मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मुक्त… लेखिका – सुश्री अनघा किल्लेदार ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? जीवनरंग ?

☆ मुक्त… लेखिका – सुश्री अनघा किल्लेदार ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

रविवार बागलांच्या घरी अंमळ उशिराच उगवला. वहिनी गेल्याच्या धक्क्यातून दोन महिन्यांनीसुद्धा त्यांचा एकुलता एक मुलगा पराग पुरता सावरला नव्हता. 

नऊ वाजल्याचे लक्षात येताच त्याने बेडरूमच्या खिडकीत मोबाईलमधे रममाण झालेल्या प्रितीला पाहिले आणि विचारले, ” कधी उठलीस तू? मला उठवायचस ना..बराच उशीर झाला आज.. आप्पांचा चहा झाला ना? “

“आप्पांचा चहा? मला नाही माहित..मी इथंच आहे, मी पण नुकतीच उठते आहे..”  प्रितीच्या या उत्तराने पटकन् उठून त्याने आवरले आणि बाहेर आला.

मस्त गरमागरम चहाचे तीन कप बाहेर आणत त्याने आप्पांना हाका मारली..पण त्यांनी ओ दिली नाही. 

दोन महिन्यांपूर्वी वहिनी म्हणजे त्याची लाडकी आई झोपेतच निघून गेली कायमची..नको नको त्या विचारांनी पराग धसकला. दोन हाकांनंतरही प्रत्युत्तर न आल्याने कासावीस होऊन त्याने आप्पांच्या खोलीकडे धाव घेतली. खोली रिकामी, स्वच्छ आवरलेली होती. मग आप्पा कुठे गेले? फिरायला? न सांगता कसे जातील? 

गोंधळून त्याने प्रितीला बोलावले, “अग आप्पा दिसत नाहीयेत घरात, तुला काही कल्पना आहे का? “

“छेः !! माझ्याशी धड बोलतात का कधी ते? मला नाही माहित..”

तिचे बोलणे पुरे होईपर्यंत परागला टेबलवर एक चिठ्ठी मिळाली. आप्पांचे अक्षर तर त्याच्या पूर्ण परिचयाचे..चिठ्ठीत लिहिले होते..

“प्रिय पराग आणि सुनबाई,

दोन महिन्यांपूर्वी ही गेली आणि मला विचित्र एकटेपणा येऊ लागला.  तुमच्या सुंदर घरट्यात मी एकटा पडलो…. कारण काय? कोण बरोबर कोण चूक याची शहानिशा मला करायचीच नाही. जिच्यासाठी मी अट्टाहास करायचो तिनेच दगा दिला रे. 

खूप विचारान्ति मी गावाला परत जातोय.  एकटा नाही, तिच्या सर्व आठवणींना सोबत घेऊन. तुमच्यात मी ‘ बसत नाही ‘ हे तुम्हालाही माहिती आहे..आणि मला ही. मला आधीच कळलं होतं, पण तुझी आई भाबडी होती. 

गावातली शेती वाडी , दुभती जनावरे सगळं सगळं वैभव सोडून ती तुमच्या महालात आली…. तुम्ही तिला हाकलले नाहीत, पण तोंडभर स्वागतही झाले नाही. लेकाची मुले -नातवंडे नाहीत, ती मोठी करत राहिली. ‘ माझी मुलं माझ्या पद्धतीने वाढू दे..’  असे सूनबाईने सुनावल्यावर घायाळ झालेल्या तिला मीच आधार दिलाय. घरच्या कामकरणींना, कामक-यांच्या सुनांना ज्या तुझ्या आईने बाळंतपणात पायली पायली तांदूळ स्वतःच्या हातानं काढून दिला, त्याच तिला ‘ सकाळी कशाला हवाय ताजा वरण भात ? उरतो तो गरम करून खा ना ‘ ..असे मुलाच्या भरल्या घरात ऐकावं लागलंय.

मी कमजोर आणि लाचार तेव्हाही नव्हतो आणि आजही नाही.. तेव्हाच बोलणार होतो पण फक्त तिच्याखातर गप्प बसलो. आता मोकळं केलंय तिने मला. 

माझे मोठ्याने देवाचे म्हणणे, पूजा करणे, सगळेच तुम्हाला नापसंत. इतकंच काय, बरे नाही दिसत पंचे वापरणे म्हणून तुम्ही ते जड टाॅवेल आणून दिलेत, सांगू का हळव्या त्वचेबरोबर मनही ओरबाडून टाकले त्यांनी. 

पण, राहू दे ते सगळं आता.. मी गावाकडच्या माझ्या घरी जातोय..मला भेटायला शोधायला येऊ नको. मीही फोन करणार नाही आणि तूही करू नकोस. माझा राग नाही तुमच्यावर, आशिर्वादच आहेत…. पण आपले मार्ग आता भिन्न आहेत. 

माझ्या माघारी शेतीवाडी , घरदार, दागदागिने सगळेच तुझ्या नावावर असेल. तुझा कोणताच हक्क मी डावलणार नाही…. मला मुक्त व्हायचंय आता.”

– आप्पा.

आप्पांची ही चिठ्ठी वाचताच पराग हमसाहमशी रडू लागला. त्याने रडत रडतच गावाला आप्पांच्या शेजारी रहाणा-या मुसळे काकांना फोन केला. 

त्याचा आवाज ऐकून अगदी कोरडेपणाने काका म्हणाले  ” पोचला हो तुझा बाप सुखरूप, कळली तुमची खुशाली.  आता तू फोन करूच नको ,आम्हीच करू तुला शेवटला फोन. तुला ऐकवायचं खूप मनात आहे, पण तुझ्या बापाला फार कळवळा तुझा..असो. आजपासून खूप कामात असेन मी ..  माझा मित्र आलाय परत.. ठेवतो फोन. ” 

मुसळे काकांनी फोन बंद केला. 

मुसळे काका वाड्यात आले तेव्हा आप्पांची नुकतीच आंघोळ झाली होती. खणखणीत आवाजात अथर्वशीर्ष म्हणत होते. आंघोळीनंतर,  हातासरशी पिळलेला पंचा त्यांनी दिमाखात दोरीवर वाळत टाकला होता, आणि वाडवडिलांनी पूजलेल्या देवांची पूजा करायला ते देवघराकडे वळले होते.

लेखिका – सुश्रीअनघा किल्लेदार, पुणे

प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “पुनर्जन्म…” ☆ श्री कौस्तुभ केळकर नगरवाला ☆

?जीवनरंग ?

☆ “पुनर्जन्म…” ☆ श्री कौस्तुभ केळकर नगरवाला

आज ?

बहुतेक नाही…

अजून बारा पंधरा दिवस आहेत.

तू जा आॅफीसला.

बिलकूल काळजी करू नकोस….

काही वाटलं तर मी लगेच फोन करीन.

शिवाय शेजारी अम्मा आहेतच.

ती म्हणाली.

तिच्या डोळ्यांनी डोंट वरी, जा तू म्हणलं.

गेला आठवडाभर हे असंच चाललंय.

रोज सकाळी आॅफीसला जाताना हाच विचार.

जावं की नको ?

अजून फक्त एक दिवस.

ऊद्या त्याचे आईबाबा पोचतील इथे.

मग काळजी नाही.

काळजावर दगड ठेवून त्यानं गाडीला किक मारली.

अन् तो आॅफीसला भुर्र ऊडाला.

आॅफीसला पोचला अन् सगळं विसरला…

हेडआॅफीसहून बाॅसलोक आलेत.

त्यांना घेऊन हायटेक सिटीला जायचं.

तिथल्या मिटींग्ज.

त्यांना जेवायला घालायचं.

परत अॅबीटस्ला यायचं.

दिवस मोडणार होता.

जग इकडचं तिकडं झालं तरी,

दुपारी तो तिला फोन करणार होताच.

तो कधीच विसरायचा नाही..

जिसे डरते थे, वही बात हो गई !

बाॅसलोकांची सरबराई.

हायटेक सिटीची वारी.

नेमका तो त्याचा फोन केबीनमधेच विसरला.

मिटींग्ज आवरल्या.

बंजारा हिल्सपासचं ठरलेलं हाॅटेल.

नेहमीचा मेनू.

एसीची थंडगार हवा…

त्याला घाम फुटला.

जाम अस्वस्थ वाटतंय.

का ते नाही सांगता येणारं.

अनसहणेबल.

बाॅसकडनं त्याचा फोन घेतला.

तिला फोन लावला.

उचल…उचल…उचल…

उचलला.

तिनं नाही शेचारच्या अम्मानं.

तो हलला.

भैया, कबसे फून लगाकू होना.

बॅग फट गया.

टॅक्सी मंगवाया मैने.

अबी अस्पताल मे जारी हमलोगा.

तुम फून नही ऊठाया.

फीक्र नाको.

अम्मा है इधरकू.

आठ बच्चे कू जनम दिया ये अम्मा.

तुम आरामसे आने को होना…

तो हादरला…

ती जाम घाबरायची..

तीची आई बिचारी बाळ॔तपणातच गेलेली.

आजीनं वाढवली तिला.

एका अटीवर….

ती तयार झाली.

हाॅस्पीटलमधे न्यायची वेळ येईल तेव्हा तू हवास तिथे.

अगदी ओटीचा दरवाजा बंद होईपर्यंत.

नाहीतर…

मी पण मरून….

तो निरागस हसला.

ऐ पागल !

असं काहीही होणार नाही .

मी तिथेच असेन.

त्यानं तिचा हात हातात घेऊन ‘आईशप्पथ’ प्राॅमीस केलेलं.

आणि आता तो नेमका..

बाॅस ईज बाॅस..

सांभाळून घेतलं.

तू जा..

कंपनीची ईनोव्हा…

तरीही काचीगुडापर्यंत पोचायचं होतं.

ड्रायव्हरनं गाडी अॅम्ब्युलन्स स्पीडनं ऊडवली ..

कसाबसा तो हाॅस्पीटलमधे पोचला..

खाली आम्मा भेटल्या..

सिझेरियन करने कू होना.

थिटेरमें लेके जारे…

लिफ्टच्या नादी लागण्यात अर्थ नव्हता.

जिन्याला टाचेखाली चिरडत तो वरच्या मजल्यावर.

ओटीचा दरवाजा तिला पोटात घेऊन बंद होणार… एवढ्यात…

पलट..

स्टेचरवर झोपलेली ती जीवाच्या आकांतानं बसती झाली.

वेदनेनं विव्हळणार्या चेहर्यावरचे ग्लानीडोळे ऊघडले…

एक क्षणभरच…

धापा टाकणारा तो तिच्या डोळ्यांना भरभरून दिसला..

तिच्या जीवात जीव..

त्यानं नुसत्या डोळ्यांनी बेस्ट लक म्हणलं.

ती फुल आॅफ काॅन्फीडन्स.

तिचं आधारकार्ड आलेलं.

आता तिनं यमालाही कोलला असता.

दरवाजा बंद.

तो डोकं धरून बाहेरच्या बाकावर.

अर्ध्या तासानं ट्याह्या आवाज.

नर्सनं बाहेर येऊन सांगितलं.

लक्स्मी आई है , मा बेटी दोनू टीक.

रडारड..

आत त्याची लेक.

बाहेर तो.

त्याची आजी नेहमी म्हणायची.

बाळंतपण म्हणजे आईचा पुनर्जन्म.

आत्ता पटलं.

पुनर्जन्म.

आईचा अन् बाबाचाही.

वेलकम लक्ष्मी…

* माझी पोस्ट नावासकट शेअर करायला माझी ना नाही *

© कौस्तुभ केळकर नगरवाला

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ पायथागोरसचा ओहम्स लॉ… श्री हर्षद वा. आचार्य ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ☆

सुश्री स्नेहलता दिगंबर गाडगीळ

? जीवनरंग ?

☆ पायथागोरसचा ओहम्स लॉ… श्री हर्षद वा. आचार्य ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ ☆

परवा सुट्टी म्हणून हॉटेलात जेवायला जायचा प्लॅन ठरला. सहकुटुंब ठाण्याच्या एका नवीनच चालू झालेल्या मस्त हॉटेलात गेलो. आम्ही बसतो न बसतो तेवढ्यात आमच्या  शेजारच्याच टेबलवर चौघे जण येऊन बसले. दोन पुरुष आणि दोन बायका. जोडपी वाटत नव्हती. मित्रमैत्रीणीच असावेत. चाळीशीच्या आसपासचे असतील.

आम्ही काय ऑर्डर करायची ते ठरवत होतो. त्या चौघांचाही विचारविनिमय चालू होता. त्यातला एक जण दिसायला जरा वेगळाच होता. अतिशय कृश शरीर. टक्कल. आणि सतत धाप लागल्यासारखं पण मोठ्या आवाजात बोलणं. बाकीचे तिघे मात्र सामान्य माणसासारखे वागत-बोलत होते. आमची ऑर्डर देउन झाली. त्यांनीही चौघांमध्ये ८-९ डीशेस मागवल्या. मी, बायको आणि मुलीने एकमेकांकडे पाहिलं. ‘किती अधाशीपणा’ असा भाव तिघांच्याही नजरेत होता.

दोघांच्याही टेबलवर ऑर्डर प्रमाणे डिशेस येऊ लागल्या. खाताना अर्थातच गप्पा चालू होत्या. त्या चौघांच्या  गप्पाटप्पा चालू होत्या. विषयांतर होत होत ‘शाळेत शिकलेलं किती उपयोगी पडतं’ ह्या विषयावर बोलणं आलं. दोघीपैकी एक जण म्हणाली,” ए जो कोणी पायथागोरस थिअरमचं स्टेटमेंट म्हणून दाखवेल त्याला  माझ्याकडून चॉकलेट ब्राऊनी”. लगेच तो वेगळा दिसणारा पुरुष मोठ्याने बोलू लागला,” So long as the physical state of the conductor remains the same, the current flowing through a conductor is directly proportional to the potential difference applied across its ends.”

वा! वा!वा! तिघांनीही त्याचं तोंडभरून कौतुक करून टाळ्या वाजवल्या आणि लगेच वेटरला चॉकलेट ब्राऊनी ची ऑर्डर दिली. आता तर टेबलवर जागाच उरली नव्हती. आधी मागवलेल्या आठ डिश सुद्धा जवळपास तशाच होत्या. बहुतेक डिशेस चाखल्यादेखील नव्हत्या. एकदोन फक्त नुसती चव घेऊन ठेवल्यासारख्या.

आम्हाला तिघांनाही तो प्रकार विचित्र वाटला. एकतर अन्नाची नासाडी. मोठमोठ्याने बोलणं. कहर म्हणजे पायथागोरस थियरम म्हणून ओहम्स लॉ म्हणून दाखवणं. वर इतरांनी त्याचंच कौतुक करणं. आम्ही नजरेनेच एकमेकांशी बोलत होतो. ‘असे काय हे मूर्ख, माजोरडे’ ह्यावर आमचं एकमत झालं. आम्ही  आपसात दुसरं बोलणं चालू केलं तरी बाजूच्या टेबलवरचा प्रकार खटकत होताच.

दोघांचंही जेवण जवळपास एकत्रच आटोपलं. बिलं आलं. मी आणि तो कार्ड स्वाईप करण्यासाठी काउन्टरपाशी गेलो. त्याने मला जरासं ढकलूनच स्वतःच कार्ड पुढे केलं. मी जराशा त्रासिक नजरेने त्याच्याकडे पाहिलं. तो बिल देऊन ते दोघे मित्र पान खाऊया म्हणून टपरीकडे वळले.

मागून येणाऱ्या दोघींशी माझी नजरानजर झाली. आमच्या चेहऱ्यांवरची नापसंती त्यांना स्पष्ट दिसली असावी. त्यांच्यातली एक जण (ब्राऊनीचं बक्षीस देणारी) पुढे येऊन म्हणाली,” सॉरी..तुम्हाला हे सगळं विचित्र वाटत असेल ना…आम्ही मस्तवाल, माजलेले आहोत असं वाटत असेल.” मी उत्तरादाखल केवळ खांदे उडवले. ती पुढे म्हणाली, “तुम्ही ऐकणार असाल तर मी काही सांगू का?”. मी, बायको आणि मुलगी गोंधळून उभे राहिलो. दरवाजाची वाट मोकळी करून थोडे बाजूला उभे राहिलो.

ती बोलू लागली,” ‘त्याचं’ वागणं-बोलणं ह्याकडे दुर्लक्ष करा. He is terminally ill. कदाचित दिवाळीपर्यंत तो आपल्यात नसेल. त्याच्याच आग्रहाखातर ही आम्हा बालमित्रमैत्रिणींची छोटीशी फेयरवेल पार्टी होती…त्याच्यासाठीच… त्याच्याच खर्चाने….” तिला हुंदका आवरला नाही.

आम्ही तिघेही सुन्न होऊन आळीपाळीने त्याच्याकडे, त्या दोघींकडे आणि एकमेकांकडे पाहत उभे राहिलो. त्याचं कृश शरीर, टक्कल, धाप लागल्यासारखं बोलणं हे सगळं आता पटत होतं. आता दोघींपैकी दुसरी स्त्री म्हणाली,” आणि हो..त्याने पायथागोरस थियरम म्हणून ओहम्स लॉ म्हणून दाखवला. हे आम्हालाही कळलं. पण आम्हाला हसवण्याचा त्याचा हा प्रयत्न होता हेही आम्हाला कळत होतं. बाय द वे, He is M.Tech., Ph.D from IIT”. त्यामुळे… now you understand?”

इतक्यात पानं घेऊन ते दोघे आले. “Let’s go buddies…Hurry…Time is running…” असं बोलत ‘त्या’ने त्या दोघींच्या हातातल्या पार्सलच्या पिशव्या घेतल्या. पिशव्या घेता घेता त्याने आमच्याकडे पाहिलं. आमचे चेहरे पाहून त्याला सारं समजलं. तो मोठ्याने म्हणाला,” ओह गॉड, पचकल्या का ह्या दोघी? सगळं सांगितलं असेलच.” थोडं स्वतःशीच तर थोडं आमच्याकडे पाहून हसत तो म्हणाला,” ह्यांना वाटतंय मी दिवाळी पर्यंत तरी असेन..पर आपुन का प्लॅन अलगीच है। दसऱ्यालाच सीमोल्लंघन”. असं म्हणून त्याने त्या पार्सल केलेल्या डिशेस वाटण्यासाठी सिग्नल जवळ उभ्या असलेल्या भिकारीणीला आणि एक तृतीयपंथीयाला जवळ बोलवलं. जाता जाता मला उद्देशून “Sorry for the push at the counter…But you know…I don’t have much time left…Need to hurry..” असं म्हणून तो चालू लागला.

त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहून आम्हाला पायथागोरसचा नवीनच सिद्धांत समजत होता…

(सकारात्मकता) वर्ग + (समाधान) वर्ग = (जीवन जगणं) वर्ग.

लेखक : श्री हर्षद वा. आचार्य

संग्राहिका  : स्नेहलता गाडगीळ

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ घरात राहणारी बाई – भाग 2 (भावानुवाद) – श्री भगवान वैद्य `प्रखर’ ☆ सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

☆ घरात राहणारी बाई – भाग २ – भगवान वैद्य `प्रखर’ ☆ सौ. उज्ज्वला केळकर

मागील भागात  आपण पाहीलं – महानगरात पस्तीस वर्ष रहाणार्‍या बाईला किती वेळा सांगायचं , ‘बाई ग, बाहेर जाताना बाकी सगळं विसरलं तरी चालेल, पण मोबाईल न्यायचा विसरू नको. पण हिची पर्स कुठे आहे? पर्स…. पर्स दिसत नाही आहे. अरे, लॅच कीची दुसरी चावी पण इथेच पडलीय. आणि हा कसला कागद? टी.व्ही.वर पडलाय. उं…उं… पत्र दिसतय … बघू या, काय लिहिलय… आता इथून पुढे 

‘अनुरोध … नाही… श्रीमान अनुरोधजी,

मी जात आहे. आपल्याला काही संधी मिळावी आणि आपण मला बाहेर काढावं, त्यापूर्वी मी स्वत:च निघून जातेय. बस… इतक्याच दिवसाची माझी आणि आपला साथ होती.आता आणखीन मी आपल्या सोबत राहू शकत नाही. क्षणभरसुद्धा नाही.

मी कुठे गेलीय, जाणून घेऊ इच्छिता? घ्या. मीच सांगते. आईकडे जातेय मी. चिता करू नका. अंधेरी ते पनवेल मी जाऊ शकते. आईकडे अशासाठी की ती जागा सुरक्षित आहे. आपण तिथे येणार नाही. माझ्या बाबांचं ( आपले सासरे होते पण आपण नेहमीच त्यांच्याशी शत्रू असल्यासारखे वागलात. ) निधन झालं, तेव्हा वाटत होतं, कदाचित याल आपण पण आपण घरी नाही, थेट स्मशानभूमीत आलात. तिथे येऊन आपण आपला मूल्यवान वेळ का खर्च केलात कुणास ठाऊक? बिझनेस सुरू करण्यासाठी सासरे पाच लाख रुपये देऊ शकले, नाहीत, तर त्यांच्या इंजिनिअर जावयाने त्यांच्या दाह संस्काराला कशाला जावं?डिलिव्हरीसाठी मी माहेरी गेले होते.बंटीला घेऊन परत आले, तेव्हापासून आपण माझा माहेराशी असलेला संबंध नेहमीसाठी तोडून टाकलात. एक-दोनदा बाबा इथे आले होते, या फ्लॅटवर  पण आपण त्यांच्याशी असे वागलात, जसा कुणी एलियन घरात शिरलाय.

आज बंटी तीस वर्षाचा आहे. कुठे आहे बंटी? माझा मुलगा…

मला अजूनही बेड रूममधून आवाज येतो. ‘बाबा दरवाजा उघडा ना!’

‘बाबा, मी अर्ध्या तासासाठी बाहेर येऊ इच्छितो. प्लीज… मला गुदमारायला होतय इथे.’   ‘पंखा वाढव. अशाने इंजिनीअर कसा बनशील? टॉप करायचाय तुला. मी जे करू शकलो नाही, ते तुला करून दाखवायचय. आपल्या नातेवाईकात कुणीच केलं नाही. असं काही तरी तुला करून दाखवायचय.’

करून दाखवलं त्याने. बोर्डात अव्वल नंबरने पास झाला. पिळाणीतून इंजिनीअर केलं. पण आपण त्याला एका क्षणासाठीसुद्धा मोकळा श्वास घेऊ दिला नाहीत. परिणाम काय झाला? ‘

कुठे गेला बंटी?’

‘मला माहीत नाही.’

‘अशी नाही सांगणार तू!’

‘…..’

‘बोल. कधीपासून तिथे जात होता?आता काय सांगून गेलाय? असं कसं जाऊ दिलास तू त्याला?त्याच्या शिक्षणावर माझे किती तरी लाख खर्च झाले. माझी सगळी स्वप्नं चूर चूर झाली.

आपले पैसे… आपली स्वप्ने… मला पहिल्यापासून माहीत होतं, तो इस्कॉन मध्ये जाऊन तासण तास बसतो. तिथे त्याला शांती, समाधान मिळतं. त्याने आपल्यासाठी चिठ्ठी ठेवली होती ना?

‘बाबा मी जातोय. आत्तापर्यंत आपण जे सांगितलंत ते मी ऐकलं. इच्छेने, अनिच्छेने. आपण आता काही सांगू नका. कारण आता मी आपलं ऐकणार नाही. मी माझा रास्ता शोधलाय. आपण त्याला मारमारून ‘हिरा’ बनवू इच्छित होता.  आपल्याला मारणच तेवढं येतं॰ तासणं, कोरणं नाही. मी माझा मुलगा गमावला. पण बंटी वाचला. आपल्या पकडीतून सुटून स्वामी श्रीपाद बनला. कुणा नशेड्याची आई बनण्यापासून देवाच्या दयेने मी वाचले.

लकने आपल्या जीवनाचा जोडीदार स्वत:च निवडला. काय करणार? आपल्याकडे वेळ कुठे होता तिच्यासाठी? अमेयला घेऊन आपला आशीर्वाद मागण्यासाठी आली होती नं? आपण तिला आपल्या नजरेपासून दूर व्हायला सांगितलंत. काय कमी आहे अमेयत? एका बॅंकेत अधिकारी आहे. जात वेगळी आहे. एवढाच. पण इतकंच नाही.. यापेक्षाही काही जास्त आहे. आणिते आहे आपला अहंकार. आपल्या परवानगीशिवाय, या घरात दुसर्‍या कुणाला श्वास घेण्याची परवानगी नाही. सीझर झाल्यानंतर पुलक सिरीयस झाली होती. त्यासाठी अमेयचा फोन आला होता. माझं रक्त मॅच होत होतं, म्हणून दिलं. धावपळ करत आपण येण्यापूर्वी घरी आले. सगळी परिस्थिती मी आपल्याला सांगितली. पण काय म्हणालात आपण?

‘मरू द्यायचं होतं तिला. आता ती काही माझी मुलगी नाही. ती माझी कोणीच लागत नाही.’  

‘पण माझी मुलगी आहे. मुलाला गमावलं. कमीत कमी मुलगी तरी हिसकावून घेऊ नका. ‘

उत्तरादाखल कमरेचा बेल्ट साप बनून मला डसू लागला. पाठीवर, कमरेवर उमटलेल्या खुणा हळू हळू  अस्पष्ट होऊ लागल्या. पण काळजाला झालेली जखम दिवसेंदिवस खोल खोल चरतच गेली.

पुलकने पुनीतचा पाचवा वाढदिवस साजरा केला. किती आग्रहाने बोलावलं होतं त्यांनी आपल्याला. कुठल्या आजीला वाटणार नाही की एका शहरात असलेल्या आपल्या नातीला भेटावं? तेदेखील पाच वर्षांनंतर? पण आपण ‘जायचं नाही’ म्हणालात आणि मी गेले नाही. …. अमेयचा अ‍ॅक्सिडेंट झाला होता. हॉस्पितलमधून फोन आला होता. आपण ‘जायचं नाही’ म्हणालात आणि मी गेले नाही.माझी आई  ब्याऐशी वर्षाची आहे.एकटी रहाते. जायचं तर दूरच आपण तिच्याशी फोनवर बोलण्यालासुद्धा नकार दिलात. भाऊ याच शहरात राहतो. त्याच्या मुलाचं बारसं, घराची वास्तुशांत… अनेक कार्यक्रम झाले त्याच्याकडे. त्याने प्रत्येक वेळी बोलावलं. आपण नाही म्हणालात, त्यामुळे गेल्या बाबीस वर्षात मी त्याच्या घरी गेले नाही. त्याबद्दलही फारसं काही नाही. पण परवा आपण जे केलंत, ते अगदी असह्य झालं मला.

भावाच्या मुलाचा विवाह होता. मी आपल्याला सांगितलं, ‘त्याच्या घरातलं हे शेवटचं कार्य आहे.सगळे लोक, नातेवाईक येतील. किती तरी वर्षांनंतर माझी सर्वांशी भेट होईल. संध्याकाळी परत येईन.’

आपण म्हणालात, ‘’खबरदार जर घराच्या बाहेर पडशील तर’

‘फक्त यावेळेला जाऊ दे. एकदा डोळ्यांनी सगळ्यांना बघीन. मग पुढे आयुष्यात कधीही…’

‘गेलीस, तर परत येऊ नकोस. या फ्लॅटचा दरवाजा तुझ्यासाठी कायमचा बंद झालाय, असा समज. मी तीन दिवसांनी चायनाहून परत येईन. गेलीस, तर लॅच बंद करून चावी आत टाकून जा. चावी मिळाली नाही, तर मी तुझ्याविरुद्ध चोरीचा रिपोर्ट करीन.’[

माझी तडफड झाली. अश्रूंची जशी झडी लागली. आणि आपण रात्री घरी उशिरा परत आलात. का? मला ‘चेक’ करण्यासाठी. माझी उत्कट इच्छा पाहून आपल्याला वाटलं होतं की आपण किती का नाही म्हणा ना, मी लग्नाला जरूर जाईन. आपण चायनाला जाणार असल्याचा मी जरूर फायदा उठवीन आणि आपण माझी चोरी पकडाल. जर मी तसं केलं असतं, तर आपण काय केलं असतंत? मला घराबाहेर काढलं असतंत, हेच नं? पस्तीस वर्षांचा माझा संसार वाचवण्यासाठी मी माझ्या काळजाच्या तुकड्यांची, माझ्या मुलांचीसुद्धा पर्वा केली नाही. त्याचं हे फळ मिळालं मला. अनुरोधजी, चोरी मी पकडलीय आपली. आपल्याला त्या दिवशी चायनाला जायचच नव्हतं. त्या दिवशी आपला कुठेही बाहेर जायचा कार्यक्रम नव्हता. मला छ्ळण्यासाठी आपण हा खोटा बहाणा केला होतात. दिवसभर इथेच आपली मीटिंग होती. आपल्या ऑफीसमधून आलेल्या एका फोनमुळे माझ्या सगळं लक्षात आलं. आपला विश्वास मिळवण्यासाठी आता डावावर लावायला माझ्याकडे काहीही नाही. एवढं मात्र जरूर सांगेन की जो स्वत:वरचाच विश्वास गमावून बसलाय, तो दुसर्‍यावर विश्वास कधीच ठेवत नाही.

आपल्या शब्दात- मी म्हणजे घरात रहाणारी एक नालायक, निरुपयोगी बाई

– o –

अनुरोधने पत्र वाचून ते सेंटर टेबलवर असं भिरकावलं, जसं काही पेपरबरोबर आलेला कागदाचा फालतु तुकडा आहे. आता ते ड्रॉइंगरूमची खिडकी उघडून बाहेर बघू लागले. बाहेर रस्त्यावरून अनेक वाहने वेगाने धावत होती. अनुरोधला वाटलं, त्याची कार या धावणार्‍या वाहनात पुढे आहे. सर्व वाहनात त्यांची कार सगळ्यात पुढे आहे. एवढ्यात त्यांची कार अचानक थांबली. कुणी तरी हवाच काढून घेतली, त्यांच्या कारच्या चारही चाकांमधली. क्षणभरासाठी रस्त्यात चक्का जाम झाला. पण दुसर्‍याच क्षणी त्यांच्या कारच्या बाजूने रास्ता काढत सगळ्या वाहनांनी आपापला वेग घेतला.

– समाप्त

मूळ हिंदी  कथा – ‘घर में रहनेवाली औरत’  मूळ लेखक – श्री भगवान वैद्य `प्रखर’

अनुवाद –  सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170ईमेल  – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ घरात राहणारी बाई – भाग १ (भावानुवाद) – श्री भगवान वैद्य `प्रखर’ ☆ सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

☆ घरात राहणारी बाई – भाग १ – भगवान वैद्य `प्रखर’ ☆ सौ. उज्ज्वला केळकर

 गजर होताच अनुरोध रोजच्याप्रमाणे उठून बिछान्यावर बसला. सेल फोन काढून त्याने वेळ पहिली. साडे पाच. त्याने गजर बंद केला. पलंगावरून उतरून स्लीपर घातले आणि ड्रॉइंग रूमकडे वळला.जाता जाता त्याने एक नजर शेजारच्या बिछान्यावर टाकली. तो रिकामा होता. हं! ही उठलीय तर!. अनुमतीचा बिछाना नेहमीप्रमाणेच साफ-सुतरा होता. एक सुरुकुती नाही. ब्घणार्‍याला मुली वाटलंच नसतं की रात्री कुणी इथे झोपलय. कधी दोन्ही बिछाने एकमेकांना जोदोन असायचे व त्यावर एकच बेडशीट घातलेली असेल, तर दोन वेगळे पलंग आहेत, असं वाटणारच नाही कुणाला. चार-पाच वर्षं झाली, दोनहीची मध्ये एक सेंटर टेबल असं ठेवलं गेलाय, की जसं काही दोन रुळांच्या मध्ये फिश – प्लेट आहे.

त्यांनी फोन सेंटर टेबलच्या हवाली केला. किचनमध्ये जाऊन काचेच्या ग्लासमध्ये पाणी घेतलं आणि शेजारच्या खुर्चीवर बसून रोजच्याप्रमाणे जलपान करू लागले. पाणी पिता पिता किचन कट्ट्याकडे लक्ष गेलं. एकदम अस्पर्शीत. पाण्याचा एक थेंब नाही की  वापरलेलं भंड नाही. ‘आज काला चहा न पिताच मॅडम फिरायला गेलेल्या दिसताहेत. ब्रश करून ते ड्रॉइंग रूममध्ये येऊन बसले. एरवी, बसताक्षणीच चहा हजार होतो. आज माडम्ला फिरून यायला उशीर झालेला दिसतोय. काय करावं? चहाविणा शरीराच्या घड्याळाचा काटा जसा काही पुढे सरकताच नाही. मग काय, स्वत: बनवून घ्यावा?हा प्रयोग केला, त्याला किती दिवस झाले! दिवस नव्हे, महाराजा, महीने…! थोडा वेळ वाट बघू या. बनवलेला तयार मिळाला, तर सोन्याला सुगंध. करायला लागलो, तर कोणकोणत्या अडचणींना तोंड द्यावं लागेल, कुणास ठाऊक?डब्यात साखर किंवा चहा पावदरच नसायची. सेलफातील डबे शोधत बसावे लागेल. त्याला डिसूझा साहेबांचं बोलणं आठवलं. ‘यार, किचनमध्ये काही शोधायला जा. आपल्याला हव्या त्या गोष्टीचा दबा सगळ्यात शेव ती मिळणार. तोपर्यंत पन्नास डबे उघडावे आणि लावावे. आणि काय बिशद यावेळी जिथे मिळालाय, तिथेच पुढल्या वेळी मिळेल. अनुरोध व्साहेब, हे कैचा म्हणजे घराच्या आत बायकांनी आपला बनवलेला किल्ला असतो. तिथून त्या आपल्या सार्‍या लढाया लढतात. म्हणून आपल्या किल्ल्याचा भेद कुणी जाणावा, असं त्यांना वाटतच नाही.’  

एका मिनिटानंतर कुणी तरी पायर्‍या चढत असल्याचा आवाज आला. किती वेळा तिला सांगितलं, सकाळी घाई असते. वर येण्यासाठी लिफ्टचा वापर कर पण नाही… ती जिना चढूनच वर येईल. या बाईला बेल वाजवण्यात काय अडचण वाटते, कुणास ठाऊक? दरवाजा जरा खटखटला. सगळ्या अपार्टमेंटचा साऊंड पोल्युशन कमी करण्याचा ठेका जसा काही हिने एकटीने घेतलाय. मॅगॅसेसे अवॉर्डच मिळायला हवं हिला.कुणास ठाऊक, कुठून कुठून काय काय शिकते?. तरी बरं, सगळी मासिकं बंद करून टाकलीत. हा टी.व्ही तो मात्र घरात राहणार्‍या बायकांची डोकी फिरवून टाकतो. दरवाजा उघडला, तर तर समोर वर्तमानपत्र पडलेलं होतं. पेपर घेऊन आत येऊन ते बसले. पण देहाचा घड्याळ…. त्यांनी पेपर बाजूला ठेवला आणि आत येऊन चहा करायला लागले.

चहाच्या पाण्याबरोबरच मनातही काही उसळू लागलं…. आज सांगून टेकन, माझ्या चहापर्यंत परत येणं होणार नसेल, तर किचन कट्ट्यावर सगळं सामान काढून ठेव. चिमटा नाही. कुठला कापड नाही. आता या काय मायक्रोवेव्हवर ठेवायच्या गोष्टी आहेत? समोरच्या भिंतीवर स्टँड लावून दिलाय या सगळ्या गोष्टींसाठी. सगळ्या गोष्टी समोर दिसायला हव्यात. टाईल्समध्ये भोकं पाडताना किती त्रास झाला होतं. पण काय फाडा? घरात तिच्याशिवाय आणखी कोणी रहातं, याचा विचारच नाही. काय सांगायचं, पस्तीस वर्षाच्या संसारात, किमता, सूरी, किंवा किल्ल्या कुठे ठेवायच्या, याच्यावर काही एकमत होऊ शकलं नाही. स्सालं… हे काय जीवन आहे? 

चहा… चहा नाही, कसला तरी कडवट द्रव झाला होता. पण अनुरोधाने सगळा पिऊन टाकला कप खाली ठेवता ठेवता संडासला लागले. त्यांनी उठून दरवाजा आतून लॉक केला. आता या दरम्यान आली तर… लॅचची चावी घेऊन गेलीच असेल. ती कुठे विसरते? चावी आणि मोबाईल… मुलगा आणि मुलगीही इतके आत्मीय नसतील.

टॉयलेटला जाऊन आल्यावर त्यांनी पेपरमधल्या हेडलाईन्स बघितल्या. मग ऑफीस बॅग उघडून डायरी काढली आणि आजच्या एपॉइंटमेंटस् बघू लागले. साडे दहा वाजता सुप्रवायझर्स बरोबर मीटिंग होती. .भिंतीवर लावलेल्या घड्याळाकडे नजर गेली. ‘अरे, सात वाजले. हद्द झाली हिच्यापुढे. ही बाई वेडी-बिडी झालीय का? साडे आठची लोकल चुकली, तर वेळेवर पोचणार तरी कसे? ? ही खरोखर बेअक्कल आहे. खरंच एम. ए. झालीय ना? की वशिला लावून किंवा लाच देऊन सर्टिफिकेट मिळवलय?  हा… हा… मला तरी त्या वेळी काय सुचलं कुणास ठाऊक? चांगल्या इंडस्ट्रीअ‍ॅलिस्टच्या मुलीची ऑफर आली होती. शिकलेली, अगदी रियल सेन्सने. त्या काळात बी.ई. केलं होतं. म्हणजे पस्तीस वर्षांपूर्वी. आज असती तर आपलीसुद्धा ‘इन्फोसिस’ असती. ‘इन्फोसिस’ राहीलं. छोटी-मोठी कंपनी तर असतीच असती. पण बापाला आपल्या अ‍ॅग्रीकल्चर मित्राला उपकृत करण्याची पडली होती न!’

एवढ्यात दरवाजाची बेल वाजली. त्याने पाहीलं, दरवाजाची वरची कडी आतून बंद केलीय. टॉयलेटला जाताना आतून कडी लावलेली असणार. थोडा वेळ बाहेरच उभं राहूदेत मॅडमना. तेव्हा कळेल, नवर्‍याला बॅग हातात घेऊन दरवाजाशी वेट करताना काय वाटतं?

– o –

  ‘ तू करतेस काय, एवढा वेळ दरवाजा उघडायला लागला ते?’

  ‘ मी ऑफीसला जात नाही, याचा अर्थ असा नाही की, दरवाजात उभी राहून आपली वाट बघत राहू? एक मिनीटसुद्धा झालं नाही बेल वाजून.’

   ‘तुम्हा घरात राहणार्‍या बायकांना कसं कळणार एका मिनिटाचं महत्व.

‘नोकरी करण्याची इच्छा कुणाला नव्हती? बोला ना! आपल्या बुटांना पॉलीश करण्यासाठी आणि आपण ऑफीसमधून परत आल्यावर बॅग हातात घेण्यासाठी बाई हवी होती घरात. कुणाला नोकरी करायची असेल, तर करणार तरी कशी?’

 बालकमंदिरातल्या दीड हजाराची नोकरी करण्यापेक्षा घरात राहून नवर्‍याच्या बुटांना पॉलीश करणं जास्त किफायतशीर आहे. ‘

– o –

दरवाजाची कडी काढताच एक विचित्र असा वास त्यांच्या नाकाला स्पर्श करत झापझाप करत पुढे निघून गेला. ‘ही भांडीवालीसुद्धा न …! थोडी दुरून जाऊ शकत होती ना! अनुमतीने डोक्यावर चढवून ठेवलय. नोकरांशी कसं वागावं, एवढही हिला कळत नाही. ’सुटकेचा निश्वास टाकण्यासाठी त्यांनी ड्रॉइंग रूममधली खिडकी उघडली आणि खुर्ची पुढे ओढून पेपर उचलला. एका बातमीवर त्यांची नजर रेंगाळली. ‘सकाळची फिरत असताना टॅक्सीवाल्याने उडवलं.’ हे टॅक्सीवाले पण ना, खूप फास्ट चालवतात. सकाळी सकाळी ट्रॅफिक कमी असतो, म्हणून तर आणखीनच फास्ट. पोलीस नसतो, ना सिग्नल . असे जातात की जसा काही रास्ता त्यांना हुंड्यात आंदण मिळालाय. … अनुमतीलासुद्धा नीट रस्त्याने चलता येत नाही. पुढे कमी आणि मागे जास्त बघते. 

   ‘अठ्ठावनची झालीये. काही फरक पडणारच की चालण्यात!’

   ‘इथे मुंबईत ऐंशी वर्षाच्या बाया पळत सिग्नल पार करतात. पण तुला काय माहिती?’

‘ज्यांना रोज जावं लागतं, त्यांना सवय झालेली असते. मला तर कधी तरीच घराच्या बाहेर पडावं लगतं. तेही पूर्व परवानगीने. पूर्ण शोध घेऊन आणि पडताळणी करून ‘पोलीस इंन्क्वायरी’त समाधानकारक उत्तरे मिळाल्यानंतरच….. आईला भेटायला तर निघाली नाहीस ना… भावाने तर बोलावलं नाही ना… मुलगा तर भारतात आला नाही ना…. की मुलीने बोलावलय, नातीला आजीची आठवण आली म्हणून … सतराशे साठ प्रश्न.’

  ‘साहेब, आज मेंसाहेब नाही आहेत का?’

  ‘ का? बेसीनमध्ये भांडी तर आहेत ना?’

  ‘ होय, पण डिशवॉश लिक्विड संपलय. ‘

  ‘जेवढं असेल, तेवढ्याने आज काम चालव, नाही तर राहूदेत भांडी, तू जा. मला आंघोळीला जायचय.’

भांडीवाली निघून गेली, तशी ते उठून बेसीनशी आले. लिक्विड डिश वॉशचा पाऊच उचलून पहिला. खरोखरच संपला होता. ‘किती वेळेला सांगितलंय, मागायची वेळ यायला नको. बाथरूममध्ये संबण संपायला येत असतानाच दूसरा काढून ठेव. पण नाही…. या, घरात रहाणार्‍या बायका दिवसभर घरात काय करत असतात, कुणास ठाऊक? … अरे, पण हिला आज झालय काय? दुधाची पिशवी फ्रीजमध्ये पडलेली आहे. हां… भाजी. पार्कच्या जवळ सकाळी पालेभाज्या घेऊन भाजीवाले उभे असतात. जेव्हा बघावं, तेव्हा उचलून आणते आणि निवडत बसते दिवसभर. नोकरी करणार्‍या बायका हे काम हिंडत-फिरत किंवा येता-जाता करतात. कळतसुद्धा नाही, कधी भाजी निवडून टाकतात. पण यांच्यासाठी… हे एक मोठ्ठं काम असतं. काय करणार? कोणत्या कोणत्या गोष्टींवर म्हणून वाद घालायचा. जोडीदार वेगाने चालणारा असला, तर जीवन सुसह्य होतं. जाऊ दे झालं. सगळ्यांनाच, सगळं कुठलं मिळायला आणि लग्नं हा तर खरोखर नशिबाचा खेळ आहे. लॉटरी आहे लॉटरी! चला साहेब, आंघोळ करून घ्या.  आली तर उभी राहील बाहेर.

आंघोळ झाल्यावर येऊन घड्याळ पाहीलं. सात चाळीस. ‘ ओफ्हो! आता काय खाक ब्रेक फास्ट बनणार आणि काय खाणार? अजब बाई आहे. माझ्याच नशिबाला आली … पण इतका उशीर आजपर्यंत कधीच झाला नाही. चला महाराज, लोकांना मार्केटिंग शिकवता. थोडी मार्केटिंग घरातच करावी. इगो सोडा आणि मोबाईल लावून पहा. काही अ‍ॅक्सिडेंट वगैरे तर झाला नसेल ना!’

‘…. …. …. ‘

अरे, तिचा फोन तर इथेच वाजतोय. हा इथे फ्रीजवर आहे. मग काय मोबाईल घेऊनच गेली नाही. कमाल आहे. महानगरात पस्तीस वर्ष रहाणार्‍या बाईला किती वेळा सांगायचं , ‘बाई ग, बाहेर जाताना बाकी सगळं विसरलं तरी चालेल, पण मोबाईल न्यायचा विसरू नको. पण हिची पर्स कुठे आहे? पर्स…. पर्स दिसत नाही आहे. अरे, लॅच कीची दुसरी चावी पण इथेच पडलीय. आणि हा कसला कागद? टी.व्ही.वर पडलाय. उं…उं… पत्र दिसतय … बघू या, काय लिहिलय…

– o –

क्रमश: – भाग १

मूळ हिंदी  कथा – ‘घर में रहनेवाली औरत’  मूळ लेखक – श्री भगवान वैद्य `प्रखर’

अनुवाद –  सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170ईमेल  – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “Date with Dad…” लेखक – अनामिक ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहा वाघ ☆

? जीवनरंग ❤️

☆ “Date with Dad…” लेखक – अनामिक ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहा वाघ 

रविवारची आळसावलेली सकाळ. सुटीचा दिवस असल्यानं थोडासा उशिरा उठलो आणि सवयीनं मोबाइलमध्ये हरवलो. हॉलमध्ये आलो. तिथं रोजच्याप्रमाणे नाना पेपर वाचत बसलेले. मला पाहून त्यांनी पेपर पुढे केला. 

“ तुमचं वाचून होऊ द्या. मी नंतर वाचतो. ” नाना पुन्हा पेपरमध्ये हरवले. काळ बदलला तरी सत्तरी पार केलेल्या नानांची पेपर वाचण्याची सवय मात्र बदलली नाही. वाचनात हरवलेल्या नानांना पाहून जुने आठवणींचे एकेक फोल्डर उघडून मन मागे मागे जात थेट शाळेच्या दिवसात जाऊन थांबले. 

मी नानांचा अतिशय लाडका. त्यांच्यासोबत सायकलवरून डबलसीट केलेली फिरस्ती, पाहिलेले सिनेमे…  सगळं आठवलं. एकूणच बालपण मस्त होतं. नाना माझे बेस्ट फ्रेंड. त्यांच्याबरोबर खूप  बोलायचो. बराच वेळ आमच्या गप्पा चालायच्या, म्हणजे मी सांगत असायचो अन ते ऐकायचे. सातवी पर्यन्त हा सिलसिला चालू होता, परंतु नंतर नकळत सगळं बदलत गेलं. जसजसा मोठा झालो तसा शिक्षण, उच्चशिक्षण, करियर, नोकरी, लग्न, संसार, ऑफिस, टेंशन्स अशा एकेक जबाबदाऱ्यात गुरफटलो. मी माझ्या व्यापात आणि त्यांचे रिटायर्ड लाईफ. दोघांचे आयुष्य वेगवेगळे 

झाले . वाद नव्हता पण संवाद नक्कीच कमी झाला. आता तर फक्त कामापुरतं बोलणं व्हायचं. स्वभावानुसार त्यांनी कधीच बोलून दाखवलं नाही अन मलाही जाणीव झाली नाही.

मोबाईलच्या आवाजानं आठवणींची तंद्री तुटली. पुन्हा वास्तवात आलो. शाळेच्या व्हॉटसपच्या ग्रुपवर औपचारिक वाढदिवस शुभेच्छांचा पाऊस सुरू होता. मेसेज न करता फोन करून मित्राला शुभेच्छा देत असताना लक्षात आलं की आज २ ऑक्टोबर, म्हणजे ओळखीतल्या अजून काही जणांचा वाढदिवस. लगेच पाठोपाठ फोन करून शुभेच्छा दिल्या. 

सकाळीच फोनवर बिझी झालेल्या माझ्याकडं नानांनी अर्थपूर्ण नजरेनं पाहिलं.  

“ फोन करून शुभेच्छा देण्याची तुमचीच सवय घेतलीय ” नाना फक्त हसले. 

“ संध्याकाळी अमेरिकेवरून आलेल्या मित्राच्या घरी पार्टी आहे. खूप वर्षांनी भेटतोय. तेव्हा ताईच्या घरी  कार्यक्रमाला तू आणि रिया जा ” नाश्ता करताना मी म्हणालो तेव्हा अपेक्षित असल्यासारखं बायको सूचक हसली.

“ आपण ताईकडं पुढच्या रविवारी जाऊ. शंभर टक्के, प्रॉमिस ” मी.   

“ ठीकय. एंजॉय पार्टी पण लिमिटमध्ये ”

“ डोन्ट वरी, थॅंक यू बायको ”

“ दुपारी जेवायला गोड काय करायचं ” बायकोनं विचारलं 

“ राष्ट्रपित्याचा वाढदिवस म्हणून का?” मी गंमतीने म्हणालो. 

“ मिस्टर, विसरलात ना. आज तुमच्याही वडिलांचा वाढदिवस आहे. ”

आठशे चाळीस व्होल्टचा झटका बसला. पोह्याचा घास घशातच अडकून जोराचा ठसका लागला. दुनियेला आवर्जून शुभेच्छा देणारा मी, नानांचाच वाढदिवस विसरलो. एकदम कसंतरीच वाटायला लागलं. पोह्याची डिश बाजूला ठेवून नानांसमोर जाऊन उभा राहिलो. 

“ काय रे, काही पाहिजे का ? ”

“ वाढदिवसाच्या खूप खूप खूपच शुभेच्छा ” म्हणत वाकून नमस्कार केला आणि कडकडून मिठी मारली, तेव्हा नानांना खूप भरून आलं. मोठ्या मुश्किलीने त्यांनी स्वतःला सावरलं. खिडकीतून बाहेर पाहत उभे राहिले. काही क्षण विलक्षण शांततेत गेलं. मी सुद्धा खूप भावुक झालो. 

“ दुपारी गुळाचा शिरा करते. नानांना आवडतो ” बायकोनं नेहमीप्रमाणे परिस्थिती सांभाळली. सून असूनही नानांच्या आवडी तिला माहिती आहेत आणि मी???  प्रचंड गिल्ट आला. 

“ आज संध्याकाळी तू ताईकडे जाणारेस ना ? ”

“ हो, स्वयंपाक करून जाते ”

“ नको ”

“ का??”

“ आज बापलेक बाहेर जेवायला जातो. नानांना पार्टी!!”

“ आम्हांला !! ” बायको आणि मुलगी एकसुरात म्हणाल्या. 

“ नक्कीच!! पण नंतर. आज दोघंच जातो, प्लीज ” दोघीनी समजुतीने घेतलं.

“ उगीच खर्च कशाला. बाहेर नको ” सवयीने नानांनी नकार दिला. पण मी हट्ट सोडला नाही. 

संध्याकाळी हॉटेलच्या पायऱ्या चढताना नकळत आधारासाठी नानांचा हात हातात घेतला. तेव्हा ते हसले. त्यांच्या मनात काय आले असेल याची कल्पना आली. पस्तीस वर्षापूर्वीची परिस्थिती बरोब्बर उलटी होती.. तेव्हा त्यांनी मला आधार दिला होता.. आता मी. 

काळाने आमच्या दोघांच्या जागा बदलल्या आणि जबाबदाऱ्या सुद्धा….

हॉटेलमध्ये आल्यावर स्टार्टरची ऑर्डर दिली. समोर बसलेले नाना प्रचंड संकोचले होते. त्यांचं अवघडलेपण लक्षात आलं. मनातली अस्वस्थता चेहऱ्यावर दिसत होती. 

“ टेंशन घेऊ नका. रीलॅक्स. ”

“ फार महाग हॉटेल दिसतंय.” आजूबाजूला पाहत नाना म्हणाले. 

“ किती वर्षांनी आपण दोघंच असं आलोय.” 

“ तू अकरावीला असताना हॉटेलमध्ये गेलो होतो त्यानंतर आजच..”

“ बापरे, एवढं डिटेल लक्षात आहे. ग्रेट . ” नाना काहीच बोलले नाहीत. 

“ नाना, सॉरी, माफ करा.”

“ अरे, होत असं. आणि तसंही आता या वयात कसलं आलंय वाढदिवसाचं कौतुक!” 

“ वाढदिवस विसरलो म्हणून नाही तर एकूणच. तुमच्याकडे दुर्लक्ष झालं. नकळत का होईना पण चूक झालीच.”

“ अरे एकदम कोणता विषय घेऊन बसलास.”

“ आज मन मोकळं करू द्या. माझं यश-अपयश, आनंद, दु:ख, चुकलेले निर्णय, निराशा या सगळ्यात ठामपणे पाठीशी उभे राहिलात. माझ्यातला बदल सहज स्वीकारलात. स्वतःवर बंधनं घालून घेतलीत, आणि मी मात्र तुमचा कधी विचारच केला नाही. माझ्या प्रायोरिटीजमध्ये तुम्ही नव्हताच.”

“ हीच म्हातारपणाची खंत आहे. जे झालं ते झालं. सोडून दे.” नाना म्हणाले. 

“ तुम्हांला नेहमीच गृहीत धरलं, ”  मी हात जोडले. एकदम आवाज कापरा झाला तेव्हा आलेला मोठा हुंदका नानांनी आवरला. पुढचे काही क्षण शांततेचे होते. 

“ उगीच मनाला लावून घेऊ नकोस. बापलेकाचं नातं असंच असतं. आई जिवलग मैत्रीण होऊ शकते, पण वडील मित्र झाले तरी अंतर राहतेच.” 

“ खरंय, पण हे ठरवून होत नाही. तुम्ही कधीच इच्छा सांगितल्या नाहीत आणि मलाही त्या समजून घेता आल्या नाहीत.” पुढचं बोलता येईना.

“ वडील आणि कर्ता मुलगा यांच्यात कमी होणारा संवाद हा या नात्याला शाप आहे. ” एका वाक्यात नानांनी कैफियत मांडली. 

“ यापुढे काळजी घेईन.”

“ अरे तू मुद्दाम केलं नाहीस आणि करणार नाहीस हे माहितेय. एवढं मनाला लावून घेऊ नकोस.”

“ तरी पण.. खूप अपराध्यासारखं वाटतं.” 

नंतर बराच वेळ मी नळ सुरू केल्यासारखा धो धो बोलत होतो. सगळा बॅकलॉग भरायचा होता. अगदी शाळेत असताना त्यांच्याशी बोलायचो तसाच. नाना शांतपणे ऐकताना गालातल्या गालात हसत होते.

“ काय झालं. हसताय का ?”

“ इतका मोठा झालास तरी मूळ स्वभाव बदलला नाही,” नाना दिलखुलास हसत म्हणाले. मलाही खूप शांत वाटत होतं. मोठ्ठं ओझं उतरल्याचं समाधान होतं.  

“ खरं सांगू , बोलायची खूप इच्छा व्हायची. पण तुझी धावपळ, घरातली चिडचिड बघून बोलायची हिंमत झाली नाही. तुमच्या आयुष्यात मोबाईल आणि अस्वस्थता सतत सोबत असते.” 

“ पर्याय नाही.”

“ मान्य. तरीही पैसा, संपत्ती, सोशल स्टेटस हे सगळं मृगजळ. त्यामागे किती आणि कुठपर्यंत पळायचे याची लक्ष्मणरेखा आखून ठेव. स्वतःला जप. तब्येतीची काळजी घे. लोकांसाठी नाही तर आपल्या माणसांसाठी जगायचं.”

“ नक्कीच.”

“ आजचा दिवस कायम लक्षात राहील.”

“ माझ्याही.”

“ सर्वात महत्वाचं, आज माझा उपास नाहीये ” नाना मिष्किलपणे म्हणाले. बोलण्याच्या गडबडीत मी जेवणाची ऑर्डरच दिली नव्हती. 

“ आयला, हो की….” नकळत तोंडातून शब्द बाहेर पडले तेव्हा नानांकडे पाहत जीभ चावली. 

“ चायनीज खाऊ ”.. नानांची फर्माईश. जेवणाची ऑर्डर देताना नानांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून  डोळे भरून आले……. 

…….. बाप-लेकाच नातं रिचार्ज होऊन अपडेट झालं. आईच्या आठवणीनं एकदमच  दोघांची नजर आभाळकडं गेली. 

— घरातला अबोल आधारस्तंभ असलेल्या सर्व “बाप”माणसांना  समर्पित.. 

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सुश्री स्नेहा वाघ

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ देवाचं दुकान… अज्ञात ☆ सुश्री मंजुषा पाटील ☆

? जीवनरंग ?

🚩देवाचे दुकान🙏… अज्ञात ☆ सुश्री मंजुषा पाटील 

एके दिवशी मी रस्त्याने जात होतो, वाटेत एक बोर्ड दिसला, ‘ईश्वरीय किराणा दुकान,’माझी उत्सुकता वाढली. या दुकानाला भेट देऊन त्यात काय विकले जाते ते का पाहू नये?हा विचार येताच आपोआप दार उघडले, थोडेसे कुतूहल असेल तर दरवाजे आपोआप उघडतात, ते उघडावे लागत नाहीत!…

मी दुकानात पाहिले तर सर्वत्र देवदूत उभे होते. एका देवदूताने मला टोपली दिली आणि म्हणाला, “माझ्या लेकरा, काळजीपूर्वक खरेदी कर, माणसाला आवश्यक असलेली प्रत्येक गोष्ट इथे आहे!”

देवदूत पुढे म्हणाला, “जर तुला टोपली एकाच वेळी भरता येत नसेल, तर पुन्हा ये आणि पुन्हा टोपली भर.!

आता मी सगळं बघितलं, आधी संयम विकत घेतला, मग प्रेम,मग समजूतदारपणा, मग विवेकाचे एक-दोन डबे घेतले.पुढे जाऊन विश्वासाचे दोन-तीन डबे उचलले, माझी टोपली भरत राहिली.पुढे गेलो, पावित्र्य दिसले; विचार केला कसं सोडू, तेवढ्यात शक्तीची पाटी आली, शक्ती पण घेतली. हिंमतसुद्धा घेतली, वाटले की हिंमतीशिवाय आयुष्यात काहीच चालत नाही!…

आता सहिष्णुता घेतली, मग मुक्तीची पेटीही घेतली.माझे सद्गुरू प्रभुजींना आवडणाऱ्या सर्व वस्तू मी विकत घेतल्या. मग एक नजर प्रार्थनेवर पडली, मी त्याचाही डबाउचलला.कारण सर्व गुण असूनही माझ्या कडून कधी काही चूक झाली तर मी देवाला प्रार्थना करेन की देवा, मला माफ कर!…

आनंदी होऊन मी टोपली भरली, मग मी काउंटरवर गेलो आणि देवदूताला विचारले, “सर,या सर्व गोष्टींसाठी मला किती पैसे द्यावे लागतील?”

देवदूत म्हणाला, “माझ्या बाळा, इथली बिल भरण्याची पद्धतही दैवी आहे. आता तू जिथे कुठे जाशील, तिथे या गोष्टींची उधळपट्टी कर, सर्वांना मुक्तपणे वाट दे.आणि या गोष्टींचे बिल असेच भरले जाते!…”

या दुकानात क्वचितच कोणी प्रवेश करतो, जो आत जातो तो श्रीमंत होतो, व या गुणांचा भरपूर उपभोग घेतो आणि लुटतो!…

प्रभूंच्या या दुकानाचे नाव आहे ‘सत्संगाचे दुकान’ सद्गुणांचा खजिना भगवंताने दिला आहे, रिकामा झाला तरी सत्संगाला या आणि टोपली भरा!…

देवाच्या या दुकानातून मी एकतरी वस्तू आपलीशी करू शकेन असा मला आशीर्वाद द्या.!

लेखक – अज्ञात 

प्रस्तुती – सुश्री मंजुषा पाटील 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ माऊली… भाग – 2 – सुश्री संध्या सोळंके-शिंदे ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? जीवनरंग ?

☆ माऊली… भाग – 2 – सुश्री संध्या सोळंके-शिंदे ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

(“काय दिती रं तुझी ती शाळा ‘”) इथून पुढे —-

आयुष्याचे कैक उत्सव, इच्छा वेळोवेळी वजा केलेल्या त्या शिष्याला गुरूने गणितातली वजाबाकी समजावून सांगितली…. त्याक्षणी ते ज्ञानही आधाशागत प्राशन करत  होते त्याचे कान.

संवाद संपला… डोळे मिटून मॅडम विचार करू लागल्या…

‘जगण्यासाठी आयुष्याच्या काही अलिखित अटी गुपचूप मान्य केलेल्या असतात प्रत्येकानेच. अश्वत्थाम्यासारख्या असंख्य जखमा आजन्म मिरवत असतात काही जीव ! पोटातली भुसभुशीत दलदल भुकेच्याही बाहेर एक जग असतं हे विसरून जायला भाग पाडते. सादळलेल्या परिस्थितीचे ओले पापुद्रे सोलण्यात उभा जन्म जातो… अस्तित्वावर बुरशी चढवत ! अस्तित्वहीन जन्माची ठणकही जाणवू देत नाही ती भूक. प्रगतीच्या गुरुत्वाकर्षणकक्षेच्या कोसो दूर हुंदडत उभं आयुष्य जातं अन् एक  दिवस अवेळी अंधार पांघरून निपचित निजतं… खरंच… वास्तवाइतकं परखड, पारदर्शी काहीच नसतं… काहीच !

दीर्घ सुट्टीनंतर ,शाळा भरल्या. वर्गावर्गात हजेरी सुरू झाली… 

१.यश बनसोडे….यस मॅडम…!

२.अथर्व आवड…यस मॅडम…!

.

.

.

.

.

.

९.माऊली बडे   ……..शांतता…!

त्याक्षणी त्याच्या डेस्कवरची ती रिकामी जागा खूप काही बोलत होती..! त्याचा मंजुळ आवाज, उत्तर देण्यासाठीची धडपड..!… 

शाळा सुटली.. मुले लगबगीनं वर्गाबाहेर पडली.. मॅडम सामानाची आवराआवर करू लागल्या.. पर्स, टाचणवही, हजेरी, पुस्तके, बॉटल….सगळं दोन हातांत घेणं….केवळ अशक्य !… तिथेही ‘त्याची’ आठवण आली.. तो नित्याने थांबायचा.. मॅडमला हे सगळं घेऊ लागायचा. पाण्याची बॉटल हातात घेऊन सर्वांत शेवटी मॅडमसोबत वर्गाबाहेर  पडायचा… पराकोटीची समज अन् माया असते एखाद्या माणसात !

शाळा सुटल्यावर मॅडम गाडीवर घरी निघाल्या. तोच मागून कुणीतरी… ” मॅडम ss ..” अशी हाक मारली.

गाडी थांबवून मागे पाहिलं तर एक छोटी मुलगी पळत आली अन् म्हणाली,  ” तुम्हाला माऊलीच्या आईनं बोलावलंय.”

” त्या इथं कसं काय? कधी आले ते सगळे इकडे? ” म्हणेपर्यंत तर ती मुलगी पळूनही गेली…आश्चर्य अन् आनंदही वाटला. मनोमन सुखावल्या मॅडम. तशीच गाडी माऊलीच्या घराकडे वळवली. रस्त्यावर मुलं खेळत होती..

“मॅडम,मॅडम “.. हाका मारत होती. पण ह्या सगळ्यांत माऊली कुठेच दिसला नाही. घरासमोर आल्या.

कुडाचं, पत्र्याचं घर ते !.. दुरावस्था झालेलं.. सगळं भकास..ओसाड…

दाराआत डोकावलं तर.. भयाण शांतता….त्या शांततेत घोंगावणाऱ्या माशांचा आवाज, जवळच्या नाल्याची दुर्गंधी,

पावसाळ्यात गळणाऱ्या पत्र्यांच्या छिद्रांतून डोकावलेले, जागोजागी दारिद्र्याची लक्षणे दाखवणारे कवडसे..

मागच्या दाराबाहेर खाटेवर दारू पिऊन बेधुंदावस्थेत पसरलेला माऊलीचा बाप….. अन् कुठल्याशा कोपऱ्यात गुडघ्यांत तोंड खुपसून बसलेली माऊलीची आई!

आत जाताच..” माऊली ” हाक मारली.

तोच त्या आईने छताकडे बघत मोठ्याने हंबरडा फोडला…..” माऊली, तुझ्या मॅडम आल्यात रे ! ये की लवकर !”

…. काळजात चर्रर्र झालं! शंकेची पाल चुकचुकली, पण नेमका अंदाज येईना !

तोच मागून आवाज आला,

” काय सांगावं मॅडम, माऊलीचा घात केला हिनं ! मारून टाकलं ह्या बाईनं त्याला !”

…. भोवताली अगणित किंचाळ्या टाहो फोडत घिरट्या घालत असल्यागत झालं एकदम.

घरमालकीण मॅडमजवळ येत म्हणाली, ” मीच निरोप धाडला होता तुमाला बोलवायला. मॅडम,ही बया एकट्या माऊलीला घरी सोडून, पोरींला घेऊन कामावर गेली, जेवणाच्या सुट्टीत आली तर लेकराच्या तोंडाला फेस, अन् हातपाय खोडत होतं ते !.. माऊलीला सर्प डसला वो, लेकरू तडपडुन मेलं ! त्याला नगं न्हेऊ म्हणलं होतं मी हिला.. मी संबाळते म्हणलं होतं त्याला चार महिने !पण हिला ईश्वास न्हाई ! चार पोरीच्या पाठीवर झाल्यालं नवसाचं पोरगं  म्हणून सोबत न्हेलं हिनं, आन काटा निगाला लेकराचा ! लई भांडून गेली होती ना ही तुमाला? मंग नीट संबाळायचं होतं की त्याला! “

…. तिचे शब्द मॅडमच्या कानात लाव्हा ओतल्यागत शिरत होते. पण मेंदू मात्र थंड पडत होता.

 कोरड्या ठक्क डोळ्यांतून रक्ताचे अश्रू तेवढे बाहेर पडायचे बाकी होते ! तरीही अवंढा गिळून जमिनीकडे खिळलेली नजर विचलित न होऊ देता मॅडमने विचारलं,

” दवाखान्यात नेलं नाही का लवकर? “

” इकडं यायला निगाली होती, पण मुकादमानं  येऊ दिलं न्हाई म्हणं. आधी घेतलेली 20,000 उचल दे म्हणला म्हणं !

तितंच कुण्या जाणत्याला दाखवलं म्हणं. दोन दिवस तडपडत होतं म्हणं लेकरू.दवाखान्यात दाखवलं असतं तर हाती लागला असता मावल्या ! … त्याला सदा एकच म्हणायची…’ काय देती रं मावल्या तुझी शाळा?? ‘ त्याच्या वह्या   पुस्तकावर राग राग करायची, म्हणून त्यानं जाताना कपड्याच्या घड्यात घालून न्हेली पुस्तकं ! अन् आता रडत बसलीय !”…. म्हातारी घरमालकीण पोटतिडकीने बोलत होती.

छताकडं शून्यात नजर लावून ती आई बघत होती ! स्वतःच्या लेकराला वाचवू न शकल्याचा आरोप होत होता तिच्यावर !

… त्याच्या शेवटच्या पेपरमधील त्याचं देखणं अक्षर, आईच्या आडून बघत त्याने डोळ्यांनी केलेली आर्जवे, गुपचूप केलेल्या फोनमधील त्याचा दबका, पण सच्चा आवाज … सारं सारं चित्रफितीसारखं डोळ्यासमोरून जात होतं मॅडमच्या !… 

त्या माऊलीचं सांत्वन न करताच  मॅडम उठून दाराकडे चालू लागल्या… पाषाण हृदयाने, निःशब्द…!

तोच मागून आवाज आला, ” मॅडम…पाच भुकेली तोंडं पोसण्यापलीकडं काहीच करू शकले नाही मी उभ्या 

जन्मात ! मावल्या असा सोडून जाईल,असं स्वप्नात देखील वाटलं नव्हतं ! लेकरानं तडपडत माझ्या डोळ्यात बघत, माझ्या मांडीवर जीव सोडला. त्याची आठवण आली तर माझ्याकडं त्याचा साधा एक फोटो पण नाही, ह्याचं लै वाईट वाटायचं ! आज त्याचं सामान बघताना एक गोष्ट सापडली…तुम्हाला मी म्हणलं होतं ना…. ‘ तुमची शाळा काय देती म्हणून? ‘ माझ्या जन्माला पुरंल आशी, त्याची सगळ्यात मोठी आठवण दिलीय मला तुमच्या शाळेनं ! “

… असं म्हणत तिनं छातीशी कवटाळलेल्या हाताच्या मुठीतला ऐवज उघडून मॅडमसमोर धरला…

… शाळेनं दिलेलं ओळखपत्र होतं ते…! 

…. तिच्या काळजाचं ! मातीआड झालेल्या एका हसऱ्या, समंजस दुःखाचं !

— समाप्त   —

(शिक्षक म्हणून भोगलेला अनुभव आहे हा ! …दुर्दैवाने..पात्रांची नावं  बदलली आहेत. आजही तितक्याच तीव्रतेने आठवण येते त्याची..!)

लेखिका – सुश्री संध्या सोळंके-शिंदे, अंबाजोगाई

प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ माऊली… भाग – 1 – सुश्री संध्या सोळंके-शिंदे ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? जीवनरंग ?

☆ माऊली… भाग – 1 – सुश्री संध्या सोळंके-शिंदे ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

“काय देती वो तुमची शाळा? तुमाला तुमच्या शाळेचंच पडलंय…इतं भुकेनं आss वासलेली पाच तोंडं हायेत पदरात माझ्या. वरून नवरा तसला पिदाडा. पोटापाण्याचं आदी बागावं का तुमची शाळाच बगावी? नुसती शाळा शिकून पोट भरत नसतंय मॅडम ! आन पयलीचं वर्ष एवढं काय मह्त्वाचं नसतंय.. कायी फरक पडत न्हाई थोडे दिवस शाळा बुडली तर…… मुकादमाकडून 20,000/- रुपय उचल घेतलीय मी घराचे गळके पत्रे दुरुस्त करायला…ती फेडावी लागल का न्हाई? 

आईच्या पदराआड तोंड लपवत, किलकिल्या डोळ्यांनी हे सारं ऐकत होता माऊली ! संध्या मॅडम आपल्या आईला समजावण्यात अयशस्वी झाल्यात, आता सगळं आपल्या मनाविरुद्ध होणार, हे एव्हाना लक्षात आलं होतं त्या चिमुकल्या जिवाच्या !

मॅडम म्हणत होत्या, ” शाळेच्या होस्टेलवर  सोय होईल त्याची राहण्याची. मी विचारते संस्थेला. हुशार आहे हो माऊली, असं मध्येच नेऊन त्याचं नुकसान नका करू! “

” नगं…. पाचीच्या पाची लेकरं घेऊन चाललेय मी. चार पोरीच्या पाठीवर झालंय हे पोरगं मला, त्याला इथं ठेऊन तिथं जीव कसा लागल माजा? “

तब्बल आठवडाभराच्या चर्चेअंती संध्या मॅडमला माऊलीच्या आईकडून मिळालेलं हे निराशाजनक अन् काहीसं कटू उत्तर होतं. पण त्याक्षणी त्या हेही जाणून होत्या की, त्यांना केवळ एक शिक्षणाबद्दल अनास्था असलेला,अशिक्षित पालक बोलत नसून, नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून गेलेली, पाच लेकरांच्या पोटापाण्याचा प्रश्न भेडसावत असलेली हतबल आई बोलत होती.

अखेर परिस्थितीसमोर नाईलाज झाला अन् उद्या प्रथम सत्राचा शेवटचा पेपर देऊन माऊली काही महिन्यांसाठी शाळा सोडून आईसोबत ऊसतोडीसाठी भटकंती करत  गावोगाव फिरणार, यावर शिक्कामोर्तब झालं !

गरिबीचे निकष अन् व्याख्या तिला सोसणाराच सांगू शकतो, इतरांनी त्यावर सांगितलेल्या उपाययोजना केवळ  पुळचट असतात !

दुसरा दिवस…

माऊली मन लावून पेपर सोडवत होता. मॅडम त्याच्याकडे बघत विचार करत होत्या… 

‘ काय भविष्य असेल अशा लेकरांचं ? पोटाला दोन वेळचं अन्न मिळवणं हे आणि हेच अंतिम ध्येय असलेल्या अशा कैक लोकांचं? ‘… मॅडम विचारात असतानाच माऊली त्यांच्यासमोर सोडवलेला पेपर घेऊन उभा राहिला. मॅडम भानावर आल्या.पेपरसोबत त्याने एक छोटीशी कोरी चिठ्ठी मॅडमकडे सरकवली… 

” मॅडम, आमच्यासोबत मावशी पण येणार आहे. मला तुमचा नंबर द्या, मावशीच्या फोनवरून मी कधी मिसकॉल केला तर कराल का मला फोन? “ त्या चिमुकल्या जीवाची ती साधीच मागणी किती आर्त वाटली त्याक्षणी !

पेपरवर नजर फिरवली. किती सुवाच्य अक्षर, अचूकता…! त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे टक लावून बघितलं मॅडमने.

— घंटा वाजली, शाळा सुटली, अन् एक चिमुकला जीव आपल्या मनाविरुद्ध जगण्यासाठी चकारही न काढता निघून गेला.

लखलखता दिवाळसण…

झगमगाट, रोषणाई, नवनवीन खरेदी, उत्साह, गुलाबी थंडी….. एकुणात सुखवस्तू सण..!

पण जगाच्या एका कोपऱ्यात एक कोवळा जीव कुठेतरी हाच सण ऊसाच्या घनदाट रानात, किर्रर्र अंधाराच्या साक्षीनं केवळ कल्पनेत साजरा करत होता. त्या किर्रर्रर, कर्कश्श रानात, दिवसभर काम करून दमून निजलेल्या माणसांच्या घामाच्या दुर्गंधात, किरकिऱ्यांच्या आवाजात, अठराविश्व दारिद्र्याच्या ओटीत, शिक्षणाची चटक लागलेला पण परिस्थितीपुढे हतबल झालेला एक जीव त्या भयाण शांततेत  मनातल्या मनात किंचाळायचा… 

… गावाबाहेर दूर कुठेतरी उसाच्या फडात तंबू ठोकून राहिलेल्या त्याच्या टोळीत त्याला दुरून एखाद्या फटाक्याचा बारीकसा आवाज, लुकलुकणारा एखादा आकाशकंदील दिसायचा अन् त्या कडाक्याच्या थंडीत अंगावरच्या फाटक्या कपड्यानिशी बाहेर येऊन तो हा सण अधाशागत कानाडोळ्यांनी प्यायचा!… घटाघटा..!!

दिवसा ऊसाच्या चरबट पानांच्या सळसळीत त्याच्या पुस्तकाच्या पानांचा आवाज विरून जायचा.

भाऊबीजेदिवशी दुपारी मॅडमचा फोन अचानक किंचित चमकला, थरथरला…लगेच बंद झाला…

एखादी किंकाळी दाबावी तसा!… Unknown number.

मॅडमने त्यावर फोन लावला. रिंग जाते न जाते, तोच फोन उचलला गेला. एक मृदू, कोवळा,नाजूक, सच्चा पण दबका आवाज… गुपचूप केला असावा …

” मॅडम, मी माऊली! “

” बोल बाळा, कसा आहेस? कुठे आहेस? दिवाळीत आलास का इकडे? “

“मॅडम, आम्ही इकडं खूप लांब आलोत. मला ह्या गावाचं नाव माहीत नाही. सारखंच गाव बदलत जातोत आम्ही ऊसतोडीला ! मुकादम खूप कडक आहे.”

“बरं..! अरे, दिवाळी कशी झाली मग तुझी ? नवा ड्रेस घेतलास ना? आईनं काय काय केलंय फराळाला “

“न्हाई मॅडम, मायजवळ पैशे न्हाईत भाजीचं सामान आणायला. चार दिवस झाले,म्ही रानातली कच्ची पात खायलोत भाकरीसोबत. कोरडा घास गिळतच न्हाई, पाणी पेत पेत जेवावं  लागतंय. इथं मित्र पण नाहीत खेळायला. नयन, अर्णव, रुपेशची खूप आठवण येते.”

….. ओह ! पराकोटीचं दारिद्र्य, दुःख बोलत होतं केविलवाण्या स्वरात !

“मॅडम, मला गणितातली वजाबाकी समजत नाहीय, सांगतात का समजून? “

“अरे, तिथं पण अभ्यास करतोयस की काय? “

“हो मॅडम, मी सगळी पुस्तकं आणलीत इथं. बहिणी, माय कामावर गेल्या की मी अभ्यास करतो. वहीवरच्या तुमच्या सह्या बघून खूप आठवण येते तुमची. शाळा किती तारखेला भरणारयेत मॅडम? आईला विचारलं तर लई खेकसती माझ्यावर !….शाळेचं नुसतं नाव जरी काढलं तरी. सारखं म्हणती.. “ काय दिती रं तुझी ती शाळा?'”

— क्रमशः भाग पहिला 

लेखिका – सुश्री संध्या सोळंके-शिंदे, अंबाजोगाई

प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मात… भाग – 5 (भावानुवाद) – सुश्री भावना ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर☆

सौ. गौरी सुभाष गाडेकर

? जीवनरंग ❤️

☆ मात… भाग – 5 (भावानुवाद) – सुश्री भावना ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆

(पूर्वसूत्र: अक्षय शालिनीला शाळेची नोकरी सोडून पांड्याजींची सेक्रेटरी व्हायला सांगतो. गरजेच्या वेळी ते मदत करतील, असंही सांगतो…. आता पुढे….)

आणि मग पुन्हा मासा गळाला लागला. ती सेक्रेटरी झाली.

हेही सांगितलं पाहिजे की माझ्या आग्रहावरून तिने आधीच तिचे लांब केस कापले होते. खूप प्रयत्नांनंतर ती स्लीव्हलेस ब्लाऊझ आणि हाय हिल सॅन्डल्स घालायला लागली होती. शेवटी तिचं रूपयौवन कोणाच्या खुशीसाठी होतं? माझ्याच ना? आता सगळेच खूश राहतील. मीही आणि पांड्याजीही.

दोन-चार दिवस सगळं व्यवस्थित चाललं. मी श्वास रोखून ज्या क्षणाची प्रतीक्षा करत होतो, तो आला एकदाचा.

माझ्या खांद्यावर डोकं ठेवून शालिनी ओक्साबोक्सी रडू लागली. पांड्याच्या गलिच्छ वागण्याने ती एवढी वैतागली होती, की मरण्यामारण्याच्या गोष्टी करू लागली. कितीतरी वेळ ती बोलत होती आणि मी ऐकत होतो.

किती मागासलेले संस्कार! आजकालच्या मुली एवढ्या बोल्ड आणि बिनधास्त असतात आणि माझ्या नशिबात साली ही काकूबाई लिहिलीय. कोणी नुसता स्पर्श केला, तरी कलंकित होणारी. माय फूट!

किती वेळ मी तिचं पावित्र्यावरचं लेक्चर ऐकत बसणार? शेवटी बोललोच, ” जराशी तडजोड करून जर आपलं आयुष्य सुधारणार असेल, तर काय हरकत आहे? जरा थंड डोक्याने विचार कर, शीलू. आपल्याला पांड्याची गरज आहे. त्याला आपली गरज नाहीय. या बारीकसारीक गोष्टींनी असा काय फरक पडतोय? “

ती विदीर्ण नजरेने बराच वेळ माझ्याकडे बघत राहिली. मग दाटलेल्या कंठाने बोलली, ” हो. काय फरक पडतोय!”

तिची नजर, तिचा स्वर यामुळे मी अस्वस्थ झालो. तरीही हसून बोलणार, तेवढ्यात तीच म्हणाली, “तू चांगले दिवस यायची किती वाट बघितलीस! आता येतील ते. असंच ना?”

माझ्या मनातलं तिच्या तोंडून ऐकल्यावर मी झेलपाटलोच. तरी स्वतःला सावरत म्हटलं, ” मला असं नव्हतं म्हणायचं, शीलू. तुझं सुख….. “

मला अर्ध्यावरच तोडत ती म्हणाली, “काही गोष्टी न बोलताही समजतात, अक्षय. तर पैशासाठी मी एखाद्या म्हाताऱ्याला गटवायचं, हेच ना?”

आता तुम्हीच सांगा, इतक्या दिवसांच्या प्रेमाची हिने अशी परतफेड करावी? प्रेम असं निभावतात? स्वार्थी!विश्वासघातकी बाई! जीवनाच्या वाटेवर चालताचालता मध्येच माझा हात सोडून दिला. शेवटी मीही तिचाच होतो ना? काय म्हणालात? मीच हात दाखवून अवलक्षण…..

आता काय सांगू? तिने माझ्या बापाशी लग्न केलं. आज ती माझी आई आहे. आणि माझ्या बापाला बोटांवर नाचवतेय. आत्ताच्या माझ्या या दशेला तीच कारणीभूत आहे. विश्वास नाही बसत?

– समाप्त –

मूळ हिंदी  कथा – सुश्री भावना  

भावानुवाद –  सौ. गौरी सुभाष गाडेकर

संपर्क –  1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares