1

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ नानीची भांडी ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी

सुश्री तृप्ती कुलकर्णी

🍁 मनमंजुषेतून 🍁

☆ नानीची भांडी ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆ 

मी लहान असताना आमच्या शेजारच्या घरमालकीण (जिला सगळे नानी म्हणत) त्या माझ्या नानीची ही एक आठवण. एकंदरीत चार भाडेकरूंची मालकीण होती तरीही ती घरातली सगळी कामं स्वतःच करायची आणि ते ही अगदी आत्मीयतेनं. आपण शिकलो नाही पण मुलांना शिकवायचंय तर पैसा साठवायला हवा ही जाणीव तिला होती. शिवाय अजून एक गोष्ट म्हणजे नानीच्या मनासारखी स्वच्छता, टापटीपपणा दुसऱ्या कुणाला जमणं अवघडचं.  स्वच्छतेचं तिला व्यसन होतं असं म्हटलं तरी चालेल. याची छोटी झलक तिच्या भांडी घासण्यात दिसायची. 

रोज रात्री अंगणात गोष्टी ऐकायची आमची वेळ आणि भांडी घासण्याची नानीची वेळ एकच असायची. त्यामुळे गोष्टीला आपोआपच बॅकग्राऊंड म्युझिक मिळायचं. अजूनही ते दृश्य लख्खं आठवतं. रात्रीचं जेवण झालं की नानी भांड्यांचा ढिगारा घेऊन अंगणात यायची. ढिगाराच असायचा. कारण एक तर माणसं जास्त असायची आणि त्यात नानीचं शाकाहारी जेवण आणि इतरांचं मांसाहारी जेवण यांची भांडी वेगळी असायची. मागच्या अंगणात दोन सार्वजनिक नळ होते त्यातल्या एका नळावर नानीचं भांडी घासण्याचं काम चालायचं. नानी भांडी घासता घासता गोष्टीत रस दाखवायची आणि मी तिच्या भांडी घासण्यात. 

कधीकधी गोष्ट नसेल तर माझ्या आणि नानीच्या गप्पा सुरू व्हायच्या. नानीला बोलायला खूप लागायचं. ती मला बोलतं करायची. शाळेतली एखादी गोष्ट सांग, अभ्यास केला का सांग, किंवा अजून काही खेळातली गंमत, मैत्रिणीशी भांडण झालं असेल तर असं सगळं काही त्या भांडी घासण्याच्या कार्यक्रमात बोलणं व्हायचं. 

पण कधीकधी तिचा मूड नसायचा. तेव्हा मी विचारायचे… 

“नानी आज तू बोलत का नाही?” 

“दमले आज मी”.  

“मग मी करते ना तुला मदत”.  

“कशाला पुढं बाईच्या जन्माला हे करावं लागतंच. आतापासून नको. त्यापेक्षा तू श्टोरी सांग.”

आणि मग मी तिला गोष्ट सांगायचे. पण माझं लक्ष गोष्टीपेक्षा नानीच्या भांडी घासण्यात अधिक असायचं. एकंदरीतच ती ज्या पद्धतीनं भांडी घासायची ते पाहून असं वाटायचं नानीचा या भांड्यांवर खूप जीव आहे.

एखादा माणूस पूजा जेवढ्या भाविकतेनं करतो ना तसं नानी भांडी घासायची. पूजेचं कसं एक तबक असतं… त्यात फुलं-पत्री, हळद-कुंकू आणि पूजेचे इतर साहित्य ठेवलेलं असतं तसं नानींच भांडी घासण्याचं सामान एका ताटलीत नीट ठेवलेलं असायचं. (हा! नानीच्या कुठल्याही अशा सामानाला हात नाही लावायचा नाही तर मग काय खरं नसायचं.) नारळाच्या शेंड्या, भांडी घासायची राख, चिंचेचा कोळ, थोडं मिठ  आणि एका मोठ्या भांड्यात गरम पाणी. असा सगळा जामानिमा घेऊन, नानी त्या त्या भांड्यांना त्या त्या पद्धतीनं स्वच्छ करायची. कुठलं भांडं, कसं साफ करायचं, तसंच का साफ करायचं अशा माझ्या प्रश्नांच्या सरबत्तीला ती प्रेमानं तोंड द्यायची. आणि भांडी धुऊन झाली की त्यातलंच एक स्वच्छ ताट, मला देऊन म्हणायची,  

“बघ बरं, यात तुझा चेहरा सपष्ट दिसतो का?”

मी ते ताट हातात घेऊन चेहरा बघायचे आणि ‘हो’ म्हणायचे. मग नानीचा चेहरा खुलायचा. तेव्हा मला याची गंमत वाटायची. पण आज कळतंय तिला दिवसभराच्या श्रमाचं सार्थक झाल्यासारखं वाटत असेल. 

लॉकडाऊनच्या काळात भांडी घासताना नानीची नकळत आठवण आली तशी मी लहान होऊन पुन्हा नानीच्या अंगणात गेले. नानीशी आणि तिच्या भांड्यांशी संवाद साधू लागले.

भांडी

किती निगुतीने घासत असते बाई

आपल्या घरातली भांडी, 

ती भांडी म्हणजे केवळ वस्तू नसतात; 

तर त्या असतात घरातल्या माणसांच्या ‘तृप्ततेच्या खुणा’. 

म्हणूनच माणसांच्या तऱ्हांप्रमाणेच ती ओळखत असते भांड्यांच्या ही तऱ्हा. 

त्यांच्या नितळतेसाठी चांगल्यातला चांगला साबण आणि चरा पडू न देणारी घासणी वापरते.

खरकटं काढून, स्वच्छ आंघोळ घालून, सुगंधी साबणाने घासून, धुवून काढते.

आणि काही वेळासाठी का होईना पण त्यांना पालथं निजवते.

दूध, तेल, तूप, या स्निग्धता जपणाऱ्या भांड्यांवर तर खास जीव तिचा.

ऊन ऊन पाण्याने त्यांचे सर्व अंग शेकून त्यांच्या ओशटपणाचा थकवा ती घालवून टाकते.

इतकंच काय, तिला माहीत असतात तांब्या-पितळ्याच्या भांड्यांच्याही व्यथा.

म्हणूनच त्यांना हाताळताना ती बोटभर का होईना चिंच आणि मीठ यांनी त्यांची दृष्ट काढते. 

मग त्यांच्या तेजस्वी रुपाने स्वतः च झळाळून उठते. 

किती निगुतीने घासत असते बाई, 

आपल्या घरातली भांडी, 

जाणून त्यांच्या तऱ्हा.

 

©  सुश्री तृप्ती कुलकर्णी

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ हे सांगायला आमचीच पिढी कमी पडली ☆ संग्रहिका – प्रस्तुति – कालिंदी नवाथे

🍁 मनमंजुषेतून 🍁

☆ हे सांगायला आमचीच पिढी कमी पडली ☆ संग्रहिका – प्रस्तुति – कालिंदी नवाथे ☆ 

 

लग्न पूर्ण ठरेपर्यंत 

स्पर्शाचा गंधही नव्हता.. 

नुकत्याच ठरलेल्या लग्नाला 

स्पर्श मंद मंद स्पर्शत होता .. 

 

जातायेता वाऱ्याने उडलेला पदर

गुदगुल्या करायचा .. 

चहाच्या कपाची देवाणघेवाण

हळूच बोट धरायचा . 

 

रस्त्याने चालताना समोरून येणारी गाडी 

खांदा धरायला भाग पाडायची 

ती रुतलेली बोटं 

काळजापर्यंत भिडायची .. 

 

हॉटेलमध्ये समोरासमोर बसल्यावर

नजरेला नजर स्पर्श करायची .. 

टेबलाखाली लपलेली पावलंही 

अडसर दूर करुन पावलाला बिलगायची .. 

 

मोगऱ्याच्या गजऱ्याचा सुगंध

केसांनाही स्पर्शुन जायचा .. 

मानेवर ओघळलेल्या फुलाला नव्हे मानेला 

हात लावण्याचा मोह व्हायचा .. 

 

वाऱ्याने उडलेलं पान 

हळूच गालावर पडायचं .. 

पान सुकलेलं असलं तरी 

त्या दोघांच प्रेम हिरवगार  व्हायचं .. 

 

तरल कोमल अशा भावनांनाच 

स्पर्शाचं भान होत .. 

कळतनकळत एकरूप होण्याचं 

अनावर स्वप्न होतं .. 

 

हळूहळू जोपासलेल्या या नात्याला 

एकमेकांच्या संमतीची साथ होती .. 

नाती आयुष्य संपेपर्यंत टिकवण्याची 

ती अलिखित नियमावली होती .. 

 

हे सगळे पुन्हा आठवले 

आजकालचे स्पर्श पाहून .. 

नजाकत त्यातली संपली .. 

याने दाटून आले काहूर .. 

 

झटपट आयुष्यामधे 

नात्यात फक्त झटापट उरली .. 

प्रत्येक कृतीला भावनांची जोड हवी  

हे सांगायला आमचीच पिढी कमी पडली .. 

 

||  हे सांगायला आमचीच पिढी कमी पडली..||

 

अनामिक……

प्रस्तुति –  कालिंदी नवाथे 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आदरणीय टिळक,  आज तुम्ही हवे होतात … ☆ सौ. सुचित्रा पवार

सौ.सुचित्रा पवार

🍁 मनमंजुषेतून 🍁

☆ आदरणीय टिळकआज तुम्ही हवे होतात … ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

 महनीय,लोकमान्यजी टिळक 

         साष्टांग अभिवादन 

खरे तर आम्ही तुम्हाला पत्र लिहावे इतके आम्ही मोठे नाही,तुमच्याशी कोणती चर्चा करावी इतकेही समपातळीचे नाही तरीही ‘थोरांची ओळख ‘या इतिहासाच्या पुस्तकापासून आपली ओळख अन विचारांनी आम्ही प्रेरित झालो,तुमच्या जयंती पुण्यतिथीला त्याच पाठातून तुम्ही उच्चारलेली,”स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच !” या ब्रिटिश सरकारला दिलेल्या बाणेदार उत्तराने आमचे रोम रोम स्फुल्लींगले,” मी शेंगा खाल्ल्या नाहीत,टरफले उचलणार नाही अन कोणाचे नावही घेणार नाही ” हा परखडपणा नकळत आमच्याही अंगी आला ;आणि कित्येक भाषणाना वाहवा मिळवली ! आपण सुरु केलेली ‘मराठा,केसरी ‘ वर्तमान पत्रातून हिंदी जनतेत ब्रिटिशांविरुद्ध वाढवलेला असंतोष,तुरुंगातही गप्प न बसता लिहिलेला ‘गीतारहस्य ‘ हे सगळं तुमच्या अंगी कुणी बाणवले? आणि आजच्या पिढीत ते का नाही? हा प्रश्न वारंवार सतावतो.

देशास समर्पित सर्वच हुतात्मे, महान व्यक्तिमत्त्वे आणि देशभक्तांकडे पाहिले की वाटते,ही जाज्वल्यता ,प्रखर तेज आमच्याकडे का नाही? या प्रश्नाचे उत्तर खोलवर विचार केल्यावर सापडले.आम्ही खूप खुजे अन स्वार्थी आहोत,त्याग,संयम अन साधना या गोष्टी आमच्या आसपासही नाहीत.भारत माझा देश आहे…ही प्रतिज्ञा नुसतीच म्हणतो खरेच माझे माझ्या देशावर प्रेम आहे? आहे तर मग ही बेसुमार वृक्षतोड,वाळू उपसा,नद्या तलावावरील अतिक्रमणे,भ्रष्टाचार,लाच,हिंसाचार कुठून आले? काय स्वतंत्र देशाचे स्वप्न तुम्ही असे पाहिले होते? आणि आज तुम्ही असतात तर हे सहन केले असते? की कडक शासन करून फासावर लटकावले असते? तुमच्या जहाल विचारांची आज देशाला गरज आहे आणि म्हणून तुम्ही हवे होतात. आजची सरकारे तुम्ही कधीच उधळून लावली असतात आणि ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?’ असं सारखंच खडसावले असते !

जनजागृती करण्यासाठी आणि सामाजिक ऐक्यासाठी तुम्ही  गणेशोत्सव सार्वजनिक केला पण आज त्याचे रूप हिडीस,विकृत,ओंगळ झालेय. देवाचा मालकी हक्क अन कोपऱ्या कोपऱ्यात स्वतंत्र गणेश मंडळे,देणग्या,राजकारण अन टोकाच्या अस्मितेने,अहं भावनेने ही एकी कधीच बेचिराख झालीय ! 

आम्हाला थोरामोठ्यांनी केलेल्या बलीदानाविषयी,त्यागाविषयी कृतद्न्यता नाही,प्रेम आदर तर नाहीच नाही कारण आजचे शिक्षण फक्त पैसे कसे मिळवायचे अन ऐश आरामात कसे रहायचे? याचे शिक्षण तासून,घासून देते असे गुळगुळीत गोटे मग पुढच्या पिढीला अजून गुळगुळीत बनवून घरंगळत जायला भाग पाडतात,माणूस म्हणून कसे जगायचे? देशप्रेम,राष्ट्रवाद या गोष्टी त्यांच्यासाठी मूर्खपणा आहे,यातून काय मिळणार? हाच वयवहार ते शिकत आलेत.

केवळ जयंती,पुण्यतिथी करून का कुणी मोठे झालेय? त्यासाठी आदर्श तत्वे अंगी बाणवायला हवीत अन आचरणातही आणायला हवीत पण खरे दुःख तर इथेच आहे आजच्या पिढीपुढे आदर्शच नाहीत ! मनोरंजनाचे आकडे करोडो च्या घरात असतात अन उपाशी माणसाच्या भुकेला भाकरीचा गोल सापडत नाही,ही प्रचंड लोकसंख्या का वाढली? याचे उत्तर आहे,प्रत्येकाला देशापेक्षा स्वहित अन स्वार्थ महत्त्वाचा वाटतो.

तंत्रज्ञानाने देश जवळ आले, पाश्चात्त्य देशातील नको ते आम्ही स्वीकारले पण त्यांच्या देशप्रेम,स्वच्छता,शिस्त याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले.

देशातील स्वातंत्र्याचा असा स्वैराचार तुम्हाला खपला असता? नाही ना? तुम्ही हाकलून लावले असते अशा कृतघ्ननाना ! 

म्हणूनच तुम्ही हवे आहात पुन्हा एकदा देश प्रेमाचा धडा शिकवायला अन सार्वजनिक गणेशोत्सव बंद करायला,देशास वळण लावायला अन मूळ सुजलाम,सुफलाम रूप द्यायला !

© सौ.सुचित्रा पवार

तासगाव, सांगली

8055690240

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ नैवेद्यम समर्पयामि ….! – डॉ.सौ.सुमेधा आपटे-रानडे ☆ संग्रहिका – श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

श्रीमती मीनाक्षी सरदेसाई 

🍁 मनमंजुषेतून 🍁

☆ नैवेद्यम समर्पयामि ….! – डॉ.सौ.सुमेधा आपटे-रानडे ☆ प्रस्तुती – श्रीमती मीनाक्षी सरदेसाई ☆

नैवेद्यम समर्पयामि ….|’

एरवी आपल्या सण परंपरेला न मानणारी मंडळी,’आखाडी’ so called ‘गटारी’ अगदी न चुकता साजरी करतात. असा थोडासा ‘broad minded’ विचार आपल्या सर्व सणांच्या बाबतीत झाला तर,किती छान होईल ना..!!आता हेच बघा ना,श्रावण सुरु होतोय,पाठोपाठ गणपती,नवरात्र,दिवाळी अशी सणांची रांगच लागते. या सगळ्यात महत्वाचा असतो तो ‘नैवेद्य’.. फक्त देवाला दाखवायला लागतो म्हणून असतो का हा ‘नैवेद्य?’.. नाही,खरतरं या ‘नैवेद्य’ करण्यामागे अनेक गोष्टींची योजना आपल्या परंपरेत आहे.

माझ्या मैत्रीणी यावर म्हणतील “काहीही हं,तो नैवेद्य करायचा म्हणजे एक event च असतो बाई!! सरळ ऑर्डर देऊन करुन आणतो”..

पण,मैत्रीणिंनो,आपल्या संस्कृतीत नैवेद्याला अनन्यसाधारण महत्व आहे. देवाला अन्नस्वरुपात अर्पण केलेला ‘नैवेद्य’ आपण प्रसाद म्हणून खातो. ऋतू नुसार सण व त्या सणांचे व देवांचे विशिष्ठ नैवेद्य हे ठरलेले असतात. ह्याचा संबंध नैवेद्य-आरोग्य असा १००% आहेच. पण माझ्यामते घरात ‘स्वतः नैवेद्य बनवणे’ ही एक आपल्या संस्कृतीने आपल्यातील चांगल्या Qualities निर्माण करण्यासाठी दिलेली activity वाटते मला. कशी काय?..बघा

१. नैवेद्य करताना अगदी सोवळ्यांत नसलं तरी शुचिर्भूत होऊन नैवेद्य करावा लागतो. इथे Hygiene आलं.

२. नैवेद्याला काय काय लागेल ते पक्क माहिती असावं लागतं, पदार्थांचे प्रमाण काटेकोर ठेवावे लागते, कारण चव पहायची मुभा नसते.  नैवेद्य हा ठराविक वेळेतच तयार करावा लागतो..Accuracy and Time management 

३. नैवेद्य करताना करणाऱ्यांना खायची मुभा नसतेच, पण घरातल्या इतर मंडळींनाही स्वतः च्या मनावर प्रचंड ताबा ठेवावा लागतो. फोडणीचे खमंग वास,पुरणपोळीचा खरपूस वास रसनेंद्रियास उत्तेजित करत असताना हा control खूप काही शिकवून जातो..कारण नैवेद्य दाखविल्याशिवाय खायचे नाही हा दंडक आहे ना! बघा ‘संयम'(Patience,self restraint) हा अत्यंत महत्वाचा गुण नैवेद्याने  develop होतो. जो आजकाल खूप कमी होत चाललाय.

४. नैवेद्य हा नेहमी सात्विक, सुंदर च होतो. कारण करणाऱ्याने अत्यंत मनापासून, एकाग्रतेने,‌ श्रध्देने तो बनवलेला असतो. Concentration, devotion झालं ना develop..

५. नैवेद्याचे ताट वाढताना ते सुध्दा एक ठराविक पध्दतीने वाढले जाते. डावी-उजवी बाजू नीटनेटकेपणाने वाढणे हे कोणत्या कलेपेक्षा कमी नाही. ताटाच्या बाजूला रांगोळी साक्षात कलाविष्कार!!

६. नैवेद्यातून आरोग्य जपल्या जातंच कारणं तो सर्व रसात्मक,भक्ष्य,भोज्य,चूष्य,लेह्य या स्वरुपातील ही असतो. नैवेद्य दाखवताना आपण जे “ॐ प्राणाय स्वाहा,ॐअपानाय स्वाहा…’ हे म्हणतो,ते काय आहे? तर प्राण,अपान,उदान,व्यान,समान हे शरीरातील कार्यकारी वायू आहेत,ते त्या अन्नाचे ग्रहण,पचन,अभिसारण,उत्सर्जन करण्यास आपल्याला सहाय्यभूत ठरतात. त्यांचे स्मरण करुन देवाला नैवेद्य दाखवल्या जातो.

अर्थात,मैत्रीणींनो विकत,आयता आणून दाखवलेला नैवेद्य हे सगळे skills, qualities आपल्यात कसे बरे develop करेल?? but,i know नैवेद्य करायला वेळ कुठाय?? हो,ना? मग,सगळं ताट नको निदान त्यांतील एकतरी पदार्थ ‘नैवेद्य’ म्हणून करायला काय हरकत आहे? साधी खिर करा पण स्वतः करा. आपल्या छोट्यांना शाळेत Activities देऊन वेगवेगळी skills develop केली जातात. पण आपली संस्कृती ही आपल्याला असे task देत असते. तिचा आपण आपल्यातील qualities improve करण्यासाठी नक्कीच उपयोग केला पाहिजे..मग बघा ‘नैवेद्यम समर्पयामि|’ असे म्हणताना किती समाधान होईल..

– डॉ. सौ. सुमेधा आपटे-रानडे

संग्रहिका:  श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

सांगली

मो. – 8806955070

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आईचा खिसा…केदार साखरदांडे ☆ प्रस्तुती – श्री विनय माधव गोखले

🍁 मनमंजुषेतून 🍁

☆ आईचा खिसा…केदार साखरदांडे ☆ प्रस्तुती – श्री विनय माधव गोखले ☆ 

मला लहानपणी नेहेमी प्रश्न पडायचा की बाबांना कसा खिसा असतो. त्यात ते पेन , सुट्टी नाणी, कधी कधी बंद्या नोटा ठेवतात. तसा आईला खिसा का नसतो. शाळेची फी भरताना बाबा कसे ऐटीत खिश्यातून काढून फी साठी पैसे देतात , किंवा प्रगति पुस्तकावर खिश्यातल पेन काढून ऐटीत सही करतात. तसा आई जवळ खिसा का नसतो. आणि जर असलाच खिसा तर नेमका कुठे असतो. आईला विचारलं तर ती फक्त हसायची. तुला भूक लागली असेल ना अस म्हणून पदर खोचून शिऱ्या साठी रवा भाजायला घ्यायची . त्या रवा  भाजण्याच्या वासावर भुकेशिवाय दुसरं काही सुचत नसे. एकदा खेळताना पडल्यावर पायाची जखम पुसायला कापसाचा बोळा मिळाला नाही म्हणून चक्क कॉटन च्या नव्या साडीच्या टोकाने  माझी जखम पुसून काढली आणि  कपाटातील कैलास जीवन काढून त्यातलं लोण्याच्या गोळ्या सारख मलम माझ्या जखमेवर लावलं. मला रात्री लवकर झोप यायची तेंव्हा घरातली काम लगबगीने आवरून ती तिच्या जुन्या साडीचा काठ घडी करून मला दिव्याच्या उजेडाने  त्रास होऊ नये म्हणून डोळ्यावर मांडायची आणि मला त्या साडी सारखीचं अगदी तलम निद्रा यायची. कुठे बाहेर जाताना बाबा खिशातून पैसे काढून रेल्वेची तिकीट काढायचे आणि आई मात्र खिडकीतून झो झो येणारा वारा माझ्या कानाला बसतो म्हणून माझ्या काना केसां भोवती आपला पदर गुंडाळून घ्यायची. तेंव्हाही माझं लक्ष खिडकीतल्या बाहेरच्या दृश्या बरोबर बाबांच्या खिश्या कडे असायचं. मोठा झाल्यावर मी सुद्धा बाबांसारखा खिसा शिवून घेऊन त्यात वेगवेगळ्या वस्तू ठेवणार हे ठरवून ठेवले होते. नेमकी तेंव्हाच आई पदराच्या टोकाला गुंडाळून ठेवलेली गोळी (मला तहान लागली असताना) हळूच माझ्या जिभेवर ठेवायची. तृषा पूर्ण शांत व्हायची. कधी खेळताना सर्व मुलं बॉल आणण्यासाठी वर्गणी काढत अश्यावेळी आई तिच्या पदरात बांधलेला रुपया दोन रुपया काढून देत असे आणि वर रुपया देऊन उन्ह फार आहेत पेपरमिंट खा चघळायला म्हणून सांगत असे. मित्र म्हणत तुझी आई खूप छान आहे रे तेंव्हा कॉलर टाईट होत असे. आईकडे खिसा नसताना बाबापेक्षा जास्त गोष्टी तिच्या कडे कश्या हा प्रश्न मला मला थोडा मोठा होता  होताना पडू लागला. आणि एक दिवस मला माझंच उत्तर सापडून गेलं. आईकडे खिसा असतो आणि त्या खिश्याला चौकट नसते तो आईचा पदर असतो जो कायम मुलांसाठी सुखं बांधून ठेवत असतो आणि तोच आईचा कधीही न रिक्त होणारा खिसा असतो .

 – केदार अनंत साखरदांडे

प्रस्तुती – श्री विनय माधव गोखले

भ्रमणध्वनी – 09890028667

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ बाबासाहेब पुरंदरे….. एक आठवण ☆ श्री विजय गावडे

श्री विजय गावडे

🍁 मनमंजुषेतून 🍁

☆ बाबासाहेब पुरंदरे….. एक आठवण  ☆ श्री विजय गावडे ☆  

ज्यांचे पूर्ण जीवन शिवशाहीमय झालंय त्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेना मानाचा मुजरा.

साधारण विसेक वर्षांपूर्वीचा काळ. असेच पावसाळ्याचे दिवस होते. धो धो सरी कोसळत होत्या. पाय मात्र दादरच्या राजा शिवाजी विद्यालयच्या दिशेने चालत होते. आज शिवशाहीरांच व्याख्यान होणार होतं. विषय होता ‘महाराजांची Time Management ‘ प्रमुख पाहुणे होते रिझर्व बँकेचे त्या वेळचे संचालक डॉ. नरेंद्र जाधव.

राजा शिवाजी विद्यालय सभागृह तुडुंब भरलेलं. ओल्या अंगानिशी लोक मिळेल तिथे स्तब्ध. ज्यांना जागा मिळाली नव्हती ते उभे होते. सभागृहात प्रवेश न मिळालेले कमी भाग्यवान क्लोज्ड सर्किट टीव्ही वर समाधानी होते.

महाराजांच्या Time Management वर बोलणारे बाबासाहेब स्वतःही दिलेल्या वेळेच्या अगोदर हजर होते. मात्र पावसामुळे झालेल्या वाहन कोंडीत अडकलेले डॉ. नरेंद्र जाधव मात्र थोडे उशिरा पोहोचले. आपणांस झालेल्या उशिराबद्धल त्यांनी शिवशाहीरांशी दिलगिरी व्यक्त केलेली दिसली.

पावसाच्या पाण्याने तुडुंब झालेल्या जलाशयाप्रमाणेच ओसंडून वाहणाऱ्या सभागृहामध्ये शांतता पसरली आणि शिवशाहीरांची ओघवती वाणी बरसु लागली.

“ वेडात मराठे वीर दौडले सात “ या गीतात वर्णिलेली प्रतापराव गुजर आणि मंडळीची ती अंगावर शहारे आणणारी गोष्ट कथन करतांना शिवशाहीर तल्लीन झालेले आणि एक एक पदर तारखानीशी उलगडून दाखवताना त्यांच्या वाणीला चढत जाणारी धार श्रोत्यांना शिवकाळात घेउन जाणारी. 

बाबासाहेबांच्या वाणीतून तो प्रसंग तर जीवन्त झालाच परंतु वेळेच्या काटेकोर अंमल बजावणीविना प्रतापराव आणि मंडळींना महाराजांच्या खपामर्जीला कसे बळी पडावे लागले हे शिवशाहीरांच्या तोंडून ऐकण्याचे भाग्य आम्हाला त्या दिवशी लाभले.

सम्पूर्ण आयुष्य शिवशाही आणि छत्रीय कुलवतन्स छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भोवतीच ज्यांनी खर्ची घातलं त्या या महाराष्ट्र भूषण ऋषीतुल्य व्यक्तीमत्वाला शम्भराव्या वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

© श्री विजय गावडे

कांदिवली, मुंबई 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ गुडमाॅर्निंग… ☆ सौ. श्रेया सुनील दिवेकर

💐 मनमंजुषेतून 💐

☆  गुडमाॅर्निंग… ☆ सौ. श्रेया सुनील दिवेकर ☆ 

Good morning

सुप्रभात!!! काय बरे आहात ना सगळे, किंवा एखादा सुंदर पुष्पगुच्छ, किलबिलाट करणार्‍या पक्ष्यांचे चित्र, कोणता तरी उपदेश देणारा संदेश, नाहीतर एखादा motivational संदेश असे अनेक संदेश टिंग टिंग करत पडायला लागतात ना सकाळी सकाळी आपला मोबाईल ऑन केल्यानंतर?

पूर्वी ना… मला ह्या गुड मॉर्निंगची फार गंमत वाटायची. आणि रागही यायचा. असं वाटायचे की काय मिळतय लोकांना रोज hii, good morning, good night असे मेसेजीस टाकून? आणि हे टाकले नाहीत तर काय आपण लगेच disconnect होतो की काय त्यांच्या पासून? आणि आश्चर्यही वाटायच की त्यांना एवढा वेळ मिळतोय तरी कुठून ? ते ही सकाळी सकाळी. काहीजणांचा तर पहाटे पाच वाजल्यापासून हा गुड मॉर्निंग संदेश देण्याचा कार्यक्रम चालू होतो. 

इथ दोन घोट चहा निवांत बसुन प्यावा म्हणलं तर पाच मिनिटं नसतात. कधी बसलेच तर लगेच नवर्‍याची तरी हाक येते किंवा मुलांना काहीतरी सापडत नसतं, सासुबाईंना त्याचवेळी साखरेच्या डब्यातून साखर काढून हवी असते, आणि हे कमी की काय म्हणून अगदी त्याच वेळी भाजीवाले मामा दारात हजर. मग काय नाखूषीने का होईना उठावच लागत. 

आज हे सगळं तुमच्याशी शेअर करावसं वाटलं कारण, घडलं ही तसंच आहे. माझी एक मैत्रीण आहे ती मला रोज न चुकता सुप्रभात!!! चा संदेश टाकायची. भले मी त्याला रीप्लाय देवो नाही तर नाही. खरं सांगायच तर कधीतरी दुपारी मी तो पहात होते आणि कधी वाटले तर hii किंवा एखादी smile टाकत होते. काहीवेळा तेही नाही. आमच्यात नेहमी ह्यावरून वादही व्हायचा. अर्थात वाद फोन वरूनच व्हायचा, कारण ती दिल्लीत आणि मी मिरजेत. मी नेहमी तिला विचारत होते काय गं.. एखादा दिवस नाही टाकला मेसेज तर काय आपली मैत्री टिकणार नाही, मैत्री संपणार की काय ?? 

हा वाद आमच्यात घडलेल्या दुसर्‍याच दिवसापासून तिचे सुप्रभात मेसेज यायचे बंद झाले. मला वाटलं माझ्या बोलण्याचा उपयोग झाला वाटत. चला बर झालं उगीच वेळ वाया घालवत होती. पण खर सांगते असेच तीन चार दिवस गेले आणि मलाच चुकल्यासारखे वाटू लागले. I was missing Something in the morning. आणि पाचव्या दिवशी मात्र असे वाटले की का टाकत नसेल ती मेसेज ? एवढ मनावर घेतलं असेल का तिने माझं बोलणं? का आजारी असेल, किंवा एखाद्या संकटात तरी सापडली नसेल ना?

वाट पाहून मीच दुसरे दिवशी तिला फोन केला तेव्हा तिचे मिस्टर फोनवर ओक्साबोक्शी रडत होते. तिला massive heart attack आला होता आणि ती हॉस्पिटल मधे अ‍ॅडमिट होती. हे ऐकून मला धक्काच बसला. पाच दिवसांपूर्वी जिच्याशी मी वाद घातला ती आज मरणाशी लढत होती आणि तिचे ऑपरेशन करायचे ठरले होते.

जेव्हा आमच्यात वाद होई तेव्हा ती मला नेहमी म्हणायची it’s a connecting wavelength between two people. कळेल तुला एक दिवस पण तो एक दिवस असा येईल अस मला स्वप्नात ही वाटलं नव्हतं.

त्या दिवसापासून मी रोज सकाळी तिला न चुकता सुप्रभात!!! चा मेसेज टाकू लागले. आणि जेव्हा एक महिन्यानंतर माझ्या सुप्रभात वर तिचा smiley पडला तेव्हा माझा दिवस खरा गुड ठरला.

आणि तेव्हा कळले की अंधारा कडून प्रकाशाकडे केलेली वाटचाल म्हणजे सुप्रभात!!!

आपल्या मित्र मैत्रिणींकडून मिळालेली एक संजीवनी म्हणजे सुप्रभात!!! 

आपलं कोणी आहे ह्याची जाणीव म्हणजे सुप्रभात!!!

प्रत्येक वेळी आपण मनांत आलं की फोन करू शकतोच असं नाही .पण हा एक गुड मॉर्निंगचा मेसेज मात्र नकळत आपण सुखरूप असल्याची पावती देऊन जातो. 

A connecting wavelength between two people

सहज मनाच्या कोपऱ्यातून ☺️

©  सौ. श्रेया सुनील दिवेकर

मो 9423566278

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
मराठी साहित्य –  मनमंजुषेतून  ☆ ☆ सर्वम् जगदिदम् त्वयि प्रत्येति ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

🍁 मनमंजुषेतून 🍁

☆ सर्वम् जगदिदम् त्वयि प्रत्येति ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

२००० साली आमचा मुलगा सून- सतीश सुप्रिया- सतेजसह मिनीयापोलिस इथे होती. अमेरिका पहायला जायचं मनात होतं. व्हिसाही  मिळाला होता. पण गणेशोत्सव जवळ आला होता. आणि सासुबाईंनी नेहमीच्या समजूतदारपणे अमेरिकेत गणपती साजरा करण्याची परवानगी दिली. मग तयारीची धांदल उडाली. श्रींची मूर्ती इथूनच नेण्याचे ठरले. पण ‘केसरी’ने त्यांच्या पूर्वीच्या  अनुभवावरून बजावून सांगितले होते की, गणपतीची मूर्ती बॅगेत ठेवू नका. कितीही चांगलं पॅकिंग केलं तरी एवढ्या प्रवासानंतर मूर्तीला काही झालं तर आपला विरस होतो. म्हणून माझ्या खांद्यावरच्या मोठ्या पर्समध्ये राहील अशी मध्यम आकाराची मूर्ती व्यवस्थित पॅक करून घेतली. मुंबई- न्यूयार्क व पुढे पंधरा दिवस पूर्व-पश्चिम-पूर्व अमेरिका दर्शन  असा श्री गणेशाच्या साथीने प्रवास करून मिनीयापोलिसला पोहोचलो. खूप आधीपासून  आणलेली मूर्ती सुखरूप होती हे पाहून फार बरे वाटले.

घराभोवती सुरेख हिरवळ आणि हरतऱ्हेच्या फुलांनी सजलेली बाग बघून माझे डोळे चमकले. सतीशने लगेच बजावले, ‘ इथल्या कुठल्याही फुलालाच काय पण पानालाही हात लावायचा नाही. मी तुम्हाला डिपार्टमेंटल स्टोअर्समध्ये घेऊन जाईन. तिथे सारे काही मिळते.”  गणपतीसाठी बहुतेक सर्व तयारी मुंबईहूनच  करून आणली होती. अभिषेकासाठी चांदी-पितळेची छोटी मूर्ती तेवढी आणायची राहिली होती. डेकोरेशनचे मनाजोगते सामान ,फळे , फुले आणि एक डॉलरला नारळसुद्धा त्या स्टोरमध्ये मिळाला.. यांनी स्वतःच पुस्तकावरून श्री गणेशाची यथासांग प्रतिष्ठापना केली.  डिस्नेलॅ॑डमध्ये एका स्टॉलवर सुंदर रंगीत दगड विकायला ठेवलेले दिसले. त्यातला लाल रंगाचा, गणपतीच्या आकाराचा भासणारा, नर्मदा गणपती खरेदी केला होता, त्याचीच  गणपतीच्या मूर्तीबरोबर पूजा करून त्यावरच आवर्तनांचा अभिषेक करत होतो. तिथल्या काही परिचितांना सहकुटुंब बोलावले होते. पूजा, आरती, नैवेद्य सर्व यथासांग झाले. शेजाऱ्यांना त्रास नको म्हणून झांजा न वाजवता टाळ्या वाजवून आरती झाली. एसीमधून उदबत्तीचा जास्त सुगंध जाऊ नये म्हणून साध्या उदबत्या लावल्या. आदल्या दिवशीच गुलाबजाम व तळलेल्या करंज्या मोदक करून ठेवले होते. भरगच्च मेन्यू होता. सर्वजण गणपती, आरती, प्रसाद यावर खुश होती. आम्हालाही मुंबईसारखेच सगळे साग्रसंगीत झाल्याने आनंद झाला होता.

दोन दिवसांनी सतीशच्या ऑफिसमधील आठ नऊजणं रात्री गणपतीला जेवायला येणार होते.  संध्याकाळीच स्वयंपाक करून ठेवला.  आरतीही करून घेतली. पण पाहुणे विचारायला लागले, ‘ऑंटी, आरती कभी करेंगे?’  आरती झाल्याचे सांगितल्यावर ते म्हणाले,’नही नही .ऐसे कैसे हो गया? हमे तो आरती, पूजा सब देखना है. करना है. कितने बरस के बाद ये सब देखने का मौका मिला है.’– मग पुन्हा एकदा साग्रसंगीत आरती झाली. आमचा नातू आश्चर्य वाटून म्हणाला की, ‘आजी, आपण उद्याची आरतीसुद्धा आजच करीत आहोत का?’— ठिकाण आणि पाहुणे दरवर्षीपेक्षा वेगळे पण आनंद, मानसिक समाधान तेच!

मिनीआपोलिसला मिनेसोटा नदी मिसिसिपीला मिळते. मिनीयापोलिस व सेंट पॉल ही जुळी शहरे मिळून तिथे पाण्याने भरलेले अनेक मोठे तलाव आहेत. लोक मजेने स्वतःच्या बोटीतून फिरत असतात. आत्ममग्न, उच्चभ्रू लोकांचे हे शहर आहे. फक्त डाऊन टाऊनमध्ये उंच टॉवर्स आहेत. बाकी सगळीकडे शोभिवंत, टुमदार बंगले. निगुतीने राखलेली रंगीबेरंगी फुले, झोपाळे ,छोटी कारंजी व निवांत लोक. तलावांशी पोचणाऱ्या शांत स्वच्छ वाटा! विसर्जनाच्या वेळी बाप्पांना घातलेले सर्व वस्त्रालंकार, फुले घरीच उतरवून, छानपैकी मॅक्झीमा गाडीतून  श्री गणेशांसह सिडार लेकवर गेलो  आणि अभिषेकाच्या ‘नर्मदा’ गणेशासह शांतपणे विसर्जन केले. दरवर्षीप्रमाणे एक प्रकारच्या हुरहुरीने, समाधानाने मन भरून आले.

दोन दिवसांनी सॅनहोजेला आमच्या  भाच्याकडे गेलो. तिथेही सनीवेल  इथे साजरा होणारा गणेशोत्सव पहायला मिळाला. गणेश चतुर्थीला श्रींची प्रतिष्ठापना, पूजा आरती यथासांग करतात. पेणहून खास मूर्ती नेली जाते. सर्वांना सोयीचे जावे म्हणून गणपतीत येणाऱ्या  शनिवार-रविवारी भरपूर कार्यक्रम ठेवले जातात. आम्ही गेलो तेंव्हा रविवारी सर्वांसाठी मोदकांचे साग्रसंगीत जेवण होते. आधीच  नोंदणी केलेले लेंगे-झब्बे–त्यावर जाकिटे किंवा रंगीबेरंगी उपरणी घालून लहान मोठे सारे पुरुष हजर होते. बायका ठेवणीतले शालू पैठणी नेसून, नटून सजून उत्साहाने वावरत होत्या. लहान मुलांनी सादर केलेले श्लोक ,नाच-गाणी असा कार्यक्रम चालला होता, वेगवेगळ्या स्पर्धा घेतल्या होत्या. रांगोळ्या, समया आणि फुलांच्या आराशीत गणेशाची प्रसन्न मूर्ती विराजमान होती. अगदी आपल्यासारखीच  थोडी गडबड आणि गोंधळ होताच. क्षणभर आपण अमेरिकेत आहोत की भारतात असा संभ्रम पडला.  आपली तरुण हुशार पिढी स्वकर्तृत्वाने, कष्ट करून या परदेशात उभी आहे–उत्साहाने आपले उत्सव साजरे करून मनातले काही टिकविण्याचा प्रयत्न करीत आहे म्हणून कौतुक वाटले — आणि प्रकर्षाने जाणवले की —-श्री ज्ञानेश्वरांनी वर्णिलेला ‘विश्वात्मक देव’ इथे आपल्या देशात काय आणि सातासमुद्रापलिकडे काय —एकच !— त्यामागची मनातली भावना महत्त्वाची !

 

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
मराठी साहित्य – मनमंजुषेतून  ☆ प्राजक्त… ☆ सुश्री नीलाम्बरी शिर्के

सुश्री नीलाम्बरी शिर्के

🍁 मनमंजुषेतून 🍁

प्राजक्त… ☆ सुश्री नीलाम्बरी शिर्के ☆ 

माझ्या अंगणात आपसूक आले होते एक प्राजक्ताचे झाड. पहिल्यांदा मला त्याच्या पानाचा खरखरीतपणाच लक्षात आला. नंतर तो बोचूही लागला.  पण त्याचे औषधी गुण जाणल्याने मी ते सहन करू लागले.  हळुहळु  त्याला नाजुक फुलेही आली. वासही मंदमंद असा— मनाला चित्ताला प्रसन्नता देणारा. मी फुलांच्या सौंदर्य व सुगंधात गुंतले. नंतर लक्ष गेल तर झाडाची भली मोठी फांदी कुंपणापलीकडे वाढत जाऊन बहरलेली. रोज तिकडे फुलांचा सडा नजरेला दिसायचा.  गंधाचे झोत वारा इकडे तिकडे उधळायचा.  माझी फुले माझी, पण पलिकडची पखरणही माझ्याच मालकीहक्काची होती ना ? पण तक्रार  केली तर “ तुला कमी पडताहेत का फुलं ?मग गप्प  बस की “ असं  उत्तर  मिळालं  .या उत्तरातून मला शापच मिळाला जणू– माझ्याकडची फुलं मला प्रसन्न  करायला असफल होऊ लागली.—-आणि पलिकडची फुल अस्वस्थता देऊ लागली.  पलीकडे जाणारी फांदी तोडण्याचा अयशस्वी प्रयोगही केला ,कारण  ते माझ्या ताकदीबाहेरचं  काम हे माझ्या लक्षात आलं,  अन खरखरीत  पानं  जास्तच खरखरीत वाटू लागली.  

©  सुश्री नीलांबरी शिर्के

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आली गौराई अंगणी ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

🍁 मनमंजुषेतून 🍁

☆ आली गौराई अंगणी ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

आली गौराई अंगणी

रुणझुणत्या पाखरा, जारे माझ्या माहेरा, आली गौराई अंगणी, तिला लिंबलोण करा’ गाणं गुणगुणतच आपण मोठं झालो हे आता आठवते.गौराई येते ती अशीच आनंदात, उत्साहात! त्या माहेरवाशिणीचं किती कौतुक करू असं वाटतं!

लहानपणी निसर्गाच्या सान्निध्यात फुले, पत्री गोळा करताना खूप आनंद उत्साह असे.माझ्या माहेरी गौर बसवायची पद्धत नव्हती, तरी मी माझ्या मैत्रीण सह त्यांच्या आनंदात सहभागी होत असे.

सासरच्या घरी आल्यावर मात्र गौरी गणपतीचा आनंद खूप मिळाला सांगली ला कृष्णा नदीच्या  जवळच आमचे घर असल्याने गौर आणायला मी सासुबाईं बरोबर नदीवर गेले होते. त्यांनी मला गौरी ची सगळी तयारी करायला शिकवले. आम्ही वाड्यातील शेजारणीं बरोबर नटून थटून नदीवर जाऊन गौरी घेऊन आलो. छोटासा गडू, त्यावर ठेवायला ताटली, गौरीची पानं,(तेरड्याची पाने) हळद कुंकू, फुलं सर्व घेऊन पाणवठ्यावर गेलो. तिथे गडूत थोडसं पाणी, त्यावरच्या ताटलीत पाच खडे ठेवून त्याची पूजा केली. हळद कुंकू,वस्त्र, फुल वाहिले. तिथून येताना तोंडात जवळ घेऊन तसंच यायचं, मागं वळून पहायचं नाही, असे काही काही रितीभाती चे नियम मला शिकायला मिळाले. घरी आलं की दारातच ती पाण्याची चूळ बाहेर टाकायची. आणि   त्या गौरीला ओवाळून पायावर दूध-पाणी घालून घरात घेतलं जाई. घरात आलं की प्रत्येक खोलीत गौरीसह जायचं. तिथे जाऊन ‘इथे काय आहे? या प्रश्नाला’ उदंड आहे!’ असं उत्तर द्यायचं! अशी ही सोन्याच्या पावली येणारी गौर गणपतीच्या जवळ आणून बसवायची!ते झाल्यानंतर गौरी आणणारीची ओटी भरायची हे सर्व छान साजरे केले जायचे. नवीन साड्या, दाग दागिने घालून मिरवत मिरवत नवीन सुनेकडून गौर आणण्याचा आनंद काही वेगळाच असे.

गौरी आणल्या की रात्री गौरीला भाजी-भाकरीचा नैवेद्य असे. दुसऱ्या दिवशी  गौरी जेवणाची तयारी आधीच केली जाई. गौरी जेवणाच्या दिवशी बायकांची धावपळ असे.एकमेकीकडे पाठशिवणी दिल्यासारख्या सवाष्ण म्हणून बायका जात असत. ते सर्व एकमेकीच्या सोईने केले जाई. एकदाचे गौरी जेवण झाले की संध्याकाळच्या हळदी कुंकवाची तयारी करायची. संध्याकाळी आसपासच्या घरातून हळदी कुंकू घेऊन यायचे आणि आपल्या घरी बायका ना हळदीकुंकवासाठी बोलवायचे. अशी धावपळ असायची, पण त्यातही खूप मोठा आनंद मिळत असे. कदाचित संस्काराचा परिणाम असेल पण हे सर्व आवडत होते. काळाबरोबर आता थोडे बदल करायलाच हवेत. आपल्या पुढच्या पिढीला नोकरी, व्यवसाय यातून वेळ काढून सर्व करणे अवघड जाते तरीही त्या हौसेने जमेल तितके करतात याचे कौतुक वाटते.

एकदा  का गौरी जेवणाचा दिवस झाला की, गौरी-गणपती जाणार म्हणून मनाला हुरहुर लागत असे. गौरी गणपतीचे पाच-सहा दिवस इतके धामधुमीत उत्साहात जात की खरोखरच घरी  पाहुणे आल्यासारखे वाटे. त्या पाहुण्यांना निरोप देताना मनापासून वाईट वाटे. नेहमीप्रमाणे गौरी, गणपती घेऊन विसर्जनाला गेले की मन भरून येते! निरोप देताना दही भात, तळलेले मोदक, करंजी यांची शिदोरी गणपती, गौरीसाठी दिली जाई. तिथून येताना पाण्या जवळची थोडीशी माती, खडे बरोबर घेऊन यायचे आणि ते गौरी गणपतीच्या रिकाम्या जागी ठेवायचे! एकदम रिकामी जागा नको म्हणून तिथे एखादे देवाचे पुस्तक ठेवायची आमच्याकडे प्रथा होती. गणपतीचा हा सगळा सोहळा आनंददायी केला जाई.

कितीही संकटे आली तरी आपण ती बाजूला सारून या उत्सवाला आनंदाने सामोरे जातो.

शेवटी ते संकट दूर करणारा विघ्नहर्ता गजाननच आहे याची आपल्याला खात्री असते.

आता ही आलेली वादळे, कोरोना आणि इतर संकटे दूर करून गणपती आपल्याला चांगले दिवस दाखवून देईल ही मनाची खात्री आहे. गौरी गणपती कडे एवढेच मनापासून मागणी आहे!

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈