मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ जातीअंतासाठी – भाग 2 ☆ श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

श्रीमती मीनाक्षी सरदेसाई 

? मनमंजुषेतून ?

☆ जातीअंतासाठी   – भाग 2 ☆ श्रीमती मीनाक्षी सरदेसाई ☆

(त्यांच्या मते त्यांनी एक चांगला विनोद केला होता.) इथून पुढे —- 

मी सगळ्यांचं ऐकलं नि माझं म्हणणं माडलं–“आत्ता प्रश्न जातीचा नाहीये. गुणवत्तेचा आहे. हा तरुण मुलगा हुशार आहे. वडील लवकर गेलेत, आईने मोलमजुरी करून संसार पेललाय, चांगले संस्कार केलेत , त्यांचे मार्क्स बघा. त्यांनी शिकताना इंग्रजीच्या शिकवण्या घेतल्या आहेत.  ते हार्मोनियम उत्तम वाजवतात. त्यांना संगीताची जाण आहे. गावातल्या भजनी मंडळांना, धनगरी ओव्यांना साथ करायला ते जातात. आपल्या शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम बसवायला बाहेरचे  वादक बोलवायला लागतात, त्याना पैसे द्यावे लागतात. (पैसे हा शाळेचा वीक पॉईन्ट असतो ना.)  ते काम ह्यांच्याकडे सोपवता येईल. इतर सगळ्या उमेदवारांपेक्षा हयांची गुणवत्ता सर्व बाबतीत सरस आहे. केवळ त्यांची जात आपल्याला नको म्हणून त्यांना नेमायचं नाही का? म्हणजे रोष्टरचं बंधन आहे म्हणून ,नाहीतर खालच्या जातींवर आपण अन्यायच करणार का? हे मला बरोबर वाटत नाही. माझं ऐका प्लीज, ह्यांना नेमू या “.  बरीच वादावादी झाली. भांडलेच जवळजवळ. ठाम राहिले. काहीना माझं बरोबर वाटलं. नि झाली एकदाची माझ्या आवडत्या शिक्षकाची निवड.  ती योग्य ठरली.  २-३ वर्षांतच, मी निवडलेले शिक्षक मुलांचे आवडते  झाले. दरवर्षी समूहगीत स्पर्धेतलं  जिल्हा पातळीवरचं पहिलं बक्षिस आमची शाळा पटकाऊ लागली. ‘ उषःकाल होता‘ अशी अवघड गाणी त्यानी पंचवीस-तीस मुलांच्या समूहामध्ये बसवली. वेगवेगळ्या जातीधर्माची मुलंमुली एका सुरांत गाताना ‘एक ह्रदय’ झाली. आसपासच्या शाळा  त्यांना बोलावू लागल्या. मुख्याध्यापकांची परवानगी घेऊन ते जातात. त्यावेळी बुडलेले तास ते जादा तास घेऊन भरून काढतात. मुलांच्या अभ्यास- विषयांचं महत्त्व ते जाणतात. कर्तव्य तत्पर आहेत ..नीतीमान आहेत. आता तर म्हणे त्यांनी काही पुरस्कारही मिळवलेत ‘ आदर्श शिक्षक ‘ म्हणून.  शाळेतल्या मुलांचा कार्यक्रम त्यानी दूरदर्शनवरही सादर केला. 

पंधरा वीस वर्षांपूर्वी, सहजपणे, जातीभेद मानणाऱ्या संस्थाचालकांशी (मुख्याध्यापकांचं सर्व्हिस बुक वगैरे त्यांच्या हातात असतं तरीही) झगडून मिळवलेलं ते अगदी छोटसं यश मला समाधान देऊन गेलं आहे.

‘Destiny of the nation is being shaped in the classroom.’ हे लक्षात घेऊन शिक्षकांनी वर्गात, शाळेत, जातीअंतासाठी प्रयत्न केले तर थोडे तरी यश येऊ शकते.

जवळपास एखादी सहल निघते. फिरून झाल्यावर मोठा गोल करून डबे खायला बसायचं.  शिक्षकांनी मध्ये गोल करावा. वेगवेगळ्या मुलांसमोर हात करावा. मुलं आपल्यातलं शिक्षकांना तत्परतेने देतात. कोणत्याही जातीच्या मुलाने  दिलेलं खावं. ‘ मस्त झालय ‘ म्हणावं. आपले शिक्षक आपण दिलेलं पण आवडीने खातात , हे बघून मुलांना ब्रम्हानंद होतो.

हल्ली बऱ्याच शाळांचे माजी विद्यार्थी गेट-टुगेदर करतात. लहानपणचे भिन्न जातीतले असलेले मित्रमैत्रिणी पुन्हा एकत्र येतात. तेव्हा जात लक्षात ठेवली तर वाईट दिसेल म्हणून मनात आलं तरी दाखवलं जाणार नाही. अशी संमेलनं करायला हवीत. 

एखादा मुलगा किंवा मुलगी आजारी असते. त्याची जात कोणतीही असली तरी शिक्षकांनी त्याच्याकडे बघायला जावं. बरोबर तीनचार विद्यार्थ्यांना न्यावं.  सर ,बाई जात पाळत नाहीत हे मुलांना कळतं . मुलं नेहमीच शिक्षकांचं अनुकरण करतात.  मुलांच्या मनावर ते ठसतं. आमची खारेपाटणची शाळा नवीन निघाली होती. स्वातंत्र्य सैनिक शंकरराव पेंढारकर–’ आता  स्वराज्य मिळालं, पण ते सुराज्य व्हायला हवं.  त्यासाठी प्रत्येकाने खारीचा वाटा उचलायला हवा,’ म्हणून त्यांनी ‘ शिक्षणातून पुनर्रचना ‘हे ध्येय ठरवलं. खारेपाटणसारख्या अगदी लहान गावात ते आले. त्या जुन्या काळात त्यांनी विद्यार्थ्यांवर जातीभेद न पाळण्याचे संस्कार युक्ती युक्तीने केले. कारण समाजाला दुखवून चालणार नव्हतं. आंबेडकर जयंतीला आम्ही गावाबाहेरच्या वस्तीतल्या झोपड्या स्वच्छ करायला जायचो. पर्युषण काळात बस्ती सजवायचो, गणपती उत्सव , नवरात्र ह्या गावातल्या सार्वजनिक सणांना आम्ही गावकऱ्यांना मदत करायचो, श्रमदानातून भेदाभेद न पाळण्याची सवयच लागली आम्हा त्या काळच्या मुलांना. एक खेडवळ बाई म्हणाली, ” पोरानो, सर सांगतात तसा वागा.  कोणाक भिवुचा नाय. लोका काय, चार दिवस कावकाव करतंत. मगे गपचुप बसतंत.”  प्रयत्न केले तर अडाणी सुध्दा शहाणी होतात ती अशी.

जातीअंतासाठी मानअपमान मात्र बाजूला ठेवावा लागेल.

आम्ही बरीच वर्षं श्रावणातल्या, गौरीच्या, सवाष्णी म्हणून वेगवेगळ्या जातीच्या बायकांना बोलावतो. त्यांची रीतसर ओटी वगैरे भरतो. त्यांना छान वाटतं. आम्हालाही समाधान वाटतं.

अशा अनेक गोष्टी करून पाउलं पुढेच पडतील, मागे तर नक्कीच जाणार नाहीत.

समाप्त 

लेखिका : श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

सांगली

मो. – 8806955070, 9561582372.

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ जातीअंतासाठी   – भाग 1 ☆ श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

श्रीमती मीनाक्षी सरदेसाई 

? मनमंजुषेतून ?

☆ जातीअंतासाठी   – भाग 1 ☆ श्रीमती मीनाक्षी सरदेसाई ☆

जातीभेद हा समाजाला लागलेला एक कलंक आहे. ती विषारी अशी कीड आहे, तो समाजाला कुरतडून खाणारा कँन्सर आहे –अशी तळमळ व्यक्त करणारी वाक्य आपण नेहमी ऐकतो, वाचतो. सर्व समाज, समूह, धर्म ह्यात तो आहेच. तो पूर्ण नाहिसा व्हावा असं वाटतं,पण त्यासाठी आपण काय करायचं हे कळत नाही.  प्रत्येक जात त्यांच्यापेक्षा तथाकथित ‘खालच्या’ जातीला कमी लेखते,आपल्या जातीचा टेंभा मिरवते आणि कडकपणे भेदाभेद पाळते, हे   समाजात वावरताना नेहमीच दिसून येतं.   ह्याबाबतीतले माझे काही अनुभव सांगावेसे वाटतात.

आमच्याकडे  कामांना येणाऱ्या गोतावळ्यात वेगवेगळ्या जाती आहेत. प्लंबर, गवंडी, केअर टेकर- हे मुसलमान आहेत. सुतार उत्तर प्रदेशचा, माळी -लिंगायत,  गेटं वगैरे करणारा बी.सी.  आहे. इलेक्ट्रिशियन ब्राम्हण. आमची कामवाली  तिच्या भाषेत ‘वर’च्या  जातीची..ती आम्हाला म्हणते,  “ ह्या समद्यास्नी कशाला बोलावता ? आमच्या जातीतले आनू काय ? त्या नर्शीला–नर्सला तुमच्या ट्येबलावर खायला बशिवता ह्ये बरं न्हाई.”

मी तिला म्हणते, “ चांगलं काम करणाऱ्याला आम्ही बोलावतो. जात नाही बघत. त्यांचे मोबाईल नंबर सेव् केलेत आम्ही. शबाना ह्यांचं किती प्रेमाने करते. स्वच्छ रहाते. तिला टेबलावर खायला दिलं तर तुझ्या का पोटात दुखतं ? तुला पण देतेच की “.

त्यावर तिचं म्हणणं- “ आम्ही हलक्या जातीला पंक्तीला घेत न्हाई.  तसं क्येलं तर भावबंध वाळीत टाकतील आमास्नी. “ खूप वर्ष ती काम करतेय आमच्याकडे, पण तिचं मन बदलणं आम्हाला शक्य झालेलं नाही. 

शाळा हे जातीभेद न पाळणारं एक चांगलं केंद्र असतं. मुलं निरागस असतात. वेगवेगळ्या जातीजमातीच्या मुलांची अगदी घट्ट मैत्री असू शकते. ती एकमेकांच्या गळ्यात गळे घालून फिरतात, एकमेकांच्या डब्यातलं खातात, भेदाभेद न पाळणारे हे ‘छान छोटे’ समाजात वावरायला लागले की मात्र ‘वाईट्ट मोठे’ होतात़.  त्यांच्या डोक्यात जातीभेदाची कीड वळवळू लागते. मूल्यं कायमची ठसावीत म्हणून शिक्षकांनी काय करायला हवं ? पण लीला पाटीलबाईंची प्रिय विद्यार्थिनी म्हणून मला खरंच शिक्षकांबद्द्लच भरंवसा वाटतो. पुलंच्या चितळे मास्तरांइतके नाही, पण मोठेपणीही लक्षात रहातील अशी जातीअंताची मूल्यं ठसवणारे काही शिक्षक आहेत, ते करतील असं काम. ‘ लहूका रंग एक है ‘,   किंवा,  ‘ जात कोणती पुसू नका, धर्म कोणता पुसू नका, उद्यानातील फुलांस त्यांचा रंग कोणता पुसु नका,’   किंवा,  ‘ ब्राह्मण नाही, हिंदूही नाही, न मी एक पंथाचा ‘ अशी शाळेत शिकवलेली, आणि पोटतिडकीने म्हटलेली समूहगीतं आठवतीलच काही मुलांना तरी. म्हणजे शाळेतच जातीअंताचे संस्कार होऊ शकतात. लक्षपूर्वक करायला हवेत मात्र.

मी मुख्याध्यापक असतानाचे काही किस्से अजूनही आठवतात.— आमच्या त्या गावात मादनाईक गुरुजी म्हणून एक रिटायर्ड प्राथमिक शिक्षक होते. राष्ट्रसेवादलाचे कार्यकर्ते होते ते.  कधीतरी आमच्या शाळेत यायचे. एखादा तास मागून घ्यायचे.  ते स्वतः जैन, पण जातीभेद त्यांनी कधीच पाळला नाही. सर्व जातीच्या, गरीब, भटके, ऊस तोडणाऱ्यांच्या, अशा मुलांना हाताला धरून ते आपल्या घरी न्ह्यायचे. आम्ही गुरुजीना ‘ विठु माझा लेकुरवाळा ‘ म्हणायचो. ते मुलांना खाऊपिऊ घालायचे. कधीतरी निरोप यायचा–‘ बाई, बायको माहेरी गेली आहे. चार जातीची चार पोरं शाळा सुटल्यावर माझ्याकडे पाठवा. त्यात एक ब्राह्मणही असू दे. पोरांना पाणी, स्वयंपाक असं  करायला लावतो. श्रमसंस्कार  होईल त्यांच्यावर. सगळी मिळून इथेच जेवतील ‘–जातीभेद  न पाळण्याचा एक आदर्श त्यांच्या रूपाने गावाला मिळाला होता. 

शिक्षकांच्या नेमणुका शालेय समिती किंवा स्कूल कमिटी करते. त्या कमिटीत मुख्याध्यापकही असतात. त्यावर्षी एक डी. एड. झालेला  शिक्षक  भरायचा होता. मुलाखती झाल्या.  एका  होतकरू  तरुण शिक्षकाची मी शिफारस केली. कमिटीचे अध्यक्ष वरच्या जातीचे होते. उपाध्यक्ष त्यांच्यापेक्षा वेगळ्या जातीचे  होते.

अध्यक्ष मला म्हणाले, ” गेल्या साली  जागा रोष्टर परमाने भरली न्हवं ? मग आता आणि ह्ये  कशाला ? आता आपल्यातले भरु या की. त्यो पाचवीला इंग्रजी शिकवनार ? म्हराटी तरी नीट बोलायला येतय का त्याला ?” मी उघड बोलू शकत नव्हते, कारण ते माझे वरिष्ठ होते. पण मनात म्हटलं, ‘ तुम्मी तरी कुटं शुद बोलताय? ‘ उपाध्यक्षाना वाटत होतं आपला भरावा. ‘ तो कुंभाराचाबी चांगला वाटला. पोरांची कच्ची मडकी पक्की करील ‘.एक सभासद म्हणाले. त्यांच्या मते त्यांनी एक चांगला विनोद केला होता—-

क्रमशः ……

लेखिका : श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

सांगली

मो. – 8806955070

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आठवणींचा त्रिपूर…! ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

? मनमंजुषेतून ?

आठवणींचा त्रिपूर…! ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

आज त्रिपुरी पोर्णिमा! दसरा दिवाळीपासून सुरू झालेल्या सर्व सणांची सांगता या त्रिपुरी पौर्णिमेने होते. त्रिपुरी पौर्णिमा आली की डोळ्यासमोर आपोआपच आठवणींचा त्रिपुर उभा राहतो ! तेलाच्या पणत्यांनी उजळलेली असंख्य दिव्यांची दीपमाळ दिसावी तसा हा आठवणींचा त्रिपुर डोळ्यासमोर येतो.लहानपणी त्रिपुर पहायला संध्याकाळी सर्व देवळातून फिरत असू!

वर्षभर उभी असलेली दगडी त्रिपुर माळ   उजळून  गेलेली दिसत असे. गोव्यातील तसेच कोकणातील देवळातून अशा दिप माळा मी खूप पाहिल्या.

पण… माझ्यासाठी ही त्रिपुरी पौर्णिमा मोठी भाग्याची होती बहुतेक! कारण ह्यांचा जन्म त्रिपुरी पौर्णिमेला झाला! सासुबाई  सांगत, ‘समोर देवळात त्रिपुर लावून आले आणि मग यांचा जन्म झाला! त्याकाळी जन्मवेळ अगदी परफेक्ट नोंदली जाण्याची शक्यता कमी असे, पण ह्यांचा जन्म त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी झाला एवढे मात्र खरे! आणि लग्नानंतर तारखेपेक्षा त्रिपुरी पौर्णिमेला ह्यांचा वाढदिवस साजरा केला जाई!

सांगलीला आमच्या घरासमोर असलेल्या मारुती मंदिरात संध्याकाळी त्रिपुर लावण्यात  प्रकाश भावजींचा पुढाकार असे. मग मुले आणि आम्ही सर्वजण पणत्या , मेणबत्या घेऊन त्रिपुर लावण्यात मदत करत असू. मंदिराचे सौंदर्य पणत्यांच्या स्निग्ध प्रकाशाने उजळून गेलेले पहाण्यात आम्हाला खूप आनंद मिळत असे. या काळात आकाश साधारणपणे निरभ्र असे. शांत वातावरणात वाऱ्याची झुळूक आणि गारवा असला तरी पणत्या  तेवण्यासाठी योग्य हवा असे. सगळीकडे नीरव शांतता आणि अंधार असताना ते दिवे खूपच उजळून दिसत! अगदी बघत राहावे असे!

प्रत्येक सण आपले वैशिष्ट्य घेऊन येतो. तसा हा त्रिपुरी पौर्णिमेचा दिवस! यानंतर थंडीचे दिवस शालीत गुरफटून  घेत डिसेंबर ,जानेवारी येतात, पण बरेचसे मोठे सण संपलेले असतात. संक्रांतीचे संक्रमण सोडले तर फाल्गुनातील होळी आणि चैत्र पाडव्यापर्यंत सर्व निवांत असते.

ह्यांच्या आयुष्याचे 71 त्रिपूर पूर्ण झाले! या त्रिपुरी पौर्णिमेच्या आनंदात आम्ही परिपूर्ण जीवन जगलो,असेच आनंदाचे, आरोग्याचे टिपूर चांदणे यांना आयुष्यभर मिळो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना! जीवेत शरद: शतम्!

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे – भावपूर्ण श्रद्धांजली ☆ सौ. मंजुषा सुधीर आफळे

सौ.मंजुषा सुधीर आफळे

? मनमंजुषेतून ?

☆ शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे – भावपूर्ण श्रद्धांजली  ☆ सौ. मंजुषा सुधीर आफळे ☆ 

babasaheb purandare felicitation ceremony: बाबासाहेब पुरंदरेंचा उद्या नागरी सत्कार; निमंत्रितांच्या यादीत 'या' दिग्गजांचा समावेश - shiv shahir babasaheb purandare turns 100 ...

? बाबासाहेब बळवंत मोरेश्वर पुरंदरे ?

ज्यांनी आपले उभे आयुष्य श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायी अर्पण केले, अशा थोर शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली…….?

हिमालयातील ट्रेकसाठी दुरांतोमधून प्रवास सुरू होता. संध्याकाळ झाली होती. बाहेर अंधार पडला होता. आम्ही पत्ते खेळत होतो. तितक्यात आमच्यापैकी कुणीतरी धावत येऊन, ‘ शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे दिसले आपल्या गाडीत — मागच्या बाजूने २ डबे ओलांडून गेल्यावर दिसले ‘  अशी बातमी दिली. ताबडतोब डाव सोडून आम्ही धावत गेलो. आणि त्यांचे दर्शन घडले. त्या तेजःपुंज व्यक्तिमत्वापुढे नतमस्तक झालो. डोक्यावर हात ठेवून त्यांनी आम्हा सर्वांना आशीर्वाद दिले. तो आयुष्यातला खूप अविस्मरणीय क्षण होता. प्रत्यक्ष देव भेटल्याचा अनुभव आला. डोळ्यात आनंदाश्रू —मन भरून आले.

बोलता येईना. ते हसले. “बसा”  म्हणाले. वडिलांजवळ बसल्यासारखेच वाटले. आता ट्रेक यशस्वी होणारच हे निश्चित होते. आणि तसेच झाले. एक विलक्षण अनुभव जगता आला. त्याबद्दल देवाची  खूप खूप आभारी आहे.

भेटीनंतर जी उर्जा, चेतना मिळाली, ती आजतागायत टिकून आहे. अजूनही ट्रेकला जायचं ठरवलं की, ही आठवण मनात येते. आणि अंगात चार हत्तींचे बळ आल्यासारखे वाटते.

अफाट स्मरणशक्ती, आपल्या भाषणातून, लेखनातून, अभिनयातून संपूर्ण इतिहास, त्यातील प्रसंग,  जिवंतपणे डोळ्यासमोर उभे करण्याचे सामर्थ्य त्यांच्याकडे होते. अत्यंत निष्ठावंत शिवप्रेमी, अभ्यासू आदर्श व्यक्तिमत्व–ज्यांनी आपलं सर्व आयुष्य खर्च करून भावी पिढीसाठी इतिहास जागवला, आणि तो जिवंत ठेवण्यासाठी तळमळीने अखंड यज्ञ सुरू ठेवला, त्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना शतशः नमन—?

शरीराने आज ते आपल्याजवळ नसले तरी त्यांचे महान कार्य सतत प्रेरणा देणारे आहे. ते कार्य पुढे नेण्याची जबाबदारी स्वीकारणाऱ्यांसाठी ते नेहमीच त्यांच्या सोबत आहेत, हे नक्कीच–

भावपूर्ण श्रध्दांजली… ?

 

© सौ.मंजुषा सुधीर आफळे

विश्रामबाग, सांगली.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ हर हर महादेव…. ☆ सुश्री सुनीता पाटणकर

सौ. सुनीता पाटणकर

? मनमंजुषेतून ?

☆ हर हर महादेव…. ☆ सुश्री सुनीता पाटणकर ☆

babasaheb purandare felicitation ceremony: बाबासाहेब पुरंदरेंचा उद्या नागरी सत्कार; निमंत्रितांच्या यादीत 'या' दिग्गजांचा समावेश - shiv shahir babasaheb purandare turns 100 ...

? बाबासाहेब बळवंत मोरेश्वर पुरंदरे ?

सांगलीच्या राजवाड्याच्या तीन कमानी,त्यातून आत गेलं की,दरबार हॉल समोरचे,भव्य पटांगण……….

रात्रीचे जेवण लवकर आटोपून,खाली बसण्यासाठी स्वतःच बसकूर पिशवीत घेऊन बरोब्बर साडे सातला घर सोडायच.

पटांगण गच्च भरलेलं,पुढची जागा पकडून बसायचं…………

ठीक म्हणजे ठीक आठ वाजता,बाबासाहेबांच्या व्याख्यानाला सुरुवात……..

छत्रपती शिवाजी महाराजांचे दैदिप्यमान चरित्र उलगडणारं,ओघवत्या, तडफदार, मनामनात चैतन्य फुलवणारं, राष्ट्रभक्तीची तेजोमय ज्योत प्रज्वलित करणारं व्याख्यान

“हर हर महादेव”ची गुंज तनमनात…….

ते म्हणायचे, “छत्रपती शिवाजी महाराजांनी जिथे, जिथे पाऊल ठेवलयं, तिथे, तिथे मी पाऊल ठेवलं आहे आणि अखेर आज महाराजांना भेटायला, आपल्यातून ते गेले.

आमच्या लहानपणी आम्हाला  गोब्राह्मण, प्रतिपालक, क्षत्रियकुलवतंस, राजाधिराज, छत्रपती शिवाजी महाराज समजले, ते बाबासाहेब तुमच्या मुळेच……

त्यानंतर,”दार उघड बये दार उघड”, म्हणत सायंकाळी सातच्या ठोक्याला तुळजाभवानीच्या आरतीने “जाणता राजा”

या महानाट्याचा पडदा उघडायचा.या महानाट्याने वेड लावलं…….

बाबासाहेब आपण इतकं दिलंय ना आम्हाला.  ………..

शब्दांच्या पलीकडल………..

माझ्या सारखी एक सामान्य व्यक्ती, ‘महाराजांची उपासक’, तुमच्या पायावर डोकं ठेऊन नमस्कार करण्याची संधी मला दोनदा लाभली होती. मला खूप धन्यता वाटते. ज्यांच्या पायावर ‘ठक’ ठेवावे, असे पाय खूप कमी असतात.

शिवशाहिरांना मानाचा मुजरा! साष्टांग दण्डवत!!!!!!

 

सुनीता@पाटणकर.

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ ते तिघे…!!! ☆ डॉ अभिजीत सोनवणे

डॉ अभिजीत सोनवणे

??

?‍⚕️ डॉक्टर फॉर बेगर्स ?‍⚕️ डॉ अभिजीत सोनवणे ☆

☆ ते तिघे…!!! ☆ 

(अति लघु व्यथा  (अलव्य) )

@doctorforbeggars

शनिवार… भिक्षेकरी तपासत एका स्पॉटवरून दुसऱ्या स्पॉटकडे जात असताना सहज फूटपाथ कडे लक्ष गेलं.

तिथं एक माणूस दयनीय अवस्थेत पडला होता, पडल्या पडल्या वारंवार गुडघ्याला हात लावून विव्हळत होता… रडत होता. 

मी नीट पाहिलं, अर्रे… हा तर तोच… पूर्वी वाढपी म्हणून एका ठिकाणी काम करायचा… कोविड काळात नोकरी गेली… रस्त्यावर आला…. अन्नपूर्णा प्रकल्पात याला डबे वाटण्याचं काम देऊन पगार सुरू केला होता. 

मागच्या वर्षी केवळ वेळेवर रक्त न मिळाल्यामुळे अनेकांचे प्राण गेले होते. 

हा तसा धट्टाकट्टा…! — मी याला म्हटलं होतं, ‘समाज आपल्याला ‘भीक’ देऊन जगवत आहे—चल, आज समाजाला गरज आहे—- आपण समाजाला “रक्त” देऊन “दान” करू— समाजाला परतफेड करू…

हा चटकन तयार झाला होता. याने माझ्या शब्दावर तेव्हा रक्तदान केले होते.

कोरोनाने आजारी असलेले तीन अतिगंभीर रुग्ण, ज्यांना रक्ताची आत्यंतिक गरज होती, परंतु कुठेही रक्त उपलब्ध होत नव्हतं…. हे तीनही रुग्ण याने केलेल्या रक्तदानामुळे तेव्हा वाचले होते. 

मी गडबडीने उतरून त्याच्याजवळ गेलो. मला पाहून त्याने हंबरडा फोडला… मी गुडघा पाहिला… गुडघ्याचा आकार चित्रविचित्र झाला होता… गुडघ्याच्या हाडांचे तुकडे तुकडे झाले असणार, हे लगेच लक्षात आलं.

‘गाडीनं उडवलं सर, मी दोन दिवस इथेच पडून आहे, मला वाचवा सर… खूप दुखतंय हो , या दुखण्यातून मला मोकळं करा सर…’– त्याला भयानक यातना होत असणार…  त्याच्या ओरडण्यातून, रडण्यातून या सर्व वेदना प्रत्यक्ष दिसत होत्या…. कागदावर चित्र दिसते तसे !

त्याच्याकडे बघवत नव्हतं…. तो गुडघा पकडून रडत होता. मोठी माणसं रडताना खूप भेसूर दिसतात…. ! 

आपलं काही दुखत असतं.. आपण कळवळतो … तेव्हा होते ती “वेदना”…. परंतु दुसऱ्याचं दुखणं पाहून जेव्हा आपण कळवळतो ती “संवेदना”… ! 

आज जरी हा स्वतःच्या वेदनांनी तळमळत होता… तरी कधी एकेकाळी… दुसऱ्यांच्या वेदना समजून घेऊन, याने रक्तदान करत, तीन जणांना जीवदान देऊन “ संवेदना “ जपली होती…

आज याच्या वेदनेवर फुंकर मारणे हे माझं काम होतं… ! 

आणखी उशीर न करता, रिक्षात घालून त्याला मॉडर्न ऑर्थोपेडिक हॉस्पिटलमध्ये एडमिट केलं .

उपचार सुरु झाल्यानंतर, काही वेळातच वेदना थांबल्या. पायाला प्लास्टर घातलं गेलं… आता त्याच्या चेहऱ्यावर हसू होतं. 

त्याला भेटायला गेलो… डोळ्यात पाणी… चेहर्‍यावर हसू…

दोन्ही हात जोडत म्हणाला, “ सर, तुम्ही मला वाचवलं… नाय तर मेलो असतो रस्त्यावर.  “

जोडलेले त्याचे दोन्ही हात हातात घेऊन त्याच्या कानाजवळ जात म्हणालो, “ तुला एक गंमत सांगू का ?  तुला मी वाचवलं नाही… तुला वाचवलं त्या तिघांनी… ज्यांना कधी काळी तू तुझं रक्त देऊन वाचवलं होतंस… ! “ 

त्याच्या चेहऱ्यावरचे भाव झरझर बदलत गेले…. जणू अविश्वासाने तो माझ्याकडे पाहत होता…

गालावर हळूच चापटी मारत त्याला म्हटलं, “ बघतोस काय असा येड्या माझ्याकडं ? दुसऱ्याला जगवणारा, स्वतः कधी मरत नसतो… ! “ 

त्याने शून्यात कुठेतरी पाहत पुन्हा हात जोडले—- हा नमस्कार  होता, त्या “तिघांना” !!!

२४ ऑक्टोबर २०२१

© डॉ. अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ चारिका वारी … आतंरिक नाते ☆ सौ. सावित्री जगदाळे

सौ. सावित्री जगदाळे

? मनमंजुषेतून ?

☆ चारिका वारी … आतंरिक नाते ☆ सौ. सावित्री जगदाळे ☆

गौतम बुद्धांनी संघाला चारिका करण्याचा उपदेश केला. “भिक्खुंनो, बहुजनांच्या हितासाठी ,सुखा- -साठी, लोकांवर अनुकंपा करण्यासाठी आणि देवमनुष्याचे साफल्य, हित, सुख यांसाठी तुम्ही चालत रहा. “— “ सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम ”—-(लेखक आ.ह.साळुंखे )– या पुस्तकातील हा उतारा वाचला आणि मला  वारीची सुरुवात का झाली असेल याचा थोडासा अंदाज आला. नेहमी वाटायचं “का सुरू केली असेल ही वारी ?”

आपल्याकडे तीर्थयात्रा करणे तसे होतेच. पुण्यप्राप्ती व्हावी म्हणून, मोक्ष प्राप्ती व्हावी म्हणून तीर्थ यात्रा करायचे. पण ठराविकच  काळ किंवा तोच मार्ग असं काही नसतं. वारीला मात्र ठराविक काळ, ठराविक मार्ग, ठराविक मुक्काम, सगळं काही ठरलेलं असतं.  (वारीचं  व्यवस्थापन जबरदस्त असते. अतिशय शिस्तबद्ध , काटेकोर असते.)  सगळ्यांनी एकत्र पायी जाणं, असं का असावं असं नेहमी वाटायचं.

तुकोबांची पालखी देहूवरून अगदी अलीकडच्या काळात का निघत असेल ??  वाटतं तुकारामांनी हा मनातला विचार नारायणाला तर सांगितला नसेल ??? त्यांची इच्छापूर्ती करण्यासाठी नारायणाने देहूवरून इतर वारीबरोबर तुकोबांची वारी सुरू केली असावी . तशी वारी कधी सुरु झाली याचा स्पष्ट , ठाम काळ सांगता येणार नाही . नामदेव , ज्ञानेश्वरांच्याही आधी वारी असावी असं अभ्यासकांचं मत आहे . देहू वरून मात्र तुकोबानंतर नारायणाने तुकोबांची पालखी पंढरपूरला वारीबरोबर नेण्यास सुरवात केली असावी. कारण तुकोबांचे विचार बुद्धासारखेच होते, आहेत.  बहुजन हिताय, बहुजन सुखाय या उद्देशाने चारिका करा. चालण्यामुळे लोकांना धर्म सांगता येतो. त्यांचं कल्याण करता येते. म्हणून एका दिशेला एकजणाने जाऊन लोकांच्या कल्याणासाठी उपदेश करावा. भिक्खुंनी चारिका करावी असं त्यांनी सांगितले. स्वतःही चार दशकांहून अधिक काळ त्यांनी चारिका केली. वारकरी संप्रदायाचे विचार, आचार बघितले तर बुद्धाच्या विचारांचा हा आधुनिक अवतार वाटतो. ठाम मत मांडण्यासाठी माझा तेवढा अभ्यास नाही. इतरांनी लिहिले आहे तेच मांडण्याचा हा प्रयत्न.

विठ्ठल हा बुद्धाचा अवतार आहे असं संतांच्या अनेक  अभंगातून रामचंद्र ढेरे  वगैरेंनी दाखवले आहे.

बुद्ध धम्म जेव्हा भारताबाहेर घालवून दिला, तेव्हा सगळाच्यासगळा जाणे शक्य नसते. काही अंश राहतो, उरतो. सुप्त अवस्थेत, गुप्तपणे कुठेतरी वाढ विस्तार, विकास होत राहतो. उजळ माथ्याने नसेल वावरत पण वेष बदलून धम्म टिकवून ठेवण्याचा प्रयत्न झाला नसेल कशावरून….

चारिकाबद्दल वाचल्यावर तर खात्रीच वाटली. लोकांचे कल्याण करायचे असेल तर चालले पाहिजे. हे असे विचार तुकोबा घरात, मुलांजवळ  बोलत असणार. जिवंतपणी ते साध्य झालं नाही की मागे राहणारे त्या व्यक्तीची इच्छा पूर्ण करण्यासाठी अनेक कष्ट घेतात. तसंच हे वारीचे असावे. असं माझे वैयक्तिक मत आहे..

॥ ॥ ॥

© सौ. सावित्री जगदाळे

संपर्क – १००, कुपर कॉलनी, सदर बाजार, सातारा ,पीन-४१५०० १

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ कोतमीर ☆ मेहबूब जमादार

? मनमंजुषेतून ?

☆ कोतमीर ☆ मेहबूब जमादार

साधारण 1980 च्या आसपासचे दिवस होते.स्वस्ताई होती. मुबलक भाजीपाल्यांची उधळण होती. शेजारी शेजार धर्माला जागत होता. माणूसकीची जाण होती. दिवस अगदी सुखाचे होते.

नुकतीच सुगी आटपली होती. रानांतली ज्वारी, देशी भूईमूग काढला होता. कोतमीरीला धनं आलं होतं. ते भी पिक शेतक-यानीं काढलं होतं. सगळी रानं मोकळीच निपचीप पडली होती. नेहमीप्रमाणे कार्तिक महिन्यात हलकासा पाऊस पडला होता.

मी अन वसंता सहज ओढ्याकडे फिरायला गेलो. ओढयाला स्वच्छ पाणी वहात होतं. काटावरल्या झाडांची सावली पाण्यात पडली होती. आंम्ही ओढ्याकडे सिताफळ, मोराचे पीस गोळा करणेस नेहमी जात असू. आमच्यात तसा थोरला म्हणजे शंकर आबा होता. फिरतानां आमच्या एक गोष्ट लक्षात आली. आमच्या मळ्यात सगळीकडे पालेदार कोतमीर ऊगवली होती. ती पेरली नव्हती पण झडलेल्या धन्यांच्या बियांमूळे ती सा-या रानांत पेरल्यासारखी ऊगवून आली होती.हिरवीगार कोतमीर पहातानां डोळं ठरत नव्हतं.

त्याच दिवशी शंकरआबाला सांगितलं तसं तो म्हणाला,

“ऊद्याच सगळी कोतमीर उपटून गोळा करू.दहा पैशाला एक अशा पेंड्या बांधू.परवा गुरूवार आहे.येरवाळी जाऊ अन बाजारात विकून चैनी करू”

हे ऐकल्यावर आमचे चेहरे खुलले.बेत चांगला होता. त्याला खर्च कांहीच नव्हता. बरं कोतमीर घेवून जायला तिघांच्याही सायकली होत्या.

बुधवारी सायंकाळीच आंम्ही तिघानीं कोतमीर उपटली. त्यात कुठं तण आलं तर ते वेगळं केलं. पानमळ्यांतनं वाळलेल्या केळांच सोपट आणलं. त्याच्या पेंड्या बांधता येतील अशा बारीक वाद्या केल्या. राती जेवनांआधी त्या सगळ्या पेंड्या एकसारख्या बांधल्या. एका पोत्यावर पाणी मारून त्या बैजवार ठेवल्या. पेंड्या मोजल्या जवळ जवळ अडीचशे पेंड्या भरल्या.

दुसऱ्या दिवशीं येरवाळी ऊटून त्याच्या तीन वाटण्या केल्या. त्या सायकलच्या क्यरेजवर बैजवार बांधल्या. पडू नयेत म्हणून त्या दोरींन बांधल्या. तिघांची जेवनं एका पिशवीत घेतली. ऊजाडताच निघालो. कांहीवेळा चालत तर कांही वेळा सायकलवर बसून इस्लांमपूरची गणेश मंडई गाटली. खाली शंकरआबाची लुंगी अंथरली. त्याच्यावर सगळ्या पेंड्या ठेवल्या. आसपास सगळीकडं पाहीलं. सगळीकडं कोतमीर विकायला आली होती. मला तरं वाटलं अख्खा तालुका कोतमीर विकायला तिथं आला होता.

तास गेला. दोन तास गेले. पण कोतमीर ला गि-हाईक काय भेटनां. चार दोन यायची पण कोतमीर न घेताच हसत निघून जायची. हिच परिस्थिती सगळीकडे होती.

आंम्ही तिघं कोतमीरकडं मोठ्यां आशेनं बघत होतो. कोतमीर आमच्याकडं दिनदुबळ्या नजरेनं पहात होती.

आंम्ही कोतमीर जवळ बसून होतो. तोवर वाडीतला म्हादण्णा आला. आमच्याकडं बघून तो म्हणाला,

“गड्या,तुमची वेळ चूकली”

“कावं आण्णा?”

“आरं मी पानं विकायला बाजारातच असतु. तुम्ही हे कोतमीरीचं बोलला असता तर तुमचं याप तरी वाचलं असतं. एक सांगू आज कोतमीर ला कोण इचारत नाय. तरीभी बघा थोडं थांबून”

हे सारं ऐकून आंम्हाला दरदरून घाम फूटला.vकाल केलेल्या कामांवर पाणी पडणार होतं.बरं आम्ही काय सराईत बाजारकरी नव्हतो त्यामूळे कायच अंदाज नव्हता.

दुपारचे बारा वाजले. सकाळी नुसत्या चहावर आलो होतो. कोतमीरीचं चार पैसं मिळाल्यावर भाकरीबरोबर ताजी भजी घेवून जेवणार होतो. तरी बरं आंम्ही तिघानीं बरोबर जेवन आणलं होतं. पण कोतमीर विकल्याबिगर खायाचं कसं? म्हणून दम धरून होतो.

बाराचे एक झाले. दोन झाले. तरी एक पेंडीचा खप झाला नाय. सारा बाजार कोतमीरीवर रूसून होता. सगळ्यानीं शेतात अनावधानांन उगवलेली कोतमीर बाजारात आणली होती. सगळा बाजार कोतमीरनं भरला होता. त्यामूळे मालाला आजिबात उठाव नव्हता. पुढंपण काय सुधरलं असं काय दिसून येत नव्हतं.

दोन वाजल्यानंतर शंकरआबानं एक काम केलं, कोतमीरीच्या पेंड्याखाली टाकलेली लूंगी हळूवार काढून घेतली. त्यो आंम्हाला म्हणाला,

“चला लुंगी तरी घेवूया,नायतर ती भी जायाची.”

आंम्ही काय बोललो नाय. मूळात बोलण्यासारखे काय राहिलंच नव्हतं. गुमान सायकली घेतल्या अन पुढं चालू लागलो. कोतमीरीच्या पेंड्याकडं बघायचं धाडस झालं नाय. शंकरआबा अन वसंतानं सायकलवर केंव्हाच टांग मारलीवती. मी सायकलवर टांग मारण्याआधी कोतमीरीकडं बघितलं. एक गाय ती कोतमीर निवांतपणे खात ऊभी होती……!

© मेहबूब जमादार

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ चाचरता संस्कार नि ओशाळलेली शिस्त!…भाग 2- अपर्णा देशपांडे ☆ प्रस्तुती – श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

श्रीमती मीनाक्षी सरदेसाई 

? मनमंजुषेतून ?

☆ चाचरता संस्कार नि ओशाळलेली शिस्त!…भाग 2- अपर्णा देशपांडे ☆ प्रस्तुती – श्रीमती मीनाक्षी सरदेसाई ☆

(उंच टाचेच्या बुटांचा टॉक टॉक आवाज करत बाहेर पडल्या.) इथून पुढे —-

संध्याला राहावलंच नाही. स्वयंपाकघरात काम करणाऱ्या आपल्या बहिणीकडे जाऊन तिनं विचारलं, ‘‘तू  शानूला सांगितला नव्हतास का आजचा आपला प्लॅन?’’

‘‘ताई, सांगितलं होतं गं. सगळ्यांबरोबर तू असायलाच हवीस, असंही म्हटलं होतं. पण हल्ली मुलींना त्यांच्या प्रोग्रॅममध्ये अडवलेलं आवडत नाही. ‘आमच्या मैत्रिणींच्या गेट टुगेदरचं काय?’ असं म्हणाली.’’

‘‘तू नक्की आईच आहेस ना तिची? घरातल्या कार्यक्रमांसाठी आपण घरी असलंच पाहिजे, शेवटी सगळी आपली माणसं आहेत, हे ठणकावून सांगायची हिंमत होत नाही का तुझी? की  मुलांसमोर आपली ‘इमेज’ सांभाळायच्या नादात संस्कार आणि शिस्त गुंडाळून ठेवलीय माळ्यावर? तिच्या बाहेर जाण्याला माझा विरोध नाहीये. दोन कार्यक्रमांचं वेगवेगळ्या दिवशी नियोजन करणं, इतकं साधं आहे ना हे! तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही मुलांशी बोला ना घडाघडा.’’ संध्याचं म्हणणं बहिणीला पटलं होतं, पण… हा ‘पण’च फार अवघड होता.

——————————————————————————————————–

‘‘पप्पा, आनंदाची बातमी आहे. आम्ही नवीन ‘एस.यू.व्ही.’ घेतली काल. येतो दुपारी दाखवायला.’’ मनोजरावांचा जावई शंतनू फोनवर सांगत होता. त्यांनी जावयाचं अभिनंदन तर केलं, पण नंतर चिंतेत पडले. नुकताच नव्वद लाख रुपयांचा फ्लॅट घेतलाय, घरात दोन स्कूटर आणि चक्क दोन कारही आहेत. मग पुन्हा ही गाडी का घेतली असावी? त्याच्या आईवडिलांशी किंवा आपल्याशी न बोलता इतका मोठा खर्च?

‘‘तुम्ही का त्रास करून घेताय? तो जावई आहे, त्यांचा त्यांचा संसार आहे. आपण नको बाई बोलायला!’’ सासूबाई बोलल्याच.

‘‘मुलगी-जावई काय फक्त कौतुक करवून घ्यायलाच आहेत का? मुलासारखं मानतो ना आपण त्याला? ढळढळीत दिसतंय की अवाजवी खर्च चुकीचे आहेत. मग हक्कानं आपलं मत सांगायला नको? गरज जेव्हा लालसेचं रूप घेते ना, तेव्हा अनिर्बंध वर्तणुकीला प्रारंभ होतो बघ. फ्लॅटसाठी दहा लाख ज्या हक्कानं दिले आपण त्यांना, त्याच हक्कानं त्यांच्याशी बोलायला हवं. नको तिथे मूग गिळून बसल्यावर त्यांचं चुकतंय हे त्यांना कोण ऐकवणार?’’ मनोजराव म्हणाले.

तनया असो, शानू असो किंवा मनोजरावांचे जावई आणि मुलगी… घरातील मोठ्या मंडळींना आता आपण बोलावं की नाही, असं वाटणं चुकीचं नाही का? जीव तोडून प्रेम करणाऱ्या ज्येष्ठांची जीभ शिस्त आणि संस्कारांच्या बाबतीत अडखळणं, हे बेलगाम जीवनशैलीला खतपाणी घालणारं आहे.

लग्नानंतर मुलांच्या संसारात ढवळाढवळ करायची नसते… अगदी मान्य! पण समोरचा चुकतोय हे दिसत असूनही न बोलणं हा अतिरेक ठरेल. ही वेळ येऊच नये, म्हणून उधळणाऱ्या घोड्यांचे लगाम त्याआधीच आवळले गेले पाहिजेत.

मुलीनं एखाद्या विशिष्ट पार्टीला जाणं अजिबात पटत नसताना आईचं तिला नकार देताना चाचरणं वाईट नाहीये का? ठोंब्या मुलांना ‘बाब्या’ बनवत लोळत पडू देणं आणि बापानं त्यांची कामं करणंही वाईटच. खर्चाला दिलेल्या पैशांचा हिशेब विचारताना वडिलांची जीभ अडखळणंही वाईट. ‘मी तुझ्यावर मुळीच अविश्वास दाखवत नाहीये, पण तू या रकमेचा कसा विनियोग केलास ते मला सांग,’ असंही म्हणता येतं की! ‘पहिला मोबाइल उत्तम चालतोय ना, मग दुसऱ्या मोबाइलचा विषय आता अजिबात काढायचा नाही. त्यापेक्षा हवा तर एखादा ऑनलाइन प्रशिक्षण वर्ग लाव, मी पैसे देतो.’ हे कमावत्या मुलाला सांगताना वडिलांना अवघडल्यासारखं वाटणं चुकीचं. ‘मैत्रिणीशी फोनवर नंतर बोल. आधी मला या कामात मदत कर,’ हे सांगायला आईनं का कचरावं? करोनामुळे निदान स्वच्छतेच्या बाबतीत बरीच जागरूकता आलीय. नाहीतर महाविद्यालयातून आलेली मुलं न चुकता आल्याबरोबर हातपाय धूत होती का? जर उत्तर ‘नाही’ असेल तर त्याला जबाबदार कोण? नुकतंच शाळेतून आलेलं पोर आल्या आल्या मित्राला फोन करून आजचा गृहपाठ विचारत असे, तर ‘सोन्या, तुझं शाळेत बाईंच्या बोलण्याकडे लक्ष नसतं का? अजिबात असं मित्राला फोनवर विचारायचं नाही. वर्गात नीट लक्ष द्यायचं,’ हे आई-बाबा सांगत नसतील तर ते चुकीचंच नाही का? 

मुलं आपलं ऐकत नाहीयेत किंवा आपल्याला अजिबात न विचारता निर्णय घेत आहेत, हे जेव्हा पहिल्यांदा जाणवतं, तेव्हाच त्यांच्याशी निवांत बोलण्याची गरज असते. ‘तू हे करायचं नाही म्हणजे नाही!’ असं बिनबुडाचं वाक्य फेकल्यास मुलं तात्त्विक मुद्द्यांवर वाद घालून पालकांना नक्कीच निरुत्तर करू शकतात. त्यासाठी त्यांना समजेल, रुचेल, अशा पद्धतीनं समजावून सांगणं गरजेचं आहे. पूर्वी मुलांना सांभाळणं किती सोपं होतं नाही? वडिलांची नुसती चाहूल लागली तरी असतील नसतील तिथून येऊन पुस्तक हातात घेऊन बसत. ‘तोंड वर करून’ बोलायची हिम्मत नसायची (अर्थात त्यामुळे फार कमी घरांमध्ये पितापुत्रात मैत्रीचे संबंध होते हेही मान्य करावं लागेल). पूर्वी मिळतंय त्यात हवी तेवढी मजामस्ती चालायची, पण अवाजवी मागण्यांना थारा नसे. करंजी-लाडूला लज्जत होती! कष्टाची किंमत होती. नात्यांची कदर होती. दिनचर्येला आकार होता. ‘नाही’चा आदरयुक्त धाक होता.  पण आज मैत्रीचे संबंध राखताना तो ‘बडगा’, पालकांचा वाटणारा एक प्रकारचा धाक मिळमिळीत झालाय असं नाही वाटत?

आपल्याच मुलांशी वागताना आपण अत्यंत सुधारलेल्या, नवीन विचारांचे पालक आहोत, मुलांना संपूर्ण मोकळीक देणारे आहोत, त्यांना स्वतंत्र विचारांचे पंख देणारे आहोत, मग आता काही गोष्टींना विरोध केल्यास आपलं दुटप्पीपण उघडं पडेल, अशी भीती वाटते का पालकांना? मग वाटू देत की! पण जिथे हस्तक्षेपाची गरज आहे तिथे बोललंच पाहिजे.

आजच्या मुलांच्या वागण्यातला सगळा समतोल बिघडलाय असं जर वाटत असेल, तर नक्कीच त्याला कारणीभूत आहे पालकांचा चाचरता संस्कार आणि परिणामी ओशाळलेली शिस्त! तुम्हाला काय वाटतं?

समाप्त 

ले: अपर्णा देशपांडे  

प्रस्तुती :  श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

सांगली

मो. – 8806955070

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ चाचरता संस्कार नि ओशाळलेली शिस्त!…भाग 1- अपर्णा देशपांडे ☆ प्रस्तुती – श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

श्रीमती मीनाक्षी सरदेसाई 

? मनमंजुषेतून ?

☆ चाचरता संस्कार नि ओशाळलेली शिस्त!…भाग 1- अपर्णा देशपांडे ☆ प्रस्तुती – श्रीमती मीनाक्षी सरदेसाई ☆

आईवडिलांनी मुलांचे मित्र व्हावं, असं म्हणता म्हणता आई-वडील म्हणूनच त्यांच्या असण्यात जो आदरयुक्त धाक असतो, तो हरवला. मुलांना मोकळीक देणं, घरात खुलं वातावरण असणं योग्यच. पण त्याचा अर्थ असा नाही, की मुलांची एखादी गोष्ट खटकल्यावर पालकांनी आपली नापसंतीही व्यक्त करू नये. मुलांशी नेमकं  कसं वागावं याविषयी पालकांमध्ये जास्त गोंधळ आहे? की त्यांचं वागणं दुटप्पी आहे? पालकांनी यावर गंभीरपणे विचार करायला हवाय…

उंच स्टुलावर चढून भिंतीवरचं कोळ्याचं जाळं काढणाऱ्या आपल्या नवऱ्याकडे बघून शोभाताई ओरडल्या, ‘‘अहो, काय करताय हे? खाली उतरा आधी! तरुण पोरं आहेत घरात. त्यांना सांगू ना! उगाच पडलात बिडलात, हाड मोडलं, तर केवढ्याला पडेल ते?’’

‘‘अगं होतंय तोवर करायचं! पोरांना कशाला सांगतेस लगेच? दिवाळी आलीय तोंडावर. आणि तू शंभर वेळा ओरडशील तेव्हा कुठे मुलं ऐकतील कदाचित. वर्षही संपेल तोपर्यंत!’’ नाइलाजानं खाली उतरत, हात झटकत शरदराव म्हणाले.

नवऱ्याचे हे शब्द दिवसभर शोभाताईंच्या मनात घुमत राहिले. त्या विचार करू लागल्या, खरंच, हे असंच होतं हल्ली. मुलं पटकन ऐकत नाहीत, मग आपणच काम हातावेगळं करून टाकू म्हणत पालकच सगळी कामं उरकतात. मुलांपर्यंत जातच नाहीत. परवाचीच गोष्ट- मुलांना सांगितलं होतं, ‘आज मुंबईहून मामा येणार आहेत. उद्या  सकाळी लवकर उठून तयार राहा. त्यांना एका ठिकाणी नेऊन सोडायचं आहे.’ पण मुलं रात्री जागत बसली आणि सकाळी वेळेवर उठलीच नाहीत. शेवटी शरदरावांनीच गाडी काढली. कडक शिस्तीच्या मामांसमोर आपल्यालाच ओशाळल्यासारखं झालं होतं. आणि शिस्तीचं म्हणावं, तर मामाच का, आपले आईवडीलसुद्धा किती शिस्तीचे होते! पहाटे उठणं, रात्री लवकर झोपणं, संध्याकाळी हात-पाय धुवून देवासमोर पसायदान म्हणणं, अशा गोष्टी अंगी भिनलेल्या सहजप्रवृत्ती म्हणून आपण करत होतो. कधी चांगल्या सवयी लागल्या हे समजलंच नाही. पाढे पाठ केल्याशिवाय जेवणाचं ताट मिळत नसे लहानपणी. आपण किती शिस्तीत वाढलो नाही? आपल्या पालकांनी घालून दिलेले नियम आणि शिस्तच आज स्थिर आयुष्य जगण्यास कारणीभूत आहे…’ हा विचार आला आणि शोभाताई चमकल्या. आपण आपल्या मुलांसाठी त्यांच्या आयुष्यभराच्या पुंजीत नेमकं कोणतं दान टाकणार आहोत? आपण त्यांना योग्य ती शिस्त लावण्यात कमी पडतोय का? या विचारानं त्या अस्वस्थ झाल्या.

‘‘मॉम, आम्ही या वीकेंडला विकीच्या फार्महाऊसवर जातोय. शनिवारी दुपारीच निघू.’’ तनयानं सरळ आपला कार्यक्रम जाहीर केला. आईची परवानगी नाही मागितली. आईला अर्थातच ते खटकलं. आज निदान आपली मुलं न लपवता, सांगून सगळं करतात हे जरी योग्य वाटत असलं, तरी मुलीनं असं कुणाच्या फार्महाऊसवर जाणं आपल्याला अजिबात पटलेलं नाहीये, हे चेहऱ्यावर न जाणवू देता मीनाताईंनी विचारायला सुरुवात के ली, ‘‘मुक्कामी का जाताय? कोण कोण आहे? सकाळी जाऊन संध्याकाळी परत येणं नाही जमणार का? मुली किती आहेत? ’’

‘‘आता तूपण प्रियाच्या आईसारखे ‘ऑर्थोडॉक्स’ प्रश्न विचारणार आहेस का? आमचं ठरलंय गं सगळं. सांगते रात्री क्लासवरून आल्यावर.’’ हे बोलत तिनं स्कूटर सुरू केली आणि आई काही बोलण्याआधीच वेगात निघूनही गेली.

लहानपणापासूनच मनाप्रमाणे वागण्याची मोकळीक दिल्यानं आता नेमक्या कोणत्या शब्दांत मुलीला ‘जाऊ नकोस’ म्हणावं याचा विचार करत मीनाताई तिथेच उभ्या होत्या. ‘हल्ली हे असं का होतंय? का आपण पटकन तनयाला विरोध नाही केला? मुलांना फटकारताना आपली जीभ का चाचरते? ती दुरावतील किंवा दुखावली जातील, असं वाटून आपण गप्प बसतो का? आपणच घेतलेल्या सुधारणावादी भूमिकेमुळे आता आपण अचानक जुन्या मतांचे वाटू अशी भीती आपल्याला वाटते का? बदललेल्या जगण्याशी हातमिळवणी करताना आपणच ओढून घेतलेल्या नव्या कातड्याखाली आपले संस्कार गाडले जात आहेत. हे बरोबर नाही. वागण्यातील कृत्रिमता कधीच मनाला भिडत नसते. आता लेक घरी आली की कडक शब्दात तिला ‘नाही’ म्हणायचं. काय महाभारत व्हायचंय ते होऊ देत.’ असा विचार करत मीनाताई घरात आल्या तर खऱ्या, पण आपल्या कडक शब्दांची धार केव्हाच बोथट झाली आहे, हे जाणवून त्यांना खूप अगतिक वाटत होतं.

मीनाताईंच्या आईनं त्यांना वेळोवेळी जाणीव दिली होती, ‘‘मीने, पोरांना वेळच्या वेळी ठामपणे नाही म्हणायची सवय लाव तू! लहानपणीच थोडं नियमात बसवावं. पाक घट्ट झालेले लाडूही वळत नाहीत गं! मग ही तर स्वतंत्र विचारांची पोरं आहेत. नको तिथे ढील दिली की पतंगही भरकटतोच.’’ आईनं सल्ला दिला होता, पण मीनाताईंना वाटायचं, की जुन्या काळातल्या शिस्तीचे नियम आज कसे लागू होतील? मुलांशी मित्रत्वानं वागायचं, तर थोडं त्यांच्या कलानं घ्यावंच लागतं. पण आता वाटतंय, की  कोणत्या विषयात किती कलानं घ्यावं, याचं गणित जरासं बिघडलंच.

संध्यासमोर तिची भाची बाहेर जाण्याची तयारी करत होती. खरंतर त्या दिवशी घरात सगळ्या मावस-मामे भावंडांचा मेळावा होता, काही भाचेमंडळीही येणार होती. ‘‘शानू, तू बाहेर निघालीस? आज सगळे येत आहेत ना घरी?’’ संध्यानं विचारलं.

‘‘हो गं मावशी, पण आमच्या इंजिनीअरिंगच्या फ्रेंड्सचं ‘जी.टी.’ (गेट टुगेदर) आहे आज. मी येईन रात्री अकरापर्यंत.’’

‘‘अगं, तुझ्या घरी जमतायत ना सगळे? महिनाभर आधीच ठरलं होतं ना हे?’’ आवाजात शक्य तितकं मार्दव आणत मावशीनं विचारलं.

‘‘चिल मावशी ! धिस इझ लाईफ.’’ ओठांवरून लिपस्टिक फिरवत शानूबाई बोलल्या आणि पर्स उचलून उंच टाचेच्या बुटांचा टॉक टॉक आवाज करत बाहेर पडल्या. 

 क्रमशः….

ले: अपर्णा देशपांडे  

प्रस्तुती :  श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

सांगली

मो. – 8806955070

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares