मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ संघर्ष – भाग-2 ☆ श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

??

☆ संघर्ष – भाग-2 ☆ संग्राहक – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे 2

(नानाजींशी त्याचे न पटण्याचे कारणही तसेच होते. ) इथून पुढे —–

नानाजी स्वातंत्र्यसंग्राम सैनिक होते. एका आंदोलनात इंग्रजांनी त्यांना घोड्याने तुडविले होते. त्याच्या खुणा त्यांच्या पाठीवर होत्या. शंकरला वाटायचे नानाजींनी स्वातंत्र्यसैनिकांना मिळणारी पेन्शन मिळवावी.  पण नानाजींचा त्याला विरोध होता— “ मी स्वातंत्र्यासाठी आंदोलन केले ते माझे कर्तव्य होते.  त्याचे पैसे मी का म्हणून घ्यावे ? जर पैसे घेतले तर हा व्यवहार झाला. माझ्या कार्याचा मला अभिमान आहे. माझ्या पाठीवरील व्रण हेच माझे सर्टिफिकेट आहे, नि त्याचा आनंद मला मिळतो. मी कधीही माझ्या देशप्रेमाची किंमत घेणार नाही. “  हे त्यांचे ठाम मत होते. नेमके तेच शंकरला आवडत नव्हते. जर सरकार देण्यास तयार आहे तर का घेऊ नये, हे त्याचे मत होते. पण नानाजी आपल्या मतावर ठाम असायचे. दुकानात अनेकदा आमच्या वडलांसमोर हा शाब्दिक संघर्ष व्हायचा.  दोघेही आपली बाजू वडलांसमोर मांडायचे.  वडील शंकरला समजवायचे की,

‘त्यांच्या संमतीशिवाय काही होणार नाही. तेव्हा नानाजींना जोपर्यंत वाटत नाही तोपर्यंत शंकरने त्यांना त्याबद्दल आग्रह करू नये. ‘ शंकरला वाटायचे गुरुजींचे नानाजी ऐकतात.  तेव्हा गुरुजींनी त्यांना पेन्शनसाठी तयार करावे. पण आमचे वडील पक्के आदर्शवादी.  ते नानाजींना कधीच पेन्शनसाठी समजवायचे नाहीत. परिणाम असा झाला की शंकर नानाजीसोबत आमच्या वडलांचाही  विरोध करू लागला. आम्हाला मात्र शंकरचे पटायचे. पैशाची गरज काय असते ते आम्ही अनुभवले होते.  केवळ वडलांच्या तुटपुंज्या पगारावर आमचा मोठा परिवार चालवितांना आईची महिन्याच्या शेवटी होणारी ओढाताण आम्ही अनुभवत होतो. घरी शिकवणीला येणाऱ्या पोरांकडून फी घ्यावी असा तिचा आग्रह असायचा.  पण विद्यादानाचे पैसे घ्यायचे नाही हा आमच्या वडलांचा आदर्श. अनेकदा यावरून घरी झालेला संघर्ष आम्ही अनुभवला होता. त्यामुळे शंकर- नानाजींच्या संघर्षात आम्ही मनाने शंकरच्या बाजूला असायचो. तसे आमच्या विचारांना काहीच महत्व नव्हते, पण वाटायचे नानाजीनी पेंशन घ्यावी आणि घरचे,दुकानातील वातावरण आनंदी ठेवावे. पुढे पुढे नानाजीच्या दुकानातील वातावरण खूप तणावग्रस्त होत गेले. नानाजी आणि शंकर यांच्यात अबोला सुरू झाला. पुढे पुढे या तणावामुळे आमच्या वडलांचे नानाजींच्या  दुकानात जाणे कमी झाले. अचानक एक दिवस सकाळी शंकर आमच्या घरी येऊन धडकला.  त्याच्या हाती एक पोस्टाने आलेला लिफाफा होता, तो त्याने बाबांच्या हाती दिला. बाबांनी त्यातील पत्र काढून वाचायला सुरुवात केली.  कागदावरील अशोकस्तंभ खूण पाहून ते पत्र शासनाकडून आलेले आहे हे आम्हाला समजले. ते वर्ष महात्मा गांधीचे जन्मशताब्दीवर्ष होते, आणि शासनाने त्या निमित्ताने पेन्शन न घेणाऱ्या आदर्शवादी स्वातंत्र्यसंग्राम सैनिकांच्या सत्काराचे आयोजन केले होते.  त्या यादीत नानाजींचे नाव होते, त्याचेच पत्र नानाजींना आले होते. पण नानाजी सत्काराला नाही म्हणत होते, त्यामुळे त्यांना समजवावे म्हणून शंकर आला होता. बाबांनी चौकशी केली, नकाराचे कारण विचारले–शंकर म्हणाला ‘ सत्कारासोबत अकरा हजार मिळणार आहेत  म्हणून ते नाही म्हणतात.’ आता मात्र बाबा गंभीर झाले.  विचार करून शंकरला म्हणाले,” तू जा. स्वीकारतील ते सत्कार “. दुपारी बाबा एकटेच नानाजीना भेटले. काय चर्चा झाली माहीत नाही, नानाजी तयार झाले. ठरलेल्या दिवशी बाबा, नानाजी, त्यांची पत्नी, व शंकर नागपूरला गेले.  तिथे नानाजींचा सपत्निक  सत्कार झाला.  ताम्रपत्र, खादीचे धोतर, बंगाली शाल, श्रीफळ व अकरा हजाराचा चेक नानाजीना,  व त्यांच्या पत्नीला नऊवारी पातळ- खण देऊन मंत्रीमहोदयाहस्ते सन्मानित केलं गेलं. सोबतच कार्यक्रमाच्या संचालकाने घोषणा केली. नानाजींनी मिळालेले अकरा हजार रुपये अनाथाश्रमाला देणगी म्हणून देऊन टाकले होते. केवळ ताम्रपत्र, चंदनाचा  हार,व खादीचे कपडे, शाल स्वीकारली. शंकरचा चेहरा उतरला.  पण वडलांनी त्याला समजावले, आश्वस्त केले –’ तुझा फायदा होईल.’- सारे चंद्रपूरला परत आले. आता मात्र शंकरचे बाबांकडे येणे वाढले. नानाजींना  मिळालेल्या ताम्रपत्रामुळे शंकरच्या मुलांना शिष्यवृत्ती सुरू झाली. दोन्ही पोरांना स्वातंत्र्यसैनिक कोट्यातून नोकऱ्या मिळाल्या.  शंकर जाम खुश झाला.आता मात्र नानाजी- शंकर अबोला संपला. पुन्हा बाबांचा दुकानातील वावर वाढला.  संघर्ष संपून आनंदोत्सव नांदू लागला.  पुन्हा बाबा- नानाजीचे कविता वाचन रंगू लागले. काही वर्षानंतर कळले की सत्कार होण्यासाठी नानाजींचे नाव आमदारांना सांगून बाबांनीच  शासनाला कळविले होते. आज नानाजीचे दुकान काळाचे ओघात नष्ट झाले.  तिथे नवीन दुकानांची इमारत उभी आहे.  पण आजही त्या रस्त्याने गेलो की नानाजीचे ते दुकान, तो संघर्ष डोळ्यासमोर  चलचित्रपटासारखा सरकत जातो.

समाप्त

©  श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

चंद्रपूर,  मो. 9822363911

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ बा.द.सातोस्कर….भाग 2 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

??

☆ बा.द.सातोस्कर….भाग 2 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर 

(मागील भागात आपण पहिलं,-  त्यांच्या घरी जेव्हा जेव्हा मी जाई, तेव्हा तेव्हा मला आमच्या कॉलेजमधील विजय सुराणाने लिहिलेल्या ओळी आठवत,

‘असं माहेर ग माझं गाढ सुखाची सावली ।

क्षणभरी पहुडाया अनंताने हांतरली।।  आता इथून पुढे – )

पुढे पुढे पुण्याला त्यांच्या मुलीकडे वृंदाकडे जाताना ते आमच्याकडे थांबत आणि मग पुढे पुण्याला जात. आमचा हा थांबा त्यांच्यासाठी  फक्त एक-दोन दिवसांचा असे. पण तेवढ्या वेळात वाङ्मय क्षेत्रातील काही घडामोडी, त्यांचे काही नवीन संकल्प, प्रसिद्ध  झालेले नवीन पुस्तक असं खूप काही कळत असे. 

दादांना दोन मुली आणि एक मुलगा होता. आणि साहित्याच्या रेशमी धाग्याने जोडलेल्या आम्ही दोघी मुली —माझ्यावर आणि माझ्या बहिणीवर, लतावर त्यांचा स्वतःच्या मुली असल्यासारखाच लोभ जडला होता. दादांनी म्हणजे बा.द.सातोस्करांनी आपल्या ९१ वर्षाच्या प्रदीर्घ आयुष्यात काय काय आणि किती किती केलं, हे सांगायचं तर एक ग्रंथच होईल. ते ग्रंथपाल होते. प्रकाशक होते. लेखक होते, संपादक, संशोधक होते आणि गोवा मुक्ती लढ्यातील कार्यकर्तेही होते. गोवा मुक्ति लढा धगधगता ठेवण्यासाठी त्यांनी सन ५४ ते ६२  दूधसागर हे पाक्षिक चालवले होते. गोवा मुक्त झाल्यावर त्यांना दैनिक गोमंतक वृत्तपत्राचे संपादन करण्यासाठी पाचारण करण्यात आले. त्यांनी ती जबाबदारी ५ वर्षे सांभाळली आणि नंतर या जबाबदारीतून मुक्त झाले.  

दादा सातोस्कर साधारणपणे १९३२-३४च्या दरम्यान मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयात काम करत होते. तिथल्या अनुभवाच्या जोरावर, पुस्तकांचे शास्त्रशुद्ध व निर्दोष वर्गीकरण कसे करावे, हे शिकवणारी द्विबिंदू वर्गीकरण पद्धत त्यांनी शोधून काढली आणि त्यावर पुस्तकही लिहिले. 

ते ग्रंथवेडे होते. त्यांनी ग्रंथ वाचले. ग्रंथांवर प्रेम केले. ग्रंथ लिहिले. ग्रंथप्रेमातून ग्रंथरक्षणाच्या म्हणजेच ग्रंथपालनाच्या शास्त्राकडे वळले. त्यावर पुस्तक लिहिले. गाव तिथे ग्रंथालय ही चळवळही त्यांनी सुरू केली. उत्कृष्ट प्रकाशक हा ग्रंथवेडा असतो- नव्हे असायलाच हवा, असं ते बोलून दाखवत. 

१९३४ साली दादा मुंबईत असताना, लक्ष्मणराव सरदेसाईंचे ‘ कल्पवृक्षाच्या छायेत ‘ आणि जयंतराव सरदेसाईंचे ‘ सुखाचे दिवस ’ ही पुस्तके विक्रीची व्यवस्था करण्यासाठी त्यांच्याकडे आली. त्याचवेळी त्यांच्या मनात आले, पुस्तकाशी संबधित असा पुस्तक प्रकाशनाचा व्यवसाय करावा. १९३५मध्ये बा.द. सातोस्कर पदवीधर झाले. त्या काळात त्यांना कितीतरी चांगल्या नोकर्‍या मिळाल्या असत्या. पण साहित्य प्रेमाने, त्यांनी नोकरी न करण्याचा निर्णय घेतला. आणि ‘ सागर साहित्य प्रकाशन ‘ ही प्रकाशन संस्था काढली. १९३५ ते १९८५ या ५० वर्षांच्या काळात त्यांनी हा प्रकाशन व्यवसाय अव्याहतपणे, उत्साहाने व आनंदाने केला. मराठी प्रकाशक परिषदेच्या पहिल्या संमेलन प्रसंगी, जुन्यातला जुना प्रकाशक म्हणून त्यांचा सत्कार झाला होता, तर ५व्या संमेलन प्रसंगी अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली होती. 

सातोस्करांनी प्रकाशनासाठी पुस्तक निवडताना प्रथितयशांच्या पुस्तकांबरोबरच नवोदितांची पुस्तके काढून त्यांना प्रोत्साहन दिले. सुजाण वाचकांकडून दर्जेदार पुस्तक काढले, अशी वाहवा मिळवून घेण्यापेक्षा, अधिकाधिक लोकांपर्यंत आपले पुस्तक पोचले पाहिजे,  अधिकाधिक लोकांनी ते वाचले पाहिजे आणि अधिकाधिक लोकांना ते कळले व आवडले पाहिजे,  असा त्यांचा दृष्टीकोन होता. म्हणूनच पुस्तकाची निवड करताना त्यांनी ‘क्लास’चा विचार न करता ‘मास’चा विचार केला. प्रकाशन व्यवसाय सुरू केल्यानंतर त्यांनी दोन-तीन वर्षात स्वत:चा प्रेस घेतला. पुढे १९४३च्या दरम्यान कबूल केलेल्या लेखकांनी वेळेवर पुस्तके आणून दिली नाहीत, तेव्हा प्रेसला काम पाहिजे, म्हणून त्यांनी स्वत:च पुस्तक लिहिण्याचे ठरवले. त्यावेळी त्यांनी पर्ल बकच्या ‘मदर’ कादंबरीचा ‘आई’ असा अनुवाद केला. त्यानंतर त्यांनी त्यांच्या द गुड अर्थ ‘ चा ‘धरित्री असा अनुवाद प्रसिद्ध केला. प्रकाशक सातोस्कर असे लेखक सातोस्कर झाले. त्यानंतर त्यांनी ‘जाई‘ ही स्वतंत्र कादंबरी लिहिली. त्याचाच पुढचा भाग ‘ मेनका ‘ लिहिली. अनुपा, अभुक्ता, दिग्या अशा अनेक कादंबर्‍या त्यांनी पुढे लिहून प्रकाशित केल्या. 

क्रमश: ….

©️ श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ संघर्ष – भाग-1 ☆ श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

??

☆ संघर्ष – भाग-1 ☆ श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

वडिलांसोबत सायंकाळी आम्ही  जेव्हा बाजारात जात असू तेव्हा नानाजी टेलर यांचे दुकान हा थांबा निश्चित ठरलेला असायचा.

नानाजी टेलर अतिशय  जिव्हाळ्याने व आदराने आमच्या वडिलांचे स्वागत करायचा, विचाराने दोघेही आदर्शवादी असल्याने दोघांचेही खूप जमायचे. बाबा शिक्षक असल्यामुळे वर्तमानपत्र वाचन हा त्यांचा दिनक्रम असायचा. वाचलेल्या बातम्या ते नानाजींना सांगायचे नी मग त्यावर चर्चा रंगायची. आम्हाला या चर्चेतील काही समजायचं नाही, पण नानाजीच्या दुकानात जाणे आम्हाला आवडायचे. नानाजी टेलरचे दुकान म्हणजे काही ऐसपैस नी सुशोभित शो रूम नव्हती. दहा बाय बाराची एक खोली.  तिला उत्तर दक्षिण असे दोन्हीकडे रस्ते. त्यामुळे दोन्हीकडे दरवाजे. त्यात दोन शिलाई मशीन, एक कापड कटाईचा लाकडी पाट, कपडे ठेवण्याची एक लाकडी अलमारी आणि बसण्यासाठी ऐक बेंच, असा या दुकानाचा पसारा होता. पण त्यात नानाजी खूश असायचे. आम्हालाही या दुकानात बदल व्हावा असे वाटत नसे. तसे या दुकानात बसणे आम्हाला आवडण्याची इतरही अनेक कारणे होती.  त्यातील प्रमुख कारण म्हणजे नानाजींच्या दुकानाला लागून प्रसिद्ध कोहपरे यांचे हॉटेल होते. त्यांचा भटारखाना दुकानातून दिसायचा. त्यांचे कारागीर पदार्थ बनवायचे ते पाहणे आनंददायी वाटायचे. पदार्थांचा सुवास दुकानापर्यंत जाणवायचा.

वडिलांच्या कडक शिस्तीमुळे हॉटेलात जाणे आमच्यासाठी निषिद्ध गोष्ट होती. त्यामुळेही कदाचित बनणारे पदार्थ आनंद देऊन जायचे. एक किरकोळ शरीरयष्टीचा नोकर सतत खलबत्यात काहीतरी कुटत असायचा. बहुदा हॉटेलला लागणारे मसाले, अद्रक लसूण जिरे तो कुटत असावा. पण याव्यतिरिक्त काही इतर कामे करतांना मी त्याला पाहिले नाही. नानाजींच्या दुकानासमोर खाजांची सावकाराची पेढी होती. अनेक गरजू कर्जदार लोक तिथे बसून असायचे. त्यांचे चिंताग्रस्त चेहरे आम्हाला तेव्हाही जाणवायचे. त्यांची अगतिकता ,लुबाडणूक होते याची जाणीव आम्हाला त्यांच्या चेहऱ्यावर दिसायची. त्यामुळे कदाचित मला सावकार सिनेमातील कन्हय्यालाल किंवा जीवन या अभिनेत्यासारखा वाटायचा. समोर एक सोनाराचे दुकान होते. त्याच्या दुकानासमोर असलेल्या नालीतील माती साफ करून त्यातून सोने मिळविण्याचा प्रयास करणाऱ्या विशिष्ट जमातीच्या महिला नेहमी दिसायच्या.  त्यांच्या कडेवर  लहान मुले असायची. दिवसभर आपल्या कोहपऱ्यासारख्या पात्रातून पाण्याच्या सहाय्याने त्या माती गाळून सोने काढायच्या. त्यांच्या कार्याचे निरीक्षण करणे हे आमचे आनंददायी कार्य होते.

नानाजीं च्या दुकानात आलमारीलगत एक मोठी पिशवी ठेवलेली असायची. त्यात कापडाच्या चिंध्या असायच्या.  त्यांचा उपयोग  कापडी बाहुल्या बनविण्यासाठी व्हायचा.  माझी बहीण सोबत असली की तिची नजर त्या पिशवीवर असायची.  ,नानाजींचा मूड चांगला असला की तिला परवानगी मिळायची, नि रंगबिरंगी कापडी चिंध्यांवर ती खजिना मिळाल्यागत तुटून पडायची. नानाजींना कविता ऐकण्याची आवड होती आणि बाबांना कविता करण्याची. दोघेही एकत्र आले की रंग जमायचा. बाबांचे कविता ऐकवणे आणि नानाजींचे त्यांना दाद देणे, यात किती वेळ जातो याचे दोघांनाही भान नसायचे. आम्ही मात्र कंटाळून जात असू, अनेकदा बाजार बंद व्हायचा तरी दोघांचे चर्चासत्र थांबत नसे. नानाजींच्या दुकानात त्यांच्यासोबत त्यांचा शंकर हा मुलगाही काम करायचा. शंकर विवाहित व दोन मुलांचा पिता होता. नानाजी आणि शंकर यांचे कधी फारसे पटत नसे. तो व्यवहारवादी होता. त्याचा कल अधिक पैसे मिळविण्याकडे असायचा. विनाकारण दुकानात येऊन बसणारे व नानाजींशी चर्चा करणारे त्याच्या नजरेत बिनकामाचे असायचे. तो तसे बोलत नसे, पण त्याच्या देहबोलीतून ते जाणवायचे. मात्र त्याने आमच्या वडिलांचा कधी अपमान केला नाही. नानाजींशी त्याचे न पटण्याचे कारणही तसेच होते. 

क्रमशः….

©  श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

चंद्रपूर,  मो. 9822363911

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ बा.द.सातोस्कर….भाग 1 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

??

☆ बा.द.सातोस्कर….भाग 1 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर 

संपादकीयसाठी दिनविशेष बघताना दिसलं, २७ तारखेला बा. द. सातोस्कर यांचा स्मृतिदिन आहे. हे पाहिलं आणि आठवणींची पाखरं भिरीभिरी येऊन मनाच्या झाडावर उतरली आणि किलबिलत  राहिली.

त्यांची माझी पहिली भेट झाली, गोव्यातील डिचोली येथे झालेल्या साहित्य संमेलनात. त्यापूर्वी माझी मामेबहीण लता हिच्याकडून त्यांच्याबद्दल खूप काही ऐकलं होतं. तेवढ्यानेही माझी छाती दडपून गेली होती. डिचोलीला लताच्या बालकविता- संग्रहाचे प्रकाशन होते. अध्यक्ष होते, पं महादेवशस्त्री जोशी. ते माझ्या मामांचे मित्रच. तिथे कार्यक्रमाच्या आधी लताने माझी बा. द. सातोस्कर यांच्याशी ओळख करून दिली आणि म्हणाली, ‘ ही माझी आत्येबहीण. हीसुद्धा कथा-कविता लिहिते.’ संमेलनाच्या दरम्यान मधल्या वेळेत त्यांच्याशी खूप गप्पा झाल्या.  त्यांनी मोठ्या आत्मीयतेने माझी चौकशी केली. मी काय काय लिहिलं, कुठे कुठे छापून आलं, वगैरे विचारलं. मोठ्या (कर्तृत्वाने) लोकांशी बोलताना मी फारशी मोकळी होत नाही. त्यांच्याशी  बोलताना मला दडपणच येतं. धाकुटेपणाची ( कर्तृत्वाच्या दृष्टीने) भावना मनाला वेढून रहाते. पण सातोस्करांचं मोठेपण असं की, ते मधलं औपचारिकतेचं अंतर तोडून दादा स्वत:च  धाकुटेपणाजवळ आले. दादा म्हणजे सातोस्कर. जवळचे, परिचित त्यांना दादा म्हणत. मीही मग त्यांना दादा म्हणू लागले. त्यानंतर दादांनी मला मुलगीच मानलं आणि तसं घोषितही केलं. त्यानंतर सांगलीला आल्यावर त्यांचा आणि माझा पत्रव्यवहार वाढला. मी नवीन काही लिहिलं की त्यांना वाचायला पाठवावं असा त्यांचा आग्रह असे. हा पत्रव्यवहार प्रामुख्याने माझ्या बाजूने पाठवलेल्या कविता, मांडलेल्या कथा- कल्पना किंवा मग सगळीच कथा, लिहिलेले लेख या संदर्भात असे.  तर त्यांच्या बाजूने त्यांच्या नवीन लेखनाच्या योजना किंवा साहित्य क्षेत्रातील विविध घटनांची माहिती, या संदर्भात असे. 

पुढच्या वर्षी मंगेशीला साहित्य संमेलन झालं. अध्यक्ष होते, बा. द. सातोस्कर. एका परिसंवादात बोलण्यासाठी मला त्यांनी निमंत्रित केलं. संमेलनाला सुरुवात होण्यापूर्वी एका खोलीत दादा, गंगाधर गाडगीळ, जितेंद्र अभिषेकी , कृ. ब. निकुंब इ. थोर थोर मंडळी बसली होती. मला बघताच दादांनी मला आत बोलावलं. बस म्हणाले. मग त्यांनी ‘ ही माझी मुलगी, उज्ज्वला केळकर. ही सुद्धा लिहिते, बरं का! आणि चांगलं लिहिते.’  अशी माझी ओळख करून दिली. मला अतिशय संकोच वाटला. अनेक वर्षे शारदेची उपासना करणार्‍या व्यक्तीने, तितक्याच तोलामोलाच्या व्यक्तींपुढे माझं कौतुक करावं, याची एकीकडे अपूर्वाई वाटत असताना, दुसरीकडे संकोचही वाटत होता. त्याचवेळी त्यांच्या एका मित्राने चेष्टेने विचारलं , ‘ आम्हाला माहीत नसलेली ही मुलगी तुला केंव्हा झाली? ’ दादा सहजपणे म्हणाले. ‘ डिचोलीच्या साहित्य संमेलनात. तिथेच तिची आणि माझी ओळख झाली.’ 

बा. द. सातोस्कर यांच्याशी नाते जुळले आणि  गोवा हे माझे माहेर झाले. शाळा- कॉलेजात आणि नंतरही बा.भ. बोरकरांच्या कविता वाचताना, त्यातील निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेताना गोवा माझी स्वप्नभूमी झाली होती. आता ते माझं माहेर झालं.  त्यावेळी दादांनी मला घरी येण्याचा खूप आग्रह केला होता. पण मला वेळ नव्हता. दुसर्‍या दिवशीचं परतीचं माझं रिझर्वेशन झालं होतं.

त्यानंतर मी ४-५ वेळा गोव्याला गेले, तेव्हा तेव्हा त्यांच्याकडे, मी आणि माझी बहीण लता गेलो. पणजीपासून १५-१६ कि.मीटर अंतरावर असलेल्या करंजाळे इथे ‘स्वप्नगंध’ हे काव्यात्मक नाव असलेली त्यांची टुमदार बंगली होती. घराच्या मागच्या बाजूला मांडवी नदीचे बॅक वॉटर. भोवताली स्निग्ध शांतता. अतिशय रम्य जागी त्यांची छोटी बंगली होती आणि बंगलीत होते स्वागतशील आई आणि दादा. त्यांच्या घरी जेव्हा जेव्हा मी जाई, तेव्हा तेव्हा मला आमच्या कॉलेजमधील विजय सुराणाने लिहिलेल्या ओळी आठवत-

     ‘असं माहेर ग माझं गाढ सुखाची सावली ।

      क्षणभरी पहुडाया अनंताने हांतरली।। 

क्रमश:….  

©️ श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ म्हातारी…भाग 4 ☆ डॉ अभिजीत सोनवणे

डॉ अभिजीत सोनवणे

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ म्हातारी…भाग 4 ☆ डॉ अभिजीत सोनवणे☆

@doctorforbeggars

(आपल्याकडे काहीही नसणं आणि एके दिवशी खूप काही असणं या दोन टोकांमधलं अंतर जिद्दीने काटणे म्हणजे भरभराट…. ) इथून पुढे —-

चार वर्ष मी या कुटुंबासोबत आहे…. 

रस्त्यावरची निराधार भिक्षेकरी ते आताची सक्षम कष्टकरी असा हा तिचा प्रवास….  मी माझ्या डोळ्यांनी पाहिला आहे…. नव्हे अनुभवलाय….

या सर्व प्रवासात तिने आणखी एका व्यक्तीला हात दिला होता…. याचंच मला अप्रूप  !

स्वतःला भूक लागते तेव्हा खाणं म्हणजे प्रकृती, दुसऱ्याचं ओढून घेऊन खाणं म्हणजे विकृती, पण स्वतःला भूक लागलेली असताना, आपल्या घासातला घास काढून दुसऱ्याला देणं ही झाली संस्कृती….!

ती शिकलेली नाही, तिची भाषा ओबड-धोबड आहे…. पण तरीही माझ्यासाठी ती सुसंस्कृतच आहे…! 

या दिवाळीत तिने मला पुन्हा शिव्या देऊन भाऊबीजेला घरी बोलावलं….

भाऊबीजेच्यादिवशी तिने तिच्या घरासमोर, फुटपाथवरच  एक चटई अंथरली…. 

तिथे तिने मला साग्रसंगीत ओवाळले…मी तिला ओवाळणी दिली.

तिने मला पेढा भरवला आणि पेढ्याचा बॉक्स माझ्या हाती दिला…. 

“पेढ्याच्या  बॉक्सवरच भागवते का म्हातारे… मला वाटलं जेवायला बोलवशील…”, मी हसत  म्हणालो.

“म्हातारी म्हणू नगो “, तिरक्या डोळ्यानं माझ्याकडे बघत, हातातलं ताट ठेवता ठेवता ती गुरगुरली. 

“दिसते तर म्हातारी आणि मला म्हणते ताई म्हण…” मुद्दाम मी तिला उचकवलं…. आता पुढं काय होणार हे मला  माहित होतं…

“म्हातारी कुणाला म्हणतो रे मुडद्या… “बी असं  म्हणत तिने पायातली चप्पल काढून माझी ओवाळणी केली होती….

एका भावाला प्रेमळ बहिणीच्या या मायेच्या चपलेपेक्षा आणखी जास्त काय हवं….?

माझ्या आईच्या वयाची ती बाई, आता तिचा आशीर्वाद घ्यावा आणि निघावं म्हणून उठलो. 

तिच्या पाया पडत म्हणालो, “ तुला म्हातारे म्हटलेलं आवडत नाही, तुला मी ताई म्हणावं अशी तुझी इच्छा आहे…. पण  खरं सांगू का,  ताई पेक्षा तुला मी आई म्हणणं जास्त योग्य आहे….!”

तिच्या भावूक झालेल्या चेहऱ्यावर आता प्रश्नचिन्ह होतं…

तिला म्हणालो, “ अगं तू स्वतः अपंग, त्यात तू स्वतः रस्त्यावर राहत होतीस. मात्र जेव्हा स्वतः सावरलीस, तेव्हा तू एका अपंग माणसाला वर्षभर सांभाळलंस.  हे सारंकाही एक आईच करू शकते….”

आता तिच्या डोळ्यात पाणी होतं…. ती म्हणाली, “ पाय नसत्यात तवा त्याचं दुःख काय आस्त हे मला म्हाईत हाय. रस्त्यावर कुत्र्यावानी निराधार म्हणून उनात पावसात पडणं म्हंजी काय आस्तंय,  हे सुदा मला म्हाईत हाय. मला तू आदार देऊन पायावर हुबी केलीस…. डोक्यावर छत टाकलंस…. पोटातली भूक भागवलीस….  तू माजा कुनीही नसताना माज्यासाटी तू हे केलंस… मी तुजी आई नसताना तू माजा पोरगा झालास….म्हणलं,  चला बिन बाळंतपनाचं या वयात आपल्यालाबी पोरगं झालंय…. तर संबळु या अपंग  पोराला…. आपुन बी या वयात आई हुन बगु…. मी आय झाले आन ह्यो बाप……”  तिने नवऱ्याकडे  बोट दाखवत म्हटले….!

आता डोळ्यात पाणी माझ्या होतं….!

म्हटलं, “ म्हातारे तू लय मोठी झालीस…. “

यावेळी ” म्हातारी ” म्हटल्यावर ती चिडली नाही, उलट गालातल्या गालात हसली…. 

हसत ती झोपडीत गेली आणि चार-पाच बोचकी उचकटली… त्यातून एक शर्ट काढला…. एक साडी घेतली आणि मला म्हणाली, “ दिवाळीला ह्यो शर्ट घालशील का ?  तू घिवून जा, नाय बसला तर सांग मला आणि मनीषाला ही साडी पन दे… तिला म्हणावं साडीतच ब्लाउज पीस पन हाय….”  

हा भरजरी पोशाख मी घेतला…. 

गाडीला किक मारली आणि तिला हात जोडून मनोमन नमस्कार करत म्हणालो, “ जातो मी माई…”. 

ती म्हणाली, “ ए मुडद्या, जातो म्हणू न्हायी…. येतो म्हणावं…. आनी हो…. माई आणि ताई म्हणायची थेरं करू नगंस. मला आपली म्हातारीच म्हन….मी तुजी म्हातारीच हाय….! “

मी माझ्या या म्हातारीला मनोमन नमस्कार करून शर्ट आणि साडी घेऊन निघालो…. 

आज जगातला सगळ्यात श्रीमंत व्यक्ती मी होतो…. ! 

समाप्त 

© डॉ. अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ म्हातारी…भाग 3 ☆ डॉ अभिजीत सोनवणे

डॉ अभिजीत सोनवणे

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ म्हातारी…भाग 3 ☆ डॉ अभिजीत सोनवणे☆

@doctorforbeggars

(आणि म्हणून त्या दोघांनी काहीतरी व्यवसाय करावा अशी माझी इच्छा होती….) इथून पुढे —-

एकदा तिला म्हणालो, “ अशी भीक घेण्यापेक्षा ‘चार पैसे’ कमव… काहीतरी धंदा सुरू करू 

आपण..” 

ती म्हणाली होती, “ मुडद्या भांडवल काय माजा मेलेला बाप घाललं काय….? “ 

मी म्हणालो होतो, “ नाही ना, तुझा जिवंत असलेला भाऊ भांडवल  घालल…. “

यावर तिने पदराला पुसलेले डोळे मला अजून आठवतात…. 

यानंतर मी तिला पाच ते दहा विक्रीयोग्य वस्तू विकत आणून दिल्या आणि तिला म्हणालो,

“ बघ हळूहळू हा व्यवसाय सुरु कर.”

तिने माझं ऐकलं….  मी ज्या वस्तू दिल्या होत्या त्या वस्तू ओळीने तिने त्या फूटपाथवरच्या तिच्या घरात मांडून ठेवल्या…… व्हीलचेअर घेऊन ती आता घराबाहेर बसू लागली…. येणार्‍या-जाणार्‍या लोकांना वस्तू घेण्याचा आग्रह करू लागली…. 

व्यवसाय हळूहळू वाढत गेला

मी दिलेल्या पाच दहा वस्तूंची संख्या वाढवत तिने ती दोनशे-तीनशेच्या वर नेली. आता वस्तू ठेवायला घर पुरेना… हे कर्तुत्व तिचं होतं….!

तिला मी फक्त एक हात दिला होता, तिने या संधीचे सोनं केलं…. ती आकाशात  भरारी  घेत  होती….!

फुंकर मारल्याने दिवा विझतो….. अगरबत्ती नाही….!

जो दुसऱ्याला सुगंध  देतो तो कसा विझेल….?

कोणतंही काम करण्याच्या पलीकडे गेलेला एक अपंग माणूस रोज तिच्या दारावर यायचा…. या ताईने त्याला रोज दोन वेळचं जेवण द्यायला सुरुवात केली. 

स्वतःला जाणवते ती वेदना. पण जेव्हा दुसऱ्याची वेदना जाणवायला सुरुवात होते, ती म्हणजे संवेदना….!

तिने त्याची वेदना जाणून त्या अपंग व्यक्तीला हात दिला होता….

आपण उठून उभे राहिल्यावर दुसऱ्याला सुद्धा मदतीचा हात द्यावा….. कुठून आला असेल हा विचार तिच्या मनात…? 

मी तिला मनोमन नमस्कार करायचो.

ती मला नेहमी म्हणायची, “ एवढ्या लोकांचं करतोस, याचं पण पांग फेड बाबा, या अधू पोरासाठी पण कायतरी कर…. “ 

कालांतराने या व्यक्तीवर सुद्धा हॉस्पिटलमध्ये उपचार केले. तो आता स्वतःच्या पायावर चालतो.  यानंतर त्याला एका आश्रमात नोकरी मिळवून दिली आहे. 

त्याचं सर्व छान झालं, या सर्व गोष्टींचा सर्वात जास्त आनंद कुणाला झाला असेल, तर तिला…!

दुसर्‍याच्या आनंदात आपलं सुख माणणं, म्हणजे खऱ्या अर्थाने मोठं होणं…. बाकी नुसतंच वय वाढण्यानं कुणी मोठा  होतं नसतो….!

मोठं होणं म्हणजे maturity येणं….!

किती कॅरेटचं सोनं घातलंय, यापेक्षा किती मूल्यांचं  कॅरेक्टर आहे हे समजणं म्हणजे maturity….!

विझलेल्या दिव्यांना सुद्धा किंमत द्यायची असते, कारण कालची रात्र त्यांनीच प्रकाश दिलेला असतो….

आज जरी आई बाप  म्हातारे आणि बिनकामाचे  दिसत  असले, तरी आपल्याला त्यांनीच उजळून टाकलंय….त्यांनाही किंमत द्यायची असते हे कळणं म्हणजे maturity….!

चुका शोधायला मेंदू लागतो…. पण माफ करायला हृदय…. हे समजणं म्हणजे maturity….!

…. अशाच एके दिवशी शिव्या देत फोन करत मला तिने घर बघायला बोलवलं…. तिथे तिने अनंत वस्तू विक्रीसाठी ठेवल्या होत्या, ते पाहून माझे डोळे दिपून गेले…. 

कृतज्ञतेने म्हणाली, “ ही भरभराट तुज्यामुळं झाली बाबा “. 

खरंच तिची भरभराट झाली होती…. पण केवळ वस्तूंची संख्या वाढली म्हणून तिला भरभराट म्हणायचं का ?  तर मुळीच नाही…..

काळ्याकुट्ट अंधारात मिणमिणता का होईना, पण दुसऱ्याच्या घरात एक दिवा लावणे म्हणजे भरभराट….

सर्व काही संपलेलं असतानासुद्धा उठून उभं राहण्याची इच्छा मनात बाळगणे म्हणजे भरभराट…

पाय नसतानाही आकाशात भरारी घ्यायचं वेड मनात बाळगणं म्हणजे भरभराट…

आपले डोळे पुसत असतांनाच, एक हात दुसऱ्यांचे डोळे पुसण्यासाठी पुढं जाणं म्हणजे भरभराट…

आपण पडलेले असतानासुद्धा, दुसऱ्याच्या आधारासाठी एक बोट आपोआप पुढं जाणं म्हणजे भरभराट….

आपल्याकडे काहीही नसणं आणि एके दिवशी खूप काही असणं– या दोन टोकामधलं अंतर जिद्दीने पार करणं म्हणजे भरभराट…. 

क्रमशः….

© डॉ. अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ म्हातारी…भाग 2 ☆ डॉ अभिजीत सोनवणे

डॉ अभिजीत सोनवणे

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ म्हातारी…भाग 2 ☆ डॉ अभिजीत सोनवणे☆

@doctorforbeggars

( पण कुणाचं ऐकेल तो मी कसला ? ) इथून पुढे —-

मी तिचं ऐकायचो नाही….. 

मी तिला ‘ ए म्हातारेच ‘ म्हणायचो आणि मग ती तोंडाचा पट्टा सुरु करायची, तोंडातून शिव्या यायच्या, मला मस्त गंमत वाटायची..  

वर  अजून म्हणायचो , ‘म्हातारीच तर आहेस…. तुला काय ताई म्हणायचं गं ?’  यावर  चिडून ती चप्पल दाखवायची….

लोक फूटपाथवर राहणाऱ्या या दोघांना शर्ट-पॅंट, साड्या, पैसे असं बरंच काही द्यायचे…. 

दर भाऊबीज आणि रक्षाबंधनाला मात्र मला ती बोलावून घ्यायची आणि ओवाळून झाल्यानंतर तिला भिकेमध्ये  मिळालेल्या शर्ट, पॅन्ट, बूट अशा अनेक वस्तू मला भेट म्हणून द्यायची….

बोचक्यातले शर्ट काढून मला ते होतील की नाही, हे ती  माझ्या अंगाला लावून बघायची….  

तिला मिळालेले फाटके बूट….. त्यातल्या त्यात चांगले निवडून ती मला द्यायची आणि  घालून बघ म्हणून आग्रह करायची…. 

“ होतील गं, दे मी घालतो “ असं म्हणून,  गुपचूप मी त्या  गोष्टी घ्यायचो…. 

“ व्वा…मला असाच शर्ट हवा होता “ असं मी तिला म्हणालो की तिचा चेहरा उजळून जायचा….

“ मला असाच बूट हवा होता आणि नेमका आज तू तसाच दिलास “  म्हटलं की तिला आभाळ ठेंगणं व्हायचं…. 

भीक म्हणून तिला मिळालेल्या गोष्टी ती मला द्यायची आणि मी त्या वस्तू बहिणीने दिल्या आहेत म्हणून सांभाळून ठेवायचो ….

“ शर्ट आणि बूट घाल बरं का….. न्हायी बसला तर फूडल्या बारीला दुसरा देते “  हे पण ती आठवणीने सांगायची… 

अशा प्रेमानं मिळालेल्या अनेक गोष्टींचा मी संग्रह केला आहे…. 

ज्यांच्याकडे पैसे होते त्यांनी इतिहासात अशा वस्तूंची  संग्रहालयं उभारली….

आठवणीसाठी स्मारकं बांधली…

खूप नंतर कळलं….. स्मारक बांधायला आणि संग्रहालय उभं करायला पैसा लागतच नाही….

स्मारक तयार करायचं असतं मनात आणि संग्रहालय उभं करायचं असतं हृदयात….! 

मिळालेल्या वस्तूला किंमत असेलही, नसेलही, देणाऱ्याच्या भावनेला मात्र मोल नसतं…

भावनांचं हे स्मारक बांधून उरात घेऊन मिरवायचं असतं…! 

तू डॉक्टर- मी अडाणी, तू जरा बऱ्या घरातला- मी रस्त्यावर राहणारी, असा काही भेद-भाव ती माझ्या बाबतीत करत नसे….

तिला मी म्हणजे तिच्या कुटुंबाचाच  एक भाग वाटतो.. 

ती तिच्यात आणि माझ्यात काहीही फरक करत नाही….

ती मला तिच्याचसारखा समजते…. तिने मला तिच्याचसारखं समजणं, हा मी माझा विजय मानतो !

मी म्हणजे तूच आहे आणि तू म्हणजे मीच आहे, हे ती समजत होती, आणि मी अनुभवत होतो…

“अद्वैत” ही संकल्पना नुसती वाचली होती… तिच्यामुळे मला अनुभवायला मिळाली

लोक बाहेर सर म्हणतात, ही मला मुडद्या म्हणते…

एरव्ही,’ आपणास कधी वेळ असतो ?  कधी आपणास फोन करू ? ‘ लोकांचे असे नम्रतेने मेसेज येतात…

ती मात्र बेधडक रात्री बारा वाजता फोन करते, ‘ मुडद्या मेलास का जिवंत हायेस ?  भयनीची काय आटवण हाय का नाय ?’ म्हणत ठेवणीतल्या शिव्या देते…. 

मी हसत तिला म्हणतो, “ बहीण कसली तू तर कैदाशीन आहेस, हडळ आहेस  म्हातारे …” 

मग काय …. यानंतर आणखी स्पेशल शिव्या सुरू होतात आणि मी तिने उधळलेल्या या फुलांच्या सुगंधाचा आस्वाद घेतो…. 

त्यात बहिणीच्या मायेचा आस्वाद असतो…. ! 

वजन फुलाचं होत असेलही…. सुगंधाचं करता येत नाही….

अगरबत्ती किलोत मोजत असतील सुद्धा, परंतु त्या अगरबत्तीपासून निघालेल्या सुगंधी वलयाचं वजन कशात करावं मी ….? 

ती तशीच होती– काटेरी फणसासारखी… ! 

बहीण म्हणून ती करत असलेली “माया” मोजायला माझ्याकडे कोणताही तराजू नाही…. 

तिला छत टाकून तात्पुरता निवारा करून दिला होता,  त्या झोपड्याला तिने घर म्हणून रूप दिलं होतं. मी त्यात जगण्यासाठी आवश्यक अशा सर्व वस्तू तिला घेऊन दिल्या होत्या.

लोक भीक देत होते, त्यात तिची गुजराण होत होती. परंतू  माझी बहीण भीक मागून जगत आहे, हा माझा अपमान होता…

आणि म्हणून त्या दोघांनी काहीतरी व्यवसाय करावा अशी माझी इच्छा होती…. 

क्रमशः….

© डॉ. अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ म्हातारी…भाग 1 ☆ डॉ अभिजीत सोनवणे

डॉ अभिजीत सोनवणे

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ म्हातारी…भाग 1 ☆ डॉ अभिजीत सोनवणे☆

@doctorforbeggars

ती मला भेटली होती साधारण चार वर्षांपूर्वी…. 

वय असावं साधारण साठीच्या आसपास… ती तिच्या यजमानांसह अंगाचं मुटकुळं करून पुण्यातल्या नामांकित रस्त्याच्या फुटपाथवर,  एका कडेला शून्यात नजर लावून बघत बसलेली असायची….. 

येता जाता मी तिला पहायचो…तिच्याशी बोलायचा प्रयत्न करायचो.  पण ती कधी दाद द्यायची नाही…. तिला अंधुक दिसायचं… जवळपास नाहीच…

वयाच्या मानाने तिचे यजमान बऱ्यापैकी धडधाकट दिसायचे, परंतु ती मात्र पूर्णतः खचलेली…. वयापेक्षा पंधरा-वीस वर्षांनी जास्त आहे असं वाटायचं…. मी तिच्या यजमानांशी  मैत्री करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनीही दाद दिली नाही.  मला याचं काहीच कारण कळत नव्हतं…. 

असंच वर्ष निघून गेलं….. पावसाळा सुरू झाला, एके दिवशी त्या रस्त्याने जात होतो.  माझ्या अंगावर रेनकोट होता…. सहज फूटपाथ कडे लक्ष गेलं– ते दोघे भिजत होते… पावसापासून लपण्याचा प्रयत्न करत होते…. ! सगळ्यांनीच छळलं होतं…. पाऊस बरा यांना सोडेल?

खूप वाईट वाटलं.. परंतू ते दोघेही सहकार्य करायला तयार नव्हते… मी तरी काय करणार ? 

तरीही एके दिवशी जुन्या बाजारात गेलो आणि तिथून प्लास्टिकची मोठीच्या मोठी ताडपत्री आणि सुतळी विकत आणली…. पाऊस  धो धो कोसळत होता… ते भिजत होतेच…

ते ज्या ठिकाणी बसले होते तिथे जाऊन मग त्यांच्याशी काहीही न बोलता या टोकापासून ते त्या टोकापर्यंत प्लास्टिकची ताडपत्री टाकून,  छत होईल असा काहीतरी देशी जुगाड केला…. 

तिला दिसत नव्हते… तिने शेजारी बसलेल्या नवऱ्याला विचारले, “ एवढ्या जोरात पाऊस पडत होता अचानक कसा थांबला ? “ यजमानांनी तिच्या कानात काहीतरी सांगितले. 

मी छत टाकून निघणार इतक्यात त्या आजीने मला हाक मारली….”  ए बाबा… हिकडं ये….” 

मी छताखाली गेलो, तशी ती मला म्हणाली, “  तू हायस तरी कोण?  आनी आमच्या मागं का लागला हायस?  तुला काय पाहिजेन…. जगू दे ना बाबा हित तरी सुखानं…” 

घरातून बाहेर पडलेले हे दोघे….जगाने यांना, या ना त्या कारणाने खूप फसवले होते, आता मीही त्यांना असाच फसवणार असा त्यांचा गैरसमज झाला होता….अनेकांनी यांना धोका दिला होता….

खरंच, विश्वास किंमती असेलही,  पण धोका मात्र खूप महाग असतो…!

पुढे तासभर मी त्यांच्याशी बोलत होतो.  मी नेमकं काय करतो आणि कशासाठी,  हे त्यांना समजेल अशा भाषेत यांना समजावून सांगितलं….’ माझ्याकडून तुमची काहीही फसवणूक होणार नाही झाली तर मदतच होईल ‘ याची मी त्यांना खात्री दिली…! मी निघालो, जाताना या वेळी तिच्या चेहऱ्यावर हसू होतं… 

यानंतर अनेक वेळा मी तिच्या त्या तात्पुरत्या उभारलेल्या छताखाली जायचो.  जाताना प्रत्येक वेळी संसाराला उपयोगी होईल अशी काहीतरी वस्तू घेऊन जायचो…. बघता बघता दोन माणसांना स्वयंपाक करून खाता येईल आणि जगता येईल अशा सर्व गोष्टी घेऊन दिल्या.

तिचं माझ्याविषयीचं मत आता बदलत चाललं… 

मी तिला फसवणार नाही, याबद्दल ति ची खात्री झाल्यावर त्या कुटुंबाबरोबर माझा स्नेह जुळला….

यानंतर तिला माझ्या गाडीवर बसवून तीन ते चार वेळा डोळ्यांच्या डॉक्टरांकडे घेऊन गेलो. ऑपरेशन केली, आणि … शेवटी एकदाचं तिला दिसायला लागलं…. 

एका पायाने ती अधू  होती…. मग तिला एक  व्हीलचेअर पण घेवून दिली….

आता नाती घट्ट झाली होती….

मी तिला गमतीने नेहमी  “ए म्हातारे” असं म्हणूनच हाक मारायचो.

तिला बाकी कशाचा नाही, पण म्हातारी म्हटल्याचा राग यायचा. बस एवढ्या एकाच गोष्टीने ती चिडायची….दरवेळी मला म्हणायची,  “  म्हातारे नको ना म्हणू…. ताई म्हणत जा की मला “. 

पण कुणाचं ऐकेल तो मी कसला ?

क्रमशः….

© डॉ. अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ एक स्टाफ रुम…..☆ सौ. सुचित्रा पवार

सौ. सुचित्रा पवार

? मनमंजुषेतून ?

☆ एक स्टाफ रुम ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

 

शुभ्र आच्छादनाखाली निश्चेष्ट, प्रेतवत पहुडल्या गाद्या उचलताना

तो मिश्किल हसत रहातो —-

इतस्ततः पसरलेल्या कागदी बोळ्यांना, चुरगळलेल्या कागदी कपांना

शेंगांच्या फोलांना अन फळांच्या सालींना

प्रश्न एक विचारतो —-

“घरेही यांची अशीच असतात का ? स्वच्छतेचे धडे देणारे गुरू न गुरुमाऊली

सार्वजनिक स्वच्छतेचे धडे स्वतः गिरवत नसतात  का ?—-

कुबट गाद्या कुत्सित हसून साक्ष देतात—

डेस्कवरील चहाचे चिकट डाग ओठ गच्च मिटतात !

पांचट विनोद ,राजकारण अन गावगप्पांचे आवाज हिंदळत राहतात भिंतीवर —-

ऑफ तासाला चघळत नाहीत कुणी–  विद्यार्थ्यांचे  जटील प्रश्न जिभेवर !

चटकदार खमंग वास अधून मधून दरवळतात भिशी पार्टीचे—

चघळत असतो कुणी शिष्य–डब्यातले कोरडे घास  चटणी भाकरीचे—-

“विठ्ठल नामाची शाळा भरली …” दूरवरून एक आवाज रेंगाळतो कानावर–

कल्पनेतली शाळा आकार घेते मनावर–

झटकतो आच्छादन अन मनातले विचार—

शिपाई तो शाळेतला निमूटपणे करतो–  शेवटी रूढ पायंडयाचा  स्वीकार !!

 

© सौ.सुचित्रा पवार 

तासगाव, सांगली

8055690240

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ दूरचे दिवे…. ☆ डॉ. ज्योती गोडबोले

डॉ. ज्योती गोडबोले 

? मनमंजुषेतून ?

☆ दूरचे दिवे…. ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆ 

लहानपणी एक गोष्ट वाचल्याचे आठवते —-

—- बादशहाने यमुना नदीत रात्रभर उभ्या राहिलेल्या माणसाला बक्षीस दिले. 

पण पोटदुखी झालेल्या दरबाऱ्यांनी म्हटले—’ याला नदीकाठी दिवे होते, त्याची ऊब मिळाली, म्हणून तो उभा राहिला, याला बक्षीस देऊ नये महाराज। ‘

यावरूनच मनात आले —- दूरचे दिवे हे कधी कोणाला ऊब देतात का ? ते दूर असतात,आणि त्यांनी ऊब द्यावी ही अपेक्षाच चुकीची आहे ना. व्यवहारात बघा–या दूरच्या दिव्यांचा, रोषणाई- व्यतिरिक्त काही उपयोग नसतो। मिरवणुकीत झगमगाट करतात, आणि मिरवणूक संपली,की  लोक त्यांना विसरूनही जातात.

अलीकडेच बघा, घरटी एक मूल परदेशात स्थाईक झालेले आढळते. त्यांचे आईवडील, त्या मुलांचे, नातवंडांचे फोटो, मोठ्या अभिमानाने आणि कौतुकाने सगळ्यांना दाखवत असतात. बघणाऱ्याला काहीवेळा त्यांचे ते कौतुक  ऐकूनच उबग येतो. पण बोलणार कोण,आणि त्यांच्या उत्साहाला टाचणी लावणार कशी, आणि  का ? रमतात बिचारे स्वप्नरंजनात, तर रमेनात का—

पण खरी परिस्थिती त्यांनाही चांगलीच माहीत असते. मग नातवंडांना उन्हाळी सुट्ट्या लागल्या, की हे तिकडे 2 महिने जातात, आणि सुट्टी संपली,की मायदेशी परत येतात.

या संदर्भात लेखिका मंगला गोडबोलेंचा, ” बाल्टिमोरची कहाणी “ हा अतिशय सुंदर लेख मला नेहमी आठवतो. किती परखड आणि सत्य लिहिलंय त्यांनी – तिकडे असलेल्या मुलांचे तोंड फाटेपर्यंत कौतुक, आणि इथे सतत जवळ राहून, हवे नको बघणाऱ्या मुला- सुनेला दुय्यम स्थान.– जसजसे वय वाढू लागते, तसे परदेशवाऱ्या झेपेनाशा होतात.

तिकडे सिटीझनशीप घेऊन कायमचे राहणाऱ्या लोकांना मी भेटलेय, बोललेय.

ते लोक 40 -45 वर्ष तिकडेच राहिलेले असतात. त्यांची कोणतीही मुळे भारतात रुजलेली रहात नाहीत. त्यांची पूर्ण मानसिक तयारी असते,की आपल्याला वृद्धाश्रम हाच पर्याय उरतो.

सुना अमेरिकन, जावई व्हिएतनामी, आणखी एखादी सून चिनी, –असले सगळे विविधदेशीय लोक, या म्हाताऱ्यांना कशाला हो विचारतात. 

पण तरी ते मात्र सांगत असतात, की आम्हीच oldage होम हा पर्याय निवडलाय.

–एका अमेरिका भेटीत मी बघून आले ते वृद्धाश्रम.  काळे,गोरे, चिनी, मराठी, पंजाबी,असे अनेक वृद्ध तिथे होते. ना आपुलकी,ना प्रेम। पण काळजी, कर्तव्यात मात्र कमी नाही.

भरपूर पैसे मोजावे, आणि रहावे. आता आता, तिथल्या मराठी लोकांनी एकत्र येऊन, आपल्या colonies करायला सुरुवात केलीय–इथल्या ‘अथश्री ‘सारख्या.

मला तिकडे एक आजी दिसल्या.  मी जवळ जाऊन त्यांच्याशी बोलले.

त्या म्हणाल्या, “ मी जर माझ्या गोऱ्या सासूला एकही दिवस सांभाळले नाहीये, तर माझ्या सुनेकडून मी कशी अपेक्षा करावी ,की  ती गोरी सून मला कायमचं घरी ठेवून घेईल.”

त्यांच्या डोळ्यात पाणी आले होते. म्हणाल्या, ” भाग्यवान हो तुमची आई. ८५  वर्षाची आहे, पण तुम्ही बहिणी संभाळताय.–माझी तक्रार नाही, पण इथे नको वाटते ग. संध्या छाया भिववतात.

माझा मुलगा सून चांगले आहेत हो. नवराही छानच होता. त्या काळात मी अमेरिकन नवरा केला,तर भारतात माझे आई वडील नुसते संतापले होते. बरोबरच  आहे ग. आता समजतो मला त्यांचा संताप. पण  4 वर्षांपूर्वी नवरा  गेला,आणि माझे घरच  गेले. मुले मला एकटी राहू देईनात.मग काय, हेच माझे घर आता. नशिबाने पैसा आहे, म्हणून या चांगल्या वृद्धाश्रमात  रहाणं परवडतेय मला.  नाही तर कठीण होते बाई सगळेच. “ 

माझ्या पोटात  कालवले ही कहाणी ऐकून.

मला त्यांनी विचारले, “ काय ग, इंडियात नसतील ना असे वृद्धाश्रम ? किती छान असेल तिथले म्हातारपण ? “ 

कोणत्या तोंडाने त्यांना मी सांगणार होते, की “ आजी असे अजिबात नाहीये. पैश्याच्या ओढीने तिकडेच गेलेली मुले, नाईलाजाने का होईना, पण एकाकी उरलेल्या आई किंवा वडिलांना ठेवतात हो वृध्दाश्रमात. एवढेच कशाला, परदेशात नसूनही, आई बाप नकोसे झालेली मुलेही कमी नाहीत—-” 

पण हे काहीही न बोलता, मी त्यांना वाकून नमस्कार केला. बरोबर आणलेला खाऊ त्यांना दिला— “ इथे आहेस तोवर येत जा मला भेटायला. मराठी बोलायलाही कोणी नाही ना ग इथे.” —–खिन्न मनाने मी मुलीबरोबर परत आले. तिला म्हणाले, “ बाई ग, इथे नका हं राहू म्हातारपणी. हा देश आपला नाही ग बाई. “ 

मुलगी माझ्या जवळ बसली. म्हणाली, ”आई,तू का रडतेस? बघू,ग आम्ही. येऊ परत साठ  वर्षाचे झालो की.”

पण मला मनातून माहीत आहे की –’ सिंहाच्या गुहेत गेलेली सशाची पावले, परत आलेली कोणी बघितली आहेत का.?’

 पुन्हा विचार केला–म्हणजे मनाला समजावलं — देश सोडण्याचा निर्णय त्यांचा, त्याचे भले बुरे परिणाम भोगायची तयारीही त्यांचीच—-

—निमूट बॅग भरली, आणि ठरलेल्या वेळी माझ्या देशात परत यायला निघाले ।—

 विमानाने टेकऑफ घेतला. मी अगदी सहज खिडकीतून बाहेर बघितलं —–

 अमेरिका दिव्यांनी नुसती झगमगत होती. हळूहळू विमान आकाशात उंच झेपावलं —- इतका वेळ झगमगणारे दिवे पुसट पुसट होत गेले, आणि एका क्षणी दिसेनासेच झाले—–का कोण जाणे, पण नकळत हसू आलं —- आणि झर्रकन मनात विचार आला —- 

“ दिवे असोत, की माणसे असोत, दूर असले की ऊब मिळण्याची अपेक्षा व्यर्थच ठरणार .” 

©  डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares