मराठी साहित्य – जीवनरंग ☆ प्रामाणिकपणाचे कौतुक… ☆ श्री गुरुनाथ चंद्रकांत ताम्हणकर

श्री गुरुनाथ चंद्रकांत ताम्हणकर

? जीवनरंग ❤️

☆ प्रामाणिकपणाचे कौतुक… ☆ श्री गुरुनाथ चंद्रकांत ताम्हणकर ☆ 

बंडूतात्या सकाळी सकाळीच तयारी करून शहराच्या गावी जायला निघाले. महत्त्वाचे काम असल्याने त्यांच्या सोबत त्यांचे मित्र अप्पाजीही होते. एस.टी.त बसल्यावर आपल्याला काय काय घ्यायचं आहे याचा ते विचार करत होते. बर्‍याच दिवसांनी शहराच्या ठिकाणी जात होते. त्यामुळे त्यांच्या छकुलीनेही “आपल्यासाठी काहीतरी आणा” असे बजावले होते.

गाडी वेळेवर पोहोचली. कार्यालयातील त्यांची कामेही लवकरच आटोपली. आपली सर्व कामे आटोपल्यावर  त्यांना घरी जाण्यासाठी बराच वेळ शिल्लक होता. आता  खरेदी करू या असं ठरवून दोघेही बाजारामध्ये गेले. घरी लागणा-या काही वस्तू बाजारातून त्यांनी खरेदी केल्या. आपली छकुली  काय तरी नवीन घेऊन येण्याची वाट पाहत असणार. म्हणून आपल्या मुलीसाठी त्यांनी एक सुंदर फ्रॉक खरेदी केला . मुलीला आवडत असलेला रंग आणि त्यावर असलेला सुंदर गोंडा त्यामुळे तो फ्रॉक बंडूतात्यांना खूपच आवडला होता. केव्हा एकदा घरी गेल्यावर आपल्या मुलीला ती भेट देतो असं त्यांना झालं होतं.  अजूनही गाडीला खूप वेळ होता. त्या दोघांची खरेदी संपलेली होती. आता बस स्टॉपवर बसून राहण्यापेक्षा आपण सिनेमा पाहायला जाऊ असा त्यांनी विचार केला. त्या दोघांनी एक रिक्षा बोलावली आणि त्या रिक्षात बसून ते सिनेमागृहात निघाले. सिनेमाचा वेळ झालेला होता. सिनेमागृहापाशी पोहोचल्यावर बंडूतात्यांनी रिक्षावाल्याला पैसे दिले आणि लगेच तिकीट काढायला म्हणून घाईघाईने निघून गेले. त्यांनी सिनेमाची तिकिटं काढली आणि सिनेमागृहात प्रवेश केला. त्यांच्या आवडीच्या विषयावर सिनेमा असल्यामुळे बंडू तात्या सिनेमा पाहण्यात दंग झाले होते.

दरम्यान मध्यंतर झालं आणि सिनेमागृहाच्या लाइट्स सुरू झाल्या. मात्र त्यांच्या चेहऱ्यावर दु:खी भाव दिसू लागले. अप्पाजींनी त्याला विचारलं, “काय रे, काय झालं? तू दु:खी का?”

बंडू तात्या म्हणाले, “आपण बाजारातून  माझ्या मुलीसाठी फ्रॉक घेतला होता. त्या फ्रॉकची पिशवी आता मला दिसत नाही. आता रिकाम्या हाताने घरी गेलो तर छकुली नाराज होईल.”

आप्पाजी म्हणाले, “अरे आता काय करणार ? आता तर आपली जायची वेळ झाली. आपल्याला वेळेवर निघायला हवं. नंतर बस नाही.”

बंडू तात्या आपल्या मित्राला म्हणाले, “चल आपण बाहेर जाऊ आणि थोडा शोध घेवू.”

आप्पाजी  त्याला म्हणाले, “ठीक आहे. पण नीट आठव. नाहीतर आपल्याला उगाच इकडे-तिकडे भटकत राहावे लागेल.”

बंडूतात्यांना मात्र काहीच सुचत नव्हतं. ते लगबगीने बाहेर आले. सिनेमागृहाच्या बाहेर आल्यानंतर इकडेतिकडे शोधक नजरेने पाहू लागले. त्याच वेळी एक गृहस्थ त्यांच्या दिशेने आला आणि त्यांना विचारलं, “काय हो, काय शोधत आहात? मला जरा सांगता का?”

त्या गृहस्थाकडे ते पाहू लागले. ते म्हणाले, “सांगून काय उपयोग आहे? पण सांगतो.  माझी एक किंमती वस्तू हरवलेली आहे आणि ती वस्तू मी जर घरी नेली नाही तर माझ्या मुलीला खूप वाईट वाटेल.”

तो गृहस्थ म्हणाला, “मी एक रिक्षा व्यावसायिक आहे. दुपारी माझ्या रिक्षामध्ये दोन व्यक्ती बसलेल्या होत्या . त्यापैकी एकाची पिशवी माझ्या रिक्षामध्ये राहिली. परंतु त्यांचा चेहरा नीट पाहिला नसल्यामुळे मला ते व्यवस्थित आठवत नाहीत. मी शोधू शकत नाही.”

हे ऐकून बंडूतात्यांना बरं वाटलं. ते म्हणाले, “अहो तो मीच आहे. माझीच पिशवी हरवली आहे.”

रिक्षावाला म्हणाला, “माझ्या रिक्षामध्ये ही पिशवी विसरली होती. घरी गेल्यावर माझ्या पत्नीला सापडली.”

“हो पण एवढ्या पिशवीसाठी तुम्ही परत आलात?”

रिक्षावाला म्हणाला, “खरं तर तुम्हाला सोडून मी माझ्या घरी गेलो. घरी गेल्यावर पत्नी पाहते तर ती पिशवी होती. ती पिशवी  बघून माझी बायको म्हणाली, “अहो केवढ्या प्रेमाने सद्गृहस्थाने आपल्या मुलीसाठी सुंदर ड्रेस घेतलेला आहे. आणि ती पिशवी तो आपल्या रिक्षामध्ये विसरला आहे. त्याला खूप वाईट वाटेल. पहिले तुम्ही पुन्हा मागे जा आणि त्याला शोधून काढा. आपल्या मुलीसारखी त्यांची मुलगी त्या वस्तूसाठी वाट बघत असेल.” म्हणून मी पुन्हा तुम्हाला शोधण्यासाठी आलो.”

हे ऐकून बंडूतात्यांना त्याच्या प्रामाणिकपणाबद्दल अप्रुप वाटलं. त्याला बक्षीस म्हणून पैसे देऊ केले. मात्र त्याने पैसे घेण्यास नकार दिला.

तो म्हणाला, “अहो आम्ही कष्टाची  भाकरी खातो. आणि त्यामुळेच मी तुम्हाला ही पिशवी परत देण्यासाठी आलो आहे. मला अजिबात नको पैसे.”

बंडू तात्यांना राहवत नव्हतं. त्यांनी त्या रिक्षावाल्याचा पत्ता घेतला आणि त्या रिक्षावाल्याच्या युनियनचा सुद्धा पत्ता घेतला. घरी आल्यावर त्यांनी रिक्षा युनियनच्या अध्यक्षांना पत्र लिहिले. त्या पत्रामध्ये त्या गृहस्थाच्या प्रामाणिकपणाबद्दल कौतुक केलं आणि रिक्षावाल्यांच्या युनियनचे सुद्धा आभार मानले

असेच काही दिवस गेले. एक दिवस त्यांना एक पत्र आले. त्यात लिहिलं होतं, “नमस्कार! आमच्या  रिक्षा युनियन मधील एका रिक्षावाल्याच्या प्रामाणिकपणाबद्दल तुम्ही कौतुक केलं. आमच्या सहका-यांनाही चांगलं वाटलं. त्याबद्दल त्या रिक्षावाल्याचा एक छोटासा सत्कार आमच्या युनियनच्यामार्फत ठेवलेला आहे. आणि हा सत्कार आपल्या शुभ हस्ते व्हावा अशी आमची इच्छा आहे. यासाठी तुम्ही आमच्या कार्यक्रमाला उपस्थित रहावे. येण्या- जाण्याचा जो खर्च आहे तो आमच्या रिक्षा युनियनच्या मार्फत तुम्हाला देण्यात येणार आहे.”

बंडूतात्यांना खूप आनंद झाला. आपण लिहिलेल्या पत्रामुळे एका चांगल्या माणसाचा गौरव होतोय याचा त्यांना आनंद झाला. या कार्यक्रमाला ते उपस्थित राहिले. कार्यक्रम संपल्यावर पदाधिकाऱ्यांनी प्रवास खर्च देऊ केला परंतु त्यांनी तो नाकारला.

” एवढं चांगलं काम तुम्ही केलं. एका प्रामाणिक व्यक्तीचा तुम्ही गौरव केलात. त्यामुळे तुमच्याकडून पैसे घेणे हे मला शोभत नाही. अशाच प्रकारची प्रामाणिक सेवा तुम्ही सर्व जनतेला देत आहात हे पाहून मला खूप आनंद झाला आहे.”

प्रामाणिकपणाचे फळ नेहमीच चांगलं असतं.

© श्री गुरुनाथ चंद्रकांत ताम्हणकर

सदस्य, अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मालवण

पत्ता – मु. बागायत, पो. माळगाव, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग. 416606

संपर्क – 9420738375

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ कागदपत्रे शोधता शोधता… सुश्री निलिमा क्षत्रिय ☆ प्रस्तुती सुश्री नेहा जोशी ☆

? जीवनरंग ❤️

☆ कागदपत्रे शोधता शोधता… सुश्री निलिमा क्षत्रिय ☆ प्रस्तुती सुश्री नेहा जोशी

कागदपत्रे शोधणे हा घरातील एक अतिशय तणावपूर्ण क्षण असतो. ब-याच घरांमध्ये कागदपत्रे नीटनेटके ठेवण्याची जबाबदारी पुरूष स्वत:कडे घेतात. कारण ते महत्वाचं काम असतं. आणि अशी महत्वाची कामे करण्यासाठी जी कुशाग्र बुद्धी लागते, ती बुद्धी पण त्यांना जन्मत:च असते. बायका काय आपल्या स्वयंपाकपाणी, स्वच्छता, आलं गेलं, नेणं आणणं, पाहुणारावळा, आजारपणं.. अशी क्षुल्लक बिन महत्वाची खाती सांभाळत असतात. कारण त्यांना काय समजतं!!

तर्रर्र.. ज्यादिवशी अचानक एखादं कागदपत्र घरातल्या पुरूषाला हवं असतं..

” इथे टिव्ही पाशी मी दोन पेपर्स ठेवले होेते ते कुठे आहेत? “

” कधी ठेवले होते”?

” परवा नाही का, तुमची भिशी होती, म्हणून मी घाईघाईत गेलो, नंतर ठेवू म्हटलं कपाटात.. “

“बरं मग? “

बाईला आता पुढचा सगळा एपिसोड रंगताना  दिसतो.

“बरं मग काय? सत्यनारायणाची कथा सांगतोय का मी? कागद गेले कुठे ते विचारतोय! भिशी च्या आवराआवरीच्या नादात टाकले नाही ना कुठे केरात बिरात”?

“केरात कशी टाकेन मी? तुमच्या एवढी नाही पण थोडीतरी अक्कल दिलीय देवाने मला पण”!  #सरीवरसरी

“हो,विसरलो होतो,” (कंसात)

“नक्की इथेच ठेवली होती का?”

” नक्की म्हणजे काय, मला आठवतं ना चांगलं. मला एक कळत नाही, दिवस दिवस वस्तू लोळत पडलेल्या असतात, त्या जागच्या हलत नाहीत, पण महत्वाचं काही ठेवलं की लगेच दोन मिनिटात गायब.”

” ठेवायचं ना मग व्यवस्थित लगेच, इथे तिथे टाकून पळायचं, आणि वर्षभराने विचारायचं, मी हे इथे ठेवलं होतं कुठे गेलं”

“सगळ्या घरभर तुझा आणि मुलांचा पसारा असतो, मी एखादा कागद ठेवला तर तो पण नाही रहात घरात नीट”

” बेडवरचा ओला टॉवेल, कपडे बदलल्यावर ‘ळ’ आकारात पडलेला पायजमा वेळच्या वेळी उचलला जातो माझ्याकडून म्हणून तुमचा पसारा दिसून येत नाही…

उडाले असतील ते फॅनने.. काही ठेवलं होतं का त्याच्यावर?”

” हो मग, टिव्ही च्या खाली दाबून ठेवले होते, झालंच तर रिमोट ठेवला होता वर”!

कागदांच्या ठेवणुकीचं इतकं डिटेलिंग ऐकल्यावर आता बिचारी गृहिणीं जरा गांगरते..

“कुठे गेले असतील बरं… थांबा जरा सापडतील. बघते मी…”

अशी जरा पुढची बाजू ढासळायला लागली की गृहस्थांच्या अंगात दहा बुलडोझर ची ताकद संचारते… #nilima_kshatriya

” हज्जारदा  सांगितलंय कागदपत्र फेकत जाऊ नका, माझ्या कामाच्या वस्तूंना हात नका लावत जाऊ.. पण नाही.. ( असा अनेकवचनी आदरार्थी उल्लेख केला की आपोआपच मुलांना पण समज मिळते, आणि ते शक्यतो घरातून काही वेळापुरते अदृष्य होतात, किंवा अभ्यासाला बसतात. )

हा हा लोकप्रभाचा अंक… गेल्या वर्षापासून इथे लोळतोय तो नाही हलला, पण दोनच कागद.. फक्त एकाच दिवसात गायब.. काय जादू आहे..”

खरं म्हणजे लोकप्रभाचा अंक ह्या महिन्याचा असतो, तो दोनच दिवसांपूर्वी आलेला असतो, पण ‘तो वर्षापासून इथे लोळतोय’ ह्या म्हणण्याला आता आडवं लावण्यात अर्थ नसतो, म्हणून गृहिणी नमतं घेत रहाते.. तसतसा गृहस्थांचा बुलडोझर सैरावैरा धावत सुटतो…

“दोन तास तहसील कचेरीत उभं राहून ते पेपर्स मिळवले होते.. सालं कशाचं गांभिर्य म्हणून नाही.. घर आहे की कबाडखाना.. “

आता गृहिणी सशाच्या काळजाने टीव्हीच्या आजूबाजूचा परिसर पिंजत सुटते. सोफ्याच्या खाली, शू रॅकखाली, टीव्हीच्या मागे, करत करत किचन बेडरूम्स.. इतकंच काय फ्रीज, बाथरूम सुद्धा बघून होतात. पण कागद पत्रं.. ‘धरती निगल गयी या आसमां खा गया’.. अशी अवस्था..

तेवढ्यात बुलडोझर डिझेल संपल्यासारखा एकदम लडखडतो. त्याला काहीतरी आठवतं. आणि तो

गृहिणीची नजर चुकवत बाहेर उभ्या ॲक्टीव्हाच्या पोटातून दोन कागद तोंड पाडून घरात आणतो.

आता गृहिणी च्या अंगात पण पोकलेन संचारतो..

“तुम्ही तर टिव्ही शेजारी ठेवले होते कागद, त्याच्यावर रिमोट पण ठेवला होता. मग ते गाडीच्या डिकीत कसे पोहोचले? सगळं घर उलथं पालथं करायला लावलं. स्वत:ला लक्षात रहात नाही आणि घरादाराला नाचवायचं. तेवढंच काम आहे का मला? घरात इकडची काडी तिकडे करायची नाही, मी एकटीनेच गाडा ओढत रहायचा.. ते कार्टे पण मेले तुमच्यावरच पडलेत. का ss ही कामाचे नाहीत. मला खरंच इतका कंटाळा आलाय ना ह्या सगळ्याचा आता. असं वाटतं निघून जावं कुठेतरी लांब.. मी म्हणून टिकले बरं, दुसरी असती ना तर केव्हाच निघून गेली असती. “

पुढील अनर्थ हसण्यावारी टोलवला जातो..

” चहा ठेव पटकन, बँकेत जमा करायचेत कागदपत्रं..

लेखिका : सुश्री निलिमा क्षत्रिय

संकलन : सुश्री नेहा जोशी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ कथा एका राणीची – भाग-3 ☆ सुश्री सुनिता गद्रे ☆

सुश्री सुनिता गद्रे

? जीवनरंग ❤️

 ☆ कथा एका राणीची – भाग-3 ☆ सुश्री सुनिता गद्रे ☆ 

(एक क्रूर कपटी राणी असे नवे  विशेषण राणी दिद्दाला मिळाले.)

पण या सगळ्याची पूर्वीपासूनच तिने पर्वा केलेली नव्हती.याउलट अभिमन्यूला गादीवर बसून तिने राज्यकारभार सांभाळला. ती अतिशय उत्तम, कुशल राज्यकर्ती होती.तिच्या अधिपत्याखाली तिचे राज्य अधिक समृद्ध आणि बलशाली बनले होते.तिने पूर्ण आशिया खंडात व्यापारी संबंध जोडले आणि इराण पर्यंत पसरलेल्या अखंड भारताच्या वायव्य सीमेचेरक्षण करण्याची रणनीती पण तयार केली. तिने अतिशय सुंदर आणि भव्य अशा चौसष्ट  मंदिरांचे निर्माण कार्य केले. श्रीनगर जवळ बांधलेले एक शिवमंदिर …ते आता ध्वस्त झालेले आहे… पण त्या परिसराला आजही दिद्दामार म्हणून ओळखले जाते.सगळ्या प्रजेचे सहकार्य तिला लाभले.

हे सगळे चांगलेच चालू होते .पण तिच्या वैयक्तिक जीवनात तिला अनेक आघात झेलावे लागले. 972 मध्ये तिच्या पुत्र अभिमन्यु मृत्युमुखी पडला आणि त्यानंतर राज्यावर आलेल्या दुसऱ्या राजपुत्राने तिला राजवाड्यातून बाहेर काढले. दुःखाने कोलमडून जाण्याची तिची मनोवृत्तीच नव्हती .जनतेच्या सहकार्याने ती पुन्हा सत्ता हातात घेऊ शकली आणि नंतर अभिमन्यूच्या अवयस्क मुलाच्या…. नातवाच्या…नावाने तिने राज्य सांभाळले. पण नशिबाने जणू तिला दुःखच द्यायचे ठरवले होते…… तो आणि नंतर पाठोपाठ दोन तीन वर्षातच दुसरा नातू…. ज्यांना ज्यांना ती राजपाट देत होती त्यांचे निधनच होत राहिले. हे दुःख तर होतेच पण या क्रूर कपटी राणीने आपल्या मुलांना आणि नातवंडांना मारुन टाकले, हा तिच्याविरुद्ध दुष्प्रचार पण  खूप मोठ्या प्रमाणात चालू होता. सर्व तऱ्हेने दाटून आलेल्या दुःखाच्या अंधारातून सावरण्यासाठी जे मनोबल लागते,त्याचे बाळकडू तिच्या जन्मापासूनच तिला मिळाले होते .तिने कशाचीही पर्वा न करता आपल्या पोलादी पंजाने मंत्री, सरदार यांच्यावर वचक ठेवून प्रजेला प्रसन्न ठेवत पन्नास वर्षे राज्य केले. त्याचबरोबर भावी राज्याच्या संरक्षणाचा विचार करून तिने इतक्या मोठ्या राज्याला एक सक्षम राज्यकर्त्यांची गरज आहे हे लक्षात घेऊन  आपल्या वेगळ्या शैलीने एका वारसाची पण निवड केली. त्याच्या हातात  राज्य सोपवून इसवीसन 1003 मध्ये ती मरण पावली.

दिद्दाची जीवन यात्रा …जी नको असलेल्या अपंग मुली पासून सुरू होऊन …पुरुष वर्चस्व असलेल्या समाजाचे नियम मोडीत काढून आपले नवे नियम स्थापित करून पन्नास वर्षे भारताच्या वायव्य सीमेचे रक्षण करून चांगले राज्य जनतेला देणाऱ्या एका वीरांगनेची कथा आहे.

खरे सांगायचे तर आजच्या युगात दिद्दाराणीची कहाणी तेव्हा आपल्याला अधिक समर्पक वाटते, जेव्हा बऱ्याच स्त्रिया संघर्षमय प्रवासानंतर केवळ सत्तेत आणि उच्चपदावर विराजमान होत नाहीत तर आपल्या क्षमतेने जगाला आश्चर्य चकीत करतात .

 हेच काम एका अनभिज्ञ राणीने  हजार वर्षांपूर्वी केले होते.

**  समाप्त **

© सुश्री सुनीता गद्रे

माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ कथा एका राणीची – भाग-2 ☆ सुश्री सुनिता गद्रे ☆

सुश्री सुनिता गद्रे

? जीवनरंग ❤️

 ☆ कथा एका राणीची – भाग-2 ☆ सुश्री सुनिता गद्रे ☆ 

(जगात बहुतेक प्रथमच कमांडो सैन्य आणि गोरिल्ला युद्धतंत्राचा वापर दिद्दाने केला होता.)आता यापुढे…..

या युद्धतंत्राचा जोरावरच एकदा राणीने शत्रूच्या पस्तीस हजार सैन्याच्या तुकडी बरोबर फक्त पाचशे सैनिकांच्या मदतीने पाऊण तासातच एक युद्ध जिंकले होते.

पण स्त्री जातीच्या दुर्दैवाचा तिलाही सामना करावा लागला. तिचे शत्रूंनी ‘चुडैल राणी'(चेटकीण राणी) असे नामाभिधान केले. कारण युद्धशास्त्रातील कौशल्याबरोबरच बुद्धिमत्ता, आत्मविश्वास ,इच्छाशक्ती यांच्या बळावर तिने आक्रमणकारी मोठ्या राजा ,महाराजांना रणांगणावर धूळ चारली होती. एका स्त्रीकडून पराभूत झालेल्या राजांनी हारल्यामुळे गेलेली आपली प्रतिष्ठा सांभाळण्यासाठी तिला चुडैल राणी म्हणायला सुरुवात केली. तिच्या अपंगत्वामुळे तिला खिजवण्यासाठी लंगडी राणी हा खिताब तर तिला त्यांनी आधीपासूनच दिलेला होता.

तिचा सर्वात मोठा पराक्रम त्या वेळी दिसून आला जेव्हा… सोमनाथ मंदिर लुटणाऱ्या आणि कित्येक शहरे उध्वस्त करणार्‍या…खूंखार मोहम्मद गजनीला तिने फक्त एकदा नाही तर दोनदा आपल्या  रणनीती-सामर्थ्याने भारतात काश्मीर मार्गे प्रवेश करण्यास रोखले. त्याला पराभूत पण केले. नंतर त्याने मार्ग बदलून गुजरात मार्गे भारतात प्रवेश केला.

इतके ‘असामान्यत्व’ सत्तेवर असल्यावर त्या व्यक्तीला मित्रांपेक्षा शत्रूच अधिक असतात. राणी दिद्दा पण याला अपवाद नव्हती. दरबारातले… एक सेनापती सोडला तर… सगळेच मंत्रीगण,सरदार तिला पाण्यात पाहत असत. अंतःपुरात इतर राण्या, त्यांचे नातेवाईक तिचा काटा काढण्याच्या तयारीतच असत.

अशातच एके दिवशी शिकारी दरम्यान राजा क्षेम गुप्ताचा मृत्यू झाला. तेव्हा तिला सती जाण्यासाठी तिच्यावर सगळीकडूनच खूप दबाव आणला गेला. पण मरणासन्न झालेल्या राजाला,राज्य सुरक्षित हातात सोपविण्याच्या तिने दिलेल्या वचनाने तिला मनोबल दिले. तिने सती जाण्यास साफ नकार दिला. कारण तिचा पुत्र अभिमन्यु लहान होता. त्याला राज्यकारभाराचे शिक्षण देण्याची जबाबदारी तिच्यावर होती.

हे सहन न झालेल्या अनेक सरदारांनी वेळोवेळी तिच्या  विरोधामध्ये अनेकदा बंडे पुकारली. पण दिद्दाने तिला सिंहासनावरून हटवण्याचे सर्व प्रयत्न क्रूरपणे हाणून पाडले. त्यामुळे क्रूर- कपटी राणी असे तिला नवे विशेषण मिळाले.

क्रमशः…

© सुश्री सुनीता गद्रे

माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ कथा एका राणीची – भाग-1 ☆ सुश्री सुनिता गद्रे ☆

सुश्री सुनिता गद्रे

? जीवनरंग ❤️

 ☆ कथा एका राणीची – भाग-1 ☆ सुश्री सुनिता गद्रे ☆ 

आपल्या देशात प्राचीन काळापासून राजघराण्यातील खूप शूर स्त्रियांनी राज्याचे रक्षण करण्यासाठी शत्रूंना परास्त केल्याचा इतिहास आपण वाचतो .पण झाशीची राणी लक्ष्मीबाई किंवा कित्तूरची राणी चन्नम्मा यापेक्षा जास्त नावे आपल्या लक्षात राहत नाहीत. तर कुणाकुणाचे आपण नावही ऐकलेले नसते. अशीच एक अनभिज्ञ राणी,जिने पुरुष वर्चस्व असलेल्या समाजाचे नियम मोडून आपल्या पोलादी पंजाने  शत्रूला नामोहरम करून पन्नास वर्षे राज्य केले. त्या काश्मीरच्या-राणी दिद्दाचे हे चरित्र.

उत्तर भारतात (आजचे हरियाणा, पूर्ण पंजाब, राजौरी, पुंछ या भागावर) तेव्हा लोहार वंशाचे राज्य होते .लोहार समाज त्या काळी खूप प्रतिष्ठीत होता. युद्धासाठी जरुरी असलेली शस्त्रास्त्रे आणि शेतीची अवजारे बनवणे हे त्यांचे काम असायचे. एका शहराचे लाहोर हे नाव सुद्धा ‘लुहार’ या शब्दावरूनच पडले होते.

ईसवी सन 958 मध्ये लोहार वंशात एक अतिशय सुंदर कन्यारत्नाचा जन्म झाला. पण राजा सिंहराज व राणीने आनंदोत्सव साजरा केला नाही. कारण ती दुर्दैवी बालिका जन्मताच एका पायाने अपंग होती.निष्ठुर आई-वडिलांनी तिचा त्याग केला. तिला कायमचेच एका दाईच्या सुपूर्द करून टाकले.त्या प्रेमळ दाई मॉंच्या दुधावरच ती सुंदर चिमुरडी मोठी झाली. दाईमॉंने तिला राजकन्येसारखे वाढवले. तिच्या योग्य शिक्षणाची व्यवस्था केली आणि  छोटीशी द़द्दा पण आपल्या अपंगत्वाला अडथळा न मानता युद्ध कलेत पारंगत झाली. खेळामध्ये प्रवीण झाली. अर्थशास्त्र, राज्यशास्त्र याचा तिने अभ्यास केला. या सगळ्यात व्यस्त असलेल्या तिचे वय वाढत चालले होते. त्या काळात, साधारण हजार वर्षांपूर्वी सव्हिस वर्षाची अपंग   कुंवारी मुलगी… म्हणजे ती वाया गेलेलीच असणार तिचे नाव उच्चारणे पण महापाप आहे,असा समज सर्वत्र होता.

पण दैवाच्या योजना माणसांना थोड्याच माहीत असतात!

एके दिवशी  शिकारीच्या दरम्यान काश्मीरचा राजा क्षेमगुप्त याच्या ती दृष्टीस पडली आणि पहिल्या दृष्टिक्षेपातच तो सौंदर्यवती दिद्दाच्या प्रेमात पडला. ती लंगडी आहे हे माहीत झाले असूनही क्षेमगुप्ताने तिच्याशी विवाह केला.

दिद्दाचे भाग्य चक्रच पालटले. आता ती एका मोठ्या राजघराण्याची…. ज्यांच्या राज्याची सीमा इराणपर्यंत पसरली होती…. कुलवधू झाली होती.  तिचे सुखी आयुष्य सुरू झाले. तिला पतीचे प्रेम व आदर आणि अभिमन्यूच्या रुपाने सुंदर पुत्र ही लाभला.क्षेमगुप्ताला राजकारणात विशेष रुची नव्हती. त्याने दिद्दाची बुद्धिमत्ता व व्यवहार कुशलता पहिली आणि राज्यकारभारात लक्ष घालण्याची तिला प्रेरणा दिली. नंतर तर तिच्या कर्तृत्वावर प्रसन्न होऊन तिचा सन्मान करण्यासाठी सुवर्णमुद्रा पण त्याने काढली .आपल्या पत्नीच्या नावाने ओळखला जाणारा तो पहिलाच राजा म्हणावा लागेल.कारण तो नंतर राजा दिद्दाक्षेमगुप्त म्हणून ओळखला जाऊ लागला.

चतुर, चाणाक्ष पराक्रमी दिद्दाने कित्येकदा आक्रमण करून आलेल्या शत्रूला नेस्तनाबूत केले. बहुतेक जगात प्रथमच तिने ‘कमांडो’ सैन्याचा विकास केला.तसेच युद्ध जिंकण्यासाठी गोरिल्ला युद्ध (गनिमी कावा)  तंत्राचा वापर केला.

क्रमशः…

© सुश्री सुनीता गद्रे

माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ खिचडी… सुश्री नीता नामजोशी… ☆ प्रस्तुती सुश्री स्नेहा वाघ ☆

? जीवनरंग ❤️

☆ खिचडी… सुश्री नीता नामजोशी… ☆ प्रस्तुती सुश्री स्नेहा वाघ ☆

समोरच्या पातेल्यातली खिचडी आपल्या पानात वाढून घेत ती खात बसलेल्या आपल्या सासूकडे ती चकित नजरेनं पहात होती..

नवं नवंच लग्न झालं होतं तिचं..

अगदी आयत्या वेळी नवऱ्याचा नि तिचा बाहेर जेवायला जायचा प्लॅन ठरला.. 

नवरा म्हणाला “ आईबाबांसाठी खिचडी बनवून ठेव..”

तशी तिनं नवथर उत्साहानं तिला बऱ्यापैकी जमणारी मुगाच्या डाळीची खिचडी बनवली..

आणि ती निघायच्या तयारीला लागली…

सासूचा निरोप घ्यायला ती स्वयंपाकघरात आली आणि पहाते तर..

सासू  एकटीच शांतपणे खिचडी खात बसलेली..हे दृष्य तिच्या सरावाचं नव्हतं..

आजवर कधी तिची आई तिच्या बाबांच्याआधी अशी एकटीच जेवली नव्हती..

ती एकटक पहात असताना नवऱ्याच्या हाकेनं तिची तंद्री भंग झाली..

ती सासूचा धावता निरोप घेऊन बाहेर पडली..

नवऱ्यासोबत रेस्टॅारंटमध्ये जेवतानाही तिच्या नजरेसमोर सतत  खिचडी खाणारी सासूच येत राहिली..

एका क्षणी न राहवून तिनं नवऱ्यापाशी मन मोकळं केलं.. ते ऐकताना तो तिच्याकडेच विचित्र अविश्वासाच्या नजरेनं पहात राहिला.. बोलला मात्र काहीच नाही..

एव्हाना तिला अंदाज आला होता -सासू नि नवरा मनमोकळं बोलणारे नाहीत..

माहेरच्या मोकळ्या ढाकळ्या दंगामस्तीच्या वातावरणात वाढलेली ती..

या घरात सदासर्वकाळ नांदणारी शांतता तिच्या अंगावर यायची…. ही माणसं मनातलं भडाभडा बोलून मोकळी का होत नाहीत..? न बोलताच एकमेकांच्या मनातलं कसं कळतं यांना..? दोन चार शब्दांची देवाणधेवाण कशी पुरते यांना ?—- हा प्रश्न तिला नेहमी पडायचा..

या संदर्भात बोलताना नवरा कधीतरी बोलून गेला -” अगं तुलाही जमेल.. फार काही न बोलता मनातलं समजून घ्यायला तूही शिकशील ..सूर जुळले की मनांचा सहज संवाद सुरू होतो..”

तिला मात्र ते काही केल्या जमत नव्हतं…. जमत नव्हतं म्हणण्यापेक्षा ते हजमच होत नव्हतं…

सासूचा तर अंदाजच येत नव्हता..

तिला आई म्हणणं जीवावर यायचं…. आतून त्या भावना आल्याशिवाय आई म्हणण्याचा दुटप्पीपणा तिला जमला नसता..

कसं कोण जाणे पण सासूला ते कळलं ..तिनंच तिला सांगितलं, “  तू आपली सासूबाईच म्हण हो मला.. “

आणि तिला हुश्श झालं.. 

नेमकी आपली सासू कशी आहे हे तिला कळत नव्हतं.. आजवर तिचा स्वर उंचावल्याचंही तिनं पाहिलं नाही..

की भावनांचं प्रदर्शन नाही .. कायम शांत संयत नि सौम्य ..

पण आजचं तिचं असं खिचडी खाणं मात्र सासूच्या मनातल्या प्रतिमेशी विसंगत असं वाटलं…

दोघं घरी परतले तेव्हा सासरेबुवा मजेनं तिला म्हणाले–”  बरं का सूनबाई.. आज तुमच्या सासूनं हद्दच केली ..तुम्ही केलेली खिचडी तिला इतकी आवडली की तिनं एकटीनं ती सफाचट केली.. आमच्यासाठी वेगळी बनवून दिली .. आता पुन्हा आमच्यासाठी खिचडी बनवा एकदा “ .. ते ऐकून ती अवाकच झाली…हे कसलं वागणं… ? 

रात्री झोपेतही तिला तेच आठवत राहिलं.. 

अचानक तिला मध्येच जाग आली..पहाते तर काय..नवरा शेजारी नाही..

त्याला पहायला ती बाहेर ड्रॅाइंग रूममध्ये आली…

रात्रीच्या शांततेत सासू नि नवऱ्याचं हलक्या स्वरातलं बोलणंही तिला स्पष्ट ऐकू येत होतं..

सासू नवऱ्याला सांगत होती– “ अरे खिचडी जरा खारट झाली होती.. तुला माहितेय यांना बीपीचा त्रास आहे.. जराही मीठ जास्त झालं की यांची चिडचिड होते.. बोलण्यातलं भान सुटतं.. यांच्याकडून सूनबाईला जरासं काही बोललं गेलं असतं तर ते मला आवडलं नसतं .. अरे आपलं माहेर सोडून आलेय ती..त्यात तिचा स्वभाव आहे हळवा.. आपणच जपायचं, तिला सांभाळून घ्यायचं….” 

 त्यावर नवरा म्हणाला “ अगं मग टाकून द्यायची खिचडी.. तू कशाला खात बसलीस ती.. ?” 

 सासू- “ अरे बाबा खाऊन माजावं पण टाकून माजू नये या संस्कारात वाढलीय मी.. अन्नाचा अपमान करवेना..म्हणून खाल्ली हो…. यांच्यासाठी दुसरी बनवली..” 

 नवरा- “ अगं पण मग फ्रिजमध्ये ठेवायची ..” 

 सासू -” ते यांच्या नजरेतून थोडंच सुटणार होतं.. किती बारीक लक्ष असतं यांचं तुला ठाऊकच आहे .. “

नवरा -” अगं पण तुला त्रास होतोय त्याचं काय… ?”

 सासू- “ घेतलीय मी पाचक गोळी .. बरं वाटेल हो मला.. आता तू जाऊन झोप बरं. आणि हो.. झाल्या प्रसंगाचा चुकून उल्लेखही करायचा नाहीये .. “ 

नवरा- “ हो…” 

आणि आता तिला त्या जागी उभं रहावेना.. ती तशीच बाहेर येऊन सासूच्या मांडीवर डोकं ठेऊन स्फुंदून स्फुंदून रडू लागली… सासू तिच्या डोक्यावर थोपटत राहिली.. 

दुसऱ्या  दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे किचनमध्ये आली ती.. गॅसपाशी उभी सासू चहा करत होती.. तिला पाहून प्रसन्न हसत म्हणाली- ”  बाळा जरा हा चहा नेऊन देतेस बाहेर .. “ 

आणि तिच्या तोंडून “ हो आई “ असं कधी निघून गेलं .. तिचं तिलाही कळलं नाही.. ती चहा घेऊन वळली.. सासू पाठमोऱ्या  तिच्याकडे त्याच शांत सौम्य समाधानी नजरेनं पहात होती.

लेखिका : सुश्री नीता नामजोशी

प्रस्तुती :  सुश्री स्नेहा वाघ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ सुंदरी (भावानुवाद) – भगवान वैद्य `प्रखर’ ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

?जीवनरंग ?

☆ सुंदरी (भावानुवाद) – भगवान वैद्य `प्रखर’ ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे  

संध्याकाळ व्हायला लागली होती. त्या पांथस्थाला दूरवर एका देवळाचे शिखर दिसले. त्यावरून कुठलेतरी गाव जवळच असणार असा त्याने विचार केला, आणि चालण्याचा वेग वाढवला. अचानक त्याला रस्त्याच्या कडेला असणाऱ्या झाडांच्या पलीकडून कुणाच्या तरी कण्हण्याचा आवाज ऐकू आला. पुढे जायचं सोडून तो त्या आवाजाच्या दिशेने जायला लागला– झाडी ओलांडून पलीकडे गेला मात्र – आणि समोरचं दृश्य पाहून एकदम दचकला – घाबरला. कमालीच्या जखमी अवस्थेतली कितीतरी माणसं तिथे तळमळत पडलेली होती. त्याला काही समजायच्या आतच जवळच पडलेल्या एक जखमीने कसंतरी म्हटलं – “ पाणी —” . 

त्या पांथस्थाने आपली पाण्याची बाटली ताबडतोब त्याच्या तोंडाजवळ नेलीही, पण तेवढ्यात दुसऱ्या जखमी माणसाने क्षीण आवाजात म्हटलं —” पाणी —”. लगेच पहिल्या जखमी माणसाने आपलं तोंड दुसरीकडे वळवत, खुणेनेच त्या दुसऱ्या जखमीला पाणी देण्यास सांगितलं. पांथस्थ त्या दुसऱ्या जखमी माणसाकडे वळतच होता, तेवढ्यात तिसऱ्या जखमी माणसाने पाणी मागितलं. आणि दुसऱ्या जखमीने स्वतः पाणी न पिता त्याला  तिसऱ्या  जखमी माणसाला पाणी देण्यास पाठवलं. आणि हाच प्रकार पुढे चालू राहिला. एकाला पाणी द्यायला हात पुढे केला की तो पुढच्या जखमी माणसाकडे बोट दाखवत मान वळवत होता. असं होता होता तो पांथस्थ अगदी शेवटच्या टोकाला पडलेल्या जखमी माणसाजवळ पोहोचला. त्याची अवस्था तर अशी होती की त्याला जर अगदी लगेच पाणी मिळालं नसतं, तर त्याचा जीवच गेला असता. पांथस्थाने त्याला जेमतेम दोन घोट पाणी पाजलं असेल- त्याने घाईघाईने त्याच्या अलीकडच्या जखमीकडे जायची खूण केली. अशा प्रकारे सगळ्यांना घोट घोट पाणी पाजत पांथस्थ पुन्हा पहिल्या जखमी माणसापर्यंत आला.  घोटभर पाणी पाजल्यावर त्याला जरा हुशारी आली. त्या सगळ्याच जखमी माणसांनी एक-दुसऱ्याबद्दल दाखवलेली ती  आश्चर्यकारक आपुलकी पाहून तो पांथस्थ एव्हाना पार चक्रावून गेला होता. त्याला आता त्या सगळ्याबद्दलच  प्रचंड कुतूहल वाटायला लागलं होतं. म्हणून नुकतंच जो पाणी प्यायला होता त्या जखमी माणसाला त्याने न राहवून विचारलं — “ तुम्ही सगळे कोण आहात ? आणि तुमची ही अशी अवस्था कशी झाली आहे ? “ 

––” आम्ही सगळे या जवळच्या गावातच राहणारे आहोत. “  

—-” पण तुम्हाला असं इतकं घायाळ कुणी केलंय ?”

—-” आम्ही सगळे आपापसातच भांडलो आहोत. आणि मागचा पुढचा कुठलाही विचार न करता एकमेकांना बेदम मारलं आहे. “ 

—-” पण आत्ताच मी जे काही पाहिलं, त्यावरून तर एक गोष्ट स्पष्ट लक्षात येते आहे की तुमचं सगळ्यांचं   एकमेकांवर जिवापाड प्रेम आहे – मग ही अशी मारामारी कशासाठी ?”

—-” आम्ही जेव्हा असे भांडतो, मारामारी करतो, तेव्हा आपसातलं प्रेम, आपलेपणा, नातीगोती, माणुसकी, हे सगळं आपोआपच  विसरून जातो. कारण ज्या गोष्टीसाठी आम्ही भांडतो ती गोष्टच अशी आहे जी आम्हाला एकमेकांच्या जीवावर उठणारे शत्रू बनवते. “

—-” म्हणजे ? अशी गोष्ट तरी कोणती आहे ती – जरा मलाही कळू दे की .” 

—-” ती एक सुंदरी आहे. आता गावात पंचायतीच्या निवडणूका होणार आहेत, आणि हे अगदी पक्कं ठरलेलं आहे की त्या निवडणुकीत जो जिंकेल, त्यालाच ती सुंदरी वरमाला घालेल .” 

—-” हो का ? पण स्वतःची इच्छा पूर्ण करण्यासाठी माणसांना राक्षस बनवणाऱ्या या सुंदरीचं काहीतरी नाव असेल ना–” 

—-” आहे ना–’ सत्ता-सुंदरी ‘ म्हणतात तिला. “ 

————पाणी पिऊन झाल्यावर काही जखमी माणसं कशीतरी उठून बसली होती. काही जण उठण्याचा किंवा उभं राहण्याचा प्रयत्न करत होते. पांथस्थाशी बोलत असलेल्या त्या जखमी माणसाचं इतर जखमी माणसांच्या त्या हालचालींकडे लक्ष जाताच स्वतःही उठण्याचा प्रयत्न करताकरता त्याने आधी आपली काठी हातात नीट धरली.

मूळ हिंदी  कथा – ‘सुंदरी’ मूळ लेखक – भगवान वैद्य `प्रखर’

अनुवाद – सुश्री मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ‘ऋणमुक्त’ – भाग – ३ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? जीवनरंग ❤️

☆ ‘ऋणमुक्त’ – भाग – ३ ☆ श्री अरविंद लिमये

(पूर्वसूत्र- “त्ये झालंच. पन सायब, मास्तर द्येवमानूस हाय हो. त्येंच्या जावयानं पुरता धुतलाय बघा त्येनला. तुमचा मेल्याला कर्जदार म्हणजे जावईच की येंचा. जाताना पार धुळीला मिळवून गेलाय यानला. येंच्या पोरीचीबी कशी दशा करुन टाकली बघताय न्हवं?दोन पोरींच्या पाठीवरचं ह्ये एक लेकरु पदरात हाय बगा. सैपाकाची चार घरची कामं करती म्हणून चूल तरी पेटती हाय इथली. मास्तरांच्या पेन्शनीत त्येंचं सोताचं औषदपानीबी भागत न्हाई बगा.. ” बेलीफ सांगत होता. ते ऐकून मी सून्न होऊन गेलो. नाना भिकू कुलकर्णींचं अंधारं म्हातारपण, अर्धवट जळलेल्या वाळक्या  लाकडासारखा त्यांच्या मुलीचा धुरकट संसार, खोलीत भरून राहिलेला कळकट अंधार आणि माझ्या मनात भरून येऊ पहाणारं मळभ… या सगळ्यांच्या नातेसंबंधातला गुंता वाढत चालला होता… !)

विचार करायला वेळ होताच कुठं? मी न बोलता आत आलो. एक कागद घेतला. त्यावर पेन टेकवले. दोन परिच्छेद न थांबता लिहून काढले. खाली सहीसाठी फुली मारली. कागद मास्तरांच्या पुढे सरकवला. थरथरत्या हातानी मास्तरांनी न वाचताच त्यावर सही केली. कागदाची घडी करुन मी ती खिशात ठेवली. जाण्यासाठी वळणार तोच कान फुटक्या दोन कपात घोटघोटभर चहा घेऊन, थकून गेलेल्या चेहऱ्याची मास्तरांची मुलगी समोर उभी होती. तिच्या थकलेल्या मनावरचं ओझं उतरवण्याचा मोह मला आवरता आला नाही. म्हणालो,

“हा व्याज आणि कोर्टखर्च माफीसाठी मी अर्ज लिहून घेतलाय. हेड आॅफीसला हा अर्ज मी रेकमेंड करीन. कांहीतरी मार्ग नक्की निघेल.. ” कृतज्ञतेने भरलेल्या नजरेने माझ्याकडे पहात तिने हात जोडले.

“पोरी, आण तरी तो अर्ज इकडे. त्यांचं शुद्धलेखन एकदा तपासून तरी पहातो.. “

केविलवाणं हसत मास्तर म्हणाले. मी अर्जाची घडी मास्तरांच्या हातात दिली. उलगडून न वाचताच त्यांनी ती एका झटक्यांत फाडून टाकली. मी चमकलो. काय होतंय मला समजेचना.. !

“या उतार वयात एवढं ओझं पेलवायचं कसं हो मला?अहो या वाळक्या कुडीत जीव तग धरुन ठेवलाय तो सगळ्यांची सगळी देणी फेडण्यासाठीच. मी म्हातारा आहे. कंगाल कफल्लकही आहे. पण.. पण.. मला खऱ्या अर्थाने ऋणमुक्त होऊन मगच ‘राम’ म्हणायचंय. “

हे बोलता बोलता मास्तरांच्या विझू लागलेल्या नजरेत अचानक वीज चमकून गेल्याचा मला भास झाला….!

“साहेब, आजवर चालवलेले, माझ्या या चिमुकल्या नातवाचे वारसदार म्हणून नाव लावलेले माझे पोस्टात एक बचत खाते आहे. दात कोरुन, पोटाला चिमटे घेऊन जमवलेले किडूक-मिडूक आहे त्यात‌. नवऱ्याच्या दारूच्या वासापासून वाचवलेले, लपवून बाजूला जपून ठेवलेले पैसेही माझ्या या पोरीने त्यात वेळोवेळी जमा केलेले आहेत. त्या खात्यावर माझ्या नातवाचे नव्हे तर माझ्या त्या कर्मदरिद्री जावयाचेच नाव वारसदार म्हणून लावले होते असे

मी समजतो आणि तुमचं सगळं कर्ज फेडून टाकतो. पोरी, ते पासबुक आण बघू इकडे.. “

काॅटखालची पत्र्याची ट्रंक पुढे ओढून त्यातलं जिवापाड जपलेलं ते पासबुक मुलींनं मास्तरांकडे सोपवलं. मुलीबरोबर पूर्ण रक्कम बॅंकेत पाठवायचं त्यांनी आश्वासन दिलं. कुणीतरी हाकलून दिल्यासारखी त्यांची मुलगी खालमानेनं आत त्या

विझलेल्या चुलीपुढे जाऊन बसली. मास्तरांकडून पंधरादिवसांची मुदत मागणारा अर्ज घेऊन मी बाहेर पडलो. माझ्याबरोबर बेलीफही.

बेलीफ गप्पगप्पच होता. मी कांही बोलणार तोच खिशातून एक घामेजलेली, कळकट, शंभरची  नोट काढून त्यानी माझ्या हातात कोंबली.   

“.. हे.. पैसे. मास्तरांचे.. “

माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. म्हणजे मी येण्यापूर्वीच सकाळी आगाऊ वर्दी द्यायला जाऊन याने त्या गरीब माणसाकडून बक्षिसी उकळली होतीच तर.. !नुसत्या कल्पनेनेच मला. त्या माणसाची विलक्षण किळस आली.

“सायब, ताईस्नी कर्जाचा हिशेब सांगशीला तवा शंबर रुपै कमी सांगा न् ह्ये त्येंच्या कर्जात आज जमा करुन टाका.. “त्याचा आवाज कळेल न कळेल इतपत ओला झाला होता.

“आवं, आज सकाळच्याला ह्यीच नोट घिऊन मी मास्तरांकडं आलोतो. ह्ये सायेबाना द्यून मुदत मागा म्हण्लंतं. पन त्येनी या पैक्याला हाय बी लावला न्हाई. आवो माज्या ल्हानपनीचं माजं मास्तर ह्ये. मला बुकं शिकायची लई हाव हुती. पन वक्ताला दोन घास खायला मिळायची मारामार असायची. तवा या देवमानसाच्या घरातल्या उरलंल्या अन्नावर दिवस काढलेते आमी. ह्ये पैकं त्येनी घेत्लेतर नाहीतच, पन मला वळख सांगूनबी वळखलं न्हाई. आवं, त्येच्यावानी वाळकुंडा म्हातारा मानूस बी कुणाचं उपकार न ठिवता कर्ज फेडतू म्हनतोय, मंग धडधाकट शरीरपिंडाच्या मी त्येंच्या अन्नाच्या रिणातून कवा न् कसं मोकळं व्हायचं सांगा की… “

मी पैसे ठेऊन घेतले. त्याच्या प्रश्नाचं हेच तर एकमेव उत्तर त्याक्षणी माझ्याजवळ होतं! या माणसाबद्दल माझ्या मनात डोकावून गेलेल्या शंका, संशयाची आठवण होऊन मला माझीच लाज वाटू लागली.

दारिद्र्याशी झगडताना  आयुष्याच्या अखेरच्या  क्षणीही मनाचा कणा ताठ ठेऊ पहाणारे मास्तर आणि खाल्लेल्या अन्नाचं ऋण फेडायला धडपडणारा बेलीफ यातलं मोठ्ठं कोण याचा निर्णय मला घेता येईना.

वसुलीची कांहीही शक्यता नसणाऱ्या कर्जाची पूर्ण वसूली होत असल्याचं खूप विरळाच मिळणारं समाधान का कुणास ठाऊक पुढे कितीतरी दिवस दुर्मुखलेलंच राहीलं होतं!!

समाप्त

©️ अरविंद लिमये

सांगली

(९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ‘ऋणमुक्त’ – भाग – २ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? जीवनरंग ❤️

☆ ‘ऋणमुक्त’ – भाग – २ ☆ श्री अरविंद लिमये

(पूर्वसूत्र-माझ्या नजरेसमोर अंथरुणाला खिळलेली, शेवटच्या घटका मोजणारी, नाना भिकू कुलकर्णींची कृश मूर्ती अलगद तरळून गेली.)

“हं.. चला हतंच ” बेलीफ म्हणाला.

एका पडक्या वाड्यापुढे आम्ही उभे होतो. भुसभुशीत भिंतीच्या आधाराने कसंबसं तग धरून उभ्या असणाऱ्या दारांच्या चौकटीला धक्का न लावता बेलीफ अलगद आत शिरला. मी घुटमळत बाहेरच उभा राहिलो. 

“साहेब, .. आत या ” बेलीफ म्हणाला. मी आत गेलो. पण त्या टिचभर खोलीत टेकायला जागाच नव्हती ! )

पडे निघालेल्या भिंतींसारखं त्या अंधाऱ्या खोलीतलं मलूल वातावरणही बोचणारं होतं. लाकडी फळ्यांच्या काॅटवर कुणीतरी झोपलेलं होतं. मास्तरच असावेत. आतल्या विझू लागलेल्या चुलाण्याजवळ सावली हलल्याचा मला भास झाला.

“ताईसाब, बॅंकेचं सायब आल्यात” बेलीफने मुद्द्यालाच हात घातला.

मांडीवरल्या पोराला खांद्यावर टाकून ती पुढे आली. त्या भग्न वाड्याच्या कृश सावलीसारखा रापलेला रंग, वाळलेल्या अंगकाठीवर लोंबणारं जुनेरं.. त्रासलेल्या चेहऱ्यावर उदासीत कालवलेले .. मला शापणारे भाव.. !

काय बोलावं, कशी सुरुवात करावी मला समजेचना.

एवढ्यात काॅटवरच्या अंधारात थोडीशी हालचाल जाणवली. बेलीफ पुढे झाला.

“मास्तर, ब्याकेचं सायब आल्यात.. “

“या.. या.. “कुलकर्णी धडपडत उठायचा प्रयत्न करु लागले. एखाद्या प्रतिक्षिप्त क्रियेसारखा बेलीफ त्यांना सावरायला पुढे झेपावला. 

“या.. बसा असे.. ” पायथ्याजवळची कळकट चादर गोळा करुन लाकडी काॅटचा एक कोपरा रिकामा करुन देत नाना भिकू कुलकर्णीनी मला थरथरते हात जोडत बसायची खूण केली. विरघळू पहाणारी माझी नजर रंग उडालेल्या भिंतींवरुन मास्तरांच्या वाळून गेलेल्या चेहऱ्यावर येऊन स्थिरावली.

“बोला.. काय म्हणताय?”

“हे बेलीफ. यांच्यामागोमाग आम्ही आलो. म्हणजे.. यावं लागलं.. ” मी बेलीफकडे पाहिलं.

“मास्तर, कोरटाचं वारंट निघलंय. तुमाला अटक कराय आलोय आमी.. “

“तुम्ही जामिनदार आहात ‘प्रसन्न इलेक्ट्रीकल्स’च्या कर्जाला. दोन वर्षांपूर्वी कोर्टाचा

हुकूमनामा मिळूनही कर्जखात्यात कर्जदाराने पैसे भरलेले नाहीत. त्यांची कांही मालमत्ताही नाही. आता त्यांच्या कर्जाचे जामिनावर म्हणून त्यांच्या पश्चात तुम्हीच बॅंकेचे एकमेव ऋणको आहात. एकूण व्याज, कोर्टखर्च मिळून वीसएक हजार रुपये भरावे लागतील… ” मी म्हणालो. ते विचारात पडले. गप्प बसले. शून्यात नजर लावून कांहीतरी शोधत राहिले.

मग बेलीफच पुढे झाला.

“मास्तर.. “

“अं.. ?”

“अटकेचा पंचनामा करायला हवा… “

“अं.. ? हो.. रितसर जे असेल, ते करा. तयारी आहे माझी. ”  बेलीफला काय बोलावं कळेना. तो जागचा उठला. दाराजवळ जाऊन मला खूणेनं बोलावून घेतलंन्.

“काय करायचं?” हलक्या आवाजात मला विचारलं.

“कायद्यानुसार जे काही असेल ते करायचं. “

“त्ये झालंच. पन सायब मास्तर द्येवमानूस हाय हो. जावयानं पुरता धुतलाय याला. तुमचा मेल्याला कर्जदार जावईच की ह्येंचा. जाताना सोताचं न् ह्येंचं दोनी घरं पार धुळीला मिळवून मेलाय बगा. हाय खाऊन मास्तरांची बायकू गेली. सोन्यासारक्या यांच्या पोरीची जावयानं पार दशा करुन टाकलीया बगा. दोन पोरींच्या पाठीवरचं त्ये एक लेकरु हाय तिच्या पदरात. दोन घरी सैपाकाची कामं करुन चूल पेटती ठेवतीया. मास्तरांच्या पेन्शनीत  त्येंचं औषदपानीबी भागत न्हाईय” बेलीफ सांगत राहीला. मी ऐकत होतो. नाना भिकू कुलकर्णींचं अंधारं म्हातारपण, अर्धवट जळलेल्या वाळक्या लाकडासारखा त्यांच्या मुलीचा धुरकट संसार, खोलीत भरुन राहिलेला कळकट अंधार.. आणि माझ्या मनात भरुन आलेलं मळभ… या सगळ्यांच्या नातेसंबंधातला गुंता वाढत चालला….. !

क्रमशः…

©️ अरविंद लिमये

सांगली

(९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ‘ऋणमुक्त’ – भाग – १ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? जीवनरंग ❤️

☆ ‘ऋणमुक्त’ – भाग – १ ☆ श्री अरविंद लिमये

बेलीफचं ते चार ओळींचं पोस्टकार्ड माझ्या उत्साहावर विरजण ओतायला पुरेसं होतं. एका हुकूमनामा मिळालेल्या कर्जखात्यातील जामिनादारावर अटक वाॅरंट बजावण्यासाठी बॅंकेमार्फत मला केळघर ग्रामपंचायतीत हजर रहायला सांगणारं ते पत्र!

कामाच्या घाईगर्दीतला एक अख्खा दिवस कर्जवसुलीची कांहीही आशा नसलेल्या एका खात्यासाठी  फुकट घालवायचा ही कल्पना मनाला पटणारी नव्हतीच. पण कायद्याचा एकदा उगारलेला बडगा कोणत्याही आदेशाविना शेवट गाठण्याआधी केवळ माझ्या इच्छे न् मतानुसार आवरणं बँकेच्या नियमात बसणारं थोडंच होतं?

मला जाणंच भाग होतं.   

बेलीफच्या पत्रानुसार मी दहा वाजता ग्रामपंचायतीच्या ऑफिसमधे हजर रहाणं आवश्यक होतं. पण मी गेलो साडेनऊ वाजताच. कारण ‘बेलीफ’या व्यक्तीपासून मी आधीपासूनच सावध रहायचं ठरवलं होतं.  त्याला कारणही तसंच होतं.  जिथे जायचं त्यांना आधीच भेटून, वर्दी देऊन त्यांच्याकडून बक्षिसी उकळायचं त्यातील काहींचं तंत्र आणि कसब राष्टीयकृत बॅंकेचा मॅनेजर म्हणून मला ऐकून माहिती होतं. आज इथेसुध्दा संशयाला जागा होतीच. कारण माझ्या आधीच बेलीफ हजेरी लावून कामानिमित्त बाहेर गेल्याचं ग्रामपंचायतीच्या ऑफिसमधून मला समजलं आणि माझ्या तळपायाची आग मस्तकात जाऊन भिनली.  सहजासहजी आपली अशी फसवणूक करायचा त्याचा प्रयत्न असल्याचा संशय मला तिडीक यायला पुरेसा होता. पण डोक्यात राख घालून चालणार नव्हतं.  मी शांत रहायचं ठरवलं.  आता एक तर पुरेसा पुरावा नसताना चिडून संतापून उपयोग नव्हताच.  त्यामुळे त्याच्या कलाने घेणे माझ्या दृष्टीनं सोयीचंच नव्हे तर

आवश्यकसुद्धा होतंच. पाच-दहा रुपयांसाठी स्वत:चं इमान विकायचीही तयार असणाऱ्या या माणसाची मला आता किंव वाटू लागली.

पुढे अर्ध्या-पाऊण तासानंतर बेलीफ आला.

धोतर, वर पांढराच पण मळकट शर्ट,डोक्यावर कळकट टोपी,तोंडात पानाचा तोबरा, ओबडधोबड मातकट चेहऱ्यावरचे दाढीचे खुंट,आणि हातात लोंबती पिशवी. तो माझ्याकडेच पहात थोडा घुटमळलाय हे लक्षात येताच सावध अंदाजानेच त्याच्याकडे पाहून मी ओझरता हसलो.

“मॅनेजर सायब का ?”

“हो. तुम्ही बेलीफ?तुम्ही तर मघाशीच आला होतात ना?”

“हां.. म्हंजी.. तुमच्या म्होरं घटकाभर आधी तर आलोतो.. पन.. ”  

“मग गावात गेला होतात कां?”

तो बावचळला.

“हा़.. म्हंजी काम हुतं वाईच”

“नाना कुलकर्ण्यांकडे ?” मी वर्मावर बोट ठेवल्यासारखं तो दचकलाच एकदम.. थुंकायचं निमित्त करून मला नजर द्यायचं टाळत त्याने मान वळवली.

“म्हंजे त्ये मास्तर व्हय. ? अवं तेंच्याकडं आत्ता तुमच्यासंगट जायचं नव्ह का.. “तो सव्वाशेर निघाला होता. मी स्वतःशीच हसलो. गप्प बसलो. रस्त्यातून जाताना मी विचारलेल्या प्रश्नांना तो न अडखळता मुद्देसूद उत्तरे देत होता.

“नाना कुलकर्णी असतील, भेटतील का हो घरी?”

“व्हय तर. जात्यायत कुटं?हांतरुन सोडता याय नगं?”

“म्हणजे?”

“अवं समद्या हातापायाच्या काटक्या झाल्यात. वाळून कोळ झाल्यालं म्हातारं मानूस त्ये. दिस मोजत पडून आसतंय. “

“अस्सं? मग त्याना अटक कशी करायची. ?”

“आता कायदा म्हणतोय न्हवं अटक करा म्हणून..  आपण करायची. अवं ही काय फौजदारी अटक हाय का ?सादी शिव्हील अटक ही. ततं जायाचं. त्येना म्हनायचं,’मी बेलीफ. ह्ये बॅंकेचं सायब. आन् ह्ये कोरटाचं वारंट. नाना भिकू कुलकरनी , आमी तुमाला अटक केलीय. ‘ त्ये व्हय म्हनतील. पन त्यो वाळका ओंडका उचलून न्याचा कसा न् ठिवायचा कुटं?म्हनून मंग अटकंचा पंचनामा करायचा. त्येचा कोर्टात रिपूर्ट लिवायचा. मंग कोर्ट नोटीस काढंल,पुलीस धाडंल. त्ये समद त्येंचं काम.  कोर्टात हजर नाही झालं तर  पुलीस त्यांना बेड्या घालून नील. त्ये समदं त्येंचं काम. आपनाकडं त्येचं काय नाय. “

मी ऐकत होतो. कायदा कोळून प्यालेला तो बेलीफ किती निर्विकारपणानं सांगत होता सगळं! माझ्या नजरेसमोर अंथरुणाला खिळलेली,शेवटच्या घटका मोजणारी, नाना भिकू कुलकर्णींची कृश मूर्ती नकळत तरळून गेली… माझ्याकडे केविलवाण्या नजरेने पहाणारी.. दयेची भीक मागणारी..

“हं.., चला हतंच. “

एका पडक्या वाड्यापुढे आम्ही उभे होतो. अवशेषांच्या रुपात डुगडुगत कसाबसा उभा असणारा दिंडीदरवाजा.. वाळवीनं पोखरलेलं त्यावरचं नक्षीकाम..  पुढचा कोंदट अरुंद बोळ..  वाटेतला गंजका नळ..  धुण्याच्या दगडाजवळची सुकलेली केळ.. वाळून गेलेला आळू..  जांभळाचं वाळत चाललेलं म्हातारं झाड..

भुसभुशीत भिंतीच्या आधारानं कसंबसं तग धरुन उभ्या असणाऱ्या दारांच्या चौकटीला धक्का न लावता, बेलीफ अलगद आत शिरला.  मी घुटमळत बाहेरच उभा राहिलो.

“साहेब, या..आत या” बेलीफ म्हणाला. मी आत गेलो.. पण त्या टिचभर खोलीत टेकायला जागाच नव्हती.. !

क्रमशः…

©️ अरविंद लिमये

सांगली

(९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print