मराठी साहित्य – जीवनरंग ☆ जीवनसंग्राम… – भाग – 2 ☆ श्री दीपक तांबोळी ☆

श्री दीपक तांबोळी

? जीवनरंग ?

☆ जीवनसंग्राम… – भाग – 2 ☆ श्री दीपक तांबोळी

(नैराश्याच्या या अवस्थेतच संध्याकाळी शेजारच्या बायका तिला बळजबरी किर्तनाला घेऊन गेल्या.किर्तनकार सांगत होते – –) – इथून पुढे — 

‘गड्यांनो देवांनासुध्दा स्वतःसाठी युध्दं करावी लागली.सीतामाईला आणण्यासाठी प्रभु रामचंद्रांना स्वतःला लंकेला जाऊन युध्द करावं लागलं.दुष्ट कंसमामाला मारण्यासाठी क्रुष्णाला स्वतः कंसाशी युध्द करावं लागलं.महिषासुराला मारण्यासाठी देवीला स्वतः युध्द करावं लागलं.आपण तर शुद्र माणसं आहोत.आपल्या आयुष्यात लढाईचे,युध्दाचे प्रसंग वारंवार येतात.दुसरं कोणीतरी येऊन आपली लढाई लढेल ही अपेक्षा सोडून द्या. तो देव आपल्याला मार्ग नक्की दाखवेल पण आपली लढाई आपल्यालाच लढायची आहे हे लक्षात ठेवा.तुम्ही देवांचे फोटो बघितले असतील.प्रत्येकाच्या हातात धनुष्यबाण, गदा,तलवार अशी शस्त्रं आहेत.आपण सामान्य माणसं अशी शस्त्रं बाळगू शकत नाही.पण संयम,धैर्य, चिकाटी आणि हुशारी हीच आपली शस्त्रं आहेत.त्यांचा वापर करुन आपल्याला आपली लढाई जिंकायची आहे “

ते ऐकून कमलाच्या अंगावर शहारे आले.आपली परिस्थिती तिच्या डोळ्यासमोर उभी राहिली.आशेचे किरण असे सहजासहजी दिसणार नाहीत.त्यांच्या मार्गात येणारे अडथळे आपल्यालाच प्रयत्नांनी दुर करावे लागतील हे तिच्या लक्षात येवू लागलं “आपल्यालाबी आता लढलं पाहिजे.असं हातपाय गाळून कसं चालेल?”तिनं मनाला समजावलं आणि तिला थोडासा का होईना हुरुप आला.

दुसऱ्या दिवशी ती तिच्याकडून नियमित भाजी घेणाऱ्या वकीलीण बाईकडे पोहचली.वकीलसाहेब घरीच होते.कमलाने मुलीचं प्रकरण  त्यांच्यासमोर मांडलं.दोनतीन वर्ष का होईना नियमित पैसे देणारं अशील मिळालं या कल्पनेने वकीलसाहेब खुष झाले.

“ठिक आहे.आपण तुमच्या मुलीच्या नवऱ्याला नोटीस पाठवू.जर तरीही त्याने नाही ऐकलं तर आपण कोर्टात केस दाखल करु.पण त्या अगोदर तुमच्या मुलीला रितसर पोलीस स्टेशनला सासू आणि नवरा छळ करत असल्याची तक्रार करावी लागेल”

कमला गोंधळली.पोलिस, कोर्ट या शब्दांनी तिला कापरं भरलं.ती वकीलसाहेबाला म्हणाली

” साहेब ते नोटीस, पोलिस ,कोर्ट मले काय बी म्हाईत नाई.पोलिसात गेलो तर माह्या जावई आनखीनच डूख धरीन.दुसरं करता यीन का?”

” खरंच हो!ते नोटिस,पोलिसात कंप्लेंट,कोर्टकचेऱ्या यात तर अनेक वर्ष निघून जातील.आणि ही गरीब बाई एवढा खर्च कुठून करणार?दुसरं काही करता येत असेल तर सांगा बिचारीला “

बायकोच असं म्हणायला लागल्यावर वकीलसाहेबांचा चेहरा पडला.मग त्यांनी कमलाला महिला दक्षता समितीला भेटायला सांगितलं.त्यांचा फोन नंबर आणि पत्ताही दिला आणि आपली जबाबदारी झटकून टाकली.दुसऱ्या दिवशी त्यांनी दिलेल्या पत्यावर कमला हिंमत करुन मुलीला घेऊन पोहचली.त्या तिला घेऊन पोलिस सुपरिटेडंट साहेबांकडे गेल्या.एस.पी.साहेब कडक शिस्तीचे आणि प्रामाणिक असले तरी दयाळू होते.कमलाच्या मुलीची हकिकत ऐकून त्यांना तिची दया आली.त्यांनी फोन उचलला.कमलाचा जावई ज्या गावात रहात होता तिथल्या पोलिस ठाण्याला आदेश दिले.चक्रं फिरली.एक तासात कमलाचा जावई आणि त्याच्या आईला पोलिस स्टेशनला उचलून आणल्या गेलं.एस.पी.साहेबांनी दोघांना सज्जड दम भरला.पहिल्या बायकोला घटस्फोट न देता दुसरं लग्न केलं तर जेल होईल आणि जेल झाली तर आहे त्या सरकारी नोकरीला मुकावं लागेल अशी धमकी जावयाला दिली.तो थरथर कापू लागला.महिला पी.एस.आय.ने सासूला ताब्यात घेतलं.मुलगा किंवा मुलगी जन्माला घालण्यात बाई जबाबदार नसते हे तिला समजावून सांगितलं.पण म्हातारी मोठी चिकट होती.म्हणाली

“ते मले काय बी माहित नाय.मले नातू पाहिजे म्हणजे पाहिजे “

” मावशी तुम्हाला मुलं किती?”

“एक पोरगा आणि दोन पोरी “

” त्या दोन पोरी तुम्ही का बरं जन्माला घातल्या?त्यांच्याऐवजी पोरांना का नाही जन्म दिला ?”

म्हातारी गडबडली.चिडून म्हणाली

“आता ते काय माह्या हातात हाये?”

” आम्हीही तेच म्हणतोय.पोरींना जन्म देणं तुमच्या हातात होतं का?आणि मला सांगा या सुनेला फारकत देऊन तुम्ही दुसरी सुन आणली आणि तिलाही पोरीच झाल्या तर?मग तिलाही फारकत देऊन तिसरी सुन आणली आणि तिलाही पोरीच झाल्या तर तुम्ही काय सुनाच बदलत रहाणार का?”

आता मात्र म्हातारीला हसू आलं.महिला पी,एस.आय.म्हणाली

” आणि हे बघा मावशी.तुमची सुन चांगली आहे म्हणून तिनं अजून लेखी तक्रार केलेली नाही. तिनं तशी तक्रार केली रे केली की आम्ही तुम्हांला आणि तुमच्या पोराला सुनेचा छळ केल्याच्या आरोपावरुन अटक केलीच समजा “

म्हातारी घाबरली.दुसऱ्याच क्षणी जवळच उभ्या असलेल्या कमलाच्या पोरीला म्हणाली

“चाल वं सरले,घरला चाल”

पुन्हा मुलावरुन बायकोचा छळ करणार नाही असं आश्वासन कमलाच्या जावयाने दिलं.मग कमला दोघांना घेऊन घरी घेऊन गेली.झणझणीत मटन करुन जावयाला आणि त्याच्या आईला खाऊ घातलं.

संध्याकाळी मुलगी मुलींना घेऊन जावयासोबत सासरी गेली.कमलाने सुटकेचा निश्वास सोडला.एक लढाई तिने जिंकली होती.आता पोराचा निकाल लावायचा होता.तिने सरळ मुळावर घाव घालायचं ठरवलं.

दोन दिवसांनी ती पुढाऱ्याला जाऊन भेटली.त्याला कळवळून म्हणाली

“सायेब माह्याकडून आता हे भाजीचं काम होत नाही. पोरानं लई सेवा केली तुमची.आता त्याला कामधंद्याला लावून द्या “

पुढारी महाबेरकी होता.असे आपले कार्यकर्ते कामधंद्याला लागले तर आपल्यामागेमागे कोण फिरेल,आपली चमचेगिरी कोण करेल असा विचार करुन तो कमलाला टाळण्याच्या द्रुष्टीने म्हणाला

” मावशी दोन वर्ष थांबा.दोन वर्षांनी महानगरपालिकेच्या निवडणूका आहेत.त्याला तुमच्या वार्डाचा नगरसेवकच बनवतो.एकदा नगरसेवक बनला की मग काय पैसाच पैसा “

कमलाने पुढाऱ्याचा डाव ओळखला.ती उसळून म्हणाली

“अवो साहेब नगरसेवक बनण्याची त्याची लायकी तरी हाये का?दोन मुस्काटात मारल्या तर चड्डीत मुतेल तो.तो काय नगरसेवक बनतो!आणि नगरसेवक बनायला करोडो रुपये खर्च कराया लागत्यात.हायेत का त्याच्याजवळ करोडो रुपये?ते काही नाही साहेब आता म्या त्याला कामधंद्याला लावणार.ते भाजी मार्केटमधी एक दुकान हाये.ते घेऊन द्या.लई मेहरबानी होईन तुमची “

कमला काही ऐकत नाही हे पाहून पुढाऱ्याने फोन उचलला.त्या दुकानाची चौकशी केली.फोन ठेवून म्हणाला “पाच लाखाचं दुकान आहे.जमेल?”

“साहेब माझं सोनंनाणं विकून दोन लाख जमतील.तीन लाखाचं कर्ज द्या.आम्ही दोघं मिळून फेडू”

पुढारी काही बोलेना.कमलाने त्याच्या मनात काय चाललंय ते ओळखलं.ती म्हणाली

” साहेब काही काळजी करु नका.गरज लागीन तवा पोराला बोलवा.तुमच्यासाठी त्याला कवा बी हजर करीन “

आता मात्र पुढारी हसला.कमलाचं काम झालं.

आठवडाभरात दुकान मिळालं.सुरवातीला पोरगा दुकानात बसायला तयार होईना.सारखा दुकान बंद करुन पळून जायचा.मग ती स्वतःच त्याच्यासोबत बसायची.त्याला जागचं हलू द्यायची नाही.कमलाच्या नशिबाने एक चांगली गोष्ट घडली.एका खुनाच्या गुन्ह्यात जामीनावर असलेल्या पुढाऱ्याला सजा झाली.तो तुरुंगात गेला.आपल्यावरही कारवाई होऊ नये या भितीने त्याचे चमचेही राजकारण सोडून कामधंद्याला लागले.कमलाचा पोरगाही मग हळूहळू धंद्यात रमला.तो रमला हे पाहून कमलाने परत भाजी विकायला सुरुवात केली.कामाची सवय असल्याने असंही तिला घरात करमत नव्हतंच.

भाजीची टोपली घेऊन कमला मंदिराजवळ आली.बाहेरुनच तिने देवाला हात जोडले.’आपली लढाई आपणच लढायची’हे ती देवाकडून तर शिकली होती.तिच्या मनात आलं.’अजून  लई लढाया बाकी आहेत.पोराचं लग्न,येणाऱ्या सुनेशी  जमवून घेणं,सुनेची बाळंतपणं,तिचं स्वतःचं म्हातारपण,त्यासोबत येणारे आजार.हा कधीही न संपणारा जीवनसंग्राम होता.त्यात कधी चांगली माणसंं भेटतात कधी वाईट.पण युध्द करणं टळत नाही हेच खरं! 

त्याशिवाय आयुष्यात मजाही नाही.देवा मला लढण्याची शक्ती दे रे बाबा “

कमलाने टोपली उचलली आणि ती चालू लागली.पण आता तिच्या पावलात आत्मविश्वास भरला होता आणि जीवनसंग्रामाला तोंड देण्याचं सामर्थ्य!

– समाप्त – 

© श्री दीपक तांबोळी

जळगांव

मो – 9503011250

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ जीवनसंग्राम… – भाग – 1 ☆ श्री दीपक तांबोळी ☆

श्री दीपक तांबोळी

? जीवनरंग ?

☆ जीवनसंग्राम… – भाग – 1 ☆ श्री दीपक तांबोळी

भल्या पहाटे मार्केटमध्ये जाऊन लिलावात घेतलेली भाजी कमलाने टोपलीत टाकली आणि ती जड टोपली डोक्यावर घेऊन ती भाजी विकायला निघाली.काल म्हणावा तसा धंदा झाला नव्हता.”आज तरी चांगली कमाई व्हायला पाहीजे”अशी मनाशीच बडबडत ती “भाजी घ्या होsss मेथी,पालक,भोपळा भेंडी,मिरची,कोथिंबीर “असं ओरडत गल्ल्यागल्ल्यातून फिरु लागली.फिरतांना मात्र तिचं मन थाऱ्यावर नव्हतं.मनात सतत येणारे विचार ती थांबवू शकत नव्हती.घटनाच तशा घडल्या होत्या.नुकतीच बाळंतीण झालेली तिची मुलगी घरी आली होती.दुसरी मुलगीच झाली म्हणून तिच्या नवऱ्याने आणि सासूने त्या ओल्या बाळंतिणीला तिच्या निष्पाप पोरीसकट घरी आणून टाकलं होतं.जावयाची तिनं खुप मनधरणी केली.त्याच्या पाया पडली.जावई थोडा नरमला.बायकोमुलीला घरी घेऊन जायला तयार झाला.पण सासू महाहलकट होती.ती जावयावरच भडकली “नातू झाल्याशिवाय इस्टेटीतला एक रुपया पण देणार नाही” अशी धमकी दिल्यावर जावई घाबरला.शेवटी कमलाच्या मुलीला आणि दोन्ही नातींना तिथंच सोडून निघून गेला.आता मुलासाठी तो दुसरं लग्न करणार होता.एका बाईलाच दुसऱ्या बाईचा जन्म नकोसा का होता हे कमलाला कळत नव्हतं.वंशाला दिवा पाहिजे म्हणे!वंशाचा दिवा असणाऱ्या तिच्या नवऱ्याने काय दिवे लावले होते हे काय तिला माहित नव्हतं?कमलाच्या पोटी दोन मुलांना जन्माला घातलं हाच काय त्याचा पराक्रम.त्यानं जन्माला घातलेला दुसरा वंशाचा दिवा,कमलाचा चोविस वर्षांचा मुलगा काहीच कामधाम न करता एका राजकीय पुढाऱ्याच्या मागेमागे फिरायचा.रात्री अकराबारा वाजेपर्यंत त्याचा पत्ता नसायचा.कोबडी खायला मिळते आणि दारु प्यायला मिळते म्हणून त्यानं आपलं आयुष्य असं  बरबाद करावं हे काही तिला पटत नव्हतं.पुढाऱ्याने त्याला नगरसेवक बनवण्याचं आश्वासन दिलं होतं.पण तो अशी स्वप्नं सगळ्याच तरुण पोरांना दाखवून त्यांना स्वतःच्या स्वार्थासाठी वापरुन घेत होता हे कमलाला कळत होतं.तिनं ते पोराला अनेकवेळा समजावूनही सांगितलं होतं.पण पोरगा ऐकत नव्हता.नवरा वारल्यानंतर तीनंच मुलांना मोठं केलं होतं.तसाही नवऱ्याचा तिला काहीच उपयोग नव्हता.रोज दिवसा पत्ते खेळत बसायचं,रात्री दारु पिऊन तमाशे करायचे आणि कमलाने विरोध केला की तिला मारहाण करायची हेच त्याचं रोजचं काम.त्याची अशी थेरं पाहून लग्नानंतर दोनच वर्षांत कमलाने भाजीची टोपली हाती धरली होती.नवऱ्याने तिला पोसायच्या ऐवजी तिनंच नवऱ्याला पोसलं होतं.शेवटी तिच्या कुंकवाचा धनी होता ना तो!नवरा लिव्हर सडून मेला तेव्हा ती लोकलाजेस्तव रडली खरी पण खरं तर तिला खुप हायसं वाटलं होतं.आता मुलगा मोठा झाला की तो काहीतरी कामधाम करुन घरात पैसे आणेल आणि आपलं हे असं उन्हातान्हात, थंडीपावसात दारोदारी फिरुन भाजी विकणं बंद होईल अशी तिला आशा वाटत होती.ती मुलाने फोल ठरवली होती.शेवटी तो बापाच्याच वळणावर जातो की काय अशी कमलाला भिती वाटायला लागली होती.

 विचारांच्या गर्दीत ती किती गल्ल्या फिरली तिचं तिलाच कळलं नाही.उन्हाचे चटके बसायला लागले तशी ती भानावर आली.आज अजूनही बोहनी झाली नाही हे तिच्या लक्षात आलं तेव्हा ती धास्तावली.अजून बंगलेवाल्यांची काँलनी बाकी आहे हे पाहून ती त्या काँलनीत शिरली.

खरं तर तिला या काँलनीत यायला आवडायचं नाही.करोडोंच्या बंगल्यात रहाणारे,लाखांच्या गाड्या उडवणारे आणि नवीन वर्षाला हजारोंची दारु पिणारे हे बंगलेवाले तिच्याशी पाचदहा रुपयांसाठी घासाघीस करायचे,वाद घालायचे.बाईच बाईचं दुःख समजू शकते असं ती नेहमी ऐकायची पण या बंगल्यातल्या बायकांना कधीही तिची दया आल्याचं तिच्या अनुभवाला आलं नव्हतं.उन्हाळ्यात साधं पाणीसुध्दा पाजायला त्या नखरे करायच्या.

उन्हाच्या चटक्यांनी आणि थकव्याने कुठेतरी बसून पाणी प्यावं असं तिला वाटू लागलं.एका बंगल्याच्या सावलीत ती बसली.टोपलीतून गरम झालेली बाटली काढून तोंडाला लावून ती पाणी पिणार तेवढ्यात तिथं एक आलिशान कार येऊन थांबली.गाडीतून एक तरुण बाई उतरली.कमलाबाईला पाहून तिच्या कपाळावर आठ्या पडल्या.

“काय आहे?कशासाठी रस्त्यात बसलीये?” ती जोरात कमलावर खेकसली

“ताई काही भाजी हवी अशीन तर घ्या.भोपळा आहे,भेंडी आहे,मेथी,मिरची……”

“काही नको.तू जा इथून “ती चिडून बोलली तशी

कमला उठून जायला निघणार तेवढ्यात ” अग अशी काय करतेस?” असं म्हणत एक तरुण तिच्या मागून येत म्हणाला”परवा आपल्याकडे कार्यक्रम आहेच. त्याला लागेल ना भाजी!मावशी सांगा कितीची होईल ही सगळी भाजी?”

तो सगळी भाजी घेतोय यावर  कमलाचा विश्वास बसेना तरी तिनं हिशोब लावला.तो भावात घासाघीस करेल या विचाराने तिनं भाजीचे शंभर रुपये वाढवून पाचशे रुपये सांगितले.पण त्याने काही न बोलता लगेच पाकिट काढून तिला पाचशे रुपये दिले.गडी माणसाला बोलावून टोपली रिकामी करुन दिली.

“अरे आपण मार्केटमधून आणली असती भाजी.स्वस्त मिळाली असती.दारावर येणाऱ्या या बायका खुप महाग देतात “

त्याच्या बायकोची कटकट अजून सुरुच होती.

“जाऊ दे गं.मावशींकडची भाजी चांगली फ्रेश असते आणि वीस पंचवीस रुपयांकडे काय बघायचं?बिचाऱ्या मावशींना एवढ्या कडक उन्हात उगीचची पायपीट करावी लागते.वीसपंचवीस रुपये त्यांनी जास्त घेतले तर बिघडलं कुठं ?”तो तिला आत नेत म्हणाला.

कमला खुश झाली.बायांपेक्षा हे बापे जास्त दिलदार असतात याचा पुन्हा एकदा तिला प्रत्यय आला.बोहनी झाली होती तीही दणदणीत पाचशे रुपयाची!आणि तीही एका फटक्यात!आनंदाने ती रिकामी झालेली टोपली घेऊन सरळ घरी आली.स्वयंपाक करुन मुलीला,नातीला जेवू घातलं.मग नातींशी खेळताखेळता झोपून गेली.

उन्हात फिरल्याने संध्याकाळी तिला सणकून ताप चढला.ती नाही नाही म्हणत असतांनाही मुलीने तिला डाँक्टरकडे नेलं.सकाळी झालेली सगळी कमाई डाँक्टरची फी आणि औषधात साफ झाली.आता उद्या भाजी विकता येईल की नाही या चिंतेने आणि मुलांच्या काळजीने तीला रात्रभर झोप लागली नाही.

दुसऱ्या दिवशीच काय तीन दिवस तिला तापामुळे भाजी विकायला घराबाहेर पडता आलं नाही. तीन दिवसांनी तिचा ताप उतरला.तिन्ही दिवस ती घरीच होती.डाँक्टरचं बिल थकलं होतं.प्रचंड अशक्तपणा आला होता.उन्हातान्हात भाजीची जड टोपली घेऊन फिरायचं त्राणही तिच्या शरीरात राहीलं नव्हतं.एकीकडे मुलगा काही कमवत तर नव्हताच पण तिच्याकडेच सतत पैशांची मागणी करुन तिला त्रास देत होता आणि दुसरीकडे लेकुरवाळी पोरगी उरावर येऊन बसली होती.सगळीकडे अंधार पसरला होता.आशेचे किरण कुठंच दिसत नव्हते.कमलाला आता खचल्यासारखं वाटू लागलं.या जबाबदाऱ्यांचं ओझं तिला पेलवेनासं झालं.कुणीतरी येऊन हे सगळं सांभाळावं असं वाटू लागलं.पण कोण येणार याचं उत्तरही तिच्याकडे नव्हतं.दुसऱ्याच्या दुःखांनी खुश होणाऱ्या नातेवाईकांकडून तर ति ला काडीचीही अपेक्षा नव्हती.त्यापेक्षा छताला लटकून मरुन जावं म्हणजे या सगळ्या कटकटींतून मुक्तता तरी होईल अशीही भावना तिच्या मनात डोकावू लागली.

नैराश्याच्या या अवस्थेतच संध्याकाळी शेजारच्या बायका तिला बळजबरी किर्तनाला घेऊन गेल्या. किर्तनकार सांगत होते

– क्रमशः भाग पहिला 

© श्री दीपक तांबोळी

जळगांव

मो – 9503011250

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ दोन लघुकथा — (१) एका लग्नाची गोष्ट / (२) शठम् प्रति शाठयम्… ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

श्री मकरंद पिंपुटकर

🌸 जीवनरंग 🌸

दोन लघुकथा — (१) एका लग्नाची गोष्ट / (२) शठम् प्रति शाठयम्… ☆ श्री मकरंद पिंपुटकर 

(१) एका लग्नाची गोष्ट – माझे मन तुझे झाले…

१२ मे २०२४ – आज त्या दोघांच्या लग्नाचा सुवर्ण महोत्सव. 

तो – कंपनीत टर्नर फिटरची नोकरी करणारा. ती – अकराव्वी (तेव्हाचे मॅट्रिक्युलेशन) पास. मुंबईत, बोरीवलीत दहा बाय दहाची एक पत्र्याची खोली. 

रेल्वेच्या संपामुळे जोडप्याची वरात निघालेली एका ट्रकमधून. नवीन जोडपे – ड्रायव्हर क्लिनरच्या मध्ये फ्रंट सीटवर बसलेलं. मागे ट्रकमध्ये सासरची माणसं आणि रुखवतात मिळालेली भांडीकुंडी आणि बाकीचा आहेर. ती भांडीकुंडी आणि आहेर कोणी, कुठे, कधी उतरवून नेली हे आजवर कोणालाच ठाऊक नाही.

एका ॲल्युमिनियमच्या भांड्याच्या साथीने सुरू झालेला राजा राणीचा संसार. आर्थिक ओढाताण सुरू व्हायची महिन्याच्या वीस पंचवीस तारखेलाच. पण त्याने तिची हुशारी ओळखलेली, तिला पुढे शिकायचा आग्रह धरलेला. नवऱ्यापेक्षा बायको जास्त शिकलेली नको – “नाकापेक्षा मोती जड नको” हे म्हणणाऱ्या दुनियेत, नवऱ्याचा हा विश्वास तिला हुरूप देऊन गेलेला. ती जिद्दीने शिकली. D.Ed., BA, MA, शिकतच गेली. 

आता ती शाळेत शिक्षिका झाली होती आणि त्याने स्वतःचा वर्कशॉप टाकला होता. संसार-वेलीवर दोन गोजिरवाणी फुलं. छोटा परिवार – सुखी परिवार. पण इतकं छोटंसंच विश्व नव्हतं त्या दोघांचं. 

तो कर्णाचाही अवतार आणि भोळ्या सांबाचाही – वर्कशॉपमधील कामगार, शेजारीपाजारी – अडीअडचणीला सगळेच याच्याकडे यायचे. आणि तोही पदरमोड करून – धावपळ करून – शब्द खर्ची करून सगळ्यांना मदत करायचा. यात खरंतर त्याचा गैरफायदा घेणाऱ्यांचीच संख्या जास्त. याला ते उमगायचेही, पण त्याने लोकांना मदत करणं काही सोडलं नाही. 

आणि ती तर काय ? शिक्षिकाच झालेली. ती नोकरी नव्हती, व्यवसाय नव्हता, तो एक पेशा होता – पु लं च्या चितळे मास्तरांसारखा. “पोरगं हातात आलं, की त्याला ठाकूनठोकून घडवायचं आणि जगात पाठवायचं” हे जे व्रत तिनं अंगिकारलं, ते कधी सोडलंच नाही.

तिच्या कर्तुत्वाची सरकार – दरबारी दखल घेतली जाऊ लागलेली, तिला पुरस्कार मिळू लागलेले. मार्गदर्शनासाठी तिला आमंत्रणे येऊ लागलेली. आणि तिच्या यशात हाच जास्त सुखावू लागलेला.

लेकाचं लग्न झालेलं, तो नोकरीनिमित्त आखाती देशात. सून नातू आधी त्याच्या बरोबर परदेशी पण आता मुंबईतच बोरिवलीला राहायला आलेले. लेकीची इथेच नोकरी छान सुरू.

दिवस – वर्षे सरली, ती निवृत्त झाली, त्यानेही वर्कशॉप बंद केलेलं. पुण्यात घर घेतलेलं, बोरिवलीच्या जागेच्या पुनर्विकासात एक छान फ्लॅट मिळालेला. “सुख म्हणजे नक्की काय असतं” याची ते दोघं पुरेपूर अनुभूती घेत असलेले.

पण अचानक संकटाची वादळं घोंघावू लागलेली. कोविडने त्याला ग्रासलेले. ऑक्सिजन लेव्हल कमालीची खाली गेलेली, तो ICUमध्ये ऍडमिट. ती स्वामींसमोर ठाण मांडून बसलेली. आणि तो सहीसलामत बचावलेला. 

मग तिची पाळी. आयुष्यात कधी डॉक्टरचं नव्या पैश्याचं बिल न केलेली ती, एकदम कर्करोगानं गाठलेलं. साडे अठरा सेंटिमीटरची गाठ. केमो सुरू झालेली. डोक्यावरचा केशसंभार शिशिराच्या पानगळीसारखा पूर्णपणे झडलेला – पण डोक्यावरचं काळजीचं ओझं मात्र वाढलेलं. आता तो स्वामींसमोर ठाण मांडून बसलेला.

वाकड्या चालीचा कर्करोग आटोक्यात आलेला, ऑपरेशन यशस्वी झालेलं.

दोघेही स्वामी (समर्थ) भक्त. स्वामी त्यांच्या पाठीशी होतेच. 

आज लग्नाच्या सुवर्ण महोत्सवदिनी- ते दोघं – हे सगळंच पुन्हा एकदा अनुभवत होते – एखाद्या चित्रपटासारखं – झरझर डोळ्यासमोरून जाताना. 

लेकाने, लेकीने आई बाबांच्या लग्नाच्या सुवर्ण महोत्सवाचा एक छानसा घरगुती कार्यक्रम आयोजित केलेला. त्या दोघांनाही आश्चर्याचे धक्क्यांवर धक्के बसत होते. अगदी संगीत, मंगलाष्टकं यांसमावेत पुन्हा एकदा छान लग्न लागलेलं, सुवासिनींनी ओवळलेलं, अगदी उखाणे – घास भरवणं : सगळं कसं साग्रसंगीत. घरचाच पण व्यावसायिक फोटोग्राफर सगळ्या भावमुद्रा अलवारपणे टिपून घेताना. 

आणि ती आता तिचं मनोगत व्यक्त करताना – 

“हे” आजारी असताना, मला कर्करोग झाला आहे हे कळल्यावर माझे असंख्य विद्यार्थी, आमचे अनेकानेक नातेवाईक हे सगळे सगळे एकजुटीने आमच्या पाठीशी उभे राहिले, स्वामींचे आशिर्वाद आहेतच. माझ्या कर्करोगाचे निदान कळल्यावर लेकाने क्षणभरही विचार न करता, परदेशातली लठ्ठ पगाराची नोकरी सोडून दिली आणि कायमचा भारतात – घरी परतला. लेकीने नोकरी सोडून दिली, ती पूर्ण वेळ माझ्यासोबत खंबीरपणे उभी राहिली. 

पैशांच्या जोरावर पूर्ण वेळ सांभाळणारी नर्स हे दोघं सहज ठेऊ शकले असते, पण त्यांनी तसं केलं नाही, मायेची पाखर धरली. आणखी आयुष्यात काय हवं ?

गेल्या १२ मे ला, मी हॉस्पिटलमध्ये होते, श्वास घेतानाही जीव जात होता. पण “हे”, माझा लेक, माझी लेक, सून, नातू – सगळे आले, आम्ही केक कापला, लग्नाचा वाढदिवस साजरा केला. आणि आज, तुमच्या सगळ्यांच्या सदिच्छेने, मी तुमच्या समोर उभी आहे – हा सुवर्ण सोहळा अनुभवते आहे,”

ती बोलत होती, पार्श्वभूमीला, तिच्या लाडक्या विद्यार्थ्याचा आवाजात पुरिया धनश्री दरवळत होता, सांगत होता – माझे मन तुझे झाले, तुझे मन माझे झाले….

… सगळा आसमंत धूसर, सांद्र झालेला, 

गळ्यात दाटलेला आवंढा, डोळ्यात दाटलेले अश्रू …

आज तो आनंद, आनंद !

एका लग्नाची सुवर्ण महोत्सवी गोष्ट ….

( २ ) शठम् प्रति शाठयम्…

शनिवार संध्याकाळ, आणि नेहमीप्रमाणे “निगडी पिझ्झा”ला ग्राहकांची तुंबळ झुंबड उडाली होती. 

निगडी प्राधिकरण – अतिशय वेगाने वाढणारे पुण्याचे एक उपनगर. तेथील एका प्रतिष्ठित खाजगी मानित विद्यापीठाच्या (deemed university) भोवतालचा विस्तीर्ण परीसर. जवळील हिंजवडी आयटी पार्क, चाकण, पिंपरी चिंचवड येथील ऑटोमोबाईल उद्योग यामुळे बहुसंख्येने येऊन स्थायिक झालेले तरुण – तरुणी आणि भरीस या विद्यापीठातील उच्चभ्रू विद्यार्थी. त्यामुळे रेस्टॉरंट, फास्ट फूड यांच्या दुकानांची नुसती रेलचेल होती या परीसरात.

शनिवार रविवार म्हणजे तर या व्यवसायांना पर्वणीच. वीक एण्ड म्हणजे ऐशआरामाचे हक्काचे दोन दिवस असं जणू अलिखित समीकरणच. त्यामुळे जास्तीत जास्त ग्राहकांना आपल्याकडे खेचून घेण्यासाठी अहमहिका लागलेली. वेगवेगळ्या सवलती, कुपन्स यांचा भडीमार असायचा तेव्हा. एकावर एक बर्गर फ्री, ५०% सवलत, मोफत कोल्ड कॉफी – अशा अनेक सवलती. आणि सवलतींच्या मोहाने ग्राहकही तुटून पडायचे खाद्यपदार्थांवर. 

“निगडी पिझ्झा” या स्थानिक दुकानाचा त्या परिसरात निःसंशय दबदबा. तिथला पिझ्झा दोन पैसे महाग असायचा, पण फुल टू पैसा वसूल. आजूबाजूच्या अन्य नामांकित आणि स्थानिक पिझ्झा दुकानांचा व्यवसाय “निगडी पिझ्झा”मुळे चांगलाच मार खात असे.

आफताब बेकर्सला, या आठवड्यात नुसत्या “निगडी पिझ्झा”चेच नव्हे, तर सगळ्याच फास्ट फूडवाल्यांचे ग्राहक आपल्याकडे खेचायचे होते. त्यांच्या डोक्यात एक प्लॅन शिजत होता. त्याने स्थानिक वर्तमानपत्रांत टाकण्यासाठी एका पत्रकाची (flyer) ऑर्डर दिली. “कोणत्याही दुकानाची पंचवीस कुपन्स आणा – आमच्याकडून ४९९/- चा एक पिझ्झा फक्त ४९/- रुपयांत घेऊन जा.” 

सगळेच ग्राहक इतर दुकानांची सगळी कुपन्स घेऊन आपल्याच दुकानी येतील, या आठवड्याअखेरीसचा (weekendचा) त्यांचा सगळा धंदा पूर्ण बसेल आणि एकदा ग्राहकांना आपल्याकडे यायची सवय झाली, की मग ते इतरांकडे फिरकणार नाहीत – असा आफताबवाल्यांचा ठोकताळा. 

प्लॅन सुंदर होता, पण ज्या छापखान्यात हे पत्रक छापायला दिलं होतं त्या छापखान्याच्या मालकाला, सॅमला काही हे पटलं नाही. “निगडी पिझ्झा”वर सॅम लहानाचा मोठा झालेला, उसे उसके नमक का कर्ज अदा करना था. 

सॅमने “निगडी पिझ्झा”ला फोन लावला आणि शनिवारी वर्तमानपत्रासोबत येणाऱ्या आफताबच्या पत्रकाबद्दल सांगितले. “निगडी पिझ्झा”वाल्याने  सॅमचे आभार मानले, आणि मग पुढे त्यांच्यात काही बोलणी झाली. 

शनिवार उजाडला, वर्तमानपत्रे वाटली गेली, त्यात दोन पत्रकं होती. एक आफताब बेकरीवाल्याचं आणि दुसरं “निगडी पिझ्झा”चं. 

“निगडी पिझ्झा” या शनिवारी सर्व ग्राहकांना त्या पत्रकाद्वारे पंचवीस मोफत कुपन्स देऊ करत होते. गंमतीचा भाग म्हणजे या सर्व पंचवीस कुपन्सवर मिळून फक्त पाच रुपयांचे एक चॉकलेट मिळणार होते. 

एरवी असल्या पाच रुपयांच्या भुक्कड कुपनकडे, ते जरी अगदी “निगडी पिझ्झा”वाल्यांचं असलं, तरी कोणी ढुंकूनसुद्धा पाहिले नसते. पण आज “निगडी”च्या या पंचवीस कूपनच्या मोबदल्यात आफताबची घसघशीत ऑफर होती. आणि लोकं ४९९/- चा पिझ्झा फक्त ४९/- रुपयांत मिळवण्याची अशी सुवर्णसंधी अर्थातच सोडणार नव्हते.

ज्यांनी ज्यांनी शनिवारी सकाळी वर्तमानपत्रे उघडली, त्या सगळ्यांनीच आफताब बेकर्सकडे आपला मोर्चा वळवला. अधिक चाणाक्ष लोकांनी दोन तीन वर्तमानपत्रे घेतली, त्यातील “निगडी पिझ्झा”ची कुपन्स घेतली, आणि आफताबकडे कूच केलं. 

संपूर्ण weekend साठी आफताबने जी तयारी ठेवली होती, ती शनिवारची संध्याकाळ सुरू होण्यापूर्वीच पार संपली. आणि हा तिहेरी आतबट्ट्याचा व्यवहार झाला होता. पिझ्झा अगदी स्वस्तात – नुकसानीतच विकावा लागला होता, “निगडी पिझ्झा”वाल्याचं विशेष काहीच नुकसान झालं नव्हतं, आणि संध्याकाळी जेव्हा खरं गिऱ्हाईक आलं, तेव्हा त्यांना देण्यासाठी आफताबकडे काहीच शिल्लक नव्हतं. 

आणि म्हणूनच, आत्ता शनिवार संध्याकाळ होती, आणि नेहमीप्रमाणे “निगडी पिझ्झा”ला ग्राहकांची तुंबळ झुंबड उडाली होती. 

© श्री मकरंद पिंपुटकर

चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अवकाळी… ☆ सौ. प्रांजली लाळे ☆

सौ. प्रांजली लाळे

? जीवनरंग ?

☆ अवकाळी…  ☆ सौ. प्रांजली लाळे

ह्या वर्षी उन्हानीही जोर धरलेला. पाण्यासाठी पाणवठे शोधत बाया बापड्या दारोदार भटकल्या. वीस रुपयाला एक बादली विकत घेतली. घरात अन्नाचा कण नसला तरी पाण्याला पैसे मोजावेच लागले. पै पै साठी कष्ट करणाऱ्या कष्टकऱ्यांना पाण्यासाठी तरसावं लागलं..

दिनेशच्या गावाकडल्या घरात आईबाप रहायचे त्याचे. तो मात्र शहरात रहायचा ऐटीत.. ए.सी. रुमचा आरामदायक वेल फर्निश्ड फ्लॅट.. सुंदर बायको, मुलं.. रमला होता संसारात. वर्षाकाठी गावाकडून येऊन शेतावरचे वर्षभराचे धान्य भरून द्यायचे बापू.. माई-बापूने कष्ट करून त्याला शिकवून मोठा सायब बनवलं.. पण तो परत गावाकडे फिरकला नाही. माय-बापू फोन करायचे पण हा टाळून द्यायचा गावाकडे यायचं.. इतका स्वार्थी कसा होऊ शकतो कोणी? 

ह्या वर्षीचा दुष्काळ फारच परीक्षा घेत होता. बापू आता थकले होते.. माय माऊली बिचारी कोंड्याचा मांडा करत होती. बापूंनी फोन केला दिनेशला.. सत्य परिस्थिती सांगितली.. ” ह्या वर्षी म्या काय बी पिकवू शकलो नाय बग.. तुला ह्या वर्साला बाहेरून इकत घ्यावं लागंल सर्व ..त्वा काय आला नाय मदतीला.. म्या आता हतबल झालो बग.”

दिनेशही हे ऐकून थोडा हतबुद्ध झाला खरा, पण शहरातील वारं लागलेला शहरी नागरिक झाला होता तो.. बायकोही म्हणाली, “काय फरक पडणार आहे? घेऊ इथून शॉपिंग मॉलमधून विकत.” वर्षभराचे बजेट बिघडताना दिसत असले तरी गावाकडे जाणं मान्य नव्हते.. 

उद्या बापूंना जमीन विकण्याचा प्रस्ताव देणार होता तो.. भरघोस पैसा मिळाला की माय बापूंना शहरात घेऊन येणार.. तेवढीच बायकोला मदत !! सर्वतोपरी निर्णय बापूंचा होता अर्थातच…. आर्थिक बजेट बिघडतंय वाटायला लागलं तसं दिनेशनं गावाकडं दोन-तीन दिवस जायचं ठरवलं.. बायकोला हा स्वार्थी निर्णय पटल्याने तीही चक्क निघाली त्याच्याबरोबर..

दारासमोर गाडी उभी राहिली. बापू खाटेवर बसून होते आणि माय काय तरी निवडत बसलेली. लेकरं अचानक दारात दिसल्यावर कोण आनंद झाला तिला.. थकलेल्या हातांनी नातवंडाच्या चेहऱ्यावरनं हात फिरवताना आकाश ठेंगणं झालं होतं.. बापू मात्र थंड नजरेनं शुन्यात बघत बसले होते.. शेतकऱ्याचं आयुष्य असंच असतं.. वरुणराजा कोपला आणि धरणीमाय तप्त झाली की काय बी खरं नसतं.. शेतीवर असलेलं अमाप प्रेम त्यांना अस्वस्थ करत होतं.. 

दिनेश बापूंजवळ जाऊन बसला.. मायनं तांब्याभर पाणी आणलं.. गटगटा प्यायला.. ‘तृप्त!!’ असा त्याच्या मनातला आवाज ऐकू आला स्वतःलाच.. हातपाय धुवून अंगणात चटई टाकून पहुडला. बायको, मुलं सवय नसल्याने आतमध्ये झोपले.. दिनेशला अंगणातल्या सावलीत गाढ झोप कधी लागली ते कळलंच नाही.

दिनेश झोपला तसं बापू शेजारी येऊन बसले असावेत.. की भास होता कोणास ठाऊक !! डोळे उघडले तसे बायको, मुलं सुद्धा अंगणात येऊन बसलेले दिसले.. मायनं सर्वांसाठी चहा आणला होता.. बापू वावराकडं चक्कर मारायला गेले होते. 

मायजवळ विषय काढलाच त्यानं.. “काय ठेवलंय ह्या गावात आता?? ना पाऊस ना शेती !! बापूंना म्हणावं विकून टाकूया शेती आता.. तुम्ही चला माझ्या बरोबर शहरात..”

माईच्या चेहऱ्यावरचा आनंद कुठल्या कुठे पळाला.. अनपेक्षित होते सर्व.. “नाही रे बाळा, ही जमीन आपली आई आहे.. तिच्याशी प्रतारणा कशी करायची? बापू कधीही मान्य नाही करणार. बापूंनी पै पै गोळा करून ही जमीन विकत घेतली आहे.. तु विचारशील, पण जरा जपून.. बापू आणि मी इथेच राहिल, अगदी शेवटच्या श्वासापर्यंत. ‘आमचं भागतयं.” नजर चुकवून माय बोलली..

बापू आले संध्याकाळी.. पाहुणे आले म्हटले की गोडधोड व्हायला हवं ना.. गावातील सावकाराकडून व्याजावर पैसे घेऊन आले येताना.. थोडेफार तरी लेकरांच्या हातात टेकवायला म्हणून.. हातपाय धुवून देवासमोर हात जोडून जेवायला बसले.. पिठलं भाकरी.. वरण भात वरपून खाल्ला सर्वांनी. पोरांनाही हा नवीन पदार्थ आवडला.. आजी आजोबांचे घर भारी आवडलं. शेणाने सारवलेले अंगण, ओसरी, स्वयंपाक घर आणि एक खोली.. हवेशीर, शुद्ध हवा..  बायकोही सासूच्या हातचे पदार्थ खाऊन खुश !! 

“माई हे पदार्थ आम्हाला रोज खाऊ घालायला चला नं आमच्या बरोबर..”  माईच्या डोळ्यात आसू तरळले. ती खुश होती लेकरं आली तर.. भोळी होती ती.. खरंच वाटले तिला.. ती रात्री बापूंना हा विषय बोलणार होती..

बापू बाहेर खाटेवर आकाशात पहात पहुडलेले.. माईनं सुपारी कातरुन आणून दिली.. तशी अस्वस्थता अधिक गहरी होत गेली तिच्या मनातली.. ” लेकाचा मनसुबा कळलाय नव्हं तुम्हाला??”  बापू तसे समजून चुकले होते.. त्यांनी इतके उन्हाळे पावसाळे पाहिले होते की ही गोष्ट लगेच लक्षात आली होती. पण बोलून फायदा नव्हता.. पोटाची भूकही महत्वाची होती.. निर्णय घ्यावा तर लागणार होता.. 

‘हो किंवा नाही’ ह्या मनस्थितीत रात्र न झोपता सरली.. माईला तो दिवस अजूनही आठवत होता ज्या दिवशी ती बापूंचा हात धरुन मापटं ओलांडून ह्या गावात आली. एक छोटसं खोपटं होतं बापूंचं.. रुबाबदार दिसायचे बापू.. दिलदार मनाचा रांगडा गडी.. .. माई तशी साधी, सालस. दिसायला सोज्वळ आणि सोशिक. घरात सासु सासरे, नणंद.. सर्वांचे निमूटपणे केले.. बापूही जमिनीच्या एका तुकड्यावरुन वीस एकर जमिनीवर आले.. घोर मेहनतीचे फळ !! एकमेकांच्या साथीने संसार उभा राहिला.. आणि आज अशी वेळ यावी.. दोघांचेही डोळे ओलावले..

झुंजुमुंजू झाल्या. बापू सकाळधरनं गायब झाले ते कोणाला दिसलंच नाही.. दिनेश, सुनबाई सगळेच  उठले.. माईनी डोळ्याला पदर लावला.. काही विपरीत तर घडलं नसलं ना? ” दिनेश.. अरं आपलं बापू कुठं बी न्हाय दिसत..”

दिनेश वैतागून “काय गं माई, काय झाले? असतील शेतावर..”

“नाही ना.. शेजारचा म्हादबा बी येऊन गेला आत्ता.. तो शेतावरनंच आला. तो बी हेच विचारत होता..कुठे गेले बापू म्हणून..”

दिनेशची चांगलीच तंतरली. त्याचं प्रेम होतं बापूंवर.. पण स्वार्थही होताच थोडा.. पैसा महत्त्वाचा वाटायचा त्याला.. पण जे घर, जिथं तो लहानाचा मोठा झाला.. जी जमीन, जिने त्याला महागाचे शिक्षण मिळवून दिले. तो बाप, ज्यानं त्याला घाम गाळून शिकवले.. त्यालाच तो विसरला?? माई धायमोकलून रडायला लागली.. आता मात्र दिनेश हलला.. गावभर मंदिरं, नातेवाईक, शेजारी, सारं सारं शोधलं.. दिनेश हतबल झाला..  ‘कुठे आहात तुम्ही बापू? तुमच्या विना घर कसे वाटतेय?’  सूनबाई माईजवळ बसून राहिली.. लेकरं घाबरली बिचारी.. घर पोरकं तर होणार नाही ना?? एक अनामिक भिती प्रत्येकाच्या मनात रुंजी घालत होती..

अचानक पावसाची थेंबं टपटप पडायला लागली.. सगळीजणं एकमेकांना सांभाळत होती. माईंना दिलासा देत होती. तो दिवस सांत्वनाचा होता की अजून काही?? पण एकत्र राहण्याचे महत्त्व समजत होते दिनेशला.. हरवलेल्या बापूंना शोधायचेच होते.. पण माईलाही सावरायचे होते. सतत पडणाऱ्या पावसानं तप्त जमीन तृप्तं झाली होती.. पाऊस अवकाळी का होईना, धरणीमाय शांत झाली होती. बापूंसाठी प्रार्थना करत सर्वजण कधी झोपले कळलंच नाही.. 

सकाळी फटफटल्यावर दिनेशला बाहेर गडबड ऐकू आली. पोलीस दिसले चार-पाच. पोटात भितीचा गोळा आला.. ब्रम्हांडं आठवले.. बापू?? बायकोला आवाज देत बाहेर पळालाच.. पाहिले तर बापू माणसांच्या गराड्यात बसलेले मान खाली घालून.. 

पोलिसांनी जुजबी चौकशी करुन दिनेशच्या खांद्यावर थोपटले.. ” सांभाळा आपल्या वडिलांना..काल पहाटे हायवेवर मोठ्या ट्रकसमोर आले होते. पण ट्रकवाल्याने एअरब्रेकने गाडी थांबवली..” 

बापरे हायवे तर इथून एक गाव ओलांडून आहे.. कसे गेले असतील बापू?? दिनेश मनातल्या मनात बोलला. काहीच बोलत नाहीयेत.. नशीब त्यांच्या एका ओळखीच्या माणसानं ओळख पटवली. ” सांभाळा.. वडील पुन्हा मिळत नसतात कधीच..” इन्स्पेक्टर बोलले..

सर्वजण निघून गेल्यानंतर बापूंना जी मिठी मारली ना दिनेशने, ती आयुष्यात कधीच मारली नव्हती.. स्काॅलरपणाचा अहंकार बाळगत बापाच्या अडाणीपणाला तुच्छ समजत जगत होता तो.. सर्व अहंकार विरघळला होता त्या मिठीत !!! जोरदार हंबरडा फोडत म्हणाला “बापू तुम्ही मला हवे आहात “…

बापूंच्या निस्तेज डोळ्यात एक चमक दिसली.. डोळ्यातून घळघळा पाणी आलं.. ” चला बापू आपल्या घरात.. तुम्ही कुठेही नाही जायचं.. आम्हीच येणार. दर सहा महिन्याला.. तुम्हाला आणि तुमच्या धरणीमायला, दोघांनाही भेटायला…”

© सुश्री प्रांजली लाळे  

मो न. ९७६२६२९७३१

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ३ अनुवादित लघुकथा – प्रेशरकुकर/यातनांचं गाठोडं/अहिंसावादी पार्टी – मूळ हिंदी लेखक:डॉ. रमेश यादव ☆ मराठी अनुवाद : सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

? जीवनरंग ?

☆ ३ अनुवादित लघुकथा – प्रेशरकुकर / यातनांचं गाठोडं / अहिंसावादी पार्टी – मूळ हिंदी लेखक:डॉ. रमेश यादव ☆ मराठी अनुवाद : सौ. गौरी गाडेकर

☆ (१) प्रेशरकुकर… ☆

खचाखच भरलेली चर्चगेट-विरार लोकल मीरा रोड स्टेशनवर थांबताच लोकांची गर्दी, कोंडलेला श्वास सोडत बाहेर पडली. जणू त्यांना एखाद्या गॅस चेंबरमधून मुक्त केलंय आणि आता ते मोकळ्या हवेत श्वास घेत आहेत. 

त्यात शांतिलालही होते. ट्रेनमधून उतरून लांब लांब टांगा टाकत शांतिलाल सरळ जाऊन रिक्षाच्या रांगेत थांबले. जवळजवळ दहा मिनिटांनी त्यांचा नंबर लागला. 

बेल वाजवली. दरवाजा उघडता उघडता पत्नी म्हणाली,” आज पुन्हा उशीर झाला?परवा माझं उद्यापन आहे. सगळं सामान आणलंय ना? की नेहमीसारखाच आजही वेळ नाही मिळाला?” 

पत्नीला बाजूला  सारून शांतिलालजी आत सोफ्यावर डोळे मिटून बसले.

काही वेळाने पत्नीला म्हणाले,” ऐक.ऑफिसात कामाचं खूप प्रेशर आहे. बॉसकडून उलटसुलट बोलणी आणि ओरडा खाण्यापेक्षा उशिरापर्यंत बसून मी आपलं काम कसंबसं पुरं करतो. टार्गेट पुरं झालं नाही, म्हणून बॉस आपली भडास स्टाफवर काढतो. तू तर दिवसभर घरातच असतेस ना? मग आवश्यक ती खरेदी आटपून घेत जा.”

“असं कसं? दोघांनी मिळून केलं,तर पूजेचं सगळं आयोजन व्यवस्थित होईल ना! लग्न करून आले,तेव्हापासूनच  तुमच्या ऑफिसचं रडगाणं ऐकते आहे. मल्टिनॅशनल कंपनीची नोकरीआणि मुंबईचं नाव ऐकून मी लग्नासाठी होकार दिला होता. आमचे बाबा सरकारी ऑफिसात साहेब होते. माझ्या आईला कधी बाजारहाट करावा लागला नाही. दुकानदार नाहीतर बाबांच्या ऑफिसातला प्यून घरी सगळं सामान आणून द्यायचे. तसंही आमच्याकडे बायका बाहेरची कामं करत नाहीत. कुटुंबाच्या इज्जतीचा प्रश्न असतो तो.” 

त्याच वेळी प्रेशरकुकरची शिटी वाजली. शांतिलाल स्वतः किचनमध्ये गेले. पहिल्यांदा त्यांनी लक्षपूर्वक कुकरकडे बघितलं आणि मग ते विचार करायला लागले,’ या कुकरकडे तरी बघा . वरून प्रेशर आहे आणि खालून आग लागते आहे ,तरीही शिटी वाजवत काय मस्त काम करतो आहे! अनावश्यक वाफ बाहेर टाकायची ,हे त्याला बरोबर माहीत आहे.’ 

मग काय? पुढच्याच क्षणी ऑफिसची चिंता सोडून शिटी वाजवत ते पत्नीला सामोरे गेले. 

मूळ हिंदी लेखक:डॉ. रमेश यादव 

अनुवाद: सौ. गौरी गाडेकर. गोरेगाव (पश्चिम), मुंबई, फोन नं. 9820206306

☆ (२) यातनांचं गाठोडं ☆

हलतडुलत  बस आली आणि वृद्धाश्रमासमोर थांबली. आतापर्यंत पिकनिकच्या मूडमध्ये असणारी मुलं अचानक शांत झाली. 21 ऑगस्ट आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिवस म्हणून साजरा केला जातो, म्हणून पिकनिक स्पॉटनंतर त्यांना या वृद्धाश्रमात स्टडीटूरसाठी आणण्यात आलं होतं. वृद्धाश्रमाचे पदाधिकारी त्यांची वाट बघत होते. वही आणि पेन सांभाळत मुलं बसमधून खाली उतरली. एकमेकांची ओळख करून देणं, थोडा खेळ, खाणंपिणं झाल्यावर पाच-पाच मुलांचा गट बनवण्यात आला आणि त्यांना वृद्धांच्या खोलीत त्यांच्याशी बोलण्यासाठी पाठवण्यात आलं. 

निकिता आपल्या गटाबरोबर ज्या खोलीत गेली, तिथे एक आजी झोपल्या होत्या. कर्मचार्‍याने सांगितलं की या आजी हल्लीच आल्या आहेत. त्यांची तब्येत ठीक नाही,म्हणून त्या बाहेर आल्या नाहीत. त्या खोलीत शिरताच मुलांनी आजींना नमस्कार केला. त्यांची चाहूल लागताच आजी उठून बसल्या. आजीचा चेहरा बघताच निकिता सुन्न झाली.दोघींची नजरानजर झाली आणि त्यांच्या अंतःकरणातून प्रेमाचा लाव्हा फुटला. धावत जाऊन निकिता आजीला बिलगली आणि हमसून हमसून रडू लागली. आजीही तिचे पापे घेऊ लागली. समोरचं दृष्य बघून सगळे चकित झाले. रडण्याचा आवाज ऐकून टीचर आणि इतर लोकही तिथे आले.हे काय झालं अचानक? कोणालाच समजत नव्हतं. प्रयत्नपूर्वक टीचरनी दोघींना शांत केलं. 

पाणी पिऊन निकिताने सांगितलं,” टीचर, ही माझी आजी आहे. घरच्यांनी मला सांगितलं की आजी गावी गेली आहे. हा वृद्धाश्रम म्हणजे आजीचा गाव आहे,का टीचर? “

हे ऐकताच खोलीत विलक्षण शांतता पसरली. एकमेकींपासून दूर राहण्याची वेदना निकिता आणि आजी -दोघींच्याही चेहर्‍यावर स्पष्ट दिसत होती. 

“टीचर,मला घरी नाही जायचं. मी आजीबरोबर इथेच राहीन आणि आजीची काळजी घेईन. जेव्हा मी आजारी पडायचे, तेव्हा आजीला दिवस-रात्र एक करताना पाहिलंय मी. मम्मी-पापा तर ऑफिसात निघून जायचे. टीचर,ही माझी फक्त आजी नाही, माझी मैत्रीणही आहे. जिथे  कुठे राहू, आम्ही दोघी एकत्र राहू .मम्मी-पापा माझ्याशी खोटं का बोलले कोणास ठाऊक! ” 

निकिताचा दबलेला ,घुसमटलेला आवाज शांततेला चिरून जात होता. बालमनाला लागलेल्या  ठेचेने सगळ्यांच्या  यातनांचं गाठोडं उघडलं गेलं होतं. 

मूळ हिंदी कथा: ‘पीडा की गठरी’

मूळ लेखक : डॉ. रमेश यादव

अनुवाद: सौ. गौरी गाडेकर. गोरेगाव (पश्चिम), मुंबई, फोन नं. 9820206306

☆ (३) अहिंसावादी पार्टी ☆

जंगलात निवडणुकीचा धूमधडाका चालू होता. त्यामुळे प्राणी आणि प्राणिनेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या होत्या. लहानसहान पुढारी आपली रोटी भाजून घेण्यासाठी अचानक सक्रिय होऊन मांड्या ठोकत होते. लोकांना आकर्षित करण्यासाठी हिंसक पुढार्‍यांनी अहिंसेचा जप सुरू केला होता. एकजूट करून निवडणूक लढण्याच्या इराद्याने लहान पक्षांच्या काही प्राणिनेत्यांनी जंगलाबाहेर तलावाकाठी गुपचूप भेटायचं ठरवलं होतं. कोल्हा,अस्वल,लांडगा, बोका,बगळा वगैरे पुढारी अगोदरच पोहोचले होते. दुसर्‍याची विचारपूस करता करता आपलंच घोडं पुढे दामटत होते. या सर्वपक्षीय पार्टीचा नेता कोण होणार आणि जनतेला आपल्याकडे कसं वळवायचं , यावर चर्चा चालली होती. स्वतःविषयी सांगत नेतेपदासाठी आपणच कसे पात्र आहोत,हे सांगत होते. अस्वलानंतर  लांडग्याने आपली बाजू मांडली,” मित्रांनो, आमच्या टोळीने शिकार करणं पूर्णपणे बंद केलं आहे. शिळंपाकं खाऊन आम्ही कसंबसं भागवतोय. खरं सांगायचं तर परस्परांचा आदर-सन्मान करत आपण सर्वांनी बंधुभावाने राहिलं पाहिजे.त्यामुळे गरीब आणि असाहाय्य लोकांवर जुलूम होणार नाही. या त्यागामुळे या दलाचा नेता आमच्या समाजातीलच असला पाहिजे. ” सर्वांनी लांडग्याच्या समाजाच्या त्यागवृत्तीची प्रशंसा केली. 

हे ऐकून बोका म्हणाला,” बंधूंनो, माझ्याबरोबरच माझ्या समाजानेही शपथ घेतली आहे,की आता आम्ही उंदरांची शिकार करणार नाही. लोककल्याणासाठी एवढा त्याग तर केलाच पाहिजे. म्हणून नेता आमच्या समाजातीलच असायला हवा.”

आता बगळ्याची पाळी होती. आपलं समर्थन करताना तो बोलला,” मित्रांनो, माझ्यावर विश्वास ठेवा. मेलेले मासे खाऊन आणि पाणी पिऊन आम्ही गुजराण करत आहोत. त्यामुळे नेतेपदाचा आम्हालाही अधिकार आहे. “

संयुक्त दलाच्या नेतेपदाविषयी एकमत होत नाही, म्हटल्यावर कॉमन मिनिमम प्रोग्रॅम आणि सिटांचं वाटप यावर चर्चा सुरू झाली. या मुद्द्यांवरून खूप बाचाबाची झाली; पण ते ठाम निर्णयापर्यंत पोहोचले नाहीत. 

तेव्हा बगळाभगत म्हणाला,” मित्रांनो,तुम्ही चर्चा चालू ठेवा. मी पटकन तलावाचं ताजं पाणी पिऊन येतो.” आणि तो तलावाच्या दिशेने चालू लागला. थोडं लांब गेल्यावर त्याने मागे-पुढे बघितलं आणि एका पोहोणार्‍या माशावर पटकन आपल्या चोचीने झडप घातली. पोटपूजा झाल्यावर तो पुन्हा सभास्थानी आला. त्याच्या चेहर्‍यावरची टवटवी बघून लांडगाही पाणी प्यायला म्हणून तिथून निघाला. थोडं पुढे गेल्यावर एक कोंबडी त्याच्या नजरेस पडली. त्याने पुढचामागचा विचार न करता लगेच तिला पकडलं. मागून कोल्हा येत होता,हे बघून शिकारीचा थोडा हिस्सा त्यालाही दिला. ढेकर देत दोघेही सभास्थानी पोहोचले. बोका थोडाच मागे राहणार होता? “जरा जाऊन येतो,” म्हणून थोडा पुढे गेला, तोच त्याला शेतात काही उंदीर दिसले. सफाईदारपणे त्याने त्यांच्यावर हल्ला केला आणि दोन उंदरांना गट्टम केलं. जेव्हा तो सभास्थानी पोहोचला,तेव्हा बघितलं तर,झाडावर तीन कावळे कावकाव करत आपल्या भाषेत ओरडत होते,” राज की बात कह दूं तो…” 

सगळ्यांना धक्का बसला.मग सर्व नेत्यांनी मिळून त्यांना आश्वासन दिलं,” बंधूंनो, काळजी करू नका. तुमच्या समाजासाठीही काही खास व्यवस्था करण्यात येईल.” 

यानंतर सर्वसंमतीने संयुक्त मोर्चाची घोषणा करण्यात आली. पार्टीचं नाव ठेवलं-अहिंसावादी पार्टी’.त्याबरोबरच सगळ्यांना सांगण्यात आलं,की सर्वोच्च नेतेपदाची निवड निवडणुकीनंतरच केली जाईल. या घोषणेनंतर प्रेस नोट जारी करण्यात आली.

मूळ हिंदी कथा: डॉ.रमेश यादव 

मराठी अनुवाद :सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ऑक्सिजन… ☆ डॉ. शैलजा करोडे ☆

डॉ. शैलजा करोडे

🌸 जीवनरंग 🌸

☆ ऑक्सिजन… ☆ डॉ. शैलजा करोडे

मटार धुवून चाळणीत निथळत ठेवले . बटाटे उकडून घेण्यासाठी कुकरला लावले . कढीपत्ता , कोथिंबीर , हिरव्या मिरच्या , आलं , लसूणाचं वाटण केलं .पीठ मळण्यासाठी परातीत घेतलं .हे सगळं करतांना दमछाक व्हायला लागली . अशावेळी पाणी प्यावं म्हणे , कारण पाण्यातून आँक्सिजन मिळतो .So water is the first remedy for any health issue .माझी मैत्रिण डाॅ.वृषाली जोशी मला नेहमी सांगायची ” कामं तर कधी संपायचीच नाहीत , पण त्रास व्हायला लागला तर थोडावेळ बसायला हवचं . एक दीर्घ श्वास घ्यायचा , क्षणभर डोळे मिटायचे . आपली श्वासाची गती स्थिर झाली कि पुढील काम हाती घ्यायचं . लक्षात असू दे , श्वासाची गती स्थिर होणं म्हणजे आँक्सिजन लेव्हल स्थिर होणं , ह्रदयाची गती स्थिर होणं ” .एक मंद स्मित माझ्या चेहर्‍यावर आलं , आता पन्नाशीच्या उंबरठ्यावर याची गरज पडते वेळोवेळी, पण ऐन तारूण्यात तर , ” लाथ मारीन तिथे पाणी काढीन ” अशी परिस्थिती . क्षणाची उसंत नसली तरी थकवा कधी जाणवला नाही . दहावीच्या शालांत परीक्षेत मिळालेल्या घवघवीत यशाने अनेक माध्यमांनी माझ्या मुलाखती घेतल्या होत्या . ” कसा अभ्यास केला ? वेळेचं नियोजन कसं केलं ? कोणते क्लासेस लावले होते काय ? त्याचा कितपत फायदा झाला ? वगैरे

मी क्लासेस तर लावले नव्हतेच , शाळेत जे शिकवलं ते ज्ञान व काही स्वतः अभ्यास करून आत्मसात केलेलं ज्ञान उपयोगी आलं . अंगी एक झपाटलेपण होतं तेव्हा .वेळेचं नियोजन म्हणाल तर एका विषयाचा कंटाळा आला तर दुसरा विषय घ्यायचा हाती .change of work is my rest .तिच विश्रांती , तोच आँक्सिजन होता माझ्यासाठी .” “वाह ग्रेट , खूपच छान .तुझ्याकडून प्रेरणा घ्यावी असं तुझं यश तरआहेस पण ते साध्य करण्यासाठी तुझं साधनही प्रेरकचं .” म्हणत पेढ्यांचा बाॅक्स माझ्या हाती दिला होता .

आयुष्यात असा वेळोवेळी ऑक्सिजन लागतोच … प्रेमाचा , मायेचा , कौतुकाचा ..

चला थोडी वामकुक्षी घेऊया म्हणत मी पलंगावर लवंडले . झोप यावी म्हणून सकाळचं वर्तमानपत्र दुपारी हाती घेतलं . आज शनिवार चित्रपट व नाटकांची वेगळी पुरवणी होती .” नृत्य हा माझा प्राणवायू ” अभिनेत्री अर्चना जोगळेकर शीर्षक वाचलं आणि 1980 ते 1990 च्या दशकातील नितळ चेहर्‍याची , घार्‍या डोळ्यांची , गौरवर्णाची , शेलाट्या बांध्याची अर्चना डोळ्यासमोर तरळली .चित्रपट , नाटक करीत असतांनाच नृत्याचेही धडे तिने गिरवलेले . ” अर्चना नृत्यालय ” ची स्थापना आई नृत्यांगना आशा जोगळेकर यांचे समवेत करून न्यू जर्सी ( अमेरिकेत ) इथे तिने शाखा उघडली . यातून अनेक विद्यार्थी प्रशिक्षण घेऊन नृत्यात पारंगत होत आहे .खरंच माणसाच्या अंगी असे झपाटलेपण हवं , डेडिकेशन हवं .हा प्राणवायूच आम्हांला ऊर्जा देतो , लक्ष्यपूर्तीत सहाय्यक ठरतो .वाचता वाचताच वर्तमानपत्र हातातून गळालं , मी निद्रेच्या आधीन झाले होते .

” आई , चहा घेतेस काय ? मी बनवलाय ? इथे किचनमध्ये येतेस की तिथे आणून देऊ “

सुरेखा , माझी मुलगी विचारत होती

” नको , इथे नको , मी येते किचनमध्ये .नसत्या सवयी लावून घेऊ नये माणसानं . उद्या तू सासरी गेल्यावर कोण देणार आहे मला “

” काय आई , किती विचार करतेस . मी काही कोठे जात नाही. नवर्‍यालाच येथे घेऊन येईन “

” वेडी कुठली ” आणि आम्ही दोघी खळाळून हसलो .

मनावरची मरगळ जाऊन मन प्रफुल्लित झालं . खरंच हसण्याने किती गोष्टी साध्य होतात .रक्तदाब नियंत्रणात राहातो . स्वतः आनंदी असल्याने इतरांनाही आनंदीत करता येते , दुःख हलके होते . जगण्यासाठी नवी ऊर्जा मिळते . चिंता , तणाव दूर होतो .या सकारात्मकतेचे परिणाम शरीरावरही दिसून येतात .पचनसंस्था सुधारते. शांत झोप येते . बापरे किती फायदे आहेत हसण्याचे .उगाचच कोणी हास्यक्लब नाही काढत . कारण हसणे हा जीवनदायी प्राणवायूच तर आहे ना .

मनाच्या या प्रसन्नतेनं मन हलकं फुलकं झालं .आणि कवितेच्या प्रदेशात हिंडावसं वाटू लागलं . होय , कविता ही त्या कवीचा जीव कि प्राण असते . जीवात प्राण ओतणारी ती कविता म्हणजे कवीचा आँक्सिजन म्हटली पाहिजे .क्षणात आकाशात भरारी घेणारी तर क्षणात समुद्राचा तळ गाठणारी , कधी क्षितिजावर हिंदोळे घेणारी तर कधी मनाच्या खोल डोहात दुःखाने बुडालेली , अशी ब्रम्हांडाची सफर घडविणारी कविता कवीला दुःखात सोबत करणारी , आनंदाने उचंबळणारी ,संकटकाळात धैर्य देणारी , काळोखातही प्रकाशकिरण शोधण्याची शक्ती देणारी .. प्राणवायूच म्हणायला पाहिजे टेबलवरचं रायटिंग पॅड घेतलं आणि काव्यकामिनीची मी पूजा आरंभली .जीवन मार्गातील खाच खळगे , काट्यांवरुन वाटचाल करतांना मनोधैर्य खंबीर हवं .मार्ग सुगम होतो , फक्त तो सुखाचा पासवर्ड शोधता आला पाहिजे .

ऊन सावलीचा खेळ

शिकवण निसर्गाची

दुःखामागे येई सुख

धरी कास ही आशेची

 

निराशेत दडलेला

शब्द असतो आशेचा

मना खंबीरता देई

पासवर्ड तो सुखाचा

काव्य प्रदेशात हिंडतांना मला अशी नवऊर्जा मिळत असते .

डोअरबेल वाजली . कोण असेल , विचार करतच मी दरवाजा उघडला .माझी मैत्रीण आरती तिचा मुलगा सुहाससह आली होती .सुहासचं पदवीपर्यंतचं शिक्षण झालं होतं, पण तो नोकरीपेक्षा स्वतःचा काही व्यवसाय सुरू करू इच्छित होता आणि या इच्छेला मूर्तरूप देण्यासाठी त्याने माझ्या बँकेतून मुद्रा योजनेअंतर्गत कर्जही घेतलं होतं .त्याने उद्योग सुरू केला पण ज्या कंपनीला तो पुरवठा करणार होता तो वेळेत करू शकला नाही . एक तर अकुशल कामगार , कामगारांची काम करण्यातील दिरंगाई , सुहासचं poor management , बाजारातील गळेकापू स्पर्धा .यामुळे हे घडत गेलं . त्या कंपनीला पुरवठा दुसर्‍यानेच केला . कामगारांचे पगार , बँकेचे EMI मात्र चालुच होते . सुहासला हे सगळं नवीन होतं किंबहुना त्याच्या प्लॅनप्रमाणे झालेलं नव्हतं . तो भांबावला होता .

” शोभना यासाठीच आज सुहासला घेऊन आलेय . बघ तुला काही मार्गदर्शन करता आलं तर . मदत कर बाई माझ्या मुलाची” .

“ अग होय , पण तू चिंता नको करूस आणि पॅनिकही होऊ नकोस . सुहास व्यवसाय करतांना प्लॅनिंग , मार्केट स्ट्रॅटेजी महत्वाची तर आहेच , पण वक्तशीरपणाही तितकाच महत्वाचा.  किंबहुना वक्तशीरपणा हा प्राणवायू आहे उद्योग व्यवसायातला . प्रत्येक उद्योगामध्ये उत्पादन, वाहतूक, विक्री किंवा वसुलीसारख्या प्रत्येक कामासाठी वेळेचं एक गणित असतं. ते गणित मिनिटांनी जरी चुकलं तरी व्यवसायाचं गणित लाखांनी चुकण्याची ती सुरुवात ठरू शकते. वेळा पाळण्याचं काम जसं उद्योजकाला करावं लागतं तसं त्याच्याकडे काम करणार्‍या प्रत्येक कर्मचार्‍यालाही करावं लागतं. ‘इंडियन टाइम’ नावाचा एक विचित्र प्रकार आपल्याकडे आहे. तो उद्योग-व्यवसायासाठी अतिशय घातक असतो. असा घात होऊ नये अशी इच्छा असणार्‍या सर्वच उद्योजकांनी आणि त्यांच्या कर्मचार्‍यांनी वक्तशीरपणा अंगी बाणवण्याला पर्याय नाही; अन्यथा, काळ कोणाहीसाठी थांबत नाही हे लक्षात असलेलं बरं.  वक्तशीरपणा बाणवण्यासाठी वेळेचं नियोजन आवश्यक असतं. त्यासाठी आपल्या कामाचा प्राधान्यक्रम ठरवता यायला हवा. म्हणजे वेळेच्या नियोजनाचा विचार करताना दोन महत्त्वाचे प्रश्न स्वतःला विचारायला हवेत. एक म्हणजे माझ्या आयुष्यात मला जे साध्य करायचं आहे आणि दुसरा म्हणजे रोजच्या जगण्यातला वेळ मी कसा वापरतो? थोडक्यात वेळेचं नियोजन करायला शिकायचं असेल तर आधी वेळेबद्दल आणि स्वतःबद्दलही आदराची भावना हवी. नाहीतर कल करे सो आज कर, आज करे सो अब हे वचन सगळ्यांनाच माहिती असतं. पण ते अमलात आणणारे मात्र कमी असतात. वेळेवर कामं निपटायची सवय अनेक बाबतीत फायदेशीर ठरते. कामात सुटसुटीतपणा येतो, गोंधळ टळतात, मनावरचा ताण नाहीसा होतो. गेलेला वेळ परत येत नाही ही ध्यानात घेऊन कामातल्या व्यक्तशीरपणाची सवय अंगी बाणवणं म्हणूनच आवश्यक असतं. 

आता तुझ्या काय चुका झाल्या , कोठे आणि केव्हा झाल्यात याचं बारकाईने निरीक्षण आणि विश्लेषण कर . मेहनत तर तू करतोच आहेस . पण हिंमत हारू नकोस . एकदा आलं अपयश . पण यातून तुला खूप शिकायला मिळणार आहे हे लक्षात घे आणि पुढील वाटचाल करत राहा . मग यश तुझंच आहे .” 

“ होय आँटी ” सुहासच्या चेहर्‍यावर हास्य उमललं आणि नकळत माझ्या आणि आरतीच्याही चेहर्‍यावर हास्य आलं .

” अग शोभना तुझ्या कानावर काही आलंय काय ग ” माझ्या शेजारच्या फ्लॅटमधील वीणा बोलत होती 

” नाही ग , आणि कशाबद्दल म्हणत आहेस तू .” अग त्या मातृरक्षा बिल्डिंगमधील कालिंदीचा मुलगा अशोक अमेरिकेत मिशिगनला होता बघ . छान नोकरी मिळाली , तिकडेच स्थायिक झाला . लग्न झालं , दोन मुलं झाली . सगळं कसं सुरळीत चालू होत. ” .. ” बरं मग झालंय तरी काय “..  ” जागतिक मंदीची लाट आली आणि अशोकची नोकरी गेली . उच्चपदस्थ असुनही त्याला ही झळ बसली कारण तो परदेशातील होता . स्थानिकांना झुकतं माप मिळालंच . अशोकने जवळची जमापुंजी खर्च करुन सहा महिने काढले . नोकरीसाठी खूप प्रयत्न केले पण अपयशच आलं आणि त्याचा व्हायचा तोच परीणाम झाला .अशोकने आत्महत्या केली ” .. ” काय ? आत्महत्या ? हे कसं शक्य आहे?” . “ होय , असेलही कारण आपण मुलांना यशाचे मार्ग दाखवतो .प्रेरणा , प्रोत्साहन देत राहतो .यशस्वीतेच्या वाटेवरील तो झगमगीतपणाही सुखकर वाटतो . पण आपण अपयश पचवायला शिकवित नाही .परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी आपणच धैर्य , हिंमत धरली पाहिजे , प्रतिकूलतेवर मात कशी मात करायची आपणच शिकवत नाही .त्याने हे दुःख आपल्यापुरतं मर्यादित न ठेवता आपल्या आई वडिलांना , आपल्या माणसांना सांगायला हवं होतं .होय आपली माणसं ..  आपल्या जगण्यासाठी ज्या प्राणवायूची गरज असते तो प्राणवायु म्हणजे आपली माणसं .. …. रक्ताच्या नात्याचीही आणि आपल्याशी ऋणानुबंधानं जुळलेलीही ..अशा कठीण प्रसंगी हीच माणसं कामाला येतात . भावनांचा निचरा होतो . मनातलं मळभ नष्ट होऊन लख्ख उजाडतं आणि अशा अप्रिय निर्णयापासून माणूस परावृत्त होतो . हा प्राणवायू हवाच .जाऊ आपण कालिंदीकडे ..” 

ऊं ऊं ऊं ऊं हाताने डोळे पुसत आजी आजी करत अक्षय माझा नातू झोपेतून उठला होता , मला शोधत दरवाज्यापर्यंत आला होता . ” ओ ले माझ्या राजा , झोपा झाली वाटतं ,रडू नाही , काय हवं तुला .मी त्याला उचलून कडेवर घेतलं .”  माझा आँक्सिजन माझ्या कुशीत होता .

© डॉ. शैलजा करोडे

नेरुळ नवी मुंबई मो. 9764808391

ईमेल – [email protected] 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ चित्रकार… भाग-२ – लेखक : श्री शशांक सुर्वे ☆ प्रस्तुती – सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

☆ चित्रकार… भाग-२ – लेखक : श्री शशांक सुर्वे ☆ प्रस्तुती – सौ. उज्ज्वला केळकर 

(इतरांच्या दृष्टीने जरी त्या भूत वैगेरे असल्या तरी माझ्या दृष्टीने एक प्रेमळ मायेची ऊब देणारी स्त्रीच आहे…) इथून पुढे … 

भूत ही संकल्पना किती क्रूर,नकारात्मक रंगवली आहे ना लोकांनी??….कदाचित ते कधी कमला काकूंना भेटले नसतील….त्यांच्याबद्दल मी थोडी माहिती आजूबाजूला फिरून गोळा केली….त्या एकट्याच ह्या बंगल्यात राहत होत्या….सुधाकर काका 60 व्या वर्षीच कमला काकूंना एकटे सोडून देवाघरी गेले होते….ह्या आधी त्यांचा एकुलता एक मुलगा त्यांना एका अपघातात सोडून गेला….काकू अगदी एकट्या ह्या घरात राहत होत्या…ह्यातच एका दिवशी त्यांना ह्रदयविकाराने गाठले आणि हे घर अगदीच रिकामे झाले…..सुधाकर काका आणि कमला काकूंनी मोठ्या मेहनतीने हे घर बांधले होते ते त्यांनी जिवंतपणी कुणालाही विकलं नाही  त्यामुळे अजूनही कमला काकूंचा वावर ह्या घरात आहेत असे आजूबाजूचे लोक म्हणतात…त्यामुळे हे घर कुणी विकत घेत नाही..आणि हे खरेच आहे….खरोखर त्या इथे वावरतात….माझ्याशी बोलतात……मलाही त्या खूप आवडतात…..

त्या दिवशी शाळेतून मी घरी येत होतो तर वाटेत हा बंगला होता….गेटच्या आतल्या बाजूला एका झाडावर एक पोपट बसला होता…..मला तो पोपट निरखून रेखाटायचा होता त्यामुळे विचार न करताच मी आत गेलो आणि इथल्या एका धुळकट पायरीवर बसून तो पोपट रेखाटू लागलो….मी एकदा चित्र काढायला बसलो की माझं कशात लक्ष नसत…..काही दिवसांपूर्वी एका माणसाने मला सांगितले होते इथे जास्त उशीर थांबू नको ही जागा भूतीया आहे…..भूत हा शब्द ऐकून घाबरून मी इथून काढता पाय घेतला होता पण आता त्या पोपटाच्या मागे मी इथे कसा आलो मला कळलंच नाही…..मी चित्र काढू लागलो पण न राहून अस वाटत होतं की मागे कुणीतरी उभं आहे….अचानक कानात एक कुजबुज ऐकू आली….

“खूप छान चित्र काढलं आहेस बाळा”

मी थबकून मागे बघितलं….मागे कुणीच नव्हतं…..नंतर लक्षात आलं आपण तर त्याच भूतीया घरात आहोत….अगदी धावत पळत तिथून आलो…..खूप घाबरलो होतो तेव्हा…..पण नंतर त्या बाळा शब्दाने मला विचार करायला भाग पाडलं…..खूप दिवसांनी तो शब्द ऐकत होतो……कुणीतरी माझ्या चित्राचीही तारीफ केली होती….एकेदिवशी शाळेतून येताना अचानक एक नजर त्या बंगल्याकडे गेली…..आज तो बंगला कमालीचा स्वच्छ आणि नीटनेटका वाटत होता….मी येताच तिथल्या गार्डन मध्ये मंद वाऱ्याची झुळूक वाहू लागली न जाणो अस वाटत होतं कुणीतरी आपल्याला त्या घरात बोलवत आहे….आज्जीच्या घरी आल्यावर जसा आनंद होतो तस काहीसं मनात वाटत होतं त्यामुळे थोडा धीर एकवटून बंगल्यात शिरलो…..परवा कुलूप असलेले दार आज उघडे दिसत होते…..दारात उभं राहून आत जाऊ की नको?? हाच विचार मनात चालू होता…..दारातून मला आतली हॉल मधली मोठी तैलचित्रे स्पष्ट दिसत होती…..ती चित्रे बघून आत शिरलो…..कमालीचा जिवंतपणा होता त्या चित्रात जणू प्रत्यक्ष आपण त्या ठिकाणी उभे आहोत असं वाटत होतं…..सगळी चित्रे फिरून फिरून बघत होतो….चित्राच्या खाली कमला असे नाव आणि सही होती 1996 हे साल देखील होते आपण एका भूतीया घरात आहोत हे जणू विसरूनच गेलो….अचानक थोडी सळसळ जाणवली चमकून तिकडे बघितले तर एका पॅड वर एक कोरा कागद अडकवला होता बाजूला पेन्सिल,ब्रश काही रंग आणि समोर एक खोटे सफरचंद ठेवलेले दिसत होते…..जणू सगळा सेटअप माझ्यासाठीच होता अस वाटत होतं…..कोणताही विचार न करता समोर ठेवलेल्या सफरचंदाचे चित्र रेखाटू लागलो…..ह्या वेळी मला ती भीती नव्हती जी इतर वेळी चित्र काढताना असायची…..माझी चित्रे आगीत फेकणारे माझे पप्पा पाठीत धपाटा मारणारी माझी मम्मी सगळ्यांच्या विसर पडला होता…..माझ्या पेन्सिल पकडलेल्या हातात एक वेगळेच बळ आले होते….समोरच्या सफरचंदाचे हुबेहूब चित्र,आउटलाईन वैगेरे माझ्याकडून रेखाटली जात होती….कानात कुणीतरी मला मार्गदर्शन करत होते….त्या दिवशी पहिल्यांदा मी मुक्तपणे जगल्याचा भास मला झाला…..मन अगदीच प्रसन्न झाले होते…..माझे आवडते काम करायची संधी मला मिळाली होती…..मग काय शाळा सुटल्यावर ITP च्या क्लास ना जाता भूतीया बंगल्यावर जाऊन चित्रे रेखाटू लागलो….रोज रोज माझ्यासाठी नवीन पेपर समोर एखादा नवीन ऑब्जेक्ट आपोआप तयार असायचा…..त्या कमला काकू मला मार्गदर्शन करीत होत्या….त्याची अगदी काळसर आकृती दिसत होती….वाऱ्याबरोबर हलणारी….पण त्यांचा खरवरीत मोठी नखे असलेला हात जेव्हा माझ्या डोक्यावर प्रेमाने फिरायचा तेव्हा मायेचे एक वेगळीच अनुभूती येत होती…..तिथे भय,किळस असले भाव गळून पडत असत….मग त्या मायेच्या स्पर्शासाठी घरी येऊन पप्पांचा मार सुद्धा अगदी किरकोळ वाटत असे……कमला काकू माझ्या चित्रांची खूप तारीफ करायच्या माझं जिथं चुकत असे तिथे आपोआप एखादी आउटलाईन यायची…..माझ्या चुकीच्या वेळी  त्यांच्या सांगण्यात कुठेही आरडाओरडा नव्हता….त्यांचा इतरांच्यासाठी भयानक दिसणारा काळा हात माझ्या पाठीत बसत  नव्हता…  उलट तो हात माझ्या डोक्यावरून फिरवून त्या मला प्रोत्साहन देत होत्या…..जवळपास महिनाभर इथे आलो….आईचा अबोला नको म्हणून ITP चा दिवसरात्र जागून अभ्यासही केला तरी जिल्ह्यात 9 वा आलो……साहजिक मार तर पडणारच होता…..आईनेही अबोला धरला होता पण मी जेव्हा भूतीया बंगल्यात आलो आणि कमला काकूंना रिझल्ट बद्दल सांगितलं तर त्यांनी टाळ्याच वाजवल्या….आपल्या खरवरीत हातात माझा हात घेऊन अभिनंदन देखील केले……खूप बर वाटलं…..दिवसरात्र केलेली मेहनत सफल झाल्याची अनुभूती आली…..दोन वेगवेगळ्या टोकाच्या मध्ये मी होतो….एक माझे जन्मदाते असून सुद्धा मला त्यांची पुढची पैसे कमावण्याची मशीन बनवू पाहत होते आणि एक जी काकू माझी कुणी नसून सुद्धा माझ्या आवडत्या कामात मला साथ देत होती….मुलांनी मोठं व्हावं हे प्रत्येक आईवडिलांचे स्वप्न असते हे मान्य आहे पण मुलांचे छंद,त्यांच्या कला,त्यांची स्वप्ने ह्याचा विचार कोण करणार??…..त्यामुळे मी हा निर्णय घेतला आहे….कायमच कमला काकूंच्या बरोबर रहायचं…..पण त्यांच्या जगात जाण्यासाठी मला हे जग सोडावे लागेल…..हरकत नाही…..तसही ह्या जगात ते वजनदार दप्तर,अभ्यासावरून मारझोड करणारे माझे आईवडील,शाळेचा निकाल टॉप ला रहावा म्हणून मुलांच्यावर सक्ती करणारे दिवसभर शाळेत बसवून घेणारे ते शिक्षक,ज्यादाचे क्लासेस अजून बरच काही  माझी वाट बघत असतील……नकोच ते सगळं….आताच मी कमला काकूंचे ते त्यांच्या अमानवी रूपातले चित्र रेखाटले आहे ते बघून त्यांच्या विद्रुप चेहऱ्यावरचा आनंद मला स्पष्ट दिसत आहे….त्यांनी जवळपास मला प्रेमाने मिठीच मारलीय…..हेच प्रेम मला हवं आहे म्हणून आता त्या बंगल्याच्या तिसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारणार आहे…..ह्या दुनियेतली शेवटची उडी…..सरळ कमला काकूंच्या दुनियेत……तिथे गेल्यावर मला त्या प्रेमळ स्त्रीचे खरे रूप बघता येईल…

— समाप्त — 

लेखक:- श्री शशांक सुर्वे

प्रस्तुती : उज्ज्वला केळकर 

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ चित्रकार… भाग-१ – लेखक : श्री शशांक सुर्वे ☆ प्रस्तुती – सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

☆ चित्रकार… भाग-१ – लेखक : श्री शशांक सुर्वे ☆ प्रस्तुती – सौ. उज्ज्वला केळकर 

एखाद्या चौथीच्या प्राथमिक वर्गात असलेल्या मुलाकडून अस काही ऐकणे तुम्हाला नवल वाटेल पण हो करतो मी जास्ती विचार… माझी आज्जी पण नेहमी म्हणते “पुष्कर लहान आहे पण एखाद्या मोठ्या व्यक्ती पेक्षा जास्त समज त्याच्यात आहे” आता ह्याला वरदान म्हणावे की श्राप??….. श्रापच…. अवेळी आलेली गोष्ट तशी धोकादायकच…. मग ते अवेळी आलेलं प्रौढत्व का असेना….. असो….. ह्या सगळ्या दुनियादारी गप्पा तुमच्या सोबत ह्यासाठी मारतोय कारण हे जग सोडण्याचा मी निर्णय घेतला आहे….. कारण??….. मी स्कॉलर ITP परीक्षेत जिल्ह्यात 9 वा आलो म्हणून?? अजिबात नाही….. कारणे खूपशी आहेत…. ती सुद्धा माझ्यासोबत घेऊन जाईन….. माझ्याबद्दल विचाराल तर अभ्यासापेक्षा इतर गोष्टीत रमणारा मी आहे… मी रोज पेपर वाचतो… तो पेपर तिथल्या मोठ्यांच्या गोष्टी….. पण पेपर मधल्या न समजणाऱ्या गोष्टी शेजारच्या काकांना विचारतो ते सगळं समजावून सांगतात मला…. त्यात किनी बातम्या येतात बघा “मानसिक त्रासाला कंटाळून युवकाची आत्महत्या”….. आता मी युवक तर नाही….. शाळकरी मुलगा आहे…. पण खरं सांगू का लहान मुले सुद्धा विचार करतात…. त्यांना सुद्धा मानसिक त्रास येतो ह्याचा विचार कदाचित पालक करत नसतील पण ते खरे आहे… लहानमुले म्हणजे मातीचा गोळा… मातीचा गोळा…. त्यांना आकार देण्यासाठी एवढं बदड बदड बदडलं जातं की हे मडकं तुटू शकतं ह्याचा कुणी विचारच करत नाही… लहान मुलांना पण मन असत… त्यांच्या सुद्धा मनावर परिणाम होत असतो.. कोण करणार विचार??… बरं.. ते सगळं जाऊ द्या.. कुठे होतो आपण….. हा तर ITP स्कॉलर परीक्षेत माझा 9 वा नंबर आला…. बाकी हा सगळा नंबर्सचा खेळ माझ्या डोक्या बाहेरचा आहे…… इथे फक्त 1 ह्या नंबरलाच मानाचे स्थान आहे….. कारण मागच्या वेळी ITP परीक्षेत मी 4 नंबर वर होतो तरीही बाबांचा मार खाल्ला आणि आता ह्या वर्षी तर थोडा जास्तच….. पप्पा आणि मी शाळेत गेलो निकाल हातात आला आणि तिथेच लक्षात आलं की घरी गेल्यावर फुल्ल धुलाई होणार आहे आणि तसच झालं… पप्पांनी अगदी हात दुःखेपर्यंत मला धोपटून काढलं….. साहजिक मार खाताना ओरडायच नाही हा एक कायदा आमच्या घरी होता त्यामुळे हुंदके देत सगळा मार खाऊन घेतला….. मम्मी कोपऱ्यात उभी राहून बघत होती….. दिवस सगळा रडण्यात गेला…. रात्री पप्पा आले काहीवेळ त्यांनी मोबाईल बघितला आणि परत येऊन धोपटून काढलं…… नक्कीच त्यांनी बाजूच्या प्रतीकच्या वडिलांचे स्टेटस बघितले असेल….. प्रतीक 3 रा आला होता….. बाकी माझ्या पप्पांना स्टेटसचे जाम वेड आहे….. पण आपल्या मुलाचा प्रथम 3 क्रमांकात येणाचे स्वप्न मी काही पूर्ण करू शकलो नाही त्यामुळे ते एक दुःख त्यांच्या मनात सलत असावं परिणामी माझी बारीकसारीक गोष्टीसाठी होणारी धुलाई, शिव्या देणे हे सगळं चालूच असायचं….. पण पप्पांच्या मारापेक्षा जर कोणती गोष्ट मला जास्त वेदना देते ती म्हणजे मम्मीचा अबोला….. माझा रिझल्ट लागला की माझी पप्पांच्या कडून येथेच्छ धुलाई होणार हे मला माहित होतं आणि त्याची जराही भीती वाटायची नाही कारण मार खाऊन खाऊन मी पुरता धीट झालो होतो पण मम्मीचा अबोला??….. तो मात्र अगदी आत मनापर्यंत वेदना द्यायचा…. वास्तविक मी प्रथम 3 क्रमांकात नाही आलो तर आई अबोला धरेल कित्येक दिवस बोलणार नाही ह्या विचाराने मी अभ्यास करायचो….. माराचं काही विशेष वाटत नव्हतंच….. पण काय करू?? अभ्यासात माझं मनच लागत नाही….. मला चित्रे काढायला खूप आवडतात….. मला आजूबाजूचा निसर्ग रेखाटायला जाम आवडतो…. शाळेत देखील माझं लक्ष बाजूच्या बगीच्यात असत….. म्हणून तर वर्गातल्या मुलांशी भांडून मी खिडकी कडेची जागा घेतली….. बगीच्यातले पक्षी, खारुताई, फुलझाडे सगळं काही मला आनंदित करून सोडत…. ती फुले, खारुताई वैगेरे मी वहीच्या मागच्या बाजूला रेखाटायचो… माझ्या चित्रकलेच्या मॅडमांना माझी चित्रे खूप आवडायची…. त्यांनी पप्पाना किती वेळा सांगितलं की ह्याची चित्रे खूप चांगली आहेत ह्याला चित्रकलेची आवड आहे तर चित्रकलेच्या क्लासला घाला….. पण त्या दिवशी घरी आल्यानंतर मात्र पप्पांनी माझी सगळी चित्रे जाळून टाकली…… परत तीच धुलाई….. त्यांनी दमच भरला…. “परत चित्र काढताना दिसलास तर तंगड मोडीन”…….. म्हणून तर वहीच्या मागे पेन्सिलने चित्र काढून खोडून घरी जात होतो….. खर सांगू का….. माझं मन नाही लागत अभ्यासात…… मला चित्रे काढायला आवडतात….. शाळेतली मुले जेव्हा एकत्र जमून अभ्यासाच्या चर्चा करतात तेव्हा खूप वेगळं वेगळं वाटत.. कमीपणाचा भाव येतो…. म्हणून तर मी एकटा राहण्याचा प्रयत्न करतो…… आजूबाजूचा निसर्ग पशु पक्षी माझे मित्र बनले आहेत….. आता मला समजून घेणारं कुणीच नाही एवढंच काय तर माझे आई वडील सुद्धा मला समजून घेत नाहीत…. कधी कधी अस वाटत की त्यांनी मला एका मिशन साठी जन्माला घातलं आहे….. मिशन कलेक्टर….. मला ते झालंच पाहिजे असं ते सतत बोलतात….. ते त्यांचं स्वप्न आहे म्हणे पण मग माझ्या स्वप्नांचे काय??…… मला जगप्रसिद्ध चित्रकार व्हायचं आहे…… ज्याचा ह्या वास्तविक जगाशी काहीही संबंध नसेल तो आपल्याच काल्पनिक जगात हरवून वेगवेगळ्या रंगानी चित्र रंगवत जाईल….. पण असो…. आजकल मुलांच्या स्वप्नांना कुठे किंमत आहे म्हणा…… पालकांनी शाळेत अभ्यासात एवढं गुंतवून टाकलं आहे की आधीच्या पिढी सारखं फिरावं, खेळावं, पोहवं हे सगळं आमच्यासाठी स्वप्नवत आहे.. आमच्या उन्हाळी सुट्या सुद्धा क्लासेस आणि स्कॉलर परिक्षमध्येच जातात…. उन्हाळ्याच्या सुट्टीत देखील आमच्या कडून एखादा पेपर किंवा पुढच्या वर्षीची तयारी ते क्लासेस सुरूच असत….. पालकांच्या स्वार्थात आमच्या स्वप्नांचा बळी जातोय ह्याचा विचार कोण करणार आहे??…… मी तरी त्या दप्तराचे आणि घरच्यांच्या स्वप्नांचे ओझे वाहून अक्षरशः थकून गेलो आहे….. खरंच

अजून दुसरी गोष्ट सांगायची झाली तर सगळेच लोक माझ्या विरुद्ध किंवा माझ्यावर ओरडणारे नाहीत बरं….. काही लोकांना माझे जाम कौतुक देखील आहे…. आता तिला “लोक” ह्या कॅटेगरी मध्ये गणले जाऊ शकत नाही… ती फक्त जाणवते तिचा आकार नेहमी बदलत असतो एखाद्या कंपना सारखा तिचा घोगरा आवाज समजण्यासाठी थोडे कष्ट पडतात पण ठीक आहे ना…… अशी ती जरी जिवंत नसली तरी माझ्या आयुष्यात जेवढी जिवंत माणसे आली त्यांच्यापेक्षा ह्या कमला काकूंनी मला खूप प्रेम दिलं आहे….. इतरांच्या दृष्टीने जरी त्या भूत वैगेरे असल्या तरी माझ्या दृष्टीने एक प्रेमळ मायेची ऊब देणारी स्त्रीच आहे…

– क्रमशः भाग पहिला 

☆☆☆☆☆

लेखक:- श्री शशांक सुर्वे

प्रस्तुती : उज्ज्वला केळकर 

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ प्रभाव — भाग-२ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? जीवनरंग ❤️

☆ प्रभाव — भाग-२ ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

(एकदा पूजाला तिने त्यांच्या फॅमिली डॉक्टरकडे नेले.आधी मोहिनी त्यांना जाऊन भेटली होती. या मुलीवर वडिलांचा असलेला प्रचंड प्रभाव तिने डॉक्टरांना सांगितला.) इथून पुढे — 

आणि मग ती सहज म्हणून पूजाला त्यांच्याकडे घेऊन गेली. डॉक्टरकाकांनी तिला हळूहळू बोलते केले आणि तिचे   councelling केले…. “ पूजा, काही वर्षांनी तू मोठी होशील, तुला लग्न करावेसे वाटेल,तेव्हाही तू आपल्या बाबांसारखा जोडीदार शोधणार का? नाही ना? तुझे आयुष्य हे फक्त तुझे आहे बाळा.वडिलांचा आदर्श असणे वेगळे आणि त्यांना चिकटून रहाणे वेगळे.तुला हवे तेच करिअर तू कर पूजा.” डॉक्टर काकांनी तिला समजावून सांगितले… होतात मुली अशा वडिलांकडे आकर्षित. त्याला फादर  फिक्सेशन म्हणतात.पण सहसा आई नसलेल्या किंवा घरात फक्त वडीलच असलेल्या मुलींचा वडील हा आदर्श असतो आणि त्यांच्यावर वडिलांचा फार दबावही असतो. तुमच्याकडे तुझी आई एक आदर्श आई आहे पूजा. हे बघ तू तुला हवे तेच कर यापुढे.” पूजा डॉक्टरांसमोर मोकळी होत गेली.

एकदाच मोहिनीने उमेश नसताना पूजाला समोर बसवून विचारलं होतं, “ बाळा,तुला मनातून काय करायचं आहे? तुझी काय इच्छा आहे? न घाबरता सांग.” पूजा गडबडून गेली. “ आई , पण बाबा….” 

“ हे बघ पूजा,हे आयुष्य तुझं आहे ,बाबांचं नाही. तुला काय करायचं आहे ते तू ठरवायचं आहेस.बाबांनी नाही. तुझा कल कुठे आहे? “ पूजा म्हणाली “ आई, मला नाही ग आवडत ते मेडिकल. मलाही दादासारखं इंजिनीअर होऊन  मग परदेशात पण जावंसं वाटतं.” आज इतक्या वर्षात प्रथमच पूजा मोहिनीशी इतक्या जिव्हाळ्याने बोलत होती. “ हो ना? मग तू तुझ्या मनाचा कौल घे आणि तेच कर. करिअर म्हणजे काही गंमत नाही पूजा. तुझ्या मनाविरुद्ध तू तुला आवडत नसलेले मेडिकल करिअर करणार का? केवळ बाबा म्हणतात म्हणून? आणि का? तुला तुझं मत नाही का? हे बघ पूजा ! आई आहे मी तुझी. मी राहीन तुझ्या पाठीशी उभी. मी तुला बाबांच्याविरुद्ध भडकवत नाहीये, पण असं बाबांच्या ओंजळीने नको कायम पाणी पिऊ. आम्ही तुला जन्मभर पुरणार नाही बाळा.” मोहिनीने पूजाला कळकळीने सांगितलं. आणि मगच तिला डॉक्टर काकांकडे नेलं  . 

केवळ उमेशच्या हट्टाखातर पूजाने p c m b चारही  विषय घेतले. परीक्षा झाली आणि उमेश तिच्या रिझल्टची तिच्यापेक्षाही आतुरतेने वाट बघू लागला. पूजाचा रिझल्ट लागला. तिला बायॉलॉजीमध्ये जेमतेम पास होण्याइतके मार्क्स होते आणि फिजिक्स आणि मॅथ्समध्ये मात्र अत्यंत उत्तम रँकस्. अर्थात आता मेडिकलची दार बंदच होती तिला.

उमेशने खूप धिंगाणा केला, तिला वाट्टेल ते बोलला. “ दोन्ही मुलांनी माझी निराशा केली. तू तरी माझं स्वप्न पूर्ण करशील असं वाटलं होतं मला. माझी सगळी मेहनत वाया गेली. कर आता काय हवं ते.” उमेश तिथून निघूनच गेला. पूजा बिचारी कावरीबावरी झाली. इतके सुंदर मार्क्स मिळूनही कौतुक तर सोडाच पण बाबांची बोलणी मात्र खावी लागली तिला. 

न बोलता तिने इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला आणि तीही मुंबईला निघून गेली  प्रसाद उत्तम मार्कानी इंजिनीअर झाला आणि त्याला सिंगापूरला छान जॉबची ऑफर आली. पूजा सुट्टीवर घरी आली होती. प्रसाद तिला म्हणाला, “ काय मस्त कॉलेज ग पूजा? डायरेक्ट पवई?ग्रेट ग तू.”.

 “ अरे पण दादा,बाबांना हे आवडलं नाही ना. ते बोलत नाहीत माझ्याशी.” पूजा रडवेली होऊन म्हणाली. प्रसाद खो खो हसला आणि म्हणाला  “ मॅडच आहेस. लहानपणापासून सारखी बाबांच्या पंखाखाली राहून तू स्वतःचे आयुष्यच विसरलीस पूजा. सारखं काय बाबा आणि बाबा. गाढव आहेस का? याला ना, फादर  फिक्सेशन म्हणतात वैद्यकीय भाषेत. तुला फक्त बाबा हेच आदर्श वाटायचे लहानपणापासून. त्यात वाईट काहीच नाही ग पूजा. पण किती त्यांचा इम्पॅक्ट तुझ्यावर? ते म्हणतील ते कपडे घालायचे, ते म्हणतील ते वाचायचे,ते म्हणतील तेच सिनेमे बघायचे. तुला स्वतःचं मत नाही का? काही मुली तर लग्न करताना, नवराही आपल्या वडिलांसारखा असावा अशी अपेक्षा ठेवतात.नशीब यावेळी तरी आपल्या मनाचा कौल घेतलास,आणि मेडिकलचं  खूळ झुगारून दिलंस.” प्रसादने तिला जवळ घेतलं… “ मस्त कर करिअर तुझं. कसली हुशार आहेस तू. आगे बढो. मी आहे तुझ्यासाठी.”  पूजाने प्रसादला मिठीच मारली.” दादा आई, सॉरी हं. मी तुम्हाला  ओळखलंच नाही नीट. पण बाबानीही खूप प्रेम केलंय रे माझ्यावर. त्यांना  दुखावलं मी खूप.” पूजाच्या डोळ्यात पाणी आलं. 

“ अग ठीक आहे पूजा. तू काहीही गैर केलेलं नाहीयेस. उलट पवईसारख्या ठिकाणी प्रवेश मिळणं चेष्टा आहे का? तू नको वाईट वाटून घेऊ बाबांचं. आपल्या अपेक्षा मुलांच्यावर लादणे हे अत्यंत चुकीचेच आहे.तू निर्धास्तपणे जा बरं आता.” 

मोहिनीने पूजाची समजूत घातली.जाताना पूजा नमस्कार करायला वाकली तर उमेश तिथून न बोलता निघूनच  गेला. पूजा पवईला गेली. अत्यंत सुरेख करिअर चाललं होतं तिचं. शेवटच्या वर्षात ती घरी आली ती हातात नोकरीचे अपॉइंटमेंट लेटर घेऊनच. ”बाबा,बघा ना. किती छान जॉब मिळालाय मला. राग सोडा ना आता “ .उमेशने ते लेटर बघितले आणि छान आहे म्हणून तिथून निघूनच गेला.पूजा आईजवळ बसली आणि म्हणाली, “आई ,सगळं लहानपण मी बाबांच्या मर्जीनेच  वागून घालवलं ना? ते म्हणजे माझा आदर्श होते. तुलाही मी कधीही महत्व दिलं नाही.. उलट दुखवलंच ग तुला मी. आता आणखी एक गोष्ट सांगायची आहे. मी लग्न ठरवतेआहे. फार छान मित्र आहोत आम्ही. माझ्याच वर्गात आहे … आशिष तिवारी.आपल्या जातीचा नाहीये पण अत्यंत हुशार आणि लाखात एक मुलगा आहे. आता मात्र मी चूक करणार नाही.आणि आशिषमध्ये बाबा शोधायचा वेडेपणा करणार नाही आई. मी मोठी आहे आणि माझं भलं मला समजतं. दादाचे आणि तुझे खूप उपकार आहेत ग माझ्यावर, वेळीच डोळे उघडलेत माझे तुम्ही.” 

उमेशला पूजाने हे लग्न ठरवलेले अजिबात आवडले नाही. त्याने खूप आकांडतांडव केले पण यावेळी मोहिनी आणि प्रसाद तिच्या पाठीशी उभे राहिले. प्रसाद म्हणाला, “ तुम्ही नसला येणार तर नका येऊ लग्नाला. आई आणि मी लावून देऊ त्यांचं लग्न. लाखात एक मुलगा आहे आशिष. कसली जात घेऊन बसलाय हो तुम्ही?”   

पूजाचं लग्न प्रसाद आणि मोहिनीने थाटात लावून दिलं. केवळ नाइलाज म्हणून उमेश लग्नाला उपस्थित होता. पूजाच्या डोळ्यात अश्रू आले. “बाबा,मला माफ करा तुम्ही. पण अभिमान वाटावा अशीच तुमची दोन्ही मुलं आहोत ना आम्ही? आता तर मी आशिषबरोबर अमेरिकेला चाललेय. राग सोडून द्या बाबा.” पूजा म्हणाली. उमेशच्या डोळयातून अश्रू वाहू लागले.” पूजा प्रसाद ,माझं चुकलं.कोणालाही लाभणार नाहीत अशी मुलं मला देवाने दिली. मी जन्मदाता आहे,पण तुमच्या आयुष्याचा मालक नाही हे मला फार उशिरा समजलं. कदाचित मला जे लहानपणी मिळालं नाही ते मी तुमच्याकडून पुरं करायला बघत असेन. यात मी मोहिनीवरही खूप अन्याय केला. पूजाला कधी आईजवळ जाऊच दिलं नाही. यात पूजाची काहीही चूक नाही पण माझं चुकलं… मला माझी मुलं गमवायची नाहीत रे. आता तर तुम्ही दोन्ही मुलं दूरदेशी चाललात. मला माझी चूक कबूल करू दे. मोहिनी,मला माफ करशील ना? मी खूप स्वार्थीपणाने वागलो ग तुझ्याशी..पूजा आशिष, सुखात संसार करा आणि प्रसाद माफ कर मला.” 

प्रसाद म्हणाला.. “  काय हे बाबा?असं नका बोलू. आपण पूजाला आनंदाने निरोप द्यायला एअरपोर्ट वर जाऊया .. .येताय ना? “ डोळे पुसत उमेश आणि मोहिनी ‘हो’ म्हणाले आणि प्रसादची कार एअरपोर्ट कडे धावू लागली..

— समाप्त —   

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ प्रभाव — भाग-१ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? जीवनरंग ❤️

☆ प्रभाव — भाग-१ ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

काल  पूजा लग्न होऊन  सासरी गेली. घर किती रिकामे रिकामे झाले मोहिनी बाईंचे.. त्यांना त्या उदास घरात बसवेनाच. बंगल्याच्या अंगणात सहज आल्या आणि बागेतल्या झोपाळ्यावर बसल्या क्षणभर. शेजारच्या बंगल्यातल्या पद्माची हाक आली, “ मोहिनी,ये ना ग जरा.मस्त चहा पिऊया दोघी.” मोहिनी बाई म्हणाल्या “अग तूच ये पद्मा. मी चहा केलाच आहे तो घेऊन येते .ये गप्पा मारायला.”

मोहिनीने चहाचा ट्रे आणला. पद्मा तिची अगदी सख्खी शेजारीण. लग्न होऊन दोघी जवळपास एकदमच सासरी आल्या आणि चांगल्या मैत्रिणी झाल्या. दोघीही एकमेकींच्या मदतीला तत्पर असत,एकमेकींची सुखदुःख शेअर करत. पद्माची दोन्ही मुलं अमेरिकेत स्थायिक झाली होती. दुर्दैवाने पद्माचा नवरा फार लवकर कॅन्सरने गेला आणि पद्मा फार एकटी पडली. पण त्यावेळी मोहिनी आणि तिच्या नवऱ्याने – उमेशने तिला खूप आधार दिला. मुलं अमेरिकेहून महिनाभर आली,आईला तिकडे घेऊन गेली.चार महिन्यांनी पद्मा इकडे परत आली. म्हणाली, “ मी इथेच रहायचा निर्णय घेतलाय  मोहिनी. थोडे दिवस तिकडे ठीक आहे ग, पण माझं सगळं विश्व इथे भारतातच नाही का? मी मुलांना तसं समजावून सांगितलं आणि त्यांना ते पटलं देखील.आता पुढचं पुढे बघू.” मोहिनीने तिला दुजोरा दिला आणि पद्मा बंगल्यात एकटी रहायला लागली.  .

आत्ताही पद्मा मोहिनीला म्हणाली “ खूप सुंदर केलंस ग लग्न पूजाचं. सुटलीस ग बाई. प्रसाद सुद्धा आलाय सिंगापूरहून ते उत्तम झालं.कुठे गेलाय ग? “

 “अग कालच मुंबईला गेले सूनबाई आणि तो तिच्या माहेरी. आता मी आणि हे दोघेच आहोत  हा आठवडाभर.”. पद्मा म्हणाली “ मोहोनी,प्रसादच्या लग्नाला नाही तुला काही त्रास झाला, पण पूजाच्या लग्नाला केवढा विरोध ग उमेशचा? मला सांग,एवढी शिकलेली मुलगी,आपल्याला आवडेल,योग्य वाटेल तोच जोडीदार निवडणार ना? नाहीतरी उमेश अतीच करतात. जणू काही पूजावर मालकी हक्कच आहे यांचा. तीही वेडी बाबा बाबा करत किती ऐकायची ग त्यांचं.”

“ मोहिनी, इतकी आदर्श आई असूनही ही मुलगी लहानपणी तुला नव्हती कधी attached. पण मग काय जादू झाली तेव्हा की आई आणि दादाचे महत्व समजले. मलाच काळजी वाटायला लागली होती.पण बाई, झालं सगळं नीट. देवाला असते काळजी./’ पद्मा म्हणाली.

मोहिनी म्हणाली “ हो ना ग “ .. .पण खरी गोष्ट  फक्त आणि फक्त मोहिनीलाच माहीत होती. मोहिनीचं मन झोपाळ्याच्या झोक्याबरोबरच मागं गेलं.मोहिनीला लग्नानंतर वर्षभरात प्रसाद झाला.अगदी शहाणं बाळ होतं ते. कधी हट्ट नाही कधी खोड्या नाहीत. आईवडिलांचे लाड करून घेत प्रसाद मोठा होत होता. तो सहा वर्षाचा झाल्यावर ध्यानीमनी नसताना मोहिनीला दिवस गेले. हे गर्भारपण आणि  बाळंतपण जडच गेलं तिला. मोहिनीला सुंदर मुलगी झाली तीच ही पूजा. तिची आई येऊन राहिली दोन महिने म्हणून मोहिनीला खूप विश्रांती मिळाली. उमेशचे लेकीवर जगावेगळं प्रेम होतं. प्रसाद लहान असताना त्याने फारसे त्याला जवळ घेतले, फिरायला नेले असं कधी झालं नाही, पण उमेश पूजाला मात्र खूप खेळवायचा, बागेत न्यायचा. पूजा मोठी व्हायला लागली.उमेश म्हणाला, “आता ही शाळेत जाईल ग.आपण हिला जवळच्याच शाळेत घालू म्हणजे आपल्या नजरेसमोर राहील “ मोहिनी उमेशकडे बघतच राहिली.

“ हे काय उमेश?प्रसादच्याच शाळेत मी तिचं नाव घालणार आणि जाईल की स्कूल बसने. सगळी मुलं नाही का जात? भलतंच काय सांगता? मी ऍडमिशन घेऊन टाकलीय तिची.” पूजा  शाळेतून आली की आधी बाबांच्या गळ्यात पडे. “बाबा ,आज शाळेत असं झालं, मी पहिली आले. “ सगळ्या गोष्टी पूजा बाबांशी शेअर करी. आई आणि भाऊ तिच्या गावीही नसत. मोहिनीला हे फार खटके. विशेष म्हणजे जेव्हा तिच्या मैत्रिणी सांगत की आई मुलीचं एक वेगळंच जिव्हाळ्याचं नातं असतं, तेव्हा तर मोहिनीला वाटे,हे आपलं आणि पूजाचं का नाही?ही मुलगी इतकी कशी वडिलांनाच attached? नाही, त्यात काही चूक नाही,पण  आपणही हिच्यासाठी सगळं करतो, प्रसाद किती लाड करतो, पण हे म्हणजे अजबच आहे हिचं. उमेशला आपली मुलगी फक्त आपलं ऐकते,आईला अजिबात महत्व देत नाही याचा कुठेतरी सूक्ष्म आनंदच व्हायला लागला. हौसेने मोहिनीने एखादा सुंदर फ्रॉक आणावा आणि तिने तो बाबांना धावत जाऊन दाखवावा.उमेश म्हणे .. ‘ छानच आहे ग बेटा हा फ्रॉक पण तुला निळा रंग आणखी सुंदर दिसला असता.’ हट्ट करून पूजा तो  फ्रॉक बाबांबरोबर जाऊन बदलून आणायची आणि मगच तिचे समाधान व्हायचे. उमेश मोहिनीकडे मग जेत्याच्या नजरेने बघायचा. हे असं का व्हावं हेच मोहिनीला समजेनासे झाले. प्रसादच्याही हे लक्षात येऊ लागलं होतं. “आई, तू आणलेली कोणतीच गोष्ट कशी ग पूजाला आवडत नाही? किती सुरेख चॉईस आहे तुझा. माझे मित्र तर नेहमी म्हणतात ‘प्रसाद, तुझे सगळे कपडे मस्त असतात रे.छानच आहे काकूंचं  सिलेक्शन. ’पण मग तू कोणतीही गोष्ट आणलीस की बाबा ती बदलून का आणतात ग? “ मोहिनी त्याला जवळ घेऊन म्हणे, “ अरे,नसेल आवडत त्या दोघांना माझी निवड. जाऊ दे ना. तुला आवडतंय तोपर्यंत मी आणत जाईन  तुझे कपडे हं.” काय होतंय हे समजण्याचं प्रसादचं वय नव्हतं. 

प्रसादला बारावीत फार सुंदर मार्क्स मिळाले. उमेश प्रसादजवळ बसला आणि म्हणाला,” वावा,जिंकलास रे प्रसाद. आता तू मेडिकलला जा. तुला हसत मिळेल ऍडमिशन.मग तू मोठं हॉस्पिटल काढ. माझं स्वप्न आहे तू  डॉक्टर व्हावंस असं.” त्यावेळी प्रसादने त्याच्या नजरेला नजर देऊन सांगितलं होतं .. . ” पण माझ्या स्वप्नांचं काय बाबा? मला अजिबात व्हायचं नाहीये डॉक्टर.मी इंजिनिअरच होणार.मी तिकडेच घेणार प्रवेश. बोलू नये बाबा,पण तुम्ही माझा विचार कधी केलात का लहानपणापासून? माझी आई भक्कम उभी आहे आणि होती म्हणून मी इथपर्यंत आलो. तुम्हाला तुमच्या पूजाशिवाय दुसरं जग आहे का? ती करील हं तुमची स्वप्नं पुरी. मी नाही तुमच्या अपेक्षा पुऱ्या करणार !” प्रसाद तिथून निघूनच गेला.आपल्या या मुलाकडे  उमेश बघतच राहिला.असं आजपर्यंत त्याला कोणी बोलले नव्हते. मोहिनी हे सगळं ऐकत होतीच.

ठरल्याप्रमाणे प्रसादने इंजिनियरिंगला ऍडमिशन घेतली आणि तो  गेला कानपूरला.आता उमेशने आपलं सगळं लक्ष पूजावर केंद्रित केलं. तिचं एक वेळापत्रकच आखून दिलं. स्वतः तिच्याबरोबर अहोरात्र बसून तिची तयारी करून घेऊ लागला. सतत मनावर बिंबवू लागला ‘ पूजा,तुला डॉक्टर व्हायचंय. इतके इतके मार्क्स पडलेच पाहिजेत तुला.’  पूजा जिद्दीने अभ्यासाला भिडली. मोहिनी हे नुसतं बघत होती. तिला पूजाची अत्यंत काळजी वाटायला लागली. पूजाचा कोंडमारा होतोय हेही लक्षात आलंच तिच्या. एकदा पूजाला तिने त्यांच्या फॅमिली डॉक्टरकडे नेले.आधी मोहिनी त्यांना जाऊन भेटली होती. या मुलीवर वडिलांचा असलेला प्रचंड प्रभाव तिने डॉक्टरांना सांगितला

– क्रमशः भाग पहिला 

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print