लपली. ते इकडे-तिकडे मुलीला शोधू लागले. इकडे बाकीची सगळी तयारी झाली होती. माईक, लाईट,परीक्षक, श्रोते – प्रेक्षक, डेकोरेशन, प्रॉडक्शन सगळे अगदी तयारीत होते. उमेदवार गायब होता. गोंधळ झाला होता. सगळ्यांची धडधड वाढली होती. करोडो रुपये डावावर लागले होते. त्या चॅनेलचे आणि त्याच्याशी संबंधित प्रत्येकाचे.

सगळ्यात अधीक धक्का बसला होता, डायरेक्टर साहेबांना. ते स्तंभित झाले. या अनपेक्षित स्थितीतून बाहेर येण्यासाठी काही तरी करायला हवं होतं. शांतपणे मुलीशी बोलून त्यांना समजून घ्यायला हवं होतं की मुलगी मंचावर यायला का तयार नाही आहे? मुलगी आहे तरी कुठे? आई गोंधळून गेली. तिचा चेहरा पांढरा फाटक पडला. तिने धावत येऊन अरोरा साहेबांना सांगितलं, ‘मुलगी कुठे तरी लपून बसलीय.’ अरोरा साहेब तिला आश्वस्त करत म्हणाले, ‘आपण आपल्या जागेवर जाऊन बसा. मी बघतो.’

आई कशीबशी जाऊन बसली. पण तिला अतिशय काळजी वाटत होती. भात्यासारखा जलद गतीने श्वास चालू होता. दोघांची सत्वपरीक्षाच होती जशी काही. छोटुलीच्या आईचीही आणि अरोरा साहेबांचीही. छोटुली जिथे लपली होती, त्या दिशेने अरोरा साहेब पुढे निघाले. त्यांना आपल्या जीवनाबद्दल काही काही आठवू लागलं. फरक एवढाच की ही मुलगी अगदीच लहान होती आणि ते शाळा संपवून कॉलेजला जायच्या तयारीत होते. त्यावेळी त्यांच्या बाबतीत असंच काहीसं घडलं होतं. आई-वडलांचं स्वप्न होतं त्यांना डॉक्टर बनवण्याचं॰ पण त्यांना डॉक्टर बनण्याची मुळीच इच्छा नव्हती. त्यांना सिनेमात जायचं होतं. डायरेक्टर बनायचा होतं. आई-वडलांचा दबाव होता, म्हणून मेडीकलला गेले खरे, पण थोड्याच दिवसात, त्यांच्यावर लादलेला तो अभ्यास सोडून ते तिथून पळाले. घरच्यांचा विरोध झाला. खूप संघर्ष करावा लागला, तेव्हा कुठे आता सगळं ठाक-ठीक आहे. तरीही ते दिवस अजूनही त्यांचा पाठलाग करतात.

मुलीला नृत्य करायला आवडत असेल, तर ती आज नक्कीच नृत्य करेल. आवडत नसेल, तर नाहीच करणार. असाच काहीसा विचार मनात घोळवत, ते त्या मुलीला समजावायला निघाले होते. आता या प्रौढ वयापर्यंत येता येता, एवढा अनुभव त्यांच्या गाठीशी नक्कीच होता, की कुठल्याही कलाकाराला दररोज आपल्याच शैलीत काम करायला लावणं काही सोपी गोष्ट नव्हती. डायरेक्टरची तीक्ष्ण दृष्टी सगळीकडे फिरत असते. कलाकाराच्या प्रत्येक हावभावावर टिकून राहिलेली असते. आज तेच कौशल्य त्यांना त्या रुसलेल्या मुलीची समजूत काढण्यासाठी वापरायचं आहे.

क्रमश:….

मूळ लेखिका – डॉ. हंसा  दीप 

Contact- Dr. Hansa Deep, 1512-17 Anndale Drive, North York, Toronto, ON – M2N2W7 Canada

Ph. 001 647 213 1817  Email- hansadeep8@gmail.com

अनुवाद –  श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
मराठी साहित्य – जीवनरंग ☆ छोटुली – भाग 3 (भावानुवाद) – डॉ हंसा दीप ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

🌸जीवनरंग 🌸

☆ छोटुली – भाग 3 (भावानुवाद) – डॉ हंसा दीप ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

(मागी भागात आपण पाहीलं – तिच्या दृष्टीने हे सगळं अस्वाभाविक होतं पण काही तरी नवीनदेखील होतं, जे तिला छान वाटत होतं. आता पुढे)

‘सल्लू’च्या कडक सूचना, वारंवार आरशात बघून आपल्या चेहर्‍यावरचे भाव दाखवणं तिला छान वाटत होतं आणि ती मजेत शिकत होती. जेव्हा ती थकायची किंवा तिला भूक लागायची, तेव्हा मग ती काहीच नीट करत नसे. ‘सल्लू’ जाणून होता की हे सगळे नियम, अडकाठ्या या मुलीसाठी नवीन आहेत. तोदेखील चोवीस-पंचवीस वर्षाचा तरुण होता आणि आपल्या करियरला या शोद्वारे नवीन परिमाण देऊ इच्छित होता. हळू हळू, त्या छोट्या मुलीची मन:स्थिती त्याच्या लक्षात आली आणि कुठल्याही प्रकारे धाक-दपटशा न दाखवता, मजेत तो तिला शिकवू लागला.

छोटुली, आपली आई, ‘सल्लू’ आणि तिच्या आगे-मागे कॅमेरे घेऊन धावपळ करणारे लोक यांचं ऐकायची, पण थकायची, पाय दुखायचे. भूक लागायची. खेळावसं वाटायचं. नाचावसं तर वाटायचंच वाटायचं, पण आपल्या मानाप्रमाणे. एका मागोमागच्या रिहर्सलनी तिच्या नाकात दम आणला होता. रिहर्सल एकदा नव्हे, दिवसातून किती तरी वेळा व्हायची. पार पार थकून जायची ती. तिला चीड यायची अशा रिहर्सल्सची. तिला चीड यायची ती चकमक कपड्यांची.

आई म्हणायची, ‘बस, आता हा एकच एपिसोड.’ पण हा एकच एपिसोड पुढे… पुढे… पुढच्या तीन महिन्यांपर्यंत चालतच राहिला. आईने तिला कधी लॉलिपॉप देऊन, कधी मनपसंत खेळणी देऊन, तिला फूस लावून, फुलवत- झुलवत ठेऊन, शोपूर्वी तयार ठेवलं. अनेकदा तिने आईसक्रीमसाठी हट्ट केला, पण तो मात्र तिने पुरवला नाही कारण आईसक्रीम खाऊन ती आजारी पडली असती, तर बरं व्हायला तीन-चार दिवस तरी लागले असते आणि मग शोचं सारं गणितच गडबडून गेलं असतं.

एका मागून एक शोच्या पायर्‍या चढत ती अंतीम फेरीपर्यंत येऊन ठेपली. आईसाठी आणि मुलीसाठीही हे सांभाळून ठेवण्याचे महत्वाचे दिवस होते. छोटुली इथे जेव्हा आली, तेव्हा जशी होती, तशीच आजूनही आहे पण आईच्या मात्र चालण्या- बोलण्या- वागण्यात खूप रुबाब आला आहे. मुलीची वाढती कीर्ती तिच्या व्यक्तिमत्वाला मोठं करत गेलीय. असं जेवण – खाण, असा थाटमाट पुन्हा कुठे मिळणार होता तिला? ज्या सामर्थ्यावर मुलगी इथपर्यंत येऊन पोचली होती, त्याच आधारावर आईचा गौरव वाढत चालला होता. मंचावर गेल्यावर मुलगी, लाजेल किंवा घाबरेल, किंवा स्टेप्स विसरून जाईल, अशी वाटणारी धाकधूक या अंतीम फेरीपर्यंत दृढ विश्वासात बदलली होती. मागच्या सार्‍या एपिसोडमधील तिचं सादरीकरण आणि परीक्षकांच्या प्रतिक्रिया यामुळे आईला खात्री वाटू लागली होती की छोटुलीच जिंकणार. दररोज फोन करून ती वडलांना प्रत्येक बारीक-सारीक गोष्ट सांगत असे. अंतीम फेरीसाठी तेही इथे येऊन पोचले. 

आई-वडलांचा उत्साह पराकोटीला जाऊन पोचला होता. आई वारंवार मुलीला संगत होती, ‘आज छान डान्स कर. मग उद्यापासून तुला जे करायचं असेल, ते कर. मग आपण आपल्या घरी जाऊ. खूप खेळू. मजा करू.’

आजचा दिवस सगळ्यांच्या दृष्टीने खूप महत्वाचा होता. सगळ्यांचं भाग्य अजमावण्याचा दिवस होता. शोच्या अ‍ॅंकरपासून कॅमेरावाले, सफाई कामगार, चहा आणणारा पोर्‍या,  सगळे काय होतय, ते बघण्यासाठी उत्सुक होते. सगळ्यांना मोठमोठ्या रकमा मिळणार होत्या. सगळ्यात मोठी रक्कम अर्थातच विजेत्याला मिळणार होती. जिंकणारी रक्कम डोळ्यापुढे ठेवून छोटुलीच्या  आई-बाबांनी किती तरी स्वप्ने रंगवली होती. आजची एकूण चकमक, दिमाख काही वेगळाच होता. फायनलला आलेल्या चार स्पर्धकांमध्ये छोटुली सगळ्यात लहान आहे, सगळ्यात चांगली नर्तक आहे, हे सगळेच जाणून होते. तिच्या चाहर्‍यावरचे भाव, तिचे बोलके डोळे, नयन विभ्रम जे काही सांगायचे, ते बेजोड असायचं. सगळ्यांना वाटत होतं, तीच पहिली येणार. तीच विजेती होणार.

त्यामुळेच चॅनेलने तिला डोक्यावर बसवलं होतं. तिला विचारलं गेलं की आई-वडलांव्यतिरिक्त ती आणखी कुणाला बोलावू इच्छिते? तिने जराही विलंब न लावता उत्तर दिलं होतं की ती  आपल्या छोट्या दोस्ताला अविनाशला बोलावू इछिते. त्या क्षणापासून उतावीळ होऊन ती  अविनाशाची वाट पाहू लागली. त्या क्षणापासून उतावीळ होऊन ती  अविनाशाची वाट पाहू लागली.

क्रमश:….

मूळ लेखिका – डॉ. हंसा  दीप 

Contact- Dr. Hansa Deep, 1512-17 Anndale Drive, North York, Toronto, ON – M2N2W7 Canada

Ph. 001 647 213 1817  Email- hansadeep8@gmail.com

अनुवाद –  श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈