मराठी साहित्य – जीवन रंग ☆ उत्तर ☆ डॉ वसुधा गाडगीळ

डॉ वसुधा गाडगिल

☆ जीवन रंग ☆ उत्तर ☆ डॉ वसुधा गाडगीळ ☆

मॉरीसेट कांगारू वाइल्ड लाइफमधून बाहेर पडून लोक  क्रूसनच्या वाटेकडे पाहत होते. आमच्या शेजारी दोन स्त्रियाँ उभ्या होत्या.  दोघीही परदेशी होत्या.  माझ्या कपाळावर कुंकू बघून एक स्त्री म्हणाली – “इंडिया !”

मी “हो”  म्हणाले.

“ब्यूटीफूल कंट्री”.

“तुम्ही भेट दिली होती का!”

“नाही, पण माझी मुलगी तिथे होती …. फॅमिली बॉन्डिंग अँड ह्यूमन रिलेशनशिप इज व्हरी स्ट्रॉंग इन इंडिया!”

“हो!” मी स्मितहास्य देत म्हणाले.

“ऑस्ट्रेलिया सुंदर देश आहे “.

“हो … सुंदर आणि विकसित देश.”

त्यांनी आपल्या देशाच्या प्रगतीबद्दल बरेच काही सांगितले. मी उत्सुकतेने चौकशी केली

“येथील सामाजिक आणि कौटुंबिक रचना आहे ?”

अचानक तिचा उत्साह थांबला.  तिच्या वार्धक्यातल्या  चेहऱ्यावरील सुरकुत्यांचे आकार एकाएकी बिघडले.  श्वास सोडत ती मोठ्या आवाजात बोलली.

“कृपया येथील रचनांबद्दल विचारू नका! खूप बीटर एक्सपिरियंस…”

मला माझ्या प्रश्नाचे उत्तर सापडले तसेच हा सांस्कृतिक वारसा जोपासण्याच्या विचारांनी मनात उत्तम आकार  घेतला होता.

 

© डॉ. वसुधा गाडगीळ 

संपर्क –  डॉ. वसुधा गाडगिल  , वैभव अपार्टमेंट जी – १ , उत्कर्ष बगीचे के पास , ६९ , लोकमान्य नगर , इंदौर – ४५२००९. मध्य प्रदेश.

मोबाईल  – 9406852480

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ लोककथा – मुकणा मोर ☆ डॉ. मंजुषा देशपांडे

☆ जीवनरंग ☆ लोककथा – मुकणा मोर ☆ डॉ. मंजुषा देशपांडे 

 

खूप वर्षांपूर्वी गोंडवनात अगदी चिमण्यासारखे मोर असत त्यावेळची गोष्ट आहे ही.  त्या राज्यात मोराला खूपच महत्व होते.  राजाच्या किरीटावर चक्राकार मोरपिसे असत. राणीच्या किरीटावर पाच आणि अंबाड्यावरच्या सुवर्ण फूलावरही 2 मोरपिसे असत.  राजवाड्यातील जवळ जवळ सर्व दागिने मोरपिसांच्या घडणीचे बनवले जात. राजमुद्रेवरही मोराचे चिन्ह होते.  राजवाड्यात सगळीकडे मोराच्या विविध छटांची चित्रे चितारलेली असत.

त्या वाड्यात शंभर सव्वाशे लफ्फेदार पिसा-यांचे मोर  आणि त्यांच्या लांडोरी इकडून तिकडे सतत बागडत असत. राजवाड्यापासून दोन कोस दूरच्या जंगलातल्या टेकडीवर एक पठार होते.

ती होती मोरनाची! प्रत्येक वर्षी ‘शरद,चैत्र आणि वैशाख पौर्णिमेच्या रात्री  पिसारा झूलवत त्या जंगलातले सगळे मोर आणि मोरणी तिथे जात आणि रात्रभर स्वर्गीय नर्तन होई. दुसर्‍या दिवशी तिथे मोरपिसांचा नुसता सडा पडे.

वास्तविक मोर सोडून दुसर्‍या प्राण्यांना त्या पौर्णिमेच्या दिवशी मोरनाचीवर जायची मुभा नव्हती.  माणसे सोडून इतर सर्व प्राणी हा नियम कसोशीने पाळत.

राजा आणि त्याची माणसे मात्र पौर्णिमेच्या संध्याकाळी टेकडीवरच्या उंच झाडांवर चढून बसत आणि त्या सोहळ्याची मजा लुटत.

त्या मोरांचा एक राजा होता.  त्याला या प्रकाराचा खूपच राग येई.  पण करणार काय! त्याने एकदा राजाला एकटे गाठून सांगितले,  “चोरून मोरनाची पहाणा-यांच्या घरात मुकणा मोर जन्माला येतो”

” मुकणा मोर म्हणजे”? राजाने विचारले

“वयात आल्यावरही ज्याला पिसारा फुटू शकत नाही असा मोर”,  मोराने सांगितले. राजाला नीटसे कळले नाही पण राणीला कळले. तिला खूप भीती वाटली.  तिचे होणारे मूल तसे जन्माला आले तर… राजाने सारेच हसण्यावारी नेले.

राणी मनात झुरू लागली. ‘ मला मुलगी होऊ दे’,   म्हणून मनोमन प्रार्थना करायला लागली.  खरे तर राज्याला चांगला  वारस मिळावा म्हणून तिने किती व्रतवैकल्ये केली होती. ती लवकरच फळाला येणार होती.

त्या दिवशीही शरद पौर्णिमा होती.  राजा आणि त्याचे मित्रमंडळ शिकारीसाठी जंगलात गेले होते. राणीला खूप अस्वस्थ वाटत होते. ती आणि तिच्या सख्या पुनव पूजेसाठी त्यांच्या देवीच्या मंदिरात जाणार होत्या. पूजा झाल्यावर जेवण आणि त्यानंतर नाचाचे फेरे.

राणी पूजा करुन परत येणार होती. खरे तर तिचे दिवस भरत आले होते पण पूजा झाली नाही तर.. तो अपशकून मानला जाई. त्यामुळे ती जड पावले  टाकत कशीबशी मंदिरात पोचली. तिने देवीची पूजा केली. ‘जन्मणारे मूल चांगले निपजू दे.’  त्याचा वंश वाढू दे!,  म्हणून डोळ्यात पाणी आणून तिने देवीकडे प्रार्थना केली.

देवळातच तिच्या पोटातून कळा येऊ लागल्या.  सख्यांनी लगबग करून सगळी व्यवस्था केली आणि राणीने एका देखण्या राजपुत्राला जन्म  दिला.

राज्यभर गूळाच्या बट्टया वाटण्यात आल्या. राजाने चहुबाजूंना सैनिक पाठवून जंगलात अस्वलाने तयार त्याच्या बाळंतीण अस्वलीसाठी तयार केलेले लाडू शोधून आणायला पाठवले.

हे लाडू फारच पौष्टिक असतात असे म्हणतात.   मोहाची फूले,  बाभळीचा डिंक, चारोळ्या आणि मध घालून ओबडधोबड बांधलेले लाडू जर कोण्या आईने खाल्ले  तर आई आणि बाळ दोन्ही टणटणीत व्हायलाच पाहिजे… रोज राणीपुढे त्या लाडवांचा ढीग पडायला लागला.

बाळ खरंच सुदृढ झालं आणि बापासारखं शूरही व्हायला लागलं.  राणीला मात्र काही खटकत होतं… कारण तिचं बाळंतपण करणा-या एका म्हातारीने तिला मुद्दाम वाड्यात येऊन. ‘राजपुत्र मुकणा मोर असणार आहे’, असे नुकतेच सांगितले होते. राजपुत्र खरे तर फक्त आठ वर्षांचा होता आणि राणीची कूस त्यानंतर काही भरली नव्हती.

राणीने देवीची रोज पूजा घालायचे ठरवले.  रोज पहाटे जंगलात फिरून सुंदर आणि सुवासिक फूले आणून संध्याकाळी देवीची सालंकृत पूजा बांधे आणि दिवसभर काही न खाता संध्याकाळी थोडा कुटकीचा भात खाऊन उपास सोडी.

हळुहळू राजाच्याही लक्षात यायला लागले . आता दोघे मिळून ती पूजा करत. काही वर्षे गेली.  राजपुत्र 13 वर्षांचा झाला. त्याच्यासारखा तिरंदाज दुसरा कुणी नव्हता. त्याची भाला फेक तर भल्याभल्यांना अचंबित करे.

मुलगा आईबापांच्या आज्ञेतही होता. पण राजा राणी मात्र झूरत होती.

एका दिवशी पूजेनंतर राजा राणी विमनस्कपणे बसले होते कारण राजपुत्र आता लवकरच 15 वर्षांचा होणार होता.  मोठा समारोह करायचा होता प्रथेप्रमाणे त्यानंतर राजपुत्र वर्षभर जंगलात राहून परत आला की त्याला युवराज अभिषेक व्हायचा होता आणि त्यानंतर वीस वर्षांच्या आत त्याचे लग्न करुन देणे भाग होते. एकमेकांशी काहीही न बोलता दोघेही हाच विचार करत होते. अचानक देवीच्या गाभा-यातून एक म्हातारी आजी बाहेर आली.  तिने राणीला सांगितले,  “सलग पाच  दिवस, मुकण्या मोराचे मांस मोराला खायला घाल.” सगळं मार्गाला लागेल.

जंगलात मुकण्या मोराला शोधणे सोपे नव्हते. कारण  त्या मोरांना मोरनाचीत प्रवेश नसतो त्यामुळे ते  पौर्णिमेचा तो मयूर क्रीडेचा सोहळा,  एखाद्या उंच झाडावर बसून टिपे गाळत पाहतात.

राजाने किंवा कुणीच असला मोर कधी पाहिला नव्हता.

पुन्हा मयूर राजा मदतीला आला.  तो म्हणाला..”मुकण्याला पिसारा नसला आणि त्याला पिल्ले द्यायची क्षमता नसली तरी तो अतिशय चिडलेला असतो  आणि तो मोरांमध्ये सर्वात बलवान असतो.  तो दहा नागांशी एकटा लढेल आणि जिंकेल.  ”  आपल्या जवळपास कुठे मुकणा मोर नाही पण सात टेकड्या ओलांडून पलिकडच्या जंगलात तो रहातो.”

राजा म्हणाला,  ” तुला कसे माहीत?

मोर म्हणाला, ” मागच्या जन्मी मी माणूस असताना मी टेकडीवरच्या झाडांवर चढून मोरनाचीवरचा पौर्णिमेचा सोहळा पहात असताना,  झाडावरून पडून मृत्यू पावलो होतो.

“खरेतर मीच मुकणा व्हायचो पण कसलासा डिंक आणि मखमलीचे किडे खाऊन मला पिसारा आला पण माझ्या पहिल्याच अंड्यातून मुकणा मोर निपजला पण त्यानं निसर्गाच्या विरूध्द जायचं नाकारलं आणि तो दूर जंगलात निघून गेला.”  मोर हुंदके देऊन रडू लागला.  राजा राणीच्या डोळ्यातूनही अश्रू वाहू लागले. ही कहाणी ऐकत मागे उभा असलेला राजपुत्र म्हणाला, ” मीही मुकणाच आहे ना,  मग त्या मोराच्या संगतीने मी त्याच्या जंगलात राहीन” मला राज्याचा लोभ नाही.  असे म्हणून तो कुणाचेही काही न ऐकता उजाडायच्या आत जंगलात निघून गेला.

राजानेही  पुन्हा कधी मोरनाची पाहिली नाही.

यथावकाश राणीला दुसरा मुलगा झाला आणि तो राजा बनला.

इकडे राजपुत्र मुकण्या मोराला भेटला आणि त्यांनी मुकण्यांची मोरनाची सुरू केली.  वास्तविक मोरनाचीचा एक उद्देश मोराचे प्रजनन असा असतो पण मुकण्यांच्या मोरनाचीत केवळ क्रीडा आणि निखळ आनंद असतो.

अजूनही नवेगावच्या जंगलातल्या एका टेकडीवर ‘मुकण्यांची मोरनाची’ आहे.  दरवर्षी वैशाख पौर्णिमेला पंचक्रोशीतले मुकणे मोर आणि मुकणे पुरुष तिथे जमा होतात आणि पुढचे चार दिवस मोठी धूम असते.

©  डॉ. मंजुषा देशपांडे

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ सखु  ☆ सुश्री श्रेया सुनील दिवेकर

☆ जीवनरंग ☆ सखु  ☆ सुश्री श्रेया सुनील दिवेकर ☆

 

चांगल रुपया येवढ मोठ ठसठशीत कुंकू लावणारी, हातात कायम हिरवा चुडा असणारी, नीट नेटक स्वच्छ नऊवारी लुगड नेसणारी, आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे सदा सर्वदा हसतमुख असणारी आमची सखु.

मध्यम बांध्याची, सावळ्या रंगाची, आणि स्वच्छ राहणारी सखु आमच्या कडे गेली कित्तेक वर्ष काम करत होती. कितीही दुःख, कष्ट असले तरी त्याचा लवलेश नाही चेहर्‍यावरती. सदा हसतमुख. पदरी तीन मुले आणि दारुडा नवरा. हिने रात्रंदिवस काम करायचे, मुलांना चार घास खाऊ घालायचे आणि रात्री नवऱ्याचा यथेच्छ मार खायचा. हा नित्य क्रम…. तरी ही माऊली हसतमुख चेहर्‍याने दुसरे दिवशी कामा वर येत होती.

एकेदिवशी तिच्या पाठीवरचे वळ खूप काही बोलून गेले. आणि तिला त्या दिवशी मी न राहून विचारले, काय झाले, मारले आहे काय काल नवऱ्याने ?? त्यावर हसत म्हणाली रोजचं हाय की. आम्ही राबायचे कष्ट करायचे, खायला घालायचे आणि वर मार खायचा. मला आधीच खूप राग आला होता तिचे वळ बघून म्हणून पोटतीडकीने, जरा रागातच म्हणाले मग सोडून का देत नाहीस त्याला?? नाही तरी स्वतः कमावतेस, तो काही तुला पोसत नाही मग हवाच कश्याला तो ? कधी नाही ते ती आज खूप त्रासलेली होती, म्हणाली स्वतः साठी नाही हो आज लढून आली आहे माझ्या हिरकणी साठी, हिरकणी म्हणजे तिची पंधरा वर्षाची वयात आलेली पोर. दिसायला गोरी पान, नाकी डोळी नीटस असलेली आईसारखीच हसतमुख. आज तिच्या बापाने चक्क पैश्यांसाठी विकायचा प्रयत्न केला होता. आज मात्र सखु भरभरून बोलत होती पहील्यांदा. नागाच्या शेपटी वर पाय दिल्यावर जसा नाग चवताळून फणा काढतो तसा. त्यावर मी परत तोच प्रश्न केला तिला, सोडून का देत नाहीस त्याला? आता मात्र ऐकुन घ्यायची वेळ माझी होती. म्हणाली कसा ही असला तरी कुंकू आहे माझं, आज त्याच कुंकवा मुळे घुबडासारख्या घाणेरड्या नजरा वर तोंड करून बघायची हिम्मत ठेवत नाहीत. हे काळे मणी गळ्यातले रक्षण करतात माझे ताई. आणी दारुडा असला तरी माझ्या वर लई प्रेम करतोय. आज कोणाच्या सांगण्यावरून पैश्यांसाठी खूप मोठी चूक करायला निघाला होता, पण आज मी पण हात उगारला बघा नाही सोडला आज त्याला, माझ्या पोटच्या गोळ्याचा सौदा करायला निघाला होता, जागेवर आणले टक्कुर त्याचे, कस काय मती फिरली त्याची काय माहीत, लई जीव आहे त्याचा पण हिरकणी वर, नशा उतरली तेव्हा ढसाढसा रडला,पोरीला कवटाळून.

आणि तिने नंतर जो मला प्रतिप्रश्न केला त्याने मात्र मी अंतरबाह्य हलले.

ती म्हणाली आमच्या सारखीअनाडी लोकं पिऊन रात्री नशेत असतात पण तुमच्या सारखी सुशिक्षित लोक दिवस रात्र नशेत असतात. फक्त पैसा मिळवणे एवढाच ध्येय. घर दार मुलं बाळ तुम्हा मोठ्या माणसांना पण आहेच की. ती म्हणाली, मी जिथे जिथे काम करते तिथे पाहिले आहे ताई घर तर तुम्ही बायकाच सांभाळता की. खर सांगु ताई तुमच्या सुशिक्षित लोकात पण पितात फक्त झाकून. हाणामारी तर तुमच्यात पण होते फक्त चार भिंतीत दडवून ठेवली जाते आणि आमची चवाट्यावर येते. ही सुशिक्षित लोकं जेव्हा त्यांची पायरी सोडतात तेव्हा जास्त त्रास होतोय ताई. फक्त पैशांचे खेळ आहेत. तुम्ही झाकून ठेवता, गरिबी काही झाकून देत नाही एवढेच. उलट आम्ही बोंबाबोंब करून अन्याय विरूद्ध आवाज उठवतो वेळ प्रसंगी हातही उगारतो, पण तुम्ही निमुटपणे सोसता आणि कुणाला कळायला नको म्हणून लपवून सहन करता.

खरच की, ती एवढ बोलून गेलीपण दुसर्‍या कामावर. आणि मी बधीर मनानी नुसते विचार करत होते. ती बोलून गेली ते अगदी खर होत. अशी कित्येक सुशिक्षित घर आहेत जिथे नवरा रोज पिऊन येतो मारहाण करतो, ज्याची बाहेर आपल्या एज्युकेटेड लोकांच्या भाषेत गर्लफ्रेंड असते, अशिक्षित त्याला रखेल म्हणतात. आपण थोबाडीत खाऊन चेहेरा लपवितो तर त्या एक घेऊन दोन ठेऊन द्यायची हिम्मत ठेवतात.

मग नक्की अबला कोण आपण की त्या? एक ना अनेक प्रश्न मला भेडसावत होते ज्याची उत्तरे माझ्या जवळ पण नव्हती.

सहज मनाच्या कोपऱ्यातून☺️

 

©  सुश्री श्रेया सुनील दिवेकर 

मो – 9423566278

30.8.2020

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ दृष्टी ☆ सुश्री प्रियदर्शिनी तगारे

☆ जीवनरंग ☆ दृष्टी ☆ सुश्री प्रियदर्शिनी तगारे

 

मोबाईल वाजला. गुडघ्यावर हात चोळत उमाताई उठल्या. आशिषचा फोन होता.

“हॅलो .आई , कशी आहेस ?” त्याचा आवाज ऐकून क्षणभर त्यांच्या मनाला टवटवी आली.

“मी बरी आहे रे. तू कसा आहेस?मुलांचं काय चाललंय? रश्मीची नोकरी…..”

हळूहळू आपला आवाज निर्जीव होत चाललाय असं उमाताईंना वाटलं.त्या नुसत्या “हूं….हूं ” करीत राहिल्या.

फोन ठेवताच एकाकीपण दाटून आलं. अशोकराव होते तोपर्यंत असं कधीच वाटलं नव्हतं.बाहेर जाणंही कमी होत गेलं. जवळपासच्या फ्लॅटमधल्या सगळ्या नोकरीला गेल्या सारं सामसूम ! घरातलं काम करायला सुशी यायची तेवढीच काय ती घराला जाग.

आताशा संध्याकाळ बरोबर उदासी दाटून येते. टी. व्ही. बघण्यातही मन रमत नाही. रात्री ची अवेळी जाग येते. उगाचच घुसमटतं. जीव घाबरतो.

आज आशिषचा फोन येऊन गेल्यावर रात्रभर झोप लागली नाही.पहाटे पहाटे डोळा लागला.दहा वाजता सुशी आली.तिच्या पाठोपाठ एक काळी सावळी बाई आत आली , साडीचा पदर डोक्यावरून घेतलेली.

” ही माझी आई. कालच्याला आलीय. म्हनलं चल ,घरात बसून कट्टाळशील.”

तोंडभरून हसत ती बाई सुशीच्या मागोमाग किचनमध्ये गेली.थोडावेळ सुशीला मदत करुन हॉलमध्ये आली.

“बसा” असं उमाताईंनी म्हणताच जमिनीवर टेकली.

“कुठं असता तुम्ही ? ”

“मी व्हय तकडं सांगुल्यात  ”

“कोण कोण असतं घरात ?”

“म्या येकलीच की ! पोरी लगीन हून गेल्या. पोरगं तकडं म्हमईला नालासुपारीत कामाला हाय.  ”

” एकट्यानं रहायला भीती नाही वाटत ?”

” भ्या ? कशाचं वो ?”

“भीती हीच की आजारपणाची ,मरणाची .”

त्यावर ती खळखळून हसली.

“त्येचं कसलं आलंय  भ्या? पांडुरंगानं दिलाय ह्यो जीव. समदं त्येच्याच हाती. त्यो चल  म्हनला का जायाचं !” असं म्हणून तिनं गळ्यातली तुळशीची माळ चाचपली.

उमाताई क्षणभर तिच्याकडं बघत राहिल्या. एकाएकी त्यांना वाटलं ;घरात लख्ख् प्रकाश भरुन राहिलाय

 

©  सुश्री प्रियदर्शिनी तगारे

मो :9246062287

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ तिबेटी लोककथा – समुद्र खारा नव्हता तेव्हा ☆ डॉ. मंजुषा देशपांडे ☆

☆ जीवनरंग ☆ तिबेटी लोककथा – समुद्र खारा नव्हता तेव्हा ☆ डॉ. मंजुषा देशपांडे

खूप वर्षांपूर्वी…जेव्हा समुद्र खारट नव्हता.  पृथ्वीचा बराचसा भाग घनदाट जंगलाने व्यापला होता.  त्यावेळी एका जंगलाने वेढलेल्या विस्तीर्ण डोंगर पठारावर  सूर्य देवाचे राज्य होते. राजा प्रजेचा आवडता होता. राजाची प्रजा शहाणी होती.  मंत्रीमंडळ राजाची आज्ञा मोडत नव्हते. कोणीही बंडखोर अजून पैदा झाला नव्हता.

बायको एकच होती. सोन्यासारख्या दोन राजकन्या होत्या आणि एकापेक्षा एक बुध्दीमान आणि धाडसी तीन राजपुत्र होते. वेळेवर पाऊस पडे.  शेती पिके.  फळाफूलांचे हंगाम भरपूर असत. लोक उत्सवप्रिय होते.  राज्यातला प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या कलेत निपुण होता. त्यामुळे गाणे,  बजावणे,  नाच, नाटके यासारख्या कार्यक्रमांनी रात्री उजळलेल्या असत.

अर्थातच लोक आरोग्याने मुसमुसलेले आणि अतिशय आनंदी होते. सगळं कसं हवं तसं.  देखणं आणि रेखीव.

एका संध्याकाळी एक देवदूत आणि त्याची पत्नी आकाशातून विहरत चाललेले होते. त्या दिवशीही गावात कसलासा उत्सव होणार होता. सगळीकडे मोगरा आणि गुलाबाच्या माळा लावल्या होत्या. गरमागरम मिष्टान्नांचा घमघमाट सुटलेला होता.  रंगीबेरंगी कपडे आणि फूलांच्या माळांनी सजलेले लहान थोर लगबगीने उत्सवाच्या ठिकाणी निघाले होते.

आज राजदरबार आणि गावातील मुले विविध प्रकारे मनोरंजनाचे कला प्रकार सादर करणार होते.  ती मुले संगीत, वादन,  नर्तन आणि नाटक या सर्वातच प्रवीण होती.  दरवर्षी हा उत्सव अभिनव पध्दतीने सादर करण्याची त्या गावातली प्रथा असल्याने, सर्वजण अतिशय उत्सुकतेने कार्यक्रमाची वाट पहात होते.

राजा राणीचे आगमन होताच कार्यक्रमाला सुरूवात झाली. पहिल्याच नांदीला लोकांनी माना डोलावल्या.

……तर त्या आकाशातल्या देवदूताची पत्नी त्या गावातला आनंद पाहून स्वतःही खुदुखुदू हसू लागली आणि ते विमान गदागदा हलायला लागलं.  देवदूताला फारच राग आला, तो तिरसटल्या स्वरात म्हणाला, “गप बस ग ए.. विमान पडेल तुझ्या हसण्याने… पृथ्वीवर कोणताही आनंद फार काळ टिकत  नाही, लक्षात आहे ना!”  त्यावर ती पत्नी ठासून म्हणाली,  “काळ बदलतो.  माणसंही बदलतात.” त्यावर देवदूताने एक सुस्कारा सोडून विमान आणखी उंचावर नेत म्हटले, ” माणसे आहे त्यात समाधानी नसतात आणि त्यांना नेहमीच अधिकचे काहीतरी हवे असते.  त्यामुळेच ते स्वतःबरोबर

दुस-यांचाही नाश ओढवून घेतात.”

मी म्हणतोय त्याचा प्रत्यय तुला लवकरच येईल.” देवदूत काहीशा विषादाने म्हणाला.

कदाचित केवळ त्यामुळेच त्या उत्सवानंतर मधल्या रिकाम्या काळात त्या राणीला एक व्रत करायची बुध्दी झाली असावी.  ते व्रत म्हणे राज्य हजार वर्ष पर्यन्त टिकण्यासाठी होते.  प्रथम राजाने ती कल्पना हसण्यावारी नेली.  तो म्हणाला,  ” आपण शंभर वर्षापुढे जगणार नाही,  आपली मुले,  नातवंडे,  पंतवंडेही हजार वर्षापर्यन्त जगत नाहीत. आपल्यानंतर आपला वंश हजार वर्षापर्यंत टिकतो का नाही याची आपल्याला कशाला चिंता!

राणीला ते मुळीच आवडले नाही. ती अगदी हट्टालाच पेटली.  ते 15 दिवसाचे आणि अगदी सोपे व्रत होते.

रात्रीला दिवस मानायचा आणि दिवसाची कामे रात्री करायची आणि रात्रीची कामे दिवसा.  असे 15 दिवस केले की संध्याकाळी देवीची पूजा करून लोकांना मेजवानी द्यायची.

रात्री जागरण करायचे. यज्ञ करायचा. देवीला संतुष्ट करायचे.. ..

आणि सोळाव्या दिवसापासून परत सगळे पूर्वीसारखे…

राजा काही त्याला तयार नव्हता.

राणी सतत राजाच्या मागे भुणभुण करी आणि राजा तिला उडवून लावी.

मग राणीने ही कल्पना प्रधान आणि सेनापती यांच्या बायकांसमोर बोलून दाखवली.

त्या राज्यात सेनापतीला युध्दाचा पोशाख घालून आपल्या शिपायांसह रस्त्यावरून मिरवत जाण्याव्यतिरिक्त काही काम नसे. त्यामुळे सेनापती आणि त्याची बायको सतत सोंगट्यांचा खेळ मांडून हास्य विनोद करत बसलेली असत.

सेनापतीण बाईंनी या व्रताची गोष्ट  नव-याच्या कानावर घातली. सेनापतीलाही थोडे विचित्रच वाटले…’असले कसले व्रत… ते सुध्दा वंश 1000 वर्षे राज्यावर असावा… म्हणून..’

पण बाईंनी बसता उठता त्याच्या डोक्याशी कटकट केल्यामुळे तो राजाशी त्याबद्दल बोलायला तयार झाला.  इकडे प्रधानाचेही तेच झाले.

सेनापती आणि प्रधानजी दोघांनीही राजाकडे त्या व्रताचा विषय काढला आणि मुत्सद्दीपणे त्यांनी राजाचे मन त्यासाठी  वळवले.

राजा म्हणाला.. ” त्या व्रतामध्ये रोज देवीची पूजा करावी लागेल. ” हे माहिती आहे ना.. रोजच्या पूजेसाठी डोंगरापलिकडच्या राजाच्या तळ्यातली 100 कमलपुष्पे आणायची आहेत,  ती देखील त्यांच्या नकळत!

हे मात्र सेनापतीला भारी आवडलं.  सेनापती म्हणाला.. “अहो रोज नव्या दमाच्या शिपायांची तुकडी पाठवेन आणि कमळं आणवेन. ” लेकाच्यांना काहीच काम नसल्याने सोदे झालेत नुसते…..

खरे तर त्या तिघांनाही त्या व्रतात ना दम वाटत होता ना रस!

पण असो… व्रताची तयारी जोरात सुरू झाली.  विणकर, सोनार आणि माळी भराभर कामाला लागले.  चहूबाजूंनी मंडप घातले. पताका लावल्या.

देवीचे देऊळ रंगवले.  रांगोळ्या काढल्या. या व्रतामध्ये दिवसाची कामे रात्री करायची होती आणि सूर्य उगवल्याबरोबर झोपायचे होते. सूर्य मावळायच्या सुमाराला उठून प्रथम देवीची पूजा करून नित्य कामांना सुरुवात करायची होती.  मध्यरात्री आरती झाली की जेवून पुन्हा पहाटे शेजारती करून घरी जाऊन झोपायचे..

कसलं हे विचित्र व्रत!  प्रजाजन म्हणाले.  पण त्यांचा राजावर विश्वास.  त्यामुळे कोणी काही उघड बोलले नाही. अखेरीस व्रताच्या रात्रीचा दिवस उजाडला. शिपायाची एक तुकडी डोंगरापलिकडे आदल्या दिवशीच रवाना झाली होती.

तिथल्या एका सुंदर तळ्यात असंख्य कमळे फूलली होती.  शिपायांनी भराभर शंभर कमळे तोडली आणि परतायला निघाले.  शंभर कमळावर एका फूलाला हात लावायचा नाही अशी त्यांना सक्त ताकीद होती.

पहिल्या रात्री कमळांसकट सांग्रसंगीत पूजा झाली पण मध्यरात्री कुणाला जेवण जाईना.  अंधार असल्यामुळे दिवसाची कामेही होईनात.

पहाटे पटापट लोक अंथरूणात शिरले.  दुपार नंतर जागे झाले तर बहुतेकांचे पोट बिघडलेले. डोकेही दुखत होते.  कसेतरी सगळेजण देवळातल्या सायंपूजेला गेले उत्साह तर नव्हताच.

त्या दिवशीही मध्यरात्रीचे जेवण जवळ जवळ वायाच गेले.  खुद्द राणीला झोप आवरेना पण आपल्या वंशाचे राज्य हजार वर्षे टिकणार…या आशेने… तिने मनाला ढळू दिले नव्हते.

आता शिपायांनी कमळे आणली खरी… पण त्या राजाच्या शिपायांना चोरीचा पत्ता लागल्याने त्यांची आणि या शिपायांची चकमक झाली.

त्यात यांचे दोघे आणि त्यांचे तिघे जखमी झाले. पण ती ही रात्र पार पडली.  रात्री झोप न झाल्याने लोक चीडचीड करायला लागले.  एकमेकांवर डाफरू लागले.

राजा तर भयंकर वैतागला होता. पूजेच्या वेळी त्याने राणीचा हात जोरात हिसडला.. राणीच्या डोळ्यात पाणीच आले.

तिस-या दिवशी दुपारी  या गावातले सगळे गाढ झोपेत आणि पहा-यावरील शिपाई पेंगत असताना त्या राज्यातले काही सैनिक त्यांच्या सेनापतीसह या राज्यात आले त्यांनी त्या पेंगुळलेल्या शिपायांच्या मुसक्या आवळल्या आणि ते राजाच्या गुलाबाच्या बागेत शिरले.  फूले तर सगळी तोडलीच वर बागेची नासधूसही करून ठेवली.

प्रमुख  माळ्याला बांधून ठेवले माळीणबाई राजाकडे पळत सुटल्या.  त्यांना पळण्याच्या शर्यतीत मिळालेली बक्षिसे अशी कामी आली.

राजा डोळे चोळत उठला.  भूपाळी नाही तरीही भाटही जागे झाले.

यांचे सेनापती लगबगीने शिपायांना घेऊन निघाले.  अगोदरचे आळशी बनलेले शिपाई आणि त्यात झोपाळलेले.

त्यांच्या नव्या दमाच्या शिपायांना अगदी सहज यांच्या सेनापतीलाच कैद करता आले.  राजा तसा चतुर होता.  त्याने त्यांच्या सेनापतीला बोलणी करण्याचे निमंत्रण दिले.  त्या वेळेला फारशा लढाया होत नसत. त्यामुळे तो सेनापतीही फार तंदुरुस्त नव्हता. शिवाय डोंगरावरून दौडत आल्याने त्याला तहान भूकही जबरीची लागली होती.

त्याने यांच्या सेनापतीला काटेरी बुंध्याला बांधून ठेवले आणि तो त्याच्या शिपायांसकट राज्याकडे गेला.

इकडे सेनापतीच्या बायकोने तिच्या नव-यावर पहारा करणा-या दहा शिपायांना जेवायला बसवून तिच्या मैत्रिणींना आग्रह करायला लावला आणि स्वतः जाऊन

नव-याला सोडवले. त्याला ठिकठिकाणी काटे टोचल्यामुळे त्याचे शौर्य जागे झाले त्याने एकट्याने त्या जेऊन ढेकर देत असलेल्या शिपायांना असे धोपटले म्हणता की राजवाड्यात चर्चेसाठी गेलेल्या त्यांच्या सेनापतीच्या कानावर त्यांच्या किंकाळ्या पोचल्या.

तो सेनापती त्याच्या शिपायासह या सेनापतीशी लढायला लागला.  राजा डोके धरून बसला आणि राणीवर कावायला लागला.  ते शिपाई आणि सेनापती पळून गेले खरे पण सापाच्या शेपटीवर पाय पडलाच होता.

एवढे होईपर्यंत संध्याकाळ झाली.  आज लोकांना दिवसाही जागरण झालं.

पर-राज्यातून कमळे तर आली पण पूजेसाठी कोणाची मनःस्थिती असणार.. पहा! सगळं चांगलं चाललं असताना राणीला खुळचट व्रत करायची दुर्बुध्दी सुचली.

साध्या कमळावरून शेजारच्या राजाशी वैर घ्यावं लागलं.  शेवटी ते वैर संपावं म्हणून त्या राजाच्या दोन बावळट राजपुत्रांशी राजाला त्याच्या गोड राजकन्यांचा विवाह करावा लागला.  पण कायम कुरबुरी… वैर धुमसतच राहिलं.  सतत चकमकी,  असुरक्षित आयुष्य…त्यामुळे लोक चिडचिडे बनले.  बायका पोरांच्या रडण्यामुळे समुद्र खारट बनला.

परत काही वर्षानंतर जेव्हा देवदूत …आकाशात त्याच्या बायकोबरोबर फिरत होता तेव्हा डोंगर बोडके झाले होते आणि जंगले उजाड,  माणसे चिडचिडी आणि राजा राणी वैतागलेले… कुठे निषेधाच्या घोषणा… कुठे कसल्या तरी फालतू कारणामुळे सत्कार… असे सगळे अराजक माजलेले होते…

देवदूत म्हणाला… पहा!  सगळे सुरळीत चाललेले असताना राणीला वंश हजार वर्षे टिकवावासा वाटला.. इकडे स्वतःचे आयुष्य किती ते माहिती नाही.

माणसाच्या क्षुधांना अंतही नाही आणि पारावार नाही… देवदूताच्या पत्नीने खिन्नपणे मान हलवली.

आणखी काय करणार!

 

©  डॉ. मंजुषा देशपांडे

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆  हतबल ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

☆ जीवनरंग ☆  हतबल ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

चपला काढून जवळजवळ पळतच रेखा स्वयंपाकघरात  आली. ” काकू– काकू ऐका ना”….मी वळून पाहिलं आणि पहातच राहिले. नवी कोरी झुळझुळीत साडी नेसलेली, व्यवस्थित वेणी घातलेली आणि गोड हसत उभी असलेली रेखा आज खूप आनंदात दिसत होती. ” कशी आहे माझी साडी ?”…. “मस्तच. अगदी खुलते आहे तुझ्यावर “.. मी मनापासून म्हणाले. पण तिच्यापेक्षा तिच्या चेहेऱ्यावरचा

आनंदच जास्त सुंदर वाटत होता मला….” मिश्टरांनी आणलीये माझ्यासाठी. आणून रात्री गुपचूप कपाटात ठेवली होती”… तिला इतकी खुशीत असलेली मी आजपर्यंत कधीच पाहिली नव्हती. मी पूजेसाठी ठेवलेला गजरा नकळत तिला दिला. घाईघाईने तो केसात माळून, आरशासमोर उभी राहून, ती वेगवेगळ्या कोनातून स्वतःकडे हसत पहात होती. नंतर काम करतानाही गुणगुणत होती, स्वतःशीच हसत होती.

रेखा….२१-२२ वर्षांची असेल. सुंदर नसली तरी नीटस होती. नीटनेटकी राहायची. चेहरा शांत पण डोळे मात्र बोलके होते. दोन वर्षांपूर्वी पासून आमच्याकडे घरकामाला  येते आहे. सुरुवातीला सतत बावरलेली, घाबरलेली वाटायची, हळूहळू रुळली. नवरा वयाने बराच मोठा असावा. आईच्या हट्टामुळे हिच्याशी नाईलाजाने लग्न केल्याचं सारखं तिला ऐकवायचा म्हणे. पण हिच्या बोलण्यात कधीच कुठली तक्रार जाणवायची नाही. फारसं न बोलता, शांतपणे काम करायची. हळूहळू मला ती आवडायला लागली होती. पण ही आजची रेखा, याआधी मला कधीच दिसली नव्हती. आज तिच्या अंगोपांगी फुललेला तो निर्मळ आनंद पहाताना मलाच खूप छान वाटत होतं …..

पटापट काम संपवून ती निघूनही गेली …… आणि आज आता मी सकाळपासूनच तिची वाट पहात होते. दोनच माणसांच्या आमच्या घरात, काल तिच्यामुळे एक वेगळाच आनंद दरवळला होता … त्या आनंदाची मी वाट पहात होते. …‘ अजून का नाही आली ही ?‘.. मी अस्वस्थ व्हायला लागले होते.

—- बेल वाजली. मी घाईघाईने दार उघडलं… माझा माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. रेखाच आली होती….. पण ही अशी ?….. लालबुंद डोळे… विस्कटलेला, सुजलेला चेहरा… अंगावर ठळक दिसणाऱ्या मारल्याच्या खुणा….. खूप खूप केविलवाणी दिसत होती. आत आली,आणि ‘ आई ‘….म्हणत

एकदम गळ्यात पडून रडायलाच लागली. ‘आई‘ ?……माझ्या मनात प्रचंड कालवाकालव होत होती. त्या क्षणी तिला आईच्या मायेची किती तीव्र गरज होती हे मला जाणवत होतं. मी कसं -तरी तिला खुर्चीत बसवलं. पाणी दिलं. आणि नुसतीच तिच्या डोक्यावर, पाठीवर हात फिरवत राहिले.

जरा वेळाने तिचं रडणं थांबलं, आणि तिने आदल्या रात्री घडलेला सगळा प्रकार मला सांगितलं …….. तिने कौतुकाने, हौसेने दिवसभर मिरवलेली साडी नवऱ्याने तिच्यासाठी नाही, तर त्याच्या ‘ मानलेल्या‘ बायकोसाठी आणली होती म्हणे. आणि हिने ती नेसलेली पहाताच नवरा प्रचंड भडकला होता. कसलाही विचार न करता त्याने तिला गुरासारखे मारले होते. शिव्यांचा भडीमार करत तुडवले होते. आणि तिच्या अंगावरची साडी फराफरा ओढून, फाडून टाकून घरातून निघून गेला होता. ही पार कोलमडून गेली होती. उपाशीपोटी रात्रभर रडत बसली होती. सकाळी नाईलाजाने उठून लटपटतच घरातली कामं तर उरकली होती. पण तिला घरात थांबावं असं वाटत नव्हतं. नवऱ्याची खूप भीती वाटत होती. त्याला आवरू शकेल आणि हिला सावरू शकेल असं हिच्या आयुष्यात कुणीच नव्हतं. म्हणून मग कामाला आली होती. माझ्यात तिच्या आईला शोधत होती. … फार फार हत- बल होऊन गेली होती….

आणि मी ?….मला तिच्यापेक्षा जास्त हतबल झाल्यासारखं वाटत होतं. जनरीतीनुसार आज ना उद्या ती नाईलाजाने वास्तव स्वीकारेलही. पण मी प्रत्यक्षात काय करू शकणार होते तिच्यासाठी? मला आई म्हणण्याची परवानगी तेवढी देणार होते का शहाजोगपणाने?….प्रत्यक्षात तिची आई होणं झेपणार होतं का मला खरंच? मलाच खूप हतबल झाल्यासारखं वाटतं होतं. फार फार अगतिक वाटतं होतं …….

 

© सुश्री मंजुषा सुनीत मुळे

पत्ता : ४, श्रीयश सोसायटी, ५७१/५७२, केंजळे नगर, पुणे  ४११०३७.

मोबाईल: ९८२२८४६७६२.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ लघुकथा – विचार … भावानुवाद ☆ श्रीमती मीनाक्षी सरदेसाई 

श्रीमती मीनाक्षी सरदेसाई 

☆ जीवनरंग : लघुकथा – विचार … भावानुवाद ☆ श्रीमती मीनाक्षी सरदेसाई 

गीताताई मला मोठ्या बहिणीसारखी होती. तिचे यजमान वारले तेव्हा मी परदेशात होतो. पुढचं एक वर्षही मी स्वदेशी येऊ शकलो नाही. आता मात्र आल्याबरोबर मी तिला भेटण्यासाठी सरळ तिच्या घरी गेलो. ती घरी नव्हती. ती शाळेत गेली आहे असं कळलं तेव्हां मी शाळेत गेलो. ताईच्या चेहऱ्यावर दुःखाचा लवलेशही नव्हता. उलट तिने माझं हसतमुखाने स्वागत केलं, आणि माझी समजूत घातली. “हेबघ, आपण कितीही रडलो तरी तुझे जिजाजी परत येणार नाहीत. मला दुःखी बघून इतरांना वाईटच वाटेल. म्हणून मी स्वतःला गुंतवून घेऊन आनंदी रहाण्याचा प्रयत्न करते. शाळेची प्रगती करण्याचं ध्येय्य मी ठरवलं आहे. मला स्वतः ला मूल नाही, शाळेतल्या विद्यार्थ्यांनाच मी माझी मुलं मानीन आणि शिक्षकपणाचा धर्म प्रत्यक्षात आणीन.

मूळ हिंदी लघुकथा-‘सोच’ – लेखक – डॉ. नरेंद्र नाथ लाहा

मूळ लेखकाचा पत्ता—२७,ललितपुर कॉलोनी, डॉ. पी. एन. लाहा मार्ग, ग्वालियर—म.प्र.-  ४७४००९ मो.९७५३६९८२४०.

मराठी अनुवाद – श्रीमती मीनाक्षी सरदेसाई 

मो. – 8806955070.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ माणूसकीची हार..अनुवादित कथा.. ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

☆ जीवनरंग ☆ माणूसकीची हार ..अनुवादित कथा.. ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर☆

चौधरी सगळ्यांना मदत करायचे,  हे सगळ्या कॉलनीत माहीत होतं. मानवता,  सत्य,  ईमानदारी यांची ते जणू प्रतिमूर्तीच होते. त्यांचं घर कोपर्‍यावर होतं. घर दोन्ही बाजूंनी उघडायचं. घराला दोन दरवाजे होते. मागचा दरवाजा आणि एक खिडकी कायम बंद असायची.

ते सुट्टीचे दिवस होते. त्यांची पत्नी मुलांना घेऊन माहेरी गेली होती. सकाळी सकाळी चौधरी म्हशीचं दूध काढून घरात शिरणार, एवढ्यात एक तरुण तिथे धावत धावत आला आणि म्हणाला,  `भाऊसाहेब मला वाचवा. माझ्यामागे चार गुंड लागलेत. मी हात जोडतो. आपले उपकार मी कधीच विसरणार नाही. कृपया मला कुठे तरी लपवून ठेवा.’

`आपण कोण?  कुठून आलात?   प्रकरण काय आहे? ‘

तरुण म्हणाला. मी ड्रायव्हर आहे. त्यांची गाडी एकदम मधे आली. थोडासा अ‍ॅक्सिडेंट झाला.!  बस!’ चौधरींची माणुसकी उफाळून आली. त्यांनी मागे-पुढे काही बघितलं नाही. त्याला घरात लपून बसायला सांगितलं आणि स्वत: दरवाजात उभे राहिले.

थोड्याच वेळात चार गुंड धावत आले. त्यांनी चौधरींना विचारलं, `कुणी तरुण इथे धावत आला होता का? ‘

चौधरी म्हणाले, `इथे कुणीच आलं नाही. सकाळपासून मी इथेच बसलोय. काय झालं?’ तो माणूस अ‍ॅक्सिडेंट करून इथे पळून आलाय. ‘  चौधरींनी माणुसकीची बाजू घेत त्यांना समजावण्याचा बराच वेळ प्रयत्न केला. `याचे परिणाम वाईट होतील.’  चारी गुंड त्यांना ताकीद देऊन हसत हसत पुढे गेले.

चौधरींनी कुलुप उघडलं आणि ते आत गेले. बघतात तो काय?  गोदरेजचे कपाट,  पेट्या सगळ्यांनी कुलुपे तोडलेली होती. कपडे पसरलेले होते. दागिने, रोख रक्कम गायब झालेली होती. मागचा दरवाजा उघडलेला होता. त्यांनी आपलं डोकं  बडवून घेत म्हंटल,  `हा माणुसकी दाखवल्याचा परिणाम.  काय करणार?  ते पाचही जण एकमेकांना मिळालेले होते. त्यांच्या योजनेपुढे माझी माणुसकी हरली.

 

मूळ कथा – इंसानियत हार गई  मूळ लेखक – शिवचरण सेन शिवा

 

अनुवाद – श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

 

ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ लोककथा – पिसाची करामत ☆ डॉ.  मंजुषा देशपांडे

☆ जीवनरंग ☆ लोककथा – पिसाची करामत ☆ डॉ.  मंजुषा देशपांडे ☆

एका जंगलात एक आजी आणि तिचा नातू रहात असे.  आजी दिवसभर फिरुन रानातून फळे,  बिया, मूळ्या गोळा करी  आणि थोडे घरासाठी ठेवून बाकीचे जवळच्या गावात विकून टाकी.  तिचा माल शेलका असल्याने लवकर विकला जाई.

तिचा नातू मात्र भयंकर आळशी होता. सूर्य डोक्यावर येईपर्यंत लोळत पडे आणि फारतर जवळपासच्या काटक्या वेचून आणी. दिवसभरही तो उगीचच इकडे तिकडे करी.  जेवायची वेळ झाली की तो आजीला लाडीगोडी लावी.

आजीच काय पण आसपास रहाणारेही त्याला समजावत. त्याने आता कामधंदा केला पाहिजे म्हणून बजावत.

या आजीचे एक छोटेसे शेत होते,  डोंगराच्या पलिकडे आणि ओढ्याळ ओढ्याकाठी… तिथे ती धान आणि कुटकी, डाळी लावे.  तिथे जायचे म्हटलं की मात्र नातवाला उत्साह येई.  त्या दिवशी मात्र तो लवकर उठे आणि लवकर आवरूनही बसे.

तो तिथेही काही कामे करत नसेच पण तिथे त्याची मैत्रीण होती जीवा.  जीवा  अगदी त्याच्या विरूध्द …शहाणी आणि कामसू..

हा नातू लंब्या चवड्या बाता मारी,  तो म्हणायचा.. ‘तो काही हलकीसलकी कामे नाही करणार तर म्हणे तो एकच काम असे करेल की.. ‘ ..मग तो जीवासाठी काळा अबलख घोडा आणेल.  पाटलाच्या वाड्यापेक्षा टोलेजंग घर बांधेल.. जरीकाठी मुंडासे बांधून घुंगराच्या माळा घातलेल्या पांढ-या शुभ्र बैलजोडीच्या गाडीत बसेल.. आणि शेजारी लाडूचे मोठे ताट..असेल.. . मनात येईल तेवढे लाडू खाईल.

एकट्या जीवाचा त्याच्या या असल्या बोलण्यावर विश्वास होता..

बाकी सगळेजण त्याचे बोलणे करमणूकीसाठी ऐकत आणि टाळ्या वाजवून हसत.  त्याला लोक हसतात ते पाहून आजीला वाईट वाटे.

एक दिवस त्याची आजी त्याला खूपच रागवली,  तिने त्याला कामधंदा शोधण्यासाठी घरातून जवळ जवळ हाकलूनच काढले.

नातू हिरमुसून चालायला लागला,  खिशात बोरं होती..  एकेक बोरं खात खात जंगलात निघाला…असं फिरता फिरता उन्हं डोक्यावर आली.  पोटात भूक जाणवायला लागली.

तो थकून एका झाडाखाली मोठ्या दगडावर बसला तितक्यात त्याला..तिथे जवळच एका दुसऱ्या झाडाखाली त्याला एक मोठे निळ्या रंगाचे पीस दिसले.  हात लांबवून त्याने हातात घेतले तर काय… पीस त्याला म्हणाले… “आज दिवसभर चालून कसं वाटतंय तुला, रोज नुसता लोळत पडतोस ते… ” नातू त्याला म्हणाला… ‘एवढी बोलण्याची अक्कल आहे तर मला खायला घेऊन ये काहीतरी.. पीस म्हणाले, काय हवयं सांग,  लगेच आणतो.. नातू म्हणाला, “चार रोट्या आण आणि भाजी आण बरबटीची.”  लगेच ताट हजर.. वर पाण्याचा गडू पण.. नातवाने आजूबाजूला पाहिलं.

मग तो पिसाला म्हणाला… “लाडू आण बरं.”!. थोडे का चांगले ताटभर लाडू आले.

एवढे खाऊन आणि गटागट पाणी पिऊन नातवाला गाढ झोप लागली.

त्याला स्वप्नात त्या पिसाने त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण केलेल्या दिसल्या.  त्याला जाग आली तेव्हा चांगलीच संध्याकाळ झाली होती.

त्याच्या आजूबाजूला मात्र आणखी  काही निळीभोर पिसे पडली होती. त्याला एकदा वाटले, उचलावी सगळीच.. पण तो आळशी असला तरी लालची नव्हता.. पण त्याचे पीस कसे शोधावे… सगळी पिसे एकसारखीच होती.

मग त्याने त्यातल्या त्यात आठवून एक पीस उचलले आणि भराभर.. जवळ जवळ पळतच घरी पोचला.  घरी आजी काळजी करत होती,  त्याला म्हणाली, “हात पाय धुवून ये गरम भाकरी खायला..”.

तो म्हणाला,  भाकरी!  अगं लाडू,  पुरणपोळी काय हवं ते सांग.

हा नातू गोष्टी मोठ्या छान सांगे.

आजीने काही एक न बोलता एका थाळीत भाकरी आणि भाजी वाढली.  इकडे नातवाने पिसाला सांगितले.. पुरणपोळी,  लाडू आणि पाण्याचा गडू.. एक नाही दोन नाही.. काहीही आले नाही.

तो अगदी रडकुंडीला आला.

आजी म्हणाली, ” अरे तू ते जादूचे पीस समजून दुसरेच पीस घेऊन आला असशील.

त्या रात्री नातवाला कशीतरी झोप लागली. अगदी पहाटे उठून तो परत जंगलात गेला. सगळीकडे फिरूनही पिस काही दिसेना, शेवटी  आदल्या दिवसासारखेच एका झाडाखाली थकून बसल्यावर त्याला ते निळे पिस दिसले.

त्याने त्या पिसाला सगळी कहाणी सांगितली. तो पिसाला म्हणाला, “आता मी तुला माझ्या जवळच ठेवतो बघ.

पीस म्हणाले,” असं नाही चालत! “मला कुणीच पकडून ठेवू शकत नाही. “बाकीच्या पिसातून तुला मला शोधून काढावं लागेल” पण त्या दिवसाचे त्याला जेवण मात्र मिळाले. पण घरी नेण्यासाठी लाडू घ्यावे म्हटले तर ते पिसाबरोबर गायब.

त्याही  संध्याकाळी परत तसेच .झाले.. बघता बघता महिना उलटला.  हा मुलगा महिनाभर रोज पहाटे उठून जंगलात जाई,  मग जाता जाता फळे,  फूले,  बिया गोळा करी,  एकदा तर भलं थोरलं मधमाशांचे पोळेही घेऊन आला. जंगल एवढे देखणे आहे हे त्याला प्रथमच कळले. किती झाडे… किती फळे …किती पक्षी,..  किती प्राणी!

प्रत्येकाच्या नाना त-हा…हळूहळू त्याला प्रत्येक फूला फळाचे उपयोग कळू लागले. रोज दुपारी झोप येईनाशी झाली.  कोणत्या झाडाखाली ते पीस होते हे ही तो विसरून गेला.

आजी मात्र खूश होती.  आळशी नातू सुधारला.

एक दिवस  जंगलातून त्या गावचा राजा चालला होता.  राजाला जंगलात सुंदर फूले दिसली.  राजा स्वतः घोड्यावरून उतरला.

हया मुलाने डोंगरावरून पाहिले..तो ओरडला.. “अहो ती विषारी फूले आहेत…

पण त्याचा आवाज राजाला ऐकायलाच आला नाही. राजाने एक फूल तोडले आणि तो बेशुद्ध  पडला.  राजाबरोबर त्याचे सगळे मंत्रीमंडळ होते पण नेमके राजवैद्य त्या दिवशी आले नव्हते.

हा बाकीच्यांना म्हणाला.. घाबरु नका… त्याने राजाला थोड्या सपाट जागेवर वाळल्या औषधी पानांच्या गादीवर झोपवले. त्याने कसलासा पाला,  मुंगुसाच्या लाळेत मिसळून वाटला आणि त्याचा रस राजाच्या नाकात थेंब थेंब असे सोडत राहिला.

दोन दिवसानंतर राजाला शुध्द आली तोपर्यंत राजवैद्यही तिथे पोचले होते.

सर्वांनी या मुलाचे कौतुक केले.  राजाने मोठे बक्षीस दिलेच आणि राजवैद्यानी तर त्याला त्यांचे सगळे ज्ञान देऊन त्यांचा वारसच ठरवले.

आता तो आळशी राहिला नव्हता. राजवैद्य म्हणून  त्याचा मोठा लौकीक झाला होता.  त्याची सगळी स्वप्ने खरी झाली.

पण अजूनही कधी तो एकटा जंगलात जातो.  तो त्या झाडाखाली बसला की पीस येतेच. पण घरी मात्र जाताना नेमके पीस सापडत नाही..

खरे तर आता तो मुलगा नाही चांगला उंच निंच माणूस आहे.  त्याला आणि जीवाला चार गोड मुले आहेत.. असे एकट्याने उठून जंगलात भटकणे त्याला आता शोभत नाही. पण त्या पिसाचे कुतुहल मात्र त्याला आजही तिथे घेऊन जाते.

पण बहुतेक आजी आणि जीवाला त्याबद्दल माहिती आहे कारण पिसाबद्दल,  तो जेव्हा कळकळीने बोलतो तेव्हा त्या दोघी आपसात डोळे मिचकावून हसतात.

(एका नाॅर्वेजियन लोककथेचा स्वैर अनुवाद)

© डॉ. मंजुषा देशपांडे

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ सामाजिक दूरी (अंतर) ☆ डॉ. वसुधा गाडगीळ 

डॉ. वसुधा गाडगीळ 

☆ जीवनरंग  ☆ सामाजिक दूरी (अंतर) ☆ डॉ. वसुधा गाडगीळ  ☆

”  वर्तमानपत्रातही आले आहे  , आता सामाजिक रीत्या सर्वांना एकमेकांपासून दूर राहावेच लागणार आहे. कुठेही येणे नको जाणे नको ! आम्हाला सर्वांना घरात कोंडूनच राहावे लागणार. समजलात का ! कसली नातीगोती  आणि कसलेकाय ! ” दिलीपने अख्या कुटुंबाला ही बातमी वाचवून दाखवली आणि तणावाने म्हणाला

” केवढा कठीण काळ आला आहे ! ”

” अगदी सोपे आहे दिलीप ! तुम्ही सगळेजण  एकमेकांबरोबर बसून जेवणखाण करता ना….. मी तर कित्येक वर्षांपासून बाजूच्या पड़वीत एकटा… ”

वडिलांच्या तोंडून सामाजिक दूरीचे उदाहरण ऐकून दिलीप अचंबितच झाला !

 

© डॉ. वसुधा गाडगीळ 

संपर्क –  डॉ. वसुधा गाडगिल  , वैभव अपार्टमेंट जी – १ , उत्कर्ष बगीचे के पास , ६९ , लोकमान्य नगर , इंदौर – ४५२००९. मध्य प्रदेश.

मोबाईल  – 9406852480

– श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares
image_print