मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मोहोर फाल्गुनीचा ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

सुश्री प्रणिता प्रशांत खंडकर

? जीवनरंग ❤️

☆ मोहोर फाल्गुनीचा ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

संपत न्याहरी करून उठतच होता आणि त्याचा मोबाईल वाजला. सुनंदाचा त्याच्या मोठी बहीणीचा फोन होता मिरजेहून. ‘संपत, अरं उद्या होळीला येतंय मी घरला, सांगलीला. तुझ्या दाजींचं जरा तिकडं काम हाय आणि लेकरांना पण दोन दिवस सुट्टी! म्हणलं चला मामाकडे जाऊ होळीला.’

‘ बरं बरं या की! आमी वाट बघतो मंग!’ असं म्हणून संपतनं फोन ठेवला. एवढ्या सकाळी कोणाचा फोन म्हणून आईनं विचारलंच.’ ताई आणि दाजी येतात इथं उद्या होळीला, लेकरांसंगट! दाजींचं काय काम हाय म्हणं इकडं ‘, सांगताना नाराजीची एक आठी

संपतच्या कपाळावर नकळत उमटलीच.’ पोरांना बी सुट्ट्या हायेत दोन दिस. ‘

‘ अग, शालू, सारजा, सुनंदा येतेय ग उद्या होळीला! हौसाबाईंनी आपल्या दोन्ही सुनांना आवाज दिला.

‘येऊ द्या की ‘, असं सासूला म्हणताना,

‘पुरणा-वरणाचा बेत कराय लागणार ‘, दोघी जावांची नेत्रपल्लवी झाली. ‘

खरंतर सुनंदा एकुलती एक लाडकी बहिण! दोन्ही वहिन्यादेखील, माहेरवाशिणीचं कोण कौतुक करायच्या. पण आता परिस्थितीच अशी झाली होती.

हौसाबाईंना तीन मुलं! थोरला शंकर, मग सुनंदा आणि धाकटा संपत. सुनंदाचं सासर मिरजेला. तिच्या घरी भरपूर शेतीवाडी होती. हळदीचा व्यापार जोरात होता. त्यांच्या मसाला कांडायच्या दोन गिरण्यापण होत्या. जावई सुभाष, एकुलता एक मुलगा, त्यामुळे पैशाला तोटा नव्हता. मंगेश आणि मीना, बारा आणि दहा वर्षांची दोन लेकरं आणि सासू-सासरे अशी मोजकी माणसं घरात!

हौसाबाईंच्या नवऱ्याचं बबनरावांचं चार वर्षांपूर्वी  निधन झालं. कोणाच्यातरी पिसाळलेल्या खोंडानं धडक दिली. त्याचं शिंग छातीत खुपसलं. घाव वर्मी लागला. औषधोपचारात खूप पैसा खर्च झाला. मुंबईच्या मोठ्या इस्पितळात नेऊन शस्त्रक्रिया केली. पण कश्याचा उपयोगच झाला नाही.

शंकर आणि संपत घरची शेती बघायचे. सलग दोन वर्षे अवकाळी पाऊस आणि गारपीट… कापसाच्या शेतीची पार वाट लागली. हातातोंडाशी गाठ पडणं मुश्किल झालं. हे कमीच होतं म्हणून की काय कोरोनाच्या पहिल्या लाटेत शंकर सापडला. होता नव्हता तो सर्व पैसा पणाला लागला. शंकर काही वाचला नाही.

संपतच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिला.

नवरा आणि मुलगा, दोघांच्या पाठोपाठ झालेल्या मृत्यूने हौसाबाई अगदी खचून गेली होती. जमेल तसं थोडंफार काम रेटत होती.

कोरोनामुळे सगळीच दाणादाण उडाली होती. मजूर नाही, त्यात हवामानही लहरी. उत्पन्न जवळजवळ शून्य आणि घरात सात माणसं! हौसाबाई, शंकरची बायको सारजा, पंधरा वर्षांची मुलगी सुनिता, संपत,त्याची बायको शालू आणि मुलगा श्रीपती! २ एकर जमीन पतपेढीकडे गहाण पडली, कर्जाचे हप्ते भरणंही कठीण झालेलं.

दहावी पास झालेली सुनिता पैश्याअभावी पुढचं शिक्षण घेऊ शकत नव्हती. आईसोबत परसदारी भाजीपाला पिकवून ती घरखर्चाला थोडा हातभार लावत होती. श्रीपती सातवीत शिकत होता. शालू घरकाम सांभाळून, आजकाल साडीच्या फाॅलबिडिंगचं काम करून चार पैसे जोडत होती.

या परिस्थितीत सणवार कसे साजरे करणार? म्हणून सुनंदाताईंच्या येण्याचा म्हणावा तसा आनंद कोणालाच झाला नव्हता. शिवाय माहेरवाशीण  म्हटलं की तिला साडीचोळी, जावयाला कपडा, मुलांना काही-बाही घेणं आलंच.सुनंदाताईचा स्वभावही थोडा चिकित्सक! त्यामुळे त्यांना आवडेल अशी साडीही भारीतलीच घ्यायला हवी. सणासुदीला पाहुणे म्हणजे जेवायला चार पदार्थ करायला हवेत. हा जास्तीचा  खर्च आत्ता या कुटुंबाला झेपणारा नव्हताच. तरी बरं जावई बुवांनी कोणत्या महाराजांची दिक्षा घेतल्यामुळे,  शाकाहारी होते.

हौसाबाईंनाही या परिस्थितीची जाणीव होतीच. मग शालू आणि सारजाबरोबर बातचीत करून, शालूच्या माहेरहून भाऊबीजेला आलेला संपतसाठीचा सदरा जावयाला द्यायचं ठरलं. बाजारातल्या चोरडिया मारवाड्याकडून साडी उधारीवर आणायचं ठरलं. शालू त्यांच्याकडूनच फाॅलबिडिंगचं काम आणायची. पुरणपोळीच्या सामानासाठी किराणा उधारीवर आणावा लागणार होता. कसंतरी जुगाड करायचं झालं!

दुसर्‍या दिवशी संध्याकाळी शालू-सारजा पुरणपोळ्या करत असतानाच सुनंदाताई आणि कुटुंबीय अवतरले. होळीची पूजा, नैवेद्य होऊन जेवणंही

हसत-खेळत पार पडली. रात्री उशिरापर्यंत गप्पा-गोष्टी रंगल्या.पोरं एकमेकांत गुरफटली. सकाळी नाश्ता करून जावई कामासाठी रवाना झाले.

मग दोन्ही सुना आपल्या रोजच्या कामात गुंतल्या. माय-लेकीचं हितगुज सुरू झालं.  दिराच्या उपचारासाठी शालूने आपलं स्त्रीधन सुद्धा गहाण ठेवलं होतं, घेलाशेठ सावकाराकडे. सारजाने आपले मोजके दोन -चार डाग होते, ते पण विकले होते. आडवळणाने हौसाबाईनी लेकीला परिस्थिती सांगण्याचा प्रयत्न केला. पण तिच्या कानात  ते शिरलं की नाही कोण जाणे!

दुपारची जेवणं झाली. जावई आले की निघायची गडबड होईल म्हणून शालूनं लगेच नणंदेची ओटी भरली.साडी दिली. मुलांना मिठाईचा पुडा दिला. इतक्यात जावई पण आले. तशी सुनंदाने आपली साडी हातात घेऊन निरखली आणि ती आईला म्हणाली, ‘ मला काही हा रंग आवडला नाही बाई!चल  शालू, आपण ही साडी बदलून आणूया का? ह्यांच्याबरोबर गाडीतून जाऊन येऊ पटकन!’ बिचारी शालू काय बोलणार?  संपतही गेला बरोबर.

चोरडियांच्या दुकान खूप मोठं होतं. सुनंदाने ती साडी परत केली. आणि त्याऐवजी आणखी चार साड्या खरेदी केल्या. शालू आणि संपतचं धाबं दणाणलं होतं. पण सुनंदाताईंचं तिकडे लक्षच नव्हतं. त्यांनी आपल्या यजमानांना खुणेनंच विचारलं, ‘का हो ह्या घेऊ ना? .’ तुला पाहिजे तेवढ्या  घे की! तुम्ही बघा निवांत साड्या , आम्ही दोघं जरा एका ठिकाणी जाऊन येतो. ‘असं म्हणून संपतला घेऊन सुभाषराव बाहेर पडले सुद्धा! मग ते येईपर्यंत सुनंदाताईंनी मुलांच्या विभागातही थोडी खरेदी केली. चोरडिया ओळखीचे असल्याने,’ हिशोबाचं नंतर पाहू’, असं शालूला  म्हणाले. मग या दोघी दुकानाबाहेर आल्या आणि ते दोघंही गाडी घेऊन पोचलेच. मंडळी घरी परतली. हौसाबाई आणि सारजा माजघरात लवंडल्या होत्या, त्या उठून बसल्या. मुलंही माजघरात आली. शालू चहा ठेवायला आत जाणार तोच सुनंदाने तिला थांबवलं आणि जवळ बसवलं. पहिले आईला आणि दोन्ही वहिन्यांना एक एक साडी तिनं हातात ठेवली. मुलांना कपडे दिले. तेवढ्यात सुभाषराव आपली बॅग घेऊन तिथे आले. त्यातून एक मिठाईच्या खोक्यासारखा दिसणारा खोका काढून, त्यांनी शालूच्या हातात दिला. ‘अग, उघडून बघ तरी’, असं त्यांनी म्हटलं तसं तिनं संपतकडे तो उघडायला दिला. त्या खोक्यामध्ये शालूचे, घेलाशेठकडे गहाण ठेवलेले दागिने होते. सगळेजण चकित होऊन बघू लागले. सुभाषराव म्हणाले, ‘ सासूबाई , मुली आता कायद्यानं बापाच्या संपत्तीत वाटा मागतात. भावाकडून हक्काने माहेरपण वसूल करतात. मंग माहेरच्या मोठ्या खर्चाची , कर्जाची जिम्मेवारी पण त्यांनी घ्यायाला नको का?’ ‘मला यांनी हे समजावलं आणि  पटलंबी! माझे भाऊ-वहिनी चिंतेत, हलाखीत जगत असताना, मला  माझी ही वाटणीदेखील घेयाला पाहिजेच की!आईकडून  समदं समजल्यावर मी फोन केला होता यांना! म्हणून घरी  येतानाच हे घेलाशेठचे पैशे देऊन आले आणि चोरडियांचं बिल ऑन लाईन दिलंय यांनी!

 हौसाबाईनी लेकीला मिठी मारली. त्यांचे डोळे आनंदाश्रूंनी भरले होते. संपत, सुभाषरावांच्या पायाशी वाकला होता. शालू आणि सारजाचे डोळेही तुडुंब भरले होते.

मंगेशने बाबांचा मोबाईल पळवून, होळीचे हे मनोहारी रंग पटापट फोटोत कैद केले होते आणि तो आता आपल्या भावंडांसोबत सेल्फी घेण्यात दंग होता.

(ही कथा आवडल्यास लेखिकेच्या नावासह आणि कोणताही बदल न करता सामाईक करू शकता.)

© सुश्री प्रणिता खंडकर

दिनांक.. ०६/०३/२०२३.

संपर्क – सध्या वास्तव्य… डोंबिवली, जि. ठाणे.

वाॅटसप संपर्क.. 98334 79845 ईमेल [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ चोरीचा मामला…… लेखक – सु. ल. खुटवड ☆ प्रस्तुती – श्री मेघःशाम सोनवणे ☆

श्री मेघःशाम सोनवणे

?जीवनरंग ?

☆ चोरीचा मामला…… (सु. ल. खुटवड) ☆ प्रस्तुती – श्री मेघःशाम सोनवणे ☆ 

मध्यरात्री दोनच्या सुमारास घराची बेल वाजली…

तायडे, आम्ही आलोय गं! बाहेरून आवाज आल्याने संगीता जागी झाली. तायडे असा आवाज आल्याने आपल्या माहेरचंच कोणीतरी आलं असावं याची खात्री संगीताला पटली. तिने आयव्होलमधून पाहिले. तिघेजण पावसात भिजल्याने कुडकुडत उभे होते. तिने पटकन दार उघडून तिघांनाही आत घेतले.

एवढ्या रात्री कोठं गेला होतात? तिने विचारले. आमच्या कामधंद्याची हीच वेळ असते त्यातील टोपीवाला बोलला. मी तुम्हाला ओळखलं नाही पण तुम्ही माहेरच्या नावाने हाक मारली म्हणून दरवाजा उघडला संगीताने खुलासा केला. तुमचा धाकटा भाऊ मन्या, जलसंपदा खात्यात नोकरीला असणारा. आमचा लई जिगरी दोस्त आहे. तसेच तुमचा थोरला भाऊ सुधीर. जातेगावला शिक्षक असणारा, आम्ही लहानपणी एकत्रित खेळलोय. बागडलोय.. शिवाय तुमची धाकटी बहीण सुषमा… एका दाढीवाल्याने एवढी माहिती दिल्यावर संगीताचा त्यांच्यावर विश्वास बसला.

ती त्यांना चहा करायला किचनमध्ये गेली. चहाचे कप त्यांच्या हातात दिल्यावर ती म्हणाली, तुम्ही माझ्या माहेरची सगळी माहिती बरोबर सांगितली पण गावात तुम्हाला मी कधी पाहिलं नाही! संगीताने आश्चयनि म्हटले. आम्ही एका जागेवर कशाला राहतोय? आमचा येरवड्याला इंग्रजाच्या काळातला मोठा वाडा आहे. आम्ही वर्षातील सात-आठ महिने तिथं काढतो. तिथं आमचं गणगोत बी लई मोठं हाये, तेथून बाहेर पडल्यावर राज्यभर बिझनेससाठी फिरतीवर असतो. टोपीवाल्याने माहिती दिली.

माझे पती नेमके आज सकाळीच परगावी गेले आहेत संगीताने सांगितले. आम्हाला माहिती आहे. कंपनीच्या कामासाठी ते कोल्हापूरला स्विफ्ट या मोटारीने गेले आहेत. त्याच्या गाडीचा नंबरही आम्हाला पाठ आहे. परवा रात्री नऊ वाजेपर्यंत ते घरी येणार आहेत टोपीवाल्याने माहिती पुरवली.

माझ्या सासूबाईंनी तुम्हाला ओळखलं असतं. त्यांचं पण माहेर आमचंच गाव आहे. पण नेमक्या त्याही आज घरी नाहीत संगीताने माहिती पुरवली. शिरूरला तुमच्या नणंदेकडे त्या गेल्या आहेत. नणंदेचं दुसरं बाळंतपण गेल्याच आठवड्यात झालंय. त्यांची चिमुकली परी फार गोंडस आहे  दाढीवाल्याने म्हटले.

तुम्हाला एवढी अपडेट माहिती कशी काय? संगीताने आश्चर्यानं विचारले. अशा माहितीच्या जोरावरच तर आमच्या बिझनेसची बिल्डिंग उभी आहे… दाढीवाल्याने हसत उत्तर दिले. असं म्हणून त्याने सुषमाच्या गळ्याला चाकू लावला.

घरात जेवढी रोकड आणि दागिने असतील, तेवढे मुकाट्याने आणून दे! दाढीवाल्याने असं म्हटल्यावर तिला घाम फुटला. तिने पैसे आणि दागिने त्यांच्या हातात दिले. तुझ्या वाढदिवसाला नवऱ्याने दिलेला हिऱ्याचा हार कोठंय? तो दे! टोपीवाल्याने दरडावून म्हटले. त्यानंतर तिने तोही दिला. तुझ्या धाकट्या भावाने रक्षाबंधनाला दिलेला ‘आयफोन- १३’ दे! दाढीवाल्याने म्हटले. संगीताने तो फोनही देऊन टाकला.

या दागिन्यांमध्ये राणीहार दिसत नाही. वटपौर्णिमेच्या दिवशी तो घातला होता. तो कोठाय? तिसऱ्याने आवाज चढवत विचारले. संगीताने कपाटातून काढून तोही दिला. जेजुरीला जाताना पंचवीस हजारांची पैठणी नेसली होतीस. ती पण दे! टोपीवाल्याने दरडावले. ती दिल्यानंतर संगीताला रडू यायला लागलं. सासूबाई आणि नणंदेला अंधारात ठेवून, एवढ्या वर्षात आपण दागदागिने व मौल्यवान वस्तू करून ठेवल्या होत्या. एका क्षणात त्याचं होत्याचं नव्हतं झालं होतं.

माझ्याकडचा सगळा पैसा अडका, सोनं नाणं तुम्ही लुटलंत पण माझ्या घरातील एवढी सविस्तर माहिती तुम्ही कशी मिळवलीत?  संगीताने विचारलं. तायडे, आम्ही सगळे तुझे फेसबुक फ्रेंड आहोत… तिघांनीही एका सुरात उत्तर दिले.

👆🏻

जरुर बोध घ्यावा.

लेखक – सु. ल. खुटवड

संग्राहक – मेघःशाम सोनवणे

मो 9325927222

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ कथा एका पत्राची – भाग २ ☆ श्रीमती मीनाक्षी सरदेसाई ☆

श्रीमती मीनाक्षी सरदेसाई 

? इंद्रधनुष्य ? 

☆ कथा एका पत्राची – भाग २ ☆ श्रीमती मीनाक्षी सरदेसाई ☆

(मागील भागात आपण पहिले –    बापरे. मी दादाकडे धावले. “दादा, रनर गेला?”
  “अगो , केव्हाच. अजून राहिला जायचा? तुला कशाला हवा तो? खारेपाटणातून काय आणायला सांगायचेय काय? उद्या सांग हो बाबी.” आता इथून पुढे)

“जेवायला ये आता. भुकेजली असशील”. आत्तेला माझी दया आलेली. मी तिला म्हटलं ,    ” थांब .” नि पुन्हा आल्या वाटेने पत्र शोधायला धावतच निघाले. हातातलं पत्र वाटेत पडलं असलं तर…. रस्त्याच्या दोन्ही बाजूला बघत बघत मी  चालले होते. माकडांचा खेळ चालला होता तिथेपर्यंत आले. गोलगोल फिरून बघितलं.  वाऱ्याने उडालं असेल का? म्हणून आणखी लांब फिरले. देसाई भाऊंकडून जिन्नस नेणाऱ्या दोघा-तिघानी विचारलं “काय  गो हुडकतंस? पैसे पडले काय साळंत येता जाता? नाय गावूचे.कोणाक सापडले असतील तर तो उचलल्या बिगर कसो -हाव्हतलो? जा घराक. उनातानाची फिरो नको”. त्यांना काय माहिती? पैशापेक्षाही महत्वाची वस्तू हरवली होती.

मी घरी आले. आईने दहीभात कालवून ठेवला होता. तो गपागपा जेवला. पंगतीला हजर नसलं की आई नेहमी असा भात कालवून ठेवायची.

दुपारची शाळा भरण्याची वेळ जवळ आली होती. मी अगदी रडायच्या बेतात होते. पत्राचं काय होणार काही सुचत नव्हतं.

नानू – माझा सातवीतला भाऊ, तो म्हणाला, “काय झालं”?

-त्याला सगळी हकिगत सांगितली.”आता मला गुरुजी मारतील कायरे खूप? खूप भीती वाटतेय.” मी म्हटलं.

“पत्र हरवलेले सांगूच नको. टाकले म्हणून सांग. त्यांना कुठे कळणारे?”

नानूने सांगितलं . त्याच्या  सांगण्यामुळे मी अगदी फुशारूनच गेले. भीती पळून गेली. मुलगे मुलींपेक्षा शूर असतात. खात्रीच झाली माझी.

अडीच वाजता दुपारची शाळा भरली. गुरुजीनी विचारलंच.  .”टाकलंस का पत्र?”माझ्या गळ्यात आवंढा आला. तरी मी जोरात म्हटलं ” हो.” .आपण खोटं बोलत आहोत हे मनाला सारखं डाचत  राहिलं होतं. वरवर मी चेहरा हसरा ठेवला होता. जुगाबाईच्या आणि तिच्या  बहिणींच्या डोळ्यांकडे मी मधून मधून बघत होते. मनातल्या मनात त्यांना सांगत होते,     ” देव्यानो, मला क्षमा करा. मी खोटं बोलले आहे.” 

मराठीचा नवा शिवाजी महारांजाचा धडा गुरुजीनी शिकवला, मोठ्याने कविता म्हणून झाल्या .पाढे म्हटले.  पाच गणितं सोडवून झाली. उद्याचा  अभ्यास  गुरुजीनी फळ्यावर लिहून दिला. मी तो पाटीवर अक्षरं कोरून लिहून घेतला. आता शेवटचा खेळाचा तास.

पहिली ते सातवीची सर्व मुलं मुली  मैदानावर जमली. कोणाचा खोखो, कोणाची लंगडी, कोणाचा ‘आईचं पत्र हरवलं, हा खेळ चालू होता. तो बघून  मला गुरुजींच्या पत्राची आठवण होत होती. सगळी मुलं  आनंदात होती. सगळे गुरुजी खुर्च्यांवर बसून गप्पा मारीत  होते. मला मात्र  केव्हा एकदा शाळा सुटण्याचा गजर होतो असं  वाटत होतं. मी जाताना रस्त्यावर पत्र सापडतं का हे बघणार होते. सोमेश्वर, भरडाई, ह्या देवांचीही मी प्रार्थना करीत होते.  पत्र सापडू दे म्हणून.

–आता घरी जायचं होतं. पत्राच्या भानगडीतून  सुटले होते.  नि एक  टोपी घातलेला , पट्ट्याची चड्डी, नि जुनापाना सदरा घातलेला गडी-माणूस मैदानात अवतरला. तो देसाई भाऊंच्या दुकानातला जिन्नस देणारा नोकर होता. आम्हाला वाटलं, देवळात जायला आला असेल. पण तो तर  गुरुजींच्या खुर्च्यांपर्यंत पोचला. आमची लंगडी संपली होती. आम्ही बघत राहिलो. नोकराने खिशातून एक पत्र काढलं नि रामगुरुजींच्या हातात दिलं. गुरुजी म्हणाले, “हे काय? पत्र कोणाचं?”  

-“त्याचा काय झाला, माकडांचो खेळ इलोलो, दोन गिरायंका बरोबर मी बी ग्येलय बगुक. थयसर ह्या पत्र गावला. माका वाचुक येता पर मी आपला भाऊंकडे दिला. त्येनी बारीक डोळं करून वाचलानी, म्हणाले, अरे ह्ये आजच्या तारकेचा पत्र हा. रामक्रिष्न रामदास गोरे. ही सई हा ह्यावर.. अरे , हये राममास्तरांचा पत्र. ह्ये टाकलानी कसा नाय? त्यां न्हेऊन दे बगुया. असा कसा पडला?कोणी पाडलान?”

गड्याचं सगळं बोलणं मला ऐकू येत होतं , कारण मी जवळच्याच रांगेत उभी होते. माझे पाय थरथरायला लागले होते. मला सीतामाई सारखं धरणीने दुभंगून पोटात घ्यावं असं वाटत  होतं. राम गुरुजींचा चेहरा हळूहळू रागाने लालभडक झाला होता. तो माझ्याकडे वळला होता. त्यांनी पत्र हातात घेतलं. बघून खिशात ठेवलं. गड्याच्या पाठीवर थोपटलं नि ते त्याला म्हणाले, ” शाब्बास.  देसाई भाऊना म्हणावे, मी तुमचा आभारी आहे. माझे मालवणात पाठवायचे पत्. महत्वाचे आहे. आज स्वत: मीच टाकीन. जा तू.”.

“रानडेबाई , इकडे या.”  मी रडायला लागलेच होते . नाक पुसत मी पुढे गेले. गुरुजींच्या हातात छडी होती. मी हात पुढे केले. त्यांनी सटासट चारपाच सणसणीत छड्या हातांवर मारल्या. पायांवर, पाठीवर, डोक्यावरसुद्धा मारल्या. कुठलेच गुरुजी मुलींना  हाताने मारीत नसत. पण छड्या काय कमी लागतात? मला इतकं लागलं, इतकं लागलं की श्वास गुदमरल्यासारखं वाटलं. मैदानावरची सगळी मुलं गुरुजींच्या रुद्रावताराकडे घाबरून बघत होती. माझ्या भावानी खाली माना खाली घातल्या होत्या. आता गुरुजी मारायचे थांबले नि त्यांनी छद्मीपणाने  बोलणं सुरू केलं.

“-मुलांनो,  ही आपल्या शाळेतली  एक हुशार मुलगी. पण दीड शहाणी. हिचं नांव सुमन रानडे. पण  हिचं मन सुमन नाही. दुर्मन आहे.  हिला मी पत्र टाकायचं काम सांगितलं. हिने पत्र पेटीत  नाही टाकलं. रस्त्यावर टाकलं. आणि पत्र टाकलं म्हणून खोटं सांगितलं. दोन अपराध. म्हणून उद्या  प्रार्थनेच्या वेळी हिचा सत्कार करूया. चला आता घरी. हिच्यासाठी  एकदा टाळ्या.” मोठ्या मुलांनी टाळ्या वाजवल्या नाहीत. पहिली दुसरीच्या मुलांनी  न कळल्यामुळे वाजवल्या.

मी हमसाहमशी रडत घरी निघाले. माझ्या नली आणि माली या मैत्रिणी माझं दप्तर घेऊन माझ्याबरोबर आल्या. त्या माझ्या पाठीवरून हात फिरवित होत्या. धीर देत होत्या. त्यांनी मला पायंडीतच सोडलं. खोटं बोलणाऱ्या मुलीबरोबर यायची त्यांना लाज वाटत होती वाटतं.

भावांनी सगळी बातमी आई, आजी, आत्ते  यांच्यापर्यंत  पोचवली होती. आईने मला जवळ घेतलं. “अगो, ताप भरलाय तुला. ” असं म्हणून  तिने मला माजघरात माच्यावर निजवलं नि  घोंगडी पांघरली.  –“बाबा, दादा घरी आले की त्यांना काय सांगायचे नाय हो. नायतर ते आणि पोरीला राघे भरतील. “आजीने मुलांना बजावलं. “रमे, तू आता सैपाकाकडे येऊ नको. तिला काढा करत्ये तो घाल नि निजव “आत्ये आईला म्हणाली. आमच्याकडे सगळ्या एकमेकीशी प्रेमाने वागत.

आई माझी समजूत घालायला लागली. “एवढे मनाला लावून घेऊ नको हो. अगो, सगळी मोठी माणसे लहानपणी खोटे बोललेलीच असतात. क्रिष्ण नाय का म्हणला, ” मै नही माखन खायो.”

माझी आई शिकली नव्हती पण तिने वाचन  खूप केलेलं होतं तिने आणखी सांगितलं. “अगो, तुला एक गंम्मत सागत्ये, महात्मा गांधी–ते सुद्धा लहानपणी खोटे बोललेले. त्यांच्या आत्मकथनात त्यानी स्वतःच लिहिले आहे. महाभारतातला धर्म  एव्हढा धर्मनिष्ठ पण द्रोणाचार्यांना काय म्हणाला “अश्वत्थामा गेला खरा, पण माणूस किं हत्ती  गेला हे मला माहीत नाही. नरो वा कुंजरोवा”. म्हणजे खरे नाहीच ना बोलला? काही वेळा खोटे बोलावे लागते. तसे तू बोललीस.”  माझ्या अंगावरून प्रेमाने हात  फिरवित आई मला धीर देत होती. तेव्हढ्यात  आजी पण माझ्या मदतीला धावली. “अगो, तुझा हा रामगुरुजी, नांव असेल राम, पण सत्यवचनी असेल कशावरून?  लहानपणी का होईना खोटे बोलला असेलच. त्याच्या आईलाच विचारत्ये मी.”  आत्तेने पण तिला दुजोरा दिला. ” मला  ठाऊक आहे. डब्यातला लाडू खाल्लान नि आईला म्हणाला, मी लाडू नाय खाल्ला.” मला कळत होतं ,मला बरं वाटावं म्हणून आत्ते खोटंच बोलत होती.  तापाच्या ग्लानीत नि सगळ्यांच्या प्रेमामुळे माझे डोळे गपागप मिटत होते.

 – समाप्त – 

© श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

संपर्क – ‘अनुबंध’, कृष्णा हॉस्पिटल जवळ, सांगली, 416416.        

मो. – 9561582372, 8806955070.

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ कथा एका पत्राची – भाग १ ☆ श्रीमती मीनाक्षी सरदेसाई ☆

श्रीमती मीनाक्षी सरदेसाई 

? इंद्रधनुष्य ? 

☆ कथा एका पत्राची – भाग १ ☆ श्रीमती मीनाक्षी सरदेसाई ☆

—–पूर्ण प्राथमिक मराठी शाळा , कोर्ले, तालुका- देवगड, जिल्हा -रत्नागिरी. ही माझी लाडकी शाळा.तिथे माझं पहिली ते सातवी (म्हणजे त्यावेळच्या भाषेत- “फायनल”.) पर्यंत शिक्षण झालं. विंदा करंदीकरनी पण इथेच श्री गणेशा गिरवला बरंका. आईशप्पथ. आमच्या त्या गावाची त्यावेळची लोकसंख्या फक्त पाच हजार. आणि सातवीपर्यंत शाळा! गावातल्या काही हुशार मंडळींचं ते कर्तृत्व. खाडीकिनारीच्या  सगळ्या म्हणजे अगदी पोंभुर्ल्यापासूनची मुलं आमच्या शाळेत यायची. आमची काही नात्यातली मुलं शाळेसाठी आमच्याकडे रहायलाच  आलेली. त्यामुळे आम्ही भावंडं नि ती मुलं मिळून चांगली दहाची क्रिकेटची  टीम होती. माझा भावंडात खालून दुसरा नंबर. पुस्तकं माझ्यापर्यंत  गलितगात्र , म्हातारी होऊनच यायची.

—–शाळा सात वर्गांची, पण इमारतीत चारच खोल्या .मग काय,  चौथी सोमेश्वराच्या देवळात, पाचवी जुगाबाईच्या देवळात नि  सहावी भरडाईच्या देवळात.  प्रत्येक वर्गाला सर्व विषयांना एकच गुरुजी. हायस्कूल सारखे तासा तासाला  गुरुजी बदलत नसत. म्हणजे त्यांना फेऱ्या घालाव्या लागत नव्हत्या.  हे त्यातल्या त्यात  चांगलं.  मुलांना पांच गणितं घालायची .नि होई पर्यंत एखादी डुलकी काढायची संधी त्याना मिळे. असं सगळं बेजवार चाललेलं.

—–मी पाचवीत होते. त्यामुळे वर्ग जुगाबाईच्या देवळांत. देऊळ अगदी ऐसपैस. एका बाजूला पाच काळ्या कुळकुळीत  देव्या उभ्या. मधली जरा मोठी, ऊंच. नि डाव्या, उजव्या बाजूला तिच्या दोनदोन मैत्रिणी किंवा बहिणी. सगळ्यांचे कमरेवर हात. डोक्यावर मुकुट, गळ्यात भरपूर दागिने. सगळं दगडात कोरलेलं. डोळे मोठमोठे. धाक, भीती  दाखवणारे. वर्गात आल्याबरोबर आधी पाची देव्यांना नमस्कार करायचा.

एका खिडकी खाली खुर्ची आणि टेबल. टेबलावर मोजून चार  खडू नि डस्टर. वेताची छडी सुध्दा. खडूपेक्षा छडीचा वापर गुरुजी जास्त करायचे.

—–पुजारी पूजा करायला यायचा तेव्हढी पंधरावीस मिनिटं आमचा अभ्यास बंद असायचा. एरव्ही आमचे पाढे नि कविता इतक्या जोरजोरात घुमायच्या की दगडाच्या देव्यानी सुद्धा म्हटल्या असत्या.

—–आमच्या गुरुजींचं नांव होतं ‘रामकृष्ण रामदास गोरे.’  नांवात दोन राम असूनही गुरुजी शांत स्वभावाचे नव्हते. अगदी जमदग्नीचा अवतार. गोरे या आडनांवाला तर त्यांनी काळिमाच फासला होता. पण ते आमच्या वर्गाचे गुरुजी होते त्यामुळे आम्हाला त्यांच्याबद्दल अभिमान होता आणि  मुलांचं मानसशास्त्र असं असतं की  कडक गुरुजीच मुलांना आवडतात. सगळे त्यांना रामगुरुजी म्हणायचे.. आम्हीही तसंच म्हणायचो. 

—–तर माझं सुदैव की दुर्दैव , आमच्या आगबोटीसारख्या  चिरेबंदी घराचे तीन भाग पडलेले. शेवटच्या भागांत माझ्या चुलत भावाचं कुटुंब रहायचं. गावातलं पोस्ट त्याच्या पडवीत होतं. म्हणजे तो पोस्टमास्तर होता. तिथे पोस्टाची लालभडक पेटी. खाडीकाठच्या दहा गावांना जशी एक पूर्ण प्राथमिक शाळा. तसंच सर्वांना एक पोस्ट. पस्तीस रुपये पगारात आमचा दादा पेटीतल्या पन्नासभर  पत्रांवर शिक्के मारायचा. कधीतरी ते काम आम्हालाही सांगायचा.  आम्हाला मजाच. एका सरकारी पोत्यात सर्व पत्र भरून, पोत्याला सील  करून दादा रनरकडे द्यायचा.  रनर खारेपाटणला पोतं पोचवायचा नि तिकडचं पोतं  संध्याकाळी घेऊन यायचा. तो चालतच जायचा, तरी त्याला रनर का म्हणत कोणाला ठाऊक?

—–आमची शाळा सकाळी नि दुपारी दुबार भरायची. त्यादिवशी सकाळची शाळा सुटली . आम्ही दप्तरं खांद्याला लावून घाईने निघालो. रामगुरुजी म्हणाले, “रानडे, इकडे ये.”

—–बापरे!मी घाबरले.  छाती धडधड करू लागली. काय झालं? आपलं काय चुकलं? कालची गणितं तर सगळी बरोबर आली होती. शुध्दलेखन दहा पूर्ण ओळी लिहिलेल्या. घंटेच्या आधी वर्गात येऊन पोहोचले होते. का बोलावलं असेल गुरुजीनी? छडी मारणार की काय?

पाय लटपटत होते. रडक्या चेहऱ्याने मी गुरुजींसमोर उभी राहिले. गुरुजींच्या हातात एक पोस्टकार्ड होतं.

“हेबघ, हे कार्ड–पोस्टाच्या पेटीत नीट टाकायचे, दादा शिक्के मारत असला तर  त्याच्या हातात द्यायचे,  टपाल पोत्यात भरले असेल तर ते शिक्का मारून रनरच्या हातात द्यायला दादाला सांगायचे, पत्र महत्वाचे आहे. आज गेले तर चार दिवसांनी मालवणात पोचेल. काय?”

गुरुजी इतकं भराभरा  बोलत होते की मला काही समजतच नव्हतं. तरी मी मान  डोलावली. ”  धावत जा. काय?”

—–मी खरंच धावत निघाले. हातात घट्ट धरललं पत्र. कडक रामगुरुजींचं काम म्हणजे रामायणातल्या त्या रामाचंच काम. देसाई भाऊंच्या दुकानापर्यंत आले. मला धाप लागली होती. ऊन्ह गुरुजींसारखंच कडक होतं. पण रस्त्यावर गर्दी जमली होती. माणसं गोल करून काही तरी बघत होती. मी त्या गोलात शिरले. माकडांचा खेळ चालला होता. आमच्या त्या ठार खेड्यात असले खेळ क्वचितच यायचे. डोंबारी, गारुडी, अस्वलवाले आले की सगळा गाव तिथे जमायचा. करमणुकीचे हे खेळ बघताना आम्ही मुलं तर तहानभूक विसरायचो. मी तशीच विसरले. नि खेळ संपेपर्यंत बघतच राहिले. विसरलेली भूक आता जागी झाली. नाही, खवळलीच. धावतच घरी़ आले. मोठ्यांची नि सगळ्या भावंडांची पंगत बसलेली. आई     म्हणालीच,”अगो,कुठे होतीस इतका वेळ? नानू शोधायला येणार होता”.

” माकडांचा खेळ बघत होती.” सहावीतल्या बापूने चहाडी  केली आणि एकदमच पत्राचं लक्षात आलं. हातात पत्र नव्हतं.

बापरे. मी दादाकडे धावले. “दादा, रनर गेला?”

“अगो , केव्हाच. अजून राहिला जायचा? तुला कशाला हवा तो? खारेपाटणातून काय आणायला सांगायचेय काय? उद्या सांग हो बाबी.”

क्रमश: – भाग १

©  श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

सांगली

मो. – 8806955070

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अति लघु कथा (अ. ल.क.)… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

? जीवनरंग ?

☆ अति लघु कथा (अ. ल.क.)… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर  ☆

 

१. आयुष्य संथ झालं म्हणून तक्रार करत होतो. 

    तेव्हा मैलाचा दगड भेटला अन म्हणाला; 

    मी स्थिर आहे म्हणूनच

    लोकांना त्यांची गती मोजता येते रे….

 

२. माझ्या एका सत्कार समारंभात मला आकाश भेटलं. 

    कानात कुजबुजत म्हणालं, “ एवढ्यात शेफारलास??

    अरे जी मोजता येत नाही ती खरी उंची….”

 

३. कुठली ही गोष्ट हसण्यावारी नेतो म्हणून मी मित्रावर रागावलो. 

    तो मला समुद्रकिनारी घेऊन गेला. आणि त्याने मला विचारलं,

    या समुद्राची खोली किती असेल सांगू शकशील??

    तेव्हापासून मी मत बनवत नाही कुणाबद्दल….

 

४. मला वाटलं कठीण हृदयाच्या माणसांना सौंदर्य कसं समजणार?? 

   एक हिरा लुकलुकला….. म्हणाला,… “ वेडा रे वेडा….”

 

. कमी मार्क मिळाले म्हणून एका कोकराला कोणीतरी बदडत होतं.  

    त्या कोकराच्या डोळ्यातले भाव वाचले…  ते म्हणत होतं,

    “ करून बघायचं की बघून करायचं … ठरवू दे की मला, मी कसं जगायचं…”

 

७. एका वाढदिवसाला मला आयुष्यानं विचारलं …  “ जगलास किती दिवस???? “

 

८. प्रेताने सरणावरच्या लाकडांना विचारलं, “ माझ्याबरोबर तुम्ही का जळताय?? “ 

    लाकडं म्हणाली, “ मैत्री म्हणजे काय ते कळलं नाही का अजूनही तुला???? “ 

 

९. पांगळ्या मुलाला भर उन्हात खांद्यावरून उतरवून, रस्त्याच्या कडेला एका फाटक्या  पोतेऱ्यावर बसवल्यावर त्याचा घाम आपल्या नवखंडी पदराने पुसून ती माऊली एकुलती एक कोरडी शिळी 

    पोळी त्याला भरवताना म्हणाली,… “ बाळा दमला असशील ना?? खा पोटभर….”

 

o. माणसाने देवाला विचारलं … “ संकटं का पाठवतोस??”

     देव म्हणाला …. “ माणसाला होणाऱ्या माझ्या विस्मरणावरचं हमखास औषध आहे ते….”

 

११. विश्वास या शब्दात श्वास का आहे??

     — दोन्ही ही एकदा जरी तुटले तरी संपतं सगळं….

 

१२. दरवेशाचं माकडाशी वागणं बघून मला माकडाची दया आली.

      माझ्या मनाचा मला लगेच प्रश्न…. “ माकडाची येते पण माझी नाही येत दया तुला??”

      त्यावर माझा मनाला प्रतिप्रश्न…. “ माकडानं दरवेशाला खेळवताना पाहिलं आहेस कधी?? “

 

१३. ‘ नाती का जपायची ? ‘ …. रेशमाच्या धाग्याचा गुंता सोडवून पहा एकदा….

 

१४. आठवणींची एक गंमत आहे….. त्याच्यात गुंतून राहिलात तर, नवीन निर्माण नाही होत….

 

१५. माणूस देवाला म्हणाला, “ माझा तुझ्यावर विश्वासच नाही.”

      देव म्हणाला, ‘ वा !! श्रद्धेच्या खूप जवळ पोहोचला आहेस तू. प्रयत्न सुरू ठेव….”

 

१६. गवई एकदा तानपुऱ्याला म्हणाला, “ तू नसलास तर कसं होईल माझं?? “

      तानपुरा म्हणाला, “ अरे वेड्या ! माझी गरज लागू नये हेच तर ध्येय आहे….”

 

१७. विठुमाऊली एकदा एकादशीला दमून खाली बसली. 

      मी विचारलं, “ काय झालं?? “

      विठुराय म्हणाले, “ पुंडलिकाचा गजर करतात लेकाचे, पण मायपित्यांना एकटं सोडून 

      अजून माझ्याच पायाशी येऊन झोंबतात…  वेडे कुठले….” 

 

१८. एकटं वाटलं म्हणून समुद्रावर गेलो एकदा. 

      त्याला विचारलं, “ कसा एकटा राहतोस वर्षानुवर्ष?? “ 

      तो म्हणाला, “ एकटा कुठला, मीच माझ्यात रमावं म्हणून ईश्वराने लाटा दिल्या आहेत ना मला.” 

      मी विचारलं, “ माझं काय?? “

      तो हसून म्हणाला, “ नामस्मरण आणि माझ्या लाटांमध्ये काहीच साम्य दिसत नाही का तुला???? “ 

 

लेखक : अज्ञात 

संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ क्षमा…  सुश्री भारती ठाकुर ☆ प्रस्तुती – सौ. विद्या पराडकर ☆

सौ. विद्या पराडकर

? जीवनरंग ?

☆ क्षमा…  सुश्री भारती ठाकुर ☆ प्रस्तुती – सौ. विद्या पराडकर ☆

नाशिकला आमच्या बागेत अनेक प्रकारच्या जास्वंदी फुललेल्या होत्या. 

रस्त्याने जाणारा-येणारा थोडावेळ थबकून त्यांच्या कडे न बघता गेला असं कधी होत नव्हतं. श्रावण महिना होता. माझ्या दारा समोरच पिवळ्या रंगाची पण आत लालसर –(गर्द गुलाबी) रंगाचा चांदवा असलेली जास्वंद खूप बहरली होती. साधारण दहा बारा फुट उंचीचे झाले होते ते झाड. रोज किमान 56-60 हून अधिक फुले झाडावर असायची. फार लाडकी जास्वंद होती ती माझी. तिने शेजारच्या सोनार काकांच्या बागेत अतिक्रमण करायला कधी सुरवात केली, समजलंच नाही. तिच्या फांद्या त्यांच्या बागेत जरा जास्तच पसरायला लागल्या. झाडाची फुले कोमेजून दुसऱ्या दिवशी खाली पडून त्याचा खूप कचरा व्हायचा. कोमेजलेल्या फुलांवर असंख्य चिलटे बसायची. ती मग दिवसभर घरात देखील फिरायची. कोमेजल्यावर फुले चिकट होत. त्यावर चुकून पाय पडलाच तर पाय सटकून माणूस खाली पडायची पण शक्यता असायची. 

शेजारचे सोनार काका मला रोज सांगत, “अगं भारती, आमच्या बागेत आलेल्या या जास्वंदीच्या फांद्या कापून टाक बरं. मला त्रास होतो त्याचा.” मला त्यांचा त्रागा समजत असे. पण त्या फांद्यांवरच्या असंख्य कळ्या पाहिल्या की मी त्यांना प्रॉमिस करायची, “ काका, एवढ्या कळ्यांची फुले होऊन जाऊ देत ना. काही दिवसांनी असाही त्याचा बहर कमी होईल. मग कापतेच मी त्याच्या फांद्या. चालेल ना ?”

“ठीक आहे. पण लवकर काप. मी पडलो पाय घसरून तर ?” इति काका.

“हो, हो, लवकरच कापीन मी फांद्या. प्रॉमिस काका !” माझे ठरलेलं उत्तर .

एके दिवशी मी ऑफिसमधून घरी परतले तर काका बाहेरच उभे. “त्या फांद्या आत्ताच्या आत्ता काप . फार दिवसापासून ऐकतोय तुझं. आज कापते- उद्या कापते. आज आत्ता माझ्या समोर काप फांद्या.” एरवी अत्यंत प्रेमळ असे सोनारकाका त्यादिवशी इतके का संतापले होते मलाही समजलं नाही. माझाही राग जरा अनावर झाला. घरात जाऊन मी झाडे कापायची कात्री आणि चांगला धारदार कोयता आणला. फक्त  त्यांच्या बागेतल्याच नाही तर माझ्याही बागेतल्या  जास्वंदीच्या झाडाच्या फांद्या कापल्या. दहा बारा फुट उंचीचे ते झाड मी अगदी अडीच तीन फुटी करून टाकलं . कंपाऊंड वॉलच्या पलीकडून सुद्धा ते आता काकांना दिसणार नव्हतं.

ती माझी कृती म्हणजे राग अनावर झाला की  माणूस किती विकृतपणे वागतो याचं ते मूर्तिमंत उदाहरण होतं.

पश्चाताप तर लगेचच झाला. पण आता पश्चाताप करून काही उपयोग पण नव्हता. त्या फांद्या पुन्हा थोडीच जोडता येणार होत्या ? त्या रात्री जेवलेही नाही आणि झोपलेही नाही.

पावसाचे दिवस होते. झाड पुन्हा भराभर वाढलं. आश्चर्य म्हणजे एकही फांदी  सोनार काकांच्या बागेच्या दिशेने वाढली नाही. पुन्हा दहा -बारा फुट झाड वाढलं. पाने हिरवीकंच आणि टवटवीत. पण फूल मात्र एकही नाही. त्याच्या आसपासच्या झाडांवर असंख्य फुले पण याला मात्र एकही नाही. खतं-औषधे सर्व काही प्रयोग झाले. सहा महिने उलटले आणि माझी अस्वस्थता वाढली. काय करू मी ? सोनार काकांना पण ही घटना सांगितली. त्यांनाही खूप वाईट वाटलं. 

एक दिवस कन्याकुमारीच्या विवेकानंद केंद्रातल्या ज्येष्ठ कार्यकर्त्या सरस्वती दीदी यांचा फोन आला. त्यांनी वयाची पंच्याहत्तरी गाठली होती. झाडा झुडपांची आणि बागेची सरस्वती दिदीना खूप आवड होती. कन्याकुमारीच्या समुद्र किनाऱ्यावर -अगदी समुद्राच्या रेतीत सुंदर असे Beach Garden त्यांनी बनवलेले मी पाहिले होते. झाडांवरचे त्यांचे प्रेमही मला ठाऊक होते . त्यांचा फोन येताच मी जास्वंदीच्या झाडाची कथा अगदी अथपासून त्यांना सांगितली. ‘दीदी, त्या झाडाला आता कुठलं खत घालू म्हणजे त्याला पुन्हा छान फुले येतील?” मी अक्षरश: रडवेली झाले होते.

“There is no need for any fertilizer. Did you say sorry to that plant Bharati ? And say it honestly till it responds to you.”  

“काय ? झाडाला सॉरी म्हणू ?” खरं तर डॉ जगदीश चंद्र बोस यांनी लावलेले वनस्पतींच्या बाबतीतले सर्व शोध माहीत होते. वनस्पतींना भावना असतात, ते प्रतिक्रिया व्यक्त करतात वगैरे. Secret of plants सारखी अनेक पुस्तकेही वाचली होती. पण प्रत्यक्षात आपल्याला स्वत:ला असा काही अनुभव येईल असा कधी विचारही मनात आला नव्हता. सरस्वती दिदी पुढे म्हणाल्या की अगदी रोज ठराविक वेळेला क्षमा मागायची. झाडाला कुरवाळायचं, इतरही गप्पा मारायच्या.

झाडाची क्षमा मागण्याचा माझा दैनिक कार्यक्रम सुरू झाला. पहिल्या दिवशी थोडं कृत्रिम वाटलं पण जसजसे दिवस वाढत गेले, एक व्याकुळता माझ्या बोलण्यात – स्पर्शात आपोआपच यायला लागली.  

 जास्वंदीशी बोलणं, तिला कुरवाळणं मलाही आवडायला लागलं.  तिला फुले कधी येतील या उत्सुकतेपेक्षा आमच्या  दोघींमध्ये एक वेगळं नातं तयार झालं ते मला अधिक महत्त्वाचं वाटलं.. दहा-बारा दिवस होऊन गेले.  एके दिवशी सकाळी जास्वंदीच्या पानामागे एक कळी लपून बसलेली दिसली.  जणू म्हणत होती, “शोध मला. बघ मी आलेय”.  आनंद गगनात मावेना म्हणजे काय असतं ते प्रत्यक्ष अनुभवलं.  पण थोडा वेळच.  शेवटी मन शंकेखोर.  हा निव्वळ योगायोग  तर नाही ?  पण चार दिवसातच जास्वंदी कळ्यांनी  पानोपान बहरली. फुलेही उमलू लागली.  मग मात्र खात्री पटली की जास्वंदीने मला खरोखर क्षमा केली  आहे.

 पहिला फोन सरस्वती दीदींना  केला.  माझ्या या आनंदात त्यांच्या इतकं दुसरं कोण सामील होऊ शकलं असतं?  

त्या दिवशी जास्वंदीशी हितगुज करताना मी म्हणाले,  “आता जन्मात कधी मी असे वागणार नाही.  पण तू सुद्धा माझ्याशी पुन्हा कधी कट्टी घ्यायची नाही बरं का !”

(नर्मदालयाच्या मा. भारती ठाकूर यांनी लिहिलेली अप्रतिम कथा.

संग्रहिका – सौ. विद्या पराडकर

वारजे  पुणे.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ।। अरब आणि उंट ।। — भाग 2 ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

?जीवनरंग ?

☆ ।। अरब आणि उंट ।। — भाग 2 ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

( तिकडे काहीच पैसे  सेव्ह नाही झाले.मला दुसरा फ्लॅट घेणं शक्य नाही. आणि औंधचा माझा फ्लॅट किती लहान आहे. मी कसला तिथे रहातोय. आजींचा केवढा प्रशस्त आहे ग !” रमाला हे ऐकून भयंकर संताप आला.) इथून पुढे —

तिला हे ऐकू गेलंय, हे सुदैवाने अखिलला समजले नव्हते. रमा उठून संध्याकाळी वीणाकडे गेली. वीणाला हे सगळे सांगितलं तिने. म्हणाली, “ वीणा मी आत्तापर्यंत तुला काही सांगितलं नाही ग. आपलेच दात आणि आपलेच ओठ ! माझ्याच मुलीचा मुलगा ग हा … पण काय वागते त्याची ती बायको ! आणि कसली  ती   मॉंटेसरीतली नोकरी आणि काय तो रुबाब..  वीणा, हे लोक आल्यापासून माझं स्वातंत्र्य आणि स्वास्थ्य हरवून गेलंय. तुला सांगितलं नाही मी, पण अखिलने घरात एक पैसाही दिला नाही, की किराणा, दूध किती लागतं तेही विचारलं नाहीये. मला कशालाच कमी नाहीये ग, पण हा युरोमध्ये पैसे मिळवून, परदेशी राहून आलेला मुलगा ना ? इतकी स्वार्थी असतात का ग आपली मुलं?” .. रमाच्या डोळ्यात पाणी आलं. वीणाने सगळं शांतपणे ऐकून घेतलं. “ रमा, तू का रडतेस? हे बघ! कित्ती शहाणपणा केलाय आपण, की पूर्वीच मृत्युपत्र करून ठेवलं. तेही रजिस्टर केलं, म्हणजे कोणतीही कायदेशीर त्रुटी नको. त्यात तू स्पष्ट लिहिलं आहेस ना, की हा तुझा फ्लॅट, तुझ्या पश्चात मुलगा आणि मुलीला जावा ! मग आता या नातवाचा संबंधच येतो कुठं? मुळीच देऊ नकोस. हा तुला घराबाहेर काढायलाही कमी करणार नाही रमा.  त्यातून तुझ्याच मूर्ख लेकीची फूस आहेच त्याला. तू आता शांतच बस. नुसती गम्मत बघ आता, काय काय होते ते. मग बघू या त्याची चाल. मी आहे ना तुझ्यासाठी ? कशी ग ही आपलीच म्हणायची माणसं … अजिबात खचून जाऊ  नकोस तू. घर आपलं, पैसा आपला … का म्हणून भ्यायचं ग यांना. जा निवांत घरी ! काहीही समजलंय असं दाखवूच नकोस. येऊ दे त्यांच्याचकडून पहिली खेळी.” …. वीणाकडून रमा मानसिक बळ घेऊनच आली.

 महिना काही न होता गेला आणि एक दिवस अखिल म्हणाला, “आजी, तू अशी एकटी किती दिवस राहू शकणार? आता सत्तरी उलटली की तुझी ! मी काय म्हणतो, आता गेले वर्षभर आपण एकत्र राहतोय, तसं कायम राहायला काय हरकत आहे? मामाच्या मुलाला या घरात इंटरेस्ट नाही. तो परदेशातून काही परत येत नाही बघ. मग राहिलो मीच ! मी कायम राहीन तुझ्याजवळ !” .. रमा धूर्तपणे म्हणाली,” हो रे अखिल, किती छान होईल तू शेवटपर्यंत माझ्याजवळ राहिलास तर ! मलाही नातवाचा आधार होईल.”  

— अखिल आणि रेणूची नेत्रपल्लवी रमाच्या लक्षात आलीच.

अखिल म्हणाला, “आजी, मग  तू हा फ्लॅट माझ्या नावावर कर ना ! म्हणजे मलाही कायदेशीर हक्क राहील ग …  तुला खात्री आहे ना, आम्ही तुला कधीच अंतर देणार नाही याची ? तुझं दुखलं खुपलं, म्हातारपण नीट बघू?” …. “ होय रे अखिल. मला तू आणि शिरीषमामाची दोन, अशी तिघेच तर आहात तुम्ही. ” 

अखिलच्या  कपाळावर  आठी उमटली. “ मामाची मुलं? अमोल आणि अपूर्व? छेछे.. ती काय करणार तुझं ? इथंआली तर करतील ना ! कायम एक दुबईला दुसरा  फ्रान्स ला! काय कमी आहे त्यांना? आणि इथं कशाला येतील ती दोघे? अग आजी, मीच  बघणार तुझं सगळं ! तू माझ्या नावावर करून दे फ्लॅट. मी फुलासारखा जपेन तुला ! “  रमा तिथून निघून गेली, काहीही न बोलता ! 

एक महिना तसाच गेला. रमा सगळे अपडेट्स वीणाला देत होतीच. एक दिवस अखिल म्हणाला, “आजी, उद्या आई येतेय. कित्ती दिवसात आलीच नव्हती. मध्यंतरी  आम्हीच आईबाबांना भेटून आलो, त्यानंतर ती कुठे आलीय ना पुण्याला? आता खास आपल्या सगळ्यांना  भेटायला येतेय आई.” … ‘ आता ही कोणती नवी चाल ‘  असं मनात आलंच रमाच्या ! ठरल्यादिवशी  माया बंगलोरहून आली. आल्याआल्या आईच्या गळ्यात पडली !  ‘ किती ग आई तू करतेस, किती पडतं तुला सगळं ‘ , असं म्हणून झालं. चार दिवस लेक सून नात यांच्याबरोबर फिरण्यात गेले.

जायच्या चार दिवस आधी म्हणाली, “आई, किती म्हातारी होत चाललीस ग तू. बरं झालं ना देवानेच अखिल ला पाठवलं,तुझ्यासाठी ! तू आता असं कर..  हा फ्लॅट अखिलच्या नावाने करून  टाक. ती शिरीषची पोरं कशाला येतात इकडं आई? आपला अखिलच तुला सांभाळेल बरं! कधी करूया ट्रान्सफर मग डॉक्युमेंट्स? म्हणजे हे पण येतील बंगलोर हून. “

रमा हे ऐकून थक्क झाली. स्वतःच्या पोटची मुलगी इतकी स्वार्थी होऊ शकते? हा अखिल आणि त्याची ती आळशी उनाड  बायको काय सांभाळणार मला? देवा ! मी हे जर प्रत्यक्ष माझ्या कानांनी ऐकलं नसतं  तर माझाही विश्वास बसला नसता यांच्या मनातल्या स्वार्थी हेतूवर. रमा म्हणाली, “ माया उद्या बोलूया आपण हं.”  

दुसऱ्या दिवशी सगळी मंडळी हॉलमध्ये जमली. रमाची अशी सुटका होणार नव्हती. 

रमा म्हणाली, ” कालपर्यंत तुम्ही सगळे बोलत होतात आणि मी ऐकत गेले, पण आता माझं  नीट ऐका. अखिल,आज दीड वर्ष झालं, तू तुझी बायको, मुलगी इथं रहाताय. किती खर्च केलात घरात? परदेशी राहून आलेले लोक ना तुम्ही? साधं  दुधाचं बिल, सुलूबाईंचा तुमच्यासाठी वाढवलेला पगार, किराणा, भाजी, याची तरी कधी चौकशी केलीत का? नशीब मला भरपूर पेन्शन आहे. नाहीतर मी कुठून केला असता हा डोईजड खर्च रे?  तू खुशाल म्हणतोस, मामाच्या मुलांना गरज नाहीये या फ्लॅटची. हे तू कोण ठरवणार रे? जसा मला तू नातू, तसेच तेही नातूच. कधी पाच वर्षात म्हणालास का, ‘आजी लंडनचा काही फार मोठा प्रवास नाही, ये ना माझा संसार बघायला.’  मी सहज येऊ शकले असते रे,,स्वतः  तिकीट काढून ! तू तरी म्हणालीस का ग माया? उलट अपूर्वने मला दुबईला स्वतः बरोबर नेऊन आणले. सगळी दुबई दाखवली. मी फ्रान्सलाही गेलेली आठवतेय का रे? अमोलकडे? काडीची तोशीस पडू दिली नाही मला पोरांनी. आणि किती गोड त्यांच्या बायका… खरोखर सांगते, मला इकडची काडी नाही तिकडे करू दिली त्या मुलींनी ! दुबईची सून तितकीच गोड आणि फ्रान्सची पण अशीच लाघवी. यात तुझी सून कुठेतरी बसते का माया? तूच बघ ना. मारे लंडनहून आजीकडे हक्काने आलात, काय आणलेत आजीला? हे बघ.. मला तुमच्याकडून खरंच काहीही नकोय. इथे सगळं मिळतं. पण तुमची नियत समजली मला ! अनेकवेळा हॉटेलमध्ये जाऊन जेवून येता तुम्ही, कधीही वाटलं नाही का, आजीलाही न्यावं ? मस्त आहे अजून मी तब्बेतीने ! विचारलंत का कधी एकदा तरी?— मी तुमचे दोष उगाळायला इथं बसली नाहीये. खूप दुनिया बघितलीय बरं मी ! म्हणूनच तुमच्या धोरणी आजोबांनी हा फ्लॅट फक्त माझ्याच नावावर केला. मी भाबडी आहे, व्यवहारी नाही, हे त्यांना माहीत होते. किती उपकार फेडू त्यांचे मी? “—- रमाने डोळे पुसले…. “ तर बरं का मंडळी, आहे हे असं आहे. स्वतःचा औंधचा तो तीन खोल्यांचा फ्लॅट भाड्याने दिला आहेस ना, तो लगेचच रिकामा करायला सांग. मला काही माहीत नाही असं वाटलं का? आजीने सुद्धा बँकेत 30 वर्ष नोकरी केलीय आणि ती  एम.कॉम. पण होती, हे विसरू नका. जवळजवळ दोन वर्षे आजीकडे अलिशान  चार बेडरूमच्या फ्लॅटमध्ये राहिलात. आता चार महिने मुदत देतेय. लवकरात लवकर तिकडे शिफ्ट व्हा. नाहीतर मग कुठं जायचं हा सर्वस्वी तुमचा प्रश्न आहे. माया, तुझ्या ह्यांना इथे यायची काहीही गरज नाहीये. मुळीच नको बोलावू त्यांना. मी आत्ता हा फ्लॅट तुझ्याच काय, कोणाच्याच नावावर करणार नाही. माझ्या नंतरच तुम्हाला समजेल, त्याचे काय करायचे ते. सहा वर्षाची ही तन्वी मला विचारते — ‘ आजी तू इथे का राहतेस? दुसरीकडे का नाही जात?’  हिचा बोलविता धनी कोण आहे, हे समजायला कोणा ज्योतिषाची गरज नाही. माझं बोलून  संपलं आहे. चार महिन्यात  गाशा गुंडाळायचं बघा. माझ्या म्हातारपणाची नका बरं काळजी करू! तीही व्यवस्था केलीय मी.” 

— रमा स्वतःच्या बेडरूममध्ये निघून गेली आणि  सगळे अचंबित होऊन एकमेकांची तोंडे बघत बसले.

— समाप्त —  

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ।। अरब आणि उंट ।। — भाग 1 ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

?जीवनरंग ?

☆ ।। अरब आणि उंट ।। — भाग 1 ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

गेले चार दिवस अगदी धो धो पाऊस पडला, म्हणून रमाला बाहेर पडता आलेच नाही. आज छान ऊन पडलं आणि  हवाही छान पडली होती. ‘ संध्याकाळी  जाऊया जरा फिरायला आणि भाजी, सामान आणून टाकू,’ असा विचार केला तिनं. रमाच्या मैत्रिणींचा छान ग्रुप होता. नुसत्याच गप्पा नसत मारत त्या सगळ्या,तर सतत एकमेकींच्या  संपर्कात असत. एकमेकांची सुखदुःखे शेअर करत. प्रसंगी मदतीला धावून जात.

सकाळीच वीणाचा फोन आला होता, “ रमा ,बरी आहेस ना ग.  ये की चहा प्यायला आणि पोहे खायला. ये ग! ” वीणाची बिल्डिंग कोपऱ्यावरच होती. साडी बदलून आणि कुंडीतली छान जास्वंदीची फुलं घेऊन रमा वीणाकडे गेली ! दोघींच्या जिव्हाळ्याच्या गप्पा झाल्या. वीणाची दोन्ही मुलं परदेशात. मिस्टर अचानकच गेले चार वर्षांपूर्वी. या फ्लॅटमध्ये वीणा एकटीच रहाते. रमाचीही स्थिती काही वेगळी नाही. फरक इतकाच की तिची मुलं परदेशात नाहीत, तर मुलगा दिल्लीला आणि मुलगी बंगलोरला स्थायिक ! म्हणून रमाही एकटीच. तिचे यजमान माधवराव सहा वर्षांपूर्वी हार्ट अटॅकने गेले, तेव्हापासून रमाही एकटीच पडली. 

 पण या दोघीही आर्थिक दृष्टया स्वतंत्र होत्या. दोघींचीही नोकरी एकाच बँकेत, त्यामुळे मैत्री अगदी घट्ट झाली. राहणी अतिशय साधी पण अभिरुचीपूर्ण. आणि दोघी मैत्रिणी अगदी रसिक. दोघींनीही छान  सेव्हिंग्ज केलेली आणि पुन्हा पेन्शन तर होतेच. अधून मधून दोघीही लहानशी ट्रिप करून येत आणि  ताज्यातवान्या होत.यांची मैत्री हा हेव्याचाच विषय होता इतर बायकांचा, पण या ते जाणून होत्या. आणि आपल्या मैत्रीत कधीच कसलीही बाधा येऊ द्यायची नाही, हा अलिखित करार होता त्यांचा .. 

कालच रमाला अखिलचा … तिच्या नातवाचा फोन आला होता. अखिलचं पोस्टिंग पाच वर्षासाठी लंडनला झालं होतं आणि तो बायकोला आणि मुलीला घेऊन लंडनला गेला होता. पण ते कॉन्ट्रॅक्ट आता चार वर्षांनीच सम्पले होते, आणि त्याला कंपनीने पुन्हा पुण्यात पोस्टिंग दिले होते. अखिलने आजीला फोन करून विचारलं, “ आजी, मी, रेणू आणि माझी मुलगी तन्वी, तुझ्याकडे काही दिवस राहायला आलो तर चालेल का? तन्वीची शाळा तुझ्या घरापासून जवळच आहे आणि रेणूला पुन्हा नोकरी बघता येईल. अचानकच माझं इथलं कॉन्ट्रॅक्ट एक वर्ष आधीच संपलं म्हणून जरा पंचाईत झालीय. ” रमा म्हणाली “ या की! त्यात काय ! मलाही छान कंपनी होईल तुमची ! ” आज हे रमाने सहज म्हणून  वीणाला सांगितलं.

नाही म्हटलं तरी वीणा रमापेक्षा जास्त व्यवहारी होती. रमा भावना प्रधान आणि  भावनेच्या भरात पटकन कोणतेही निर्णय घ्यायची. आणि तिचा त्यामागचा हेतू चांगला असला, तरी मागून तिलाच त्याचा त्रास व्हायचा. वीणा हे जाणून होती. म्हणून लगेच तिने रमाला विचारलं, ” रमा, किती दिवस येणार आहे ग अखिल? “ .. “ तसं काही बोलला नाही बाई तो ! मी तरी लगेच कसं विचारणार ना ? नाही म्हटलं तरी मुलीचा मुलगा ! तिकडून तिलाही यायचा राग, की आईनं एवढी सुद्धा मदत नाही केली माझ्या मुलाला म्ह्णून !” रमा म्हणाली. हेही अगदी बरोबरच होते म्हणा !

रमाचा फ्लॅट खूप मोठा आणि सुरेखच होता. तिचे पति माधवराव चांगल्या नोकरीत होते आणि एकूण सधन कुटुंबातलीच होती रमा.  वीणाने शांतपणे रमाचे ऐकून घेतले आणि जे जे होईल, ते ते पहावे म्हणत गप्प बसली. ठरल्यावेळी अखिल,रेणू आणि तन्वी  रमाच्या फ्लॅट मध्ये दाखल झाले.  रमाने मोठी बेडरूम त्यांना दिली. सगळी बेडरूम तिने अतिशय नीटनेटकी करून, कपाटे रिकामी करून ठेवली होती. काम करणाऱ्या बाईना सांगितलं, “ मी तुम्हाला पगार वाढवते सुलूबाई ,आणि तुम्ही माझ्याकडे पोळीभाजी पण करायला या. एकदम तीन माणसं वाढली म्हणजे खूप कामही वाढणार तुमचं. मग मी इतका इतका पगार वाढवते ! चालेल ना? “ सुलूबाई हसत तयार झाल्या. आजींचा उदार हात त्यांनाही माहीत होताच. पहिले काही दिवस खूप गडबडीत गेले. तन्वीची ऍडमिशन, अखिलचे रुटीन, रेणूचेही बस्तान बसवायला– नाही म्हटलं तरी सगळ्यांना अवघड जातच होते. थोड्या दिवसात सगळं नीट लागी लागलं. रेणूला जवळच एका शाळेत पार्टटाईम जॉब मिळाला. सगळं घर अगदी बिझी होऊन गेलं. सकाळी अखिल रेणू आणि तन्वी गेले, की मगच रमा रिकामी होई.  त्यांचे  नाश्ता, चहा सगळे बाईंकडून रमा करून घेई.  रेणू जमेल तशी मदत करे, पण ती तन्वीच्याच मागे असे. तिचा डबा, स्कूल बस, मग आपली तयारी. रमा हे सगळं बघत असे.  

गम्मत  वाटायची तिला. दोन लागोपाठची आपली मुलं, सासूसासरे, नोकरी, हे सगळं तिनंही लीलया पेललंच की. मग एकच मुलगी, नोकर चाकर, शिवाय मी, असताना हिला एवढे उरकत कसे नाही? या मुलीनं लंडनला कसं काय केलं असेल? तिकडे तर ना नोकर ना मदत. कालच मुलीचा बंगलोरहून फोन आला होता .”आई, कसं चाललंय सगळं? तुझी अडचण नाहीये ना होत? दोन नोकर जास्त ठेव ग बाई ! रेणूला कामाची सवय नाही. तन्वी तर किती पसारा करते ना. आणि अखिल तर कधीच काही आवरत 

नाही. ” कौतुकाने बंगलोरहून माया, रमाची मुलगी लाडेलाडे बोलत होती. रमाचे डोके सटकलेच, पण ती वेळ काही बोलायची नव्हती. रमाने काहीतरी बोलत वेळ  मारून नेली. आता तिला खूप काम होते. 

तिला पसारा अजिबात चालायचा नाही. तिचं घर कसं नेहमी आवरलेलं ,चकचकीत आणि आरशासारखं ठेवलेलं! हा पसारा अजिबात आवडायचा नाही तिला. पण तिनं एक पथ्य पाळलं होतं, त्यांच्या रूममध्ये जायचं नाही, आवरायचं नाही. काय वाटेल तसे का पडलेले असे ना ! 

अखिल रेणू येऊन सहा महिने होऊन गेले. रेणूनं एक दिवस विचारलं, “ आजी, उद्या माझ्या शाळेतल्या मैत्रिणी येणार आहेत चहाला. तर सुलूबाई करतील ना इडली सांबार, शिरा? ”  रमा म्हणाली, “ नाही ग करणार ! तुला माहीत आहे ना, त्यांना दहा घरची  कामं आहेत. तू कर ना! तुझ्या मैत्रिणी येणारेत ना….  बघ आणि मगच ठरव हं !” रमाच्या अपेक्षेप्रमाणे, सुलूबाई नाहीच म्हणाल्या. रेणू शाळेत गेल्यावर त्या रमाला म्हणाल्या, “ बाई,राग नाही ना आला माझा? अहो ! आज सहा महिने बघतेय,जराही जाणीव नाही तुमची या बाईला ! काय हो पसारा,आणि उरक म्हणून न्हाय. काय ती बेडरूम पसरलेली ! माझा घाम निघतोय आवरून ! मी करतेय इडली सांबार—   वाट बघा ! करू देत की त्यांना. बाई, तुम्ही बी नका करू बरं का !तुम्ही पडल्या भिडस्त !” सुलूबाई हसायला लागल्या. “ बाई, कायम राहणार का इथं हे लोक? आपण एकमेकींना साहेब असल्यापासून ओळखतो न्हवं का ? बाय,, घेऊ नका हं हे लचांड  मागं लावून ! “

रमाही हसली आणि तिला सुलूबाईंचं कौतुक वाटलं. किती बरोबर ओळखलं तिनं सगळ्यांना. रेणू मात्र चिडलेली दिसली..सुलूबाईंच्या  नकारानं पार्टीचा बेत कॅन्सल झालेला दिसला. ‘ अजिबात उरक नाही  स्वतःला, आणि त्या बिचाऱ्या सुलूबाईंचा जीव घेणार ही ! वर  त्यांना चार जास्त पैसेही देणार नाही, मग कसं कोण काम करणार?’ 

त्या दिवशीही असंच झालं.  रेणूच्या  शाळेत काही प्रोग्रॅम होता. “ आजी तन्वीला  बसस्टॉपवरून  आणाल का प्लीज ? मला येता येत नाहीये घरी. “  रेणूचा रमाला फोन आला. धडपडत उन्हाचं तन्वीच्या बस स्टॉप वर जावे लागले रमाला. पुन्हा आल्यावर “ आजी, हेच नकोय खायला, पोहेच करून दे,“ हे करून झालेच! थकून गेली अगदी रमा. तीही आता सत्तरी कडे झुकली होतीच की. रेणू त्या दिवशी संध्याकाळी सहाला आली. आल्यावर एक शब्द नाही की, “ आजी सॉरी! अचानक उशीर झाला. तुम्हाला त्रास झाला ना?”  रमाला हे दिवसेंदिवस डोईजड व्हायला लागले. सांगता येईना आणि सहन करता येईना अशी परिस्थिति झाली तिची. असेच  एक वर्ष गेले.

एक दिवस अखिलला आईशी बोलताना चुकून रमाने ऐकले, “आई ,गेले वर्षभर राहतोय आम्ही इथं. आम्हाला आवडतो हा आजीचा फ्लॅट! काय हरकत आहे ग हा आम्हाला द्यायला तिनं? बाकीच्या नातवंडांना कोणालाही नकोय. सगळे तर परदेशात आहेत.  तू बोलून बघ ना आजीशी ! माझं तर फार सेव्हिंगही नाहीये ग ! तिकडे काहीच पैसे  सेव्ह नाही झाले. मला दुसरा फ्लॅट घेणं शक्य नाही, आणि औंधचा माझा फ्लॅट किती लहान आहे ! मी कसला तिथे रहातोय. आजींचा केवढा प्रशस्त आहे ग !” 

— रमाला हे ऐकून भयंकर संताप आला.

– क्रमशः भाग पहिला .  

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ रुजणं… ☆ सुश्री स्वप्ना मुळे (मायी) ☆

सुश्री स्वप्ना मुळे (मायी)

? जीवनरंग ?

☆ रुजणं… ☆ सुश्री स्वप्ना मुळे (मायी) ☆ 

“अग सुरू जरा खाली येतेस का..?ताजं लोणचं देते तुला.. लवकर ये पण, मला देवळात जायचं आहे गं..” असं म्हणत साने आजी घराच्याबागेतून आत गेल्या…   

गॅलरीतली सुरू नवरोबा कडे वळून म्हणाली, “अहो जाऊ ना.. माझी फारशी ओळख नाही म्हणून म्हंटलं…”

त्यावर हसत अवि म्हणाला, “जा जा, फार चवदार पदार्थ असतात आजींच्या हातचे.. आणि तेवढ्याच मायेने देतात देखील. अगं आपलं लग्न ठरलं तश्या मला चिडवत होत्या ‘आता आजीने पाठवलेले पदार्थ आळणी लागतील’, अग आईला देखील बरेच पदार्थ त्यांनी शिकवले….जा बिनधास्त खुप काही शिकवणारं व्यक्तिमत्त्व आहे सानेआजी..”

सुरू आजीच्या दाराजवळ आली तर तिथेच तिला एकदम प्रसन्न वाटलं…. छोटी तुळस.. दारात रांगोळी, दरवाज्याला तोरण… तिने बेल दाबली तश्या लगबगत आजी आल्या.. बुटक्याश्या आजी मस्त गुलाबी कॉटनचे पातळ.. पांढऱ्या शुभ्र केसांचा छोटासा अंबाडा, त्यात मोगऱ्याचं फुल, एका हातात घड्याळ… अगदी गोड हसणाऱ्या आजी.. तोंडात कवळीच असावी पण ती देखील त्यांना अगदी शोभत होती..

फ्लॅट वन बीएचकेच होता आणि मागची थोडी बागेची जागा.. सगळं न्याहाळत सुरू बैठकीत बसली… ‘आपला फ्लॅट मोठा असुन प्रसन्न नाही, आजीच्या घरात किती छान वाटतंय’ ती विचार करत होती तेवढ्यात आजी थंड पन्ह घेऊन आल्या… 

काहीतरी बोलावं म्हणुन सुरू म्हणाली, “महिना झाला लग्नाला पण माझं जास्त खाली उतरणंच झालं नाही. आई आजारी आहेत त्यामुळे जरा जास्तच काम पडलंय…”

खरंतर अगदी बरोबर खालचा फ्लॅट असल्याने आजीला सगळा आवाज स्पष्ट येत होता… ह्या नव्या नवरीला सासूच्या तब्येतीची सगळी माहिती देऊनच लग्न ठरलं होतं.. अवि इतका हुशार, देखणा, पण तरिही ‘माझ्या आईची सेवा करायला जी तयार होईल तिच्याशीच लग्न करणार’ असं त्याने ठरवलं होतं…

सुरू तशी फार शिकलेली नव्हती. दिसायला ठिकठाक आणि घरी गरिबी, त्यामुळे त्यांनी चटकन हे स्थळ स्वीकारलं.. कॅन्सरमुळे सासु सहा महिने जगणं तसं कठिण ह्याची कल्पना दिलीच होती.. तरी पण सुरुचा आवाज जरा जास्तच वरच्या पट्टीत लागत होता हे साने आजींनी बरोबर हेरलं.. म्हणून आज हे बोलावणं… 

आजी सुरुला म्हणाल्या, “चल तुला बाग दाखवते..” 

बागेत जातांना मागच्या खोलीत कुणीतरी पलंगावर तिला दिसलं. “कोण झोपलं आहे आत??” सुरुने विचारताच आजी म्हणाल्या, “माझ्या सासुबाई, नव्वद वर्षाच्या आहेत.. फक्त तोंड सुरू आहे, बाकी सगळं जागेवर..” 

हे सांगत असतांना आतुन आवाज आला.. “कोण गं, सुरू आली का..?इकडे आण तिला..” सुरुने साने आजीकडे आश्चर्याने बघितलं.. 

साने आजी हसून म्हणाल्या, “अगं, आमच्या दोघींमध्ये संवाद हा सगळा भोवतालचा असतो… कोणाकडे सुन आली..? कोणाला लेकरू झालं..? कोणाला नोकरी?? कोण गावाला गेलं ?? अश्या सगळ्या गप्पात तू त्यांना माहीत आहेस, आणि मघाशी हाक मारली तेंव्हा ऐकली की त्यांनी…”

दोघी खोलीत गेल्या.. पलंगावरच्या पांढऱ्या शुभ्र चादरीवर त्या सासुबाई झोपलेल्या होत्या. अगदी प्रसन्न, स्वच्छ छान मंद कापुराचा सुवास दरवळत होता.. पलीकडे सानेआजीचा दिवाण, त्यावर दोन जप माळ, बाजुला दासबोध…

साने आजीने सासुबाईला मानेत हात घालून पाणी पाजलं.. लगेच बाजुच्या रुमालाने तोंड पुसलं.. सासुबाईंनी सुरुला बसायची खुण केली.. हे सगळं बघून सुरुला आपण किती रागारागाने सासूबाईंच करतो हे जाणवलं..

सासुबाई म्हणाल्या, “सुरू, आजारपण कोणाला आवडत नसतं, पण ते वाट्याला आल्यावर त्याचं दुःख जास्त तेंव्हा वाटतं जेंव्हा आपलेच आपला त्रागा करायला लागतात..”

सुरूला जरा अंदाज आला, बहुतेक आपलं सासुशी वाद घालणं ऐकू येत असावं.. आणि मनातून जाणवलं, आपण खरंच त्या मानाने काहीच नीट करत नाही सासुबाईचं. तेवढ्यात साने आजी म्हणाल्या, “तिला आपली बाग दाखवते हं आई.. चल गं..”

दोघी मागे आल्या.. गर्द आंब्याच्या सावलीत खुर्चीत बसवत साने आजी म्हणाल्या.. “हे बघ, हा आंबा सासुबाईंनी माझ्या हाताने लग्नानंतर लावला.. आणि मला सांगितलं ‘तुझा संसार म्हणजे हे झाड.. जशी काळजी घेशील तसं बहरेल,.. रोज प्रेमाचं पाणी झाडाला आणि संसाराला गरजेचं आहे.. त्याभोवती कचरा, दगड, गोटे येतच राहणार, जसे आपल्या संसारात येणाऱ्या अडचणी, न पटणारी माणसं… पण त्यांना तिथेच पडू द्यायचं नाही, त्यांचंच प्रेमाने उचलुन आळं करायचं भोवताली.. मग बघ, मधल्या पाण्याची ओल त्यांनाही लागते… तेही मग झाडाचं रक्षणच करतात. तसंच नात्याचं आळं करायचं आपल्या आयुष्यात, कामीच येतं गं… आणि हो, त्या झाडाला सारखं येता जाता गोंजारायचं, ते तुझ्यासारख्या नव्या नवरीच्या भुमिकेत असतं ना… पण फार दिवस नाही, कारण एकदा का ते रुजलं कि बघ, आज बहर तुझ्या समोर आहे.. आज नशिबाने आम्ही दोघीच राहलोय सोबतीला.. त्या आजारी आणि माझी सत्तरी.. त्या नव्वदिला असल्या तरी माझ्याशिवाय जेवत नाहीत. 

नात्यांचा मोहर कायम टिकवावा लागतो. त्यासाठी प्रेमाचं पाणी घालायला विसरायचं नाही.. मला वाटतं तुला कळलं असेल मला काय म्हणायचं आहे.. चल हे रोपटं लाव पलीकडे आणि रोज येऊन तू बघायचं त्याला रुजेपर्यंत…”

सुरुने मनापासून रोप लावलं.. घरात येत आजींनी बरणी तिच्या हातात ठेवली.. “बघ हे रुजणं मनातुन झालं कि असं स्वादिष्ट लोणचं आपोआप तयार होतं..”

सुरू घरी आली.. सगळा संवाद तिच्या मनात रुंजी घालत होता.. तिची भूमिकाच बदलून गेली.. आठवडाभरात वरून येणारे सुरूचे आवाज बंद झाले.. साने आजीला सासुबाई म्हणाल्या.. “रुजणं सुरू झालं वाटतं पोरीचं..”

आज आईला घेऊन दवाखान्यातुन घरी जाताना अविने पायऱ्यांवरून मुद्दाम जोरात हाक मारून सांगितलं, “आजी डॉक्टर म्हणाले, आईची प्रकृती सुधारत आहे.. बहुतेक तुम्ही लावलेलं आंब्याचं झाड रुजायला लागलं बरं का…. चांगले विचार घालुन दिलेले लोणचं फारच मुरेल असं दिसतंय…”

“छान छान…” म्हणून आजी आतूनच ओरडल्या आणि खुदुखुदु हसत त्यांनी सासुबाईंना टाळी दिली.. दरवाज्यातून रुजेललं ते रोपटं वाऱ्यावर आनंदाने हलत होतं.. तिथे ह्या दोघींना सुरूचा चेहरा दिसला.

 © सुश्री स्वप्ना मुळे (मायी)

मो +91 93252 63233

औरंगाबाद

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ‘भय…’ – भाग – 4 ☆ श्री आनंदहरी ☆

श्री आनंदहरी

?जीवनरंग ?

 ☆ ‘भय…’ – भाग – 4 ☆ श्री आनंदहरी  

“ अगं, तो म्हणतोय ना? मग आणू दे की त्याला हवं ते गिफ्ट… तू का नाही म्हणतेयस ? “

बाबा सूनबाईंच्या साधेपणावर, विचारीपणावर खुश होऊन म्हणाले.

“ बाबा, तुम्हीपण ऐकत नाही माझे .. मग आईतरी ऐकणार आहेत थोड्याच ? त्या तुमच्याच सुरात सूर मिसळणार…”

ती आत जाता जाता म्हणाली , त्यावर बाबा फक्त हसले. तो दिगमूढ होऊन हे सारे पाहत होता.

‘ किती नाटकी आणि पाताळयंत्री बाई आहे ही… आई बाबांना कसे  सांगू ? कसे समजावू ?’ तो मनात म्हणाला खरं..पण ‘ हिच्यापुढे आपला काय निभाव लागणार?’ या विचाराने आणि तिचे वागणं पाहून खरेतर तो मनातून गर्भगळीत झाला होता. ‘ तिचे हे असले वागणे आता कुठंल्या टोकापर्यंत जाणार आहे ? किती काळ चालणार आहे ? आणि या साऱ्याचा शेवट नेमका काय होणार आहे? ’  या विचाराने तो खूप अस्वस्थ झाला होता. इकडे आड आणि तिकडे विहीर अशी त्याची अवस्था झाली होती.. या साऱ्यात आपले काहीही झालं तरी चालेल पण आपले सरळसाधे आईबाबा भरडून निघता कामा नयेत..असे त्याला वाटत होतं पण ती कधी कशी वागेल याचा त्याला काहीच अंदाज येत नव्हता..

मध्यमवर्गीय मानसिकतेने मनात असणारी बदनामीची भीती.. लोक काय म्हणतील ? याची प्रत्येकक्षणी मनात  दाटणारी भीती. अशा भीतीची सावली आयुष्यभर पाठलाग करीत राहत असते. त्याच्याबाबतीतही तेच घडत होतं. त्याला ऑफिसातले, बाहेर असतानाचे क्षण  हे त्याच्या मनावरती तिच्या या असल्या वागण्याचा कितीही ताण असला तरी ,काहीसे बरे, काहीसे मुक्त झाल्यासारखे, काहीसे सुटकेचे आणि हवेहवेसे वाटू लागले होते..  लवकरात लवकर काम आटोपून ऑफिसमधून घरी परतायची, तिला भेटायची ओढ उरली नव्हती. त्याचं मन  ऑफिसमध्ये जास्तच वेळ रेंगाळू  पाहत होते. घरी आले की मनावरचा ताण अधिकच वाढत होता. दिवसेंदिवस तो मनानं अधिकाधिक खचत होता. तो तिच्यापासून, त्या भयापासून दूर पळण्याचा प्रयत्न करीत होता पण भय त्याची पाठ सोडत नव्हते. तिच्या वागण्या- बोलण्याने मनात रुजलेलं भय त्याला गिळंकृत करू लागले होते..

तो स्वतःच्याच विचारात राहू लागला.. मित्रांसोबत राहण्याचं टाळू लागला. मित्रांच्यात असला तरी गप्पागोष्टीत त्याचे फारसे लक्ष नसते हे त्याच्या जवळच्या मित्रांनाही जाणवू लागलं होतं.

“ काय झालंय? काही प्रॉब्लेम आहे काय?”

त्याच्यातील बदल जाणवून मित्रानं त्याला एके दिवशी एकट्याला गाठून विचारले. तो आपल्याच विचारात होता. मित्राने पुन्हा तोच प्रश्न विचारला तेव्हा तो भानावर आला.

“ नाही.. काहीच प्रॉब्लेम नाही.”

“ हे बघ .. गेले काही दिवस पाहतोय, तू खूप विचारात असतोस..एकतर सर्वांना टाळत असतोस.. आणि भेटलास तरी कुठल्यातरी दुसऱ्या जगात असल्यासारखा स्वतःतच गुरफटलेला असतोस, आमच्यामध्ये, गप्पांमध्ये सामील नसतोसच. एकतर तू नसतोस आणि असलास तरी नसल्यासारखाच असतोस. आपल्याचं विचारात असतोस.. कशातच सहभागी होत नाहीस.. मलाच नव्हे तर आपल्या ग्रुपमधल्या प्रत्येकाला जाणवतंय ते.. बोललास तर बरं होईल.. काही अडचण असेल सांग. त्यातून काहीतरी मार्ग काढता येईल..”

“ नाही रे खरंच काही नाही. “

“ काहीच अडचण , समस्या नसेल तर चांगलंच आहे.. पण मग पूर्वीसारखा मिसळत का नाहीस सर्वांत ? लग्न झालंय तुझे.. पू्र्वीसारखं नियमित भेटणं तुला जमणार नाही हे जाणून आहोत आम्ही… पण भेटल्यावर ही वेगळाच राहतोस.. असं वेगळं राहणं, अलिप्त असणं हा तुझा स्वभावच नाही हे आम्हांला ठाऊक आहे .. त्यामुळे मग आम्हाला प्रश्न पडतो.. तू काहीतरी अडचणीत, समस्येत  आहेस असं वाटू लागलंय.. मला एकट्याला नाही तर आम्हां सगळ्यांनाच तसं वाटू लागलंय.. अगदी काहीही अडचण असेल, समस्या असेल तरी बोल. “

“ नाही रे तुम्हाला वाटतंय तसे काहीच नाही… आणि असते तसं काही तर तुमच्याशी नाही का बोलणार मी ? बराच वेळ झालाय.. भेटू पुन्हा.. चल, निघतो मी आता..”

तो घड्याळात पहात म्हणाला आणि झटकन उठून निरोप घेऊन निघून गेला.

तो बोलणे टाळण्यासाठी निघालाय हे मित्राच्या लक्षात आलं होतं. तो निघून गेला तरी ‘ काय झालं असेल? हा प्रश्न मित्राच्या मनात बराच वेळ रेंगाळत राहिला होता.

तो घरी आला दारावरची बेल वाजवली.. तिने हसतमुखाने दार उघडलं.. तिला समोर पाहताच , ‘आता ती काय बोलेल ? कशी वागेल ? ‘ हा विचार मनात आला आणि  इतका वेळ त्याच्या मनात झोपलेल्या भयाच्या अजगराने, जागं होऊन त्याच्या तन-मनाला विळखा घालायला सुरुवात केली.

 – समाप्त –

© श्री आनंदहरी

इस्लामपूर जि. सांगली – मो  ८२७५१७८०९९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares