मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ बालपणीच्या आठवणी…भाग-4 – खजिना ☆ सौ. अमृता देशपांडे

सौ. अमृता देशपांडे

☆  मनमंजुषेतून ☆ बालपणीच्या आठवणी…भाग-4 – खजिना ☆ सौ. अमृता देशपांडे ☆ 

बाबांची बदली “कद्रा ” येथे झाली. कारवारच्या पुढे काळी नदीच्या पलीकडे कद्रा हे छोटेसे खेडेगाव. गाव म्हणजे आदिवासी जमात आणि जंगल. तिथले सगळे वर्णन बाबा आम्हाला अगदी रंगवून सांगत असत. बाबांनी सांगितलेल्या त्या आठवणी  बाबांच्या शब्दात मांडल्या आहेत.

“मेडिकल ऑफिसर म्हणून माझं पोस्टिंग कद्रा येथे झालं. कद्रा म्हणजे जवळजवळ जंगलच. तेथील एक छोटीशी वस्ती असलेलं गाव. मनुष्यवस्ती अतिशय विरळ. लांब लांब वसलेल्या छोट्या छोट्या घरांची वसाहत. मी व सौ दोघे 2-3 गाड्या बदलून कद्र्याला पोचलो. गावातील लोकांना हे आलेले जोडपे डाॅक्टर आहेत, हे सहज लक्षात आले. जाॅन कपौंडरने दवाखाना दाखवला. एका ब्रिटिशकालीन बंगल्यामध्ये आमच्या रहाण्याचा इंतजाम केला होता. तो बंगला पाहिल्यावर मधुमती सिनेमातील महालाची आठवण झाली. भले मोठे दरवाजे, काचेची तावदाने असलेल्या चौकोनी मोठमोठ्या खिडक्या,  त्यावर अर्धगोलाकार रंगीत काचा, उंच छतावरून लोंबणारे दिवे, हंड्या, मोठाली दालने, अशा भव्य बंगल्यात रहाणार आम्ही दोघे.

पक्ष्यांच्या किलबिलाटाने सकाळी जाग येई. खिडकीतून येणा-या सूर्यकिरणांनी दिवसाची सुरुवात होत असे. सूर्य मावळला की दिवस संपला. घर ते दवाखाना,  दवाखाना ते घर. दुसरे काहीच नाही. इतरही वेळ घालवण्याचे साधन नाही.

आसपास चार घरे सोडली तर इतर सर्व परिसर जंगलच होतं. संध्याकाळ झाली की घराचे दरवाजे,  खिडक्या बंद ठेवा अशा सूचना वस्तीवरच्या लोकांनी दिल्याने दिवसाही खिडक्या  उघडण्याची भीती वाटत होती.

एकदा रविवारी सकाळी जाग आली तेव्हा जरा बाहेर जाऊन चक्कर मारून येऊ या असा विचार मनात आला.  दरवाजा उघडण्यापूर्वीच घाण वास  यायला लागला.  घरात शोधलं, उंदीर मरून पडलाय की काय? काहीच सापडलं नाही.. तेवढ्यात बाहेर घुर्र घुर्र आवाज आला. हळूच खिडकी  किंचितशी उघडून बघतो तर काय? ? बाप रे!

असा मोठ्ठा पिवळा जर्द पट्टेरी ढाण्या वाघाचं धूड व्हरांड्यात पसरलं होतं.  माझी तर बोबडीच वळली. खिडकी आवाज न करता बंद केली  आत जाऊन बसलो. दर दहा पंधरा मिनिटांनी कानोसा घेत होतो.  सगळा दिवस तो तिथेच होता. संध्याकाळ झाली तसा तो निघून गेला. दुस-या दिवशी जाॅनला सांगितलं तेव्हा तो हसायला लागला.  सायेब, अशेच आसता हंय….

एक दिवस कोवळी उन्हे अंगावर घेत व्हरांड्यात बसलो होतो. अचानक एक. कुत्र्याचं छोटुलं , गुबुगुबु पिल्लू शेपूट हलवत आमच्या जवळ आलं. बराच वेळ ते घोटाळत होतं. त्याला बहुतेक भूक लागली असावी असं समजून सौ ने चतकोर भाकरी दिली त्याला. ती खाऊन पिल्लू तिथेच रेंगाळलं. दुस-या दिवशी दार उघडलं तर पिल्लू हजर! दोनच दिवसात पिल्लू आपलंसं वाटू लागलं. आता रोज दोन्ही वेळी त्याची भाकरीची ताटली तयार असे. सौ ने त्याचं नाव ठेवलं “रघुनाथ”.

आता रोजचा वेळ रघुनाथ बरोबर छान जाऊ लागला. जवळपास फिरायला गेलो तरी रघुनाथ सोबत असेच. आम्हाला एक छान सोबती मिळाला.

एक दिवस अचानक रघुनाथ दिसेनासा झाला. दोन दिवस झाले, याचा पत्ताच नाही. मन अस्वस्थ झाले. जाॅनला विचारले,  तेव्हा तो सहजपणे म्हणाला, कुत्रे दिसत नाही,  तर नक्कीच वाघरानं खाऊन टाकलं असणार.

एवढंसं गोड पिल्लू वाघानं खाल्लं असं ऐकून खूप वाईट वाटलं. खूप चुकल्या चुकल्या सारखं वाटलं.  मुक्या प्राण्यांची सवय होते. पुढे नित्य व्यवहारात आठवण कमी होत गेली. कालाय तस्मै नमः II

क्रमशः…

© सौ अमृता देशपांडे

पर्वरी- गोवा

9822176170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ जनरेशन गॅप ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे

सौ.ज्योत्स्ना तानवडे

 ☆ मनमंजुषेतून ☆ जनरेशन गॅप ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

खरोखरी ‘जनरेशन गॅप’ अशी काही गोष्ट असते का हो? दोन पिढ्यांच्या मतांतराला हे नाव दिलंय झाले. असो.प्रत्येक पिढीचा कालावधी वेगळा, परिस्थिती वेगळी,अनुभव वेगळे, उपलब्ध साधन सामग्री वेगळी, त्यामुळे गरजा वेगळ्या, राहणीमान वेगळे, विचारसरणी वेगळी, शैक्षणिक पात्रता वेगळी असते. मग नैसर्गिकपणे त्यांच्या वागण्या-बोलण्यात, विचारात फरक असणारच आहे. त्यात वेगळे विशेष ते काय?

काही वर्षांपर्यंत हे बदल तुलनेने खूप सावकाश होत होते. त्यामुळे वर्षानुवर्षे परिस्थिती जवळपास सारखीच, आहे तशीच, असायची. आपण आपल्या आजोबा,पणजोबांचे विचार कौतुकाने सांगायचो. पण आता आधीच्या सोडा, अगदी मागच्या पिढीचे विचारही मागासलेले, बुरसटलेले वाटतात.

कारण आजचा काळ एकदम वेगळा आहे‌. आज दोन पिढ्यांमध्ये एकदम तीन-चार पिढ्यांएवढे अंतर पडलेले जाणवते आणि त्यातली कळीची मेख आहे आजचे प्रगत तंत्रज्ञान.

संगणकाचे आगमन झाले आणि बदलाला वेगाने सुरुवात झाली. त्यात एकदम मोठी भर पडली ती मोबाईलमुळे. आजचा  ‘स्मार्टफोन’ तर जणू बाटलीतला राक्षसच आहे. नवीन पिढी अगदी लहानपणापासून या तंत्रज्ञानात पारंगत होतेय आणि जुन्या पिढीला या तंत्रज्ञानाशी जुळवून घेणे अवघड जातेय. त्यामुळे तर दोन पिढ्यातले अंतर आणखीनच वाढले आहे.

पण गरज माणसाला शहाणे बनवते. पाण्यात पडले की पोहता येते. तसे आत्ताच्या लाॅकडाऊनच्या परिस्थितीमुळे अनेक ज्येष्ठांनी नवीन तंत्रज्ञानाशी छान दोस्ती केली. त्यामुळे आपोआप नव्या पिढीशी पुन्हा जवळीक होऊ लागली आहे. नवी पिढी पण ज्येष्ठांच्या या विद्यार्थीदशेला  स्वत: गुरु बनून कौतुकाने छान प्रतिसाद देत आहे‌. नव्या-जुन्या पिढ्यांची पुन्हा छान गट्टी जमत आहे.

सर्वच आघाड्यांवरील  बदलाने वैचारिक, आर्थिक, शैक्षणिक अंतर हे पडणारच आहे. त्यात नवीन सुधारणांनी, तंत्रज्ञानाने जग जास्ती जवळ आले आहे. नोकरी व्यवसायामुळे परदेशी जाऊन राहणाऱ्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे परदेशी राहणीमान, विचारसरणीचे ही आक्रमण झालेले आहे. तेव्हा नव्या-जुन्यांचा, पाश्चात्य व पौर्वात्य अशा बदलांचा, विचारसरणीचा संयमाने, विवेकाने मेळ घातला की आपोआप संघर्ष टाळता येईल.

अशावेळी दोन्ही पिढ्यांतील लोकांनी दुसऱ्याच्या भूमिकेत शिरून विचार केला की त्याची बाजू छान समजते आणि जुळवून घेणे सोपे जाते. म्हणतात ना दुसऱ्याच्या चप्पलेत पाय घातला की, ती नक्की कुठे चावते हे लक्षात येते. तसेच इथेही असते. एकदम कुठलाही निष्कर्ष काढण्यापूर्वी दुसऱ्याच्या विचारांचा पूर्ण उलट-सुलट विचार करायला हवा. शेवटी विचार वेगळे असले तरी त्यामागे आपलीच जीवाभावाची व्यक्ती आहे हे आधी लक्षात घ्यायला हवे. मग आपोआप विचार सोपे होतील आणि संघर्ष टळू शकेल.  मतभेद झाले तरी मनभेद होणार नाही याची काळजी घेता येईल.

नव्या-जुन्यांचा मेळ गुंफणे

हे आपल्याच हातात आहे

एकमेकांना समजून घेणे

हेच दोघांच्याही हिताचे आहे !!

“जगात काय चाललेय हे तुम्हाला माहित नाही. आता पूर्वीचे सगळे विसरा. काळ बदलला आहे.तेव्हा तुम्ही पण जरा काळाप्रमाणे बदला. हे जुने विचार सोडा, “असे नव्यांनी जुन्यांना टाकून बोलू नये‌. त्याच बरोबर,” आम्हाला या सर्व गोष्टी नवीन आहेत‌. थोडा वेळ लागेल जुळवून घ्यायला. आम्ही प्रयत्न करू, तुमच्या कडूनच शिकू. तुम्ही थोडे सांभाळून घ्या,” अशी जुन्या पिढीने पण बदलायची तयारी दाखवायला हवी.

शेवटी जुन्यांनी एक पाऊल पुढे टाकले आणि नव्यांनी एक पाऊल मागे घेतले, तर हे दोघातले अंतर आपोआप कमी होईल. हातात हात घेत आनंदाने वाटचाल होऊ शकेल. म्हणूनच मला वाटते दोन पिढ्यांच्या मतमतांतरांमुळे ‘वाद’ न होता घर्षणमुक्त ‘संवाद’ होण्यासाठी सोडलेली गॅप म्हणजेच “जनरेशन ” गॅप आहे.

© सौ. ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी वाटचाल…. मी अजून लढते आहे – 15 ☆ सुश्री शिल्पा मैंदर्गी

सुश्री शिल्पा मैंदर्गी

☆ मनमंजुषेतून ☆ माझी वाटचाल…. मी अजून लढते आहे – 15 ☆ सुश्री शिल्पा मैंदर्गी ☆

सौ.अंजली गोखले 

(पूर्ण अंध असूनही अतिशय उत्साही. साहित्य लेखन तिच्या सांगण्यावरून लिखीत स्वरूपात सौ.अंजली गोखले यांनी ई-अभिव्यक्ती साठी सादर केले आहे.)

हा माझा नृत्याचा प्रवास सुरू असताना आणि अडचणी मला अजगरा सारख्या तोंड पसरून गिळंकृत करायला बघत असताना माझ्या बाबतीत काही चांगल्या घटनाही घडत होत्या. त्या गोड आणि रमणीय आठवणी मध्ये मला आपल्या वाचकांनाही सहभागी करून घ्यायचे आहे. त्या माझ्या आठवणींचे बंध जुळले आहे ते त्या माझ्या ताई,गोखले काकू,श्रद्धा, आई बाबा, टि म वीअनघा जोशी, माझे भाऊ बहिणी, इतर कामात मदत करणाऱ्या माझ्या मैत्रिणी, रिक्षावाले काका आणि प्रेक्षक सुद्धा.

ताईंच्या विषयीचे खास गोड आठवण मला इथे नमूद करावीशी वाटते. मी नृत्याच्या अगदी सुरुवातीच्या काळात शिकत असताना, बऱ्याच वर्षांनी काय चित्र दिसणार हे मला माहीतही नव्हते. समाजा ची प्रतीक्रीया काय असेल हेसुद्धा माहिती नव्हते. नृत्य सुरू राहील की नाही, आपल्याला जमेल की नाही अशा साशंक मनस्थितीत असताना त्यांनी मला अचानक सांगितले की दिवाळीनंतर असणाऱ्या सुचिता चाफेकर निर्मित कला वर्धिनी तर्फे होणाऱ्या”

नृत्यांकूर “कार्यक्रमात तुला तिश्र अलारपू म्हणजे नृत्यातला पहिला धडा सादर करायचा आहे. पुण्यामध्ये मुक्तांगण या हॉलमध्ये. हे ऐकून मी कावरीबावरी अन गोंधळून गेले. कारण स्वतः ताईंनी माझी पुण्यातल्या कार्यक्रमासाठी निवड केली होती. तिथे माझे कोणी नातेवाईक नसल्याने ताई मला त्यांच्या माहेरी घेऊन गेल्या. तिथे विश्रांती जेवण करून आम्ही लगेच हॉलवर गेलो. मी नटून-थटून मेकअप रूममध्ये तयार होऊन बसले होते आणि  बाहेरच्या गर्दीतून ताई आल्या. त्यांनी मला टेबल वर बसवलं आणि स्वतः खाली जमिनीवर बसून माझ्या पायांना आणि हातांना सुद्धा अलता लावला आणि तो माझ्या आयुष्यासाठी मोठा सन्मानच होता.

माझा नृत्याचा कार्यक्रम खूप रंगला आणि स्वतः सुचेता चाफेकर आणि सर्व पुणेकरांनी माझ्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. तो दिवस माझ्यासाठी संस्मरणीय ठरला.

त्याच बरोबर भर दुपारी आपले सगळे व्याप बाजूला ठेवून,संसारातील कामे बाजूला ठेवून तीनच्या उन्हामध्ये माझ्या एम ए चा अभ्यास वाचून दाखवणाऱ्या गोखले काकूंना मी कधीच विसरू शकत नाही.

तिच्या कॉलेजचा अभ्यास करता करता माझ्यासाठी एम. ए. च्या लेखनिकाचं काम मनापासून करणारी, मला हसत खेळत साथ देणारी, मला हसवत ठेवणारी, इतर कार्यक्रमांनाही मेकप साठी मदत करणा री श्रद्धा म्हस्कर माझ्यासाठी अपूर्वाई ची मैत्रीण बनली.

टि म वी. मधल्या अनघा जोशी मॅडम त्यांनी मला लागेल ती मदत केली. त्याच बरोबर माझी दुसरी मैत्रीण सविता शिंदे माझी जीवाभावाची मैत्रीण जी मला  फिरायला फिरताना गप्पा मारायला अशी उपयोगी पडली. घरी सुद्धा आम्ही तासनतास गप्पा मारत असू. त्यातून एकमेकींच्या अडचणी समजून आम्ही एकमेकींना मदत ही करत असू.

ज्यावेळी मला घरातून क्लासमध्ये सोडायला कोणी नसेल त्यावेळी आमच्या चौकात ले रिक्षावाले काका बाबांना सांगत असतकी आम्ही शिल्पाला क्लास मध्ये सोडून आणि परत आणून सोडू. बाबा माणसांची पारख करून मला त्यांच्याबरोबर जाऊदेत.

म्हणून माझ्या मनात येतं की माझे खरे दोन डोळे नसले तरी अशा कितीतरी डोळ्यांनी मला मदत केली आहे आणि अशा असंख्य डोळ्यांनी मी जग पाहते आहे.

…. क्रमशः

© सुश्री शिल्पा मैंदर्गी

दूरभाष ०२३३ २२२५२७५

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ परळीचे पुरातन शीव मंदीर ☆ सौ. सावित्री जगदाळे

सौ. सावित्री जगदाळे

☆ मनमंजुषेतून ☆ परळीचे पुरातन शीव मंदीर ☆ सौ. सावित्री जगदाळे ☆

३१ जाने २० २१ रविवार  रोजी सज्जन गड ला जाताना रस्ता चुकला. गडावर जाण्या ऐवजी परळीला गेलो. तिथे पक्का रस्ता संपल्यावर लक्षात आलं आपण चुकलोय . माघारी फिरलो तर एके ठिकाणी माळावर पडझड झालेले पुरातन शिवमंदीर दिसले. अनेक मंदिर होत. चुकून आलोय तर मंदीर बघूनच जाऊ असं म्हणून मंदिराकडे गेलो. एक मंदिर चांगले होते पण त्याला कुलूप होते. बाहेर डोके नसलेला नंदी होता. तिथेच जवळच उंच स्तंभ होता. नेहमीच्या दीपस्तंभा सारखा नव्हता. हे वेगळेपण. अलीकडे बरीच पडझड झालेलं एक शिवमंदीर होते ते मात्र उघडे होते. गाभाऱ्याच्या वरचा छताचा भाग मोकळा झाल्यामुळे पिंडीवर ऊन पडले होते कळस नव्हताच.  दुरवर आणखी मंदिर होते. बाहेर उत्खनन करून काढलेले बरेच शिल्प शिळा उभ्या करून ठेवलेल्या होत्या . वीरगळ , सतीशिळा होत्या. एक हात असले ल्या अनेक सतीशीळा होत्या. पुरातन काळी हा भाग खूपच वैभवशाली होता असे जाणवत होते.

मंदिराच्या भिंतीवर अनेक प्रकारची कोरीव शिल्प अर्थपूर्ण होती. बाहेर बर्याच शिळा पडलेल्या होत्या. तिथेच बोर्ड लावलेला होता त्यावर लिहिले होते, पांडवकालीन केदारेश्वर मंदीर. परळी. जि. सातारा

परळी गावाच्या शेजारी असूनही खूपच दुर्लक्षित राहिलेले हे अतीसुंदर, पुरातन, वैभवशाली इतिहास सांगणारे असे हे मंदीर एवढे कसे दुर्लक्षित राहिले;  तेही जग प्रसिद्ध अशा सज्जन गडच्या शेजारी असून… याचेच आश्चर्य वाटत होते. इथे उत्खनन होऊन या मंदिराचा इतिहास यावर संशोधन व्हायला हवं असं वाटते.

© सौ. सावित्री जगदाळे

संपर्क – १००, कुपर कॉलनी, सदर बाजार, सातारा ,पीन-४१५०० १

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझे जन्मदाते….! ☆ सौ. राधिका भांडारकर

सौ. राधिका भांडारकर

 ☆ मनमंजुषेतून ☆ माझे जन्मदाते….! ☆ सौ. राधिका भांडारकर ☆ 

आम्ही पाच बहिणी.

“सगळ्या  मुलीच? मुलगा नाही? मग वारस कोण? वंश खुंटला.”

अशा दुर्भाष्यांना, माझ्या आई वडीलांना नेहमी सामोरं जावं लागत असे.

पण दोघंही खंबीर. वडील नेहमी म्हणायचे, “माझ्या पाच कन्याच माझे पाच पांडव आहेत! माझ्या वंशाच्या पाच दीपीका आहेत!”

लहानपणी जाणीवा इतक्या प्रगल्भ नव्हत्या पण आज जाणवतय् पित्याची ती ब्रह्मवाक्ये होती! आणि त्यांनीच आम्हाला आत्मसन्मान,आत्मनिर्भरता आणि आत्मविश्वास दिला.

आई, स्रीजन्माची कर्तव्ये तिच्या स्वत:च्या आचरणातून कळतनकळत बिंबवत होतीच.  त्याचवेळी वडील — पपा विचारांचे, लढण्याचे, सामोरं जाण्याचे, दुबळं.. लेचपेचं. न राहण्याचे धडे गिरवत होते! ते म्हणत, “गगनाला चुंबणारे वृक्ष नाही झालात —— हरकत नाही. पण लव्हाळ्या सारखे व्हा! वादळात मोठी झाडं ऊन्मळुन पडतात पण लव्हाळी तग धरतात!”

आमच्या घरात ऊपासतापास, व्रतवैकल्ये, कर्मठ देवधर्म नव्हते. परंतु पारंपारिक सोहळे आनंदाचे प्रतिक म्हणून जरुर साजरे केले जात.

प्रभात समयी पपा रोज ओव्या अभंग त्यांच्या सुरेल आवाजात गात! ते सारं तत्व अंत:प्रवाहात झिरपत राह्यल.आणि त्यानं आम्हाला घडवलं!

एक दिवस मी पपांना म्हणाले, “पपा सकाळी तुम्ही मला पैसे दिले होते. पण हिशेब विचारायला विसरलात!”

ते लगेच म्हणाले, “बाबी, माझा विश्वास आहे तुझ्यावर. तू नक्कीच ते वेडेवाकडे खर्च केले नसणार”

मुलांवर आईवडीलांचा विश्वास असणे ही त्यांच्या जडणघडणीतील खूप महत्वाची पायरी असते! पपांनी नाती जोडायला शिकवलं अन् आईने ती टिकवायला शिकवलं.

आईनं केसांच्या घट्ट वेण्या घातल्या अन् पपांनी मनाची वीण घट्ट केली.

असं बरंच काही…

लहानपणी माझ्या मुलीने निबंधात लिहीले होते “मला चांगली आई व्हायचे आहे”

माझ्या आईसारखी आई मी होऊ शकले का हा प्रश्न मला नेहमी सतावत असतो!

परवा पपांच्या स्मृतीदिनी धाकटी बहीण म्हणाली, “आपण पपांच्या दशांगुळेही नाही. त्यांची विद्वत्ता, वाचन, लेखन, स्मरणशक्ती, जिद्द चिकाटी काही नाही आपल्यात!”

खरय्.. पण त्यांच्याकडुन जगावं कसं ते शिकलो!

वादळ संपेपर्य्ंत टिकणारी लव्हाळी तर झालोच ना?

खूप रुणी आहे मी माझ्या जन्मदात्यांची..!!!

 

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ विविध गुणदर्शन ☆ श्री अमोल अनंत केळकर

श्री अमोल अनंत केळकर

☆ मनमंजुषेतून ☆ विविध गुणदर्शन ☆ श्री अमोल अनंत केळकर ☆ 

मंडळी नमस्कार ?

शाळेत असताना  आमचे काही  सगळ्यात आवडते  दिवस असायचे ते म्हणजे २६ जानेवारी, १५ ऑगष्ट, शेवटची मारुती पूजा आणि  विविध गुणदर्शन/स्नेहसंमेलन (तसं आम्ही आमचे विविध गुण शाळेत दररोजच उधळायचो म्हणा).  आजच्या अनेक यशस्वी ठरलेल्या कलाकारांनी आपली कला सर्वप्रथम कुठे सादर केली असेल तर  माझ्यामते शाळेत.

‘मुलाचे पाय पाळण्यात दिसतात’ हे कितीही  खरे असले  तरी  ती कला सादर करायला  त्यांना पहिला प्लँटफॉर्म शाळेने  दिला हे अनेक जण मान्य करतील.

शाळेच्या वार्षिक स्पर्धा मग त्या मैदानी असू देत  किंवा बौद्धिक अनेकजण यात भाग घ्यायचे.  गायन, वक्तृत्व (अजूनही हा शब्द मला बरोबर लिहिता आला तर शपथ !), निबंध, धावणे, पोहणे,  खो-खो, बुध्दीबळ, रिले-रेस  आणि अनेक स्पर्धा. यात ज्यांनी सातत्य राखले, ज्यांना आवडीच्या गोष्टीत अजून पुढे जायची इच्छा झाली त्यांनी पुढे ती कला जोपासली. मग  कॉलेज, जिल्हा स्तरीय स्पर्धा, गणेशोत्सव वगैरे निमित्ताने अनेकांचा उदयोन्मुख कलाकार ते प्रसिध्द कलाकार किंवा  खेळाडू  असा  प्रवास झाला. अनेकजणांची किर्ती वटवृक्षाएवढी मोठी झाली पण याचे मूळ मात्र नक्कीच शाळेत रुजले गेले असं म्हणणे वावगे ठरणार नाही. अनेकजण ते मान्य ही करतील.

वार्षिक स्पर्धांचे वेळापत्रक लागले की  कुठे कुठे आणि केंव्हा केंव्हा कुठल्या कुठल्या स्पर्धेत भाग घेता येईल याची चाचपणी व्हायची.प्रामुख्याने सकाळच्या सत्रात मैदानी स्पर्था आणि दुपारी गाणे/स्तोत्र पठण/चित्रकला/निबंध अशा पध्दतीने स्पर्धांचे आयोजन व्हायचे. ‘कृष्णा नदीत’ पोहण्याची स्पर्धा हे एक आमच्या शाळेचे वैशिष्ट्य असायचे. त्यावेळीही मॅक्झीमम् स्पर्धेत भाग कसा घेता येईल हे बघीतले जायचे.

ब -याचदा नंबर यायचा नाही. पण  यामुळे फार काही कधी दुःखे झालो नाही.  ही प्रोसेस मात्र भरपूर एन्जॉय केली जायची, सगळ्यांकडूनच.  स्पर्धा संपल्या की एक दिवस शाळेत जेवणाचा कार्यक्रम असायचा. सगळ्या मित्रांसमवेत ‘स्नेह भोजन’  याची मजा  काही अनोखी असायची. त्यानंतर पारितोषेक वितरण आणि बहुतेक त्याच दिवशी संध्याकाळी विविध – गुण दर्शनाचा कार्यक्रम असायचा. नाटके, मिमिक्री, डान्स, गाणे  आणि बरेच काही  सादर होऊन  हा ‘अनुपम्य सोहळा ‘ संपायचा आणि  सगळेजण  (मी सोडून) वार्षिक परीक्षेच्या तयारीला लागायचे.

हेच विविध गुण दर्शन पुढे कॉलेज मध्ये ही  सुरु राहिले. इकडे जरा  तारुण्याची शिंगे फुटली होती. स्तोत्र पठणाच्या जागी  “फिश पॉन्ड” ?  आले होते. ‘रेकॉर्ड फिश पॉन्ड’  नामक  प्रकार कळला, आणी आमच्या टवाळखोरीला चार चाँद लागले.

संबंध वर्षात एखाद्या मित्राच्या (मैत्रीणींच्या च जास्त) स्वभाव/गुण/घटना यावर समर्पक ओळी लिहिणे. किंवा तिला/त्याला उद्देशून गाणं  लावणे या साठी अभ्यास करु लागलो.  यात कॉलेजचे प्रोफेसर/प्राचार्य मंडळीही सुटायची नाहीत.  नवीन आलेल्या मुलीसाठी – “कुण्या गावाचं आलं पाखरू”   हे गाणं लागलं नाही  तर फाॅल व्हायचा.  “पापा कहते हे बडा नाम करेगा/खुद्द को क्या समजती  है/क्या अदा क्या नखरे तेरे पारो” वगैरे गाणी  फिक्स असायची, ती कुणाच्या नावे हे फक्त दरवर्षी बदलायचे.

काही फिश-पाॅन्ड ?

ची यानिमित्याने फक्त उजळणी

जिवलग मैत्रीणींसाठी :-

आम्ही दोघी मैत्रिणी जिद्दीच्या,जिद्दीच्या,

हातात वह्या रद्दीच्या,रद्दीच्या

ज्याचा तास कळत नाही अशा शिक्षकास:-

अजीब दास्तां है ये,

कहां शुरु कहां खतम,

ये लेक्चर है कौनसा,

न वो समझ सके न हम..

खालील ‘फिश- पाॅन्ड’ कुणासाठी ते तुम्हीच ठरवा:-?

करायला गेली रक्त दान

करायला गेली रक्त दान

डॉक्टर म्हणाले बाटली नाही चमचा आण…

कोण म्हणत मी खड्ड्यात पडले,

मी पडले म्हणून खड्डा पडला.

 

म्हणतो मुलींना चल आपण वडापाव खाऊ.

म्हणतो मुलीना चल आपण वडापाव खाऊ.

.

.

कँटीन मधे गेल्यावर मुली म्हणतात

किती माझा चांगला भाऊ…….

 

उठे सबके कदम

तर रम पम पम

कभी ऐसे मार्क्स लाया करो

कभी झिरो कभी वन

कभी उससे भी कम

कभी तो पास होके आया करो. ?

जिथे असतील फुकटच्या पार्ट्या

जिथे असतील फुकटच्या पार्ट्या

तिथे भेटतील ह्या दोन कार्ट्या

मंडळी,

काय तुम्हाला काही पडलेले का

“फिश -पॉन्ड “? किंवा तुमच्या खास मित्र- मैत्रिणीना?. लिहा की मग  कमेंट मध्ये खाली

तर मंडळी आजच्या टवाळखोरीचा शेवट आम्हाला ११ वी का १२ वीला आमच्या  “सांगली कॉलेज “मध्ये पडलेल्या (फारच टुकार) फिश-पॉन्डने

“स्वप्नात आली जुही चावला. उठून बघतो तर  ढेकूण चावला”

तेव्हा पासून  खरं म्हणजे आम्ही  कुठलीही गोष्ट चावली की लगेच खाजवायला….. ?

फिशो आपलं असो

(स्तंभ लेखक) अमोल केळकर  ?✌?

(इथे आम्ही उधळलेले विविध  -गुण वाचायला मिळतील) >>poetrymazi.blogspot.com

 

©  श्री अमोल अनंत केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ बालपणीच्या आठवणी…भाग-3 – खजिना ☆ सौ. अमृता देशपांडे

सौ. अमृता देशपांडे

☆  मनमंजुषेतून ☆ बालपणीच्या आठवणी…भाग-3 – खजिना ☆ सौ. अमृता देशपांडे ☆ 

बाबांचा पेशा वैद्यकीय, आयुर्वेदिक वैद्य.(BAMS) पुढे integrated courses करून शल्य चिकित्सक व भूलतज्ञ (anesthetist) ही झाले.

त्यांची बोटे हार्मोनियमवर जितक्या सहजतेने व चपळाईने फिरत तितक्याच किंबहुना जास्तच अचूकतेने आणि सावधपणे शस्त्रक्रिया करत असत. हार्मोनियम मधून मधुर स्वर निर्मिती होत असे तर शस्त्रक्रियेतून शरीराची व पंचप्राणांची दुरुस्ती होत असे.

एक 10-11 वर्षाची मुलगी चालत्या स्कूटरवरून पडली आणि कानापासून हनुवटीपर्यंतचा गाल चक्क कागद फाटावा तसा फाटला. तशीच तिला रक्तबंबाळ अवस्थेत CPR kolhapur ला आणले. बाबा होतेच तिथे. लगेचंच तिला OT मध्ये घेण्यात आलं. जवळ जवळ दोन तास ऑपरेशन चालू होतं. हळूहळू बरी झाली,   तर एका महिन्यानं तिचे आईवडील तिला घेऊन हाॅस्पिटल मध्ये छान बरी झाली म्हणून भेटायला गेले.बाकीचे सगळे डाॅक्टर्स ही होतेच तिथे. तिचा फाटलेला गाल पूर्णपणे बरा झाला होता. गोरीपान मुलगी, गालावरची शस्त्रक्रिया म्हणजे आयुष्यभर तोंडावर टाके, आणि शस्त्रक्रियेची खूण कायमच रहाणार. कदाचित थोडी विद्रूपता येण्याचीही शक्यता. असाच ठाम समज झाला होता. पण तिच्या बाबतीत प्रत्यक्षात वेगळंच झालं होतं. बाबांनी इतर डाॅक्टर्सना  सांगितली तिची case. पण तिला बघितल्यावर डाॅक्टर्स सगळे चकित झाले. OTच्या नर्सेस नी जेव्हा सांगितलं की तिचा पूर्ण गाल फाटला होता, पण सरांनी (बाबांनी) तो इतका नाजुकपणे आणि कम्मालीच्या सफाईने शिवला की, डाग किंवा विद्रूपता सोडाच, गालावरून एक लांब बारीक केस यावा असा भास होत होता. गोरा पान चेहरा, गुलाबी ओठ, एका गालावर खळी, आणि दुस-या  गालावरचा हा केस सौंदर्यात आणखीच भर घालत होता.

सगळ्या डाॅक्टर्सनी अक्षरशः बाबांना दंडवत घातलं.

हाॅस्पिटल मध्ये शिस्त, स्वच्छता याबाबतीत बाबांची करडी नजर असे. दराराच होता म्हणा ना! पण प्रेम ही तितकेच होते. बाबांना बाकीचे डाॅक्टर्स डॅडी म्हणायचे.

बाबांना  शस्त्रक्रियेतल्या कौशल्यासाठी नावाजले जात होते.

क्रमशः…

© सौ अमृता देशपांडे

पर्वरी- गोवा

9822176170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ एक सीट गेली…. ☆ श्रीमती सुधा भोगले

☆ मनमंजुषेतून ☆ एक सीट गेली…. ☆ श्रीमती सुधा भोगले ☆ 

ते दिवस मार्गशीर्षातील होते. नुकतीच थंडीची चाहूल लागली होती. माझे यजमान आणि त्यांचे व्यावसायिक मित्र, महत्वाच्या कामानिमित्य पुण्याला निघाले होते. सकाळीच लवकर ते गाडीने निघाले. जाताना रात्रीपर्यंत परत येईन, असे सांगून गेले.

घरात, मी, मुले, व सासूबाई होतो. त्या दिवसभराची दैनंदिनी हळूहळू पुढे सरकत होती. संध्याकाळ झाली. पुरुषमाणसे जेवायला नसली की स्वयंपाक आवरता करता येतो. त्याप्रमाणे आमची जेवणे चट्कन आवरली. हळूहळू रात्रीने आपले पाय गडदपणाकडे पसरायला सुरवात केली. आणि डोळे त्यांच्या वाटेकडे वळू लागले. १९८९-९० साली भ्रमणध्वनीचा संचार झाला नव्हता. घरोघरी फक्त दूरध्वनी असत. त्यामुळे निरोप मिळणे दुरापास्तच होते.

वाट पाहतापाहता आम्ही निद्राधीन झालो.

सकाळी चहापाणी आवरून, मी परदेशस्थ नणंदेला पत्र लिहायला बसले होते. घड्याळात सकाळचे सात वाजायला आले होते. तेवढ्यात दारावरची घंटा वाजली. मला वाटले यजमानच आले असतील, मुलाने दर उघडले, तर आमचे कार्यालयातील दोन माणसे, कसनुसे चेहरे घेऊन उभी होती. मी विचारले, ”सकाळी,  सकाळी,  काय काम आहे?”ते जरा घाबरलेलेच वाटत होते. त्यामुळे काहीतरी विपरीत तर घडले नाहीना, अशी शंका मनाला चाटून गेली. मग मी त्यांचेशी खोलात जाऊन बोलू लागल्यावर, त्यांनी माझे यजमान रात्री अपघातात सापडल्याचे सांगितले. पुन्हा पुन्हा, यजमान सुरक्षित असल्याची व किरकोळच  लागल्याची ते ग्वाही देत होते. कऱ्हाडला कृष्णा हॉस्पिटलला त्यांना एडमिटकेल्याचे सांगितले. मला न्यायला गाडी येईल, व कार्यालयाच्या शेजारी राहत असलेल्या मावशी माझ्याबरोबर सोबत येणार असल्याचे सांगितले. मी जायची जुजबी तयारी केली. मनात काळजी, आणि असंख्य प्रश्न उभे राहत होते. नुकताच कऱ्हाडला त्याच रस्त्यावर, अशाच खाजगी गाडीच्या अपघातात शहरातला एक व्यावसायिक दगावला होता.

ते सर्व मनात आले. अंगावर सरसरून काटा उभा राहिला. सर्व आवरून जायला निघालो.

ती रात्रीची वेळ होती.  त्या काळात चौपदरी मार्ग झालेला न्हवता.  कऱ्हाड-पेठ रस्ता दोह्नी बाजूंनी गर्द वृक्षांनी वेढलेला होता.  दुपदरी रस्त्यावर,  एखाद्या पुढच्या वाहनाला,  मागे टाकून जाताना प्रचंड त्रास होत असे.  चालवणार्याचे कसबच पणाला लागत असे.  त्यात साखर कारखान्याला उस पुरवणार्या ट्रॅक्टर ट्राॅलीची वाहतूक ही चालू असण्याचा तो हंगाम होता काही वेळेस बंद पडलेला ट्रॅक्टर,  ट्राॅली मागे सोडून निघूनही जाई.  त्या ट्राॅलीला मागे कोणतीही लाल खुण,  किंवा दिवा नसे.  येणार्या वाहनाला अचानक जवळ गेल्यावरच हि ट्राॅली दिसू शके.

त्या दिवशी माझे यजमान व त्यांचे मित्र पुण्याहून उशिरा निघाल्यावर,  साताऱ्यात ते जेवायला थांबले जेवण झाल्यावर ते मार्गस्थ होण्यासाठी निघाले.  पुण्यातून येताना मागच्या आसनावर बसलेल्या माझ्या यजमानांना,  त्यांचे मित्र म्हणाले ‘भोगले साहेब,  तुम्ही पुढच्या आसनावर बसा.  मी मागे एकटाच बसतो,  म्हणजे आरामात झोपून जाईन.  त्या प्रमाणे दोघांनी,  आसनांची आदलाबदल केली.  गाडीचे सारथ्य तिसरे मित्र होते ते करू लागले.  कऱ्हाड सोडल्यावरही प्रवास सुरक्षित चालला होता.  थोडेसे अंतर कापल्यावर,  एका पुढच्या वाहनाला मागे टाकून पुढे गेल्यावर,  एकदम वर वर्णन केले आहे तशी उसाची ट्राॅली दृष्टीपथात आली.

त्या बरोबर सारथ्य करणाऱ्या राय सोहनींनी त्यांच्या गाडीचा वेग कमी करत गाडी शून्य वेगावर आणत ट्राॅली मागे उभी करण्याचा विचार केला.  पण हाय !! विपरीत घडणारं टळणारं न्हवतं.  मागून एक ट्रक वेगाने येत असलेला त्यांच्या गाडीवर मागच्या बाजूने जोरात आदळला.  क्षणात गाडीचा मागचा भाग चेपाटला जाऊन पुढच्या आसनांना टेकला.  सारथ्य करणारे राय सोहनी व माझ्या यजमानांना जोरात दणका बसून ते पुढच्या गाडीच्या भागावर आदळले.

थोडा वेळ गेल्यावर माझ्या यजमानांना गुदरलेल्या प्रसंगाची जाणीव होऊ लागली.  येणारया जाणार्या गाड्यांना त्या गाडीची अवस्था बघून,  त्यात कोणी जिवंत असेल असे वाटतच न्हवते माझ्या यजमानांनी धक्यातून थोडसं सावरल्यावर आपले पाय शाबूत असल्याची खात्री केली.  इकडे तिकडे पाहत त्यांच्या हाताला एक तुटलेला लोखंडी लांब तुकडा लागला.  तो घेऊन त्यांनी वरच्या तुटलेल्या टपावर जोरजोरात आपटायला सुरुवात केली आणि मग तो आवाज ऐकून येणारया जाणार्या वाहनांना आत कोणीतरी जिवंत असल्याची जाणीव झाली मग वाहने थांबवून लोक मदतीला धावले वाहतूक पोलिसांना पाचारण केल्यावर ते हजर झाले.  जिवंत असलेल्या त्या दोघांना बाहेर काढून कऱ्हाडच्या कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

माझ्या यजमान ज्या कामासाठी गेले होते,  त्या साठी त्यांचे मित्र बाफना यांच्या बॅगेत बरीच रक्कम असल्याचे ठाऊक होते.  त्यांनी मोठ्या समय सूचकतेने ती पिशवी आपल्या पोटाजवळ ठेऊन दिली.  न जाणो ती रक्कम सरकार जमा झाली असती तर परत मिळवणे दुरापास्त होऊ नये.  नंतर रुग्णालयात बाफनांचे भाऊबंद पोहोचल्यावर त्यांना ती पिशवी सुपूर्द केली.

आम्ही घरातून निघाल्यावर दोन तासांत रुग्णालयात पोहोचलो बाहेर काही व्यक्ती माझ्या येण्याची वाट पहात उभ्या होत्या.  त्यात कर्हाडच्या किर्लोस्कर कंपनीतील,  श्री. महाबळ साहेब व श्री. चिपळूणकर साहेब तेथे आलेले होते.  मी उतरल्यावर त्यांनी माझ्या यजमानांची तब्येत चांगली असल्याचे सांगून मला धीर दिला.  पण त्या पुढे म्हणाले,  ‘एक सीट गेली. ’ ती एक सीट म्हणजे यांचे व्यावसायिक मित्र बाफना यांची होती.  ज्यांनी साताऱ्याला माझ्या यजमानांना पुढे बसण्यास सांगितले होते (केवढा हा दैवदुर्विलास) पण पुढची माझ्या यजमानांची सीट शाबूत राहिली.

© श्रीमती सुधा भोगले 

९७६४५३९३४९ / ९३०९८९८९१९

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी वाटचाल…. मी अजून लढते आहे – 14 ☆ सुश्री शिल्पा मैंदर्गी

सुश्री शिल्पा मैंदर्गी

☆ मनमंजुषेतून ☆ माझी वाटचाल…. मी अजून लढते आहे – 14 ☆ सुश्री शिल्पा मैंदर्गी ☆

सौ.अंजली गोखले 

(पूर्ण अंध असूनही अतिशय उत्साही. साहित्य लेखन तिच्या सांगण्यावरून लिखीत स्वरूपात सौ.अंजली गोखले यांनी ई-अभिव्यक्ती साठी सादर केले आहे.)

इतक्या वर्षाच्या घोर तपश्चर्ये नंतर आणि अथक प्रयत्ना नंतर मी ज्या सोनेरी क्षणांची वाट पहात होते, तो क्षण समोर येऊन ठेपला. मी भरत नाट्य म् या अवघड नृत्य प्रकारामध्ये एम ए. ही पदवी मिळवून मास्टरी केली. तो क्षण मी, आई-बाबा, घरातील सर्व, ताई, गोखले काकू, श्रद्धा, माझ्या मैत्रिणी सगळ्या साठीच अविस्मरणीय होता.

एम ए. पदवी प्राप्त केल्यामुळे माझी आणि माझ्या व्यक्तिमत्वाची ओळखच पूर्णपणे बदलून गेली. कदाचित या परिस्थिती मध्ये मी घरातल्या एका अंधाऱ्या कोपऱ्यात बसून राहिले असते. आई-बाबां साठी कायमची चिंता बनून राहिली असते. पण त्यावर मात करून मी हे मोठे यश प्राप्त केले होते.

अनेक शाळांमधून, महिला मंडळांमधून, रोटरॅक्ट क्लब, लायन्स क्लब मधून मला नृत्याचे कार्यक्रम करण्यासाठी आमंत्रणे येऊ लागली समाजामध्ये माझी ओळख अंध शिल्पा अशी न रहाता, नृत्यांगना शिल्पा म्हणून झाली. एक चांगला कलाकार म्हणून मला ओळखले जाऊ लागले. मीही माझे भाग्य समजते की माझ्या वाट्याला कलाकाराचे आयुष्य आले.

सतत कार्यक्रम, त्यासाठी ड्रेसअप होणे, मेकअप करणे, हेअर स्टाईल करणे, दागदागिने घालणे, पायात घुंगरू, कार्यक्रमाच्या ठिकाणी वेळेवर पोहोचणे यामध्ये माझा वेळ आनंदात जात होता. घुंगरां च्या छुन छुन गोड गोड नादाने माझ्या जीवनात अनोखे संगीत निर्माण केले होते. प्रेक्षकांच्या टाळ्यांचा कडकडाट, त्यांचे अभिप्राय, रंगमंचावरून खाली उतरताना पासून त्यांची पाठीवर पडलेली कौतुकाची थाप, त्यांनी हसत मुखाने केलेले हस्तांदोलन या मुळे मी हर्षून जात होते. माझ्या जीवनाला एक वेगळीच उंची प्राप्त झाली होती. माझे हे कौतुक बघून आई बाबांच्या चेहर्‍यावरील आनंद आणि समाधान मला जाणवत होते.

भरत नाट्यम् मध्ये एम.ए होणं हे ताई आणि माझ्यासाठी तपश्चर्येचा प्रदीर्घ काल होता. प्रवास होता. त्याचा परिपाक म्हणून त्याला पदवीच्या रुपात एक छान, गोंडस फळ आलं होतं. त्या आनंदा प्रित्यर्थ्य आईबाबांनी एक कौटुंबिक समारंभ करायचं ठरवलं. तो दिवस माझ्यासाठी न भूतो न भविष्यति असा होता. या कार्यक्रमामध्ये आपटे कुटुंबीय, आमचे सर्व कुटुंबीय, सुपरिचित या सर्वांना आमंत्रित केले होते. त्यांच्या समोर मी माझी कलाही सादर केली. सगळे जणं नृत्यामध्ये रमून गेले.

…. क्रमशः

© सुश्री शिल्पा मैंदर्गी

दूरभाष ०२३३ २२२५२७५

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ऋणानुबांधाच्या गाठी’ – भाग 4 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

☆ मनमंजुषेतून ☆ ऋणानुबांधाच्या गाठी’ – भाग 4 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ 

वहिनी गेल्या. नंतर आण्णांची काळजी घेणारे घरात कुणी उरले नाही. त्यांचे धाकटे भाऊ होते  पण ते स्वत:च थोडे अपंग होते. धाकटा मुलगा चाळीशीचा असला, तरी थोडा लाडावलेला. थोडा गतिमंद. त्या दोघांचीही अर्थात लग्ने झालेली नव्हती. मोठा मुलगा नोकरी निमित्त इंदौरला. तो किती राहणार? यावेळी उज्ज्वलाच आण्णांच्या घरी रहायला आली. आण्णाचे पथ्य सांभाळले. पातळ जेवण करून,  मिक्सरमधून काढून ती ते चमच्याने आण्णांना भरवू लागली. त्यांना गिळता येत नसे. झोपवून चमच्याने ते पातळ जेवण थेट घशात सोडावं लागे.  आण्णांची आई बनून तिने आण्णांना जेवू घातले.

वर्षभर सगळं ठाक-ठीक चाललं. आण्णांचं जेवण, पातळ खीर, अंबील, मिक्सरमधून पोळी काढून त्यात दूध घालून केलेली पोळीची पेस्ट असं सगळं करून ती शाळेत जाई. हे घर तसं मध्यवर्ती होतं. तिचं स्वत:चंही घर शाळेपासून जवळ होतं. तिला शाळेतून येताना घरी डोकावता येत असे. तिचा मुलगा-मुलगी,  आई-वडील,  भाऊ यांना भेटून येता येत असे. मुलीचे लग्न झाले होते. तिला एक नातही होती. या सार्‍यांची ख्याली-खुशाली विचारून,  घरचं हवं – नको पाहून ती संध्याकाळी आण्णांकडे येऊ शकत असे. पुढे वाड्याचं अपार्टमेंट करायचं ठरलं. बिल्डरने दिलेली पर्यायी जागा उज्ज्वलाच्या दृष्टीने खूप लांब होती. तिला दोनदा बस बदलून शाळेत जावं लागणार होतं. आण्णा तिला म्हणत, ‘वाडा सोडला, की तू आपल्या घरी जा. साडी, चोळी, बांगडी देऊन माहेरवाशिणीची पाठवणी करतो.’  आण्णा म्हणायचे,  म्हणजे लिहून दाखवायचे. ती म्हणायची, `मग तुमचं कोण करणार?’  ते म्हणायचे, `मी दूध वगैरे पेय घेऊन राहीन. बाकीचे नेहमीप्रमाणे डबा आणतील. तू इतक्या लांब येऊ नकोस. तुझी खूप ओढ होईल.’  पण ती म्हणायची,  ‘मी वहिनींना वचन दिलय,  शेवटपर्यंत तुमची काळजी घेईन. मीही तुम्हा सर्वांबरोबर तिकडच्या घरी येणार!’

उज्ज्वला आता इतकी घरातली झाली होती की आम्ही भाच्या-पुतण्या आण्णांना भेटायला गेलो की तिला इतका आनद होई, माहेरवाशिणींचं किती कौतुक करू आणि त्यांच्यासाठी घरात काय काय करू, नि काय काय नको, असं तिला होऊन जाई. आण्णांना मुलगी असती, तर तिने तरी त्यांच्यासाठी इतकं  केलं असतं की नाही कुणास ठाऊक? कदाचित् तीदेखील आमच्यासारखी आपल्या संसारात गुरफटून गेली असती.

आण्णांचा मोठा मुलगा नोकरीच्या निमित्ताने दूर गावी होता. तो आण्णांना सारखा `तिकडे चला’  म्हणायचा. पण आण्णांना पुणं सोडून कुठेच जायचं नव्हतं. ‘नेत्रदान केलय.. देहदान केलय…’ वगैरे सबबी ते सांगायचे. खरी गोष्ट अशी होती की त्यांना अखेरच्या दिवसात,  आपली वास्तु,  जी त्यांच्या पत्नीची स्मृती होती आणि आपली कर्मभूमी या गोष्टी सोडून कुठेही जायचं नव्हतं,  हेच खरं. या स्थितीत त्यांच्याजवळ होती,  त्यांची एके काळची विद्यार्थिनी, जी गुरुऋण मानून आपलं शिक्षण संपल्यावरही, त्यांच्या गरजेच्या काळात,  त्यांची काळजी घेण्यासाठी आपलं घर,  आई-वडील,  भाऊ,  मुलगा या सार्‍यांपासून दूर आपल्या गुरुजवळ राहिली. आता आण्णा जाऊनही किती तरी वर्षे झाली. पण तिने त्यांच्यासाठी जे केले त्याला खरोखरच तोड नाही. `ऋणानुबांधाच्या गाठी’ हेच खरं!

समाप्त

© श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares
image_print