मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ हिरवी भिशी… ☆ सुश्री शीला पतकी ☆

सुश्री शीला पतकी 

? मनमंजुषेतून ?

☆ हिरवी भिशी… ☆ सुश्री शीला पतकी 

फोनची रिंग वाजली म्हणून फोन उचलला तर पलीकडून अंजूचा आवाज उर्मी उद्या माझ्याकडेबरोबर पाच वाजताभीशि आहे पण वेगळी हं! म्हणजे हिरवी मिशी! सर्वांनी हिरवे पोशाख परिधान करून या सगळे हिरवे! मी पदार्थही हिरवे करणार आहे तिची ती भन्नाट कल्पना ऐकून मी पांढरी फटक पडायची वेळ आली. मी म्हंटल बर बर येते बाई !

फोन खाली ठेवल्यापासून डोक्याला हिरवाईने घेरलं…. साडी हिरवी. कुंकू हिरवं.. कानातले गळ्यातले हिरव्या खंड्यांची अंगठी.. हिरव्या वादीची चप्पल, बांगड्या, हिरवी साडी हिरवी पर्स !माझा हा सगळा जामानिमा पाहून हे म्हणाले, ” आता हिरवी लिपस्टिक लाव म्हणजे ध्यान दिसशील” एवढ काही नको हं हे एवढ छान केलय तुम्हाला मेल कौतुकच नाही! या वाक्याने आमचा संवाद संपला…?

मंजूकडे गेले बंगल्याच्या फाटकासमोर हिरव्या पानांची सुंदर रांगोळी काढली नव्हे गालीचा होता. मध्ये फक्त थोड्याशा रंगीत पाकळया दारावर आंब्याचं तोरण आणि हिरव्या वाटाण्यानी सजवलेली नक्षीदार महिरप… फार सुंदर सजलं होतं दार ! दोन्ही बाजूला सुंदर हिरव्या कुंड्या त्यात डेरेदार उंच मयुर प्लॅन्ट… दारात हिरवी पायपुसणी हॉलमध्ये हिरवे पडदे…. सोफ्याला हिरवे कव्हर हिरव्या नक्षीदार छोट्या उषा खाली हिरवा गालीचा पसरलेला हिरव्यागार छोट्या छोट्या छोट्या पोपटांचे कॉर्नर्स हँग केलेले. एका भिंतीवर हिरव्या फॅनेलचा बोर्ड त्यावर हिरव्या रंगाचे वर्णन असलेल्या गाण्याच्या दोन दोन ओळी लिहिल्या होत्या आणि त्या हिरव्या पानांनी पिनअप केल्या होत्या हिरव्या हिरव्या रानात;

हरियाली और रास्ता; हिरवे हिरवे गार गालीचे…. इत्यादी सारखी गाणी होती ! माझ्या अंजूच्या घराची ती हिरवाई न्याहाळतांना मी थक्क झाले आणि तिचं कौतुकही वाटले. इतक्यात अंजू बाहेर आली बाई ग.. मी तर बघतच राहिले! गोरीपान अंजू.. हिरवी पैठणी.. हिरवे दागिने.. सुंदर हेअरस्टाईल त्यावर हिरवा बो आणि त्यावर हिरव्या पानांची फुल करून माळलेला गजरा मध्ये फक्त चार शुभ्र फुले होती. दागिने सुंदर होते आणि सगळे हिरव्या रंगांना धारण करणारेही होते! मी तर बाई बघतच राहिले….. ! पाठोपाठ तिची मुलगी आली तिनेही हिरव्या रंगाचा पंजाबी ड्रेस परिधान केलेला. “बाई समद झालया नव्ह” असं म्हणत दोन कामवाल्या बाया बाहेर आल्या त्यांनी हिरवी इरकली लुगडी नेसली होती. हिरव्या बांगड्या घातल्या होत्या.

हळूहळू सगळ्या मैत्रिणी जमा झाल्या प्रत्येकीच्या एंट्रीला कुतूहल !अय्या काय गोड दिसतेस! किती सुंदर! झकास! टाळ्या काय न वाजणाऱ्या शिट्या काय….. प्रत्येकीची एन्ट्री दणाणून सोडत होती. प्रत्येकीच्या बौद्धिक क्षमतेची जणू परीक्षा होती. इतक्यात हिरव्या टी शर्टचा तिचा मुलगा बाहेर पडला आणि आम्हा सर्वांवर नजर फेरीत म्हणाला, ” मम्मा कोण म्हणतंय कि सोलापुरात यंदा कमी पाऊस झालाय “असं म्हणत त्यांना पोबारा केला. आम्ही खूप हसलो! वेलकम ड्रिंक म्हणून तिने वाळ्याचे सरबत ठेवले होते सुंदर हिरव्या ट्रेमधून हिरव्या रंगाच्या ग्लासामध्ये, त्या ग्लासाला छोट्या हिरव्या छत्र्या हिरवे सुंदर स्ट्रॉ वर्ती हिरव्या पुदिन्याची पानं पेरलेली होती पेय सुंदर रंगतदार होत… !

खूप गप्पा झाल्या काही गेम्स झाले शेवटच्या गेममध्ये एका हिरव्या प्लास्टिकच्या डिशमध्ये खूप नाणी होती ती हातानी उचलायची.. किती प्रयत्न केला तरी एक दोन चार नाण्याच्या वर जास्त मजल जात नव्हती आम्ही जिंकलेली सर्व नाणी एका हिरव्या बटव्यात एकत्र केली.

मग आले खाद्यपदार्थ सुंदर हिरव्या पत्रावळींचे डिझाइन असलेल्या डिशेश त्यात पालक पुलाव त्यावर खोबरं पलीकडे हिरव्या कोथिंबिरीची खोबऱ्याची चटणी हिरव्या मटारची उसळ पालक पुरी आणि हिरव्या रंगाची पिस्ता बर्फी…. अहाहा… बेत चवदार लज्जतदार तसा रंगतदार ही होता !

खाणे पिणे झाले शेवटी पिस्ता आईस्क्रीमचे सुंदर कप त्यावरचा पिस्ता खाताना खूपच मजा आली अंजूच्या कल्पकतेचे कौतुक प्रत्येकजण तोंडभरून करत होता इतक्यात हिरव्या सुबक केळीच्या पानात मस्त हिरवेगार गोविंद विडे आले… मी म्हणाले अंजू पुरे ग किती धक्के देशील? ती म्हणाली थांबा तिने आपल्या सहकारी मावशांना बोलावले आणि मगाचे हिरवे बटवे आमच्या काही ज्येष्ठ भगिनींच्या हस्ते त्या महिलांना बक्षीस म्हणून दिले त्यांनाही खूप आनंद झाला या तिच्या कृतीने आम्ही भरून पावलो म्हणजे या सुंदर प्रसंगाला एक छान भावनेची बाजूही होती आणी ती हिरवी कंच होती अंजूच्या कल्पकतेचे तोंडभरून कौतुक करीत मिळालेल्या नवीन कल्पनेचा सुखद हिरवट गारवा अंगावर लपेटत मी घरी आले ओठावर गाणं होतं हिरव्या हिरव्या रानात ——-

© सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “जरासं बदलून बघा ना…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ “जरासं बदलून बघा ना…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

माझी मैत्रीण आणि तिचे मिस्टर दोघेही वकील आहेत. तीनी पितळेचा किंवा चांदीचा गणपती घेऊ म्हटलं तर ते म्हणाले,

” नाही…. मला चालणार नाही. यावर नोऑर्ग्युमेंट”

ती म्हणाली 

“लग्नाला 50 वर्षे झाली आहेत पण घरातल्या निर्णयात कायम तेच जज्ज…. ते म्हणतील तेच फायनल…..

मी बोलू पण शकत नाही. ऊगीच वाद नको. म्हणून गप्प बसायच. “

हं………

 

मीनाचे मिस्टर बहात्तर वर्षाचे आहेत. ते म्हणाले 

“मला एकदम पटलं पण दादा काय म्हणेल?”

दादा म्हणजे त्यांचे भाऊ वय वर्ष 76

मीना म्हणाली 

” दादाला भीत भीतच यांच आयुष्य गेलं. पुढचंही जाणार… यांना निर्णय क्षमता कधी येणार कोण जाणे?

दरवेळेस दादा काय म्हणेल……. “

……..

नानांनी तर डिक्लेअरच केलं

” मी मेलो की काय करायचं ते करा… “

……….

बहुतेकांचं म्हणणं असं की सगळं पटतं पण भितीच वाटते….

काही विपरीत झालं तर…

त्यापेक्षा नकोच ते…..

 

वसुधा म्हणाली” माझा मुलगा आणि सून किती वर्ष म्हणत होते. पण माझाच विरोध होता. खरंतर कारण असं काहीच नाही. पण होता..

पण आता एकदम कसा होकार द्यायचा ? “

 

लिली चा फोन आला

” मावशी यस यु आर राईट.. पण नंतर गर्दी होईल म्हणून मी आधीच ऑनलाईन गणपती बुक केला होता. त्यांनी कालच डिलिव्हरी दिली आहे. आता नेक्स्ट टाईम मी पितळेचा घेईन…. “

 

जया म्हणाली 

“आमच्या पप्पांच मम्मींसमोर काही चालत नाही. त्यांना खरतर हे आवडलं असतं. मी त्यांच्याशी बोलले. पण ते म्हणाले मम्मीला चालणार नाही काही बोलू नकोस…. “

 

चार वर्षांपूर्वीची गोष्ट आशाकडे चांदीचा गणपती होता. तिनी चौरंग आणला. त्यावर गणपती बसवला. हार घातला. समया, निरांजन, लावलं. लाईटची माळ लावली. छान डेकोरेशन करून सजवलं.

पण नणंद बाई रागवल्या,

“हे काय चाललय तुझं ?आपल्याकडे गणपती बसवत नाहीत तू हे काय नवीन सुरू केलेस? इत्यादी……. “

झालं….

तेव्हापासून बंद..

 

अमेरिकेत असलेल्या अमोलंनी आईला विचारलं ती म्हणाली

” गणपती बसव, गौरी कर, नवरात्र घाल, काय वाटेल ते कर तू थोडंच माझ ऐकणार आहेस ?… “

थोडक्यात काय तर……

 

दोन वर्षांपूर्वी सुधानी मेटलचा गणपती आणला.

तिची नात जाम खुश झाली.

बाप्पा बाप्पा म्हणत हातात घेऊन नाचली. मग शेजारी झोक्यावर बाप्पाला घेऊन बसली.

तिच्या बाबांनी बाप्पासाठी छोटा झोपाळा आणला. तिनी तो सजवला. बाप्पाला त्यात बसवल.. फोटो काढले…

नात खुष झाली….

 

बाप्पाला आपण म्हणतो 

“आम्हाला सुखात.. आनंदात ठेव…. ” खरंतर तसं राहणं बरंचस आपल्याच हातात आहे. सगळंच कशाला देवावर सोपवायचं?

थोडा प्रयत्न आपणही करू या की.

 

काय खरं की नाही?

मग म्हणा की

” गणपती बाप्पा मोरया…. “

आणि थोडं बदला की……

ज्यांना जमेल त्यांनी घरी मातीचा गणपती करा. घरीच विसर्जन करा. आता काही शाळेतही शिकवतात. मुलांना पर्यावरणाचे महत्त्व पटवून देतात.

 

श्री शंकराचार्यांनी लिहिलेलं

” श्री गणेश पंचरत्न स्तोत्र “खूप छान आहे.

यावर्षी ते पाठ करा. मी म्हटलेलं तुम्हाला पाठवत आहे तुम्हाला युट्युब वर मिळेल.

बाप्पाला तुम्ही समोर बसून मनापासुन म्हटलेलं आवडेल.

 

बदल कशाचा, कधी, कसा करायचा हे समजलं की आपले आपण आनंदात राहतो.

बघा प्रयत्न करुन….

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ बीज अंकुरे अंकुरे – भाग – २ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ बीज अंकुरे अंकुरे – भाग – १ ☆ डॉ अभिजीत सोनवणे

(गोष्ट तशी छोटी पण लाखमोलाची… !!!) — इथून पुढे 

‘ए चेंगट बेण्या… माजा कप आक्का भर… बशीत च्या सांडला पायजे बग… ‘ 

तिच्या या वाक्याने मी भानावर आलो आणि बशीत सांडेस्तोवर च्या तिच्या कपात “वतला”.

समाधानाने तिच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या हसल्या.

यानंतर बशीत सांडलेला चहा तिने घरातल्या तुळशी वृंदावनाच्या मातीत टाकला, थोडा चहा एका प्लेटमध्ये टाकून ती प्लेट तीने घराबाहेर ठेवली.

आता कपात पुन्हा निम्माच चहा उरला.

हा निम्मा चहा तिने बशीत ओतून समाधानानं भुरके मारत पिला.

म्हातारीला मी पुन्हा वैतागून म्हणालो, ‘म्हातारे, मी तुला आधी कपात निम्माच चहा दिला होता, तू इकडे तिकडे ओतून निम्माच चहा पिलास…. मग मला मघाशी संपूर्ण कप सांडेपर्यंत का भरायला लावलास ?’ 

यावेळी ती, न चिडता भावुक होत म्हणाली… ‘माज्या बाळा, आपून इतकं कमवायचं… इतकं कमवायचं… की ते सांडून कपाभायेर येऊन बशीत पडलं पायजे… पन बशीत जे पडंल त्ये मात्र आपलं नसतंय… त्ये आस्तय प्राणी, पक्षी, गुरांचं… त्ये त्यांना वाहायचं… ‘ 

‘द्येव आपल्याला कप भरून देतो, पण म्हनुन आपुन अख्खा कप प्यायचा नसतो…. निम्मा कप समाजातल्या गोरगरिबांसाटी आसतो… निम्म्या कपाचं दान तिथं करायचं आस्तय बबड्या… ‘

… माझ्या गालावरून खरबरीत हात फिरवत तिनं माणुसकीची व्याख्या सांगितली.

“ कुठं गं शिकलीस ही जगण्या आणि जगवण्याची कला…. ??? “ माझ्या डोळ्यातून अश्रू ओघळले…

मला तिचे पाय धरायचे होते… पण मला हे नक्की माहीत होतं, की मी तीचे पाय धरताना; पाठीत धपाटा घालून ती मला म्हणेल, ‘ न्हाई भजं खायाला मी तुला आट आनं द्येनार न्हाई हां मुडद्या, लय नाटकं नगों करुस… ‘ 

पाच लाख दरमहा कमावणारा मी….

तरीही आज “भजं खायाला” माझ्याकडे आठ आणे नाहीत… गरीब कोण… ? श्रीमंत कोण… ?

माझ्याकडे पैसा होता; पण तिच्याकडे लक्ष्मी… !!! 

गोष्ट तशी छोटी पण लाखमोलाची… !!!

एकदा ती मला म्हणाली होती, ‘मेल्यावर बिन बोलवता बी “खांदा” द्यायला समदं गाव जमतंय, पन भुकेजलेल्या जित्त्या माणसाला आणि जनावराला आपल्या जवळची कोरभर भाकर आणि “कांदा” कुनी देत न्हाय… ‘ खांदा दिवून पुन्य मिळवन्या पेक्षा… जित्या मानसाला “भाकर आनं कांदा” दीवून पुन्य मिळव 

आपल्याला दगडातला द्येव् व्हायचाच न्हायी… चालता बोलता मानुस व्हयाचं हाय… ! 

आंतरराष्ट्रीय संस्थेचा प्रमुख मी… Management आणि Humanity या विषयावर माझ्याकडे पारितोषिके आहेत. Doctor for Beggars या कामामध्ये मला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मिळून एकूण 3000 पेक्षा जास्त पुरस्कार आहेत.

माझे हे सर्व पुरस्कार आणि पारितोषिके एका पारड्यात…. आणि माझ्या म्हातारीचे विचार एका पारड्यात…. ! 

कसं कोण जाणे… पण तीचंच पारडं खाली जातं… ! तिच्या विचारांचं वजन नेहमीच जास्त भरायचं.

“ओझं” “भार” आणि “बोजा” हे; वरवर “वजन” या शब्दाचे समानार्थी शब्द वाटतात. खरंतर तिघांचेही अर्थ वेगळे आहेत.

मनाविरुद्ध अंगावर पडतं ते ओझं…

नाईलाजाने वाहिला जातो तो भार…

इच्छा नसतानाही लादला जातो तो बोजा…

पण, मनापासून आणि आनंदाने खांद्यावर वागवलं जातं ते वजन… ! 

माझी अशिक्षित म्हातारी, विचारांचं धन डोक्यावर घेऊन… खऱ्या अर्थाने लक्ष्मी होते…

आणि, इतकं सर्व मिळवून माझी झोळी रिक्त राहते…. आणि हातात काही नसून, माझी म्हातारीच श्रीमंत होऊन जाते… !!! 

अशीच एकदा ती मला म्हणाली होती, ‘नारळाच्या झाडागत बोंबलत उच्च नगो होवूस… शेळ्या मेंढ्या ह्यांच्या तोंडाला तुजी पानं लागून त्यांची भूक भागंल, असं दोन फुटाचं बुटकं झाड हो… ‘ 

“दुसऱ्यासाटी तू किती झुकतोस, यावर आपली उंची ठरत्ये माज्या सोन्या… ” 

….. तिची ही वाक्ये ऐकून माझ्या अंगावर शहारे आले होते… ! 

डाव्या हाताने मग मी चड्डी सांभाळत, उजव्या हाताने नाकाचा शेंबूड पुसत… मी पुन्हा लहान होतो आणि पुन्हा तिच्या पदराखाली जातो… पुन्हा पुन्हा तिच्या पदराखाली जातो… आणि दरवेळी हा पदर मला माणुसकीच्या रस्त्यावर घेऊन येतो, एखाद्या दिशादर्शकासारखा… !!! 

तिच्या फाटक्या पदराची हि पताका; हेच माझं भरजरी वस्त्र आहे… !!!

गोष्ट तशी छोटी पण लाखमोलाची… !!!

ती जायच्या अगोदर काही दिवस मला म्हणाली होती… ‘खेड्यातली ल्वोकं फुलपात्रातून च्या देत्यात यात तुला गावंडळपना वाटतू ना… ?’ 

मी खाली मान घालून गप्प बसलो.

यावर तिने तिच्या भाषेत, फुलपात्र या शब्दाचा व्यापक अर्थ सांगितला तो असा…

… प्रत्येकाजवळ स्वतःचं असं एक भांडं… एक पात्र असतं. हे पात्र कधी रिकामं असतं… तर कधी भरलेलं असतं. ज्याच्याकडे हे रिकामं पात्र असतं त्याला हिणवू नये कधीच… कदाचीत स्वतः कडचं सर्वस्व पोरा बाळांना देऊन माघारी फिरला असेल तो… कधी आई होऊन… कधी बाप होऊन… आई बापाचं भांडं दिसायला रिकामं दिसलं तरी ते पात्र कायम Full च असतं… ! आपल्या ताटातली भाकरी जेव्हा आपण दुसऱ्याला देतो… तेंव्हा दिसायला ताट रिकामं दिसतं… पण खऱ्या अर्थाने ते तेव्हाच भरलेलं असतं… आणि तुमचं पात्र आपोआप Full होतं… घेण्यात आनंद आहे बाळा… पण देण्यात समाधान… ! आपण घ्यायचं सुद्धा असतं आणि द्यायचं सुद्धा… ,… कधीतरी एखाद्याची भूक उसनी घेऊन, त्याच्या चेहऱ्यावरचा “आनंद” आपण घ्यायचा… आणि त्याला भाकर देऊन, आपल्या मनातलं “समाधान”, त्याच्या मुखात ठेवायचं…. ! 

‘हितं तुजं भांडं रिकामं दिसंल… पन तवाच तुजं पात्र Full होतंय गड्या… !’ 

गोष्ट तशी छोटी पण लाखमोलाची… !!!

खाटेवर पडलेल्या आजीचे क्षीण झालेले, सुरकुतलेले हात मी माझ्या दोन्ही हातात घेतले…

या हातांवर आपोआप अश्रूंचा पाऊस झाला… आणि तिच्या चेहऱ्यावरच्या भेगाळलेल्या जमिनीवर, एक अंकुर उगवून आला…. “डॉक्टर फॉर बेगर्स… !!!”

माझी हि आजी… “लक्ष्मी” होऊन माझ्या पदरात आली… अक्षय विचारांचे धन देऊन मला श्रीमंत बनवून; अक्षय होऊन गेली… ! 

ती गेली तो दिवस होता “अक्षय तृतीया”…. हा योगायोग नक्कीच नव्हता… !!!

ती माझं पात्र… फुल्ल करून गेली… अक्षय्य करून गेली… ! 

आता चेंबलेलं का असेना… जुनं का असेना… फुटकळ का असेना… पण हेच “फुलपात्र”; मी रोज याचकांच्या चरणी रीतं करतो…

परतताना मात्र माझं हे पात्र तुम्ही सर्वजण पुन्हा Full करता… परत परत Full करता…

आणि Full झालेलं हे “फुलपात्र”; मी जपून ठेवतो, दरिद्री नारायणाची उद्याची पूजा मांडण्यासाठी… !!! 

आणि म्हणून आजचा हा लेखाजोखा आपल्या पायाशी सविनय सादर !

या महिन्यात झालेल्या कामाचा आढावा आता विस्तृत सांगत नाही… फक्त इतकंच सांगेन, या महिन्यात जे अंध, अपंग – विकलांग, भिक मागणारे लोक सापडले, अशांना हातगाडी, वजन काटे, कापडी पिशव्या विकायला देऊन, छोटे छोटे व्यवसाय काढून देऊन व्यवसायाचं एक साधन त्यांच्या चरणी अर्पण केलं आहे… हाच मी वाहिलेला नैवेद्य… ! 

भीक मागणाऱ्या पालकांची मुलं किंवा खुद्द भीक मागणारी मुलं, यांना एकत्र करून सॉक्स बुट आणि युनिफॉर्म पासून शाळा कॉलेजेच्या त्यांच्या फिया भरल्या आहेत. 15 जुलैला जेव्हा ही मुलं दप्तर – रेनकोट घेऊन शाळेत निघाली, त्यावेळी मला त्यांच्यात, आयुष्यातला “विठ्ठल” शोधायला निघालेला वारकरी दिसला…

इथेच झाली माझी वारी,

आणि म्हणून विठ्ठला मी आलोच नाही पंढरपुरी… !!

रस्त्यावरील याचकांना रस्त्यावरच वैद्यकीय सेवा दिल्या, रस्त्यावर जे जमत नाही अशा गंभीर रुग्णांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले.

आषाढी एकादशीला पंढरपुरात हातातले टाळ तिकडे दुमदुमत होते… मला इथे ते आजारी याचकांच्या धडधडणाऱ्या हृदयात ऐकायला आले… माझा स्तेथोस्कोप आज टाळ झाला… ! 

काय गंमत आहे पहा, “वि-ठ्ठ-ल” नाम स्मरण हे हृदयाशी निगडित आहे… शास्त्रोक्त पद्धतीने केलेल्या नामस्मरणास “विठ्ठल क्रिया” असं म्हटलं जातं.

पंढरीच्या राजा, आम्ही इथेच बसून रोज “विठ्ठल क्रिया” केली… ! 

“हात हे उगारण्यासाठी नाही… उभारण्यासाठी असतात… ” हे ज्या वृद्ध याचकांनी मला रस्त्यावर शिकवलं, मी त्यांनाच गुरु मानुन त्यांच्या चरणांवर नतमस्तक झालो… ! 

त्यांच्या विचारांच्या उजेडात, माझी प्रत्येक अंधारी रात्र मग “पौर्णिमा” झाली… !

आज खूप वर्षांनी विचार करतो…. भिकाऱ्यांच्या डॉक्टर /भिक्षेकर्‍यांचा डॉक्टर/डॉक्टर फॉर बेगर्स… याचं बीज नेमकं आहे कशात… ? 

खडकाळ जमिनीत सुद्धा तृण उगवतं… कुणीही बीज न रोवता बांधावर एखादं बाभळीचं / रानफुलाचं झाड उगवतं… याला ना खत लागत ना मशागत… तरीही ते फोफावतं… सावली देण्याची त्याची पात्रता नसेलही, पण शेळ्या मेंढ्यांचं खाद्य होण्यात ते धन्यता मानतं… !

*खडकाळ… भेगाळ का असेना…. पण माझी म्हातारीच माझी जमीन झाली… आणि माझं बीज इथेच अंकुरलं…*

माझ्याच म्हातारीच्या भाषेत सांगायचं तर; मला अफाट, पण खारट समुद्र व्हायचंच नाही… मला व्हायचंय एक छोटंसं, पण गोड पाण्याचं तळं… जिथं कोणाची तरी तहान भागेल… शेतकऱ्याचं बीज पिकेल… ! 

त्यावेळी माझ्या थेंबा थेंबाने गाणं म्हणावं…. बीज अंकुरे अंकुरे… !!!

– समाप्त –

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ बीज अंकुरे अंकुरे – भाग – १ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ बीज अंकुरे अंकुरे – भाग – १ ☆ डॉ अभिजीत सोनवणे

माझं सर्व बालपण सातारा जिल्ह्यातल्या म्हसवड नावाच्या छोट्याशा खेडेगावात आजीच्या सहवासात गेलं.

इथे घडलेल्या गमती – जमती, कथा – व्यथा आणि माझ्यावर झालेले भले – बुरे परिणाम; हे सर्व मी माझ्या पुस्तकात काहीही न लपवता मांडलं आहे.

माझ्या आजीचं नाव लक्ष्मीबाई… !

नावाप्रमाणेच ती होती. कपाळावर जुन्या रुपयाच्या कॉइन एवढं भलं मोठं कुंकू, नाकात बांगडीला लाजवेल एवढी मोठी नथ, काठापदराचं लुगडं घालून ती अशी चालायची; जसा राज घराण्यातला हत्ती निघाला आहे… ! म्हणायला अशिक्षित, पण व्यवहार चातुर्य PHD झालेल्या माणसाला लाजवेल असं…

तोंडानं फटकळ, पण मायेचा जिवंत झरा हृदयात घेऊन फिरायची… गावात जबरदस्त दरारा… ! 

एके दिवशी तिकडे तिचे वडील वारले आणि इकडे माझा जन्म झाला…

त्यावेळच्या भाबड्या कल्पनेनुसार, एका माऊलीने तिला सांगितले, ‘आगं लक्साबया… रडु नगो बाये, पांडुरंगाचे पोटी तुजा बापच जलमाला आलाय… !’ … पांडुरंग माझ्या वडिलांचे नाव… ! 

झालं, तेव्हापासून माझी आजी मला तिचा बापच समजायला लागली, आणि तेव्हापासून माझे विशेष लाड आणि कोड कौतुक सुरू झालं.

अख्खा गाव तिला मामी म्हणायचा, तिला घाबरायचा…. पण तिच्या प्रेमाने लाडावलेला मी तिला लहानपणी “ए लक्षे” म्हणून हाक मारायचो…. आजीचे वडील तिला याच नावानं हाक मारायचे, नातू पण त्याच नावाने हाक मारतो, म्हणजे खरोखरच आपला बापच नातवाच्या रूपाने जन्माला आला आहे, यावर आता शिक्कामोर्तब झालं… ! 

तिचा “बाप” असण्याचा, मग पुढे मी पुरेपूर फायदा घेतला.

करारी आणि कठोर बाई हि, परंतु कोणत्याही गरिबाच्या अडल्या नडल्या मदतीला ही सर्वात प्रथम पुढे येई.

सर्वांनाच हिच्याबद्दल आदरयुक्त भीती होती. गावातल्या श्रीमंतापासून ते गरिबातल्या गरीब घरापर्यंत कोणाच्याही घरात ती डायरेक्ट घुसायची… घरात जिथे उंच जागा सापडेल तिथे ती पायावर पाय टाकून बसायची…. आणि इकडे तिकडे पहात, पदराची दोन टोकं हाताच्या चिमटीत पकडत, स्वतःला वारा घालत, घरातल्या लोकांची हजामत करायची.

हतरून पांगरून आजुन काडली न्हाईत ? 

शेळ्याच्या लेंड्याच हित पडल्यात…

घरच नीट सारवलं न्हायी…

गाई म्हशीचं श्यान उचलायला का तुजा बा येणार हाय का ए… ? 

सुना म्हशीवानी खाऊन फुगल्यात…

ए टवळे डोक्याला त्याल लाव कि…. का तमाशात नाचायला जायचं हाय ? 

डोक्यावर पदुर घ्यायला तुज्या आईनं शिकावलं न्हाय का तुला, व्हय गं ए उंडगे… !

इतभर गजरा आणि गावभर नखरा…

……. तिची टकळी चालू असायची… तिच्या तावडीतून कुणीच सुटायचं नाही. येणारा जाणारा प्रत्येक जण तिची नजर चुकवून जायचा… ! 

यावेळी मी तिचा पदर धरून, डाव्या हाताने चड्डी सावरत शर्टाच्या उजव्या बाहीला शेंबूड पुसत सर्व काही पहात असे. चड्डी माझ्या मापाची मला कधीच मिळाली नाही.

‘ थोडी मोटी दे… वाडतं वय हाय… अजून मोटी दे…. हांग आशी… ‘ म्हणत दुकानदाराला माझ्या चड्डीची ऑर्डर आजीच द्यायची…

डावा हात हा फक्त चड्डी सांभाळण्यासाठी असतो आणि उजवा हात शेंबूड पुसण्यासाठी… त्या वयात हाताचे इतकेच उपयोग मला माहित होते.

तर सर्व उणीदुनी काढून झाल्यानंतर, पदरानं घाम पुसत, म्हातारी बिनदिक्कतपणे त्या घरात ऑर्डर सोडायची… ए टवळे, च्या टाक जरा मला… तुमाला आक्कल शिकवून दमले बया मी, तुमच्यापेक्षा गाडव बरं… वर तीच कांगावा करायची… ! 

चहा येईपर्यंत, माझी नाकाची फुरफुर चालूच असायची…

समद्या गावाचा शेंबूड तुलाच आलाय का काय मुडद्या ? असं म्हणत वैतागून उठत; ती मला दरा दरा ओढत घराबाहेर नेत, माझं नाक पदरात धरून असं शिंकरायची, की मृत्यु परवडला…. ! 

अजून थोडा जोर लावला असता, तर तीने माझा मेंदूच बाहेर काढला असता…

तुजं आसं हाय, शेंबूड आपल्या नाकाला, आन् रुमाल देतंय लोकाला… असं स्वतःशी पुटपुटत, मला कडेवर घेऊन ती परत घरात यायची.

यानंतर कान नसलेल्या, फुटक्या कपात, किंवा चार ठिकाणी चेंबलेल्या फुलपात्रात चहा यायचा. बऱ्याच वेळा जर्मन च्या “भगुल्यात” च्या यायचा… बशी नसली तर… आम्ही मग हा “च्या” गोल ताटात भरून भुरके मारत प्यायचो… आज जाणवतं, हा खऱ्या अर्थाने सोहळा होता… !!! 

….. आता कुठे आहे हे फुलपात्र ? ते जर्मनचं भांडं आणि तो कान नसलेला फुटका कप ??? 

 मी शोधतोय… ! आईच पत्र हरवलं… हा खेळ आम्ही लहानपणी खेळायचो, हे फुलपात्र… ते जर्मनचं भांडं आणि कान नसलेला फुटका कप सुद्धा तसाच हरवलाय… ! 

माणसं शिकत गेली आणि या जुन्या गोष्टी पुस्तकाच्या पानात दबून गेल्या… आठवण म्हणून ठेवलेल्या पिंपळाच्या जाळीदार पानासारख्या… ! 

आता या गोष्टी दिसतात फक्त जुन्या बाजाराच्या दुकानात… नाहीतर, चेहऱ्यावर सुरकुत्यांची जाळी घेऊन, अंताकडे वाटचाल करणाऱ्या म्हाताऱ्या माणसांच्या मनात… !!!

तर; बऱ्याच वेळा फुलपात्रातून किंवा फुटलेल्या कपातून, बशीत चहा सांडेस्तोवर दिला जायचा…

फुलपात्र आणि कप सोडून बशी सुद्धा चहानं भरलेली असायची… ! डाव्या हाताने चड्डी, उजव्या हाताने नाक सांभाळताना…. मला चहा प्यायलाच जमायचं नाही, मग माझी म्हातारी एक घोट स्वतः प्यायची, एक घोट मला पाजायची… ! हा चहा पिताना, माझ्या घशातून घुटुक घुटुक आवाज येत असावा… मला माहित नाही. पण यातही माझ्या आजीला कौतुक…

‘ बगा गं बायांनो, “माजा बाप” कसा घुटुक घुटुक च्या पितो, तुमाला दावते… ‘ म्हणत ती अजून चार फुलपात्रे नाक दाबून मला चहा पाजायची…

पुढे डोक्यावरून पाणी गेलं…

रडत खडत शिकलो…. त्यानंतर मोठ्या मुश्किलीने डॉक्टर झालो… पुढच्या खाचखळग्यातून वाटा काढत चालत राहिलो… आयुष्यातली सगळी पानीपते हरलो… तरीही पुढे कष्ट करून मनातला “विश्वासराव” जिवंत ठेवला… ! 

आयुष्याच्या एका टप्प्यावर आंतरराष्ट्रीय संस्थेत कामाला लागलो… आर्थिक स्थैर्य आलं. मग अनेक उच्चभ्रू लोकांशी / ऑफिसशी संपर्क येऊ लागला. सुरुवातीला… “खेड्यातनं आलंय येडं, आन भज्याला म्हनतंय पेडं…. ” अशी माझी अवस्था होती. खेड्यातला येडा मी…. तिथले मॅनर्स आणि एटिकेट्स शिकण्याचा प्रयत्न करू लागलो. चकचकीत आणि महागड्या कपांमध्ये चहा मिळू लागला… भल्या मोठ्या कपामध्ये / मगमध्ये सांडणार नाही, अशा पद्धतीने निम्माच चहा किंवा कॉफी असायची… ! 

पुढे मी सरावलो…

एकदा हि माझी खडूस म्हातारी… बऱ्याच वर्षांनी माझ्या घरी आली….

आंतरराष्ट्रीय संस्थेतील महाराष्ट्राचा प्रमुख मी….

तिला एका मोठ्या पांढऱ्या स्वच्छ कपामध्ये मी तिला चहा दिला…

कपाला सोन्याचीच वाटावी, अशी सोनेरी रंगाची नक्षी होती…

शिकलेले मॅनर्स सांभाळत, भल्या मोठ्या कपामध्ये; सांडणार नाही अशा पद्धतीने तिला निम्मा चहा दिला होता. विहिरीत वाकून बघावं, तसं तीनं कपात वाकून बघितलं… कपातला अर्धा चहा बघून ती खवळली…. तिच्या स्वभावानुसार ती बोलली…. ‘येवडासा च्या ? ल्हान पोरगं हेच्यापेक्षा जास्त मुततंय… तू कंनच्या कंपनीत काम करतूय रं… ? सायबाला म्हणावं पाच धा रुपय पगार जास्त दे… घरात आलेल्या पावण्यांना कप भरून च्या पाजू दे… !’

पाच लाख रुपये दरमहा कमावणाऱ्या माझ्यासारख्या माणसाच्या तोंडात माझ्याच म्हातारीने सणसणीत चपराक हाणली. मलाही राग आला, गावाकडे चेंबलेल्या फुलपात्रात आणि फुटक्या कपात च्या पिणारी माजी म्हातारी, आज इतक्या मोठ्या, सुंदर सोनेरी नक्षीच्या कपात चहा पीत आहे, नातवाचं हिला काहीच कौतुक नाही… ??? मी तिला हे बोलून दाखवलं.

यावर जोरदार पलटवार करत म्हातारी म्हणाली, ‘ गप ए शेंबड्या… तूजा कप किती छोटा हाय, का मोटा हाय…. त्याला सोन्याची का चांदीची नक्षी हाय, त्याला किंमत नसती… या कपातून तू काय देतू, किती देतू, कोनच्या भावनेनं देतू त्याला जास्त किंमत आसती… !’ 

आंतरराष्ट्रीय संस्थेमध्ये दरवर्षी “मॅनेजमेंट” या विषयावर किमान चार सेमिनार असतात… असे मागील दहा वर्षात मिळून मी 40 सेमिनार अटेंड केले असतील… तू काय देतो, किती देतो, कोणत्या भावनेनं देतो त्याला जास्त किंमत असते… ! सेमिनार मध्ये किती कळलं मला माहित नाही… पण माझ्या म्हातारीने दोन मिनिटात मॅनेजमेंटचं सर्व सार सांगितलं… ! हातातला कप माझ्या हातातच राहिला… तिच्याकडे भारावून मी पाहत राहिलो… “कपावरची” सोनेरी नक्षी आता तिच्या “कपाळावर” उमटलेली मला भासली… !!! 

गोष्ट तशी छोटी पण लाखमोलाची… !!!

— क्रमशः भाग पहिला   

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी जडणघडण… भाग – ९ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ माझी जडणघडण… भाग – ९ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(सौजन्य : न्यूज स्टोरी टुडे, संपर्क : ९८६९४८४८००)

कुमुदताई

आम्ही राहत असलेल्या गल्लीत शिरतानाच उजवीकडे एक खूप मोठा ओटा सदृश मोकळा चौथरा होता ज्यास आम्ही “घटाणा” असे म्हणत असू. हा घटाणा म्हणजे एक प्रकारचे गल्लीतले ‘ॲम्फीथिएटरच” होते. तिथे नाना प्रकारचे पारंपरिक, लोककलेचे आणि लोक कलाकारांचे कार्यक्रम विनामूल्य चालत. जसे की डोंबाऱ्याचा खेळ, मदारी, माकडांचा खेळ, डब्यातला सिनेमा, टोपलीतले नाग नागिण, पोतराज आणि असे कितीतरी. त्यातल्या सगुणा, भागुबाई, गंगुबाई, अक्का, माई, जंगल्या, आण्णा, आप्पा अशी नाना प्रकारची पात्रे आजही आठवली तरी सहज हसू येते. डोंबारीचा खेळ पाहताना हातात काठी घेऊन दोरीवर चालणारी ती लहान मुलगी पाहताना छाती दडपून जायची. पुढे आयुष्यात केलेल्या अनेक लाक्षणिक कसरतींचा संदर्भ या लहानपणी पाहिलेल्या खेळांशीही जोडला गेला ते निराळे पण आम्हा मुलांसाठी घटाण्यावरचे खेळ म्हणजे एक मोठे मनोरंजन होते. या पथनाट्यांमुळे आमचे बालपण रम्य झाले.

एक चांगलं लक्षात आहे की या खेळांव्यतिरिक्त मात्र आम्हा मुलांना त्या घटाण्यावर जाण्याची परवानगी नसायची कारण त्या घटाण्याच्या मागच्या बाजूला ट्रान्सजेंडर लोकांची वस्ती होती. ती चेहऱ्यावर रंग चढवलेली स्त्री वेशातील पुरुषी माणसे, त्यांचं टाळ्या वाजवत, कंबर लचकवत सैरभैर चालणं, दोरीवर वाळत घातलेले त्यांचे कपडे पाहताना विचित्र असं भयही जाणवायचं. कधीकधी घटाण्यावर रात्रीच्या वेळी ढोल वाजवत गायलेली त्यांची भसाड्या सूरातील गाणी ऐकू यायची. त्या गाण्यात अजिबात श्रवणीयता अथवा गोडवा नसायचा. आज विचार करताना वाटतं, त्यांच्या जीवनातील भेसूरता ते अशा सूरांतून व्यक्त करत असावेत.

पण तरीही मनात प्रश्न असायचे. ही माणसं अशी कशी? ही वेगळी का? यांचे आई वडील कोण? यांची वस्ती हेच यांचं कुटुंब का? या प्रश्नांची उत्तरे त्यावेळी कधीच मिळाली नाहीत पण आजही त्यावेळी उत्तर न मिळालेले अनेक प्रश्न मनात आहेतच.

एकदा बोलता बोलता जीजी म्हणजे माझी आजी म्हणाली,
”मालु गरोदर असली आणि मी घरात नसले की शेजारची काकी बिब्बा मागायला यायची. मालु भोळसट. ती काकीला द्यायची बिब्बा. ”

बिब्बा नावाचं एक काळं, औषधी, सुपारी सारखं ‘बी’ असतं जे स्नायूंच्या दुखण्यावर उपयोगी ठरतं. हे बिब्बे वगैरे विकणाऱ्या बाया “बुरगुंडा झाला बाई बुरगुंडा झाला” अशाप्रकारे काहीतरी गाणी गात सुया, मणी, बिब्बे वगैरे विकत.
जीजी पुढे सांगायची, ”म्हणून तुझ्या आईला तुम्ही पाच मुलीच झालात. ”

मालु — मालती हे माझ्या आईचं नाव. मला जीजीचं हे बोलणं अजिबात आवडलं नाही. मी तिला लगेच म्हटलं, “आम्ही मुली म्हणून तुला आवडत नाही का ?”
तेव्हा मात्र जीजी फार खवळली आणि तिने माझे जोरात गालगुच्चे घेतले पण मग दुसऱ्या क्षणी प्रेमाने जवळ घेऊन म्हणाली, ” नाही ग ! तुम्ही तर माझे पाच पांडव. ”

पण माझ्या मनात जे उत्तर न मिळालेले अनेक प्रश्न आहेत त्यापैकीचा एक प्रश्न कुमुदताई या आकर्षक व्यक्तिमत्वाभोवती गुंतलेला आहे. घटाणा ओलांडून गल्लीतून बाहेर पडताना उजवीकडे एका जराशा उंच प्लिंथवर दोन बैठी पण वेगवेगळी घरे होती. एक समोरची खोली आणि आत एक स्वयंपाक घर. एक खिडकी हॉलची आणि एक खिडकी स्वयंपाकघराची. परसदारी दोन्ही घरांसाठी वेगवेगळी स्वच्छतागृहे होती आणि पुढे मागे थोडा मोकळा परिसर होता. त्यातल्या एका घरात लैला आणि कासिमभाई हे बोहरी दाम्पत्य आपल्या इबू आणि रफिक या लहान मुलांसोबत राहत आणि दुसऱ्या घरात चव्हाणकाका आणि कुमुदताई हे नवविवाहित दांपत्य राहत असे. अतिशय आकर्षक असे हे दांपत्य. दोघेही गौरवर्णीय, उंच आणि ताठ चालणारे. त्यांच्याकडे पाहता क्षणी जाणवायचं की धोबी गल्ली परिसरातल्या जीवनशैलीशी न जुळणारं असं हे दाम्पत्य आहे. त्यांचा क्लासच वेगळा वाटायचा. चव्हाणकाका हे उत्तम वकील होते. अर्थात ते नंतर कळलं जेव्हा ते आमचे चव्हाणकाका झाले आणि त्यांच्या पत्नी आमच्यासाठी कुमुदताई झाल्या. आम्हा मुलांना नसेल जाणवलं पण ते नवविवाहित दांपत्य असलं तरी ते प्रौढ होते पण महत्त्वाचे हे होतं की सुरुवातीला काहीसे निराळे, वेगळ्या क्लासमधले ते वाटले तरी तसे ते असूनही खूपच मनमिळाऊ, हसरे आनंदी आणि खेळकर होते. आमच्याशी त्यांचे सूर फारच चटकन आणि छान जुळले. दोघांनाही लहान मुले फार आवडायची. शेजारच्या बोहरी कुटुंबातल्या रफिक आणि इबु वर तर ते जीवापाड प्रेम करत आणि कुमुदताई आम्हा मुलांना तर प्रचंड आवडायच्या.

मी प्रथम त्यांच्याशी कधी बोलले ती आठवण माझ्या मनात आजही काहीशी धूसरपणे आहे. मी आणि माझी मैत्रीण त्यांच्या घरावरून जात होतो. जाता जाता कुतुहल म्हणून त्यांच्या घरात डोकावत होतो. तेवढ्यात त्यांनीच मला खुणेने बोलावलं. खरं सांगू तेव्हा मला इतका आनंद झाला होता! कारण मला त्यांच्याशी नेहमीच बोलावसं वाटायचं पण भीडही वाटायची. आता तर काय त्यांनी स्वतःहूनच हाक मारली होती मला. मी धावतच गेले.
“तुझा फ्रॉक किती सुंदर आहे ग !”
हे त्यांच्याशी झालेल्या संभाषणातलं पहिलं वाक्य. मग मी फुशारकीत सांगितलं,
“माझ्या आईने शिवलाय माझा फ्रॉक. ”
“अरे वा ! तुझी आई कलाकारच असली पाहिजे. ”
“होयच मुळी. ”
आणि मग त्या दिवसांपासून कुमुदताईंची आणि आमची घट्ट मैत्री झाली.

उठसूठ आम्ही त्यांच्याच घरी. रविवारच्या सुट्टीत तर आम्हा सवंगड्यांचा त्यांच्याकडे अड्डाच असायचा. त्यांच्याबरोबर आम्ही खूप पत्ते खेळायचो. पत्त्यातले अनेक डाव. पाच तीन दोन, बदामसत्ती, नॉट ॲट होम, लॅडीस, झब्बू, ३०४ वगैरे. आम्ही आमच्या वयातलं अंतर कधीच पार केलं होतं शिवाय नुसतेच खेळ नसायचे बरं का. कुमुदताई उत्कृष्ट पाककौशल्य असणार्‍या गृहिणी होत्या. खेळासोबत कधीकधी कांदाभजी, सोडे किंवा अंडे घालून केलेले पोहे, वालाची खिचडी असा बहारदार चविष्ट मेनूही असायचा.

माझी धाकटी बहीण छुंदा त्यांना फार आवडायची. ती सुंदर म्हणून तिला चव्हाणकाका लाडाने “प्रियदर्शनी” म्हणायचे. त्यांचंही आमच्या घरी जाणं-येणं होतं. चव्हाणकाकांचं आणि पप्पांच अनेक विषयांवर चर्चासत्र चालायचं आणि “कुमुदताई” माझ्या आईची खूप छान मैत्रीण झाल्या होत्या. अर्थात यातही मैत्रीचं पहिलं पाऊल त्यांचंच होतं. आईकडून आणि जिजी कडूनही शिवणकामातल्या अनेक कौशल्याच्या गोष्टी अगदी आत्मीयतेने त्यांनी शिकून घेतल्या. आईने त्यांना कितीतरी पारंपारिक पदार्थही शिकवले. जसे कुमुदताईंकडून आमच्याकडे डबे यायचे तसेच आमच्याकडूनही त्यांना डबे जात. मग एकमेकींनी बनवलेल्या पदार्थांची चर्चाही घडे.

कुठल्याही अडचणीच्या वेळी कुमुद ताई आईची मदत घेत आणि हे दोन्हीकडून होतं. आम्हा मुलांना तर त्यांच्यासाठी काहीही करायला आवडायचे. त्या एकट्या असल्या तर अभ्यासाची वह्या पुस्तके घेऊन आम्ही त्यांना सोबत करायचो. असं खूपच छान नातं होतं आमचं. त्यांच्याबरोबर गाणी ऐकली, सिनेमे पाहिले. कितीतरी वेळा— बालमन कधी दुभंगलं तर त्यांच्यापुढेच उघडं केलं आणि त्यांनी आमच्या डोळ्यातलं पाणी वेळोवेळी टिपलं.

मग नक्की काय झालं ?
कुमुदताई गर्भवती झाल्या, चव्हाण काका आणि कुमुदताईंना ‘बाळ’ होणार म्हणून खरं म्हणजे सारी गल्लीच आनंदली. दुसऱ्यांच्या मुलांवर जीवापाड प्रेम करणारं, मुलांमध्ये रमणारं हे जोडपं आता स्वतः “आई-बाबा’ होणार ही केवढी तरी आनंदाचीच गोष्ट होती पण कळत नकळत का होईना जाणवायला लागलं होतं ते पडत चाललेलं अंतर, त्यांच्या वागण्या बोलण्यातला अधोरेखित फरक. बालमन बारकावे टिपण्याइतकं परिपक्व नसतं पण कुठेतरी आत संवेदनशील नक्कीच असतं.

आजकाल रोज येणाऱ्या कुमुदताई आमच्याकडे येईनाशाच झाल्या होत्या. अत्यंत तुटकपणे बोलायच्या. नंतर तर बोलणंही संपलं. गल्लीतल्या बाकीच्यांशी मात्र त्यांचं काही बिनसलं नव्हतं.

प्रश्नांची खरी उत्तरं फक्त “जीजी” कडे मिळायची. जीजी आपणहूनच म्हणाली एक दिवस, “ तुझ्या कुमुदताईंना विसर आता. आता नाही येणार त्या आपल्याकडे. ”
“पण का ?”
माझे डोळे तुडुंब भरले होते. कुमुदताईंसारख्या आवडत्या व्यक्तीला तोडणे कसे शक्य होते ?
“त्यांना भीती वाटते की तुझ्या आईचा चेहरा त्यांनी पाहिला तर त्यांनाही मुलगीच होईल. त्यांना मुलगी नको मुलगा हवाय. ”

हा मला बसलेला ‘मुलगी’ विषयीचा अनादर दाखवणारा एक प्रचंड धक्का होता. त्या क्षणी मी माझ्या आईला घट्ट मिठी मारली आणि तेव्हा एकच जाणवलं, ”माझ्यासाठी या जगात माझ्या आई इतकी महान व्यक्ती दुसरी कुणीच नव्हती. एक वेळ मी परमेश्वराची आरती करणार नाही पण माझ्या आईची महती गाणारी आरती जन्मभर करेन.”

आई आणि जीजीमध्ये सासू—सून नात्यातले वाद असतील पण अशा कितीतरी भावनिक, संवेदनशील संघर्षामय क्षणांच्या वेळी जीजी आईमागे भक्कमपणे उभी असायची.

शेतात उंचावर बसवलेल्या बुजगावण्यासारखं माझ्या मनातलं कुमुदताईंचं स्थान एकाएकी कोसळलं आणि रात्रीच्या भसाड्या आवाजातल्या ट्रान्स जेंडरांचं गाणं अधिक भेसूर वाटलं.

त्यानंतर चव्हाणकाका आणि कुमुदताईंनी घरही बदललं. ठाण्यातल्याच “चरई’ सारख्या प्रतिष्ठित भागात त्यांनी स्वतःचं मोठं घर घेतलं. चव्हाणकाकांची वकिली जोरात चालू होती. ठाण्यातील नामांकित वकील म्हणून त्यांची ओळख निर्माण होत होती. घटाण्या समोरची त्यांच्या घराची खिडकी कायमची बंद झाली आणि आमच्यासाठीही तो विषय तिथेच संपला.

आमच्याही आयुष्यात नंतर खूप बदल झाले. आम्ही मोठ्या झालो. भविष्याच्या वाटेवर आम्हा बहिणींची— आई वडील आणि आजीच्या प्रेम आणि मार्गदर्शनाखाली आयुष्ये फुलत होती. ’ मुलगा नसला तरी.. ’ हे वाक्य सतत कानावर पडत राहिलं तरीही कधी कधी ते चांगल्या शब्दांबरोबरही गुंफलेलं असायचं. “मुलगा नसला तरी ढग्यांच्या मुली टॅलेंटेड आहेत. ढग्यांचे नाव त्या नक्कीच राखतील. ” तेव्हा त्या व्यक्तिंबद्दल “ही माणसं आपल्या विचारांची” असंही काहीसं वाटायचं.

अनपेक्षित पणे एक दिवस, ध्यानीमनी नसताना आमच्याकडे चव्हाणकाका आणि कुमुदताई आले. मध्ये बर्‍याच वर्षांचा काळ लोटला होता. काळाबरोबर काळाने दिलेले घावही बोथट झाले होते. आमच्यावर लहानपणापासून झालेला एक संस्कार म्हणजे, “ झालं गेलं विसरून जावे, कोणाही विषयी विचार करताना केवळ त्यांच्या आनंदाचा, सुखाचा, अथवा त्यांच्याच भूमिकेतून विचार करावा. कुठलाही आकस मनात ठेवून टोकाची प्रतिक्रिया कधीही देऊ. नये. ”

कुमुदताईंना तीन मुली झाल्या. सुंदर गुणी, त्यांच्यासारख्याच आकर्षक. मुलगा झाला नाही. तिसऱ्या मुलीच्या जन्मानंतर चव्हाण दांपत्य पेढे आणि बर्फी दोन्ही घेऊन आमच्याकडे त्या दिवशी आले होते.
कुमुदताईंनी माझ्या आईला घट्ट मिठी मारली. एक अबोल पण अर्थपूर्ण मीठी होती ती! एका वैचारिक चुकीची जणू काही कबुलीच होती ती. त्यानंतर कृष्णमेघ ओसरले. आकाश मोकळे झाले.

आज प्रातिनिधिक स्वरूपात विचार केला तर वाटते यात ‘कुमुदताईंना’ दोष देण्यात काय अर्थ आहे? सामाजिक वैचारिकतेचा हा पगडा असतो. अजून तरी समाज पूर्णपणे बदलला आहे का ?

—- क्रमशः भाग ९ 

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ कृष्णा… ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

??

☆ कृष्णा… ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

(दहीकाल्याच्या निमित्ताने…)

कृष्णा, बंदी वासातून स्वातंत्र्याकडे तुझी वाटचाल काल रात्रीपासून सुरू झाली! कंसाच्या बंदीवासात देवकीच्या पोटी जन्माला येताच, दुसऱ्या क्षणी तुला तिथून स्थलांतर करावे लागले! विष्णू अवतारातील एक म्हणून पृथ्वीवर जन्माला आल्याबरोबरच तुला इथले मानवी जीवनाचे वनवास भोगावे लागले, आणि गोकुळात जाऊन तू साधा गोपाल म्हणून जगलास! इतर गोकुळ वासी मित्रांबरोबर तुझे खेळ रंगले पण ते करता करता तू किती राक्षसांचे पारिपत्य केलेस आणि दृष्टांच्या निर्दालनासाठी असलेला तुझा मानवी अवतार कार्यरत झाला! गरीब बिचाऱ्या गोपांना घरचे दूध, दही, लोणी मिळत नाही म्हणून गोपींची मडकी फोडलीस, सर्वांसोबत त्यांच्या दही काल्यात रंगून गेलास आणि समाजवादाचा एक धडा शिकवलास! जे आहे ते सर्वांनी वाटून घ्यायचं! थोडा मोठा झाल्यावर सांदिपनी ऋषींच्या आश्रमात शिकण्यासाठी गेलास! तेथे गरीब सुदाम्याशी मैत्रीचे बंध ठेवून पुढील काळात त्याचा उद्धार केलास! किशोरावस्था संपून मोठा झालास आणि कंसाचा वध करून मथुरेचे राज्य मिळवलेस!

तारुण्य सुलभ भावने ने स्वयंवरासाठी गेलास, तुला द्रौपदीची आस होती का ?की पुढे काय घडणार याचे दृश्य रूप  तुला दिसले होते ?त्यामुळे पांडवांच्या पदरी द्रौपदी देऊन तू तिचा “सखा” बनलास! दुर्गा भागवत म्हणतात की, मित्र या नात्याला “सखा” हे रूप देऊन स्त्री-पुरुषातील हे नाते तू अधिक उदात्त केलेस! आयुष्यभर पांडवांची साथ देत कौरव- पांडव युद्धात तू अर्जुनाचा सारथी बनून कुरुक्षेत्रावर उतरलास, योद्धा म्हणून नाही तर सारथी बनून!एक सहज विचार मनात आला, द्रौपदीने कर्णाला ‘सूतपुत्र’ म्हणून नाकारले,! सारथ्य करणारा माणूस समाजात खालच्या स्तरावर असतो हे तिने दाखवून दिले, पण शेवटी युद्धात तू सारथी  बनून जी पांडवांना मदत केलीस त्यातून तू सारथी हा सुद्धा किती महत्त्वाचा असतो हे द्रौपदीला दाखवून दिलंस का? तुझं सगळं अस्तित्वच देवरूप आणि मानव रूप यांच्या सीमेवर होतं! जन्म घेतलास त्यात तू त्याच रंगात रंगून गेलास! मगध देशाच्या लढायांना कंटाळून तू गोकुळ, मथुरा सोडून द्वारकेला पळून गेलास आणि स्वतंत्र राज्य स्थापन केलं म्हणून तुला ‘रणछोडदास’ नाव मिळालं! वेगवेगळ्या राज्यातील राजकन्यांशी विवाह करून तू साऱ्या भरत खंडाला एकत्र आणण्याचा प्रयत्न केलास! आणि अवतार कार्य समाप्त करताना एका भिल्ला च्या हातून तुझ्या तळपायाला बाण लागून तुझे जीवन कार्य संपवलेस! कृष्णा,

तुझे नाव घेतले की आपोआपच गुणदोषातून मुक्ती मिळते असं वाटतं! कारण आपण काहीही घडलं तरी “कृष्णार्पण” असा शब्द वापरून ते संपवतो. सगळं हलाहल जणू संपून जातं तुझ्या स्मरणात!

तुझा जन्म काळ मध्यरात्री येतो, तेव्हाही आम्ही वाजत गाजत तुझा जन्मोत्सव साजरा करतो. कारण अंधाराची रात्र संपून तुझ्या जन्माने उत्साहाचा आणि कर्तृत्वाचा जन्म होणार असतो. आजचा गोपाळकाला म्हणजे उत्साही कामाची सुरुवात! पावसाच्या सरींबरोबरच पुढील वर्ष आनंदात जाऊ दे हीच इच्छा आपण प्रकट करतो . चार वर्षांपूर्वी आधुनिकतेच्या नावाखाली कृष्ण किंवा परमेश्वराचे अस्तित्व न मानणारे “कोरोना” पुढे शरणागत झाले होते .तेव्हा माणसाच्या लक्षात आले की विज्ञानाने  कितीही मात केली तरी एक “हातचा “तुझ्याकडे, परमात्म्याकडे आहे हे मात्र आपण मान्य केले पाहिजे!

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ प्रिय कृष्णा… ☆ सुश्री राजसी जान्हवी संदीप सुंकले ☆

? मनमंजुषेतून ?

☆ प्रिय कृष्णा… ☆ सुश्री राजसी जान्हवी संदीप सुंकले 

“ प्रिय कृष्णा, आज जन्मदिन ना तुझा? खूप आनंदी असशील ना मग? “

“ नाही…. “

“.. का रे? तुझ्या सगळ्या भक्तांनी status ला फोटो टाकला नाही का तुझा? “

“ हो ठेवलं होत ना status त्यांनी. ”

“ मग? दहीहंडी फोडली नाही का त्यांनी? “

“ हो, ते ही केलं… “

“ अरे मग? अच्छा, लवकर आटपला का त्यांनी कार्यक्रम? खूप वेळ नाचले नाही का ते तुझ्यासाठी trending गाण्यांवर? “

“ हो. झालं ते ही करून झालं की …”

“मग? तरी तू का खूष नाहीस? नैवेद्य ( भोग ) आवडला नाही का? तरीही मी आईला सांगत होते की जरा बाहेरून मागव काहीतरी स्पेशल. कृष्ण पण तेच तेच खाऊन कंटाळत असेलच की, पण नाही. ऐकेल ती आई कुठली ? एक काम करते, तुझ्यासाठी काहीतरी स्पेशल ऑर्डर करते. ” 

“अगं कशाला ? नको ग.. एवढं सगळं तरी कशाला करायचं आता तुम्ही माझ्यासाठी…. जो काही माझ्या जन्मदिनाचा इव्हेंट करून ठेवला आहात ना तुम्ही, त्यानेच पोट भरलं माझं….. दमला असाल ना तुम्ही माझ्या नावाचं निमित्त करून हा “ इव्हेंट “ एंजॉय करता करता…. मग आता तुमच्यासाठीच ऑर्डर करा…. स्पेशल काहीतरी… खरंतर तेही एव्हाना झालंच असेल म्हणा… असो.. सुखी रहा.. “ 

© सुश्री राजसी जान्हवी संदीप सुंकले 

मो 9028438769

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी जडणघडण… भाग – ८ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ माझी जडणघडण… भाग – ८ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(सौजन्य : न्यूज स्टोरी टूडे – संपर्क क्र. ९८६९४८४८०० )

(काही तांत्रिक कारणामुळे ” माझी जडणघडण ” या लेखमालिकेचा भाग आठवा दि. २७/८/२४ रोजी प्रकाशित होऊ शकला नाही, तो आजच्या अंकात प्रकाशित करत आहोत. वाचकांनी कृपया नोंद घ्यावी.)

 आनंद
आमच्या घरासमोर “गजाची चाळ” होती. वास्तविक चाळ म्हटल्यावर जे चित्र डोळ्यासमोर येते तशी ती चाळ नव्हती. एक मजली इमारत होती आणि वरच्या मजल्यावर गजा आणि दोन कुटुंबे आणि खालच्या मजल्यावर तीन कुटुंबे राहत होती. पण तरीही गल्लीत ती “गजाची चाळ” म्हणूनच संबोधल्या जात असे. गजा मालक म्हणून तो राहत असलेला घराचा भाग जरा ऐसपैस होता. वास्तविक गल्लीतल्या कुठल्याच घराला (आमच्याही) वास्तू कलेचे नियमबद्ध आराखडे नव्हतेच त्यावेळी. कुठेही कशाही लांब अरुंद खोल्या एकमेकांना जोडल्या की झाले घर. पण अशा घरातही अनेकांची जीवने फुलली हे महत्त्वाचे.

गजाच्या घरात त्याची आई आणि त्याच्या लांबच्या नात्यातील बहिण “शकू” राहायचे आणि येऊन जाऊन बरीच माणसं असायची तिथे. कधी कधी गजाचे वडीलही दिसायचे मात्र गजा आणि शकू या बहीण भावांच्या नात्याबद्दल मात्र बऱ्याच गूढात्मक चर्चा घडायच्या.

गजाकडे आम्हा मुलांचं फारसं जाणं-येणं नव्हतं, पण गजाच्या शेजारी राहणाऱ्या दिघ्यांच्या कुटुंबातला आनंद आमच्यात खेळायला यायचा. आनंद, दिवाकर, अरुणा आणि त्याचे आई वडील असा त्यांचा परिवार होता.

आनंदची आई भयंकर तापट होती आणि सदैव कातावलेली असायची. त्यामुळे आम्ही आनंदच्या घरी खेळायला कधीच जात नसू पण आनंद मात्र आमच्यात यायचा. आम्ही त्याला आंद्या म्हणायचो. पुढे तोच “आंद्या” “आनंद दिघे” नाव घेऊन शिवसेनेचा एक प्रमुख नेता म्हणून नावारूपास आला ते वेगळं. पण माझ्या मनातला “आनंद” मात्र त्यापूर्वीचा आहे.

बालवयात आम्हा साऱ्या मुलांना फक्त खेळणं माहीत होतं. भविष्याची चिंताच नव्हती. पुढे जाऊन कोण काय करेल, कसे नाव गाजवेल याचा विचारही मनात नव्हता आणि “आनंद” अशा रीतीने लोकनेता वगैरे होण्याइतपत मजल गाठेल असे तर स्वप्नातही वाटले नाही कारण साध्या साध्या खेळात सुद्धा तोच प्रथम आऊट व्हायचा आणि आऊट झाल्यावर कोणाच्यातरी घराच्या पायरीवर गालावर हात ठेवून, पाय जुळवून पुढचा खेळ पहात बसायचा तेव्हा तो अगदी “गरीब बिच्चारा” भासायचा.

आज हे लेखन करत असताना खूप आठवणी उचंबळत आहेत. “आनंदची” खूप आठवण येत आहे. पुन्हा लहान होऊन त्याच्याशी संवाद साधावासा वाटतोय. तो आता या जगातही नाही. मनात दाटलेल्या भावना पत्रातूनच व्यक्त कराव्यात का ? कदाचित पत्र लिहिताना क्षणभर तरी त्याच्याशी बोलल्यासारखे वाटेल म्हणून.

प्रिय आनंद,
स. न. वि. वि.
खरं म्हणजे मला, तुला पत्र लिहिताना “सनविवि” वगैरे ठरलेले मायने नव्हते घालायचे. कारण त्यामुळे आपल्या मैत्रीच्या नात्यात उगीचच औपचारिकपणा जाणवतो. आपल्या मैत्रीत आपलं निरागस, आनंदी, खेळकर बाल्य अशा पारंपरिक शब्दांनी उगीचच बेचव होतं. आणि मला ते नको आहे.
मी तुझा बायोपिक पाहिला. आवडला. तुझ्या भूमिकेतल्या त्या नटाने सुरेख अभिनयही केलाय. संहिता लेखन छान. तुझ्या राजकीय आणि सामाजिक जीवनावर वास्तववादी प्रकाश पाडलाय. पण चित्रपट बघताना मला मात्र, ’टेंभी नाका, धोबी गल्ली ठाणे’ इथला अर्ध्या, खाकी चड्डीतला, मळकट पांढर्‍या शर्टातला मितभाषी, काहीसा शेमळट, भित्रा, गरीब स्वभावाचा पण एक चांगल्या मनाचा आनंद नव्हे आंद्या आठवत होता. जो माझा बालमित्र होता. तो मात्र मला या चित्रपटात सापडला नाही. आणि मग माझं मलाच हंसू आलं अन् वाटलं तो कसा सापडेल ? इथे आहे तो एक जनमानसातला प्रमुख राजकीय नेता आणि माझ्या मनातला आनंद होता तो माझ्याबरोबर, विटीदांडु खेळणारा, गोट्या, डबा ऐसपैस, थप्पा, लगोरी खेळणारा आनंद.. आईची रागाने मारलेली हाक ऐकली की खेळ अर्धवट सोडून पटकन घाबरत, धावत घरी जाणारा आनंद. लहान भाऊ, बहिणीला सांभाळणारा आनंद.
एकदा मी तुला विचारलं होतं “तू आईला इतका कां घाबरतोस ?”
तू एव्हढंच म्हणाला होतास, “मला तिला आनंदी ठेवायचे आहे.. ”
आनंद, तुझ्या नावात आनंद होता पण तू कुठेतरी अस्वस्थ, खिन्न होतास का ? लहानपणी कळत नव्हते रे या भावनांचे खेळ.
एक साधं गणित मी तुला सोडवून दिलं होतं आणि तुझी खिल्लीही उडवली होती.
“काय रे ! इतकं साधं गणित तुला जमलं नाही ? इतका कसा ढब्बु ?” तू वह्या पुस्तकं घेऊन फक्त निघून गेलास.
पण नंतर तू किती मोठी राजकीय गणितं सोडविलीस रे..
पुढच्या काळात तुझ्याविषयीच्या पेपरात येणार्‍या बातम्या, फोटो. लोकप्रियता वाचून मी थक्क व्हायची. अरे ! हाच का तो आनंद ? मी कधी विश्वासच ठेऊ शकले नाही.
मी माहेरी ठाण्याला असताना एक दोनदा तुला भेटलेही होते. पण तू घोळक्यात होता. माझा बालमित्र आनंद, तो हा नव्हता. वाईट वाटले मला.
पेपरात जेव्हां तुझ्या निधनाची बातमी वाचली, उलट सुलट चर्चाही वाचल्या. एका राजकीय नेत्याचे ते निधन होते. पण माझ्यासाठी फक्त माझ्या बालमित्राचे या जगात नसणे होते हे तुला कसे कळावे आणि त्यासाठी माझ्या डोळ्यात अश्रू होते.
चित्रपट बघून मी घरी आले. मैत्रीणीचा फोन आला.
“कसा वाटला मुव्ही ?”
“छानच”
अग ! आनंद आमच्या धोबी गल्लीत आमच्या घरासमोर रहायचा…
पण हे काही मी नाही सांगितले तिला.
कारण आपलं वेगळं नातं मी मनात जपलंय. उगीच एका राजकीय नेत्याशी असलेल्या नात्याचं मला मुळीच भांडवल करायचं नव्हतं आणि नाही. माझ्यासाठी फक्त ढब्बु आंद्या. कसं असतं ना लहानपण ? मुक्तपणे एकमेकांशी भांडणे, वाट्टेल ती नावे ठेवणे, टिंगलटवाळी करणे आणि तरीही मैत्रीच्या नात्यात कधीही न येणारी बाधा.. म्हणून का ते रम्य बालपण ?
पण आनंद मला मनापासून तुझा अभिमान आहे. तुझ्या बालवयातल्या प्रतिमेसकट.

तुझी
बालमैत्रीण.

माझं पत्र वाचून तुला नक्की काय वाटेल याचा विचार करत असताना मला आताही “गजाची चाळ” आठवते.
काही वर्षांपूर्वी बदललेल्या धोबी गल्लीत गेले होते तेव्हा “गजाच्या चाळीचा” चेहराच बदलला होता. त्या संपूर्ण इमारतीचं शिवसेनेच्या कार्यालयात रुपांतर झालं होतं. त्या कपाळावर गंध, दाढीधारी प्रतिमेत लपलेला आनंदचा चेहरा मी शोधत राहिले…

क्रमश: भाग आठवा.

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मी घर आवरत्येय… मोकळी होत्येय की गुंतत्येय !!!!! ☆ डॉ. माधुरी जोशी ☆

डॉ. माधुरी जोशी

? मनमंजुषेतून ?

मी घर आवरत्येय… मोकळी होत्येय की गुंतत्येय !!!!! डॉ. माधुरी जोशी 

अखेर सह्या झाल्या. बिल्डिंग री डेव्हलपमेंटला गेल्याचं शिक्कामोर्तब झालं…. थोडा अवधी होता हातात… नवीन जागा मिळण्याचा भविष्यातला आनंद खुणावत होता…. आणि या भिंती मधला सारा भूतकाळ सतत सामोरा येत होता… आता चमचा नॅपकिन्स पासून कागदपत्रांपर्यंत किती आणि काय काय आवरायचं होतं. मनात ही वास्तू, आणि काही वस्तू सोडून जायची हलकीशी वेदना होती… पण घर आवरायलाच हवं होतं आणि खरं म्हणजे मनही!!! कामाला लागले आणि लक्षात यायला लागलं आवरणं कमी होतंय आणि आठवणींच्या साम्राज्यात गुंतणंच वाढतंय…

किती खोलवर रुजलेल्या, रुतलेल्या स्मृती.. एकेक आठवणींचं गाठोडं…. समोर आलेली फोटोंची पिशवी तर मनाला सगळ्यात जीवंत करणारी… सणवार, वाढदिवस, लग्नकार्य, ट्रीप्स, बक्षिस समारंभ, ट्रॉफ्या, एअरपोर्टवर मुलांना शिक्षणासाठी जातांना भरल्या डोळ्यांनी हासत दिलेले निरोप, दृष्टी आड, काळाच्या पडद्याआड झालेले वडीलधारे, कुणी सोबती, कुणी अगदी क्वचित भेटलेले तरी जवळचे, वाड्यातले, किती किती आठवणी…

तर काही कागदावर पेनानं उमटलेली अक्षरं, मनातल्या विचारांना सजवणारी… सुख दुःखाची, यशापयशाची, मन मोकळं करणारी…. कधी वर्तमानपत्रांनी दाद देऊन छापलेली, काही कविता, कार्यक्रमाची निवेदनं, त्यावरंच कुठल्याशा कोपऱ्यात लिहीलेले पत्ते, फोन नंबर्स…. चाललं मन गुंतत….

आणि अभ्यास, नोट्स, नोंदी, फेअर वर्क…. माझं संगीतातलं, मुलांचं इंजिनिअरिंगचं, यांचं गड किल्ल्यांचं… सुटत चाललेले, पिवळे पडलेले, क्वचित तुकडे पडणारे…. किती किती जुने कागद…. खूप दिवसात सापडंत नव्हतं ‘ ते ‘ पुस्तक…. कशात तरी दडलेलं. आनंदाच्या भरात तेच चाळलं… गुंतलं वेडं मन… अचानक सामोऱ्या येणाऱ्या जुन्या पावत्या… बिलं…. जगण्यातला इतक्या वर्षांचा आर्थिक आलेख मांडणाऱे… फोडायचंच राहिलेलं एखादं आहेराचं पाकिट आणि अमक्याकडून केंव्हातरी आलेला पण आज मिळालेला आहेर… आपलेच पैसे परत छुपा आनंद देणारे… मग ते पाकिट देणाऱ्यांच्या आठवणी… एखादी कपड्याखाली जपून ठेवलेली अन् आता चलनातंच नसलेली नोट…. चाललं… चाललं मन हिंडायला…. गंमत म्हणजे हे सारं आपल्या जागी होतंचकी.. निवांत, शांत पहुडलेलं…. या इथून निघण्यानी ते निघालं जागेवरून…. मोकळा श्वास घेतला कागदांनी…. स्मृती वगैरेंचे कागद परत आत गेले पाऊचमधे आणि सटरफटर गेले केराच्या टोपलीत… किती पसारा, , किती कागद, , किती काय जपलेलं, चुकून राहिलेलं, उगीच सांभाळलेलं…. आवरलं ते सगळं खरं पण मन मात्र आठवणींच्या गुंत्यात गुंतलेलं राहिलं….

इथून निघेपर्यंत स्वयंपाकघरात जेवणखाण बनणार होतं… ते शेवटी आवरू असं ठरवलं खरं…

पण रोज लागणाऱ्या भांड्यांपेक्षा किती तरी जास्त काही भांडी होतीच…. अनेक वर्ष जमवलेली. भांडी…. २५ लोक आले तरी घरात तयार असणारी वेळोवेळी घेऊन जमवलेली, हौसेची, आवडीची, मुलांची मुद्दाम नावं घालून घेतलेली, तर काही आहेरात आलेली, नावं नसलेली पण पदार्थ घालून शेजारपाजारची आलेली कन्फ्यूज्ड भांडी, मी जपून ठेवून मालक शोधणारी, काही तर बॉक्स मधूनही न निघालेली… कप, मग्ज्, न लागणाऱ्या बशा, दह्या दुधाचे सट, गंज, कल्हई लावलेली पितळी पातेली… लोखंडी तवे कढया पळ्या…. बापरे…. ४६ वर्षांचा पसारा…. सासुबाईंच्या वजनदार पितळी, स्टीलच्या भांड्यापासून अगदी निर्लेप तरीही हवाहवासा…. प्राणपणानी जपलेला, वाढवलेला पसारा… सारं सोबत होतं इतकी वर्षं….

पण आता मन आवरायला हवं होतं… मोजकं, गरजेचं, चांगलं, ठेवून मोकळं व्हायचं होतं… आणि मग भांडी निवडली…. गुंतलेल्या माझ्याच मनाविरुद्ध जणू लढंत राहिले….

मग असेच नातवंडांचे खेळ, कपडे, अगदी बॉक्स सुद्धा न उघडलेल्या गिफ्टस्,…. सगळं काढतांना मन अस्थिर… टाकणाऱ्या हाताला परत मागे खेचणारं… कधी आठवणींची कासाविशी कधी दुर्लक्ष झाल्याचा अपराधीपणा….

आवरणं कसलं…. मनाचं धावणं चारही दिशांना…. भूतकाळात.. कसं आवरायचं? आठवणींच्या गुंत्यातून कसं अलगद, न दुखावता सोडवायचं?यातलं काय ठेवावं? काय टाकावं? आता कुणाला दाखवायच्या आहेत त्या ट्रॉफ्या, सर्टीफिकेट्स, पत्र, लेख….. मुलं तर सगळ्यातून दूर… १००% प्रॅक्टीकल सल्ला देणारी…. नवीन पिढीच अशी… न गुंतणारी… स्पष्ट…..

आम्ही फार गुंतलोय का ? फारच भावनिक आहोत का?चुकलं का?

नाही नाही…. मन कबूल होत नाही…. कारण आम्ही आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर क्षण अन् क्षण जगलो…. जे, जसं, जेंव्हा, जेवढं मिळालं त्यात आनंदात राहिलो. म्हणून तर पुढे श्रीमंत सिल्क नेसलो तरी आईच्या मायेचा चिटातला फुलांचा फ्रॉक, खणाचं परकर पोलकं आजही मनाजवळ आहे…. मुलांच्या घरात बॉयलर आले तरी तांब्याच्या लालभडक बंबाच्या ठिणग्या आणि पत्र्याच्या बादलीतल्या वाफाळत्या पाण्याची ऊब सोबत आहे… मिक्सर आले तरी पाटावरवंट्याचं खसखशीत वाटंण चवीत आहे…. वस्तू नाहीत पण आठवणी घट्ट आहेत…. मन गुंतून राहिलंय आजवर…

बरं या आठवणींचं तरी असं आहे…. आज फ्रीज जवळ गेलं की क्षणात विसरायला होतं काय घ्यायला आलो होतो ते… पण त्याच मनात ५वी, ६वी मधल्या नाना वाड्यातल्या शाळेत काव्य गायनासाठी गायलेल्या कविता लख्खं स्मरणात आहेत. किती उतारे, नाटकातले संवाद, समुहगीतं, अभंग, भावगीतं बंदिशी, तराणे…. मग शिक्षिकेची नोकरी करतांना मुलींचं यश, ते आलेले नंबर, त्या घोषणा…… हे सगळं आठवणीत आहे कारण सारं मन लावून, जीव ओतून केलंय. आज हे फोटो, सर्टिफिकेट्स पुन्हा ४० /५० वर्ष मागे नेतात ते त्या जिव्हाळ्यामुळे…

तेच स्वैपाकात.. प्रेमानं, मायेनं खाऊ घालण्याच्या भावनेत आहे. मग ती लोखंडी, पितळी, जाडजूड स्टीलची जुनी भांडी पण मऊ स्पर्श देतात. केवढी सेवा दिली त्यांनी…. ती टाकायची, नाकारायची कशी? ते कागद, पत्रं फोटो, ती पत्र, सर्टीफिकेट्स, भांडी, कपडे साऱ्यांनी तर सोहळा केला जगण्याचा…. पण मग मी मनाची समजूत घालते…. परत परत चाळण लावते…. मोजकं ठेवते…. काही दूर सारते… डोळे भरून पाहून घेते. तासाभरात आवरुया असं ठरवते सकाळी आणि दिवस कलायला येतो तरी मी त्याच पसाऱ्यात असते. पत्रं, भांडी, फोटो, पावत्या, पुस्तकं, कपडे सगळं सगळ्यांकडे आहेच…. एक गोड पसारा आयुष्यभर मांडलेला…

… सगळ्यांचं असंच होतं असेल का?आवरायला काढलं खरं…

पण किती प्रसंग, विषय, घटना, आनंद, दु:ख, यश अपयश… कुठेकुठे मन हिंडून येतं… हिंडवून आणतं….

पण भावनिक मनाला प्रॅक्टिकल मन समजावतं…. आवरायला लावतं सामान आणि भावना !!! तरी भावनिक मन चोरून याच्या नकळत काही पिशवीत भरतंच…………… आवरण्यातली ही गुंतवणूक !!

© डॉ.माधुरी जोशी

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ सरणावर टाकलेलं चारित्र्य…. श्री मयुरेश उमाकांत डंके ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनावणे ☆

श्री मेघ:श्याम सोनावणे

? मनमंजुषेतून ?

☆  सरणावर टाकलेलं चारित्र्य… श्री मयुरेश उमाकांत डंके ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनावणे ☆

सोमवार संध्याकाळची वेळ होती. पुण्यात पाऊस अगदी व्यवस्थित प्रामाणिकपणे त्याचं कर्तव्य बजावत होता. एक पालक भेटायला येणार होते, पण अजून पोचले नव्हते. मी टेबलाशी बसून स्व. डॉ. स्नेहलता देशमुख यांचं “अरे संस्कार संस्कार” वाचत होतो. तितक्यात माझी पत्नी आतून बाहेर आली आणि काहीही न बोलता तिनं तिच्या स्मार्टफोन वर एक व्हिडिओ मला दाखवला. तरुणांनी खांद्यावर उचलून घेतलेला एक तरुण. मिशा नाहीत अन् दाढी राखलेला. गळ्यात बांगलादेश चा राष्ट्रध्वज आणि दोन्हीं हातात स्त्रीची अंतर्वस्त्रे एखाद्या विजयी वीरासारखी तो नाचवत होता.. ! 

तो व्हिडिओ मेंदूऐवजी आधी मनातच घुसला. काही क्षण तर आपण नेमकं काय पाहतो आहोत, हे समजून घेण्यातच गेले. तो व्हिडिओ मी आठ दहा वेळा वारंवार पाहत राहिलो. जल्लोष करणाऱ्या त्या तरुणाच्या चेहऱ्यावरचे भाव वाचण्याचा प्रयत्न करत राहिलो.

साधारण पंचविशीचा किंवा त्याहूनही लहान वयाचा तो तरुण असेल. ७६ वर्षं वयाच्या आपल्या देशाच्या महिला पंतप्रधानांच्या घरी घुसतो, घरात नासधूस करतो, महिला पंतप्रधानांच्या कपड्यांचं कपाट उचकतो आणि त्यातून त्यांची अंतर्वस्त्रं काढून घेऊन ती अत्यंत उन्मादानं कॅमेऱ्यासमोर नाचवतो.. ! तो व्हिडिओ पाहताना एका बाजूला लाज वाटत होती, दुःख होत होतं अन् दुसऱ्या बाजूला विलक्षण संताप होत होता.

त्याच लिंकवर आणखी फोटो दिसायला लागले. काही तरुण अत्यंत आनंदानं पंतप्रधानांच्या साड्या गुंडाळून फिरत होते, त्यांचें ब्लाऊजेस दाखवत होते.. ! विशेष म्हणजे, यात बांगलादेशी तरुणीदेखील सहभागी होत्या आणि स्वतः स्त्री असूनही त्यांना ह्या कृत्याची किंचितही लाज वाटली नाही आणि त्यात काही गैर आहे असंही वाटलं नाही.. !

बांगलादेशातली राजकीय धुमश्चक्री मीही इंटरनेटवरुन पाहत होतो, माहिती घेत होतो. भारत-बांगलादेशचं निर्यात धोरण आता धोक्याच्या वळणावर आहे, हे सरळ सरळ दिसत होतं. बांगलादेशातली उद्योगव्यवस्था आणि साहजिकच अर्थव्यवस्था या दोन्हींचा बोजवारा उडाला तर येत्या काळात दयनीय अवस्था निर्माण होणार आणि बांगलादेशातले अल्पसंख्य नागरिक त्यांचं चंबूगबाळं उचलून, बायका-पोरं काखोटीला मारुन जगभर निर्वासित म्हणून फिरणार, हे सगळं कळत होतं. बांगलादेशातले एक कोटी हिंदू रहिवासी नागरिक आता काय करतील, हा प्रश्न गेल्या काही दिवसांत हजारदा मनात येऊन गेला असेल.. ! 

पण हे फोटो पाहिले, व्हिडिओ पाहिले आणि जाणवलं की, या अल्पसंख्य हिंदूंमधल्या स्त्रिया अन् मुलींचं काय होईल ? “जीव वाचवायचा असेल तर शीलाला तिलांजली द्या” असा प्रकार सुरु झाला तर मुळीच आश्चर्य वाटणार नाही, अशी सामाजिक परिस्थिती तिथं नग्नसत्य बनून उभी आहे.. ! सच्चिदानंद शेवडे गुरुजींचं “रक्तलांच्छन” हे पुस्तक तरुणांनी तर वाचावंच, पण त्याहीपेक्षा पालकांनीच वाचणं अधिक गरजेचं झालं आहे.

राजकीय आंदोलनाला एखाद्याची चिथावणी असू शकते, पाठिंबा असू शकतो, कट-कारस्थानं असू शकतात, हे सगळं मान्य. देशाच्या प्रधानमंत्र्यांच्या निवासस्थानी जाणं आणि तिथं धुडगूस घालणं, फर्निचर पळवून नेणं हे खरोखर चुकीचं असलं तरीही त्या वागण्याला अख्ख्या जगात “जनक्षोभ” असं गोड नाव दिलेलं असल्यामुळे त्यातला सामाजिक गुन्हा आता जवळपास नामशेष झाला आहे.

पण देशातल्या तरुणांनी आंदोलन किंवा जनक्षोभाच्या नावाखाली महिला पंतप्रधानांच्या अंतर्वस्त्रांची माध्यमांसमोर जाहीर बीभत्स विटंबना करणं, हे आता काहीतरी भलतंच सांगू पाहतंय.. ! ह्या तरुणांच्या आयांना, बहिणींना, आत्यांना, मावश्यांना, माम्यांना हे फोटो बघून काय वाटलं असेल हो ? धर्म कुठलाही असो, पण स्त्री चारित्र्याची अशा पद्धतीनं जाहीर वासलात लावणं, हे आधुनिक जगाच्या कुठल्या जीवनशैलीत बसणारं आहे ? 

आपल्या देशात हे घडलं असतं आणि अशा तरुणांवर गुन्हा दाखल झाला असता तर काय झालं असतं ? सगळ्यात पहिलं म्हणजे, घटना घडल्यानंतर चार पाच दिवसांनी माध्यमांनी या तरुणांना नराधम वगैरे म्हटलं असतं, दिवसरात्र महाचर्चांची गुऱ्हाळं चालवली गेली असती, शे दोनशे सामाजिक विचारवंत, कलावंत, लेखक, साहित्यिक यांनी सह्यांची मोहीम केली असती आणि आठ दहा नामांकित वकिलांची फौज उभी केली असती. दुसरी एखादी याहून सनसनाटी घटना घडेपर्यंत मीडियाचा तोफखाना सुरु राहिला असता. पंधरा दिवसांनी समाजच हा विषय विसरुन गेला असता. आजवर हे असंच घडत आलेलं आहे. पण आता जनक्षोभाचा नवा पैलू अवतार घेतो आहे.. ! राजकीय किंवा सामाजिक विरोधातून सुरु झालेलं वैमनस्य आता नैतिकतेला अन् महिलांच्या चारित्र्यालासुध्दा पायदळी तुडवत सुटलं आहे.

“पद्धतशीर विसंवेदन” नावाचं एक मानसशास्त्रीय तंत्र आहे. माणसांना भावनिकदृष्ट्या बोथट किंवा संवेदनाशून्य कसं केलं जातं, याचं हे एक प्रमुख तंत्र आहे. ते वैयक्तिक आयुष्यापासून ते समाज, देश, राष्ट्र अशा सगळ्या पातळ्यांवर उपयोगात आणलं जातं. समाजात सर्वदूर सगळीकडे अनैतिक घटनांचा असा महापूर आणायचा की, लोकांच्या त्याविषयीच्या भावना, संवेदना तेच तेच पाहून, ऐकून, वाचून पार बोथट होत जातात. “आता नैतिकता आणि चारित्र्यापेक्षा आमची भावना महत्त्वाची” याच मार्गावर चालण्याचा पायंडा पाडला गेला तर आश्चर्य वाटायला नको.

महाराष्ट्रात तर याची सुरुवात केव्हाच झाली आहे आणि महाराष्ट्रातल्या जनतेनं ते आनंदानं स्वीकारलं आहे. मराठी “कॉमेडी शो” ने या प्रकरणाचा शुभारंभ केव्हांच केला आहे. विनोदाच्या नावाखाली पुरुषांनी स्त्री भूमिका करणे हा तर उघड स्वैराचार चालला होता. “ह्याला विनोद म्हणा” असा आग्रह जर शरद तळवलकर, राजा परांजपे, राजा गोसावी, अशा लोकांच्यासमोर धरला असता तर ही माणसं झीट येऊनच पडली असती. समीर चौगुले नामक माणूस विनोद निर्मितीच्या नावाखाली काय काय आचरट चाळे करतो, हे इथे नव्यानं सांगायला नको. पुरुष कर्मचाऱ्याने ऑफिसात परकर परिधान करून जाणे, स्त्री ला जाहीर मुलाखतीत “पावसाळ्यात चड्डी कशी वाळवता” असा प्रश्न विचारणे, असले अनंत आंबट चाळे या माणसाने विनोद या नावाखाली महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचवले आहेत. त्याची साथ द्यायला बाकीचे तथाकथित कलावंत आहेतच. विनोदाच्या नावाखाली गौरव मोरे “थंडीत तुझी कोळंबी होते” असं म्हणतो, मराठी माणसांना तो विनोद वाटतो. वनिता खरात आणि समीर चौगुले विनोदाच्या नावाखाली एकमेकांना छातीवर धडकतात, त्याचा प्राजक्ता माळी आणि प्रसाद ओक वन्स मोअर देतात, मराठी माणसांना तो विनोद वाटतो. एका स्टॅण्डअप कॉमेडी शो मध्ये अंकिता वालावलकर ” रात्रीच्या वेळी सुनसान रस्त्यावर बॉयफ्रेंड अचानक कार थांबवून रस्त्यात उतरला आणि मूत्र विसर्जन करु लागला. “मी प्रकाशात पाहिलं तेव्हा कळलं की केवळ ह्याचा मेंदूच छोटा नाहीय” असं म्हणते, मराठी माणसांना तो विनोद वाटतो… !

आता ‘विनोद असेच असतात’ असा मराठी माणसांचा ठाम समज झाला असेल तर ते स्वाभाविकच आहे. कारण, विनोदाच्या नावाखाली वारंवार त्याचाच मारा करण्यात येतो आहे. समाजमन उथळ आणि आंबट होण्यात या असल्या प्रकरणांचा खारीचा नाही तर सिंहाचा वाटा आहे, हे आपणच लक्षात घेण्याची गरज आहे.

एकही स्त्रीवादी साहित्यिक, कलावंत, सामाजिक कार्यकर्ता, विचारवंत या प्रकरणाचा निषेधही करत नाही आणि तक्रारही करत नाही, हे तर त्याहून जास्त धक्कादायक आहे. मग आपण नेमकी कोणती संस्कृती जन्माला घालतो आहोत, ह्याचा विचार कुणी करायचा? 

“सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जे करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे, अधिष्ठान पाहिजे” असे समर्थांनी म्हटलेलं आहे. ते आपण नेमक्या कोणत्या बासनात गुंडाळून ठेवलेलं आहे? आणि कशासाठी? 

आज बांगलादेशातल्या तरुण आंदोलकांनी चारित्र्याच्या बाबतीत जी नीच पातळी गाठली आहे, तिचं लोण जगभर पसरणार नाही, ह्याची कुणाला खात्री आहे? राजकीय मतभेद, वैचारिक मतभेद अगदी अवश्य असू शकतात, पण ते महिलांच्या चारित्र्याची विटंबना करण्यापर्यंत यावेत, हा अध्याय गंभीर आहे. केतकी चितळे ला महाराष्ट्रात ज्या भाषेत ट्रोल केलं गेेलं आहे, त्यात हे नैतिकतेचं पारडं पार गंजून खलास होण्याच्या मार्गावर असल्याचं दिसलेलं आहे.

समाजातल्या तरुण वर्गाचा राजकीय स्वार्थासाठी उपयोग करून घेण्याचा घाणेरडा डाव महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यातही गेल्या पंचवीस वर्षांपासून सुरु आहे. त्या धगीचे चटके बसत असतानाच हे सांस्कृतिक प्रदूषणाचं वारं आणखी भर घालत सुटलं आहे, हे काळजीचंच लक्षण आहे.

कुटुंबांचा आपल्या घरातल्या तरुणांवर असलेला प्रभाव नष्ट होत चालला आहे का, असा शोध घ्यायला भरपूर वाव आहे. आपली मुलं मोठी झाली, वयात आली, त्यांना आपण स्वातंत्र्य दिलं, हे सगळं खरं. पण त्यांच्या वैचारिक संतुलनाचं काय, असा प्रश्न आता पालकांना स्पष्टपणे विचारण्याची वेळ आली आहे. आपली मुलं कुठं जातात, काय करतात, कुणासोबत फिरतात, कुणाच्या सहवासात असतात, त्यांची सामाजिक प्रतिमा कशी आहे, या सगळ्यांची जबाबदारी नेमकी कुणाची आहे ? आपली मुलं स्मार्टफोनचा, इंटरनेटचा नेमका कशासाठी उपयोग करतात, हे पालकांना माहित असायला नको का ? आता या प्रश्नांची उत्तरं समाजानं सगळ्या पालकवर्गाला विचारायला हवीत. तरुणांच्या स्वातंत्र्याला, अभिव्यक्तिला, ऊर्जेला नैतिकतेची, विवेकाची आणि तारतम्याची भक्कम चौकट असणं ही केवळ आपलीच नव्हे तर संपूर्ण जगाची गरज आहे. कुटुंबव्यवस्थेनं तरुण वर्गाला स्वैराचारापासून थांबवलं नाही तर, आज बांगलादेशातले फोटो दिसतायत, उद्या आपलीही मुलं त्याच गोष्टी करताना दिसली तर, त्या पापाला कुठल्याच प्रायश्चित्ताचा काहीही उपयोग नसेल…! 

आपल्या भावना योग्य प्रकारे आणि सामाजिक- सांस्कृतिक- नैतिक चौकटीत राहूनच व्यक्त करणं, भावनांवर योग्य पद्धतीनं नियंत्रण मिळवणं आणि स्वतःला इतरांच्या स्वार्थाचा बळी होऊ न देणं ही कौशल्यं केवळ भारतातल्याच नव्हे तर जगभरातल्या तरुण पिढीला अवगत असणं अत्यंत आवश्यक आहे. नाही तर या सगळ्याचे फार भीषण परिणाम सगळ्यांना भोगावे लागण्याचा दिवस आता फार काही दूर असेल असं वाटत नाही.. !

लेखक :  श्री मयुरेश उमाकांत डंके

मानस तज्ज्ञ, संचालक – प्रमुख, आस्था काऊन्सेलिंग सेंटर, पुणे. मो 8905199711

प्रस्तुती : श्री मेघ:श्याम सोनावणे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print