मराठी साहित्य – जीवनरंग ☆ कावळ्यांचा सण… ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

🔆 जीवनरंग 🔆

☆ कावळ्यांचा सण… ☆ श्री मंगेश मधुकर

रविवारी सगळं कसं आस्ते कदम चाललेलं. रोज घड्याळाच्या तालावर नाचणारं आयुष्य गोगलगाय असतं. आमच्या घरात सुद्धा असंच आळसावलेलं वातावरण. आई किचन तर हॉलमध्ये बाबा पेपर वाचत होते. मी आणि दीदी मोबाईलमध्ये गुंग.

“परवा सकाळी सगळ्यांनी ऑफीसला तासभर उशीरा जा” किचनमधून आई म्हणाली.

“बरं” कारण न विचारता बाबांनी होकार दिला.

“आई, काही विशेष”दीदी 

“जमणार नाही” मी म्हणताच आई तडक हॉलमध्ये आली.

“जमवावं लागेल. घरात महत्वाचं कार्य आहे म्हणून थांबायला सांगितलं. कळलं”

“तुझं प्रत्येक कार्य महत्वाचं असतं. परवा नेमकं काय आहे. ते किती महत्वाचं आहे. ते आम्हांला ठरवू दे. ”

“येस, आय टोटली अॅग्री”कधी नव्हे दीदीनं माझी बाजू घेतली. बाबांकडून मात्र काहीच प्रतिक्रिया नाही.

“पितृ पंधरवडा चालूयं”

“ओ! म्हणजे कावळ्यांचा सण”मी चेष्टेच्या सुरात म्हणाल्यावर आई चिडली पण काही बोलली नाही.

“गप रे, काहीही बोलू नकोस. ”दीदी.

“सण म्हण किवा अजून नावं ठेवा. तुम्हांला ऑफिसला उशीर होऊ नये म्हणून गुरुजींना सकाळी लवकर बोलावलंय. ”

“बाबा थांबणारेत तेव्हा आम्ही ऑफिस गेलो तर काहीच प्रॉब्लेम नाही. उगीच कशाला उशिरा जायचं”दीदी.

“तसंही फार काही महत्वाचं नाहीये”मी दिदीला दुजोरा दिला.

“ते मला माहित नाही. नमस्कार केल्याशिवाय कोणीही घराबाहेर जायचं नाही. हे फायनल”आईनं जाहीर केलं.

“आई, हट्ट करू नकोस. ”

“हट्ट मी करते की तुम्ही!! आणि हे काही माझ्या एकटीसाठी करत नाहीये. ”

“मग कोणासाठी?”

“आपल्यासाठी”

“कुणी सांगितलं करायला”

“सांगायला कशाला पाहिजे. पिढ्यानपिढ्या चालत आलयं”

“म्हणून आपण तेच करायला पाहिजे असं नाही”

“हे बघ उगीच वाद घालू नकोस”

“मला हे पटत नाही आणि तसंही या सगळ्या प्रकाराला काहीही लॉजिक नाहीये. ”

“प्रत्येक गोष्टीत लॉजिक शोधायचं नसतं. काही गोष्टी मनाच्या समाधानासाठी करायच्या असतात”

“तुला जे करायचं ते कर ना. आम्हांला आग्रह का करतेस. ”

“आपल्या माणसांसाठी तासभर वेळ काढू शकत नाहीस. इतका बिझी झालास”.

“प्रश्न तो नाही. बुद्धीला पटत नाही. ”

“म्हणजे माणूस गेला की आपल्या आयुष्यातून कायमचा वजा करायचं का?गेला तो संपला. असंच ना. ” 

“आई, इमोशनल होऊ नकोस. मी असं काही म्हटलेलं नाही. फक्त पित्रकार्य. मृत व्यक्तींच्या नावानं कावळ्यांना घास ठेवणं या गोष्टी डज नॉट हँव सेन्स.. ”माझं बोलणं आईला आवडलं नाही.

“ईट हॅज सेन्स, ”पेपर बाजूला ठेवत बाबा म्हणाले.

“म्हणजे, बाबा, तुम्ही पण.. ”

“येस, आईचं बरोबर आहे. तू साध्या गोष्टीचा इश्यू करतोयेस”

“गोष्ट साधीच आहे मग एवढा आग्रह का?”

“तेच मी म्हणतोय. एक नमस्कारासाठी एवढा आग्रह का करावा लागतोय. ”

“मला हे प्रकार आवडत नाही आणि मान्यही नाहीत”

“तू एकांगी विचार करतोयेस. यासगळ्याकडं दुसऱ्या बाजूने बघ. ”

“म्हणजे”

“एकाच घरात राहूनही कामाच्या व्यापामुळे एकमेकांशी निवांत बोलायला वेळ मिळत नाही आणि इथं तर विषय दिवंगत व्यक्तींविषयी आहे. काळाच्या पडद्याआड गेलेली माणसं हळूहळू विस्मरणात जातात. महिनोमहीने त्यांची आठवणसुद्धा येत नाही. यानिमित्तानं त्यांचं स्मरण करून काही धार्मिक कार्य केली तर त्यात बिघडलं काय?”

“आठवणच काढायची तर मग कावळ्यांना घास देणं असले प्रकार कशासाठी?इतरवेळी कावळ्यांकडे बघायचं नाही आणि या पंधरा दिवसात मात्र कावळा हा मोस्ट फेवरेट!!. ” 

“पुन्हा तेच!!तू फक्त क्रिया कर्माविषयीच बोलतोयेस. ”

“ज्यांचा वारसा आपण चालवतो त्या पूर्वजांविषयी कृतज्ञता व्यक्त करणं हाच प्रमुख उद्देश आहे. ”

“तरी पण बाबा.. ”

“मॉडर्न विचारांच्या नावाखाली प्रत्येक जुन्या गोष्टी, रीती, परांपरांना नावं ठेवणं, त्यांची चेष्टा करणं योग्य नाही. इतकी वर्षे यागोष्टी चालूयेत त्याच्यामागे काही कारण असेलच ना. ”

“प्रॉब्लेम हा आहे की तुमच्यासारख्यांचा सांताक्लोज चालतो पण कावळ्याला घास ठेवला की लगेच ऑर्थोडॉक्स, जुनाट विचारांचे वगैरे वगैरे अशी लेबल लावता. ”आई. “मला सांग. गेलेल्या व्यक्तीचा फोटो घरात का लावतात”बाबांचा अनपेक्षित प्रश्न.

“नक्की सांगता येणार नाही” 

“भिंतीवर फोटो लावणे. हार घालणं हे सगळं पूर्वी व्हायचं. आजकाल हॉलमध्ये निवडुंग चालतो पण फोटोची अडचण होते. कपाटातला फोटोसुद्धा कधीतरी बाहेर निघतो. ”आई.

“फोटोच्या रूपानं ती व्यक्ती आपल्यात आहे या विश्वासानं काही चांगलं घडलं की नमस्कार करून गोडधोड ठेवलं जातं. आशीर्वाद घेतला जातो. फोटोतली व्यक्ती निर्जीव असते पण असं केल्यानं समाधान मिळतं. त्यांचा आशीर्वाद आहे या जाणिवेनं बरं वाटतं. ”बाबांचा मुद्दा आवडला. विचारचक्र सुरु झालं. काही गोष्टींकडे आतापर्यंत एकाच चष्म्यातून पाहत होतो. नावं ठेवत होतो. चूक लक्षात आली.

“बाबा, थॅंक्स. मी एकांगी विचार करत होतो. ”

“तुझ्यासारखाच विचार करणारे बरेच आहेत. सरसकट टीका करण्यापेक्षा दुसरी बाजू पहावी एवढंच सांगायचं होतं. जे बोललो त्यावर विचार कर. जर तुला वाटलं तर थांब. बळजबरी नाही. पालक म्हणून आपल्या परांपरांविषयी सांगू शकतो पण त्या स्वीकारायच्या की झिडकारायच्या तुम्ही ठरवा. अजून एक, काही गोष्टी मान्य नसतील तर तटस्थ रहा पण मनाला लागेल असं बोलू नका. प्लीज.. ”बाबांच्या बोलण्यात एक वेगळाच सूर जाणवला.

“जुन्या गोष्टींना नावं ठेवायची फॅशन झालीय”आईचा राग अजूनही शांत झाला नव्हता.

“आई, सॉरी!!परवा नमस्कार करून जाईन”

“असा बळजबरीचा नमस्कार नको. मनापासून वाटत असेल तरच थांब. ”एवढं बोलून आई किचनमध्ये गेली. दिदीकडं पाहिल्यावर ती लगेच म्हणाली “मी थांबणार आहे”तितक्यात बाल्कनीच्या बाजूनं ओरडण्याचा आवाज यायला लागला. पाहिलं तर झाडावर दोन कावळे ‘काव काव’ ओरडत होते. कदाचित ते माझे……..

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ देणं… ☆ सुश्री स्वप्ना मुळे (मायी) ☆

सुश्री स्वप्ना मुळे (मायी)

? जीवनरंग ?

देणं… ☆ सुश्री स्वप्ना मुळे (मायी)

“शरूवहिनी कालची पुरणपोळी सुरेख झाली होती.. हि डिश घ्या, आईने भाजी दिली आहे… ” डिश देऊन तो ऑफिसला पळाला देखील,..

ती जाळीच दार लावून आत वळाली तेवढ्यात सावी, “एक मिनीट वहिनी” म्हणत धावत पळत दारावर हजर झाली,.. “हि चावी ठेवा ना प्लिज. मला आज उशीर होईल आणि रवी जाताना चावी विसरून गेला आहे.. ” जाळीतूनच चावी तिने हातावर ठेवली आणि “हो” वळत लाजत वहिनीला म्हणाली, “कालच्या मोगऱ्याच्या गजऱ्याबद्दल खरंच थँक्स,… खुप प्रसन्न वाटलं त्यामुळे मला… ” एवढं बोलून ती निघून गेली.

हि परत जाळीचं दार लावत गॅसकडे धावली. चहाचं आधण उकळून गेलं होतं. तिने पटकन दूध घातलं आणि दोन कपात ओतुन आपल्या मैत्रिणीसमोर ट्रे पकडला. काल पासुन कामानिमित्त आलेली तिची मैत्रीण श्रिया हे सगळं न्याहाळत होती.

खरंतर ‘शरू किती चिडकी, एकटी राहणारी आणि घुमी होती, आणि आजची शरू… ‘ असा विचार श्रिया करतच होती तेवढ्यात परत हाक आली.. “अगं शरू, तेवढी चार जास्वंदीची फुलं देतेस का आणून बागेतून ? मीच गेले असते गं, पण मला मेलीला घंटा जाईल पायऱ्या चढ उतर करण्यात… “

शरूने पटकन चहाचा घोट घेतला आणि श्रियाला म्हणाली, “दोन मिनिटं हं श्रिया,.. ” तिने आजीला दार उघडून आत घेतलं. आजीच्या हातातली परडी घेतली आणि आजीला बसवून ती खाली पळाली,..

आजीने श्रियाची चौकशी केली आणि शरूचं कौतुक सुरू केलं… “शरू अपार्टमेंटमध्ये आली आणि आमचा सगळ्यांचा आधार झाली आहे गं,.. फार गुणी आहे,.. “

तेवढ्यात टपोरे लाल, पिवळे जास्वंद आणि दुसऱ्या परडीत पांढरा शुभ्र मोगरा घेऊन शरू आली. पानांसह असलेलं फुल तिने आजीच्या अंबाड्यात खोचलं आणि म्हणाली, “आजी लक्षात आहे ना.. “

आजी हसत म्हणाली, “हो हो हो, नाही काढत मुलाची आठवण, आणि नाही रडत दिवसभर. तुझं हे फुलं सांगत मला.. त्याचं काम सुगन्ध देणं तसंच आपलं आनंदाने जगणं… घटना घडल्या, आता आहे ते आयुष्य स्वीकारून आनंदी रहाणं‌…. मुख्य म्हणजे आपलं कर्तव्य करत राहणं…

बरं का श्रिया, माझा मुलगा अपघातात गेला तेंव्हा मी रडून रडून वेडी झाले होते.. शरू ने सावरलं.. म्हणाली, ‘रडत बसण्यापेक्षा आपल्याकडून समाजाला काय देता येतं का ते बघा… ‘ म्हंटल ‘मी म्हातारी आता कुठे घराबाहेर पडून समाजकार्य करणार,.. ‘ तर म्हणाली ‘मग घरात बसुन करा… ‘.

माझ्या वाती तिला आवडतात त्या करून घेते…. वॉचमनच्या बायकोला पाठवते. ती बंडल करून पॅकिंग करून विकते. चार पैसे तिला सुटतात…. इनडायरेक्ट समाजसेवा तिने मला शिकवली आणि मला वेड्याच्या इस्पितळात जाण्यापासुन वाचवलं,.. “

शरू म्हणाली, “आजी, देव खोळंबले आहेत तिकडे आणि आजोबा पण वाट बघतील,… “

“हो हो” म्हणत आजी गेली….

शरू हसत श्रियासमोर मोगऱ्याच्या वेण्या करत बसली. पटकन एक वेणी करून तिने श्रियासमोर धरली. श्रियाचे डोळे पाणावले. तिने पटकन शरूला जवळ घेतलं. “किती बदललीस गं…. “

शरू म्हणाली, “हो, आयुष्यातल्या अनुभवाने बदलले. नवरा कॅन्सरने गेला… त्याक्षणी शेवटच्या काळात ह्या अपार्टमेंटच्या लोकांनी जी मदत केली त्या मदतीचा धागा पकडून जगायला शिकले… खरंतर आधी शून्य झाले होते…. पण एक दिवस कुंडीतल्या मोगऱ्याच्या छोटयाशा फुलाने घर दरवळून टाकलं होतं,.. वाटलं क्षणभर मिळालेल्या आयुष्याची दरवळ करणारी हि चिमणी फुलं बघा आणि आपण बसलोय दुःख कुरवाळत,..

मग रडणं सोडलं,.. ज्यांनी कठीण काळात मदत केली त्यांचं देणं लागतो आपण ह्याची जाणीव मनात निर्माण केली आणि मदतीचा हात प्रत्येकासाठी पुढं केला… ऋणानुबंध वाढत गेले,.. आपण आधार होऊ शकतो हे कळलं.. ह्या फुलांनी ते शिकवलं… आजींना तर तू ऐकलं, नवरा गेल्यावर किती तरी दिवस मला रात्री सोबत करायला आल्या…. माझं एकटेपण त्यांनी वाटून घेतलं गं,..

मघाशी ती सावी गेली ती आता मोनोपॉज च्या खेळात त्रस्त असते…. तिला रोज असा गजरा दिला कि थोडी स्थिरावते…. सुगंध थेरपी तिच्यावर काम करते… माझ्या नवऱ्याच्या केमो थेरपीच्या वेळी तिच डबे पुरवत होती गं हॉस्पिटलमध्ये‌… तिचं देणं असं फिटतंय…

आणि तो पुरणपोळी विषयी कौतुक करणारा… त्याने तर नवऱ्याच्या शेवटच्या विधीचं सगळं बघितलं… अगदी डेथ सर्टिफिकेट आणून पेन्शन नावे करेपर्यंत…. कुठलंही नातं नसताना हि माणसं माझ्या जगण्यात जर मला काही देतात तर माझंही देणं लागतं ना… ह्या फुलांनी मला ते देणं शिकवलं… दरवळून टाकायचं दुसऱ्याचं आयुष्य…”

श्रियाने पदराने डोळे पुसले. शरूची पाठ थोपटली,.. “तुझ्या ह्या पद्धतीच्या जगण्याने मलाही फार काही दिलंस तू,.. मला वाटलं होतं तू अगदी एकाकी, खिन्न, उदास आयुष्य जगत असशील. पण नाही शरू, तू तर ह्या मोगऱ्यासारखी दरवळत आहेस… आणि तुझ्या विचारांनी आम्हालाही सुगंधी करत आहेस,.. खरंच ग देणं कळलं तर जगणं कळलं…. “

 मोगऱ्याची दरवळ खोलीभर पसरली होती,.. डोळ्यातल्या अश्रूंचीही दोघींना फुलेच दिसत होती…

© सुश्री स्वप्ना मुळे (मायी)

मो +91 93252 63233

औरंगाबाद

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ बाप्पाची वर्गणी… ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

🔆 जीवनरंग 🔆

☆ बाप्पाची वर्गणी… ☆ श्री मंगेश मधुकर

मंडळाच्या मिटिंगमध्ये डेकोरेशन, मिरवणूक यावर चर्चा चालू असताना वर्गणीचा विषय निघाला. प्रत्येक बिल्डिंगमधून दहा हजार आणि सोसायटी लगतच्या दुकानदारांकडून जास्त वर्गणी घ्यायची असं सर्वानुमते ठरलं.

“चला, चांगली चर्चा झाली आणि पटापट निर्णयही झाले. ”अध्यक्ष.

“एक महत्वाचं राहीलं”एकजण उभं राहत म्हणाला.

“आता काय?”

“काहीजण वर्गणी देत नाही. कार्यक्रमाला आणि प्रसाद घ्यायला मात्र हजर असतात. ”

“मागच्या वेळेला गप्प बसलो पण आता नाही. सोसायटीत राहतात, दुकानं आहेत म्हणजे वर्गणी द्यावीच लागेल. ”

“नाहीतर मग दुसरे उपाय करावे लागतील. ”

“वर्गणी मागायला गेलो तर हिशोब मागतात. वर उगीच कशाला खर्च करतात असं ऐकवतात. ”एकेक कार्यकर्ता बोलू लागल्यावर वातावरण गरम झालं.

“एक मिनिट, शांत बसा. इथं सगळ्या बिल्डिंगचे प्रतिनिधी आहेत. वर्गणी जमा करण्याची जबाबदरी त्यांची आहे. मंडळापैकी कोणीही सभासदांना वर्गणी मागणार नाहीत. कळलं” 

“मिटिंगमधले निर्णय अध्यक्ष सोसायटीच्या ग्रुपवर टाकतील. किती पैसे जमले, कुठं खर्च केले, हे कशाला?ते कशाला? असले मेसेजेस ग्रुपवर नकोत. ”कार्यकर्ते मन मोकळं करत होते.

“मित्रांनो, गणपती उत्सव म्हणजे भक्तीचा, आनंदाचा, जल्लोषाचा सोहळा. सर्वांना सोबत घेऊन उत्सव साजरा करायचा आहे. प्रत्येकानं समजुतीनं घ्यावं. वाद टाळावे ही विनंती”अध्यक्षांनी हात जोडले.

“तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे पण सर्वांना प्रेमाची भाषा समजत नाही. काहीजण कधीच वर्गणी देत नाहीत. यातला मेन माणूस म्हणजे बाहेरचा हॉटेलवाला बाप्पाशेठ, चार वर्ष झाली एकदाही वर्गणी दिली नाही आणि देणार नाही असं बिनधास्त सांगतो. त्याचं बघून बाकीचे दुकानदार सुद्धा बोलायला लागलेत. ” 

“बरंयं, मी एकदा बाप्पाशेठबरोबर बोलतो नंतर ठरवू. ”अध्यक्षांचा प्रस्ताव सर्वांनी मान्य केला. दोन दिवसानंतर अध्यक्ष बाप्पांना भेटायला गेले. “अरे वा, आज सूर्य इकडे कुठे उगवला. ” 

“खास भेटायला याव लागलं. ”

“काही विशेष”

“म्हटल तर आहे. म्हटलं तर नाही. ”

“कळलं. ”बाप्पाशेठ.

“मग यंदापासून श्रीगणेशा करा. ”

“नको”

“काही खास कारण”

“खरं सांगू”

“प्लीज. ”

“गणपतीच्या मंडळाच्या विरोधात नाही पण.. ”

“बाप्पाशेठ बिनधास्त बोला. हा विषय तिसऱ्यापर्यंत जाणार नाही. ”

“दरवर्षी उत्सव जोशात, जल्लोषात होतो. त्यात नवीन काहीच नाही. तेच ते.. ”

“लोकांच्या आवडीसाठी करावं लागतं. ”

“हो पण हे सगळं करण्यात बराच पैसा विनाकारण खर्च होतो. नंतर हाती शिल्लक काहीच राहत नाही. ”

“नाईलाज आहे. बहुमताचा आदर करावा लागतो. एरवी रुटीनमध्ये अडकेलेले लोक उत्सवाच्या निमित्तानं एकत्र येतात हे जास्त महत्वाचं.. ”

“माझाही तोच मुद्दा आहे. लोक एकत्र येतात. त्याचा सदुपयोग करून घेऊ. डेकोरेशन, कार्यक्रम, स्पर्धा, मिरवणुका यांच्या बरोबरीनं काही भरीव, चांगलं काम व्हायला पाहिजे आणि नेमकं तेच होत नाही म्हणूनच.. ”

“तुम्ही वर्गणी देत नाहीत. ”अध्यक्षांनी विचारलं तेव्हा बाप्पांनी होकारार्थी मान डोलावली.

“वर्गणी देणारच नाही असं नाही. एखाद्या चांगल्या कामासाठी किवा गरजवंताला नक्की मदत करू. भपकेबाज, तात्पुरत्या गोष्टीसाठी पैसे द्यायची अजिबात इच्छा नाही. ”

“हरकत नाही. आग्रह करणार नाही. मंडळ आपलं आहे. आरतीला नक्की या. ”

सोसायटीत उत्सवाची लगबग सुरू झाली. अध्यक्षांच्या हस्ते पूजा करून सोसायटीत मांडव उभरणीचं काम सुरू झालं. त्यावेळेला बाप्पाशेठकडून यंदाही वर्गणी मिळणार नाही हे समजल्यावर कार्यकर्ते नाराज झाले. धडा शिकवण्याविषयीची चर्चा सुरू झाली तेव्हा अध्यक्ष कार्यकर्त्यांची समजूत घालत असताना मांडवाचं काम करणारा एक कामगाराचा तोल गेला अन वीस फुटांवरून तो खाली ठेवलेल्या बांबूवर पडला. धाडकन आवाज झाला आणि एकच गोंधळ झाला. पडलेला माणूस वेदनेनं विव्हळत होता. ताबडतोब रिक्षानं त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं. कार्यकर्ते सुद्धा सोबत गेले. मंडळाच्या वतीनं हॉस्पिटलमध्ये पाच हजार भरले त्यामुळे ठेकेदाराला औषध आणावी लागली. जोरात पडल्यामुळे कामगाराला बरीच दुखापत झाली होती. उजवा हात जास्त ठणकत होता प्लास्टर घालावं लागेल असं डॉक्टरांनी सांगताना. काही टेस्ट करायला सांगितल्या. त्या कामगाराची घरचे लोक आल्यावर कार्यकर्ते हॉस्पिटलमधून बाहेर पडले.

— 

गणपती उत्सवानिमित्तानं वेगवेगळ्या स्पर्धा, गाण्यांचे कार्यक्रम यामुळे सोसायटीत उत्साहाचं वातावरण होतं. संध्याकाळच्या आरतीला सगळी सोसायटी जमत होती. विसर्जनांच्या आदल्या दिवशी संध्याकाळी आरतीची तयारी सुरू असताना उजव्या हात प्लास्टरमध्ये असलेला माणूस बायको आणि मुली सोबत आला.

“मांडव बांधताना पडलेले तुम्हीच ना. ”कार्यकर्त्यांनी ओळखलं.

“व्हय, मीच तो. ”

“आज इकडं, काय विशेष. ”

“गणपतीची कृपा म्हणून जीवावरचं दुखणं हातावर निभावलं. म्हणून दर्शनासाठी आलोय आणि माज्या ऐपतीप्रमानं खडीसाखर प्रसाद म्हणून आणलीय. नाही म्हणू नका. ”

“दादा, प्रसादाला नाही म्हणायचं नसतं आणि तुम्ही प्रेमानं आणलात. त्यातच सगळं आलं. ”अध्यक्ष.

“साहेब, तुमच्या मंडळाचे उपकार जन्मभर विसरणार नाही. ”

“आम्ही काहीही विशेष केलं नाही. ”

“आज इथं उभा आहे ते तुमच्यामुळेच”

“काय बोलताय याचा उलगडा होत नाहीये. जरा स्पष्टपणे सांगता का?”अध्यक्ष.

“त्यादीशी इथं काम करताना पडलो. चार तीन दिवस हॉस्पिटलमध्ये होतो. सतराशे साठ तपासण्या केल्या नंतर ऑपरेशन करून हात गळ्यात बांधला. चाळीस हजार बिल झालं. बायकोनं शंभर ठिकाणी हात पसरून धा हजार जमवले. ठेकेदारानं तर वळख सुद्धा दाखवली नाही. बिल भरलं नाही म्हणून हॉस्पिटलवाले सोडत नव्हते. ”

‘मग.. ”

“तुमचं मंडळ देवासारखं धावून आलं. ”

“म्हणजे.. “

“मंडळानं पंचवीस हजार भरले म्हणून तर हॉस्पितलवाल्यांनी सोडलं. गरिबावर लई उपकार झाले. ”

“दादा, मंडळानं फक्त पाच हजार दिलेत. काहीतरी गैरसमज झालाय. तुम्ही म्हणताय तसं काही केलं नाहीये. ”

“हा तुमचा मोठेपणा हाय!! पैशे मंडळानं भरले म्हणून हॉस्पिटलवाल्यांनी सांगितलय. ते खोटं कशाला बोलतील. ”

कामगाराचं बोलणं ऐकून सगळे विचारात पडले. नक्की काय झालं. कोणी केलं असेल, का केलं असेल, यात मंडळाचं नाव कसं? यागोष्टी जाणून घ्यायची प्रचंड उत्सुकता निर्माण झाली. आपसात चर्चा सुरु झा ल्यानं कोलाहल वाढला. त्यावेळी अध्यक्षांच्या डोक्यात विचारचक्र सुरु होतं. मांडवापासून बाजूला जाऊन त्यांनी फोन केला.

“हॉस्पिटलचं बिल तुम्ही भरलं ना”

“हो. ”

“अरे वा!!चांगली गोष्ट केलीत. पैशाची मदत स्वतः केली नाव मात्र मंडळाचं दिलं. हे फारच कौतुकास्पद आहे. याविषयी सर्वाना कळायला हवं. ”

“वेळेची गरज आणि मनापासून वाटलं म्हणून मदत केली. काही फार मोठी गोष्ट नाहीये. हे सगळं नावासाठी, फोटोसाठी केलंलं नाही. एक विनंती आहे, याविषयी कोणाला काहीच सांगू नका. मी सुद्धा कार्यकर्ता आहे म्हणजे हे काम मंडळानंच केलंय ना. ”

“थोडक्यात काय तर तुमची वर्गणी जमा झाली. बरोबर ना. “

“तसं समजा हवं तर”

“यंदापासून दरवर्षी वर्गणीतील काही रक्कम बाजूला ठेवून त्याचा उपयोग एखाद्या गरजूसाठी केला जाईल. न बोलता कृतीतून योग्य मार्ग दाखवलात. मंडळ आपलं आभारी आहे. खूप खूप धन्यवाद!!”.

“मंगल मूर्ती, मोरया!!” म्हणत बाप्पाशेठनं प्रतिसाद दिला.

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अविधवानवमी – लेखिका : सुश्री प्राची गडकरी ☆ सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

? जीवनरंग ?

☆ अविधवानवमी – लेखिका : सुश्री प्राची गडकरी ☆ सौ. गौरी गाडेकर

“आजी कपाटाची चावी हवी आहे मम्मीला”… मी मोबाईल बघत बघत आजीला म्हटंले.

“अरे! चावी मी काय कमरेला लावून फिरते का? फळीवर असेल बघ ना… मला आता आयुष्यात रस नाही उरलाय, तिथे कपाटाच्या चावीत काय रस असणार”..

आजीने जरा चिडूनच मला उत्तर दिले.

आजीचा चिडलेला स्वर ऐकून आजोबांनी घाईघाईत फळी वरील चावी माझ्या हातात देत म्हंटले,

“तिचा उपास आहे ना आज… त्यामुळे भुकेने थोडी चिडचिड झालीय तिची. आणि तुझ्या मम्मीची पण कमाल आहे. चावी मागायची कशाला… अरे जेव्हा पाहिजे तेव्हा फळी वरून आम्हाला न विचारता सरळ घ्यायची की “…. आजोबांनी आजीला आज पुन्हा सावरण्याचा प्रयत्न केला. तितक्यात आजी पुन्हा चिडचिड करत म्हणाली,

“उगाचच माझ्या भूकेच खोटं कारण सांगू नका. आठ महिन्यांपूर्वीच माझी भूक मेली आहे…. “आजी पुढे काही बोलायच्या आत आजोबांनी मला खुणेनेच निघून जायला सांगितले.

मी चावी मम्मीला नेवून दिली आणि आजीची चिडचिड सुध्दा सांगितली.

मम्मीने माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले, आणि ती कपाटाच्या दिशेने गेली.

तसं तर आमचं सगळं घर माझ्या मम्मीच्याच मर्जी प्रमाणे चालते. आजी- आजोबांची खरंतर माझी मम्मी सून लागते! परंतू मम्मीचे कायम मुली प्रमाणेच आजी-आजोबांनी लाड केलेले मी पाहिले आहे. मम्मीला कधीच कसलही बंधन, रितीरिवाजाचं ओझं, परंपरेच्या बेड्यात आजीआजोबांनी अडकवले नाही, आणि माझ्या मम्मीनेही त्यांच्या लाडाचा गैरफायदा न घेता त्या लाडाचा प्रेमानी स्वीकार करून कायम आजी-आजोबांना योग्य तो मान दिलेला मी पाहिला आहे.

तसेतर मम्मीच्या लग्नाला वीस वर्षे झालीत. तरीही अजून सुध्दा मम्मी घरातील छोट्या छोट्या गोष्टी आजीला विचारूनच करते ‘भाताला तांदूळ किती घेऊ, दहा पोळ्या करू का बारा, वांग्याच्या भाजीत गोडा मसाला घालू का?’…. आणि मग आजी रोजच ठरलेले उत्तर मोठ्या कौतुकाने मम्मीला देणार… “अग मला काय विचारतेस चित्रा, माझ्यापेक्षा जास्त तुझाच अंदाज बरोबर असतो. तू तुझ्या नावाप्रमाणेच “चित्रा” सारखा संसार साभाळाला आहेस. खरं सांगते चित्रा… तुझ्यामुळे ह्या घरात आनंद आहे. “

त्यावेळी मात्र मम्मीलाही दोन मुठ मांस जास्त चढून तिच्यात नवीन उत्साह संचार होतो. स्वत:च्या चित्रा नावाची ही मम्मीला तेव्हा फार गंमत वाटते. घरातील आनंद, सुखशांती, समाधान हे सगळं केवळ आजी- आजोबा आणि मम्मी ह्यांच्या खेळीमेळीच्या वातावरणामुळे, तसेच प्रेमळ स्वभावामुळे टिकून आहे. बाबातर कायम बाॅर्डरवरच असायचे. परंतू अलिकडे माझे बाबा गेल्यापासून आजी डोक्याने थोडी सैरभैरच असते. त्यामुळे आमच्या घरातील चैतन्य हरवलं होतं.

तसं पाहायला गेले, तर आमचं संपूर्ण खानदानच मिल्ट्रीतलं…. पणजोबा मिल्ट्रीत होते. तेही युध्दात शहीद झाले होते. आजोबाही मिल्ट्रीत होते. आजोंबांचा तर एक हात गोळी लागल्याने कापावाही लागला होता. त्यांना तर आता एकच हात आहे. ह्याच सगळ्या भीतीने आपल्या मुलाने म्हणजे माझ्या बाबांनी मिल्ट्रीत जावू नये असं आजीला अगदी मनापासून वाटायचे. परंतू माझ्या बाबांनी खुपच हट्ट धरला होता मिल्ट्रीचा. आणि आजोबांनी लहानपणा पासून माझ्या बाबांचा प्रत्येक हट्ट पुरवला होता. त्यामुळेच आजीच्या इच्छे विरुद्ध आजोबांनी बाबांना मिल्ट्रीत जायला परवानगी दिली होती. आणि आमचं दुर्दैव म्हणजे आठ महिन्यांपूर्वी बाबा अतिरेक्यांच्या चकमकीत शहीद झाले.

त्यामुळे आजोबांनी बाबांना आर्मीत जायला परवानगी नसती दिली, तर आज आपला मुलगा जिवंत असता… ही सल आजीला सतत टोचत होती. म्हणूनच अलिकडे ती रोज उठून आजोबांशी वाद घालायची. प्रचंड चिडचिड करायची. ती जणू एकदम बिथरली होती. डाॅक्टर तर म्हणाले, आता जर आजी सावरल्या नाही… तर कदाचित त्यांना वेड लागण्याची दाट शक्यता आहे. म्हणूनच गेल्या आठ महिन्यांपासून केवळ आजीला सांभाळणे एवढेच माझे, मम्मीचे आणि आजोबांचे काम होते.

आजोबांना मात्र बाबा शहीद झाले, याचा फार गर्व वाटायचा. आपला केवळ हात गेला. “ह्यापेक्षा देशासाठी जीव गेला असता, तर आपले जीवन सार्थकी लागले असते असे त्यांना मनापासून वाटायचे. “

किंबहुना माझी मम्मी तर दोन दिवसात सावरली होती बाबा गेल्यावर. ती तर अभिमानाने सगळीकडे मिरवायची… माझा नवरा देशासाठी शहीद झाला आहे… इतकंच नाही, तर मी सुध्दा मिल्ट्रीत जावून घराण्याची परंपरा राखावी, असाच मम्मीचा हट्ट असतो. आणि मी ही तसा एका पायावर तयारच आहे डिफेन्स जाॅईन करायला. एकीकडे माझी डिफेन्सची तयारी चालू होतीच… परंतू आजीच्या अशा वागण्यामुळे आम्ही सगळी तयारी आजीच्या चोरून करत होतो. इतक्यात मम्मी घाईघाईत आजीच्या रुममध्ये गेली. मी सुध्दा उत्सूकतेने तिच्या पाठोपाठ गेलो.

मम्मी आजोबांना म्हणाली… “अण्णा स्वयंपाक तयार आहे. परंतू अजून अकराच वाजतायत. म्हणून मी जरा बाजारात जाऊन येते. मला यायला उशीर झालाच तर तुम्ही जेवून घ्या. तसे मी विठाबाईंना सांगितलेही आहे, मला उशीर झालाच तर तुम्हाला वाढायला. “…

मम्मीचं वाक्य अर्धवट तोडून आजी लगेच म्हणाली,

“आज पर्यंत तुझ्या विना कधी जेवलो आहोत का आम्ही चित्रा?… मग आज तुझ्याविना कसे जेवू. आणि येवढ्या पावसात काय सामान आणायचं तुला बाजारातून! धोंडूला सांग… तो आणून देईन की”…..

आजी मोठ्या काळजीने मम्मीला म्हणत होती. मम्मीने आजीला स्वेटर घातला. तिच्या दोन्ही गुढघ्यावर नीकॅप चढवली. आजोबांच्या हातात दोन औषधाच्या गोळ्या दिल्या, आणि पाण्याचा ग्लास देत म्हणाली,

“धोंडू किती धांदरट आहे, माहित आहे ना तुम्हाला… चारातील दोन गोष्टी हमखास विसरतो. म्हणून विचार केला, आपण स्वत:च जावं बाजारात. तसेही धोंडू पाण्याचा पंप बिघडलाय तो दुरूस्त करायला गेलाय. कधी उजाडेल तो आता देवच जाणे. तुम्ही काळजी नका करू, मी लवकरच येते. “

मम्मीने आजीच्या खोलीतून बाहेर पडताना पंखा बंद केला आणि आजीला टी व्ही लावून दिला. तसेच आजोबांना स्टडी रुम मध्ये खगोलशास्त्रा वरील एक मस्त इंग्रजी सिनेमा लावून दिला. आणि मला दोघांवर नीट लक्ष ठेव असे बजावून ती बाजारात गेली.

आजीच्या अस्थीर मनामुळे तिने पुढच्या दहा मिनिटात टिव्ही बंद केला आणि ती माझ्याशी चेस खेळायला बसली. आजी कधीच हरलेली मला आवडत नाही, हे तिला माहीत असावे. म्हणूनच अर्धा डाव सोडून ती आजोबांच्या शेजारी जाऊन इंग्रजी सिनेमा बघत बसली.

एक-दीड तासाने मम्मी दोन मोठ्या पिशव्या भरून सामान घेऊन आली. तोपर्यंत विठाबाईंनी डायनिंग टेबलवर जेवायची सगळी तयारी करून ठेवली होती. मम्मी हातपाय धुवून येई पर्यंत आजी स्वयंपाक घरात जाऊन मम्मीने आणलेल्या पिशव्या वाचकरून पहात होती. आजी-आजोबांना खूप उत्सुकता होती. कारण अचानक बाजारात जाऊन त्यांच्या चित्राने काय सामान आणलय हे आजीला पहायचे होते.

इतक्यात मम्मीने सगळ्यांना हाक मारली जेवायला. खिमा-पाव आणि फ्राईड राईसचा आनंद घेत आमची पंगत चांगली रंगली होती. मी तर आडवा हातचं मारला खिम्यावर… तेवढ्यात बेचैन झालेल्या आजीने मम्मीला विचारलेच…

“काय खरेदी केली चित्रा”

” काही खास नाही. भाज्या, दुध, देवाला हार सगळं रोजचंच आणि… “मम्मी पुढे काही म्हणायच्या आधीच आजी एकदम म्हणाली…

“पण त्या सामानात केळीची पानं पाहिली मी… ती कशासाठी आणली आहेत. “

मम्मी पाच सेकंदासाठी एकदम शांत झाली आणि एक दिर्घ श्वास घेवून म्हणाली,

“पितृपक्ष चालू आहे… तर… पान ठेवीन म्हणते मी उद्या… “

‘पान’ एवढा शब्द ऐकताच आजीच्या डोळ्यातून घळघळ पाणी वाहू लागले. आजीने हातात घेतलेला घास तसाच ताटात ठेवला, आणि ती तिच्या बेडरूममध्ये निघून गेली. मम्मीने ताटाला नमस्कार करून आजीच्या पाठी जाणार… तोच आजोबा मम्मीला धीर देत म्हंणाले…

” चित्रा थांब… तू जेव बेटा, तिला तशीही भूक नव्हतीच. तू बाजारात गेली होतीस, तेव्हा एक चिकू तिने खाल्ला होता… बाकी यंदा कावळ्याला पान ठेवावं असं माझ्याही मनात खूप होते.. पण हे कसं तुला सांगावं, हेच मला कळत नव्हतं. तुला सांगतो चित्रा… मी अगदी लहान असताना तात्या म्हणजे माझे वडील युध्दात शहीद झाले. देशासाठी शहीद झालेला जवान हा अमर असतो. तो कधीच मरत नाही. अशी माझ्या आईची ठाम समजूत होती. आणि पितृपंधरवड्यात पान हे मेलेल्या माणसांना ठेवले जाते. म्हणून आईने कधी पानच ठेवले नाही तात्यांना.

त्यानंतर ‘मिल्ट्री’ हे एकच ध्येय डोळ्यासमोर ठेवून आईने मला मोठं केले. परंतू मी काॅलेजमध्ये असताना माझी आई अचानक गेली. आईची पहिल्या पासून शेवट पर्यंत एकच इच्छा होती… मी आर्मीत जावं! तीची ती इच्छा मात्र मी पुर्ण केली. आणि मी मिल्ट्रीत गेलो. कधी बाॅर्डवर तर कधी महत्त्वाच्या मिशनवर होतो. त्यामुळे मी माझ्या आईवडिलांना कधीच पान ठेवू शकलो नाही. आणि जेव्हा रीटायर झालो, तेव्हा इतके वर्ष ठेवले नाही, मग आता तरी कशाला ठेवा. हीच भावना मनात होती. परंतू माझ्या मुलाला… अवधूततला मात्र उद्या आपण पान ठेवायचं. अवधूतच्या पानाला कावळा शिवला… की मला माझ्या मागील चार पिढ्यांना शांती मिळाल्याच समाधान तरी मला मिळेल. “….

आजोबा चक्क सेंटीमेंटल झाले होते. एक मिल्ट्री मॅन एवढा भावूक झालेला मी पहिल्यांदाच पाहिला. आजोबांचा गहिवरलेलां आवाज ऐकून आजी लगिबगीने डोळे पुसत बाहेर आली. आजोबांकडे पहात जरा गंभीर आवाजात आजी मम्मीला म्हणाली….

“उद्या आपल्या अवधूतची तिथ नाही बरं का चित्रा… अग अवधूत तर एकादशीला गेला. आणि उद्या नवमी आहे. आपल्याला परवा पान ठेवायला लागेल अवधूतला!”

आजी डायनिंग टेबलची खुर्ची ओढून मम्मी शेजारी बसली. मम्मी गालात हसली. तिने आजी-आजोबांना क्षणिक न्याहळलं आणि म्हणाली… ,

“पण मी पान उद्याच ठेवणार आहे… नवमीला! आणि खरंसांगू ? मला अवधूतला पान ठेवायचंच नाही. अण्णा तुमचीच आई म्हणाली होती ना… ‘शहीद जवान अमर असतात’. माझा अवधू तर अमरच आहे. त्यामुळे त्याला पान ठेवायचा प्रश्न येतच नाही!…

हे पान तर… मी तुमच्या आईला ठेवणार आहे अण्णा! कारण उद्या अविधवा नवमी आहे.

ऐन तारूण्यात नवरा शहीद होवून सुध्दा त्यांना तुम्हाला सैन्यात भरती करण्याचा ध्यास होता. तुम्ही स्वत:चा हात गमवून सुध्दा, सासुबाईंचा विरोध पत्करून अवधूतला सैनिकी शिक्षण दिले. तिच परंपरा पुढे नेत मी सुध्दा माझ्या मुलाला मिल्ट्री जाॅईन करायला सांगितले. आपण नशिबान आहोत ना अण्णा!

म्हणूनच आपल्या पिढ्या देशासाठी शहीद होत आल्या आहेत.

पण हे देशप्रेम ज्या माऊली आपल्या मुलांच्या मनावर बिंबवतात, त्या माऊलींच कौतुक केले पाहिजे. एक दुःख पदरात असताना त्या माऊल्या आपल्या मुलांना सीमेवर पाठवून दुसऱ्या दुःखाला छातीठोकपणे सामोरी जायची तयारी दाखवतात. अशा आदर्शवादी माऊलींला पान ठेवून मी त्यांचे आशीर्वाद घेणार आहे. अण्णा तुमच्याच आईचा आदर्श मी गिरवून माझ्या मुलाला सैनिकी शिक्षण देतेय. अण्णा तुमच्या आईने देश प्रेमाचे बीज ह्या घरात रुजवले. म्हणूनच येणारे प्रत्येक फळ देशप्रेमाने भारावलेले निघते.

म्हणूनच ह्यापुढे जो पर्यंत मी जिवंत आहे, तो पर्यंत केवळ पितृपक्षातील अविधवा नवमीलाच ह्या घरात पान ठेवलं जाईल… त्या माऊलीच्या आदर्शाचे स्मरण हे झालेच पाहिजे. “

मम्मीच्या बोलण्याने आजी-आजोबांचे डोळे पाण्याने डबडबले असले तरी, त्या दोघांनी चक्क टाळ्या वाजवून मम्मीचे कौतुक केले.

आजीचा सैरभैर पणा तर क्षणातच पळुन गेला, आजीला जणू एकदम नवी उमेदच मिळाली. आजीने विठाबाईला भाज्या निवडायला सांगून, पणजीआजीचा फोटो हाॅलमध्ये आणून ठेवला. माझ्या जवळ येऊन आजीने नुसता प्रश्नांचा भडीमार सुरु केला…. “बाळा कधी निघणार आहेस? कुठे तुझं ट्रेनिंग आहे? गरम कपडे खरेदी केलेस का? पोस्टींग कुठे? आणि बरं का… निघताना रव्याचे लाडू देईन हो तुला. अवधूतला सुध्दा नेहमी बरोबर मी लाडू द्यायची….

आजोबा आणि मम्मी दुरून आजीची गडबड बघत होते. आजीच्या मनातील दुःखाला मम्मीने आदर्शाची जोड देऊन, आजीला जगण्याची नवी उभारी दिली. हे आजोबांनी क्षणातच ओळखले होते. म्हणूनच बहुतेक आजोबा मम्मीला शेकहॅन्ड करून जणू धन्यवाद देत होते.

गेले आठ महिन्यांपासून आजीच्या मनावरील दुःखाच्या ओझ्याला पितृपक्षातील अविधवा नवमीने क्षणात उतरवले… हेच खरे !

लेखिका : सुश्री प्राची गडकरी

मो.  ९९८७५६८७५०

प्रस्तुती : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ शब्देविण संवादू… सुश्री ज्योती रानडे ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनावणे ☆

श्री मेघ:श्याम सोनावणे

🌸 जीवनरंग 🌸

☆  शब्देविण संवादू… सुश्री ज्योती रानडे ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनावणे ☆

“अवंती, छान झाली आहे ग भाजी. मी ना या भाजीला जिरं व मिरची वाटून घालते. ” अलकाताई सुनेला म्हणाल्या.

जेवण संपवून जरा पडावं म्हणून त्या आपल्या खोलीत गेल्या.. तेवढ्यात त्यांचा मुलगा अनिकेत खोलीत आला. “आई, तू भाजीला काय घालतेस हे तिला सांगत जाऊ नको. तिचं करणं तुला आवडत नाही म्हणून तू दरवेळी काहीतरी शिकवत बसतेस असं तिला वाटतं. तुझा हेतू चांगला असतो ग.. पण तिला ती टीका वाटते. त्यापेक्षा बोलूच नको ना!.. बरं डुलकी काढ आता!” म्हणून तो बाहेर गेला.

आता कुठली डुलकी? कॅालेजात मराठी शिकवण्यात आयुष्य गेलं. पण आता शब्द आपल्याला साथ देत नाहीत? प्रशंसा देखील टीका वाटते?.. त्यापेक्षा बोलूच नको? काय बोलायचं आणि कसं बोलायचं ही कसरत होऊन बसली होती.

अलिकडे हे अवंतीचं काय पण अनिकेत बरोबर सुध्दा सारखं घडत होतं. साधं काही बोलायला जावं अन् ते शब्द मुलांना टोचावेत. आम्हाला नाही का कळत असं वाटावं..

बावीस वर्षाची अलका सासरी गेली तेव्हा आईनं सांगितलं होतं, “शिकून घे हं सगळं सासुबाईंकडून. हुशार आहेत त्या!

मोठ्यांकडून शिकायचं ही मानसिकता आईच्या त्या एका वाक्याने बनली होती पण हल्ली ‘फट म्हणता ब्रम्हहत्या’ अशी तऱ्हा होऊन बसली आहे.. मुलं सर्वज्ञ झाली आहेत.. दोन दोन डिग्र्या असतात.. भरपूर पैसा मिळवतात आणि ते गुगल आहेच अडीअडचणीला! AI पण आहे.. माणसं हवीत कशाला? पण गुगलला अनुभवाची जोड असते का? आईचं प्रेम असतं का आणि गुगल सांगेल ते सगळं खरं असतं का?

त्यांनी एक निःश्वास टाकला.. तेवढ्यात लेकीचा फोन आला.. ”आई, मी व केदार सुटं रहायचं म्हणतो आहोत. अगं मुलांना रागावले ना की आई निष्कारण मधे पडतात. ‘नको गं तिला रागवू.. अगं मुलं आहेत ते.. चुकायचचं’ असलं बोलतात. मग मुलांना काय!” लेक भडाभडा मनातलं सारं बोलून मोकळी झाली.

“नंतर करते फोन.. पडली आहे जरा.. ” म्हणून त्यांनी फोन बंद केला. आपल्या सासुबाई काही म्हणाल्या तर ब्र काढायची हिंमत नव्हती कुणाची! वडिलधारे आपल्या हिताचंच सांगणार ही भावना असे त्या काळात!

बाहेर कामाची बाई शैला जोरजोरात अवंतीला म्हणत होती, ”वैनी, नवरा लई भांडतो.. नकोसं करतुया.. डोकं फिरवतो.. म्हणून कामात लक्ष लागत नाही माजं.. अन् मग तुमी ओरडता मला सारखं. ”

एक शब्दावर शब्द आपटत होते. लहान मोठ्यांना दुखवत होते. अर्थाचा अनर्थ होत होता. म्हणायचं होतं एक आणि होत होतं भलतचं. ईश्वरानं केवळ माणसाच्या हातात शब्द दिले. साधे शब्द, गोड शब्द, कटू शब्द, शीतल शब्द, उग्र शब्द..

केवढं सामर्थ्य असतं शब्दात! रडणाऱ्याचे अश्रू थांबवण्याचं.. दोन देशातील युध्दं मिटवण्याचं.. ईश्वराजवळ पोचण्याचं! शब्द, अक्षर ब्रम्हाची महती कधी समजते का माणसाला. विद्यार्थ्यांना शब्दब्रम्ह शिकवताना किती बारकावे सांगत असू आपण.. समर्थ दासबोधात म्हणतात..

पहिले ते शब्दब्रम्ह । दुजे मीतिकाक्षर ब्रम्ह ।

तिसरे खंब्रम्ह । बोलिली श्रुती ॥

शब्द बोलून झाला की त्याचं अस्तित्व संपतं.. भात्यातून सुटलेला बाण व मुखातून बाहेर पडलेला शब्द परत घेता येत नाही. म्हणून तर विचार करून शब्द वापरा हे शिकवलं आपण पण आता आपल्याच शब्दांनी अवंती का दुखावते? काय चुकतंय माझं?

तेवढ्यात त्यांना यजमानांचा फोन आला. “अगं, नामदेव सिरिअस झालाय. मला घरी यायला उशीर होईल. ”

त्यांचे यजमान डॅा. लेले एक उत्तम डॅाक्टर होते. सारं आयुष्य सेवेला वाहून घेतलेले.. चाळीशीतला नामदेव त्यांच्याच घरी काम करत होता पण अचानक त्याची तब्ब्येत खालावली. त्यांच्याच हॅास्पिटल मध्ये ॲडमिट झाला. ह्रुदयाचा आजार होता.. केस कठीण आहे असं डॅाक्टर सांगत होतेच..

त्या एकदम उठल्या व केस विंचरून, साडी सरळ करून तयार झाल्या. “अनिकेत, मी नामदेवला बघून येते. ” एवढं एकच वाक्य बोलल्या व घाईनं बाहेर पडल्या. वर्क फ्रॅाम होम दोघांचं चालू असतं. ते चालू असताना काही बोललं तर तिकडून नको आरडाओरडा! त्यांनी थोडी फळं विकत घेतली व त्या हॅास्पिटलमधे पोचल्या.

अनेक नळ्या जोडलेला नामदेव त्यांना बघून क्षीण हसला. षड्-रिपू नी गांजून गेलेल्या जीवाला अंतकाळी तरी समजत असेल का की ती सारी धडपड व्यर्थ होती. होतं महत्वाचं फक्त ईश्वराशी जोडलेलं नातं, सत्कर्म व सदाचार!

आजूबाजूला त्याचे आई, वडील, बायको व पंधरा वर्षाचा मुलगा उभे होते… उसनं अवसान आणून.. अलकाताईनी नामदेवचा हात हातात घेतला. त्यानं डोळ्यानीच नमस्कार केला. तो आजारी पडला तेव्हा “तुझ्या कुटूंबाची आम्ही काळजी घेऊ” हे अलकाताईंचं वाक्य त्याला नक्की आठवलं असेल..

.. डॅाक्टर लेले आले. त्यांनी परत एकदा नामदेवचा चार्ट बघितला. त्यांनी त्याच्या वडीलांच्या खांद्यावर हात ठेवला व थोपटले. त्यांनी डॅाक्टरांकडे बघत हात जोडले. डॅाक्टरनी नामदेवच्या पंधरा वर्षाच्या मुलाला जवळ घेतले आणि त्याच्या केसातून हात फिरवला. नामदेवाजवळ जाऊन त्याच्या कपाळावर हात फिरवला व ते बाहेर गेले… नामदेवचे डोळे मिटले होते.. तरी डॅाक्टरांच्या स्पर्शाने त्याचा चेहरा शांत झाला असे सर्वांना वाटले..

अलकाताई पण बाहेर आल्या.. डॅाक्टरनी चष्मा काढून डोळे पुसले व ते दोघे हळूहळू चालत त्यांच्या ॲाफिसकडे जात असतानाच नामदेवची नर्स धावत आली व तिने डॅाक्टरांकडे बघत.. ‘नाही.. ‘ अशी मान हलवली.. नामदेव आता नाही हे कळल्यावर त्या तिघांचे अश्रू गालावर ओघळले..

अलकाताई घरी आल्या. नामदेवाच्या यातना संपल्या म्हणून एका प्रकारची शांती वाटत होती पण त्याच्या खोलीत घडलेल्या शब्देविण संवादातलं सामर्थ्य त्या परत परत अनुभवत होत्या. एका शब्दाशिवाय नामदेवला ‘आम्ही आहोत तुझ्या बरोबर’ सांगितलं गेलं. त्याच्या आई वडीलांना व मुलांना डॅाक्टरनी “माझ्या हातात जे होतं ते मी केलय.. आता परमेश्वराची ईच्छा” सांगितलं.. त्या खोलीत ज्याला जे म्हणायचं होतं ते शब्दाशिवाय प्रत्येकाला समजलं होतं.. नामदेवला सुध्दा! शब्दावाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले..

तान्ह्या बाळाला काय हवं ते आईला कसं समजतं.. आणि ईश्वर भेटीची आस ज्याला लागली तो ईश्वरापाशी शब्दाविना कसा पोचू शकतो.. केवढी प्रचंड शक्ती आहे या शब्देविण संवादात!

अवंती चहा घेऊन आली. त्या काही न बोलता चहा घेऊन खोलीत गेल्या.. त्या आठवड्यात चाललेलं मनातलं द्वंद्व काही वेगळच होतं. घरात बोलायचं का नाही? बोलताना आपला हेतू चांगला आहे हे आपल्याला व त्या देव्हाऱ्यातल्या गजाननाला माहित असल्याशी कारण.. मग इतर काही का म्हणेनात!

.. का शब्देविण संवाद करायचा?

काही दिवस विचार केल्यावर अलकाताईंनी एक निर्णय घेतला.. कमीत कमी शब्द वापरण्याचा.. शब्दाचा अर्थ बदलणार नाही असे अगदी जरूरीपुरते लागणारे शब्द बोलण्याचा. उत्स्फुर्तपणे काही प्रेमानं सांगणं हे अपात्री दान आहे इथे हे लक्षात घेऊन..

भरभरून बोलण्याची उर्मी आरत्या, श्लोक, कविता, लेख चार मैत्रीणींना किंवा खाली राहणाऱ्या दहावीतल्या आर्याला शिकवताना पूर्ण होत असे.. आर्या हुशार होती. मराठीमध्ये

मार्क पडत नाहीत म्हणून काही विचारायला येत असे! आता त्यांनी तिच्या शिकवणीची वेळच ठरवली होती..

अमेरिकेत राहणाऱ्या जीवश्चकंठश्च मैत्रीणीला एक दिवस फोन करत असतं.. ज्यादिवशी मुलं मिटींग करायला आठवड्यातून एकदा ऑफिस मधे जात.. डॉक्टर कामावर असत तेव्हा.. मन हलकं होऊन जात असे.

लेकीला फोन करून म्हणाल्या होत्या, “जरूर रहा सुटे. दोघींनाही मोकळा श्वास घेता येईल.. ” लेक आश्चर्याने ऐकतच राहिली..

हॅाल मध्ये अवंती अनिकेतला म्हणत होती, “अरे, हल्ली आई काही बोलतच नाहीत. नामदेव गेल्या त्यातून बाहेर पडल्या नाहीत वाटतं”.

डॅाक्टर व अलकाताईंना त्यांच्या खोलीत हा संवाद ऐकू आला.. ते एकमेकांकडे बघून हसले.. दोघांना अगदी पक्कं समजलं एकमेकांच्या मनात काय चाललं होतं ते.. शब्देविण संवादु यापूर्वीच करायला हवा होता असं दोघांच्या मनात आलं व ते एकदम खळखळून हसले!!

शब्देंविण संवादु। दुजेंवीण अनुवादु॥

हें तंव कैसेंनि गमे।परेहि परतें बोलणे खुंटले॥

आयुष्यभर शब्द वापरून मराठी शिकवणाऱ्या अलकाताईंना आता शब्द या माघ्यमाची गरज उरली नव्हती! आयुष्यात सतत काहीतरी नवीन शिकावं म्हणतात.. ते घडून आलं होतं अवंतीमुळे! अनिकेत मुळे!

अवंती अनिकेतचे मनोमन मानलेले आभार त्यांच्यापर्यंत पोचू देत अशी त्यांनी शब्दब्रम्हाला विनंती केली आणि पांडुरंग कांती.. या अभंग मैत्रीणींना शिकवण्यासाठी त्या सज्ज झाल्या!

लेखिका : सुश्री ज्योती रानडे.

प्रस्तुती : श्री मेघ:श्याम सोनावणे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ जाग ! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? जीवनरंग ?

जाग ! श्री संभाजी बबन गायके 

त्याच्या घराच्या अंगणात कसं कुणास ठाऊक औदुंबर उगवला होता. हे झाड एकदा का उगवून त्यानं बाळसं धरलं की ते उपटून टाकण्याची हिंमत सहसा कुणी करू धजत नाही. त्याच्या वडिलांनीही मग या देवाच्या झाडाला पार बांधून दिला आणि काही वर्षांतच तो पार देवाचा पार म्हणून ओळखला जाऊ लागला.

वडील असेतोवर त्याचं सर्व नीट होतं. एकुलता एक गडी.. लाड व्हायचेच. तालमीत जायचं, कबड्डीचे मैदान गाजवायचे हा नित्यक्रम. त्यात ढोल लेझिमचा नाद अंगात मुरला. ताशा असा घुमायचा की केवळ तो ऐकण्यासाठी लोक गर्दी करीत. गावोगावच्या जत्रेत त्याच्या मंडळाने बक्षिसं मिळवली नाहीत असं कधी होत नसे. देवळातली शो केस असंख्य मानाच्या ढाली, भिंतीवरची घड्याळं, स्मृतिचिन्हे यांनी भरून गेली होती. बिदागी म्हणून मिळालेल्या पैशांतून तालमीची आणि मारुतीच्या देवळाची डागडुजी केली जाई. पण रंगाचं काम करावं ते यानेच. नुसतं भिंती रंगवणं नव्हे. त्याचं हस्ताक्षर केवळ सुंदर आणि देखणं. गावातला फळा त्याच्याच अक्षराला सरावला होता.

लग्नात दिल्या जाणाऱ्या भांड्यांवर नावं कोरायला पण तो शिकला होता. मग गावातले वरबाप झालीत द्यायची भांडी तर विकत आणत, पण नावं टाकायला याच्याचकडे देत… पैसे द्यायचा विचार ते करत नसत आणि हा मागतही नसे. पुढे लग्नाचे बॅनर केले जाऊ लागले. लोक फक्त पांढरा कपडा आणून देत आणि जमलंच तर निळा रंग. हा बाबा आपला वेळ खर्ची टाकून लग्नाच्या दिवशी बॅनर लागेल गावात अशी व्यवस्था करायचा. थोडक्यात हा गावचा नारायण ! लग्न झालं आणि दोन मुलं झाली तरी याचा हा उद्योग काही थांबला नाही.

वडील गेले आणि कारखान्यात कामाला जाणं भाग पडलं. तरीही याचं रात्री ढोल लेझीम वाजवायला जाणं थांबलं नाही. याला त्याच्या गावातले खेळ म्हणत. आणि जत्रेतले खेळ तर रात्रीच असत. कबड्डीच्या टुर्नामेंट सुद्धा दूर दूर असत. नोकरी सांभाळून हे व्याप सांभाळणं किती अवघड. पण यातच जीव गुंतला असल्याने रात्रीचे जागरण आणि दिवसभर अंगमेहनत याचा मेळ घालणं कठीण होत होतं.

त्यात पाच पंचवीस पोरं एकत्र आणि शिवाय ही पोरं तरुण तडफदार. तारुण्यातील काही आकर्षणं ओलांडून डोळे बंद करून पुढे जाणे यातील प्रत्येकाला शक्य होईलच असं नव्हतं.

बाकी जाऊ द्यात… आधी काहीतरी भारी करायचं म्हणून एकदा तोंडाला लागलेली ती अगदी नसानसांत भिनायला लागली. देखणा, उंचापुरा गडी… दारूमुळे त्याची रया जायला लागली. अनेकांनी सांगून पाहिलं. पण क्रम चुकेना !

असाच एकदा मध्यरात्री तो घरी परतला.. झुलत झुलत…. एवढ्या रात्री कशाला घरच्यांना जागं करायचं म्हणून त्यानं औदुंबराच्या पारावरच अंग टाकून दिलं ! औदुंबर आता डेरेदार झालेला होता. त्याच्या बायकोने बुंध्यापाशी दिवाबत्ती सुरू केली होती… तुळस ठेवली होती. दत्ताची तसबीर होती. याची दारू सुटली म्हणजे या अवदसेसोबत आलेली सारी बिलामत सुद्धा निघून जाईल अशी त्याच्या आईला आणि कारभारणीला आस होती.

पहाटेचे तीन वाजले असावेत… त्याला कुणीतरी गदागदा हलवत होतं… त्याचे डोळे तांबारलेले.. शुद्ध नव्हतीच. त्याने कसेबसे डोळे किलकिले केले. “असं कुठवर चालायचं? जागा हो… ” असं काहीबाही त्याच्या कानापाशी कुणीतरी बोलत असल्याचं त्याला जाणवलं. आई किंवा बायको… या दोघींपैकी हा आवाज नव्हता… काही समजेना !

हा पुन्हा गाढ झोपी गेला. झोप कसली.. नशा ती. पण त्याला साडेपाच वाजता जाग आली. घरचे अजून उठायचे होते. हा सहज बाहेर रस्त्यावर आला. तिथून पुढे पाय मोकळे करायला म्हणून मारुतीच्या देवळाच्या चौकात निघाला… तर चौकात एस. टी. गाडी उभी. कोण कुठं निघालं असावं? लग्न तर नाही आज कुणाचं ! तो जवळ गेला.. पंचवीस बाया गडी माणसं तयार होऊन गाडीत दिगंबरा दिगंबरा भजन करीत बसली होती.. इतरांची वाट बघत. त्याने गाडीपुढे जाऊन बोर्ड पाहिला…. नारायणपूर ! कधी ऐकलं, पाहिलं नव्हतं. त्याला पाहून गाडीतील एक वयोवृद्ध म्हणाला…. “ बाळा, यायचं का नारायणपूरला? “

“ काय आहे तिथं? “ त्याने विचारलं.

” चल तर खरं.. कल्याण होईल ! हे असं किती दिवस राहणार…. दारूत आयुष्य बुडवीत? ” उत्तर आलं.

” पण मी तर अजून काहीच आवरलं नाही. आंघोळ पांघुळ काय नको का देवाच्या गावात जायला?” त्याने अडचण सांगितली !

” अरे, मन साफ आहे ना? चल.. गुरू माऊली समजून घेतील यावेळी !”

आणि तो गाडीत बसला. त्याला गाडीत बसलेलं अनेकांनी पाहिलं होतं, त्यांपैकी कुणी न कुणी तरी त्याच्या घरी सांगणार होतं !

गाडी नारायणपूर गावात पोहोचली. साऱ्या प्रवासात भजन सुरूच होतं. आज गुरुवार.. दत्त गुरूंचा वार. तुफान गर्दी. गुरुजी आसनावर बसलेले… त्यांच्या दर्शनाला मोठी रांग.. तो कितीतरी वेळ रांगेत तिष्ठत थांबून राहिला.. त्याची वेळ आली.. गुरुजींनी मस्तकावर हात ठेवला… “ बरं केलंस… माझं ऐकून इथवर आलास.. सोड तो मार्ग ! पुढच्या गुरुवारी व्यवस्थित अंघोळ, पूजा करून ये ! “

गुरुजींनी त्याच्या गळ्यात तुळशी माळ घातली.. ’. कल्याण हो ! ‘

तो रांगेतून पुढे सरकला आणि भानावर आला ! सामान्यांच्या आयुष्यात अध्यात्माच्या वरच्या पायऱ्या कधी येत नाहीत. पण एखादी अशी पायरी सापडते की जिच्यावर माथा टेकला की आहे या आयुष्याचा प्रवास सोईचा होऊन जातो. व्यसन सुटलं की चालणे सरळ मार्गी होऊन जाते.. याचेही असेच झाले.

भगवंताने सामान्य लोकांसाठी असे काही महात्मे धाडून दिलेत जागोजागी. त्याचं काम सोपं करायला !

अध्यात्म असं व्यवहाराच्या कामी आलं तरच ते लोक आचरणात आणतील, हेच खरं.

अशा असंख्य लोकांना व्यसनमुक्त करून उत्तम मार्गावर आणणारे कित्येक महात्मे आपल्या आसपास आहेत. नारायणपूर, सासवड येथील अण्णा महाराज हे असेच एक सिद्ध ! त्यांच्या जाण्याने एक आधार हरपला आहे…..

… खरं तर असे आधार कुठे ना कुठे असतातच.. जे माणसाला उत्तम मार्गावर नेण्यासाठीच असतात.

पण ते योग्य वेळी सापडले पाहिजेत …. आणि नकळता नाही सापडले तर आपणहून शोधले पाहिजेत.

अर्थात ते शोधण्याची सद्बुद्धी देणारे कोण.. ते मन स्वच्छ-शुद्ध आणि खऱ्या अर्थाने जागं झाल्याशिवाय लक्षात येत नाही हे मात्र खरं !!!!

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “कोण ? कुणाचा ?” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? जीवनरंग ❤️

☆ “कोण ? कुणाचा ?” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित

मी अंथरुणातून उठलो तर अचानक छातीमध्ये दुखू लागले. मला हार्टचा त्रास आहे का ? या विचारांमधे मी बैठकीच्या खोलीमध्ये गेलो. मी पाहिलं तर माझा पूर्ण परिवार मोबाईल बघण्यामधे व्यस्त होता.

मी माझ्या पत्नीकडे बघून म्हणालो, “माझ्या छातीमध्ये आज रोजच्यापेक्षा थोडं जास्त दुखत आहे, मी जाऊन डॉक्टरांना दाखवून येतो. “

“हो पण सांभाळून जा, गरज पडली तर फोन करा. ” मोबाईलमध्ये बघता बघताच बायको म्हणाली. बाकी सर्व मंडळी याबाबतीत तर बेखबरच होती.

मी गाडीची चावी घेऊन पार्किंगमध्ये पोहोचलो. मला खूप घाम येत होता आणि गाडी स्टार्ट होत नव्हती. त्याच वेळी आमच्या घरी काम करणारा, ध्रुव सायकल घेऊन आला. सायकलला कुलूप लावल्यानंतर मला समोर बघून तो म्हणाला, “काय साहेब, गाडी चालू होत नाही का?”

मी म्हणालो, “नाही… !!”

“साहेब, तुमची तब्येत ठीक दिसत नाही. इतका घाम का येतो आहे? साहेब, या परिस्थितीमध्ये गाडीला किक मारू नका, मी किक मारून चालू करून देतो. ” ध्रुवने एकच किक मारून गाडी चालू करून दिली. त्याबरोबरच विचारले, ” साहेब, एकटेच जात आहात का?” 

मी म्हणालो, “हो. “

तो म्हणाला, “अशा परिस्थितीमध्ये एकटे जाऊ नका. चला, माझ्यामागे बसा. ” 

मी म्हणालो, “तुला गाडी चालवता येते का ?”

“साहेब, माझ्याकडे मोठ्या गाडीचं देखील लायसेंस आहे, काळजी करू नका आणि मागं बसा. “आम्ही जवळच्याच एका हॉस्पिटलमध्ये पोहोचलो. ध्रुव पळतच आत गेला आणि व्हीलचेअर घेऊन बाहेर आला, “साहेब, पायी चालू नका, या खुर्चीवर बसा. “

ध्रुवच्या मोबाईलवर सतत रिंग वाजत होती. मी समजून गेलो की, फ्लॅटमधील सगळ्यांचे फोन येत असतील की तो अजूनपर्यंत का नाही आला? शेवटी कंटाळून ध्रुव कोणाला तरी म्हणाला की, “मी आज येऊ शकत नाही. “

ध्रुव, डॉक्टरांबरोबर ज्या प्रकारे चर्चा करत होता त्यावरून त्याला न सांगताच समजलं होतं, की साहेबांना हार्टचा त्रास आहे. लिफ्टमधून तो व्हीलचेअर ICU कडे घेऊन गेला. माझ्या त्रासाबद्दल ऐकल्यानंतर, डॉक्टरांची टीम तयारच होती. सगळ्या टेस्ट ताबडतोब केल्या.

डॉक्टर म्हणाले, “तुम्ही वेळेवर पोहोचलात आणि त्यातून तुम्ही व्हिलचेअरचा उपयोग करून अधिकच समजूतदारपणाचे काम केले आहे. आता कोणाचीही वाट बघणंं हे तुमच्यासाठी हानिकारक आहे, यामुळे वेळ न घालवता आम्हाला हार्टचं ऑपरेशन करून तुमचे ब्लॉकेजेस लवकरच दूर करावे लागतील. या फॉर्मवर तुमच्या नातेवाईकाच्या हस्ताक्षराची गरज आहे. ” डॉक्टरांनी ध्रुवकडे बघितलं.

मी म्हणालो, “बेटा, तुला सही करता येते का?” 

तो म्हणाला, “साहेब, इतकी मोठी जबाबदारी माझ्यावर टाकू नका. “

“बेटा, तुझी काहीही जबाबदारी नाही. तुझ्याबरोबर भले रक्ताचा संबंध नाही, तरीही तू काहीही न सांगता आपली जबाबदारी पूर्ण केलीस. खरंतर, ही माझ्या कुटुंबियांची जबाबदारी होती. एक अजून जबाबदारी पूर्ण कर बेटा. मी खाली हस्ताक्षर करून लिहून देईन, की मला काही झालं, तर ही जबाबदारी माझी आहे. ध्रुवने फक्त माझ्या सांगण्यावरून हस्ताक्षर केलं आहे. कृपा करून आता सही कर… आणि हो, घरी फोन करून सांगून दे. “

त्याचवेळी माझ्या पत्नीचा फोन ध्रुवच्या मोबाईलवर आला. ती काय म्हणत होती ते त्याने शांतपणे ऐकून घेतले.

थोड्या वेळाने ध्रुव म्हणाला, “मॅडम, तुम्हाला माझा पगार कट करायचा असेल, तर कट करा, मला काढून टाकायचं असेल तर काढून टाका, परंतु आत्ता ऑपरेशन सुरु होण्या आधी हाॅस्पिटलमधे पोहचून जा. हो मॅडम, मी साहेबांना हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो आहे. डॉक्टरांनी ऑपरेशनची तयारी केली आहे आणि त्यांनी सांगितले आहे, की आता वेळ घालवून चालणार नाही. “

मी विचारलं, “बेटा घरून फोन होता का?” 

“होय साहेब. “

मी मनात पत्नीविषयी विचार केला… अगं, तू कोणाचा पगार कट करण्याची गोष्ट करत आहेस आणि कोणाला काढून टाकण्याची गोष्ट करत आहेस? अश्रूपूर्ण डोळ्यांनी, मी ध्रुवच्या खांद्यांवर हात ठेवून म्हणालो, “बेटा काळजी करू नकोस. मी ज्या संस्थेमध्ये सेवा देतो, तिथे वृद्ध लोकांना आसरा देतात आणि तिथे तुझ्यासारख्या व्यक्तींची गरज आहे. तुझं काम भांडी धुणे… कपडे धुणे… हे नाही तर तुझं काम समाजसेवा करण्याचे आहे. बेटा, तुला पगारही मिळेल, त्याबद्दल चिंता बिलकुल करू नकोस. “

ऑपरेशननंतर मी शुद्धीवर आलो. माझ्यासमोर माझे सर्व कुटुंबीय मान खाली घालून उभे होते. मी पाणावलेल्या डोळ्यांनी विचारले, “ध्रुव कोठे आहे?”

पत्नी म्हणाली, “तो आताच सुट्टी घेऊन गावी गेला. म्हणत होता की त्याच्या वडीलांचे हार्टअटॅकने निधन झाले आहे. पंधरा दिवसानंतर तो परत येईल. ” आता मला समजलं, की त्याला माझ्यामध्ये आपले वडील दिसत असावेत. हे देवा! त्याला हिम्मत दे.

संपूर्ण कुटुंबीय हात जोडून, शांतपणे मान खाली घालून माझी माफी मागत होते. मोबाईलच व्यसन एका व्यक्तीला आपल्या हृदयापासून, आपल्या परिवारापासून, आपल्या अस्तित्वापासून किती दूर घेऊन जाते!

डॉक्टरांनी येऊन विचारलं, “सगळ्यात प्रथम मला हे सांगा, ध्रुव तुमचे कोण लागतात?”

मी म्हणालो, “डॉक्टर साहेब, काही नात्यांच्या संबंधाविषयी किंवा त्यांची खोली न मोजणं हे केंव्हाही चांगलं. अशामुळे त्या नात्याचे मोठेपण तसचं राहील, फक्त मी इतकंच म्हणेन की तो माझ्या अडचणीच्या काळात माझ्यासाठी देवदूत बनून आला होता. “

पिंटू म्हणाला, “आम्हाला माफ करा बाबा. जे आमचं कर्तव्य होतं, ते ध्रुवने पूर्ण केलं, ही आमच्यासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. इथूनं पुढे अशी चूक भविष्यामध्ये कधीही होणार नाही. “

“बेटा, आम्ही सर्वजण आज टेक्नॉलॉजीमध्ये इतके गर्क झालो आहोत, की आपल्या आसपासच्या लोकांचा त्रास देखील आपल्याला जाणवत नाही. एका निर्जीव खेळण्याने जिवंत माणसाला गुलाम बनवून ठेवलं आहे. आता वेळ आली आहे, की त्याचा उपयोग मर्यादित स्वरूपात करावा. नाहीतर… परिवार, समाज आणि राष्ट्रालाच नाही तर संपूर्ण विश्वाला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील आणि त्याची किंमत चुकविण्यासाठी तयार रहावे लागेल. “

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ हत्तीवरची स्वारी- भाग – ३ – हिन्दी लेखक : श्री हेमन्त बावनकर ☆ भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

☆ हत्तीवरची स्वारी – भाग – ३ – हिन्दी लेखक : श्री हेमन्त बावनकर ☆ भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर

श्री हेमन्त बावनकर

(अधून मधून ते संशयित दृष्टीने एकमेकांकडे बघत होते. दोघांमध्ये दोन तीन टेबले होती. कुणास ठाऊक, संध्याकाळपर्यंत मॅनेजर साहेब काय निकाल देतात?) — इथून पुढे — 

ही चौकशी लंच ब्रेकनंतरही चालू राहिली. एक एक स्टाफ केबीनमध्ये जात होता. डोळ्यांनी जे पाहिलं, त्याचं सविस्तर वर्णन करून, प्रसन्न मुद्रेने बाहेर पडत होता, जसं काही आपल्या मनावरचं सगळं ओझं, ते केबिनमध्ये ठेवून आलेत.

तो बाहेर येताच सगळे त्याच्याभोवती गोळा व्हायचे, जसे काही तो एखादा इंटरव्ह्यू देऊन आलाय. ते विचारायचे, ‘आत काय झालं?’ बाहेर येऊन सगळे रामप्रसाद आणि सीतारामला सांगायचे, ‘‘काळजी करू नका. सगळं ठीक होईल. ” आता या सगळ्या चौकशी दरम्यान मॅनेजरनाही मजा वाटू लागली होती. ते स्टाफला खोदून खोदून विचारत होते. आणि प्रत्येक जण आपापल्या पध्दतीप्रमाणे आणि कुवतीप्रमाणे रामप्रसाद-सीतारामच्या वीरगाथेचं वर्णन करून आले होते.

आता चौकशी व्हायची फक्त दोन माणसे उरली होती. एक स्वत: बडेबाबू आणि दुसरे मॅनेजरसाहेब. दुस-या क्षणी त्यांची पाळी आली. मॅनेजरसाहेबांचं काय, ते आरामात केबीनमध्ये बसून जसे काही रामप्रसाद आणि सीताराम या दोन भावांच्या विरश्रीच्या चित्रपटाची पटकथाच लिहित होते जणू.

बडेबाबूंच्या टेबलावरचा इंटरकॉम वाजला. ‘‘आलोच सर!” ते फोन उचलून म्हणाले. ते मॅनेजर साहेबांच्या केबीनमध्ये पोचले. त्यांना नमस्कार केला आणि त्यांनी आदेश दिल्यावर त्यांच्या समोरच्या खुर्चीवर बसले. मग त्यांनी सगळ्या केबीनभर चौफेर दृष्टी टाकली. ते आत्ता प्रथमच या केबीनमध्ये येत होते. सगळं काही व्यवस्थित ठेवलेलं होतं. एका बाजूला सीतारामचा अर्ज होता. साहेब आपल्या डायरीत काही काही लिहीत होते. कदाचित् स्टाफव्दारे जी माहिती मिळाली, त्याबद्दल नोंदी करत होते. बड्याबाबूंनी केबीनच्या दरवाज्याला लावलेल्या काचेतून बाहेर पाहिले. तिथून बाहेरचं ऑफीसचं सगळं दृश्य स्पष्ट दिसत होतं. एवढ्यात मॅनेजर साहेबांनी त्यांच्याकडे पाहिलं.

‘‘हां, बडेबाबू आजचा दिवस कसा काय गेला?”

‘‘ठीक गेला सर! काही अत्यावश्यक, फाईलींचा अभ्यास करत होतो. एक-दीड दिवसांत इथल्या कामाप्रमाणे स्वत:ला ऍडजेस्ट करेन. ”

मॅनेजर साहेबांना थोडं आश्चर्य वाटलं. इथे सकाळपासून रामप्रसाद आणि सीतारामचा किस्सा चालला होता. आणि बडेबाबू फाईली चाळत होते. मॅनेजर पुढे म्हणाले, ‘‘मी रामप्रसाद आणि सीतारामबद्दल विचारतोय. ”

बडेबाबू अगदी सामान्य दिसत होते, जसं काही घडलंच नाही. आपल्या शांत, चिरपरिचित, गंभीर मुद्रेने बघत ते म्हणाले, ‘‘अच्छा! आपण सीतारामबद्दल विचारताय होय? काही नाही सर, छोटीशी जखम झालीय. सगळं ठीक होईल. ”

आता मॅनेजर चकीत झाले. त्यांना वाटलं, एक तर आपल्या बोलण्याचा आशय यांना कळला नाही किंवा मग ते बनवाबनवी करताहेत.

‘‘आपल्याला माहीत आहे ना, की या दोघांच्या केसची मी चौकशी करतोय. आज त्या दोघांमध्ये काय झालं, जरा विस्ताराने सांगा ना!”

पण बडेबाबू कोणत्या मातीचे बनले होते, कुणास ठाऊक? ते जराही विचलित झाले नाहीत. ‘‘म्हणजे रामप्रसाद आणि सीतारामबद्दल विचारताय का आपण?”

‘‘आपण आत्ताच म्हणालात ना की सीतारामला मामुली जखम झालीय. त्याला ती कशी झाली, हे मी जाणून घेऊ इच्छितो. जरा विस्ताराने सांगा. ”

बडेबाबू गंभीरपणे पुढे म्हणाले, ‘‘सर, मी सकाळी आलो. मस्टरवर सही केली आणि माझ्या खुर्चीवर येऊन बसलो. टेबलवर ठेवलेल्या फाईल्समधून अत्यावश्यक फाईली काढल्या आणि त्यांचा अभ्यास करू लागलो. इतक्यात, धडामकन् आवाज आला. मी डोकं वर करून पाहिलं, तर सीताराम अर्धवट टेबलावर व अर्धवट जमिनीवर असा लोंबकळत होता. शक्यता अशी आहे की थोडा लेट झालेला असल्याने, हजेरी पत्रकात सही करताना घाईघाईत तो टेबलावर आपटला असावा. आणि त्याला जखम झाली असावी. ”

मॅनेजर साहेब आता स्वत:ला रोखू शकले नाहीत. आपलं डायरी लिहिण्याचं काम बंद करून त्यांनी पेन खाली ठेवलं आणि डायरी बंद केली. आता लिहिण्यासारखं काही उरलंच नव्हतं.

‘‘वा: ! बडेबाबू आपण तर कमाल केलीत. आपल्याला प्रजासत्ताक दिनी हत्तीवर बसवून आपली मिरवणूक काढली पाहिजे. ”

‘‘का बरं? मी असं कोणतं काम केलंय?”

‘‘बडेबाबू आपल्याला श्रमवीर पुरस्कार मिळायला हवा. आपण आपल्या कामात इतके तल्लीन झाला होतात, की चार पावलांवर दोन शिपायांची मारामारी होते आहे आणि आपल्याला त्याचा पत्ताही लागत नाही. आणि आपण म्हणताय सीतारामचं डोकं टेबलवर आपटलं. ऑफीसमधल्या सगळ्या स्टाफने सांगितलं, ते काय खोटं आहे?”

आता बड्याबाबूंच्या चेह-यावर त्यांचं ते चिरपरिचित कुटील हसू तरळलं. ते या आपल्या ठराविक हास्यपूर्ण चेह-याने मॅनेजरकडे बघत म्हणाले, ‘‘सर, हत्तीवर स्वार तर मी आपल्या सोबतच होईन. ”

आता मॅनेजर साहेबांचा चेहरा रागाने लालीलाल झाला. ‘‘काय बकताय काय तुम्ही?”

‘‘तसं नाही सर! मी खरंच बोलतोय. आज सकाळी जे झालं, ते रामप्रसाद-सीताराम यांच्यापासून सगळ्या स्टाफला माहीत आहे. ”

केबीनच्या काचेतून बाहेर पहात बडेबाबू म्हणाले, ‘‘आता आपल्या बाबतीत बोलायचं, तर इथून बाहेरचं सगळं दृश्य स्पष्ट दिसतं तरीही, सकाळपासून आत्तापर्यंत. एकेका स्टाफ मेंबरला बोलवत त्याला त्या दृश्याचं वर्णन करायला सांगितलंय, ही गोष्ट काही गळ्याखाली नीट उतरली नाही. आता जोपर्यंत हत्तीवरच्या स्वारीचा प्रश्न आहे, तर निवृत्त झाल्यानंतर आपण दोघेही हत्तीवर बसू या. गणतंत्र दिनाच्या परेडमध्ये नव्हे, एखाद्या अभयारण्यात. ”

बडेबाबू उठून उभे राहिले. त्यांनी नमस्कार केला आणि मॅनेजर साहेबांना काही बोलण्याची संधी न देताच ते केबीनच्या बाहेर पडले. मॅनेजर साहेबांना अशा अनपेक्षित उत्तराची मुळीच अपेक्षा नव्हती. इतक्या दीर्घ नोकरीत, अतिशय कडक स्वभावाबद्दल प्रसिध्द असलेल्या मॅनेजर साहेबांचा असा स्पष्टवादी, सटीक आणि सरळ उत्तर देणा-या स्टाफशी आत्तापर्यंत कधीच संबंध आला नव्हता. ते काही वेळ शांतपणे बसले. मग त्यांनी काही विचार केला व डायरी उचलून बाहेर पडले. जाता जाता बडेबाबूंना म्हणाले, ‘‘मी काही जरूरीच्या कामासाठी घरी चाललोय. कुणाचा फोन आला, तर तेव्हढं मॅनेज करा. ”

बडेबाबू काही बोलणार, एवढ्यात मॅनेजर साहेब ऑफीसच्या बाहेर पडलेसुध्दा. ऑफिस सुटायचीही आता वेळ झाली होती. मॅनेजर साहेब जाताच सगळे जसे स्वतंत्र झाले. आणि हळूहळू पिंज-यातून बाहेर पडून आपापल्या घरट्याकडे जाण्यासाठी बाहेर पडले. आता ऑफीसमध्ये फक्त बडेबाबू आणि शूरवीर रामप्रसाद व सीताराम तेवढे उरले. शेवटी तिघांनीही आपापले टिफीन उचलले आणि आपल्या घराच्या दिशेने निघाले.

दुस-या दिवशी ऑफीसला जाण्यापूर्वीच बडेबाबूंना हेडऑफिसमधून फोन आला की त्यांना डेप्युटेशनवर जायची आवश्यकता नाही. त्यांच्या चेह-यावर एक रहस्यमय हसू पसरलं.

बडेबाबू आपल्या पहिल्या ऑफिसमध्ये पोचले, एवढ्यात रामप्रसादचा फोन आला, बडेबाबू, आपले खूप खूप आभार. काल संध्याकाळी आपलं आणि मॅनेजर साहेबांचं काय बोलणं झालं, माहीत नाही. पण आत्ता सकाळी सकाळी मॅनेजर साहेबांनी बोलावलं आणि सांगितलं, की सीतारामने आपला अर्ज परत घेतलाय. पुन्हा तक्रार येता कामा नये.

‘‘चला! बरं झालं! अभिनंदन! माझ्याजागी कुणी दुसरा हेडक्लार्क आला की नाही?”

‘‘नाही. बडेबाबू कोणीच आलं नाही. साहेब म्हणत होते, आपण येणार नाही. आणि त्यांनी त्या टेबलवरच्या सगळ्या फाईली केबीनमध्ये आणून ठेवायला सांगितल्या. ”

बड्याबाबूंच्या चेह-यावर एक रहस्यमय, कुटील हास्य पसरले आणि ते निश्चिंतपणे गुपचुप आपल्या जुन्या फाईली निपटू लागले.

— समाप्त — 

मूळ हिंदी कथा – हाथी की सवारी

मूळ लेखक – हेमंत बावनकर, मो. – 9833727628

अनुवादिका –  सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 836 925 2454, email-id – [email protected] 

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ हत्तीवरची स्वारी- भाग – २ – हिन्दी लेखक : श्री हेमन्त बावनकर ☆ भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

☆ हत्तीवरची स्वारी – भाग – २ – हिन्दी लेखक : श्री हेमन्त बावनकर ☆ भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर

श्री हेमन्त बावनकर

 ( या फालतु समस्येवर उपाय तरी काय करायचा? बडेबाबूंच्या दृष्टीने जशी काही ही समस्याच नव्हती. मॅनेजर साहेवांनी थोडा वेळ विचार केला मग इंटरकॉमवरून ते विरेंद्रशी बोलू लागले. ) – इथून पुढे —-

‘अरे विरेंद्र, हा रमेश आहे ना, त्याच्या मोठमोठ्या लोकांशी ओळखी आहेत. तो आपल्यासाठी उगीचच काही तरी खुसपट काढून अडचणी निर्माण करेल. हे बघ, या विभागात कुणी थट्टेने त्याची टुलकीट लपवली असेल, तर तर सांग, कुठल्या तरी ठराविक जागी ती ठेवावी. यावर मी कुठलीही अनुशासनिक कारवाई करणार नाही. ”

बडेबाबूंनी गुपचुप चहाचा शेवटचा घोट घेतला व ते उठले. गंभीर चेह-यावर कुटील हसू आणत मॅनेजरच्या डोळ्यांना डोळे भिडवत म्हणाले, ‘‘काय बोलताय साहेब? थट्टा आणि तीदेखील रमेशची. कोण करणार त्याची थट्टा? ज्याने कुणी हे केले असेल, त्याने ते सिरियसलीच केले असेल. ” आणि मॅनेजर साहेबांच्या प्रतिक्रियेची वाट न बघता ते केबीनमधून बाहेर पडले. मॅनेजर असहाय्यपणे त्यांच्याकडे बघू लागले.

त्या दिवसापासून आजपर्यंत टूलकीट काही मिळाली नाही आणि मॅनेजरने पुन्हा काही त्याबद्दल विचारले नाही.

धीरगंभीर दिसणारा विरेंद्र उर्फ वीरु आणि बडेबाबू या दोघांमध्येही प्रचंड सेन्स ऑफ ह्यूमर होता. त्यांच्याशी अतिशय काळजीपूर्वक बोलावे लागे. नाही तर, ते केव्हा काय बोलतील, ते समजायलाच डोक्याला ताण द्यावा लागे. बड्याबाबूंशी बोलताना अगदी पूर्ण शुध्दीत राहून बोलावं लागे. नाही तर ते असं एखादं वाक्य टाकत की आसपासच्या लोकात आपल्याला हास्यास्पद बनायला वेळ लागत नसे. ते अतिशय गंभीरपणे बोलत. पण त्यावेळी चेह-यावर एक कुटील हसू खेळत असे. हे हसू आसपासच्या लोकांसाठी आहे की ते ज्यांच्याशी बोलताहेत, त्यांच्यासाठी आहे, कळत नसे. थोडक्यात काय, तर त्यांच्याशी सुसंवादी होऊन आपण त्यांच्याशी, जेवढं आवश्यक आहे, तेवढं मोजकंच बोलायला हवं.

बडेबाबू वेळेच्या बाबतीत अगदी काटेकोर, वक्तशीर होते, तसेच कामाच्या बाबतीत ईमानदार. नोकरीत सध्या ते जिथे आहेत, तेथून त्यांच्या बाबतीत पदोन्नतीची कुठलीही शक्यता नव्हती. तशी त्यांची इच्छाही नव्हती. शिवाय, आता नोकरीत त्यांचं कुणी काही बिघडवू शकेल, याचीही त्यांना काळजी, चिंता नव्हती.

आपल्या हाताखालची मंडळी आणि अधिकारी वर्ग यांच्याशी ते नेहमीच हसून खेळून बोलत. आपली वाक्पटुता आणि स्पष्टवक्तेपणा याबद्दल ते सगळ्या ऑफीसमध्ये सुप्रसिध्द होते. त्यांच्या हाताखालच्या लोकांची काय बिशाद होती, की ते बडेबाबूंशी वाद घालतील. बडेबाबूंच्या या वैशिष्ट्यामुळे त्यांचे वरीष्ठ अधिकारीही त्यांच्याकडून प्रेमानेच काम करून घेत.

बड्याबाबूंची नोकरीत आता अवघी पावणे दोन वर्षे उरली होती. त्यापूर्वी एखादी चांगली निवृत्तीयोजना आली, तर त्यांनी ती घेण्याचेही ठरवले होते. अर्थात् त्यामुळे पेन्शनीत फार काही फरक पडला असता असं नाही. इतक्यात बातमी आली की त्यांची बदली झाली. या बदलीसाठी ते मुळीच तयार नव्हते. त्यांनी आपल्या संपर्क सूत्रांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आणि ब-याच प्रमाणात तो यशस्वीही होत होता. नाही तर त्यांनी सेवानिवृत्ती घेण्याचेही नक्की केले होते. पण त्या कशाची गरज पडली नाही, कारण त्यांच्या वरिष्ठांनी त्यांच्या सेवाकालाचा विचार करून त्यांची बदली करण्याचा विचार रद्द केला. गरज पडेल, तेव्हा त्यांना डेप्युटेशनवर पाठवावे, असे ठरले.

सगळं ठाकठीक चालू होतं. तोपर्यंत कळलं, की त्याच शहरातल्या दुस-या विभागीय कार्यालयातील हेडक्लार्क दीर्घ मुदतीच्या रजेवर जाणार आहेत. बड्याबाबूंना तिथे डेप्युटेशनवर पाठवायचे ठरले. त्यांची काही तशी खास इच्छा नव्हती, पण फारशी असुविधाही नव्हती. शहर तेच. या कार्यालयाऐवजी ते कार्यालय. तेथील हेडक्लार्क रजेवर जाण्यापूर्वी बड्याबाबूंनी फोनवर त्यांच्याशी बोलून तिथल्या कामकाजाविषयीची माहिती जाणून घेतली. त्यांना असं कळलं की तिथले मॅनेजर अतिशय कडक आहेत. पण एकंदर कर्मचारी वर्ग शिस्तीच्या बाबतीत अतिशय ढिला आहे.

शनिवारी ते आपल्या ऑफिसमधून रिलीव्ह झाले आणि सोमवारी सकाळी नेहमीच्या वेळेत नवीन ऑफिसमध्ये पोचले. त्यांना काय कल्पना की त्यांच्या नोकरीच्या तिथल्या पहिल्याच दिवशी तिथे बॉम्ब फुटणार आहे.

साडे दहा वाजले होते, पण रामप्रसाद शिपायाशिवाय ऑफीसमध्ये कुणीच आलेलं नव्हतं. रामप्रसाद म्हणाला, ‘‘साहेब, मॅनेजर साहेब केबीनमध्ये बसले आहेत. ’ बड्याबाबूंनी केबीनकडे नजर टाकली. केबीनच्या काचेवर काळी सनस्क्रीन फिल्म लावली होती. त्यामुळे बाहेरून आतलं दिसत नव्हतं, पण आतून बाहेरचं सगळं स्पष्ट दिसत होते.

ते गुपचुप काहीसे अस्वस्थपणे खुर्चीवर बसले. आणि फाईलींच्या ढिगा-यातल्या काही अत्यावश्यक फाईल्स काढून, मजकूर समजून घेण्याच्या दृष्टीने त्यातील पाने उलटू लागले.

थोड्या वेळाने ऑफीसमध्ये गडबड, गोंधळ वाढू लागला. लोक येऊ लागले. मस्टरवर सही करून आपापल्या जागी बसू लागले. बडेबाबू फायली चाळत होते खरे, पण त्याचवेळी त्यांचं लक्ष सगळीकडे होतं.

सगळं काही ठाक-ठीक चाललं होतं. त्यांच्या टेबलपासून तिस-या किंवा चौथ्या टेबलवर मस्टर ठेवलेलं होतं. रामप्रसाद आणि दुसरा शिपाई सीताराम यांच्यात काही बाचाबाची सुरू झाली. बघता बघता प्रकरण इतकं वाढलं की दोघेही शिव्यागाळीवर उतरले. बड्याबाबूंना वाटलं, थोड्या वेळात सगळं शांत होईल, पण हे काय प्रकरण हातघाईवर आलं. दोघांच्यात मारामारी सुरू झाली. तरीही ते तसेच बसून बघत राहिले. काही लोक भांडण सोडवायला पुढे धावले. पण या दरम्यान दोघांची मारामारी इतकी वाढली, की कुणालाच मधे पडता आलं नाही. रामप्रसादने सीतारामला इतकं जोरात ढकललं, की तो पलिकडच्या टेबलाच्या कोप-यावर जोरात जाऊन आदळला. त्याच्या डोक्याला लागलं. जखमेतून रक्त येऊ लागलं. आता हा सगळा तमाशा थांबवण्यासाठी बड्याबाबूंना नाइलाजाने उठावं लागलं.

त्यांना वाटत होतं, हे प्रकरण इथेच थांबावं. पण सीतारामच्या डोक्याला खोक पडली होती. त्यामुळे तो ऐकायला मुळीच तयार नव्हता. आपलं डोकं धरून तो मॅनेजर साहेबांकडे पोचला. बड्याबाबूंना वाटलं, आता म्हैस पाण्यात गेली.

मॅनेजरने प्रथम सीतारामला मलमपट्टी करण्याची व्यवस्था केली आणि त्याला समजावण्याचा प्रयत्न केला की त्याने रामप्रसादशी तडजोड करावी, पण ऑफीसमधील काही स्टाफच्या भडकावण्यामुळे त्याने ते आजिबात ऐकलं नाही व मॅनेजर साहेबांकडे रामप्रसादविरुध्द लेखी तक्रार केली. आता काय करणार? मॅनेजर साहेबांना वाटलं की या सा-या प्रकरणाचा नीट तपास करायला हवा.

सगळ्या कार्यालयातलं सरकारी काम एका बाजूला राहिलं आणि चौकशी करायला सुरुवात झाली. बड्याबाबूंना वाटलं, चांगली व्यवस्थित नोकरी चालू होती. या नाही त्या भानगडीत येऊन अडकलो. पण आता दुसरा काही इलाजही नव्हता. मॅनेजर साहेबांनी एकेका स्टाफ मेंबरला केबीनमध्ये बोलावलं आणि विचारणा सुरू केली. त्यांच्या बोलण्याप्रमाणे ते टिपणं काढू लागले.

ऑफीसमध्ये एका बाजूला रामप्रसाद आणि दुस-या बाजूला सीताराम डोक्याला पट्टी बांधून, शूरवीराप्रमाणे बसले होते. अधून मधून ते संशयित दृष्टीने एकमेकांकडे बघत होते. दोघांमध्ये दोन तीन टेबले होती. कुणास ठाऊक, संध्याकाळपर्यंत मॅनेजर साहेब काय निकाल देतात?

– क्रमशः भाग दुसरा.

मूळ हिंदी कथा – हाथी की सवारी

मूळ लेखक – हेमंत बावनकर, मो. – 9833727628

अनुवादिका –  सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 836 925 2454, email-id – [email protected] 

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ हत्तीवरची स्वारी- भाग – १ – हिन्दी लेखक : श्री हेमन्त बावनकर ☆ भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

☆ हत्तीवरची स्वारी – भाग – १ – हिन्दी लेखक : श्री हेमन्त बावनकर ☆ भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर

श्री हेमन्त बावनकर

भोपाळमधील एका सरकारी कार्यालयात प्रबोधबाबू हेड क्लार्क होते. आता हिंदी भाषेच्या रिवाजाप्रमाणे हेडक्लार्कला ‘बडेबाबू’ म्हंटलं जातं. पण प्रबोधजींच्या बाबतीत त्यांचे केवळ सहकर्मीच नव्हेत, तर मॅनेजरपासून डायरेक्टरपर्यंत सगळे त्यांना ‘बडेबाबू’च म्हणत. होता होता परिचित नातेवाईकांमध्येही त्यांना बडेबाबूच म्हंटलं जाऊ लागलं. प्रबोध हे त्यांचं नाव जणू विसरल्यासारखंच झालं.

तर एकदा बडेबाबूंच्या विभागात मेंटेनन्स विभागाकडून, कॉम्प्युटर इंजिनिअर रमेश आला. कॉम्प्युटर मध्ये काही समस्या असतील, तर त्या सोडवणे, सुधारणा वगैरे करणे गरजेचे असेल, तर ते करणे इ. गोष्टींसाठी त्याची नियुक्ती झाली होती. रमेश प्रत्यक्ष कामापेक्षा बढाई मारण्यात पटाईत होता. त्याने विभागातील सर्वांना कॉम्प्युटर किती काळजीपूर्वक हाताळायला हवा, वगैरेबद्दल सूचना दिल्या. लोकांनी कॉम्प्युटर काळजीपूर्वक हाताळले नाहीत, तर त्यांना अद्दल घडवण्यासाठी तो काय काय करू शकतो, हे सांगायलाही त्याने कमी केले नाही. लोक त्याची वायफळ बडबड ऐकून पार वैतागले होते.

 थोड्या वेळाने रमेश पाणी पिण्यासाठी बाहेर कुलरकडे गेला. त्यावेळी रमेशची थट्टा करण्यासाठी बडेबाबूंनी काही जणांना नजरेच्या इशा-यानेच रमेशची टूलकीट लपवायला सांगितली. रमेश पाणी पिऊन परत आला आणि आपली टूलकीट न दिसल्याने तो बेचैन झाला. त्याने त्या विभागात सगळीकडे शोधाशोध केली, पण त्याला त्याची टूलकीट कुठेच मिळाली नाही.

सगळा विभाग अगदी शांत आणि स्तब्ध होता. जसा काही नुकताच कुणाचा तरी मृत्यू झालाय. थोड्या वेळापूर्वी रमेशची बडबड ऐकणारे सगळे, खाली मान घालून आपापल्या फाईलींमध्ये गर्क झाले होते. कुणीच त्याच्याकडे लक्ष दिले नाही.

रमेशने आपल्या स्मरणशक्तीवर खूप ताण दिला, पण त्याला काहीच आठवलं नाही. मग तो ज्या ज्या ठिकाणी कॉम्प्युटर तपासणीसाठी गेला होता त्या त्या ठिकाणी गेला पण कुणीच त्याला सहकार्य केले नाही. काहींनी त्याला सहानुभूती जरूर दाखवली. ‘नीट आठवून बघ. कुठे ठेवली होतीस टूलकीट?’ ते तर त्याने आधीच केले होते.

सगळा घटनाक्रम बघू जाता रमेशच्या आता लक्षात येऊ लागलं होतं, की ‘दालमें कुछ काला है’. हे लोक त्याच्याशी काही कपट करत आहेत. शेवटी नाईलाजाने तो बडेबाबूंच्या टेबलापुढील खुर्चीवर जाऊन बसला. बडेबाबूंनी त्याला न पाहिल्यासारखे करत आपल्या फाईली बघण्याचं काम चालू ठेवलं. विभागाची अनपेक्षित स्तब्धता, शांतता याचा भंग करत रमेश म्हणाला, ‘‘बडेबाबू माझी टूलकीट मिळत नाही. ’’

‘‘अरे रमेशभैय्या जरा डोक्याला ताण देण्याचा प्रयत्न करा. आपण कुठे गेला होतात? शेवटी कुठे गेलात? आपली टुलकीट शेवटी कुठे ठेवलीत?’’

रमेश आता पुरता वैतागला. म्हणाला, ‘‘बडेबाबू, मी ते सगळं करून बघितलं. ”

‘‘छे: छे: हे काही बरोबर झालं नाही. अखेर आपली छोटीशी टूलबॉक्स ती जाईल कुठे?” आपल्या धीर-गंभीर चेह-यावर एक कुटील हसू खेळवत ते म्हणाले, ‘‘रमेशभैय्या, आपण मुळीच चिंता करु नका. आपण जर खरोखरच टूलकीट आणली असेल, तर ती इथेच कुठेतरी असेल. ”

आता रमेशचं डोकं जरा सटकलंच. चिडून म्हणाला, ‘‘आणली असलीत तर… म्हणजे काय? या विभागातले इतके सगळे कॉम्प्युटर मी त्याच्याशिवाय तपासले का?”

‘‘शांत व्हा. शांत व्हा. रमेशभैय्या. ”

‘‘शांत… शांत काय? मला इतर विभागातसुध्दा कॉम्प्युटर बघायला जायचंय. आपण माझी टूलकीट लवकर मिळवून नाही दिलीत, तर… ”

‘‘तर काय?”

‘‘मी मॅनेजर साहेबांकडे तक्रार करीन. ”

बडेबाबू आपल्या नेहमीच्या चिरपरिचित मुद्रेत पोचले. ‘‘मग करा ना तक्रार!”

संतापाने रमेश उभा राहिला. आणि पाय आपटत मॅनेजरच्या केबीनकडे निघून गेला. विभागात अगदी शांतता पसरली. इतकी शांतता की टाचणी पडली, तरी आवाज येईल. सगळे एक दुस-यांना डोळ्याने खुणावत होते. बडेबाबू निश्चिंत होऊन आपल्या कामाला लागले. त्यांना माहीत होतं, मॅनेजरच्या केबीनमध्ये आत्ता काय चाललं असेल व त्यांना हेही माहीत होतं की हा मुद्दा निकालात कसा काढायचा.

त्यांच्या अपेक्षेप्रमाणे मॅनेजरचा इंटरकॉमवरून कॉल आलाच. ते हसत हसत उठले. विभागात सगळीकडे बघत आपले कुटील हसू पसरवले. आणि ते केबीनकडे निघाले. विभागात खुसफुस होऊ लागली. काही जण म्हणत होते, ‘आता मजा येईल’. काहींना वाटत होतं, ‘विनाकारणच भांडण ओढवून घेतले. ’

बडेबाबू मॅनेजरच्या केबीनमध्ये पोचले. रमेश आधीपासून तिथे होताच. केबीनमध्येही शांतता होती. मॅनेजर साहेबांनाही वाटत होतं की हा फालतु मामला लवकरच निपटला जाईल. कारण रमेशची अनेक वरिष्ठ अधिका-यांशी ओळख होती. एवढीशी गोष्ट वरपर्यंत जाऊन कुणी त्यांच्या व्यवस्थापनाकडे बोट दाखवावं, असं त्यांना वाटत होतं.

बडेबाबूंच्याकडे तोंड करत मॅनेजर म्हणाले, ‘‘बडेबाबू बसा. बघा बरं या रमेशची काय समस्या आहे?”

बडेबाबू अगदी शांतपणे बसले. आणि गंभीरपणे रमेशकडे बघत म्हणाले, ‘‘रमेशभैय्या काय झालं? आपण तर इतरांच्या समस्या सोडवता. आता आपल्याला कोणती समस्या आली?”

रमेश संतापाने लालीलाल झाला. तो जवळ जवळ किंचाळत म्हणाला, ‘‘बडेबाबू, माझी टूलकीट आपल्या विभागात हरवलीय. ”

बडेबाबू मुळीच उत्तेजित झाले नाहीत. आश्चर्यकचकित होऊन, त्यांनी अगदी शांतपणे विचारलं, ‘‘काय टूलकीट? कमाल आहे. टूलकीट म्हणजे काय कुणी लहान मूल आहे, जे माझ्या विभागात हरवेल. आपण आपलं काम पूर्ण करून बाहेर गेला होतात. तिथे कुठे तरी विसरला असाल. जरा शांत डोकं ठेवून विचार करा. आपण तिकडे कुठे तर विसरला नाहीत ना!”

‘‘मी बाहेर फक्त कूलरचं पाणी प्यायला गेलो होतो. आपल्याशी बोलण्यात काही अर्थ नाही. ”

मग रमेश मॅनेजरला म्हणाला, ‘‘सर, मला यांच्याशी काहीही बोलायचे नाही. आपण माझी टूलकीट मिळवून द्या बस्स!”

मॅनेजर साहेबांच्या आता एकंदर परिस्थिती लक्षात येऊ लागली होती. ते म्हणाले, ‘‘रमेश, सध्या दुस-या टूलकीटने तू आपलं काम चालव. मी सगळ्याची माहिती काढून तुला कळवतो. ”

रमेश रागाने उठून उभा राहिला आणि बड्याबाबूंकडे बघत म्हणाला, ‘‘ठीक आहे. सध्या मी जातो. जर आपल्याला यांच्याकडून टूलकीट मिळवण्यात काही अडचण असेल, तर सांगा. मी जनरल मॅनेजरकडे जातो.”

मॅनेजर गप्प बसले. रमेश पाय आपटत तिथून निघून गेला. केबीनमध्ये थोडा वेळ शांतता पसरली. तोपर्यंत चहाची वेळ झाली. त्यांनी कँटीनच्या पो-याला दोन कप चहा केबीनमध्ये पाठवायला सांगितला. पो-या चहा ठेवून निघून गेला. दोघे गुपचुप चहा घेऊ लागले. मॅनेजर साहेबांच्या डोक्यात उलट-सुलट विचारांचा नुसता गुंता झाला होता. या फालतु समस्येवर उपाय तरी काय करायचा? बडेबाबूंच्या दृष्टीने जशी काही ही समस्याच नव्हती. मॅनेजर साहेवांनी थोडा वेळ विचार केला मग इंटरकॉमवरून ते विरेंद्रशी बोलू लागले.

– क्रमशः भाग पहिला 

मूळ हिंदी कथा – हाथी की सवारी

मूळ लेखक – हेमंत बावनकर, मो. – 9833727628

अनुवादिका –  सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 836 925 2454, email-id – [email protected] 

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print