☆ ‘माझी शिदोरी…’ भाग-२ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित ☆
बुधवारातली खाऊगल्ली- –
या परिसराचं प्रमुख आकर्षण म्हणजे ‘ बुवा आईस्क्रीमवाले ‘ मधुर, मुलायम चवीचं असं सुंदर आईस्क्रीम, आम्हा मुलांच जीव की प्राण असलेल्या या दुकानाचे नांव ‘बुवा’ कां ठेवले असेल? हे कोडं सोडवणं आमच्या बुद्धी पलीकडचं काम होत. आमच्यात तशी खूप चर्चाही व्हायची. शेवटी एकाने दिवे पाजळले, दुकानाच्या मालकांच्या भरगच्च मिश्यांमुळे ते ‘बागूल बुवा’ सारखे दिसतात म्हणून असं नाव ठेवलं असावं. पण काही म्हणा, हे ‘बुवा आईस्क्रीमवाले’ पुण्यात खूप प्रसिद्ध होते. धंदाही दणक्यात चालला होता. लग्न मुंजीसाठी मुहूर्ताची पहिली अक्षत कसबा गणपती पुढे असायची. नंतर दुसरा मान होता जागृत ग्रामदैवत तांबड्या जोगेश्वरीचा. भर उन्हांत कसबा गणपती नंतर श्री जोगेश्वरी ला अक्षत देऊन बाहेर पडल्यावर कोऱ्या साडीला खोचलेल्या चार बोटाच्या टिचभर रुमालाने घाम पुसत, नऊवारीचा बोंगा आंवरत, नथीचा आकडा सांवरत वधू माय नवऱ्याला म्हणायची, काय बाई हे ऊन! इश्य! कित्ती उकडतंय ! अहो आपण आइस्क्रीम खाऊया का गडे!” गौरीसारख्या नटून थटून आलेल्या बायकोकडे बघून आणि तिच्या गोड बोलण्याला विरघळून नवऱ्याचं आईस्क्रीमच व्हायच. आणि मग ती जोडी त्या गारव्यात शिरायची. आम्हाला त्यांच्यामागे दुकानात शिरावंस वाटायच. पण फ्रॉकचा खिसा रिकामाच असायचा. मन मारून मग आम्ही प्रसादाचा, खडीसाखरेचा खडा मिळवण्यासाठी देवीच्या गाभाऱ्यात शिरायचो. आईस्क्रीमची किंमत चार आणे बाऊल होती. ते आम्हाला परवडणार नव्हतं त्यापेक्षा फुकटची देवीसमोरची खडीसाखर परवडायची. ‘– दुधाची तहान ताकावर दुसरं काय ‘—- –
टकले आत्या नावाची आमची एक मानलेली आत्त्या होती.. त्यावेळची गर्भ श्रीमंत, दागिन्यांनी नटलेली, आत्त्या कारमधून उतरली की आम्ही विट्टी दांडू फेकून जीव खाऊन पळत सुटायचो. कारचा दरवाजा उघडायला एकमेकांना ढकलत पुढे जायचो. ही आत्त्या आली की आमचा आनंद गगनाला भिडायचा, कारण श्रीमंत माहेरवाशिणीला कान तुटक्या कपातून पांचट दुधाचा चहा कसा काय द्यायचा?अशा धोरणी विचाराने आमची आई सौ. टकले आत्यांकरिता चक्क आईस्क्रीम मागवायची. आम्ही आशाळभूत पणे गुलाबी थंडगार आईस्क्रीम कडे बघत तिथेच घिरट्या घालायचो. आत्याच्या ते लक्षातच यायचं नाही. आत्याचा बाउल साफ- सूफ व्हायचा. आणि मग तिच्या लक्षात आल्यावर ती म्हणायच, ” हे काय वहिनी मुलांसाठी नाही का आईस्क्रीम मागवलत? आईला काय बोलावं काही सुचायचच नाही कारण तिच्याजवळ इतके पैसेच नसायचे. चाणाक्ष आत्या ‘त ‘ वरून ताकभात ओळखायची. आणि मग हळूवारपणे आपल्या मखमली, चंदेरी टिकल्या लावलेल्या बटव्यातून नाणी काढायची, अलगद आमच्या हातावर ठेवून म्हणायची, पळा रे पोरांनो आईस्क्रीम खाऊन या. ” हे वाक्य ऐकण्यासाठी आम्ही आतुर झालो होतो. पैसे हातात पडताच छताला टाळू लागेल अशी उंच उडी मारावीशी वाटायची. पण मग धाड्दिशी जमिनीवर आदळायचो. कारण आईचे डोळे मोठे झालेले असायचे. आईच्या डोळ्यांकडे नजर गेल्यावर आम्ही चुळबूळ करायचो, आत्या म्हणायची “आईकडे काय बघताय ? मी सांगतेय ना! हे पैसे घ्या आणि पळा लौकरआणि जा बुवांकडे” मग काय आम्ही हांवरटासारखे चार आण्याचं नाणं मुठीत पकडून जिन्यावरून एकेक पायरी वगळत उड्या मारत बुवा आईस्क्रीम वाल्यांच्या दुकानात शिरायचो. आणि मग काय बुवांकडे गुलाबी पोपटी, पिस्ता आईस्क्रीम खाताना मनांत यायचं आपला ढग झालाय आणि आपण हवेत तरंगतोय… अहाहा! काय तो सुखद गारवा. , आईस्क्रीमची मिठ्ठास चव, अजूनही जिभेला विसर पडला नाही. आणि मग मनाला सुखावणारा गारवा अंगावर घेता घेता आमची ब्रह्मानंदी टाळी लागायची. स्वर्गच आमच्या हातात आला होता. आईस्क्रीमची चटक लागली होती, पण पैशांचा ताळमेळ जमत नव्हता. अखेर पगार झाल्यानंतर माझ्या वडिलांनी ति. नानांनी आईस्क्रीमचा पॉटच घरी आणला तो फिरवतांना नाकी दम आले. घामाच्या धारा लागल्या, पण नंतर मात्र तीन-तीन वाट्या आईस्क्रीम हादडायला मिळाल.
गेले ते दिवस, गेली ती आईस्क्रीमची तेव्हांची चव, पण अजून रंग उडालेली –‘ बुवा आईस्क्रीमवाले ‘ — ही पाटी डोळ्यासमोरून हालत नाहीय्ये. मनाचे पांखरू अजूनही त्या दुकानाभोवती गिरट्या घालतय. .
आमच्या मित्राने पडद्यावरच्या पिक्चर संदर्भातील फोटो टाकला आणि मन जवळ जवळ 50 60 वर्षे मागे भूतकाळात गेले. असंख्य आठवणींचा कल्लोळ झाला. राव काय दिवस होते ते. माझे जे अनुभव आहेत तसेच माझ्या पिढीतील अनेकांचे असतील त्यांच्यासाठी खास हा लेख !
आमच्या लहानपणी तर सार्वजनिक सत्यनारायण पूजा, गणपती उत्सव व नवरात्री हा रस्त्यावर पांढऱ्या पडद्यावर बघितलेल्या पिक्चरशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. मंडळांमध्ये स्पर्धा असायच्या कोण लेटेस्ट सिनेमा लावतो ते. त्याकाळी रात्री रस्त्यावर किंवा मैदानात बांबूंना पांढरा पडदा बांधून प्रोजेक्टरवर पिक्चर दाखवले जात असत.. मुख्य म्हणजे फुकट असायचे मंडळातर्फे खर्च करायचे. दिवसा सायकलवर फिरून कुठे पिक्चर आहे ते बघायचे फळ्यावर खडूने लिहून ठेवलेले वाचायचे. आठ दहा दिवस अगोदर मित्रांमध्ये पण बातम्या मिळायच्या. मग तारीख लक्षात ठेऊन जायचो आणि विसरलो की हळहळ वाटायची. एका दिवशी दोन तीन ठिकाणी पूजा असायची मग चांगला सिनेमा असेल तिथे जायचे तो संपला की दुसरीकडे जायचे तिकडे जेवढा मिळेल तेवढा बघायचा. गणपतीमधे 10 दिवस रोज सिनेमा असायचा.
सिनेमा बघताना मधेच पाऊस यायचा मग आडोशाला पळायचे. प्रोजेक्टर वर छत्री नाहीतर ताडपत्री धरायचे. त्याकाळी गणपतीत फार कमी पाऊस असायचा एखादी सर आली की थांबायचा. सत्यनारायणाच्या पूजा असतील तिथे जायचे.
आम्ही कुठे कुठे जायचो. कसेही कुठेही बसायचो. रस्त्यावर बसायचे गोणपाट घेऊन, नाहीतर टॉवेल टाकून, अगदीच काही मिळाले नाही तर वर्तमानपत्र किंवा नुसतेच डायरेक्ट रस्त्यावर बसायचो. त्यामध्ये कधीही लाज किंवा कमीपणा वाटला नाही आणि कोणी वाटून घेतला नाही. घरच्यांनीही कधी विरोध केला नाही.
प्रोजेक्टरचा सिनेमा बघणे खूप मजेशीर गोष्ट असायची. गंमत म्हणजे पडद्याच्या एका बाजूला लेडीज बसायच्या तिथेच नेहमी प्रोजेक्टर असायचा आणि आपण जेन्टस नेहमी अपोझिट साईडला. त्यामुळे सगळे उलटे दिसायचे, हिरोईनची साडी गुजराथी पद्धतीने नेसली असे वाटायचे, सगळ्या ऍक्शन उलट्या दिसायच्या, फायटिंग उलट्या हाताची बघायची. हे सगळे नको असेल तर बायकांच्या साईडला सर्वात शेवटी उभे राहून बघायचं नाहीतर कडेला रेतीवर, खडीवर बसून बघावे लागायचे. ती खडी टोचायची. जेवढे लांब बसू तेवढा सिनेमा छोटा दिसायचा म्हणून पुढे बसायचे. सिनेमा बघताना भरपूर डास चावायचे मुंग्या चावायच्या तरीसुद्धा नेटाने प्रोजेक्टर वाल्याची बडदास्त ठेवायचे त्याला चहा नाष्टा असायचा. मंडळाचे पदाधिकारी आणि पाहुणे यांच्यासाठी खुर्च्या मांडायचे. त्यांना टेबल फॅन असायचा. त्यांचा खूप हेवा वाटायचा.
त्यावेळी. सिनेमा चालू असताना कधी प्रोजेक्टर खराब व्हायचा तर कधी लाईट जायचे मग बोंबाबोंब. मधेच उंदीर किंवा घूस यायची नाहीतर कुत्रे घुसायचे, मग नुसती पळापळ. स्थानिक पोरांच्या माऱ्यामाऱ्या व्हायच्या. आजूबाजूचे लाईट बंद करायला लागायचे. पिक्चर स्टार्ट करताना रीळ लावल्यावर 6/5/4/3/2/1असे स्क्रीनवर यायचे तेव्हा नंबर ओरडायचो. एक रीळ संपले की दुसरे लावायचे.. काहीवेळा पिक्चरचा आवाज आणि चित्र सिंक्रो नाही झाले तर विचित्र वाटायचे. ऍक्शन आधी आणि आवाज नंतर तरी बघायचो.
सिनेमांत चांगल्या डायलॉगला, फायटिंगला, गाण्याला टाळ्या शिट्ट्या मिळायच्या मग परत रिवाइंड करून वन्स मोअर. इन्कार सिनेमातील मुंगळा गाण्याला तर तीन चार वन्स मोअर मिळायचे तेवढे वेळा रिवाइंड. पडद्यावर लव्ह सीन आला की पोर बोंब मारीत सोड सोड म्हणून ओरडत.
केश्तो, असितसेन, मेहमूद, असरानी, जगदीप, राजेंद्रनाथ यांच्या कॉमेडीला जाम दाद मिळायची. गाण्यावर लोक रस्त्यात नाचायचे. शम्मी, देव, ऋषीं, अमिताभ, जितेंद्र, धर्मेंद्र, राजेशखन्ना यांच्या पिक्चरला खूप गर्दी व्हायची. सगळे डायलॉग पाठ असायचे लोकांचे. शोले, जंजीर दिवार, रोटी कपडा और मकान, ज्वेलथीफ, जंगली, अदालत, दामाद, चितचोर, जॉनी मेरा नाम, तिसरी मंझिल. वो कौन थी, कालिचरण किती नावे घेऊ हे सिनेमे थिएटर आणि रस्त्यावर असंख्य वेळा बघितले.
मराठी पिक्चर ब्लॅक व्हाईट असायचे दामुअण्णा शरद तळवलकर राजा गोसावी निळू फुले सूर्यकांत रमेश देव अशोक सराफ दादा कोंडके रवींद्र महाजनी सीमा चित्रा रेखा जयश्री गडकर रंजना उमा यांचे पिक्चर असायचे. सासुरवाशीण सिनेमा बघताना ललिता पवार आणि निळू फुले यांना बायका चक्क शिव्या द्यायच्या. त्यावेळी ते दोघ तिथे आले असते तर त्यांनी नक्की मार खाल्ला असता अशी परिस्थिती असायची.
आठवणीत रमायला झाले की मन उचंबळून येते डोळे पाणावतात. कितीतरी सिनेमे बघितलेले आठवतात.
गेले ते दिन गेले
रस्त्यावर बघितलेल्या पिक्चरची मजा आता मल्टिप्लेक्सला शेकडो रुपये मोजून पण येणार नाही. आणि खिशातून पांच पैशाचे चणे, दाणे खाण्याची चव फ़्रेंच फ्राईज बर्गर आणि पॉप कॉर्न ला येणार नाही. आताच्या मुलांना ही मजा अनुभवाला कधीच मिळणार नाही.
गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी
लेखक : अज्ञात
संग्राहिका – सुश्री सुनीता गद्रे
माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
दोन ओळी सुचल्या त्या काम करता करता गुणगुणत राहिले. आणि पुढे इतकं काही सुचू लागलं की काम बाजूला ठेवून मला त्या लिहून काढाव्या लागल्या. पूजा करतानासुद्धा इतकी तन्मयता झाली असेल की नाही माहिती नाही, पण या ओळी लिहिताना मात्र एक विलक्षण तन्मयता, आनंद, चैतन्य जाणवत होतं. लिहिल्यावर जाणवलं की ही एक साधीसुधी आरती म्हणता येईल अशी रचना आहे. गणपतीची विविध नावं यात गुंफली गेली आहेत.
सोन्या रुप्याच्या पावलांनी गौरी घरात आल्या. प्रत्यक्ष त्या महालक्ष्मींच आगमन होतं घरी… किती भाग्याची गोष्ट आहे ना… सगळं घर त्यांना फिरून दाखवलं. दोघींना नीट बसवलं. दागिने हार घातले. आरती, मंत्रपुष्पांजली झाली. आल्या दिवशी साधी भाजी भाकरी ती दाखवून झाली. दूध देऊन दोघींना आराम करायला सांगितलं.
दुसऱ्या दिवशीची लगबग सुरू झाली. पुरणावरणाचा स्वयंपाक, भाजी, कोशिंबीर, भात वरण, दोघींचा चेहरा तृप्त दिसत होता. गौरी प्रसन्न हसतमुख दिसत होत्या. घरात आनंद उत्साह भरला होता.
तो दिवस गडबडीतच गेला. रात्री निवांत दोघींसमोर बसले… मनातलं तिला ओळखता येतच…. तरी सांगितलं… तिच्याशी बोललं की मन शांत होत.
तीन दिवसांच्या पाहुण्या म्हणून आलेल्या गौरी….. निघाल्या की परत…. मुरडीचा कानवला, दहीभाताचा नैवेद्य दाखवला. अक्षता टाकल्या… जाता जाता निरोप देताना म्हटलं..
…. “ आई… क्षणभर जरा थांब ग.. तुझ्या लेकीबाळींचा निरोप सांगते तुला… गौरी माय तू यायच्या आधीच आम्हाला शहाणं केलं होतंस.. त्यामुळे तुझं सांगणं सगळ्यांनी ऐकलं बरं का… त्यामुळे आम्ही अन्न वाया नाही घालवलं.. मोजकच केलं.. खूप जणींनी मला हे सांगितलं. त्यांचा स्वयंपाक लवकर झाला. एका ताईंची सवाष्ण दरवर्षी अडीच वाजता जेवायची. यावर्षी त्यांनी तुला बारालाच नैवेद्य दाखवला. तुझी आरती करून साडेबाराला घरच्यांना जेवायला वाढलं. खूप आनंदानी ताईंनी मला हे सांगितलं.
लेकी सुनाच घरच्या लक्ष्मी आहेत ते सर्वांना फार पटलं बघ… किती जणींनी पहिल्यांदाच तुझ्यासमोर बसून श्रीसूक्त, देवी अथर्वशीर्ष, नवीन नवीन आरत्या म्हटल्या. तुझी गाणी गायली.. तू ऐकली असशीलच तरीपण सांगते ग आई…
…. बऱ्याच जणी शहाण्या आणि सुज्ञ झाल्या. तू सांगितलं तसंच वागल्या… घरचे पण आनंदित झाले.
हळूहळू जमेल तसा थोडा थोडा बदल करत आहेत.. सगळ्याजणी…. रूढी, परंपरा, रीती, रिवाज यांचा पगडा मनावर अजून खूप आहे. नव्हे.. त्याचे दडपण आहे. बदल करताना मनात अजून भीती मात्र आहे ग……
… काय होतं आई खरं सांगू का… बदल केला आणि काहीतरी विपरीत घडलं की वाटतं आपण बदल केला म्हणूनच हे असं झाल. लगेच मनात संशय येतो देवी किंवा देव आपल्यावर कोपला तर नसेल…
आमचं कसं आहे.. आमची प्रगती, भरभराट झाली, चांगल्या गोष्टी घडल्या की आम्हाला वाटतं ते आमचं कर्तृत्व….. माझ्यामुळेच ते झालं.. मी कष्ट केले म्हणून ते झालं.. अस आम्ही म्हणतो..
तेव्हा” ही देवाची कृपा “अस क्वचितच म्हणतो….. पण विपरीत काही झालं की आम्ही आपलं देवावर ढकलून देतो… हे अगदी खरखुर आमच्या मनातल आज तुला सांगते बरं का…
…. पण आता नाही…. आता आम्ही शहाणे होऊ… तू सांगितलं आहेस तसेच वागू…. तसं तुला आश्वासन देते…. भेटूया आता पुढच्या वर्षी….. पुनरागमनायच…. “
.. असं म्हणेपर्यंत डोळे भरून आले होते. घर शांत झालं होतं. त्यांचं येणं आनंदाचं, सुखाचं समाधानचं असतं. घर भारुन टाकणार असतं. इतर कशाचीच आठवण या तीन दिवसात येत नाही. त्याच्याभोवतीच मन फिरत असतं. हे दिवस झटकन जातात..
…. आता लक्षात येतं… त्यासाठीच गौरी घरी येतात.. मन तृप्त करायला.. भरपूर सुख आनंद द्यायला…
राहिलेले दिवस त्यांच्या आठवणी काढत जातात.. सुखदुःख, राग, लोभ, करत संसार चालूच राहतो……
हात जोडून तिला सांगितलं…… “ गौरीमाय तू अपार सुख देणारी आहेस. तुझा आशीर्वादाचा हात सदैव आमच्या पाठीवर असू दे. हीच तुझ्या चरणी आमची प्रार्थना. तू साथीला असलीस की आम्हाला बळ येतं ग माय… “
श्रावण मास कसा सरला ते कळलंच नाही. व्रतवैकल्ये, श्रावणाची रिमझिम, हवं हवेस वाटणार सोनेरी कोवळ उन ! हवेत गारवा ठेवत. भाद्रपद मास आलाच !
दोन चार दिवस आधीच बाप्पाच्या आगमनाची गोड चाहूल होतीच ! त्याची तयारी पण चालू झाली. गणेश मूर्ती ठरवण्यासाठी कुंभार वाड्यात नेहमीप्रमाणे हेलपाटे. पण आनंदाचे ! मूर्तिकाराला अनेक सूचना, रंगसंगतीचा सल्ला ! तो पण हो दादा हो ! अगदी सालाबादप्रमाणेच, तुमचा बाप्पा सजवून तुम्हाला सुपुर्द करतो ! काळजी सोडाच ! सकाळी लवकरच येणार ना. बाप्पाला न्यायला !
होय महादू नक्कीच लवकर येणार, नन्तर मग गर्दी खूप वाढते. महादू कुंभार हा अख्या गावातील एकमेव मूर्तिकार ! पण अव्वल दर्जाचा कलाकार. दादांचा स्वभाव त्याला माहित होताच ! गणेशोत्सव व गणपती बाप्पाची मूर्ती ह्यात प्रत्येकाच भाव विश्व गुंतलेलं असतच !
आले आले म्हणत, बाप्पा वाजत गाजत आले.
घरोघरी बाप्पा विराजमान पण झाले. त्यापूर्वीच आरास, सजावट मखर आणि घरातील पण रंग रंगोटी झालेली ! रोज नवीन पक्वान्न, आरत्या, मंत्रपुष्पांजलीची चढाओढ रात्री चक्री भजन. दिवसभर फटाक्यांची आतषबाजी ! गौरीचे आगमन दुसऱ्या दिवशी गौराई आणि गणेश भोजन उर्फ मोठा नैवेद्य. हो त्याच दिवशी राधा अष्टमी चा योग असतो.
त्यातच श्रावण मासात राहिलेली सत्यनारायण पूजा.
दिवस कसे सरले ते कुणालाही कळलं नाहीच !
आणि तो दिवस येऊन ठेपला ! नको नकोसा वाटणारा !
आज अनंत चतुर्दशी, गणपती बाप्पा येऊन दहा दिवस कसे सरले ते कळलंच नाही. ह्या दहा दिवसांत घर कस भरभरून गेल्याच जाणवत होतं. वर्षातील अपूर्वाई तर होतीच. रोज नवविध पक्वान्न, पूजा, आरती, मंत्रपुष्पांजली, कस सगळं साग्र संगीत चाललं होतं. आज शेवटचा दिवस, मनाला हुरहूर लागली होतीच. आज गणपती बाप्पाच विसर्जनकाल येऊन ठेपला होता. गुरुजींची वाट बघत दादा उभे होते.
गुरुजी लवकर येउ नयेत अस वाटत होतं.
जरा अंमळ चार वाजताच गुरुजी आले, घरी पण सर्व तयारी झाली होतीच, गुरुजी नी गडबड केली, चला अजुनी वरच्या आळीत जायचं आहे.
तस दादांनी मुकटा सोहळ नेसल व बाप्पाची आता बाप्पासमोर आरती करण्यासाठी उभा ठाकले आरत्या झाल्या, मंत्रपुष्पांजली झाली. पंच खाद्य तसेच दहीभात पाट वड्या, कडबोळी इत्यादी प्रसादाचा नैवेद्य झाला.
गुरुजींनी अक्षता हातात घेतल्या
।।”यांतु देवागणांनाम सकळ पुर्वमादाय
इच्छित कामना सिद्धर्थम
पुनरागमनायच ” ।।
अस मंत्र म्हणुन अक्षता “श्री मुर्ती “वर टाकल्या तस डोळ्यात टचकन पाणी आलं, सर्वांचे डोळे ओले झाले, पाट रिकामा होणार, केलेला थाट आरास निर्माल्यागत होणार. घर ओकबोक वाटु लागणार होतं पण नाइलाज होता.
मंडळी वर्षातुन एकदा बाप्पा येणार दहा दिवस राहणार, कोड कौतुक करून घेणार व बघता बघता दहा दिवस कसे निघुन गेले ते कळतच नव्हते. दहा दिवसांत घर कस भरलेलं वाटत होतं, रोज नवीन पक्वान्न, नैवेद्य आरती, मंत्रपुष्पांजली जागर इत्यादी गोष्टींची रेलचेल. जगण्याचा एक एक क्षण सोहळाच! शिकवत होता.
बघा मंडळी जे जे पार्थिव आहे ते ते विसर्जित होण्यासाठीच!! मग बाप्पा असो वा तुम्हींअम्ही, सकळ पशु पक्षी, चराचर पार्थिव च की ! पार्थिव म्हणजे काय ?
तर जे जे पंचभुताने निर्मित ते ते सर्व पार्थिव. ह्या नियमात सर्व सजीव श्रुष्टी आलीचकी म्हणजे एक ना एक दिवस आपलं पार्थिव शरीर सोडुन आपणास पण गेले पाहिजेच !
विसर्जन आपलं पण होणारच हे त्रिकालाबाधित सत्य ! बाप्पाचं अनंत चतुर्दशी ही तिथी ठरलेली आहे. तस तुमची आमची तिथी ठरलेली नाही ! ते सर्व बाप्पाच्या हातात !
एक ना एक दिवस आपल्याला विसर्जित व्हावं लागणार ! श्रुष्टी नियमच आहे तो. जुनी पान गळुन पडणार नवीन पालवी येणार, जसा वसंत ऋतु येतो तसाच ग्रीष्मही येतो
हीच निसर्गाची ख्याती आहे.
पान फुल फळ मोहर काही झाड, याना पण विसर्जित व्हावं लागतच की, विविधरंगी फुल उमलतात, विविध गंध ते देतात, फळात रूपांतर झाले की आपलं अस्तीत्व ते फळात ठेऊन बाजुला होतात. नवीन रोप त्याच बहरण, त्याच अस्तीत्व, वयात आलं की कळी ते फुल, फुल ते निर्माल्य त्याचा गंध शेवटी मातीत पार्थिव रुपात विसर्जित होतो. हेच तर श्रुष्टी चक्र आहे, मग गणपती असो व इतर तुम्ही आम्ही सजीव !
हो पण गम्मत अशी आहे की, मन व आत्मा हे अविनाशी, ते परत सृष्टीत अनेक रुपात पुनर्जन्म घेतात च की !
गीतेत श्रीकृष्ण म्हणतात
“पुनरपि जननं पुनरपि मरण म ।
पुनरपि जननी जठरे शयनम”।।
याचाच अर्थ “
।।” इच्छीत कामांना सिद्धर्थम पुनरागमना यच ” ।।
पार्थिवं शरीर जन्म घेणे व परत मरणे व परत पुनर्जन्म घेणे ! हाच सृष्टी चक्राचा नियम मग तो कोणी ही असो. तुम्हाला आम्हाला चुकलेल नाही, हेच गणपतीच्या विसर्जनाच्या निमित्याने बाप्पाला सांगायचं असत ! अस नाही का वाटत तुम्हाला ?
म्हणूनच मला ह्या तत्वावर काव्य सुचलं ते तुम्हाला कस वाटलं, विचार योग्य आहेत का ते जरूर कळवा..
श्रावण आणि बालपण यांचं अतूट नातं आजही माझ्या मनात मी जपलेलं आहे. आम्ही एका गल्लीत राहत होतो. ज्या गल्लीत एकमेकांना चिकटून समोरासमोर घरं होती आणि तो असा भाग होता की एकमेकांना लागून आजूबाजूलाही अनेक लहान मोठ्या गल्ल्याच होत्या. कुठल्याही प्रकारचं सृष्टी सौंदर्याचं वातावरण तेथे नव्हतंच म्हणजे श्रावणातली हिरवा शालू नेसलेली अलंकृत नववधूच्या रूपातली धरा, श्रावणातलं ते पाचूच बन, मयूर नृत्य असं काही दृश्य आमच्या आसपासही नव्हतं. फारतर कोपर्यावरच्या घटाण्यावर हिरवं गवत मोकाट वाढलेलं असायचं. आमच्या घराच्या मागच्या गॅलरीतून खूप दूरवर धूसर अशी डोंगरांची रांग दिसायची आणि वर्षा ऋतूत त्या डोंगरावर उतरलेलं सावळं आभाळ जाणवायचं.
श्रावणातल्या ऊन पावसाच्या वेळी आकाशात उमटलेलं सप्तरंगी इंद्रधनुष्य मात्र आम्ही डोळा भरून पाहायचो. लहानपणी आम्हाला श्रावण भेटायचा तो तोंडपाठ केलेल्या बालकवी, बा. भ. बोरकर, पाडगावकर यांच्या कवितांतून. नाही म्हणायला काही घरांच्या खिडकीच्या पडदीवर कुंडीत, किंवा डालडाच्या पत्र्याच्या डब्यात हौशीने लावलेली झाडं असायची. त्यात विशेष करून झिपरी, झेंडू, सदाफुली, तुळस, कोरफड, मायाळू क्वचित कुणाकडे गावठी गुलाबाच्या झाडावर गुलाब फुललेले असायचे. गल्लीतलं सारं सृष्टी सौंदर्य हे अशा खिडकीत, ओसरीवर पसरलेलं असायचं. ज्या घरांना परसदार होतं त्या परसदारी अळूची पानं, कर्दळ, गवती चहाची हिरवळ जोपासलेली असायची पण मुल्हेरकरांच्या परसदारी मात्र मोठं सोनचाफ्याचं झाड होतं ते मात्र श्रावणात नखशिखान्त बहरायचं त्या सोनचाफ्याचा सुगंध सर्वत्र गल्लीत दरवळयचा. या दरवळणाऱ्या सुगंधात आमचा श्रावण अडकलेला असायचा. या सुवर्ण चंपकाच्या सुगंधात आजही मला बालपणीचा श्रावण कडकडून भेटतो.
श्रावणातील रेशीमधारात मात्र आम्ही सवंगडी मनसोक्त भिजलोय. “ये ग ये ग सरीमाझे मडके भरी” नाहीतर “येरे येरे पावसा तुला देतो पैसा ” ही धम्माल बडबड गीतं पावसाच्या थेंबांना ओंजळीत घेऊन उड्या मारत गायली आहेत. गल्लीतले रस्तेही तेव्हा मातीचे होते. पावसात नुसता चिखलच व्हायचा. चिखलाचं पाणी अंगावर उडायचं. खड्ड्यात साचलेल्या पाण्यात कागदाच्या होड्या सोडतानाचा तो बालानंद अनुभवला. श्रावणातली हिरवळ आमच्या मनाच्या कोपऱ्याकोपऱ्यात अशा रितीने बहरायची. आमच्या मनातला श्रावणच पाचूचं बन होऊन उतरायचा. एकीकडे ऊन आणि एकीकडे पाऊस.. “आला रे आला पाऊस नागडा” करत मस्त भिजायचे. संस्कार, परंपरा, त्यातली धार्मिकता, श्रद्धा, त्यामागचं विज्ञान, हवामान, ऋतुमान, विचारधारा या सर्वांचा विचार करण्याचं आमचं वयच नव्हतं. श्रावणातले सगळे विधी, सण सोहळे, पूजाअर्चा, व्रतं, उपवास हे आमच्यासाठी केवळ आनंदाचे संकेत होते आणि गल्लीत प्रत्येकाच्या घरी कमी अधिक प्रमाणात ते साजरे व्हायचेच.
माझे वडील निरीश्वरवादी होते असं मी कधीच म्हणणार नाही पण आमच्या कुटुंबात काही साजरं करण्यामागे कुठलाही कर्मठपणा नसायचा, सक्ती नसायची पण श्रावण महिना आणि त्यात येणारे बहुतेक सर्व सण आमच्या घरात आनंदाने साजरे व्हायचे. आज हे सगळं आठवत असताना माझ्या मनात विचार येतो की अत्यंत लिबरल, मुक्त विचारांच्या कुटुंबात, कुठल्याही कठीण नियमांना बिनदिक्कत, जमेल त्याप्रमाणे अथवा सोयीप्रमाणे फाटे फोडू शकणाऱ्या आमच्या कुटुंबात श्रावण महिन्याचं त्या अनुषंगाने येणाऱ्या रितीभातींचं उत्साहात स्वागत असायचं आणि या पाठीमागे आता जाणवते की त्यामागे होतं पप्पांचं प्रचंड निसर्ग प्रेम ! निसर्गातल्या सौंदर्याचा रसिकतेने घेतलेला आस्वाद आणि जीवन वाहतं रहावं म्हणून केलेला तो एक कृतीपट होता. धार्मिकतेचं एक निराळं तत्त्व, श्रद्धेच्या पाठीमागे असलेला एक निराळा अर्थ आमच्या मनावर कळत नकळत याद्वारे बिंबवला गेला असेल आणि म्हणूनच आम्ही परंपरेत अडकलो नाही पण परंपरेच्या साजरेपणात नक्कीच रमलो. तेव्हाही आणि आताही.
श्रावण महिन्यात घरी आणलेला तो हिरवागार भाजीपाला.. त्या रानभाज्या, ती रानफळे, हिरवीगार कर्टुली, शेवळं, भुईफोडं, मेणी काकडी, पांढरे जाम, बटाट्यासारखी दिसणारी अळू नावाची वेगळ्याच चवीची, जिभेला झणझणी आणणारी पण तरीही खावीशी वाटणारी अशी फळे, राजेळी केळी, केवड्याचे तुरे या साऱ्यांचा घरभर एक मिश्र सुगंध भरलेला असायचा. तो सुगंध आजही माझ्या गात्रांत पांघरलेला आहे.
श्रावण महिन्यातले उत्सुकतेचे वार म्हणजे श्रावणी शनिवार आणि श्रावणी सोमवार. श्रावणी सोमवारी शाळा ही अर्धा दिवस असायची. सकाळच्या सत्रात उपास म्हणून चविष्ट, खवलेला ओला नारळ, कोथिंबीर, लिंबू पिळलेली साबुदाण्याची खिचडी आणि संध्याकाळचे सूर्यास्ताच्या थोडं आधी केलेलं भोजन. शनिवारचा आणि सोमवारचा जेवणाचा मेनूही ठरलेला असायचा. सोवळ्यात चारी ठाव स्वयंपाक रांधायचा. त्या स्वयंपाकासाठी आईने आणि आजीने घेतलेली मेहनत, धावपळ आता जाणवते.
शनिवारी वालाचं बिरडं, अळूच्या वड्या, पंचामृत, अजिबात मीठ न घालता केलेली पिवळ्या रंगाची मूग डाळीची आळणी खिचडी आणि पांढरे शुभ्र पाकळीदार ओल्या नारळाच्या चवीचे गरमागरम मोदक, शिवाय लोणचं, पापड, काकडीची पचडी हे डाव्या बाजूचे पदार्थ असायचे आणि त्या दिवशीचं वैशिष्ट्य म्हणजे हिरव्यागार केळीच्या पानावर मांडलेला हा पाकशृंगार. सभोवती रांगोळी आणि मधल्या घरात ओळीने पाट मांडून त्यावर बसून केलेलं ते सुग्रास भोजन! पप्पाही ऑफिसमधून लवकर घरी यायचे. ते आले की आम्ही सगळे एकत्र जेवायला बसायचो, उदबत्तीच्या सुगंधात आणि वदनी कवळ घेताच्या प्रार्थनेत आमचं भोजन सुरू व्हायचं. आई आणि जीजी भरभरून वाढायच्या. त्या वाढण्यात भरभरून माया असायची. तसं आमचं घर काही फार मोठं नव्हतं पण झेंडूच्या फुलांनी सजलेला देव्हारा आणि भिंतीवर आणि चुलीमागे तांदळाच्या ओल्या पीठाने काढलेल्या चित्रांनी आमचं घर मंदिर व्हायचं. पप्पा आम्हाला जेवताना सुरस कहाण्या सांगायचे. एका आनंददायी वातावरणात जठर आणि मन दोन्ही तृप्त व्हायचं.
श्रावणी सोमवारही असाच सुगंधी आणि रुचकर असायचा. त्यादिवशी हमखास भिजवून सोललेल्या मुगाचे बिर्ड असायचे. नारळाच्या दुधात गूळ घालून गरमागरम तांदळाच्या शेवया खायच्या, कधीकधी नारळ घालून केलेली साजूक तुपातली भरली केळी असायची आणि त्या दिवशी जेवणासाठी केळीच्या पानाऐवजी दिंडीचं मोठं हिरवगार, गोलाकार पान असायचं. या हिरव्या पानात आमचा श्रावण आणि श्रावण मासातल्या त्या पारंपरिक पदार्थांचा सुगंध भरलेला असायचा. विविध पदार्थांचा आणि विविध फुलांचा सुगंध ! आणि या सगळ्या उत्सवा मागे कसली सक्ती नव्हती, परंपरेचं दडपण नव्हतं.. मनानं आतून काहीतरी सांगितलेलं असायचं म्हणून त्याचं हे उत्साही रूप असायचं. आमच्या जडण घडणीच्या काळात या परंपरेने आम्हाला जगण्यातला आनंद कसा टिकवावा हे मात्र नक्कीच शिकवलं. या इथे मला आताही— आमच्या वेळेचं आणि आत्ताचं— कालच आणि आजचं याची कुठेही तुलना करायची नाही. फक्त या आज मध्ये माझ्या कालच्या आनंददायी आठवणी दडलेल्या आहेत हे मात्र नक्की.
नागपंचमीला गल्लीत गारुडी टोपलीत नाग घेऊन यायचा. आम्ही सगळी मुलं त्या भोवती गोळा व्हायचो. गारुडीने पुंगी वाजवली की टोपलीतून नाग फणा काढून बाहेर यायचा. छान डोलायचा. मध्येच गारुडी त्याच्या फण्यावर टपली मारायचा. गल्लीतल्या आयाबाया नागाची पूजा करायच्या. एकाच वेळी मला भीती आणि त्या गारुड्याचं खूपच कौतुक वाटायचं.
जन्माष्टमीला आई देव्हाऱ्यातला एक लहानसा चांदीचा पाळणा सजवायची आणि त्यात सॅटीनच्या पिवळ्या आणि जांभळ्या रंगाची वस्त्रं घातलेला लंगडा बाळकृष्ण ठेवायची. यथार्थ पूजा झाल्यानंतर आई सोबत आम्ही,
श्रावण अष्टमीला देवकी पोटी आठवा पुत्र जन्माला आला छकुला सोनुला तो नंदलाला जो बाळा जो जो जो जो रे कृष्णा…
असे गीतही म्हणायचो. त्यानंतर लोणी, दहीपोह्याचा, डाळिंबाचे लाल दाणे पेरून केलेला सुंदर दिसणारा आणि असणाराही प्रसाद मनसोक्त खायचा. एखाद्या जन्माष्टमीला आम्ही कुणाकडे होणाऱ्या संगीत मैफलीलाही हजर राहिलो आहोत. रात्रभर जागरण करून ऐकलेलं ते भारतीय शास्त्रीय संगीत कळत नसलं तरी कानांना गोड वाटायचं. ताई आणि पप्पा मात्र या मैफलीत मनापासून रंगून जायचे.
मंगळागौरीच्या खेळांची मजा तर औरच असायची. कुणाच्या मावशीची, मोठ्या बहिणीची अथवा नात्यातल्या कुणाची मंगळागौर असायची. फुलापानात सजवलेली गौर, शंकराची बनवलेली पिंडी, दाखवलेला नैवेद्य, सारंच इतकं साजीरं वाटायचं ! नाच ग घुमा कशी मी नाचू अगं अगं सुनबाईकाय म्हणता सासूबाई एक लिंबं झेलू बाई
अशा प्रकारची अनेक लोकगीतं आणि झिम्मा, फुगड्या, बस फुगड्या, जातं, गाठोडं असे कितीतरी खेळ रात्रभर चालायचे. मंगळागौरीच्या आरतीने समारोप झाला की झोपाळलेले डोळे घेऊन पहाटेच्या अंधारात घरी परतायचे. या साऱ्यांमध्ये एक महान आनंद काठोकाठ भरलेला होता.
दहीकाल्याच्या दिवशी टेंभी नाक्यावरची सावंतांची उंच टांगलेली दहीहंडी बघायला आमचा सारा घोळका पावसात भिजत जायचा. यावर्षी कोण हंडी फोडणार ही उत्सुकता तेव्हाही असायची पण पैसा आणि राजकारण याचा स्पर्श मात्र तेव्हा झालेला नव्हता.
राखी पौर्णिमेला तर मज्जाच यायची. बहीण भावांचा हा प्रेमळ सण आम्ही घरोघरी पहायचो पण आम्हाला भाऊ नाही याची खंत वाटू नये म्हणून स्टेशनरोडवर राहणारी आमची आते भावंडं आवर्जून आमच्या घरी राखी बांधून घ्यायला येत. गल्लीतल्याच आमच्या मित्रांनाही आम्ही राख्या बांधलेल्या आहेत. मी तर हट्टाने पप्पांनाच राखी बांधायची. भावाने बहिणीचे रक्षण करावे म्हणूनच ना राखी बांधायची मग आमच्या जीवनात आमचं रक्षण करणारे आमचे बलदंड वडीलच नव्हते का? त्या अर्थाने ते दीर्घायुषी व्हावेत म्हणून मी त्यांना राखी बांधायची. माझ्यासाठी मी रक्षाबंधनाला दिलेला हा एक नवीन अर्थ होता असे समजावे वाटल्यास.. याच नारळी पौर्णिमेला आम्ही सारे जण कळव्याच्या खाडीवर जायचो. खाडीला पूर आलेला असायचा. समस्त कोळी समाज तिकडे जमलेला असायचा. घट्ट गुडघ्यापर्यंत नेसलेलं रंगीत लुगडं, अंगभर सोन्याचे दागिने आणि केसात माळलेला केवडा घालून मिरवणाऱ्या त्या कोळणी आजही माझ्या नजरेसमोर आहेत.
समिंदराला उधाण आलंय सुसाट सुटलाय वारा धोक्याचा दिला इशारा नाखवा जाऊ नको तू दर्याच्या घरा..
अशी गाणी गात, ठेक्यात चाललेली त्यांची नृत्यं पाहायला खूपच मजा यायची. आम्ही खाडीत नारळ, तांब्याचा पैसा टाकून त्या जलाशयाची पूजा करायचो आणि एक सुखद अनुभव घेऊन घरी यायचो. घरी सुगंधी केशरी नारळी भात तयारच असायचा. तेव्हा जाणवलं नसेल कदाचित पण या निसर्गपूजेने आम्हाला नेहमीच निसर्गाजवळ ठेवलं असावं. श्रावणातला शेवटचा दिवस म्हणजे पिठोरी अमावस्या. दिवे अमावस्यानंतर श्रावण सुरू होतो आणि पिठोरी अमावस्येला तो संपतो. अंधाराकडून प्रकाशाकडे— हेच ते तत्त्व. तो असतो मातृदिन.
आमची आई देवापाशी बसून डोक्यावर हिरव्या पानात केळीचे पाच पेटते दिवे घेऊन आम्हाला विचारायची, “अतित कोण?”
मग आम्ही म्हणायचो, “मी”
असं आई चार वेळा म्हणायची आणि पाचव्या वेळी विचारायची, “सर्वातित कोण ?”
तेव्हाही आम्ही म्हणायचो, “मी”
काय गंमत असायची ! माय लेकीतल्या या तीन शब्दांच्या संवादाने आम्हाला जीवनात एकमेकांसाठी कायमस्वरूपी प्रेम आणि सुरक्षितताच बहाल केली जणू.
सर्वात हृद्य सोहळा असायचा तो माझी आजी डोक्यावर दिवा घेऊन पप्पांना विचारायची “अतित कोण?” तेव्हांचा. सोळाव्या वर्षापासून वैधव्यात काढलेल्या तिच्या उभ्या जन्माची एकमेव काठी म्हणजे आमचे पप्पा. आईच्या हातून दिवा घेताना पप्पांचे तेजस्वी डोळे पाणावलेले असायचे. तिच्या सावळ्या, कृश, कायेला त्यांच्या बलदंड हाताने मीठी मारून ते म्हणायचे,
“सर्वातित मीच”
या सर्वातित मधला श्रावण मी कसा विसरेन आणि कां विसरू ?
आत्तापर्यंत 1760 रीळं पाहून आणि शंभर रेसिप्या वाचून उकडीचे मोदक म्हणजे हातचा मळ वाटू लागले. मग डी मार्टमधून तांदळाचं पीठ आणलं. उकळत्या पाण्यात चमचाभर गावरान तूप आणि मीठ घातलं. चमच्याने हलवून तांदळाचं पीठ कालवलं. झाकून ठेवलं. कोमट झाल्यावर परातीत काढून हाताने मळलं. गोळ्यावर पातेलं पालथं घालून ठेवलं.
नारळ फोडण्याचे विविध विधी.
आधी नारळाच्या सगळ्या शेंड्या काढून त्याखाली त्याचे जे दोन डोळे आणि ओठ असतात ते मोकळे केले. नारळाच्या तोंडात सुरी घालून गोल फिरवली. नारळाचं पाणी चहाच्या गाळणीने पातेल्यात गाळून घेतलं. मग ओट्यावर नारळ धरून लाटण्यानं मारलं. मग बाल्कनीच्या कठड्याच्या भिंतीवर नारळाला आपटलं. मग जाड्या कडप्प्यावर धरून आपटलं. मग जिना उतरून खाली गेले आणि पेवमेंट ब्लॉकवर नारळ ठेवून वरून दगडाने ठोकलं.
हातोडी, दगड, उलथने, सुरी, लाटणे सर्व हत्यारांच्या मदतीने नारळाचे सविस्तर विच्छेदन केले. मग कुणीतरी सांगितल्यानुसार खोबरे सहजपणे निघावे म्हणून नारळाचे तुकडे गॅसवर ठेवले.
करवंटीवरचे उरलेसुरले धागे जळू लागले आणि चमत्कारिक वास सुटला. भयंकर हिंसाचारानंतर नारळाचे तुकडे ताटात पडले.
माझ्याकडे नारळाची खोवणी नाही. खोवणी हा शब्द मला खोबणी या शब्दासारखा वाटतो. आणि मला डोळ्याच्या खोबणीत सुरी घालायची भीती वाटते; त्यामुळे मी ती खरेदी करत नाही
त्यामुळे चाकूने नारळाच्या पाठीवरचे कडक सालटे सोलून काढले. मग ते गुळगुळीत पांढरे खोबरे किसणीवर बारीक किसून घेतले. त्यात गूळ, विलायचीचा चुरा, जायफळाचा किस घालून जाड बुडाच्या कढईत शिजवले.
त्यानंतर पातेल्याखाली दडवलेला पांढरा गोळा बाहेर काढला. हाताला तूप लावून त्यातला छोटा गोळा घेतला. तो हातावर थापतानाच कडेने फाटू लागला. त्याला मऊ पण यावा म्हणून त्यात दूध आणि साय घातली. तर ते जास्तच पातळ झालं. लाटता लाटता तुटू लागलं. मग ते विसविशित, भुसभुशीत द्रव्य हातावर धरून थापटून थापटून चपटं केलं. मध्यभागी दाबून त्याच्यात नारळाचे सारण भरावे म्हणून चमचा सारणाच्या कढईत घातला तर सारण दगडासारखे कडक होऊन बसले होते.
मग हातातली पुरी बाजूला ठेवून सारणात दूध आणि साय घातली. पुन्हा एकदा गॅसवर ठेवून हलवा-हलवी सुरू केली. सारण पातळ दिसू लागलं. मग त्यावर बाजारातून आणलेला खोबऱ्याचा चुरा टाकला. पुन्हा एकदा हलवून घेतलं. थोडं मऊ झाल्यानंतर एका चमच्याने ते पुरीवर ठेवले. पण ते गरम असल्यामुळे पुरी चिकटली नाही. कडक सारणामुळे ती फुटू लागली. काही केल्या सारण आणि पारी एकत्र नांदायला तयार होईनात.
एका बाईप्रमाणे मोदकाला कळ्या पाडण्याचा प्रयत्न करू लागले. पण कळ्या तुटून हातात येऊ लागल्या. आता या कळ्यांचा हार करून गणपतीच्या गळ्यात घालावा की काय असे वाटू लागले. मोदकाची पारी लाटेपर्यंत सारण पुन्हा-पुन्हा कडक होऊ लागले. मला वस्तूच्या आकाराचा मोह नाही पण वस्तूला कुठलातरी एक आकार तर दिला पाहिजे की नाही…. पण मोदक कुठलाच आकार धरायला तयार होत नव्हते.
आता पारीच पाहू का सारणाचं पाहू…. असं करता करता “एक तरफ उसका घर एक तरफ मैकदा… ” अशी अवस्था झाली. मग गमे जिंदगीतून सुटका मिळवण्यासाठी मी एका ताटाला तूप लावलं. आणि पुन्हा एकदा सारण गरम करून पटकन ताटात ओतलं आणि बाळाला झोपवण्यासाठी घाई-घाईने थोपटावं तसं थापलं. सुरेख नारळी वड्या तयार झाल्या. पांढऱ्या पिठाच्या पातळ पातळ भाकरी थापून भाजल्या. अशाप्रकारे भाकरी आणि नारळी वड्या असे दोन उपपदार्थ तयार झाले.
ज्या बायका कळीदार मोदक तयार करतात त्यांनी छान छान व्हिडिओ टाकून आम्हाला नादी लावू नये ही नम्र विनंती. तुम्ही तुमच्या घरात करून खा की. आम्हाला का मनस्ताप मोगरा जाई जुई च्या कळ्यांचा गजरा करून डोक्यात घालावा हार करून गणपतीच्या गळ्यात घालावा पण शहाण्या बाईने मोदकाच्या कळ्यांच्या नादी लागू नये.
लेखिका : सुश्री अमृता खंडेराव.
संग्रहिका – सौ अस्मिता इनामदार
पत्ता – युनिटी हाईटस, फ्लॅट नं १०२, हळदभवन जवळ, वखारभाग, सांगली – ४१६ ४१६
मोबा. – 9764773842
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
गोष्ट मे महिन्यातील आहे. रविवारचा दिवस होता. सकाळी सकाळी नऊ वाजता बायकोला घेऊन भाजी आणायला गावात चाललो होतो. मोटारसायकलवर आम्ही निघालो होतो… आणि हिने मागून बडबड सुरु केली.
“जरा जीवाला चैन नाही माझ्या. जरा जरा म्हणून काही चव नाही आयुष्यात. नुसतं घर घर करून जीव आंबून चाललाय.”
मी गाडी थांबवून म्हणलं “काय झालं सकाळी सकाळी. का चिडली आहेस.?”.. तर हिचे डोळे भरलेले.
मी परत विचारलं, “ बोल काय हवंय तुला.. ?” भेळ पाणीपुरी तिला आवडतं. म्हणलं “ खायची का भेळ.. ?” तर म्हणाली “हितं खाऊन काय करू.. ?”
मी म्हणलं “ मग कुठ खायची आता..? “
तर म्हणली, “ पुण्याच्या सारसबागेत नवऱ्यासोबत भेळ खायची माझी लै इच्छा होती आयुष्यात. पण तुम्ही सतत कार्यक्रमात. सतत चळवळीत. आता पोरं पण मोठी व्हायला लागली. सगळा रंगच गेला माझ्या आयुष्यातला. चला वांगी घेऊ भरलेली वांगी करते.”
मी किक मारली. गाडी सुरू केली. ती मागे बसलेली होती. गाडी सरळ एस. टी. स्टँडवर आणली. पार्किंगमध्ये गाडी लावली. तसं ही म्हणाली, “ इकडं कशाला आणलं.?” मी शांतपणे म्हणलं “आता काहीच बोलू नकोस. माझ्या सोबत शांतपणे चल. ” पोरं घरात होती. त्यांना सुट्ट्या सुरू होत्या. आई वडील असल्यामुळे पोरांची चिंता नव्हती.
समोर कवठेमहांकाळ ते स्वारगेट ही साडेनऊची एस. टी. उभी होती. मी हिचा हात धरला आणि थेट एस. टी. त बसलो. ही लागली ओरडायला. “ काय चाललंय हे. मूर्खपणा नुसता. चला घरी. ”
त्यावर मी म्हणलं, “ आज काही झालं तरी सारसबागेतच तुला भेळ खायला घालणार. ”
त्यावर ती घाबरली. आणि गाडीतून झटकन खाली उतरली. मी पळत खाली उतरून तिचा हात धरला. म्हणलं “हे बघ घरात काही अडचण नाही. आई आण्णा आहेत पोरांजवळ. मी सांगतो त्यांना काय असेल ते. तू शांत रहा “.. खूप विनवण्या करून तिला गाडीत आणून बसवलं.
घरी आईला फोन करून आईला जे काही सांगायचं ते सांगितलं. स्वारगेट चे तिकीट काढले. प्रवास सुरू झाला. सायंकाळी पाच वाजता आम्ही सारसबागेत होतो. हातात भेळ होती. मी तिला भरवत होतो. तिथं बसलेल्या एका कॉलेजच्या पोराला आमचा फोटू काढायला लावला. मी तिला हाताने भेळ भरवली. एक तास थांबलो. परत काही काळ पुण्यात चालत हिंडलो. रात्रीचं जेवण केलं. आणि रात्री अकराच्या गाडीने माघारी निघालो. ते दुसऱ्या दिवशी सकाळी कवठेमहांकाळ.
बिचारी पार थकून सुकून गेली होती. पण खुलून आणि उजळून निघाली होती. तिची मागणी फार मोठी नव्हती. फक्त ठिकाण आणि अंतर तीनशे किलोमीटर वर दूर होतं. मी फक्त मनाची तयारी करून ते अंतर आमच्या ओंजळीत भरलेलं होतं. कधी कधी संसारात असा वेडेपणा केल्याशिवाय घराच्या उंबरठयावर सुखाची जत्रा भरत नसते.
(ज्यांनी आपल्या आई-वडिलांना असं रस्त्यावर सोडलं आहे, त्यांच्या आयुष्यात येईल का हा पश्चातापाचा दिवस ? … करतील का ते कधी आत्मपरीक्षण ?? … देतील का ते कधी कबुली जबाब स्वतःला ???
… येईल का त्यांच्याही आयुष्यात “पतेती”…??? मी त्या नववर्षाची वाट पाहत आहे… !!!) – इथून पुढे
…कॅलेंडर प्रमाणे पारशी नववर्ष सुरू झाले… तो दिवस होता 15 ऑगस्ट !
15 ऑगस्ट आपला स्वातंत्र्य दिन !
वर्दीमधली माणसं जेव्हा देशासाठी शहीद होतात, तेव्हा त्यांच्याभोवती तिरंगा गुंडाळला जातो…!
हा सन्मान मिळायला तेव्हढं भाग्य असावं लागतं….!
तरीही त्यापुढे जाऊन मी धाडसाने म्हणेन… देशभक्ती करायला फक्त वर्दीची गरज नसते…
ज्याला जे काम नेमून दिलं आहे, त्यांनं ते प्रामाणिकपणे करणं म्हणजे देशभक्ती… !
….. विद्यार्थ्याने गुरुजन आणि आई-वडिलांचे ऐकून शिक्षण घेणे आणि त्या शिक्षणाचा उपयोग देशाच्या भल्यासाठी करणे म्हणजे देशभक्ती !
….. डॉक्टरने, रुग्णसेवेला महत्त्व देऊन… Allopathy, Homeopathy, Naturopathy यासोबतच Sympathy आणि Empathy या पॅथींचाही वापर करणे म्हणजे देशभक्ती !
….. इतर कोणत्याही सरकारी / खाजगी सेवेत असलेले अधिकारी, कर्मचारी, सेवक या सर्वांचे बाबतीत सुद्धा हेच सांगता येईल…. !
….. रस्त्यावर न थुंकणे म्हणजे देशभक्ती…
….. चिरीमिरी न घेणे म्हणजे देशभक्ती…
….. मुली महिलांचा आदर करणे म्हणजे देशभक्ती…
….. आपल्याला जे नेमून दिलेलं काम आहे, ते मनोभावे करणं म्हणजे देशभक्ती….
अशा प्रकारची देशभक्ती केली तर, अंगावर घातलेलं कुठलंही वस्त्र, हे मग युनिफॉर्मच होईल !
वर्दी / युनिफॉर्म…. ही अंगावर घालायची गोष्टच नाही मुळी….. ती मनात घेऊन मिरवायची गोष्ट आहे… !
… फक्त दहा ते पाच नाही…. जन्मलेल्या तारखेपासून, मृत्यू होईपर्यंत सांभाळायची ती गोष्ट आहे… !
पूर्वी भीक मागणाऱ्या परंतु आता, शाळेत जाणाऱ्या अनेक मुलांना या महिन्यात आपण युनिफॉर्म घेऊन दिले आहेत…. शाळेच्या फिया भरल्या आहेत… !
उद्या हीच मुलं मोठी होतील…. पुढे इतर कोणत्याही क्षेत्रात जातील, देशाची भक्ती करतील….
आणि म्हणून, याच मुलांना, “भारत” समजून, युनिफॉर्ममधल्या पोरांकडे पाहून मी त्यांना कडक सॅल्यूट ठोकला…. जय हिंद… वंदे मातरम… असं म्हणत मग आम्ही झेंडावंदन केलं.. !!!
आधार हरवलेली… अंधारात चाचपडणारी ही माणसं, जेव्हा स्वयंपूर्ण होऊन… स्वतःच प्रकाशित होतात, तो क्षण पौर्णिमेचा ! आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि मदतीने माझी अनेक माणसं या महिन्यात “प्रकाशित” झाली…. कदाचित यांच्याच प्रकाशाने रात्र उजळली… आणि मग 15 ऑगस्ट नंतर, श्रावणातली पौर्णिमा उगवली…
आली पौर्णिमा आली…. अल्लड, अवखळ धाकली बहीण म्हणून धावत आली, हातात राखीचे बंधन घेवून आली… रक्षाबंधन… !!!
… रस्त्यावरील शेकडो आजी आणि ताईंनी मला राख्या बांधल्या. “जगात ज्याला जास्त बहिणी, तो खरा श्रीमंत”, अशी श्रीमंतीची व्याख्या ठरली; तर आज सगळ्या जगातला मीच एक श्रीमंत !
सर्वात श्रीमंत मीच असलो तरीही एका टप्प्यावर याचक सुद्धा मीच आहे….. इतक्या साऱ्या बहिणींना मी ओवाळणी तरी काय देऊ ? माझी पात्रता ती काय ?
…. मग, कमरेत वाकलेल्या आजीला कमरेचा पट्टा देवून तिचा आधार झालो…
…. गुडघ्याच्या त्रासामुळे चालता येईना, त्या आजीला गुडघ्याचा पट्टा बांधून देवून, तीचा गुडघाच झालो…
…. आधाराशिवाय उभेच राहता येत नाही, अशा आजीला हातात काठी देऊन तीची काठीही झालो…
…. डोळ्याला दिसत नाही ? मग ऑपरेशन करून तिचा नेत्र झालो…
सुकलेल्या, वाळलेल्या, वठलेल्या झाडांवर पुन्हा पालवी फुटत नाही असं म्हणतात…
आईशपथ सांगतो, मी या झाडांवर त्या दिवशी हिरवीगार नाजूक पालवी उमललेली पाहिली आहे… !
हसताना यांच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या मला, समुद्रातल्या एका संथ पण फेसाळलेल्या लाटेसारख्या भासतात… !
… रक्षाबंधनाच्या दिवशी, मी ही संथ लाट झालो… त्यांच्या काळजावर पडलेली मी एक छोटीशी सुरकुतीच झालो…. !
“नारळी भात” आमच्या नशिबात नसला, तरी अनेक याचकांना, कामाला लावून त्यांच्याकडून, जेवणाचे डबे तयार करून घेऊन; रस्त्यावरील गोरगरिबांना आणि हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असणाऱ्या याचकांना आमच्या “अन्नपूर्णा प्रकल्पाच्या” माध्यमातून देत आहोत.
त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून जाणीव झाली, श्रावण मास आत्ता चालू झाला गड्या…. !
… पण, हरलेल्या या चेहऱ्यांकडे पाहून मग माझ्या तोंडून शब्द निघाले…
श्रावणमासी हर्ष नसू दे
नसू दे हिरवळ चोहीकडे
सरसर शिरवे, भिऊ नको तू
आपोआप ते ऊन पडे
*
झालासा तो वाटतो सूर्यास्त
सूर्याला रे, अंत नाही गडे
तूच सूर्य हो, तूच प्रकाश हो
हो तू रे गरुड राजा, जो आकाशाशीं भिडे
(आदरणीय बालकवींची माफी मागून)
श्रावणातल्या पौर्णिमेचा चंद्र मनामध्ये जागा ठेवत, मग “श्रीकृष्ण जयंती” आली.
जे भिक्षेकरी; भीक मागणे सोडून देऊन काम करायला लागले आहेत; त्यांचा नवीन जन्म झाला असंच मला वाटतं…. माझ्यासाठी मग हेच बाळकृष्ण !
माझेच काही याचक लोक; आम्ही भिक्षेकरी (भिकारी) हाय, अजूनही असं काही वेळा उघडपणे सांगतात… मला त्यावेळी वाईट वाटतं… !
पण ज्या भिक्षेकर्यांनी भीक मागणं सोडून दिलं आहे; असे माझे “बाळकृष्ण” मग हा “कंस” फोडतात… तोडतात… भेदतात…
कंसातल्या भिकारी या शब्दाचा वध करून, स्वतःच तयार केलेल्या “बंदीशाळेतून” जेव्हा “गावकरी” म्हणून जन्माला येतात, तोच माझ्यासाठी जयंती सोहळा असतो… !
आम्ही दहीहंडी सुद्धा मांडली….. नव्हे रोज मांडत आहोत…
तीनच थर आहेत, त्यामुळे वरवर दिसायला सोपी दिसते पण फोडायला त्याहून अवघड… !
ही दहीहंडी फोडायला आपण सर्वजण आम्हाला प्रोत्साहन देत आहात, पाठीमागून टेकू देऊन वरवर ढकलत आहात, सर्वतोपरी मदत करत आहात…. आम्ही ऋणी आहोत आपले !
आता आपल्याकडून एक वचन हवे आहे…..
‘आपण सर्वांनी भिक मागणाऱ्या व्यक्तीला भीक देणे बंद करूया… स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी त्याला मदत करूया… ! ‘
भीक आणि मदत या दोन शब्दामध्ये खूप फरक आहे….. आपल्या काहीही देण्यामुळे समोरची व्यक्ती जर परावलंबी होत असेल तर ती भीक….. पण, आपल्या कोणत्याही देण्यामुळे समोरची व्यक्ती जर स्वावलंबी होत असेल तर ती मदत ! …. पुण्य कमावण्याच्या नादात भीक देऊन एखाद्याला खड्ड्यात ढकलण्यापेक्षा, स्वावलंबी होण्यासाठी मदतीचा हात पुढे करून त्याला खड्ड्यातून बाहेर काढूया…
तरच ही तीन थरांची, दहीहंडी खऱ्या अर्थाने फुटेल… !!!
जेव्हा ही दहीहंडी कायमची फुटेल, त्यावेळी मी रस्त्यावर येऊन जल्लोष करेन… नाचेन… गाईन आणि म्हणेन…. गोविंदा आला रे…. आला…. !