डॉ अभिजीत सोनवणे
☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ म्हातारी…भाग 2 ☆ डॉ अभिजीत सोनवणे☆
@doctorforbeggars
( पण कुणाचं ऐकेल तो मी कसला ? ) इथून पुढे —-
मी तिचं ऐकायचो नाही…..
मी तिला ‘ ए म्हातारेच ‘ म्हणायचो आणि मग ती तोंडाचा पट्टा सुरु करायची, तोंडातून शिव्या यायच्या, मला मस्त गंमत वाटायची..
वर अजून म्हणायचो , ‘म्हातारीच तर आहेस…. तुला काय ताई म्हणायचं गं ?’ यावर चिडून ती चप्पल दाखवायची….
लोक फूटपाथवर राहणाऱ्या या दोघांना शर्ट-पॅंट, साड्या, पैसे असं बरंच काही द्यायचे….
दर भाऊबीज आणि रक्षाबंधनाला मात्र मला ती बोलावून घ्यायची आणि ओवाळून झाल्यानंतर तिला भिकेमध्ये मिळालेल्या शर्ट, पॅन्ट, बूट अशा अनेक वस्तू मला भेट म्हणून द्यायची….
बोचक्यातले शर्ट काढून मला ते होतील की नाही, हे ती माझ्या अंगाला लावून बघायची….
तिला मिळालेले फाटके बूट….. त्यातल्या त्यात चांगले निवडून ती मला द्यायची आणि घालून बघ म्हणून आग्रह करायची….
“ होतील गं, दे मी घालतो “ असं म्हणून, गुपचूप मी त्या गोष्टी घ्यायचो….
“ व्वा…मला असाच शर्ट हवा होता “ असं मी तिला म्हणालो की तिचा चेहरा उजळून जायचा….
“ मला असाच बूट हवा होता आणि नेमका आज तू तसाच दिलास “ म्हटलं की तिला आभाळ ठेंगणं व्हायचं….
भीक म्हणून तिला मिळालेल्या गोष्टी ती मला द्यायची आणि मी त्या वस्तू बहिणीने दिल्या आहेत म्हणून सांभाळून ठेवायचो ….
“ शर्ट आणि बूट घाल बरं का….. न्हायी बसला तर फूडल्या बारीला दुसरा देते “ हे पण ती आठवणीने सांगायची…
अशा प्रेमानं मिळालेल्या अनेक गोष्टींचा मी संग्रह केला आहे….
ज्यांच्याकडे पैसे होते त्यांनी इतिहासात अशा वस्तूंची संग्रहालयं उभारली….
आठवणीसाठी स्मारकं बांधली…
खूप नंतर कळलं….. स्मारक बांधायला आणि संग्रहालय उभं करायला पैसा लागतच नाही….
स्मारक तयार करायचं असतं मनात आणि संग्रहालय उभं करायचं असतं हृदयात….!
मिळालेल्या वस्तूला किंमत असेलही, नसेलही, देणाऱ्याच्या भावनेला मात्र मोल नसतं…
भावनांचं हे स्मारक बांधून उरात घेऊन मिरवायचं असतं…!
तू डॉक्टर- मी अडाणी, तू जरा बऱ्या घरातला- मी रस्त्यावर राहणारी, असा काही भेद-भाव ती माझ्या बाबतीत करत नसे….
तिला मी म्हणजे तिच्या कुटुंबाचाच एक भाग वाटतो..
ती तिच्यात आणि माझ्यात काहीही फरक करत नाही….
ती मला तिच्याचसारखा समजते…. तिने मला तिच्याचसारखं समजणं, हा मी माझा विजय मानतो !
मी म्हणजे तूच आहे आणि तू म्हणजे मीच आहे, हे ती समजत होती, आणि मी अनुभवत होतो…
“अद्वैत” ही संकल्पना नुसती वाचली होती… तिच्यामुळे मला अनुभवायला मिळाली
लोक बाहेर सर म्हणतात, ही मला मुडद्या म्हणते…
एरव्ही,’ आपणास कधी वेळ असतो ? कधी आपणास फोन करू ? ‘ लोकांचे असे नम्रतेने मेसेज येतात…
ती मात्र बेधडक रात्री बारा वाजता फोन करते, ‘ मुडद्या मेलास का जिवंत हायेस ? भयनीची काय आटवण हाय का नाय ?’ म्हणत ठेवणीतल्या शिव्या देते….
मी हसत तिला म्हणतो, “ बहीण कसली तू तर कैदाशीन आहेस, हडळ आहेस म्हातारे …”
मग काय …. यानंतर आणखी स्पेशल शिव्या सुरू होतात आणि मी तिने उधळलेल्या या फुलांच्या सुगंधाचा आस्वाद घेतो….
त्यात बहिणीच्या मायेचा आस्वाद असतो…. !
वजन फुलाचं होत असेलही…. सुगंधाचं करता येत नाही….
अगरबत्ती किलोत मोजत असतील सुद्धा, परंतु त्या अगरबत्तीपासून निघालेल्या सुगंधी वलयाचं वजन कशात करावं मी ….?
ती तशीच होती– काटेरी फणसासारखी… !
बहीण म्हणून ती करत असलेली “माया” मोजायला माझ्याकडे कोणताही तराजू नाही….
तिला छत टाकून तात्पुरता निवारा करून दिला होता, त्या झोपड्याला तिने घर म्हणून रूप दिलं होतं. मी त्यात जगण्यासाठी आवश्यक अशा सर्व वस्तू तिला घेऊन दिल्या होत्या.
लोक भीक देत होते, त्यात तिची गुजराण होत होती. परंतू माझी बहीण भीक मागून जगत आहे, हा माझा अपमान होता…
आणि म्हणून त्या दोघांनी काहीतरी व्यवसाय करावा अशी माझी इच्छा होती….
क्रमशः….
© डॉ. अभिजित सोनवणे
डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे
मो : 9822267357 ईमेल : [email protected],
वेबसाइट : www.sohamtrust.com
Facebook : SOHAM TRUST
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈