सौ. दीपलक्ष्मी नारायण पुजारी
शिक्षण:M.Sc.B.ed.
अनुभव: २० वर्षे ज्युनिअर कॉलेज ला अध्यापक, मेडिकल एन्ट्रन्स परीक्षा कोचिंग
वाचन व लिखाणाची आवड, दिवाळी अंकात प्रसिद्ध
कोल्हापूर आकाशवाणी वर प्रसारित
☆ जीवनरंग : गणपती बाप्पा , उंदीर आणि चांदोबा ☆ सौ. दीपलक्ष्मी नारायण पुजारी ☆
आजी गोष्ट सांगत होती. अमेय समरसून ती ऐकत होता.
‘एकदा गणपती बाप्पा उंदरावर बसून फिरायाला निघाले होते. त्यांना पाहून च्ंद्राला हसू आवरेना….’ इटुकल्या पिटुकल्या उंदरावर बसलेले तुंदीलतनु गणपती बाप्पा डोळ्यापुढे येताच अमेयही हसू लागला.
‘दात काढू नकोस. चंद्राने दात काढले, म्हणून गणपती बाप्पा त्याला रागावले आणि शाप दिला’ आजी पुढे गोष्ट सांगू लागली.
गोष्ट ऐकता ऐकता त्याला एकदम आठवलं, आई म्हणते, गणपती बाप्पा म्हणजे बुद्धीची देवता. सकळ जगाचं ज्ञान त्यांच्या ठायी आहे.
बाबा म्हणतात, कॉम्प्युटरच्या मेमरीत सर्व जगाच्या ज्ञानाचा साठा आहे. माऊसच्या एका क्लिकवर तो आपल्याला खुला होतो.
अमेय विचार करू लागला. म्हणजे… म्हणजे… जगातले सगळे कॉम्प्युटर म्हणजे गणपती बाप्पाच झाले की! आणि त्यांना चालवणारे माऊस म्हणजे उंदीरच. मग इतके सगळे गणपती बाप्पा पाहून चांदोबा कुणाकुणाला हसेल? इतक हसला तर त्याचं पोट नाही दुखणार? आणि हसून हसून दात नुसते दुखणारच नाहीत, तर सैल होऊन खाली पडतील. मग तो तूप रोटी कशी खाईल? मग कोजागिरीच्या दुधावरच त्याला संतुष्ट व्हावं लागेल!‘ या सगळ्या आपल्या कल्पनेचं त्याचं त्यालाच हसू आलं.
‘अरे, झालं काय तुला हसायला?’ आजी विचारात होती, पण आपली कल्पना आईला सांगायला अमेय स्वैपाकघरात पळालादेखील.
© सौ. दीपलक्ष्मी नारायण पुजारी
मो. – 9665669148
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈