मराठी साहित्य – जीवन यात्रा ☆ आत्मसंवाद…भाग 6 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? जीवन यात्रा ?

☆ आत्मसंवाद…भाग 6 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

(मागील भागात आपण पहिलं – मी – तू अनुवादाकडे कशी वळलीस? आता इथून पुढे )

उज्ज्वला – अगदी योगायोगाने. साधारण मी निवृत्त होण्याचा तो काळ होता. लायब्ररीतून एकदा  एक हिन्दी कथासंग्रह वाचायला आणला. ‘कविता सागर.’ हा तारीक असलम तस्नीम या बिहारी लेखकाचा विशेषांक होता. विचार असा, हिन्दी लेखकांचे आस्थेचे विषय कोणते? काय, कसं लिहितात, बघावं. या वेळेपर्यंत माझ्या कथांचे फास्ट फूड, कृष्णस्पर्श, धुक्यातील वाट आणि झाले मोकळे आकाश ही ४ पुस्तके प्रकाशित झाली होती. 

पुस्तिकेच्या आकाराचे हे त्रैमासिक होते. वाचायला लागले, आणि चकीतच झाले. अर्धं, पाऊण, एक पानी कथा. कुठेही वर्णनाचा फापट पसारा नाही॰ थेट विषयाशी भिडणं आणि सत्य, तथ्य मांडणं. मराठीत आशा प्रकारच्या कथा लिहीलेल्या माझ्या पहाण्यात तरी नव्हत्या. याचा अनुवाद केला, तर मराठी वाचकाला एका वेगळ्या साहित्य प्रकाराची ओळख होईल, असं वाटलं. म्हणून मग मी काही कथांचे अनुवाद केले आणि तेव्हाचे लोकमतचे संपादक दशरथ पारेकर यांना दाखवले. त्यांनीही आस्था दाखवली. आणि या कथा सदर स्वरूप लोकमतमध्ये येऊ लागल्या. या दरम्यान ‘बेळगाव तरुण भारत’ च्या ‘खजाना’ पुरवणीसाठीही  कथांचा अनुवाद पाठवू लागले. ‘कथासागर’ची वर्गणी भरली. त्यामुळे मला अनुवादासाठी कथा उपलब्ध झाल्या. मी त्या त्या  लेखकांना त्यांच्या कथांचे मराठी अनुवाद पाठवत असे. मग ते आणि त्यांच्या परिचयाचे इतर लेखक आपापले लघुकथा संग्रह अनुवादासाठी पाठवत. त्यामुळे मला अनुवादासाठी कथांची कमतरता कधी भासली नाही. बारा वर्षे होऊन गेली. ‘खजाना’ मधील माझे हे सदर अजून चालू आहे.

या लेखनातून माझी लघुतम कथांची ६ पुस्तके झाली. यातील कथांचा आकृतिबंध वेगळा असल्याने सुरूवातीला पुण्याच्या ‘मेहता पब्लिशिंग हाऊसने’ स्पॉट लाईट- तारीक असलम तस्नीम व सवेदना – डॉ. कमल चोपडा ही पुस्तके प्रकाशित केली. यापैकी ‘स्पॉट लाईट’ला बुलढाण्याचा ‘तुका म्हणे’ हा अनुवादाचा पुरस्कार मिळाला. त्यानंतर ‘आवाज: आतला… बाहेरचा …हे घनश्याम अग्रवाल यांच्या लघुतम कथांचे पुस्तक निघाले. पुढे प्रत्येकी दहा लघुतम कथाकारांच्या प्रत्येकी १० कथांचे मिळून ‘थेंब थेंब सागर’ व कण कण जीवन’ आसे दोन संग्रह निघाले. अगदी अलीकडे ‘प्रातिनिधिक पंजाबी कथां’चा संग्रह निघाला. हा पंजाबीच्या हिन्दी अंनुवादावरून केलेला होता इतक्या कथांचा अनुवाद करता करता मीही काही लघुतम कथा लिहिल्या. त्या हिन्दी मासिके व पुस्तक संकलने यातून प्रकाशित झाल्या.

मी – तू केवळ लघुतम कथाच नव्हेत, तर मोठ्या कथाही केल्या आहेसं.

उज्ज्वला – हो. त्यावेळीही असंच झालं. लायब्ररीतून वाचायला आणलेल्या एका पुस्तकात मोहनलाल गुप्ता यांची ‘आशीर्वाद’ ही ऐतिहासिक कथा वाचली. ती मला खूप आवडली. मनात आलं, हा इतिहास मराठी वाचकांना कळावा, म्हणून मग त्यांच्या परवानगीने मी तिचा अनुवाद केला. परवानगी देताना त्यांनी लिहिलं होतं, ‘त्यांचं जे साहित्य मला आवडेल, त्याचा अनुवाद करून मला हव्या त्या ठिकाणी प्रसिद्ध करायला मी स्वतंत्र आहे.’  या सोबत त्यांनी तोपर्यंत त्यांची प्रकाशित झालेली सगळी पुस्तके मला पाठवली. त्यात ४ कथासंग्रह होते. कथा छानच होत्या. मी इतरही कथांचे अनुवाद केले. ते मासिकातून, दिवाळी अंकातून प्रसिद्ध झाले. पुढे त्याचं पुस्तक निघालं ‘सांजधून’. हे माझं पहिलं अनुवादीत पुस्तक. त्यानंतर इतर अनेक निघाली. कथांचा अनुवाद करताना एक विचार मनात असे, तेच तेच घिसं-पीटं लिहिण्यापेक्षा आशय, रचना या सगळ्या दृष्टीने वेगळं आणि वैशिष्ट्यपूर्ण असेल, ते वाचकांपर्यंत पोचवावं. त्याचप्रमाणे कथा अनुवादीत वाटू नयेत. मूळ मराठीत लिहिलेल्या वाटाव्या. त्यानंतर मी मोहनलाल गुप्ता, सरला अग्रवाल, आणि डॉ. कमल चोपडा या ३ लेखकांच्या प्रत्येकी ८ कथांचा अनुवाद ‘त्रिधारा’ म्हणून केला. हेही पुस्तक ‘मेहता पब्लिशिंग हाऊस’ने प्रकाशित केले. या पुस्तकाला शिरगावचा  (जि. धुळे)  ‘स्मिता पाटील’ पुरस्कार अनुवादासाठी मिळाला.

त्यानंतर मी प्रतिमा वर्मा (बनारस), सूर्यबाला ( मुंबई),  मधू कांकरीया ( मुंबई),  डॉ. कमल चोपडा ( दिल्ली ) इ.च्या कथासंग्रहांचा अनुवाद केला. याशिवाय अनेक लेखकांच्या कथांच्या अनुवादाची संकलित पुस्तकेही आली. हे सारं करत असताना आणखीही एक महत्वाची गोष्ट घडली. माझ्या एका मराठी कथेचा अनुवाद ( लीडर) साहित्य अॅहकॅदमीच्या मुखपत्रात ‘समकालीन भारतीय साहित्य’ यात आला म्हणून ते द्वैमासिक माझ्याकडे आले. तोपर्यंत त्या नियतकालिकाबद्दल मला काहीच माहीत नव्हते. त्यानंतर मी त्याची वर्गणी भरली. या नियतकालिकाचे वैशिष्ट्य असे की इथे हिन्दी साहित्याबरोबरच अन्य भाषातील दर्जेदार साहित्याचा हिन्दी अनुवाद प्रकाशित होत असे.  यातून मला अन्य भाषेतील चांगल्या कथा अनुवाद करण्यासाठी मिळाल्या. आवर्जून उल्लेख करावा आशा कथा म्हणजे- राक्षस – सुकान्त गंगोपाध्याय ( बंगाली), उत्तराधिकारी  केशुभाई देसाई -(गुजराती), मुडीवसंतम्-  व्होल्गा (तेलुगू)  मागच्या दाराने – ममतामयी चौधुरी ( आसामी). या सगळ्या कथा माझ्या ‘विविधा या कथासंग्रहात संग्रहित आहेत.

त्यानंतर माझ्या धुक्यातील वाट, गणवेश, मीच माझ्याशी या कथांचे हिदी अनुवादही यात प्रकाशित झाले. पुढे गणवेशचा तर कन्नड आणि तेलुगूमध्येही अनुवाद झाला.

मी – तुझी हिंदीतील अनुवादाची एकूण किती पुस्तके झाली?

उज्ज्वला – लघुतम कथासंग्रह -६, लघुकथासंग्रह ( हिंदीत याला कहानी म्हणतात.) – १३ , कादंबर्या -६, , तत्वज्ञान – ५ अशी माझी अनुवादाची पुस्तके प्रकाशित आहेत. कथासंग्रहांच्या अनुवादाच्या २-३ आवृत्याही निघाल्या आहेत. यातील काही पुस्तके मला प्रकाशकांनी सांगितली, म्हणून मी ती केली.

मी – तुझ्याही कथांचा हिन्दी अनुवाद झालाय.

उज्ज्वला – होय. मानसी काणे, सुशीला दुबे, प्रकाश भातंब्रेकर यांनी तो केलाय. तो हिंदीतल्या दर्जेदार मासिकातून प्रकाशित झालाय.

मी – तू आत्तापर्यंत तुझा झालेला लेखनप्रवास मांडलास. तुला असं नाही का वाटलं, की या क्षेत्रात आपल्या अजून काही गोष्टी करायच्या राहिल्या ?

उज्ज्वला – नाही. माझ्या कुवतीप्रमाणे, जे आणि जेवढं करावसं वाटलं. तेवढं मी मनापासून केलं. मी जेवढं करू शकले, त्याबद्दल मी तृप्त आहे. समाधानी आहे. वाचकांना माझ्या लेखनाबरोबरच अनुवादीत साहित्यही आवडलं. त्याबद्दल ते फोन करतात. मला म्हणतात, ‘पुस्तकात लिहिलं आहे, अनुवादित म्हणून आम्हाला तो अनुवाद आहे, हे कळलं. एरवी आम्हाला हे लेखन मूळ मराठीतीलच वाटतं. मी ऐकते आणि मला कृतार्थ वाटतं. एकूणच माझ्या लेखनाच्या बाबतीत मी तृप्त आहे. कृतार्थ आहे. जे मिळालं, त्यात मी समाधानी आहे.

समाप्त

©  श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवन यात्रा ☆ आत्मसंवाद…भाग 5 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? जीवन यात्रा ?

☆ आत्मसंवाद…भाग 5 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

(मागील भागात आपण पाहिलं  – उज्ज्वला–मी अनुवादात घुसले. आणि चक्रव्यूहासारखी त्यातच अडकले. मग माझं स्वतंत्र कथालेखन थांबल्यासारखच झालं. आता इथून पुढे) 

मी – तुला कादंबरी लिहावीशी नाही वाटली?

उज्ज्वला – नाही. तेवढा स्टॅमिना मला नाही, असं वाटलं. तसंच मी नाटकाही लिहिलं नाही.

मी – पण संवाद माध्यम तू हाताळलं आहेस.

उज्ज्वला – हो. आकाशवाणीवरील कार्यक्रमात मी संवाद लिहिले आहेत. सांगली आकाशवाणीवर ‘प्रतिबिंब’ ही कौटुंबिक श्रुतिका सुरू झाली. पूर्वी मुंबईहून ‘प्रपंच’ मालिका सादर व्हायची. त्या स्वरूपाची. हे सादर १० वर्षे चालू होते. यात मी एकूण १०० तरी श्रुतिकांचं लेखन केलय. श्रोत्यांची पत्रे आणि त्यांनी प्रत्यक्ष भेटल्यावर दिलेल्या प्रतिक्रिया यातून लोकांना ते लेखन आवडल्याचं लक्षात आलं. अनेक जणी मला विचारायच्या, ‘आमच्या घरातले संवाद तुला कसे कळतात? ‘

मी – आणि तुझी नभोनाट्ये?

उज्ज्वला – माझी ५ नभोनाट्ये आकाशवाणीवरून प्रसारित झाली. त्यापैकी पहिले नभोनाट्य ‘इथे साहित्याचे साचे मिळतील’, हे मी स्वत: नेऊन दिले होते. इतर सर्व नाटके मी सबंधित विभागांच्या प्रमुखांनी सांगितली म्हणून मी लिहिली.

मी – म्हणजे?

उज्ज्वला – त्यावेळी शशी पटवर्धन नाट्यविभागाचे प्रमुख होते. एकदा त्यांनी मला बोलावलं . म्हणाले,’जागतिक आरोग्यदिन’ आहे. या निमित्ताने ‘फास्ट फूड’ या विषयावर नाटक लिहा.’ मी विचार करू लागले. ‘फास्ट फूड’वरून जुनी पिढी- नवी पिढी यातील वाद हा ठरीव विषय मनाला काही भिडेना. विचार करता करता मला ‘फास्ट फूड’च्या अनेक परी सुचल्या, जसे इंटलेक्चुअल ‘फास्ट फूड’ ( १० दिवसात १०वी मराठी, इतिहास, भूगोल, विज्ञान वगैरे…),  संस्कृतिक ‘फास्ट फूड’ (झट मंगनी, पट ब्याह, फट विभाजन ). तरी क्लायामॅक्स पॉइंट मिळेना. मग सुचलं, ‘जेनेटिक फास्ट फूड ‘. ९ महीने बाळंतपणासाठी लागतात. त्यामुळे स्त्रियांची कार्यशक्ती फुकट जाते. तेव्हा  त्या ९ आठवड्यात आणि पुढल्या काही वर्षात ,९ दिवसात बाळंतीण झाल्या तर… महिला कल्याण विभागाच्या अध्यक्षा संशोधनाला उत्तेजन देतायत. त्यांचा प्रयोग पूर्णत्वाला येऊ पहातोय . सर्व डाटा पी.सी. वर सुरक्षित आहे आणि त्याच वेळी विष्णु त्यात व्हायरस सोडून तो सगळा प्रयोगाचा तपशील डी लिट. करून टाकतो. फॅंटसीवर आधारलेलं हे नभोनाट्य छान जमून गेलं. आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून ते प्रसारित झालं. ही नाटिका मला लिहायला सांगितली नसती, तर लेखनाचा विषय म्हणून मला हे सुचलं नसतं. त्यामुळे माझ्या लेखनात योगायोगाचासुद्धा भाग आहे.

मी – पुढे यावर तू कथासुद्धा लिहिलीस. 

उज्ज्वला – हो. त्यानंतर थोड्याच दिवसात सावंतवाडीचा साहित्य संमेलनात, किस्त्रीमचे संपादक ह. मो. मराठे भेटले. ‘नवीन काय लिहिलय’ वगैरे बोलणं झालं. नुकतच ‘फास्ट फूड’ लिहिलेलं असल्यामुळे मी त्याबद्दल बोलले. ते म्हणाले, ‘ताबडतोब याचं कथा रूपांतरण कर आणि ‘स्त्री’कडे पाठव.’ नंतर ती कथा स्त्री’च्या महिला विनोद विशेषांकात आली. पुढे मी जेव्हा विनोदी कथांचं पुस्तक काढलं, तेव्हा त्याचं नाव ‘फास्ट फूड’च दिलं.

मी – तुझ्या आणि नभोनाट्यांचं काय?

उज्ज्वला – तिसरं नभोनाट्य मी एड्स्वर लिहिलं. ‘सुनीलची डायरी’ म्हणून. तेही त्यांच्याच सांगण्यावरून. हेही आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून प्रसारित झालं होतं. यासाठी मला आर्यापाइकी अभ्यास कारावा लागला होता. त्यानंतर ‘पठ्ठे बापूराव’ यांच्यावर ‘नाही तर रंग पुन्हा सुना सुना..’ हे नभोनाट्य झालं. शेवटचं नभोनाट्य ‘सावित्री’ ( सावित्रीबाई फुले) मी संजय पाटील यांच्या सांगण्यावरून लिहिलं.त्यानंतर आकाशवाणीकडून मला पुन्हा काही बोलावणं आलं नाही आणि माझं नभोनाट्य लेखन थांबलं.

मी – तू अनुवादाकडे कशी वळलीस?

क्रमश: ….

©  श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवन यात्रा ☆ आत्मसंवाद…भाग 4 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? जीवन यात्रा ?

☆ आत्मसंवाद…भाग 4 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

(मागील भागात आपण पाहिलं- मी –  डी.एड.ल असताना एका संस्थाभेटीतूनही तू कथा लिहिली होतीस. आता इथून पुढे-)

उज्ज्वला – हो. एक नाही, मी दोन कथा लिहिल्या होत्या तेव्हा. ती संस्था म्हणजे ‘ममता क्रेश’. आमच्या कॉलेजपासून थोड्या अंतरावर असलेल्या चर्चने ते क्रेश चालवलं होतं. क्रेश म्हणजे सांगोपनगृह. विद्यार्थिनींच्या अभ्यासक्रमात समाजसेवी संस्थांना भेट देऊन तेथील कामकाजाची माहिती करून घेणे, हा भाग होता. म्हणून आम्ही मुलींना घेऊन त्या क्रेशमध्ये आलो. इथे माहिती कळली की इथल्या परिसरातील गोर-गरीब मुलांसाठी हे क्रेश चालवलं जातं. याला मदत जर्मन मिशनची होती. त्यांनी जगभरच्या उदारमनस्क धांनिकांना विनंती केली होती की त्यांनी इथल्या एका मुलाला दत्तक घ्यायचं. म्हणजे इथल्या एका मुलाचा खर्च चालवायचा. पन्नास- साठ मुले होती तिथे. ८वाजता मुले येत. प्रार्थना होई. मुलांना नाश्ता मिळे. खेळ, शिक्षण होत असे. दुपारचं जेवणही इथे मिळे. ६ वाजता मुले घरी परतत. तिथल्या एक केअर टेकर महिला आम्हाला माहिती देत होत्या, इतक्यात एक दीड दोन वर्षाची चिमुरडी लडखडत्या पावलांनी तिथे आली. त्यांनी तिला जवळ घेत म्हंटलं, ही क्रेशाची पहिली दत्तक मुलगी सूझान. आम्ही एका लेपर भिकार्यातच्या जोडीकडून हिला दत्तक घेतली. त्यांना म्हणालो, आम्ही हिच्या आयुष्याचं कल्याण करू, पण तुम्ही तिला ओळख द्यायची नाही. ते कबूल झाले. आम्ही हिला डॉक्टर करणार आहोत. पुढे जर्मनीला पाठवणार आहोत.

इथे मला कथाबीज मिळालं. मी मुलीचं नाव ठेवलं जस्मीन. कथेची सुरुवात, मुलगी डॉक्टर झालीय व लेप्रसीवर संशोधन करण्यासाठी जर्मनीला निघालीय, इथून केली. तिला एव्हाना हे कळलेलं असतं की एका लेपर झालेल्या भिकारी जोडप्याची आपण मुलगी आहोत पण ते कोण हे तिला कळलेलं नाही.

मी – मिशन हॉस्पिटलच्या कॅरिडॉरमध्ये एक मोठं पोस्टर पहिलं होतं. त्यात येशू एका सुरईतून पाणी घालत आहे व एका स्त्रीने त्याखाली ओंजळ धरली आहे. त्याखाली लिहिलं होतं, त्याने दिलेल्या पाण्याने जो तहान भागावतो, त्याला कधीच तहान लागत नाही.  प्रतिकात्मक असं हे चित्र. मी माझ्या कथेत ते पोस्टर क्रेशच्या हॉलमध्ये लावलं. जस्मीनचा सेंडॉफ होतो. ती टॅक्सीत  बसताना तिच्या मनात येतं , आपण लहानपणापासून त्याने दिलेल्या पाण्यानेच ( शिकवणुकीने ) तर तहान भागावतो आहोत. तरीही आपल्याला तहान लागलीय. खूप तहान. आपले आई-वडील कोण हे जाणून घेण्याची तहान. कथा इथेच संपते. मी कथेचं नावही ‘तहान’च ठेवलं. मराठी आणि हिन्दी दोन्ही वाचकांना ही कथा आवडली होती. या कथेचा हिन्दी अनुवाद हिंदीतील सुप्रसिद्ध मासिक ‘मधुमती’मध्ये प्रकाशित झाला होता. प्रा.झुल्फिकारबांनो देसाईंनी तो केला होता. 

आम्ही गेलो होतो, त्या दिवशी क्रेशमद्धे आणखी एक कार्यक्रम होता. चादर वाटपाचा. थंडीचे दिवस होते, म्हणून मुलांच्या जर्मन पालकांनी त्यांना चादरी पाठवल्या होत्या, असा क्रेशाच्या प्रमुख संचालिका रेमण्डबाईंनी प्रास्ताविक केलं. मुलांच्या आयांना चादरी न्यायला बोलावलं होतं. त्या म्हणाल्या, मुलांच्या पालकांना थॅंक्स गिव्हींगची पत्र लिहा. आमच्याकडे या. आम्ही लिहून देऊ, असाही म्हणाल्या.  इथे माझ्या ‘पांघरूण’ कथेचा जन्म झाला. सर्जा कथेचा नायक. मी चादरींऐवजी आकर्षक विविध रंगी ब्लॅंकेटस केली. तिथल्या शिक्षिका म्हणल्या होत्या, ‘जर्मन पालकांची मुलांना पत्रे येतात. खेळ येतो. चित्रे येतात. मुलांची प्रगतीही त्या पालकांना कळवावी लागते.’ आम्ही ते सगळं बघितलं होतं. शिक्षिकेच्या माध्यमातून सर्जाने जर्मनीतल्या पालकांशी खूप भावनिक संबंध प्रस्थापित केले होते. तो दोन दिवस विचार करत होता, ‘आपल्याला कोणत्या रंगाचं ब्लॅंकेट मिळेल? अखेर कार्यक्रम झाला. आई सर्जाला घेऊन घरी आली. घरी येताक्षणी सर्जा ब्लॅंकेट पांघरून झोपला.

सर्जाचा दारुड्या बाप घरी आला. त्याच्याकडे पैसे नव्हते. रखेलीकडे तर जायचे होते. त्याच्या मनात विचार आला, हे मऊ ऊबदार ब्लॅंकेट पाहून माझी राणी खूश होऊन जाईल. त्याने सर्जाचं ब्लॅंकेट ओढून घेतलं. सर्जाचा सगळा प्रतिकार लटका पडला. त्याच्या सख्ख्या बापानं त्याच्यावर पांघरूण घालायचं. पण होतं उलटच. त्याच्या मानलेल्या परदेशी बापानं पाठवलेलं पांघरूण त्याचा सख्खा बाप ओढून नेतो. सर्जा रडतो. आक्रोशतो. आई अखेर फटका पदर, त्याच्या अंगावर पांघरूण म्हणून पसरते.

ही कथादेखील मराठी, हिन्दी दोन्ही वाचकांना आवडली. माझ्या सगळ्या काथांमागे ठोस वास्तव आहे. काही प्रसंग, काही हकिकती आहेत. माझी ‘परक्याचं पोर’ ही कथा ७८ मध्ये स्त्री मध्ये प्रकाशित झाली. त्याला अनेक खुषीपत्रे आली. तेव्हा फोन घरी -दारी सर्वत्र  उपलब्ध नव्हता. त्यानंतर काही महिन्यांनी मला अनंत साठे यांचे लंडनहून , तर अनिल  पाटील यांचे रियाधहून कथा आवडल्याचे पत्र आले.

मी – अर्थात या मुळे तुझ्या कथालेखनाची गती वाढली असेल?

उज्ज्वला – नाही. असे काही झाले नाही. माझे व्याप सांभाळत अतिशय संथ गतीने माझे कथालेखन चालू होते. पण मी लिहिलेली कथा प्रसिद्ध झाली नाही, असंही कधी झालं नाही.

मी – पुढे पुढे तुझ्या कविता लेखनाप्रमाणेच क्थालेखनही कमी होत गेलं.

उज्ज्वला – खरं आहे. मी निवृत्त झाल्यानंतर माझा समाज संपर्क कमी होत गेला. नवनवे अनुभव मिळणं दुष्कर होत गेलं. मग कथालेखनही ओसरलं. आणखीही एक झालं.

मी – काय?

उज्ज्वला – मी अनुवादात घुसले. आणि चक्रव्यूहासारखी त्यातच अडकले. मग माझं स्वतंत्र कथालेखन थांबल्यासारखच झालं. 

क्रमश: ….

©  श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवन यात्रा ☆ आत्मसंवाद…भाग 3 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? जीवन यात्रा ?

☆ आत्मसंवाद…भाग 3 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

(मागील भागात आपण पहिलं- श्रोत्यांनाही कविता आवडतात, हे त्यांच्या प्रतिसादावरून म्हणजे टाळ्यांवगैरे वरून कळत होतं. आता इथून पुढे – ) 

मी – पण काय ग, काव्यक्षेत्रात तू अशी स्थिरावली असताना, तू एकदम कविता करणं बंद कसं केलस?

उज्ज्वला – मी बंद केलं असं नाही, कविता माझ्या हातून निसटून गेली. माझं जसं गद्य लेखन वाढलं, ललित, वैचारिक लेख, व्यक्तिचित्रण , पुस्तकावरील अभिप्राय, तसतशी कविता माझ्यापासून दूर जाऊ लागली. मी १९७० मध्ये सांगलीला डी.एड. कॉलेजमध्ये नोकरीला लागले. कॉलेज मुलींचं, वसतिगृहयुक्त होतं. तिथे वेगवेगळ्या गावाहून, बर्या चशा खेड्यातून मुली राहायला यायच्या. त्या प्रत्येकीचे प्रश्न वेगळे, समस्या वेगळ्या, कथा-व्यथा वेगळ्या. त्यांच्या बोलण्यात मला कथांची बीजे दिसायची. पुढे मी कथा लिहायला लागले.

मी – कधीपासून बरं? आठवतय?

उज्ज्वला – साधारण १९७६पासून मी कथा लिहायला लागले. याशिवाय आसपास घेतलेल्या अनुभवातूंही मला कथाबीजे मिळाली आहेत.  मी तुला २-३ अनुभव सांगते. म्हणजे मी तिथे नोकरी करत नसते, तर तशा कथा माझ्याकडून लिहून झाल्या नसत्या असं मला तरी वाटतं.   मी – सांगच! नाही तरी मी तुला तुझ्या कथांबद्दल विचारणारच होते.

उज्ज्वला – आता साल माझ्या लक्षात नाही. आमच्या कोलेजमध्ये राधा नावाची मुलगी होती. ती पूर्व प्राथमिककडे होती. त्यावेळी शासनाने पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक असे २ भाग केलेले होते.

पूर्व प्राथमिक म्हणजे बालवाडीचे आणि इ. १ ली ते ४ थी पर्यन्त शिकवणार्याा शिक्षिका तर प्राथमिक म्हणजे इ. १ली ते ७वी पर्यन्त शिकवणार्याण शिक्षिका. मुली म्हणायच्या डी.एड. झालं की राधाची नोकरी पक्की. ‘कसं काय?’ मी विचारलं. इतर मुलींच्या बोलण्यातून कळलं, तिच्या गावात बालवाडी आहे. एक बाई त्या चालवतात. पण त्या ट्रेंड नाहीत. त्यामुळे सरकारी अनुदान नाही. तिढा खराच होता.  राधाचे सासरे सरपंच आहेत. त्यामुळी राधाची नोकरी नक्की. माझं मन मात्र  तिच्यापाशी रेंगाळत होतं, जी आजूनपर्यंत तिथली बालवाडी चालवते आहे.   राधा डी.एड. झाली की तिला शाळेत शिक्षिकेची नेमणूक द्यायची, म्हणजे शाळेला सरकारी अनुदान चालू होईल. शाळेच्या विकासासाठी अनुदान आवश्यकच होतं. पण, जिने ३-४ वर्षं काटकसरीत आणि कमी पगारात शाळा चालवली होती, तिचं काय?  त्यातून माझी ‘पायाचा दगड’ ही कथा लिहिली गेली. मराठी आणि हिन्दी दोन्ही भाषांच्या वाचकांना ती आवडली.

मी – खरं म्हणजे याच सुमाराला तू मुलांसाठीही कथा लिहिल्यास नाही का?

उज्ज्वला – हो. त्यालाही एक कारण झालं. शासनाच्या लघुशोध प्रकल्पाच्या माहितीचं एक सर्क्युलर आलं होता. त्यात एक विषय होता, किशोर मासिकाच्या ५ वर्षांचा अभ्यास व सुधारणेसाठी शिफारसी. विषय छान होता. किशोरचे ६० अंक वाचून होणार होते. म्हणून मी हा प्रकल्प निवडला. तो वर्षभरात पूर्ण केला. तो करता करता मुलांसाठी गोष्टी लिहायला मला सुचल्या. तसंच आणखी एक गोष्ट दिसली. मुलांसाठी लिहीलेल्या नाटिका कमी आहेत. मग मी नाटिकाही लिहिल्या. माझी नाटीकांची ५ पुस्तके झाली. त्यापैकी गवत फूल गात राहिलेला बाल कुमार साहित्य संमेलनाचा पुरस्कार मिळाला.

मी – तुझी एकूण बलवाङ्मायाची किती पुस्तके झाली आणि पुरस्कार कुणाला मिळाले? माझी बालवाङ्मयाची ३०-३२ पुस्तके झाली. दोन दोन आवृत्याही निघाल्या. त्यात कथा, नाटिका, चरित्र, भौगोलिक , कादंबरी, कविता सगळ्या प्रकारची आहेत. त्यात ‘गरगर गिरकी ‘ या कविता संग्रहाला साहित्यप्रेमी भगिनी मंडळाचा व ‘बदकाचे बूट’ ला बाल कुमार साहित्य संमेलनाचा आणि द्क्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचा पुरस्कार मिळाला.

मी – डी.एड.ल असताना एका संस्थाभेटीतूनही तू कथा लिहिली होतीस, नाही का?

©  श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवन यात्रा ☆ आत्मसंवाद…भाग 2 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? जीवन यात्रा ?

☆ आत्मसंवाद…भाग 2 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

(मागील भागात आपण पाहिलं – त्यात उत्स्फूर्तता अशी फारशी नसायची. फार गंभीरपणे आम्ही तिकडे बघतही नव्हतो. आता इथून पुढे-)

उज्ज्वला – तरीही काही बर्या  कविता त्यावेळीही माझ्याकडून लिहिल्या गेल्या. मी एस. वाय. बी.ए. ला असताना कॉलेजच्या आजी माजी विद्यार्थ्यांचा कविता संग्रह काढायचा ठरला. ‘शिल्प’ नावाने तो निघालादेखील त्यात माझी ‘बंधन ‘ही कविता निवडली गेली होती. एव्हाना चांगली कविता आणि वाईट कविता याबद्दलची माझी समाज काहीशी वाढली होती.

मी – त्यावेळी मासिकातूनही तू कविता पाठवायचीस ना!

उज्ज्वला- हो. चांगली लिहून झालीय असं वाटलं तर पाठवायची. ‘माणूस’ म्हणून पाक्षिक तेव्हा निघायचं. त्यात मी कविता पाठवायची आणि समोरच्याच पानावर गोपीनाथ तळवलकर यांनी कवितेचा आस्वाद घेतलेलं लेखन असायचं. माझ्या कवितांचं त्यांनी खूप कौतुक केलं होतं. तिथे पाठवलेल्या कवितांच्या संदर्भात एक मजेशीर आठवण आहे.

मी – कोणती ग?

उज्ज्वला – ‘धुंद धुक्यातील अशा पहाटे’ अशी एक कविता मी पाठवली होती. लहानशीच कविता. कवी वामन देशपांडे  यांना ती इतकी आवडली होती की त्यांची पाठ झाली. पुढे योगायोगाने त्यांची ओळख झाली स्नेह संबंध जुळले. एकदा अशीच काही मंडळी जमली होती. एकमेकांना कविता वाचून दाखवत होतो. मी ती कविता वाचली. ते म्हणाले, ‘ही कविता तुमची नाही.’ मी म्हंटलं ‘का माझीच आहे.’ ते म्हणाले ‘ही कविता मी कुठे तरी मासिकात वाचलीय. मी म्हंटलं, ‘माणूस’ मध्ये पाठवली होती. तीच तुम्ही वाचली असेल. तर त्यांचं म्हणणं असं की खाली कवायत्रीचं नाव वेगळं होतं.’ मी म्हंटलं, ‘असणारच. कारण मी ती लग्नापूर्वी लिहिलेली व पाठवलेली कविता होती. त्यावेळी मी उज्ज्वला केळकर नसून कुमुदिनी आपटे होते.’ तेव्हा कुठे त्यांची खात्री पटली, कविता माझीच होती म्हणून. यानंतर पुन्हा जेव्हा जेव्हा भेट होईल, तेव्हा या कवितेची आठवण काढून आम्ही खळखळून हसतो.

मी – पण आपण केलेली कविता कुणाला तरी आवडते, लक्षात ठेवावीशी वाटते, ही गोष्टदेखील आनंददायक आणि प्रेरणादायक होती, नाही का?

उज्ज्वला – हो नक्कीच

मी – मग पुढे?

उज्ज्वला – पुढे काय? चार-चौघींसारखं लग्न झालं. मी संसाराला लागले.  कविता  करण्यापेक्षा कविता  जगायला लागले. कवितेचा प्रवाह नव्हे, थेंबुटे ओंजळित येऊ लागले. या मधल्या काळात चांगल्या कवींच्या खूप चांगल्या कविता वाचल्या. चांगली कविता म्हणजे काय, हे मनात स्पष्ट झालं. 

या काळात, उमेद वाढवणारी आणखी एक घटना घडली. किर्लोस्करने जिल्हावार नवनवोन्मेषांचा शोध घेण्यासाठी एक उपक्रम राबवायचे ठरवले. जिल्हावार कविसंमेलने घ्यायची. त्याची जबाबदारी एखाद्या स्थानिक संस्थेकडे द्यायची. त्यांनी कविता मागवायच्या निवडायच्या व तेवढ्याच कविता संमेलनात वाचायच्या. दोन दोन कविता मागवल्या होत्या. संमेलनाचे वेळी किर्लोस्करचे संपादक कुणा तरी मोठ्या कवींना घेऊन येणार होते. तिथे वाचल्या गेलेल्या कवितांपैकी ७ कविता किर्लोस्करमध्ये छापण्यासाठी निवडल्या जाणार होत्या. सांगलीत एकूण 300 कविता आल्या, असे प्रस्ताविकातून कळले. त्यापैकी संमेलनात वाचायला 30 कविता निवडल्या होत्या. त्यापैकी ‘जन्म आणि ‘पेपर’ आशा माझ्या 2 कविता वाचायला निवडल्या गेल्या. त्यापैकी ‘पेपर’ ही कविता त्यांनी किर्लोस्करमध्ये छापण्यासाठी निवडली. त्यानंतर संपादक ह. मो. मराठे यांचे पत्र आले, ‘पेपर’मध्ये कथेचे बीज आहे. तुम्ही परवानगी देत असाल, तर त्यावर मी कथा लिहीन.‘ मी नकार देण्याचं काही कारणच नव्हतं. एक मोठा कथाकार माझ्या कवितेवर कथा लिहितो, म्हंटल्यावर मी हुरळूनच गेले. पुढे त्यांनी कथा लिहिली. ती प्रसिद्धही झाली, पण मला वाचायला मिळाली नाही. त्यानंतर दुसरी ‘जन्म ‘ही कविता मी ‘स्त्री’मध्ये पाठवली. तीही छापूनही आली.

या सगळ्या गोष्टींमुळे माझा आत्मविश्वास वाढत गेला. आपण लिहितो, ते लोकांना आवडतं, हे नक्कीच प्रेरणादायी होतं. त्या काळात अनेक वेळा कविसंमेलने होत आणि मी बहुतेक ठिकाणी हजर राहत असे. श्रोत्यांनाही कविता आवडतात, हे त्यांच्या प्रतिसादावरून म्हणजे टाळ्यांवगैरे वरून कळत होतं. 

क्रमश:….

©  श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवन यात्रा ☆ आत्मसंवाद…भाग 1 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? जीवन यात्रा ?

☆ आत्मसंवाद…भाग 1 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

मी – का ग, आज गप्पगप्पशी आहेस आणि जरा गंभीर दिसतियस.

उज्ज्वला – मी? नाही बाई!

मी – खरं म्हणजे तू खुशीत असायला हवस. नुकतीच तुझी २ पुस्तके प्रकाशित झालीत. ‘कृष्णस्पर्श ‘ रिप्रिंट झालय आणि एवढ्यातच आणखीही २ पुस्तके येणार आहेत. 

उज्ज्वला – तशी खुशीतच आहे मी. पाचा उत्तराची कहाणी हे माझ्या स्वत:च्या कथांचं पुस्तक आलय. आनुवादीत नव्हे. दुसरं मात्र अनुवादीत आहे. प्रातींनिधिक पंजाबी लघुकथा. अरिहंत प्रकाशनाने ही छापलीत.

मी –आणि येणार्याल पुस्तकात तुझ्या टोरॅंटोच्या मैत्रिणीचा पुस्तक आहे. तू पण खूश. ती पण खूश.

उज्ज्वला- होय. हंसा दीप तिचं नाव. या चार-पाच वर्षातलीच तिची नि माझी ओळख. तीही ई-मेल, फोनद्वारेच आणि मुख्य म्हणजे लेखनातून पण ती माझी अगदी सख्खी मैत्रीण झालीय. तिच्या कथांचा अनुवाद ‘आणि शेवटी तात्पर्य’ म्हणून येतोय. छान, खुसखुशीत आणि वास्तववादी कथा आहेत तिच्या. माझ्यापेक्षा तीच जास्त उत्सुक आणि अधीर झाली आहे पुस्तक बघायला.

मी  – मला वाटतं , नवदुर्गा काढतेय हे पुस्तक.

उज्ज्वला-  बरोबर आहे. याबरोबरच गौतम राजऋषी यांच्या कथांचा ‘हिरव्या हास्याचा कोलाज’ हेही पुस्तक येतय. अगदी वेगळ्या प्रकारचं पुस्तक आहे हे. लेखक स्वत: मिल्ट्रीमध्ये कर्नल आहेत. युद्धाचा अनुभव घेतलेले आहेत. त्यांचं पोस्टिंग बव्हंशी काश्मीर घाटी, पीरपंजालची पहाडी,  संरक्षण रेषेच्या जवळपासची ठाणी इ. ठिकाणी झालय. तिथलं वातावरण, तिथल्या सैनिकांचं आणि लोकांचं जीवन आणि मानसिकताही, या पार्श्वभूमीवरच्या त्यांच्या कथा आहेत. अगदी वेगळ्या प्रकारच्या कथा आहेत. या पुस्तकाचं खूप चांगलं स्वागत होईल असं मला वाटतं.

मी –मग असं असताना तू इतकी गंभीर का?

उज्ज्वला – सहज मनात येतय, आपल्या लेखनप्रवासाचा मागोवा घ्यावा. खरं म्हणजे लेखिका व्हायचं मी काही लहानपणापासून ठरवलं नव्हतं. 

मी – पण मला वाटतं, तू लहानपणापासून म्हणजे शाळेत असल्यापासून कविता करतेस.  उज्ज्वला- हो. पण माझी पहिली कविता मात्र फुकटच गेली. म्हणजे गंमतच झाली तिच्याबाबतीत.

मी – काय झालं ग?

उज्ज्वला – अग, मी ८ वीत होते तेव्हा गोवा मुक्तिसंग्रामाचा लढा जोरात चालू होता. त्यातले एक मुख्य सेनानी हेमंत सोमण. एकदा शाळेत बातमी आली, हेमंत सोमणांनी तिरंगा फडकावला आणि पोर्तुगीजांनी त्यांना गोळी मारली. त्यांचा बळी गेला. बातमी ऐकली आणि मी उत्स्फूर्तपणे लिहिलं,

‘हेमंत सोमणांनी गोव्यात झेंडा रोविला

तडतडा तडकले पोर्तुगीज झेंडा त्यांनी पाहिला ‘

इथून मग त्यांच्या बलिदानाशी कविता येऊन थांबली. दुसर्याी दिवशी बातमी आली, की हेमंत सोमणांना गोळी नाही मारली. पकडून तुरुंगात टाकलं. मग माझ्या कवितेला काहीच अर्थ उरला नाही. अर्थात माझी कविता फुकट गेली याचं मात्र मला मुळीच वाईट वाटलं नाही. हेमंत सोमण वाचले, हे महत्वाचं.

मी- आणखीही काही कविता तू लिहिल्या होत्यास ना शाळेत?  

उज्ज्वला – चार-पाच वेळा काही तरी चाल मनात सुचली, ती गुणगुणताना त्यावर शब्द सुचत गेले.

मी- आठवते तुला त्यातलं काही?

उज्ज्वला- दोन ओळीच आठवताहेत. एक चाल गुणगुणताना  लिहिलं होतं,

‘ संध्यारजनी आली आली

     गाई – वासरे घरा परतली.’  बाकी काही आठवत नाही. म्हणजे ते सगळं तितकं महत्वाचं नव्हतंच.

मी – कॉलेजला गेल्यावर तुझ्या कविता लेखनाला बहार आला होता, नाही का?

उज्ज्वला- बहार वगैरे असा नाही पण कविता करणार्याा आणि मुख्य म्हणजे कवितेवर प्रेम    करणार्या– मैत्रिणी मिळाल्या. हिने काल कविता लिहिली, आपण का नाही? आशा इरिशिरीने कविता लिहिल्या तेव्हा. त्यात हौसेचा, अनुकरणाचा भाग जास्त होता. मौलिकता कमीच. तो काळ रोमॅंटिक होता. प्रेम या कल्पनेवरच प्रेम होतं तेव्हा. त्यामुळे प्रेमावर त्याहीपेक्षा वियोगावर कविता जास्त लिहिल्या गेल्या. काव्यबहरातला बराचसा बहर या स्वरूपाचा होता. त्यात उत्स्फूर्तता अशी फारशी नसायची. फार गंभीरपणे आम्ही तिकडे बघतही नव्हतो.

©  श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ विवेक साहित्य # 146 ☆ जीवन यात्रा – श्री सुशील सिद्धार्थ, एक  व्यंग्यकार, समीक्षक, संपादक और सहज इंसान ☆ श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ☆

श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ 

(प्रतिष्ठित साहित्यकार श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ जी के साप्ताहिक स्तम्भ – “विवेक साहित्य ”  में हम श्री विवेक जी की चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुंचाने का प्रयास करते हैं। श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र जी, मुख्यअभियंता सिविल  (म प्र पूर्व क्षेत्र विद्युत् वितरण कंपनी , जबलपुर ) से सेवानिवृत्त हैं। तकनीकी पृष्ठभूमि के साथ ही उन्हें साहित्यिक अभिरुचि विरासत में मिली है। आपको वैचारिक व सामाजिक लेखन हेतु अनेक पुरस्कारो से सम्मानित किया जा चुका है। )

आज प्रस्तुत है  आपका एक आलेख  श्री सुशील सिद्धार्थ, एक  व्यंग्यकार, समीक्षक, संपादक और सहज इंसान

☆ साप्ताहिक स्तम्भ – विवेक सहित्य # 146 ☆

? जीवन यात्रा – श्री सुशील सिद्धार्थ, एक  व्यंग्यकार, समीक्षक, संपादक और सहज इंसान ?

किसी भी कवि लेखक या व्यंग्यकार की रचनाओ में उसके अनुभवो की अभिव्यक्ति होती ही है.  रचनाकार का अनुभव संसार जितना विशद होता है, उसकी रचनाओ में

उतनी अधिक विविधता और परिपक्वता देकने को मिलती है. जितने ज्यादा संघर्ष रचनाकार ने जीवन में किये होते हैं उतनी व्यापक करुणा उसकी कविता में परिलक्षित होती है , कहानी और आलेखो में दृश्य वर्णन की वास्तविकता भी रचनाकार की स्वयं या अपने परिवेश के जीवन से तादात्म्य की क्षमता पर निर्भर होते हैं. रोजमर्रा  की दिल को  चोटिल कर देने वाली घटनायें व्यंग्यकार के तंज को जन्म देती हैं.

श्री सुशील अग्निहोत्री एक प्राध्यापक के पुत्र थे. अध्ययन में अव्वल. हिन्दी में उन्होने पी एच डी की उपाधि गोल्ड मेडल के साथ अर्जित की. स्वाभाविक था कि विश्वविद्यालय में ही वे शिक्षण कार्य से जुड़ जाते. पर  नियति को उन्हें  अनुभव के विविध संसार से गुजारना था. सुप्रतिष्ठित नामो के आवरण के अंदर के यथार्थ चेहरो से सुपरिचित करवाकर उनके व्यंग्यकार को मुखर करना था. आज तो अंतरजातीय विवाह बहुत आम हो चुके हैं किन्तु पिछली सदी के अतिम दशक में जब सिद्धार्थ जी युवा थे यह बहुत आसान नही होता था. सुशील जी को विविध अनुभवो से सराबोर लेखक संपादक समीक्षक बनाने में उनके  अंतरजातीय प्रेम विवाह का बहुत बड़ा हाथ रहा. इसके चलते उन्होने विवाह के एक ऐसे प्रस्ताव को मना कर दिया, जिसके परिणाम स्वरूप उन्हें विश्वविद्यालयीन शिक्षण कार्य की नौकरी नही मिल सकी, और वे फ्रीलांसर लेखक बन गये. स्थायित्व के अभाव में वे लखनऊ, मुम्बई, वर्धा, दिल्ली में कई संस्थाओ और कई व्यक्तियो के लिये अखबार, पत्रिकाओ, शिक्षण संस्थाओ, प्रकाशन संस्थानो के लिये लेखन कर्म से जुड़े तरह तरह के कार्य करते रहे.

प्रारंभ में वे लखनऊ से अवधी में अधिक लिखते रहे. तभी उनके दो अवधी कविता संग्रह आये जिसके लिये उन्हें उत्तरप्रदेश हिंदी संस्थान से नामित पुरस्कार मिले.

 

© विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ 

ए २३३, ओल्ड मीनाल रेसीडेंसी, भोपाल, ४६२०२३

मो ७०००३७५७९८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवन यात्रा ☆ आत्मसंवाद…भाग ४ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

? आत्मसंवाद – भाग ४ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ?

(रेडिओवरील व मंडळांमधील भाषणांसंबंधी सांगितले.)

“कवितेच्या प्रांतात कधी शिरली नाहीस का?”

“जवळ जवळ नाहीच. माझी ‘चारधाम’वरील कविता आणि ‘झोपाळा’ ही कविता प्रसिद्ध झाली . बाकी बऱ्याच कविता या प्रसंगानुरूप केलेल्या होत्या. कुणाच्या लग्नाचा वाढदिवस, साठावा किंवा ८० वा वाढदिवस वगैरे. अशा कविता मी सांभाळून ठेवल्या नाहीत. कारण त्या कविता त्या प्रसंगापुरत्याच असतात.”

“बरोबर. लेखनामुळे आलेले आणखी काही विशेष वेगळे अनुभव सांगतेस का?”

“हो. आठवतील तसे सांगते. माझा रशियामधील पीटर्सबर्गवरील लेख प्रसिद्ध झाल्यानंतर साधारण दोन महिन्यांनी मला रशियन कॉन्सुलेटमधून डॉक्टर सुनीती अशोक देशपांडे यांचा फोन आला. पीटर्सबर्गवरील माझ्या लेखात मी रशियन बॅलेबद्दल सविस्तर लिहिले होते. डॉक्टर देशपांडे यांनी त्या लेखातील बॅलेचा उल्लेख करून मला कॉन्सुलेटमधील ‘कल्चरल सेंटर ऑफ रशिया’ पेडर रोड इथे होणाऱ्या एका रशियन बॅले शोसाठी आमंत्रित केले. डॉक्टर देशपांडे यांच्यापर्यंत हा लेख कसा पोहोचला ते मला कळले नाही कारण बॅले शोसाठी आम्ही गेलो  त्यावेळी त्यांची भेट होऊ शकली नाही. आम्ही बॅले पाहून आणि  अल्पोपहाराचा आस्वाद घेऊन परतलो.”

“अरे वा! छान संधी मिळाली.”

“माझा मोरोक्कोवरील लेख मानिनी दिवाळी अंकात प्रसिद्ध झाल्यानंतर सुप्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ यांची ईमेल मला आली. त्यात त्यांनी लेख खूप आवडल्याचे व त्यांना मोरोक्को पहायची इच्छा होती पण जमले नाही. त्यामुळे या लेखातूनच मरोक्कोची भेट झाली असे कळविले होते.”

“मला आठवतं की तुला कौस्तुभ आमटे यांचीही एक मेल आली होती”.

“हो ना! तेव्हाही मला आनंद आश्चर्याचा  धक्का बसला होता. माझा ‘उरते फक्त आमसुलाची चटणी’ हा लोकसत्ता- चतुरंगमध्ये प्रकाशित झालेला ललित लेख वाचून  श्री कौस्तुभ प्रकाश आमटे यांनी आनंदवनहून लेख खूप आवडल्याची कौतुकाची ईमेल पाठविली होती.”

“छान! त्यांनी आवर्जून कळविले ही विशेष गोष्ट!”

“तसंच कौतुक मला डॉक्टर महेश करंदीकर यांचं वाटतं. डॉक्टर करंदीकर नाशिकरोडला त्यांच्या स्वतःच्या हॉस्पिटलमध्ये न्युरो सर्जन आहेत. पण त्यांच्या व्यस्त दिनक्रमातून माझा लोकसत्तेत आलेला लेख वाचून आवडला तर आठवणीने फोन करतात. ‘आमसुलाच्या चटणीसाठी’ त्यांचाही फोन होताच!

“मला वाटतं माननीय सुरेश खरे यांनीसुद्धा तुझी पुस्तके वाचून तुला काही सूचना केल्या होत्या.”

“हो तर! शिवाय डॉक्टर शरद वर्दे, शुभदा चौकर ,जयप्रकाश प्रधान, धनश्री लेले,ठाण्याचे श्री शरद भाटे , शुभदा चंद्रचूड यांचेही कौतुक व मार्गदर्शन लाभले. रत्नागिरीपासून नागपूरपर्यंतच्या वाचकांनी खुशी पत्रे पाठवून,  किंवा फोन, ईमेल करून पसंतीची पावती दिली. या सर्वांमुळे मी लिहिती राहिले.

“चांगल्या झाल्या आपल्या गप्पा! आठवणींची उजळणी झाली. मी आता एकच प्रश्न विचारतो. प्रवासाच्या आवडीमुळे भरपूर विमान प्रवास झाला. कधीच काही अडचण आली नाही का?”

“एक अविस्मरणीय प्रसंग सांगते आणि आपण थांबू या.”

“चालेल”.

“ऑस्ट्रेलिया- न्यूझीलंडच्या प्रवासाहून मुंबईला परत येताना वाटेत बँकॉकला विमान बदलायचे होते. बँकॉकहून  दुसऱ्या विमानाने निघालो. पोटावर बांधलेले पट्टे अजून तसेच होते. विमान  आकाशात स्थिरावयाचे होते. तेवढ्यात उजवीकडील खिडक्यांच्या बाजूने, पुढपासून मागपर्यंत विजेची एक सळसळती रेषा सरकन गेली. ‘something wrong ‘असं मनात येईपर्यंत मागच्या बाजूचे लोक ‘फायर फायर ‘असं ओरडत पुढे येऊ लागले. आरडाओरडा, हुंदक्यांचे आवाज येऊ लागले. कॅप्टनने सर्वांना आपापल्या जागेवर पट्टे बांधून बसण्याची विनंती केली. सर्व क्रू मेम्बर्स, एअर होस्टेससुद्धा त्यांच्या जागेवर बसले. कॅप्टनने  घोषणा केली की, विमानाच्या एका इंजिनाला आग लागली होती. ती आता विझविण्यात आली आहे आणि विमान परत बँकॉक विमानतळावर नेण्यात येत आहे.

मी मधल्या रांगेत ,पुढून दुसऱ्या लाईनमध्ये कडेच्या सीटवर होते. तिथेच जवळ दरवाजाशी एक एअर होस्टेस कॅप्टनने सूचना केल्या प्रमाणे बसली होती. तिचं तोंड माझ्याकडे होतं. अगदीच पोरसवदा दिसत होती. नवीनच लग्न झालं असावं किंवा घरी लहान बाळ असावं. तिच्या डोळ्यातून घळघळा पाणी वाहत होतं. मी खुणेने तिला सांगितलं रडू नको आणि आकाशाकडे बोट दाखवून नमस्कार केला. खांद्यावर क्रॉस करून दाखवलं आणि म्हटलं God is great. Don’t weap .”

अशा परिस्थितीमध्ये विमानाचं जमिनीवर सुखरूप उतरणं हे महत्त्वाचं असतं. विमानाने नुकतेच उड्डाण केल्यामुळे ते फ्युएलने पूर्ण भरलेले होते. काहीही घडू शकत होते. कॅप्टनने अतिशय कौशल्याने विमान सुखरूप उतरविले. सर्वांनी टाळ्या वाजवून जल्लोष केला. ती एअर होस्टेस माझ्या जवळ आली आणि माझे हात हातात घेऊन,

‘Thank you very much, thank you very much’असे म्हणू लागली. मी तिला म्हटलं,’ अगं, मी तुझ्यापेक्षा जास्त घाबरले होते. (I was more afraid of than  you. Believe in God. He will take our care.)’

नंतर मनात आलं की मृत्यु समोर दिसल्यावर कोण घाबरणार नाही? पण काही प्रसंगच असे असतात की त्या वेळी आपण काहीसुद्धा करू शकत नाही. आपलं आयुष्य हा सुद्धा एक प्रवासच आहे. जीवनाच्या या प्रवासात कितीतरी वेळा आपल्याला प्रश्न पडतात की अरे, हे असं का झालं? अमुक एक घटना का घडली? पण अशा प्रश्नांना काहीही उत्तर नसतं. असे अनुत्तरित प्रश्‍न आणि अनपेक्षित घटना यांना बरोबर घेऊनच आपल्याला आयुष्याचा प्रवास करायचा असतो.

बँकॉकला विमान उतरल्यावर आमच्यासाठी चहा नाश्ता तयार होता. कोणाला घरी फोन करायचा असेल, ई-मेल करायची असेल तरी विनामूल्य सोय होती. तासाभरातच दुसऱ्या विमानाने आम्हाला घेऊन उड्डाण केलेसुद्धा आणि आश्चर्य म्हणजे त्याच एअर होस्टेस , पण नवीन ताजा आकर्षक युनिफॉर्म घालून हसर्‍या चेहर्‍याने आमचं स्वागत करीत होत्या.

अनुत्तरित  प्रश्न आणि अनपेक्षित घटना यांना गृहीत धरून आयुष्याचं असंच स्वागत करायला हवं, नाही का?”

भाग चार व आत्मसंवाद समाप्त

 © सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवन यात्रा ☆ आत्मसंवाद…भाग ३ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

? आत्मसंवाद – भाग ३ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ?

(सिडनीमध्ये परदेशी स्त्रीकडून भारतीय पुरुषांची नक्कल)

“आणखी कुठच्या क्षेत्रात मुशाफिरी करायला मिळाली?”

“एका मैत्रिणीच्या सांगण्यावरून ‘आकाशवाणी’ मुंबई, इथे प्रवासावरील दोन लेख लिहून पाठविले. काही दिवसांनी त्यांचे रेकॉर्डिंगसाठी बोलावणे आले तो एक वेगळाच अनुभव होता.”

” फक्त प्रवास वर्णनांचे  प्रसारण झाले की….”

‘ऑल इंडिया रिटायर्ड पर्सन्स असोसिएशन’ यांच्यातर्फे आनंदी वार्धक्य या कार्यक्रमात भाग घेता आला. तसेच आम्ही मैत्रिणींनी एकदा गाणी गोष्टी वेगळेअनुभव यांचा एक सुंदर गजरा आकाशवाणीवरून सादर केला. त्याचे लेखनही मीच केले होते.”

“याला श्रोत्यांचा प्रतिसाद मिळत होता का?”

“माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त! प्रथम मला वाटायचे की, या टीव्हीच्या जमान्यात रेडिओ कोण ऐकतो? पण तसं नाहीये . रेडिओचे कार्यक्रम नियमित ऐकणारे श्रोते महाराष्ट्रभर पसरलेले आहेत. माझे प्रवास लेख आवडल्याचे अनेकांनी आकाशवाणीवर कळविले. त्यामुळे मला अशा प्रकारचे दहा कार्यक्रम प्रसारित करायची संधी मिळाली.”

“मला आठवतं की तुझ्या “अन्नब्रह्म” या कार्यक्रमाला सर्वात जास्त प्रतिसाद मिळाला होता. काय सांगितलं होतंस तेंव्हा?

“जे जे देश बघितले तिथल्या हवामानानुसार ,पिकानुसार तिथे बनवले जाणारे विविध पदार्थ यात सांगितले होते. व्हिएतनाममध्ये तळ्यात उगवणाऱ्या गुलाबी कमळाच्या देठापासून फुलापर्यंत प्रत्येक भाग विविध पदार्थांमध्ये वापरला जातो तर कंबोडियामध्ये अननस, आंबा, फणस यांच्याबरोबरच खेकडे, कोळी यांचे वेफर्ससुद्धा मिळतात. तसंच आपल्या आदिवासींमध्ये लाल डोंगळ्यांची चटणी करून खाण्याची पद्धत आहे असा माहितीपूर्ण आणि मजेशीर विषय होता.”

” खरं आहे. अन्नब्रम्हाचा मार्ग ब्रह्मांडं व्यापणारा आहे. मला वाटतं एकदा  टीव्हीवर सुद्धा कार्यक्रम झाला”.

“हो ऑल इंडिया रिटायर्ड पर्सन्स’ असोसिएशनतर्फे मी व डॉक्टर आचरेकर यांच्याबरोबर ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न व त्यावरील उपाय यांची चर्चा झाली. तोही एक एक वेगळा अनुभव. तसंच  रविराज गंधे यांनी एकदा ‘अमृतवेल’ या त्यांच्या टीव्हीवरील कार्यक्रमात  माझ्या ‘देशोदेशींचे नभांगण’ या पुस्तकाचा परिचय करून दिला .”

“मला आठवतं की तू वेगवेगळ्या मंडळांमध्ये व्याख्यानासाठीसुद्धा जात होतीस”.

“हो. दादरपासून डहाणूपर्यंतच्या अनेक वनिता मंडळात व ज्येष्ठ नागरिक संघात वेगवेगळ्या विषयांवर भाषण करण्याची संधी मिळाली.”

“यात फक्त प्रवासातील अनुभव सांगितलेस की…..”

“प्रवासातील अनुभव  व इतर गमतीजमती तर सांगितल्याच.  एकदा दहावीच्या विद्यार्थ्यांसमोर पालकांच्या भूमिकेतून बोलायला मिळाले. मातृदिनानिमित्त झाशीची राणी, जिजाबाईंपासून आधुनिक  स्त्रीपर्यंत विचार मांडले. रोटरी इंटरनॅशनल क्लबमध्ये ‘जर्नी ऑफ लाइफ’ यावर भाषण केले. स्त्री दिनानिमित्त ‘स्त्री ही सबलाच आहे’ या विषयावर बोलले. “

“अशा भाषणांसाठी वेगळा अभ्यास करावा लागला असेल ना?

“अशी माहिती जमवताना आपल्या ज्ञानात भर पडते. मुख्य प्रश्न असतो तो अभिव्यक्तीचा! समोरच्या श्रोत्यांना आपल्याला पहिल्या तीन-चार मिनिटातच आपल्या विषयाकडे आकर्षित करून घ्यावं लागतं आणि मग त्या विषयाचा विस्तार सहजपणे होतो.”

” म्हणून तर वक्तृत्व कला चौसष्ट कलांमध्ये समाविष्ट आहे”.

“कार्यक्रमांचे निवेदन करतानाही असाच अभ्यास करावा लागतो. गीतरामायण, पावसाळी गीते अशा काही कार्यक्रमांचे निवेदन केले. “

“निवेदनालाही भाषणासारखी तयारी करावी लागते का?”

“निवेदकाला प्रामुख्याने हे लक्षात ठेवावे लागते की निवेदकाचे काम हे फुलांच्या गजऱ्यामधल्या  दोऱ्यासारखे आहे. योग्य शब्दात  आधीच्या व पुढच्या गाण्याची जोड कुशलतेने करून द्यावी लागते.  कधी एखादी त्या गाण्यासंबंधी आठवण किंवा प्रसंग थोडक्यात सांगावा लागतो. “

“म्हणजे हा गाण्यांचा कार्यक्रम आहे.निवेदनाचा नाही हे लक्षात ठेवायचं.”

“बरोबर. अनेक वेळा महिला मंडळं, गणेश उत्सव यांच्यातर्फे घेतलेल्या स्पर्धा, शालेय विद्यार्थ्यांच्या स्पर्धा यासाठी परीक्षकाचे काम केले.” 

“म्हणजे तेंव्हा अगदी व्यस्त दिनक्रम होता म्हणायचा”.

“व्यस्त पण आवडीचा”. याच सुमारास “मराठी प्रवास वर्णन लेखक वाचक मंच” यांच्यातर्फे महिला दिनाला सन्मानपत्र मिळाले.”

“म्हणजे तुझ्या अनेक प्रांतातल्या मुशाफिरीची दखल घेतली गेली म्हणायची.”

 आत्मसंवाद भाग – ३ समाप्त

 © सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवन यात्रा ☆ आत्मसंवाद…भाग २ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

? आत्मसंवाद – भाग २ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ?

(मैत्रिणीने माझ्यावर लेखनाची जबाबदारी टाकली.)

“पार पाडलीस का ही जबाबदारी?”

“हो तर! तिच्या फोननंतर डोक्यात विचारचक्र सुरू झालं. मनातलं कागदावर  उमटू लागलं. लेखन, पुनर्लेखन असं करता करता तो लेख विविध उदाहरणांनी सजवून झाला.”

“मला आठवतं की त्या लेखात तू अमृता प्रीतम यांच्या ‘चौथा कमरा’ या पुस्तकाचा उल्लेख केला होतास”.

“हो. ‘अमृता प्रीतम’ यांचा ‘चौथा कमरा’ डोळ्यापुढे ठेवून त्यादृष्टीने लेखाचा शेवट केला की प्रत्येक स्त्रीला तिची स्वतःची आवड जपण्याची संधी मिळाली पाहिजे. मग ती आवड कसलीही असो. गायन, वादन ,भजन, पत्ते खेळणे, नाटक सिनेमा पाहणे जे आवडत असेल त्या आनंदासाठी तिने स्वतःच स्वतःचा ‘चौथा कमरा’ निर्माण करणं आणि तो जपणं खूप गरजेचे आहे .”

“आवडला ना तो लेख संपादकांना?”

“हो.लेख प्रसिद्ध झाला आणि फोनचा पाऊस पडला. फक्त मनस्वीनीच नाही तर माझे इतर अनेक सुहृद,मित्र- मैत्रिणी आणि अनोळखी वाचक यांनी लेख आवडल्याचे फोनवरून, पत्रांतून कळवलं.  मला लेखनातला, प्रसिद्धीतला आनंद कळला आणि त्याची गोडी लागली.”

“लेखक ‘स्वान्त सुखाय’ लिहितो असं म्हणतात….. “

“असं कितीही म्हटलं तरी लेखकाला वाचकांच्या पसंतीची पावती लागतेच.

वाचकांच्या उत्साही प्रतिसादामुळे अनेक ललित लेख लिहून झाले .आजूबाजूला घडणाऱ्या लहान मोठ्या गोष्टी टिपून त्यावर तरंगणाऱ्या विचारलहरी आणि अनेक अनुभव सजगतेने टिपताना मनात उमटणार्‍या प्रतिक्रिया व्यक्त करण्याची संधी ललित लेखनातून मिळाली.या ललित लेखनाला वर्तमानपत्रे मासिके आकाशवाणी यांच्यामुळे चांगली प्रसिद्धीही मिळाली.”

“लेखन सुरू होऊन साधारण किती वर्ष झाली असतील?”

“माझ्या लेखनाची डेक्कन क्वीन सुरू झाली त्याला आता १७ वर्षं झाली.””  “प्रवास वर्णनं लिहिण्याकडे जास्त कल आहे का?”

“हो. प्रवासाची आवड आम्हा दोघांनाही आहे. नोकरी करीत असताना भारत दर्शन केले. स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर परदेश प्रवासाचा आनंद घेतला.”

” एखाद्या नावाजलेल्या टूरिस्ट कंपनीत पैसे भरायचे आणि प्रवासाला जायचे असा प्रवासाचा सोपा मार्ग स्वीकारला की……..”

“सुरवातीला प्रवासी कंपनीबरोबर जाणारे आम्ही, नंतर प्रवासी कंपनीकडून  फक्त बुकिंग करून घेऊन जाऊ लागलो. आमचा मित्र मैत्रिणींचा प्रवासाचा ग्रुप खूप छान आहे. सर्वांच्या उत्साहाने सहकार्याने अनेक देश बघण्याचे भाग्य लाभले.”

“मला आठवतं की जपानला तुम्ही एका स्नेह्याच्या घरी आठ दिवस राहून जपानमध्ये भरपूर फिरलात.”

“हो. ती एक चांगली संधी आम्हाला मिळाली. नाही तर जपान प्रवासी म्हणून फिरायला खूपच महाग आहे.परदेशात राहणाऱ्या मित्र-मैत्रिणी नातेवाईक यांचा आधार घेऊन काही देश बघितले. तर त्यानंतर इंटरनेटवरून युथ हॉस्टेलचे बुकिंग करून प्रवास करण्याचा यशस्वी प्रयोग केला.”

“अशा पद्धतीच्या प्रवासाची मजा वेगळीच! नाही का?

“नक्कीच! थोडीफार खटपट करावी लागली तरी असा प्रवास स्वस्त आणि मनासारखा होतो. वेगवेगळ्या अनुभवांनी आयुष्य समृद्ध बनतं.”

“खटपट म्हणजे—–“

” प्रवास सुरू करण्यापूर्वी ज्या देशाला भेट द्यायचे ठरविले आहे त्या देशाबद्दल सहा- सहा महिने आधी आमची चौकशी चालू होते. जगाच्या नकाशावरील त्या देशाचे भौगोलिक स्थान, हवामान, प्रेक्षणीय स्थळे, खर्चाचा अंदाज घेणे चालू असते. आम्हा सर्वांना स्थलदर्शनामध्ये विशेष रस आहे.  अनेक टुरिस्ट कंपन्यांकडून माहितीपत्रके मागवून, खर्च व स्थलदर्शन यांचा योग्य समन्वय साधून मग आम्ही  एका कंपनीकडून बुकिंग करून घेतो.”

“वा! छान आहे ही पद्धत .”

“आज इंटरनेटमुळे फारच चांगल्या सुविधा निर्माण झाल्या आहेत.शिवाय ज्या देशाला जायचे आहे त्या देशामध्ये आपल्या माहितीतले कुणी जाऊन आले आहे का याची चौकशी करून त्यांचे नाव, संपर्क नंबर मिळवून आम्ही त्यांच्याशी बोलतो. त्यामुळे त्यांचे अनुभव, त्यांना आलेल्या अडचणी कळतात. अशा संपर्कांचा खूप फायदा होतो .”

“प्रवासाहून आल्यानंतर त्या त्या देशावर लेख लिहीत होतीस का?”

“हो. प्रवास करताना आपले कान, नाक, डोळे उघडे ठेवले की तिथल्या इतिहास-भूगोलाबरोबरच तिथली माणसे वाचण्याची सवय लागते. ते अनुभव लेखात उतरले की तो लेख जिवंत वाटतो.”

“त्या लेखांना प्रसिद्धी मिळाली ना?”

“अगदी चांगली प्रसिद्धी मिळाली. लोकसत्ता, साप्ताहिक सकाळ, श्री दीपलक्ष्मी, विवेक, भटकंती, माहेर ,अथश्री, ब्रह्मवार्ता,  चारचौघी अशा अनेक ठिकाणी ललितलेख व प्रवास वर्णने प्रसिद्ध झाली.”   

“छान. मला वाटतं अनेक दिवाळी अंकातही…..”

“हो. मानिनी, अनुराधा, उत्तम कथा ,हेमांगी, गार्गी, विश्व भ्रमंती, मुशाफिरी अशा अनेक दिवाळी अंकात लेख प्रसिद्ध झाले”.

“लेख सहजपणे लिहून होतात की…..”

“माझ्या प्रत्येक लेखासाठी मी व्यवस्थित मेहनत घेते. लेख मनासारखा होईपर्यंत मी त्याचे पुनर्लेखन करते. लेख माहितीपूर्ण असतोच शिवाय त्याला इतिहास- भूगोल याबरोबरच वर्तमानाचे संदर्भही असतात.”

“खरं आहे. म्हणून तर एवढे वाचक आणि त्यांच्या लेख आवडल्याच्या प्रतिक्रिया  मिळाल्या. तुला एक विचारायचं होतं की,प्रवासाची इच्छा असली तरी तेवढंच पुरेसं आहे का?”

“नाही रे बाबा! घरातील सर्वांनी संपूर्ण सहकार्य केल्यामुळे प्रवासासाठी मानसिक बळ  मिळालं.  प्रवासाची इच्छा असली तरी आर्थिक पाठबळ महत्वाचं. आम्हा     दोघांनाही हे बळ आपापल्या नोकऱ्यांमधून मिळालं. एकदा प्रवासाची चटक लागली की मग इतर अनेक लहान- मोठ्या, अनावश्यक गरजांना मागे सारून प्रवास केला जातो. प्रकृतीची साथही तितकीच महत्त्वाची.”

“अगदी बरोबर”. या प्रवास लेखांना पुस्तक स्वरूप देता आलं का?”

“भारतातील व परदेशातील प्रवासाचे  तीस-पस्तीस लेख प्रसिद्ध झाले तरी त्यांचे पुस्तक करण्याचा विचार केला नव्हता. माझ्या मैत्रिणीच्या- शोभाच्या पाठपुराव्यामुळे तीन-चार प्रकाशकांना फोन केला. त्यांनी सांगितलेला खर्चाचा आकडा ऐकून गप्पच बसले.”

“बापरे. मग पुस्तक प्रसिद्ध कसं झालं?”

“विजय खाडिलकर या आमच्या सुहृदांच्या सांगण्यावरून ‘महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळा’कडे माझे परदेश प्रवासावरील लेख ‘देशोदेशींचे नभांगण’ हे नाव देऊन पाठविले. एका वर्षानंतर पुस्तक स्वीकृत झाले पुण्याच्या ‘गमभन प्रकाशन’ यांनी ते अतिशय दर्जेदार स्वरूपात प्रसिद्ध केले. या पुस्तकाला माननीय यशवंतराव चव्हाण पारितोषिक मिळाले.”

“शाब्बास! आणि भारतातील प्रवासाचे लेख…….”

“ते लेख मी पुण्याच्या ‘उत्कर्ष प्रकाशन’ यांच्याकडे पाठवले. त्यांना आवडले . त्यांनी ते प्रवास लेख ‘चला आसाम पासून अंदमान पर्यंत’ या नावाने प्रसिद्ध केले.

“एवढ्या प्रवासामध्ये अनेक अनुभव आले असतील ना?”

“भरपूर अनुभवांचं गाठोडं जमलं आहे”.

“त्यातला एखादा मजेशीर अनुभव सांगतेस का?”

“ऑस्ट्रेलियाच्या प्रवासासाठी आम्ही  इंटरनेटवरून मेलबर्न, सिडनी, ब्रिस्बेन अशा तीन ठिकाणी युथ होस्टेलमध्ये राहण्यासाठी बुकिंग केलं होतं. सिडनीचं युथ होस्टेल खूप मोठं होतं. तिथे जगभराच्या प्रवाशांची सतत ये-जा चालली होती. “

“युथ होस्टेलमध्ये सर्वांना राहता येतं का? तिथे सोयी वगैरे कशा असतात?”

“युथ हॉस्टेल ही परदेशामध्ये राहण्याची एक अतिशय स्वस्त आणि सुंदर सोय आहे. युथ होस्टेलच्या मेंबरशिपला वयाची अट नसते. सिडनीला आम्ही दोघा- दोघांच्या रुम्स घेतल्या होत्या. छोट्याशा स्वच्छ खोलीत, एकावर एक दोन बंकर बेड (टू टायर थ्रू ट्रेनमध्ये असतात तसे), आणि सामान ठेवायला थोडी जागा होती.”

“आणि टॉयलेट वगैरे?”

“बाथरूमस् आणि टॉयलेटस्  कॉमन पण अतिशय स्वच्छ! स्त्रीयांसाठी , पुरुषांसाठी वेगळी. २४ तास गरम पाणी.  कधीही कसली खोटी झाली नाही.”

“खान-पान सेवेसाठी रेस्टॉरंट होतं का?”

“छे.छे.सर्वांना मिळून एक मोठं कॉमन किचन दुसऱ्या मजल्यावर होतं.त्या स्वयंपाकघरात वेगवेगळ्या ठिकाणी पंधरा-वीस ओटे होते. त्यावर गॅसच्या शेगड्या. कपाटातील ड्रॉवरमध्ये छोट्या चमच्यांपासून ग्लास, कपबशा, प्लेटस् , झारे,, कालथे ,चाकू,सुऱ्या सारे होते. मिक्सर टोस्टर मायक्रो  होते. पुरुषभर उंचीचे फ्रिज भरपूर होते. आपण मार्केटमधून आणलेले दूध, लोणी वगैरे फ्रिजमध्ये आपल्या नावाचे लेबल लावून ठेवण्याची सोय होती.”

“म्हणजे अगदी सुसज्ज स्वयंपाकघर म्हण ना! तिथे आपण जेवण बनवायचे का?”

“हो. आणि त्यासाठीआपण वापरलेली सारी भांडी तिथेच ठेवलेल्या लिक्विडने घासून पुसून परत जागेवर ठेवायची. स्वयंपाकघराला जोडून बाहेर मोठा हॉल होता. तिथे टेबल-खुर्च्या ,सोफासेट, टीव्ही होता. आपण तयार केलेले पदार्थ प्लेटमध्ये घेऊन हॉलमध्ये बसून खायचे अशी पद्धत होती.”

“छानच सोय आहे ही! एक वेगळा अनुभव.”

“नक्कीच! सारेच प्रवासी असल्याने झटपट जेवण म्हणजे ब्रेड- आम्लेट, चहा- कॉफी, तयार पाकिटातील सूप, भाज्या, भात असा मेनू असायचा.  त्या होस्टेलमधला आमचा तो तिसरा म्हणजे शेवटचा दिवस होता. आम्ही मैत्रीणी मिळून त्या दिवशीचा आमचा झटपट स्वयंपाक बनवित होतो. तेवढ्यात तिथे एक उंच- निंच  धिप्पाड, गोरीपान बाई आली.आम्ही नेहमीप्रमाणे तिला हाय-हॅलो केले.”

“म्हणजे ती ओळखीची होती की…….”

“छे रे. ती आमची एक सवय आहे. ओळखी करून घ्यायच्या. त्यांची माहिती आपल्याला मिळते आणि आपण त्यांना आपल्याविषयी काही सांगू शकतो .”

“चांगली आहे सवय. घडीभरच्या भेटीत आपुलकी व्यक्त करणारी.”

“तिच्या बोलण्यावरून कळलं की ती एकटीच स्वीडनहून जगप्रवासाला निघाली होती. तिने आम्हाला विचारलं,’ तुम्ही इंडियनस् ना’?’. आम्ही ‘हो’ म्हटलं. आम्हाला वाटलं नेहमीप्रमाणे आमच्या कुंकवाच्या टिकल्यांवरून, पंजाबी ड्रेसवरून ओळखलं असावं. तेवढ्यात ती पुढे म्हणाली ‘I know, I know. All ladies are working and gents are sitting like this.’ असं म्हणून, सिटींगवर जोर देऊन, तिने बाहेर हॉलमध्ये आरामात गप्पा मारत बसलेल्या आमच्या पुरुष वर्गाची अशी झकास नक्कल केली की आम्ही आऽवासून पाहतच राहिलो. म्हणजे भारतीय पुरुषांची कीर्ती इतकी सर्वदूर पसरली आहे याची आम्हाला कल्पना नव्हती.”

“?? अगदी मर्मावर बोट ठेवले तिने!

” हो ना!तयार केलेले जेवण प्लेटमध्ये घेऊन आम्ही हॉलमध्ये आलो. हसत-हसत पुरुष वर्गाला तिची नक्कल करून दाखविली. पुरुषवर्ग गुळमुळीतपणे म्हणालाच की, ‘आम्ही तुमच्या पर्सेस सांभाळण्याचे महत्त्वाचे काम करीत होतो असे सांगायचे तिला!’.  पण तात्पुरता परिणाम मात्र झाला. जेवणानंतर सगळ्यांच्या डिश वगैरे पुरुषवर्गाने धुवून, पुसून ठेवल्या.

आत्मसंवाद भाग – २ समाप्त

 © सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares