माझ्या अंगणात आपसूक आले होते एक प्राजक्ताचे झाड. पहिल्यांदा मला त्याच्या पानाचा खरखरीतपणाच लक्षात आला. नंतर तो बोचूही लागला. पण त्याचे औषधी गुण जाणल्याने मी ते सहन करू लागले. हळुहळु त्याला नाजुक फुलेही आली. वासही मंदमंद असा— मनाला चित्ताला प्रसन्नता देणारा. मी फुलांच्या सौंदर्य व सुगंधात गुंतले. नंतर लक्ष गेल तर झाडाची भली मोठी फांदी कुंपणापलीकडे वाढत जाऊन बहरलेली. रोज तिकडे फुलांचा सडा नजरेला दिसायचा. गंधाचे झोत वारा इकडे तिकडे उधळायचा. माझी फुले माझी, पण पलिकडची पखरणही माझ्याच मालकीहक्काची होती ना ? पण तक्रार केली तर “ तुला कमी पडताहेत का फुलं ?मग गप्प बस की “ असं उत्तर मिळालं .या उत्तरातून मला शापच मिळाला जणू– माझ्याकडची फुलं मला प्रसन्न करायला असफल होऊ लागली.—-आणि पलिकडची फुल अस्वस्थता देऊ लागली. पलीकडे जाणारी फांदी तोडण्याचा अयशस्वी प्रयोगही केला ,कारण ते माझ्या ताकदीबाहेरचं काम हे माझ्या लक्षात आलं, अन खरखरीत पानं जास्तच खरखरीत वाटू लागली.
☆ आली गौराई अंगणी ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆
आली गौराई अंगणी
रुणझुणत्या पाखरा, जारे माझ्या माहेरा, आली गौराई अंगणी, तिला लिंबलोण करा’ गाणं गुणगुणतच आपण मोठं झालो हे आता आठवते.गौराई येते ती अशीच आनंदात, उत्साहात! त्या माहेरवाशिणीचं किती कौतुक करू असं वाटतं!
लहानपणी निसर्गाच्या सान्निध्यात फुले, पत्री गोळा करताना खूप आनंद उत्साह असे.माझ्या माहेरी गौर बसवायची पद्धत नव्हती, तरी मी माझ्या मैत्रीण सह त्यांच्या आनंदात सहभागी होत असे.
सासरच्या घरी आल्यावर मात्र गौरी गणपतीचा आनंद खूप मिळाला सांगली ला कृष्णा नदीच्या जवळच आमचे घर असल्याने गौर आणायला मी सासुबाईं बरोबर नदीवर गेले होते. त्यांनी मला गौरी ची सगळी तयारी करायला शिकवले. आम्ही वाड्यातील शेजारणीं बरोबर नटून थटून नदीवर जाऊन गौरी घेऊन आलो. छोटासा गडू, त्यावर ठेवायला ताटली, गौरीची पानं,(तेरड्याची पाने) हळद कुंकू, फुलं सर्व घेऊन पाणवठ्यावर गेलो. तिथे गडूत थोडसं पाणी, त्यावरच्या ताटलीत पाच खडे ठेवून त्याची पूजा केली. हळद कुंकू,वस्त्र, फुल वाहिले. तिथून येताना तोंडात जवळ घेऊन तसंच यायचं, मागं वळून पहायचं नाही, असे काही काही रितीभाती चे नियम मला शिकायला मिळाले. घरी आलं की दारातच ती पाण्याची चूळ बाहेर टाकायची. आणि त्या गौरीला ओवाळून पायावर दूध-पाणी घालून घरात घेतलं जाई. घरात आलं की प्रत्येक खोलीत गौरीसह जायचं. तिथे जाऊन ‘इथे काय आहे? या प्रश्नाला’ उदंड आहे!’ असं उत्तर द्यायचं! अशी ही सोन्याच्या पावली येणारी गौर गणपतीच्या जवळ आणून बसवायची!ते झाल्यानंतर गौरी आणणारीची ओटी भरायची हे सर्व छान साजरे केले जायचे. नवीन साड्या, दाग दागिने घालून मिरवत मिरवत नवीन सुनेकडून गौर आणण्याचा आनंद काही वेगळाच असे.
गौरी आणल्या की रात्री गौरीला भाजी-भाकरीचा नैवेद्य असे. दुसऱ्या दिवशी गौरी जेवणाची तयारी आधीच केली जाई. गौरी जेवणाच्या दिवशी बायकांची धावपळ असे.एकमेकीकडे पाठशिवणी दिल्यासारख्या सवाष्ण म्हणून बायका जात असत. ते सर्व एकमेकीच्या सोईने केले जाई. एकदाचे गौरी जेवण झाले की संध्याकाळच्या हळदी कुंकवाची तयारी करायची. संध्याकाळी आसपासच्या घरातून हळदी कुंकू घेऊन यायचे आणि आपल्या घरी बायका ना हळदीकुंकवासाठी बोलवायचे. अशी धावपळ असायची, पण त्यातही खूप मोठा आनंद मिळत असे. कदाचित संस्काराचा परिणाम असेल पण हे सर्व आवडत होते. काळाबरोबर आता थोडे बदल करायलाच हवेत. आपल्या पुढच्या पिढीला नोकरी, व्यवसाय यातून वेळ काढून सर्व करणे अवघड जाते तरीही त्या हौसेने जमेल तितके करतात याचे कौतुक वाटते.
एकदा का गौरी जेवणाचा दिवस झाला की, गौरी-गणपती जाणार म्हणून मनाला हुरहुर लागत असे. गौरी गणपतीचे पाच-सहा दिवस इतके धामधुमीत उत्साहात जात की खरोखरच घरी पाहुणे आल्यासारखे वाटे. त्या पाहुण्यांना निरोप देताना मनापासून वाईट वाटे. नेहमीप्रमाणे गौरी, गणपती घेऊन विसर्जनाला गेले की मन भरून येते! निरोप देताना दही भात, तळलेले मोदक, करंजी यांची शिदोरी गणपती, गौरीसाठी दिली जाई. तिथून येताना पाण्या जवळची थोडीशी माती, खडे बरोबर घेऊन यायचे आणि ते गौरी गणपतीच्या रिकाम्या जागी ठेवायचे! एकदम रिकामी जागा नको म्हणून तिथे एखादे देवाचे पुस्तक ठेवायची आमच्याकडे प्रथा होती. गणपतीचा हा सगळा सोहळा आनंददायी केला जाई.
कितीही संकटे आली तरी आपण ती बाजूला सारून या उत्सवाला आनंदाने सामोरे जातो.
शेवटी ते संकट दूर करणारा विघ्नहर्ता गजाननच आहे याची आपल्याला खात्री असते.
आता ही आलेली वादळे, कोरोना आणि इतर संकटे दूर करून गणपती आपल्याला चांगले दिवस दाखवून देईल ही मनाची खात्री आहे. गौरी गणपती कडे एवढेच मनापासून मागणी आहे!
प्रत्येकवर्षी गणपती आले की गिरगावातील वेगवेगळ्या गणपतींची आठवण येतेच.
सहा महिने आधीपासून रविवारी गणपती मंडळांच्या मिटींग्स चालू व्हायच्या .वाडीतील काही बुजुर्ग लोकाना अध्यक्ष,सचिव, खजिनदार अशी पदे देऊन सार्वजनिक मंडळाची नेमणूक व्हायची. वर्गणीवर चर्चा व्हायची, वाद आणि काही वेळा भांडणेही होत असत. पण त्यामुळे कधी गणेशोत्सवात विघ्न येत नसे. सगळेजण गणेशोत्सव कसा चांगला होईल ह्यासाठी जोमाने कामाला लागायचे.
—- पण १९८७ च्या हेमराजवाडीच्या गणपतीची तयारी मात्र एक वर्ष आधीपासूनच चालू होती, कारण त्यावर्षी हेमराजवाडीतल्या गणपतीला ५० वर्षे होणार होती. त्यामुळे ते गणपतीउत्सवाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष होते. त्याची संपूर्ण जबाबदारी अशा कामात नेहेमी आघाडीवर असणाऱ्या वाडीतील चार तरुणांनी घेतली होती. वाडीतील असंख्य तरुण कार्यकर्ते त्यांच्या मदतीला होते. त्यामुळेच सुवर्णमहोत्सवी शिवधनुष्य वाडीतल्या रहिवाश्यांच्या साथीने व्यवस्थित उचलले गेले. सुवर्ण महोत्सवाची तयारी पद्धतशीरपणे चालू होती.
एक महिना शिल्लक असताना बाबूच्या डोक्यात एक भन्नाट कल्पना आली. तसे त्याच्या डोक्यात भन्नाट कल्पना येणे हे नवीन नव्हते. त्याने सांगितले, ” ह्यावर्षी आपण गणपतीला खरोखरच्या हत्तीवरून आणायचे “. सुरुवातीला सगळ्यांनी त्याला वेड्यात काढले . जोखीम खूप आहे– पोलीस परमिशन मिळणे मुश्किल आहे —हत्ती गर्दी बघून उधळू शकतो –अशी अनेक कारणे सांगून सगळ्यांनी त्याला हा विचार डोक्यातून काढायला सांगितला. पण बाबू असा सहजासहजी हार मानणारा नव्हता—-
परळच्या पुलाखाली एक माहूत त्याचा हत्ती घेऊन राहत होता. तेथे जाऊन त्याने प्रथम त्या माहुताला तयार केले.. नंतर जवळपास पंधरा दिवस, रोज रात्री त्या हत्तीजवळ जाऊन कधी फटाक्यातला बॉंम्ब लाव, फटाक्याची माळ लाव, तर कधी ढोलताशा वाजव असे करून हत्ती दचकतो का, उधळतो का ह्याचे निरीक्षण केले. जेव्हा सगळ्यांना खात्री पटली की हत्तीवरून गणपती आणण्यात काहीच धोका नाही, तेव्हा सर्वसंमत्तीने त्यावर शिक्कामोर्तब झाले. आता पोलीस संमतीची गरज होती. त्याकाळी दक्षिण भारतात देवांच्या मिरवणुका हत्तीवरून निघायच्या हे टीव्हीवर बघायला मिळायचे. पण महाराष्ट्रात तरी तसे कधी दिसले नव्हते. तेव्हाचे एक राजकीय नेते वाडीतच रहात असल्याने पोलीस संमतीची बोलणी झाली, पण लेखी संमती मिळणे शक्य नव्हते. त्यामुळे,’ तुमच्या जबाबदारीवर मिरवणूक काढा आणि काही अघटित घडल्यास कारवाईला सामोरे जाण्यास तयार रहा,’ या अटीवर, गणपतीचे आगमन हत्तीवरून होणार हे नक्की झाले, आणि पूर्ण गिरगावात हेमराजवाडीच्या गणपतीची चर्चा सुरु झाली.
गणेशचतुर्थीच्या दिवशी पहाटे हत्तीला कोमट पाण्याने आंघोळ घालून दुधाचा अभिषेक केला गेला. सोंडपट्टी आणि अंगावर झालर चढवून सजविण्यात आले. सजवलेल्या अंबारीत बाप्पांची मूर्ती ठेवण्यात आली.पुढे राजदंड आणि मागे छत्र घेऊन मावळे उभे केले गेले. ‘गणपती बाप्पा मोरया’ अशी सामुदायिक आरोळी दिली गेली. सनई चौघडा आणि बँड पथक वाजविण्यास सज्जच होते. ‘गजानना श्रीगणराया आधी वंदू तुझ मोरया’ हे गाणे बँडवर वाजविण्यास सुरवात झाली. सगळे कार्यकर्ते मिरवणुकीत काही अघटित घडू नये ह्याची दक्षता घेत होते. गणपतीबरोबर एकाला अंबारीत बसवून, जितेकर वाडीतून वाजतगाजत मिरवणूक सुरु झाली. सी पी टॅंक वरून फडके वाडीच्या गणपतीवरून, गिरगावातून मिरवणूक हेमराजवाडीत आली. गणपतीचे वाडीत आगमन झाल्यावर नऊवारी साड्या नेसून, नथी घालून, केसांत गजरे माळून १५१ सुवासिनींनी गणपतीला औक्षण केले. त्यादिवशी हेमराजवाडीत सगळे खरंच ‘ न भूतो न भविष्यती ‘ असेच घडत होते. गणरायाचे आगमन गजराजाच्या अंबारीतून– असे आधी कधीच घडले नव्हते आणि त्यानंतरही आजपर्यंत कधीही घडले नाही— ते स्मृती पटलावरून कधीच विरणारेही नाही. .
गणपती स्थानापन्न झाला आणि गणपतीउत्सव सुरु झाला. नेहमीपेक्षा मोठे स्टेज आणि सजवलेला मांडव उत्सवाची भव्यता वाढवत होता . तेव्हाच्या महापौरांच्या हस्ते सुवर्णमहोत्सवी उत्सवाचे उदघाटन झाले.
दहाही दिवस सकाळसंध्याकाळच्या प्रसादाचा मान कोणाचा ह्याचे ‘आरक्षण’ झालेलेच होते. प्रत्येकालाच आपला हातभार लागावा असे वाटत असल्याने, जमेल तसा प्रत्येकजण गणपतीची सेवा करीत होता
रात्री पन्नासाव्या वर्षाला शोभेल असे करमणुकीचे कार्यक्रम होत होते.
सुवर्णमहोत्सवाची भव्यता जाणवत होती. त्यासाठी मंडळाला पैशाची गरज होती म्हणून लॉटरी काढण्यात आली होती. आधी एक महिन्यापासून लॉटरी चालू करून पहिले बक्षीस स्कुटर ठेवले होते. त्याकाळी स्कुटर घेणेही सगळ्यांना शक्य नसे. छोटेसे स्टेज करून त्यावर स्कुटरचे प्रदर्शनही केले होते. पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नव्हता. शेवटचे तीन दिवस राहिले होते. मी लॉटरी विकायची जबाबदारी घेतली. शेवटच्या तीन दिवसात लहान मुलांना पँट- शर्ट आणि टाय लावून वाडीच्या नाक्यावर उभे केले. माइकवरून प्रत्येकाला तिकीट घेण्यासाठी गळ घातली जाऊ लागली. मोठ्या मुलांना सिग्नलला बसमध्ये चढवून तिकीटे विकायला पाठविले, ज्याला प्रतिसादही चांगला मिळाला. “ लॉटरीचे तिकिट घ्या आणि बसऐवजी स्कुटरवरून घरी जा” असे आवाहन करत तीन दिवसात सगळी तिकीट विकली गेली.आवश्यक पैसे जमा झाले. निकाल काढायला झावबावाडीतल्या स्वप्नील जोशी या तेव्हाच्या फेमस बालनटाला बोलाविले होते. एक दिवस वाडीतल्या रहिवाश्याना जेवण ठेवले होते.आवर्जून वाडीच्या माहेरवाशीणीना, आणि वाडी सोडून गेलेल्या माजी रहिवाश्यानाही बोलाविले होते. त्यादिवशी संपूर्ण वाडीत एक वेगळेच चैतन्य नांदत होते.
गणपती विसर्जनाचा दिवस उजाडला. दहा दिवस कसे गेले ते कळलेच नाही.. बाप्पासाठी निरोपाच्या दिवशीही काहीतरी वेगळंच असणार हे नक्की होते. फुलांनी सजवलेला चार सफेद घोड्यांचा रथ बाप्पासाठी तयार होता. पुढे ढोल — लेझीम –आणि मागे रथात बसलेला बाप्पा, अशी मिरवणुकीला सुरुवात झाली. बाप्पा परत चालले म्हणून सगळी वाडीच मिरवणुकीत सामील झाली होती. प्रत्येकाच्याच डोळ्यात पाणी होते. अशातऱ्हेने हेमराजवाडीतील आगळयावेगळया सुवर्णमहोत्सवी गणेशोत्सवाची सांगता झाली.
————-खरंच काही आठवणी विसरता नाही येत —जागा बदलल्या तरी ओढ नाही संपत—- अंतर वाढले म्हणून प्रेम नाही आटत.
हेमराजवाडीचे वेगळेपण हेमराजवाडी सोडल्यावरच जास्त जाणवते. गिरगाव सोडलेल्या प्रत्येक गिरगावकरची आपल्या वाडीबद्दल अशीच भावना असेल ह्याची मला खात्री आहे.
” मावशी, सॉरी हं जरा उशीर झााला, पण थोडे बोलायचे होते.”
” अग बोल ना, काय आहे प्रॉब्लेम.”
” कुठून सुरवात करू, तेच समजत नाहीये मला…. तुम्हाला तर माहित आहे, मी सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे, माझी जायची वेळ नक्की, पण यायची कधीच लवकर नसते हो. फार धावपळ होते माझी. तरीही, होईल ते सगळं करत असते मी. आत्ताच प्रमोशन झालं आणि पगारही छान वाढला माझा. पण कसं सांगू , माझी मुलं सासूबाई सांभाळतात. खूप मायाही करतात, लक्ष देतात मुलांवर. पण परवा मी सहज भाजी केली तर अमोल म्हणाला,’ शी ! आजीसारखी नाही झाली भाजी. मला नको ही डब्यात.’ — असं अनेक वेळा झालंय, पण मी दुर्लक्ष केलं ! पण हल्ली हे वरचेवर व्हायला लागलंय. मुलांना माझ्या कष्टाची किंमत वाटत नाही, असं वाटतं मला. बघा ना, माझ्या कंपनीतून कर्ज काढून, हे मोठं घर आम्ही घेऊ शकलो. दोघं कमावतो, म्हणून हे शक्य झालंय ना ! पण– मुलं मला असं बोलली तर सासूबाईंना सूक्ष्म आनंदच होतो. त्या त्यांना रागवत नाहीतच. शिवाय, ‘ आई, आजी कित्ती कामं करते घरात. तू तर फक्त ऑफिस मध्ये जातेस ‘ असंही अबोली म्हणाली मला. लहान आहेत अजून मुले, पण मला हे खूप लागले.— मला हा तिढा कसा सोडवावा हे समजतच नाहीये. माझा नवरा यात काहीच बोलत नाही. मी इतकी दमते हो, की मला भांडायची शक्तीच उरत नाही… मला आता हे सगळं झेपेनासे झालंय ! तुम्हीच सांगा ना आता काहीतरी उपाय !” — एका दमात एवढं सगळं बोलली ती .
” स्नेहा, तुझी आई काय म्हणली यावर ?”
” ती म्हणाली, तू लक्ष देऊ नको ग. करतात ना त्या सगळं, मग घे थोडं ऐकून. ”
” अहो, त्यांना बाई ठेवलेली चालत नाही. कुरकुर करून देतात घालवून. म्हणतात,
‘ आम्हाला बाईच्या पोळ्या आवडत नाहीत. ‘ मला नाही जमत हो पोळ्या करून मग ऑफिसला ७ लाच जायला. ”
” हे बघ स्नेहा, अजिबात रडू नकोस. एवढी हुषार आणि गुणी मुलगी तू , अशी खचून जाऊ नकोस. हे बघ. मी सांगते ते ऐकशील का? रविवारी सुट्टी असते ना तुला, तर सगळ्यांना एकत्र बोलाव. त्या आधीच, तुमच्या सोसायटी मधली चांगली बाई शोधून, तिला पक्की करून ठेव. आहे का अशी कोणी ? ”
” अहो एक मावशी आहे ना, पण सासूबाई नको म्हणतात. “
” ते सोड ग !– तर त्या बाईला भरपूर पगार कबूल कर आणि बोलवायला लाग. त्या आधी मिटिंग घे घरात. गोड शब्दात, सासूबाईंना सांग–‘ तुम्हाला खूप काम पडतं आणि आता तर मला आणखी उशीर होईल, म्हणून मी या बाई बोलावल्या आहेत. या सर्व स्वयंपाक उत्तम करतील. समोरच्या गोगटे मावशींकडे त्याच करतात. मी चौकशी केलीय, असेही सांग.आणि हो, मुलांना, त्यांच्या समोरच सांग,’ हे बघा, आजीला खूप काम पडतं की नाही, मग आपण त्रास नाही द्यायचा आजीला– उलट तिचा त्रास कमी करायचा . . आणि मी नोकरी आपल्या घरासाठीच करते ना , मग मी नाही सतत घरात राहू शकत. ”
“बरं. मी खरं तर मुलांना आधीपासूनच असं समजावत होते की , ‘ तुम्हा दोघांनाही मागच्या महिन्यात ट्रेकला पाठवले. तेव्हा शेजारच्या सुबोधला त्याचे आई बाबा पाठवू शकले नाहीत. ते का? तर तेवढे पैसे ते देऊ शकणार नव्हते, हो ना अमोल? ‘ –त्यावर तो असही म्हणाला की, ‘ हो आई ! सुबोध म्हणाला सुद्धा मला की , ‘तुझी मज्जा आहे, तुझी आई पण नोकरी करते. माझे बाबा म्हणाले, एवढे पैसे मी नाही देऊ शकत तुला. एकट्याच्या पगारात नाही भागत बाबा.’ —मी लगेच तो धागा पकडत त्याला म्हटलं होतं की, ‘ बघ अमोल, हे पटले ना तुला ! मग आता, आपण आजीचा भार हलका करूया. त्यासाठी आता लीलामावशी येईल आपल्या कडे कामाला, चालेल ना ?’ — यावर मात्र तेव्हा तो काहीच बोलला नाही. “
” हे बघ स्नेहा, तू हे करून बघ. सासूबाईंना जरा राग येईल, पण त्यांनाही मोकळीक मिळेल ग.
आणि हो , त्यांना दरमहा पॉकेट मनी देत जा. सगळे आयुष्य कष्टात गेलेय त्यांचे…. मग बघ चित्र कसे बदलेल ! आणि दोन वर्षातून एकदा, कुठे तरी चांगल्या कंपनी बरोबर ट्रीपलाही पाठव दोघांना. ”
स्नेहाल बहुदा पटलं असावं. ती निघून गेली—-
—–चार महिन्यांनी ती हसत हसतच आली, आणि माझ्या हातात एक छान परफ्युमची बाटली ठेवली.
” अग हे काय, आणि कशाला?”
” सांगते ना मावशी. तुमचा सल्ला अगदी रामबाण ठरला हो. मी अगदी असेच केले.
आता तर सासूबाई इतक्या खूष असतात. पहिल्यांदा, लीलाबाईंशी उभा दावा होता. पण हळूहळू, आवडायला लागला त्यांचा स्वयंपाक ! शिवाय, मी एक मुलगीही ठेवलीय वरकाम करायला. सगळे करते ती, म्हणून घरही छान राहते. आणि सासूबाईंचीही चिडचिड होत नाही. आता तर लीला बाईंशी गट्टीच जमलीय. तुम्ही सांगितल्या प्रमाणे, मी त्यांच्या हातात पैसे ठेवले, तर म्हणाल्या मला, ‘ कशाला ग? ‘–म्हटले अहो घ्या, सासूबाई. खूप केलेत कष्ट, आता करा खर्च मनासारखा. मावशी, हे ऐकून डोळ्यात पाणी आले हो त्यांच्या. म्हणाल्या, ‘ बाई ग. कोणीही नाही ग मला असा पॉकेट मनी दिला कधी ‘.—आता आमचे घर एकदम खूष आहे. पोरेही आता म्हणतात , ‘ आज्जी, तू आणि आजोबा जा भेळ खायला. मज्जा करा.’–मावशी, तुम्ही किती मस्त सल्ला दिलात.” —
—गोष्टी छोट्या असतात, पण लक्षातच येत नाहीत आमच्या. —
स्नेहाने मला मिठी मारली. म्हणाली, ” खूप छान सल्ला दिलात आणि माझा संसार मला परत मिळाला. नाहीतर मी खरोखरच चालले होते हो डिप्रेशन मध्ये. पण आता सगळे मस्त आहे. ”
–आणि माझे आभार मानून स्नेहा गेली.
—-बघा ना, छोट्याशाच गोष्टी, पण अमलात आणल्या, की सुखाच्या होतात !
नुकतीच श्रीकृष्ण जन्माष्टमी झाली.. हा भारतभरात मोठ्या उत्साहात साजरा होणारा सण! आणि आमच्या घरातही.. जन्मष्टमी म्हणजे “श्रीकृष्णाचा हॅप्पा” (हॅप्पी बर्थडे) म्हणून सकाळीच वैदेहीने तिच्या या “मित्राच्या” पूजेची तयारी केली.. सकाळीच देवासमोर बसून आपल्या लाडक्या श्रीकृष्णाला “जन्मदिनमिदं…” म्हणून शुभेच्छा दिल्या, आणि मग घरातील देव्हाऱ्या व्यतिरिक्त असलेले बाळकृष्ण/श्रीकृष्ण गोळा करून देव्हाऱ्याशेजारी आपला वेगळा पाट मांडला, आणि आजोबांच्या बरोबर आमचीपण जन्माष्टमीची पूजा संपन्न झाली! (त्यात “दिवसभर सॉफ्ट कृष्ण सुद्धा हलवायचा नाही हं पूजेतून, आजी!” अशी मला दटावणी पण झाली)
साक्षात भगवंताचा हॅप्पा साजरा करणारी ही “सहज भक्ती” सर्वांनाच मिळावी हीच त्या श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरणी आज जन्माष्टमी निमित्त प्रार्थना!
घरी आल्यावर हातपाय धुतलेस का? चल उठ आधी, तशीच बसलियेस घाणेरडी! अग जेवायला बसायचं ना, हात धुतलेस का स्वच्छ? संध्याकाळ झाली, आधी तोंड धू आणि नीट केस विंचरून वेणी घाल. तोंड पुसायचा टॉवेल हात पुसायला घेऊ नको ग, गलिच्छ कुठली! बाथरूम मधून बाहेर येताना पाय कोरडे कर, ओले पाय घेऊन फिरू नको घरभर! केस स्वयंपाकघरात नको ग विंचरू, अन्नात जातील, शिळ्या भाताचा चमचा ताज्या भाताला वापरू नकोस, खराब होईल तो, दुधाची पातेली एकदम वरच्या खणात ग फ्रीजमध्ये, खालती नको ठेऊ! वाट्टेल त्या भांड्यात दुध नाही तापवायच ग. तुझ्या भांड्याने पाणी पी, माझं घेऊ नकोस, अग केस पुसायच्या पंचाने अंग नको पुसू, बेक्कार नुसती!!! खोकताना तोंडावर रुमाल घे, कितीवेळा सांगायचं, आणि तो रुमाल स्वतः धू, बाकीच्या कपड्यात टाकू नको धुवायला, दुसऱ्याशी बोलताना चांगलं हातभार अंतर ठेवून उभी रहा, थुंकी उडते कधीकधी ?. कशाला जाता येता मिठ्या मारायच्या एकमेकांना, घाम असतो, धूळ असते अंगाला ती लागेल ना! काहीतरी फ्याड एकेक, काय ते प्रेम लांबून करा!!! चप्पल घालून घरात आलीस तर याद राख, काढ आधी ती दारात. खजूर खल्लास, बी टाकून दे लगेच, तशीच ठेवायची नाही,तोंडातली आहे ना ती? नीट जेव, शीत तळहाताला कस लागतं ग तुझं? कसं जेवत्येस! ताट स्वच्छ कर, आणि पाणी घालून ठेव, करवडेल नाहीतर! तोंडात घास असताना बोलू नकोस, इतकं काय महत्वाचं सांगायचंय ??
——–तात्पर्य काय? तुम्हाला जर असं वाढवलं गेलं असेल, तर कोरोना ची अजिबात चिंता करू नका, कारण आज सगळं मेडिकल सायन्स जे सांगतंय, ते आपल्या पितरांनी आपल्याला लहानपणीच शिकवलंय. तेव्हा जाच वाटला खरा, पण आज ह्याच सवयी आपलं कोरोना पासून रक्षण करतील. तेव्हा काळजी करू नका, जसे वागत आलायत तसेच वागत रहा .
——–एक शंका, आपल्या पूर्वजांचे अस्वस्थ आत्मे तर कोरोनाच्या रूपाने परत आले नाहीत जगाला स्वच्छता शिकवायला??? नाही म्हणजे, इंग्लंड चा राजा पण शेकहँड करायच्या ऐवजी नमस्कार करतोय म्हणे ??
संग्रहिका : सौ. स्मिता पंडित
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
‘राखीची गोष्ट’ सांगतो. जरा वेगळीये. म्हणूनच तर तुम्हाला सांगायचीय. महिनाभरापूर्वीची गोष्ट.लेकीच्या पाच सहा मैत्रिणी आल्या होत्या आमच्या दुकानात.. इंडियन आर्मीसाठी एखादी स्पेशल राखी आहे का हो तुमच्याकडे ? त्यातल्या एकीनं विचारलं. मला कन्सेप्ट आवडली. मी लगेच सूरतला आमच्या सप्लायरला काॅल लावला. त्यालाही कन्सेप्ट आवडली. तिरंगा, आर्मी टँक आणि स्टेनगनधारी वीर जवान असं डिझाईन असणारी तिरंगा राखी आलीये या वर्षी मार्केटमधे..त्यावर ‘वीर जवान , देश की शान’ असं लिहलंय… लोकांनाही खूप पसंत पडत्येय ही राखी.
लेक खूप मागे लागलीये. तिच्या पाच सहा मैत्रिणींचा ग्रुप जायचाय तिकडे जैसलमेरला.खरं तर काजल राखी घेऊन जायचीयेय.तीच ती आर्मीवाली राखी.काजलचे आई बाबाही आहेत बरोबर.तिचे बाबा रिटायर्ड कर्नल कृष्णप्रकाश सिन्हा. आर्मीवालं घराणं आहे त्यांचं. प्रत्येक पिढीत एक तरी आर्मीत आहेच. ग्रेट.
तर काय सांगत होतो ? परमिशन्स,रिझर्व्हेशन्स वगैरे सगळे सोपस्कार झालेत. माझाच धीर होत नव्हता. काल कर्नलसाहेबांचा फोन आला.”बच्ची की चिंता मत करो , हम है ना !”. मी कशाला नाही म्हणतोय…?
लेक खुष. लेक खुष तो तिचा बाबाही खुष.
आत्ता लेकीचा फोन आला होता. जाम एक्सायटेड होती.
ती काय म्हणाली ते ऐका. “बाबा, आज सकाळी जेसलमेरला पोचलो. तिथून चाळीस किलोमीटरवरआहे ही चेकपोस्ट. इकडेतिकडे नुसतं वाळवंट. रणरणतं ऊन. चाळीसच्या वर टेम्परेचर. वाळूत रेघ मारावी तसलं तारांचं फेन्सींग. पलीकडे नापाक पाकिस्तान. तिथल्या प्रत्येक गोळीच्या टप्प्यात होतो आम्ही. मोस्ट थ्रिलींग.असं वाटलं स्टेनगन घ्यावी,ध डधड फायर करावं आणि Let’s close the matter forever”
“280 किलोमीटरच्या आसपास पसरलेली बाॅर्डर आहे इथली. 150 च्या आसपास चेकपोस्ट.काही ठिकाणी दलदल, चिखल.दिवस, रात्र, ऊन, पाऊस नो एक्स्यूझ. 24×7 चा खरा इथं समजला. आॅलवेज आॅन ड्यूटी.
बाबा मोस्ट शाॅकींग….आम्ही राख्या घेवून गेलेलो. ऊडालोच. काजलचा भाऊ नही मोठी बहीण होती तिथं. राखी नाव तिचं. तिच्यासारख्या अजून 399 होत्या तिथं.400 जणींची बटालियन आहे ही. या बटालियनचं नावच कसलं भारीये. ‘सीमा भवानी’. आम्ही राखीताई आणि तिथल्या काही जणींना औक्षण केलं. राखी बांधली. मिठाई भरवली.दे वेयर व्हेरी हॅप्पी.दुर्गा होती प्रत्येक जण.मर्दानी. प्रहारी. पलीकडच्या बाजूला ओरडून सांगितलंय.’चड्डीत रहायचं,नाहीतर….’.बाबा, आयुष्यात विसरणार नाही आजचा दिवस…”
तासाभरानं मी कर्नलसाहेबांना फोन लावला. मनापासून थँक्स म्हणलं. ते गहिवरून बोलत होते.
’93 की बात है.कश्मीर में पोस्टींग थी हमारी.अनंतनाग के पास एक सर्च आॅपरेशन चालू था. पंडित के घर को अॅटॅक किया था मिलिटंटस् ने. आधा घंटा फायरिंग चालू था. दो को मारा. दो भाग गये …… घर के अंदर घुसे तो सब खत्म हुआ था. पूरी फॅमीली लाल रंग की होली खेल चुकी थी. बेचारा बाप आखरी सास गिन रहा था. कपट के अंदर तीन साल की बच्ची को छिपाया था. ‘ईसे संभालो’ बोल के वो बाप मर गया. मैं भी बाप हूँ. गोद ले लिया वो नन्हीसी परी को.. वही हमारी बडी बेटी राखी.’
शाॅक्ड मी होतो आता. राखीची गोष्ट. मी कधीच ऐकली नव्हती. जो रक्षण करतो तो भाऊ.आता रक्षण करणारी बहिण सुद्धा. राखीचा धागा किती स्ट्राँग आहे ते समजलं आज. सीमेवरच्या एका तरी ‘जवाना’ला नाहीतर ‘सीमाभवानी’ला राखी पाठवायलाच हवी. वुई केअर, वुई रिस्पेक्ट, वुई सॅल्यूट. हा राखीचा धागाच देश बांधून ठेवतोय. सॅल्यूट इंडियन आर्मी. सलाम नमस्ते !
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा.
कौस्तुभ केळकर नगरवाला
संग्रहिका: श्रीमती मीनाक्षी सरदेसाई
सांगली
मो. – 8806955070
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
जे काय म्हणाल ते लागू पडेल त्या रम्य बालपणाला. त्या मंतरलेल्या दिवसांना. पावसाळा आला की मोठ्या प्रमाणेच आम्हा शाळकरी मुलांना सुद्धा श्रावण महिन्याची ओढ लागायची. त्याच्या अनेक कारणामध्ये श्रावणी सोमवारची शाळा फक्त अर्धा दिवस असणे हे एक होतं. तशी श्रावण महिन्यात सुट्ट्यांची रेलचेल असे. गणपती बाप्पा च्या आगमनाची चाहूलहि श्रावण सुरु झाला की लागे.
श्रावणातील शुक्रवार हा आम्हांला खूप आवडायचा. किंबहुना पावसाळ्यातील शुक्रवार म्हणजे तव्यावर भाजलेल्या खमंग चण्यांच्या मुठी तोंडात कोंबून साजरा करायचा वार असायचा. आंबोली चौकुळचा तो पाऊस त्या काळी खऱ्या अर्थाने कोसळायचा. साधारण होळी दरम्यान सुरु झालेला पाऊस गणेश चतुर्थी आली तरी न थकता आपलं अस्तित्व राखून असायचा. ‘ शिगम्यान पावस नी चवतीन गिम ‘ अशी मालवणी म्हणच प्रचलित होती त्यावेळी. अतिवृष्टीमुळे कित्येक वेळा शाळा अर्ध्यावरच सुटे. आमच्या आनंदाचं हेही एक कारण असे. परंतु शुक्रवारी दुपार नंतर आम्ही वर्गात असलो की चणे विकत आणण्यासाठी पैसे गोळा केले जायचे. हि जबाबदारी मॉनिटर वर असायची. फक्त पाच पैसे वर्गणी देऊन मूठभर गरमागरम चणे बुक व्हायचे. आजूबाजूच्या घरातून तवा आणला जायचा. तात्पुरती चूल पेटविली जायची. दुकानातून एक, दोन किलो चणे आणले जायचे. चण्यावर मिठाचे पाणी शिंपडून ते खरपूस भाजले जायचे. हि सगळी कामे करतानाचा आमचा उत्साह कपडे ओले चिंब झाले तरी टिकायचा. घरी गेल्यावर पावसात उनाडक्या केल्या म्हणून आई कडून उत्तरपूजा बांधली जायची ती वेगळी. पण ‘शुक्रवारचे गरम चणे, कुणा हवे का फुसदाणे’ या मस्तीत असे कित्येक पावसाळी शुक्रवार आम्ही बालमित्र मैत्रिणींनी साजरे केलेले अजूनही स्मरणात आहे.
आता ते आठवलं की मनात चणे फुटतात आणि चणे न खाताही ती खरपूस चव जिभेवर रेंगाळते.