मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ‘आरसा…’ – लेखक – सुश्री रेणुका दीक्षित ☆ प्रस्तुती – श्री मेघःशाम सोनवणे ☆

श्री मेघःशाम सोनवणे

?जीवनरंग ?

☆ ‘आरसा…’ – लेखक – सुश्री रेणुका दीक्षित ☆ प्रस्तुती – श्री मेघःशाम सोनवणे ☆

“काय????” जोरात किंचाळत अमोघने सईला विचारले.. दचकून आजूबाजूच्या टेबलवरची लोकं पाहू लागली.

“आपण हॉटेल मध्ये आहोत… be calm अमोघ… चील मार…” सई कॉफीचा घोट चवी चवीने पीत म्हणाली.

अमोघ वैतागत म्हणाला, “तुझं हे चील ना मला कधी कधी शेखचिल्लीची आठवण करून देत राहतं… काय करशील तुझा नेम नाहीय.. काहीही वेड्यासारखा विचार करू नकोस.. आई तुला हे सगळं बोलली का?? मला आईशी बोलावं लागेल… नक्की प्रॉब्लेम काय आहे?? काय कमी आहे आत्ता तिला…?”

“हे बघ… मी तुला सांगते आहे… विचारत नाहीय… आईनाही यातलं काहीही माहिती नाहीये .. म्हणजे कल्पना आहे ..आणि हे मनात आले की पटकन मी करून मोकळी होते म्हणून आज तुझी बायको म्हणून बसलेय तुझ्यासमोर… नाहीतर तू दहा वेळा कबड्डी खेळाडूसारखं माझ्यापर्यंत येऊन मागे जात होतास.. रेषेला न शिवता… आठवतं ना…”

अमोघला आठवलं, इंजिनीअरिंगला असतानाच सई त्याला खूप आवडायची. पुढे जाऊन दोघांना नोकरी लागली. हळुवार प्रेम मनात उमलू लागले, पण ते सांगण्याची हिंमत त्याच्यात नव्हती. आपल्या घरी आई एकटीच… आपला आणि सईचा तेव्हाचा आर्थिक स्तरही वेगळा…

एके दिवशी रविवारी ही सई सरळ घरी आली होती. आईने केलेले पोहे खाऊन चक्क तिनेच विषय काढला होता. तिला अमोघ आवडतो, तिच्याइतकी आत्ता आर्थिक परिस्थिती नसली तरी त्याच्या हुशारीवर असलेला तिचा विश्वास, त्यालाही ती आवडते असा दाट संशय… सगळे काही बोलून मोकळी…. आपण तर नुसते बघतच बसलेलो होतो. तिने उचललेलं हे पाऊल… पुढे लग्न… तिची साथ… मनासारखं घर… अवनी सारखी गोड मुलगी… आईचे कमी होत गेलेले कष्ट…. सईचं आईला आपलंसं करून घेणं… सगळं काही क्षणार्धात समोर येऊन गेलं….

तडकाफडकी मनात येईल ती बोलत आणि करत असली, तरी त्या मागे तिचे ठाम विचार.. त्या दिशेने कृती.. हे त्याला चांगलेच माहिती होते..

सवाष्ण नाही म्हणून आई लग्नात विधीला बसायला तयार नव्हती. या सईने आग्रह करून सूनमुख आईच आधी पाहणार असा हट्टच केला होता..

जसे आठवत होते तसे आई कधीच आरशासमोर उभी राहिलेली त्याला आठवली नाही. दोन मिनिटं छोट्या आरशात बघून बाजूला व्हायची.

तो तीन वर्षांचा असताना त्याची आजी आणि वडील दोघं एका अपघातात दगावले होते. आजूबाजूच्या लोकांमुळे किंवा काहीही, पण आईने स्वतःला साध्या साड्या, साध्या रुपात गुंतवून घेतलं होतं. किती गोष्टी तिने मागे टाकल्या होत्या याची त्याला आत्ता कल्पना येत होती, स्वतः चा संसार सुरू झाल्यावर.. तरीही ती जे काही बोलत होती ते अजिबातच त्याला मान्य नव्हते… आईचं लग्न….

तो बुरसटलेल्या विचारांचा नक्कीच नव्हता, तरीही हे जे काही चालवलं होत सईने, ते त्याला पचनी पडत नव्हतं… तो एकदम गप्प होऊन गेला होता….

त्याच्या मनातली घालमेल पाहून सईने हळूच त्याच्या हातावर हात ठेवला… “मला तुझ्या मनातली उलथापालथ अगदीच समजते आहे. मी खूप वेळ घेतलाय. काही गोष्टी माझ्या लेव्हलवर पास केल्या आहेत, आणि मग तुझ्याशी हे बोलते आहे… तुझ्या इतकंच… कदाचित तुझ्याहीपेक्षा जास्त मी आईंशी जोडले गेले… त्यांच्या शाळेच्या नोकरीत भागणार नाही हे ओळखून आजोबांनी त्यांची शिवणकलेची आवड व्यवसायात बदलण्यासाठी केलेले प्रयत्न, आईंचे कष्ट, सगळी कलात्मकता पणाला लावून नोकरी आणि व्यवसाय यावर तुला मोठं केलं त्यांनी. अवघा तीन वर्षांचा त्यांचा संसार… त्याच्या आठवणीत आजवर आयुष्य काढलं त्यांनी… आजोबांचंही शेवटच्या दिवसात किती केलं ते मी कॉलेजमध्ये असताना पाहिलं आहे. तुला सांगू… लग्नानंतर मी त्यांना बऱ्याच वेळा म्हणायचे, ‘तुम्हाला छान सिल्कच्या साडीत.. कानातले.. बांगड्या.. केसात मोगऱ्याचा गजरा.. असं पहायचं आहे. तुम्ही भान विसरून आरशात बघत बसल्या पाहिजेत…’  त्या हसून सोडून द्यायच्या..”

“ बरं…. ‘यासाठी लग्नाचा घाट’ असं तुला वाटतं असेल तर नीट ऐक…  त्यांनी इतकी वर्ष एकाकी काढली. आपण आहोतच रे सोबत… पण आपलेही काही ना काही उद्योग सुरूच असतात…

तुला सांगू… म्हणजे हे माझे विचार आहेत.. प्रत्येकाला अगदी कोणत्याही वयात हक्काची सोबत लागतेच की.. ‘मी आहे ना…’ असं सांगणारा एक आवाज… कधी आपले लाड करणारं… वय विसरून लहान करणारं हक्काचं माणूस.. संवाद साधायला… अगदी कधी मनात आलं, तर मी जशी तुझ्याशी भांडते तसं भांडायलाही कुणीतरी हवं… बरं वाटत नाहीये… हे सांगायला अर्ध्या रात्री शेजारी कुणी हवं….”

तिला थांबवत अमोघने विचारले, “मग आता काय तू आईचं नाव वधुवर सूचक केंद्रात घालते आहेस का काय… यातून पुढे काय होईल याचा विचार केला आहेस..? लोकं काय म्हणतील??”

सईने लगेच उत्तर दिले… “किती आले होते रे तुझे नातेवाईक तुम्हाला मदत करायला… आणि जे मी तुला सगळं सांगितलं तसाच एक छान मेसेज बनवून मी सगळ्यांना पाठवणार आहे. कुणाला काही प्रश्न असणार नाहीत त्यांच्या लग्नानंतर…  .हे बघ, अवनी एरवी रविवारी अभ्यास करते का? पण परीक्षा असली की आपोआप न सांगता अभ्यासाला बसते… ती मानसिकता रुजलेली असते. तशीच थोडी मानसिकता सगळ्यांमध्ये थोड्या प्रमाणात रुजवते… करते प्रयत्न…”

“आता इतका विचार केलाच आहेस तर लग्न कुणाशी आणि आई कुठे जाणार हेही सांगून टाक…”

“त्रागा करून घेऊ नकोस… काळजीही करू नकोस… गेले सहा महिने मी साठे काकांना पाहतेय… बाजूच्या बिल्डिंगमध्ये राहायला आले आहेत… परवा नाही का तू होतास तेव्हा मला होममेड कणकेची वडी घेऊन आले होते… ते.. बायको कॅन्सरने गेली… बारा वर्ष झाली.. मुलगी लग्न होऊन ऑस्ट्रेलियात असते… सोसायटीत असलेल्या प्रोग्रॅममुळे आमची घट्ट मैत्री.. उत्साही.. स्वतः ला सकारात्मक कामात गुंतवून घेतलेले काका .. मुलांना किल्ले बनवायला मदत कर.. कामवाल्या मावशींच्या मुलांना शिकव.. गृहिणींसाठी आर्थिक साक्षरतेची कार्यशाळा घे.. असे असले तरी ही क्वचित एक उदासी जाणवली त्यांच्या चेहऱ्यावर…

मी त्यांच्याशी, त्यांच्या लेकीशी बोलून.. त्यांची परवानगी घेऊन… त्यांचं मत विचारात घेऊनच तुझ्याशी बोलतेय… आईना मी नाही, पण काकांनी कल्पना दिली आहे या सगळ्याची… त्या हो म्हणत नाहीत, पण नाही ही म्हणाल्या नाहीत… तू काय म्हणशील हा विचार… लोकांची धास्ती आहेच… त्यांनी स्वतःला मिटवून घेतलं आहे… नवरा नाही.. या एका गोष्टीपायी या पिढीमधल्या सगळ्याच बायकांनी कदाचित असंच स्वतः ला बंद करून घेतलं आहे……

….. आणि इतकं सगळं जुळून येतंय म्हणूनच हे तुला सांगते आहे. आपण बोलू सगळ्यांशी… मार्ग काढू… आणि त्या आपल्या जवळच राहतील.. दोघंही… अवनीला एक छान आजोबा मिळतील.. माझा आग्रह नाही तू त्यांना वडील मानावं असा… पण एक उबदार सोबत तुला नक्की मिळेल ही खात्री करूनच मी पुढे जायचा विचार करते आहे..

मी तर म्हणेन आईना एक दोन वर्ष राहू दे पलीकडच्या बिल्डिंगमध्ये… कधी हौसेने त्यांचं माहेरपण झालं नाही, की सणवार… मला त्यांचं माहेरपण करायचं आहे… वर्षभर त्यांचे सगळे सण त्यांना नवीन साडी घेऊन मस्त साजरे करायचे आहेत मला … त्यांना मनापासून तयार होऊन आरशात पाहताना मला बघायचं आहे…..  अमोघ.. इतकं सोसून त्याबद्दल चकार शब्दही काढत नाहीत आई… खूप शिकले मी त्यांच्याकडून… कधी एका शब्दाने ‘मी इतकं केलं…’ never… मी मनापासून काही ठरवते आहे.. मला तुझी फक्त साथ हवीय.”

अमोघ गप्प होत म्हणाला.. “बाई गं.. येत्या वटपौर्णिमेला मी वडाला फेऱ्या मारतो …ही वेडी मुलगी मला सगळे जन्म बायको म्हणून दे….”

हळूहळू सगळ्यांशी संवाद साधत दोघांनी गोष्टी पुढे नेल्या… सुमतीबाईंना सईने स्वतःच्या हाताने तयार केले होते.. आजवर झुगारून दिलेला मोठा आरसा… हिरवा रंग त्यांना अंगभर भेटायला आला होता.. लाल काठाची हिरवीगार पैठणी… हातात हिरव्या बांगड्या.. हाताला मेंदी… गळ्यात मोजके दागिने… नाकात नथ… केसात सुंदर गजरा…

त्या भान हरपून आरशात पहातच राहिल्या… डोळे आनंदाश्रूंनी भरून आले होते… तशाच काही भावना चेहऱ्यावर दिसलेले सईचे प्रतिबिंब त्यांना त्यात दिसले… नेहमीसारखे चेहऱ्यावर खट्याळ हसू आणि डोळ्यात पाणी… “बघा आई… मी म्हणाले होते ना… एक दिवस तुम्ही स्वतःला विसरून आरशात बघत राहाल असे काही मी करेन…”

आरशात एक छबी कैद झाली होती…. एकमेकींच्या मिठीत विसावलेल्या त्या दोघींचे चेहरे …statue केल्यासारखे…

लेखिका : सुश्री रेणुका दिक्षित

संग्राहक – मेघःशाम सोनवणे

मो 9325927222

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अखेरची इच्छा … भाग – २ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

☆ अखेरची इच्छा … भाग – २ ☆ डॉ. ज्योती गोडबोले

(किती अल्प संतुष्ट आहे ग हं विशाल. नुसता स्वभाव चांगला असून काय उपयोग? महत्वाकांक्षा नको का काही ?” ) इथून पुढे —-

“ बरं वैदेही, ते जाऊ दे आता. किती पैसे लागतील ते सांग मला. मी चेक देते तेवढ्या रकमेचा “ .वैदेही आणि ऋचाला रडू आलं. आपल्याला वाटलं तशी आजी कठोर आणि आपमतलबी नाही हे ऋचाला समजलं. “ किती व्यवहारी आहे आपली आई ! तिचं ऐकलं असतं तर आपणही ताई माई सारखे पैसा गाठीला लावून राहिलो असतो.”   वैदेहीला ऋचाचं लग्न केवळ आईच्या मदतीमुळे  चांगलं करता आलं. ऋचाला छान नेकलेस,  व्याह्यांचे मानपान, सगळं हौसेने करता आलं. 

ऋचा सासरी जाताना आजी सांगायला विसरली नाही, “ ऋचा, बाईला आपली आयडेंटिटी जपता आली पाहिजे बरं ! तुझी नोकरी तू काहीही झालं तरी सोडू नकोस. तुझ्या आईची फरपट कायम लक्षात ठेव. इतकी गुणी आणि हुशार माझी वैदेही, पण बघ ना, एक चुकीचा निर्णय आणि जन्मभर पश्चाताप आला बघ नशिबाला. माझा जीव तुटतो तिच्यासाठी ! तुझ्या दोन्ही मावश्या पण लबाड आहेत बरं का ग! जपूनच अस हो त्यांच्यापासून !”

ऋचा हसली आणि आजीला मिठी मारून म्हणाली,”आज्जी, कित्ती ग हुशार होतीस तू ! अशीच आहेस का ग पहिल्यापासून?” आजी हसली आणि म्हणाली, “नको  का अशीच मी ऋचा? तुझे आजोबा भोळे सांब ! मी खमकी होते म्हणून नीट संसार केला बरं ! अग, संसाराला बाई चतुर धोरणी हुशार  लागते बाळा! कायम लक्षात ठेव !अग पैसा असेल तरच सगळं खरं बरं ! नाहीतर सगळे गुण मातीमोल होतात. कायम लक्षात ठेवा. आणि ए रोहित ठोंब्या,तू सुद्धा !” रोहितने आजीला उंच उचलले आणि गरगर फिरवले. “ अरे हे काय मेल्या, मरेन ना मी !”– “ छे ग आजी,अजून मी डॉक्टर कुठे झालोय? मी डॉक्टर झालो की मग मरायचं ! आत्ता नाही !” – “ बाई गं वैदेही,अफाट आहे बरं पोरगं तुझं.”  आजी खुदुखुदु हसत आत गेली.  

ऋचा सासरी गेली आणि वैदेहीला घर सुनंसुनं झालं. आईला म्हणाली, “आई यावेळी नको ना जाऊ माईकडे ! थांब माझ्याजवळ ! मला माहीत आहे, तिकडे तुझी आबाळच होते, पण तू बोलत नाहीस.  दोघींकडे सुना मुलं नातवंडे असा धबडगा असतो. मला समजतं ग ! माझी जागा मोठी असती तर मी कायम तुला संभाळले असते बघ !”  आई उदास झाली.  म्हणाली, “चालायचंच वैदेही ! त्यानाही करू दे जरा आईची सेवा !तरी मी तुझ्याचकडे राहते जास्त, आणि ते पथ्यावरच पडलंय त्यांच्या ! यावेळी राहीन बाळा, पण दरवेळी नको आग्रह करू हं !” दोघींचे डोळे भरून आले. आजी खूप थकली आणि मग मात्र ती जास्त जास्त वैदेहीकडे राहू लागली. ताई माई लहर लागली तर फिरकत,, नाही तर येतही नसत. रोहित सुंदर मार्क मिळवून डॉक्टर झाला आणि त्याला हवी तशी सर्जरीला ऍडमिशन मिळाली  आजीला अतिशय आनंद झाला.आजी म्हणाली,” रोहित, माझं एक काम करशील? आपल्या नगरकर वकिलांचा मुलगा वकील झालाय ना? त्याला बोलावून आण.उद्याच.” रोहितने वकिलांना बोलावून आणले. आतल्या खोलीत बराच वेळ चर्चा चालली होती, पण ती कोणीच ऐकली नाही. दुसऱ्या दिवशी नगरकर वकील गाडी घेऊन आले आणि आजींचे मृत्युपत्र रजिस्टर झाले सुद्धा ! आजींना फार समाधान झाले. ” रोहित, मला वचन दे.तू वैदेहीला नीट संभाळशील. कधीही अंतर देणार नाहीस “ .. .” नाही ग आजी, मी असं कसं करेन? मी आईला कायम संभाळणारच ! आणि तुला सुद्धा ! माझं लग्न नाही का बघणार तू?” रोहित लाजला. “ अरे लबाडा ! आत्ता सांगतोस होय? ये बघू घेऊन तिला उद्या !” 

दुसऱ्याच दिवशी रुचिराला घेऊन रोहित घरी आला. “आजी, ही बघ तुझी नातसून ! अगदी ढ आहे, काहीही येत नाही स्वयंपाक ! नुसतीच आहे डॉक्टर ! तूच शिकव हं हिला सगळं ! “ रुचिरा हसत होती. “आजी, मला सगळं येतं हो !काहीही सांगतो हा गाढव !”— “आजी, सर्जन नवऱ्याला गाढव म्हणत का ग तुमच्या वेळी?” सगळे हसण्यात सामील झाले.

वैदेहीला,आजीला ही गोड रुचिरा अतिशय आवडली. त्याच रात्री, काहीही हासभास नसताना आजी झोपेतच गेल्या. रोहितला अतिशय वाईट वाटले. त्याची आजी म्हणजे तर त्याची जिवाभावाची मैत्रीण– ती  गेली ! पण सगळ्यानी समजूत घातली, “अरे किती जगायचे रे त्यांनी ! चौऱ्याण्णव हे काय कमी झालं का वय? सगळं बघितलं त्यांनी !अगदी नातसून सुद्धा !आणखी काय हवं रोहित? झोपेत किती छान शांत मृत्यू आला त्यांना !” 

दिवस कार्य झाल्यावर नगरकर वकील आले. “ सगळ्याना बोलावून घ्या,आजीचं मृत्युपत्र वाचायचं आहे तुमच्या समोर ! “— ‘आईनं  मृत्युपत्र केलं होतं? आम्हाला नाही बोलली काही कधी !’ ताई माई म्हणाल्या. अतुलही अमेरिकेतून आला होता.

नगरकर वकीलानी सगळ्यांसमोर मृत्युपत्र उघडले. मृत्यूपूर्वी आठच दिवस आजीने रजिस्टर्ड मृत्युपत्र केले होते. आजींनी त्यात लिहिले होते,— “ माझा  जुना वाडा रोहितला द्यावा. तिथे त्याने हॉस्पिटल काढावे. हवे तर पाडून नवीन  हवी तशी इमारत  बांधावी.  आमच्या वास्तूचा असा  सदुपयोग दुसरा कशाने होणार?  माझ्या ताई माईना मी माझ्या फिक्स डिपॉझिट रिसीट निम्म्या निम्म्या देऊ इच्छिते. माझा दुसरा फ्लॅट वैदेहीला देण्यात यावा. माझे दागिने अतुलला मिळावेत. तसाही त्याला पैशाचा, घराचा उपयोग नाही. आणि माझी सगळ्यात जास्त सेवा वैदेहीने निरपेक्षपणे केली आहे, म्हणून तिला माझा फ्लॅट मी देतेय. बाकी माझे आशीर्वाद तर कायम तुम्हाला आहेतच. विल वाचून संपले. .सगळ्यांचे चेहरे बघण्यासारखे झाले. अतुल म्हणाला,  “ हे काय असलं विल ! मी एकुलता एक मुलगा !माझा हक्कच आहे दोन्ही घरांवर !” ताईमाई म्हणाल्या, “ हे काय आईचं वागणं !आम्ही काही कमी नाही केलं आईचं ! या रोहितला सगळा वाडा ! आणि वैदेहीला फ्लॅट पण ! आम्हाला हे मान्य नाही.”

नगरकर हसायला लागले. तुमच्या मान्य-अमान्यचा प्रश्नच येत नाही. आजींनी हे सगळं ओळखून रजिस्टर विल केलंय. त्यात कोणालाच बदल करता येणार नाहीत. तुम्हालाही पुष्कळ पैसे मिळाले आहेत. आजींच्या एफ डी मला माहीत आहेत किती रकमेच्या आहेत ते ! अतुलराव, उगीच वाकड्यात शिरू नका. किती वेळा आलात हो गेल्या पाच वर्षात आईकडे बघायला, भेटायला ? कधी तिला अमेरिकेला चल, असं तरी म्हणालात का ? मिळालंय तेही खूप आहे. कमी नाहीये. आजी हुशारच होत्या. मला जास्त तोंड उघडायला लावूच नका. मी, माझे  बाबा असल्यापासून तुमच्या घरी येतोय. तुमच्या वडिलांचे वकील होते माझे बाबा.  मी ओळखतो सर्व मंडळींना ! आजींनी फार विचारपूर्वक छान, आणि कोणत्याही कायदेशीर त्रुटी न ठेवता विल केलंय. तुम्हाला माहीत नसणार म्हणून सांगतो, त्यांनी लिव्हिंग विल पण केलेय. म्हणजे, त्यांना वेळ आलीच तर कोणत्याही कृत्रिम उपायांनी जगवू नये, व्हेंटिलेटरवर अजिबात ठेवू नये असे ! नेत्रदान करावे. ते तर आपल्या रोहितने केलेच म्हणा ! किती हुशार होत्या आजी बघा. त्यांच्या अंतिम इच्छेला मान देणं तुमचं सगळ्यांचं कर्तव्य आहे. कोणालाही काहीही कमी मिळालं नाही आणि असलं तर ज्याने त्याने त्यांनी असं का केलं ते समजून  घ्यावे ! माझी जबाबदारी सम्पली.” — नगरकर वकील निघून गेले.  

चेहरे पाडून ताईमाई आणि अतुल, तिथून चहासुद्धा न घेता निघून गेले. पैसा माणसात वाकडेपणा आणतो हे वैदेहीला पुन्हा एकदा समजले. तिला अतिशय वाईट वाटले. रोहित म्हणाला,”आई, तू का वाईट वाटून घेतेस? आजीला माणसांची  चांगलीच पारख होती. आला वाईटपणा तर येऊ देत. तू शांत रहा आणि आजीच्या इच्छेला आपण मान देऊया.  तू  किंवा मी, काहीही मागायला गेलो नव्हतो आजीकडे ग !  आपल्याला  तिचे विल माहीत तरी होते का? नाही ना? मग बस झाले.” रोहितने आईची समजूत घातली आणि तो रुचिराला फोन करायला वळला.

– समाप्त – 

प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अखेरची इच्छा … भाग – १ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

☆ अखेरची इच्छा … भाग – १ ☆ डॉ. ज्योती गोडबोले

कालच वैदेही  ऋचाला खूप रागावली होती. हल्ली ऋचाच्या मागण्या जरा जास्तच वाढल्या होत्या. रोहित अजून लहान होता, म्हणून अजून  तरी  आईचं ऐकत होता. ऋचा आता दहावीला होती आणि  मैत्रिणींकडे नवीन काही बघितलं की हिला ते हवंसं वाटे. यात तिची चूक नव्हती. ते वयच तसं होतं आणि अशा तिच्या मागण्याही काही फार अवास्तव नसत. पण फक्त विशालच्या एकट्याच्या पगारात भागवताना वैदेहीच्या नाकी नऊ येत. हे कोडे कसे सोडवावे, हेच तिला समजेनासे झाले होते हल्ली. मुलांकडे नीट लक्ष देता  यावे, म्हणून असलेली चांगली सरकारी नोकरी सोडली तिने आणि आता पश्चाताप करण्याखेरीज हातात काहीच उरले नाही !

तेव्हाही विशाल म्हणाला होता, की ‘ नको  सोडू नोकरी. आपल्याला अजून बरीच गरज आहे. अजून मोठा फ्लॅट घ्यायचाय ना, शिवाय मुलांसाठीही लागतीलच पैसे ! ‘ पण खुशाल सोडली आपण नोकरी. मैत्रिणी, बॉस   -सगळे सांगून थकले…. पण तेव्हा घर, मुलं यांचं भूत बसलं होतं डोक्यावर !आता लक्षात येतंय  की आपण नोकरी सोडल्याने काहीही फायदा झालेला नाही, उलट तोटाच झालाय. बहिणी म्हणाल्या होत्या की “ बरं झालं नोकरी सोडलीस. आता आईकडे तुला छान लक्ष देता येईल. आम्ही नोकऱ्या करतो, म्हणून फक्त सुट्टीच्या दिवशी येऊन जाऊ.” भाऊराया परदेशात स्थयिक झालेले, त्यांचे येणे कधीतरीच व्हायचे, आणि ते आले की मग काय ! तोचि दिवाळी दसरा व्हायचा आईला.   

अतुल आईचा अतिशय लाडका. अगदी उघड उघड ती त्याला देत असलेले झुकते माप लक्षात येण्यासारखेच असे. या तिघी बहिणी आणि हा एकुलता एक भाऊ. सगळ्यात धाकटा आणि सगळ्यात हुशार, म्हणून आईचा अत्यंत लाडका. त्याच्याच आवडीच्या भाज्या, त्याला आवडते म्हणून कायम घरात सणासुदीला जिलबीच. मुलींना आई फारसे महत्व द्यायचीच नाही. अतुल  म्हणेल ते प्रमाण. याचा परिणाम असा झाला, वरच्या दोघी जणींनी आपापली लग्नं ऑफिसमध्येच ठरवली आणि आईने  न बोलता लावूनही  दिली.

वैदेही त्यातल्या त्यात गरीब आणि भिडस्त ! सगळं दिसत असूनही बंड न करणारी आणि सोसणारीही. बहिणीही सांगून थकल्या– ‘अग वैदेही, नोकरी कसली सोडतेस? आम्ही नाही का केल्या नोकऱ्या? मुलंबाळं सांभाळून? तुलाही जमेल. मुलं काय ग, बघताबघता होतात मोठी, पण पैसा मात्र त्या प्रमाणात वाढत नाही,आणि गरजा मात्र वाढतात.’ 

पण वैदेहीला हे पटले नाही. कालांतराने तिचे वडील कालवश झाले  आणि आई एकटी पडली. बहिणींनी आधीच  खूप लांब घरं घेतली होती. वैदेहीचंच घर आईच्या जवळ होतं.  आई शिक्षिका होती आणि तिने स्वतःला  छान गुंतवून घेतलं होतं. पत्ते ग्रुप, भिशी ग्रुप, त्यांच्या समवयस्क मैत्रिणींच्या जवळपासच्या ट्रिपा, आईचा वेळ मस्त जायचा. आई एकटीही मजेत राहत होती. वैदेहीला आता वाटलं, किती मूर्ख आहोत आपण !

 मुलं बघताबघता सहजपणे मोठी होत होती, आणि लागलं सवरलं तर आई होती की बघायला . परवाच  ऋचा म्हणाली ते तिला आठवलं, “ आई, कशाला ग नोकरी सोडलीस तू? मला जर कमी मार्क मिळाले, तर तू म्हणणारच, आम्ही नाही हं तुला पेमेंट सीट देऊ शकत ऋचा ! माझ्या इतर मैत्रिणींच्या घरी दोघेदोघे नोकऱ्या करतात म्हणून सगळं कसं मस्त आहे. त्यांना नाही हा प्रॉब्लेम !”  वैदेहीला हसावे का रडावे हेच समजेना. या मुलीला चार महिन्यापासून पाळणाघरात नको टाकायला म्हणून  जीव नुसता तळमळला होता आपला, आणि म्हणून नोकरी सोडली ना आपण ! तर तीच मुलगी बघा काय म्हणतेय ! तिचंही बरोबरच होतं म्हणा. मागे त्यांची कुलू मनालीला ट्रिप होती. तर त्यावेळी आपण तेवढे पैसे देऊ शकलो नाही तिला. काय हे ! वैदेहीला पुरेपूर पश्चाताप झाला. विशाल तर काय ! त्याला कशाचेच सोयरसुतक नसायचे. ना कधी त्याने प्रमोशनसाठी धडपड केली, ना कधी काही नवीन गोष्टी शिकला ऑफिसमध्ये ! वर्षानुवर्षे तीच नोकरी करत राहिला… निर्विकार पणे !  आईला आता ऐशी वर्षे पूर्ण झाली. आता मात्र तिला एकटे राहवेना . तिघी बहिणींकडे ती आलटून पालटून राहू लागली. अतुल कायम अमेरिकेत स्थायिक झाल्यामुळे त्याचा प्रश्नच येत नव्हता. ताई माई जमेल तसं बघायच्या आईकडे.  त्याही आता  रिटायर झाल्याच होत्या. वैदेही सर्वात धाकटी. 

आईचा स्वभाव अतिशय हेकट, कुरकुरा आणि  कुणाशी  ऍडजस्ट करणारा नव्हता. आयुष्यभर मास्तरकी केल्यामुळे, मी म्हणेन तसंच झालं  पाहिजे ही वृत्ती लोकांना आता त्रासदायक  ठरू लागली. ताई माईंची घरं मोठी होती, तरी त्यांचीही मुलं सुना आल्या होत्याच ! आजीचं आणि नवीन नातसुनांचं एक मिनिट पटत नसे. सुना म्हणत, “अहो आई,, आजीचं नका सांगू काही करायला. त्यांना आमचं काहीही आवडत नाही. सतरा चुका काढत बसतात. तुम्ही त्यांचं सगळं करून जा. इतर कामं आम्ही करू”.   सुदैवाने वैदेहीकडे हे झगडे होत नसत. तिच्यात आणि ताई-माईमध्ये बरंच अंतर होतं म्हणून, आणि तिची मुलंही अजून कॉलेजमधेच शिकत होती. तरीही ऋचा रोहितचे आजीशी फार पटत असे. आजी फार लाडकी होती त्या दोघांची ! कुठे चाललीस, कधी येणार, हा काय ड्रेस घातलाय, अशी टीका टिप्पणी आजीची बसल्याबसल्या चालू असे.  आणि मुलांना ते मुळीच चालत नसे. मुद्दाम ऋचा आजीसमोर येऊन म्हणायची, ‘आजी हा स्कर्ट आवडला का? मांड्या दिसत नाहीत ना? आजी, गळा खोल आहे का टॉपचा?” – मुद्दाम आजीला चिडवून ऋचा म्हणे.. ‘हात मेले !’ आजी रागावून म्हणायची. किती वेळा तरी  वैदेहीने आईला सांगून बघितलं, की आई नको ग तू त्यांच्या   भानगडीत पडत जाऊस. आत्ताची मुलं आहेत ती. आम्ही घेतलं तुझं ऐकून, ती कशी घेतील? तू शांत बसत जा ना.” पण हे काही तिला जमायचं नाही. रोज रोज खटके! रोहित स्वतःच्या मेरिट वर मेडिकलला गेला. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये फी अगदी माफक, म्हणून तो अभिमानाने सांगे, “ मी खरा मेरिट होल्डर डॉक्टर होणार आजी!”

तरीही त्याला आजी म्हणायचीच ‘ हे काय लांडे कपडे ! ही कसली फाटकी पॅन्ट ! गुडघ्यावर फाटलीय ! आणि हे काय झबलं  घातलंय?” खोखो हसून रोहित म्हणायचा. आजी, ही अशीच  फॅशन असते, लै भारी असते बरं ! ‘पुरे मेल्यानो .. नसतं अवलक्षण,’  असं म्हणून आजी उठून जायची. रोहितवर आजींचा विशेष जीव ! एक तर तो अतिशय हुशार आणि दांडगोबा. आजी त्याचं सगळं ऐकायची.

आईची तब्येत चांगलीच होती. पण तरीही आता तिच्यासाठी म्हणून दिवसाची बाई ठेवावी, असा निर्णय मुलींनी घेतला. कारण मग त्याशिवाय यांना घराबाहेर पडताच येत नसे.  सुना बघायला अजिबात तयार नसत आणि वैदेहीच्या मुलांची कॉलेजेस दिवसभर ! ओळखीच्या एक चांगल्या बाई मिळाल्या आणि त्या सकाळपासून रात्रीपर्यंत येऊ लागल्या. आई खुशीने त्यांचे पैसे देऊ लागली. तिलाही सोबत, आणि गप्पा मारायला एक माणूस झालं. शांताबाई आजींना रिक्षातून देवाला, बागेत, आजी म्हणतील तिथे हिंडवून आणायच्या. मुलं चेष्टा करायची, “आजी भेळ खाल्ली का? आम्हाला नाही का आणली?” आजी खुशीत हसायची. वैदेहीची मुलंही मोठी झाली. आजी आता  नव्वदच्या जवळपास आल्या. ऋचाचं लग्न ठरलं आणि तिला खूप छान स्थळ मिळालं. आजीने वैदेहीला जवळ बसवलं आणि विचारलं, ‘ वैदेही, तुला काही पैसे हवे असतील तर निःसंकोचपणे सांग. माझ्या चार बांगड्याही मी देणार आहे ऋचाला. त्या मोडून तिला हवे ते कर हो तिच्या आवडीचे !”  वैदेहीच्या  डोळ्यात पाणी आले. तिला आत्ता खरोखरच गरज होती या मदतीची. “ अग वैदेही, मला समजत नाहीत का गोष्टी? तू नोकरी सोडलीस आणि मग तुझी फरपट सुरू झालेली मी डोळ्यांनी बघतेय ना. कानी कपाळी ओरडूनही तू माझं ऐकलं नाहीस. बघ बरं आता ! ताई माईंचे संसार बघ,आणि तू सगळ्यात उजवी, हुशार असून किती मागे पडलीस बघ बरं.  बाबांनाही फार वाईट वाटायचं ग तुझ्या बद्दल ! बरं, जोडीदार तरी धड निवडावास ! किती अल्प संतुष्ट आहे ग हा  विशाल. नुसता स्वभाव चांगला असून काय उपयोग ग ? महत्वाकांक्षा असायला नको का काही ? “ 

– क्रमशः भाग पहिला 

प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – जीवनरंग ☆ देणाऱ्याने देत जावे…– भाग- २ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली ☆

श्री व्यंकटेश देवनपल्ली

? जीवनरंग ❤️

☆ देणाऱ्याने देत जावे…– भाग- २ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली

(“सगळ्यांना मदत करायला आपण काही धनाढ्य लागून गेलो नाही. जग हे या कवींच्यामुळे चालत नाही. माणूस थोडा व्यवहारीदेखील असावा लागतो.” असं बडबडत सुजाता आत गेली.)  इथून पुढे —- 

दुसऱ्या दिवशी संध्याकाळचे साडेसात वाजायला आले. जावेदचा पत्ता नव्हता. सतीशने जावेदला फोन लावला. त्याचा मोबाईल स्विच ऑफ येत होता. जावेद कुठं राहतो हेही माहीत नव्हते. 

सतीशला आता काळजी वाटायला लागली. पैसे गेल्याचे दु:ख नव्हते. देवाच्या कृपेने आजही तो काहीतरी मिळवतोच आहे. माणुसकीवरचा आपला विश्वास उडायला नको असं सतीशला मनोमन वाटत होतं. जावेदने शब्द पाळला नाही तर ‘सतीश फसवला गेला’ हा शिक्का कायमचा बसला असता, तो त्याला नको होता. यापुढे कुणा गरजू माणसाला मदत करताना आपला हात आखडता घ्यावा लागेल म्हणून सतीशला खरी धास्ती वाटत होत

सुजाता दार उघडं ठेवून शेजारच्या काकूंना सांगत होती, “कालच मी ह्याना म्हटलं होतं की तो परत फिरकणार नाही म्हणून. अख्खी दुनिया बदलली तरी आमचे हे अजून तसेच आहेत. कुणी न कुणी यांच्या हळवेपणाचा फायदा घेत असतो आणि हे फसत जातात.  ‘पुढच्यास ठेच मागचा शहाणा’ म्हणतात. भले तुम्ही लोकांच्या अनुभवातून शिकू नका. अमुक रस्त्यावरून जाताना कधीतरी ठेच लागली होती हे तरी माणसानं विसरू नये. लोकांना मदत करण्याच्या भानगडीत कशाला पडावं? ..  मागे ती कोण एक इन्वेस्टर बॅंकर आली. फारच गयावया करत होती म्हणून ह्यांनी तिला वीस हजार रूपये दिले. तिने महिन्याअखेरचा चेक दिला. महिन्याअखेरीस तिनं दहा हजार रूपये यांच्याकडे जमा करून चेक लावू नका असं सांगितलं. उरलेले दहा हजार रूपये द्यायला तिने तीन महिने लावले…..आम्ही मध्यंतरी तिरूपतीला गेलो होतो. हॉटेलातून आम्ही बाहेर पडताच एक केविलवाणं जोडपं, छोटीशी मुलगी आणि आजी यांच्यासमोर हात जोडून उभे. ‘सर आमचा खिसा कापला गेला आहे. आमच्या परतीच्या प्रवासासाठी कृपा करून पाचशे रूपयाची तरी मदत करा. तुमच्या पत्त्यावर पैसे पाठवतो.’ अशी विनवणी करीत होते. ‘आता एनीव्हेअर बॅंकिग आहे. तुमच्या नातेवाईकाकडून पैसे मागवून घ्या ‘ म्हणून सांगायचं ना? पण नाही, यांनी लगेच खिशातून शंभरच्या दोन नोटा काढून दिल्या. बाकीची व्यवस्था करून घ्या म्हणून पुढं निघाले. उलट मलाच म्हणत होते, ‘अग वेंकटेशाच्या हुंडीत दोनशे रूपये अधिक टाकले असे समज.” तिची टकळी सुरूच होती.   

सतीश खिन्न मनाने डोळे मिटून आरामखुर्चीत विसावला. थोड्याच वेळात सुजाता आली आणि शांतपणे म्हणाली, “चला, साहेब आता विसरा सगळं, जेवून घ्या पाहू.” 

सतीश जेवायला बसला खरा. त्याचं जेवणात लक्ष नव्हतं. ‘ इतक्या वर्षाच्या नोकरीत मला माणसं ओळखता आली नाहीत की काय? कितीतरी लोकांना लहानसहान कर्जे दिली. एकाही खातेदारानं कधी फसवलं नव्हतं. अमुक व्यक्ति व्यसनी आहे त्याला कर्ज देऊ नका असं गावकऱ्यांनी पूर्वसूचना दिली असताना देखील मी त्या व्यक्तिला कर्ज दिलं होतं. त्याला मी सांगितलं होतं की, ‘तुम्ही व्यसनी आहात अशी माहिती मिळाली असतानाही मी तुम्हाला हे कर्ज देतोय. गावकऱ्यांना खोटं ठरवायचं काम आता तुमच्या हातात आहे.’ त्या पठ्ठ्याने कर्जाचे हप्ते नियमितपणे फेडून माझा माणुसकीवरचा विश्वास खरा ठरवला होता.’ या विचारातच दोन घास गिळून सतीश ताटावरून उठला.  

पायात चपला सरकवून सतीश तडक एटीएम बूथवर गेला. पाच हजार रूपये खिशात कोंबून त्यानं गुपचूप घरात पाऊल टाकलं. 

“पैसे काढायला एटीएमला गेला होतात ना?” सुजाताने तोफ डागली.

सतीशला क्षणभर काय बोलावं, कळलं नाही. सतीशच्या मनात काय चाललेलं असतं हे तिला नेमकं कळतं, हा अनुभव सतीशने आजवर कित्येकदा अनुभवला होता. आता एटीएमला जाऊन पैसे काढायची गोष्ट म्हणजे हद्दच झाली होती. तो दिंग्मूढ होऊन पहात राहिला.   

“अहो, आपल्या शंभूने तुम्हाला एटीएम बूथमध्ये शिरताना पाहिलं होतं म्हणून मला म्हटलं. काय गरज होती पैसे काढायची?” सुजाता म्हणाली.     

सतीश न डगमगता म्हणाला, “हो गेलो होतो पैसे काढायला. अडीअडचणीला कामाला यावेत म्हणून घरात ठेवलेले पैसे मी जावेदला दिले होते. ते पैसे परत आणून ठेवावेत म्हणून…” गंभीर मुद्रा करून सतीश सोफ्यावर बसला. 

अचानक कौन बनेगा करोडपतीतल्या अमिताभ बच्चनच्या स्टाईलमध्ये हात वर उंचावून सुजाता उच्च स्वरात गरजत म्हणाली, ‘आप सही हो, सतीशबाबू. आप जीत गए.’ सुजातानं सतीशच्या हातात पांच हजार ठेवताच चिरंजीव शंभू टाळ्या वाजवत खळखळून हसत होते.

“अहो, तुम्ही बाहेर पडलात तितक्यात जावेद आला अन पैसे देऊन गेला. किल्ल्या अडकवण्यासाठी तुम्ही एक बोर्ड सांगितलं होतंत म्हणे, ते ही तो देऊन गेला.” 

सतीश बोर्डाचं काहीच बोलला नव्हता. जावेदनं दाखवलेलं ते कृतज्ञतेचं एक द्योतक होतं. सतीश मनोमन खूश झाला. त्याचा विश्वासावरचा विश्वास आणखी पक्का झाला. 

तितक्यात दारावरची बेल वाजली. शेजारचे प्रभाकरपंत आत आले. चौफेर नजर टाकत ते म्हणाले, “तुमच्याकडचं फर्निचर चांगलं झालं आहे असं ऐकलंय. खरंच, खूपच छान. मला त्या सुताराचा फोन नंबर द्याल काय?” 

सतीश गप्पच होता. मघाशी जावेदचा मोबाईल नंबर स्वीच्ड ऑफ आला होता. सुजाता जावेदचं नवं कार्ड त्यांच्या हातात देत म्हणाली, “ लिहून घ्या हा त्याचा नवा नंबर. आणि हो त्याला काम देताना तुमच्या जबाबदारीवर द्या बरं का, आमच्या विश्वासावर देऊ नका.”  

प्रभाकरपंत निघता निघता म्हणाले, “अहो वहिनी, विश्वास म्हणजे दोन व्यक्तीमधलं ते एक अलिखित नातं असतं. कित्येक वेळेला विश्वासाला तडा बसतो, नाही म्हणत नाही. परंतु एकमेकांवरील विश्वासाशिवाय कुणाचंच पान हलत नाही. खरं तर विश्वासावरच जग चालतं.” 

——- त्या रात्री सतीशला छान झोप लागली.

– समाप्त –

© श्री व्यंकटेश देवनपल्ली.

बेंगळुरू

मो ९५३५०२२११२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – जीवनरंग ☆ देणाऱ्याने देत जावे…– भाग- १ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली ☆

श्री व्यंकटेश देवनपल्ली

? जीवनरंग ❤️

☆ देणाऱ्याने देत जावे…– भाग- १ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली

सुजाता दारातच उभी राहून कुणाशी तरी बोलत होती, “काय काम काढलंस? त्यांनी बोलवलं होतं काय?” तिच्या या प्रश्नावर दबल्या आवाजात तो माणूस काही तरी सांगत होता. 

“ते बॅंकेतून रिटायर झाले म्हणून काय झालं, एवढे पैसे काय घरात असतात होय?” सुजाताचं बोलणं तेवढं सतीशच्या कानावर आलं. 

“ठीक आहे वहिनी, फक्त साहेबांना एकदा भेटून जातो.” असं म्हटल्यावर सुजाताने त्या गृहस्थाला आत बसायला सांगून सतीशला आवाज दिला, “अहो, ऐकलंत काय, जावेद आला आहे तुम्हाला भेटायला.”  सुजाता आत निघून गेली.   

सतीश दिवाणखान्यात येताच जावेद पटकन उठून उभा राहिला. सतीशने त्याला खुणेनंच बसायला सांगितलं आणि लगेच विचारलं, “किती पैसे हवे आहेत तुला?” 

त्यानं चमकून वर पाहिलं. सतीश हळूच म्हणाला, “मी ऐकलं आहे सगळं. किती हवे आहेत सांग.” 

इकडे तिकडे पाहत तो हळूच बोलला, “साहेब, पाच हजार रूपयाची नड आहे. मुलाला दवाखान्यात अ‍ॅडमिट करावं लागेल. तापानं फणफणला आहे तो. काल भारत बंद असल्याने माझा चेक वटला नाही. उद्या संध्याकाळी सात वाजेपर्यंत तुमचे पैसे परत करतो.” 

सतीश पटकन आत गेला. पैसे आणून त्याने जावेदच्या हातात ठेवले. जावेदही तेवढ्याच घाईत निघून गेला.

हा सगळा प्रकार सुजाताच्या लक्षात यायला वेळ लागला नाही. ती कमरेला पदर खोचत बाहेर येत म्हणाली, “काय हो, हा जावेद चार वर्षापूर्वी आपल्याकडे फर्निचरचं काम करून गेला होता ना ! त्यानंतर आजच दिसला. आजवर त्याने कितीतरी ठिकाणी कामं केली असतील. पण पैशासाठी त्याला तुमचाच भाबडा चेहरा बरा आठवला. आणि बघाच तुम्ही, उद्या तो तुमचे पैसे परत करायला फिरकणारच नाही. मी अगदी खात्रीने सांगते.” सतीशने तिचं बोलणं ऐकून न ऐकल्यासारखं केलं.

सतीशच्या फ्लॅटमध्ये जेव्हा फर्निचरचं काम करायचं होतं, तेव्हा जावेद पहिल्यांदा सतीशला भेटला होता. त्यानं एकंदर पंचेचाळीस हजाराचं एस्टिमेट सांगितलं होतं. काटेकोर मोजमापासहित आयएसआय मार्कचा कुठला प्लाय, कुठले लॅमिनेशन वापरणार हे सगळं सतीशला त्यानं समजावून सांगितलं. जावेद त्याच्या एस्टिमेटवर ठाम होता. सतीशला बजेट जास्त वाटत होतं म्हणून विचार करीत होता.  

जावेद म्हणाला, “साहेब, विश्वास ठेवा माझ्यावर, काम अगदी चोख करून देईन. दोन चार हजाराकडे पाहू नका. निकृष्ट दर्जाचे मटेरियल वापरून हेच काम तीस हजारात देखील होईल. मला क्वालिटीत तडजोड करायला आवडत नाही. या उपर तुमची मर्जी !” 

सतीश पटकन म्हणाला, “अरे त्याचं काही नाही. माझं बजेटच तीस हजाराचं आहे.” 

“साहेब उरलेले पंधरा हजार दोन चार महिन्यानंतर तुमच्या सवडीने द्या, मी अ‍ॅडजस्ट करीन.” 

फर्निचरच्या कामामुळे सतीशच्या घरातल्यांची कसलीही गैरसोय झाली नाही. जावेदने सगळी मापं काटेकोरपणाने घेतलेली होती. त्यानं सगळं वूडवर्क बाहेरच करून घेतलं. एका रविवारी येऊन फिटींग आणि लॅमिनेशन करून गेला. सतीशने देखील राहिलेले पैसे जावेदला लगेच देऊन टाकले. जावेदने काम सुरेखच केलं होतं. 

थोड्याच वेळात सुजाता सतीशच्या समोर चहाचा कप ठेवत म्हणाली, “तुम्हाला आठवतं का, मध्यंतरी तुमच्या नात्यातला कुणी तरी आठवड्यात देतो म्हणून दोन हजार रूपये घेऊन गेला, परत फिरकलाच नाही. आता कुठल्याही कार्यक्रमात दिसला तरी तो न तुम्हाला ओळख दाखवतो न मला. तुमच्या एका मित्राचा जावई ‘लगेच परत करतो’ म्हणून एक हजार रूपये घेऊन गेला. फिरकला का तो इकडे?” 

सतीश शांतपणे सुजाताला म्हणाला, “हे बघ, हे पैसे परत येणार नाहीत, हे समजून उमजूनच मी दिले होते. आपल्याकडून त्यांना केलेली ही एक नगण्य मदत आहे असं समज, हे तुला त्यावेळीच बोललो होतो. तुला ती कविता आठवतेय का? ‘देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे !’”

सुजाता पटकन म्हणाली, “ते कवी महाशय असं का म्हणाले मला मुळात तेच कळलेलं नाहीये. देणारा देतो आहे तर घेणाऱ्याने त्याचे हात सुद्धा कशाला घ्यावेत? त्याचे हात त्यालाच राहू द्यावेत ना !” 

सतीश हसत हसत म्हणाला, “अगं, देणाऱ्याचे हात घ्यावे म्हणजे त्या देणाऱ्या माणसाची दानत घ्यावी आणि घेणाऱ्यांनी देखील कुणाला तरी देत जावे असा त्याचा अर्थ आहे.”

“ते असू द्या, पण हा जावेद तुमचा कोण लागतो बरं?” 

या तिच्या प्रश्नावर सतीश म्हणाला, “अग, जावेद आणि माझ्यात कसलंही नातं नाही हे खरं असलं तरी किमान माणुसकीचं नातं तरी आहे ना? तूच म्हणालीस ना, त्याला तुमचाच भाबडा चेहरा का आठवला म्हणून? कदाचित जावेदने माझ्यात माणुसकीचा ओलावा पाहिला असेल म्हणून तो माझ्याकडे आलाय… 

सुजा, अग पैसे उसने मागण्यासाठी मुलगा आजारी आहे असं कारण कुणी सांगेल का? क्षणभर समज, तो खोटेही सांगत असेल. ते खोटंच आहे असं मी कशाला समजू? कदाचित खरं देखील असेल. एक वेळ बेगडी श्रीमंती दाखवता येईल पण सच्चेपणा कसा दाखवता येईल? ती सिध्दच करावी लागते. गरिबांच्यावरच विश्वास टाकता येतो याचा प्रत्यय मला खूप वेळा आलेला आहे….. एका कवीने किती छान सांगितले आहे, ‘ज्यांची बाग फुलून आली, त्यांनी दोन फुले द्यावीत. ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी दोन गाणी द्यावीत. आभाळाएवढी ज्यांची उंची, त्यांनी थोडे खाली यावे. मातीत ज्यांचे जन्म मळले, त्यांना थोडे उचलून घ्यावे !’ .. कळलं?”   

“सगळ्यांना मदत करायला आपण काही धनाढ्य लागून गेलो नाही. जग हे या कवींच्यामुळे चालत नाही. माणूस थोडा व्यवहारीदेखील असावा लागतो.” असं बडबडत सुजाता आत गेली.

— क्रमशः भाग पहिला 

© श्री व्यंकटेश देवनपल्ली.

बेंगळुरू

मो ९५३५०२२११२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – जीवनरंग ☆ तिचं दु:ख… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती : सुश्री माधुरी परांजपे ☆

? जीवनरंग ❤️

☆ तिचं दु:ख… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती : सुश्री माधुरी परांजपे ☆

गीता ला जाऊन महिना झाला होता. पंधरा दिवस थांबलेली पाहुणे मंडळी आपापल्या घरी गेली होती. मुलगा अमेरिकेला जॉब करीत होता.

मुलगी म्हणाली,” चला ना बाबा सोबत काही दिवसासाठी “.

माधवने मात्र नकार दिला… रात्री त्याला भयंकर शांत वाटू लागलं…

चाळीस वर्षाच्या सहजीवनात असं कधीच एकटं राहण्याचा प्रसंग आला नव्हता. त्याला गीता सोबत घालवलेले दिवस आठवू लागले. कधी भांडण, तंटा झालेला सुद्धा आठवत नव्हतं. आपण कितीही आदळआपट केली तरी  मात्र शांतच राहायची. लोकांच्या दृष्टीने एक आदर्श जोडी. गीता  होतीच तशी. सगळयांशी मिळून मिसळून राहणारी. माधवने कधी विचारही केला नाही ती अशी आपल्याला अर्ध्यावर सोडून जाईल…

“गीता,  तुझ्याशिवाय जीवन ही कल्पनाच करता येत नाही ग… कस जगू मी गीता तुझ्या शिवाय…” माधवला हुंदका अनावर झाला…

गीताचे लग्न झाले तेव्हा ती वीस वर्षाची. लग्नानंतर प्रायमरी शिक्षिकेची नोकरी लागली. नोकरी, घर सांभाळत नेटाने संसार केला. मुलं चांगली शिकली. चांगल्या पदावर नोकरीला लागली. मुलामुलींचं लग्न झालं. आताच कुठे गीता सेवानिवृत्त झाली होती. किती ठरविले होते आपण की निवृत्त झाल्यावर दोघंही मस्त फिरू.  सगळं छान असताना अशी अचानक निघून गेली. अचानक हार्ट फेल झाले. … लक्षातच आलं नाही. अगदी शेवटच्या क्षणी लक्षात आलं. वेळच मिळाला नाही ट्रीटमेंट घ्यायला आणि  अचानक निघून गेली…

माधवने  डोळे पुसले आणि कपडे बदलायचे म्हणुन कपाट उघडलं त्याला हवा तो शर्ट दिसत नव्हता म्हणुन वरच्या कप्प्यात हात घातला.. एक डायरी खाली पडली.

थरथरत्या हातानी डायरी उघडली आणि डायरी वाचायला सुरवात केली.. 

दि, =====

‘नुकतंच लग्न होऊन महिना झालाय. घरचं वातावरण फार विचित्र आहे. सासू सासरे सतत भांडत असतात आणि भावाभावात पण विशेष पटत नाही.  नवरा तसा चांगला परंतु मी म्हणेल ती पूर्व दिशा म्हणणारा. एक दोनदा काही बोलून पाहिलं पण तो आपलं ऐकणारा नाही हे कळलं त्यामुळे तुम्ही म्हणाल तस, असं म्हणून जगायचं ठरविले… ‘

बरंच काही लिहिलं होत… तो पानं  पालटत राहिला.

दि……

आज आमच्या लग्नाचा पहिला वाढदिवस. ह्यांना म्हटलं ,”आपण बाहेर जाऊ. सिनेमाला जाऊ आणि बाहेरच जेऊ या. ” तर म्हणाले ,”मला नाही आवडत. तुला खायचं असेल तर  चल…  तू खा मी तुला सोडतो हॉटेलला “.

‘अरे, हे काय बोलणं झालं… मला काय एकटीला खायला जायची हौस होती का….?’

मैत्रिणी सांगायच्या आमच्या लग्नाच्या वाढदिवसाला आम्ही बाहेर फिरायला गेलो… नवऱ्याने गिफ्ट दिलं … फार हेवा वाटायचा… कारण इथे काहीच आवडत नव्हतं .. काही म्हटलं तर ऐकणार नाही. मला म्हणतात, ‘नवऱ्यानं गिफ्ट दिल म्हणजे, फिरवलं, हॉटेल मध्ये जेवू घातलं म्हणजे  बायकोवर खूप प्रेम करतोच असं काही नसत. नवरा -बायकोच्या प्रेमाचा जगाला दिखावा का करायचा ?’

त्यानंतर मी बाहेर चला म्हणणेच सोडले……

दि….

माझा मुलगा पाच वर्षाचा आहे . माझ्याकडे आई आलेली.. आमच्या गप्पा गोष्टी सुरु होत्या. मुलानी खाताना इकडे तिकडे सांडवलेलं. हे बाहेरून आले. कचरा पाहून डोकं फिरलं. बडबड सुरु झाली. मी म्हटलं करते ना साफ… थांबा थोडा वेळ…. माहिती नाही काय इगो दुखावला. अगदी अंगावर धावून आलेत. हात उचलला. माझ्या आईच्या डोळ्यात पाणी आले. मलाही खूप अपमानित वाटले. खुप राग आला. असं वाटल सोडून जावं परंतु तेवढी हिम्मत नव्हती आणि त्यांचा राग उतरला की परत चांगले वागतात. आपण काही चुकीचं वागलं… हीचं मन दुखावलं हे लक्षातही नसतं… मी मात्र विसरू शकत नाही.. सगळं दुःख…. मनाच्या एका कोपऱ्यात बंद करून ठेवते… आणि परत कधी ठेच लागली तर कप्पा उघडून बघते… फार त्रास होतो तेव्हा…

दि,…. 

आज मी पडद्याचे कापडं आणले…  खुप ओरडले… कुठलीही गोष्ट ह्यांच्याच मनाप्रमाणे व्हावी. मला घर सजवायला खुप आवडायचं.. काही विकत घेऊ या म्हटलं तर त्यावर लेक्चर देणार.. तुला वापरायची तरी अक्कल आहे का?   वगैरे वगैरे… काही कधी विकत आणले तर त्यात खोट काढणार. तुझी पसंत चांगली नाही… तुला व्यवहार समजत नाही.. तुला लोक ठगवतात… इतक बोलणं होतं की वाटतं कशाला आणलं आपण विकत… त्यानंतर मात्र काहीही विकत आणले नाही….

पानांमागून पान पलटवू लागला.. प्रत्येक पानावर त्याच्या तक्रारीच लिहिल्या होत्या. माधवला खूप आश्चर्य वाटले. वाटले की आपल्याला कधी वाटलेच नाही की गीता इतकी दुःखी आहे. गीताच्या मनात इतकी कटुता असून ती वरून चांगलीच वागायची. आणखी एक पान पलटवले…. बहुतेक शेवटचे.

दि….

आज डावा हात खूप दुखतोय. यांना सांगून काय उपयोग. दवाखान्यात चला म्हटलं तर बडबड करणार त्यापेक्षा नकोच. मीच जाऊन येते…. तसंही ह्यांना बाहेरगावी जायचं आहे.

दि….

काल मैत्रिणीसोबत दवाखान्यात जाऊन आली… डॉक्टरांनी सगळ्या तपासण्या केल्या.. Ecg मध्ये प्रॉब्लेम निघाला.. त्यानंतर अँजिओग्राफी सांगितली..यांना फोन लावला… म्हणाले ज्या काही तपासण्या करायच्या त्या करून घे…’

अँजिओग्राफी केली… 95 टक्के ब्लॉकेज… डॉक्टरांनी सांगितले ताबडतोब ओपन हार्ट सर्जरी करावी लागेल…

घरी येऊन यांना सांगावं या  विचारातच घरी आले…..हे बाहेरगावावरून आलेले होते. घरी येताना औषध आणायला विसरले…. खुप थकवा आला होता…

म्हटलं, ‘थोडी औषधं आणून देता का?’

‘आताच आलीस ना रस्त्याने, आणायची ना स्वतः, परत कपडे बदलवू, परत जाऊ ” खुप चिडचिड आणि बडबड केली.

“असू द्या, मी घेईन उद्या “

“अग, पण काय झालंय….? काय सांगितलं डॉक्टरांनी “

“काही नाही, सगळं ठीक आहे “

मी ह्यांना काहीही सांगितलं नाही… साधी औषध आणायला सांगितली तर किती त्रास ? आणि आपलं ऑपरेशन असलं तर किती त्रास करून घेतील.. तसंही आपण जगून काय करायचं.. मुलगा सेटल आहे… रोजची लहान सहान बाबीवरून कटकट… आता मी थकले… हार्ट प्रॉब्लेम म्हणजे मरताना त्रासही होणार नाही.. शांतपणे जाता येईल.. घेतच नाही आता औषध आणि जातच नाही आता दवाखान्यात……..

डायरीचे शेवटचेच पान होते.

माधवने डायरी बंद केली.. डोळ्यातून अश्रू वाहू लागले… गीताचा हार्ट अटॅक नसून आत्महत्या आहे आणि त्याला कारणीभूत मी आहे…. गीता, माझं वागणं तुला पटत नव्हतं तर तेव्हाच विरोध करायचास ना… तुझ्या मनात एवढा असंतोष होता हे कधी मला कळलंच नाही… मला वाटायचं आपण एकरूप आहोत परंतु नाही, तुझं शरीर फक्त माझ्या सोबत होतं आणि तुझं मन?? ते तर कधी माझं झालंच नाही…..

का वागली तू अशी गीता ? कोणत्या गुन्ह्यांची शिक्षा दिलीस तू ? गीता  मी तुला समजूच शकलो नाही… आणि तू मला समजून घेतलं नाहीस…. तू आणि मी वेगळे आहोत असा कधी विचारच केला नाही… मला वाटायचं मी माझा निर्णय तुला सांगतो आणि तो तुला पटतोय.. तुझ्यावर लादतोय असं कधी मला वाटलच नाही… तुझं मन मला कधी वाचताच आलं नाही…. पण गीता, अग एकदा बोलायचं होतंस ग.. व्यक्त व्हायच होतस… भांडलो असतो कदाचित… परंतु कदाचित मला तुझं म्हणणं पटलंही असतं… नसत पटलं तर निदान मला अपराधी पणाची भावना घेऊन तर जगावं नसतं लागलं…. मला कधीच जाणवलं नाही ग तुझी पण काही स्वप्नं असतील.

तुझं दुःख जर मला वेळीच समजलं असतं तर आज तू माझ्या सोबत राहिली असतीस ग. मला माफ कर… !!

✧═❁═✧

लेखक – अज्ञात 

संग्राहिका – सुश्री माधुरी परांजपे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – जीवनरंग ☆ भाडेकरू… ☆ म. ना. दे. (श्री मयुरेश देशपांडे) ☆

? विविधा ?

☆ भाडेकरू… ☆ म. ना. दे. (श्री मयुरेश देशपांडे) 

“बरे झाले साठे काका तुम्ही फोन करून आलात, नाहीतर नेमके तुम्ही यायचे आणि आम्ही कुठेतरी बाहेर गेलेलो असायचो.” सुहासने साठे काकांचे अगदी हसून स्वागत गेले. त्यांना त्यांची आवडती आरामखूर्ची बसायला दिली.

“अगं मंजिरी पाणी आणतेस का? आणि हो चहा टाक साठे काकांसाठी, कमी साखरेचा बरं का.” आतल्या खोलीत कार्यालयातले काम घरी करत बसलेल्या मंजिरीला त्याने आवाज दिला.

“तसे महत्वाचेच काम होते, म्हणून फोन करून आलो होतो.” जरा स्थिरावल्यावर व पेलाभर पाणी पोटात गेल्यावर साठे काकांनी विषय काढला.

“अगं मंजिरी आधी चहा टाक, काका किती दिवसांनी आपल्या घरी आले आहेत.” साठे काका का आले असतील या विचारांत तिथेच उभ्या मंजिरीला त्याने जागे केले.

“थांब मंजिरी, मी जे सांगणार आहे ते तूही ऐकणे महत्वाचे आहे. तर बरं का सुहास, तुझ्या वडिलांनी शेवटच्या काळात माझ्याकडे एक पत्र दिले होते. ते गेल्यावर मी ते पत्र तुला वाचून दाखवावे अशी त्यांची इच्छा होती.”

काकांनी कुठल्याशा पत्राचा विषय काढताच सुहास आणि मंजिरी एकमेकांकडे प्रश्नार्थक नजरेने पाहू लागले.

“इतका विचार करायचे कारण नाही, हे काही मृत्यूपत्र नाही. त्यांना फक्त त्यांच्या मनातला विचार तुला सांगायचा होता. आधी तुझ्या नोकरीच्या धावपळीमुळे तर शेवटी दवाखान्यातल्या धावपळीमुळे त्याला तुझ्याशी नीटसे बोलता आले नव्हते. पण बहुधा त्याला त्याची वेळ जवळ आल्याचे आधीच कळाले असावे, म्हणून त्याने हे पत्र खूप आधी लिहून ठेवले होते. फक्त माझ्या हातात शेवटच्या काळात दिले.” आता साठे काकांनी दीर्घश्वास घेतला. त्यांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या. त्यांनी आणखी घोटभर पाणी घेतले.

“काका असे काय आहे त्या पत्रात की जे त्यांना माझ्या जवळ किंवा मंजिरीच्या जवळ बोलता नाही आले.” सुहासच्या मनात नाना शंकांचे काहूर माजले होते. मंजिरी शांत असली तरी तिचीही अवस्था फार वेगळी नव्हती. एवढ्या वेळ उभ्या मंजिरीने पटकन भिंतीला टेकत खाली बसणे पसंत केले.

काकांनी सोबतच्या पिशवीमधून पत्र बाहेर काढले. कार्यालय सुटले तरी कार्यालयातील कामकाजाची पद्धत सुटली नव्हती. आणि म्हणूनच पत्र अगदी खाकी लिफाफ्यामध्ये वरती छान अक्षरात अगदी नाव तारीख घालून ठेवले होते. काकांनी आधी पत्र सुहासला दाखवले. वडिलांचे अक्षर त्याने सहज ओळखले. ते सुबक नक्षीदार असले तरी शेवटच्या काळात थरथरत्या हातांनी नक्षी थोडी बिघडली होती.

काकांनी पत्र वाचायला सुरूवात केली. वरचा मायना वाचला तसे सर्वांचेच डोळे पाणावले. अधिक वेळ न दवडता त्यांनी पुढचे वाचायला घेतले.

“मला कल्पना आहे की, या वाड्याची वास्तू पाडून ही जागा एखाद्या व्यावसायिक इमारत विकासकाला द्यायची तुझी इच्छा अनेक वर्षांपासून आहे. तू माझ्याकडे थेट विषय काढला नसलास तरी कधी ताई तर कधी मंजिरीच्या आडून तो माझ्या पर्यंत पोहचवत राहिलास. माझ्या पाठीमागे या वाड्यावर तुझा व बहिणीचा समसमान हक्क आहे हे मी वेगळे सांगायला नको.”

“पण काका मला यातले काहीच नको आहे. माझे घर केव्हाच झाले आहे. तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने गाठीला बक्कळ पैसाही आहे. ताईने हवे तेव्हा या वाड्याचा ताबा घ्यावा, मी हसत माझ्या घराकडे निघून जाईन.”, काकांचे पत्र वाचन मधेच तोडत सुहास तावातावाने बोलला. तसा त्याचा हात दाबत मंजिरीने त्याला शांत केले.

“अरे मला पत्र तर पूर्ण वाचू देत.”, असे म्हणत काकांनी पुढे पत्र वाचायला सुरूवात केली.

“माझ्या आजोबांपासूनचा म्हणजेच तुझ्या पणजोबांपासूनचा हा वाडा. इथे काही बिऱ्हाडे पिढ्यान् पिढ्या राहात आहेत. जशी तुझी माझी नाळ जुळली आहे तशीच या बिऱ्हाडांच्या पुढच्या पिढ्यांशी माझी नाळ जुळली आहे. तू जागा विकसकाला देताना ताईचा विचार घेशीलच याची खात्री आहे पण सोबत या बिऱ्हाडांचाही एकदा विचार घ्यावा एवढीच माझी विनंती आहे, त्यांची योग्य व्यवस्था करावी एवढीच माझी शेवटची इच्छा आहे.”

पुढची पत्राच्या समारोपाची वाक्ये वाचायची गरजच नव्हती. त्यांची पत्र लिहिण्याची पद्धत, त्यातली भाषा, सुरूवात व समारोप आताशी साऱ्यांच्या परिचयाचे झाले होते. काकांनी पत्र सुहासच्या हाती सुपूर्त केले. पुढची काही मिनिटे तो नुसताच पत्रावरून हात फिरवत होता. “मी आत जाऊन चहा टाकते.”, त्यांची तंद्री तोडत मंजिरी म्हणाली आणि झपझप आत गेलीही.

बाहेर फक्त साठे काका, सुहास आणि वडिलांचे पत्र राहिले होते.

वाडा तसा खरेच जुना होता. अनेक बिऱ्हाडे आधीच सोडून गेली होती. काही खोल्या वारसा हक्क राहावा म्हणून कुलुपे आणि जळमटांसह बंद होत्या. न मागता दर महिना खात्याला भाडे म्हणून नाममात्र रक्कम जमा होत होती. पण सुहासच्या चटकन लक्षात आले की ज्यांच्यासाठी वडिलांचा जीव अडला होता किंवा त्यांनी एवढा पत्र प्रपंच केला होता, ते जोशी मास्तर वाड्याच्या मागच्या अंगणातील खोल्यांमध्ये आपल्या पत्नीसह राहात होते. पंख फुटले तशी मुले केव्हाच उडून गेली होती. पाठीमागे दोन जीर्ण देहांसह जीर्ण घरटे राहिले होते.

त्यांची जुजबी व्यवस्था करून सुहासला हात काढता आले असते, किंबहुना विकसकाने तसे सुचविले देखील होते. ना जोशी मास्तरांमध्ये लढायची ताकद होती ना त्यांच्या बाजूने कोणी लढायला उभे राहिले असते. काही शिक्षक दुर्लक्षिले जातात हेच खरे.

विकसकाला जागा ताब्यात द्यायला अद्याप पुष्कळ वेळ होता. सुहासने जोशी मास्तरांच्या मुलांशी संपर्क करून पाहिला. अपेक्षेप्रमाणे समोरून काहीच प्रतिसाद आला नाही.आता मात्र एक वेगळीच कल्पना सुहासच्या मनात आली आणि ती त्याने आधी मंजिरीला मग ताईला बोलून दाखविली. साठे काकांना यातले काहीच सांगायचे नाही असे त्याने दोघींना बजावले होते. जोशी मास्तरांशी तो व मंजिरी स्वतः जाऊन बोलले. त्याची कल्पना ऐकून तर मास्तर ढसाढसा रडले.

इकडे साठे काका लांबूनच पण वाड्यात घडणाऱ्या घडामोडींवर लक्ष ठेवून होते. सुहास सामानाची बांधाबांध करीत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. पण त्याने जोशी मास्तरांचे काय केले याचा काही थांग पत्ता लागत नव्हता. त्याला वडिलांच्या पत्राची आठवण करून द्यावी असे काकांना खूपदा वाटले, पण त्यांनी धीर धरला. एके दिवशी वाड्याच्या दारात ट्रक उभा असल्याचे त्यांना कोणाकडून तरी कळाले आणि हातातली सगळी कामे टाकून त्यांनी वाडा गाठला.

“अरे सुहास तू निघालास वाटतं. ते जोशी मास्तर कुठे दिसत नाहीत, त्यांचे काय ठरवले आहेस? तुझ्या वडिलांचे पत्र लक्षात आहे ना?” काहीसे रागात काहीसे नाराजीने पण एका दमात साठे काका बोलून गेले.

“ते तर पुढे गेले.”, ओठांवर हसू आलेले असतानाही कसेबसे ते दाबत सुहास थोडा कर्मठपणे बोलला.

“पुढे गेले म्हणजे? कुठे गेले?” साठे काकांचा पारा चढला.

“माझ्या घरी, माझे स्वागत करायला.” सुहासने अगदी संयमाने प्रतिउत्तर दिले.

“तुझ्या घरी म्हणजे? तू मला नीट सांगणार आहेस का? हे बघं तुझ्या वडिलांची अंतिम इच्छा होती की …” साठे काकांचे वाक्य पूर्ण होऊ न देताच सुहासने त्यांना वाड्याच्या पायऱ्यांवर बसवले.

“काका मी त्यांना दत्तक घेतले आहे. लोक मूल दत्तक घेतात तसे मी आई वडील दत्तक घेतले आहेत आणि आता अगदी शेवटपर्यंत मी त्यांचा संभाळ करणार आहे.” एखाद्या मुलाने वडिलांच्या खांद्यावर डोके ठेवावे तसे सुहासने साठे काकांच्या खांद्यावर डोके ठेवले आणि म्हणाला, “तसेही आई बाबांच्या पाठीमागे आम्हाला तरी आधार कोण आहे.” साठे काकांच्या डोळ्यांतून अश्रूधारा वाहात होत्या आणि आज त्या पुसायचे भानही त्यांना राहिले नव्हते.

लेखक : म. ना. दे.

(श्री होरापंडीत मयुरेश देशपांडे)

C\O श्री मंदार पुरी, पहिला मजला, दत्तप्रेरणा बिल्डिंग, शिंदे नगर जुनी सांगवी, पुणे ४११०२७

+९१ ८९७५३ १२०५९ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 




मराठी साहित्य – जीवनरंग ☆ रेशमाची झूल… ☆ सुश्री स्वप्ना मुळे (मायी) ☆

सुश्री स्वप्ना मुळे (मायी)

? जीवनरंग ?

☆ रेशमाची झूल… ☆ सुश्री स्वप्ना मुळे (मायी)

“गेले पंधरा दिवस भुर्रकन निघून गेले … उद्या तुम्ही पण जाल.. मग मात्र सासुबाईंशिवाय हे घर मला आणि अविला खायला उठेल हो ताई..” एवढं बोलून शरु ढसढसून रडायला लागली. ह्या पंधरा दिवसात ती बरीच खंबीर होती. खरंतर आईचं पडल्यापासूनचं दुखणं या आठ महिन्यात तिनेच काढलं होतं. आपण फक्त नावाला लेक होतो. तिच्या कर्तव्याने खरी लेक शरुच झाली होती. त्यामुळे आपल्याला आईची उणीव जाणवणार, पण शरुला ती जास्त प्रखरपणे जाणवेल..

… स्मिताने तिला पटकन जवळ घेतलं. थोडा वेळ कोणीच काही बोललं नाही, कारण ‘ स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी ‘ हे आता सगळेच अनुभवत होते. तिघांनी परत मनसोक्त रडून घेतलं. 

मग शरु अलगद उठली. कपाटातून तिने सासुबाईचे कानातले जोड आणि बांगड्या नणंदेपुढे ठेवल्या. कपाटही उघडं ठेवलं. ती स्मिताला म्हणाली, ” ताई, आईची आठवण म्हणून हे दागिने आणि त्यांच्या ज्या साड्या पाहिजे त्या तुम्ही घेऊन जा…”

स्मिता उदास हसत म्हणाली, “अगं माणूस आठवणींनी मनात, हृदयाच्या कप्प्यात जपलेला असतो.. ह्या वस्तू, दागिने हे सगळं गौण आहे गं,.. मला काही नको, असू  दे तुमच्याकडेच.. आईचा एवढा दवाखाना, खर्च, तुम्ही सगळं कसं पेललं असेल ह्याची कल्पना आहे मला… हे दागिने सगळे तुमच्याकडेच ठेवा. पण एक वस्तू मात्र मी हक्काने मागेल. आईने रेशीम दोऱ्याची एक सुंदर झूल शिवली होती.. ती मला दे. त्याच्या फार सुंदर आठवणी आहेत गं माझ्या मनात.”

शरुने लगेच खालच्या पांढऱ्या शुभ्र कपड्यात गुंडाळलेली ती झूल काढली. स्मिताने ती गच्च छातीशी धरली. तिला परत आईची खूप आठवण आली. रडणं ओसरल्यावर ती बोलू  लागली, ” एकदा मागच्या अंगणात एक गाभण गाय हंबरत होती.. आईने बघितलं आणि म्हणाली ‘अगं बाई, इथेच पाडस जन्माला घालते की काय..? हिचा मालक कुठे गेला, का ही वाट चुकुन इकडे शिरली..’ .. पण तिला आता हाकलून लावणं शक्य नव्हतं… अवि तुला आठवतं का, त्या गावी बाबांची बदली झाली होती तिथं आपलं मागच्या पुढच्या अंगणाचं घर होतं बघ.”

त्यावर अवि म्हणाला, ” फार काही आठवत नाही, पण त्या कच्च्या दुधाच्या वड्या आठवतात.. पोटभर खायला मिळाल्या होत्या बघ….”

स्मिता म्हणाली, ” हं, तू लहान होतास फार, मला मात्र स्पष्ट आठवतं सगळं.. आपल्याकडे कामाला येणाऱ्या शामलाबाईंना आईने लगेच बोलवलं.. त्यांना सगळी माहिती होती.. आई म्हणाली ‘ मुकं जनावर असलं तरी त्रास आणि लाज दोन्ही असतात प्राण्याला..’ 

भिंतीच्या कोपऱ्यात घुसून हंबरत होती ती गाय. मग आईने तिला आडोसा केला.. गरम पाण्याचा शेक… अगदी जणू लेकीचं बाळंतपण केल्यासारखं केलं.. पाडस तर किती सुंदर होतं.. आणि काही क्षणात चार पायावर उभं राहिलं. आई म्हणाली, ‘ देवाला काळजी सगळ्या जीवांची.. ह्या मुक्या प्राण्यांना बघा कसं मिनिटात उभं करतो तो.. आपली लेकरं वर्ष घेतात..’ 

शामलाबाई आईला म्हणायच्या, ‘ फार जीव लावू नका, कधी मालक येईल आणि घेऊन जाईल तर करमणार नाही…’ आईने तेंव्हा त्या पाडसासाठी ही झूल केली होती.. अगदी रातोरात जागून… म्हणाली, ‘आपल्याकडे नव्या लेकराला कपडे करतात, त्याला झूल तर करू….’

मला फार आवडली होती ती रेशमी झूल, सुंदर रंगांची मऊमऊ. मी पण जागी होते त्या रात्री.. सकाळी उठून कधी त्या पाडसावर घालू असं झालं होतं.. पण सकाळी जाग आली ती आईच्या रडण्याने… गाय, वासरू निघून गेलं होतं आपल्या वाटेने.. तू खूप रडला होतास.. ‘बांधलं का नाहीस?’ तिला विचारत होतास…

आई म्हणाली, ‘ ती आपली मालकीची नव्हती, तिची अडचण म्हणून आडोश्याला उभी राहिली. आपलं मन वेडं, लगेच गुंतलं त्यात.’

मी ही झूल छातीशी घट्ट धरून रडत होते. आई म्हणाली, ‘ रडू नकोस.. अगदी स्त्री जन्म कसा असतो ते तुझ्या या वयात ही गाय येऊन तुला शिकवून गेली बघ. लज्जा, वेदना, मातृत्व… बघितलं ना वासराला कशी चाटत होती, आनंदाने दूध पाजत होती सगळ्या वेदना विसरून.. परत आपण दिलेल्या आरामाच्या मोहात रमली नाही, गेली निघून. आपल्या कर्तव्यांचं असंच असतं..  स्त्रीच जगणं…  माहेरी दोन दिवस यायचं, लाड करून घ्यायचे आणि जायचं निघून परत आपल्या भूमिकेच्या युद्धावर..’

आईने झूल हातात घेतली.  म्हणाली, ‘आता येणाऱ्या प्रत्येक चैत्र गौरीला मी ही झूल घालेल.. त्यावर माझी गौर बसेल.. कारण ही गाय माझ्या लेकीसारखीच आली माझ्या आयुष्यात, राहिली आणि निघून गेली… पण ह्या रेशमी झुलीवर तिच्या आठवणींच्या पाऊलखुणा सोडून गेली…’ आईने ह्या झुलीतून मला खूप काही शिकवलं आयुष्यभरासाठी. ही तिची आठवण मात्र मला द्या..”

अविने आणि शरुने स्मिताला जवळ घेतलं. तिघेही आईच्या आठवणीने रडत होते आणि रेशमी झूल, म्हणजे आईनेच हातात हात धरलाय असं अनुभवत होते…

© सुश्री स्वप्ना मुळे (मायी)

मो +91 93252 63233

औरंगाबाद

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – जीवनरंग ☆ तीन अनुवादित लघुकथा ☆ सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

☆ तीन अनुवादित लघुकथा ☆ सौ. उज्ज्वला केळकर 

(1) निगेटिव रिपोर्टची कमाल – अज्ञात (2) कर्जमुक्त – श्री अशोक दर्द (3) कोरोनाची भाकरी – श्री घनश्याम अग्रवाल 

☆ निगेटिव रिपोर्टची कमाल – अज्ञात ☆ भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर ☆ 

दहा दिवसांच्या प्रयत्नांनंतर एक माणूस आपला करोंनाचा निगेटिव्ह रिपोर्ट हातात घेऊन हॉस्पिटलच्या रिसेप्शनजावळ उभा होता.

आसपासचे काही लोक टाळ्या वाजावत होते. त्याचं अभनंदन करत होते. युद्ध जिंकून आला होता ना तो. त्याच्या चेहर्‍यावर मात्र बेचैनीची गडद छाया होती. गाडीतून घरी येताना त्याला रस्ताभर ‘आयसोलेशन’ च्या त्या काळातली असह्य मन:स्थितीची आठवण येत होती.

कमीतकमी सुविधा असलेली ती छोटीशी खोली, काहीशी अंधारी, मनोरंजनाचं कुठलंच साधन नाही. कुणी बोलत नव्हतं की जवळही येत नव्हतं. जेवण देखील प्लेटमध्ये भरून सरकवून दिलं जायचं.

ते दहा दिवस त्याने कसे घालवले, त्याचं तोच जाणे. 

घरी पोचताच त्याला दिसलं, त्याची पत्नी आणि मुले दारात त्याच्या स्वागतासाठी उभी आहेत. पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करत तो घराच्या एका उपेक्षित कोपर्‍याकडे वळला. तिथल्या खोलीत त्याची आई गेली पाच वर्षे पडून होती. आईचे पाय धरून तो खूप रडला आणि आईला धरून घेऊन बाहेर आला.

वडलांच्या मृत्यूनंतर गेली पाच वर्षे ती आयासोलेशन ( एकांतवास ) भोगत होती. तो आईला म्हणाला, ‘ आई, आजपासून आपण सगळे एकत्र, एका जागी राहू.’

आईला आश्चर्य वाटलं. पत्नीसमोर असं सांगण्याची हिंमत आपल्या मुलाने कशी केली? इतकं मोठं हृदयपरिवर्तन एकाएकी कसं झालं? मुलाने आपल्या एकांतवासाची सारी परिस्थिती आईला सांगितली आणि म्हणाला, आता मला जाणीव झाली, एकांतवास किती दु:खदायी असतो.

मुलाचा निगेटिव्ह रिपोर्ट आईच्या जीवनाचा पॉझिटिव्ह रिपोर्ट बनला होता. 

मूळ कथा – निगेटिव रिपोर्ट की कमाल –  मूळ लेखक – अनाम लेखक

☆ ☆ ☆ ☆ ☆

☆ कर्जमुक्त – श्री अशोक दर्द  ☆ भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर ☆ 

एक काळ असा होता, शेठ करोडीमल आपल्या मोठ्या व्यवसायामुळे आपला मुलगा अनूप याच्यासाठी वेळ देऊ शकत नव्हते. मुलाला चांगलं शिक्षण मिळावं आणि आपल्या व्यवसायातही व्यवधान निर्माण होऊ नये, म्हणून त्यांनी आपल्या मुलाला दुरच्या शहरातील बोर्डिंग स्कूलमध्ये ठेवलं. वर्षभराने सुट्टी लागली की ते नोकराला पाठवून मुलाला घरी आणत. सुट्टी संपली की त्याला पुन्हा त्याच शाळेत पाठवलं जायचं.

काळ बदलला. आता अनूप शिकून मोठा व्यावसायिक बनला. शेठ करोडीमल म्हातारे झाले. वडलांचं अनूपवर मोठं कर्ज होतं. त्याने चांगल्या शाळेत घालून त्याला शिकवलं होतं.

वडलांचा कारभार आता मुलाने आपल्या हातात घेतला. त्यात खूप वाढ केली. कारभारात अतिशय व्यस्तता असल्यामुळे अनूपला आता आपल्या म्हातार्‍या बापाकडे लक्ष द्यायला फुरसत नसे. त्यामुळे त्याने आता वडलांना शहरातील चांगल्या वृद्धाश्रमात ठेवलं. वेळ झाला की त्यांना घरी नेण्याचं आश्वासन दिलं आणि तो पुन्हा आपल्या व्यवसायात रमून गेला. वृद्धाश्रमातला मोठा खर्च करून, त्याला आपण कर्जमुक्त झालो, असं वाटू लागलं होतं.

मूळ कथा – कर्जमुक्त – मूळ लेखक – श्री अशोक दर्द  मो. – मो. 9418248262

☆ ☆ ☆ ☆ ☆

☆ कोरोनाची भाकरी – श्री घनश्याम अग्रवाल  ☆ भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर ☆ 

करोंनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. घरात शांतता पसरली. म्हातार्‍याला आयसोलेशन्समध्ये ठेवलं गेलं. सून दोन वेळचा चहा आणी जेवणाची थाळी घाबरत घाबरत खोलीच्या उंबरठ्यावर ठेवायची. मग हात सॅनिटायझराने स्वच्छ धुवायची.

म्हातार्‍याने आज तीनपैकी दोनच भाकरी खाल्ल्या. उरलेल्या तिसर्‍या भाकरीचं काय करणार? वाटलं, बाहेर जाऊन एखाद्या भिकार्‍याला किंवा गायीला घालावी. पण खोलीपुढे १४ दिवासांची लक्ष्मणरेषा ओढलेली होती. अखेर त्याने भकारी उंबर्‍यावर ठेवत सुनेला म्हंटलं, ‘भाकरी फुकट जायला नको. बाहेर कुणाला तरी देऊन टाक.’

‘हा म्हातारा म्हणजे नं…. कुणाला देणार त्याचा हात लागलेली भाकरी?….’ अखेर तिने चिमट्यात धरून ती भाकरी उचलली आणि पेपरमध्ये गुंडाळून बाहेरच्या गेटपाशी गेली कचराकुंडीत भाकरी टाकायला. पण कचराकुंडी दूर होती. अचानक तिला म्हातारा भिकारी हात पसरत येत असलेला दिसला. द्यावी त्याला? पण तोही माणूसच ना! तिने त्याला जवळ बोलावले. कागदात गुंडाळलेली भाकरी त्याला देत ती म्हणाली, ‘ ही कचराकुंडीत टाक. करोना पॉझिटिव्हवाल्याचा हात याला लागलाय याला आणि हे घे पाच रुपये तुला.’

करोंनाची इतकी भीती  आणि चर्चा होती की भिकारीदेखील त्याबद्दल काही बाही  ऐकत होते. दोन दिवसांचा भुकेजलेला असूनही त्याने विचार केला, करोंनावाल्याचा हात लागलेली ही भाकरी… नाही… नाही…मी ही खाणार नाही. ही कचराकुंडीत टाकून पाच रूपायांची भाकरी विकत घेऊन खाईन मी. भाकरी विकत घेण्याच्या विचाराने त्याच्या चालीत एकदम रुबाब आला. पहिल्यांदाच तो भाकरी विकत घेऊन खाणार होता.

कचरापेटीपर्यंत येता येता त्याच्या मनात विचार आला, त्याला भाकरी विकत कुठे मिळणार? सगळी हॉटेल्स, खानावळी बंद आहेत. त्याचे हात भाकरी टाकता टाकता थबकले.

मग त्याने भाकरी नीट निरखून बघितली. त्याला कुठे काही व्हायरस दिसला नाही. मग त्याने ती दोनदा झटकली. असला व्हायरस तर पडून जाईल. मग त्याने भाकरीकडे पाहिले. करोना पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोघेही भाकरी खातात. भाकरी पॉझिटिव्ह – निगेटिव्ह कशी असेल? भाकरी भाकरीच असते. शिवाय कुणा भिकार्‍याला कोरोना झालेला ऐकला नाही. कुणा भिकार्‍याला क्वारंटाईन झालेलं पाहीलं नाही. भुकेने सगळे सोयिस्कर तर्क केले. त्याने पुना भाकरी झटकली नि मनाशी म्हणाला, ‘ समाजा एखादा व्हायरस पोटात गेलाच, तर काय होईल? या रोटीमुळे इतकी इम्युनिटी मिळेलच, की ती त्या व्हायरसला मारून टाकेल. आता तो इतका प्रसन्न होऊन भाकरी खाऊ लागला की जसा काही तो कोरडी भाकरी खात नाही आहे, तर भाजीबरोबर भाकरी खात आहे.

मूळ कथा – कोरोना की रोटी  –  मूळ लेखक – श्री घनश्याम अग्रवाल मो. 94228 60199

☆ ☆ ☆ ☆ ☆

अनुवाद – सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170 ईमेल  – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – विविधा ☆ पांढरा प्रकाश/white light… ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

 🌸 विविधा 🌸

☆ पांढरा प्रकाश/white light… ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

विश्वातील असा स्रोत आहे ज्यामध्ये सकारात्मक ऊर्जा असते. सहाय्य, उपचार आणि नकारात्मक ऊर्जा किंवा अस्पष्ट कंपनांपासून संरक्षणासाठी पांढर्‍या प्रकाशाला कोणीही (बरे करणारे, सहानुभूती देणारे कोणीही!) आवाहन करू शकतात. महत्त्वाचे म्हणजे पांढर्‍या प्रकाशाचा वापर कोणालाही किंवा कशालाही इजा करण्यासाठी केला जाऊ शकत नाही. तसेच त्याने कोणत्याही प्रकारे नुकसान होऊ शकत नाही.

 व्हाईट लाइट बोलावणे पांढऱ्या प्रकाशासाठी ओरडणे किंवा गुडघे टेकून प्रार्थना करण्याची विनंती करण्यासारखे नाही. आपण धार्मिक असणे आवश्यक नाही, फक्त तो प्राप्त करण्यासाठी खुले असावे. प्रकाश सर्वांसाठी उपलब्ध आहे… जर तुम्ही त्याच्या उपचार आणि कंपनांना स्वीकारत असाल तर तो अधिक सहज उपलब्ध आहे.

शुद्धीकरण आणि परिवर्तनासाठी नकारात्मक किंवा  गलिच्छ  ऊर्जा पांढर्‍या प्रकाशाकडे पाठविली जाऊ शकते किंवा निर्देशित केली जाऊ शकते. उदाहरणार्थ तुम्ही विनंती करू शकता की तुम्ही तुमच्या मधून बाहेर काढलेल्या अशुद्धता शुद्धीकरणासाठी पांढर्‍या प्रकाशाकडे पाठवत आहे.

पांढर्‍या प्रकाशाच्या परिवर्तनाची संकल्पना अगदी सोपी आहे.जसे तुमचे सर्व घाणेरडे कपडे पॅक करण्याचा आणि ड्राय क्लीनला टाकण्याचा विचार करा. तुमचे कपडे जसे एका बॅग मध्ये भरून लॉंड्रीत देता आणि  काही दिवसांनी  ते स्वच्छ  होऊन परत येतात तसेच हे आहे.

पांढर्‍या प्रकाशाच्या क्षेत्रात जे काही प्रवेश करते किंवा ज्यावर पांढरा प्रकाश पडतो ते स्वच्छ आणि शुद्ध होऊन बाहेर येते.

पांढरा प्रकाश देवदूत,चांगल्या शक्ती घेऊन येतात.

विश्वास ठेवा की जेव्हा तुम्हाला पांढर्‍या प्रकाशाच्या संरक्षणाची इच्छा असेल तेव्हा तो तुम्हाला मिळेल. जसे की रिक्षा ला कॉल करणे. तुम्हाला फक्त दरवाजा उघडण्याची आणि प्रकाशाचे स्वागत करण्याची आवश्यकता आहे.

आपल्याला जीवनात मिळालेले धडे,वाईट अनुभव,नकळत केलेली चुकीची कर्म इत्यादी सर्व गोंधळातून बाहेर पडण्याचे ठिकाण आहे.तसेच अत्यंत विश्रांतीची जागा आहे.

पांढर्‍या प्रकाशाचे व्हिज्युअलायझेशन व्यक्तिपरत्वे भिन्न असू शकते. काहींना पांढर्‍या रंगात लहान धूमकेतूसारखे चमकणारे चमक दिसू शकतात, तर इतरांना चमकणारे मोठे पांढरे गोळे दिसू शकतात.काहींना पांढरे सोनेरी किरण दिसतात.काहींना प्रकाशाचा शॉवर दिसतो.काहींना उजेड दिसत नाही पण जाणवतो.काहीतरी आपल्या कडे येत आहे असे वाटते.अशा कोणत्याही स्वरूपात ही अनुभूती येते.

दिवसातून 10 मिनिटांनी सुरुवात करा, हळूहळू कालावधी 30 मिनिटांपर्यंत वाढवा.

श्वेत प्रकाश/white light ध्यान काय आहे आणि त्याचे फायदे काय आहेत?

तुम्हाला अनेक फायदे मिळू शकतात. त्यापैकी काही येथे आहेत:

🪷 तुमची प्रेरणा सुधारते आणि वाढवते .

🪷 दृढनिश्चय आणि सहनशक्ती सामर्थ्य देते.

🪷 तुम्हाला तुमच्या ध्येयांवर अधिक चांगले लक्ष केंद्रित करण्यात मदत होते.

🪷 तुम्हाला तुमचे ध्येय साध्य करण्यात मदत करते .

🪷 आत्मविश्वास सुधारतो.

🪷 यशाच्या मार्गात येणाऱ्या अडथळ्यांवर मात करण्यास मदत करते.

🪷 स्पष्ट विचार प्रक्रिया करण्यास मदत करते.

🪷 अडकलेला गाभा स्वच्छ आणि साफ करतो आणि अशा प्रकारे तुम्हाला आजारापासून दूर ठेवतो.

पांढऱ्या प्रकाशाच्या ध्यानाचा सराव करण्यासाठी तुम्हाला दिवसातून फक्त 10 मिनिटे लागतात. जेव्हा तुम्ही मनाच्या निवांत अवस्थेत याचा सराव करता तेव्हा परिणाम चांगले मिळतात, तुम्ही जागे होताच हे करणे सुरू करण्याचा सल्ला दिला जातो.

सर्वोत्कृष्ट परिणाम मिळविण्यासाठी तुम्ही काही गोष्टी तुमच्या मनात ठेवल्याचे सुनिश्चित करा.

🪷 धीर धरा.

🪷 प्रामाणिक रहा.

🪷 परिणामांची अपेक्षा ठेवून कधीही ध्यान करू नका.

🪷 नकारात्मक विचार नेहमी तुमच्या फोकसपासून दूर ठेवा.

🪷 नेहमी सकारात्मक उर्जेने वावरत रहा.

🪷 पूर्णपणे दयाळूपणे ध्यान करा.

श्वेत प्रकाश ध्यान हे शुद्धीकरण आणि आत्मज्ञान प्राप्त करण्याचा एक उत्तम मार्ग आहे. हे तुमचे शरीर आणि मन पुन्हा टवटवीत करण्यास मदत करते. आणि राग, चिंता आणि तणाव यासारख्या नकारात्मक भावनांवर नियंत्रण ठेवण्यास मदत करते . यात प्रत्येक अवयवांना व मन त्यातील विचारांना स्थिर,शुद्ध करणे हे होत असते. त्यामुळे आपल्यातील प्रेरणा आणि सहनशक्ती वाढते, चांगले विचार करण्याचे प्रमाण वाढते, उद्दिष्टांकडे लक्ष  केंद्रित करणे जमू लागते, दृष्टीकोन बदलतो, आत्मविश्वास वाढतो,आपण स्पष्ट आणि तर्कशुद्ध विचार करू लागतो. आणि शरीर शुद्ध होते. हे या ध्यान तंत्राचे काही प्रमुख फायदे आहेत. हे ध्यान दिवसातून किमान 10 मिनिटे आरामशीर मनःस्थितीसह स्वतःमध्ये हळूहळू परिवर्तन करण्यासाठी करा.

पांढरा प्रकाश ध्यान तुमची नैसर्गिक उपचार क्षमता वाढवते असे मानले जाते.

हे तुम्हाला तुमच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करण्यात मदत करते आणि तुमचा आत्मविश्वास आणि प्रेरणा सुधारते.

हे मन स्वच्छ करते आणि तुम्हाला तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्यास मदत करते.

सर्वोत्तम परिणाम मिळविण्यासाठी दयाळू, प्रामाणिक आणि संयमाने ध्यान करा.

© सुश्री विभावरी कुलकर्णी

सांगवी, पुणे

मोबाईल नंबर – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈