मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ काहीतरी हरवलेले… ☆ सौ. अर्चना गादीकर निकारंगे ☆

सौ. अर्चना गादीकर निकारंगे

??

☆ काहीतरी हरवलेले… ☆ सौ. अर्चना गादीकर निकारंगे 

हल्ली आपल्या आजूबाजूला सध्या बर्‍याच ठिकाणी जुन्या चाळी, जुन्या को- आँप. सोसायट्या रिडेवलपमेंटला जाऊन नवीन नवीन टॉवर होताना दिसताहेत. नुकतीच कानावर अशीच बातमी आमच्या मागच्या ३५ ते ४० वर्षांपूर्वीच्या सोसायटीबद्दल पण ऐकीवात आली. आज दुपारी सहजच खिडकीजवळ उभी राहून पाऊस बघताना ही गोष्ट मनात आली. म्हटले, ” अरे, हो खरच की ! आता या सोसायटीतील लोक पण इथून वेगवेगळ्या ठिकाणी पांगतील. एवढे वर्ष त्यांना पाहत असताना काही चेहर्‍याने, तर काही आणखीन जास्त परिचित होते. सहजच एका घराकडे लक्ष वेधले गेले. आताशा ते घर मुकं झाल्यासारखे वाटत होते. त्या घरात एक १७-१८ वर्षांची मुलगी पाहिल्याचे आठवले. शाळकरी असताना वडीलांचा हात पकडून जाताना तिला बरेच वेळा पाहिले होते. त्यानंतरसुद्धा तिला अधूनमधून मैत्रिणींच्या घोळक्यात पाहिल्याचे आठवते. शैशवावस्थेतून यौवनावस्थेत शिरताना तिच्यात पण खूप बदल झालेला दिसला होता. हळूहळू त्या खिडकीखाली उभे राहून तिला हाका मारणारे आवाज थांबत चालले होते. वाढदिवसाला ऐकू येणारा तो मुलांचा कलकलाट पण थांबलेला दिसत होता. वाढदिवसाच्या छोटेखानी पार्ट्यांना पूर्णविराम मिळाला होता.

एक सळसळतं जिवंतपण आटत होतं हे ध्यानातच येत नव्हतं. बर्‍याच वर्षांचा काळ मागे पडला असावा. नंतर जाऊन कळले की त्या मुलीचे लग्न पण झाले. आता तर त्या खिडकीत शांतता जाणवत होती. तिच्या जाण्याने जणू ते घर एक बडबड आणि एक उत्साह हरवून बसले होते.

दिवसाच्या प्रकाशात ते थोडं हर्षभरीत जाणवत असलं तरी पण नंतर सहजच दिवेलागणीच्या वेळेस त्याकडे लक्ष गेले असता दिव्यांच्या कृत्रिम झगमगाटात ते हरवल्याप्रमाणे वाटत होते. पुढे जाऊन टाॅवरमध्ये नवीन रुपडे लाभले तरी त्याचे ते हरवलेपण त्याला गवसेल का ? हा प्रश्न शेवटी मनामध्ये अनुत्तरीतच राहीला.

© सुश्री अर्चना गादीकर निकारंगे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “विवेकाचा दिवा हृदयात जपून ठेवा…” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

??

☆ “विवेकाचा दिवा हृदयात जपून ठेवा…” ☆ श्री जगदीश काबरे ☆

विवेकाचा दिवा हृदयात जपून ठेवा – हाच या दिवाळीचा सांगावा.

 

हजारो वर्षापासून मेंदूवर चढलेली अज्ञानाची काजळी खरडून काढण्याचा प्रयत्न ज्यांनी केला 

त्यांनाच या अंधाऱ्या संस्कृतीने संपवून टाकले आहे. त्यांनी दिलेला विचार गिळंकृत करून 

समाजाला मोडून-तोडून सांगितला जात आहे. विज्ञान तंत्रज्ञानात जगाने अभूतपूर्व मुसंडी मारलेली असताना 

भारतात आताच्या प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी धर्मग्रंथांची पाने चाळली जात आहेत.

 

डार्विन, न्यूटन, आईन्स्टाईन, स्टीफन हॉकिंग या सगळ्यांना वेड्यांच्या पंक्तीत बसविण्याची सत्तेला घाई झाली आहे. शास्त्रज्ञ म्हणवून घेणारे सोवळे परिधान करून मंदिरात घंटा बडवत बसले आहेत.

राफेल सारख्या अत्याधुनिक फायटर विमानांवर निंबू-मिरची उतरवल्या जात आहेत. गाय, गोमुत्र आणि गोपालनाला राष्ट्रीय स्वरूप आले आहे….. अशा काळात अज्ञानाची काजळी अधिक घट्ट होताना दिसत आहे. विवेक, वैज्ञानिक दृष्टिकोन यांना शत्रुस्थानी मानले जावून नवे अभ्यासक्रम तयार केले जात आहेत.

 

विवेकाचा एक मंद दीप घेवून मूठभर व्यक्ती चार्वाकाच्या काळापासून चालत आहेत, पण त्यांना ध्येय गाठता आले नाही. कारण अविवेक आजही प्रभावीच आहे… परंतु विवेकाने पराभव अजून पत्करला नाही.

 

तुमचाही विवेक धडका देतोय.. मेंदुतील अंधश्रद्धांच्या पोलादी तटबंदींना…

.. त्याला बघा एकदा मोकळे करून…

.. विवेकाचा दीप पेटवून तर बघा.. हृदयाच्या एखाद्या कोनाड्यात…

…. मग बघा सारं विश्व कसं प्रकाशमान होतेय ते… !

© श्री जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ पैठणीवरचं नक्षीदार नातं… भाग – 2 ☆ श्री नितीन सुभाष चंदनशिवे ☆

श्री नितीन सुभाष चंदनशिवे

 

? मनमंजुषेतून ?

पैठणीवरचं नक्षीदार नातं… भाग – 2 ☆ श्री नितीन सुभाष चंदनशिवे 

(बहिणीने मला बजावून ठेवलं. दोन तीन महिने इकडं यायचं नाव काढू नकोस. तिचा राग शांत झाला की मग ये. पण माझं धाडसच होत नव्हतं.) – इथून पुढे —-

तीन महिने होऊन गेले. वहिनीने एकही फोन केला नाही. माझं नाव काढलं तरी ती तिथून उठून जायची. तिचा राग शांत होण्याची लक्षणे दिसत नव्हती. आणि त्यातच आमच्या मोठ्या आत्तीच्या मुलीचे म्हणजे सोनालीचं लग्न ठरलं. वहिनीला घाबरून मी लग्नाला न जाण्याचा निर्णय घेतला. पण सोनालीने स्वतः फोन करून सांगितलं तू मला लग्नात हवा आहेस काहीही करून ये. मी ही मनात ठरवलं. काय व्हायचं ते होऊ दे. असं वहिनीपासून तोंड लपवून कुठवर राहायचं. एकदाच काय असेल ते होऊ दे राडा. जीव तर घेणार नाही ना ती. आणि मी लग्नाच्या दिवशीच डायरेक्ट मंडपात हजर व्हायचं. लग्न करून तिथूनच माघारी यायचं असा निर्णय घेतला.

तो दिवस उगवला. मनात धाकधूक घेऊनच प्रवास केला. आज आपल्याला तुडवलं जाणार आहे. हे मनाशी पक्के ठरवूनच मी तिकीट काढलं होतं. मी विवाहस्थळी पोहचलो. लांब थांबून अंदाज घेतला. तोंडाला रुमाल बांधला होता. नवरदेवाला घोड्यावरून नाचवत मंडपात नेलं जात होतं. मंडप गच्च भरला होता. मी लांबून बघत होतो. आई, बहिणी अण्णा चुलते चुलत्या सगळ्याजणी दिसत होत्या. आणि माझी नजर शोधत होती ती फक्त सुनितावहिनीला. तिला पाहण्यासाठी. तिच्या जवळ जाऊन लहान लेकरू होऊन हट्ट करण्यासाठी कायम आसुसलेला मी. आज वहिनी नजरेला दिसूच नये असं वाटत होतं.

अक्षता वाटप सुरू झालं. नवरा आणि नवरीला आत कुठेतरी नटवत होते. मी तोंडाला रुमाल बांधूनच दबकत दबकत मंडपाजवळ गेलो. दोन्ही बाजूला खुर्च्या अगदी व्यवस्थित लावल्या होत्या. मंडप गच्च भरला होता. लग्नात सगळे नातेवाईक खूप दिवसांनी एकमेकांना भेटत असतात. सगळेजण गप्पा मारत बसले होते. मी आल्याचं कुणालाच कळलं नव्हतं. मी मागेच अक्षता हातात धरून उभा राहिलो. आणि तेवढ्यात माझी चुलत बहीण स्नेहा अचानक माझ्या जवळून जात असताना तिने मला ओळखलं. तिने माझ्या तोंडावरून रुमाल ओढला आणि जोरात ओरडली. “नितीनदादा आलाय इथं”. माझ्या पोटात कळ आली. पण मी पळून जायचं नाही असं ठरवूनच आलो होतो. आणि स्नेहल पळतच ‘आला आला आला ‘ असं करत धावत नवरीच्या रूमकडे गेली.

सुनितावहिनी सोनालीला म्हणजे त्या नवरीला तयार करत होती. आणि तिच्याजवळ ही बातमी गेलीच. “एका दमात सात आठ जणींनी तिला सांगितलं “आलाय बघ तुझा नितीनभावजी” वहिनीने सगळं हातातलं काम सोडलं. ती त्याच वेगाने तिथून बाहेर आली. इतर सगळ्या बायका तिच्या मागे. आणि ती माझ्या नजरेसमोर दिसू लागली. दोघी तिघी जणींनी तिला धरायचा प्रयत्न केला. लग्नात भांडू नकोस म्हणून समजावू लागल्या तशी वहिनी जोरात ओरडली “जे कुणी मध्ये येतील त्यांनाही मी सोडणार नाही. ” तिचा तो अवतार पाहून सगळेजण जागेवर शांत उभे राहिले. साउंड सिस्टम बंद झाली. तसं सगळयांना माहीत होतच मी वहिनीसोबत काय केलेल होतं ते. त्यामुळे मला धडा मिळायला हवा अशी तमाम लोकांची इच्छा होतीच. पण यात गंमत अशी झाली होती. जे नवऱ्याकडचे नवे वऱ्हाडी पाहुणे होते त्यांना यातलं काहीच माहीत नव्हतं. ते माझ्याकडे एखादा पाकीटमार असल्यागत एकटक बघत होते.

दोन्ही बाजूला लोक उभे होते. मी या टोकाला तर वहिनी त्या टोकावरून चालत यायला लागली. तिची एकटक रागीट नजर माझ्यावर रोखलेली. माझ्या पोटात कळ दाटून येत होती. समोरून वहिनी नाही तर तीन महिन्यांपासून आपली बरी न झालेली जखम सांभाळणारी जखमी वाघीणच येत होती. असंच मला वाटत होतं. वहिनी अगदी जवळ आली. मी मान खाली घातली तशी वहिनीने उजव्या हाताने माझ्या डाव्या गालावर खनकन मुस्काडीत वढली. तिच्या हातातल्या दोन तीन बांगड्या फुटून खाली पडल्या. परत दुसऱ्या हाताने दुसऱ्या गालावर वढली. तेव्हाही बांगड्या फुटल्या. मी अडवायला हात वरती केला तर हातावर तिच्या मनगटाचा मोठा दणका बसला. आणि एका बांगडीची काच माझ्या हातात घुसली. एक तुकडा तिच्या मनगटात रुतला. वहिनीने जोरात हाणायला सुरवात केली. मी शांत उभा होतो. समोरचं काहीच दिसत नव्हतं. डोळ्यावर अंधारी यायला लागली. वहिनीने वेग वाढवला. मला वेदना सहन होत नव्हत्या. मी खाली बसलो. कपाळाच्या डाव्या बाजूला वर एक काच घुसली होती. तिथून रक्त येत होतं. डोळा मोठा झाला होता. ओठांवर काही दणके बसले होते त्यामुळे दात ओठात रुतल्यामुळे तिथून ही रक्त येत होतं. वहिनीचा राग शांत होत नव्हता. मी खाली बसलो. तर बाजूची खुर्ची तिने उचलली आणि मला मारण्यासाठी दोन्ही हाताने वर उचलली. पण काय झालं कुणास ठाऊक. तिने खुर्ची बाजूला जोरात आपटली. तिचे दोन्ही पाय तुटले.

अण्णा जवळ आले. “वहिनीला म्हणाले आता बास झालं. जा तू आत. “वहिनी शांत झाली आणि आत निघून गेली. मी तसाच तिथंच बाजूच्या खुर्चीत बसून राहिलो. सगळेजण माझ्याकडे केविलवाणे बघत होते. लग्नात आलेल्या नव्या पोरी बघण्याची लै हौस असायची मला. पण आज मानच वर होत नव्हती.

त्याच अवस्थेत अक्षता टाकल्या. सोनालीचं लग्न झालं. आणि सगळेजण जेवायला गर्दी करू लागले. मला भूक लागली होती. पण कोणत्या तोंडाने जेवायचं हेच कळत नव्हतं. नवऱ्याला आणि नवरीला भेटून जावं म्हणून स्टेजवर गेलो तर सगळेजण बाजूला झाले. सोनालीजवळ जाऊन फक्त दहा सेकंद उभा राहिलो. कुणीच माझ्याशी बोललं नाही. आई आणि अण्णा जवळ आले. आई म्हणाली “जेवण करून घे चल. “मी हुंदके देत मान हलवली. आणि मी पुण्याला चाललोय परत असं म्हणून तिथून काढता पाय घेतला. पावलं टाकत मंडपाच्या बाहेर आलो.

जेवढी मस्करी वहिनीची केली होती त्याहून जास्त अपमान झाला होता. पण वहिनीला एका शब्दाने बोललो नाही. तिने एका खोलीत नेऊन हवं तेवढं मारलं असतं तरी चाललं असतं. असं काहीतरी विचार करून मी रुमालाने तोंड पुसत होतो. जेवणाचा वास दरवळत होता. पण जेवायचं तरी कुठं आणि कसं?नकोच म्हटलं, बाहेर जाऊन खाऊ अस म्हणून निघायला लागलो.

तेवढ्यात सुनितावहिनीने मागून येऊन मानेवर अजून एक फटका हाणला. मी दात ओठ खात रागाने मागे बघितलं तर सुनितावहिनीचे दोन्ही डोळे गच्च भरले होते. माझे ही डोळे गच्च भरून आले. मी हात जोडले आणि म्हणलं “वहिनी माफ कर. माझं चुकलं. अजून काय मारायचं बाकी राहिलं असेल तर सांग घे मार मला. सगळा राग शांत करून टाक”. वहिनी काहीच बोलली नाही. मी तसंच हात जोडून म्हणलं “निघतो वहिनी. एकाच दिवसाची सुट्टी काढून आलो होतो. उशीर होईल जायला गाडी मिळणार नाही” असं म्हणून निरोप घेऊन पाठ तिच्याकडे केली आणि चालायला लागलो तेवढ्यात, माझं मनगट वहिनीने हातात घट्ट धरलं आणि आणि हात जोरात मुरगाळात वहिनी म्हणली. “मला उपाशी ठेवून जाऊच कसं वाटतय भावजी तुम्हाला”. खळकन डोळ्यातून पाणी वाहायला लागलं. मागे फिरलो, आणि वहिनीच्या गळ्यात पडलो. तिच्यापेक्षा माझी उंची वाढली होती. हुंदके बाहेर पडू लागले. वहिनीही रडू लागली. सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं.

सुनितावहिनी पदराने माझं तोंड पुसत होती. आणि एका हाताने मला धरून जिकडे जेवणाची पंगत बसली होती तिकडे घेऊन चालली होती. आणि मला हळूच म्हणत होती “ओय भावजी ती बघा ती हिरव्या ड्रेसमध्ये जी उभी आहे ना ती लै तुमच्याकडे बघतेय बर का लावा जरा सेटिंग” मला हसूही येत होतं आणि रडूही येत होतं. आणि आमच्या घरातल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू उगवताना दिसत होतं.

वहिनीने एका ताटात वाढून घेतलं. दादा एका बाजूला आणि वहिनी एका बाजूला बसली दोघांच्या मध्ये मी. दादाने एक गुलाबजाम माझ्या तोंडात त्याने स्वतःच्या हाताने कोंबला. इकडून वहिनीने भाताचा घास माझ्या ओठाजवळ केला. आणि फोटू वाल्याला आमची सुनिता वहिनी म्हणत होती “अरे ये फोटूवाल्या काढ की आमचा बी एक फोटू”

कॅमेरावाल्याने क्लीक केलं आणि मंडपात गाणं वाजू लागलं.

“पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा

संसारातून वेळ काढूनी खेळ खेळूया नवा

होम मिनिस्टर… होम मिनिस्टर.. होम मिनिस्टर

वहिनी बांदेकर पैठणी घेऊन आला.. ”

आणि डोळ्यातली आसवं पुसत पुसत सुनितावहिनी मला घास भरवू लागली.

अशा कित्येक सुनीतावहिनी प्रत्येकाच्या घरात आहेत. ज्यांच्यापर्यंत पैठणी पोहचलीच नाही. त्या वहिनीपर्यंत आमच्या नक्षीदार नात्याची पैठणी मात्र पोहचती करा.

— समाप्त —

© श्री नितीन सुभाष चंदनशिवे (दंगलकार)

संपर्क – मु. पोस्ट. कवठेमहांकाळ, जि. सांगली.

मो 7020909521

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘माझी शिदोरी…’ भाग-७ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित ☆

सौ राधिका -माजगावकर- पंडित

??

☆ ‘माझी शिदोरी…’ भाग-७ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित

आई जोगेश्वरीची सेवा…

आईने नानांच्या पिठाला मीठ जोडण्यासाठी केलेल्या अनेक उद्योगांपैकी आणखी एक उद्योग म्हणजे पाळणाघर. शेजारच्या दोन मुली आणि रुबी हॉस्पिटलला एक सिस्टर होत्या, योगेशच्याआई म्हणतो आम्ही त्यांना. त्यांची दोन मुलं आणखी एक शेजारचे तान्हे बाळ पण होते. योगेशच्या आईंची शिप्ट ड्युटी असायची. त्यांच्या वेळेप्रमाणे आईने मुलं अगदी नातवंडा सारखी सांभाळली. आई अगदी बांधली गेली होती. ही बाळं मोठी झाली त्यांनाही बाळं झाली, तरी त्या मुलांनी आणि त्यांच्या आयांनी जाणीव ठेवली. जोगेश्वरीचे दर्शन घेऊन त्या आमच्याकडे यायच्या आणि म्हणायच्या, “माजगावकर काकू जोगेश्वरी नंतर दर्शनाचा मान तुमचा आहे. देवी नंतर दर्शन घ्यावं तर ते तुमचचं. “ज्योत से ज्योत जलाते चलो प्रेम की गंगा बहाते चलो, ” हे आई चं ब्रीदवाक्य होत. सेवा भावी वृत्तीमुळे तिने माणसं जोडली, ती म्हणायची कात्री सारखी माणसं तोडू नका, ‘ सुई’ होऊन माणसे जोडा. पै न पै वाचऊन खूप कष्ट करून सुखाचा संसार केला तिने. आईची बँक मजेशीर होती. नाणी जमवून ती एका डब्यात हळदीकुंकू वाहून पूजा करून देव्हाऱ्यात ठेवायची. आईचं रोज लक्ष्मीपूजन व्हायच. आम्ही म्हणायचो “आई तुझी रोजच दिवाळी असते का गं ? रोज लक्ष्मीपूजन करतेस मग रोज लाडू कां नाही गं करत दिवाळीतल्या सारखे?आता कळतंय कशी करणार होती आई लाडू? रेशनची साखर रोजच्यालाच पुरत नव्हती. गुरुविण बाई आईला नेहमी त्यांच्या घरी बोलवायच्या. त्यावेळी देवीपुढे नाणी खूप जमायची, इतकी की नाणी वेगवेगळी करण्यासाठी खूप वेळ जायचा, मान पाठ एक व्हायची. पण देवीची सेवा म्हणून आई ते पण काम करायची. गुरव श्री. भाऊ बेंद्रे हुशार होते त्यांनी रविवार पेठेतून बोहरी आळीतून तीन-चार मोठ्या भोकाच्या चाळण्या आणल्या. आईचं बरचसं काम सोप्प झाल. भोकं बरोब्बर त्या त्या नाण्यांच्या आकाराची असायची त्यामुळे पाच, दहा, 25 पैसे, अशी नाणी त्या चाळणी तून खाली पडायची. घरी पैसे वाचवणारी आई देवी पुढची ती नाणी मोजताना अगदी निरपेक्ष प्रामाणिक असायची. गरिबी फार फार वाईट असते. गुरुविण बाई आईकडे सुरुवातीला लक्ष ठेऊन असायच्या. विश्वासाने आईने त्यांच मन जिंकल. दहा पैसे सुद्धा तिने इकडचे तिकडे केले नाही. चाळून झाल्यानंतर पैसे मोजणी व्हायची वेगवेगळी गाठोडी करून आकडा कागदावर लिहून त्या गाठोड्याची गाठ पक्की व्हायची. देवळातल्या मिळकतीचा आणि त्या गाठोड्यातील पैशांचा गुरव बाईंना अभिमान होता. त्या श्रीमंत होत्या. तितक्याच लहरी पण होत्या. पण आईने त्यांची मर्जी संभाळली. मूड असला तर त्या सोबत म्हणून आईला सिनेमाला घेऊन जायच्या. आणि कधी कधी मुठी मुठीने नाणी पण द्यायच्या. जोगेश्वरी पुढे साड्यांचा ढीग पडायचा. मनात आलं तर त्या नारळ पेढे, तांदूळ, फुटाणे आणि साडीची घडी आईच्या हातात ठेवायच्या. देवीचा प्रसाद म्हणून अपार श्रद्धेने आई ती साडी घ्यायची, आणि दुसऱ्या दिवशी नेसायची तेव्हा आई आम्हाला साक्षात जोगेश्वरीचं भासायची. कधीकधी गुरवबाई भरभरून एकत्र झालेले देवी पुढचे तांदूळ गहू पण आम्हाला द्यायच्या. आई त्याची सुरेख धिरडी करायची. तिची चटणी आणि बटाट्याची भाजी इतकी लाजवाब असायची की समोरच्या उडपी हॉटेलचा मसाला डोसा पण त्याच्यापुढे फिक्का पडायचा. हा जेवणातला सुरेख बदल आणि चविष्टपणा चाखून माझे वडील आईला गंमतीने म्हणायचे, “इंदिराबाई मनात आलं तर देऊळ सुद्धा गुरवीण बाई तुमच्या नावावर करून देतील. ” “काहीतरीच तुमचं! “असं म्हणून आई गालांतल्या गालांत हंसायची. आई नानांच्या गरीबीच्या संसाराला विनोदाची अशी फोडणी असायची. खिडकीतून दिसणाऱ्या जोगेश्वरीच्या कळसाला हात जोडून आई म्हणायची, ” आई जगदंबे देऊळ नको मला, आई अंबे तू मात्र आमच्या जवळ हवीस. आईने मनापासून केलेली प्रार्थना फळाला आली आणि रोड वाइंडिंग मध्ये आमची जागा गेल्याने आम्हाला तिथेच (पोटभरे) पेशवेकालीन मोरोबा दादांच्या वाड्यात आम्हाला जागा मिळाली तेही दिवस आमचे मजेत गेले. धन्यवाद त्या मोरोबा दादांच्या वाड्याला आणि तुम्हालापण..

आई जोगेश्वरी माते तुला त्रिवार वंदन .

– क्रमशः भाग सातवा

© सौ राधिका -माजगावकर- पंडित

पुणे – 51

मो. 8451027554

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ बहीण… ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’ ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

? मनमंजुषेतून ?

☆ बहीण… ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

 

आईनंतर सर्वात जवळचे नाते कोणते असेल तर ते बहिणीचे. बहीण लहान असावी की मोठी यावर वाद होऊ शकतो पण बहीण असावीच असे प्रत्येकाचे मत असेल असे खात्रीने वाटते. ताई आणि माई. – घरात मोठी मुलगी असेल तर घराला आपसूक वळण लागते असे माझे मत आहे. जे आपण आई किंवा बाबांना सांगू शकत नाही ते आपण आपल्या बहिणीला नक्की सांगू शकतो. मन मोकळं करण्यासाठी सर्वात खात्रीचे, जवळचे कोण असेल तर बहीण, कारण तिच्यात आणि आपल्यातील वयाचे अंतर फार नसते त्यामुळे ती आपली मनःस्थिती अधिक सजगतेने समजून घेऊ शकते. कधी ती आपली ‘ढाल’ बनते तर कधी ‘तलवार’!!

बहीण लग्न होऊन प्रथम सासरी जायला निघते तो क्षण भावाच्या आयुष्यातील सर्वात कसोटीचा !! जरी ती सासरी गेली तरी तिची नजर कायम आपल्या भावंडांवर असते. पुढे कालांतराने आई वडील नसले तरी बहिणीमुळे भावाला एकाकीपण येत नाही. ती आपल्या आयुष्यात सावलीसारखी असते. ती शीतल छाया जरुर देते पण आपल्या आयुष्यात अडसर बनत नाही. द्रौपदीने हरीला चिंधी बांधली आणि तिच्या आयुष्याचे ‘सोने’ झाले. *’बहिण अथवा भावासाठी आपल्या आयुष्याची ‘चिंधी’ करणाऱ्या अनेक बहिणी या जगात आहेत. आज आपण त्यांना वंदन करू.

सर्वांस पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा!!!!

© श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

थळ, अलिबाग

मो. – ८३८००१९६७६

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ पैठणीवरचं नक्षीदार नातं… भाग – 1 ☆ श्री नितीन सुभाष चंदनशिवे ☆

श्री नितीन सुभाष चंदनशिवे

 

? मनमंजुषेतून ?

पैठणीवरचं नक्षीदार नातं… भाग – 1 ☆ श्री नितीन सुभाष चंदनशिवे 

झी मराठीवर होममिनिस्टर हा कार्यक्रम सुरू झालेला होता. रोज संध्याकाळी हा कार्यक्रम बघण्यात आमचं कुटुंब एकत्र बसलेलं असायचं. आणि आमच्या वहिनीला इथंच स्वप्नं पडायला सुरुवात झाली. की, होम मिनिस्टर माझ्याही घरी यावा. मलाही पैठणी मिळावी. आणि आपणही टीव्ही वर दिसावं. आणि वहिनी कार्यक्रम संपल्यानंतर आदेश भावजी जो नंबर सांगायचे त्यावर ती रोज मेसेज करू लागली. मी म्हणायचो तिला, “अगं वहिनी ते कशाला येतील आपल्या घरी एवढ्या दूर, ते फक्त पुणे मुंबईतल्याच घरी जात असतात. तू हा नाद सोडून दे. ” त्यावर वहिनी म्हणायची, “नितीन भावजी, बघा एक ना एक दिवस आपल्या घरी होममिनिस्टर येणारच असं म्हणून ती तिच्या कामात व्यस्त व्हायची. आणि मी त्यावर थोबाड बघावं आपलं आरशात” असं बोलून पळून जायचो. त्यावर ती मागून ओरडायची. ” या गिळायला मग बघते कोण देतंय ताट वाढून असं चिडून बोलायची. “आणि घरातले सगळेच खळखळून हसायचे. पण वहिनी अगदी पार त्यात गुंतून गेलेली असायची. प्रत्येक कार्यक्रम तो जवळ बसून बघायची. एकटीच उगाचच हसायची, मोठ्याने खिदळायची. मला गम्मतच वाटायची.

माझी बारावी झाली. आणि मी पुण्यात आलो. काम करून शिकायला लागलो. अधून मधून फोनवर दादाशी आणि वहिणीशी बोलणं व्हायचं. तिला कधी करमत नसलं की ती मला फोन करायची. मला करमत नसलं की मी तिला फोन करायचो. कारण तिच्याच मायेच्या पदराखाली मी मोठा झालो. सुनिता वहिनी माझ्यासाठी आई होती, मोठी बहीण होती, आणि मनातलं सगळं मनमोकळेपणाने बोलण्यासाठी हक्काची जागा होती.

मला तो दिवस आठवतोय. मी कंपनीमध्ये बसलो होतो. आणि समोर लँडलाईन फोन होता. चला म्हणलं वहिनीची जरा गंमत करूया. असं म्हणून मी रुमाल तोंडाला लावला आणि वहिनीला फोन केला, हा लँडलाईन चा नंबर बघून तिने तो कट केला. मी परत लावला मग तिने उचलला. मी जरा मोठ्या आवाजात रुमाल तोंडाला लावून अगदी शुद्ध पुणेरी भाषेत बोललो, “हॅलो, नमस्कार सुनिता चंदनशिवे यांच्याशी आम्ही बोलतोय का?”वहिनी घाबरत होय म्हणाली, मी लगेच पुढचं वाक्य बोललो, “ह आम्ही झी मराठी मधून होम मिनिस्टर या कार्यक्रमामधून बोलतोय आणि आम्ही उद्याच तुमच्या घरी कवठेमहांकाळ ला म्हणजे सांगलीला येतोय. आपली परवानगी आहे असे आम्ही समजावे का?” त्यावर वहिनी मोठ्याने तीन वेळा ” या या या” असं म्हणली. बाकीचं जरा इकडंच तिकडचं बोललो, आणि “उद्या संध्याकाळी आम्ही बरोबर पाच वाजता आपल्या घरी येत आहोत” असं म्हणून मी फोन कट केला. नंतर मी कामात व्यस्त होऊन गेलो. वहिनीला फसवलं याचा मनात आनंद झालेला होता. पण आनंदाने उड्या मारण्याचं माझं वय आता निघून गेलेलं होतं.

गावी मात्र सुनिता वहिनीने सगळीकडे बोंबलत ही बातमी आनंदाने पसरवली. भावाला कामावरून सुट्टी काढून बोलावून घेतलं. तिचा आनंद बघून सगळेच आनंदी झाले. साफसफाई सुरू झाली. नव्या दोन साड्या आणल्या. ही बातमी बायकांच्या जवळची असल्यामुळे आपोआप सगळ्या गावभर झाली. आणि सुनिता वहिनी एकदम सेलिब्रिटी झाली. एवढ्यावरच हे प्रकरण थांबले नाही. वहिनीने तिच्या तीन बहिणी, तिचे दोन भाऊ, माहेरची सगळी माणसं आई वडील, तिच्या मावशी, सगळ्यांना ताबडतोब गाडीला बसायला सांगितलं. बघता बघता बातमी ग्रामपंचायतपर्यंत पोहचली. आपलं गाव टीव्ही वर दिसणार म्हणून सरपंच, उपसरपंच इतर सदस्य आणि विरोधी पक्षातले पण सगळ्यांची मिटिंगसुद्धा बसली. आणि बघता बघता आमचं घर आणि आमच्या सुनिता वहिनीची चर्चा वाऱ्यागत पसरत राहिली. सेलिब्रिटी असल्यागत आमची वहिनी वागू लागली. अचानक तिचं ग्रामीण बोलणं अगदी शुद्ध झालं. तिचं चालणं तिचं बोलणं सगळं बदलून गेलं. आमचा दादाही तिच्या आनंदात हरवून गेला. आणि लग्नात सुद्धा एवढं मेकअपचं सामान आणलं नव्हतं त्याहून कितीतरी जास्त आणि महाग सामान दादाने तिला आणून दिलं. दोन तासात त्याने आणि त्याच्या मित्रानी घर ही रंगवून काढलं. आणि सगळ्या गावात होमिनिस्टरचं वातावरण तयार झालं. बिश्या फोडून आमच्या घरातल्या सगळयांना नवीन कपडे घेतले गेले. मला यातलं एक टक्काही काही माहीत नव्हतं. मी माझ्याच नादात इकडं रमून गेलो. आणि आपण वहिनीला होममिनीस्टर बोलतोय म्हणून फोन केला होता हे ही विसरून गेलो. कारण अशा गमती जमती करणं हा माझा रिकामा उद्योगच होता.

त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळीच तिच्या माहेरहून वीस पंचवीस माणसं लहान लेकरं वेगळीच. अस सगळं गणगोत गोळा झालं. आणि फार मोठा उत्सव असल्यागत वातावरण झालं. नुसतं आमच्या घरातच नाही तर गल्लीतसुद्धा सगळ्यांच्या तोंडात एकच चर्चा एकच विषय आणि तो म्हणजे होममिनिस्टर आणि सुनिता. आणि आमच्या सुनिता वहिनीचा रुबाब म्हणजे काय सांगावं. तिच्यासमोर इतर बायका म्हणजे चिल्लरच. एकटीचीच बडबड, सगळ्यांना आदेश सोडत होती. ये असं करायचं, तसं करायचं कुणी दंगा करायचा नाही. मध्ये मध्ये बोलायचं नाही. आणि सगळेजण तिचा आदेश नम्रपणे ऐकून घेत होते. आणि सुनिता वहिनी एका वेगळ्याच दुनियेत हरवून गेली होती.

सायंकाळचे चार वाजून गेले. घरासमोर गर्दी झाली. सुनिता वहिनी बघावं आणि बघतच राहावं अशी नटली होती. सगळे नातेवाईक नटून थटून बसलेले होते. अजून कसं कुणी आलं नाही म्हणून हळूहळू वातावरण काळजीचं होऊ लागलं. दादाने तिच्या मोबाईलवर आलेल्या म्हणजे मी केलेल्या नंबरवर परत परत फोन करायला सुरुवात केली. पण फोन काही कुणी उचलत नव्हतं. कारण रविवार होता आणि ऑफिस बंद होतं. मी रूमवर झोपलो होतो. काय झालं कुणास ठाऊक, वडिलांना शंका आली आणि त्यांनी मला फोन केला. मी वडिलांचा नंबर फादर म्हणून सेव्ह केला होता. मी फोन उचलला तसे वडील म्हणाले, ” हे बघ मी तुझा बाप आहे, मी जे विचारीन त्याचं एकाच शब्दात उत्तर द्यायचं आणि खरं द्यायचं. “मी घाबरलो, अण्णा असं का बोलतायत म्हणून मी उठुनच बसलो. फोन कानाला आवळून धरला. आणि वडील म्हणाले, ” ते कोण टीव्ही वाले येणारयत म्हणून सुनिताला काल तूच फोन केला होता का?”मी गप्प झालो, वडिलांनी आवाज वाढवून पुन्हा विचारलं आधीच धमकी दिली होती मी पटकन म्हणलं ” होय अण्णा मीच काल आवाज बदलून वहिनीला फोन केला होता. “त्यावर अण्णांनी असल्या शिव्या दिल्या मला की बस्स. आपोआप डोळ्यातून पाणी यायला लागलं. मी फोन कट केला. आणि माझ्या बहिणीला फोन केला, म्हणलं “तायडे, काय सुरुय ग घरी, ?'” त्यावर माझी बहिण इतक्या आनंदाने तिथल्या वातावरणाबद्दल सांगत होती. आणि माझ्या छातीत चमकत चाललं होतं. आणि डोळ्यासमोर हातात हिरव्यागार बांगड्या, तळहातावर मेहंदी काढलेली, आणि नटलेली सुनिता वहिनी दिसू लागली. मी फोन कट केला. आणि मला दम लागला.

तिकडे वडिलांनी सुनिता वहिनीला आणि इतर लोकांना कसं सांगितलं माहीत नाही. पण सुनिता वहिनी मात्र हे सगळं नितीन भावजीने केलं आहे. आपली इतकी मोठी फसवणूक झालीय या धक्क्याने गपकन खालीच बसली होती. ती रडत ही नव्हती कुणाशी बोलत ही नव्हती. एकटक ती दातात ओठ पकडून भिंतीकडे बघत बसली होती. सगळं वातावरण काही काळ शांत झालं होतं. सुनिता वहिनीला हा फार मोठा धक्का बसला होता. आणि सगळ्यांच्या तोंडात एकाच नावाने शिव्या सुरू झाल्या होत्या आणि तो ग्रेट माणूस नितीन चंदनशिवे म्हणजे मी होतो. तिच्या माहेरून आलेल्या तिच्या बहिणी तर वाट्टेल तसं बोलत होत्या. सगळेजण सुनिता वहिणीला एकच वाक्य बोलत होते

” घे तुझा लाडाचा नितीन भावजी. लै बोंबलत होतीस माझा नितीन भावजी माझा नितीन भावजी. कर अजून लाड त्याचा. बस ताटात घेऊन त्यालाच. चांगलं पांग फेडलं बघ तुझ्या भावजीने. ” … समोर भिंतीच्या फळीवर माझा फोटो मी एका काचेच्या फ्रेममध्ये बनवून ठेवला होता. वहिनी अचानक उठली आणि तिने तो फोटो जोरात फरशीवर आपटला. सगळ्या घरात काचा झाल्या. कुणीच काही बोललं नाही.

माझ्या मोबाईलवर सगळ्यांचे फोन यायला सुरुवात झाली. मी उचलायचो कानाला लावायचो आणि शिव्या खायचो. तोंडातून आवाज निघत नव्हता. वहिनीची केलेली मस्करी चांगलीच महागात पडली होती. आनंदाने उत्साहाने भरलेलं घर एका क्षणात शांत झालं. सगळेजण आपल्या आपल्या गावी निघून गेले. आणि सुनिता वहिनी आजारी पडली. चार दिवस घराच्या बाहेर आली नाही. तिने टीव्ही लावला नाही. कुणाशीच बोलली नाही. आईने आणि बहिणीने मला बजावून ठेवलं. दोन तीन महिने इकडं यायचं नाव काढू नकोस. तिचा राग शांत झाला की मग ये. पण माझं धाडसच होत नव्हतं.

– क्रमशः भाग पहिला 

© श्री नितीन सुभाष चंदनशिवे (दंगलकार)

संपर्क – मु. पोस्ट. कवठेमहांकाळ, जि. सांगली.

मो 7020909521

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘औषध नलगे मजला !’ – ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

डाॅ. मीना श्रीवास्तव

??

☆ ‘औषध नलगे मजला !’ – ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव

नमस्कार प्रिय मैत्रांनो ! 

दिवाळीच्या ‘उपहाराचा’ मनमुराद आनंद आपणास घेता यावा म्हणून हा ताजा लेखन प्रपंच! आपल्या आवडीनुसार याला तिखट अथवा गोड (किंवा दोहोंचे कॉम्बो) म्हणून स्वीकारावे.

‘ते शीतलोपचारे जागी झाली हळूच मग बोले |

औषध नलगे मजला, औषध नल गे मजला | 

परिसुनि माता ‘बरे’ म्हणूनी डोले ||

… नलाच्या विरहामुळे आजारी पडलेल्या दमयंतीला औषधोपचार देण्यासाठी वैद्य आले असता, तिने “औषध नलगे मजला” असे उत्तर दिले त्यावरून इतरेजनांनी “तिला औषध नको (नलगे)” असा अर्थ काढला. मात्र तिच्या मनांतील खरी भावना “मला नल हेच औषध (नल गे)” हीच होती. पण संकोचाने ती तसे व्यक्त करू शकत नव्हती. हा सदाबहार श्लेष काव्यालंकार रचणारे पंडित मोरोपंत (कवी मोरेश्वर रामचंद्र पराडकर उर्फ मयूर पंडित १७२९-१७९४) हे मध्ययुगीन मराठी पंडिती काव्य परंपरेतील श्रेष्ठ कवी होते. हे पुराण-काव्य अंमळ जुने झाले. १९५८ साली प्रदर्शित झालेल्या मधुमती या गाजलेल्या चित्रपटातील वैजयंतीमालाच्या गावरान नृत्यकलेने सजलेल्या ‘चढ़ गयो पापी बिछुआ’ या गाण्यात नायिका म्हणते- ‘मंतर झूठा, बैद भी झूठा, पिया घर आ रे ! सरतेशेवटी ‘सैंया को देख के जाने किधर गयो बिछुआ ‘ असे सर्व श्रेय प्रियकराला देऊन मोकळी होते.

मंडळी, आजारामुळे घरात बसायचा जाच सहन करीत लहान मुले रडत-रडत नेमके हेच सांगतात, ‘मला औषध नको ग आई!’ पण त्याचे नाक वगैरे दाबून मधाळ औषधीयुक्त सिरप त्याच्या घशाखाली उतरवल्याशिवाय आईचे इतिकर्तव्य समाधानपूर्वक पूर्णत्वाला जात नाही. आमच्या लहानपणी कोजागिरीच्या पर्वाला लागून महिनाभर ‘भुलाबाईच्या गाण्यांना’ ऊत यायचा. त्यात पुन्हा खाद्य-संस्कृतीला जागत प्रत्येक घरी गाणी म्हटल्यानंतर स्वादिष्ट फराळाचा रतीब असायचा. त्याची सुंदर सांगता कोजागिरीला केशर-मेव्याने युक्त आटीव दुग्धपानाने व्हायची. त्यातले एक गाणे आठवणीत राहिले. आधी तर दोडक्या सासरच्या वैद्याचे वर्णन येते, ‘आला ग सासरचा वैद्य’, अपेक्षेप्रमाणे त्याचे व्यक्तिमत्व ‘फाटके तुटकेच’ असते. मग येणार लाडक्या माहेरचा वैद्य, त्याचे व्यक्तिमत्व साहजिकच राजेशाही असणार… या गाण्यांमधून सासरच्या मंडळींनी वर्षभर केलेल्या छळावर उतारा म्हणून ही गोड गाणी असायची. मात्र या गाण्यातील संदेश असेच सांगतो की – ‘ वैद्य असो वा डॉक्टर, त्याची पर्सनॅलिटी पेशंटसाठी कायमच कौतुकाचा विषय असते. ’ 

मैत्रांनो, आपले सणवार जेवून-खाऊन समाधानाने साजरे करायची आपली अक्षय परंपरा आहे. इतकंच काय, नावालाच निराहारी अशी एकादशीची परंपरा आपण निर्जळा एकादशी म्हणून सुरु ठेवतो. (कोणी तरी म्हटलंय, ‘निर्जळा एकादशीला इतका वैविध्यपूर्ण फराळ करावा की जळाला सुद्धा पोटात जागा असू नये!’) आम्हां भारतीयांचे सेलेब्रेशन खाण्यापिण्याभोवती रिंगण घालत असते. कोणी रुजू होऊ दे नाही तर निवृत्त, पार्टीला पर्याय नाहीच. गेलाबाजार असा कुठलाच प्रसंग मला आठवत नाही जेव्हा खाण्यापिण्यापासून वेगळे होत आपण कांही साजरे करीत असू.

मैत्रांनो, असे कधी होईल कां की आपण मळलेल्या वाटा सोडून अनवट रानवाटा धुंडाळीत एखादे समाजाभिमुख कार्य करू? खात्यापित्या घरच्या लाडक्या आप्तांची अन मैत्रमंडळींची पोटे आधीच तुडुंब भरलेली आहेत. त्यांना पार्टी देण्याऐवजी ज्यांची पोटे खपाटीला गेली आहेत अशा भुकेल्या व्यक्तींना दोन घास खाऊ घालता येतील कां, यावर आपण विचार करायला हवा. त्यांची दारिद्र्याच्या तमाने झाकोळलेली उदासीन दिवाळी उजळायला आपल्या दानाचे दीपदान त्यांचे आयुष्य नक्कीच सुसह्य करील.

तुम्हाला काय वाटतं?

©  डॉ. मीना श्रीवास्तव

ठाणे

मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ती परतली… ☆ सौ. मंजिरी येडूरकर ☆

सुश्री मंजिरी येडूरकर

? मनमंजुषेतून ?

☆ ती परतली…  ☆ सौ.मंजिरी येडूरकर ☆

… जिच्या येण्याअगोदरच आनंद येतो.

… जिच्या स्वागतासाठी अनंत तारे आकाशमार्ग सोडून भूतलावर अवतरतात.

… जिच्यामुळे सारा आसमंत उजळून जातो, गंधाळलेले वारे वाहू लागतात, सारी सृष्टी आनंदाने बेभान होते.

… जिच्या येण्याने नात्यातले अवघडलेपण संपते.

… जिच्या गोजिरवाण्या स्पर्शाने सारी नाती जवळ येतात.

… जिच्यामुळे हळवे प्रेम आणखी गहिरे होते.

… जिच्यामुळे ओंजळभर सुख पासरीभर होते.

… जिच्याकडे कोणताही थिल्लरपणा नाही, फक्त नात्याचंच कोडकौतुक नाही तर मातृत्वाची पूजा आहे, श्रमाची पूजा आहे, व्यापारातील सचोटीची पूजा आहे.

… जिच्यामुळे नात्यांना दीर्घायुष्य लाभते.

… जिच्यामुळे बाजाराला नवचैतन्य लाभते.

… जी, असेल एखादी रुसणारी बहीण, पत्नी पण रुसवा काढण्यातला गोडवा सांगते.

… पर्यावरण प्रेमी बेचैन होतात, पण बाळ गोपाळांचे फुलबाजी पेटवल्यानंतर चमकणारे डोळे, भुईचक्र फिरायला लागले की डोळ्यातून ओसंडून वाहणारे कुतूहल हे तर शब्दातीत आहे. जगात शत्रुत्व वाढवणारे इतके बॉम्ब फुटताहेत, एक बॉम्ब इथेही फुटतो, पण जीविताला संजीवनी देणारा, वित्ताला उभारी देणारा, मित्रत्वाचा, प्रेमाचा संदेश देणारा !

भावनांचा ओलावा पापणीतून पाझरताच ती परतली—-

— पुढच्या वर्षी याहून जास्त आनंद घेऊन येण्याचं वचन देऊन !

… थोडी हुरहूर, थोडी कुरबुर, थोडी हुडहुड मागे ठेऊन !

© सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी जडणघडण… भाग – १६ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ माझी जडणघडण… भाग – १६  ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(सौजन्य : न्यूज स्टोरी टुडे, संपर्क : ९८६९४८४८००)

 घड्याळ

आजकाल मनात निरवानिरवीचे विचार वाहतात.  वेगवेगळ्या वाटांवर,  आयुष्याच्या विविध टप्प्यांवर,  गोळा केलेल्या अनंत वस्तुंचा पसारा स्वतःच्या डोळ्यात आता खूपू  लागतो.  कित्येक वस्तू अशा असतात की ज्यांना हातही लावलेला नसतो.  केवळ हौस म्हणून गोळा केलेला हा पसारा अक्षरशः अंगावर कोसळल्यासारखा जाणवतो.  कधीतरी लागतील म्हणून जपून ठेवलेल्या वस्तूंची अडगळ जाणवू  लागते.  ‘हे सगळं आता आवरलं पाहिजे.  कुणाला तरी द्यावं नाहीतर चक्क घराबाहेर काढून टाकावे’ असे डिस्पोजेलचे विचार तीव्रतेने मनात उफाळतात.  कुठून कशी सुरुवात करावी तेही कळत नाही.  वस्तू आणताना आपण किती सहजतेने आणतो पण तीच वस्तू या घडीला कितीही निरुपयोगी असली तरी टाकून  देण्यासाठी मनाची किती जोरदार तयारी करावी लागते!

शोकेसमधल्या वरच्या फळीवर मला एक घड्याळ दिसतं. स्टीलच्या कोंदणातलं,  पांढऱ्या रंगाचं,  गोलाकार,स्पष्ट अंक आणि काटे असलेलं,  टेबलावर ठेवण्यासाठी विशाल कोनातले स्टीलचे छोटे पाय असलेलं, किल्लीचं  एक जुनं पारंपरिक घड्याळ,  अनेक वर्षांपासून बंद पडलेलं आणि तरीही संग्रही ठेवलेलं.. का? एक अँटिक पीस म्हणून का?की  कुठल्यातरी भावभावनांचा धागा अदृश्यपणे त्यात जोडला गेला असल्यामुळे का?  या भावनांच्या धाग्यांच्या गुंत्यात किती दिवस अडकायचं?  ‘एक एक वस्तू काढूनच टाकूया’  आणि सहजपणे माझा हात ते घड्याळ उचलून काढून टाकण्यासाठी उचलला जातो आणि त्याच क्षणी मी साठ बासष्ट वर्षांपूर्वीच्या एका छोट्या, अत्यंत किरकोळ घटनेच्या आठवणीत नकळतपणे गुंतून जाते. 

आठवणींची पण एक मजाच असते नाही का हो?  आठवणी सुखदुःखाच्या, फजितीच्या,  गमतीच्या,  साहसाच्या, राग लोभाच्या अशा कितीतरी आणि कुठल्याही क्षणी कुठल्याही निमित्ताने त्यांना किक मिळते.  अगदी तसेच झाले. कारण काय तर घड्याळ!

ताईचे अभ्यास करताना तिला लागणारेच आणि तिच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आणि अतिशय आवडते घड्याळ छुन्दाच्या हातून खळकन्  फुटले. छुंदाने ते घड्याळ का घेतले,  तिला ते हातात का घ्यावेसे वाटले आणि घेतले तर घेतले पण ते हातातून पडलेच कसे?  या प्रश्नांना त्या क्षणी ना अर्थ होता ना उत्तर होते फक्त परिणाम होता. 

ताईचे आवडते घड्याळ फुटले.

ताई संतापली.  भयंकर खवळली. फार मोठे नुकसान झाले होते तिचे जणू काही आणि आता या छुंदाचे काय करू, कशी  शिक्षा करू तिला या विचारात तिने तिच्यावर चक्क हात उगारला.  छुंदा आधीच खूप भेदरली होती,  घाबरली होती.  एका वक्तृत्व स्पर्धेत ताईला बक्षीस मिळालेलं ते घड्याळ ताईसाठी किती महत्त्वाचं होतं याची छुंदाच्या बालमनालाही नक्कीच कल्पना होती पण ताईचा हा रुद्रावतार मात्र तिला अनपेक्षित असावा.  ताईचा मार चुकवण्यासाठी ती घरातल्या घरातच पळू लागली.

आमच्या घरातल्या प्रत्येक खोलीला दरवाजा होता त्यामुळे एका खोलीतून दुसऱ्या खोलीत असं गोल गोल पळता यायचं.  तो सीन मला आठवला की अजूनही खूप हसू येतं.  छुंदा पुढे,  ताई तिच्या मागे आणि ताईला आवरण्यासाठी जीजी ताईच्या मागे… अशा तिघी गोल गोल धावत होत्या.  त्यावेळी मी काय करत होते ते आठवत नाही पण एक दोन मिनिटात ती धावाधाव  संपली.  छुंदा रडतच होती.  ताई तिला बोल बोल बोलत होती.  जीजीने छुंदाला घट्ट पकडून मायेचं कवच  दिलेलं होतं. 

“थांब आता!  संध्याकाळी पप्पा आले की त्यांना तू केलेला प्रताप सांगतेच.  मग ते तुला शिक्षा करतील.”

 एक प्रकारे ताईने छुंदावरच्या आरोपाची याचिका हायर कोर्टात दाखल करून टाकली. 

नकळत आमच्या घरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं.  आता पप्पा घरी आल्यावर काय होणार, त्यांची  काय प्रतिक्रिया होणार?  पप्पांनाही राग नक्कीच यायचा,  ते संतप्त व्हायचेच पण त्या रागापायी त्यांनी कधी आम्हाला कठोर शिक्षा केल्याचं मुळीच आठवत नाही. थप्पड मारली  ती सदैव लाडानेच, रागाने कधीच नाही मग ताईच्या या सूट फाईलला कशाला घाबरायचं?  त्यातून छुंदा  पप्पांची सर्वात लाडकी!  या सर्वात लाडकी  या शब्दप्रयोगाची ही एक गंमत आहे बरं का?  पप्पांना आमच्यापैकी कुणीही विचारलं ना “तुमची लाडकी लेक कोण?” प्रत्येकीसाठी पप्पांच हेच उत्तर असायचं “अग! सर्वात लाडकी तूच”  पण छुंदाकडे पप्पांचा अधिक कल असावा असे मला मात्र वाटायचे. कारण ती कुणाशी कधी  भांडायची नाही,  तिची मस्ती ही शांत असायची.  शांत मस्ती  हे जरी विरोधाभासी असलं तरीही ते तिच्या बाबतीत खरं होतं.  शिवाय ती लहानपणापासूनच अत्यंत हुशार, अभ्यासू.  पप्पा तिला,” हा माझा अर्जुन” असेच म्हणायचे.  त्याला कारण बहिणींच्या रांगेत तिसऱ्या क्रमांकावर आणि गुणांच्या बेरजेत पहिल्या क्रमांकावर म्हणून असेल कदाचित.  असो.

संध्याकाळी पप्पा घरी  आले. त्यांच्या सायकलीची एक विशिष्ट धून वाजली.  पप्पा ऑफिसात जाताना ठाणे स्टेशन जवळ, त्यांच्या  मावशीच्या घरासमोर असलेल्या उसाच्या गुऱ्हाळात सायकल ठेवायचे आणि येताना ती पिकप करायचे. 

सायकलच्या घंटेने पप्पा आल्याची वर्दी दिली आणि घरात सकाळी घडलेल्या घड्याळ फुटण्याच्या घटनेचे पुन्हा तणावपूर्ण पडसाद उमटले. नेहमीप्रमाणे जीजी पप्पांच्या सायकलला टांगलेल्या सामानाच्या पिशव्या आणायला खाली उतरली.  मला वाटतं तिने त्याच वेळेला पप्पांना काही पूर्वकल्पना देऊन ठेवली असावी. जीजीचे  घराकरिता ‘आजी’व्यतिरिक्त अनेक पेशे होते. ती कधी डॉक्टर,  कधी शेफ,  कधी किरकोळ रिपेरिंगसाठी इंजिनियर,  कधी शिंपी,  कधी शिक्षक, मानसतज्ज्ञ  तर कधी वकील असे.  याप्रसंगी बहुदा तिची वकिलाची भूमिका असावी.  

पप्पा आल्याचे कळताच  छुंदा गॅलरीचा कोपरा पकडून पुन्हा रडत बसली.  ताईचा अजूनही,” थांब आता बघतेच  तुला”  हा बाणा कायम होता.

मी गॅलरीच्या उंबरठ्यावर वाकून रडणाऱ्या छुंदाला बघत होते.  सहज मनात आलं, “ अर्जुन कधी रडतो का? असा कसा हा रडका अर्जुन?”

 मी छुंदाला म्हटलं,” उठ! घे शस्त्र हातात आणि युद्धाला तयार हो!”

पप्पा घरात थोडे सेटल झाल्यावर ताईने जोरदारपणे सांगितलं,

“छुंदाने माझं घड्याळ फोडलं.  काय गरज होती तिला माझ्या वस्तूंना हात लावायची?”

संतप्त ताईला पप्पा म्हणाले,

“ काय म्हणतेस काय?  तुझं घड्याळ फुटलं? नुकसान तर झालंच. कुठे आहे छुंदा?”

 निरागसपणे छुंदा पप्पांच्या समोर अपराध्यासारखी उभी राहिली.

“ हो पप्पा पण मी मुद्दाम नाही फोडलं. चुकून हातातून पडलं आणि फुटलं. “

मग पप्पांनी स्वतः तिला मांडीवर उचलून घेतलं.

“ घड्याळ फुटलं? अरेरे!  पण आनंद आहे!  त्यात काय एवढं? आपल्याला दुसरं नवं घड्याळ मिळेल.  याहून छान, सुंदर,  पुन्हा एकदा ताई स्पर्धेत जिंकेल आणि आणखी मोठं  घड्याळ तिला बक्षीस म्हणून मिळेलच.  आहे काय नि नाही काय!”

ताईचा फुगा फुस्स झाला.

छुंदा  खुदकन हसली आणि साऱ्या घरावर आलेलं तणावाचं मळभ  दूरच झालं.  एक आभाळ क्षणात मोकळं झालं. 

आज आम्ही सगळ्याजणी वृद्धत्वाकडे झुकलोय.  पण छुंदाच्या मनातली  ताईचं  घड्याळ फोडल्याची अपराधी भावना बोथट जरी झाली असली तरी टिकून आहे आणि ताईला मात्र आपण त्यावेळी उगीचच इतके रागावलो बिचारीवर हा सल आजही बोचतो आणि मी जेव्हा या घटनेचा विचार करते तेव्हा केंद्रस्थानी मला फक्त पप्पांचेच बोल आठवतात. “आनंद आहे!  आपल्याला दुसरं नवं घड्याळ मिळेल.”

 किती साधं वाक्य पण सखोल विचारांचं! यात मुळीच बेपर्वाई नाही.  नुकसान झाल्याची कदरच नाही असेही नाही.  हे पुन्हा पुन्हा घडू नये पण आता घडलंच आहे तर त्याकडे जरा सकारात्मकतेने पाहूया.  एक गेलं तर दुसरं मिळेल. 

THIS IS NOT THE END OF LIFE.

हे तत्व किती सहजपणे पप्पानी आमच्या मनावर कोरून ठेवलं.  “नो रिग्रेट्स”  या मानसिकतेची आयुष्य जगताना जरुरी असते.  नव्हे  पुढे जाण्याचे ते शस्त्र असते हा महान विचार एका किरकोळ घटनेकडे पाहताना सहजपणे त्यांनी आमच्यावर बिंबवला.शिवाय “क्षमा वीरस्य भूषणम् हे अलगदपणै ताईला सांगितले. आणि खरोखरच ताईच्या नंतरच्या आयुष्यात ज्या अनेक दु:खद अप्रिय घटना घडल्या, ज्या लोकांनी तिचे जगणे नकोसे केले होते त्यांनाही तिने नंतर सारं काही विसरून  मोठ्या मनाने क्षमा केली. पपांचाच संस्कारना?

हेच खरे सार जीवनाचे  असे वाटते. या जीवनसत्वांनी आम्हाला इम्युनिटी दिली, एक प्रतिकारशक्ती दिली.

“थँक्स पप्पा”

आणि आताच्या या क्षणी  नकळतपणे फेकून देण्यासाठी हातात घेतलेलं ते जुनं, बंद पडलेलं घड्याळ मी पुन्हा जागच्या जागी ठेवलं.  का ? .. माहीत नाही. 

क्रमश:भाग १६. 

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ते भाग्यवान… ☆ सुश्री शीला पतकी ☆

सुश्री शीला पतकी 

? मनमंजुषेतून ?

ते भाग्यवान… ☆ सुश्री शीला पतकी 

शाळेला सुट्टी मिळालेल्या पोरासोराने अंगणामध्ये सुंदर किल्ला बांधला. मावळे विराजमान झाले.. छत्रपती शिवाजी महाराज सिंहासनावर अरुढ झाले.. जागोजागी भगवे झेंडे फडकू लागले… पोर आनंदाने टाळ्या पिटू लागली.. पहाटे अंगणात केरवारे झाले.. सडा टाकला गेला. सुंदर रंगवलीत रंग भरले गेले.. पणत्यांच्या  रूपाने आकाशीची नक्षत्र अंगणात ऊतरून आली.. अंगणाचे रूप कसे दिमाखदार रंगीबेरंगी झाले. नहाणी घरात सुवासिक तेलाचा आणि उटण्याचा सुवास दरवळू लागला.. घंगाळाच्या पाण्यातन वाफा निघू होऊ लागल्या… मनसोक्त पाण्याने आंघोळीझाल्या.. साबणाच्या वासाने देहाला घमघमाट आला. देवघरामध्ये मंत्रोच्चार होऊन पूजा झाल्या अभिषेक झाले देवासाठी केलेल्या खास बेसनाच्या लाडवांचा प्रसाद त्यांना दाखवला गेला. इथे पावेतो घरातल्या सगळ्या बायका नटून थटून तयार झाल्या नव्या साड्यांची सळसळ कानी येऊ लागली बैठकीच्या हॉलमध्ये पाट रांगोळी झाली फराळाची जय्यत तयारी सुरू झाली. सारी मंडळी आरतीसाठी देवघरात जमली आरती आणि प्रसाद झाल्यावर थोडा मोठ्यांचे आशीर्वाद घेणं सुरू झालं नमस्कार आशीर्वाद झाल्यानंतर सगळी मंडळी फराळाच्या पानावर स्थानापन्न झाली लाडू चकली चिवडा शंकरपाळे कडबोळे अनारसे यांनी पान सजली पुरुष मंडळी बायकांचे कौतुक करून फराळावर ताव मारू लागली आणि बायका त्यांना आग्रह करून वाढू लागल्या… चेष्टा मस्करी हसणे खिदळणे आणि पोरट्यांचा कल्ला यात फराळ उरकला मग महिलांची पंगत.. छे छे बायकांची पंगत माज घरात रंगली.. पुरूष मंडळी गाद्यांवर सुपारी खात बैठक मारून होते. दिवाळी अंकाची पानं चाळण्यात सगळे मग्न. पोर सर्व फटाके उडवायला केव्हाच पळाली. आतून आजी आजोबांची लकेर  सावकाश उडवा रे – काळजी घ्या– भाजून घ्याल नाहीतर…. इत्यादी सूचनांचा भडीमार सुरू झाला पण लक्षात कोण घेतो ? पोरं फटाक्यात मग्न आणि बायका पुढच्या स्वयंपाकाला लागलेल्या….

असो… ! दिवाळीचे हे दृश्य फक्त आता कथा कादंबऱ्यात वाचावं. घरात इन मीन चार माणसं.. सगळं रेडीमेड.. फराळ, इडली वडा यांना डिशमध्ये स्थान आले. सगळ्यांनी मोबाईलमध्ये तोंड खूपसायचे आणि हॅप्पी दिवालीचे मेसेजेस पाठवायचे —-  

पण वरील वर्णनाची दिवाळी ज्यांनी अनुभवली ते भाग्यवान… अशा सर्व भाग्यवंतांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा !!!

© सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares