मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अनुवादित कथा – “देवकी अजून जीवंत आहे” – सुश्री अनघा जोगळेकर ☆ (भावानुवाद) – सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

☆ अनुवादित कथा – “देवकी अजून जीवंत आहे” – सुश्री अनघा जोगळेकर ☆ (भावानुवाद) – सौ. उज्ज्वला केळकर 

(मूळ हिंदी कथा  –  “देवकी अभी मरी नही”)

रात्रीचा पहिला प्रहर सरलाय. अंधार गडद होत चाललाय. टेबलावर ठेवलेल्या कादंबरीची पाने हवेतील पंखांप्रमाणे फडफडत आहेत. या आवाजात माझ्या मनाचा आवाजदेखील मिसळत चाललाय. झोप डोळ्यांपासून कित्येक योजने दूर आहे. तुटलेल्या मनाचे तुकडे जुन्या जखमांना चिरताहेत. गेल्या तीन-चार वर्षातली ती हृदयद्रावक घटना माझ्या डोळ्यांपुढे फिरते आहे. या दु:खद आठवणी विसरण्यासाठीच मी ती कादंबरी हातात घेतली आणि एवढ्यात माझ्या खोलीत आवाज आला, ‘ शिवाला नीलकंठ का म्हणतात, माहीत आहे? 

त्या आवाजाने मी थबकले. खोलीत इकडे तिकडे पाहिले. खोलीत कुणीच नव्हते.

‘इकडे-तिकडे काय बघतेस? मी तुझ्यासमोरच तर आहे. मी आहे देवकी.’

‘देवकी.’

‘होय. देवकी. तुला माहीत आहे शिवाला नीलकंठ का म्हणतात, माहीत आहे?’

‘नीलकंठ. होय. माहीत आहे. … कारण त्यांनी वीष प्यालं होतं॰’

‘एकदा की पुन्हा पुन्हा?’

‘…..’

‘सांग ना! एकदा की पुन्हा पुन्हा?’

 ‘ए….एकदा ….’ मी चाचरत म्हंटलं॰

 ‘आणी मी?’ देवकीचा कंठ अवरुद्ध होत चालला.

 ‘…..’

(सुश्री अनघा जोगळेकर)

 ‘तू मलाच वाचत होतीस ना! ती बघ. टेबलावारच्या कादंबरीची पाने अजूनही फडफडताहेत.

 मी पुतळा बनून देवकीकडे बघत राहिले. तिची वेदना अनुभवू लागले.

 ‘आपल्याच प्राणनाथाद्वारे आपल्याच पुत्रांना आपल्याच भावाकडे , त्यांच्या मृत्यूसाठी सोपवणं…’ देवकीला वेदना असह्य झाली. ती विव्हळली.

 ‘मला माहीत आहे.’ मी धीर करून म्हंटलं.

 ‘नाही. तुला काही माहीत नाही. माझा एक नव्हे… सहा सहा मुलं….’

 ‘ मी तुझी वेदना समजू शकते.’ तिचं बोलणं मधेच तोडत मी म्हंटलं.

 ‘काय, खरोखरच तू माझी वेदना समजू शकतेस?’ तिचा आवाज करुणार्द्र झाला होता. ती हळू हळू हुंदके देऊ लागली. ‘माझ्यासमोर माझ्या मुलांना शिळेवर आपटलं गेलं… ओह!’ यापुढे ती काहीच बोलू शकाली नाही. तिचे अश्रू खोलीतील हवा आर्द्र बनवू लागले होते. खूप वेळ अश्रू ढळल्यानतर ती काहीशी संतुलित झाली. म्हणाली,

 ‘तू खरंच बोलली होतीस. तू माझी व्यथा समजू शकतेस. एक स्त्रीच दुसर्‍या स्त्रीची पीडा समजू शकते.’

 ‘ हं! खरच एक स्त्री दुसर्‍या स्त्रीची पीडा समजू शकली असती तर …. ‘ मी उदास होऊन  म्हंटलं. 

 “म्हणजे …” देवकी चमकून म्हणाली.

 मी उगीचच तिच्यावर संतापले. ‘तुला काय वाटतं, तू इतिहासातील एक मात्र स्त्री आहेस, की जिच्या मुलांना मारून टाकलं गेलय.’

मी क्षणभर थांबले आणि दीर्घ श्वास घेतला. माझ्या मनातील व्यथा माझ्या डोळ्यात उतरली.

 ‘तू आजसुद्धा जीवंत आहेस. तू मेली नाहीस देवकी. तू कधीच मेली नाहीस. देवकी कधी मरत नाही. ती प्रत्येक युगात जीवंत असते. हां! तुझ्या मुलांच्या मृत्यूमुळे त्या घृणीत कामाला सुरुवात झाली आणि वर्तमान काळात त्याचं स्वरूप बदललं. एवढंच!’

  ‘तुझं बोलणं कळलं नाही मला!’ देवकीच्या स्वरात आश्चर्य होतं आणि वेदनाही.          ‘देवकी’, मी माझे अश्रू पुसत म्हंटलं, ‘ तुझ्या मुलांना जन्म घेतल्यानंतर मारलं गेलं आणि माझ्या…’ खोलीत माझे हुंदके घुमू लागले. त्यातच देवकीची पीडाही मिसळली. खूप वेळपर्यंत आम्ही दोघींनी गुपचुपपणे आपआपल्या दु:खाला वाट मोकाळी करून दिली.

हे मौन देवकीनेच प्रथम तोडलं. नऊ महीने गर्भात रक्ताचं तीळ तीळ सिंचन करून झाल्यावर ते रक्त आपल्यासमोर शिळाखंडावर वाहाताना बघणं… ओह! केवढी असह्य वेदना होती ती… आपल्याच पुत्राचा सुकोमल देह छिन्न भिन्न होताना बघणं… मी माझ्याच मृत्यूची कामना करत होते तेव्हा…’ देवकीची पीडा मुखरीत झाली होती.

देवकीच्या या बोलण्याने माझ्या न जन्मलेल्या दोन भ्रूणांची आठवण झाली.

देवकी तू निदान नऊ महीने त्यांना आपल्या गर्भाशयात ठेवलंस. वाढवलंस. त्यांना आनुभवलंस. त्यांच्या जन्माच्या प्रसववेदना सहन केल्यास. त्यांचा सुंदर चेहरा बघितलास. एक क्षणभर का होईना, पण त्यांना आपल्या उराशी कवटाळलंस… पण मी… मला तर हेही सुख अनुभवायला मिळालं नाही.

‘…..’ देवकी आता काही न बोलता माझ्या व्यथा ऐकून घेत होती.

‘मला तर मुलगाच पाहिजे, असं काही नव्हतं. मी गर्भवती झाले, यातच मी खूश होते. ‘पण….’

‘पण…. काय?’ देवकीच्या अधीर स्वरात करूणा मिसळली होती.

‘देवकी तुझ्या पतीने तुझ्या मुलांचा बळी मान्य केला, कारण त्याला तुझे प्राण वाचवायचे होते. कारण तुझा आठवा पुत्र जन्माला येईल आणि विश्वाचे कल्याण होईल. आपले प्राण वाचवण्यासाठी तुझ्याच भावाने तुझ्या मुलांना मारलं. ते सारं अतीव दु:खदायक होतं, खूप दु:खदायक,  पण…. ‘ माझ्या आसवांनी माझा सारा चेहरा भिजून गेला होता. भावनेच्या प्रवाहात मी वहात चालले होते. ‘पण माझा गर्भ तर तीन महिन्याचाही झाला नव्हता. त्याची हत्या करणारा दुसरा कुणी नव्हता. माझाच नवरा होता. त्याला मी जीवंत रहाण्याची वा मरण्याची पर्वा नव्हती आणि मारणारा पौरुषहीन होता. या घृणीत कामात स्त्रीसुद्धा सामील होती.’

‘काय? ‘ देवकीचा स्वर कारूणामिश्रित झाला. त्यात अविश्वास होता.

‘होय देवकी! आता तुझ्याबाबतीत घडलेल्या अपराधाचं स्वरूप बदललय. आता जन्म घेण्यापूर्वीच भ्रूणाला मारून टाकलं जातं. भ्रूणाचं मुलगा होणं अपराध नाही. मुलगी होणं हा अपराध आहे. आज पती, पत्नीला वाचवण्यासाठी नाही, आपला वंश वाचवण्यासाठी पत्नीला जिवंतपणीच मारून टाकतो आणि त्याला अन्य कुणी पुरुष नाही, घरच्या स्त्रियाच साथ देतात.’

देवकी स्तब्ध उभी राहिली मग म्हणाली, ‘म्हणजे …’

‘म्हणजे… देवकीची पीडा सरलेली नाही. उलट बदलत्या स्वरुपात अनेक पटींनी वाढलेली आहे. मग माझ्याकडे बघत म्हणाली, ‘मला वाटलं होतं, माझ्या पश्चात दुसरी देवकी होणार नाही. व्हायला नको. … ओह!’

मी माझ्याच दु:खात गुरफटून राहिले. तुझं दु:ख समजूनच घेतलं नाही.’

मी आसवांनी भरलेल्या डोळ्यांनी देवकीकडे बघत राहिले. आज देवकी माझ्यापुढे स्वत:ची पीडा कमी लेखू लागली होती. पण खरोखरच आईची पीडा समजून घेणं इतकं का सोपं आहे? जिचं एक अंग कापलं गेलय, तिचं दु:ख, दुसर्‍या कुणाचं दुसरं अंग कापलं गेलय, त्यापेक्षा कमी का असणार आहे? वेदनेला परिभाषित करणं इतकं का सोपं आहे? वेदना ही वेदनाच असते. तिची कुठलीच परिभाषा नसते.

मी आणि देवकी आपल्या आपल्या दु:खात बुडून गेलो आणि एक दुसरीचे सांत्वन करत राहिलो. मला वाटलं, देवकीचं दु:ख माझ्यापेक्षा मोठं आहे. देवकीला वाटलं, माझं दु:ख तिच्यापेक्षा मोठं आहे. 

एवढ्यात टेबलावर ठेवलेल्या कादंबरीची पाने फडफडू लागली. त्यातून आणखी एक स्त्री बाहेर पडून आमच्या दोघींमध्ये उभी राहिली.

‘रोहिणी तू?’ त्या स्त्रीकडे बघ देवकी आश्चर्याने म्हणाली.

‘हो. मीच! तुम्ही दोघींनी आपापलं दु:ख वाटून घेतलंत, पण माझं दु:ख…’

‘तुझं दु:ख?’ तू तर गोकुळात मजेत, सुखाने राहिलीस. बळिरामासारखा पुत्र तुला होता. तुला कसलं दु:ख?’

माझं बोलणं ऐकून क्षणभरासाठी रोहिणी हसली, पण त्याचबरोबर तिचे डोळेही डबडबून आले.

‘जिला हेही माहीत नसेल की कधी, कुणाचा भ्रूण तिच्या गर्भात रोपित केला गेलाय, ते गोपनीय ठेवणेही अनिवार्य आहे आणि माहीत झाल्यावरही ती त्याबद्दल कुणालाच काहीच सांगू शकत नाही, तिचं दु:ख…’

‘ओह!’ माझ्या तोंडून आपोआपच बाहेर पडलं. रोहिणीचं बोलणं अर्धवटच राहिलं. माझा सुस्कारा ऐकून देवकीने पुढे होऊन रोहिणीला सांभाळलं.

‘ती वेळच अशी होती रोहिणीची गोपनीयता आवश्यक होती आणि बळिरामाचा जन्मही।‘

‘माहीत आहे. मी आपल्याला दोष देत नाही, पण पतीच्या दीर्घकालीन अनुपस्थितीत पत्नीचं गर्भवती होणं आणि दुसर्‍याला खरंही सांगता न येणं…. माझं दु:ख कुणाला कळेल?

मी त्या दोघींकडे बघत राहिले. एक आपल्याच मुलांच्या हत्येन तडफडत होती, तर दुसरीने किती कलंक माथ्यावर झेलले होते. सहन केले होते. पण माझी खात्री आहे, शेवटी दोघीही जणी संतुष्ट झाल्या असणार. कारण…. कारण कृष्णाचा जन्म नेहमीच शुभ करून जातो. पण…. पण कृष्ण काय माझ्या उदरातून जन्म घेऊन मला माझ्या दु:खातून वर काढेल? हा प्रश्न माझ्या मानात यक्षप्रश्नाप्रमाणे विक्राळ रूप धारण करून उभा आहे.

देवकी आणि रोहिणी कादंबरीच्या आपापल्या पानात गुप्त झाल्या आहेत आणि …     मी आणखी एक देवकी बनण्याच्या दिशेनेपुढे निघाली आहे आणि कदाचित रोहिणी बनण्याच्या दिशेनेही….

मूळ कथा – ‘देवकी अभी मरी नही’ – मूळ  लेखिका – अनघा जोगळेकर मो.- 9654517813 

अनुवाद – सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170 ईमेल  – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ तीन अनुवादित लघुकथा ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

☆ जीवनरंग ☆

☆ तीन अनुवादित लघुकथा ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ 

(1) अतिसामान्य तडफड – श्री संतोष सुपेकर (2) सन्मानास कारण की — सुश्री मीरा जैन (3) पुन्हा कधीतरी — श्री भगवान वैद्य ‘प्रखर’

☆ अतिसामान्य तडफड – श्री संतोष सुपेकर ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ 

नुकतंच त्याचं कॉलेज शिक्षण पूर्ण झालं होतं, आणि एक नवा ‘ सामान्य ‘ माणूस म्हणून तो या जगात प्रत्यक्ष पाय टाकू पहात होता. 

एक दिवस तो एका जगप्रसिद्ध मंदिरात गेला.. ‘ नवं आयुष्य सुरु करण्यापूर्वी देवाच्या पाया पडावं आणि त्याचे आशिर्वाद घ्यावेत  ‘ असं त्याला मनापासून वाटलं होतं. पण आत जाताच तिथे लागलेली लांबलचक रांग पाहून तो चक्रावूनच गेला – “ बाप रे … इतकी मोठी रांग ? “ तो नकळत म्हणाला. 

“ हो रे भावा.. अशी खूप मोठी रांग लागणं हे रोजचंच आहे इथे.. “ शेजारी उभे असलेले एक गृहस्थ आपणहून त्याला म्हणाले. 

“ अशाने तर देवाचं दर्शन होईपर्यंत संध्याकाळ होईल इथेच .. “ घड्याळ बघत तो वैतागून म्हणाला. 

“ अरे बाबा, संध्याकाळ कसली.. रात्र जरी झाली तरी त्यात विशेष काही नाही. “ 

“ आणि ती रांग? तिथे काय आहे ? “….. या रांगेला समांतर, पण जराशी अंतरावर असलेली तशीच एक रांग पाहून त्याला आश्चर्य वाटलं .. “ त्या रांगेतले लोक जरा जास्त शिकले-सवरलेले आणि श्रीमंत असावेत असं वाटतंय मला . “

 .. ‘ आता या मुलाला वास्तव कळायलाच हवे ‘ या हेतूने, त्याच्याहून वयस्क असणारे ते गृहस्थ शांतपणे त्याला म्हणाले … “ असतीलही त्या रांगेतली माणसं थोडी श्रीमंत… पण बाळा, ही रांग नावाची गोष्ट आहे ना ती प्रत्येक माणसाला त्याचे स्थान … किंवा योग्यता म्हणू या … दाखवून देतेच . तीही एक रांगच आहे

— फक्त  “paid line “…. 

“paid line ? – पण ती रांगही या रांगेइतकीच लांब आहे की.. मग तरी अशी वेगळी का ? “

“ ते … ते काय आहे ना बाळा… या सामान्य.. म्हणजे general रांगेत उभं रहावं लागू नये ना, एवढ्याचसाठी लावलेली आहे ती वेगळी ‘स्पेशल’ रांग…. फक्त तेवढ्याचसाठी ही धडपड …पैसे देऊन …. बाकी काही नाही . पण शेवटी उभं रहावं लागतं आहे रांगेतच “ …… 

मूळ हिंदी कथा – ‘आम छटपटाहट’ – कथाकार – श्री संतोष सुपेकर

अनुवाद :  सुश्री मंजुषा सुनीत मुळे

☆ सन्मानास कारण की (अनुवादित लघुकथा) — सुश्री मीरा जैन ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ 

“ वृद्धाश्रमाचे सर्वश्रेष्ठ संचालक “ हा एक मानाचा समजला जाणारा सामाजिक सन्मान यावर्षी कुणाला मिळणार हे त्या कार्यक्रमात घोषित करण्यात येणार होते. त्यासाठी उत्सुक असणाऱ्यांची आणि अर्थातच त्यांच्या आप्तांची बरीच गर्दी तिथे जमलेली होती. 

अखेर एकदाचा तो क्षण आला. निर्णायक मंडळाने या सन्मानाचे मानकरी म्हणून श्री. गौतम यांच्या नावाची घोषणा केली —– आणि —- आणि तिथे उपस्थित असलेल्या इतर संचालकांमध्ये अस्वस्थ कुजबुज सुरु झाली. ज्या एका संचालकांना स्वतःलाच हा सन्मान मिळणार याची पुरेपूर खात्री वाटत होती, त्यांचा राग तर अनावर व्हायला लागला होता….. “ काय ? त्या गौतमला हा सन्मान मिळतो आहे ? – हे कसं शक्य आहे ? – माझा वृध्दाश्रम तर इतका स्वच्छ असतो कायम, आणि इतरही खूप सोयी-सुविधा आहेत तिथे. एवढंच नाही, तर मी जेव्हापासून त्या आश्रमाचा कारभार सांभाळायला लागलो आहे तेव्हापासून तिथल्या व्यवस्थेत सातत्याने काही ना काही सुधारणा होताहेत. म्हणूनच आधी जिथे फक्त दहा वृद्ध होते, तिथे आता पन्नास वृद्ध रहाताहेत. आणि या गौतमचा आश्रम — तिथे एकूण व्यवस्था कशी काय आहे कोण जाणे , कारण मी कधीच तिथे गेलेलो नाही. पण आकडे मात्र असं सांगताहेत की गौतम जेव्हापासून तिथला कारभार पाहतोय, तेव्हापासून वृद्धांची संख्या सतत रोडावत चालली आहे. आता तर फक्त वीस वृद्ध उरलेत म्हणे तिथे….. नक्कीच काहीतरी गडबड असणार तिथे, ज्यामुळे ही संख्या सारखी कमीच व्हायला लागली आहे. तरी त्याचा सन्मान ???? नक्कीच काहीतरी चमचेगिरी केलेली असणार …. नाहीतर त्या गौतमने निर्णायक मंडळाचे खिसे गरम केलेले असणार …. दुसरं काय ? “ 

तेवढ्यात ट्रॉफी घेण्यासाठी श्री. गौतम मंचावर आले. निर्णायक मंडळाच्या अध्यक्षांनी त्यांचे अगदी मनापासून भरभरून कौतुक करतांना सांगितले की — “ आम्ही तुम्हा सर्वांच्या संस्थांचे निरीक्षण केले. प्रत्येक ठिकाणी वृद्धांची व्यवस्था अगदी उत्तम ठेवली जाते हे आम्ही पाहिले. पण या सन्मानासाठी गौतमजी यांचं नाव  निवडलं जाण्याचं कारण हे आहे की,, आज त्यांच्या संस्थेत फक्त निपुत्रिक वृद्ध तेवढे रहात आहेत. बाकीच्यांना त्यांच्या मुलाबाळांबरोबर राहता यावे म्हणून त्यांनी स्वतः अथक प्रयत्न केले आहेत – करत आहेत, आणि त्यांना परत स्वतःच्या घरी पाठवण्यात त्यांनी अभूतपूर्व असे यशही मिळवलेले आहे. आणि हे त्यांचं काम मुळातच खूप मोठं आणि अद्वितीय, अद्भुत म्हणावं असंच आहे. “ —

मूळ हिंदी कथा – ‘सन्मानकी वजह’ – कथाकार – सुश्री मीरा जैन

अनुवाद :  सुश्री मंजुषा सुनीत मुळे

☆ पुन्हा कधीतरी (अनुवादित लघुकथा) — श्री भगवान वैद्य ‘प्रखर’ ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ 

‘‘साधारण किती पैसे मिळतील?” अयोध्या प्रसाद, ऊर्फ ए.पी.च्या बायकोने विचारलं. पगार वाढ होणार अशी घोषणा झाली होती, आपल्याला किती ॲरिअर्स मिळतील याचा ते दोघे हिशोब करत बसले होते. 

‘‘मिळतील बहुतेक चोवीस-पंचवीस हजार…”

‘‘फक्त एवढेच?” त्याच्या हातात चहाचा कप देत तिने विचारलं. 

‘‘हो, टॅक्सही कापला जाईल ना गं.”

‘‘हो तर, तुम्हा लोकांचा एक पैसाही लपून रहात नाही. सगळ्यात आधी, आणि तुम्हाला न विचारताच टॅक्स कापून घेतात.”

शेजारीच अभ्यास करत बसलेल्या पम्मीचं लक्ष बहुतेक त्या दोघांच्या बोलण्याकडेच होतं… ‘‘बाबा, आता तरी मला सायकल आणता येईल ना?” तिने मध्येच विचारलं. 

‘‘हो बाळा, नक्की आणता येईल.”

‘‘पण मी गिअरवाली सायकलच घेणार हं!”

‘‘नको, आत्ता साधीच घे बाळा. गियरवाल्या सायकलची किंमत किती जास्त सांगताहेत, ऐकलंस ना? फार महाग आहे ती. दहा हजारांपेक्षाही जास्त किंमतीची.”

‘‘आई, घ्यायची असली तर गियरवालीच घ्यायची. मला साधी सायकल नकोय. माझ्या सगळ्या मैत्रिणींकडे गिअरवाली सायकल आहे, मग फक्त माझ्याकडेच का नाही?”

‘‘ठीक आहे. गियरवालीच घेऊ या. पण या वर्षीही तुला ‘ए’ ग्रेडच मिळाली पाहिजे… तरच…” ए.पीं.नी तिला अट घातली. 

‘‘तुम्ही गियरवाली सायकल घेऊन दिलीत ना, तर नक्कीच मिळेल यावर्षीही ‘ए’ ग्रेड.’’

‘‘तुम्ही तर काय हो? विनाकारण डोक्यावर बसवताय तिला…”

‘‘अगं एकतर मुलगी आहे आपली. आणि सायकलने जायला लागली, तर बसचे पैसेही वाचतील ना,” ए.पीं.नी हळूच बायकोला म्हटलं. 

‘‘बरं, मी काय म्हणत होते… यावेळी आईंना ‘गुजरात दर्शन’ सहलीला पाठवायचं का? गेल्या तीन वर्षांपासून म्हणताहेत त्या. पण दरवेळी काही ना काही सबब सांगून मी त्यांचं म्हणणं टाळते आहे.”

‘‘एकूण किती खर्च सांगताहेत?”

‘‘आठ हजारात होईल सगळं धरून, आणि मुख्य म्हणजे यावेळी त्यांच्या दोन मैत्रिणी चालल्यात या ट्रीपला. दोघी येऊन सांगून गेल्या तसं. आई म्हणत होत्या की त्या दोघींची सोबत असली, तर काळजी करण्याचं काही कारणच असणार नाही.”

‘‘कधीपर्यंत करावं लागेल बुकींग?”

‘‘अजून दोन आठवड्यांची मुदत आहे. तोपर्यंत ॲरिअर्स मिळतीलच ना? आणि समजा नाही मिळाले, तरी ते गजानन-ट्रॅव्हल्सवाले आपल्या ओळखीचे आहेत. थोडा जास्त वेळ देतील ते आपल्याला.” 

‘‘ठीक आहे. तूच त्यांच्याशी बोल, आणि बुकींग करून टाक.”

‘‘आणि हो… शक्य असेल तर आणखी एक छोटंसं काम करून घ्यायचं आहे.” 

‘‘कोणतं काम?”

‘‘माझं मंगळसूत्र तुटलंय्. गेल्या दिवाळीत दुरूस्त केलं होतं, पण आता परत तुटलंय्. खरं तर त्याची चेन बरीच झिजून गेली आहे. सोनार म्हणत होता की आणखी एक-दोन ग्रॅम सोनं घातलं, तर ती पक्की होईल.” 

‘‘म्हणजे ६-७ हजार तर नक्कीच लागतील.”

‘‘हो, हल्ली सोन्याचा भाव किती वाढलाय. मी नुसती काळी पोत वापरते आहे आता. पण कुठे बाहेर जायचं असेल, तर ते बरं नाही वाटत.”

‘‘घे मग करून तसं,” ए.पी. म्हणाले, आणि त्यांनी हिशोबाचा कागद बाजूला ठेवून दिला.

चहाचे कप उचलून बायको आत निघून गेली. पम्मी पुन्हा अभ्यास करायला लागली. ए.पी. गुपचुप आतल्या खोलीत गेले… ‘आता हे कपडे वापरायचे नाहीत’ असं ठरवून, कपड्यांचं जे एक गाठोडं त्यांनी बांधून बाजूला काढून ठेवलं होतं, ते उचलून घेऊन त्यांनी उघडलं. एवढ्यातच त्यात टाकलेल्या दोन पॅंटस् काढून, त्या उजेडात नेऊन त्यांनी नीट पाहिल्या… चांगल्या दोन-चारदा झटकल्या… आणि ‘आता तुमचा नंबर पुन्हा केव्हातरी’, असं मनातच म्हणत, इस्त्रीला द्यायच्या कपड्यांच्या बॅगेत त्या नेऊन ठेवल्या. 

मूळ हिंदी कथा – ‘फिर कभी’ – कथाकार – श्री भगवान वैद्य ‘प्रखर’ 

अनुवाद :  सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ आयेचा फोटु… ☆ सुश्री शांभवी मंगेश जोशी ☆

सुश्री शांभवी मंगेश जोशी

?जीवनरंग ?

☆ आयेचा फोटु… ☆ सुश्री शांभवी मंगेश जोशी

सकाळी झाडू मारायला गेली, तेव्हा 705 मधल्या मॅडमनी इडल्या दिल्या होत्या.

रखमानी त्या तेलावर परतून त्यावर तिखट-मीठ भुरभुरून सदाला दिल्या. सदा खूष झाला.

नाष्ट्याचं काम झालं.

दोन-तीन दिवसांपासून त्याचं सारखं चालू होतं ‘मोबाईल पायजे’. माजा समदा अभ्यास त्याच्यावरच असतुया.’ रखमाला काही कळंना. पैसे कुठून आणावं त्या मोबाईलसाठी. पर अभ्यास त्यावर असतो म्हणतुया. रखमानं परोपरीनं त्याला समजावलं. दिवाळीपत्तुर दम धर. दिवाळी मिळंल त्यातनं बघते.

पण त्याला काही पटत नव्हतं. त्याची आदळ-आपट अन् अबोला, यामुळं रखमा मनातून कष्टी होती. रोज कुणी काही शिळं पाकं द्यायचं त्यावरच दोघांचं भागायचं. आज दुपारी त्याला ताजी भाकर करून द्यावी, लेकराला जरा बरं वाटंल असं ठरवून रखमा पुढच्या कामाला गेली. सारी सोसायटी झाडायची म्हणजे तिला बराच वेळ व्हायचा. पण आज रविवार.

शाळेची सुट्टी. त्यामुळे आज तिनं भाजी-भाकरीचा बेत ठरवला होता.

कामावरून येतांना भाजीला पाच रुपयांचा पाला घेऊन आली. भराभरा पाला फोडणीला घातला. भाकरी थापली न् सदाला हाक मारली. ‘‘ये रं पोरा. ज्यवायला ये. ताजी भाकर केलिया तुझ्यासाठी. माझ्या सोताच्या हातानं. आपल्या घरात. ये माझ्या राजा.’’

सदानं हू, की चू केलं नाही. जेवायलाही आला नाही. रखमानं उठून पाहिलं, तर फुरगंटून बसला होता. तिच्याकडं बघायलाही तयार नव्हता. रखमानं लाख मिनतवार्‍या केल्या, पण तो काही बधला नाही. शेवटी तणतणत पाय आपटत खोपटातनं निघून गेला.

रखमाच्या काळजाचं पाणी-पाणी झालं. कधी नव्हं ते घरला ताजी भाकरी केली.

लेकरासाठी. पण त्यानं ती शिळीच केली. शिळी करून बी खायचं नाव नाही. रखमानं डोळ्याला पदर लावला. तिच्या तरी घशाखाली घास कसा उतरणार? त्या दिवशी दोघंही उपाशीच झोपले.

रखमाला त्या भाकरीकडं पाहून राहून राहून दुःखाचे कढ येत होते. पोरासाठी जीव तुटत होता. त्याचा बाप गेल्यापासून रखमानं तळहाताच्या फोडासारखा जपला होता पण पैश्याची सोंगं ती कुठून आणणार? पोरगं हट्टापायी जिवाला त्रास करून घेतंय म्हणून तिला वाईट वाटायचं.

आज तर अबोलाच धरून बसला होता.

दुसर्‍या दिवशी शाळेत गेला तोही उपाशीच. आला तो ओरडतच. ‘‘आये, मपले शाळेचे कपडे धून ठीव. उद्याच्याला कारेक्रम हाय शाळत.’’

‘‘कसला रं?’’

‘‘मला न्हाय म्हाइत. पर गांधीबाबाचं काय तरी हाय!’’ पर कापडं चमकून ठीव झाक.

दोन ऑक्टोबरचं स्वच्छता अभियान होतं शाळेत. बरं बरं म्हणून रखमा उठलीच.     कालचा राग सोडून पोरगं दोन शब्द बोललं म्हणून रखमा हुरळून गेली. तिनं डाळ-भात शिजवला. त्यानंही मुकाट्यानं खाल्ला. रखमाचा जीव भांड्यात पडला.

दुसर्‍या दिवशी दुपारी चार वाजता रखमा समोरची सोसायटी झाडून आली तर सदा धावत आला. ‘‘चल शाळेत चल. लौकर चल’’ असं म्हणून ओढतच तिला शाळेत घेऊन गेला.

अंगावरच्या मळक्या पातळातच तिला ओढून शाळेत घेऊन गेला.

शाळेत सगळी पोरं पटांगण साफ करत होते. मास्तर लोकही पोरांना सांगून साफसफाई करून घेत होते. पाहुणे, पुढारी आलेले होते.

सदानी आईला मास्तरांसमोर उभं केलं. रखमाचा जीव लाजेनं कांडकोंडा झाला. मास्तरांनाही कळंना. कोण आहे ही? कशाला आली आहे? त्यांनी सदाला विचारलं, ‘‘काय रे सदा, कोण आहेत ह्या? कशाला आणलंस त्यांना?’’

‘‘मास्तर, मपली आय हाय ती.’’

‘‘कशाला आणलंस शाळेत आईला? आज पालकांना नाही बोलावलेलं.’’

‘‘मास्तर का न्हाय बोलावलं मपल्या आयेला आज? आज तिचा खरा मान हाये. म्हून म्या आणलंय तिला फोटू काढाया.’’

‘‘काय? कसला मान? कसला फोटू?’’

‘‘आज शाळेत स्वच्छता… (अभियान) चालू हाय ना?  त्यासाठी आणलंय आयला. त्या फोटुग्राफरला सांगा आयेचा फोटो काढाया लावा त्येंना.’’

लाज-शरमेनं रखमाचा जीव पाणी पाणी झाला. ‘‘हत् येड्या. मपला कसला फोटु?  येडा का खुळा? सोड मला. जाऊं दे घरला. अजून सारी सोसायची झाडायची हाय मागली.’’

‘न्हाय-न्हाय, मी तुला जाऊन देणार न्हाय. रोज सारा जनमभर झाडत असतीया. मंग तुझाच फोटु काढाय पायजे. हे सगळे काय रोज झाडतात का कधी? तुझ्यावाणी? नुसता हातात झाडू घेऊन फोटु काढत्याती अन् पेपरात देतात.

सूज्ञ प्रेस फोटोग्राफरला इथं काही तरी बातमी दिसली. त्यानी लगेच रखमाच्या हातात झाडू दिला अन् तिचा फोटो काढला.

दुसर्‍याच दिवशी झाडझूड करताना आमदार साहेबांच्या फोटोशेजारी रखमाचाही फोटो छापला होता. ‘विशेष’ मधे. खाली लिहिलं होतं- ‘‘सत्कार्यासाठी फोटो – अन् फोटो हेच सत्कार्य’’

शाळेतही नोटीस बोर्डवर तो पेपर लावला होता. सदानं धारिष्ट्यानं सरांना तो पेपर मागितला. सरांनी शाळा सुटल्यावर सदाला तो पेपर दिला. सार्‍या वस्तीत तो पेपर दाखवत

सदा धावत सुटला.

‘‘मपल्या आयेचा फोटु पेपरात. बघा-बघा आयेचा फोटु. मपल्या आयेचा फोटु.’’

हसता-हसता डोळे पुसून रखमाचा पदर ओला झाला.

© सौ. शांभवी मंगेश जोशी

संपर्क – सुमन फेज 4, धर्माधिकारी मळा, एस्सार पेट्रोल पंपामागे, सावेडी, अहमदनगर 414003

फोन नं. 9673268040, [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ पार्टी – भाग ३ – लेखक : श्री शशांक सुर्वे ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

?जीवनरंग ?

☆ पार्टी – भाग ३ – लेखक : श्री शशांक सुर्वे ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले

(मागील भागात आपण पाहिले – जवळचा रस्ता म्हणत 3 तास ह्या असल्याच एका रोडवर फिरालोय आपला… एक गाव दिसणा की घर…..मग कंटाळून इथं थांबलो…पाणी संपलं म्हणून देवाचं तीर्थ पीत हुतो तवर तुमची गाडी भेटली बघा.” आता इथून पुढे) 

पाणी पोटात गेल्यावर आणि दोन दोन प्रसादाचे लाडू खाऊन अनुप आणि प्रकाशला बर वाटत होतं….त्यांचा श्वास आता सामान्य झाला होता…..दोघेही उठून उभे राहिले होते तरीही त्यांच्या मनात अजून भीती होतीच…..तो तरुण त्या दोघांना त्यांच्या ह्या अवस्थेबद्दल सतत विचारत होता पण हे सगळं सांगण्यापेक्षा इथून आधी निघालं पाहिजे ह्या विचाराने अनुप त्याच्या सॅककडे बघत बोलला….कारण कदाचित ह्यामुळे ते जे काही अमानवी होत ते वाटेतच थांबलं होत.

“भाऊ….एवढी मदत केली अजून एक मदत कराल का??”

तो तरुण ती बाटली सॅक मध्ये ठेवत बोलला.

“आव बोला की बिनधास्त”

सॅककडे बोट करत अनुप बोलला,

“तो तुमच्या सॅक मध्ये गणपतीचा फोटो आहे ना….तो घरच्या रस्त्यापर्यंत माझ्याजवळ द्याल का??”

तो तरुण आपल्याच हातावर टाळी मारत म्हणाला,

“हातीच्या मारी…..काय राव….लाजवताय व्हय आम्हाला….आव साहेब गणपती बाप्पा सर्वांचा हाय….हे घ्या”

बाईकला किक मारून त्या दोन गाड्या त्या रस्त्यावरून चालू लागल्या…..अनुप आणि प्रकाशने आपल्यावर घडलेला प्रसंग त्या तरुणाला सांगितला नाही…..अनुप तो गणपतीचा फोटो छातीला कवटाळून मागे बसला होता…..देवाचे आभार मानत देवाचे नाव घेत ते तिघे आता यमाई पठाराच्या मुख्य कमानीजवळ पोहोचले…..ती कमान बघून प्रकाश जोरात ओरडलाच,

‘आर अन्या…आलो रे आलो….कमानीजवळ आलो आपण” 

प्रकाशचे अश्रूंनी डबडबले डोळे बघून तो तरुण आश्चर्यचकित झाला होता….पण अनुप आणि प्रकाश बरोबर जे घडलं ते त्यांचं त्यांनाच माहीत होतं…..कमानीतून बाहेर पडताच तिघांना एकदम मोकळा श्वास घेतल्यासारख वाटत होतं….जणू कित्येक दिवसांची धावती शिक्षा आता पूर्ण झाल्याचं समाधान….कमानीतून बाहेर निघाल्यावर प्रकाश त्या तरुणाला त्यांच्यासोबत जे घडलं ते सांगायला सुरुवात केली….अनुपने मागे बघितले तर कमानीच्या आत अंधारात आठ चमकदार डोळे आणि त्या फूटभर पसरलेल्या जबड्यातले चमकदार स्पष्ट दिसत होते…..हा पाठलाग इथपर्यंतच होता…

 – समाप्त – 

लेखक : श्री शशांक सुर्वे

संग्रहिका : अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ पार्टी – भाग २ – लेखक : श्री शशांक सुर्वे ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

?जीवनरंग ?

☆ पार्टी – भाग २ – लेखक : श्री शशांक सुर्वे ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले

(मागील भागात आपण पाहिले – रस्ता संपत नव्हता आणि ती कुत्री काही केल्या पाठलाग सोडत नव्हती…गाडी थांबवून त्या कुत्र्यांना हुसकावून लावण्याचा विचार त्यांच्या मनाला शिवलाच नाही…कारण थांबला की खेळच संपणार होता…अचानक मागून अनुप जोरात ओरडला, “पक्या…पक्या….ते बघ तिथं…तिथं घर दिसाय लागलं…चल लवकर तिथं!” आता इथून पुढे) 

एक मिणमिणत्या लाईटीचा उजेड एका दगडी कौलारू घरावर पडला होता…..ओसाड अश्या माळरानावर ते घर एकटच उभं होतं…..प्रकाशने बाईकचा वेग वाढवला आणि बाईक त्या दगडी कौलारू घराच्या दिशेने चालली…..त्या घराच्या दगडी भिंतीवर काहीश्या विचित्र भाषेत काहीतरी लिहल होत…..घरावर एक बोर्डही लागला होता….ते घर जसजसे जवळ येऊ लागलं तसं मागे लागलेली ती भयानक कुत्री एकेक करून अंधारात गायब होऊ लागली….दोघांनी थोडा निश्वास सोडला…दोघांनाही प्रचंड तहान लागली होती….आधीच दोघेही प्रचंड थकले होते….सगळं अंग घामाने भिजले होते घसा कोरडा पडला होता…..दोघांनी मागे वळून बघितले मागे एक लांबलचक रस्ता दिसत होता….आजूबाजूची पांढरी माती अगदीच अनोळखी होती….त्या कमानीतून आपण एका दुसऱ्या दुनियेत आलोय की काय असा भास अनुपला होत होता तोच काहीसा खरा ठरत होता…..ह्या पांढऱ्या मातीवरून तर हा नक्कीच महाराष्ट्र वाटत नव्हता..आणि ते अनोळखी भाषेतले फलक??..कदाचित आपण एका दुसऱ्या राज्यात आहोत किंवा एखाद्या दुसऱ्या देशात??…..शक्यता नाकारता येत नव्हती….एकाच रात्रीत बऱ्याच अविश्वसनीय,भयंकर आणि जीवघेण्या गोष्टी घडल्या होत्या…..काहीही घडू शकत होत…..दोघांनी गाडी त्या घराबाहेर पार्क केली घरावरी एक अनोळखी “ホテルの客” अश्या अक्षरात काहीतरी लिहलं होतं…घराचे बांधकाम भारतीय वाटत नव्हते….छप्पर उताराचे आणि बांबूनी बनले होते…..बाहेरून दगडी विटांचे बांधकाम होते….एक रूमचे घर असावे असं बाहेरून वाटत होते…अनुप आणि प्रकाश त्या घराच्या पायऱ्या चढून दरवाज्याजवळ पोहोचले…..दरवाजा जवळपास मोडकळीस आला होता…..अनुपने फक्त एक बोट लावले आणि कर्रर्रर्रर्रर्रर्र असा आवाज करत तो दरवाजा पूर्णपणे उघडला गेला….अजून एक धक्का दोघांचेही डोळे विस्फारून गेला….बाहेरून लहान एक खोलीचे दिसणारे घर आतून मात्र एका प्रशस्त हॉल सारखे होते हा हॉल खूपच मोठा वाटत होता….दुरून परत तो कुत्र्यांचा आवाज आला आणि दोघांची पावले त्या घरात पडली…..एक मोठा हॉल मधेच एक मोठा डायनिंग टेबल ठेवला होता…..त्या मोठ्या हॉल मध्ये उजेड कमी जास्त होत होता कारण आजूबाजूला लावलेल्या मशालीची ज्योत ज्या बाजूला जाईल तिथे उजेड असा खेळ सुरू होता…मशालीच्या आगीच्या केसरी रंगात तो हॉल उजळून निघाला होता….सगळं वातावरण दोघानाही अनोळखी होत….ते त्या वातावरणात खेचले जात होते….पाऊले आपोआप आत पडत होती….हॉल च्या आजूबाजूला काही खोल्या होत्या त्यांची दारे जुन्या दरवाज्यानी बंद होती…..डाव्या बाजूला काही लाकडी ड्रम ठेवले होते त्यावर लाकडी झाकण होते…..दोघांच्याही नजरा त्या आश्रयात मानवी अस्तित्वाला शोधत होत्या….अनुपची नजर चारी दिशांना फिरत होती इतक्यात प्रकाशाची खुनावणारी थाप अनुपच्या खांद्यावर पडली आणि तो भानावर आला….समोरच्या एका स्टेज सारख्या कोपऱ्यात एक म्हातारा गुडघ्यात आपले डोके लपवून बसला होता…..होय म्हातारच होता तो…..त्याचा चेहरा जरी दिसत नसला तरी अर्धे टक्कल आणि मागे असलेल्या पांढऱ्या फेक केसांमुळे अंदाज बांधता येत होता सोबत त्याचे शरीर अगदीच अशक्त होतं…..हाडाला मांस चिटकलं होत अंगावर सुरकुत्या काळे तीळ त्या जीर्ण वृद्ध देहाची ओळख करवून देत होत्या…..तो म्हातारा गुडघ्यात तोंड लपवून पुढे मागे डुलत होता काहीतरी विचित्र भाषेत पुटपुटत होता….त्याच्या डोक्यात एक छोटंसं छिद्र आणि त्यातून पांढरा स्त्राव वाहत होता त्याचा उग्र वास सगळीकडे पसरला होता….खांद्याची पाठीची हाडे स्पष्ट दिसत होती…..त्याचा तो भयानक अवतार बघून अनुप आणि प्रकाशने एकमेकाकडे बघितले शेवटी धाडस करून अनुप बोलला,

“व आजोबा….थोडं पाणी मिळलं का प्यायला?”

तो आवाज ऐकून तो जीर्ण झालेला देह शांत झाला…..आणि आपले गुडघ्यात लपवलेला चेहरा वर न काढता एक हात बाहेर काढून त्या लाकडी ड्रम कडे बोट दाखवले…..त्या हाताकडे दोघे काहीवेळ बघतच राहिले…..लांब बोटे त्यावर लांब काळी नखे मानवी वाटत नव्हतीच…..दोघांनी लगेच तिथून काढता पाय घेतला……घसा कोरडा पडला होता…तहानेने पूर्ण अंग थरथरत होते त्यामुळे दोघेजण त्या लाकडी ड्रम जवळ पोहचले…..एक विचित्र असा वास त्या ड्रम मधून येत होता पण तहान तर प्रचंड लागली होती त्यामुळे प्रकाशने ड्रमचे झाकण उघडले……समोर जे काही होतं ते बघून दोघेही भीतीने जवळपास खालीच कोसळले….ड्रम रक्ताने काठोकाठ भरला होता एक दोन मानवी मुंडकी त्या लाल भडक रक्तावर तरंगत होती…..बसल्या बसल्या अनुपचे लक्ष समोरच्या खोलीवर गेले त्या खोलीचे दार उघडले गेले होती…..मानवी हाडांचा कवट्यांचा खच च्या खच त्या खोलीत तुडुंब कोंबून भरला होता …बाहेर येऊ पाहत होता…..अनुप आणि प्रकाश आता जोरजोरात किंचाळू लागले….कित्येक लोकांची हाडे होती ती.

कट कट कर्रर्रर्रर्रर्र कर्रर्रर्रर्रर्र….

घामेजलेल्या त्या दोन चेहऱ्यांनी त्या आवाजाच्या दिशेने बघितले……मशालीच्या उजेडात तो अगदी अमानवी वाटत होता…..तो म्हातारा आता त्यांच्या समोर उभा होता…..आपला जबडा फूटभर ताणवून उघड्या जबड्याने आणि काळ्या उभ्या डोळ्यांनी तो त्या दोघांच्याकडे बघत होता…..त्या जबड्यात छोटे छोटे असंख्य दात होते….हातांनी आकार बदलला होता 7,8 फुटी देहाचे हात लांबून आता जमिनीला टेकत होते…..त्या हातांची बोटे लांबलचक पसरली होती…..अनेक दिवसांपासून किंवा वर्षांपासून उपाशी असलेला तो अशक्त देह….मानवी मांस खाऊन जगत असावा आणि बक्षीस म्हणून हाडांचा संग्रह करून ठेवत असावा…..कित्येक दिवसापासून तो उपाशी असावा अंदाज नव्हता….लांब उघडलेला जबडा त्या दोघांचे लचके तोडायला रक्त प्यायला आसुसला होता…..समोरच दृश्य बघून अनुप आणि प्रकाश जिवाच्या आकांताने बाहेर पळत सुटले…..मागोमाग तो अमानवी म्हातारा हातांचा आणि पायाचा आधार घेत एखाद्या चारपाई प्राण्याप्रमाणे चिरररररररर चिरररररररर अस किंचाळत त्यांच्या मागे धावत येत होता…..अनुप आणि प्रकाश घराबाहेर पडले…..दोघांचाही श्वास चढला होता…..प्रकाश जोरजोरात रडत होता रडतच त्याने बाईक स्टार्ट केली….आणि रस्त्यावर आणली…..बाईक वेगाने धावत होती तितक्याच वेगाने ते अमानवी आपला जबडा फूटभर उघडा ठेवून त्यांच्या मागे येत होतं…..अनुप ओरडत होता प्रकाशला बाईक पळव पळव म्हणून जिवाच्या आकांताने सांगत होता कारण तो अमानवी म्हातारा काही अंतरावरच हातापायांनी धावत येत होता….वेगाने धावताना रस्त्यावर त्याच्या हातापायांची हाडे आपटत होती त्याचा खट खट खट असा आवाज घुमत होता….त्याचे हात लवचिक होते त्याने तो हल्ला करत होता…अचानक अनुप किंचाळला…..त्या म्हाताऱ्याने आपल्या लांबलचक नखांचा वार अनुप वर केला ….बाईक स्पीड मध्ये असल्यामुळे पाठीवर दोन तीन नखांचे ओरखडे पडून त्यातून हलके रक्त वाहू लागले…..कर्कश गर्जना करत तो म्हातारा  कोणत्याही क्षणी झडप घालून त्या दोघांचा फडशा पडायला तयार होता…..दोघांनाही काहीच सुचत नव्हतं मागून काळ धावतच येत होता…….इतक्यात प्रकाशने 80 च्या स्पीड वर धावणाऱ्या गाडीला अर्जंट ब्रेक लावला…..समोर एक जण गाडी बाजूला उभी करून रस्त्याच्या मधेच दोघांना थांबण्यासाठी हात करत उभा होता……त्याच्या हातात पाण्याची बाटली होती दुसऱ्या हाताने तो थांबायचा इशारा करत होता……घाबरलेल्या प्रकाशने डिस्क ब्रेक दाबला होता त्यामुळे गाडी थोडी लडबडून दोघेही अलगद त्या समोर उभा असलेल्या तरुणापुढे कोसळले……तसा तो तरुण पुढे आला….हातातली 2 लिटर ची पाण्याची बाटली खाली ठेऊन त्यांच्याजवळ गेला आधी त्याने गाडी उचलली.

“आव….दादा….जरा हळू की राव…..एवढ्या तर्राट कुठं निघालाईसा….हात करालतो की राव.”

कपाळावर अष्टगंधाचे दोन पट्टे ओढलेल्या तरुणाकडे अनुप आणि प्रकाशचे लक्षच नव्हतं….त्यांचं लक्ष समोरच्या रस्त्यावर होतं….गाडी बरोबर मागे येणारा त्या म्हाताऱ्याला त्यांची नजर शोधत होती…दोघे प्रचंड घाबरले होते…भीती त्यांच्या चेहऱ्यावर घामाच्या रूपातून वाहत होती…दोघांची ती अवस्था बघून त्या तरुणाने रस्त्यावर ठेवलेली पाण्याची बाटली उचलली आणि त्यांच्या दिशेने केली…..अनुप आणि प्रकाश त्या तरुणाकडे बघत होते तो सामान्य वाटत होता….बाटलीतील पाणी बघून अनुपने ती बाटली घेतली आणि थरथरत्या हातांनी टोपण उघडत घटाघटा पिऊ लागला…..आपली तहान शांत होताच त्याने ती बाटली प्रकाशकडे दिली….प्रकाशसुद्धा घटाघट ते पाणी पिऊ लागला त्याचा वेग बघून तो तरुण म्हणाला,

“ए भावा….जरा पाणी ठिव त्यात….वाईच्या गणपतीच्या मूर्तीवरच तीर्थ आहे त्ये…..घरातल्या लोकांना पण द्यायला पाहिजे की. “

प्रकाशने बाटलीला टोपण लावले…..त्या तरुणाने परत एकदा दोघांच्याकडे बघितले आणि सॅक मधून एक लाडूचे पाकीट काढले.

“बाकी काय नाही हे लाडूचे पाकीट आहे बघा….हे खावा जरा…..वाघ मागं लागल्या सारखं कुठनं आलाईसा अस??”

थरथरत्या हातांनी ते प्रसादाच्या लाडवाचे पाकीट घेऊन अनुप बोलू लागला,     “ते….ते….भूत….भूत….” अनुपच्या तोंडून पुढचे शब्द फुटेनात….त्या तरुणाने समोरच्या रस्त्याकडे बघितले.

“भूत??…..कुठं हाय भूत??….कुणी न्हाई बघा इथं….बाकी ह्यो रस्ता खूपच हरामखोर आहे राव….मी पण 2,3 तास गाडी चालवायलोय….वाटच सापडना राव….वाईतन कोल्हापूरला यायला निघालो तर एक बेनं भेटलं वाटत….लिफ्ट दिली त्याला आणि जवळचा रस्ता जवळचा रस्ता करत करत त्या रांxच्यान ह्या रोडवर आणून सोडलं बघा….भलतंच विचित्र झिपरं हुत त्ये…काय बाय विचित्र बडबडत हूत…..बर जवळचा रस्ता म्हणत 3 तास ह्या असल्याच एका रोडवर फिरालोय आपला… एक गाव दिसणा की घर…..मग कंटाळून इथं थांबलो…पाणी संपलं म्हणून देवाचं तीर्थ पीत हुतो तवर तुमची गाडी भेटली बघा.”

क्रमश: भाग २

लेखक : श्री शशांक सुर्वे

संग्रहिका : अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ पार्टी – भाग १ – लेखक : शशांक सुर्वे ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

?जीवनरंग ?

☆ पार्टी – भाग १ – लेखक : शशांक सुर्वे ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले

मार्चचा महिना …..कडक उन्हाने सगळी जमीन भाजून काढली होती….तप्त उन्हाने यमाई पठारावरची हिरवळ जवळपास करपवून टाकली होती तरीही तिथल्या आजूबाजूच्या डेरेदार झाडांनी तिथला गारवा आणि निसर्गसौन्दर्य अजून टिकवून ठेवलं होतं…..नजर जाईल तिथपर्यंत पसरलेले यमाई पठार पावसाळ्यात वेगवेगळ्या फुलांनी बहरून जायचे पण उन्हाळ्यात मात्र एखाद्या विस्तीर्ण वाळवंटासारखा त्या पठाराची दशा असायची…..तरीही आसपासच्या स्थानिक लोकांची तिथे बरीच रेलचेल असायची…  त्या थोड्या उंचीवर असलेल्या पठारावरून रात्रीच्या वेळी सगळ्या शहराचे एक विहंगम दृश्य दिसायचे…..त्यामुळे स्थानिक लोक तिथे रात्री पार्टी करण्यासाठी वैगेरे यायचे… त्या उंचीवर असलेल्या पठारावरून रात्री शहराचे दृश्य म्हणजे एखाद्या हॉलिवूड सिनेमात दाखवतात तश्या आकाशगंगे सारखे लूकलुकते दिसायचे….अनुपला तो एकांत आवडत असे तिथे तो अगदी तासन्तास बसून मित्रांच्या बरोबर रात्री गप्पा मारत असे…..अनुपच्या घरापासून यमाई पठार 10 km लांब होते त्यामुळे तिथे त्यांचे क्रिकेटचे सामने किंवा बर्थडे पार्टी होत असत…..पठारावर नगरपालिकेने दोन तीन मोठे लाईट्स आणि काही सिमेंटचे बेंच बसवल्यामुळे तशी रात्रीची कसलीच अडचण येत नसे…..

27 मार्च अनुपच्या मित्राचा म्हणजे प्रकाशचा वाढदिवस…..त्या दिवशी प्रकाशचा वाढदिवस मित्रांनी दणक्यात साजरा केला नेमका त्याच दिवशी अनुप काही कामानिमित्त बाहेर गावी गेला होता…..2 दिवसानंतर जेव्हा अनुप परत आला तेव्हा समोर प्रकाश दिसताच अनुपच्या तोंडातून एकच शब्द बाहेर पडला. ‘भावा “पार्टी”??’

प्रकाशने सुद्धा हातात हात देऊन स्मितहास्य करून मंजुरी दिली आणि रात्री यमाई पठारावर “बिर्याणी पार्टी” चे नियोजन लागले…..साहजिक अनुप आणि प्रकाश दोघेच जाणार होते….दोघे अगदी लहानपणापासूनचे मित्र आणि वाढदिवशी वैयक्तिक पार्टी करण्याची प्रथा त्यांनी अगदी लहानपणापासून जपली होती..त्या निमित्ताने अनेक जुन्या गोष्टीना उजाळा मिळायचा….ठरल्या प्रमाणे दोघेही 7 वाजता कामावरून आले आणि आपल्या आवडत्या क्लासिक बिर्याणी हाऊस मधून मस्त गरमागरम बिर्याणी आणि फ्राय चिकनचा डबा भरून घेतला…..आणि दोघे तिथून निघाले….वाटेत मस्त गाडीवर गप्पा मारत 20 च्या स्पीडने त्यांची बाईक चालली होती…..छोटी छोटी वेडीवाकडी वळणे पार करत करत त्यांची बाईक यमाई पठाराकडे चालली……साहजिक एक रंजक विषय निघाला होता त्यात दोघांच्या हसत खेळत गप्पा रंगल्या होत्या….

यमाई पठार एक पर्यटन स्थळ होत॰ त्यामुळे सुरवातीलाच एक कमान उभारली होती……गावापासून 3 की.मी.  तर मस्त गप्पा रंगल्या होत्या पण जस ती कमान पार केली दोघेही काही वेळ अचानक शांत झाले….पार्टी करायला ते सारखे यमाई पठारावर जात होते पण आता मात्र काहीसं वेगळं वातावरण त्या दोघांना जाणवत होतं…हवामानात बदल होऊन उष्ण हवामान कोंदट पावसाळी असल्यासारखं भासत होतं…आजूबाजूच्या परिचित टेकड्यांनी आपले आकार,जागा,रंग सगळं काही बदललं होत….अनुपला हा बदल लक्षात आला होता पण त्याच्याकडे त्याने दुर्लक्ष केले होते….अचानक एका दुनियेतून दुसऱ्या दुनियेत प्रवेश करावा अस काहीसं वाटत होतं ती कमान म्हणजे त्या दोन वेगवेगळ्या दुनियांचा दरवाजा असेल कदाचित म्हणून तर तिकडून पलीकडे गेल्यावर अचानक आकाशातले तारे जणू गायबच झाले होते एक काळाकुट्ट अंधार आणि त्या अंधारात हेडलाईटीच्या दिव्याचा आधार घेत चालणारी बाईक….अनुपला तर कमालीचे अस्वस्थ वाटत होते कारण रोजच्या रहदारीतला हा रस्ता वेगळा वाटत होता… मानवनिर्मित बांधकाम त्या रस्त्याच्या आसपास कुठेच दिसत नव्हते…..रस्त्याच्या आजूबाजूला असणारी झाडे एकदम नाटकी वाटत होती एरव्ही यमाई पठार परिसरात जो थंड गार वारा वाहत असे तो वारा गायबच होता त्यामुळे न हलणारी ती झाडे एकदम नाटकी वाटत होती…..काहीतरी वेगळं आणि विचित्र वाटत होतं तिथे म्हणून तर त्या कमानीतून आत आल्यावर रंगलेल्या गप्पा अचानक बंद झाल्या…..अनुपला काहीतरी वेगळं वाटत होतं पण प्रकाश अगदीच शांत राहून गाडी चालवत होता हे बघून अनुप ने त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला गदागदा हलवले.

“अरे पक्या…काय झालं एकदम शांत झालास??”

पाठीवर पडलेल्या हाताने प्रकाश भानावर आला.

“क…क…काय नाही. “

प्रकाशने विषय टाळला….नेमकं काय बोलावं प्रकाशला काहीच सुचत नव्हतं…..पठार जवळ येत होतं….प्रकाशचे नाटकी बोलणे आणि नाटकी हसू अनुप बरोबर ओळखत होता… सोबत अनुपला हे सुद्धा जाणवत होते की हा रोजचा रस्ता नाही…..काहीतरी वेगळं वाटत होतं….भकास शांत वातावरण आणि काळाकुट्ट अंधार…..बाजूची डेरेदार झाडे बाईकच्या लाईटीच्या उजेडात एखाद्या अक्राळविक्राळ राक्षसासारखी वाटत होती…आता झडप घेऊन गिळंकृत करायला तयार आहेत की काय अशी भासत होती त्यामुळे अनुप घाबरून समोर रस्त्यावर बघत होता आणि प्रकाशशी काहीतरी विषय काढून चर्चा करून त्या वातावरणावर हावी होण्याचा प्रयत्न करत होता….इतक्यात बाईकने पठाराचा चढ पार केला आणि ते दोघे मोकळ्या मैदानात आले…..हौशी लोकांची रेलचेल रात्री ही तिथे असायची पण आज त्या पठारावर कुणीच दिसत नव्हतं… नगरपालिकेने लावलेला स्ट्रीट लाईट मर्यादित उजेड देत होता त्या उजेडात सिमेंटचा बसायचा बेंच दिसत होता अनुपला थोडं हायसं वाटलं कारण मगापासून ना ना शंकांनी त्याच्या मनात वादळ उठवले होते…..त्यातल्या एका शंकेला, “हुश्शहह आपण यमाई पठारावरच आहोत. “ह्या वाक्याने मनोमन उत्तर दिले होते…..पण सिमेंटच्या बेंचच्या आजूबाजूची हिरवळ गायब होती तिथे काळे खडक दिसत होते….दोघेही थबकले पण काही न बोलताच त्या बेंच जवळ आले….पुढचा धक्का मात्र त्या दोघांना जबर बसला….अनुपने तर प्रकाशचा दंड धरला…..त्या बेंच जवळून रात्री पूर्ण शहर लकाकताना दिसत होतं ….पण आता मात्र सगळीकडे काळोख…काळोख आणि फक्त काळोख दिसत होता….दोघांनी सगळ्या बाजूला नजर फिरवली…खाली असलेल्या शहरात एकही लाईटीचा दिवा दिसत नव्हता….फक्त उतरतिला एक चमकणारा लाईटीचा बिंदू टेकडीवरून दिसत होता…….नेमका प्रकार काय चालू आहे दोघांच्याही लक्षात येत नव्हतं.

“अरे अन्या…..काय रं हे…..सगळीकडे अंधार भुडुक कसं काय??”

अनुपने थोडा वेळ विचार करत उत्तर दिले, “आरं पक्या…..शहरात लाईट गेली असलं बघ…हा…तसच असलं…नुकतीच गेली असलं….ते जाऊ दे आपण बिर्याणी खाऊन घेऊ…उगच गार व्हायची….मग मज्जा नाही येत खाण्यात….काय म्हणतो??”

प्रकाशची नजर अनुपच्या हातातल्या पिशवी कडे गेली वास्तविक लाईट जाऊन सगळीकडे अंधार पडणे आणि वरून एकही दिव्याचा उजेड न दिसणे हे प्रकाशला पटत नव्हते तरीही त्याने त्याकडे दुर्लक्ष करत,

“व्हय व्हय….आधी मस्त खाऊन घेऊ मग बघूया पुढचं पुढं.”

बिर्याणी पार्टी निम्मित्त दोघे ह्या पठारावर आले की एक दोन तास तरी बेंच वर बसून दोघांच्या गप्पा रंगायच्या…..आधी वेळ असायचा पण अंगावर पडलेल्या जबाबदाऱ्यानीं त्यांच्याकडून वेळ ओरबाडून नेला होता त्यामुळे दोघेही महिन्यातून एकदा पठारावर येऊन लकाकणार्‍या शहराकडे बघत मस्त निवांत गप्पा मारायचे.  बिर्याणी खाऊन घरी यायचे पण आता मात्र कसल्या तरी भीतीने त्यांना घेरलं होत….आपल्या शिवाय इथे अजून कुणीतरी आहे आणि त्या अंधारातून आपल्याकडे बघत आहे असा काहीसा समांतर भास दोघांना होत होता त्यामुळे दोघांनी डब्बा उघडला आणि काहीही न बोलताच बिर्याणी खाऊ लागले…..त्यांचे हात चालत होते…बिर्याणी खायचे ठरलेले औपचारिक काम आटपून इथून निघून काय पळून जावे अस दोघांनी मनोमन ठरवलं होतं…बिर्याणी खाताना त्यांच्या माना आपोआप सगळीकडे फिरून खात्री करून घेत होत्या……सळसळ जाणवू लागली…..कुणीतरी दबक्या पावलांनी त्यांच्या दिशेने येत असल्याचा भास दोघांना झाला त्यानुसार दोघांच्याही माना त्या अंधारात त्या आवाजाचा मागोवा घेऊ लागल्या.. लाईटीचा उजेड मर्यादित होता…..गडद अंधारात नेमकं काय चालू आहे काय आपल्या दिशेने येत आहे हे दोघांनाही कळत नव्हतं…..पण जे समोरून येत होतं ते बघून दोघांचाही घास हातातच राहिला…..चारी बाजूनी चार धिप्पाड कुत्री अगदी गुरगुरतच त्या अंधारातून बाहेर पडली….त्या चोघांचे एकत्रित गुरगरणे अनुप आणि प्रकाशच्या मनात धडकी भरवत होतं….नेमकी कुत्रीच होती की अजून काही?? असली भयानक कुत्री त्यांनी आयुष्यात कधीही पहिली नव्हती… काळे केसाळ चमकदार अंग पिवळेशार चमकदार डोळे आणि लांब सुळे दात….एखादी हिंस्र श्वापदे…..अनुप आणि प्रकाश प्रचंड घाबरले त्यांनी आपल्या बिर्याणीतले चिकनचे तुकडे त्यांच्या दिशेने भिरकावले… पण ते चारीही धिप्पाड कुत्रे त्या मासांच्या तुकड्याकडे न बघता गुरगुरत दबक्या पावलांनी दोघांच्या दिशेने येत होते….आता चारी दिशांनी त्या कुत्र्यांचे भुंकणे सुरू झाले आवाज अगदी घाम फोडणारा होता ती कुत्री ठराविक अंतरावरून भुंकत होती जराही जवळ येत नव्हती अंधारातून कुणाच्या तरी आदेशाचे पालन करीत आपला आवेश आवरत कधी पुढे मागे सरकत अविरत कर्कश आवाजात भुंकत होती…..दोघांच्याही अंगावर काटा आला….जास्त वेळ थांबणे म्हणजे त्या भयाण हिंस्र कुत्र्यांची शिकार होण्यासारखं होत….त्यामुळे दोघांनीही सगळं समान आहे असं टाकून बाईकला किक मारली….प्रकाशने गाडीचा स्पीड वाढवला…..गार वाऱ्यातही दोघांचे अंग घामाने भिजले होते आणि ती काळी हिंस्र कुत्री त्यांच्या गाडीच्या मागे लागली होती……रस्त्यावर पूर्ण अंधार होता बाईकच्या हेडलाईटच्या उजेडात समोरचा रस्ता आणि मागून त्या कुत्र्यांचे चमकदार डोळे आणि पांढरेफेक आसुसलेले दात स्पष्ट दिसत होते…..अनुपची नजर आजूबाजूला गेली….मगाशी जिथून आलो तो हा रस्ता नव्हताच….हा रस्ता वेगळा होता झाडेही पूर्ण वेगळी होती…डेरेदार झाडांची जागा आता उंच अश्या नारळीच्या झाडांची घेतली होती…..सगळं वातावरण क्षणार्धात बदललं होतं….टेकडीचा उतार गायब होऊन त्याची जागा एका सपाट न संपणाऱ्या रस्ताने घेतली होती….आजूबाजूला काही फलक दिसत होते पण त्यावरची भाषा मराठी नव्हतीच…कुठल्यातरी वेगळ्याच भाषेतले ते फलक अनपेक्षित होते….सगळं काही अनपेक्षित भयानक घडत होतं..गाडी अविरत धावत होती….रस्ता संपत नव्हता आणि ती कुत्री काही केल्या पाठलाग सोडत नव्हती…गाडी थांबवून त्या कुत्र्यांना हुसकावून लावण्याचा विचार त्यांच्या मनाला शिवलाच नाही…कारण थांबला की खेळच संपणार होता…अचानक मागून अनुप जोरात ओरडला, “पक्या…पक्या….ते बघ तिथं…तिथं घर दिसाय लागलं…चल लवकर तिथं!”

क्रमश: भाग १

लेखक : शशांक सुर्वे

संग्रहिका : अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मोबदला… – भाग -3 ☆ श्री दीपक तांबोळी ☆

?जीवनरंग ?

☆ मोबदला… – भाग -3 ☆ श्री दीपक तांबोळी

(मागील भागात आपण पाहीले – आपल्या तुलनेत आपल्या स्वार्थी आणि लोभी भावांना अण्णांनी भरभरुन दिलं याचं त्याला दुःख होऊ लागायचं.आठवडाभर त्याला या विचारांमुळे काम सुचत नव्हतं. कितीही झटकून टाकायचा प्रयत्न केला तरीही ते विचार पुन्हापुन्हा त्याच्या मनाला चिकटून बसायचे.अर्थात आता करण्यासारखं त्याच्या हातात तरी काय होतं? आता इथून पुढे )

आठ दहा दिवसांनी रविवारी तो नाश्ता करत असतांना रणदिवे वकीलांचा फोन आला,

” शिरीष घरी आहेस का?यायचं होतं जरा बोलायला.”

“हो या ना.का हो काका काही विशेष काम?” त्याने विचारलं.

“अरे काही नाही जरा बोलायचं होतं.मी आलो की सांगतो सर्व.”

“या या मी घरीच आहे.”

शिरीषच्या पोटात खड्डा पडला.निर्मल आणि गुणवंतने वकीलाला भेटून काही गडबड तर केली नसेल ना?दोघांच्या बायका चांगल्याच कारस्थानी आहेत हे त्याला माहित होतं.

अर्ध्या तासातच वकीलसाहेब घरी आले.शिरीषने नेहाला त्यांच्यासाठी चहा ठेवायला सांगितला.

” काका निर्मल आणि गुणवंत दादालाही बोलावून घेऊ का?” त्याने वकीलांना विचारलं. ” नाही नाही हे फक्त तुझ्यासाठी आहे.”

त्यांनी बँगेतून फाईल काढून ती उघडली. शिरीषचं ह्रदय धडधडू लागलं.

” तुला माहितच असेल की अण्णांना शेअर मार्केटचा फार नाद होता आणि ते नेहमी शेअर्सची उलाढाल करीत असत.”

“हो पण एकदा शेअर बाजार कोसळला तेव्हा त्यांचं खूप नुकसान झालं होतं. आईला हे कळल्यावर तिचं अण्णांशी जोरदार भांडण झालं होतं .त्या दिवसापासून अण्णांनी शेअर बाजाराचा नाद सोडला होता. “

वकीलसाहेब हसले. ते म्हणाले, “नाही .त्यांनी ट्रेडिंग बंद केलं पण इन्व्हेस्टमेंट म्हणून शेअर्स विकत घेणं बंद केलं नाही. “

“अच्छा! पण या सगळ्याचा आता काय संबंध?”

” तुला कल्पना नसेल पण अण्णांनी जवळपास पंचवीस लाखाचे शेअर्स घेतले होते. त्यांचा शेअरब्रोकर माझा पुतण्याच असल्याने मला ही गोष्ट कळली.तीन महिन्यांपूर्वी अण्णांना भेटायला मी तुमच्या घरी आलो होतो.तू घरी नव्हतास आणि नेहा तुझ्या मुलीचा अभ्यास घेत होती.मी अण्णांना या शेअर्सबद्दल सांगितलं आणि त्यांची विल्हेवाट कशी करायची ते विचारलं तेव्हा अण्णांनी ते शेअर्स एका व्यक्तीच्या नावावर ट्रान्सफर करायला सांगितले. मात्र त्यांनी अट घातली की ही गोष्ट तुझ्या दोन्ही भावांना कळवू नये आणि त्यांच्या मृत्युनंतर एकवीस दिवसांनी त्याबद्दल फक्त तुला सांगावं. तुझे भाऊ स्वार्थी आणि हलकट आहेत. त्यांना या शेअर्सबद्दल कळलं तर ते त्यात हिस्सा तर मागतीलच. नाही दिला तर कोर्टकचेऱ्याही करायला कमी करणार नाहीत अशी त्यांना भिती वाटत होती.”

“पण ती व्यक्ती आहे तरी कोण जिच्या नावावर शेअर्स ट्रान्सफर करायला गितलेत?” नेहाने चहाचा कप त्यांच्यासमोर ठेवत विचारलं.

वकीलसाहेब क्षणभर शांत बसले.मग आनंदाने ओरडून म्हणाले, ” अण्णांनी ते सगळे शेअर्स शिरीषच्या नावे केले आहेत.”

” काय?माझ्या नावावर?” आश्चर्याचा धक्का बसून शिरीषने विचारलं.

“हो! पण शिरीष आनंदाची बातमी पुढेच आहे. या सर्व शेअर्सची आजची मार्केट व्हँल्यू आम्ही काढली.ती जवळजवळ अडिच कोटीच्या आसपास आहे. “

“ओ माय गाँड!अडिच कोटी!!”शिरीषचे डोळे विस्फारले. नेहाही आ वासून वकीलांकडे पहात राहिली.

“आता हे तू ठरव की हे शेअर्स विकून टाकायचे की राहू द्यायचे” वकील शिरीषला म्हणाले आणि त्यांनी फाईल मधून शेअर सर्टिफिकेट काढून त्याच्या हातात दिले.

” ते ठिक आहे काका पण या शेअर्समुळे काही लिगल प्राँब्लेम्स तर येणार नाहीत ना? अण्णांच्या या निर्णयाला माझ्या भावांनी कोर्टात आव्हान दिलं तर?” शिरीषने काळजीने विचारलं.

“तशी शक्यता फार कमी आहे.कारण तीन महिन्यापूर्वीच आणि शेवटचं म्रुत्युपत्र बनवण्याच्या आतच ते शेअर्स कायदेशीररीत्या तुझ्या नावावर ट्रान्सफर करण्यात आले होते आणि तू जरा आता हुशार हो. तुझ्या भावांनी अण्णांना कशी वागणूक दिली ते बघ.त्या मानाने अण्णांनी त्यांना भरपूर काही दिलं आहे. तरीसुध्दा तू आँफिसला आला की मी तुला समजावून सांगेन. आता जस्ट सेलेब्रेट. अरे हो एक गोष्ट सांगायचीच राहिली.”

“कोणती?”

” अण्णांनी तुला विनंती केली आहे की त्यांच्या वाढदिवसाला आणि श्राध्दाला वृध्दाश्रमातील सगळ्या ज्येष्ठ मंडळींना तू जेवण द्यावंस.”

” जरुर देईन काका. “

वकीलसाहेब निघाले. त्यांना निरोप देऊन घरात येता येता शिरीषची नजर अण्णांच्या फोटोवर गेली आणि त्याला गलबलून आलं. भरल्या डोळ्यांनी आणि गहिवरल्या स्वरात तो नेहाला म्हणाला, 

” तू म्हणत होतीस ना आपल्या सेवेचा अण्णांनी काय मोबदला दिला म्हणून? बघ त्यांनी असा मोबदला दिलाय की आयुष्यभर आपल्याला कसलीच कमतरता भासणार नाही”

नेहाच्याही डोळ्यात त्यावेळी अश्रूंनी गर्दी केली होती.पण त्याचसोबत अण्णांनी आपल्याला अपेक्षेपेक्षा जास्त मोबदला दिलाय याचंही समाधान तिच्या चेहऱ्यावर विलसत होतं.

– समाप्त – 

© श्री दीपक तांबोळी

9503011250

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मोबदला… – भाग -1 ☆ श्री दीपक तांबोळी ☆

?जीवनरंग ?

☆ मोबदला… – भाग -1 ☆ श्री दीपक तांबोळी

शिरीष जसा घरात शिरला तशी त्याची बायको नेहा त्याला म्हणाली,

” अहो जरा अण्णांना बघता का? खूप अस्वस्थ वाटताहेत. जेवलेही नाहीत”

“हो.फ्रेश झालो की लगेच बघतो”

बाथरुममध्ये फ्रेश झाल्यावर तो पटकन अण्णांच्या रुममध्ये गेला.नेहमीप्रमाणे अण्णा पलंगावर झोपले होते.जवळ जाऊन शिरीषने त्यांच्याकडे पाहिलं.खरंच अस्वस्थ वाटत होते.त्यांचे खोल गेलेले डोळे,निस्तेज नजर,चेहऱ्यावरची उद्विग्नता पाहून त्याला गलबलून आलं.लक्षण काही ठिक दिसत नव्हतं.

” काय झालं अण्णा?काय होतंय?”स्वतःलाच धीर देत त्यानं विचारलं.अण्णांनी काही न बोलता उजवा हात आकाशाकडे नेला.त्यांच्या तोंडातून अस्पष्ट शब्द बाहेर पडले पण ते शिरीषला समजले नाहीत. त्यांच्या तोंडाजवळ कान नेत तो म्हणाला, “काय म्हणालात कळलं नाही. परत एकदा सांगा.

“”म….ला…..दे……वा……क…..डे……जा….य…चं….य” परत हात वर करुन ते म्हणाले.   शिरीषच्या डोळ्यात पाणी आलं.तरी स्वतःला सावरत तो म्हणाला,

“मी कोण तुम्हांला देवाकडे नेणारा? त्याला न्यायचं तेव्हा नेईल आणि अजून तुम्हांला नातवंडांची लग्न बघायची आहेत.इतक्या लवकर कुठे निघालात देवाकडे?”

अण्णांनी जोरजोरात नकारार्थी मान हलवली.परत एकदा हात वर दाखवून ते अस्पष्ट बडबडले,

“बरं बरं तुम्ही पडा.काही दुखतंय का तुमचं?”

त्यांनी नकारार्थी मान हलवली.मग हाताने त्याला जवळ बोलावलं.तो जवळ येताच त्यांनी त्याच्या डोक्यावरुन,पाठीवरुन प्रेमाने हात फिरवला.का कुणास ठाऊक त्यांचा जाण्याचा क्षण जवळ  आलाय असं शिरीषला जाणवून गेलं.त्या विचाराने त्याला गहिवरुन आलं.पण असं रडून चालणार नव्हतं.स्वतःचे डोळे पुसत त्याने त्यांना विचारलं,

“डाँक्टरांना बोलावू?”

त्यांनी नकारार्थी मान हलवल्यावर तो म्हणाला.

“बरं बरं.मी रोहनचं जेवण झालं की त्याला पाठवतो तुमच्याजवळ बसायला”

अण्णांनी होकारार्थी मान हलवली.शिरीष बाहेर आला.

“काय झालं?काय होतंय त्यांना?”नेहाने विचारलं.

” काही होत नाहिये. त्यांना आता जायचे वेध लागलेत.त्यांचंही बरोबर आहे.किती दिवस अशा स्थितीत रहाणार आहेत.कधी ना कधी माणसाचा धीर खचणारच”  शिरीष गहिवरुन म्हणाला.

शिरीष योग्यच म्हणतोय हे नेहाच्या लक्षात आलं.गेली सात वर्ष अण्णा पँरँलिसीस होऊन पडले होते.त्यांचं सगळं काही बेडवरच करावं लागायचं.नाही म्हणायला कधीतरी उठून ते चालायचा प्रयत्न करायचे.पण ते तेवढंच.खरं तर शिरीषची आई वारली तेव्हाच ते खचले होते.पण तीन मुलांच्या सहाय्याने आपलं जीवन निर्धोकपणे चालू  राहील असं त्यांना वाटलं.सुरवातीचं एक वर्ष बरं गेलं.एकत्र कुटुंबात शिरीषचे दोन्ही मोठे भाऊ निर्मल आणि गुणवंत तसंच त्यांच्या दोघांच्या बायका नोकरीला जात.नेहा एकटी घरी असायची.अण्णांची मेडिकल एजन्सी शिरीषने स्वबळावर भरभराटीला आणली होती.नवऱ्याचं चांगलं उत्पन्न असल्यामुळे नेहाला उच्चशिक्षित असूनही नोकरी करायची गरज नव्हती.पण ती घरी असते म्हणून तिने मोलकरणीसारखी घरातली सर्व कामं केली पाहिजेत,घरी आलो की चहापाणी, स्वयंपाक करुन वाढणं,नंतर सगळं आवरणं केलं पाहिजे असा शिरीषच्या दोन्ही वहिन्यांचा समज झाला होता.घरात कामावरुन कटकटी वाढल्या आणि बायकांची भांडणं होऊ लागली तसं निर्मल आणि गुणवंत यांनी शिरिषला वेगळं निघायला सांगितलं. नेहाही जावांच्या अरेरावीला आणि या रोजच्या कटकटींना कंटाळली होती.शिरीषची इच्छा नसतांना त्याला वेगळं व्हावं लागलं.अण्णा मात्र आपल्या दोन्ही मोठ्या मुलांसोबतच राहिले.शेवटी ते त्यांनी बांधलेलं घर होतं.त्याचे ते मालक होते.पण नंतरच्या सहाच महिन्यात दोन्ही मुलं आणि सुनांनी या मालकाचं जीवन आश्रितासारखं करुन टाकलं.नेहा आणि शिरीष असतांना त्यांची खुप काळजी घेतली जायची.वेळच्या वेळी जेवण,औषधं असायची.त्यामुळे अण्णा ठणठणीत होते.नेहा आणि शिरीष वेगळं निघाल्यापासून त्यांची फार आबाळ होऊ लागली.जेवणाचं तर सोडाच संपलेली औषधंसुध्दा कुणी त्यांना लवकर आणून द्यायचं नाही.त्याचा परीणाम व्हायचा तोच झाला. त्यांना पँरँलिसीसचा अटँक आला.आता तर निर्मल,गुणवंतची चांगलीच पंचाईत झाली.अण्णांकडे लक्ष देण्यासाठी कुणाला तरी नोकरी सोडण्याची गरज होती पण कुणीही तडजोड करायला तयार होईना.सुट्या तरी घेऊन किती घेणार?माणूस ठेवला तर त्याचे पैसे कोण देणार?शिवाय त्यानं घरात चोऱ्यामाऱ्या केल्या तर?घरात परत एकदा भांडणं होऊ लागली.अण्णा त्यांच्याच घरात सर्वांना नकोसे झाले.शेवटी दोन्ही भाऊ आणि त्यांच्या बायकांनी संगनमत केलं आणि अण्णांना एक दिवस शिरीषकडे आणून टाकलं.शिरीषची संमती घ्यायचीही त्यांना गरज वाटली नाही. अर्थात शिरीष आणि नेहाला अगोदरच निर्मल आणि गुणवंत यांनी अण्णांच्या चालवलेल्या हेळसांडीबद्दल वाईट वाटत होतं.दोघांनीही आनंदाने अण्णांची जबाबदारी स्विकारली.     एजन्सीत जाण्याअगोदर शिरीष त्यांची अंघोळ वगैरे सगळं आटोपून जायचा. नेहा त्यांना जेवू घालणं,त्यांना औषधं देणं,त्याच्या हातापायाला मालीश करणं वगैरे आनंदाने करायची. शिरीषचं आपल्या वडिलांवर अतिशय प्रेम होतं.त्यांच्यामुळेच आपल्याला चांगले दिवस आलेत यावर त्याची श्रद्धा होती.त्यामुळे तो अण्णांची काळजीने सेवा करायचा.अतिशय कामात असतांना देखील दिवसातून एकदा तरी तो अण्णांची चौकशी करायचा.त्यांच्याशी जमेल तसं बोलायचा.रात्री जेवण झालं की अण्णांना उचलून तो गाडीत बसवायचा आणि पुर्ण शहरातून फिरवून आणायचा.तो आणि नेहा करत असलेल्या सेवेमुळे अण्णांच्या तब्येतीत बरीच सुधारणा झाली होती.पण दुर्दैवाने एक दिवस अण्णांचा जीवलग मित्र वारल्याची बातमी अण्णांनी पेपरमध्ये वाचली.मित्राच्या निधनाचा जबरदस्त धक्का अण्णांना बसला.त्या दिवसापासून त्यांची जगण्याची इच्छा कमीकमी होत गेली.त्याबरोबरच त्यांची तब्येतही खालावू लागली.आता तर ते पलंगावरच दिवस काढत होते.

झोपण्याची वेळ आली तसा शिरीष आपला मुलगा रोहनला म्हणाला,

” आज तू राहू दे, मी झोपतो अण्णांसोबत. रात्री काही झालं तर अण्णा तुला सांगणार नाहीत” मग अण्णांच्या खोलीत जाऊन तो त्यांना म्हणाला,

” अण्णा आज मी झोपतोय तुमच्यासोबत. रात्री काही वाटलं तर उठवा बरं का मला.’ अण्णांनी मान डोलावली.

रात्री दोन तीन वेळा उठून शिरीषने अण्णांकडे बघितलं.पण ते शांत झोपले होते.त्यांचा श्वासही नियमित सुरु होता.

सकाळी तो उठला तेव्हा अण्णा जागे होते.आज रविवार असल्याने मुलं आणि नेहा अद्याप झोपलेली होती.शिरीषने अण्णांकडे बघितलं.ते फ्रेश वाटत होते.त्याला हायसं वाटलं.       

” कसं वाटतंय?”त्याने विचारलं.त्यांनी हाताने ठिक असल्याचं सांगितलं. मग पाणी हवं असल्याचा इशारा केला.शिरीषने पाणी आणून त्यांना पाजलं.

“अण्णा मी येतो अंघोळ करुन.मग तुमचा चहा झाला की तुम्हाला अंघोळ घालेन.” अण्णांनी मान डोलावली. शिरीष रुमच्या बाहेर आला तर नेहा उठलेली दिसली.शिरीषने अण्णांना बरं वाटतंय असं सांगितल्यावर तिलाही हायसं वाटलं.

शिरीष अंघोळ करुन बाथरुमच्या बाहेर आला तशी नेहा त्याला म्हणाली, “अहो अण्णा परत झोपले वाटतं. मघाशी मी आवाज दिला तर त्यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही” शिरीषला शंका आली.एकदा उठल्यावर अण्णा कधी परत झोपायचे नाहीत.त्यांच्या रुममध्ये जाऊन त्याने त्यांना हाक मारली. त्यांनी डोळे उघडले नाहीत. शिरीषने त्यांच्या नाकाजवळ हात धरला. काहीही जाणवलं नाही.त्याने घाबरुन नेहाकडे पाहिलं आणि म्हणाला, “डाँक्टरांना पटकन फोन लाव.अण्णा….”पुढे त्याला काही बोलता येईना.

डाँक्टर आले.अण्णा गेल्याचं निदान करुन गेले.शिरीष त्यांच्या पार्थिवाला कवटाळून हमसून हमसून रडू लागला.घरात शेजारपाजाऱ्यांची गर्दी जमली तसा शिरीष भानावर आला.सगळ्यांना कळवणं भाग होतं.त्याने बाहेर येऊन मोठ्या भावाला-निर्मलला फोन लावला.” ‘दादा अण्णा गेले” तो रडत रडत म्हणाला.

“काय?असे कसे गेले?मागच्या आठवड्यात तर चांगले होते. तू त्यांची व्यवस्थित काळजी घेत होतास ना?”

“सकाळपर्यंत चांगले होते.अचानक काय झालं माहीत नाही.बरं तू लवकर ये मग सांगेन तुला सविस्तर.”

“अरे बापरे,शिरीष,आम्हांला आज ट्रिपला जायचं होतं रे.आता निघणारच होतो.आता कँन्सल करावं लागणार.”

तेवढ्यात शोभा वहिनीने फोन घेतला.

” शिरीष भाऊजी,अण्णांना बरं वाटत नव्हतं तर आम्हांला रात्रीच कळवायचं ना! आता आम्ही ट्रीपला जाण्यासाठी गाडी बोलावून ठेवलीये.तिचे पैसे आता कोण देणार?”

शिरीषला संताप आला पण तो शांत राहिला.वाद घालायची ही वेळ नव्हती.त्याने फोन बंद करुन मधला भाऊ-गुणवंतला फोन लावला.अण्णांची बातमी सांगितली.

“ओ माय गाँड! शिरीष मी आता जालन्यात आहे.मला यायला उशीर लागेल.पण तू रात्रीच मला का कळवलं नाहीस?”

“अरे,असं होईल याची मला पुसटशीही कल्पना नव्हती.तू लवकर ये मग मी तुला सगळं सांगतो.”

” मी निघतोय आता इथून.अण्णांना स्मशानात न्यायची तयारी झाली की मला कळव.”      शिरीषला गुणवंतच्या निर्लज्ज आणि कोडगेपणाची चीड आली.वडिल वारल्याचं कोणतंच दुःख त्याच्या बोलण्यातून जाणवत नव्हतं.पण आता ते बोलून दाखवण्यात अर्थ नव्हता. आपल्या भावांना तो चांगलाच ओळखत होता.

निर्मल लवकर आला खरा पण त्याने कोणत्याही कामाला हात लावला नाही.पाठीमागे हात बांधून तो शिरीषची होणारी धावपळ बघत राहिला. अण्णांना न्यायची वेळ झाली तरी गुणवंतचा पत्ता नव्हता.शेवटी शिरीषने त्याला फोन लावला तेव्हा तो म्हणाला, “अरे मी दोन तासापुर्वीच आलो. तुझ्याच फोनची वाट बघत होतो. झाली तयारी?बरं आलोच” जसा वडिलांच्या अंत्यविधीला येऊन तो शिरीषवर उपकारच करणार होता.

सगळेजण त्याची वाट पहात बसले.अर्ध्या तासाने एखाद्या परक्या माणसासारखा तो उगवला.

क्रमश: १

© श्री दीपक तांबोळी

9503011250

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मोबदला… – भाग -2 ☆ श्री दीपक तांबोळी ☆

?जीवनरंग ?

☆ मोबदला… – भाग -2 ☆ श्री दीपक तांबोळी

(मागील भागात आपण पाहीलं – सगळेजण त्याची वाट पहात बसले.अर्ध्या तासाने एखाद्या परक्या माणसासारखा तो उगवला. आता इथून पुढे)                    

तेराव्या पर्यंतचे सगळे विधी आटोपले.आतापर्यंत शिरीषच्या दोन्ही भावांनी एक रुपयासुध्दा खर्च केला नव्हता.तेराव्याच्या जेवणाचा मोठा खर्चही शिरीषनेच सहन केला.

चौदाव्या दिवशी सगळे बसले असतांना निर्मलने न रहावून विषय काढला,

“अरे शिरीष अण्णांनी काही म्रुत्युपत्र करुन ठेवलं होतं का? नाही म्हणजे आता अण्णा गेले. त्यांच्या संपत्तीचे वाटे, हिस्से नको का व्हायला?”

” दादा मला तरी म्रुत्युपत्राबद्दल काही माहीत नाही आणि असंही तुम्ही रहाता तो बंगला, हा फ्लँट आणि आपली एजन्सी याव्यतिरिक्त दुसरं काही असेल असं मला वाटत नाही.”

“असं कसं म्हणता भाऊजी? त्यांची काही फिक्स्ड डिपाँझिट्स असतील किंवा एखादा प्लाँट वगैरे असेल तर आपल्याला माहीत नको?” शोभा वहिनी मध्येच बोलली.

“हो शिरीष” गुणवंत म्हणाला “मरण्यापुर्वी त्यांनी तुला काही सांगितलं असेल तर आम्हाला स्पष्ट सांग किंवा त्यांचा एखादा वकील असेल तर त्याला फोन करुन बोलावून घे.”

वडिलांच्या मरणाचं दुःख नसणाऱ्यांना त्यांच्या प्राँपर्टीची मात्र खुप काळजी होती हे स्पष्ट दिसत होतं.

” रणदिवे नावाचे वकील अण्णांचे मित्र होते ते बऱ्याचदा घरी यायचे.अण्णांच्या अंत्यविधीलाही ते हजर होते. त्यांना विचारायला हवं.“ शिरीष आठवून म्हणाला.

” अरे मग वाट कसली बघतोस? लाव त्यांना फोन ताबडतोब” दोघंही भाऊ एकदमच ओरडले.

शिरीषने डायरीतून वकीलाचा फोन नंबर शोधून त्यांना फोन लावला. त्यांच्याशी बोलून फोन ठेवत तो म्हणाला, ” ते आपल्याकडेच यायला निघालेत. त्यांच्याकडे मृत्युपत्र आहे.”

दोन्ही भाऊ आणि त्याच्या बायकांचे चेहरे प्रफुल्लित झाले.

वकीलसाहेब आले. सगळी मंडळी उत्सुकतेने त्यांच्याभोवती जमा झाली.

” मृत्युपत्रात खास असं काही सांगण्यासारखं नाही. ” वकीलसाहेबांनी म्रुत्युपत्र काढून सांगायला सुरुवात केली ” निर्मल आणि गुणवंत ज्या बंगल्यात रहातात तो बंगला त्यांच्याच नावे करण्यात आलाय. पुढेमागे निर्मल आणि गुणवंत यांचं पटलं नाही तर तो बंगला विकून आलेली रक्कम दोघांनी वाटून घ्यायची आहे. सध्या या बंगल्याची किंमत एक कोटी रुपये आहे. शिरीष ज्या फ्लँटमध्ये रहातोय म्हणजे हाच फ्लँट अण्णांनी शिरीषच्याच नावे केलाय. सध्याच्या घडीला या फ्लँटची किंमत पस्तीस लाख आहे. तसंच मेडिकल एजन्सी ज्या जागेत आहे तिची बाजारभावाने किंमत पंचवीस लाख आहे. तीसुध्दा शिरीषच्या नांवे करण्यात आली आहे.”

” याचा अर्थ शिरीषला अण्णांनी दहा लाख जास्त दिले आहेत” निर्मल अस्वस्थ होऊन रागाने म्हणाला.

वकीलसाहेबांनी त्याच्याकडे काही क्षण रागाने पाहिलं.मग म्हणाले “अण्णांच्या तीस लाखाच्या मुदतठेवी तुम्ही दोघां भावांनी अण्णा आजारी असतांना मोडल्या. शिरीषला त्याबद्दल का सांगितलं नाही आणि त्या तीस लाखाचं तुम्ही काय केलं? त्याचं स्पष्टीकरण द्या अगोदर.”

निर्मल चपापला. त्याने घाबरुन गुणवंतकडे पाहिलं. गुणवंतने त्याला नजरेने शांत बसायची खुण केली.

“तुमच्या कौटुंबिक भानगडीत मला पडायचं नाहिये. नाहीतर तुमची एक एक प्रकरणं उकरुन काढायला मला वेळ लागणार नाही. मी तुमच्या वडिलांचा वकीलच नाही तर चांगला मित्र होतो हे ध्यानात ठेवा आणि अण्णा तुमच्याकडे असतांना तुम्ही त्यांचे काय हाल केले हेही मला चांगलंच माहित आहे. तेव्हा बोलतांना सांभाळून बोला. ”

वकीलसाहेब तीव्र स्वरात म्हणाले तशा दोन्ही भावांनी माना खाली घातल्या.

“बस एवढंच होतं म्रुत्युपत्र” वकीलसाहेबांनी ते शिरीषच्या हातात दिलं.

“पण वकीलसाहेब अजून काही प्राँपर्टी नव्हती का अण्णांकडे?” गुणवंतने विचारलं.

” ते मला कसं माहित असणार? तुम्ही शोधून काढा आणि मला सांगा, पण लक्षात ठेवा ते सापडलं तरी तुम्हांला सहजासहजी काहीही मिळणार नाही. कदाचित कोर्टाची पायरीही चढावी लागेल” गुणवंतच्या बोलण्यातला लोभीपणा ओळखून वकीलसाहेब रागाने म्हणाले.  वकीलसाहेब गेले. त्यांच्यापाठोपाठ निराश होऊन निर्मल, गुणवंत त्यांच्या बायका-मुलांसह निघून गेले. ते गेल्यावर शिरीष नेहाला म्हणाला, “चला बरं झालं. सगळं व्यवस्थित पार पडलं. वाटे, हिश्शांच्या भानगडीही मिटल्या.” ” ते ठिक आहे हो.पण तुम्हांला नाही वाटत अण्णांनी आपल्याला त्यामानाने खूपच कमी दिलंय?”

” त्यामानाने म्हणजे?”

” म्हणजे आपण जे काही त्यांच्यासाठी केलं त्याचा खुपच कमी मोबदला त्यांनी आपल्याला दिलय.”

शिरीष हसला. “नेहा,अण्णांनी मला जन्म दिला, मला वाढवलं,शिकवलं,मोठं केलं, मेडीकल एजन्सी माझ्या नावावर केली. ह्याचा तर त्यांनी कधी मला मोबदला मागितला नाही.”

“अहो मला तसं म्हणायचं नाहिये. तुमच्या दोन भावांच्या मानाने,असं मला म्हणायचं होतं.विचार करा.तुमच्या भावांनी अण्णांसाठी काय केलं?त्यांच्या तब्ब्येतीची कधी काळजी घेतली नाही. त्यामुळेच अण्णांना पँरँलिसीस झाला. पँरँलिसीस झाल्यावरही अण्णांना साधं सहा महिने त्यांनी घरात राहू दिलं नाही. लगेच आपल्या घरात आणून टाकलं. विचार करा या सात वर्षांत आपण अण्णांसाठी काय नाही केलं? या सात वर्षात कधीही आपण टुरला नाही गेलो। अण्णांना एकटं राहू द्यायचं नाही म्हणून आपण कधी जोडीने लग्नासमारंभाला गेलो नाही. अण्णांना त्रास होऊ नये म्हणून कधी नातेवाईकांना आपल्या घरी बोलावलं नाही. या सात वर्षात अण्णा चार वेळा हाँस्पिटलमध्ये अँडमीट होते. तुमचे भाऊ परक्या माणसांसारखे भेटायला यायचे. कधी त्यांनी विचारलं की ‘शिरीष किती बिल झालं? आम्ही काही मदत करु का तुला?’ अण्णांच्या आजारपणात किती रात्री तुम्ही आणि मी जागून काढल्या आहेत. मान्य आहे की ते आपलं कर्तव्य होतं. पण मग तुमच्या भावांची, वहिनींचीही काही कर्तव्यं नव्हती का? अण्णांनी केवळ तुम्हांलाच नाही तर तुमच्या भावांनाही जन्म दिलाय, त्यांनाही  शिकवलं, मोठं केलंय मग त्यांचीही काही जबाबदारी नाही का? तुम्ही पाहिलंच असेल की अण्णा वारले पण अंत्यविधीपासून तेराव्यापर्यंतच सगळा खर्च आपल्यालाच करावा लागला. इस्टेटीत वाटा हवा पण बापाला मरेपर्यंत आणि मेल्यानंतरही लागलेल्या खर्चात वाटा नको ही कोणती पध्दत? निर्मल आणि गुणवंतने अण्णांचे हाल केले तरीही अण्णांनी इस्टेटीत त्यांना समान वाटा दिला.त्याचं मला वाईट वाटत नाही.पण आपण केलेल्या त्यागाचा,सेवेचा,खर्चाचा अण्णांनी आपल्याला काय मोबदला दिला सांगा.”

शिरीष निशब्द होऊन ऐकत होता. नेहाचा एक एक शब्द त्याचं काळीज चिरुन जात होता. काय चुकीचं बोलत होती ती? आजवर तिने जे पाहिलं, अनुभवलं तेच तिच्या तोंडून बाहेर पडत होतं.शिरीषला ते पटत होतं त्यामुळे काय उत्तर द्यावं ते त्याला कळेना.काहीतरी बोलावं म्हणून तो म्हणाला, “तुझं म्हणणं बरोबर आहे गं,पण आपल्याला एक्स्ट्रा देण्यासारखं अण्णांकडे काही असायला हवं ना? जे होतं ते त्यांनी वाटून दिलं. कदाचित निर्मलदादा,गुणवंत दादा आणि त्यांच्या बायका खूप कमी पगारावर नोकऱ्या करतात हाही मुद्दा अण्णांनी लक्षात घेतला असावा. “

नेहा क्षणभर काहीच बोलली नाही. मग उसासा टाकून म्हणाली, “तसं असू शकतं. पण मन काही मानत नाही हेच खरं. “

रात्री बराच वेळपर्यंत शिरीषला झोप लागली नाही. नेहाचे शब्द आठवून तो वारंवार बैचेन होत होता.

दुसऱ्या दिवशी तो आँफिसला गेला खरा पण जेव्हा जेव्हा कामातून फुरसत व्हायची तेव्हां तेव्हा नेहाचं बोलणं त्याला आठवायचं आणि तो मग भुतकाळात जायचा. त्या सात वर्षात अण्णांच्या आजारपणामुळे आलेल्या अडचणी, काही बरेवाईट प्रसंग त्याला आठवू लागायचे आणि मग तो अस्वस्थ व्हायचा. अण्णांनी खरंच आपल्यावर अन्याय केला ही भावना त्याच्यात दृढ होऊ लागायची. आपल्या तुलनेत आपल्या स्वार्थी आणि लोभी भावांना अण्णांनी भरभरुन दिलं याचं त्याला दुःख होऊ लागायचं.आठवडाभर त्याला या विचारांमुळे काम सुचत नव्हतं. कितीही झटकून टाकायचा प्रयत्न केला तरीही ते विचार पुन्हापुन्हा त्याच्या मनाला चिकटून बसायचे. अर्थात आता करण्यासारखं त्याच्या हातात तरी काय होतं?

क्रमश: २

© श्री दीपक तांबोळी

9503011250

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ परिवर्तन — भाग 2 ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

?जीवनरंग ?

☆ परिवर्तन — भाग 2 ☆ डॉ. ज्योती गोडबोले

(अगदी साधेसुधे लोक दिसले ते. पण बोलायला चांगल्या होत्या तिच्या आई. म्हणाल्या, “ मी खरे सांगू का?”) इथून पुढे —-

“जरी आम्ही इतके वर्ष इकडे राहिलो, तरी आम्ही बेताच्या परिस्थितीतच रहातोय. यांना सतत भारतात, पैसे पाठवावे लागतात. आमच्या मुलाने लग्न झाल्याबरोबर वेगळे घर घेतले, आणि तो आमच्याशी अजिबात सम्पर्क ठेवत नाहीये. यांची एक अगदी साधी नोकरी आहे, आणि मीही बेबी-सिटिंगचे काम करते. इकडे राहणीमान खूपच महाग आहे हो. आमच्याकडून आपण खूप मानपान, आणि इतरही कसली अपेक्षा ठेवू नका प्लीज… म्हणजे आम्ही हे करूच शकणार नाही. एक दिवसाचा लग्नाचा खर्च करूआम्ही. . एक छोटे गळ्यातले तेवढे तिच्यासाठी करून ठेवले आहे मी. माझी मुलगी चांगली शिकलेली आहे, पगारही चांगला आहे तिला. आणि हे लग्न त्यांचे त्यांनीच ठरवलंय तर आपण एकमेकांच्या समजुतीने घेऊया. आम्ही तुमच्या तुलनेत खूप कमीच आहोत हे अगदीच मान्य आहे आम्हाला. “ 

गीता घरी आली. समीरला आईची नाराजी समजली. तो म्हणाला, “ कोणत्या काळात रहातेस आई? मोना आणि तिचे आईवडील खरोखर सज्जन आहेत. आणि आपल्याला काही कमी आहे का? मोना मिळवती मुलगी आहे. माझी आणि तिची वर्षभराची ओळख आहे. मला खात्री आहे, ती आणि मी नक्की सुखी राहू. मी सायलीशीही बोललोय परवा. तिलाही लग्नाला येता येणार नाहीये. पण तू मात्र ते करतील ते गोड मानून घे. मग भारतात गेलीस, की घे हवे ते. मी देईन की तुम्हाला भरपूर पैसे. ”. . . . समीर आपल्या आईला ओळखून होता.

ठरलेल्या दिवशी हिंदू टेम्पलमध्ये, अगदी साध्या पद्धतीने लग्न झाले. ना कोणते दिखाऊ समारंभ, ना मानपान. . . . . दोन तासात मंडळी घरी आलीसुद्धा. मोनाच्या आईवडिलांनी छान जेवण ठेवले होते. लग्नाला मोजकीच माणसे, ऑफिसचे मित्र, असे लोक होते. गीताने सगळे दागिने, भरजरी साडी मोनाला दिली. मोनाने हौसेने नेसली, आणि सगळे दागिनेही घातले. छान दिसत होती दोघांची जोडी.

राहून राहून गीताला मात्र वाटत होते, की काय हे लग्न. . . यापेक्षा गेट टुगेदर सुद्धा जास्त भपकेदार होते आपले. . . पण बोलणार कोण? आता आपल्या मैत्रिणी असले फोटो बघून काय म्हणतील? केवढे कौतुक सांगितले होते मी. . . . परदेशातले लग्न खूप सुंदर असते. . . यव आणि त्यव. . . . . आणि इथे २ तासात घरी. . . ना काही समारंभ, ना काही. . . एक साडी ठेवली माझ्या हातात ओटी भरून. . . आणि यांना साधासा कुर्ता आणि टी शर्ट. . . जाऊ द्या झालं.

दोन्ही मुलांनी आपल्या आपल्या लग्नात, मला न विचारता सगळे करून टाकले. वर दोन्हीही असले बेताचे व्याही मिळाले. . . अतिशय नाराज होती गीता. गीताने विचारले, “ कुठे जाणार नाही का हनिमूनला? “

मोना म्हणाली, “ ममा, जाऊ ना !पण तुम्ही आहात ना, तोपर्यंत नाही. ” 

मोना दुसऱ्या दिवशी पट्कन उठून कामाला लागली. गीताच्या लक्षात आले, ही मुलगी सराईतासारखी वावरतेय स्वयंपाकघरात, म्हणजे ही इथे येऊन, राहून गेली असणार.

मोना म्हणाली, “ ममा तुम्ही खरच आराम करा. मला समीरचे सगळे किचन ओळखीचे आहे. मी कितीतरी वेळा येऊन करूनही गेलेय त्याच्यासाठी स्वयंपाक. ”. . . . मोनाने खरोखरच तासाभरात उत्तम स्वयंपाक केला. म्हणाली, “ ममा, पोळ्या मात्र बाहेरून आणल्यात हं. त्या करायला येत नाहीत मला, आणि वेळही नसतो. ” 

गीता, रवी, समीर, सगळे अगदी मनापासून जेवले. रवीने मोनाची मनापासून स्तुती केली.

गीता म्हणाली, “ वावा !मोना, मस्त केलंस ग सगळं. आवडलं मला सगळं हं. आता समीरची काळजीच नाही मला. ” 

मोना रात्री गीता आणि रवीच्या रूम मध्ये आली. म्हणाली, “ ममा, मला माहीत आहे, तुम्ही नाराज आहात. आम्ही तुमच्या बरोबरीचे नाही, माझे मॉम डॅड गरीब आहेत. पण ते खरोखर चांगले आहेत. मला, माझ्या भावाला, किती कष्ट घेऊन शिकवलंय त्यांनी. पण भाऊ निघूनच गेला अमेरिकेला. आज मी एवढा पगार, माझ्या आईवडिलांनी दिलेल्या शिक्षणानेच तर मिळवतेय. तुम्हाला आणखी एक सांगणार आहे,. . त्या दोघांना काहीही मदत लागली तर मी करणार आहे. त्यांची सम्पूर्ण जबाबदारी मी घेईन. अर्थात ते दोघे इतके मानी आहेत, की कधीही माझ्यावर अवलंबून राहणारच नाहीत. समीरला होकार देताना, मी हे आधीच सांगितलं आहे. त्याची काहीही हरकत नाही, आणि तुमचीही नसावी. ममा, नाती पारदर्शक असावीत ना. मी त्यांच्याशी, आणि समीरचे आईवडील म्हणून तुमच्याशीही, कायमच आदरानेच वागेन. मला तुम्ही समजून घ्या. लग्नात दिलेले दागिने छान आहेत, पण असले इतके भारी दागिने मी कधी वापरू? ते लहान मंगळसूत्र मात्र ठेवून घेते. . आणि फक्त २ साड्या मला पुरे आहेत. बाकी प्लीज घेऊन जा. मला खरोखर कसलाच सोस नाही हो. फक्त तुमचे प्रेम आणि आशीर्वाद द्या. “ 

गीता थक्क झाली. तिला आपल्या मैत्रिणींच्या सुना मुली आठवल्या. ’ मला लग्नात हेच हवे हं आई, आणि सासूलाही एखादा भारी दागिना तुम्ही द्यायला हवात, ’ हे बजावणारी सोनलची मुलगी आठवली.

मुलीला हिऱ्याचे मंगळसूत्र घेतले नाही, म्हणून लग्नात तमाशा करणारी प्रीतीची विहीण आठवली.

कोमलने लग्नात नुसतेच गुलाबजाम काय केले, आणखी काही स्वीट नाही का, म्हणून नाके मुरडणारी लता आठवली.

या सगळ्या मैत्रिणी, त्यांच्या मुलीसुना, तिला आठवल्याच एकदम. इतके मोठे खर्च करूनसुद्धा, न टिकलेली लग्नंही गीताला आठवली. . . एकाच वर्षात पल्लवीची सूनबाई निघून गेली होती. . . वर्षाची अत्यंत लाडावलेली मुलगी, सासरी सासूसासरे आणि नवऱ्याशीही पटत नाही म्हणून परत आली होती.

— हा सगळा चित्रपट गीताच्या डोळ्यासमोरून सरकला.

परदेशी जन्मलेली, पण संस्कार भारतीय असलेल्या या मुलीबद्दल एकदम माया दाटून आली गीताच्या पोटात. किती खरी वाटते ही मुलगी !

गीता उठली, आणि तिने मोनाला पोटाशी धरले. म्हणाली, “ मोना, मला आता माझ्या समीरची मुळीच काळजी नाही ग. फार छान निवड आहे त्याची. माझाच चष्मा बदलायला झाला होता. . . काय आहे ना समीर मोना, मी सामान्य आयुष्य कधी जगलेच नाही. सतत समाजातल्या श्रीमंत आणि उथळ मैत्रिणींसाठीच जगत आले. पार्ट्या, भिशी, सतत फार्महाऊसवर जाऊन मजा करणे, हेच आमचे आयुष्य !! पण खरं सांगू, अलीकडे उबग यायला लागला होता ग या दिखाऊ जगण्याचा. आता मात्र मी त्या ग्रुपमध्ये फिरकणार सुद्धा नाही. मोना, समीर, छान आहेत तुमचे विचार. सायलीसुद्धा मला हेच सांगत होती जीव तोडून. पण तेव्हा नाही पटलं. “

गीताच्या डोळ्यात पाणी आलं. रवीने तिला जवळ घेतले, आणि म्हणाला, “ मीही हेच सांगून शेवटी नाद सोडून दिला. पण गीता, मुळात तू खूप सरळ आणि भाबडी आहेस. चल, आता कबूल कर, आपल्या घरात, बाहेरची दोन्ही मुले लाख मोलाची आली आहेत … जावई आणि सून. ” 

गीताने मान हलवली, आणि म्हणाली, “ हो रवी. कधीतरी येते अशी डोळे उघडणारी वेळ. आता भारतात गेले की सगळे ग्रुप सोडून देणार. मी msw आहे, हेही मी कित्येक वर्षे विसरूनच गेलेय रे रवी ! माझी मैत्रीण माया, मला केव्हाची अंध शाळेत काम करायला बोलावतेय. सारखी म्हणत असते, ‘ गीता, तुझा टॅलेंट वाया घालवत आहेस तू या दांभिक उथळ बायकांच्यात. एकदा येऊन बघ समाजातली दुःखे. . . विसरून गेली आहेस का ग. . आपण msw आहोत ते?’. . . तिकडे नक्की जाईन म्हणते. ” 

अचानक झालेले हे परिवर्तन बघून, रवि आणि समीरने एकमेकांना टाळ्या दिल्या, आणि डोळे पुसत मोनाने गीताला मिठी मारली.

अतिशय समाधानाने, भरल्या मनाने, आणि डोळ्यांनी, गीता आणि रवी भारतात परतले.

 – समाप्त –

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares