सौ.ज्योत्स्ना तानवडे
जीवनरंग
☆ दृष्टिकोन… ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆
” चौकट आपल्या विचारांची “
प्रत्येक गोष्टीला अनेक अर्थ असती
जैसी ज्याची दृष्टी तैसे त्यास भावती |
एकच गोष्ट प्रत्येकाला वेगवेगळी वाटते. एका अंगणात एक मोठी छान रांगोळी काढलेली असते. काही जण ती बघतात.एकाला त्याचा आकार आवडतो, एकाला ती सुबक वाटते,एकाला रंगसंगती आवडते, एक म्हणतो ‘रेघ खूप छान बारीक काढली’, तर दुसरा म्हणतो मध्य थोडा बाजूला गेल्याने बेडौल झाली,एकाला लहान वाटते तर दुसऱ्याला मोठी वाटते. प्रत्येक जण वेगवेगळ्या जागेवरून बघतो, प्रत्येकाची आवड वेगळी, त्यामुळे एकाच रांगोळीवर वेगवेगळे अभिप्राय येतात. सात आंधळे आणि हत्तीची गोष्ट तर सर्वश्रुतच आहे.
हा अनुभव नेहमीच प्रत्ययाला येतो. एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा प्रत्येकाचा दृष्टीकोन वेगळा असतो आणि मग मतमतांतरे होतात.प्रत्येकजण आपापल्या जागी ठाम असतो आणि काही अंशी बरोबरही असतो. अशावेळी नुसता वाद घालत न बसता दुसऱ्याचे विचार, त्याचा दृष्टीकोन समजून घेतला तर आपल्या विचारांना पण वेगळी दिशा मिळू शकते. काही वेळेस आपण कल्पना पण केली नव्हती असा पर्याय मिळू शकतो. यासाठी सर्वात उत्तम उपाय ‘ऐकावे जनाचे अन् करावे मनाचे’. पण आपलेच खरे हा दुराग्रह न करता, आधी जनांचे ऐकावे हे मात्र नक्की. बहुश्रुत असणे हे खूपदा फायद्याचे ठरते.
संसाराच्या एवढ्या मोठ्या वाटचालीनंतर काही गोष्टी मनात पक्क्या रुजल्या आहेत. सुरुवातीला एखादी गोष्ट हवी तशी झाली नाही की त्रास व्हायचा. अनुभवाने बऱ्याच गोष्टी लक्षात आल्या. काही गोष्टी ह्या आपल्या हातात असतात.काही इतरांच्या हातात असतात तर काही दैवाधिन असतात.आपल्या गोष्टी आपण करू हे ठीक आहे. पण हातात नसलेल्यांचे काय करायचे ?
मग विचारसरणीच बदलली.आपल्या हातात असणाऱ्या गोष्टी प्रामाणिकपणे करायच्या, इतर गोष्टींमधील जे शक्य आहेत ते प्रयत्न करायचे आणि आपल्या हातात नसलेले सोडून देऊन शांत रहायचे. जे योग्य असते ते अवश्य घडतेच. फक्त यातले आपले प्रयत्न योग्य, प्रामाणिक आणि पुरेसे असायला हवेत.आपल्या हातात नसलेल्या गोष्टींबद्दल त्रागा करून मनस्ताप वाढवायचा नाही. जे ‘आपले ‘आहे ते आपल्याला मिळतेच. मिळणार नाही ते मिळत नाहीच. मात्र खिलाडूपणाने हे वास्तव स्वीकारायचे. या सकारात्मक वृत्तीने आपला आनंद मात्र शाबूत राहतो.
© सौ. ज्योत्स्ना तानवडे
सातारा
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈