मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘मन्मन’चे निरागस कर्मयोगी मनोहर गोखले… भाग – 1 ☆ श्री श्रीकांत कुलकर्णी ☆
मनमंजुषेतून
☆ ‘मन्मन’चे निरागस कर्मयोगी मनोहर गोखले… भाग - 1 ☆ श्री श्रीकांत कुलकर्णी ☆
आमचा सुहृद मित्र कै. दिलीप सत्तूर मला दरवर्षी आठवण करून द्यायचा “श्रीकांत, तळवलकर ट्रस्टच्या “अनुकरणीय उद्योजक” पारितोषिकासाठी तू ‘ मन्मन ‘च्या गोखल्यांचा विचार का करत नाहीस? एकदा त्यांना भेट. मन्मन उद्योग सदाशिव पेठेत मुलांच्या भावेस्कूल समोर आहे. तुला फार लांब नाही. फार वेगळे गृहस्थ आहेत. बघ एकदा त्यांच्याशी बोल आणि तुला योग्य वाटले तरच पारितोषिकासाठी विचार कर.” माझ्या डोक्यात अनेक नावे असत, त्यामुळे गोखल्यांचे नाव मागे पडत गेले. यंदा परत दिलीपने आठवण करून दिली आणि आग्रह देखील केला. तु गोखल्यांना एकदा भेटच तुमचा अनुकरणीय उद्योजकाचा शोध नक्की संपेल. फार अफलातून गृहस्थ आहेत. मी ठरवले, जाऊयात एकदा हा एव्हडा म्हणतोय तर. खरं म्हणजे सदाशिव पेठेत असा काही उद्योग असेल असे मनाला पटत नव्हते आणि असलाच तर असून असून किती मोठा असेल? असा प्रश्न मला उगीचच पडत होता. कदाचित म्हणूनच माझे पाय तिकडे वळत नव्हते. पण शेवटी मी ठरवले गोखल्यांना भेटायचे. दिलीपला विचारले तुझी ओळख देऊ का? तर दिलीप...