मनमंजुषेतून
☆ शास्त्रीय जागर ….. डॉ शिल्पा जोशी क्षीरसागर ☆ प्रस्तुती – प्रभा हर्षे ☆
“काय कटकट आहे!” म्हणत, पाय आपटत श्रुतिका आरतीला आली. तिच्या चेहेऱ्यावरचा त्रासिक भाव आईने टिपला होता. आरती झाल्यावर प्रसादासाठी पुढे आलेल्या हातावर चापट देत आई म्हणाली, “आता कशाला प्रसादाला पहिला नंबर? यायचं नव्हतं ना आरतीला?”
अर्धवट कळत्या, १३ वर्षे वयाच्या श्रुतिकाला हे पूजा, आरती, नवरात्र सगळं बोरिंग वाटत होतं. आज आईने तिला समजवायच ठरवलं. “काय गं, तुला माहित आहे का नवरात्र का करतात?” आई ने विचारलं. तशी ती रागाने म्हणाली, “त्यात काय, काहीतरी ऑर्थोडॉक्स रूढी, कुठे देवी पाहिली कोणी? पण म्हणे ९ देवींची पूजा असते. मम्मा , तू काहीही म्हण, मला पटत नाही हे.” “अगं पण तुला कोणी सांगितलं की देवींची पूजा करण्यासाठीच नवरात्र आहे असं. त्याला शास्त्रिय आणि वैचारिक दोन्ही base आहेत.ऑर्थोडॉक्स आहे की नाही तूच ठरव” आई म्हणाली. “हँ, त्यात काय शास्त्रीय? ” श्रुतिका
“बाळा, नवरात्र हे बी- बियाणांच testing kit आहे. पूर्वी आतासारखी खूप बियाणं किंवा खतं नव्हती मग सगळ्या प्रकारची धान्य थोडी थोडी टाकून त्याचं एकप्रकारे testing केलं जातं नवरात्रात की ह्यांच्यापासून पीक कसं येईल? ” “हो का? Interesting आहे. पण मग आताच का?” श्रुतिकाला प्रश्न पडला म्हणून आईला बरं वाटलं. “बरोबर विचारलं, अगं या दरम्यान रब्बी पिकांचा हंगाम सुरू होतो, आणि ती पिकं पाण्यावर वाढतात ना मग हा trial pack बरं का!” आईने उत्तर दिलं.
“wow, मम्मा, भारीच की, आणि लोकांनी ते मनापासून करावं म्हणून देवाचं नाव, हो ना?” श्रुतिका एकदम excite झाली होती. ” पण मग आई ते, तू जोगवा मागायला का पाठवते? मला नाही आवडत. खूप embrassing वाटतं” श्रुतिकाने आईला मनातलं सांगितलं. “हे बघ बाळा, मी म्हंटलं ना, वैचारिक पण पार्श्वभूमी आहे. जोगवा मागणे म्हणजे काय तर आपला वृथा अभिमान बाजूला ठेवून शरण जाणे. पूर्वी लोक ह्या मागितलेल्या जोगव्यावर पोट भरायचे. तुमच्या भाषेत ego बाजूला ठेवून गरीब लोकांची दुःख समजून घ्यायची. आता तुम्ही जाताच ना ते चॅरिटी का काय साठी पैसे मागायला? मग देवाच्या नावाने मागितलं तर छिद्र पडतं का अंगाला?”
“Right मम्मा, तो ‘फुलोरा’ का? त्यातली पापडी खूप आवडते मला.” श्रुतिकाचं डोकं आता शंकांनी भरलं होतं. आई हसून म्हणाली, ” किती चौकशा त्या! अगं , मी म्हंटलं ना, रब्बी पिकाचा हंगाम सुरू होतो, मग दिवसभर शेतात राबायचं तर घरी काहीतरी कोरडा खाऊ असावा, मुलंही खातात. ते तुम्ही evening snack म्हणतात ना, तेच! आणि हो तेच त्याकाळचे chatting चे साधन होते फुलोरा लाटायला एकत्र आलेल्या बायकांना! Live whatsapp! “आई, कसले हुशार होते गं आपले पूर्वज! मग आता सांग, कुमारिकेची पूजा कशाला? आता मला का नाही बोलवत आणि, लहान मुलींनाच का?”
“वेडाबाई, प्रत्येक स्त्री मध्ये प्रचंड शक्ती आहे. ही देवीची रूपं त्याचीच जाणीव करून देतात, ती लहानपणीच करून दिली तर त्यांना गम्मत पण वाटते आणि आपण काही तरी भारी करू शकतो हे त्यांच्या मनावर ठसतं. पूर्वी, लवकर लग्न व्हायची, पाळी यायच्या आधीच, त्यामुळे कुमारिका ह्या छोट्याच असायच्या एवढंच! ते काय तुम्ही म्हणता ना toddler, teenager वैगेरे त्यांचं चार्जिंग गं” आई.
“आयला, सॉरी, म्हणजे कमाल ग आई. प्रत्येक दिवसाला आणि सणाला काहीतरी आधार आहे. आता last, ते धान का धाण म्हणजे तो तुरा लावून का जायचं सीमोल्लंघनाला?” श्रुतिकाची प्रश्नावली सम्पणार म्हणून आईने हुश्श केलं. “मी म्हंटल ना, testing kit मधलं कुणाचं बियाणं चांगलं आहे हे त्या दिवशी कळतं मग, तुमची काय ती pilot study गं!” श्रुतिकाच्या डोळ्यातली चमक आईला बरच काही सांगत होती. “आणि आई , मला माहित आहे, दसरा म्हणजे, आपल्यातल्या रावणाला किंवा दुर्गुणांना, रामाने म्हणजे सद्गुणांनी जिंकायचं आणि ते हृदयापासून करायचं म्हणून हृदयाच्या आकाराची आपट्याची पानं प्रतीक म्हणून लुटायची, बरोब्बर ना?”
“म्हणूनच तुला सांगते, भारतीय संस्कृती, right choice है बेबी.” आई
आज आईने सुप्त कल्पकता वापरून तिच्यातल्या सरस्वती आणि श्रुतिकामधल्या दुर्गाचा GBनवरात्रानिमित्त शास्त्रीय जागर केला होता.
©️®️ डॉ शिल्पा जोशी क्षीरसागर
संग्रहिका – सुश्री प्रभा हर्षे
पुणे
भ्रमणध्वनी:- 9860006595
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈